डॉक्टर भिडे

आपल्या आयुष्यात, विविध वळणावर भेटणाऱ्या अनेक व्यक्तींचा आपण कधीतरी एकांतात विचार करतो काय? क्वचितच काही माणसं असतात, कडक कणखर स्वभावाची, आपल्याच नियमांनी स्वतःचे आयुष्य साचेबंद करणारी; पण आतून एकदम शहाळ्या सारखी गोड वाटतात. दोन शब्द आपुलकीने तर दोन शब्द रागाने ही बोलतात, पण जे बोलतात ते आपल्या चांगल्यासाठी असतं, आणि आपलं भलं व्हावं हाच त्यांचाही हेतु असतो. अशी माणसे खूप कमी असतात आणि ती आपल्या आयुष्यात येणे हा मोठा दैवयोग असतो.

     आमच्या भिडे साहेबांच्या नावाची आद्याक्षरं  होती डी. आर. DR. (दत्तात्रेय रामचंद्र भिडे -DR Bhide) त्यामुळे आमच्या HPCL कंपनीमधील त्यांचे मित्र व सहकारी त्यांना (Dr.) डॉक्टर भिडे असेच गमतीने म्हणत असत. मात्र या संबोधनाला तसा अर्थ ही, होता. कारण भिडे साहेबांचे आपल्या  कामाबद्दल सखोल ज्ञान छान आणि अनुभव , एखाद्या डॉक्टरेट मिळवलेल्या अधिकाऱ्या पेक्षा जास्त होते.

      माझा आणि भिडे साहेबांचा प्रथम परिचय आमच्या कंपनीतील, कामाच्या निमित्ताने साधारणपणे 1973 – 74 यासाठी आला. त्यावेळी मी कंपनीच्या संशोधन खात्यामध्ये म्हणजेच आर एन डी मध्ये काम करीत होतो .भिडे साहेब तांत्रिक सेवा म्हणजे टेक्निकल सर्विसेस या विभागात प्रमुख म्हणून काम करत होते. तसे ते माझ्यापेक्षा    हुद्याने कंपनीमध्ये वरिष्ठ होते मात्र माझे प्रत्यक्ष वरिष्ठ नसल्याने आमचे संबंध कामापुरती येत आणि मी त्यांना माझ्या प्रत्यक्ष वरिष्ठ पेक्षा जास्त मान देत असे.  आमच्या कोणत्याही कस्टमरला भारतात कोठेही काही गुणवत्‍ता विषयक प्रश्न निर्माण झाल्यास प्रत्यक्ष त्या कारखान्यात जाऊन तो प्रश्न सोडविणे हे त्यांच्या खात्याचे काम होते तर अशा कामात काही गुणवत्ता विषयक म्हणजे क्वालिटी कंट्रोल संबंधित किंवा फॉर्मुलेशन संबंधित प्रश्न आहेत काय, यासाठी माझी मदत त्यांना लागत असे.कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास मी व त्यांच्या खात्यातील दुसरा एक ऑफिसर असे आम्ही दोघे मिळून तेथे जात असू व त्या प्रश्नांची उकल करून आमच्या ग्राहकांचे समाधान झाल्यावर परत येत असू, मात्र यावेळी आमच्या कस्टमर कडून, त्यांचे समाधान झाल्याचे पत्र आम्हाला घेऊन यावे लागे व ते पत्र मुंबई ऑफिसात, भिडे साहेबांना आम्ही दाखवित असू. अशा रीतीने भारतभर भ्रमंती करून मी त्यांना अनेक गुणवत्‍ता विषयक व फॉर्मुलेशन संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी मदत करीत असे व त्यांची शाबासकी मला मिळत असे. ही खरे तर आमच्या कामाशी संबंधित बाब होती त्यात वैयक्तिक संबंध निर्माण होण्याचे काही कारण नव्हते.

