अंदमान बोलावतेय

      सेल्युलर जेल मधील 121 क्रमांकाची हीच ती पावन, पवित्र कोठडी जेथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा दहा वर्षे निवास होता. याच भिंतीवर त्यांनी बाभळीच्या काट्यांनी “कमला” महाकाव्य लिहिले. याच कोठडीच्या गवाक्षातून अनेक साथीदार फासावर लटकताना पाहिले.
आमचा 41 जणांचा,”टिळक ग्रुप” सेल्युलर जेल समोर. श्री शरद पोंक्षे व पार्थ बावस्कर समवेत.

       ‘अंदमान, निकोबार’ ही नावे ऐकताच माझ्याच कशाला, प्रत्येक मराठी माणसाच्या मनःचक्षु समोर प्रथम कोणी येत असेल तर ते स्वा. सावरकर आणि सेल्युलर जेल, आठवण होत असेल तर ते “काळे पाणी”, आणि जिभेवर पंक्ति  येत असतील तर त्या

  ” जयोस्तुते श्री  महन् मंगले, शिवास्पदे शुभदे….”

   आज सारे जग महामारीच्या संकटात असल्यामुळे पर्यटनक्षेत्र ठप्प आहे. मनावर भीती निराशा दाटून येत आहेत. हीच वेळ आहे सावरकरांना आठवण्याची, त्यांच्या चरित्रातून ,कर्तृत्वातून प्रेरणा घेण्याची, जिद्द बळकट करण्याची, हे समजूनच आम्ही ‘शब्दामृत’ या संस्थेने जेव्हा अंदमानला सहल काढण्याची कल्पना आणली, म्हटले ,”आपणही  हिम्मत करूया”. तीस वर्षांपूर्वी अंदमान बेटे व सेल्युलर जेलला  गेलो होतो तरी पुन्हा जायचे ठरविले.  ‘सावरकर’ या नावाची जादूच अशी आहे की तेथे व वय, शक्ती ,पैसे, साथसोबत याचा कोणताच विचार होत नाही. उर्मी फक्त एकच… चला तात्यारावांना व आमच्या अनेक स्वातंत्र्य सेनानींना वंदन करून येऊ!

          तीस वर्षांपूर्वी आम्ही अंदमानची सफर केली होती. त्या वेळी परिस्थिती वेगळी होती. अगदी प्रसन्न व मुक्त मनाने अंदमानच काय, जगात कोठेही मुक्त फिरता येत होते. आमची मुले लहान होती. माझी आईदेखील  सुदृढ व सशक्त होती. बंधू प्रदीपची साथसंगत  होती, त्यामुळे आमचा तो प्रवास अगदी संस्मरणीय न घडता तरच आश्चर्य!

    निसर्गसौंदर्याने नटलेली, बंगालच्या उपसागरातील ही बेटे प्रेक्षणीय असली, जगातील सर्वासाठी नयनरम्य पर्यटन स्थळे असली, तरी भारतीयांसाठी,  प्रत्येक मराठी माणसासाठी हर भारतप्रेमीसाठी ते एक पावन तीर्थक्षेत्र आहे !!

       तीर्थक्षेत्र म्हणजे तरी काय? ज्या ठिकाणी आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते, जगण्याचे साधन आणि साध्य यांचा अविष्कार जेथे होतो ! ‘भारतीयधर्म’, मानणाऱ्या प्रत्येकासाठी, पोर्ट ब्लेअर मधील सेल्युलर जेलला दिलेली भेट ही तीर्थयात्रा ठरते. मराठी माणसासाठी, सावरकर म्हणजे प्रेरणेचा अखंड स्रोत! त्यांचे जीवनचरित्र असो किंवा काव्य असो, सामान्य माणसांच्या अनेक समस्यांची उत्तरे देण्याची ताकद त्यात निश्चित दडली आहे.

    की घेतले न व्रत हे अंधतेने, लब्धप्रकाश, इतिहास निसर्ग माने. 

     जे दिव्य दाहक म्हणुनी असावयाचे, बुध्दाची वाण धरिले करी हे सतीचे!

     कोणतेही ध्येय उराशी बाळगले तर त्याचा पाया कसा असावा, त्यामागे भूमिका कोणती असावी याचे उत्तम वर्णन सावरकरांच्या या ओळीत आहे. पन्नास वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा ऐकूनच एखादा कोलमडून पडला असता. मात्र, हे ‘सतीचे व्रत’, आपण जाणून-बुजून घेतले आहे, ही जाणीव असलेल्या स्वातंत्र्यवीरांना, ते ऐकून काहीही फरक पडला नाही!

   सावरकरांच्या कर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घ्यायचा म्हटले तर एक कवी, निबंधकार ,जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारीत कादंब-यांचा लेखक ,ग्रंथकार , इतिहासकार ,भाषाशास्त्रज्ञ , कुशल संघटक ,धाडसी आणि कणखर व्यक्तिमत्व..सोबतीला देशप्रेमाची धगधगती ज्वाला हृदयात बाळगून, ‘वन्हीतो चेतवावा रे’,या न्यायाने केलेले समाजप्रबोधन, अशी सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. अठराशे सत्तावनचा उठाव हे बंड नसून इंग्रजांविरुद्धचे ते  पहिले स्वातंत्र्य समर आहे, हा विचार रुजविणारे सावरकर, ‘अभिनव भारत’,ची स्थापना करणारे सावरकर ,सागरा प्राण तळमळला ,जयोस्तुते श्री महन्मंगले, हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा, यासारखी काव्य रचना करणारे सावरकर, आपल्या धर्माचे व गाईंचे वेगळ्या अर्थाने महत्त्व सांगणारे सावरकर, पतीत पावन मंदिर आणि अशी 500 मंदिरे भारतभर, सर्वासाठी खुली करून सहभोजन घालणारे, जात्युच्छेदन करणारे सावरकर ,भाषेचा अभ्यास आणि अभिमान बाळगून मराठी भाषेला अनेक नवनवीन शब्दांची लेणी चढविणारे ,भाषाशुद्धी करणारे सावरकर ,अशी त्यांची किती रूपे सांगावीत?

           मलेशियन भाषेत या बेटांना, ‘हंदुमान’ म्हणतात. त्याचा संबंध हनुमानाशी आहे. त्यामुळे संजीवनी च्या शोधात असलेला हनुमान या बेटावर प्रथम आला होता असे म्हटले जाते . ही एकूण 572 बेटे आहेत त्यातील काही थोड्या बेटावर आज  मनुष्यवस्ती आहे. काही  बेटावर विविध प्रकारच्या आदिम जाती वास्तव्य करून आहेत. तेथे कोणाला जाता येत नाही. येथे सकाळी पाच वाजता उजाडते व संध्याकाळी पाच वाजता दिवस मावळतो. सर्व बेटे बंगालच्या उपसागरात विखुरलेली आहेत. एका बेटाचा दुसऱ्या बेटाशी संपर्क म्हणजे  केवळ समुद्रप्रवास आहे. त्यासाठी बोटी, क्रूज, स्पिडबोट, पडाव यांचा वापर केला जातो. आम्ही  बोटीने  चार बेटांचा प्रवास, त्या वेळी केला होता, असे स्मरते.     

  ” ग्रीन ओशन” बोटीने,यावेळी, आम्ही सफर केली.

         त्या पहिल्या प्रवासाची जी काही संस्मरणे आहेत त्यातील मद्रास ते पोर्ट ब्लेअर हा प्रवास ज्या पद्धतीने आम्ही करु शकलो ते एक दिव्य होते. मुंबई ,चेन्नई विमान प्रवास करून आम्ही चेन्नईतील आमच्या एच् पी सी  कंपनीच्या गेस्टहाउस मध्ये मुक्काम केला होता.  दुसऱ्या दिवशी पहाटे चेन्नई पोर्टब्लेअर असा विमान प्रवास होता. सर्व काही ठीक होते. दुसऱ्या दिवशी पहाटे ऑटोरिक्षाने विमानतळावर जाण्याचे नक्की केले होते .मात्र आदल्या दिवशीच रात्री भरपूर पाऊस पडला. सर्व रस्ते रात्रीत जलमय झाले. व मेट्रो रेल्वे  सर्वच वाहतूक बंद झाले. आमचे  सहकारी मित्र श्री. गावकर व श्री. पांडे यांनी अक्षरशः, कमाल करीत, सायकलवरून आमच्या सामानाची वाहतूक विमानतळापर्यंत केली. आईला सायकलवर बसवून विमानतळावर पोहोचते केले. कसेबसे विमान सुद्धा यावयाचे होते. आम्ही चेक-इन करू शकलो. हे झाले नसते तर आम्हाला विमान पकडणे केवळ अशक्य होते. या दोन मित्रांची आठवण तेव्हापासून मला कायमची आहे.

     त्यानंतर पोर्ट ब्लेअरमध्ये महाराष्ट्र मंडळात निवास. आणि तेथूनच काही बेटांची सफर. त्यामुळे ती एक छान कौटुंबिक सहल झाली. महाराष्ट्रसदन मधील निवास जरी साधा होता. तरी स्वच्छ व नीटनेटके वातावरण असल्याने काही त्रास झाला नाही. यावेळी तेथे निवासाची व्यवस्था पाहणारे एक मराठी दाम्पत्य भोजनाचीही सोय करीत होते. त्यामुळे साधे पण घरगुती जेवणही मिळाले.  जेटीवरून कोणत्या तरी बेटाची सफर करीत असू. संध्याकाळी त्याच बोटीने परत येत असू. मुक्काम पोर्टब्लेअर शिवाय आणि कुठे केला नाही.  संध्याकाळी श्री. हर्षे  या गृहस्थांनी अंदमानच्या सेल्युलर जेल कारागृहाची माहिती आम्हाला दिली . स्वातंत्रोत्तर काळात ते या तुरुंगाचे जेलर होते व निवृत्तीनंतर अंदमान मध्येच स्थायिक झाले होते. त्यामुळे त्यांच्याकडून अंदमानच्या तुरुंगातील कैद्यांच्या जुन्या व नव्या कथा ऐकणे वेगळा अनुभव  होता. त्यावेळी आम्ही रॉस आयलँड, जाॅली बाय आयलंड, हॅवलाॅक आयलँड अशा काही बेटांचा प्रवास केल्याचे आठवते. निश्चितच त्या काळचे अंदमान व आत्ता परवा पाहिलेले अंदमान खूपच फरक झाला आहे. निसर्गाचा ऱ्हास व वाढत्या नागरी संस्कृतीचा प्रादुर्भाव  ही त्याची कारणे.

