माझा ७९ वा वाढदिवस, थोडे चिंतन!

     घोलवड समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळी रंगांची बरसात

आज माझा ७९ वा वाढदिवस आणि ८० व्या वर्षात पदार्पण! विचार करतो आहे …हेखरे आहे का?? मोठी गंमत वाटतेआहे.. बघता बघता आपण ऐंशीव्या वर्षात पदार्पण केले हे खरे वाटत नाही. लहानपणी आमच्या गावात, समाजात, माणूस साठ वर्षाचा झाला की डोकरा” (म्हातारा) म्हणून गणला जाई. त्याने कामातून, दैनंदिन व्यवहारातून निवृत्ती घ्यायची, आराम करायचा. समाजदेखील अशा डोक्याकडे एक भुईला भार व्यक्तिमत्व अशाच दृष्टीने पाही. मला त्या आठ, दहा वर्षाच्या वयात वाटे, आपण असे डोकरे होऊ का? बापरे अजून पन्नास वर्षाचा काळ आहे, कोणी सांगावे, इतक्या दीर्घ कालखंडात काय होईल? त्याकाळी आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहून बालमन साशंक होई. माझे कितीतरी बालमित्र, अगदी पहिली दुसरी यत्तेत हे जग  सोडून गेले. गावातली तरणीताठी माणसेही पटकन कोणत्यातरी आजाराने, अथवा विषारी जनावराच्या दंशाने, आणि काही तर  ‘बेपत्ता’ होऊन जीवनातून निघून जात होती. 

सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि एकूण जीवनच अगदी रामभरोसे चालले होते. प्रत्येक संसारी,दंपतीला, पाच सहा तरी कमीत कमी मुले असत. माझ्या बालपणी मी बारा-तेरा मुले असलेले आईबाप पाहिले आहेत. अशा परिस्थितीत त्या मुलांचे संगोपन ,देखरेख ,शुश्रूषा कोण करणार? परमेश्वर त्यांचा वाली!!

       त्यामुळेच आयुष्यात साठ वर्षाचा टप्पा गाठणारा म्हणजे खूपच मोठी मजल मारणारा… असे विचार त्यावेळी अजाण मनात येत.  खूप मनावर घेण्याचे वय नव्हते .आज ते दिवस आठवले म्हणजे गंमत वाटते ती त्यामुळेच..आपण ऐंशीव्या वर्षात पदार्पण करीत आहोत खरे वाटत नाही नाही ते त्यामुळेच!!

  आम्हा सर्व भावंडांचे परम भाग्य, आम्हाला आप्पांचे स्वरूपात एक आदर्श पिता मिळाला. “वामन देवजी राऊत”हे आमचे वडील म्हणून मार्गदर्शक नसते तर, आज आम्ही जे काही आहोत ते अजिबात नसतो, आणि काय असतो, याचीही कल्पना करवत नाही.एवढे सांगितले म्हणजे या एका माणसाचे आमच्या आयुष्यात काय स्थान होते, हे समजावे!!गरिबी होती, पण संस्कार होते, फाटके कपडे होते पण मनाची मिजास होती, खाण्याची चंगळ नव्हती पण पोटाला चिमटा कधीही बसला नाही. आमचे पर्यटन घोलवड स्टेशनच्या पलीकडे कधीच शाळेच्या दिवसात गेले नाही मात्र वाचनासाठी दिलेल्या पुस्तकरूपी खजिन्यातून आम्ही मनाने,जगाचे पर्यटन त्याच काळात केले होते. सर्व सुबत्तेची वानवा होती पण पाठीवर प्रेमाचा हात ,आणि परीक्षेत पहिला नंबर काढल्यावर मिळालेली लिमलेटची गोळी,सर्व कमतरतेला पुरून ऊरत ,प्रत्येक वेळी नव चैतन्याचा डोस  देत असे.  स्वतः एक आदर्श शिक्षक असल्याने, शिक्षणाचे जीवनातील महत्व त्यांना पुरेपुर माहीत होते. आपल्या मुलांनी,काहीही झाले तरी ,शिक्षण हे घेतलेच पाहिजे हे त्यांचे ब्रीद होते. त्यामुळे, “मुलांच्या शिक्षणासाठी मी कोणापुढेही हात पसरणार नाही. भीक मागेन, पण माझ्या मुलांना ,जेवढे शिक्षण घ्यावयाचे आहे,तेवढे देईन!!” हे त्यांचे लहानपणी ऐकलेले वाक्य मी तेव्हा तर नाहीच विसरलो, पण आज ही विसरणार नाही. त्या एका वाक्याने आयुष्यात मला संजीवनी दिली सातार्‍याच्या कॉलेजात हाताने दगड फोडताना, कृष्णा नदीवर, थंडीच्या दिवसात आंघोळ करताना, ही संजीवनी मला कामाला आली.

