‘चिकू पार्लर’चा जनक, बच्चू दादा!

                 ‘चिकू पार्लर’चा जनक..बच्चू दादा..   

   आमचा बोर्डी गाव म्हणजे एक उत्कृष्ट पर्यटन क्षेत्र. त्याला सुंदर समुद्र किनाऱ्याची देणगी आहे. विविध फळांचे बगीचे आणि त्यांत चिकूच्या बागांसाठी तर सुप्रसिद्ध. चिकू हे आरोग्यासाठी उत्तम फळ,ते पचनास अगदी सुलभ, विविध जीवनसत्त्वे, खनिजे व मूलभूत घटक,चिकूमध्ये अगदी नैसर्गिकरित्या उपलब्ध. ते चवीलाही अत्यंत गोड. चिकूने, गेल्या शंभर वर्षात, या परिसरांतील अनेक शेतकऱ्यांना,कष्टक-याना  रोजी रोटी दिली. विशेषतः आमच्या पारशी, ईराणी  बंधूनी तर चिकूच्या बागा जोपासत, वैभवाची शिखरे गाठली. आमच्या काही आया भगिनींनी, काही वर्षापासून चिकू पासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करून चिकूला  प्रतिष्ठाही मिळवून दिली. काही वर्षापासून चिकू वाइनही तयार होऊ लागली आहे. 

     1953 साली,बोर्डीत  जन्मलेल्या एका मुलाला आपल्या बालपणापासून, चिकू, आणि चिकूबागेत ,तन्मयतेने काम करणाऱे  शेतकरीबांधव, गरीब आदिवासी भगिनी यावर, विशेष माया. चिकूच्या उत्पादनाचा योग्य तो भाव शेतकऱ्याला मिळत नाही मग ,बागेत राबणाऱ्या आदिवासीना, योग्य मोबदला कोण देणार? सतत बारा वर्षे या समस्येवर विचार करून व त्यावर समाधानकारक तोडगा निर्माण करण्यासाठी, अभियांत्रिकीत पदवी घेतलेल्या या तरुणाने आपला इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविण्याच्या उद्योगाबरोबरच फक्त चिकूशी संबंधित, विविध खाद्य पदार्थ, मिठाया, विक्री करण्याचा एक स्वतंत्र उद्योग निर्माण केला. 27 डिसेंबर 2017 हा तो दिवस! त्याच दिवशी त्याचा व त्याच्या प्रिय आईचाही योगायोगाने वाढदिवस होता! ‘आपला गाव व आपला परिसर यांतील शेतकऱ्यांना,मजुरांना, चांगला रोजगार व उत्तम जीवन प्रदान करण्याचे’, आपले स्वप्न अंशतः तरी पूर्ण झाले,याचे त्यादिवशी, त्याला खूप समाधान वाटले. 8 फेब्रुवारी 2021,रोजी अगदी महिन्यापूर्वी, देवाघरी गेलेल्या या तरुणाचे नाव होते, महेश परशुराम चुरी.. हाच ” चिकूपार्लर” या कंपनीचा प्रवर्तक.. आमच्या गावठी, नाशवंत चिकूला, जगाच्या नकाशावर सन्मानाचे स्थान देणारा,आणि महाराष्ट्राचे परमदैवत  श्रीगणेशाला नेहमीच्या उकडीच्या मोदका बरोबरच आपले “चिकू मोदक”, ही नैवेद्य म्हणून स्वीकृत करावयास लावणाऱ्या, सर्वसामान्यांसाठी चिकूच्या विविध स्वादांचे पदार्थ ,आपल्या आलिशान पार्लरमधून ग्राहकांना खिलविणाऱा हा उद्योजक आमच्या साठी होता….  बच्चू दादा ….!!

      या माझ्या लेखाला “बच्चू दादा” हे नामाभिधान मी मुद्दामच केले आहे. लहानपणी आमच्या दोन आज्या,आक्का व मावशी यांचा खूप लाडका. तो, त्या वेळी खरेतर, आम्हा सर्व मावस भावंडात लहान, म्हणून आज्यांचा इटुकला बच्चू! पुढे, भावी आयुष्यात आपल्या कर्तबगारीने, जबरदस्त जिद्दीने, कामावरील  निष्ठेने, समाजाप्रती दिलेल्या योगदानाने एक प्रतिथयश उद्योजक म्हणून ख्यातकीर्त झाला. आम्हा सर्व भावंडांचा  तू  खऱ्या अर्थाने ‘दादा’ झालास, म्हणून तुला मी,”बच्चू दादा”, असेच संबोधित आहे, पुढेही तू आमचा बच्चू दादाच राहणार !!

    दादा तू थोड्या दिवसापूर्वी आमचा निरोप घेतला आणि मनामध्ये विचारांचे काहूर उठले. या क्षणभंगुर मानवी जीवनाच्या अस्थिरतेविषयी, दुसरा दुःखद प्रत्यय आला.  संतांनी, कवींनी तत्त्वज्ञांनी ,मानवी जीवनावर भाष्य करताना, अनेक गणिते मांडलेली आहेत.भूतकाळात घडलेल्या, सध्या घडत असलेल्या आणि भविष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टी, तशाच का,घडल्या का घडत आहेत आणि का घडतील याविषयी कोणीच काही निश्चित सांगू शकत नाही व पुढेही सांगू शकणार नाही. सर्वजण फक्त एवढेच म्हणतात…..

        “हा दैवाचा खेळ निराळा नाही कुणाचा मेळ कुणा. 

         नशिबा आधी कर्म धावते दुःख शेवटी पदराला…”

     दादा, खरं सांगू या कवी आणि विचारवंतांनी सांगितलेल्या “दुःख शेवटी पदराला”… हे मला पटत नाही. तुझे अकाली जाणे जरी आम्हाला दुःखप्रत असले, तरी तू मात्र मोठे समाधान घेऊनच या जगातून आपली एक्झिट घेतली. मी मागे सांगितल्याप्रमाणे, जे स्वप्न कित्येक वर्षे पाहिले, प्रसंगी अपयश घेऊनही पुन्हा जिद्दीने उभे राहिलास, ते स्वप्न, अंशतः तरी साकारलेले पाहीले! उरलेले कार्य सुफल,संपूर्ण करण्यासाठी, भावी पिढ्यांना मार्गदर्शन करून बाकी काम त्यांच्या हाती सोपविले. जाताना चेहऱ्यावर स्मित ठेवूनच गेलास … दुःखाचा लवलेशही का असावा?

      आयुष्यात मिळविलेले यश,संपत्ती व प्रेम, हे आपल्या जिद्दीने केलेल्या अथक प्रयत्नाचे  फळ ! दैवावर हवाला ठेवून चालणार नाही या सकारात्मक वृत्तीने जीवन जगलास. मिळवायचे त्यांतील काही मिळविले ,अजूनही खूप मिळवायचे होते. ते केवळ आपल्यासाठी नव्हे  तर ज्यांच्यावर आपली माया होती, त्यांनीही वैभवाचे दिवस पहावे, ही मनिषा पूर्ण करण्यासाठी. भविष्यात खूप योजनांचा संकल्प होता. नुकतीच कुठे प्रयत्नांच्या वृक्षाला फळे येऊ लागली होती..  ‘आता फार झाले, पुष्कळ धडपड केली, पुरे, असा दैववादी भाव न ठेवता, पुढेही प्रयत्नांची पराकाष्ठा  करण्याचे आपले मनोरथ होते. तन, मन, धन देऊन,असेच सर्वांना बरोबर घेऊन, पुढे मार्गक्रमणा करावयाची होती पण..पण दैवाने अचानक घाला घालून….घात केला.

         “रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं ,

          भानुरुदेश्यति,हसिष्यति कमल श्री : ।

          इत्थं विचारयति कोषगते द्विरेफे .

           हा ! हन्त ! हन्त ! नलिनी गज ऊज्जहार..”..

   कमलदलांत दुर्दैवाने अडकलेला भ्रमर, पहाट होण्याची वाट पहात होता.थोड्या वेळाने सूर्य उगवेल, कमलदले उमलतील,आणि मी या बंधनातून मुक्त होऊन, पुन्हा उंच भरारी घेईन..माझ्या प्रियजनांना भेटायला जाईन. ही जिद्द ..पण हाय,  हाय,अरे दैवा ..एक मत्त  हत्ती,सकाळ होण्याआधीच तलावावर आला,आणि ते कमलदल देठा पासून तोडून, त्यांने ते स्वाहा केले… बिचारी पहाट दुःखी झाली.

    दादा ,एक दिवस या जीवघेण्या दुखण्यातून आपण बाहेर याल,निदान अजून,  काही वर्षे  आजाराला सोबत घेऊन तरी,आमच्याबरोबर राहाल,अजून उंच भरारी घ्याल,अशी आमची भाबडी आशा होती… पण.. पण ,ही सगळी स्वप्नेच राहिली. खेळ संपला..एक प्रयत्नवादी,शांत,सुस्वभावी,संशोधनात्मक,दृष्टिकोनाचे,व्यवसायाची अचूक दृष्टी असलेले,, स्वतः अडचणीत असूनही दुसऱ्यांच्या मदतीला,मार्गदर्शनाला सदैव तयार असणारे, असे दुर्मिळ व्यक्तिमत्त्व काळाच्या आड गेले. आम्ही, तुमची भावंडे, मित्र,नातलग, सहाध्यायी सहकारी,एका दुःखद व धक्कादायक वास्तवातून अजून सावरत आहोत. ..

      एखादी व्यक्ती,ती सुद्धा आपल्या जवळची, आपल्याला हवीहवीशी ,आपल्यावर प्रेम करणारी, आपल्या अडीअडचणीत मदत व मार्गदर्शन करणारी, आयुष्यातून कायमची निघून जाणे फारच दुःखद असते. मग ती व्यक्ती नात्याने कोणीही असो, तिचे प्रेम,आस्था,जवळीक, आपल्याला नाही विसरता येत. अशावेळी भावनांना केवळ अश्रूवाटेच नाही, तर शब्दातूनही मार्ग मोकळा करून द्यावासा वाटतो. शब्दांच्या भावनेतून व्यक्त व्हावेसे वाटते.आयुष्याच्या या वळणावर,आमच्यापासून कायमचा दुरावला गेलेल्या, तुझ्या आठवणी काढत,भावना व्यक्त करून, मन मोकळे व हृदय हलके करावे वाटते. म्हणूनच हा लिहिण्याचा प्रपंच करतो आहे…

     दादा ,सगुण वा निर्गुण रूपात देवाची भक्ती करणारे साधुसंत,महंत सुद्धा,’ प्रत्येकाने आपापले कर्म केलेच पाहिजे’ असा उपदेश देताना दिसतात. त्यावेळी नक्की महत्त्वाचे काय? दैव की  प्रयत्न,असा प्रश्न पडू शकतो.मला माझ्या बुद्धीनुसार असे वाटते की दैवआणि प्रयत्न दोन्ही आपापल्या जागेवर महत्त्वाचे आहेत. आपले इप्सित साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. थोडी नशिबाची साथ मिळाली तर ते कार्य हमखास यशस्वी होणारच .त्यानंतरही ते कार्य सिद्धीस पूर्णपणे नेता आले नाही, यश मिळाले नाही,तर माणसाला दोष देऊ नये,असे मला वाटते. आपल्या भगवद्गीतेने देखील कार्यामागील विविध कारणांची मिमांसा करतांना, केलेले प्रयत्न  इ. बाबी समवेत,दैव हे पण एक कारण सांगितलेले आहे. भगवान म्हणतात,

      दैवं चैवात्र पंचमम्: अर्थात, कर्ता, कर्म, इंद्रिये, मन यांचे बरोबरच दैव हे देखील कार्यकारणभाव व यश मिळण्यासाठी असलेला एक घटक आहे.

    दादा तू पूर्णपणे दैवाधीन कधीच नव्हतास. नेटाने प्रयत्न करणे हेच महत्त्वाचे, याचा विसर आपल्याला कधीच पडला नाही. मात्र आपल्या पूर्व पुण्याईने नशीबाची साथ ही तुला योग्य वेळी मिळाली आणि त्यातूनच उभा राहिला एक मनोज्ञ उद्योग! सर्व प्रयत्न प्रामाणिकपणे सचोटीने करून आलेल्या अमाप संकटांना धैर्याने तोंड देऊन आपण आपला व्यवसाय उभा केलात. त्यासाठी शरीराची व स्वास्थ्याची हेळसांड झाली. कदाचित याच अतीकष्टामुळे त्या काळात, आपल्याला हृदयविकारासारखा गंभीर आजार कायमचा साथीदार बनला आणि त्यानेच शेवटी घात केला .बच्चू दादा, तू मात्र नेहमीच, तुझ्या या यशाचे श्रेय ,तुझ्या अविरत ,प्रचंड प्रयत्नांना अथवा नशिबाला न देता, सर्व श्रेय पूर्वजांच्या व आप्तजनांच्या पुण्याला व आशीर्वादांना दिलेस .. किती रे मोठे मन  होते तुझे…..

    दादा तुझ्यावर, हा लेख लिहायचा प्रसंग, असा अवचित येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते.काही महिन्यापूर्वीच, फोनवरून ,आपले दीर्घ संभाषण झाले. त्यावेळी अशी पुसटशीही कल्पना आली नाही की दादाची तब्येत नाजूक झाली आहे. होय ,डोक्यावर या हृदयविकाराची टांगती तलवार सतत गेली सतरा अठरा वर्षे होती, आपण त्याची किंचितही पर्वा न करता यशस्वी वाटचाल चालू ठेवली. कामात त्याचा कोणताच बागुलबुवा केला नाही. मात्र मृत्यूची ही  टांगती तलवार 8 फेब्रुवारीला अशी कोसळून,आपले इप्सित कार्य असे वृद्धिंगत होत असतानाच संपेल, असे त्यावेळी वाटले नाही. कारण तू कधीच तब्येतीचा बागुलबुवा केला नाही,त्यामुळे मित्रांनाही तुझी खरी अवस्था कधी कळली नाही…    

     तुझ्या बद्दल काय आणि कसे लिहू? किती लिहू ??आयुष्याची सर्व जडणघडण अगदी बालपणापासून ते अखेरपर्यंत अगदी जवळून पाहणारा तुझा एक मोठा भाऊ आणि त्यापेक्षा जास्त, एक मित्र .तुझी,  प्रथमपासूनच तुझ्या जीवनाची वाटचाल विविध अंगांनी बहरली आहे. प्राथमिक शाळेमधील एक हुशार चुणचुणीत विद्यार्थी. कै.पा. मा. पाटील गुरुजी सांगायचे, “अरे तू शाळेत येताना दप्तर आणण्याची काही गरजच नाही कारण सर्व अभ्यास तुझ्या डोक्यातच साठवलेला आहे..”, हायस्कूलमध्ये ही बर्वे गुरुजी सारखे चाणाक्ष व हुशार शिक्षक, गणितातली प्रतिभा पाहून म्हणाले, “तू निश्चितच पुढे इंजिनीयर होणार कोणीतरी मोठा होणार”. कुटुंबात उच्चशिक्षणाची कोणतीच परंपरा नसताना, एका साध्या शेतकऱ्याच्या मुलाने, आपल्या गुरुजींचा तो विश्वास सार्थ करून दाखवला. पुढे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अनुभवासाठी, दोन नामांकित कंपन्यांमध्ये कामे केली. ते करतानाच तुला  कळले,” नोकरी हे माझे जीवन नाही”..आपला स्वतःचा ‘सुमो इन्स्ट्रुमेंट ‘हा एक वेगळा आगळा असा उद्योग सुरू केला. कॅथोडिकल प्रोटेक्शन सिस्टीम(Cathodical Protection System), या प्रणालीत उपयोगी पडणारे ,MEGGER (मेगेर), व शंट(SHUNT) नावाची उपकरणे, स्वतःच्या अनुभव व हुशारीने  बनवून ती परदेशात निर्यातही करू लागलास. याबाबत थोडी अधिक माहिती त्यांचे एक मित्र श्रीयुत अतुल पाटील यांचे, संदेशात पुढे येणारच आहे .

     एवढ्यावरच न थांबता आपल्या आजूबाजूच्या गरीब आदिवासी समाजासाठी काहीतरी करावे आणि आपल्या परिसरात प्रचंड उत्पादन देणाऱ्या पण अल्पजीवी चिकूच्या फळासाठी, एक मूल्यवर्धीत व्यवसाय निर्माण व्हावा, म्हणून  “चिकू पार्लर”,हा एक अभूतपूर्व, आपल्या शिक्षण व अनुभवाशी संबंधित नसलेला,  असा व्यवसाय निर्माण केला. त्यात संबंध असलाच तर तो आपल्या अंगातील शेतकऱ्याच्या रक्ताचा व मानवतेच्या ओलाव्याचा. सुरुवातीला आलेल्या मोठ्या अपयशाने,अजिबात न डगमगता, ही वाटचाल चालू ठेवली. सुरुवातीला मालाचा खप होत नव्हता आणि सरकारच्या नियमानुसार साठवणुकीची मर्यादा (Shelf life),होऊन गेली होती. सुमारे दोन हजार किलो चिकूपावडर सरकारी नियमांत कुठल्याही  प्रकारे तडजोड न करता,आपण फेकून दिलीत. बच्चू दादा त्यावेळी तुला काय वाटले असेल, याची आम्ही आज फक्त कल्पना करू शकतो. डॉक्टरांना दुर्बल वाटणारे आपले हृदय,त्या वेळी आपण एवढे सबल कसे करू शकलात? भले शरीर कमजोर झाले असेल पण आपले मन मात्र एका पोलादी पुरूषाचे होते म्हणूनच असे निर्णय आपण आपल्या आयुष्यात अनेकदा घेतले आहेत

   ‘No compromise with ETHICS and MORALITY’..

  दादा हाच तुझा आयुष्यातील यशस्वी वाटचालीचा गुरुमंत्र होता, असे म्हटले तर त्यात काय वावगे? आज चिकूच्या पावडरीबरोबरच, चिकूपासून तयार होणाऱ्या अनेक मिठायांचे प्रकार,मिल्कशेक, आइस्क्रीम, इत्यादी विविध  पदार्थ तयार करून,एक कोटी रु. च्या वर आपली उलाढाल  नेऊन पोहोचविण्यात यशस्वी झालास. हे सर्व करतांना,आपले मित्र, नातेवाईक, बंधू ,यांना विश्वासांत घेऊन, आपल्या व्यवसायात सहभागी करून घेतले… सामाजिक भान ही ठेवले. बोर्डी गावाच्या राम मंदिर परिसरात,जेथे  जन्माला आलास, बालपण व्यतीत केले, त्या आपल्या “राम मंदिर परिसर श्री गणेशोत्सव मंडळाची” स्थापना करून, गेली कित्येक वर्षे, गणेशोत्सवाचे उत्तम आयोजन केले. दरवर्षी गणेशोत्सवात प्रत्येकाला महाप्रसाद देण्याची आपली परंपरा चालू ठेवून, सामाजिक एकोपा, बंधूभाव जपला.  सोमवंशी क्षत्रिय समाजाच्या, शतकमहोत्सवी क्रीडा स्पर्धांचे आयोजन गतवर्षी बोर्डी गावात झाले. त्यासाठी रुपये 25000 ची भरघोस देणगी देऊन, आपल्या वाडवळ समाजाप्रती अमोल योगदान दिलेस. इतर गरजूंना, त्यांच्या अडीअडचणीच्या प्रसंगी,त्यांनी न मागताही,कुठे उल्लेख न करताही, लहान-सहान रकमा किती दिल्या आहेत त्याचा हिशोब आता कोठे मिळणारही नाही! ‘स्वतः मृत्यूच्या दारी असूनही,गरजवंताला शक्य तेवढी व जमेल तितकी मदत करावी,कोणासही रिकाम्या हातांनी पाठवू नये’,हे जीवनभर जपणारा, कर्ण, भारतीय संस्कृतीमधील भव्यता ,उदारता, धीरोदात्तता,संवेदनशीलता यांचे प्रतिनिधित्व करतो. दादा मी आपल्याला कर्णाची  उपमा  नाही देणार, पण समाजातील आपल्यासारखी सर्वसामान्य माणसे , आपल्यापरीने काही ना काही देत राहून, इतरांचेही कल्याण साधण्याचा अल्पसा का असेना प्रयत्न करतात,ती तुझ्यासारखी ,सर्वसामान्य, दातृत्ववान माणसे ऊदार  कर्णाच्या पंगतीत बसण्यास निश्चितच अधिकारी आहेत असे मला नम्रपणे वाटते.

   दादा, तुझे हे कर्तृत्व ,दातृत्व व वेगळेपण आपला परिसर, आपला समाज, अगदी महाराष्ट्राला समजले. महाराष्ट्राबाहेरच्या लोकांच्याही लक्षात आले. अनेक वृत्तपत्रांनी टीव्ही चॅनल्सनी आणि मीडियातून  आपल्या मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यातील काही मी वाचल्या .मराठी , इंग्रजी, हिंदी भाषेतील या मुलाखती आज वाचतांना, तू दिलेला प्रतिसाद तुझ्या सौम्य, शांत,विनम्र व ‘आपले पाय जमिनीवर’, असलेल्या एका सुसंस्कृत उद्योगपतीचा आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना तू म्हटले होते,..

    ” मी जेव्हा हा व्यवसाय  सुरु केला, तेव्हा मला कल्पनाही नव्हती की, याची उलाढाल काही कोट्यावधी रुपयावर जाईल, आणि हा एक मोठा व्यवसाय होऊ शकेल. भविष्यामध्ये मी हा  उद्योग नक्कीच पुढे नेणार आहे. माझ्या परिसरांतील अधिकाधिक, गरीब लोकांना, आनंदाचे, सुखाचे दोन घास मिळावे ही इच्छा अजून पूर्ण झालेली नाही.”

     दादा दुसऱ्या एका मुलाखतीत ,तुझ्या पार्लरमधील पदार्थांची गुणवत्ता व त्यांचा दर्जा बद्दल प्रश्न विचारला गेला.मुलाखतकाराने तुला विचारले ,

     “एवढी गुणवत्ता तुम्ही कशी ठेवू शकता?”,

    तू म्हणालास,

       “जो पर्यंत मी जिवंत आहे आणि माझे सहकारी  माझा  सल्ला घेत आहेत, तोपर्यंत माझे शंभर टक्के योगदान हे  उत्पादनाची क्षमता व गुणवत्ता उत्तम राखण्यासाठीच खर्च होईल, नफ्याचा विचार त्यानंतर..!!”

  (I want to give my 100 percent to whatever I do,so long as I live ,profits will follow. )

त्या .”.so long as I live..”, हे वाक्य इतर कोणा गृहस्थाने ,आपल्या व्यवसायाबाबत उद्गारले असते ,तर ‘ती एक सर्वसाधारण बोलण्याची कला ‘,असा विचार झाला असता. मात्र तुझ्या बाबतीत तसे नव्हते. तुझ्या मनाचा सच्चेपणा, खऱ्या परिस्थितीची जाणीव ठेवून, मनापासून व्यक्त केलेली ती कातर भावना होती ? माझा अंदाज बरोबर आहे का याचे उत्तर आता कोण देईल ?दुसऱ्या कांही प्रस॔गी ही, अशीच खंत जाणवली. तो प्रसंग पुढे सांगतो.               

चिकू पार्लर, गुणवत्तेला  प्राधान्य!

      आठ फेब्रुवारी रोजी झालेल्या आपल्या दुःखद निधनाने आपल्या कुटुंबातीलच कोणी व्यक्ती गेली असेच प्रत्येकाला वाटत होते. महामारीत देखील लोकांची,आपले अंत्यदर्शन घेण्यासाठी झालेली गर्दी ही लोकांच्या, आपल्यावरील,प्रेमाची व जिव्हाळ्याची पोचपावती होती.दुर्दैवाने मला आपले अंत्यदर्शन घेता आले नाही. मी बोर्डीत नव्हतो हे माझे दुर्भाग्य. 

       20 फेब्रुवारी रोजी आपल्या मृत्यूच्या बाराव्या दिवशी आयोजित शोकसभेत मला बोलण्याची संधी मिळाली व मन मोकळे करता आले. त्या सभेलाही बऱ्यापैकी उपस्थिती होती. ग्रामस्थ, कुटुंबीय,नातेवाईक अगदी पुण्या-मुंबई कडचे मित्र देखील आवर्जून आले होते. जे  येऊ शकले नाहीत त्यांनी आपले संदेश आठवणीने पाठविले होते. त्या सभेत बोललेल्या वक्त्यांची भाषणे आणि वाचून दाखविलेले संदेश यांचा थोडक्यात गोषवारा मुद्दाम देतो आहे . आजकालच्या टाळेबंदीच्या काळात, उपस्थिती देखील मर्यादित ठेवावी लागते.त्यामुळे कित्येक मित्र व आप्त,इच्छा असूनही येऊ शकले नाहीत. आम्हा सर्वांचंच तुझ्यावर किती आत्यंतिक प्रेम होतं, याचा थोडासा तरी प्रत्यय त्यांना यावा, एवढ्याच भावनेने हे करीत आहे. 

                 चिकू पार्लर मधील आनंदी ग्राहक….

        मला सभेत बोलता येईल काय याची शंका होती, कारण आपल्या जवळची व्यक्ती अशी तडकाफडकी व काहीच कल्पना नसताना निघून जाते तेव्हा त्या धक्क्यातून सावरणे कठीणच असते. मला अगदी त्यादिवशी मनापासून वाटले की जे भाषण माझ्यासाठी बच्चू दादाने करावयास हवे होते ते आज मला त्याच्यासाठी करावे लागते आहे, यासारखा दैवदुर्विलास नाही. माझ्या आयुष्यातील मला बसलेला हा तिसरा जबरदस्त झटका. पहिला माझा मावसभाऊ, सुरेंद्र नारायण राऊत हा केवळ पंधराव्या वर्षी असाच अचानक गेला तेव्हा. मृत्युपूर्वी, महिनाभर आधी माझ्याशी खूप बोलला. आम्ही बोर्डीच्या समुद्रकिनार्‍यावर सायंकाळी, अंधार पडेपर्यंत बसलो होतो. आपली भावी स्वप्ने र॔गवीत होता. त्याला वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्ट व्हायचे होते. दोनच महिन्यात अचानक गेला. सर्व स्वप्ने अधुरीच राहीली. मला अंत्यदर्शनही घेता आले नाही. 

       दुसरा धक्का,माझी धाकटी बहीण निलम वयाच्या केवळ तिसाव्या वर्षी गेली. असाध्य आजाराने आजारी होती ..तिचे एवढ्या लवकर, भरला संसार टाकून निघून जाणे सर्वांसाठीच सहनशक्तीच्या पलीकडले .आज हा, तिसरा प्रसंग. माझा लहान भाऊ, मित्र व हितचिंतक असा अकाली, वैभवाच्या शिखरावर आरूढ होत असताना गेला.

    बच्चू दादा,खरेतर तू माझ्यापेक्षा दहा वर्षाने लहान. तू साधारण तीन-चार वर्षाचा असताना आम्हीदेखील आमच्या आजीच्या घराशेजारी, डॉ.चुरींच्या घरात राहत होतो. त्यामुळे तुला अगदी जवळून पाहत होतो..आमचा खंडू मामा ही त्यावेळी बोर्डीला  होता. त्यामुळे त्याची मित्रमंडळीसुद्धा, कधीकधी, आमच्या आजोळच्या घरी, ज्याला आम्ही  आक्काचे घर म्हणत असू, घरी गप्पा गोष्टी साठी तेथे येत असत .सर्वांना आकर्षण बच्चू चे, कारण तो खूप चुणचुणीत. त्या छोट्या वयात गायचा ही सुंदर. अगदी हातवारे करून आपले गाणे उठावदार करायचा. हे सर्वांना खूप मजेशीर वाटायचे .त्याचे  त्यावेळेचे एक गाणे मला आठवते ते म्हणजे…

   ‘ आम्हा जात नसे, आम्हा धर्म नसे, आम्ही हिंद भूमीचे पुत्र!

    मामाची मित्र मंडळी गंमत म्हणून बच्चूला  हे गाणे परत परत म्हणावयास सांगत. तोही अगदी आनंदाने म्हणत असे. मात्र हे थोडे अतीच झाले, व एक दिवस या चिमुरड्याने या मित्रमंडळीची  विकेट घेतली. त्या मित्रमंडळीत या चुरी कुटुंबीयांचे शेजारी,आप्पाजी समेळ राहत असत व त्यांचा मुलगा मदन देखील खंडू मामाचा मित्र थट्टा मस्करी करणार्‍यांत होता. त्यादिवशी मदनने बच्चूची गंमत करण्यासाठी, अगदी नेहमीप्रमाणे, त्याला या गाण्याची फर्माईश केली. बच्चूने काय करावे… कसे कोणास ठाऊक त्याच्या तोंडून खालील प्रमाणे गाण्याच्या ओळी अगदी सहजपणे बाहेर पडल्या.

    “आम्हा जात नसे, तुम्हा लाज नसे, तुम्ही अप्पाजींचे पुत्र!” 

  मदनचा चेहरा  पडला. सर्वांनी या प्रस॔गावधानी बच्च्याचे कौतुकच केले. त्यानंतर बच्चूला कोणी गाण्याचा कधी  अत्याग्रह केलेला मला आठवत नाही!! या केवळ तीन-चार वर्षाच्या पोराने आपल्या, बुद्धी व हुषारीची  दाखवलेली चूणूक त्याच्या भावी आयुष्यातील कर्तृत्वाची नांदी होती. पुढे केव्हातरी आम्ही दोघेच भेटलो असताना त्याला या प्रसंगाची आठवण करुन दिली होती व विचारले होते की तुला हे त्यावेळी कसे सुचले? त्याने त्याचे नेहमीचे स्मितहास्य करून माझ्याकडे अर्थपूर्णरित्या  पाहिले होते……

    माझा  75 वा वाढदिवस दोन वर्षांपूर्वी साजरा झाला. माझ्या जवळच्या मित्रांना व आप्तांना मी बोलाविले होते. बच्चू दादा आपल्या प्रकृतीची तक्रार न सांगता त्यादिवशी पार्ल्यामध्ये सकाळीच आला. अगदी लवकर आला आणि मला भेटून त्याने माझे अभिनंदन केले. “या प्रसंगी माझ्याकडून आमच्या चिकू पार्लरची भेट म्हणून बर्फी आणली आहे, ती सर्वांना वाट”अशी विनंती केली .. जमलेल्या दीडशेहून जास्त लोकांना भरपूर मिठाई घेऊन आला होता. मला भरून आले. मी म्हटले .. कशाला आणलीस ही एवढी  मिठाई? आपण तुझा 75 वा वाढदिवस साजरा करू तेव्हां मिठाईची जोरदार पार्टी करूया की! नेहमीचे मंदस्मित  चेहर्‍यावर ठेवत, मला शांतपणे म्हणाला ,

  “बंधू माझा 75 वा वाढदिवस होईल की नाही देव जाणे, आज तुझा 75 वाढदिवस मी पाहतोय, तो मी माझाच समजतो आहे”..

 बच्चू दादाचे ते उद्गार त्यावेळी, त्या आनंदाच्या दिवशी मला कातर करून गेले. आज त्या ऊद्गारांचा संदर्भ मला स्पष्टपणे लागतो आहे.तो प्रसंग, ते वाक्य, आता आयुष्यात सदैव स्मरणात राहणार ! दादा, तुझा 75 वा वाढदिवस साजरा होणार नाही,  हे तुला आधीच कळले होते का रे ? भले,आता तुझा  वाढदिवस  साजरा होणार नसेल,आम्ही तुझे पुण्यस्मरण करणार, आठ फेब्रूवारी या दिवशी!

   दादाच्या वैयक्तिक , शैक्षणिक, व व्यवसायिक जीवनाबद्दल ही मी थोडे सांगितले .बालपणीच दाखवलेल्या हुशारीप्रमाणे व शिक्षकांच्या अंदाजाप्रमाणे त्याने व्ही. जे. टी .आय सारख्या भारताच्या नव्हे जगातील नामांकित संस्थेत आपले इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. व्यवसायाला सुरवात करताना प्रथम, बीपीएल इंडिया व शांती इलेक्ट्रिकल्स,या दोन प्रख्यात कंपन्यांत,  कामाचा अनुभव घेतला.त्याचवेळी त्याला, ‘आपण काहीतरी स्वतंत्र उद्योग करावा’, याची जाणीव झाली. त्यातूनच  “सुमो इन्स्ट्रुमेंट”, या स्वतःच्या कंपनीची स्थापना केली.

Cathodic protection system (CPS), म्हणजे गंजरोधक प्रणाली. त्यासाठी लागणारे मुख्य भाग म्हणजे  MEGGER व  ‘शंट,'(SHUNT) यांची निर्मिती आणि निर्यात दादा *SUMO INSTRUMENTS*  ह्या स्वनिर्मित कंपनीतर्फे करतात. दादांचे एक मित्र व मुंबई महापालिकेच्या बी ई एस टी या उपक्रमात, डे.जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झालेले अधिकारी, श्री.अतुल पाटील यांनी दादाच्या या कामाचे, आपल्या संदेशात  कौतुक केले आहे ते त्यांच्याच शब्दात येथेच सांगतो.

“महेश आणि मी, समवयस्क. आपल्या समाजातील, प्रथम पिढीतील उद्योजकांतील (first generational enterprenauer) तो होता. 

परंतु  यापूर्वी अभियंता म्हणून त्याने केलेल्या विशेष कामगिरीचा उल्लेख करावासा वाटतो.  विद्युत अभियांत्रिकीमध्ये High Voltage उपकरणांच्या व कामगारांच्या सुरक्षिततेसाठी Insulation Resistance   मोजणे अपरिहार्य असते. वीज वितरण ‘ विशेषतः शहर भागात हे फार महत्वाचे असते. यासाठी  त्याकाळी Meggar या ब्रिटीश कंपनीचे एकच उपकरण उपलब्ध होते. महेशने स्वतःच्या Technical knowledge व कल्पकतेने त्याला पर्याय निर्माण केला. Import substitution म्हणून त्याला भारतभर व नंतर इतर देशांत मान्यता मिळाली. आत्मनिर्भर हा शब्द प्रचलित होण्याच्या फार अगोदर महेशने ते प्रत्यक्षात आणून देशसेवा केली होती.”

   एका तज्ञाने, दुसऱ्या  अभियंत्याच्या कल्पकतेला दिलेली ही मोठी दाद आहे. आज भारतात एम एस ई बी(MSEB) आणि,बी ई एस टी(BEST), महामंडळाकडून या उपकरणांना मोठी मागणी आहे.

 पण त्या पुढील झेप ही खूप धाडसाचे व जोखमीचीही होती. दादा  नुकताच एका मोठ्या आजारातून ,परमेश्वरी कृपेने ऊभा राहिला होता. सर्वसाधारण माणूस अशा प्रसंगातून सावरल्यावर , इतर उद्योग गुंडाळून फक्त घरात बसून, विशेष शारीरिक व मानसिक कष्ट न करता आपले जीवन व्यतीत  करील. पण त्याचा  पिंडच वेगळा ! आपल्या भागातील चिकूला  व त्याच्या उत्पादकांना, राबणाऱ्या कामगारांना योग्य मोबदला मिळवण्यासाठी, संशोधनात अनेक वर्षे ,सुमारे,12 वर्षे,घालवून “चिकू पार्लर”, हा एक वैशिष्ट्यपूर्ण उद्योग निर्माण केला. चिकू फळावर अनेक प्रक्रिया करून, त्यापासून मूल्यवर्धित अशा, सुमारे 16 विविध पदार्थांची निर्मिती केली..महाराष्ट्रात व गुजरातमध्ये मिळून आज तीन चिकू पार्लर्स, दिमाखाने उभी आहेत. विशेष म्हणजे शंभर टक्के नैसर्गिक प्रक्रिया, रसायन, प्रिझर्वेटिव्ह, कृत्रिम रंग, कृत्रिम स्वाद अजिबात न वापरता ही उत्पादने आपण निर्माण केली. हा प्रयोग आपले,’सोशल इंजिनिअरिंग’ (Social Engineering),आहे! बच्चू दादा हे यश, आपल्या, संशोधन वृत्ती व अचूक व्यावसायिक दृष्टी यांना मिळालेले यश आहे.

 माझ्या  भाषणात मी शेवटी सांगितलेले दोन विचार पुढे सौ. ऊल्काने देखील आपल्या संदेशात सांगितल्या.. हा कर्मधर्म संयोग नाही.  मला त्याचे खूप अप्रूप आहे.. गेलेल्या व्यक्तीबाबत, आस्था,जिव्हाळा, असणारी माणसेच असा समविचार प्रदर्शित करतील.सौ.ऊल्का म्हणते , 

   “जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला..

  ही सावळाराम कवींची रचना, सर्वांच्या लाडक्या दादाच्या, अशा अचानक जाण्याला  यथार्थ वाटते. जी माणसे आपल्या अल्पायुष्यात  नाव लौकिक मिळवितात, सर्वांच्या प्रेम व कौतुकाला प्राप्त होतात,  अशी माणसे अल्पायुषी ठरावी, हा निसर्ग नियम आहे का? परमेश्वर ही माणसे आपल्याजवळ हवीत, म्हणूनच तो त्यांना लवकर बोलावून घेत असेल?”

  पुनर्जन्म आहे की नाही हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय. त्या अनुसार,कोणी विश्वास ठेवावा वा ठेवू नये .श्रद्धाळू लोकांना, प्रत्ययही आलेला आहे .

 .         गीताई म्हणते ” वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि”  जीर्ण वस्त्रे टाकून मानव जशी नवीन वस्त्रे धारण करतो,तसेच जीर्ण शरीराचा त्याग करून आत्मा एक नवीन शरीर धारण करतो.

     या जन्मातील सदाचरण व सद्वर्तनाने ,येथील निर्गमनानंतर, पुन्हा मनुष्य देहच प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त होतो. दादा तुझे येथील आचरण, सर्वाभूती  करुणा व आस्था, मिळविलेली वाहवा पाहिल्यावर तू ही दैवी शक्ती प्राप्त केलीस !  

  आपल्या पुनर्जन्मा बद्दल असलेला आत्मविश्वास याबाबत संत चरित्रामध्ये अनेक गोष्टी नमूद आहेत त्यांतील समर्थ शिष्या, वेण्णास्वामींची गोष्ट ही या पुनर्जन्मावर देणारे भाष्य करते थोडक्यात गोष्ट अशी,

        श्री संत कल्याण स्वामी व श्री संत वेणास्वामी ही समर्थांचे मानसपुत्र व मानसकन्या च होते.अखेरच्या दिवसात  वेणा स्वामींनी,समर्थांना,” मला माहेरी जायचे आहे”, असा आग्रह धरला होता. एके दिवशी आपल्या ध्यानात मग्न  असताना त्यांना समजले,

     ‘माहेरी म्हणजे,वेण्णेला,आपले अवतार कार्य संपवावयाचे आहे.’

  त्यांनी वेण्णेला ‘माहेरी जाण्याची’ परवानगी दिली. अखेरच्या दिवशी वेणास्वामींचे कीर्तन राम मंदिरात ,सर्व शिष्य व समर्था समोर झाले. शेवटचे चरण,

    ” वेण्णा पावली पूर्णविराम”.. हे विवरून ,समर्थांच्या चरणावर अश्रुधारा सांडू लागली. श्रीगुरूंनी विचारले,” वेण्णा आता निघालीस,पण पुन्हा केव्हा येणार?” तेव्हा वेण्णेने दिलेले उत्तर, त्यांची स्वतःच्या पुनर्जन्मावर खात्री, आणि आपल्या गुरुवरील श्रद्धा यांचे प्रतीक. वेण्णास्वामी म्हणाल्या

    “महाराज, आपण कधीही  मला बोलवा, मी आपल्या सेवेला हजर होईन. जेथे जेथे धर्माचे, रामाचे,आणि दीन दुःखीतांच्या सेवेचे काम चालू असेल तेथे तेथे माझा वास असेल.”  

   एवढे बोलून वेण्णेने गुरू चरणावर माथे टेकले ,आणि तेथेच त्या पूर्णविराम पावल्या . त्यांची समाधी आजही सज्जनगडावर आहे. 

   .आपल्या सद्गुरूंना हे वचन देताना, वेण्णा स्वामींनी आपल्यासारख्या सामान्य माणसांनाही,आश्वासित केले आहे. सर्व जीवमात्रा विषयी प्रेमभाव व जनता जनार्दनाप्रति सद्भाव, हे आयुष्यातले, कर्तव्य मानून,जगाल, तर सामान्य माणूस ही “अधिकारप्राप्त आत्मा”,होईल…. दादा,, तू सुद्धा संसार करताना परमार्थही जोडलास… करिता,देवाला आमची प्रार्थना!,तुला विनंती..

      तुझ्या या चिकू पार्लरचे संदर्भात एक दुसरी आठवण माझी पत्नी सौ मंदा नेहमी सांगत असते. एकदा कोणत्यातरी प्रसंगा निमित्ताने ती मुंबईकडे जात असता मुंबई  अहमदाबाद हायवेवर  मनोर जवळील आपल्या चिकू पार्लर असलेल्या मॉलमध्ये थांबली .तुझे चिकू पार्लरचे सुंदर दुकान पाहून  तिला खूप आनंद वाटला. काही पदार्थही घेतले. फोटो घेतले व दुसऱ्या दिवशी तुला व्हाट्सअपवर मेसेज पाठवला.” बच्चू दादा आपल्या चिकू पार्लर मध्ये जाण्याचा मला योग आला . तेथील सर्व वस्तुंची मांडणी व एकंदरीत व्यवस्था पाहून खूप आनंद आणि अभिमानही वाटला. आमच्या बच्चु दादाचे हे चिकू पार्लर एवढ्या मोठ्या मॉलमध्ये दिमाखाने उभे आहे याचे कौतुक वाटले”  थोड्याच वेळात तिला जबाब मिळाला, वहिनी धन्यवाद पण मला प्रामाणिकपणे असे वाटत आले आहे हे सर्व वैभव हे माझे नसून, माझी आई, तात्या, आजोबा, आज्या तसेच माझे सर्व  मामा मावशी इतकेच काय तुमच्या अप्पांची देखील पुण्याई  माझ्यामागे आहे म्हणूनच मी काही करू शकत आहे!” कदाचित एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण हा मेसेज नक्कीच पाठवला नाही. त्यामागे आपल्या आयुष्यातील सतत आचरलेल्या विचारसरणीचे प्रतिबिंब होते. मात्र  ती एवढी प्रभावीत झाली की मला निरोप दाखवित म्हणाली, खरेच बच्चू दादा किती साधे सरळ आणि निगर्वी आहेत. खरोखर त्या दिवशी मलाही एक वेगळा बच्चू बघायला मिळाला .कारण आपल्या यशाचे सर्व श्रेय दुसऱ्या कोणाला देऊन टाकणारा तुमच्या सारखा माणूस हा केवळ दुर्मिळ !तीच यशस्वी माणसे असे जमिनीवर पाय ठेऊन बोलू शकतात. बच्चूदादा तू त्यातील एक होतास म्हणून हे शब्द उत्स्फूर्तपणे तुझ्या तोंडी येत असत.

     बच्चू दादा आपल्या व्यावसायिक, सामाजिक ,शैक्षणिक ,अशा सर्व पैलूंचा उहापोह कितीही केला तरी कमीच आहे.या सर्वांहून, जास्त कौतुक मला आपला ‘कौटुंबिक जिव्हाळा’,आपण ,”एक फॅमिली मॅन,”,याबद्दल आहे. वर  म्हटल्याप्रमाणे, आपल्या यशाचे सारे श्रेय, पूर्वसुरींना,पूर्वजांना,त्यांच्या पुण्याईरूपी आशीर्वाद, यांना दिले . हे केवळ शाब्दिक बुडबुडे नव्हते तर कृतीही तशी होती. आपल्या व्यवसायातील यश व समृद्धी याचे वाटेकरी आपले सर्व कुटुंबीय देखील आहेत या आत्यंतिक प्रामाणिक  भावनेने तू आपला व्यवसाय पुढे नेला आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबाबद्दल असलेली अशी वत्सलता ,आजकाल किती दुर्मीळ?आज प्रत्यक्ष जीवनात, आई-वडिलांबद्दल ही,अशी संवेदना हळूहळू नष्ट होत चाललेली आहे तेथे,’कुटुंबाचे देणे लागणे’हा खूप दुरचा विचार!

   “घर माझे हे मातीचे, पण प्रेमाच्या भावाचे !”

ही भावना जाणीवपूर्वक जोपासणाऱ्या वास्तूला घर म्हणावे.घरातल्या प्रत्येक सदस्याला मानसन्मान ,आपुलकी, तिथे मिळावी. प्रसन्नता,श्रमाची प्रतिष्ठा, जपणूक,स्नेहबंध, समाजाचे ऋण, अतिथी सन्मान,ज्ञानाचे संवर्धन, ही व अशी  शेकडो मुल्ये ज्या  घरातून दिली जातात, तेव्हा त्या घराला घरपण येते !  दादा तू ,आपल्या घरातील भावंडांना,कुटुंबाला एक भावनिक ऊब दिली व खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाचे रूपांतर  एका ‘आदर्श सहजीवनात’,केले. असे कुटुंब व घटक आज-काल देवदुर्लभ!          

      दादा, तू,तात्या उर्फ कै.परशराम पांडुरंग चुरी व आमची मावशी गं भा कमल परशराम चुरी उर्फ कमळी मावशी यांचा द्वितीय सुपुत्र. आपले हे भाऊ, बहिणी, भावोजी व चुरी  कुटुंबात आलेल्या सर्व स्नुषा यांचे संपूर्ण कुटुंब, एक “महाकुटुंब” झाले आहे. त्याला आपण जसे कारणीभूत, तसेच प्रभाकर भाई व सौ नलिनी वहिनी यांचे मार्गदर्शन व श्रम, सर्वांनी दाखविलेला समंजसपणा व एकत्र कुटुंबात जरुरी असलेला संयम, याला तोड नाही. प्रभाकर भाईंनी,अत्यंत खडतर व प्रतिकूल परिस्थितीतून दुग्ध व्यवसायातील नामांकित प्रशिक्षण पूर्ण केले. वरळी डेअरीत ऊच्च, व्यवस्थापकीय पदावर काम केले. वरळी येथील आपल्या निवासस्थानी,सर्व भावंडांना, शिक्षण व व्यवसायानिमित्त मुंबईत राहण्याची व्यवस्था ही मोठी गरज भागविली. प्रभाकर भाईंचे ऋण आपण सर्व भावंडे नेहमीच मानत आलात. मला आपल्या संपूर्ण कुटुंबाचे,मनापासून, खूप अप्रूप वाटत आलेले आहे.

      बोर्डीच्या माजी विद्यार्थी संघाचे कार्यवाह, श्रीयुत राजन चुरी आपल्या आदरांजलीत एक ,खूप महत्त्वाचे सांगून गेले. माजी विद्यार्थी संघाची कॅम्पिंग ग्राउंड मधील जागा आपल्या चिकूपार्लरसाठी, त्यांनी भाडेतत्त्वावर काही वर्षासाठी दिलेली आहे. तो दीर्घ करार संपल्यानंतर,’आपण ही जागा व्यवस्थित हस्तांतरित कराल काय?’, याबाबत काही समिती सदस्यांनी, शंका व्यक्त केली. त्यावेळी आपण दिलेले उत्तर  आपली निस्वार्थी वृत्ती ,स्पष्टवक्तेपणा,निरलसता यांची साक्ष देणारे. आपण त्यावेळी म्हणालात,

    ” मी सुद्धा ,आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. ही मालमत्ता माजी विद्यार्थ्यांची आहे. विद्यार्थी संघाला माझ्याकडून काही मदत व्हावी हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे मी जर जिवंत असलो, तर निश्चितच तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही. मी त्यावेळी असेन की नसेन, एक खात्री मी आज तुम्हाला निश्चित देतो. माझी मुले, या मालमत्तेच्या हस्तांतरणांत, कोणताही अडथळा, त्या वेळी आणणार नाहीत. माझ्या मुलांना, मी तसे बजावले आहे!”. 

   आपल्यासारखी,आरस्पानी व कर्मकठोर, माणसेच असे स्पष्टपणे बोलू शकतात आणि बोलले तसे वागू शकतात. पुन्हा एकदा,..आपल्या मनाच्या कप्प्यात ,आयुष्याच्या क्षणभंगुरतेची दडलेली जाण,डोकावून गेली. मी गहीवरलो!

   पुण्याचे विनय पाटील हे आपले भाचे. त्यांनीही आपल्या एक-दोन खूप हृद्य आठवणी सांगितल्या.ते म्हणाले ,”मामा ज्यावेळी नोकरीत असत, त्या वेळी पुण्याला आल्यास मुक्काम आमचेकडेच असे. आठवड्यातून दोन दिवस त्यांचा उपवास असे. तेव्हा मी त्यांना एकदा विचारले आपण देव, धर्म उपास तापास, हे सर्व मानता काय? तेव्हा ते म्हणाले होते”, 

   ” हा उपवास देवासाठी नाही, उपवास माझ्या मनासाठी आहे. माझ्या मनावर, मी कितपत ताबा ठेवू शकतो हे या उपवासांनी मला कळते!”

     आगळा प्रयत्न, शास्त्रीय दृष्टिकोन. आयुष्यभर आपण आठवड्यातून दोन दिवसाचे उपवासाचे व्रत कधीच सोडले नाही. आपल्या निग्रही स्वभावाचे हे रहस्य होते. किती सहजपणे आपण हे सांगितले !

     विनय हे एक उत्तम विक्रीव्यवस्थापन तज्ञ. जगभर फिरून त्यांनी अनेक उद्योगांना त्यांच्या वस्तूना, मार्केटिंग साठी मदत केलेली आहे. आपल्या चिकू पार्लरमधील विविध पदार्थांची विक्री करताना विनयने आपल्याला दिलेल्या मौलिक सल्ल्याची तू नेहमीच दखल घेतली. त्यात फायदाही झाला. विशेषतः आपल्या विकाऊ पदार्थांना ‘पॅकिंग’ साठी विविध प्रकारची वेस्टने तयार करताना विनयने खूप कष्ट घेतले व आपल्या ‘चिकू पार्लरचा प्रत्येक पदार्थ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा कसा होईल’ हे आपले स्वप्न पूर्ण करण्यात, विनयचा वाटा मोठा. त्यांनी कबूल केले की, मामांना इंजिनीअरिंग,नवे संशोधन या बरोबरच, विक्रीच्या  तंत्रातही (Marketing)  खूप गती होती. मामाचे काही विचार मलाही उपयुक्त ठरले. भविष्यात  मामांच्या अनेक योजना होत्या. त्या कार्यान्वित करण्यासाठी ते माझ्याशी नेहमी चर्चा करीत”

    विनयने सांगितलेली पुढची आठवण तर हृदय हेलावून टाकणारी. ते म्हणाले, “मृत्यूच्या आधी फक्त 20 तास ,माझे मामाशी बोलणे झाले. त्यांचा फोन पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण ते नुकतेच इस्पितळातून परत आले असल्याने त्यांना बोलण्याची परवानगी नव्हती. त्यांनी मला त्यांच्या काही भविष्यातील योजना, पुढील नवीन प्राॅडक्स व त्यांचे पॅकेजिंग, पुण्यातील काही मोठ्या ग्राहकांना विकावयाच्या पदार्थासंबंधी करावयाच्या करारासंबंधी विस्तृत चर्चा केली”.

     मृत्यूच्या आधी केवळ कांही तास, नुकतेच इस्पितळातून बाहेर आले असताना,त्या मनस्थितीत ही,तुला,’वेध भविष्याचे’, होते..

    बच्चूदादा, कर्मवीर त्यांनाच म्हणतात जेआपल्या अंगीकृत कामाचे असे वेड, असे अखेर पर्यंत घेतात. जे गीतेतील कर्मण्येवाधिकारस्ते …हे तत्वज्ञान स्वतः आचरतात, त्याची अनुभूती घेतात…. आपल्याला मनापासून सलाम !

    यानंतर शोकसंदेश याचेही वाचन झाले डॉ.स्निग्धा वर्तक यांनी उत्कृष्ट प्रकारे संदेशांचे वाचन केले. श्री राम मंदिर परिसर महा परिवार श्री गणेशोत्सव समिती पदाधिकारी व सदस्य आपल्या संदेशात म्हणतात ,

    “बच्चू दादा हे आपल्या श्री गणेशोत्सव आयोजनाचे प्रमुख संस्थापक.प्रत्येक गणेशोत्‍सव चांगल्या प्रकारे साजरा होण्यासाठी सढळ हस्ते आर्थिक मदत ही करीत असत. श्री गणेशोत्सवात महाप्रसाद देण्याची परंपरा त्यांनी कायम जपली. त्यांचे हे उपकार आम्ही कधीही विसरू शकणार नाही. ते आमचे प्रेरणास्थान होते, यापुढेही राहतील.”.

      बच्चु दादाचे एक बालमित्र , इंजिनिअरिंग कॉलेज मधील सहाध्यायी, आणि महापालिकेचे निवृत्त उपायुक्त,भालचंद्र उर्फ भालू पाटील ,यांनीही आपल्या संदेशात काही भावनिक आठवणी सांगितल्या.  “तू आणि नितीनने 1970 साली व्ही जे टी आय मध्ये प्रवेश घेतला. तू इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग घेतले. इंजीनियरिंग केले, शांती इलेक्ट्रॉनिक्स अंधेरी मध्ये कामाला लागलास. मी 1972 साली व्हीजेटीआय ला आल्यावर तू आणि नितिनने मला आर्थिक भार नको म्हणून तुमची वर्कशॉपची टूल्स आणि पुस्तके मला दिली. पुन्हा मागितली नाही. तू म्हणालास कोणत्यातरी गरजूला देऊन टाक. किती तुझी समज आणि किती उदारपणा! रविवारी आमची मेस बंद असल्यामुळे, मी काय खाईन, म्हणून हटकून तू मला वरळीला प्रभाकरकडे कित्येकदा जेवायला घेऊन गेला आहेस. तुझ्या क्षेत्रात अतुलनीय प्रगती केली. गृह उपयोगी वस्तु, लघुउद्योग, ते परदेशात उत्पादन होणाऱ्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तूचे प्रथम उत्पादन सुरू केले, निर्यात केली. तब्येतीने साथ दिली नाही पण जेव्हा, जेव्हा तुला भेटलो तेव्हा, तेव्हा तू असंच म्हणालास,” जी वस्तुस्थिती आहे ती आहे, मी प्रकृती चांगली ठेवण्याचा प्रयत्न करतो!”. गेल्या 27 डिसेंबरला तुझ्या वाढदिवसाच्या प्रसंगी फोनवर बोलताना आपण जुन्या आठवणींना जवळा देताना,भावनिक झालो होतो. तू काही दिवसापूर्वी हॉस्पिटल मधून घरी आला होतास,म्हणालास “भालू, इट वॉज व्हेरी व्हेरी डेंजरस इशू,, हे इन्फेक्शन आहे, पुन्हा पण होऊ शकते !”किती सहजपणे तू हे सांगितलेस आणि त्याच सहजतेने तू आयुष्य जगलास. आज असा अचानक निघून गेलास. आम्हा सर्व सवंगड्यांना मोठा शाॅक दिला, आम्हा मित्रांना सगळ्या कुटुंबाला गावाला हवा हवासा असणारा एमपी आज आमच्यातून गेला…”

     श्रीयुत प्रदीप चुरी हे आपले चुलतबंधू . गेल्या अनेक वर्षापासून यांचे बरोबर घरोबा. आणि विशेषतः या वर्षभराच्या करोना काळात आपले वास्तव्यही बोर्डीलाच असल्यामुळे, रोजचाच संबंध. ते आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “लाॅक डाऊनपासून गेले दहा महिने तू मला रोज सकाळी दिसायचा. ‘गुडमॉर्निंग’करायचा. तुझे नेमाने मॉर्निंग वाक चालू असे. मला ‘सुरज डायमंड’, मुंबई येथे नोकरी लागली होती. पण घोलवडहून रोज येणे जाणे जमणार नव्हते. नोकरी सोडायचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्या वेळेस कुलुपवाडी, बोरिवली येथे घेतलेल्या तुझ्या नवीन घरी तू मला राहावयास सांगितले व तेथे राहूनच मी नोकरी करू शकलो. 37 वर्षापूर्वी माझे बाबा, नानांनी वाडी करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळेस तू त्यांना भेटावयास एकदा आला होतास. नानांची अडचण एका नजरेत तू ओळखली व तात्काळ नानांना तीनशे रुपयाची रक्कम हातावर ठेवून पाईप घेण्यात मदत केली होती. आज त्या मदतीचे मोल करता येणार नाही.एवढी ती मूल्यवान होती. गेल्या वर्षी बोर्डीला समाजाचे सामने झाले त्यावेळी,रूपये पंचवीस हजारांची, भरघोस देणगी माझ्या हाती सुपूर्त करताना, ‘अजूनही लागले तर सांग’, असे सांगणारा, दादा तू किती दानशूरही  होतास याची प्रचिती पुन्हा आली! परदेशात उपयोगात येणाऱ्या इलेक्ट्रिक उत्पादनात तू आपल्या ‘सुमो इन्स्ट्रुमेंट, मधून नाव कमावले होते. पण शरीरात असलेले शेतकऱ्याचे रक्त तुला स्वस्थ बसू देईना. आजारातून नुकताच सावरलेला असतानाही असे धाडस कोणी करणार नाही,ते तू केलेस आणी ‘चिकू पार्लर’ चा जन्म झाला.बारा वर्षांचे संशोधन ,आर्थिक नुकसान तरीही दर्जाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता लोकांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवून, आपल्या परिसरांतील आदिवासी महिला व बेरोजगार तरुण यांना रोजगार मिळावा व स्थानिक शेतक-याला चांगला भाव मिळावा हे उद्दिष्ट ठेवून हे चिकूपार्लर सुरू केलेले आहे. व आज नावारूपाला आले आहे.

    तुला आपल्या भावंडांची व पत्नीकडील मंडळी,यज्ञेश ,संदीप व दीपक या सर्वांचीच मोलाची साथ सतत मिळाली. चिकूचे नाव देश पातळीवर होतेच पण ते चिकू व त्यापासून बनविलेले अनेक पदार्थ त्याच्या दर्जामुळे जागतिक पातळीवर नेण्याचे काम दादा तू केलेस. यात स्थानिक शेतकरी व कामगार यांचाही फायदा होऊ लागला आहे. त्यातच तुझे समाजाप्रती प्रेम  व मोठे योगदान दिसून येते.

    श्री राम मंदिर परिसर,गणपती मंडळ उत्सवाचा, तू आद्य संस्थापक.गेल्या 39 वर्षांपासून  आपल्या ओट्यावर गणपती बसवून सुरुवात करून दिलीस.आज हा गणपती गावातील एक मानाचा गणपती म्हणून ओळखला जात आहे. यावर्षी आपले मंडळ उत्सवाचे 40 वे वर्ष साजरे करणार असताना तू आम्हाला सोडून गेलास . तुझी आठवण नेहमी येईल, कारण या उत्सवातला, जेवणाचा पहिला घास, तुझ्या’ सुमो कंपनी’, कडून आम्हाला मिळायचा… दादा माझ्या हातांनी मृत्युशय्येवर तुला शेवटचा निजविताना माझ्या मनात अनेक विचार येत होते .जगात कर्तृत्ववान, प्रेमळ,कुटुंबवत्सल माणसे,लाखात एखाददुसरा, .पण ही माणसे,अशी अल्पायुषी का असतात?.. आजही तुझी भावंडे, मोठी आई, उमा वहिनी, मोहक ,सुबक ,प्रांजल, रिहान तू अचानक गेल्याच्या धक्क्यातून सावरलेली नाहीत. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. तुला भावपूर्ण श्रद्धांजली.”

    प्रदीप दादांनी आपल्या भावनांना समर्पक शब्दात वाट करून दिली. हा संदेश वाचला गेला तेव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. श्री. हरिहर चुरी सर, बोर्डी हायस्कूलमधील एक निवृत्त आदर्श शिक्षक, उत्तम चित्रकार व माझेही बालमित्र. आपल्या शोक संदेशात  म्हणतात ,

   “महेश दादाच्या अकाली जाण्याने, हळहळ निर्माण झाली. कुटुंबातील व्यक्ती गेली असेच प्रत्येकाला वाटत होते. करोनाच्या महामारीत देखील मोठ्या संख्येने अंत्यदर्शनासाठी  उपस्थिती ही त्यांच्या प्रेमाची, जिव्हाळ्याची ,परोपकाराची तसेच जोपासलेल्या नात्याची पोचपावतीच म्हणावी लागेल. आपल्या व्यवसायाचा आलेख सतत उंचावत असतानाच त्यांना हृदयविकाराच्या आजाराने ग्रासले.त्यातून एकप्रकारे पुनर्जन्म झाला व  खचून न जाता ते पुन्हा उभे राहीले. एखादी व्याधी घेऊनदेखील माणसाने धैर्याने कसे जगावे व व्यवसाय सांभाळावा याचा आदर्श पाठ त्यांनी समाजात निर्माण केला आहे.एवढेच नव्हे तर आपल्या उत्कर्षात,व्यवसायात,आप्तेष्टांना सामावून घेऊन त्यांच्या कुटुंबांचे जणू काही त्यांनी पालकत्व स्वीकारले. त्यांचा सल्ला लहानापासून थोरांपर्यंत  सर्वांना मार्गदर्शक ठरत असे. चिकू या नाशवंत फळापासून त्यांनी अनेक उत्पादने निर्माण केली व या व्यवसायाला एक वेगळी दिशा दिली .आपल्या समृद्धीचे इतरही वाटेकरी आहेत या भावनेने त्यांनी दरवर्षी दानधर्म करण्यात मागेपुढे पाहिले नाही.

      महाभारतांतील पांडवांचे बंधुप्रेम, रामायणातील राम लक्ष्मण भरत प्रेम, आपण ऐकले या प्रेमाचा प्रत्यक्ष प्रत्यय आपल्या कुटुंबात अनुभवता येतो.हा आई-तात्यांच्या  संस्काराचा एक भाग. महेशच्या आजारपणात कुटुंबाचे योगदान फार मोठे आहे. या कुटुंब वात्सल्याच्या व प्रेमाचा तो एक भाग आहे. महेशची पत्नी रतन-ऊमा,  कोणत्या मातीची बनलेली आहे माहित नाही. महेशच्या आजारपणात त्याची सुश्रुषा,पथ्यपाणी, मुलांचे शिक्षण,पाहुण्यांचे आदरातिथ्य, व आपली नोकरी अशी तारेवरची कसरत विनातक्रार, कोणताही आव न आणता ती करत आली. तिच्या कुटुंबाची भुवनेश भाई, संदीप, दीपक यांची मोलाची साथ मिळाली. राजीव व प्रणित यांची मोहक, सुबकला नेहमी उत्तम साथ असते. महेश यांनी घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे त्यांच्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरली आहेत. महेशला कष्टाने वाढविणाऱ्या, नव्वदी पार केलेल्या, त्याच्या आईच्या मनाची काय अवस्था असेल याची कल्पनाही करता येत नाही. माझी व्यक्तिशः त्यांना भेटण्याची हिंमत होत नाही म्हणून या पत्राद्वारे मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.”

       दादांचे धाकटे बंधू रमेश उर्फ बाळू  यांच्या सुविद्य पत्नी अलकाताई,यांचाही छोटा पण,अत्यंत हृदयस्पर्शी  संदेश त्यादिवशी वाचून दाखविला गेला होता. कुटुंबातीलच एक व्यक्ती जेव्हा आपल्या,आप्ता  विषयी संवेदना व्यक्त करते, तेव्हा ती एक भावनीक अनुभूती असते. त्यांनी म्हटले,    “आमचे दादा म्हणजे आमच्या समस्त कुटुंबाचे उत्कृष्ट सल्लागार, आणि उदार व्यक्तिमत्व. मला त्यांचा आवडलेला गुण म्हणजे स्पष्टवक्तेपणा. आणि कोणतीही समस्या असो त्यावर अगदी अचूक आणि निपक्षपाती निर्णय. देवाला आमचा हा आनंद मान्य नव्हता, म्हणून त्याने, हे बहुगुणी व्यक्तिमत्व, आमच्यातून हिरावून घेतले. कधीही न भरून निघणारी पोकळी आज कुटुंबात निर्माण झाली. दादा आम्हा सर्वांचे आवडते होते,पण आमच्यापेक्षा जास्त देवाला प्रिय झाले, म्हणून त्याने, त्यांना स्वतःजवळ बोलावून घेतले असेल का? कवी पी सावळाराम यांची रचना आज खरी ठरली ,

   “जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला”  ईश्वरचरणी मी एकच प्रार्थना करते, त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो आणि देवा, त्यांना आमच्यात परत पाठव”.

     दादाचे धाकटे बंधू रमेश उर्फ बाळू भाई,यांनीही मला खूप हृद्य आठवणी सांगितल्या. ते म्हणाले,  “दादाने आमच्या कोणत्याही कौटुंबिक प्रश्नांबाबत, उपायोजना सांगावी आणि मी ती अमलात आणून प्रश्नांचे निराकरण करावे अशी आमच्या कौटुंबिक कामाची पद्धती. दादाचे अचूक मार्गदर्शन व माझी कामाची पध्दती याने कोणत्याही समस्येचे निराकरण होई.

    डिसेंबर पासून दादाच्या प्रकृतीत आम्हाला चिंताजनक फरक जाणवू लागला. याला मुख्य कारण म्हणजे करोना काळातील दीर्घकाळ ‘लॉक डाऊन’. दादाचे वास्तव्य, बुहुत करून बोर्डी च्या घरी होते. डिसेंबरमध्ये तो मुंबईस  गेला. तेथेही योग्य त्या सर्व तपासण्या झाल्या, इस्पितळांत उपचार ही झाले, मात्र प्रकृतीत हवा तसा उतार पडत नव्हता. आम्ही कुटुंबीय ही अस्वस्थ होतो. सर्वांसाठीच तो खूप अवघड कालखंड होता. प्रत्येकाने  दादा च्या तब्येतीला आराम पडण्यासाठी शर्थीचे  प्रयत्न केले. नियतीला ते मान्य नव्हते… शेवटी ,8 फेब्रुवारीच्या सकाळीच, इस्पितळाच्या वाटेवर असताना, दादा सर्वांना,सोडून गेला, एक अविरत धडपड थांबली,संथ वाहणारा जलप्रवाह  एकदम थांबला, एक चैतन्य  निमाले……                                                                                        

दादाचे हे दोन्ही सुपुत्र, उच्च विद्याविभूषित आहेत. मोहक,बी.ई, व एम.ई. आहे,तर सुबक ने पदवी अभ्यासक्रमानंतर, बी.एम. एस.  हा,मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर, अभ्यासक्रम केला आहे.आपल्या वडिलांचे स्वप्न ,सर्वांच्या सहकार्याने,ते निश्चितच पूर्णत्वास नेतील अशी मला खात्री आहे. पित्याची पुण्याई पाठीशी आहेच, परमेश्वराचे आशीर्वाद त्यांना मिळोत ही प्रार्थना !

   बाळू भाईच्या या आठवणी नी, मी देखील खूप व्यथित झालो. त्यांनी सांगितलेली दादाची एक आठवण, दादाची समाजाप्रती अनुकंपा दर्शविणारी..

   “बोर्डी येथील महिला ग्राहक संघासाठी, आपल्या चिकू पार्लर मधील एक गाळा त्याने देऊ केला होता. जेणेकरून या भगिनी आपण बनविलेल्या,  गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ तेथे  विकू शकतील. त्यांनाही श्रमाचे दोन पैसे मिळावेत ही भावना. त्यांचेसाठी ठेवलेल्या गाळ्यावर, जी पाटी लावली गेली त्यात, वरती एका कोपऱ्यात, “आक्का मावशी कडून”.. असे  लिहिलेले आहे. आक्का आजी आणि  मावशी आजी, या दोघांनी बालवयात दिलेल्या प्रेमाचा अंशतः उतराई होण्यासाठी,हा कळवळा.. हे दोन शब्द त्या फलकावर लिहिलेले आजही आढळतील …”

    दादा, तू ,चिकू विक्री केंद्राला “चिकू पार्लर”,हे नाव दिले. आज पर्यंत मी ब्युटी पार्लर,हुक्का पार्लर ,अशी नावे ऐकत होतो. पार्लर म्हणजे काहीतरी आधुनिक युगातील, विशेष संदर्भ नसलेले, माॅडर्न नाव असावे, अशी कल्पना होती. मी वेबवर डिक्शनरी पाहिली आणि या आपल्या चिकू पार्लर या शब्दाचा मला बोध झाला .तुझे खूप कौतुकही वाटले. पार्लर हा शब्द मध्ययुगीन यूरोपीय देशांमध्ये,पहिल्यांदा प्रचलित झालेला आहे. ‘पार्लर’,म्हणजे यूरोपांतील मोठ्या ख्रिश्चन प्रार्थनागृहांत, (Churches, राहणाऱ्या धर्मगुरू व जोगिणी यांच्या निवासस्थानाबाहेर, लोकांना बसण्यासाठी असलेली खास खोली.हे लोक तेथे, आपापसात धर्माविषयी चर्चा करीत आणि धर्मगुरू आल्यावर त्यांचे कडून ,आपल्या प्रश्नाविषयी मार्गदर्शन घेत त्याला च ‘ आऊटर पार्लर’ बाहेरील स्वागत कक्ष म्हणत. जेथे धर्मगुरू,जोगीणी व पोप महाशय आपापसात चर्चा करीत ते ‘ईनरपार्लर आतील कक्ष. हळूहळू हा सुप्रतिष्ठित व अत्यंत शालीन असा अर्थ नामशेष होऊन, हुक्का पार्लर सारखे शब्द प्रचलित झाले. “चिकू पार्लर” मध्ये केवळ आपले दर्जेदार खाद्य पदार्थ च मिळत नाहीत, तर ‘नावात काय आहे ?’,असे म्हणणाऱ्यांना, “नावातही खूप काही असू शकते”, याचा प्रत्यय येतो..

     बच्चू दादा, तू तर गेलास. आम्ही आता,तुला आदरांजली देण्यासाठी शब्दांचे बुडबुडे आणि अक्षरांची जुळवाजुळवी कितीही केली, तरी ती निरर्थक, हे पटते. ते सर्व केवळ आमच्या समाधाना साठी.         

       आयुष्यभर ज्या प्रगल्भतेने, निस्पृहतेने,व ‘ईदं न मम् ‘, वृत्तीने  राहिलात ते पाहिल्यावर ज्ञानदेवांची एक कवी ऊधृत करावी  वाटते..  

      “वयसे च्या गावा न येता.

      दशे ची वाट न पाहता,

      बालपणीच सर्वज्ञता, वरी तयाते.”

 इतरेजनाना, म्हातारपणी ही न येणारी सर्वज्ञता,आपल्याला खूप लवकर मिळाली… पैसा, श्रीमंती ,पण त्यामुळे येणारा माज व बेफिकीरी आपल्याला कधीच स्पर्शू शकल्या नाहीत. 

  जगज्जेता सिकंदराने सांगितले होते, “मी मरताना माझे दोन्ही हात मोकळे ठेवा, जगाला दिसू दे, मी रिकाम्या हाताने जात आहे..”

    जीवनाचे सत्य हेच आहे. आपण ते खूप लवकर ओळखले,आचरले आणि म्हणून जाताना, सर्वांच्या डोळ्यात आसू, तर तुमच्या ओठावर हास्य विलसत होते. देवाने माणसाला दोन हात दिले,ते दोन्ही हातांनी फक्त गोळा करण्यासाठीच नाहीत. एका हाताने घ्यावे  आणि दुसऱ्या हाताने द्यावे!  दातृत्वा मुळे आपला स्वतःचा आनंद टिकून राहतो, समाधान मिळते,आणि दुसऱ्याचे जीवनही सुखी होते हे तू जाणले  होते .   

  एकदा ऐश्वर्य, सत्ता, संपत्ती, हाती येऊ लागली की माणूस आपले ऋणानुबंध विसरतो. त्याचे पाय जमिनीवर न राहता अनेक विकल्पा मुळे, जणू तो हवेतच तरंगतो, त्याचं डोकं काम करीनासे होऊन एक दिवस त्याचा समूळ नायनाट होतो. दादा, तुझी आयुष्याची वाटचाल पाहिल्यानंतर आपले  सतत जमिनीवरअसलेले पाय आणि आपल्या अवतीभोवतीच्या माणसांना, सुखी समाधानी आनंदी करण्यातच आपण स्वतःचाही आनंद मानला. कुटुंब,  नाती, मैत्री, समाज, यांची नाळ तू कधीही कमजोर होऊ दिली नाहीस. तुझ्या हातून हे अगदी सहज घडलं आहे.

  दादा  तुझ्याविषयी कितीही सांगितले तरी मनाचे समाधानच होणार नाही. शेवटी एका छोटे सुभाषित आपल्या साठी..

       प्रदोषे दीपक : चन्द्र:,प्रभाते दीपक:रवि:।

       त्रैलोक्ये दीपक:धर्म:,सुपुत्र: कुलदीपक:।। 

       रात्री चंद्र दीपक असतो,तर प्रभात काळी 

सूर्य, तिन्ही लोकांत केवळ धर्मदीप प्रकाशित होतो, तर एक “सुपुत्र” संपूर्ण कुलाचा उद्धार करून, कुलदीपक ठरतो.

     बच्चू दादा तू आपल्या या मोठ्या कुटुंबाचा “कुलदीपक” आहेस. …

    ऋणानुबंधाची फुले कधीच कोमेजत नसतात. आठवणींच्या सुगंधाने,ती सदैव दरवळत असतात. मनातले अबोल संकेत ज्यांना न बोलता जिवंतपणी व मृत्यूनंतरही कळतात,त्यांच्याशी मनाची खोल नाती जुळतात. ती आजन्म टिकतातच,पण मृत्यूनंतरही अनुभवाला येतात.आम्हा सर्वांचे,आपल्याशी जुळलेले हे ऋणानुबंध, असेच आमच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत टिकतील .बच्चू दादा ,,,

   शून्या मधूनी विश्व निर्मुनि  ,कीर्ती सुगंधित वृक्ष फुलवुनी

   लोभ,माया,प्रीती, देऊनी,सत्य सचोटी मार्ग दाऊनी 

   अमर जाहला तुम्ही जीवनी ….

दादा शेवटी तुझ्या जीवनाच जे सार मला समजलं ते दोन ओळीत  सांगून हे लिखाण पूर्ण करतो..

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की, बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात.* 

 *दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले कि आनंदाची फुले आपल्या दारात पडतात

 अश्रुपूर्ण नेत्रांनी आम्हा सर्वांचे प्रणाम?????

    या लेखाचे संकलन करताना ज्या मित्रांच्या भाषणांच व संदेशाचे संदर्भ घेतले आहे त्या सर्व मित्रांचे आभार आमचे बंधू रमेश ऊर्फ बाळू यांनी दिलेल्या माहिती व छायाचित्रां बद्दल ,त्यांचे आभार.