माझा ७९ वा वाढदिवस, थोडे चिंतन!
आज माझा ७९ वा वाढदिवस आणि ८० व्या वर्षात पदार्पण! विचार करतो आहे …हेखरे आहे का?? मोठी गंमत वाटतेआहे.. बघता बघता आपण ऐंशीव्या वर्षात पदार्पण केले हे खरे वाटत नाही. लहानपणी आमच्या गावात, समाजात, माणूस साठ वर्षाचा झाला की डोकरा” (म्हातारा) म्हणून गणला जाई. त्याने कामातून, दैनंदिन व्यवहारातून निवृत्ती घ्यायची, आराम करायचा. समाजदेखील अशा डोक्याकडे एक भुईला भार व्यक्तिमत्व अशाच दृष्टीने पाही. मला त्या आठ, दहा वर्षाच्या वयात वाटे, आपण असे डोकरे होऊ का? बापरे अजून पन्नास वर्षाचा काळ आहे, कोणी सांगावे, इतक्या दीर्घ कालखंडात काय होईल? त्याकाळी आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहून बालमन साशंक होई. माझे कितीतरी बालमित्र, अगदी पहिली दुसरी यत्तेत हे जग सोडून गेले. गावातली तरणीताठी माणसेही पटकन कोणत्यातरी आजाराने, अथवा विषारी जनावराच्या दंशाने, आणि काही तर ‘बेपत्ता’ होऊन जीवनातून निघून जात होती.
सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि एकूण जीवनच अगदी रामभरोसे चालले होते. प्रत्येक संसारी,दंपतीला, पाच सहा तरी कमीत कमी मुले असत. माझ्या बालपणी मी बारा-तेरा मुले असलेले आईबाप पाहिले आहेत. अशा परिस्थितीत त्या मुलांचे संगोपन ,देखरेख ,शुश्रूषा कोण करणार? परमेश्वर त्यांचा वाली!!
त्यामुळेच आयुष्यात साठ वर्षाचा टप्पा गाठणारा म्हणजे खूपच मोठी मजल मारणारा… असे विचार त्यावेळी अजाण मनात येत. खूप मनावर घेण्याचे वय नव्हते .आज ते दिवस आठवले म्हणजे गंमत वाटते ती त्यामुळेच..आपण ऐंशीव्या वर्षात पदार्पण करीत आहोत खरे वाटत नाही नाही ते त्यामुळेच!!
आम्हा सर्व भावंडांचे परम भाग्य, आम्हाला आप्पांचे स्वरूपात एक आदर्श पिता मिळाला. “वामन देवजी राऊत”हे आमचे वडील म्हणून मार्गदर्शक नसते तर, आज आम्ही जे काही आहोत ते अजिबात नसतो, आणि काय असतो, याचीही कल्पना करवत नाही.एवढे सांगितले म्हणजे या एका माणसाचे आमच्या आयुष्यात काय स्थान होते, हे समजावे!!गरिबी होती, पण संस्कार होते, फाटके कपडे होते पण मनाची मिजास होती, खाण्याची चंगळ नव्हती पण पोटाला चिमटा कधीही बसला नाही. आमचे पर्यटन घोलवड स्टेशनच्या पलीकडे कधीच शाळेच्या दिवसात गेले नाही मात्र वाचनासाठी दिलेल्या पुस्तकरूपी खजिन्यातून आम्ही मनाने,जगाचे पर्यटन त्याच काळात केले होते. सर्व सुबत्तेची वानवा होती पण पाठीवर प्रेमाचा हात ,आणि परीक्षेत पहिला नंबर काढल्यावर मिळालेली लिमलेटची गोळी,सर्व कमतरतेला पुरून ऊरत ,प्रत्येक वेळी नव चैतन्याचा डोस देत असे. स्वतः एक आदर्श शिक्षक असल्याने, शिक्षणाचे जीवनातील महत्व त्यांना पुरेपुर माहीत होते. आपल्या मुलांनी,काहीही झाले तरी ,शिक्षण हे घेतलेच पाहिजे हे त्यांचे ब्रीद होते. त्यामुळे, “मुलांच्या शिक्षणासाठी मी कोणापुढेही हात पसरणार नाही. भीक मागेन, पण माझ्या मुलांना ,जेवढे शिक्षण घ्यावयाचे आहे,तेवढे देईन!!” हे त्यांचे लहानपणी ऐकलेले वाक्य मी तेव्हा तर नाहीच विसरलो, पण आज ही विसरणार नाही. त्या एका वाक्याने आयुष्यात मला संजीवनी दिली सातार्याच्या कॉलेजात हाताने दगड फोडताना, कृष्णा नदीवर, थंडीच्या दिवसात आंघोळ करताना, ही संजीवनी मला कामाला आली.
आज गत स्मृतींचे स्मरण करताना एक मोठे शल्य उरात आहे. म्हणजे आमची लाडकी की छोटी बहिण नीलम उर्फ ममा आम्हाला अकाली सोडून गेली. देहाने जरी आमच्यात नसली,तरी तिचे आशीर्वाद आम्हा सर्वांना सदोदित असतात ,याची प्रचीती अनेकदा आली आहे.