       पण का कोणास ठाऊक ,भिडे साहेबांना माझ्याविषयी एक वेगळे ममत्व,जिव्हाळा   वाटू लागला,व माझ्या काही वैयक्तिक प्रश्नाबाबत जेथे,माझ्या वरिष्ठांकडून माझ्यावर अन्याय होतो आहे, अशी त्यांची खात्री पटली,तेथे माझ्या वरिष्ठांना त्यांनी रोखठोक शब्दात समज दिली. तसे भिडे साहेब स्वभावाने स्पष्टवक्ते असल्यामुळे आमच्या कंपनीत त्यांच्या हाताखालील मंडळी तसेच वरिष्ठ मंडळी सुद्धा त्यांना वचकून असत. त्यामुळे माझ्या वतीने त्यांनी केलेली कैफियत माझ्या वरिष्ठांनी अनेकदा,योग्यरीतीने घेतली व माझ्या सुरुवातीच्या सेवा कालखंडात मला त्याची खूपच मदत झाली, आजही, तुमचे कोणी गॉडफादर असल्याशिवाय अशा मोठ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला न्याय मिळत नाही.  भिडे साहेबांची आज मुद्दाम आठवण येते ती याचमुळे आणि म्हणून त्यांच्या विषयी दोन शब्द आत्मीयतेने  लिहायची  मला उर्मी होत  आहे.

        1971-74 सालचा काल ,ज्यावेळी ESSO सारखी बलाढ्य जागतिक कंपनी सुद्धा, फक्त ठराविक हुद्याच्या मॅनेजर्सना, कंपनीच्या कामासाठी,  विमानाने पाठवीत असे. मी एक ऑफिसर होतो व माझ्या हुद्याप्रमाणे मला आगगाडीच्या पहिल्या वर्गाचे प्रवास करणे प्राप्त होते. मात्र भिडे साहेबांच्या शिफारशीमुळे मला विमान प्रवासाचा योग आला. हा माझ्या आयुष्यातला पहिला हवाई प्रवास म्हणून त्याचे खुप अप्रुप. त्यावेळी “फाॅक्कर फ्रेंडशिप “ही लहान आकाराची, सुमारे वीस पंचवीस माणसे वाहून नेणारी विमाने प्रवासासाठी होती व खूप कमी  प्रवासी विमानाने प्रवास करीत असत .आम्हाला मुंबई भोपाळ असा प्रवास करावयाचा होता व व त्यासाठी  साहेबांनी मला बरोबर घेतले होते. .गंमत म्हणजे प्रवाशांची गर्दी विशेष नसल्याने ,त्या दिवशी, आमच्या शेजारील एक जागा रिकामी होती व चहापान देऊन झाल्यानंतर हवाई सुंदरी आमच्या शेजारील सीट वर बसून, तिने आमची जुजबी चौकशी केली  आणि काही खायला हवे आहे का वगैरे विचारपूस केलेली अजून आठवते,हा प्रसंग विशेष लक्षात राहिला कारण त्यानंतर केलेल्या अनेक विमानप्रवासात असा योग कधी आला नाही व आता तर तो कधीच येणे शक्य नाही कारण विमान प्रवासाची झालेली गर्दी व एकंदरीतच दुरावस्था.

      भोपाळ विमानतळावर आम्हाला पिकअप करण्यासाठी तेथील  ESSO कंपनीचे एक ऑफिसर आले होते व त्यांनी ,साहेबांसाठी आलिशान हॉटेल व माझ्यासाठी एक मध्यम दर्जाची लाॅज, आमच्या दोघांच्या हुद्या प्रमाणे, बुक केले होते मात्र भिडे