     आजही अंदमान म्हणजे केवळ निसर्गाच्या सौंदर्याची उधळण आहे. निसर्ग म्हणजे काय, तो किती पहावा, किती मनात साठवावा याला पारावार नाही. समुद्राची निळाई म्हणजे कशी असावी व त्या नील समुद्राचे दर्शन डोळ्यात किती साठवावे याला सीमा नाही. पृथ्वी निर्मितीच्या वेळी, मानवाचा पृथ्वीवर प्रवेश होण्याआधी, निसर्ग कसा होता याची थोडीशी जरी कल्पना घ्यावयाची असेल, तर त्याला अंदमानलाच  यावे लागेल. अजूनही काही बेटावर अजिबात वस्ती नाही. अशा बेटावर  जाऊन भ्रमंती करणे व तो निसर्ग पाहणे म्हणजे स्वर्गीय आनंद आहे. प्रवासाचे सात दिवस कसे निघून जातात ते कळलेही नाही.अंदमान निकोबार येथील सर्व बेटांची मिळून लोकसंख्या सुमारे चार लाखांच्या  दरम्यान आहे. येथील बोली भाषा हिंदी आहे. मात्र तमिळ, मल्याळी,बंगाली, इंग्रजी या भाषाही वापरात आहेत. येथील हवामान उष्ण व दमट आहे. पाऊस जवळजवळ सहा ते सात महिने बरसत असतो. येथील वनसंपदा 85 टक्के व फक्त पंधरा टक्के भूमीवर मनुष्यवस्ती आहे. जगातील सर्व प्रकारची वनसंपदा येथे पहावयास मिळते.

       या बेटांवर पूर्वीपासून रानटी व नरभक्षक आदिम जातींचे वास्तव्य होते असा उल्लेख रोमन भूगोलतज्ञ टॉलमी यांनी नोंदविला आहे या बेटांचे  सर्वेक्षण  1790 मध्ये लेफ्टनंट ब्लेअरने स्वतः केले व तो येथे राहिला त्यानेच इंग्रज सरकारला शिफारस केली या बेटावर कैद्यांसाठी वसाहत करता येईल.  या  बेटांच्या जडणघडणीत त्यांचा  मोठा सहभाग होता व त्यामुळेच येथील प्रमुख बंदर पोर्टब्लेअर हे त्याच्या नावावरून निर्माण झाले.  हे शहर या  बेटांची  राजधानी आहे. तेव्हापासून या बेटावर मोठ्या शिक्षेचे कैदी, जन्मठेपेचे कैदी, राजकीय कैदी यांना बंदीवासात येथे डांबले जाई. त्यांचा अतोनात छळ केला जाई. या कैद्यांच्या श्रमातूनच पोर्टब्लेयर शहर, बंदरे ,येथील सेल्युलर जेल या सर्वाची निर्मिती झालेली आहे. कैद्यांनी केलेल्या अफाट मेहनतीतून इंग्रजांनी सर्व  निर्माण केले. जंगलाचा परिसर साफ करून घेतला.  येथे एकदा आलेल्या कैद्याला पुन्हा परतीचा रस्ता नव्हता. मायभूमीकडे येण्याचा मार्ग नव्हता. त्यामुळे ही बेटे व  समुद्र या सर्वांना मिळून, ” काळेपाणी “,असेच संबोधले गेले.

         “शब्दामृत प्रकाशन”,ने आयोजित केलेल्या सहलीत  सामील होण्यासाठी ऑक्टोबर   2021,मध्ये जेव्हा आम्ही प्रयत्न केला तेव्हा थोडा उशीर झाला होता. सहल आयोजकांनी आम्हाला,  विमानाचे तिकीट स्वतःकाढण्याची विनंती केली .सहलीत सहभागी करण्याचे आश्वासन दिले. त्या प्रमाणे आमची विमान तिकीटे आम्ही काढली .   शब्दामृतला तसे कळवून सहलीत सहभागी झालो. शब्दामृत ही संस्था औरंगाबाद येथे स्थापित असून श्री. शरद पोंक्षे व श्री. पार्थ बावस्कर हे संचालक आहेत. पैकी श्री. शरद पोंक्षे हे मराठी रंगभूमीवरील ख्यातनाम रंगकर्मी असून त्यांच्या, “मी नथुराम बोलतो..” या नाटकाने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवून दिली होती. हे दोघेही या एक आठवड्याच्या सहलीत सहभागी होणार होते. आमचा गट एकूण 41 लोकांचा होता. शब्दामृतचे अजून  दोन, तीन गट त्याच वेळी अंदमानात विविध ठिकाणी फिरत होते. दररोज संध्याकाळी श्री. पार्थ बावस्कर अथवा शरद पोंक्षे ,  स्वा.सावरकरांच्या विस्मृतीत जाण-या  विचारांचे, त्यांच्या त्या  काळातील दूरदृष्टीविषयी व्याख्यान  देत. आजच्या एकंदरीत परिस्थितीचा  विचार  करता त्यांच्या या प्रबोधनाची नितांत गरज आहे!

         दिनांक 3 जानेवारी रोजी पहाटे साडेचार वाजता मुंबई विमानतळावरून निघून प्रथम चेन्नई , तेथे चार तासाच्या विश्रांतीनंतर चेन्नई ते पोर्ट ब्लेअर असा दुसरा विमान प्रवास. विमानाच्या वेळा थोड्याशा अडचणीच्या होत्या परंतु या सगळ्यातून मार्ग काढत आम्ही दोघांनी सोमवारी पहाटे, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठला. आणि नियोजित विमानाची प्रतीक्षा करीत बसलो. सुदैवाने त्याच वेळी तेथे आमच्या अंदमान प्रवासातील कोल्हापूर गारगोटी येथून आलेली मंडळी प्रथम भेटली. आणि तेव्हापासूनच आमचा  सहप्रवास सुरू झाला. सौ रेणू ताई, बहीण अनुराधा, मातोश्री आणि त्यांच्या स्नेही सौ ज्योती ताई कुलकर्णी ,या मंडळींचा आम्हाला परतेपर्यंत छान सहवास लाभला. पुढे चेन्नईला नूतन ताई, विजय गोखले, यांचा सुमारे 12 जणांचा ग्रुप  आला.  खर्‍या अर्थाने तेथूनच आमची अंदमान ट्रिप सुरू झाली असे म्हणता येईल . एकाकीपणाची भावना निघून गेली.  मोठ्या ऊमेदीने आम्ही सुरवात केली. चेन्नई येथे जरी चार तास बसावे लागले तरी सहप्रवासी असल्याने गप्पांमध्ये वेळ गेला. व चेन्नई -पोर्ट ब्लेअर प्रवासही आरामात, गप्पांमध्ये पार पडला. हा प्रवास आम्ही पूर्वी  केला असल्यामुळे त्याचे काही विशेष नाविन्य नव्हते. मात्र विमानाने व तोही समुद्रावरून, प्रथम प्रवास करणाऱ्या आमच्या काही सहप्रवाशांना ही मोठी नवलाई होती. मंडळी विमानातूनच, बाहेर दिसणाऱ्या ढगांच्या मनोरम देखाव्याचे व खालील अथांग सागराचे फोटो घेण्यात दंगल झाली होती.

     पोर्टब्लेअर विमानतळावर शब्दामृत संस्थेचे श्री सोहम व यांचे दोघे सहकारी, आम्हास भेटले. त्यांनी सर्वांचे स्वागत केले. शब्दामृतची रंगीत कॅप, हॉटेल निवास, पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी जुजबी माहिती देऊन, आमच्या निवासस्थानापर्यंत ट्रान्सपोर्टची व्यवस्था केली. त्यामुळे थोड्याच वेळात विमानतळावरून,”ब्लू मरलीन”, या आमच्या हॉटेलात आम्ही पोहोचलो. विश्रांती घेतली जेवण घेतले व आता पुढील कार्यक्रमास सज्ज झालो. हॉटेल तसे काही खास नव्हते मात्र टापटीप स्वच्छता व मूलभूत सोयींनी युक्त असे होते.

    हा आहे अंदमानचा समुद्र, निळे आकाश, निळे पाणी आणि भोवताली हिरवाईचा गालीचा,. त्यात अशा सुंदर होडीतून सफर करायला मिळाली तर आनंदाला काय सीमा?? ! 

   मागे म्हटल्याप्रमाणे आमच्या टिळक ग्रुप मध्ये एकूण 41 प्रवासी होतो व त्यांची विभागणी तीन हॉटेलमध्ये केली होती. “प्रवासात व राहताना अशा छोट्या ग्रुपमध्ये मुद्दामच विभागणी केली होती”,असे आयोजकांनी सांगितले. कारण करोनाच्या प्रादुर्भावामुळे, जर कदाचित कोणाला काही संसर्ग झाला, तर त्यामुळे सहलीच्या संपूर्ण सभासदांना त्रास होऊ नये, विलगीकरणासाठी तेवढाच, एखादा ग्रुप वेगळा होऊ शकतो, अशी या मागची भावना होती. मात्र सुदैवाने संपूर्ण सहलीत असे काही झाले नाही, फक्त शेवटच्या दिवशी थोडी गडबड झाली ,ती हकीकत पुढे येईल.सर्वांचा सहा दिवसाचा हा प्रवास व्यवस्थित झाला. आनंदात ,उत्साहात मंडळी नव्या ऊमेदीने, आपापल्या घरी गेली.

