सद्गुरु भाई मळेकर

श्री. भाई मळेकर. छायाचित्र सौजन्य: श्री अरुण मळेकर

गुरु कोणाला म्हणावे? लौकिक अर्थाने,आपल्याला  शाळा, कॉलेजात अभ्यासक्रम शिकवणारा  म्हणजे गुरु. आपल्याला, जीवन सन्मानाने कसे जगता येईल, त्यासाठी कोणते कौशल्य हस्तगत करणे आवश्यक आहे ,ती कौशल्ये हस्तगत करण्यासाठी कोणते ज्ञान घ्यावे, भविष्यातील जीवनाची  वाटचाल करताना, आपल्या शिष्याला ज्ञान ,संस्कार व चारित्र्य यांची शिदोरी बांधून देणारा हा गुरु असतो.पण या ऐहिक जीवनापलीकडे ही, एक जग आहे . त्या जगाची तोंडओळख तरी करून घेणे, म्हणजे खरे ज्ञान मिळविणे ,अशी  जाणीव करून देणारा, म्हणजेच, शिष्यांना “स्व”चे भान देणारा ‘…या मानवी जीवनाचे अंतिम ध्येय, पाठ्यपुस्तकांची घोकंपट्टी  करण्यापेक्षा, आपल्या शिष्यांना, “स्वतःची ओळख” करण्याची तळमळ निर्माण होईल अशी शिकवण, आपल्या आचरणातून देणारा, तो सद्गुरु!

   आमच्या बोर्डी हायस्कूलमध्ये आचार्य भिसे,आचार्य चित्रे, सावे, या सद्गुरूंच्या पंगतीत बसणारी आणखीही काही महान व्यक्तिमत्वे, सद्गुरू होते. त्यांतील एक नाव म्हणजे भाई मळेकर उर्फ  श्री गजानन म. मळेकर! आज त्यांची आठवण काढतो आहे ती त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. या गुरुजनांनी आम्हाला केवळ विद्यार्थी  म्हणूनच नव्हे तर, त्याही पलीकडे, एक  भावी नागरिक म्हणून, आमच्यातील माणुसकीचे  भान सतत कसे जागृत राहील असे काहीतरी शिकवीत राहिले..आमच्यासारख्या, खेडेगावातील, सामान्य परिस्थितीच्या, साधारण कुवत असलेल्या, विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यात, आपली लढाई, स्वतःचे पायावर कशी लढावी याचे कानमंत्र  दिले. कमी पडलो ते आम्ही. आमच्या अपरिपक्व बुद्धीत ‘जेवढे मावले, तेवढे’ ठेवले. त्यात आमच्या या सद्गुरूंचा काय दोष? आमचे हे गुरुजन म्हणजे संतपदाला पोचलेली, मानवी रूपातील व्यक्तीमत्वे होती! भाई मळेकर त्याच मांदियाळीतील एक नाव. आज, माझ्या या सद्गुरूंना आदरांजली वाहण्यासाठी,माझ्यापरीने प्रयत्न करतो आहे.

      भाई, ‘मळेकर सर’ यापेक्षा “भाई” याच नावाने बोर्डी व पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. अगदी सर्वश्रुत होते. भाईंचे थोरले बंधू श्री. नाना मळेकर यांच्याविषयी मी आधीच एक विस्तृत लेख लिहिला आहे. ते देखील आमच्या शाळेत व्यायाम गुरु म्हणून होते. त्यांचे धाकटे बंधू पंढरीनाथ हे देखिल काही काळ बोर्डी हायस्कुलात शिक्षक होते. ते पुढे मुंबईच्या राम मोहन हायस्कुलात रूजू झाले. तिघेही बंधू, उदात्त शिक्षकी पेशात रममाण झाले, हा ही एक योगायोगच. बालवयातच वनक्षेत्रपाल असलेल्या वडिलांचे छत्र गमावलेल्या भाईंचे व दोन भावांचे प्राथमिक शिक्षण, त्यांच्या अल्पशिक्षित परंतु अतिशय स्वाभिमानी आणि करारी अशा मातोश्री सरस्वतीबाई यांनी केले. धन्य त्या माऊलीची जिने पतिनिधनानंतर आपल्या धडाडीने आणि स्वकर्तृत्वावर,आपल्या तीनही मुलांना महान शिक्षण व संस्कार देऊन, त्यांना मार्गाला लावले. भाईंना त्यांच्या आयुष्यात, डहाणूचे कीर्तने वकील आणि मसुरकर महाराज यांची तालीम देखील मिळाली. मसुरकर महाराजांच्या  स्पर्शाने भाईंची बालपणीची जडण-घडण अशी अध्यात्मिक मुशीत तयार झाली. भावी जीवनात त्यांच्या विद्यार्थ्यांना याचा प्रत्यय आला. माईंचा परिचय नानांच्या लेखातही आलेला आहे.आणि त्यांचा सहवास, त्या नानांचे घरी असताना आम्हाला झालेला आहे. हायस्कूल शिक्षणासाठी भाई, डहाणू सोडून बोर्डी हायस्कूलमध्ये आले आणि त्यांचे या शाळेशी व गावाशी ऋणानुबंध जमले ते कायमचेच!! येथील आचार्य भिसे, चित्रे ,सावे इत्यादी महनीय गुरूंच्या सहवासाने, आधीच अध्यात्मिक कल, असलेल्या भाईंना बोर्डी हायस्कूल सोडता आले नाही, यात नवल नाही. भाईंच्याकडे शिक्षण शास्त्रातील कोणतीही पदवी नव्हती. मात्र एका आदर्श शिक्षकाला जरुरी असलेले बाल मानसशास्त्र आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ,’देवत्व’ पाहण्याची दृष्टी हे उपजतच असल्यामुळे भाई, तात्काल  एक विद्यार्थीप्रिय शिक्षक झाले यात काही नवल नाही. सुरुवातीचे काळात भाईंनी, शारदाश्रमांत देखील मुलांना मार्गदर्शन व आधार दिला. त्याकाळी शारदाश्रमात येणारी काही मुले, आईबापांच्या अति लाडाने थोडी बिघडलेली असत. शारदाश्रमातील गुरुजनांच्या संस्कारांनी,त्यांनी चांगला अभ्यास करून नाव कमवावे, अशा हेतूने आई-बाबा त्यांना एवढ्या लांब  बोर्डीत पाठवत असत. भाईंचा अशा मुलांना खूप मोठा आधार मिळे आणि त्यांच्या केवळ प्रेमळ स्पर्शाने अनेक विद्यार्थ्यांची आयुष्ये आमूलाग्र बदलून गेलेली आहेत .