 साहेबांनी ही व्यवस्था तात्काळ रद्द ठरवली व व त्यांच्या अधिकारात, मलाही त्यांच्या अलिशान खोलीमध्ये प्रवेश देऊन, तीन दिवस आम्ही दोघे, त्यांच्या सहवासात ,पंच तारांकित व्यवस्था भोगली.  साहेबांची, या दिवसात खूप जवळून ओळख झाली आणि आणि त्यांच्या सवयी आवडीनिवडी पाहता आल्या. अशा कामावर,बाहेरगावी असताना थोडे मद्यपान करण्याची सवय त्या वेळेच्या बहुतेक वरिष्ठांना होती त्याप्रमाणे भिडे साहेब देखील आपली संध्याकाळ थोडी  रंगतदार करून गप्पाटप्पात वेळ  घालवीत असत.  गंमत म्हणजे संध्याकाळी मद्यपानाची आचमने करणारा हा भटजी, सकाळी आपल्या जानव्या वर हात ठेवून, उपनिषदांतील स्तोत्रे गुणगुणत असे .मला त्याची मोठ्ठी  गंमत वाटत असे.  आम्ही त्यावेळेस भारतीय मानक संस्था म्हणजे इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन यांनी आयोजित केलेल्या एका परिसंवादासाठी भोपाळला आलो होतो. यावेळी एक दुसरी ही मोठी गंमत झाली .त्यावेळेचे पेट्रोलियममंत्री श्री बीपी सेठी, मुख्य पाहुणे म्हणून  आले होते. पावसाचे दिवस होते सोसाट्याचा वारा सुटला होता मंडप छान सजवला होता व भारतातून अनेक Deligates, या विशेष सभेसाठी आले होते थोड्याच वेळात पाऊसही सुरू झाला वादळी वारे वाहू लागले आणि दुर्दैवाने आम्ही बसलेला मंडप आधार देणार् या खांबा सहित हलू लागला, एकाएकी कोसळला.  वरचे छत आमच्या अंगावर पडले,  एकच धावपळ सुरू झाली आणि आपला जीव   वाचवण्यासाठी,प्रत्येक जण, ओल्या आणि जड अशा कापडा खालून बाहेर पडण्याची धडपड करू  लागला .मोठे केविलवाणे दृश्य होते. मंत्री महोदय तर कधीच आपल्या गाडीत जाऊन बसले,निघूनही गेले.  सबंध सभेचा फज्जा उडाला. आम्ही सुदैवाने मंडपाच्या कडेशी बसलेले असल्याने लवकरच सुखरूप बाहेर पडू शकलो व तसेच भिजलेल्या अवस्थेत आमच्या हॉटेलवर आलो .संध्याकाळी नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसलेलो असताना हसून सगळ्यांचीच करमणूक झाली व पुढे मुंबईत गेल्यावर देखील, या प्रसंगाची बातमी पेपरात आल्याने आमच्या अनेक मित्रांनी आम्हाला त्यावरून चिडविले. 

         त्या तीन दिवसाच्या कालखंडामध्ये आम्ही एक दिवस कॉन्फरन्सला दांडी मारली आणि आणि तेथे आलेल्या काही मित्रांबरोबर, एक स्पेशल कार करून खजुराहोची सफर करायचे ठरवले .हा देखील माझ्या साठी एक अनोखा अनुभव होता.   खजुराहो हे स्थान  पुरातन, शिल्प मंदीरासाठी प्रसिद्ध आहे,तेथील खंदेरीया मंदिर तर जगप्रसिद्ध. भोपाळ पासून सुमारे सात आठ तासाच्या कारच्या प्रवासासाठी लागणार होते. मात्र भोपाळ सोडल्यानंतर बराच मोठा  रस्ता हा जंगलातून जाणार होता आणि दुर्दैवाने आम्हाला थोडासा उशीर झाला होता. रात्री आठ साडेआठ वाजता आमची गाडी जंगलातुन जाऊ लागली त्यावेळी काही लोकांनी आम्हाला सुचना केली की या रस्त्याने तुम्ही आता रात्री जाऊ नका कारण हा भाग अति धोकादायक आहे. त्यावेळी या भागात,ज्याला भिंड -मोरेना प्रदेश म्हणतात,  त्यावेळी,तेथील, डाकू लोकांचे  थैमान चालू होते. त्यामुळे रात्री येथून जाणे धोकादायक होते.  आम्ही छत्तरपूर नावाच्या एका लहान गावात,  एका साधारण  हॉटेलमध्ये मुक्काम केला.मिळेल ते खाऊन ,थकलो होतो त्यामुळे झोपून गेलो. रात्री काही झालं कुणालाच काही  कळलं नाही.सकाळी आम्ही चहा पिण्यासाठी म्हणून बाहेर पडलो कारण हॉटेलमध्ये चहा मिळत नव्हता .एका टपरीवर, गेलो तर तिथे पोलिसांची गस्त आणि काही लोकांची चालू असलेली कुजबूज ऐकली.  काल रात्री या भागात पोलिसांनी गोळीबार केला होता आणि आमच्या हाॅटैल ची    झडती  देखील घेतली गेली होती.  कारण,त्यावेळचा कुप्रसिद्ध डाकू मानसिंग,त्या हॉटेलमध्ये साथीदारांच्या बरोबर लपलेला  आहे,अशी बातमी पोलिसांना मिळाली होती. आम्हालाही प्रसंगाचे गांभीर्य कळले व परमेश्वराचे आभार मानून आम्ही सर्वांनी लवकरात लवकर हॉटेल सोडून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.खुप खतरनाक प्रसंगातून आम्ही निभावलो होतो. दिवसभर खजुराहोची ती अप्रतिम लेणी,मैथून शिल्पे  पाहिली, मंदिरे पाहिली आणि आणि  खूप समाधान वाटले तसेच,वाईट ही वाटले, कारण अनेक अप्रतिम शिल्पे कालौघात नष्ट झाली आहेत.   पहील्यांदाच हा, सुंदर मंदिर समुह  आयुष्यात पाहायला मिळाला व तो आनंद काही वेगळाच होता त्यानंतर खजुराहो ला जाण्याचा योग पुन्हा आला नाही परतीचा प्रवास अर्थातच आम्ही लवकर सुरू केला जेणेकरून त्या बिकट वाटेतून रात्री जाता येऊ नये,ही काळजी होती.भिडे साहेबांमुळे सर्व  कार्यक्रम रंगतदार झाला.