       आमच्या  ‘टिळक ग्रुप’मध्ये अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंडळी आली होती. रत्नागिरी, रायगड, ठाणे मुंबई ,सोलापूर कोल्हापूर, औरंगाबाद,नाशिक  अशा विविध भागातून मंडळी सहभागी झाली होती.  वयोगटांची विभागणी तरी कशी? 86 वर्षांच्या भावे काका, बोडके आजोबा यापासून अगदी 10 ,12   वर्षाच्या अवनी, वेदांत या शाळकरी मुलांचाही सहभाग होता. आमच्यात उद्योजक, ऊच्च पदस्थ सरकारी अधिकारी, सेना दलातील निवृत्त मंडळी, प्राध्यापक, वकील, नोकरीत असलेले,  गृहिणी, व उद्योजक महिलाही सामील झाल्या होत्या. त्यामुळे हा संच अगदी आगळावेगळा व सर्व अनुभवांनी परिपूर्ण होता. सर्वांमध्ये एक गोष्ट अगदी हटके होती आणि ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचेप्रती जाज्वल्य निष्ठा व प्रेम ! त्यामुळे येथे काय ‘उणे’आहे यापेक्षा काय ‘अधिक’ आहे, याचा आनंद सर्वांना मोठा होता.  म्हणूनच आमची ही एक आठवड्याची सहल खूप आनंददायी ,यशस्वी  रंजक झाली.

      पोर्टब्लेयर, अंदमान, येथील आमचे एक निवासस्थान,” हॉटेल ब्लू मरलीन”.

     पहिल्याच दिवशी तीन जानेवारी 2022 रोजी विश्रांती व भोजन झाल्यावर ‘कारबीन्स कोव्ह’, या पोर्टब्लेअर मधील नयनरम्य समुद्र किनाऱ्यावर सर्वांनी, निळाशार समुद्र, हिरव्याकंच नारळी-पोफळीच्या बागा अशा निसर्ग सौंदर्याचा मनमुराद  आस्वाद घेतला. अजूनही हे समुद्रकिनारे बाजारीकरणापासून मुक्त व स्वच्छ  ठेवले आहेत. मात्र आता हळूहळू येथेही अस्वच्छता वाढू लागली आहे. तास-दीड तास तेथे हुंदडल्यावर, बसने सेल्युलर जेल मध्ये आलो. तेथे सायंकाळी,”लाईट अँड साऊंड”, हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला. जसा हा शो सुरू होतो तसा, त्या काळी स्वातंत्र्यवीरांवर होणारे अत्याचार, अन्याय, इंग्रजांच्या क्रूरतेची चीड यावी अशा  विविध शिक्षा, क्रांतिवीरांचे विव्हळणे, ओरडणे, त्यांचे चित्कार, वंदे मातरम आणि भारतमाता की जय या आरोळ्या.. असा चित्रपट डोळ्यासमोर सुरू होतो. हे सर्व आपल्या सहनशक्तीच्या बाहेर आहे, असेही जाणवते… अकरा वर्षे तेथील अन्यायाच्या विरोधात पाय रोवून असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांचे सर्व बंदिवान सहकारी, यांच्या स्मृतीने, मस्तक नकळतच झुकते. स्वातंत्र्यसेनानींवर झालेले अनन्वित अत्याचार आणि त्याही परिस्थितीत आपल्या मातृभूमीवरील त्यांची निष्ठा व प्रेम , त्यांनी धैर्याने केलेला सर्व संकटांचा व छळाचा सामना.. शेवटी, सर्व अत्याचाराला पुरून उरतं, “वंदे मातरम” आणि “भारत माता की जय”, या घोषणांनी…. त्यांना दिलेला, आपला प्रतिसाद … सर्व प्रसंग अंगावर रोमांच आणतात.. डोळ्यात पाणी येते.. खूपच सुंदर  कार्यक्रम पाहिल्याचे समाधान होते…

    पहिल्या दिवशी ,सेल्युलर जेलमध्ये, ‘शब्दामृत’, च्या टिळकगटाचे सहप्रवासी, प्रवेश घेताना..

   सेल्युलर जेल आज. सात शाखा पैकी आज केवळ तीन शाखा शिल्लक आहेत. मध्यभागी टोक दिसते ते मनोर्‍याचे.

   जेलर डेव्हिड बेरी आणि त्याचे साथी यांनी स्वातंत्र सेनानींवर अनन्वित अत्याचार केले. काळ्या पाण्यावर आलेल्या बंदीवानात काही खूनी दरोडेखोर होते. मात्र बहुतेक जण तरुण, सुशिक्षित असे देशभक्त होते. आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्याचे स्वप्न उराशी घेऊन ते येथे आले होते. बाबाराव सावरकर व विनायक सावरकर ही दोनच मंडळी महाराष्ट्रातून त्यावेळी येथे बंदीवान होती. दोन जन्मठेपेची शिक्षा म्हणजे पन्नास वर्षे शिक्षा झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्यावेळी बेरी मोठ्या छद्मीपणे विचारतो, “सावरकर तुम्हाला येथे पन्नास वर्षे शिक्षा भोगावयाची आहे हे लक्षात आहे ना?”. तेव्हा स्वातंत्र्यवीरांनी दिलेले उत्तर हे त्यांच्या विजिगीषू वृत्तीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यवीर, बेरीला म्हणाले होते, “हो मला ते पूर्ण माहित आहे?” मात्र पुढील पन्नास वर्षे तुझे सरकार आणि तू तरी इथे राहणार आहात का, हे तुला कुठे माहित आहे?”  महापुरुषांची वाणी ही भविष्यवाणी असते. स्वातंत्र्यवीर दहा वर्षांनी तेथून बाहेर आले. मात्र बेरी कधीच इंग्लंडला जाऊ शकला नाही. ब्रिटिश साम्राज्यही  भारतावरून नष्ट झाले.. हे सर्व ऐकत असतांना पहात असताना अभिमानाने ऊर भरून येतो.,.

   रोज सायंकाळी, भोजनापूर्वी आमच्या हॉटेलच्या टेरेसवर बसून, श्रीयुत शरद पोंक्षे किंवा पार्थ बाविस्कर यांचे प्रबोधनाचा आस्वाद..  एक छान अनुभव!

. संध्याकाळी पुन्हा आमच्या हॉटेलवर गेलो तेथे श्री. पार्थ बावस्कर यांचे भाषण झाले. त्यानंतर भोजन करून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पहिला दिवस संपला

       दुसऱ्या दिवशी चहापानानंतर आम्ही, राॅस बेटावर जाण्यासाठी हॉटेल सोडले. बसने जेट्टीवर गेलो तेथून,’ ‘सिल्वरओशन’, या बोटीने सुमारे दिड तासाच्या प्रवासानंतर रॉस आयलंड उर्फ नेताजी सुभाष द्विप, येथे आलो.  सध्याच्या सरकारने जुनी ब्रिटिशकालीन नावे बदलून भारतीय नावे दिलेली आहेत हे पाहून खूप आनंद होतो. या बेटावर सरकारने आता चांगले रस्ते  व पाणी, विजेची सोय केल्यामुळे प्रवास खूप सुखकर होतो.. काही वर्षापूर्वी झालेल्या त्सुनामीमध्ये  येथील ब-याच  महत्त्वाच्या  जुन्या  वास्तू, वाहून गेल्या . सुमारे 200 फूटावर समुद्राचे पाणी उंच गेले होते. म्हणजे एकंदर वाताहातीची कल्पना येईल. मागे आम्ही जेव्हा अंदमानात आलो होतो, तेव्हाही या बेटावर आलो   होतो. त्यावेळी येथील ब्रिटिशकालीन घरे, सैनिकांच्या बराकी, ब्रिटिश गव्हर्नरचा बंगला, क्लब हाऊस, इत्यादी  वास्तू व्यवस्थित पहावयास मिळाल्या होत्या. त्यावेळी ह्या सर्व वास्तू पाहून, तत्कालीन ब्रिटिश वैभव व बंदिवानावर अत्याचार करत असताना, स्वतःसाठी निर्माण केलेली  सुबत्ता, सुखलोलुपता, पाहून ,”नरेची केला हीन किती नर.,” या उक्तीचा प्रत्यय आला होता. आता  कालौघात त्सुनामीत ब्रिटिश राजवटीचा  वैभवशाली इतिहास वाहून गेला. “कालाच्या अती कराल दाढा, सकल वस्तूचा करिती चुराडा..” या भा. रा. तांबे यांच्या काव्यपंक्तीची आठवण झाली..आता उरले आहेत ते केवळ दगडाचे चौथरे.  काल महिमा किती अगाध असतो?…

  काही वर्षांपूर्वी बेटावर झालेल्या त्सुनामीने  जमिनीची एवढी धूप झाली, मग जमिनीवरील इमारती आणि माणसांचे काय झाले असेल?

    येथील दुसरे विशेष आकर्षण म्हणजे अनुराधा राव, या महिलेची भेट! प्राणी-पक्षी यांच्याशी या बाई संवाद करतात. आम्ही त्यांना विनंती केल्यावरून त्यांनी एक साद घातली व अनेक मोर, बुलबुल पक्षी, चितल(,हरणे) अगदी लेकुरवाळ्या कोंबड्या देखील  धावत आल्या… अनुराधाबाई याच बेटावर या प्राणी मित्रांच्या सहवासात आयुष्य घालवीत आहेत. त्यामुळे त्यांना स्वतंत्र असे अस्तित्व नाही.” प्रेम द्या व प्रेम घ्या”, हा नियम अगदी जंगली  श्वापदांनाही लागू पडतो असा त्यांचा जीवन सिद्धांत आहे. 

   बाई सांगत होत्या,”ज्यावेळी त्सुनामी झाली, त्या आधी तीन दिवस ही हरणे काहीच अन्नपाणी घेत नव्हती. लोकांना त्याचा उलगडा झाला नाही. तीन दिवसांनी जेव्हा हाहा:कार माजला , तेव्हांच त्यांच्या अन्नपाणी वर्जचा अर्थ लोकांना कळला. प्राणी, पक्ष्यांना निसर्ग माणसापेक्षा जास्त कळतो .