जीवनात,एक गोष्टीचा जबरदस्त प्रत्यय आला. असे म्हणतात ,”परमेश्वर जेव्हा काही वाटा तुमच्यासाठी बंद करतो, त्यावेळी नव्या संधीचे काही दरवाजे उघडे करतो!”.. विश्वास व श्रद्धा हवी.शाळेमध्ये भेटलेले चित्रे- भिसे गुरुजी,सातारच्या महाविद्यालयात उपकृत झालेले प्रिन्सिपल पी जी पाटील व प्राध्यापक एस ए पाटील.पुढे इस्माईल कॉलेजमध्ये विशेष सवलती देणारे प्राध्यापक वि मा दि पटवर्धन व प्रिन्सिपल डॉ. पोतदार…यु डी सि टी मध्ये,प्रवेश घेण्याआधीच मला बोलवून, मार्गदर्शन करणारे रजिस्ट्रार गुप्ते साहेब.त्यानंतर माझे डिपार्टमेंट हेड,पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी मार्गदर्शक डॉ. काणे, त्यांनी मला विशेष शिफारस करून, यूजीसी (University Grants Commisssion),च्या मासिक अडीचशे रुपये शिष्यवृत्ती ऐवजी सी एस आय आर ची(Council of Scientific n Industrial Reseach)मासिक चारशे रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून दिली व आप्पांचा आर्थिक भार खूप कमी केला.पहिल्या नोकरीसाठी, आचार्य भिसे गुरुजी यांच्या शिफारशी वरून मुलाखती शिवाय माझी निवड करणारे गोदरेज कंपनीचे मालक डॉ.बरजोरजी गोदरेज. पुढे ‘एस्सो'(ESSO),या त्यावेळेच्या जगातल्या एक नंबर च्या कंपनीत मला नोकरी मिळावी म्हणून मुलाखती नंतर दोन वर्षे थांबून, आठवणीने मला बोलवणारे डॉ. के व्ही विजय राघवन. या अत्यंत जोखमीच्या नोकरीतील पहिल्या वर्षात मला मदत करणारे श्री बोरकर साहेब, श्री लोटलीकर साहेब अशी किती नावे सांगावीत? आयुष्यात अगदी नेमक्या टप्प्यावर, जेव्हा “टू बी ऑर नॉट टू बी” अशी अवस्था होती तेव्हा या सर्वांनी मदतीचा हात दिला. ही माणसे ना माझ्या नात्याची ना गोत्याची ना ,त्याआधी ओळखीची .माणसाच्या रूपात आलेली ही परमेश्वराची स्वरूपे होती ,असे मी आजही मानतो, आणि त्यांच्या स्मृतीला नेहमीच मानवंदना देतो.
सेवानिवृत्ती झाली आणि सेवानिवृत्ती वेतन सुरू झाले. नोकरीतील शेवटची 13 वर्षे केवळ एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या लहरीखातर मला पदोन्नती शिवाय रहावे लागले. तो मोठा कठीण व मानहानीचा काळ माझ्यासाठी होता. त्यामुळे सेवानिवृत्ती वेतन कमी मिळाले. श्री के. किशन व श्री अरुण बालकृष्णन, यासारखी दिलदार माणसे माझ्या पाठीशी उभी राहिली. त्यांनी मला स्वतंत्र खात्याचा पद पदभार दिला व ‘आंतरराष्ट्रीय विक्री'(INTERNATIONAL MARKETING) अशा महत्त्वाच्या खात्याची स्वतंत्र जबाबदारी दिली. मी परदेशात फिरून, माझ्या कंपनीसाठी विक्रीचे नवेमार्ग शोधले व हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन या सरकारी कंपनी चा झेंडा प्रथमच देशा बाहेर फडकू लागला. आज तो अधिकच डौलाने फडकतो आहे.
सेवानिवृत्तीनंतर मला घरी बसून रहावयाचे नव्हते कारण मला स्वतःला ते आवडले नसते. अनेक मित्रांनी व कंपन्यांनी मला आपल्या ऑफर्स दिल्या होत्या. मात्र मला कोणत्याही प्रकारची बंधने व तेच तेच नेहमीचे काम, असे नको होते. सुदैवाने श्री राजेंद्र सहा या माझ्या मित्रांनीच त्यांच्या ‘आयपोल’ या कंपनीत मला सेवानिवृत्तीनंतर च्या दुसऱ्या महिन्यातच बोलाविले. मी तिथे कामाला लागलो तेव्हा कंपनीचा एकूण व्यवहार दोनशे कोटी रुपये होता. मी पंधरा वर्षानंतर कंपनी सोडली, तेव्हा तो जवळजवळ सातशेकोटी रुपये झाला .यावरून आम्ही केलेल्या कामाची व्याप्ती कळावी.अतिशय समाधानाने हे काम मी पंधरा वर्षे केले.पुढे श्री सहा यांनी काही कौटुंबिक कारणांमुळे ही सुंदर कंपनी GULF PETROLEUMS या दुसऱ्या कंपनीला विकली .येथेही मी दोन वर्षे काम केले. मात्र पूर्वीसारखी मजा न वाटल्याने ते काम मी सोडले.
त्यानंतरही गेल्यावर्षी करोनासाथ येईपर्यंत माझे काम चालू होते. हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन ने यांच्या सिल्वासा येथील कारखान्यासाठी काही महिने मला बोलाविले.काही नवीन यंत्रे आणली होती ती सुरू करावयाची होती. त्यांच्या माजगाव येथील कारखान्यात जेथे मी 18 वर्षे काम केले, तेथेही काही समस्या होत्या, त्या सोडवण्यासाठी सहा महिने काम केले.कलकत्ता, दिल्ली व बंगलोर येथील ही काही कंपन्यात त्याच वेळी मी काम करीत होतो. आता बाहेर जाणेच बंद झाल्यामुळे हीकामे बंद करून ,सध्या लेखनाचा आनंद घेतो आहे.
करोनाचे अनेक दुष्परिणाम जरूर आहेत.जगातल्या अनेकांनी त्याला दूषणे ने दिली आहेत. आणि का देऊ नयेत? ज्यांचे जिवलग ,आई बाबा, बहीण, भाऊ असे कोणीतरी जवळचे अगदी बघता बघता पटकन निघून गेले, त्यांची व्यथा तेच समजतील.
प्रत्येक संकटत एक संधीही दडलेली असते.काही मानवता हीन पशूंनी या संधीतून आपले उखळ पांढरे करून घेतले. तर काही महामानवांनी आपले स्वतःचे बलिदान देऊन,रुग्णांना मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले
निसर्गाने माणसाला दिलेली ही सणसणीत चपराक आहे. अंतिमत इशारा आहे.अजूनही माणसाने निसर्गाला ओरबाडण्याचे, कुरघोडी करण्याचे ,उद्योग सोडून दिले नाहीत तर, Writing On The Wall.. अगदी स्पष्ट आहे. जगाने हा निर्वाणीचा इशारा समजला असेल असे आपण मानू या. तसे असेल तर पुढील पिढ्यासाठी ही एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल.
