रामरंगी रंगलेले आप्पाजी

            “जगी सर्व सुखी असा कोण आहे, 

            विचारी मना, तूचि शोधून पाहे!  

           मना त्वाची रे पूर्व संचित केले

           तया सारखे भोगणे प्राप्त झाले”

     समर्थ रामदासांचा हा  ‘मनाचा श्लोक’ सर्वांनाच सुपरिचित आहे. जगात ‘सर्व सुखी’ असा कोणी आहे का? समर्थांनी त्याचे होय अथवा नाही उत्तर दिले नाही. आपल्या मनालाच त्यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधावयास सांगितले आहे. पुढे त्यांनी  मनाला म्हटले, “मना ,तू आम्हाला तर्क, वितर्क, राग, लोभ, वासना, लालसा अशा विकारांमध्ये अडकवतोस, भूतकाळातील आठवणींची ओझी व भविष्यातील स्वप्नांचा आभास निर्माण करतोस आणि मग आम्हाला ‘तया सारखे भोगणे’ प्राप्त होते!”

 समर्थांच्या, “जगी सर्व सुखी असा कोण आहे?” या प्रश्नाचे सरळ उत्तर ,”कोणीच नाही” असे आहे.कारण वर्तमानाचा आनंद न घेता सदैव भूत आणि भविष्यात वावरणे हा मानवी मनाचा  गुणधर्म आहे! समर्थांसारखा भाषाप्रभू  जेव्हा दोन ओळी लिहितो तेव्हा त्या साध्या ओळी नसून त्यात मानवी जीवनाचे मोठे तत्त्वज्ञान दडलेले असते. प्रश्नामध्येच  उत्तर आहे व या उत्तरा मध्येच  ‘सर्व सुखी’ होण्याची गुरुकिल्ली दडली आहे. ती ‘किल्ली’ कोणती ते समजून घेता आले पाहिजे.. 

   मानव प्राणी दैनंदिन व्यवहारात वागताना, जर पूर्वसंचिताची ओझी  मनातून फेकून देऊन,वर्तमानातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ लागेल,तर निश्चितच सुखी होईल,नव्हे, सर्व सुखी होईल! भूतकालात अशी माणसे होऊन गेली, आज वर्तमानात ही अशी सदासुखी माणसे आहेत,त्यांचा शोध  घेतला पाहिजे… समर्थांच्या प्रश्नातील इंगित हेच आहे, असे मला वाटते .  जगातील सर्व तत्त्वज्ञानी “सुखी होण्यासाठी अंतर्मुख व्हा”, असे सांगतात.

      आपली ‘गीताई’ सुद्धा हेच म्हणते..’ सदैव काम करीत रहाणे हाच तुझा हक्क’.. सुख आणि दुःख दोन्हीही आहेत..जशी, जेव्हा, वेळ येईल तसे, दोघांनाही सामोरे जाण्याची  मनाची तयारी ठेवावी… कर्मण्येवाधिकारस्ते..! एकदा मनाची अशी तयारी झाली की मग दुःखाचे नाव कशाला? सगळीकडे,आनंदी आनंद गडे… !!         हे एवढे सर्व तत्वज्ञान ऊगाळण्याचे कारण ,ज्या एका व्यक्तिमत्त्वाविषयी मी आज थोडेसे लिहणार आहे त्या, मी पाहिलेल्या,’आप्पाजींची जीवनकहाणी.! 

   लहानपणी  बोर्डीच्या काही लोकांनी,  बालमनावर   अमीट  ठसा उमटवून मला ..”हे असे का?” असे विचार प्रवण केले.   त्यांची मूर्ती, आजही डोळ्यासमोर येते… त्यांची आठवण झाली की पटकन, त्या दिवसातील क्षणचित्रे डोळ्यासमोर पाहतो.. मला त्या सरलेल्याआठवणींचा ठेवा पुन्हा सापडतो…  कानात  गुणगुण ऐकू येते,.. त्या पैकी एक आप्पाजी!! विशू, भारण्या, बुली या व्यक्तिंविषयी, मी मागे लिहिले आहे.

      आयुष्यभर लोखंडाचे चणे खाल्ले,चेहऱ्यावर सदैव हास्य वैभव  मिरवले, मुखात सदैव राम नामाचे चिंतन ठेवले, भावी पिढीने सुशिक्षित, सुसंस्कारित व्हावे याकरिता रोज  पौराणिक गोष्टींचा खजिना ऊघडा केला,  दरवर्षी गणरायाला सन्मानाने आपल्या घरी बोलवून त्याला,”तू सुखकर्ता तू दुःखहर्ता”, म्हणून  मनोभावे आरत्या गायल्या, खडतर परिस्थितीत गरजू, गरिबांना जमेल तेवढी मदत केली… नियतीचा अनुकूल कौल कधीच मिळाला नाही तरीही, ना माणसाविषयी ना परमेश्वाविषयी , कोणतीही खंत मनात न ठेवता, समाधानाने एक दिवस या जगाचा निरोप घेणारे आप्पाजी !!

    अप्पाजींच्या ओटीवर दररोज सकाळपासून अशी कोळशाची भट्टी पेटलेली असे.याच निखा-यावर आप्पाजी, पितळेच्या भांड्यांना कल्हई  करत.  गरजू, आजारी ,यांना ‘डाग’ देत. आता ही  कासार कला ,काळाच्या ओघात लुप्त झाली आहे.