      म.गांधींच्या विचारसरणीचा पगडा भाईं वर असल्यामुळे त्यांना साबरमती आश्रमाची ओढ असणे स्वाभाविक होते. शेवटी आचार्य भिसे यांची परवानगी व इतर गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन,भाई 1927 ते 1929 अशी दोन वर्षे साबरमती आश्रमात दाखल झाले. महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने व संजीवक वाणीने,पावन झालेल्या त्या आश्रमात भाईंना महात्माजींचे प्रत्यक्ष सहचर्य तर मिळालेच, पण, त्यांचा प्रेमळ, हळुवार हात ही पाठीवरून फिरला. त्या युगपुरुषाची वाणी त्यांच्या कानात आयुष्यभर दुमदुमत राहिली. भाई तेथून परतले ते गांधीजींना एक वचन देऊन. ते म्हणजे, ” घोलवङ, बोर्डी परिसरात मी अस्पृश्यतेचे पूर्ण उच्चाटन करून, कमीत कमी 100 खादीधारी माणसेही तयार करीन”. पुढे भाई स्वतः तर खादीधारी राहिले पण बापूंना दिलेल्या वचनाप्रमाणे, त्यांनी आपल्या   वचनपूर्तीसाठी जिवापाड काम केले आणि खरोखरच भाईंच्या त्या कामाचे फलित म्हणजे, त्या काळी आमच्या  बोर्डी, घोलवड व स॔पूर्ण परिसरात, अस्पृश्यतेचे मूलतः निवारण झाले. या कामात घोलवडच्या श्रीयुत वा. रा. उर्फ बापू अमृते यांचेही योगदान खूप मोठे आहे .