आम्हा दोघांसाठी, घोलवड गावी सतत दीड वर्षे मुक्काम ही चांगली गोष्ट झाली.मुंबईला रामराम करून आम्ही घोलवड गावी राहिलो. एवढा दीर्घ काळ येथे राहणे, अन्यथा शक्य नव्हते, झालेच नसते. सुरुवातीला जरी थोडा निराश झालो, तरी पुढे खूप समाधान व सुरक्षित वाटू लागले. चिंतन करता आले, लेखन करता आले. माझी बोर्डी, घोलवड गावे नव्याने पाहता आली.
हादेखील एक योगायोगच म्हणावा लागेल.त्या वेळी खरेतर धाकटा बंधू अण्णा, घोलवड ला, वृद्ध आईचे सोबतीसाठी येणार होता.पण जगभर ,करोना च्या वाढत्या संसर्गामुळे, तो बेहरीन हून भारतात येऊ शकेल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आम्ही घोलवडला आलो. सुदैवाने तोही काही दिवसांनी भारतात आला .मात्र घोलवड ला त्वरीत येऊ शकला नाही. आम्ही काही दिवस जरी उशीर केला असता व घोलवड ला पोहोचलो नसतो तर ..तर ,कल्पनाच करवत नाही ?आमच्या आईची सेवा, आम्हा सर्व भावंडांच्या अनुपस्थितीत, कोणी व कशी केली असती? ही परमेश्वराचीच कृपा त्यानेच आम्हाला मुंबई सोडून त्वरित गावी येण्याची प्रेरणा दिली असावी . व दुसऱ्याही अनेक चांगल्या गोष्टी येथील मुक्कामात झाल्या.
सरलेल्या वर्षात आमच्या कुटुंबासाठी, एक महत्त्वाची घटना म्हणजे प्रशांत,दीप्ती, क्रिशा,आर्यन यांचे दीर्घ कालीन वास्तव्यासाठी ह्युस्टन, अमेरिका येथे एप्रिल महिन्यातील प्रयाण. एरवी अमेरिकेला जाणे म्हणजे, विजा(Visa),विमान तिकीट ,थोडे डॉलर घेऊन विमानात बसणे.चोवीस तासांनी अमेरिकन विमानतळावर उतरणे, एवढे सोपे होते. ज्या परिस्थितीत या चौधरी कुटुंबाने अमेरिका गाठली ते सर्व कथानक हॉलिवूडच्या एखाद्या थरार सिनेमाची कहाणी आहे. सर्व जगातच करोनाचा प्रताप दिसत असतांनाच प्रशांतला त्याची अमेरिकन कंपनी तेथे, महत्त्वाच्या कामासाठी ऑफर देते. त्याच वेळी अमेरिकेने तर सर्व प्रकारचे विजा बंद करून ठेवलेले. त्यामुळे ही ऑफर घ्यावी की न घ्यावी असा पेच पडलेला. धोके पत्करूनही ,प्रशांत दीप्ती अमेरिकेला जायचे, हा निर्णय घेतात. सुदैवाने Mr.Trump महाराज जाऊन, राष्ट्रपती Mr Balden येतात आणि विजा ची दुकाने पुन्हा उघडली जातात .. हा देखील चमत्कारच घडला. विजा साठी ,मंडळीला (चारही जणांना) बंगलोर ते दिल्ली, दिल्ली ते बंगलोर, बंगलोर ते मद्रास,मद्रास ते बंगलोर,अशा लागोपाठ फेर्या माराव्या लागतात..! तेही,दोन्ही शहरात करोणाचे थैमान चालू असताना !! सर्वांना विजा मिळतात.. एक मोठा अडथळा पार होतो ..त्वरित प्रशांत एकटा अमेरिकेत जाऊन आपल्या कामावर रुजू होतो .. करोना कमी होण्याऐवजी बंगलोरमध्ये ही वाढतो.. तिघांसाठी विमानाची तिकिटे मिळविणे, बंगलोर मधील सर्व सामान भरून ,थोडे घोलवड साठी ,तर थोडे अमेरिकेसाठी पॅक करणे, त्यासाठी वेगवेगळे मालवाहक शोधणे त्यांच्याशी करारमदार.. भाड्याच्या घराची नीट व्यवस्था, साफसफाई करून किल्ली मालकाच्या हाती सुपूर्त करणे.. अमेरिकेला जाणार्या विमानांच्या फेऱ्या खूप कमी झालेल्या.. जिथे माणसांना तिकिटे मिळणे मुश्कील तेथेआपल्या दोन लाडक्या बोक्यांसाठी,खास सोपस्कार करून,तिकीटे मिळवणे, म्हणजे देवदुर्लभ गोष्ट.. थोड्याच दिवसात ,अमेरिका भारतातून येणारी विमानसेवा बंद करणार अशा वावड्या उठलेल्या ..त्यामुळे दीप्ती विमान तिकीटे आठवडा भर आधीची करून घेते .. पुन्हा सर्व सोपस्कार करावे लागतात.. मधेच आर्यन चा घसा बिघडतो.. त्याची करोना टेस्ट करावी असा डॉक्टरी सल्ला मिळतो.. मोठे संकट उभे राहते.. आता काय होणार ? परमेश्वरी संकेत , आर्यन सुखरूप असतो.. सर्व परिक्षा पास करून, दीप्ती दिल्लीला विमानात बसली तर ते विमान तीन तास लेट ..त्यामुळे पुढची connecting विमानसेवा हुकली ..पुन्हा तिकीटे बुक करा…मंडळी शिकागो विमानतळावर उतरले..दादा शिकागोला भेटावयास आला, त्यामुळे त्या धावपळीतही मिळालेला आनंद आणि समाधान व धीर.. दोघे बोके यायचे होते.. त्यांची राहण्याची व्यवस्था बंगलोर मध्ये स्वतंत्र केलेली..कर्मधर्मसंयोगाने त्यासाठी योजलेल्या स्वतंत्र एजंटने बोक्यांना विमानात बसवून दिले आणि शेवटी हे दोन भाग्यवान प्राणीही ,बामणवाडा( मुंबई )ते बंगलोर ते हुस्टन असा प्रवास करून,गिनीज बुक मध्ये दाखल झाले.. आणि हा सर्व थरार संपला! मुलांच्या अमेरिकेतील शाळा कॉलेज मधील प्रवेशासाठी यातायात, आर्यन ची बेंगलोर शाळेतील वार्षिक परीक्षा ,इत्यादी इत्यादी लहान-मोठे प्रश्न ही होतेच. आम्हाला सतत दुःख हेच होते, आम्ही काहीच मदत करू शकत नव्हतो, ना कोणी नातेवाईक मित्र तेथे मदतीसाठी होता. दादा ,स्वाती यांचा अनेक वर्षांचा अमेरिका वास्तव्यातील अनुभव ,प्रशांत आणि त्याची कंपनी यांनी अमेरीकेतून दिलेला आधार हीच जमेची बाजू निश्चित होती… या सर्वांहून अधिक गुरुमाऊली चे आशीर्वाद आणि दीप्तीची जबरदस्त श्रद्धा. त्याकाळात आम्ही देखील स्वामींच्या, “अशक्य ते शक्य करून दाखविण्याच्या”,किमये ची प्रचिती घेतली .तोही एक दुसरा विषय. अशी थोडक्यात कहाणी आहे.दीप्ती. एक पुस्तक लिहू शकते..