   आप्पाजी पेशाने कासार आणि त्यांचे घर देखील माझ्या मावशीच्या शेजारी, राम मंदिराजवळ. एका छोट्या खोलीच्या  परिसरात ,त्यांचा ‘विपुल संसार’ मांडणारे! कासार म्हणजे भांड्यांना कल्हई  करणारा  आणि बांगड्या विकण्याचा उद्योग करणारा. जुन्या काळात कासार म्हणजे बारा बलुतेदारांपैकी एक. त्याकाळी गावात कासाराची जरुरी असे, कारण प्लास्टिक,स्टील  युगाची सुरुवात होण्यापूर्वी ,स्त्रियांना बांगड्याची आवश्यकता होती व त्याही  काचेच्या हव्या असत.स्टीलची भांडी वापरात नसल्याने पितळेच्या भांड्यांना आतून कथलाचा पातळ थर लावावा लागे त्याला कल्हई असे म्हणत. या कल्हई मुळे,अन्न शिजवताना भांड्याच्या  धातूचे,  अन्नातील घटक द्रव्यांशी,  प्रक्रिया न होता, शिजलेल्या अन्नाची चव  बिघडत  नसे. आज-काल स्टीलची भांडी वापरात असल्याने व स्टील हे उदासीन धातू असल्याने कल्हईची जरुरी भासत नाही. कालौघात जसे अनेक बलुतेदार नामशेष झाले तसेच कासार ही जमात देखील  आज अस्त पावली आहे. आम्ही आप्पाजींना पाहिले तेव्हा ते सुमारे पन्नाशीत पोहोचले होते.अकरा जणांचे त्यांचे विशाल कुटुंब होते .चार मुलगे, पांच  मुली ,व दोघे पती-पत्नी. त्यांची एक मुलगी माझी वर्ग मैत्रीण होती त्यामुळे त्या बाजूला कधी गेल्यास अप्पाजींच्या घरीही वळणे होत असे व त्यांच्याशी बोलणे होत असे. गावात एकच कासाराचे घर असल्याने त्यांना काम भरपूर मिळत असे. त्यांचे काम देखील सफाईदार व माफक दरात असल्यामुळे, गिऱ्हाइकांची मोठी वर्दळ असे. मात्र खाणारी तोंडे आणि महिन्याची आवक यांचा मेळ कधीच बसत नसावा.

    बरे घर म्हणजे तरी काय? दहा बाय पाच फुटाची, एक खोली.तेच स्वयंपाकघर,तोच दिवाणखाना,आणि रात्री झोपण्यासाठी बायकांसाठी तीच बेडरूम! पुरुष मंडळी रात्री झोपण्या साठी घराशेजारील मालकाच्या ,गाईगुरांसाठी असलेल्या गोठ्याचा उपयोग, बेडरूम म्हणून  करीत. समोरील छोट्या ओटीवर अप्पाजींच्या कल्हई लावण्याचा ‘कारखाना’ दिवसभर चालत असे. सदैव विस्तवाशी प्रसंग ,कारण भांडे तापवून गरम झाल्याशिवाय त्याला कलई नीट लागत नसे .त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात तर अंगाची लाही लाही होत असणार.

    अप्पाजींचे जुने घर आजच्या स्थितीत. नंतर आलेल्या मालकाने,नवीन दरवाजा बसऊन, आत खूप सुधारणा केली आहे. मात्र ओटी  तीच व तशीच आहे.  आप्पाजी या ओटीवर बसून, कोळशाची भट्टी पेटवून कल्हई कामाचा उद्योग करीत. रात्री मुलांना गोष्टी सांगितल्या वर कोपऱ्यात आपले अंथरूण टाकीत.

        त्याकाळी आमच्या बोर्डी गावात,दहा-पंधरा रुपये मासिक भाड्यात, प्रशस्त घर, भाड्याने मिळू शकले असते. मात्र आप्पाजींना तेवढे भाडे परवडत नसावे. आप्पाजींचा स्वभाव अगदी संकोची आणि साधा. एखादी गरीब आदिवासी बाई  भांड्यांना कलई लावण्यासाठी आली व तिच्या हातात बांगड्या दिसल्या नाहीत तर आप्पाजी स्वतःहूनच  दोन काचेच्या बांगड्या तिच्या हातात चढवीत. पैसे घेणे वगैरे गोष्टी अगदी नगण्य होत्या. कल्हईचे पैसे गि-हाईक देईल त्यात समाधान! अशा परिस्थितीत संसाराची परवड हे ठरलेले…