       मी 1955 जून मध्ये बोर्डीच्या हायस्कूलमध्ये आठव्या इयत्तेत दाखल झालो. त्याआधी भाईंना मी नानांच्या गणेशोत्सव कार्यक्रमात पाहिले होते आणि त्यांचे अमोघ वक्तृत्व देखील गावातील काही सभा, समारंभाच्या निमित्ताने ऐकले  होते.मात्र त्यांच्या मराठी विषय शिकवणीचा अनुभव माझ्या,नवव्या व दहाव्या इयत्तेत आला. बोर्डी हायस्कूलातील ज्या थोड्या शिक्षकांबद्दल आप्पा नेहमी मला सांगत असत व आवश्यकतेनुसार,निःसंकोच , मदत व मार्गदर्शन मिळवीत असत, त्यातील भाई एक होते. त्यामुळे मी हायस्कुलात दाखल झाल्यावर भाईंची देखील माझ्याकडे एक नजर व अधून-मधून आपुलकीने चौकशी असे. इयत्ता नववी पासून  भाईंनी आम्हाला मराठी विषय शिकवणे सुरू केले ,आणि त्यावेळी भाई  ही काय चीज आहे याची  कल्पना आली. भाईंचा मराठीचा तास म्हणजे एक अनोखी मेजवानी असे. त्यांच्या रसवंतीचा नायगारा प्रपात,  नुसता धो धो कोसळत असे,आणि आम्ही सुदैवी विद्यार्थी ,केवळ, त्यातून अंगावर ऊडणाऱ्या थोड्याशा जलतुषारांनीही  चिंब भिजून जात असू. कधीकधी ते जे काही सांगत, शिकवत, ते कधी कधी, आमच्या आकलनापलीकडे होते. मात्र, जे कानावर पडे ते, अंतरीचे बोल आहेत ,आणि आपण, ते समजून घेण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे,  हे मात्र निश्चित वाटे. भाईंचे शिकवणे पारंपारिक नव्हतेच. ते पाठ्य पुस्तक घेऊन येत ते केवळ टेबलावर ठेवण्यासाठी. धड्याचे नाव व लेखक, एवढे एकदा फळ्यावर लिहिले की त्यांच्या अमोघ वाणीचा चमत्कार सुरू होई. त्या विशिष्ट  धड्या बद्दल  जुजबी  माहिती दिल्यानंतर , ज्या पुस्तकातून,तो धडा निवडला गेला आहे त्या, पुस्तकावर  चर्चा होई, एवढेच नव्हे तर त्या लेखकाच्या इतर पुस्तकांचा परामर्श घेऊन, भाई आम्हाला त्या विशिष्ट लेखकाचे,एकंदरीतच मराठी साहित्यातील ,योगदानाबद्दल तोंड ओळख करून देत. हे अफाट, अभूतपूर्व होते. भाईंचे प्रचंड वाचन व चिंतन , याचा प्रत्यय त्यातून येत असे. त्यामुळे एखाद्या धड्यासाठी कधीकधी दोन वा तीन  तासही निघून जात. परिणामी, भाईंचा पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम, वर्षअखेर, सहसा  पूर्ण होत नसे. मात्र त्यांचे विद्यार्थी त्या विषयात पारंगत होत. हा विरोधाभास होता. विनोबाजींचा धडा शिकवताना,विनोबांची गीता येई, विनोबांचे गांधीजींच्या प्रति असलेले शिष्यत्व, भूदान चळवळ यांचीही माहिती येई. त्याचप्रमाणे ज्ञानोबा शिकवताना, त्यांच्या  आई-वडीलांचा करूण अंत, ज्ञानेश्वरी ,त्यांनी रेड्या कडून वेद वदविले म्हणजे काय, शेवटी त्यांचे पसायदान व  संजीवन समाधी अशा सर्व गोष्टींचा ऊहापोह होऊन काही सुंदर सुंदर ओव्यांची पखरण  वर्गावर होई. मला तर भाईंच्या तासाची एवढी आवड आणि गोडी निर्माण  झाली होती की मराठीच्या त्या विशिष्ट धड्यातील, काहीही न लिहता, भाईंच्या मुखातून स्त्रवणारी, अशी सुंदर सुंदर सुभाषिते व वचने मी जेवढे जमेल तेवढे लिहून ठेवत असे. अनेक वर्षे  ही माझ्याजवळ होती आणि माझ्यासाठी तो एक उत्तम खजिना होता.महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, विनोबा ही त्यांची दैवते होती. त्यांचा उल्लेख, कोणत्यातरी संदर्भात  नेहमीच येत असे. मात्र हॅन्स अँडरसन, खलील जिब्रान, मॅक्समुल्लर,अशी अनेक पाश्चात्य पंडित मंडळीही कोणत्या ना कोणत्या  तरी संदर्भात , आमच्या वर्गात प्रवेश करीत. आमच्या समोर अलिबाबाची गुहाच जणू उघडी होत असे.जेवढी विचार मौक्तिके  लुटता येतील तेवढी लुटा, असेच जणू भाई आम्हाला दर तासाला सांगत. त्यामुळे भाईंचा तास कसा निघून जाई, ते मला कळत नसे. भाई, हे विचारधन,मराठी,संस्कृत, इंग्रजीतून  सांगत. तीनही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यावेळी,माझ्या वहीत लिहून ठेवलेली आणि आता आठवत असलेली काही सुंदर वाक्ये  देण्याचा प्रयत्न करीत आहे…

     मुलांना ते म्हणत ..“मुलांनो भविष्यकाळ खूपच कठीण आणि बिकट येणार आहे वाघ मारण्याची तयारी करून निघाल आणि हातांत एखादा ससा, कोंबडा मिळाला तर नशीब समजा.”

  मुलींसाठी यांचा उपदेश असे, “मुलींनो तुम्हाला संसारात,  पदरात निखारे घेऊन चालायचे आहे. पदर तर जळला नाही पाहिजे, आणि आपणही भाजले नाही पाहिजे”

“अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा, बिकट आर्थिक स्थिती असेल, तर साधे रहा. ऊच्चपद,अधिकार मिळाला तर ,विनयशील रहा. यालाच आयुष्याचे व्यवस्थापन म्हणतात”

    “माफी मागणे म्हणजे चूक मान्य करणे नाही. माफीचा खरा अर्थ, तुमचे नाते टिकवण्याची तुमची लायकी, त्या दुसऱ्या माणसा पेक्षा अधिक आहे.”

    ” मुलांनो भविष्यात झेप अशी घ्या ,की ,पाहणा-याची मान दुखावली जावी, आणि ज्ञान एवढे मिळवा की हा समोरचा सागरही अचंबित व्हावा.”.

     “वाहतो तो झरा आणि थांबतो ते डबके, डबक्यावर डास येतात, तर झ-यावर राजहंस येतात.राजहंसाशी मैत्री करा .”

    लोकमान्य टिळकांच्या मोठेपणाबद्दल व त्यांच्या स्वाभिमानी वृत्ती बद्दल बोलताना भाई एक सुंदर आठवण आम्हाला सांगत. टिळक डेक्कन कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना,त्यांचे गणित विषयक ज्ञान पाहून,श्रेय लाटण्यासाठी,एक इंग्रज प्राध्यापक, बोलता बोलता सहज म्हणाले होते की “Afterall, Tilak is  my student..” हे ऐकतांच, लोकमान्यांनी ताडकन उत्तर दिले ,”Sorry sir, Tilak is, the Student of Kero nana Chhatre !”  या केरो नानांची ओळख, आजच्या सुशिक्षित विद्यार्थ्यांनाही नसेल. मात्र भाईंच्यामुळे आम्हाला केरूनाना 1955 सालीच कळले. विनायक लक्ष्मण उर्फ केरोनाना छत्रे ,महान गणिती, खगोलशास्त्रज्ञ आणि त्याकाळचे, महान सृष्टी निरीक्षण शास्त्रज्ञ होते. भारतातली पहिली वेधशाळा या माणसाने 1851 च्या सुमारास, एलफिन्स्टन कॉलेजमध्ये सुरु केली. केरो नाना डेक्कन कॉलेजात टिळकांचे गुरुजीच नव्हते तर त्यांच्या आयुष्यातील ते एक आदरणीय स्थान होते.  भारत जाऊ  द्या, महाराष्ट्रातही राहू द्या, अगदी ज्या पुण्यात, केरोनाना जन्मले, ते पुणे ही त्यांना विसरून गेले आहे. पुण्यातील एका लहानशा बोळाला दिलेल्या त्यांच्या नावाची पाटी, एवढेच त्यांचे अस्तित्व आज या देशात ऊरले आहे . बस्स! मात्र  भाईंनी,त्यादिवशी, केरो नानांचे महत्त्व ,त्यांचे काम आणि टिळकांची त्याच्यावरील श्रद्धा याबद्दल आम्हाला भरभरून सांगितले होते त्याची आजही आठवण आहे.भाईंचे विद्यार्थी म्हणून आम्ही असे नशीबवान होतो !

      कोणत्याही एखाद्या लेखकाच्या विशिष्ट संकल्पनेचा खुलासा करताना, जगातील इतर विचारवंतांच्या, याच संकल्पनेवर काय कल्पना आहेत, त्याचाही,ओघातच ऊहापोह भाई करीत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या,” माझी जन्मठेप” शिकवतांना सावरकर ‘स्वातंत्र्यवीर’ कसे येथून सुरुवात होई.  ते सांगताना त्यांच्या  “जयोस्तुते महान मंगले…” या महान काव्याचे  माधुर्य चाखावयास मिळे.  त्यांच्या त्या अजरामर दोन ओळी मधील काव्य आणि तत्वज्ञान विशद करता करताच तास निघून जाई

 “तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण ,..झालेच की, खलील जिब्रान येई.त्याचे,

     “Life without liberty,  is the body without spirit” 

आणि हॅन्स अँडरसनचे ,ते प्रसिद्ध सुभाषित,

                 “Just living is not enough”,said the butterfly,

                 “One must have sunshine,Freedom and a little flower too”

  या तीन विचारवंतांच्या तत्वज्ञानातील साम्य स्थळे व त्यातील सौंदर्य, आमच्यापुढे उलगडत असत. खरोखरच भाईंचे वक्तृत्व व योग्य वेळी योग्य  ती उदाहरणे   वापरून,विषयाला पूर्णपणे भिडण्याचे कौशल्य अचाट होते. एक उत्कृष्ट, ज्ञानपिपासू शिक्षकच हे करू शकतो  !” देता अनंत हस्ते…घेऊ  किती  दो कराने” असे होई !

    भाईंकडून अशा अनेक सुविचारांचे सुवर्णकण जेवढे टिपता येतील तेवढे टिपून ठेवले आणि मी तरी, नम्रतेने सांगू शकेन,  आयुष्यात त्यांचा जेवढे उतरविता आले,तसे वागण्याचा  प्रयत्नही केला.  खरोखर भाईंच्या  दूरदृष्टीने, आजही अचंबित व्हायला होते. भाईंच्या द्रष्टेपणाची साक्ष देणाऱ्या ,त्यांच्या एका प्रसिद्ध सुभाषिताची गोष्ट सांगितल्याशिवाय राहवत नाही.

     एकदा ,माझे वडील आप्पा ,मला सहज त्यांच्या घरी घेऊन गेले होते.तेथे भिंतीवर एक वाक्य लिहिलेले आमच्या लक्षात आले व आम्ही आप-आपसात कुजबुजू लागलो. कारण वर्गात कधीमधी, त्या सुभाषिताचा ही संदर्भ ते देत असत. ते वाक्य होते …

       “ये भी नही रहेगा “

भाईंच्या  हे लक्षात आले.तात्काळ त्यांनी त्या वाक्याचा संदर्भ आणि त्याचेशी संबंधात असलेली, शकिरा या रईस माणसाची व फकिराची गोष्ट सांगितली,ती थोडक्यात अशी …एकेकाळी अत्यंत  खानदानी वैभवात  असलेल्या शकीराला नियतीने खूप चढ-उतार दाखविले .. अति श्रीमंती  ते  अगदी कफल्लक गरिबी  अशा सर्व अवस्थांतून शकीरा गेला  मात्र प्रत्येक वेळी  हा फकीर त्याला भेटल्यावर तो एवढेच सांगे “ये भी नही रहेगा”      

    शकिराच्या बाबतीत प्रत्यक्ष पाहिलेली, ही, नियतीची लहरी   खेळी पाहून,फकिराला हे वाक्य खूप अर्थपूर्ण  वाटू लागले. मात्र एके दिवशी फकीरा  त्या  शहरात फिरत फिरत पुन्हा आला  तेव्हा  त्याला शकीरा मरण पावल्याचे कळले व त्याच्या कबरीवर,  सब्जा वाहण्यासाठी फकीर जेव्हा कबरस्तानात गेला आणि त्याने ते थडगे पाहिले  तेव्हा त्याला  आश्चर्याचा धक्का बसला कारण  त्या थडग्यावर देखील  शकीराने  लिहावयास सांगितले होते,  “ये भी नही रहेगा ” फकिराला वाटले ,हे थडगे येथे राहणार नाही काय? “नही रहेगा”… म्हणजे हे काय पंखांनी उडून जाईल? असा विचार करत तो निघून गेला. मात्र पुन्हा काही वर्षांनी तो त्या गावात आल्यावर, थडग्याचे दर्शनासाठी जाऊ इच्छित होता,आणि  त्याला कळले, काही महिन्यापूर्वीच झालेल्या भूकंपात ते संपूर्ण कबरस्थानात जमिनीखाली पुरले गेले .त्यावेळी फकिराला “हे भी नही रहेगा…” या चिरंतन तत्वाची  सत्यता पटली.  नियती, कधीच, कोणाचीही पर्वा करीत नाही..आजचे राव,उद्या र॔क तर, आजचे रंक उद्या राव होतील.. नेहमी वर्तमानात रहा आणि गरिबी असली तर खंत करू नका श्रीमंती आली तर गर्व करू नका. त्या दिवशी भाईनी आम्हाला सांगितलेली ही गोष्ट मी घरी येऊन परत माझ्या वहीत लिहून ठेवली. या छोट्याश्या वाक्यात असलेल्या, महान अर्थाचा अनुभव, मी सुद्धा आयुष्यभर घेत आलो आहे. शेवटी त्या फकिराच्या तोंडी भाईनी सांगितला शेर मी लिहून ठेवला तो असा..

      जिनके महलो मे हजारो ,जलते थे फानूस! झाड ऊनकी कब्र पर था, और निशाना  कुछ भी नही….

     प्रामाणिकपणे मला त्या भूकंपात झालेल्या थडग्याची गोष्ट कुठेतरी खटकली व सबंध कबरस्थान गावाखाली कसे जाईल असे वाटले ?दोन-एक वर्षांपूर्वी मी ती इटाली मधील पाॅम्पे या  शहराला भेट दिली. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी, शेजारी असलेल्या व्हेसुव्हियस ,या ज्वालामुखीच्या लाव्हाने हे शहर संपूर्णपणे गाडले गेले होते. उत्खननातून संपूर्णपणे खोदून, पुन्हा उभे केलेले, ते एक प्रदर्शनीय शहर आहे. जगातले अनेक पर्यटक ते पहाण्यास  येतात.  जर हे संबंध शहर, जमिनीखाली जाऊ शकते, तर मग त्या,कबरस्तान ची काय कथा? “ये भी नही रहेगा,” या सत्याची शाश्वतता ‘चक्षूःर्वै सत्यम’,कळली ! भाई च्या मुखातून ऐकलेल्या अशा अनेक गोष्टींचा संग्रह एकेकाळी माझ्याकडे होता. आज त्या वेळचे जेवढे आठवले ते सांगण्याचा प्रयत्न केला.

    शाळेमध्ये, वर्गांमध्ये येताना भाईंचा पेहराव अगदी साधाच असे. स्वच्छ खादीचा लेहंगा झब्बा कधी त्याच्यावर खादीचीच बंडी आणि डोक्यावर गांधी टोपी.  चेहरा नेहमी गंभीर आणि कुठल्यातरी विचारात वा चिंतनात गढलेला असावा  असे वाटे. त्यामुळे डोळेही ,नुकतेच समाधीवस्थेतून, जाग येत असल्यागत वाटत. वर्गात शिकवताना ते एका वेगळ्याच उर्जितावस्थेत मध्ये जात असत आणि त्यांच्या वाक्वैजयंतीचा विलास चालू असताना, सर्व वर्गाचे लक्ष तिथे केंद्रित असावे,अशी त्यांचीही सार्थ अपेक्षा असे. त्यात कुठे रसभंग झालेला दिसला ,कोणा विद्यार्थ्याचे थोडेसे दुर्लक्ष होते आहे असे वाटले तर तात्काळ थांबून, भाई त्या विद्यार्थ्याला शिक्षा करण्याऐवजी,स्वतःच्या गालावर दोन्ही हातांनी फाडफाड थपडा मारून घेत. हे फार विलक्षण वाटे. आम्ही मुलांनी एकदा असा प्रसंग पाहिल्यानंतर,  भाईंच्या त्या समाधीचा भंग होणार नाही याची काळजीही घेतली. “कोणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करावा ” हे ख्रिस्ताचे वचन आपण ऐकले आहे.. मात्र आपल्या विद्यार्थ्यांना, भरभरून ज्ञानाच्या ओंजळीने भरवित असतांना, आपण कुठे तरी  कमी पडलो का…ही जाणीव करून घेऊन, त्याकरिता स्वतःलाच  शिक्षा  करून घेणारा शिक्षक आम्ही पाहिला …अशा शिक्षकाला,सद्गुरु, संत नाही म्हणावयाचे तर काय म्हणावयाचे?

     मागे सांगितल्याप्रमाणे भाई आठव्या इयत्तेत आम्हाला भूगोल शिकवित असत. पुढे मराठी शिकवू लागल्यानंतर, तो आवडीचा विषय असल्यामुळे मला त्यांचा व विषयाचा लळा जास्त लागला. त्यांचा तास कधी येतो असे होऊन जाई. भाईंची देखील माझ्यावर विशेष कृपादृष्टी होती. मागे सांगितल्याप्रमाणे माझे वडील आप्पा आणि भाई यांची चांगली पेहचान होती .दोघेही खादीधारी, गांधीवादी आणि विशेष म्हणजे दोघेही,’ साधी रहाणी  उच्च विचारसरणी’  या  तत्वाचे,  खऱ्या अर्थाने आचरण करणारे  होते. त्याकाळी देखील,मराठी शाळेतील वा हायस्कूलातील कांहीं  शिक्षक, शाळेबाहेर खाजगी शिकवण्या करीत. मात्र या दोघांनीही घरी परिस्थिती बेतास बात असतानासुद्धा पैसे घेऊन शिकवणी केली नाही .मुलांना वर्गाबाहेरही शिकवले जरूर पण त्यासाठी एक पै ही कधी घेतला नाही. विद्या दानासाठी  पैसे घेणे म्हणजे पातक आहे ही त्यामागची विचारधारा!

      भाईंचे विशेष प्रेम मिळायला आणखी एक कारण म्हणजे, शाळेतील  व आंतरशालेय वकृत्व स्पर्धा ! वक्तृत्व माझा एक आवडता छंद असल्यामुळे, या दोन्ही प्रकारच्या वत्कृत्व स्पर्धांत माझा सहभाग हमखास असे.आप्पांनी भाषण लिहून द्यावे आणि भाईंनी ते माझ्याकडून गिरवून घ्यावे हे ठरून गेले होते. त्यामुळे शाळेतील स्पर्धेत तर नेहमी माझा पहिला नंबर आला, पण आठवी ते अकरावी, चारही  वर्षी आंतरशालेय स्पर्धेत सुद्धा मला पहिल्या, दुसऱ्या नंबरची बक्षिसे मिळालेली आहेत. आणि याचे सर्व श्रेय माझे वडील आणि माझे गुरु भाई मळेकर यांनाच आहे. या स्पर्धा बोर्डी, उंबरगाव, पालघर,केळवे-माहीम वगैरे वेगवेगळ्या हायस्कूल मध्ये  झाल्या. भाई कधीही आमच्याबरोबर स्पर्धेला आले नाहीत. आम्हा बोर्डी शाळेच्या स्पर्धकांना घेऊन जाण्याचे काम,श्रीयुत गजानन जोहारी गुरुजी करीत.त्यांचीही खूप मदत होत असे, त्यांचीही आज आठवण येते. मला आठवते शाळेच्या वत्कृत्व स्पर्धा किंवा आंतरशालेय स्पर्धा जाहीर झाल्या की,भाई मला स्वतःहून, माझ्या भाषणाबद्दल विचारीत. आप्पांनी लिहून दिलेले भाषण तपाशीत, आणि दोन-तीन दिवस तरी, शाळेच्या मधल्या सुट्टीत एखाद्या रिकाम्या वर्गात ,आमची तालीम सुरू होई. हा  प्रेमळ शिक्षक ,त्यावेळी, स्वतःला मिळालेली नाश्त्याची वाटी,..त्यावेळी, शिक्षकांना मधल्या सुट्टीत शारदाश्रमातून ,काही नाष्टा मिळे, त्याला सुट्टीतली वाटी म्हणत…, तो माझ्यासाठी घेउन येत व मला खाऊ घालीत. खरेतर त्यावेळी त्यांची स्वतःची मुले ही  शाळेत होती, तरी त्यांना हा खाऊ न देता मला भरवणार-या  ह्या पितृतुल्य शिक्षकाचे  प्रेम आठवले की आजही  डोळे पाणावतात. तासभर आमची वक्तृत्वाची रंगीत तालीम होई . भाईंच्या पसंतीस भाषण आल्याशिवाय मला वकृत्व स्पर्धेत बोलायची परवानगी नव्हती. भाई बोलण्यातील बारकावे, हावभाव, शब्दांची फेक, आवाजातील चढ-उतार, अशा अनेक प्रकारे मार्गदर्शन करीत. माझ्या  स्पर्धेतील  बक्षिसांचे इंगित हे होते . वक्तृत्व कलेमध्ये वक्त्याजवळ आत्मविश्वास  हा पहिला महत्त्वाचा गुण असावा लागतो .याबाबत भाई मला दोन गोष्टी   नेहमी सांगत असत. माझ्या  शालेय जीवनातच नव्हे,  तर पुढील संपूर्ण जीवनात ही ज्या-ज्यावेळी भाषण करण्याचा प्रसंग आला, त्या ध्यानात  ठेवून ,त्याचा उपयोग केलेला आहे .आणि मला त्याचा  फायदाच  झाला.

       प्रसिद्ध ग्रीक तत्त्ववेत्ता आणि राजकारणी डेमॉस्थेनीस याची गोष्ट भाई सांगत. तो थोडा तोतरा बोलत असे व त्याच्या बोलण्यात, ते इतरांना खटकत असे. त्याने या दोषांचे निवारण करण्यासाठी अतोनात मेहनत केली.तो आपल्या गालात ,दोन बाजूला काचेच्या गोट्या ठेवून,कुठेतरी दूर एकांतात जाऊन जोर जोराने आपले शब्दोच्चार करी. असे करून जबर आत्मविश्वासाने  व मेहनतीने त्याने आपला तोत्रेपणा घालविला आणि आपला शब्दांचा स्पष्टपणा मिळविला त्याच्या काळीच नव्हे , आजही, डेमाॅस्थेनीस  जगातला एक प्रसिद्ध वक्त्यामध्ये गणला जातो. इंग्लंडचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांची ही गोष्ट भाईंनी सांगितली. ते देखील बालपणी थोडेसे तोतरे होते. मात्र त्यांनीही अतोनात मेहनत घेऊन आपल्या बोलण्यातील दोष घालवले. त्यासाठी त्यांनी काही थेरपिस्ट, तज्ञांचा सल्ला घेतला ..चर्चिल यांचे एक वाक्य भाई नेहमी सांगत, “तुमच्यासमोर बसलेले सर्व अज्ञानी आहेत, मी, आज, जे काही आत्ता, येथे बोलणार, ते त्यांना प्रथमच कळणारआहे”.. त्यामुळे बोलता बोलताना वाटणारी भीती वा संकोच निश्चितच कमी होतो. विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडसाठी एक महान पंतप्रधान तर होतेच, पण युद्धकाळात त्यांनी ब्रिटिश जनतेला भाषणाद्वारे, दिलेला धीर जगद्विख्यात आहे. अशा अनेक लहान, लहान उदाहरणांनी भाईंनी माझी  भिती घालवली. मला माझ्या भावी आयुष्यातही याचा, खूप फायदा झाला. मी काही काळ कॉलेजमध्ये प्राध्यापकी  केली आणि तेथे तर चांगले वक्तृत्व अत्यावश्यक होते. त्याचप्रमाणे माझ्या नोकरीपेशात सुद्धा मला या कलेने मदतीचा   हात दिला आहे. कामानिमित्त मला परदेशांतील भारतीय वकिलातीमध्ये उच्चपदस्थासमोर एक प्रेझेंटेशन करावे लागे ज्यामुळे माझ्या  कंपनीची माहिती त्यांना होई. तेथेही हा आत्मविश्वास कामाला आला. सुदैवाने माझ्या दोन्ही मुलांनी ही कला चांगली जोपासली आणि पुढे, नातवंडांनी तर माझ्यापेक्षाही जास्त प्राविण्य यात मिळवले.माझी शिकागोस्थित नात, इशाने, ज्या दिवशी, तिला अमेरिकेच्या, राष्ट्रीय Community Leadership सादरीकरण स्पर्धेत, शालेय गटात, सुवर्णपदक मिळाल्याचीआनंदाची बातमी दिली, त्यादिवशी माझ्या दोन्ही डोळ्यात आनंदाश्रु आले, माझे वडील आप्पा साठी  आणि माझे गुरू भाई मळेकरां साठी!!

     भाई म्हणजे अमोघ वक्तृत्व, फर्डे वक्ते, पत्रकारिता, कवी आणि एक आदर्श शिक्षक, अशा अनेक रसायनांचे अजब मिश्रण होते. त्यांच्या या सर्व सद्गुणांचा वारसा भावी पिढीतील त्यांच्या दोन्ही चिरंजीवाना मिळाला. त्यांचे ज्येष्ठ पुत्र भारत दुर्दैवाने आज हयात नाहीत मात्र त्यांच्याकडेही उत्तम वक्तृत्व, लेखन गुण व चतुरस्त्रता होती. त्यांनीही शिक्षकी पेशा केला. त्यांचे थोडे अकालीच निधन झाले. भाईंचे कनिष्ठ चिरंजीव अरुणजी. ते आज आनंदाने व सुखासमाधानाने आपले निवृत्तीचे जीवन जगत आहेत. एक उत्तम पत्रकार, लेखक आणि शिक्षक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. अरुणजींची नकाशाशास्त्र,वनपर्यटन, वारसा वस्तू व पर्यटना बद्दल पुस्तके प्रकाशित झाली असून, गेली चाळीस वर्षे, विविध वृत्तपत्रांतून आपल्या पुस्तकाद्वारा ते लेखन करीत असतात. भाईंच्या वरील हे टीपण करताना त्यांनी मला बहुमोल मदत केलेली आहे. त्यांनी स्वतः ‘सामना’ या वृत्तपत्रात लिहिलेला भाईवरील लेख व भाईंचे एक छायाचित्र मला पाठविले. भाईंची सगळ्यात छोट्या कन्या साधनाताई सफाळ्याला राहतात, त्यांचा व माझा परिचय होऊ शकला नाही. माझ्या सुदैवाने आज मी रहात असलेले घर,भाई ज्या बंगल्यात, घोलवड मध्ये अखेरपर्यंत राहिले, व ज्या परिसरात भाईंनी अखेरचा श्वास घेतला, त्याच्याच अगदी समोर आहे. त्यामुळे भाईंच्या पवित्र पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या परिसरात वावरताना, मला एक वेगळाच आनंद मिळतो आणि भाईंचा वरदहस्त आजही डोक्यावर आहे अशी जाणीव सतत होत राहते.