त्यामुळे हा एकूण 80 वा वाढदिवस मी खूप महत्त्वाचा मैलाचा दगड समजतो. सरलेल्या वर्षात जे पाहिले ,अनुभवले, मनात आले, विचार चक्र घुमले, लेखणी चालली ,हे सर्व काही अघटित होते . करोणा मुळे घोलवड मध्ये निवास झाला आणि हे सर्व घडून आले . मोडके तोडके का असेना, स्वतः काहीतरी लिहिण्याचा आनंद वेगळाच असतो .त्यामुळे अशा उदासीन, आणि निष्क्रिय दिवसांत, वेळ चांगला गेला. स्मरणातील त्या व्यक्तीविषयी लिहिताना, किंवा जुन्या दिवसाच्या आठवणी अधोरेखित करताना, नकळत मी त्यांच्या भेटीच्या, पुनःप्रत्ययाचा आनंद घेत असतो. त्या दिवसात रममाण होतो. त्या काळाशी,माणसाशी, थोडा वेळ का असेना,पुन्हा जोडलेजाणे त्यातील आनंद अगदीच अवर्णनीय ! विशेषतः, जेव्हा या घटनांचे साक्षीदार जुनेमित्र हे लिखाण वाचतात व त्यांच्या ही स्मृती जाग्या होतात,मोठ्या प्रेमाने, भावुक होऊन, त्यांची प्रतिक्रिया कळवतात, तेव्हा तर किती अप्रूप वाटते!
या करोना ने आणखी एक नवीन गोष्ट शिकविली, ती म्हणजे निसर्ग सान्निध्यात व निरीक्षणात काय आनंद आहे तो अनुभवण्याची.जमीन, आकाश, नद्या नाले समुद्र ,पर्वत, तारे आम्ही नेहमीच पाहत असतो.पण पाच मिनिटे त्यांच्यासाठी थांबून ,त्यांच्याशी काही हितगुज करून ,”तुम्ही,आम्हा सर्वांना, अगदी निरपेक्ष ,निर्हेतुक,निर्भेळ असा आनंद देता” असे सांगण्याचे क्षण आयुष्यात किती वेळा येतात? एक क्षणही नाही. कारण ‘रोजमरा’ जिंदगी मध्ये असा वेळ देण्यास आम्हाला क्षणाचीही फुरसत नाही. घोलवड च्या दीर्घ वास्तव्यात आपोआप सवय लागली. हळूहळू या निसर्गाच्या संगतीची ,निरीक्षणाची, कृतज्ञता व्यक्त करण्याची,सवय लागली. आनंद मिळू लागला. लिखाणासाठी विषयी मिळू लागले. माणूस निसर्गातूनच निर्माण झाला आणि शेवटी निसर्गातच तो लुप्त होतो. आमचे पूर्वज निसर्गाची अत्यंत जवळिकीने राहिले.त्यामुळे खूपच सुखी जीवन जगले.आजच्या मानवी जीवनाच्या शोकांतिकेला, निसर्गापासून झालेली फारकत हे एक मुख्य कारण आहे. करोना ने आम्हा सर्वांना तुम्ही निसर्गाकडे परत जा असा संदेश दिला आहे.
समुद्र बालपणापासून आम्ही पहात आलो. या एक दीड वर्षाच्या कालखंडात, समुद्राशी एक वेगळी जवळीक निर्माण झाली. रोज सायंकाळी अनवाणी पायांनी चालत ,समुद्राच्या पाण्याला स्पर्श करून, सागर लहरींचा गाज ऐकण्यात आणि सूर्यास्ताचे वेळी क्षितिजावर उमलणाऱ्या विविध रंगांच्या पिसार्याचा आस्वाद घेण्यात ,तसेच सायंकाळी आपल्या घरट्याकडे परतणाऱ्या पक्षांचे शिस्तबद्ध उडणारे थवे आणि समुद्र पक्षांची मासे पकडण्याची चपलता ..सर्वच विलोभनीय!! स्वातंत्र्यवीरांनी आपल्या मनाची खंत सागरापाशी च का व्यक्त केली याच रहस्य मग समजतं ?