    संध्याकाळी कामाचा पसारा आवरला की समोरच्या राम मंदिरात जाऊन तास अर्धा तास परमेश्वराचे भजन चिंतन करावे हा त्यांचा नियम होता. दोन हातांनी टाळ्या वाजवत, ठेका धरला जाई.कधी टाळ घेऊन ,तर कधी तसा प्रसंग असला तर आपला मृदंग घेऊन टाळ-मृदंगाच्या साथीने एक दोन भजने होत असत. आम्हा काही बाल मित्रांचा अड्डा शाळा सुटल्यावर संध्याकाळी देवळातील पटांगणात असे.आम्ही असेच काहीतरी हुतुतु,लपंडाव सारखे, खेळ नाहीतर गोट्यांचा खेळ,खेळत असू. आप्पाजी आम्हाला पकडून देवळात बसवत व एक दोन भजने बोलावयास लावत. त्यामुळे त्यांची आमची चांगलीच पेहचान झाली होती. कधी तालासुरात भजन न म्हणता आपल्या मृदंगाच्या तालावर, आम्हाला साथीला घेऊन  “गोपाळ कृष्ण,.. राधे कृष्ण..”.. एवढाच गजर करीत. त्यामुळे आम्हाला भगवंताच्या नामस्मरणाची पुण्याई मिळे. कधीकधी भजन संपले की आप्पाजी आपली कहाणी सांगत. बालपणीच्या आठवणी, शिक्षणाची झालेली आबाळ, हे विषय असत. ‘तुम्ही शिक्षण का घेतले पाहिजे?’ यावर आमची थोडे बौद्धीक घेत. वडिलांचाच  कासारी कामाचा धंदा यांनी पुढे चालविला होता .मात्र वडिलांचे देखील संसाराकडे विशेष ध्यान नसल्याने त्यांना शिक्षणाचे संस्कार मिळाले नाहीत, म्हणून ही परिस्थिती ओढवली. कासार काम करावे लागले. “मुलांनो तुम्ही शिका खूप अभ्यास करा व चांगली नोकरी मिळवा” असे नेहमी सांगत. आयुष्यात नोकरी करून पगार कमावणारा माणूस ,म्हणजे ‘धन्य तो नर’, अशी त्यांची समजूत असावी .त्यांचे ते बोलणे खूप मनावर घेण्याचे त्यावेळेचे आमचे वय नव्हते. मात्र त्यांचे चेहऱ्यावरील भाव, अंतःकरणातील आत्मीयता जाणवत असे. ‘आपण शिकायला पाहिजे’, अशी जाणीव होई.अप्पाजींची  सगळी मुले शाळेत गेली होती. मात्र इयत्ता सातवीच्या पुढे कोणी गेल्याचे आठवत नाही. कदाचित ती खंत देखील त्यांना असावी.

       त्या काळी आमच्या राम मंदिरात गोकुळ अष्टमीचा एक आठवडा आधी ,सदैव 24तास भजन कीर्तनाचा कार्यक्रम राम मंदिरात चाले. या अखंड नाम संकीर्तनाला गावकरी ,’सप्ता'( सप्ताह चा अपभ्रंश) असे म्हणत असत. बोर्डी, परिसरांतील व अगदी गोवाडा या, हल्ली गुजरात मध्ये असलेल्या छोट्या खेड्या मधील, विविध भजनी मंडळे प्रत्येक दिवशी , सुमारे दोनों तास, असे एक आठवडाभर, आपले योगदान देऊन, देवळात हजेरी लावत. गोकुळाष्टमीच्या रात्री कृष्ण जन्म झाल्यानंतर डॉक्टर हरी भाऊंचे कीर्तन झाले की हा ‘सप्ता’संपत असे. दुसऱ्या दिवशी कालाष्टमी व गोपाळ कृष्णाची पालखी असा कार्यक्रम असे. आप्पाजी देखील त्या 24 तासाच्या अखंड  भजन संकीर्तन कार्यक्रमात एक तास आपले योगदान देत. आणि त्यांची वेळ साधारणतः संध्याकाळी सहा ते सात अशी असे . या वेळी  आम्ही नेहमीचे ‘कलाकार’, त्यांच्या जोडीला असू.शाळा सुटल्यामुळे आम्हालाही काही उद्योग नसे व एरवीसुद्धा कधीतरी  संध्याकाळी, हाच गजर करीत असल्याने,आम्हालाही काही त्यात नवीन वाटत नसे. आपण गावाच्या  धार्मिक उत्सवात महत्त्वाचे योगदान देत आहोत असा  अभिमान वाटत असे . मृदंगाच्या तालावर, “गोपाल कृष्ण, राधे कृष्ण”.. असा गजर  किंवा कधी ज्ञानोबा तुकारामाचा एखादा अभंग अप्पाजी आपल्या सुरात गात आणि आम्ही टाळ वाजवीत साथ देत असू. आमचा मित्र दत्तू याला थोडी सुरेल गळ्याची साथ होती. त्यामुळे कधीकधी आप्पाजी त्यालाही दोन अभंग बोलावयास सांगत. मला आठवते मी हायस्कूलमधे जाईपर्यंत या,’आप्पाजी टीम’ मध्ये राम मंदिरातील सप्ताहात भजने व गजर केला आहे.  खूप आनंद मिळाला आहे.

    त्यावेळची एक गम्मत आठवते आप्पाजी म्हणत असत “ज्ञानोबामा बोले तुकाराम..” आणि आम्हीही जोराने प्रतिसाद देत असू ज्ञानोबामा बोले तुकाराम … अप्पाजींची बोलण्यातली गफलत आणि आमची ऐकण्यात गफलत. तो प्रसिद्ध अभंग आम्ही त्या काळात सतत असाच म्हटला..  पुढे कळले,तो अभंग ,’ज्ञानोबा माऊली, तुकाराम..’ असा होता. मात्र आज, आम्ही त्या अभंगाला कसा दुभंग केलाय हे आठवले की खरोखर हसावे की रडावे हे कळत नाही. त्या सात दिवसांमध्ये आम्ही मुले अगदी पूर्ण मोकाट सुटलेले असू व बहुतेक वेळ देवळातच सर्व भजने ऐकण्यात जाई .आज-काल देवळात गोकुळ अष्टमीच्या आधी हा सप्ताह असतो की नाही माहित नाही. खरोखर आता आठवणी आल्या की बालपणीचा तो काळ किती मजेत ,आनंदात, निरंकुश स्वातंत्र्यात कसा पटकन गेला याचे वैषम्य वाटते “.बालपणीचा काळ मजेचा..”असे उगीच म्हटलेले नाही. अभ्यास म्हणजे ‘फावल्या वेळेत करावयाचा अप्रिय उद्योग’ अशी आमची धारणा होती !