Mr Bhide,giving standing speech at farewell to Mr Nagwekar,..sitting from left,Mr Dhir GM,Mr.Sitlani.V,P,Mr Nagwekar,Mr Lotlikar…..1982

     भिडे साहेबांनी  त्यानंतर ,माझ्या वरील एका मोठ्या अन्यायाचे निराकरण करण्यासाठी मला मदत केली, तो किस्सा ही सांगण्याची गरज आहे..  मी संशोधन  विभागात काम करत होतो,  माझे सगळे प्रोजेक्ट मी वेळेत संपवत होतो आणि आणि कुठल्याही प्रकारचा कामचुकारपणा नसताना माझ्या वरिष्ठांनी माझे प्रमोशन म्हणजे बढती थांबवून ठेवली.त्याकाळी शिवसेनेचा उगम झाला होता आणि शिवसेनेच्या  दबदब्यांमुळे, आणि मी थोडासा स्पष्टवक्ता असल्यामुळे ही,वरीष्ठ मंडळी मला शिवसैनिक समजून ,माझ्याविषयी काहीतरी कागाळ्या त्यांच्या वरिष्ठांना सांगत असत. वास्तविक तसा काहीच प्रकार नव्हता परंतु हे दाक्षिणात्य साहेब त्यांचे काही बाहेरील उद्योग कंपनीत करून घेत आणि त्या बाबतीत मी त्यांना सहकार करीत नसे, ही गोष्ट त्यांना खटकत होती. दुर्दैवाने या माझ्या साहेबांचे वरिष्ठ देखील दाक्षिणात्य होते आणि त्यामुळे हे सर्व प्रकरण मला हाताळणे जड जात होते. विनाकारण मला त्रास दिला जात होता व बढती लांबणीवर पडत होती.  भिडे साहेबांना या गोष्टीची कल्पना आली व त्यांनी त्वरित माझ्या वरिष्ठांना याबाबतीत थोडे सुनावले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.  साहेब त्यांच्याही वरिष्ठाकडे म्हणजे आमच्या डिपारमेंट हेड कडे,याबाबतीत बोलणी करण्यासाठी गेले. हे खरे म्हणजे अप्रूप होते कारण त्यांचा स्वतःचा त्यात कोणताच संबंध नसताना व माझ्या खात्याशी ते संबंधित नसताना त्यांनी एवढी मोठी जबाबदारी घेतली व आमच्या ऑपरेशन्स हेड या या वरिष्ठ साहेबांना या सर्व प्रकरणाची कल्पना दिली. दुर्दैवाने हे साहेब देखील दाक्षिणात्य होते. त्याकाळी थोडीच मराठी मंडळी या अमेरिकन कंपनीत उच्च पदावर होती.मात्र अशा बाबतीत त्यांना कधी काही सांगावयाची सोय नव्हती. भिडे साहेबांची ही शिष्टाई देखील असफल झाली व शेवटी एका  शिवसैनिकाला  भेटूनच मी या अन्यायाचे परिमार्जन केले. तरुण वय होते ,अंगात रग होती व कोणताही अन्याय सहन करावयाच्या नाही या आप्पांच्या शिकवणीला अनुसरून मी देखिल त्यावेळी खूप मोठा धोका पत्करला होता. त्यात प्रमोशनचा काय पण माझी नोकरीसुद्धा जावयाचा धोका होता पण सुदैवाने मला न्याय मिळाला.ती हकीकत वेगळी आहे मोठी, आहे नंतर कधीतरी सांगेन. मात्र  साहेबांनी एवढा धोका व जोखीम स्वतः पत्करून काहीही ही स्वतःचा लाभ नसताना, ही गोष्ट त्यावेळी,केवळ माझ्यावरील प्रेमाखातर  केली हे माझ्यासाठी खूप खूप मोठे होते व व त्यासाठी त्यांचा मी सदैव उपकृत राहिलो व हे ऋण आजतागायत  मानत राहिलो.