कोंबडी, कोंबडा केवढे साधे प्राणी. रस्त्यावर ती चरत असतांना आपले लक्ष ही त्यांची कडे कधी जात नाही.त्यांचे मटण आणि अंडी खाण्यापुरताच त्यांचा आपला संबंध. मात्र या शूद्र वाटणाऱ्या प्राण्यांचेही विश्व केवढे समृद्ध आहे हे त्यांचे शी हितगुज सुरू झाल्यास कळते.त्यांच्याशी थोडी सलगी केली तर,हे क्षुद्र पाणी देखील किती मोठा आनंद देऊ शकतात, हे या करोणा काला मध्ये शिकता आले. 21 दिवसांनी अंड्यातून पिल्ले कशी निघतात, छोट्या, दुडुदुडु धावणाऱ्या पिल्लांची अगदी दोन अडीच महिन्यात, अंडी घालणारी कोंबडी आणि आरवणारा कोंबडा कसा तयार होतो.. खाणे दिले तर ते सुद्धा आपल्या मागेपुढे कसे करतात.. कधी ओरडून बोलले तर रुसून, आपण फेकलेले दाणे ही खात नाहीत.. सर्वच मोठे गमतीशीर.एका पक्षी तज्ञाने लिहिले आहे, की,’ पक्षांना देखील माणसाप्रमाणे IQ असतो.’. त्यांचीही वेगळी भाषा ,भावभावनांचे आपले विश्व आहे, ते विलोभनीय आहे!’. या पशु पक्षी आणि प्राण्यांची माणसाप्रति कृतज्ञता, व त्यांचे निरागस प्रेम पाहून वाटत, ” माणसा परीस मेंढर बरी! दुसर्या एका तज्ञाने याबाबतीत काढलेले उद्गार खूपच बोलके आहेत ..त्यांनी म्हटले आहे,”ज्याला खऱ्या अर्थाने सुखी जीवन जगायचे आहे ,त्याने आयुष्यात एक तरी प्राणी, पशु ,पक्षी मित्राशी मैत्री करावी.” तो पुढे असेही म्हणतो
“More I love the dog, more I hate the man!!” सरलेल्या वर्षात या उद्गारांचे थोडी प्रचिती आम्हाला घेता आली!!
माझा 79 वा वाढदिवस, वाढत्या वयाच्या दृष्टीने खास आहेच, थोडे आत्मपरीक्षण आणि भोवतालच्या जगाचे निरागस निरीक्षण ,या दृष्टीने देखील एकमेवाद्वितीय असा वाटतो .एका वेगळ्याच संपत्तीचा मालक मी एका वर्षात झालो. उरलेल्या भावी आयुष्यात मला त्याचा खूप लाभ होईल.
आयुष्यात, एका वर्षाच्या टप्प्याने येणाऱ्या या दिवशी,ज्या मित्रांनी, आप्तांनी ,सुहृदांनी आणि आईवडिलांनी तुम्हाला येथे पोहोचण्या साठी प्रेम दिले आधार दिला ,त्या सर्वांचे अत्यंत आदरपूर्वक स्मरण करून त्यांना वंदन करणे माझे कर्तव्य समजतो .सर्व क्षेत्रातील,थोरा-मोठ्यांनी दिलेल्या अमुल्य शुभेच्छां व अनेक उत्तम आशिर्वादांचा मी मनापासुन स्विकार करतो.व सोबत, गेल्या वर्षभरात काही चुका माझ्याकडुन झाल्या असतील किंवा अजाणतेपणामुळे कुणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो !
असेच स्नेह,प्रेम व आशिर्वाद माझ्यावर निरंतर राहुद्या अशी प्रार्थना विनंती करतो . त्या जगन्नियंता परमेश्वराने हा दिवस दाखविला याचे आभार मानतो !!
अतिशय सुंदर लेख. ओघवत्या शैलीत लिहिलेले तुमचे अनुभव आणि त्यातून मिळणारे मार्गदर्शन….शब्द अपुरे आहेत सांगायला….वाचन संपूच नये असे वाटते…. तुम्हाला वाढदिवसाच्या आणि पुढील निरोगी दीर्घायुष्यासठी खूप शुभेच्छा ?
अभिनंदन आणि ७९ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ह्यापूर्वी तुम्ही लिहिलेले अनेक लेख वाचले, त्यातून तुम्ही अनेक थोरामोठ्यांचे सर्वांगीण आणि भरभरून कौतुक केले. पण आज तुमच्याबद्दल लिहिलेला लेख वाचून मात्र तुम्हीदेखील सर्वार्थाने किती महान आहात याची प्रचिती आली.काही वेळापूर्वी तुम्ही समाजात नावलौकिक असलेली, उच्च पदावर कार्यरत असलेली एक असामान्य व्यक्ति आहात इतकेच माहीत होते. पण आता हे देखील कळले कि, महान व्यक्तिमत्वांबद्दल लिहिणारी व्यक्ति स्वतः किती महान असावी लागते. ?
आदरणीय बंदूस,
अत्यंत आदरपूर्वक नमस्कार!
आपला लेख वाचला. अत्यंत सुरेख आहे. खरं तर, त्याविषयी मी पुन्हा विस्ताराने लिहिनच.
पण आज मात्र, आपण ८० व्या वर्षात पदार्पण करून एक विशेष मैलाचा दगड पार करतांना आनंद व्यक्त करतो. आजच्या आपल्या वाढदिवसानिमित्त आपले हृदयापासून अभिनंदन! व आपणांस लाख लाख हार्दिक शुभेच्छा!
आपणांस उदंड आयुरारोग्य लाभो, हीच ईश्वर चरणीं प्रार्थना!!!
राऊत साहेब अतिशय सुंदर शब्दात आपण आपल्या आयुष्याचा झंझावाती प्रवास या लेखात मांडला आहे. आपली अफाट बुद्धीमत्ता आणि परिश्रम यांच्या जोरावर तुमचे आयुष्य परिपूर्ण आणि यशस्वी झाले आहे. या लेखामधील तुमची कन्या दीप्ती हीचे मुलांसहीत एवढेच नव्हे तर दोन बोक्यांना घेवुन अमेरिकेला केलेले प्रयाण आणि त्याअनुषंगाने झालेले इतर प्रसंग वाचनीय झालेले आहेत.