     आप्पाजींच्या  संगतीत, खरी मजा ,’गोकुळकाला’ अथवा कालाष्टमी या दिवशी  असे. जन्माष्टमीच्या  रात्री डॉ. पाटणवाला यांचे किर्तन ,त्यानंतर कृष्ण जन्माचा सोहळा साजरा होई.आम्हीसुद्धा या कीर्तनात व कृष्णजन्म सोहळ्यात रात्रीपर्यंत जागरण करीत असू. शेवटी मिळणारा, मंजिरी आणि पपनस , केळ्यांचा प्रसाद हे आकर्षण होते.. कमीत कमी तीन वेळा तरी तो प्रसाद खाता यावा, या धडपडी मागे, परमेश्वराचे पुण्य जास्त मिळावे, ह्या सदिच्छा पेक्षा, मित्रमंडळीत,’ मी काल तीन वेळा प्रसाद खाल्ला ‘,अशी बढाई मारण्याची खुमखुमी जास्त असे. डॉ.पाटण वाला यांचे खरे नाव डॉक्टर हरिभाऊ सावे असे होते. ते प्रख्यात आयुर्वेदिक डॉक्टर होते.उमेदीच्या काळात त्यांनी, गुजरात मधील पाटण या संस्थानात, ‘राजवैद्य’ म्हणून काम केले होते.  खूप मान आणि सन्मान मिळवून,बोर्डी मध्ये प्रशस्त वाडा बांधून, आपला सेवानिवृत्तीचा काळ अशा रितीने,सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात सहयोग  देऊन घालवीत होते .त्यांची कृष्ण जन्मानिमित्त होणारी प्रवचने अतिशय रसाळ व नाद माधुर्ययुक्त असत.  त्यामुळे आजूबाजूच्या गावातील बरीच मंडळी जन्माष्टमीच्या रात्री, देवळात  जमत असत. डॉ हरिभाऊ व आमच्या कुटुंबाचा संबंध अनेक तऱ्हेने आलेला आहे .आप्पांना दम्याचा त्रास सुरू झाला की याच हरी भाऊंचे औषध मी त्यांचे घरी जाऊन घेऊन येत असे. मला धावपळ करीत आलेला पाहताच,कोणतीही चौकशी माझ्याकडे न करता, हातातील बाटली घेऊन ,त्वरीत औषध भरून देत. चाटण ,पुड्या देत. औषध कशा रीतीने घ्यावयाचे एवढे सांगत. पैसे नंतर द्यायचे असत.  हरी भाऊंचा नातू अरुण हा माझा शाळेतील वर्ग मित्र, अगदी साताऱ्यास जाईपर्यंत त्याची साथ होती. नात शरयु ,आप्पांची विद्यार्थिनी. हरी भाऊंचे लहान बंधू आत्माराम पंत सावे, हे आमच्या बोर्डी हायस्कूलचे एक आद्य संस्थापक, ज्या शिक्षणगंगेत  न्हाऊन आम्ही शिक्षणाचा श्रीगणेशा केला.

शुभ्र धोतर ,सदरा ,हा पोषाख  एरवी करणारे  हरिभाऊ, कीर्तनाच्या  दिवशी मात्र सफेद धोतर, त्यावर लांब  पायघोळ तपकीरी रंगाचा कोट,डोक्यावर लाल पुणेरी पगडी आणि मानेभोवती जरीचे उपरणे अशा रुबाबदार हरदासी वेषात असत. उंच सडसडीत देहयष्टी, गोरा तांबूस रंग व चेहऱ्यावर सोज्वळ तेज ,यामुळे त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्व त्यावेळी भारदस्त  वाटत असे. त्यांच्या मंजुळ,मधाळ आवाजात कृष्ण चरित्र ऐकणे हा  सर्वांसाठी  मोठा अवर्णनीय आनंदाचा लाभ असे.  डॉ.हरिभाऊ हे एक अत्यंत सुसंस्कृत, सालस व सोज्वळ व्यक्तिमत्व होते. ते गेले आणि आमच्या बोर्डी मंदिरातील कृष्णजन्माचे किर्तन ही संपले…

       दुसऱ्या दिवशी ‘गोकुळ काला’ असे. हा आमच्यासाठी खरा धमालीचा दिवस. आम्ही अप्पाजींची वानरसेना सकाळीच देवळांत जमा होत असू. खरे तर आदल्या रात्री कृष्ण जन्मोत्सवानिमित्त जागरणं झालेले असे .अर्धवट झोप घेऊन देखील आम्हाला अजिबात थकवा वाटत नसे .आप्पाजी सुद्धा गळ्यात मृदुंग ,टाळ अडकवून,  पंचा नेसून,भस्म लावून, उघड्या अंगाने आमच्या आधीच हजर झालेले असत. मृदंगावर थाप देत आपली भजने सुरू करीत. या पालखी मिरवणुकीत आप्पाजी  पुढे आणि त्यांच्या अवतीभवती आम्ही बालगोपाळ मंडळी  टाळ्या वाजवत व भजने गात हैदोस घालत असू. राम मंदिरापासून निघून ही पालखी मिरवणूक ,बोर्डीतील जयहिंद रोड,गावदेवी ,चंपालाल , शंभुलाल,सोनराज यांचे दुकानावरून ,पुढे हरीजन वाडा करीत,झाईचे खाडी पर्यंत विसर्जनासाठी जात असे..  समुद्रस्नान करून, प्रसाद मिळे.  तेथून सर्वजण आपापल्या मार्गाने घरी जात.  या पालखी फेरीमध्ये अनेक गमती जमती होत असत.त्याचीही आठवण आज येते आहे. 