निसर्ग वाचणार्‍या व प्राणी मित्रांशी संवाद करणाऱ्या, अनुराधा राव यांची भेट अंदमानच्या सहलीत अवश्य घेतली पाहिजे.

     संध्याकाळी पुन्हा त्याच बोटीने आम्ही आमच्या पोर्टब्लेअरमधील हॉटेलात आलो. षण्मुगम हा बोटी मधील गाईड अनेक गमती व आम्हाला माहिती नसलेल्या अनेक  गोष्टी सांगून आमची करमणूक करीत होता, त्यामुळे  हा प्रवास मजेत झाला.  मात्र बोटीमध्ये करोना संसर्गाच्या  दृष्टीने, प्रतिबंधक उपाय तेवढे काटेकोरपणे पाळले जात नाहीत हे पाहून खूप दुःख झाले. लोक मास्क बांधतात मात्र तो नाकावर नाही, तर गळ्यात! सुरक्षित अंतराच्या बाबतीतही तीच वानवा दिसली, त्यामुळे अशा प्रवासातून संसर्गाचा धोका निश्चितच जास्त उद्भवतो. मात्र याकडे संयोजक व बोटीचे व्यवस्थापन यांनी लक्ष दिले पाहिजे. पुढे आमच्या या टिळक गटातील 2 जणांना करोनाचा संसर्ग झाला व त्यांना, विलगीकरणांत राहून त्यांचा अंदमान प्रवास वाढला.अनाठाई खर्च झाला. ही  बेफिकीर वृत्ती कारणीभूत होती. पुढील अनावस्थेची ही नांदीच होती…

    संध्याकाळी  पुन्हा सेल्युलर जेलमध्ये जमलो. ज्या 121 नंबरच्या कोठडीत सावरकरांना बंदिस्त ठेवले होते त्या कोठडीत आम्ही प्रत्येकाने एक छोटी पणती प्रज्वलित केली. तात्यारावांना, विशेष कैदी (Dangerous)) म्हणून जो बिल्ला ब्रिटिश सरकारने गळ्यात बांधला होता,  त्याची प्रतिकृती ,प्रत्येकाने आपले गळ्यांत अडकविली. 100 पणत्यांची आरास त्या संध्याकाळी तात्यारावांच्या कोठडीत करून , त्यांना सर्वांनी आगळीवेगळी मानवंदना दिली.

    हाच तो बिल्ला, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या  गळ्यात , अदमानातील बंदिवासात अडकविला गेला होता.सुटकेची तारीख बघा, 23 12 1960!,खतरनाक कैदी, (D)

   स्वातंत्र्यवीरांच्या अंदमान कैदेतून  सुटकेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने, हा विशेष कार्यक्रम शब्दामृतने आयोजित केला होता. सावरकरांची ही कोठडी, फाशीघराच्या समोरच आहे. ही योजनाही ब्रिटिशानी मुद्दाम केली होती, जेणेकरून सावरकरांना एक दहशत बसावी. मात्र याचा काही एक परिणाम स्वातंत्र्यवीरांच्या  बेडर वृत्तीवर झाला नाही. उलट त्यांना त्याही परिस्थितीत “कमला” हे महाकाव्य लिहावेसे वाटले! याला कारण, तुजसाठी मरण ते जनन. तुजविण जनन ते मरण, तुज सकल चराचर शरण!’  ही अध्यात्मिकता, रोमारोमात भिनलेला, हा आगळा  बंदिवान होता ! 

    एकावेळी तीन बंदिवानांना येथे फासावर चढवले जात असे. “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, हा जयघोष या परिसरात कितीदा निनादला असेल याला गणती नाही. शेकडो-हजारो बंदिवान येथे फाशीचा फंदा गळ्याभोवती अडकवून स्वर्गारोहण करते झाले.  त्यांच्या स्मृती ऊरल्या आहेत, त्या आठवून हे लोंबकळणारे फाशीचे दोर आज अगदी केविलवाणे वाटतात!!

   बाजूलाच असलेल्या कार्यशाळेत, बंद्यांना द्यावयाचे शिक्षेचे विविध व्यवसाय व त्यासाठी असलेली उपकरणे यांचे दर्शन घेतले. कोलू ,उर्फ तेलघाणी, काथ्या पिसणे, दिलेला कोटा पूर्ण न  झाल्यास मिळणाऱ्या विविध शिक्षांचे प्रकार,  त्यांचे सर्व प्रकारचे साहित्य  येथे आहे. ते पाहून, सर्व बंदीवानासाठी आपले हृदय हेलावते . त्यांनी एवढे ढोर मेहनतीचे काम कसे केले असेल?  या शिक्षा कशा भोगल्या असतील?  जनावरांनाही कठीण असे काम या तरुण व चांगल्या घरच्या पोरांनी कसे निभावले,  असे विचार मनात येतात. मात्र असेही वाटते की त्यांना  हे सर्व  अपेक्षित होते , त्यांनी स्वतःहून हा मार्ग स्वीकारला होता, त्यामुळे हे सर्व भोगतांना,

  “की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने.. ”  हीच त्यांची मनोवृत्ती असणार ! 

        ध्येयाने भारलेला मनुष्य  जेव्हा आपल्या मातृभूमीसाठी संग्राम करतो, तेव्हा त्याला जगण्याची पर्वा नसते . मृत्यूचे भय ही नसते. अत्यंत बलाढ्य शत्रूदेखील अशा वीरांपुढे हतबल होतो. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील सेनानी हे अशा ध्येयवादाचे प्रतीक आहेत. काही निशस्त्र होते तर काहींनी शस्त्र घेऊन रणांगणात प्रवेश केला होता. काही आपल्या कार्यात धारातिर्थी पडले. काही शत्रूच्या गोळ्यांना बळी पडले. काही फासावर गेले. आणि सर्व जण आपल्या हौतात्म्याने हिंदुस्थानच्या  इतिहासात अजरामर झाले. त्यातील इंग्रजांच्या हाती जिवंत सापडलेल्या आणि अभियोग दाखल होऊन जन्मठेपेसाठी पाठविले गेलेले अंदमानच्या काळ्यापाण्यावर आले. स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांच्या अशा अनेक क्रांतिकारक सहकाऱ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या अंदमानात, या वीरांनी एक नवे पर्व निर्माण केले. त्यांना येथे साखळदंडाने जखडून टाकल्यावर आपण जिंकलो असे इंग्रजांना वाटू लागले. मात्र तेथेच इंग्रजांचा पराभव झाला.  या क्रांतिवीरांनी अंदमानात एक नवा इतिहास घडविला. त्यांना वंदन करणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे.

   सेल्युलर जेलमध्ये लावलेल्या,  तत्कालीन बंदिवानांच्या यादीत अग्रभागी असलेल्या तीन नावांपैकी दोन सावरकर बंधू, मात्र तिसरे, श्री दाजी नारायण जोशी यांना आम्ही विसरलो का?

        श्री. दाजी नारायण जोशी यांच्याविषयी मला काहीच माहिती नव्हती. कोणी माहिती दिली नाही. म्हणून मी त्यांच्या चरित्राचा शोध घेतला. आणि मिळालेली माहिती मला सुन्न करून गेली. त्यांच्याविषयी येथे थोडे लिहिणे मला अगत्याचे वाटले… या लेखाची शेवटी छोटी पुरवणी म्हणून ती माहिती मी लिहिली आहे. अंदमान सफारी वर्णन करीत असताना, दाजींना अभिवादन करणे माझे कर्तव्य समजतो. म्हणूनच, लेख विस्ताराचा दोष पत्करूनही त्यांची  ही माहिती मी शेवटी  लिहिली. मला ही खूप समाधान वाटते आहे.

       येथे आलेले बंदीवान, डाकू वा दरोडेखोर नव्हते. तर राजद्रोहाचा आरोप असलेले राजकीय कैदी होते.  इंग्रज सरकारची नीती त्यांना एखाद्या खुनी दरोडेखोराप्रमाणे वागविण्याची होती. त्या वागणुकीला विरोध करण्यासाठी , मृत्यूच्या भयापासून मुक्त असलेल्या अंदमानच्या वीरांनी मे 1933 मध्ये आमरण उपोषणाला प्रारंभ केला. तसेही मरणारच आहोत तर छळाने पिचून मरण्यापेक्षा आमच्या मर्जीने, ताठ मानेने मरू ,हा त्यांचा निर्धार होता. हुतात्मा जतीन दास आणि हुतात्मा महेंद्रनाथ बॅनर्जी यांनी याआधी ते करून दाखविले होते. अंदमानच्या या पर्वात एकाहून एक असे महान क्रांतिकारक उतरले होते. हुतात्मा महावीर सिंह, जयदेव कपूर, कमलनाथ तिवारी, मोहित मित्र, मनकृष्ण नामदास, बटुकेश्वर दत्त, विजय कुमार सिन्हा, शिव वर्मा, गयाप्रसाद, अंबिका चक्रवर्ती, गणेश घोष ,अनंत सिंग, आनंद गुप्त  असे धुरंदर त्यात होते. इंग्रज सरकारने हे आंदोलन चिरडण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र स्वातंत्र्यवीरांचा जबरदस्त प्रतिकार आणि मनोनिग्रह यामुळे अखेर इंग्रज सरकारला हार स्विकारावी लागली. “की तोडीला तरू फुटे आणखी भराने”, या उक्तीला अनुसरून जुलमी सरकारला अखेर माघार घ्यावी लागली. अंदमानचे, नरक अथवा छळछावणी, असे स्वरूप त्यामुळे नष्ट झाले.

     समोरील उद्यानात  स्वातंत्र्यवीर व त्यांच्या काही सहकाऱ्यांचे पुतळे उभे केले आहेत. तेथे देशभक्तीपर गीतांचा सामूहिक गायन कार्यक्रम झाला. जयो स्तुते, ने मजसी ने, वंदे मातरम  ही गीते आम्ही सर्वांनी स्वातंत्र्यवीरांच्या  पुतळ्यासमोर विनम्र होत गायली. तिथून आमच्या हॉटेलवर आलो. रात्री श्री. शरद पोंक्षे यांचे प्रबोधन झाले.

   तिस-या  दिवशी सकाळीच, (5जाने,022), 4.30 वा,आम्ही हॉटेल सोडले व जेटीवर येऊन एका क्रुजने , सुमारे दोन-अडीच तासांचा प्रवास करून, हॅवलाॅक, (स्वराज्य द्विप),या बेटावर आलो. बोटीवर प्रवेश घेण्याआधी विमानतळावर जे सोपस्कार करावे लागतात , तसेच सर्व सोपस्कार, जसे की सामानाची व स्वतःची तपासणी, तिकीट, आयकार्ड लसीकरण सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे दाखविणे, हे सर्व झाल्यावरच बोटीत प्रवेश मिळतो. करोना प्रादुर्भावामुळे, प्रवाशांच्या संख्येवर विशेष परिणाम झालेला दिसत नाही. भरपूर प्रवासी व अतिशय बेफिकीर नियंत्रण . प्रवास दोन-अडीच तासांचा आहे. अंदमानच्या समुद्रातून प्रवास सुखकर वाटतो. प्रत्येक वेळी हॉटेलमधून सामान काढणे ते टेम्पोत भरणे, तिथून बंदरावर आणून बोटीवर चढविणे व बोटीवरून उतरतांना, नव्या हॉटेलवर पोहोचेपर्यंत पुन्हा उलटा प्रकार .. ही सगळी यातायात आम्हासारख्या ज्येष्ठ नागरिकांना खूपच त्रासदायक होते. शिवाय रणरणत्या उन्हात बोटीच्या प्रवेशासाठी रांगेत उभे राहणे त्रासदायक! संयोजकांनी याबाबतीत थोडे लक्ष घातले तर ही यातायात थोडी कमी कष्टदायक होईल असे वाटते.

  राधानगरी,अंदमान, एक निसर्गरम्य समुद्र किनारा.

     हॉटेलमध्ये सामान सोडल्यानंतर तसेच व सरळ राधानगरी या आशिया खंडातील नंबर दोनच्या ,मोठ्या ,सुंदर समुद्रकिनाऱ्यावर आलो. तेथे सर्वांनी बरीच भ्रमंती केली. मला तरी येथे काही विशेष असे वाटले नाही. या किनाऱ्यावर काही जुने जपानी बंकर्स अजूनही सुस्थितीत आढळून आले. हे बंकर म्हणजे सैनिकांना सुरक्षितरित्या शत्रूचा मुकाबला करता यावा म्हणून बांधलेली संरक्षक घरे आहेत. जपानी इंजीनियरिंग व स्थापत्यशास्त्राचा हा एक उत्तम नमुना आहे. आजही आपण आत शिरून , तळघरात जाऊन,  रचना व आंतील सोई  याचा अंदाज घेऊन , त्यांच्या बुद्धिमत्तेला सलाम करतो. आमच्या फ्रान्समधील भ्रमंतीच्यावेळी तेथील नॉर्मंडी किनाऱ्यावर असलेले, जर्मन सेनापती रोमेल याने बांधलेले बंकर्स आम्ही पाहिले होते ते अगदीच अजूनही सुस्थितीत आहेत. तोदेखील जर्मन स्थापत्यशास्त्र व संरक्षण सिद्धता यांचा एक उत्कृष्ट नमुना आहे. येथील रचना, सुविधा व तंत्रज्ञान पाहून बुद्धी अचंबित होते. मला तेथे नॉर्मंडीची आठवण झाली .

   राधानगरी समुद्रकिनार्‍यावरील अजूनही सुस्थितीत असलेल्या जपानी बंकर्स पैकी 

       आज 6 जाने 022, नील आयलंड, म्हणजे शहीद द्विपची, भेट. तोच सर्व सोपस्कार. सकाळी उठून सामाना सहित हॉटेल सोडणे ,बंदरावर ऊन्हात रांगा  लावून, सामान चढवणे बोटीत कागदपत्रे दाखवून प्रवेश घेणे आणि दोन तासाचा प्रवास.. हे खरेतर आता थोडे अतीच झाले आहे.’ “हॉटेल आर के इको”,,व्यवस्थित वाटले. आराम करून ब्रेकफास्ट वगैरे केला.सकाळी बस मधून सीतापुर समुद्रकिनारा.येथे काही जलक्रीडा प्रकार उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात, जसे की बंगी जंपिंग साठी सुमारे साडेचार हजार रुपये, स्नोरकेलींग व कोरल दर्शनासाठी चार हजार रुपये, काचेचा तळ असणार-या  बोटीतून प्रवासासाठी आठशे रुपये इ….. आम्ही काचेचा तळ असणाऱ्या बोटीचा प्रवास पसंत केला. मागील अंदमान प्रवासावेळी आम्ही हे केले होते. त्या वेळेचा अ नुभव व आनंद काही वेगळाच होता. या वेळी शंभर दीडशे फूट आत नेऊन, समुद्रतळाचे छोटे दगड व  चिटुकले मासे दाखविले. पूर्वीच्या ट्रीपमध्ये आम्ही सुमारे दीड किलोमीटर समुद्रात गेलो होतो व समुद्रतळाशी बसलेले मोठी मोठी कासवे व कोरल भोवती फिरणारे रंगीबेरंगी माशांचे विविध, प्रचंड थवे पाहून अचंबित झालो होतो. जाऊ द्या ..तुलना करण्याने आताचा आनंद कशाला घालावा. 

  काचेचा तळ असलेल्या बोटीतून कोरल्स व समुद्रतळ पाहण्यासाठीची सफर.

      तेथून एका खानावळीत शाकाहारी भोजन घेतले. इतर मंडळी पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर भ्रमंतीसाठी गेली .आम्ही मात्र आमचे हॉटेलवर परत आलो.विश्रांतीची गरज होती. थकवा जाणवू लागला होता व काळजी घेणे आवश्यक होते. आम्ही दोघे व सौ. ज्योती ताई, एका दुसऱ्या गटाच्या बस मधून हॉटेलवर जाण्यास निघालो. सोहमने ड्रायव्हरला, आमच्या हॉटेलवर आम्हास सोडण्याची सूचनाही दिली होती. मात्र सोडताना ड्रायव्हरने आम्हाला इंगा दाखवला. आमचे हॉटेलवर सोडण्याऐवजी रस्त्यातच आम्हाला उतरविले व व्यवस्थित मार्गदर्शनही न करता तो बस घेऊन निघून गेला. आम्ही दोघे व सौ.कुलकर्णी.   सुदैवाने आम्हाला दोन वाटसरू  भेटले. वाटसरू कसले ते देवदूतच वाटले. त्यांनी रिक्षा बोलविली, आम्हाला हॉटेलमध्ये  पोहोचविण्याची मेहरबानी केली. ही माणसे भेटली नसती तर थोडा अवघड प्रसंग होता. संध्याकाळची वेळ होती प्रदेश अज्ञात होता व आम्हाला आमचे हॉटेलचा पत्ताही माहीत नव्हता. आमचे मोबाईल फोन ही नेटवर्क नसल्याने चालत नव्हते.  खरोखर अशावेळी देवावरचा विश्वास वाढतो. या जगात जशी स्वार्थी, आपमतलबी माणसे आहेत, तशीच चांगली ,परोपकारी, सज्जन असतात.      

  सीतापुर येथे ज्या शेतकऱ्याने जेवण दिले , त्याने पिकविलेला हा मळा. कोकणची आठवण करून देतो.

  आज सात जानेवारी. आमच्या सहलीचा  पाचवा दिवस. सकाळीच नाष्टा करून हॉटेल सोडले व पुन्हा एकदा तेच सर्व सोपस्कार करून, सामान घेऊन क्रूजसाठी जेटीवर आलो. त्याआधी नॅचरल बीच या जवळच्याच किनार्‍यावर एक नैसर्गिक,  भव्य दगडी कमान पाहून आलो. पाऊस, वारा, व समुद्राच्या पाण्याच्या माऱ्याने, डोंगराचा एक कडा पोखरून  ही कमान तयार झाली आहे. जाण्याचा रस्ता अतिशय कठीण, दगड धोंड्यातून, चिखलातून होता. चालतच जावे लागले. व परत येऊन आमच्या बसमधून जेट्टी पर्यंत प्रवास केला. आता शहीदबेट ते  पोर्ट ब्लेअर हा परतीचा अडीच तासाचा प्रवास सुरू झाला.

   सितापूर समुद्रकिनारा ,अंदमान, येथील नैसर्गिकरित्या तयार झालेली ही दगडाची भव्य कमान.

   बराच वेळ उन्हात उभे राहणे आणि  सतत फिरणे यामुळे त्रास झालाच. दुपारी बाराच्या सुमारास आमच्या  हॉटेल,” ब्लू मरलीन”, वर आम्ही आलो. विश्रांती घेतली. जेवण घेतले. मंदाने हॉटेलवरच विश्रांती घेतली.  मी ग्रुप बरोबर ‘चिडिया टापू’, येथील समुद्रकिनार्‍यावर फिरून आलो. खरंतर नाव चिडिया टापू आहे, एकही चिडिया काही दिसत नाही. पूर्वी कधीतरी असाव्यात. समुद्रकिनारा सुंदर आहे. कडेला छोट्या टेकड्या असून त्यातून फिरण्यासाठी पायवाटा जंगलात जातात. संध्याकाळचे वेळी कोणी सोबत नसताना, असे जंगलात फिरणे मला तरी ठीक वाटले नाही. चिडीया टापू बेटासमोरच समुद्रात दुसरे एक छोटे बेट आहे. समुद्रातील या बेटावरील  डोंगरामागून सूर्यास्त पाहणे एक गंमत असते. निळ्याशार समुद्रात हिरवे बेट, त्या हिरव्या बेटा मागून,हळूहळू खाली सरकणारा सोन्याचा गोळा.. निसर्गाची किमया. ते पाहण्यासाठी लोक येतात. सूर्यास्त पाहून पुन्हा हॉटेलवर आलो . जेवण करून आराम केला.

   आज आठ जानेवारी,  फिरतीचा शेवटचा दिवस.पोर्ट ब्लेअर पासून दोन अडीच तास बस प्रवासाने लोक बारटांग या बेटावर जाणार आहेत. येथे  आदिम जमातीची वस्ती आहे. दीड एक किलोमीटर चालत जावे लागते.  निसर्ग चमत्काराने तयार झालेल्या  लवणगुंफा(salt caves),पहाणार  आहेत. आम्ही अनेक ठिकाणी अशा गुंफे पाहिल्या असल्याने आम्हाला आकर्षण नव्हते.  विश्रांतीची गरज होती. क्षार युक्त पाणी खालील गुंफेच्या पोकळीत सतत झिरपत रहाते. झिरपणाऱ्या पाण्याची हळूहळू वाफ होते. क्षार  घट्ट होत जातात. कालांतराने ते मोठे होतात त्यांना विविध रंगाचे, विविध कृत्रिम आकार येतात. रंगीबेरंगी स्फटीक खूप छान दिसतात. ती निसर्गाची लेणी वाटतात. पाहताना मोठी गंमत वाटते.बारटांगा बेटाची भेट ही एक आगळीवेगळी भेट असते.  त्यासाठी सरकारी खास परवानगी लागते. आदिम, जंगली वस्ती जवळ असल्याने थोडे धोकादायक हि असते.  रात्र होण्याचे आधी येथून परतावे लागते. मंडळींनी सफर खूप एन्जॉय केली असे कळले. 

  बारटांग बेटावरील या लवणगुंफा पाहण्यास आम्ही गेलो नाही. कारण इतरत्र आम्ही त्या पाहिल्या होत्या. व विश्रांतीची  

     बेटावर प्रवेश देतेवेळी, ज्या प्रवाशांकडे संपूर्ण लसीकरणाचे सर्टिफिकेट नव्हते, त्यांची तात्काळ,’करोना टेस्ट’,( Antigen test),घेतली गेली. दुर्दैवाने त्यात  वेदांत  पॉझिटिव्ह मिळाला. आणि त्यामुळे त्यांच्या बरोबरीच्या बसमधील   सहप्रवाशांना  प्रवेश मिळाला नाही .  हॉटेलवर येऊन त्याच्या आईसह विलगीकरणांत  राहावे लागले.त्यांचा मुक्काम आठ दिवस लांबला. शब्दामृतच्या सहकार्य व मार्गदर्शनामुळे व्यवस्थित आपल्या घरी पोहोचली ,हा त्यातला आनंदाचा भाग.

, संध्याकाळी श्री. पोंक्षे यांचे  सहलीतील  अखेरचे भाषण होते. सर्वांचा निरोप घ्यावयाचा होता . त्यांनी समारोप करताना, “यापुढे तरुण, व विद्यार्थी वर्गासाठी  आम्ही  खास अंदमान सहली काढणार आहोत, त्या करिता आम्हाला सहकार्य करा”, अशी अपेक्षा केली. खरोखरच हा एक चांगला उपक्रम असेल. या देशातील तरुणाईला सावरकर व अंदमान म्हणजे काय, व स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढीने केलेल्या अमाप त्यागाची जाणीव होण्यासाठी, हे खूप आवश्यक आहे. आमचा गतकालीन दिव्य वारसा, भावी पिढ्यांना  कळावा ही अपेक्षा असेल तर आजच्या तरुणाईला सावरकर आणि सर्व स्वातंत्र्य सैनिक यांच्या महान त्यागाची कल्पना आलीच पाहिजे. 

    आता उद्या विमानतळावरून मुंबईचा प्रवास सुरू होईल. दुपारी हॉटेलवरच असल्याने, उद्याच्या विमान प्रवासासाठी वेब चेकींग , बोर्डिंग पास, इत्यादीही सोपस्कार पूर्ण केले.  सामानाची व्यवस्थित बांधाबांध करून ठेवली होती.

  राधानगरी बीच वर एका निवांत स्थळी , मित्रांनी आग्रह करून, घेतलेला फोटो.

        आज नऊ जानेवारी आमच्या अंदमान सहलीचा शेवटचा दिवस. आता सर्वजण आपापल्या, ठरवलेल्या कार्यक्रमाप्रमाणे परतीच्या प्रवासास लागतील. आपल्या मुक्कामी जातील . मागे म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या अनेक भागातून, लांबचे प्रवास करीत, मंडळी अंदमानला आली . त्यामानाने आम्ही भाग्यवान. मुंबई विमानतळ घराजवळ असल्याने जास्त दगदग झाली नाही. मात्र गारगोटी- कोल्हापूर’अथवा देवरूख-चिपळूण, सारख्या ठिकाणाहून आलेल्या मंडळीला, अनेक टप्प्याटप्प्याने प्रवास करत मुंबई विमानतळ गाठावा लागला. पुढे चेन्नई वा बेंगलोर वा कलकत्ता व शेवटी पोर्टब्लेअर. जातांना ही अशाच टप्या टप्प्याने जावे लागणार.

   आम्ही सुमारे नऊ जण सकाळी सव्वा दहा वाजता विमानतळावर येण्यासाठी निघालो. पोर्ट ब्लेअर ते मुंबई असा सर्वांचाच प्रवास, मात्र निरनिराळ्या विमान कंपन्यामार्फत होता. आमच्या, पोर्ट ब्लेअर ,चेन्नई, मुंबई या प्रवासासाठी आम्ही एकूण सहा जण होतो. सर्व सोपस्कार विना विलंब झाले. विमान ही वेळेवर सुटले.”गो एअर”कंपनीचे हे विमान चेन्नईला फक्त अर्ध्या तासासाठी थांबणार होते. तेही खूप बरे झाले. विलंब झाला नाही. चेन्नई मुंबई प्रवास सुखरूप रित्या पार केला. बरोबर साडेतीन वाजता मुंबई हवाई अड्ड्या वर आमचे विमान उतरले. एक ,दगदगीचा व कोरोना काळांतील असल्याने, जोखमीचा हा प्रवास, आम्ही  पूर्ण केला. परमेश्वराची कृपा होती व स्वातंत्र्यवीरांचे आशीर्वाद होते अशीच आमची भावना आहे. या  प्रवासाने, अतीव समाधान व आत्मसन्मानाची भावना मिळाली हे मात्र खरे!

      ज्यावेळी आम्ही हा प्रवास ठरविला त्यावेळी ऑक्टोबर 021,मध्ये करोनाचे संकट कमी होत चालले होते . मात्र जानेवारी 022,उजाडला, आणि या संकटाने पुन्हा रौद्र रूप धारण केले. तरीही आम्ही  हिंमत केली. खूप सुहृदांनी आम्हाला न जाण्याचा सल्ला दिला होता. आम्ही  देवावर भरोसा ठेवला व निघालो. प्रवासादरम्यान थोडे काळजीचे प्रसंग आले, मात्र थोडक्यात निभावले म्हणून बरे झाले.

   या प्रवासातील काही संस्मरणीय गोष्टी शेवटी सांगावयाच्या म्हटल्यास त्यात सेल्युलर जेलचा पावन परिसर, ‘लाईट अन साऊंड’शो तसेच अजूनही निसर्गाचा पुरेपूर वरदहस्त असलेल्या अंदमानची  अविस्मरणीय निसर्ग  यांचा प्रामुख्याने उल्लेख होईल.

    क्रांतिवीरांच्या आयुष्यावर आधारित अविस्मरणीय लाईट अँड साऊंड शो तत्कालीन छळ छावण्या व क्रांतिवीरांचा दुर्दम्य आशावाद तसेच भारतमातेवरील त्यांच्या अविचल निष्ठेचे प्रत्यक्ष दर्शन घडवितात!! ब्रिटिश कालीन राजधानी रॉस आयलंड, नॉर्थ बे आयलँड, कोरल्स, स्कुबा डायविंग अशा अनेक गोष्टी इथे अनुभवता येतात स्वच्छ निळेशार पाणी असलेले , आशियातील दोन नंबरचा बीच राधानगरी बीच पाहून मन प्रसन्न होते. पोर्ट ब्लेअर शहर बाराटांग स्पीड बोट सफारी रस्त्यावरील जारवा जातीच्या आदिम लोकांचे दर्शन अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. वेळेअभावी सर्वच ठिकाणांना भेटी देणे शक्य होत नाही पण ज्याला जेवढे पाहता येईल त्यांनी पाहून घ्यावे.

   या अंदमान जेलच्या निर्मितीचा इतिहासही मोठा क्लेशकारक आणि ध्यानात ठेवण्याजोगा..हा जेल सबंध जगात प्रसिद्ध आहे. जेलचा  वेगळा इतिहास आहे. अठराशे 96 ते 1906 या कालखंडामध्ये काळ पाण्याच्या कैदेवर आणलेल्या बंदीवानांनीच तो बांधून पूर्ण केला. एक हिंदी गाणे आहे ना,” जिस का जूता, उसी का सर..” तशीच ही कहाणी. .. आजही ही वास्तू समुद्रकिनारी,एकाद्या पहारेक-याप्रमाणे उभी आहे. सुरुवातीला या जेलचे एकूण सात विंग होते आज फक्त तीन विंग शिल्लक आहेत . जपानी बॉम्ब वर्षावात काही नष्ट झाले.  प्रत्येक विंगवर एकूण तीन मजले आहेत. सर्व सात विंग करिता, मध्यभागी  एकच निरीक्षण टॉवर आहे.एकूण 698 एकांत  कोठड्या आहेत. कोणत्याही एका कैद्याला दुसऱ्या कैद्याची संपर्क साधता येणार नाही अशी त्यांची जडण आहे. म्हणून त्याला,” सेल्युलर जेल”, हे नाव दिले गेले. प्रत्येक कोठडी 13 फूट लांब 7 फूट रुंद आहे.10 फूट उंच आहे. कोठडीचा दरवाजा आतून ऊघडणे किंवा कुलूप तोडणे शक्यच नव्हते. हवेसाठी फक्त एक छोटीशी खिडकी आहे. कोठडी समोर,चार फूट रुंदीचा व्हरांडा आहे. फक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कोठडीला दोन दरवाजे आहेत, तेही मुद्दाम त्यांच्यावर खास पाळत ठेवण्यासाठी… सेल्युलरजेल , परिसर व स्वातंत्र्यवीरांना, नाउमेद, नामशेष करण्यासाठी ब्रिटिशांनी योजलेल्या अनेक क्लृप्त्या, अघोरी शिक्षांचे प्रकार   पाहिल्याशिवाय, त्यांच्या त्यागाचे महत्त्व कळणार नाही!!