खुप सुंदर… तुम्हांला आणि तुमच्या सर्व कुटुंबीयांना शुभेच्छा.. लवकरच सर्व लेख एकत्रित करुन पुस्तक प्रकाशित कराल ही मनोमनी इच्छा.. ?
Great ! enjoyed your writing. Congratulations once again that you have entered into 80. As I said before you and your wife are certainly lucky to have found time to be with your mother and also at your native place among nature.
Good to know that despite difficulties your children made into USA the land of dreams.
All the best once to you both and wish good health to your mother .
अतिशय प्रेरणादायी लिखाण केले आहे.तुमचे जीवन खूपच आदर्शवत आहे आम्हा नवीन पिढीसाठी. घोलवडला तुमच्या सहवासात राहण्याचे भाग्य मला लाभले यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो.
Wishing you a very happy birthday .आपणास आरोग्यपूर्ण, कार्यतत्पर, समाधानी, दीर्घायुष्य लाभो ही ईशचरणी प्रार्थना.
आपला जीवनाचे सिंहावलोकन शब्दबध्द करणारा लेख आवडला. पुन्हा पुन्हा वाचणार आहोत. समाजोन्नती शिक्षणसंस्थेला आपल्या विचार, विवेकपूर्ण मार्ग दर्शना ची गरज आहे ……
पुन्हा एकदा शुभेच्छा!!!
देवराव आणि सौ नीला पाटील
वयाच्या 80 व्या वर्षा कडे वाटचाल करतांना लिहिलेला लेख खुपच महत्त्वाचा.
तुमच्याकडून आम्हा लहानांना आशिर्वाद नेहमी मिळो हीच अपेक्षा
बंधू 79 व्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा,. फारच सुंदर लेख. तुमच्या जीवनातील महत्वपूर्ण प्रसंग, मोठमोठ्या व्यक्तींची मिळालेली साथ, त्यांचे आशीर्वाद, अशा अनेक गोष्टींची माहिती मिळाली. आतापर्यंत तुम्ही तुमच्या क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती झाली. ही माहिती पुढच्या पिढीला निश्चितच उपयोगी पडेल., बंधू, असेच लिहीत रहा. तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही प्रभू चरणी प्रार्थना.
बंधू,
प्रथम तुम्हाला ९ जुन रोजी ८० व्या वर्षात पदार्पण केले त्या बद्दल शुभेच्छा. तुम्ही जे लिहाले आहे ते फार थोडक्यात लिहले आहे. तुमचा जीवन प्रवास कसा खडतर पणे सुरू झाला आणि त्यानंतर तुम्ही यशाची एक एक पायरी कशी गाठली हे मला माहीत आहे. तुमच्या हया लेखात तुम्ही गेल्या एक वर्षात तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटलेले प्रसंग आणि घोलवड ला अनुभवत असलेला निसर्ग थाटला आहे. मला वाटतं वय ८० नव्हे तर ०८ मधे गेल्यासारखे वाटत असेल.. लेख वाचून आनंद वाटला. मला पण बोर्डीला असल्यासारखे वाटले. सगळ्यांना नमस्कार.
साहेब आपला लेख वाचला खूप आवडला
भाई,79व्या वाढदिवसानिमित्त आपल्याना हार्दिक शुभेच्छा!!
एका शेतकरी कुटुंबातून आपला जीवन प्रवास चालू झाला. तो भारत प्रेटोलीयम च्या एका जबाबदार अधिकाऱ्यां पर्यंत आपण सहज पार केला. वर्तक हॉस्टेलचे रेकटर, नंतर तिथेच कमिटीवर समाजासाठी तळमळतेने आपण काम पाहिले. समाजात अनेक मुले शैक्षणिक दृष्ट्या घडविण्यात आपला मोलाचा वाटा होता. नाते संबंध जपण्यात आपण कधीच मागे राहिले नाहीत. सौ. मंदा मावशी सारखी सुस्वभावी पत्नी आपल्याना लाभली. म्हणूनच आपले यशस्वी जीवन सार्थकी लागले. असे मानायला हरकत नाही.सर्व वाचले. खूपच आनंद झाला. क्षणभर का होईना पण आठवणीत रमायला मिळाले. पुन्हा एकदा आपल्या उर्वरित जीवन प्रवासाला माझ्या भरभरून हार्दिक शुभेच्छा.!!
भाई सुंदर लिखाण,आपण सर्वच आपण वर्णिलेल्या परिस्थितीतून गेलेलो आहोत. तुम्ही वर्णिलेली परिस्थिती आमच्याही बाबतीत तंतोतंत लागू पडते, तुम्ही मुंबई सोडून बोर्डीला रहायला गेलात व तिथे रमलात ,मुंबईचे आयूष्य काय असते ते अनुभवून सुद्धां आपण तिथे रमलात ह्याच्यतच सर्व काही आले,शेवटी जन्मभूमी ती जन्मभूमीच ज्या मातीशी आपली नाळ जुळलेली असते तिथेच आपण रमतो हेच सत्य. लेखन छानच जमलेल आहे,थोडक्यात पण मुद्देसुद,मला पाठविल्याबद्दल घन्यवाद भाई?????
प्रिय दिगंबर राऊत यासी ,
आपण आपल्या वयाची, 79 वर्षे पूर्ण करून, 80 व्या वर्षात पदार्पण केले. प्रथमतः आपले मनःपूर्वक अभिनंदन .आपण 80 व्या वर्षात पदार्पण केले आहे या वर प्रथमदर्शनी विश्वासच बसत नाही.कदाचित आपली कार्यपद्धती ,सामाजिक क्षेत्रातील सहभाग, एखाद्या उपक्रमासाठी तन-मन-धन अर्पण, पूर्तीसाठी स्वतःला झोकून देण्याची प्रवृत्ती ,या वयातही तरुणाला हेवा वाटेल असा उत्साह ,यामुळे आपण आजही चिरतरुण आहात. पुन्हा एकदा आपणास वाढदिवसाच्या मनापासून सदिच्छा.