   आज गत स्मृतींचे स्मरण करताना  एक मोठे शल्य उरात आहे.  म्हणजे आमची लाडकी की छोटी बहिण नीलम उर्फ ममा आम्हाला अकाली सोडून गेली. देहाने जरी आमच्यात नसली,तरी तिचे आशीर्वाद आम्हा सर्वांना सदोदित असतात ,याची प्रचीती अनेकदा आली आहे.

   जीवनात,एक गोष्टीचा जबरदस्त प्रत्यय आला. असे म्हणतात ,”परमेश्वर जेव्हा काही वाटा तुमच्यासाठी बंद करतो, त्यावेळी  नव्या संधीचे काही दरवाजे उघडे करतो!”..  विश्वास व श्रद्धा हवी.शाळेमध्ये भेटलेले चित्रे- भिसे गुरुजी,सातारच्या महाविद्यालयात उपकृत झालेले  प्रिन्सिपल पी जी पाटील व प्राध्यापक एस ए  पाटील.पुढे इस्माईल कॉलेजमध्ये विशेष सवलती देणारे  प्राध्यापक वि मा दि पटवर्धन व प्रिन्सिपल डॉ. पोतदार…यु डी सि टी मध्ये,प्रवेश घेण्याआधीच मला बोलवून, मार्गदर्शन करणारे रजिस्ट्रार गुप्ते साहेब.त्यानंतर माझे डिपार्टमेंट हेड,पदवी  व पदव्युत्तर शिक्षणासाठी मार्गदर्शक डॉ. काणे, त्यांनी मला विशेष शिफारस करून, यूजीसी (University Grants Commisssion),च्या मासिक अडीचशे रुपये शिष्यवृत्ती ऐवजी सी एस आय आर ची(Council of Scientific n Industrial Reseach)मासिक चारशे रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून दिली व आप्पांचा आर्थिक भार खूप कमी केला.पहिल्या नोकरीसाठी, आचार्य भिसे गुरुजी यांच्या शिफारशी वरून मुलाखती शिवाय माझी निवड करणारे गोदरेज कंपनीचे मालक डॉ.बरजोरजी गोदरेज. पुढे ‘एस्सो'(ESSO),या त्यावेळेच्या जगातल्या एक नंबर च्या  कंपनीत मला नोकरी मिळावी म्हणून मुलाखती नंतर दोन वर्षे थांबून, आठवणीने मला बोलवणारे डॉ. के व्ही विजय राघवन. या अत्यंत जोखमीच्या नोकरीतील पहिल्या वर्षात मला मदत करणारे श्री बोरकर साहेब, श्री लोटलीकर साहेब अशी किती नावे सांगावीत? आयुष्यात अगदी नेमक्या टप्प्यावर, जेव्हा “टू बी ऑर नॉट टू बी” अशी अवस्था होती तेव्हा या सर्वांनी मदतीचा हात दिला. ही माणसे ना माझ्या नात्याची ना गोत्याची ना ,त्याआधी ओळखीची .माणसाच्या रूपात आलेली ही परमेश्वराची स्वरूपे होती ,असे मी आजही मानतो, आणि त्यांच्या स्मृतीला नेहमीच मानवंदना देतो.

      सेवानिवृत्ती झाली आणि सेवानिवृत्ती वेतन सुरू झाले. नोकरीतील शेवटची 13 वर्षे केवळ एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या लहरीखातर मला पदोन्नती शिवाय रहावे लागले. तो मोठा कठीण व मानहानीचा काळ माझ्यासाठी होता. त्यामुळे सेवानिवृत्ती वेतन कमी मिळाले. श्री के. किशन व श्री अरुण बालकृष्णन, यासारखी दिलदार माणसे माझ्या पाठीशी उभी राहिली. त्यांनी मला स्वतंत्र खात्याचा पद पदभार दिला व ‘आंतरराष्ट्रीय विक्री'(INTERNATIONAL MARKETING)  अशा महत्त्वाच्या खात्याची स्वतंत्र जबाबदारी दिली. मी परदेशात फिरून, माझ्या कंपनीसाठी विक्रीचे नवेमार्ग शोधले व हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन या सरकारी कंपनी चा झेंडा प्रथमच देशा बाहेर फडकू लागला. आज तो अधिकच डौलाने फडकतो आहे.

   सेवानिवृत्तीनंतर मला घरी बसून रहावयाचे नव्हते कारण मला स्वतःला ते आवडले नसते. अनेक मित्रांनी व कंपन्यांनी मला आपल्या ऑफर्स दिल्या होत्या. मात्र मला कोणत्याही प्रकारची बंधने व तेच तेच नेहमीचे काम, असे नको होते. सुदैवाने श्री राजेंद्र सहा या माझ्या मित्रांनीच त्यांच्या ‘आयपोल’ या कंपनीत मला सेवानिवृत्तीनंतर च्या दुसऱ्या महिन्यातच बोलाविले. मी तिथे कामाला लागलो तेव्हा कंपनीचा एकूण व्यवहार दोनशे कोटी रुपये होता. मी पंधरा  वर्षानंतर कंपनी सोडली,  तेव्हा तो जवळजवळ सातशेकोटी रुपये झाला .यावरून आम्ही केलेल्या कामाची व्याप्ती कळावी.अतिशय समाधानाने हे काम मी पंधरा वर्षे केले.पुढे श्री सहा यांनी काही कौटुंबिक कारणांमुळे ही सुंदर कंपनी GULF PETROLEUMS या दुसऱ्या कंपनीला विकली .येथेही मी दोन वर्षे काम केले. मात्र पूर्वीसारखी मजा न वाटल्याने ते काम मी सोडले.

     त्यानंतरही गेल्यावर्षी करोनासाथ  येईपर्यंत माझे काम चालू होते. हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन ने यांच्या सिल्वासा येथील कारखान्यासाठी काही महिने मला बोलाविले.काही नवीन यंत्रे आणली होती ती सुरू करावयाची होती. त्यांच्या माजगाव येथील कारखान्यात जेथे मी 18 वर्षे काम केले, तेथेही काही समस्या होत्या, त्या सोडवण्यासाठी सहा महिने काम केले.कलकत्ता, दिल्ली व बंगलोर येथील ही काही कंपन्यात त्याच वेळी मी  काम करीत होतो. आता बाहेर जाणेच बंद झाल्यामुळे हीकामे बंद करून ,सध्या लेखनाचा आनंद घेतो आहे.

   करोनाचे अनेक दुष्परिणाम जरूर आहेत.जगातल्या अनेकांनी त्याला दूषणे ने दिली आहेत. आणि का देऊ नयेत? ज्यांचे जिवलग ,आई बाबा, बहीण, भाऊ असे कोणीतरी जवळचे अगदी बघता बघता पटकन निघून गेले,  त्यांची व्यथा तेच समजतील.

   प्रत्येक संकटत एक संधीही दडलेली असते.काही मानवता हीन पशूंनी या संधीतून आपले उखळ पांढरे करून घेतले. तर काही महामानवांनी आपले स्वतःचे बलिदान देऊन,रुग्णांना मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले

    निसर्गाने माणसाला दिलेली ही सणसणीत चपराक आहे. अंतिमत इशारा आहे.अजूनही माणसाने निसर्गाला ओरबाडण्याचे,  कुरघोडी करण्याचे ,उद्योग सोडून दिले नाहीत तर, Writing On The Wall.. अगदी स्पष्ट आहे. जगाने हा निर्वाणीचा इशारा समजला असेल असे आपण मानू या. तसे असेल तर पुढील पिढ्यासाठी ही एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल. 

    आम्हा दोघांसाठी, घोलवड गावी  सतत दीड वर्षे मुक्काम ही चांगली गोष्ट झाली.मुंबईला रामराम करून आम्ही घोलवड गावी राहिलो. एवढा दीर्घ काळ येथे राहणे, अन्यथा शक्य नव्हते, झालेच नसते. सुरुवातीला जरी थोडा निराश झालो, तरी पुढे खूप समाधान व सुरक्षित वाटू लागले. चिंतन करता आले, लेखन करता आले. माझी बोर्डी, घोलवड गावे नव्याने पाहता आली.

     हादेखील एक योगायोगच म्हणावा लागेल.त्या वेळी खरेतर धाकटा बंधू अण्णा, घोलवड ला, वृद्ध आईचे सोबतीसाठी येणार होता.पण जगभर ,करोना च्या वाढत्या संसर्गामुळे, तो बेहरीन हून भारतात येऊ शकेल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आम्ही घोलवडला आलो. सुदैवाने तोही काही दिवसांनी भारतात आला .मात्र घोलवड ला त्वरीत येऊ शकला नाही. आम्ही काही दिवस जरी उशीर केला असता व घोलवड ला पोहोचलो नसतो तर ..तर ,कल्पनाच करवत नाही ?आमच्या आईची सेवा, आम्हा सर्व भावंडांच्या अनुपस्थितीत, कोणी व कशी केली असती?  ही परमेश्वराचीच कृपा त्यानेच आम्हाला मुंबई सोडून त्वरित गावी येण्याची प्रेरणा दिली असावी . व दुसऱ्याही अनेक चांगल्या गोष्टी येथील मुक्कामात झाल्या.

    सरलेल्या वर्षात आमच्या कुटुंबासाठी, एक महत्त्वाची घटना म्हणजे  प्रशांत,दीप्ती, क्रिशा,आर्यन यांचे दीर्घ कालीन वास्तव्यासाठी ह्युस्टन, अमेरिका येथे एप्रिल महिन्यातील प्रयाण. एरवी अमेरिकेला जाणे म्हणजे, विजा(Visa),विमान तिकीट ,थोडे डॉलर घेऊन  विमानात बसणे.चोवीस तासांनी अमेरिकन विमानतळावर उतरणे, एवढे सोपे होते. ज्या परिस्थितीत या चौधरी कुटुंबाने अमेरिका गाठली ते सर्व कथानक हॉलिवूडच्या एखाद्या थरार सिनेमाची कहाणी आहे. सर्व जगातच करोनाचा प्रताप दिसत असतांनाच प्रशांतला त्याची अमेरिकन कंपनी तेथे, महत्त्वाच्या कामासाठी ऑफर देते. त्याच वेळी अमेरिकेने तर सर्व प्रकारचे विजा बंद करून ठेवलेले. त्यामुळे ही ऑफर घ्यावी की न घ्यावी असा पेच पडलेला. धोके पत्करूनही ,प्रशांत दीप्ती अमेरिकेला जायचे, हा निर्णय घेतात. सुदैवाने Mr.Trump महाराज जाऊन, राष्ट्रपती Mr Balden येतात आणि विजा ची दुकाने पुन्हा उघडली जातात .. हा देखील चमत्कारच घडला.  विजा साठी ,मंडळीला (चारही जणांना) बंगलोर ते दिल्ली, दिल्ली ते बंगलोर, बंगलोर ते मद्रास,मद्रास ते बंगलोर,अशा लागोपाठ फेर्‍या माराव्या लागतात..! तेही,दोन्ही शहरात करोणाचे थैमान चालू असताना !! सर्वांना विजा मिळतात.. एक  मोठा अडथळा पार होतो ..त्वरित प्रशांत एकटा अमेरिकेत जाऊन आपल्या कामावर रुजू होतो .. करोना कमी होण्याऐवजी बंगलोरमध्ये ही वाढतो..  तिघांसाठी विमानाची तिकिटे मिळविणे, बंगलोर मधील सर्व सामान भरून ,थोडे घोलवड साठी ,तर थोडे अमेरिकेसाठी पॅक करणे, त्यासाठी वेगवेगळे मालवाहक शोधणे त्यांच्याशी करारमदार.. भाड्याच्या घराची नीट व्यवस्था, साफसफाई करून किल्ली मालकाच्या हाती सुपूर्त करणे.. अमेरिकेला जाणार्‍या विमानांच्या फेऱ्या खूप कमी झालेल्या.. जिथे माणसांना तिकिटे मिळणे मुश्कील तेथेआपल्या  दोन लाडक्या  बोक्यांसाठी,खास  सोपस्कार  करून,तिकीटे मिळवणे, म्हणजे  देवदुर्लभ गोष्ट.. थोड्याच दिवसात ,अमेरिका भारतातून येणारी विमानसेवा बंद करणार अशा वावड्या उठलेल्या ..त्यामुळे दीप्ती विमान तिकीटे  आठवडा भर आधीची करून घेते .. पुन्हा सर्व  सोपस्कार करावे लागतात.. मधेच आर्यन चा घसा बिघडतो.. त्याची करोना टेस्ट करावी असा डॉक्टरी सल्ला मिळतो.. मोठे संकट उभे राहते.. आता काय होणार ? परमेश्वरी संकेत , आर्यन सुखरूप असतो.. सर्व परिक्षा पास करून, दीप्ती दिल्लीला विमानात बसली तर ते विमान तीन तास लेट ..त्यामुळे पुढची  connecting विमानसेवा हुकली ..पुन्हा तिकीटे बुक करा…मंडळी शिकागो विमानतळावर उतरले..दादा शिकागोला भेटावयास आला, त्यामुळे त्या धावपळीतही मिळालेला आनंद आणि समाधान व धीर.. दोघे बोके यायचे होते.. त्यांची राहण्याची व्यवस्था बंगलोर मध्ये स्वतंत्र केलेली..कर्मधर्मसंयोगाने त्यासाठी योजलेल्या स्वतंत्र एजंटने बोक्यांना विमानात बसवून दिले आणि शेवटी हे दोन भाग्यवान प्राणीही ,बामणवाडा( मुंबई )ते बंगलोर ते हुस्टन असा प्रवास करून,गिनीज बुक मध्ये दाखल झाले.. आणि हा सर्व थरार संपला! मुलांच्या अमेरिकेतील शाळा कॉलेज मधील प्रवेशासाठी यातायात,  आर्यन ची बेंगलोर शाळेतील वार्षिक परीक्षा ,इत्यादी इत्यादी लहान-मोठे प्रश्न ही होतेच. आम्हाला सतत दुःख हेच होते, आम्ही काहीच मदत करू शकत नव्हतो, ना कोणी नातेवाईक मित्र तेथे मदतीसाठी  होता. दादा ,स्वाती यांचा अनेक वर्षांचा अमेरिका वास्तव्यातील अनुभव ,प्रशांत आणि त्याची कंपनी यांनी अमेरीकेतून दिलेला आधार हीच जमेची बाजू निश्चित होती… या सर्वांहून अधिक गुरुमाऊली चे आशीर्वाद आणि दीप्तीची  जबरदस्त श्रद्धा. त्याकाळात आम्ही देखील स्वामींच्या, “अशक्य ते शक्य करून दाखविण्याच्या”,किमये ची प्रचिती घेतली .तोही एक दुसरा विषय. अशी थोडक्यात कहाणी आहे.दीप्ती. एक पुस्तक लिहू शकते..

  त्यामुळे हा एकूण 80 वा वाढदिवस मी खूप महत्त्वाचा मैलाचा दगड समजतो. सरलेल्या वर्षात जे पाहिले ,अनुभवले, मनात आले, विचार चक्र घुमले, लेखणी चालली ,हे सर्व काही अघटित होते . करोणा मुळे घोलवड मध्ये निवास झाला आणि हे सर्व घडून आले . मोडके तोडके का असेना, स्वतः काहीतरी लिहिण्याचा आनंद वेगळाच असतो .त्यामुळे अशा उदासीन, आणि निष्क्रिय दिवसांत, वेळ चांगला गेला. स्मरणातील त्या व्यक्तीविषयी लिहिताना,  किंवा जुन्या दिवसाच्या आठवणी अधोरेखित करताना, नकळत मी त्यांच्या भेटीच्या, पुनःप्रत्ययाचा आनंद घेत असतो. त्या दिवसात रममाण होतो. त्या काळाशी,माणसाशी, थोडा वेळ का असेना,पुन्हा जोडलेजाणे  त्यातील आनंद अगदीच अवर्णनीय ! विशेषतः, जेव्हा या घटनांचे साक्षीदार जुनेमित्र हे लिखाण वाचतात व त्यांच्या ही स्मृती जाग्या होतात,मोठ्या  प्रेमाने, भावुक होऊन, त्यांची प्रतिक्रिया कळवतात, तेव्हा तर किती अप्रूप वाटते!

    या करोना ने आणखी एक नवीन गोष्ट शिकविली, ती म्हणजे निसर्ग सान्निध्यात व निरीक्षणात काय आनंद आहे तो अनुभवण्याची.जमीन, आकाश, नद्या नाले  समुद्र ,पर्वत, तारे आम्ही नेहमीच पाहत असतो.पण पाच मिनिटे त्यांच्यासाठी थांबून ,त्यांच्याशी काही हितगुज करून ,”तुम्ही,आम्हा सर्वांना, अगदी निरपेक्ष ,निर्हेतुक,निर्भेळ असा आनंद देता” असे सांगण्याचे क्षण आयुष्यात किती वेळा येतात?  एक क्षणही नाही. कारण ‘रोजमरा’ जिंदगी मध्ये असा वेळ देण्यास आम्हाला क्षणाचीही फुरसत नाही. घोलवड च्या  दीर्घ वास्तव्यात आपोआप सवय लागली. हळूहळू या निसर्गाच्या संगतीची ,निरीक्षणाची, कृतज्ञता व्यक्त करण्याची,सवय लागली. आनंद मिळू लागला. लिखाणासाठी विषयी मिळू लागले.  माणूस निसर्गातूनच निर्माण झाला आणि शेवटी निसर्गातच तो लुप्त होतो. आमचे पूर्वज  निसर्गाची अत्यंत जवळिकीने राहिले.त्यामुळे खूपच सुखी जीवन जगले.आजच्या मानवी जीवनाच्या शोकांतिकेला, निसर्गापासून झालेली फारकत हे एक मुख्य कारण आहे. करोना ने आम्हा सर्वांना तुम्ही निसर्गाकडे परत जा असा संदेश दिला आहे.

       समुद्र बालपणापासून आम्ही पहात आलो. या एक दीड वर्षाच्या कालखंडात, समुद्राशी एक वेगळी जवळीक निर्माण झाली. रोज सायंकाळी अनवाणी पायांनी चालत ,समुद्राच्या पाण्याला स्पर्श करून, सागर लहरींचा गाज ऐकण्यात आणि सूर्यास्ताचे वेळी क्षितिजावर उमलणाऱ्या विविध रंगांच्या पिसार्‍याचा आस्वाद घेण्यात ,तसेच सायंकाळी आपल्या घरट्याकडे परतणाऱ्या  पक्षांचे शिस्तबद्ध उडणारे थवे आणि समुद्र पक्षांची मासे पकडण्याची चपलता ..सर्वच  विलोभनीय!! स्वातंत्र्यवीरांनी आपल्या मनाची खंत सागरापाशी च का व्यक्त केली याच रहस्य मग समजतं ?

    कोंबडी, कोंबडा  केवढे साधे प्राणी. रस्त्यावर ती चरत असतांना आपले लक्ष ही त्यांची कडे कधी जात नाही.त्यांचे मटण आणि अंडी खाण्यापुरताच त्यांचा आपला संबंध. मात्र या शूद्र वाटणाऱ्या प्राण्यांचेही विश्व केवढे समृद्ध आहे हे त्यांचे शी हितगुज सुरू झाल्यास कळते.त्यांच्याशी थोडी सलगी केली तर,हे क्षुद्र पाणी देखील किती मोठा आनंद देऊ शकतात, हे या करोणा काला मध्ये  शिकता आले.  21 दिवसांनी अंड्यातून पिल्ले कशी निघतात, छोट्या, दुडुदुडु  धावणाऱ्या पिल्लांची अगदी  दोन अडीच महिन्यात, अंडी घालणारी कोंबडी आणि आरवणारा कोंबडा कसा तयार होतो.. खाणे दिले तर ते सुद्धा आपल्या मागेपुढे कसे करतात..  कधी ओरडून बोलले तर  रुसून, आपण फेकलेले दाणे ही खात नाहीत.. सर्वच मोठे गमतीशीर.एका पक्षी तज्ञाने लिहिले आहे, की,’ पक्षांना  देखील माणसाप्रमाणे IQ  असतो.’. त्यांचीही वेगळी भाषा ,भावभावनांचे आपले विश्व आहे, ते विलोभनीय आहे!’. या पशु पक्षी आणि प्राण्यांची माणसाप्रति कृतज्ञता,  व त्यांचे निरागस प्रेम पाहून वाटत, ” माणसा परीस मेंढर बरी! दुसर्या एका तज्ञाने याबाबतीत काढलेले उद्गार खूपच बोलके आहेत ..त्यांनी म्हटले आहे,”ज्याला खऱ्या अर्थाने  सुखी जीवन जगायचे आहे ,त्याने आयुष्यात एक तरी  प्राणी, पशु ,पक्षी मित्राशी मैत्री करावी.” तो पुढे असेही म्हणतो

  “More I love the dog, more I hate the man!!” सरलेल्या वर्षात या उद्गारांचे थोडी प्रचिती आम्हाला घेता आली!!

      माझा 79 वा वाढदिवस,  वाढत्या वयाच्या दृष्टीने खास आहेच, थोडे आत्मपरीक्षण आणि भोवतालच्या जगाचे निरागस निरीक्षण ,या दृष्टीने देखील  एकमेवाद्वितीय असा वाटतो .एका वेगळ्याच संपत्तीचा मालक मी एका वर्षात झालो. उरलेल्या भावी आयुष्यात मला त्याचा खूप लाभ होईल.  

      आयुष्यात, एका वर्षाच्या टप्प्याने येणाऱ्या या दिवशी,ज्या मित्रांनी, आप्तांनी ,सुहृदांनी आणि आईवडिलांनी तुम्हाला येथे पोहोचण्या साठी प्रेम दिले आधार दिला ,त्या सर्वांचे अत्यंत आदरपूर्वक स्मरण करून त्यांना वंदन करणे माझे कर्तव्य समजतो .सर्व क्षेत्रातील,थोरा-मोठ्यांनी  दिलेल्या अमुल्य शुभेच्छां व अनेक उत्तम आशिर्वादांचा मी मनापासुन स्विकार करतो.व सोबत, गेल्या वर्षभरात काही चुका माझ्याकडुन झाल्या असतील  किंवा अजाणतेपणामुळे कुणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो !

असेच स्नेह,प्रेम व आशिर्वाद माझ्यावर निरंतर राहुद्या अशी प्रार्थना विनंती करतो . त्या जगन्नियंता परमेश्वराने हा दिवस दाखविला याचे आभार मानतो !!