      अरुणभाईनी 30 जानेवारी 2008 च्या “लोकमत” दैनिकातील, श्रीयुत मोहन अमृते यांच्या एक छोट्या लेखाचे कात्रण ही मला पाठविले आहे. त्यावरून भाईंचे, गांधीजी प्रति प्रेम व बापूंची आपल्या शिष्या प्रती असलेली आस्था याची जाणीव होते. 26 मार्च 1935 रोजी महात्माजी मुंबईहून अहमदाबादला  जातांना, भाईंच्या विनंतीवरून, थोड्यावेळासाठी,  घोलवड स्टेशनवर उतरले होते. या दिवशी या महात्‍म्‍याचे दर्शन घेण्यासाठी बोर्डी घोलवड व पंचक्रोशीतील अनेक गावकरी  जमा झाले होते. भाई व बापूसाहेब अमृतेे गर्दीचे नियंत्रण करीत होते. एवढ्यात महात्माजींची गाडी स्टेशनात आली. त्या छोट्या अल्प भेटीत, भाईंनी व बापूसाहेबांनी गांधींजींना,आपल्या पंचक्रोशीला भेट देण्याचे आमंत्रण पुन्हां  दिले. यावेळी महात्माजींनी, “तुमचे, संपूर्ण अस्पृश्यता निवारणाचे काम झाले की मी नक्की आपल्या  गावाला येईन” असे आश्वासन दिले. गांधीजींची गाडी, पुढच्या प्रवासासाठी निघाली. मात्र दोन-तीन दिवसांनी भाईंना एक दोन ओळीचे पत्र  महात्माजींकडून मिळाले त्यात त्यांनी लिहिले होते.. 

   “तू केलेली प्रतिज्ञा सफल होण्यासाठी माझ्या शुभेच्छा.”

धन्य ते गांधीजींचे शिष्य आणि धन्य तो युगपुरुष !!

भाई व बापू अमृते यांच्या पुण्याइने युगपुरुषाचे पवित्र चरण आमच्या घोलवङ स्टेशनला लागले आणि त्या कालातील अखिल पंचक्रोशीमधील भाग्यवान ग्रामस्थांना अल्पकाळासाठी का असेना पण एका अभूतपूर्व तेजाचे दर्शन झाले.

      भाईंच्या जीवनावर महात्माजींचा प्रभाव, तर त्यांच्या साहित्यावर,ललित लेखनावर रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याचा प्रभाव होता. भाईंचा “अंजली” हा काव्यसंग्रह ,त्याचा परिपाक असून त्यांचे व्यक्तिमत्व समजावून घ्यायला खूप बोलका आहे. दुर्दैवाने मला अजून तो वाचता आलेला नाही. 1959 सालच्या मे मध्ये मी बोर्डी  सोडली आणि तेव्हापासून माझा ,भाईंचा संपर्कही कमी झाला. पुढे एक-दोन वेळा सुट्टीत गावी आल्यावर, मुद्दाम शाळेत जाऊन भाईंची भेट घेत असे, त्यांना वंदन करून ,त्यांचे आशीर्वाद घेत असे. भाईंना ही खूप आनंद होई. दुर्दैवाने 1961 मध्ये वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी, भाईंचे दुर्दैवी व अकाली निधन झाले. ब्रेन हॅमरेज निमित्त होऊन भाई गेले. मात्र अखेरपर्यंत त्यांना शाळेचा व विद्यार्थ्यांचा ध्यास होता. काही क्षणी, शुद्धीवर आल्यावर, शाळा व  मुलांबद्दल ते बोलत होते. कुटुंबीयासाठी भविष्यात काहीतरी तरतूद करून ठेवण्याचा व्यवहारीपणा(?) अर्थातच भाईंकडे नव्हता. कारण आयुष्यभर ज्या व्रतस्थ व निर्मोहीपणाने त्यांनी काम केले त्याच भणंग अवस्थेत बाईंची अखेर झाली. मात्र आज साठ वर्षाचा काळ लोटल्यावर ही भाईंच्या विषयी असलेली आस्था, आदर व प्रेम, माझ्यासारख्या त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांच्या मनातून यत्किंचितही कमी  झालेले नाही. भाईंनी दिलेल्या सुविचारांची सत्यता, जसा जसा काल पुढे सरकतो तशी जास्तच प्रत्ययाला येते  आणि त्यांच्या विषयीचा आदरही दुणावत जातो आहे. 

    भाई गेले, मात्र त्यांच्या सारख्या अस्तेय वादी गुरुजनांमुळेच “गुरु”ऊपाधीला एक महात्म्य प्राप्त झालेले आहे. आम्ही भाग्यवान, एकेकाळी अशा सद्गुरूंची मांदियाळी आमच्या बोर्डीच्या हायस्कूलात होती. त्यांच्या हातून घडण्याचे सद्भाग्य जीवनात मिळाले. अशा गुरुजनांच्या प्रती आदर व्यक्त करताना आमचे शब्द अपुरे आहेत. तेथे ज्ञानेश्वरांच्या एका ओवीचा मी कृतज्ञपणे उपयोग करतो.

        गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा| गुरुविण, देव नाही दुजा, पाहता नाही, त्रिलोकी ||

        ???भाईंच्या स्मृतीला मनापासून प्रणाम???

बोर्डी शाळेतील शिक्षक 1954 भाई – उजवीकडील बसलेले पहिले