   त्या प्रभात फेरीचे संयोजक आप्पाजी असले तरी त्यांचा जेष्ठ पुत्र वसंता व त्याचे  मित्र हे  नेतृत्व करीत . त्यादिवशी दहीहंडी फोडण्यासाठी ‘मानवी मनोरा’ रचण्याचे काम त्यांचे असे. पहिले दोन ते तीन थर या तरुण वर्गाचे असत .सर्वात शेवटी टोकावर राहून,हंडी फोडण्यासाठी कोणीतरी लहान मुलगा लागे.  ते काम आमच्यापैकी पाळीपाळीने कोणीतरी करी.त्यावेळी आजच्याप्रमाणे मनोरे उंच उंच लावत जाण्याची स्पर्धा कधीच नव्हती .एक गंमत व खेळ म्हणून हे सारे होत असे. त्यामुळे घरची मंडळीदेखील अगदी बिनधास्तपणे आम्हाला या कार्यक्रमात सामील होऊ देत.मला आठवते ,मी मनोऱ्याच्या शेवटच्या टोकावर  उभा राहून,हंडी डोक्याने फोडण्याचा व आपल्या सर्वांगावर दहीकाल्याचा अभिषेक करून घेण्याचा जो अवर्णनीय आनंद असतो तो उपभोगला आहे. आजही त्या दिवसांची आठवण आली की अंगावर  शिरशिरी येते. वसंता व त्याची मित्रमंडळी, प्रसंगी वरून कोसळणाऱ्या मुलाला,झेलण्याचे बाबतीत अत्यंत दक्ष असत.

        वसंता  जिगरबाज माणूस होता. एखादे आळीतून पालखी जात असताना,आम्हाला जोरजोरात ,”गोविंदा रे गोपाळा ,यशोदेच्या तान्या बाळा..” वगैरे घोषणा करण्यास लावी. घरातून बादलीभर पाण्याची मागणी होई, ते येईपर्यंत,” घरात नाही पाणी, यांची घागर रिकामी रे रिकामी”.. असा गजर चाले !

     एका विशिष्ट घरासमोर आल्यानंतर,वसंताचा सोज्ज्वळ ‘धार्मिक अवतार’ लुप्त होऊन,आपला ‘नैसर्गिक अवतार’ प्रकट करी. वसंता म्हणे,” काकाचे आवळे…”, आणि आम्ही बोलत असू..”गोड लागतात …”.हा गजर त्या घरासमोर सुरू होण्याचे कारण, घराचे अंगणामध्ये एक आवळ्याचे झाड होते.ते टपोऱ्याआवळ्यांनी भरलेले असे.दोनेक मिनिटे हा गोंधळ झाल्यावर, घर मालक,काका,  एका टोपलीत आवळे घेऊन वसंताकडे सुपूर्द करत.   वसंता हवेमध्ये टोपली उडवून आवळ्याची पखरण आमच्यावर करी. ते टिपण्यासाठी आमच्या जिवाचा आकांत होई. खिसे भरून आवळे जमा होत.नंतरच पालखी पुढे जाई.पालखीमध्ये सामील होण्याचे हे देखील मोठे आकर्षण असे. .घरी आल्यावर, स्वच्छ गोड पाण्याने आंघोळ झाली की, भोजनानंतर झालेल्या सर्व परिश्रमाचा उपहार,दिवसभर झोपा काढून होई. या आनंदी दिवसाचे शिल्पकार होते आप्पाजी! त्या दिवसाची आठवण करताना आज एवढा आनंद आहे तर तेव्हां काय वाटत असेल ?

  अप्पाजींची आठवण मोठ्या कृतज्ञतेने होते .काकाच्या आवळ्यांची, खातांना तुरट,मात्र,खाल्यानंतर पाणी प्याल्यावर होणारी गोड चव  जिभेवर रेंगाळते आहे . खड्या आवाजात दिलेल्या वसंताच्या ,”गोविंदा, गोपाळा”, या घोषणा कानात घुमू लागतात.  भिजल्या अंगानी ,नाचणारे, बागडणारे,ते माझे सवंगडी, आता कुठे असतील, या आशंकेने मन कातर  होते.

   वसंता  व या सर्व कुटुंबाच्या  दुर्दैवाची  कहाणी पुढे सांगणार आहे. अप्पाजी व त्यांच्या कुटुंबाची  झालेली दुर्दशा,तर्काच्या पलीकडे असलेले गणित आहे. एका सालस, पारमार्थिक, गरीब   निरूपद्रवी  कुटुंबाची एवढी  परवड  झाली..का??

   आमचे मावसबंधू प्रभाकर भाई हे अप्पाजींचे अगदी लगतचे शेजारी. भाई माझ्यापेक्षा थोडे लहान परंतु त्यांचा  लहानपणी आप्पाजी समवेत नेहमीच संपर्क येई. त्यांच्या जवळ आप्पाजींच्या आठवणींचा खजिना आहे. त्यांनीही मला काही  माहिती  दिली, जुन्या  आठवणींना उजाळा दिला.