     आमच्या सहलीचे आयोजक श्री.शरद पोंक्षे व श्रीयुत पार्थ बाविस्कर यांनी त्यांच्या रोजच्या प्रवचनात, सेल्युलर जेल ,स्वातंत्र्यवीर सावरकर, सावरकरांच्या रचना, बंदिवान त्यांच्या हालअपेष्टा, विशेषतः सावरकर कुटुंबीयांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान,  या विषयावर खूप उपयुक्त अशी प्रवचने दिली.  बरीच  अज्ञात माहिती कळली. 

  बेटावर मिळणाऱ्या अगणित नारळांचा उपयोग करण्यासाठी, अशा कोलूच्या घाण्यात ,नारळाचे तेल बंदीवाना मार्फत काढले जाई.

  रात्रीच्या वेळी संध्याकाळी पाच ते सकाळी सहा पर्यंत कैद्यांना एक छोटे मातीचे भांडे दिले जाई. ते फक्त एक वेळच्या मलमूत्र विसर्जनासाठी उपयोगात येत असे. त्यामुळे ही काल कोठडी म्हणजे दुर्गंधीचे साम्राज्य होते. रात्री शौचास परवानगी नसे.  प्रमुख जेलर बेरी हा क्रूरकर्मा होता. त्याच्या मनात जे येईल तसे तो करी. प्रत्येक कैद्याला घाण्यावर दिवसभरात पंधरा किलो तेल काढावे लागे. यासाठी कैद्यांना बैलाप्रमाणे घाण्याला जुंपले जाई. तेवढे तेल काढले नाही तर, खांबाला बांधून चाबकाने फोडले जाई. क्रांतिकारकांच्या गळ्यापासून पायापर्यंत साखळदंड बांधले जात. त्यामुळे त्यांना नरकयातना म्हणजे काय, याचा जेलमध्येच अनुभव घ्यावा लागे.

   बंदीवानांनी, रोजचे दिलेले कोलूचे काम थोडे जरी अपूर्ण ठेवले तर, अशाप्रकारे उघड्या अंगावर,आसुडाचे फटके मारून शिक्षा दिल्या जात.

      जेलर बेरी हा अतिशय क्रूर व दयेचा लवलेशही नसलेला अधिकारी होता. तो कैद्यांना म्हणे, “या जगात दोन देव आहेत. एक या पृथ्वीवर व दुसरा नरकात. त्यामुळे मी पृथ्वीवरील देव जे तुम्हाला सांगेन तेच करावे लागेल. तुम्ही करा अथवा मरा!”

     तुरुंगातील जेवण अतिशय घाणेरडे असे. जळक्या रोट्या, आमटीत पाणी, पाण्यावर तरंगणारे किडे , जेवण ही अगदी अल्प दिले जाई. पाणीही बेतानेच देत. नाहीतर कोठडीत संडास व लघवी झाल्याशिवाय राहात नसे. जेवण म्हणजे एक शिक्षाच होती. फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांना, फाशी देण्याचा कार्यक्रम सर्वांसमक्ष होई. एका वेळी तीन कैद्यांना फाशी दिले जाई. व त्याला वीस फूट खोल खड्ड्यात खाली पाडले जाई. नंतर त्याचा मृतदेह मागे असलेल्या समुद्रात माशांना खाण्यासाठी फेकून दिला जाई. आजही ही इमारत तेथेच आहे.  इंग्रज शासनाविषयी आजही चीड निर्माण होते. असा हा सेल्युलर जेलचा इतिहास पाहिल्यानंतर आपली भारतभूमी आम्हाला का प्रिय असली पाहिजे. याचा मनोमन विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात आल्याशिवाय राहात नाही.

वंदे मातरम, इन्किलाब जिंदाबाद , या घोषणा, एकाच वेळी, तीन कंठा मधून कितीदा  दुमदुमल्या, याचा हिशोब केवळ हे फाशीचे दोर देऊ शकतील..

       स्वातंत्र्यवीरांच्या अनेक स्फूर्तिदायक कथा ऐकल्या त्यांच्या पदस्पर्शाने पावन परिसराला वंदन केले. भेटलेल्या अनेक  सह प्रवाशांच्या आठवणी घेऊन घरी आलो. 

      आजच्या संकटकाळात,  जगण्याच्या जिद्दीची प्रेरणा मिळाली. ही जगण्याची जिद्दच, आपल्या जगण्याचा हेतू सबळ करेल. पुन्हा लवकरच, यातून बाहेर येऊन, उमेदभरल्या मनाने आयुष्याची वाटचाल करू…

     आम्ही मराठी माणसे अंदमानच्या सफरीवर जातो ते केवळ पर्यटन म्हणून जातो का? नाही. भारतीय माणसाच्या, विशेषत: मराठी माणसाच्या अंदमान यात्रेला एक वेगळा असा संदर्भ आहे. राष्ट्रभक्तीचे व्रत घेतलेल्या असंख्य क्रांतिवीरांनी, भारतभूमीच्या स्वातंत्र्य संग्रामात, हसत-हसत आपल्या प्राणांच्या आहुती दिल्या. फाशीचे दोर आनंदाने आपल्या गळ्यात अडकवून घेतले. त्यांचे संसार घरेदारे उद्ध्वस्त झाली. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी आमच्या स्वातंत्र्य सैनिकांना छळण्यासाठी येथे छळछावणी उघडली होती. जेथे अनेक क्रांतिवीर, यमयातना भोगीत भारत मातेचे स्वातंत्र्य  गान गात होते. या सर्वांचे महामेरू, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनीही याच सेल्युलर जेलमध्ये आपल्या आयुष्याची अकरा वर्षे व्यतीत केलेली आहेत. त्यांच्या देशसेवेला सीमा नाही. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगीत आहोत ते केवळ आणि केवळ या राष्ट्रवीरांच्या आत्मसमर्पणामुळेच होय. या वीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या  भूमीला वंदन करावे व स्वातंत्र्यवीरांनी आमच्यावर केलेल्या उपकाराची , ही कृतज्ञतेची भावना भारतवासी यांच्या मनात येथे येताना असते. त्यामुळेच आम्ही दुसऱ्यांदा हा अंदमान चा प्रवास केला.अंदमान हे आमच्यासाठी एक राष्ट्रीय तीर्थस्थल आहे.

    या शक्तीपीठ अंदमानची अधिष्ठात्री देवता म्हणजे ,स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! आमच्या सहप्रवासी सौ ज्योती ताई कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वर केलेली ही छोटी कविता आपणा सर्वांच्याच मनांतील भाव -भावना सांगून जाते. ती येथे उद्धृत केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही, असे वाटते.

     “हजारो तलवारींचे शौर्य

लाखो सुमनांची कोमलता

कोट्यवधी सूर्यांचे तेज

          ……….म्हणजे वीर सावरकर.

मातृभूमीप्रती प्रखर निष्ठा

जाज्वल्य हिंदू राष्ट्रवाद

देशाचा ज्वलंत अभिमान

          ……….म्हणजे वीर सावरकर

एकाच वेळी दोन जन्मठेप

मार्सेलिसची सागरझेप

अंदमानातील काळे पाणी

          ……….म्हणजे वीर सावरकर

कष्टमय सेल्यूलर जेल

कोलूच्या अपार यातना

कोठी नं. 121 च्या भिंती

          ……….म्हणजे वीर सावरकर

कोळसा काट्यांची लेखणी

कमला महाकाव्य लेखन

तोंडपाठ दहा हजार ओळी

         ……….म्हणजे वीर सावरकर

जातीभेद निर्मूलनाचे व्रत

स्त्रियांना समान अधिकार

विज्ञानाचे सच्चा भक्त

          ……….म्हणजे वीर सावरकर

एक कवी, साहित्यिक एक

एक वकील, क्रांतीकारी एक

एक वक्ता, समाजसुधारक एक

          ……….म्हणजे वीर सावरकर.”

ज्योती ताईंना मनःपूर्वक धन्यवाद!?

    आमच्या प्रमाणे अशी अनेक मराठी ,भारतीय माणसे या भावनेने तेथे जात असतात. स्वातंत्र्यवीरांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या त्या भूमीला वंदन केल्यावर ,एक आत्मिक समाधान मिळते. स्वातंत्र्यवीरांच्या कोठडीत, एक पणती प्रज्वलित केली.  बाहेरच्या उद्यानात असलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्यासमोर,”जयोस्तुते..” चा उद्घोष  केला…  या आमच्या नेहमीच्या जगात आल्यानंतर वाटतं ,”स्वतंत्रते भगवती “च ,व्हावं तसं चीज अजूनही झालेलं नाही..,तो इतिहास जगलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या हौतात्म्याचे आज  चीज झालेलं दिसत नाही… त्यांच्या  संकीर्तन करणाऱ्या माझ्यासारख्या अनेक सामान्य भारतीय माणसाची आज हीच भावना असेल….

  भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात लढलेल्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात वीरांना पुनः पुनः वंदन करून हे लिखाण संपवतो. जय अंदमान,जय,हिंद.???

दाजी उर्फ वामनराव नारायण जोशी, अंदमानातील बंदी काल 1909 ते 1921.

अंदमानातील स्वातंत्र्यवीरांचे नावाची पाटी सहसा कोणी वाचत नाही. वाचली तरी त्यातील पहिले नाव, वामन नारायण जोशी कोणाच्या ध्यानात ही राहत नाही. त्यांचा त्याग  केवळ अद्वितीय आहे. म्हणून दाजीविषयी,लेखाचे शेवटी, एक मानाचे  पान, दाजींसाठी.. .

 बंदिवानाच्या यादीतील पहिली तीन नावे बाबाराव सावरकर तात्याराव सावरकर व वामनराव जोशी उर्फ दाजी, ही तीनही नावे वंदनीय आहेत. वास्तविक दाजी (वामनराव) हे सावरकर बंधूंचे शिष्य; शिष्य कसले ते भक्तच होते. तरीही त्यांना हा मान मिळाला. कारण, त्यांनी केलेले कृत्य हे दशकातील शतकृत्य होते.

   त्यावेळी १९०९ साली विल्यम नावाच्या मग्रूर अधिकार्‍याने, आपल्या घोडागाडीला पुढे जाऊ दिले नाही, या क्षुल्लक कारणासाठी एका गरीब गाडीवानाला लाथाबुक्क्यांनी तुडवून ठार मारले. त्याच्यावर ब्रिटिश सरकारने काहीच कारवाई केली नाही. तो मुजोर तोंड वरकरून शहरात फिरत होता. हे सळसळत्या रक्ताच्या सावरकर भक्तांना कसे सहन होणार?

 . नाशिकमध्ये असंतोषाचा आगडोंब उसळला. मग ब्रिटिश सरकारने खटला भरल्याचे नाटक केले. तो आरोपी निर्दोष सुटला आणि नाशिकमध्ये हिंडू लागला.

        वरील सर्व कारणांमुळे सावरकर शिष्यांचा भडका उडाला. त्यावेळी नाशिकचा कलेक्टर होता जॅक्सन. तोच या सर्व अत्याचाराला जबाबदार होता. अत्याचारांची हद्द झाली होती. म्हणून ब्रिटिश शासकांना हे दाखवून देणे गरजेचे होते की, आम्ही भारतीय बुळचट नाही. देव, देश आणि धर्माचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. म्हणून जॅक्सनचा वध करण्याचे निश्चित झाले.

    २१ डिसेंबर, १९०९ रोजी विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे या कोवळ्या मुलाने (वय १७) जॅक्सनचा वध केला. हा वध म्हणजे ब्रिटिश साम्राज्याला मारलेली सणसणीत थप्पड होती.

   अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे यांना जागेवरच अटक झाली. कृष्णाजी कर्वे तेथून निसटले, पण पुढे पकडले गेले.  त्याचदिवशी वामनराव उर्फ दाजी जोशी यांनाही येवले येथून अटक झाली. त्यांना काढण्या घालून उघड्या अंगाने फटके मारत मारत नाशिकला आणण्यात आले. या पुढची कहाणी अत्यंत दारुण आहे.

  या तरुण मुलांनी जे छळ सोसले त्याला तोड नाही. ती वर्णने वाचवत नाहीत. वाचताना भावना वेग असह्य होऊन मी किती तरी वेळा अगदी सुन्न होऊन बसलो. हा खटला वेगाने चालवण्यात आला. आरोप सिद्ध झाले, निकाल लागला. त्यानुसार अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे आणि कृष्णाजी कर्वे यांना फाशी, वामन (दाजी) जोशी यांना काळ्या पाण्याची जन्मठेप अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

     विनायक देशपांडे व दाजी यांनीच कट रचला, त्याची बारीकसारीक तपशीलासह उत्तम तयारी करून घेतली, हे सिद्ध झाले. म्हणून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली.

   बहुतेक सगळ्या इतिहासकारांनी यांचे वर्णन ‘निधड्या छातीचा, बलदंड शरीराचा व युयुत्सु वृत्तीचा’ असेच केलेले आढळते. काही दिवस भायखळ्याच्या तुरुंगात ठेवून नंतर त्यांना काळ्या पाण्याला अंदमानला पाठवण्यात आले. जेलर बेरी  आणि त्याची छळछावणी जगप्रसिद्धच आहे. कोलू चालवणे, काथ्या कुटणे, सतत मार खाणे, अपमान, कदान्न भक्षण हे दाजींच्याही नशिबी आले!

     दाजींनी सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली जेलमध्ये अन्न सत्याग्रह, संप, आंदोलने, सर्व हिरिरीने केली. बेरीला जेरीस आणले. तेथेही त्यांनी देशभक्तांचे जाळे विणले. त्यामुळे एकदा त्यांना काही देशद्रोही, धर्मद्रोही सावरकरांवर विषप्रयोग करणार असल्याची खबर आधीच लागली. त्यांनी तात्यारावांना सावध केले व मोठे अरिष्ट टळले. 

     दाजी शाळेत मास्तर असल्याने येथेही शाळा उघडली गेली. अनेकांना साक्षर केले. तेथे हिंदू-मुसलमान हा भेद मुळीच ठेवला नाही. सावरकर राजबंद्यांना सोडण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे सतत अर्ज पाठवत असत. त्याचा उपयोग होऊन जे राजबंदी सोडण्यात आले, त्यात वामनरावांचाही नंबर लागला व त्यांना दहा वर्षांनी भारतात पाठवण्यात आले. पण, ते सुटले असे झाले नाही. भारतात त्यांना येरवड्याच्या तुरुंगात आणून ठेवले. तेथे राजबंदी असूनही त्यांना दीड वर्ष खुनी, दरोडेखोर यांच्या बरोबर ठेवले गेले. येथेही अंदमानसारख्याच ‘दंडाबेडी’, ‘आडवीबेडी’ अशा शिक्षा भोगाव्या लागल्या. या अत्याचारांमुळे जेव्हा १९२२ साली त्यांची सुटका झाली, तेव्हा शरीराने ते खूपच दुर्बळ झाले होते, पण मनाने भक्कम होते.

     समशेरपूरला परत आले तेव्हा संपूर्ण कुटुंबाची अगदी वाताहत झाली होती. बंधू, भावजयी, आई निर्वतले होते. भावाची लहान मुले रडत होती. चरितार्थाचा मोठाच प्रश्न होता. वामनरावांनी उर्वरित सर्व कुटुंबीयांना खूप प्रेम दिले, त्यांचा अतिशय प्रेमाने, परंतु शिस्तीने सांभाळ केला.

     आपल्या सर्व पुतण्यांना/नातवंडांना मुलगा-मुलगी हा भेद न करता चांगले शिकवले. सर्वजण चांगले शिकले. त्यातील शरयू या उत्तम शिकून शिक्षकी पेशातच गेल्या. शरयू मामींनी संग्रामपूर येथील घरातून कष्टाने जुनी कागदपत्रे हुडकली, तेव्हा दाजी काकांच्या हस्तलिखितात लिहिलेले आत्मचरित्र मिळाले. त्यांनी अपार मेहनत करून ते नीट लिहिले व दि. २६ जनेवारी २०१६ रोजी भगूर येथे पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. तेव्हा कुठे दाजी काकांचे महात्म्य  प्रकाशात आले.

     वामनराव स्वतः हुशार होते. व्ह. फा. परीक्षेत ते नाशिक शहरात दुसरे व संबंध नाशिक जिल्ह्यात सातवे आले होते. त्यामुळे मुलामुलींनी खूप शिकावे, यासाठी ते आग्रही असत. ते उत्तम चित्रकार होते. संगीताचे भोक्ते होते. स्वतः संवादिनी उत्तम वाजवत. त्यांच्या सहवासातील प्रत्येकाला अगदी घरच्या गाईंनादेखील त्यांनी प्रेम, प्रेम आणि प्रेमच दिले. ते इतके स्वाभिमानी की, त्यांनी कधीही स्वातंत्र्यसैनिक म्हणून अर्ज करून पेन्शन मागितली नाही.

    क्रांतिकारकांवर लिहिणारे देशभक्त वि. श्री. जोशी हे मुद्दाम समशेरपूरला आले, दाजींना भेटले. नंतर त्यांनी पुराव्यानिशी पत्र पाठवले ते थेट स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना – पंडित नेहरूंना. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून एक हजार रुपयांचा चेक आला व पुढे अजून थोडीशी रक्कम आली. बस्स!

     स्वा. सावरकरांचा आणि दाजींचा पत्रव्यवहाराद्वारे संपर्क असे. पुढे १९५५ मध्ये दाजींचे मेव्हणे लक्ष्मण कुलकर्णी यांनी दाजी व तात्यारावांची प्रत्यक्ष भेट घडवून आणली. ही श्रीराम-भरत भेट  सावरकर सदनात दादर येथे झाली. दोघांनाही अश्रू आवरेनात. त्यांनी एकमेकांना मिठी मारत मनसोक्त रडून घेतले.

   सरकारने उपेक्षा केली, पण राष्ट्रभक्तांच्या हृदयात दाजी काकांना कायमचे मानाचे स्थान मिळाले.

१४ जानेवारी, १९६४… संक्रांत होती. दाजींनी सर्वांना तीळगूळ दिला व आपल्या कुटुंबीयांना आशीर्वाद दिले आणि आपले पुतणे भास्कर ब्रह्मदेव जोशी यांच्या मांडीवर शांतपणे अखेरचा श्वास घेतला….

   ‘नाही चिरा, नाही पणती’ अशा अनाम वीरांच्या मांदियाळीतील अजून एक तारा निखळून पडला…

  अंदमान,सेल्युलर जेलला भेट देणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने, त्या पहिल्या तीन नावांचे वाचन केल्यावर,आपली मान झुकवली पाहिजे. दाजी विषयी माहिती सर्वांना करून दिली पाहिजे.त्यांच्या अफाट त्यागाचे थोडेतरी मोल होईल!!???.

   वरील छायाचित्रे ,आमचे सर्व प्रवासी मित्र श्री.रविंद्र  प्रभूणे यांच्या उत्कृष्ट छायाचित्रणाचे नमुने आहेत. त्यांना धन्यवाद.