आपल्या लेखात आपले वडील व आमचे आदर्श गुरुजी, वामन देवजी राऊत, उर्फ आप्पा यांचा फोटो पाहिला व माझ्या गत स्मृतींना उजाळा मिळाला. मी खरोखरीच खूप भाग्यवान समजतो की, माझ्या प्राथमिक शिक्षणात,पहिली ते पाचवी व सहावी, अशी तीन वर्षे वामन गुरुजी सारखे सर्वार्थाने आदर्श गुरुजी लाभले त्यांना त्यांच्या आयुष्यात, कदाचित त्यांचे घर, किंवा घराचे छप्पर उभारता आले नाही ,परंतु त्यांच्या शिक्षणाने,संस्काराने व चारित्र्य घडविण्यासाठी घेतलेल्या अथक प्रयत्न व कष्टाने ,अनेक विद्यार्थ्यांच्या घराचे छप्पर उभे राहिले.गुरुजी या नात्याने त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी आजही नितांत आदर आहे. हीच त्यांची खरी संपत्ती व श्रीमंती आहे.
आपण आप्पांची शिकवण व संस्काराचे धडे आपल्या जीवनांत प्रत्यक्षात उतरविले. आपण उच्चविद्याविभूषित झालात.आपल्या कर्तव्य व कष्टाने, मोठ्या मोठ्या कंपनीत,मोठ्या पदावर विराजमान झालात.तरीही आपल्या वागणुकीत कुठेही, कधीही गर्वाचा लवलेश जाणवत नाही.किंबहुना आपल्या साध्या राहणी ने आपले व्यक्तिमत्त्व अधिकच खुलून दिसते.आपले सामाजिक क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे सो क्श समाज, संघ फंड ट्रस्ट,,सेतू संघटना, सेतू को-ऑपरेटिव्ह सोसायटी ,तात्यासाहेब चुरी वसतिगृह, माजी विद्यार्थी संघ संघटना,इत्यादी माध्यमातून आपण विविध उपक्रमांचे आयोजन नियोजन आणि मार्गदर्शन केले. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या वामनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ,गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत ,अशा विविध उपक्रमात, आघाडीवर राहून सक्रिय सहभाग दिला. तरी काही बाबी अनवधानाने राहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याबद्दल क्षमस्व .आपल्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा,व ऊद्बोधनाचा लाभ समाजाला नेहमीच होत आलेला आहे. आपले कार्य आणखीन पुढे नेण्यासाठी, आपणास परमेश्वराने आरोग्यदायी दीर्घायुष्य देवो ,ही प्रभू चरणी प्रार्थना.
आपला कृपाभिलाषी ,
हरीहर भास्कर चरी,बोर्डी
भाई ,सुंदर लिखाण,आपण सर्वच आपण वर्णिलेल्या परिस्थितीतून गेलेलो आहोत. तुम्ही वर्णिलेली परिस्थिती आमच्याही बाबतीत तंतोतंत लागू पडते, तुम्ही मुंबई सोडून बोर्डीला रहायला गेलात व तिथे रमलात ,मुंबईचे आयूष्य काय असते ते अनुभवून सुद्धां आपण तिथे रमलात ह्याच्यतच सर्व काही आले,शेवटी जन्मभूमी ती जन्मभूमीच ज्या मातीशी आपली नाळ जुळलेली असते तिथेच आपण रमतो हेच सत्य. लेखन छानच जमलेल आहे,थोडक्यात पण मुद्देसुद,मला पाठविल्याबद्दल घन्यवाद :
आणि हो, महत्वाचे विसरलोच .आपणास ऐशीव्या पदार्पणाच्या वाढदिवसाच्या, म्हात्रे कुटुंबिया तर्फे, लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा! तुम जीओ हजारोसाल सालके दिन हो पचास हजार, ??????????????
प़िय दिगुभाऊ,
प़थम 80 व्या वर्षा त पदार्पण झाले म्हणून या महत्त्वाच्या वाढदिवसाच्या उशिरा तरीही अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा.
गेल्या दीड वर्षात जो लेखन प़पंच्याचा झपाटा लावला आहे त्यामुळे अनेक फायदे झाले.आम्हालाही खूप माहिती मिळाली. तुमचे मन गुंतून राहिले आणि आदरणीय व्यक्तीप़ती कृतज्ञता व्यक्त केली गेली. एकूण मिळालेल्या संधीचे सोने केले.
विवेक , उज्ज्वला.
दिगंबर,
तुझ्या ऐशिव्या, 80 वर्ष्याच्या पदार्पणा निमित्ताने लिहलेला थोडेसे चिंतन, हा लेख आवडला. खरोखरच खूप छान आहे. बालवयापासून ते आता पर्यंतचा प्रवास ,ठळक आठवणी,स्मरणचित्रे खूपच उल्लेखनिय आहेत.तू भाग्यवान आहेस तुला आईबाबांच्या प्रेमळ सहवास ,आधार, मार्गदर्शन मिळाले व सर्वात मोलाचे मणजे आईची सेवा तू अजुन पर्यंत करतो आहेस. तेच मोलाचं भाग्य. आयुष्यातील पुढील वाटचाली करीता शुभेच्छा आणि तुझ्या कडून असेच छान छान इतरांना प्रेरणादायी ठरतील असे लेख वाचायला मिळू देत हीच सदिच्छा.
धन्यवाद, साहेब. तुमच्या आठवणी वाचल्या आणि मला अगदी धन्य धन्य झाल्या सारखा वाटले.
आपल्या 79 वा वाढदिवसा निमित्त व पुढील निरोगी आयुष्यासाठी माझ्या कडून हार्दीक शुभेच्या । त्यानिमित्त आपण लिहिलेला आपला लेख छानच आहे व त्यामुळे अनेकांना स्फूर्ती व प्रोस्याहन नक्कीच मिळेल।????