     दिवसभर कल्हई काम करून थकलेले आप्पाजी, संध्याकाळी जेवण आटोपल्यावर खरेतर अंथरुणावर आडवे व्हायला हवेत. पण आप्पाजी तसे करीत नसत. शेजारची सर्व बालगोपाळ मंडळी, समोरच्या माधव मामाच्या ओटीवर जमवून त्यांना देवादिकांच्या, धार्मिक गोष्टी सांगत. मुलांनाही त्यांचा एवढा लळा होता की भाई म्हणतात, “आम्ही शेजारील सात-आठ मुले जमून, जेवणानंतर, समोरच्या ओट्यावर बसून अप्पाजींची वाट पाहत असू.

        लौकिक अर्थाने आप्पाजींचे शिक्षण किती झाले होते याची कल्पना नाही पण संस्कृत श्लोक किंवा मराठीतील अभंग आणि कविता म्हणताना त्यांचे स्पष्ट आणि अस्खलित उच्चार ऐकून आम्हा लहान मुलांना असे वाटे की आप्पाजींनी खूप मोठे शिक्षण घेतले आहे. त्यावेळी आम्हाला असे वाटे जणू त्यांच्या जिभेवर प्रत्यक्ष सरस्वती देवी अवतरली आहे.गोष्टी सांगताना शेवटी तात्पर्य काय हे विचारीत आणि नंतर आम्हाला गोष्टीचे तात्पर्य सविस्तरपणे समजावून सांगत असत…

        हाच तो ,माधव मामांचा ऊंच ओटा, जेथे रात्री भोजनानंतर, आप्पाजींच्या कथाकथनाचा कार्यक्रम रंगत असे.

     … रात्रीच्या अंधारातही त्यांच्या डोळ्यात वेगळे भाव जाणवत. मुलांनी चांगले संस्कार घ्यावे, अभ्यास करावा ,कुटुंबाचे ,गावाचे नाव उज्ज्वल करावे ही त्यांच्या अंतरीची तळमळ ,आम्हाला त्या वयातही जाणवे.  भविष्यातील वाटचालीसाठी आम्हा मुलांना, त्यांच्या परीने, सुविचारांची शिदोरी बांधून देण्याचा तो प्रयत्न होता. कळत होते पण वळत नव्हते कारण ते वयच तसे होते .. गोष्टी ऐकता ऐकताच आम्ही पेंगत असू.झोपून ही जात असू. आमच्या आया येऊन आम्हा मुलांना झोपण्यासाठी घेऊन जात त्यानंतरच आप्पाजी आपल्या अंथरुणावर झोपण्यासाठी जात”

   .अप्पाजींच्या अनेक कथा भाईच्या  स्मरणात आजही आहेत. सर्व ऋतूमध्ये हे कथाकथन चाले.  प्रकृती अस्वास्थ्य अथवा  प्रसंगानुरुप कधी  बाहेर  जाणे झाले,तरच या कार्यक्रमात खंड पडे.भाई म्हणतात,”आप्पाजी गेले, आम्ही आता आजोबाच्या भूमिकेत आलो आहोत,तरीही आप्पाजींची, आम्हा मुलांना  संस्कार देण्याची ती कळकळ आज प्रकर्षाने जाणवते”. 

    अप्पाजींचे घरी दर वर्षी  गणपती बाप्पांचे आगमन होत असे. गणपती उत्सव गौरी विसर्जनापर्यंत असे. गौरी आगमनाच्या दिवशी तेरड्याची गौरी आणि तिला साडी नेसवून गौरीचे चित्र छापलेला मोठ्या आकाराचा कागदी मुखवटा ( फोटो ) लावून गौरीची प्रतिष्ठापना केली जात असे.गौरी विसर्जनापयर्यंतच्या संपूर्ण सहा सात दिवसात त्याची मोठी मुलगी शालू हिच्या सासरची पाहुणेमंडळी तसेच इतर नातेवाईक यांची वर्दळ असे पण आर्थिक परिस्थितीमुळे अशा कठीण प्रसंगात देखील आप्पाजी शांत असत.  सर्वांना जेऊ खाऊ घालताना, त्यांचा पाहुणचार करताना आणि सणाचा आनंद तसूभरही कमी होणार नाही एक कटाक्षाने पाहत असत , परमेश्वरी कृपेने, अनेक मदतीचे हात पुढे येऊन वेळ निभावली जात असे. आप्पाजींच्या घरी कमीत कमी रोज,वीसेक लोक सहज येऊन जात. अर्थात त्यांचा जेवणासाठी आग्रह,तीर्थप्रसादाला येणाऱ्या  प्रत्येकालाच असे..पण परिस्थितीची जाणीव असल्याने ,मंडळी,आरतीचा प्रसाद घेऊन आपापल्या घरी जात असत. पूर्वापार  चालत आलेली ,वाडवडिलांची सुरु केलेली,एक चांगली परंपरा ,आपल्या हयातीत तरी चालू रहावी,या निश्चयाने आप्पाजी दरवर्षी गणेशोत्सव करीत. शेजारी  परिचित,व  गावकऱी ,दोन दिवसात आप्पाजींना सर्व प्रकारची मदत करीत.  फळे, धान्य, तर देतच  मात्र काही काही जण ‘दक्षिणे’च्या रूपाने रोख रक्कम देऊन हा उत्सव  साजरा करण्यासाठी या कुटुंबाला हातभार लावीत.

      आप्पाजीना  गावठी वैद्यकाचे ही थोडे ज्ञान होते. तेही वडिलांपासून त्यांना प्राप्त झाले असावे. आजही खेडेगावात काही असाध्य आजारावर सुशिक्षित व धनवंत मंडळीदेखील ‘डाग घेण्या’ सारखे अघोरी उपचार करून घेतात.तापलेल्या लोखंडी सळईचा झणझणीत चटका ,शरीराच्या विशिष्ट भागावर,बहुदा मनगट किंवा बेंबी जवळ, घेतल्याने कावीळ, चर्मरोग,सांधेदुखी अशा प्रकारचे रोग बरे होतात अशी काही लोकांची श्रद्धा होती.त्याला शास्त्रीय आधार किती ते मला माहित नाही. मात्र आजही  खेड्यांतून असे अघोरी उपाय केले जातात..  लहान बाळ असो वा वृद्ध वयस्कर,डाग  देण्याचे काम  वैदू मंडळी करत असतात.आप्पाजी ही अशा काही आजारावर हा उपचार करीत असत. कांही लोकांना गुण  येई, म्हणून ते उपचारासाठी येत असले पाहिजेत. एरव्ही अतिशय कनवाळू दयाळू वाटणारे आप्पाजी ,तापलेल्या ,लाल लाल बुंद लोख॔डी सळईचा डाग, एखाद्या कोवळ्या जीवाला कसा देत असतील ,ते मला समजत नाही.हे काम देखील अगदी मोफत असे. कारण,कल्हई साठी तापवलेली लोखंडी सळई सदैव तयार असे.

    भाईंनी,  त्यांच्या बालमित्रांनी अप्पाजींच्या मुखातून रामकृष्णांच्या कथा ऐकल्या, गणेशोत्सवात आरत्या गायल्या, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्या कुटुंबाची झालेली वाताहत ही  पहावी लागली. चार मुले ,पांच मुली,  पती, पत्नी असे एकूण अकरा  जणांचे हे नांदते कुटुंब ,गरिबीत ओढग्रस्त स्थितीत  का असेना, समाधानाने नांदत होते…आप्पाजींना आपल्या हयातीतच सर्वात लहान मुलगा व लहान मुलगी यांचे अकाली मृत्यु पहावे लागले. थोड्या  आजाराचे निमित्त होऊन ही मुले गेली.  कुपोषण आणि अपुरे वैद्यकीय उपचार हेच त्याला मुख्यतः कारणीभूत.पुढे वयोमानाप्रमाणे आप्पाजीही निवर्तले. त्यांचे तीन मुलगे लग्नानंतर स्वतंत्र झाले. कधीमधी आपल्या घरी,आईला भेटावयास येत असत. मात्र हे तिघेही त्यांच्या भर जवानीत निवर्तले. वसंता म्हणजे आमचा बालपणीचा हिरो !त्याचे बरोबर आम्ही किती आनंद घेतला, हे वर आले आहे.वसंता पुढे ‘मांत्रिक’ झाला. अत्यंत जहरी,विषारी नाग,साप  पकडूनत्यांना जंगलात सोडून देई. मात्र एके दिवशी दुर्दैवाने, अशाच एका जहरी नागाचा डंख होऊन, वसंता तात्काळ गतप्राण झाला. एका जिंदादिल आयुष्याचा असा अचानक शेवट झाला.  वसंतला एक मुलगा होता तोदेखील पुढे बापाच्या मृत्यूनंतर, निराधार झाल्याने, आपल्या निपुत्रिक आत्याकडे  मुंबईस आश्रयाला गेला. तीन मुलींची लग्न झाली होती. त्यातील दोन मुली विवाहानंतर अगदी लवकरच अपघाताने निधन पावल्या.   सर्वांत मोठी मुलगी,शालू, मुंबईत  राहत होती. तिनेच आपला भाऊ वसंताच्या मुलाचा, वसंताचे मृत्युनंतर सांभाळ केला.ती देखील काही वर्षापूर्वी निधन पावली.  अप्पाजींची वृद्ध पत्नी (काकू),काही वर्षे एकाकी, दुर्लक्षित अवस्थेत, बोर्डी गावाबाहेर, समुद्रकिनारी, एका लहान झोपड्यात, आपले अखेरचे दिवस कंठीत होती.वृद्ध काकूंना, त्या बोर्डीच्या जुन्या घरात राहणे, आर्थिक स्थिती , अथवा वैफल्यामुळे अशक्य झाले असावे. जीवनाच्या अंतिम काळी असा अज्ञातवास त्यांचे नशीबी आला..अगदी निर्धन ,विमनस्क अवस्थेत काही वर्षांपूर्वी त्याही गेल्या. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. तिसऱ्या पिढीचा एकही वारसदार,कुळाचे नाव सांगण्यासाठी आज बोर्डी  गावात शिल्लक नाही. हे दुर्दैवाचे दशावतार नाही तर काय ? नियतीचा  निर्घृण खेळ नाहीतर काय? आयुष्यभर नशिबाचे अनेक दैवदुर्विलास भोगले,तरीही मुखी हरिनाम कधीही न सोडता, जे मिळेल त्यात समाधान मानून, आपल्या मुलांना शिक्षण, सुसंस्कार नाही देता आले तरी शेजारील बालगोपाळांना संस्कृतीचे,संस्काराचे चार शब्द सांगणाऱ्या,गावातील धार्मिक उत्सव म्हणजे आपल्या कुटुंबाचाच एक सोहळा, असे आयुष्यभर मानत,नियतीला कोणताच दोष न देता, एक दिवस या जगाचा शांतपणे निरोप घेणाऱ्या, पापभीरू अप्पाजींच्या आयुष्यात असे भोग का आले असावेत ? मी उत्तर शोधतो आहे .  उत्तर कधी मिळेल किंवा नाही ,माहित नाही? म्हणून थोडे आत्मचिंतन.

    आपण खूपदा पहातो ,जगात, प्रामाणिकपणे जगणाऱ्यांना अत्यंत कष्ट सहन करावे लागतात. लबाड, खोटे व्यवहार  करणारे,विलासात लोळतात. यामागे कर्म सिद्धांताची तत्त्वे आहेत असे सांगितले जाते. गतजन्मीची पुण्याई अथवा पापे ही पुढील जन्मात आपला करिश्मा दाखवितात व त्यानुसार माणसाला सुख वैभव किंवा कष्ट भोगावे लागतात असे आमचा कर्म सिद्धांत सांगतो.  अनेकदा या सिद्धांतावर टीका झाली, याबद्दल वाद-विवाद झाले. परंतु, सिद्धांताची महती आजही तशीच आहे.

      आप्पाजी आणि त्यांच्या सर्व कुटुंबाच्या नशिबी आयुष्यभर असे दुर्दैवाचे दशावतार आणि शेवटी कुटुंबाची धूळधाण नशिबी आली कारण त्यांच्याजवळ गतायुष्याचे चांगले संचित नव्हते असे म्हणायचे का ? चला घटकाभर  तसे मानूया.मात्र, या जन्मी आप्पाजींनी ज्या निश्चयाने, व्रतस्थ वृक्तीने,आपल्या वाणीची शुद्धता, चित्ताची एकाग्रता व व्यवहारातील पारदर्शकता ठेवली ,त्यामुळे निश्चितच त्यांचा हा जन्म सार्थ झाला. 

   शुद्ध वाणीमुळे चित्तशुद्धी, चित्तशुद्धीने  केलेला  व्यवहार हा ,परमेश्वराच्या चरणी रुजू होतो. म्हणून आप्पाजींचा सर्व  प्रपंच हा, ‘देवसेवा’, म्हणायला पाहिजे. त्यांनी भिक्षांदेही न करता,प्रामाणिकपणे संसार करत आपल्या नशिबी आलेला अनिवार्य कामधंदा कसोशीने, प्रामाणिकपणे, कष्टपूर्वक केला. आपला दुःखाचा पेला हसत-हसत स्वीकारला व तोंडीही लावला. प्रसन्न चित्ताने तो पिऊनही टाकला! प्रापंचिक जबाबदाऱ्यांचे पालन केले !

      आप्पाजी बोर्डीच्या राम मंदिरात,राम रंगी न्हाऊन निघाले!  तो त्यांच्यासाठी एक  आश्वासक आधार होता. तो त्यांच्यासाठी एक आगळाच आनंद होता ! अशा व्यक्ती, गरीब , कष्टाचे हालअपेष्टांचे खडतर जीवन जगत असलेल्या व इतर योजनांच्या दृष्टीने दुर्दैव तरी  रामकृपेने,अप्राप्य असे काहीच उरत नाही.  सुख, समाधान, आनंद, तृप्ती  भरभरून मिळते. खेद, दुःख, यांचा लवलेशही उरत नाही!”. 

       आप्पाजी गरीब होते,खडतर परिस्थितीत होते, तरीही सतत आपल्या च नामस्मरणाचे मस्तीत असल्याने, समाधानी ,आनंदी नव्हते असे कसे म्हणून शकतो? आज मी आप्पाजींचा विचार करतो तेव्हा, समर्थांच्या तत्वज्ञानाचे संदर्भात,नक्कीच म्हणू शकतो …आप्पाजी हे माझ्या बालपणीच्या काळात बोर्डी मधील,” जगी सर्व सुखी”.. असे व्यक्तिमत्त्व होते..!!

..      आप्पाजींनी आपले रोजचे काम हेच,पर्यायाने परमार्थ प्राप्तीचे साधन बनवले .शारीरिक पातळीवर असलेल्या  कामधंद्याला, आंतरिक नाम चिंतनाची जोड दिली .

     स्वाभाविक जे वर्तन, ते सहजे होय ब्रम्हार्पण, 

    या नाव शुद्ध आराधन,भागवत धर्म , पूर्ण जाण राया।

    हेच तत्व नाथांनी ही सांगितले आहे .हाताने काम आहे मुखाने नाम आहे, हे सूत्र अंगीकारले तर ऐहिक आणि पारलौकिक यांची सांगड सहज जमून येते.

   कामामध्ये काम ,मुखी  म्हणा राम राम,

   जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे।

हे तुकोबांचे उद्गार म्हणजे भागवत धर्माचे सार आहे. आप्पाजींनी आयुष्यभर तेच केले, आणि म्हणून या जन्मी ते सर्व सुखी समाधानी व्यक्तिमत्त्व होतेच. पण, या जन्मीच्या पवित्र संचितामुळे निश्चितच त्यांना पुढील मानव जन्मात राजवैभव मिळेल अशी मला आशा वाटते आणि तशी माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे. आप्पाजींच्या स्मृतीला विनम्र भावे प्रणाम.

     गोविंदा आला रे आला …बालपणीचा काल मजेचा…..

   या लेखा करीता,माझे बंधू, प्रभाकर भाई यांनी सांगितलेल्या आठवणी बद्दल व रमेश भाईंनी पाठवलेल्या छायाचित्रकारिता दोघांचेही मनःपूर्वक आभार.