     आमचे दुसरे एक साहेब त्यांचे नाव, राम काळे तेदेखील भिडे यांच्या बरोबर काम करीत होते. मात्र  ते आमच्या दिल्ली ऑफिसमध्ये असत.  दोघेही हि खूप जानी दोस्त होते.कारण या कंपनीमध्ये येण्याआधी, काळे व भिडे यांनी बगदाद मध्ये, इराक ऑइल रिफायनरी मध्ये एकत्र काम केले होते व तेथून युरोपमधील काही कंपन्यांशी त्यांचा संबंध आल्यामुळे भारताबाहेरील तेल कंपन्यांच्या कामाचा अनुभव त्यांना होता .आणि म्हणूनच या त्यावेळच्या जागतिक क्रमवारीत पहिला नंबर असलेल्या कंपनीने या दोघांना, त्यांचे शिक्षण थोडे कमी होते तरीदेखील, मोठ्या हुद्द्यावर नेमले होते. काळेसाहेब, भिडे यांना “भिडा “या नावाने हाक मारीत. कारण भिडेंच्या नेहमीच्या हमरीतुमरीवर येण्याच्या स्वभावाने व व त्यांच्या ईतरांशी होणाऱ्या वादविवाद यामुळे,   “आता तुम्ही भांडणाला भिडा” अशा प्रकारच्या संशोधनाने,गंमत करीत,तो फक्त काळे साहेबांचा अधिकार होता.

    कालांतराने भिडे साहेब आमच्या एच पी सी कंपनी मधून सेवानिवृत्त झाले आणि मी देखील वरिष्ठ व्यवस्थापकाच्या पदावर ,म्हणजे सिनिअर मॅनेजर या पदावर त्यावेळी काम करत होतो. निवृत्तीनंतर त्यांनी कन्सल्टंट म्हणजे सल्लागार म्हणून काही कंपन्यांना सेवा दिली. त्या या वेळी परदेशी कंपन्यांचे राष्ट्रीय करण म्हणजे नॅशनलायजेशन झाल्यामुळे ,खूपच थोडे तज्ञ लोक या क्षेत्रामध्ये उपलब्ध होते आणि अनेक कंपन्या पेट्रोलियम वंगणांच्या क्षेत्रांमध्ये आल्या होत्या. मात्र भिडे साहेबांनी , कंपनी मालकांना, जेथे त्यांनी सल्लागार म्हणून काम केले, स्पष्ट सांगितले होते की जेथे Esso  अथवा एचपीसीएल या कंपन्यांच्या प्रॉडक्टच्या  विक्रीशी संबंध  असेल,  तेथे मी जाणार नाही कारण ते योग्य होणार नाही व माझ्या मूळच्या कंपनीशी  बेईमानी केल्यासारखे होईल.  त्यावेळी अनेक सेवानिवृत्त लोक सल्लागार म्हणून काम करत व आपल्या एचपीसीएल मधील ओळखीचा फायदा नवीन कंपन्यांना करून देत, जेणेकरून एचपीसीएल कंपनीचा माल विकणे बंद होई व नवीन कंपनीचा माल तेथे विकला जाई.

          या या त्यांच्या कामात त्यांनी माझ्या मदतीची याचना केली व मी देखील मोठ्या आनंदाने त्यांना जी काही मदत लागेल की मी तुम्हाला करीन असे आश्वासन दिले कारण या या मोठ्या उदार मनाच्या माणसाच्या उपकारांतून अंशतः तरी उतराई होण्याचे भाग्य मला त्यामुळे मिळाले. माझ्याकडून विशेषतः प्रॉडक्ट डेटा शीट,PDS.. म्हणजे एखाद्या प्रॉडक्टची संपूर्ण माहिती ,त्याचे गुणधर्म ,त्याचा वापर कसा करावा इत्यादी संबंधी संकलन  तयार करावे लागे,  तेथे मी त्यांना माझ्या अनुभवाचा फायदा देतं असे. वास्तविक यावेळी त्यांनी मला त्यांच्या घरी बोलाविले असते तरी मी तेथे गेलो असतो मात्र या गृहस्थांनी त्याबाबतीत मला आपल्या घरी न बनवता आमच्या पार्ल्याच्या घरी सवडीने सुट्टीच्या दिवशी येत माझ्याशी चर्चा करीत टिपणे काढीत आणि चहापानाचा आस्वाद घेऊन आपल्या घरी जात.यासाठी त्यांनी मला मोबदलाही देऊ केला कारण त्यांच्या निस्पृह स्वभावात कोणाची फुकट मदत घेणे बसत नव्हते. मी मात्र याबाबतीत त्यांना अत्यंत नम्रतेने नकार देऊन काही मोबदला घेतला नाही कारण ते मला योग्य वाटले नसते. मात्र त्यामुळे कधीकधी ते,मला एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये नेऊन संध्याकाळी जेवण देत असत,चर्चा करीत..काही वेळा आपल्या चेंबूरच्या निवासस्थानी  ही मला बोलवले. आपल्या कुटुंबाशी ओळख करून दिली व तिथेही आम्ही चहापानाचा वा जेवणाचा आस्वाद घेत असू. खूपच आनंदाचे ते क्षण असत व माझ्या कंपनीमधील पुढील वाटचालीची ही, आस्थेने चौकशी करीत.

      सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू राहण्यासाठी वर्षातून एक अर्ज भरून, त्यावर कंपनीच्या सध्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्याची सही घ्यावी लागते.भिडे साहेबांनी, ही सही माझ्या कार्यालयात म्हणजे हिंदुस्तान भवनमध्ये त्यावेळी स्वतः येऊन घेतली. वास्तविक तेथेही ही,त्यांनी मला, तो कागद पोस्टाने पाठवला असता किंवा कोणा माणसा मार्फत पाठवला असता ,वा मला,बोलावेल असतें  तरी ,चालण्यासारखे होते. मात्र नियमाप्रमाणे, सेवानिवृत्त अधिकाऱ्याने स्वतः हजर राहून ही सही समोरच्या अधिकाऱ्यासमोर करावी,असे होते व त्या नियमांचे तंतोतंत पालन भिडे साहेब करीत असत.वास्तविक शेवटी शेवटी त्यांना हे येणे कठीण जाऊ लागले कारण त्यांच्या मधुमेहाने उचल खाल्ली होती व खूप अशक्तपणा आला होता.सौ भिडे यांचे निधन थोडे अकाली झाले होते, त्यामुळेही ही त्यांना थोडेसे निराश वाटत असे. मुलींची लग्ने झाली होती व आयुष्याचा जोडीदारही लवकर निघून गेला होता. त्यामुळे भिडे साहेब खंगले होते.अशाही परिस्थितीत ते सही घेण्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये स्वतः येत .मला अजून आठवते त्यांनी माझ्याकडे येऊन घेतलेली शेवटची सही देखील स्वतः माझेसमोर हजर राहून घेतली होती. त्यावेळी हिंदुस्तान भवन मध्ये टॅक्सीने आले मला त्यांनी वरून खाली बोलावले व माझा हात धरून लिफ्टमधून माझ्या ऑफिसमध्ये येऊन सही घेऊन खूप  गप्पा केल्या. त्यांच्या एकंदरीत तब्येती वरून स्पष्ट दिसत होते की भिडे साहेब खूप थकले आहेत मात्र तरीदेखील त्यांची जिद्द व बाणेदारपणा जिवंत होता. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या दुःखद निधनाची वार्ता आम्हाला कळली चेंबूर मध्येच एका इस्पितळात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले होते. आम्ही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी  जाऊ शकलो नाही याचे शल्य आजही.  आहे मात्र त्यांच्या  आठवणी व मनाचा मोठेपणा अजून मनामध्ये कायमचा  कोरल  गेलेला आहे . आणि आयुष्यात ज्या माणसांनी काहीही ऋणानुबंध नसताना, जीवा भावाने सर्व काही केले,अशा व्यक्तींपैकी भिडे सर एक असल्याने, जेव्हा जेव्हा त्यांची आठवण येते मी त्यांच्या स्मृतीला विनम्रतेने नमन करतो.