९ जुन, हा दिवस गेली कित्यक वर्षे आपणा सर्वांच्या आठवणींत असणारा एक ‘विशेष दिन’ आहे- जसा दोन दिवस अगोदर दर वर्षी पावसाळा सुरू होतो !
१९८० पासून पुढे प्रत्येक वर्षी कधी जवळून, तर कधी दूरून टेलिफोनवर आणि अलिकडे हाॅट्सअॅपवर राऊतसाहेबांना न विसरता शुभेच्छा देण्याचा हा सोनियाचा दिवस? !
साहेब, चार वर्षांपूर्वी थाटामाटात साजरा झालेला तुमचा अमृत महोत्सवी – ७५व्या वाढदिवसाचा (पार्ला, मुंबईतील) समारंभ, जवळून पाहिल्याने आजही आठवतो.
असा हा ९ जुन, साहेब तुमच्या आयुष्यात सतत ऊगवत राहो, तुम्हाला उत्तम आयुरारोग्य लाभो, तुमची निसर्गाची / लेखनाची आवड अखंड वाढती राहो आणि तुमचे नवनविन उपक्रम / मनोरथ पूर्ण होवोत हीच त्या जगन्नियंत्याकडे विनम्र प्रार्थना ?
लवू गांवकर , मुंबई
Wishing you a very happy birthday .???
आपणास आरोग्यपूर्ण, कार्यतत्पर, समाधानी, दीर्घायुष्य लाभो ही ईशचरणी प्रार्थना.
आपला जीवनाचे सिंहावलोकन शब्दबध्द करणारा लेख आवडला. अतिशय विचाप्रवर्तक आहे. पुन्हा पुन्हा वाचणार आहोत.
आजवर
अनेक संस्थांना, व्यक्तींना आपल्या मार्गदर्शनाचा लाभ झाला आहे.
समाजोन्नती शिक्षणसंस्थेला आपल्या विचार, विवेकपूर्ण
मार्ग दर्शनाची गरज आहे ……
पुन्हा एकदा शुभेच्छा!!!
डॉ. देवराव आणि
डॉ. सौ नीला पाटील
Many Happy Returns of the Day.
Wishing you many many more years of health and serene happiness.
Liked your article “,Chintan:”so much.
Interactions with you have been so enriching that I count them as my blessings?
साहेब,
तुमचा हा वाढ दिवसानिमित्तचा ओघवत्या शैलीतला , चिंतनप्रचुर लेख फार सुंदर आहे.
९ जुन, तुमच्या आयुष्यात सतत ऊगवत राहो, तुम्हाला उत्तम आयुरारोग्य लाभो, तुमची निसर्गाची / लेखनाची आवड अखंड वाढती राहो आणि तुमचे नवनविन उपक्रम / मनोरथ पूर्ण होवोत हीच त्या जगन्नियंत्याकडे विनम्र प्रार्थना ?
फारच छान . साधारणपणे हे सगळ्या पिढीचे आत्मकथन म्हणता येईल . वाढदिवसाच्या शुभेच्छा . जीवेद शरदः शतम
सहज, सुंदर आणि ओघवत्या शैलीत हे तुमच्या लेखनाचे वैशिष्टय़ आहे. ते सर्वसाधारण वाचकाच्या हृदयाला भिडणारे असते. त्यात लेखकाचे स्वताच्या जीवनातील अनुभव असतील तर त्याचा प्रभाव वाचकालाही atmachintan करण्यास प्रवृत्त करतो. खूप छान लिहिता असेच लिहित रहा. समाज prabhodhanache कार्य होणे तुमच्या प्राक्तनाचा एक भाग आहे. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो ही परमेश्वराला प्रार्थना. ???
सुंदर, ओघवत्या शैलीत चिंतन केले आहे, वाचनीय आहे. 79 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. (उशिरा अभिनंदन केल्याबद्दल क्षमस्व.)
हे तुम्ही केलेले चिंतन वाचून या तुमच्या जीवनात दुसऱ्यांसाठी करण्यासारखे खूप होते, त्यावर केव्हा तरी लिहीन.
??????????????????????????
सर
७९ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
अत्यंत हृदयस्पर्शी लेख,
जीवनमूल्यांना तडजोड न करता,अनेक आव्हानांना स्वबळावर संघर्ष करीत इच्छित उद्दिष्ट साध्य केले व समाजात कृतज्ञ होऊन समाजसेवेचे महान कार्य करीत आहात.आपल्या अंर्तमनाने निसर्गाशी साधलेल्या संवादाचे अप्रतिम वर्णन.
माझगांव टर्मिनलमधे, आपल्या नेतृत्वाखाली काम करताना, आपले अमूल्य मार्गदर्शन मिळाले व सकारात्मक विचाराने जीवन संघर्षावर यशस्वीरित्या मात करीता येते ही शिकवण मिळाली.
Nice introspection in words Sir! Old memories always cherish our life….wish you a very long and healthy life.
मी थोडे उशिरा वाचते आहे . वाचून खूप आनंद झाला . खूप छान वाटले.वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा .
सर, 80 व्या वर्षात प्रवेश….. हार्दिक अभिनंदन. तुमच्या ह्या सुनियोजित लेखाचे वर्णन काय करावे? अप्रतिम. तुम्ही केलेल्या अचाट परिश्रमांची मला कल्पना आहे. तुमची मेहनत जेवढी महत्वाची आहे त्याच्या मागे तुमच्या पिताश्रींचे मार्गदर्शन तितकेच महत्वाचे आहे. ह्या शिवाय 80 व्या वर्षात पदार्पण करताना प्रत्यक्ष मातोश्रींचा आशिर्वाद ह्यापेक्षा आणखी भाग्य काय असते? वडिलांच्या संस्कारांचे दान तुम्ही दोन्ही मुलांना दिलेत आणि म्हणूनच दोघेही यशस्वी होत आहेत. परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा.