“देव तेथेची जाणावा” -आचार्य भिसे गुरुजी [भाग-2]

“आपण बालशिक्षणाचे कार्य खेड्यात सुरू करा”,  हा गांधीजींचा आदेश शिरसावंद्य मानून भारतातील बाल शिक्षणाच्या प्रणेत्या ताराबाई मोडक यांनी बोर्डी हे खेडेगाव पसंत केले. बोर्डी गाव निवडण्यामागे आचार्य भिसे यांच्याबोर्डी मधील कामाची ख्याती व येथील आदिवासींना असलेली शिक्षणाची गरज त्यांना लक्षात आली होती. आचार्य भिसे यांची बोर्डी ही कर्मभूमी आहे, याचा त्यांना मोठा आधार वाटत होता.

 पद्मभूषण कै. ताराबाई मोडक

आचार्यांनी देखील ताराबाईंच्या बालशिक्षण कार्यक्रमात फार मोलाची मदत केली, इतकेच नव्हे तर आपल्या कृषी संस्थेची दोन एकर जमीन या नवीन संस्थेच्या इमारती बांधण्यासाठी दिली.”पद्मभूषण ताराबाई मोडक”,यांचेवरील स्वतंत्र लेखात मी ताराबाईंच्या कार्याची व त्या शिक्षण संस्थेबद्दल माझ्या आठवणींची स्वतंत्र विस्तृत माहिती दिली आहे.

महात्मा गांधीजींनी मूलोद्योग शिक्षणासाठी,  देशपातळीवर एक समिती नियुक्त केली होती. श्री .झाकीर हुसेन, जे नंतर भारताचे राष्ट्रपती झाले, या समितीचे अध्यक्ष होते. इतरही अनेक नामांकित शिक्षण तज्ञ या समितीचे सदस्य होते. आचार्य भिसे यांनाही राष्ट्रपतींनी या समितीचे सदस्य म्हणून नियुक्त केले होते. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी महाराष्ट्रातील तज्ञांशी व विधायक कार्यकर्त्यांशी चर्चा करुन मुंबई राज्यात मूलोद्योग शिक्षण सुरू करण्याची एक योजना तयार केली. ही योजना यशस्वी व्हायची असेल तर सर्वप्रथम आपल्या शिक्षण खात्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी व राज्यातील अध्यापक विद्यालयातील प्राध्यापक,यांचे ‘मूलोद्योग शिक्षण’, या विषयात प्रशिक्षण करण्याची जरुरी त्यांना भासली. त्यासाठी राज्य पातळीवर मुलोद्योगाचे प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. अर्थातच ही संस्था कुठे सुरू करावी याचा जेव्हा विचार झाला तेव्हा मुख्यमंत्री श्री बाळासाहेब खेर यांनी कोणताही संदेह न ठेवता बोर्डी या गावाची त्यासाठी निवड केली. कारण आचार्य भिसे यांनी 1920 सालापासून तेथे आपले मूलोद्योग शिक्षणाचे विविध प्रयोग सुरू केले होते त्यामुळे 1948 साली मुंबई राज्य शासनातर्फे बोर्डी येथे,” पदवीधर अध्यापक मुलोद्योग प्रशिक्षण केंद्र”, सुरू करण्यात आले… (GRADUATE’S BASIC EDUCATION TRAINING CENTRE)

 डॉ.  सुलभाताई पाणंदीकर यांची या केंद्राच्या प्राचार्या म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुलभाताई मोठ्या शिक्षणतज्ञ असून त्यांनी मुंबई येथील शासकीय अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य पद भूषविले होते. सुलभा ताईंनी ग्रामीण शिक्षणाच्या समस्यांचा सखोल अभ्यास केला होता.मूलोद्योग शिक्षण पद्धती आपल्या देशासाठी अत्यंत जरुरी आहे अशी त्यांची ठाम विचारसरणी होती. केवळ मूलोउद्योगाचे शिक्षण इतरांना देण्यापुरतेच त्यांचा संबंध  नव्हता तर त्या स्वतः चरख्यावर सूत कातून त्यातून तयार झालेली खादी वापरीत असत. ग्रामोद्योगातून तयार झालेल्या वस्तूंचा उपयोग दैनंदिन जीवनात करीत असत. त्यांनी आपली राहणी अत्यंत साधी ठेवली होती. अशा, ‘मूलोद्योग जगणाऱ्या’, विदुषीच्या हाती या केंद्राचे नेतृत्व आल्यामुळे सहाजिकच येथील प्रशिक्षण घेऊन बाहेर गेलेले विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात जाऊन ही शिक्षणपद्धती रुजविण्याचे प्रयत्न करीत.त्यांनीच महाराष्ट्रात या शिक्षण पद्धतीचा पाया घातला असे म्हटले तरी वावगे होणार नाही. या पदवीधर अध्यापक मूलोद्योग शिक्षण केंद्रात, प्राध्यापक कविवर्य ग .ह .पाटील कवियत्री इंदिरा संत यांच्यासारखे ज्येष्ठ साहित्यिक होते.”कविवर्य ग .ह .पाटील”, यांचे वरील माझ्या स्वतंत्र लेखात मी या केंद्राबद्दल व सुलभाताईंबद्दल अधिक आठवणी सांगितल्या आहेत .

“त्या आम्रा पिक सेविता, समसमा संयोग की जाहला.”

 या सुभाषिताप्रमाणे आचार्य भिसे यांनी बोर्डी व परिसरातील केलेल्या शैक्षणिक व आदिवासींसाठी केलेले समाजकार्य पाहण्यासाठी,अनुभव घेण्यासाठी, भारतातून अनेक थोर व्यक्ती बोर्डीला येऊन गेल्या. त्यातील काहींनी तर बोर्डीत कायम वास्तव्य केले.गांधीजींचे एक सहकारी पूज्य स्वामी आनंद हे 1926 साली  बोर्डीस आले. त्यांना बोर्डी गाव एवढा आवडला की त्यांनी येथे कायमचे राहणे पसंत केले. थोर साहित्यिक आचार्य काकासाहेब कालेलकर यांना प्रकृती स्वास्थ्यासाठी काही दिवस स्वामीजींनी बोर्डीस ठेवून घेतले. काकासाहेबांच्या काही पुस्तकात बोर्डीच्या निसर्गसौंदर्याचे वर्णन आहे. गांधीजींचे सुपुत्र रामदास गांधी हे देखील काही दिवस विश्रांती साठी बोर्डीत होते. राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी यांनी बोर्डीला भेट दिली होती. अशा अनेक वंद्य विभूतींच्या  पावन पदस्पर्शाने आमच्या बोर्डीची  भूमी पावन झाली आहे. त्याला कारण, आचार्य भिसे यांचे बोर्डीतील वास्तव्य,हे आहे.

        राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी यांचे समवेत आचार्य भिसे व त्यांचे सहकारी शिक्षक(सन 1927).

सरहद्द गांधी, भारतरत्न, बादशहा अब्दुल गफार खान यांचे समवेत आचार्य भिसे.

   स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात देशातील अनेक थोर नेत्यांनी आमच्या बोर्डी गावाला भेट दिली आहे. श्री विठ्ठल भाई पटेल, कर्नाटक सिंह गंगाधरराव देशपांडे, ठक्करबाप्पा ,अच्युतराव पटवर्धन, मणीबेन पटेल, शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ ही थोर मंडळी ही त्यात होती.

    भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत बोर्डीस येऊन राहत.आचार्य भिसे यांनी दलितांसाठी व शोषितांसाठी केलेले समाजकार्य पाहून त्यांना फार समाधान होत असे.

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे समवेत आचार्य भिसे.सन 1959.

      आचार्यांचे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी सेवेचे कार्य पाहण्यासाठी भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद, गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत, माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी,माजी पंतप्रधान श्री विश्वनाथ प्रतापसिंग, लोकनायक जयप्रकाश नारायण ,मुंबईचे राज्यपाल श्री .श्रीप्रकाश ,मुख्यमंत्री श्री बाळासाहेब खेर, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण, श्री वसंतराव नाईक ,श्री शंकरराव चव्हाण ,श्री शरद पवार, बॅरिस्टर ए आर अंतुले यांचा समावेश आहे.भारत सरकारचे कृषिमंत्री श्री जगजीवनराम, डॉक्टर पंजाबराव देशमुख, अण्णासाहेब शिंदे, यांनीही बोर्डीला भेट दिली आहे.महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मंत्री सर्वश्री भाऊसाहेब हिरे, वैकुंठलाल मेहता, अण्णासाहेब वर्तक यांनी बोर्डीला भेटी दिल्या. कारण एकच …आचार्य भिसे यांनी तेथे चालविलेले आदिवासी सेवेचे काम पाहणे ,आचार्यांचे दर्शन घेणे, आचार्यांना वंदन करणे!

      पूज्य साने गुरुजींचे धाकटे बंधू श्री पुरुषोत्तम साने हे बोर्डीच्या शाळेत ,आचार्य भिसे यांचे सहकारी होते.त्यांना भेटण्यास पूज्य साने गुरुजी बोर्डीस येऊन नेहमी वास्तव्य करीत. त्यांची किती तरी प्रसिद्ध पुस्तके त्यांनी बोर्डीत लिहिलेली आहेत. ग्रामस्थांसमोर त्यांची भाषणे होत. आचार्य व साने गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची दीक्षा येथील युवकांना मिळाली.या लहान गावांतून एक-दोन नव्हे तब्बल 94 स्वातंत्र्य सैनिक, त्या कालखंडात बोर्डी, घोलवड परिसरात निर्माण झाले. आचार्य भिसे, सानेगुरुजी या महान स्वातंत्र्य सैनिकांची प्रेरणा त्यामागे आहे. तो खूप रोमांचकारी इतिहास आहे.

       अनेक राष्ट्रीय नेते मुंबईहून गुजरातकडे प्रवास करताना, ‘सौराष्ट्र एक्सप्रेस’, या रेल्वे गाडीने जात असत.ही गाडी घोलवड स्टेशनवर थांबत असे. आचार्य आपल्या विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना बरोबर घेऊन, या राष्ट्रीय नेत्यांचे दर्शन घेण्यास जात असत. महात्मा गांधी,नेताजी सुभाष चंद्र बोस ,पंडित जवाहरलाल नेहरू, व मौलाना अबुल कलम आझाद या दिग्गज नेत्यांनी आमच्या घोलवड स्टेशनच्या  फलाटावर  उतरुन ,येथील जनतेला दर्शन दिले आहे. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील, स्वातंत्र्य सेनानींची मांदियाळी,या गावातील सामान्य लोकांनी  पाहीली, नेत्रांचे पारणे फेडले. स्वातंत्र्य चळवळीत आपले योगदान दिले तुरुंगवास भोगला. आचार्य भिसे यांचे मार्गदर्शन व नेतृत्व, या तरुणांना होतेच.

आचार्य भिसे यांनी,’जंगलातील छाया’, हे पुस्तक लिहिले आहे.हे पुस्तक खरे तर आचार्य यांची आत्मकथाच आहे. तो केवळ आचार्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील कालखंडाचा इतिहास नसून, ‘आदिवासी व स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील त्यांचे दुर्लक्षित जीवन’,या अंधारयात्रेचा तो इतिहास आहे. या पुस्तकामुळे ,आदिवासी-वनवासीवर होणाऱ्या अत्याचारांची, तथाकथित सुसंस्कृत समाजाला ओळख झाली.जंगलांतील या छाया खऱ्याखुऱ्या आहेत, भीषण आहेत, बीभत्स देखील आहेत. ते केवळ ठाणे जिल्ह्यातील आदिवासींचे चित्र नाही,ते तत्कालीन भारतातील वनवासींचे सार्वत्रिक चित्रण आहे. ते वाचताना कोणीही सहृदय माणूस कळवळेल. एवढा अत्याचार, जुलूम जबरदस्ती,व एवढे असूनही त्याची ना कोठे दाद ना फिर्याद.अक्षरशः जनावरे आणि गुलामांच्या पातळीवर त्यांना आणून बसवले होते.कंत्राटदार, जमीनदार, सावकार आणि सरकारी अधिकारी यांनी आपले सर्व वैभव या दलितांच्या शोषण आणि अत्याचारावर उभारले होते.स्त्रीची अब्रू कस्पटासमान लेखली जात होती. वीटभट्टीच्या कामात चूक झाल्यास पुरुषांना सरळ-सरळ पेटत्या भट्टीत फेकून दिले जाई. सर्वच भयाण व  भयंकर होते. आचार्यांच्या मनात कादंबरीची तीन पर्वे लिहावयाची होती. मात्र हे पहिले पर्व लिहून झाले. बाकीची दोन लिहिण्यास त्यांना वेळच मिळाला नाही .कसा मिळेल? हाती लेखणी, कागद घेऊन,पांढर्‍यावर काळे करण्यापेक्षा,,  दुःखीतांच्या हाकेसरशी त्वरित धावून जाणे ,त्यांना अगत्याचे वाटे. पायात त्राण नसले तरी भेलकांडत धावून जात. मनातील धग पायाचे चक्र थांबून देतं नसे.’जंगलातील छाया’, या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे,बोर्डी येथे 1975 साली प्रकाशन झाले. त्यावेळी थोर समाजवादी नेते श्री एस. एम .जोशी ,श्री.यदुनाथ थत्ते उपस्थित होते.

   आचार्य भिसे यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बोर्डी केंद्रात राहूनच शालेय शिक्षण व ठाणे जिल्ह्यातील आदिवासींचे सेवाकार्य केले. आदिवासींचे शोषण थांबावे या मुख्य उद्दिष्टाने त्यांनी आदिवासी भागात शिक्षणप्रसार, जंगल कामगार सहकारी सोसायट्या, प्रशिक्षण केंद्रे, कृषी शिक्षण संस्था,इत्यादी कार्यक्रमाद्वारे आदिवासींची उन्नती घडवून आणली .त्यांचे हे कार्य लक्षात घेऊन भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद हे जानेवारी 1959 मध्ये बोर्डीत आले. त्यांनी आचार्यांच्या कार्याला अभिवादन केले. प्रत्यक्ष भारताचे राष्ट्रपती बोर्डीला येऊन आचार्यांच्या कार्याची प्रशंसा करतात, यातच त्या महान कार्यकर्त्याची व त्याच्या कामाची  गुणवत्ता,दिल्ली दरबारीही किती होती हे कळते !

    राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी, आदिवासी कल्याण व गृहमंत्री पंडित पंत यांच्या सूचनेवरून ,”आचार्य भिसे यांनी भारत सरकारचे सल्लागार म्हणून यावे”,असे आवाहन केले. आचार्यांनी नम्रपणे ते नाकारले. ते म्हणाले,    

    “भारताचे राष्ट्रपती व गृहमंत्री यांनी माझ्या कार्याचा जो गौरव केला,त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.हे कार्य माझे एकट्याचे नसून,माझ्या असंख्य सहकाऱ्यांच्या प्रयत्नांचे फळ आहे. अद्यापही आमच्या ठाणे जिल्ह्यात हजारो आदिवासी कुपोषणाने ग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत हे कार्य सोडून मला जाणे शक्य होणार नाही. बोर्डी हीच माझी कर्मभूमी राहील.  येथेच मी आजन्म ठाणे जिल्ह्यातील आदिवासींची सेवा करीन. मी अत्यंत दिलगीर आहे.”

     मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आचार्यांचे मित्र होते. अनेक योजना दोघांनी एकत्र राबविल्या होत्या. बाळासाहेबांनी, ‘अत्यल्प काळासाठी तरी, आचार्यांनी प्रांतिक मंत्रिमंडळात शिक्षण व आदिवासी कल्याण खाते सांभाळावे’, अशी ही विनंती करून पाहिली.मात्र त्यालाही नेहमीप्रमाणे, “Nothing doing..,मला बोर्डी हे कार्यक्षेत्र सोडावयाचे नाही,” असे नम्र, पण ठामपणे त्यांना सांगितले.

        आचार्य भिसे यांच्या आदिवासीबद्दलचे सेवा कार्य लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’, किताब देण्याचे ठरविले. जेव्हा हे आचार्यांना कळले तेव्हा त्यांनी या गोष्टीला ही साफ नकार दिला. खूप मित्रांनी व त्यांचे गुरु प्रिं. कुलकर्णी यांनी आचार्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.परंतु आचार्यांनी हा महान सरकारी किताब स्वीकारण्याचे नाकारले.

   “जीवनात कोणताही सन्मान स्वीकारायचा नाही ,असे तत्व मी मानले आहे. त्यामुळे  हा किताब स्वीकारू शकत नाही!”, असे त्यांनी भारत सरकारला कळवले.

      उतारवयातील प्रवास कष्ट कमी करण्यासाठी शासनाने  दिलेल्या, रेल्वेचा पहिल्या दर्जाचा,’ कायम स्वरूपी पास’, खिशात असतांना, द्वितीय वर्गातून प्रवास करणाऱ्या ,आचार्यांच्या, निस्पृहता आणि तत्त्वनिष्ठा याबद्दल आपण पामर अधिक काय बोलणार?

      आचार्यांनी जीवनभर कोणत्याही फळाची अपेक्षा न करता, सतत दलितांच्या कल्याणाचे कार्य केले.’कोणताही सन्मान स्वीकारायचा नाही’, असे  तत्त्व मानले. त्यात कधीही,कोणतीही तडजोड केली नाही. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी  आज जागृत आहे, शोषण मुक्त आहे. स्वातंत्र्याची व विकासाची फळे, हा समाज निश्चितच उपभोगीत आहे..साक्षरता आली आहे.अनेक तरुण जीवनाच्या विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. आचार्य भिसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शंभर वर्षांपूर्वी लावलेल्या एका रोपट्या चे कल्पवृक्षात रूपांतर झाले आहे.हे बघावयाला आज आचार्य नाहीत. त्यांचे विषयी कृतज्ञता   या समाजाने बाळगावयास हवी. 

       “आयुष्याला उधळीत जावे, केवळ दुसऱ्या साठी…” ही नुसती कविकल्पना नाही, अशा अर्थाने आयुष्याचा प्रत्येक क्षण ‘ऊधळलेला’, एक अवलिया, या भारत देशात,महाराष्ट्रात, आमच्या बोर्डी गावात, केवळ पन्नास वर्षांपूर्वी राहत होता, हे आजच्या पिढीला ही खरे वाटणार नाही .मात्र आम्ही खूप भाग्यवान. आम्ही तो पुण्यात्मा पाहिला, त्याची चरणधुली मस्तकी लावली,त्यांचे आशीर्वाद मिळविले …बस्स..आयुष्यात याहून मोठी संपत्ती काय मिळवायची?

        गीतेत सांगितल्याप्रमाणे

       योगस्थः कुरु कर्माणि, सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय।

       सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते।।

आपले कर्म करीत राहा, त्यासाठी कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवू नको, काम सिद्धीस जाईल अथवा न जाईल. लोक स्तुती करतील वा निंदा करतील. दोन्ही समान मानून,जो स्थिरचित्त राहतो तोच योगी होय…या वचनाप्रमाणे आचार्य हे योगी होते. कर्मयोगी होते ,निष्काम कर्मयोगी होते !

माझे मित्र, गोखले एज्युकेशन सोसायटीचेपालघर जिल्हा, झोनल सेक्रेटरी, प्रिन्सिपल प्रभाकर राऊत यांना आचार्यांचा  निकट सहवास  मिळाला. सन 1959 मध्ये प्रभाकर राऊत एसएससी ची परीक्षा( ऑक्टोबर 1959 साली,एस .एस .सी बोर्डाच्या या  परीक्षेत प्रभाकर ,सबंध महाराष्ट्रात पाचवेआले होते), देऊन घरी सुट्टी घालवीत होते .त्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये,एके दिवशी,श्री.एस आर सावे सरांनी, खास घरी येऊन,त्यांना एक विनंती केली. ..” आचार्यांच्या डोळ्याचे मोतीबिंदू ऑपरेशन झाले आहे, त्यांना पत्रव्यवहारासाठी,थोडे दिवस,लेखनिक म्हणून, मदत हवी आहे .आपण ही करू शकाल काय?”.प्रभाकर ना हीआयती चालून आलेली, मोठी संधी होती. अर्थातच त्यांनी गुरुजींना ती मदत करण्याचे मोठ्या आवडीने मान्य केले. आचार्यांच्या सोयीनुसार, एका विशिष्ट वेळी, आचार्यांच्या निवासस्थानी ते हजर होत. आचार्य  तोंडी मजकूर सांगत व ते लिहून घेत.पत्र लिहून झाल्यावर ,मजकूर वाचण्यास सांगत. ठीक वाटल्यास  सही करून पत्र रवाना करीत .प्रभाकर म्हणतात, पत्रव्यवहारावरून,आचार्यांचा कामाचा पसारा किती अफाट होता हे कळून येई.एवढी अवधाने ते किती विलक्षण तडफेने सांभाळीत.  पत्रव्यवहारही प्रचंड होता. पत्र व्यवहाराला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. व्यक्तिगत अडीअडचणीत सल्लामसलत देण्यापासून,विविध चळवळींना मार्गदर्शन करण्यापर्यंत अनेक विषय त्यात असत. स्वतः पत्रे लिहिताना ते एक हाती, मराठी इंग्रजी आणि हिंदीत पत्रे लिहीत. आचार्यांची ही एकटाकी लिहिलेली पत्रे अल्पाक्षरी व अर्थबहुल अशी असत. आचार्यांनी कधीही साध्या पोस्टकार्ड शिवाय दुसरे पत्र वापरले नाही. मजकूर सरळ पत्रावर  उतरवून देखील कधीही, दुसरे पत्र घ्यावे लागले नाही.आपल्या सुवाच्च अक्षरात ते मजकूर लिहीत.  मोकळी जागा सोडलेली नसे. पोस्ट कार्ड वरील सर्व उपलब्ध जागा मजकुराने भरली जाई.

विशेष गंमत पुढे आहे. प्रभाकरांनी एक महिना हे काम केल्यानंतर, गुरुजींनी त्यांना रजा दिली. शेवटच्या दिवशी कामाचा मोबदला म्हणून ,शंभर रुपयांची एक नोट काढून  प्रभाकरांच्या हाती दिली.त्यांनी हे काम ‘आचार्यांना छोटीशी  मदत व आचार्यां चे ‘सेवेतून मिळणारा सन्मान’, या दृष्टीने केले होते. अर्थातच प्रभाकरनी   ती नोट घेण्याचे, नम्रतेने नाकारले. गुरुजींचा आग्रहच एवढा,त्यांना ते पैसे घ्यावेच लागले.  राऊत सर म्हणतात,”कोणाची ही सेवा फुकट घ्यायची नाही” ,हा आचार्यांचा आयुष्यभराचा शिरस्ता होता. त्यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही..इतरांची,अनेक मोठी कामे विनावेतन,विनामोबदला, केली.मात्र  स्वतःसाठी घेतलेली अल्प सेवा ,भले,ती आपल्या विद्यार्थ्याने का दिलेली असे ना.. त्याचा मोबदला दिला गेलाच पाहिजे..या तत्वनिष्ठेस काय म्हणावे? याला  उपमा नाही..

       राऊत सरांनी सांगितलेली पुढील आठवण, अत्यंत दुर्मिळ व आचार्यांच्या  प्रखर जीवनमूल्याची,तीव्रतेने जाणीव करून देणारी! 1945 साली शाळेचा रजत महोत्सव, म्हणजे ‘सिल्वर जुबिली’ येत होती व त्या निमित्ताने एकादा विद्यार्थ्यांना उपयुक्त असा उपक्रम सुरू व्हावा, अशी आचार्यांची इच्छा होती.हे काम माजी विद्यार्थ्यांनी करावे असेही त्यांना वाटत होते. त्याप्रमाणे त्यांनी एके दिवशी, काही माजी विद्यार्थ्यांना शारदाश्रमात बोलावून ,आपली तशी  इच्छा व्यक्त केली. त्या अनुसार,बोर्डी व बाहेरील कांही माजी विद्यार्थी आचार्यांना भेटण्यास आले. सुमारे पंचवीस हजार रुपये जमा व्हावे व त्यातून हा उपक्रम सुरू व्हावा ,अशी आचार्यांची  इच्छा होती. पुढे सहा महिन्यांनी ही मंडळी,स्वतंत्रपणे , गोळा केलेली,  देणगीरुपी रक्कम घेऊन, आचार्यांना भेटण्यास आली.श्री पाटकर या मुंबईतील माजीविद्यार्थ्याने, (जे पुढे मुंबईचे महापौर झाले), पुढाकार घेऊन एक आवाहनात्मक पत्र काढले होते.  श्री.पाटकरांनी सांगितलेली हकिकत ऐकून आचार्यांना खुपच धन्यता वाटली. त्यांनी जमवलेल्या काही हजार रुपयापैकी 16(,सोळा) रुपये हे दादर स्टेशनच्या  ,प्लॅटफॉर्मवर उभे राहून, लोकांकडून अर्धा,एक रुपया,  अशा स्वरूपात जमविले होते. सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आचार्यांच्या इच्छेला मान देऊन जोरदार काम केले होते. . सुमारे एक लाख रुपये वर्गणी जमली होती! विद्यार्थ्यांना आचार्यांच्या भरघोस शाबासकीची अपेक्षा होती. मात्र झाले अगदी उलटे. आचार्यांनी तीव्र नापसंती दर्शविली!!… कारण काय ?..” “मी तुम्हाला केवळ पंचवीस हजार रुपये जमा करण्यास सांगितले होते, आता या अधिक 75 हजार रुपयांचे काय करावयाचे?”.. ? मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला. .आचार्य अधिक पैसे स्विकारण्यास  तयार नाहीत तर,मुले,  ‘देणगीरूपी पैसे आचार्यांनी स्वीकारावे’ ,अशी विनंती करत होती. शुभकार्यासाठी देणग्या जमविताना, ना असा प्रश्न कधी कोणास पडला असेल, ना तो भविष्यात कधी पडेल,त्या काळी आचार्यांच्या विद्यार्थ्यांसमोर हा मोठा पेच निर्माण झाला होता.. नेहमीप्रमाणे चित्रे गुरुजींनी यात मध्यस्थाची भूमिका बजावून, आचार्यांचे मन वळविले , या पैशातून आपण एक वास्तू निर्माण करूया, असा तोडगा निघाला. सुदैवाने आचार्यांना चितळे गुरुजींची कल्पना पसंत पडली. आणि ..आणि त्यातूनच 1946 खाली “गुरूदक्षिणा मंदिर” या बोर्डी मधीलच, एका अभूतपूर्व जगावेगळ्या  अशा वास्तूचा जन्म झाला ..गुरूदक्षिणा मंदिराची जन्म कथा ही अशी आहे.

   शिष्यांच्या, गुरुवरील निर्व्याज प्रेमाचे प्रतीक असलेले हे गुरूदक्षिणा मंदिर, गेली 75 वर्षे ,गुरुशिष्यांमधील अतूट प्रेमाच्या नात्याचा, अमर संदेश जगाला  देत दिमाखात उभे आहे!!

      ज्या गुरुवर्यांच्या प्रेरणेतून ही भव्य वास्तू त्या काळी उभी राहिली, त्या वास्तूसमोरच आचार्यांचा पुतळा आहे .हा पुतळा गुरुदक्षिणा मंदिराचे परिसरात नसून समोरील रस्त्यावर आहे . आपल्या महान व रामशास्त्री बाण्याच्या गुरुची नजर या वास्तूवर सतत रहावी, या भव्योदात्त व पवित्र भावनेने,माजी विद्यार्थ्यांनी ही योजना केलेली आहे. धन्य ते शिष्य व धन्य त्यांचे आचार्य!!

       पुढे शाळेच्या अमृतमहोत्सवी वर्षात, म्हणजे 1994 सालात,एन. बी.  मेहता विज्ञान महाविद्यालयाची झालेली सुरुवात म्हणजे, आचार्यांच्या,’पूण्यप्रभावाचा’,महिमा ,त्यांच्या  निधनानंतरही, दिवसेंदिवस, सतत वृद्धिंगतच कसा होत आहे, याचे प्रात्यक्षिक आहे!       

         गोखले एज्यु.संस्थेचे सेक्रेटरी, सर डॉ. गोसावी यांनी अमृतमहोत्सवी(1993,94)) वर्षात महाविद्यालय सुरू करण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्याप्रमाणे,1994 जून मध्ये, रीतसर मुलांना प्रवेशही देण्यात आला.एफ वाय बीएस्सी चे वर्ग सुरू झाले. मात्र कॉलेजला मान्यता मिळत नव्हती. वर्ग चालू झाले होते,  ऑगस्ट ,सप्टेंबर 1995 पर्यंत मान्यता आली नव्हती.सुदैवाने त्याचवेळी, डॉ.जयंतराव पाटील, प्लॅनिंग कमिशनचे सदस्य असल्याने, दिल्लीला त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे सप्टेंबर 1995 मध्ये, राज्य सरकार कडून मान्यता मिळाली. सर्वांच्या अंगी उत्साह संचारला.आता भविष्यातील विस्तारीकरणाचे, नवीन वर्ग उघडण्याचे, आराखडे तयार होऊ लागले. जागा अपुरी पडू लागली.सर्वमंडळी, नवीन वास्तू उभारण्यासाठी लागणार् या  पैशाच्या चिंतेत होती…. आणि चमत्कार घडला!!..

    आचार्यांचे माजी सहकारी,श्री.एन. बी. मेहता सर यांनी,वलवाडा(गुजराथ), येथून,स्वतःहून फोन करून, प्रभाकर राऊत सरांना व त्यांच्या काही सहकार्‍यांना भेटावयास बोलविले.मेहता गुरुजींचे वय त्यावेळी 88 वर्षांचे होते.हायस्कूलमध्ये सेवा देऊन, निवृत्तीचे जीवन आपल्या गावी व्यतीत करीत होते. त्यावेळी आजारी होते. मेहता सरांनी आपल्याला नेमके कशासाठी बोलाविले असावे ,हे राऊत सरांना समजत नव्हते मात्र तेथे जाण्याचे नक्की केलं.

     माननीय भाऊसाहेब वर्तक,डॉक्टर गोसावी सर,प्रभाकर राऊत सर, इतर एक,दोन,अधिकारी मंडळी, मेहता सरांच्या गावी त्यांचे निरोपाप्रमाणे, वलवाडा येथे हजर झाली. अनेक वर्षांनी जुने सहकारी भेटल्याने मेहता गुरुजींनादेखील खूप आनंद झाला. खुशालीच्या गप्पा झाल्यानंतर मेहता सरांनीच मंडळीना प्रश्न केला,” आपल्या शाळेच्या या अमृतमहोत्सवी वर्षात, आपण काही नवीन ऊपक्रम हाती घेणार आहोत की नाही?” डॉक्टर गोसावी, मा.भाऊसाहेब वर्तक, प्रि. राऊत एकमेकाचे चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहू लागले. भाऊसाहेबांनी,,”संस्थेने बोर्डी येथे विज्ञान शाखेचे नवीन कॉलेज सुरू केले आहे.व त्या उपक्रमासाठी  पैशाची अडचण असून, रक्कम मोठी लागणार आहे. आम्ही प्रयत्न करीत आहोत”. अशी माहिती दिली .मेहता गुरुजींना ही कल्पना खूपच आवडली. “छान कल्पना आहे, पैशाची काळजी करू नका. या  बाबतीत आपण,माझा मुलगा नितीन यांच्याबरोबर, बोलावे”, अशी  विनंती केली. नितीन त्यावेळी घरी नव्हते. सरांनी त्वरित नितीनला फोन करून “गोखले एज्युकेशन सोसायटीची मंडळी आपल्याला भेटायला आली आहेत. तू त्वरित घरी ये, मंडळी वाट पाहत आहेत”, असा निरोप दिला. नितीन त्याप्रमाणे त्वरेने घरी आले. त्यांनी पाहुणेमंडळीसोबत चर्चेतून, कॉलेजचा निश्चीत आराखडा काय , त्यासाठी एकूण खर्चाचा अंदाज किती, आणि आमच्याकडून आपली काय अपेक्षा आहे, इत्यादी माहिती घेतली.

  “सध्या परिस्थितीत,महाविद्यालयाचा तळमजला आम्हाला बांधावयाचा आहे व त्यासाठी अंदाजे 25 लाख रुपयांची गरज आहे”,असे गोसावी सरांनी त्यांना सांगितले. आमच्याकडे  महाविद्यालयासाठी जमिनीचा प्रश्न नाही, ती उपलब्ध आहे. हे कळल्यावर नितीन एकदम बोलून गेले ,. “मग तुमचे काम झालेच समजा!”….”आपल्या बोर्डीतील जागेवर, तळमजल्याचे,20,000चौ.फूटाचे बांधकाम ,मी स्वतः बांधकाम व्यवसायात असल्यामुळे,त्वरित करून देतो,”..अशी निःसंदिग्ध ग्वाही नितीन यांनी पाहुण्यांना दिली. 

   या महाविद्यालयाच्या पायाभरणी साठी मेहता गुरुजींनीच बोर्डीस  यावे अशी सर्वांची इच्छा होती. त्यांची नाजूक प्रकृती पाहता त्यांना प्रवास झेपेल काय, ही शंकाही सर्वांना होती. 5 डिसेंबर,1995, ही अगदी नजीकची तारीख पायाभरणी समारंभासाठी ठरली.आणि आश्चर्य म्हणजे, “मी, या पायाभरणी समारंभास येणार .मला आचार्यांच्या समाधीचे दर्शन घ्यावयाचे आहे .बोर्डीच्या भूमीला वंदन व माझ्या कर्मभूमीचा परिसर एकदा ,शेवटचा पहावयाचा आहे.”असे भावपूर्ण उद्गार सरांनी काढले. . मी निश्चित येणार, अशी निःसंदिग्ध ग्वाही  सरांनी त्या दिवशी, आपल्या नाजूक अवस्थेत ही  दिली.

 “तम्हे घबरावो नही.उं चोक्कस आववानो छूं”..  मेहता गुरुजींचे गुजराती मधील हे उद्गार!

       मेहता सर ॲम्बुलन्स मधून बोर्डीला आले. आचार्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. शाळेत जाऊन आपल्या कर्मभूमीला वंदन केले. प्रकृती अगदी तोळामासा झाली होती. तशाही परिस्थितीत, त्यांनी तो भूमिपूजनाचा मान घेऊन, कार्यक्रम निर्विघ्नपणे ,यशस्वीरित्या पार पडला .आचार्यांवरील अढळ श्रद्धा, कृतज्ञता बुद्धी आणि त्यामुळे मिळालेले आत्मबल! त्यानंतर थोड्याच दिवसात, 17 मार्च रोजी पू.गुरूवर्य मेहतांनी या जगाचा निरोप घेतला.

     आजमितीस, या महाविद्यालयात पाच पदवी अभ्यासक्रम व चार पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवण्याची सोय उपलब्ध झाली आहे .वाणिज्य विभाग ही निर्माण झाला आहे. तेथे एम.कॉम. पर्यंत शिकायची सोय आहे. सुमारे पंधराशे विद्यार्थी या एन.बी.मेहता विद्यालयात शिक्षण घेतात. पैकी सुमारे पंचवीस टक्के आदिवासी विद्यार्थी आहेत. महाविद्यालयाला व गोखले एज्युकेशन संस्थेला, सर्व पदाधिकाऱ्यांना हे निश्चितच भूषणावह आहे!!

     शाळेच्या अमृतमहोत्सवी वर्षात महाविद्यालय स्थापन करण्याची संकल्पना डाॅ. गोसावी मनात आणतात.. मंडळी कामाला लागते ..मंजुरी नसतानाही विद्यार्थी प्रवेश घेऊन पहिल्या वर्गाचे काम सुरू होते.. कॉलेज इमारत बांधण्यासाठी आर्थिक चिंता सतावत असतानाच, मेहता गुरुजींचा, अचानक, “एक दिवशी मला भेटून जा”,असा फोन येतो.. प्रभाकर राऊत वरिष्ठ मंडळींना, मेहता गुरुजींच्या वलवाडा या गुजरातमधील गावी घेऊन जातात…..मेहताजी, आपल्या चिरंजीव नितीन भाईना बोलावून महाविद्यालय बांधणीची  कल्पना देतात…नितीनभाई तात्काल, “पंचवीस लाख रुपयाचे,20,000चौ.फूट तळ मजल्याचे बांधकाम  मी स्वतः करून देतो”,असे आश्वासन  देतात ,आणि तीन महिन्यात पायाभरणी समारंभ होऊन बांधकामाला सुरुवात होते ! आचार्य भिसे यांचे  आपल्या तर्फे एक चिरंतन स्मारक  व्हावे, असे, जणू मेहता गुरुजींचे अखेरचे स्वप्न होते, ते कॉलेजच्या स्वरूपात साकार झालेले पाहिले व त्यांनी जगाचा निरोप घेतला !!हे सारेच कसे अगम्य, अतर्क्य, अद्भुत आणि विलक्षण .. हाच, आचार्यांच्या, पवित्र स्मृतीचा, दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाणारा, पुण्यप्रभाव!! 

    प्रिं. राऊत सर म्हणाले ,”आचार्यांच्या पुण्याईचे संचितच एवढे आहे की ,गोखले एज्युकेशन सोसायटी, व बोर्डी शाखेला  आजपावेतो, कधीही, कोणताही उपक्रम हाती घेताना, पैशाची अडचण आली नाही . इतरांना आर्थिक मदत मिळविण्यासाठी वणवण करावी लागली,,भिसे, चित्रे, सावे यांच्या पावन भूमीत लक्ष्मी,स्वतःच्या पायाने चालत आली.

   सौ ललिता जयकुमार पाठारे माहिती तंत्रज्ञान, कटघरा पॉलीटेक्निक, व अशा सर्व संस्थांच्या निर्मितीचा इतिहास असा अद्भुत व आश्चर्यजनक आहे.  कोणताही उपक्रम पैशावाचून रखडला नाही. गेल्या शंभर वर्षात,  संस्थेचा व बोर्डी शाखेचा विस्तार विविधांगी झाला आहे. पूर्व प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षणासाठी, तांत्रिक, संगणक शास्त्र,विज्ञान, कला, व्यापार अशा अनेक शिक्षण विभागांची दालने येथे उघडली गेली आहेत. बोर्डी शिक्षणाची पंढरी झाली .”माझ्या संस्थेतून, माझा प्रत्येक आदिवासी विद्यार्थी, ‘केजी पासून पीजी’, पर्यंत त्याला हवा तो शिक्षण क्रम घेऊनच बाहेर पडावा”, हीआचार्यांची मनीषा, शाळेच्या शतकमहोत्सवी कालखंडात, आज पूर्ण झाली आहे.

    आचार्यांची कर्म कठोरता व टोकाची वाटावी अशी निःस्पृहता, यासंबंधी किती गोष्टी सांगाव्यात ?प्रि. राऊत सर यांनी वानगीदाखल सांगितलेल्या या कांही!

   1955 साली, एस. एस. सी .परिक्षेत, शेती हा विषय घेऊन बसण्याची शाळेला परवानगी मिळाली. त्याच बरोबर ,स्टाफ क्वार्टर्स साठी काही अनुदानही सरकारने मंजूर केले. आराखडयानुसार काम करण्याचे कंत्राट, डहाणूचे श्री मंजीभाई यांना देण्यात आले . आराखड्यानुसार इमारत बांधून झाल्यानंतर,कंत्राटदाराने गुरुजींना एकूण खर्चाचा तपशील सादर केला.  तेव्हा आचार्यांच्या असे लक्षात आले की,अनुदानित खर्चापेक्षा,सुमारे एक हजार रुपये खर्च कमी झाला आहे. तेव्हा कंत्राटदाराने ,”या रकमेत,इमारतीभोवती विटांचे पक्के कंपाउंड बांधता येईल”, असे सुचविले. ही सूचना आचार्यांनी त्वरित अमान्य केली. कारण अनुदान फक्त इमारतीसाठी होते, त्यात कंपाऊंडचा उल्लेख नव्हता.  आश्चर्य वाटेल, गुरुजींनी ही हजार रुपयांची रक्कम ,स्वतः ठाण्याला सरकारी ट्रेझरीत जाऊन  त्वरीत भरणा केली. मला वाटते बोर्डी केंद्राची आर्थिक व शैक्षणिक  वाटचाल, गुरुजींनी घालून दिलेल्या या नैतिक मूल्यावरच होत आहे !

     कोसबाडला सुरू केलेल्या अनेक शैक्षणिक उपक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी, आचार्य बोर्डीहून कोसबाडला वारंवार जात असत. प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये त्यांनी  प्रवेश केल्यावर, सहाजिकच कोणीतरी  बसण्यासाठी जागा देऊ करी. नम्रपणे त्याला नकार मिळे. कोसबाड पर्यंतचा प्रवास उभ्यानेच होई.

       आचार्यांनी आपला वाढदिवस कधीही साजरा केला नाही.

 ते अत्यंत प्रसिद्धीपरान्मुख  होते. 1954 साली, आचार्यांच्या शताब्दी निमित्त, त्यांचे चाहते, ‘काही औपचारिक समारंभ’, करू पाहतात, अशी त्यांना नुसती कुणकुण लागली. आणि त्याला उद्देशून जे पत्र त्यांनी पाठविले आहे, ते त्यांच्या अलिप्त, संन्यस्त  प्रकृतीवर प्रकाश टाकणारे आहे. ते म्हणतात:

“मी सेवानिवृत्त होणार नाही. मी कंटाळलो, शिणलो नाही. आपत्तींनी धास्तावलो पण नाही. विपरीत परिस्थितीपुढे मी कधीही शरणागती पत्करलेली नाही. अमुक एका वयानंतर, अमुक एक काम करू नये, असा संस्थेचा नियम आहे. तो योग्य आहे. मला तो मान्य आहे. म्हणून मी काम बदलले आहे, बंद केलेले नाही. सेवा म्हणजे ईश्वराची पूजा. त्यातून मी निवृत्त कसा होईन? माझी सेवानिवृत्ती हा एक गैरसमज आहे. अशा स्थितींत समारंभाचे अवडंबर मला, लहान मुलींच्या भातुकलीच्या खेळासारखे, बालिशपणाचे वाटते. माझ्या मित्रांच्या हातून तरी अशाप्रकारचा बालिशपणा न व्हावा. मी संन्यासी नाही, संसारी आहे. संसारी माणसाच्या भावना मला पूर्णपणे समजतात. मी बोर्डीला आलो तेव्हा एक पेटी आणि एक वळकटी घेऊन आलो होतो. हे जग मी सोडीन तेव्हाही मजजवळ कोणतीच जड संपत्ती असणार नाही. अशा स्थितीत तुम्ही माझा सत्कार कसला करता?  

अक्षरशः गुरुजींनी, आपले शब्द खरे केले. या मर्त्य जगाचा निरोप घेताना, तीच एक पेटी आणि वळकटी माघारी ठेवून ते गेले.  जीवनभर अशी पराकोटीची अनासक्त वृत्ती दाखवणाऱ्या आचार्यांचे वर्णन करण्यासाठी,माझ्याकडे तरी शब्द नाहीत !

प्रभाकर राऊत सरांनी सांगितलेल्या या काही आठवणी आचार्यांचे चरित्रात,इतरत्र कोठेही सापडणार नाहीत. प्रि. राऊत सरांना, आपल्या ,गोखले एज्युकेशन सोसायटीमधील दीर्घ सेवाकालांत ,अनेक अविश्वसनीय  घटनांचे साक्षीदार होता आले.काही आठवणी जाणकाराकडून त्यांना माहित झाल्या.  मला मोठ्या आत्मीयतेने व विश्वासाने सांगितल्या. त्यामुळे या लेखाला एक वलय प्राप्त झाले आहे.

मित्रवर्य, प्रिं. प्रभाकर राऊत यांचा मी खास उल्लेख करून मनापासून त्यांचे आभार मानतो. बोर्डी शाखेच्या या नेत्रदीपक शैक्षणिक वाटचालीत,  प्रभाकर राऊत सरांचा वाटा किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव गोखले एज्युकेशन सोसायटीला निश्चित आहे,असे मला वाटते.

आचार्य भिसे यांनी जीवनात कधी विश्रांती घेतली नाही. आदिवासी व दलितांच्या सेवेचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नसे. त्यांना मधुमेह ,उच्च रक्तदाब यांचा त्रास होत होता. अनेक वेळा भोवळ येऊन पडत. अंगात ताप असेल तरीदेखील ते शारदा श्रमातून निघून, तलासरी, कासा येथील केंद्रांना भेट देण्यासाठी वणवण चालू ठेवीत. मुंबईत एकटे फिरू नका, कोणी मदतनीस जवळ ठेवा, अशी ही विनंती त्यांना करण्यात आली होती. परंतु आचार्यांनी ते ऐकले नाही. त्यांना कोणी म्हणे,” आपण थोडी विश्रांती घ्या”, तर ते आपले बोट वर आकाशाकडे  करीत व म्हणत,” मला आता विश्रांती स्वर्गातच मिळेल”.

 जून 1971 मध्ये त्यांची प्रकृती खूप बिघडली. भायखळा येथील मसिना हॉस्पिटल मध्ये, जवळ जवळ जबरदस्तीने दाखल करण्यात आले . एक-दोन दिवसात थोडे बरे वाटू लागले, तेव्हां डॉक्टरांना ते म्हणाले,” मला आता रजा द्या, माझी आदिवासी सेवामंडळातील कामे थांबली आहेत.” पण डॉक्टरांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. 4 जुलै 1971 रोजी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी, त्यांची प्राणज्योत मालवली.शेवटचा श्वास सोडण्यापूर्वी त्यांच्या मुखातून “ओम” हे शब्द बाहेर पडले. “जीवनात सतत काम करीत राहा, कोणत्याही फळाची आशा ठेवू नका”, या महत् तत्वाचे त्यांनी जीवनभर पालन केले. ते एक असिधारा व्रत होते !तेच ,शब्दरूपाने, जीवनाच्या अंतिम क्षणी, त्यांच्या मुखातून बाहेर पडले.

  सर्वोदयी कार्यकर्ते  महात्मा गांधीजींचे शिष्य,व थोर विचारवंत स्वामी आनंद.

 त्यांचे पार्थिव दुसऱ्या दिवशी बोर्डी येथे, त्यांच्या कर्मभूमीत आणून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. दुपारी सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूलच्यासमोर, सागर तीरावर त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. त्यावेळी थोर विचारवंत, स्वामी आनंद यांनी आचार्यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले,

 “महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. आचार्य भिसे हे त्या संतांच्या मालिकेतील एक लखलखणारा तारा आहे. संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे:

    ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ,

   तोचि साधू ओळखावा ,देव तेथेची जाणावा.’

   तुका म्हणे सांगू किती ,तोची भगवंताची मूर्ती….

आचार्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आदिवासी,वनवासी व शोषित यांची सेवा केली. स्वतःसाठी काही मागितले नाही. म्हणून ते संत होते. योगी होते. मूर्तिमंत भगवंत होते .त्यांची परंपरा आपण पुढे चालू ठेऊन त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करूया.”

स्वामी आनंद यांनी अगदी मोजक्या व योग्य शब्दांत वाहिलेली ही श्रद्धांजली खूपच समर्पक अशी आहे.

 बोर्डी सागरतीरावर आचार्यांची,” स्फूर्ती सागर”,ही समाधी.”ॐ”,हे आचार्यांचे अंतिम शब्द येथे कोरले गेले आहेत.

ज्या जागी आचार्यांचे अंत्य संस्कार करण्यात आले,तेथे एक सुंदर समाधी बांधण्यात आली आहे. या समाधीवर त्यांच्या मुखातून अखेरच्या क्षणी बाहेर पडलेले ,”ओम”, शब्द कोरण्यात आले आहेत.सर्व आजी,माजी विद्यार्थी, परिसरातील नागरिक, या पवित्र समाधीचे दर्शन घेऊन आचार्यांच्या स्मृतीला  वंदन करीत असतात. आम्हा सर्वांना, आज व भविष्यांतही आचार्यांचे आशीर्वाद व प्रेरणा ही समाधी देत राहील.

 आचार्य भिसे यांची स्मृती चिरंतन राहावी व त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा प्रसार पुढेही होत राहावा, या उद्देशाने बोर्डीतील नागरिकांनी, आचार्यांच्या निर्वाणदिनी,म्हणजे 4 जुलै 1982 रोजी ,”आचार्य भिसे शिक्षण संस्था”,स्थापना केली आहे. बोरीगाव हे कार्यक्षेत्र निवडले गेले.पूज्य चित्रेगुरुजी यांनी याप्रसंगी, ज्योत प्रज्वलित करून  संस्थेचे  उद् घाटन केले आहे.1988 मध्ये दोन वर्गात,माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात आले. पुढे 24 मे 1996 रोजी संस्थेच्या प्रशस्त इमारतीचे उद् घाटन डॉ.जयंतराव पाटील यांच्या  हस्ते करण्यात आले. हा बोर्डीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण होता.ह्या विद्यालयामुळे तलासरी तालुक्यातील आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे एक नवीन पर्व सुरू झाले आहे.बोर्डी व बोरीगाव  परिसरांतील सर्व नागरिक व आदिवासी यांनी या आचार्य भिसे शिक्षण संस्थेच्या उभारणीत मोठे योगदान केले आहे.श्री एन .के. पाटील सर हे या संस्थेच्या स्थापनेपासून या संस्थेशी निगडित आहेत.

 आचार्य भिसे शिक्षण संस्थेच्या स्थापना दिनी,पूज्य चित्रे गुरुजी व संस्थेचे पदाधिकारी यांची काही क्षणचित्रे.

        शाळेच्या अगदी सुरुवातीच्या काळात आचार्य भिसे, आचार्य चित्रे व आत्माराम पंत सावे या त्रिमूर्तींला ज्या शिक्षकांनी मोलाची साथ दिली व जे  शाळेच्या पायाचे दगड झाले,  त्यापैकी  काही मान्यवर शिक्षकांची नावे येथे देणे उचित वाटते. सर्व, गुरुवर्य सोनाळकर, पिंगळे, अय्यर, कुलकर्णी ,ग्यारा, मदनराव राऊत, द्वारकानाथ मोहिते  हे काही प्रथम पासून चे शिक्षक.त्यानंतर ची पिढी म्हणजे शहा सर, गजानन मळेकर, नाना मळेकर हरिश्चंद्र पाटील, झाईवाला, ग. रा .अमृते ,पु .स .साने, एस. आर. सावे सर ही निष्ठावान सेवाभावी मंडळी आचार्यांबरोबर काम करण्यास बोर्डीस आली. मी शाळेत असताना मला शिकवणार्तया काही गुरुजनां नावे देणेही उचित ठरेल. स. वा. आपटे, न.दि. दुगल ,आर .एम .आरेकर ,बी .बी. आरेकर वत्सला चुरमुरे, एन. के.  पाटील, सौ मालती चुरी. डाॅ.दीनानाथ चुरी(अंशतः सेवा देत असत) . बाबुराव मुळे कार्यालयीन कारभार सांभाळत.  आज या शाळेचे स्वरूप व  माजी विद्यार्थ्यांनी मिळविलेला लौकिक पाहून,एक उत्कृष्ट शिक्षणसंस्था  व आदर्श विद्यार्थी निर्माण करण्याचा आपले ईप्सित  साध्य झाले,असे त्यांना स्वर्गातही वाटत असेल!

       आज या वृक्षाचा महावृक्ष झाला आहे डॉ. एम .एस .गोसावी, सेक्रेटरी, गोखले एज्युकेशन सोसायटी, व प्रिं. प्रभाकर राऊत, पालघर जिल्हा विभाग प्रमुख या दोघांचा त्यात प्रामुख्याने वाटा आहे. आ. भिसे, चित्रे, यांना त्यांच्याच एका विद्यार्थ्याने दिलेली ही उचित श्रद्धांजली आहे.

राष्ट्रभक्तीची, औपचारिक व अनौपचारिक शिक्षणाची, सर्वोदयाची, रचनात्मक कार्याची, कृषी विकास आणि संघर्षाची अशा अनेक विविध परंपरा या बोर्डी परिसरात निर्माण झाल्या. कालांतराने त्या एकमेकात मिसळून त्यांचा एक ताकतवान प्रवाह निर्माण झाला. सामाजिक कार्याचा अभ्यास करणाऱ्याला स्तिमित करणारे हे दृश्य आहे. अशा विविध परंपरा, एका लहान खेड्यात निर्माण होतात, वाढतात आणि समाजोद्धारासाठी एकमेकांना पूरक ठरून एक नवा समाज निर्माण करतात, ही अतिशय आश्चर्यकारक आणि आश्वासक घटना आहे!बोर्डीच्या किनाऱ्यावर जो कल्पवृक्ष उभा आहे ,तो चिकूचे झाड नव्हे. त्या झाडापेक्षा विशाल, दणकट आणि कनवाळू असा जो समाजसेवेचा वृक्ष आहे ,त्या वृक्षांची जोपासना आचार्य व त्यांच्या अनेक ज्ञात व अज्ञात कार्यकर्त्यांनी, आपले अश्रू, घाम आणि प्रसंगी रक्त शिंपून त्याची जतन केली आहे. या सेवेच्या वृक्षाची जोपासना पिढ्यानपिढ्या करावी लागते, तेव्हा कुठे एखादे लहानसे फळ त्याला लागते.आचार्यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या बोर्डी येथील कामाचे हेच निष्कर्ष आहेत. 

 मी या शाळेत 1956 मध्ये दाखल झालो. त्यावेळेस आचार्य भिसे शाळेच्या कामातून निवृत्त झाले होते. व चित्रे गुरुजी हेडमास्तर म्हणून काम पाहत होते.त्यामुळे आचार्यांच्या वर्गात धडे गिरवण्याचा अथवा त्यांचा प्रत्यक्ष परिचय होण्याचा योग कधीच आला नाही. निवृत्तीनंतर आचार्यांनी आदिवासी सेवाकार्याला वाहून घेतल्यामुळे बोर्डी मध्ये ते येऊन, जाऊन राहत असत. त्यामुळे मी शाळेत असेपर्यंत माला आचार्यांचे वर्गांत बसून धडे घेण्याचे भाग्य मिळाले नाही.  विशेष प्रसंगानिमित्ताने त्यांचे भाषण ऐकण्याचा योग येई. कधी तरी आमच्या प्रार्थनेत ,गुरुदक्षिणा मंदिरात,आचार्य हजर राहून आम्हा विद्यार्थ्यांना चार शब्द सांगत.

 आचार्यांशी प्रत्यक्ष बोलण्याचा व त्यांचा आशीर्वाद मिळण्याचा प्रसंग एके दिवशी अचानक आला.

  UDCT, (आता ICT) या प्रख्यात संस्थे मधून M.Sc (Tech), या परीक्षेचा प्रबंध पूर्ण झाला होता, निकाल अपेक्षित होता. त्या दरम्यान एके दिवशी, बोर्डीला येऊन माझ्या नेहमीच्या सवयी प्रमाणे, चित्रे गुरुजींचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो  होतो.  गुरुजींनी नेहमीप्रमाणे चौकशी करून, “आता पुढे काय करणार?” ,असा प्रश्न साहजिकच विचारला. मी  देखील, “आता बहुतेक नोकरी करावी”, असा विचार असल्याचे सांगितले.  “कोणत्या कंपन्या तुला नोकरीसाठी योग्य आहेत?” असे गुरुजींनी मला विचारले. मुंबईच्या गोदरेज कंपनीचे ही नाव आले. गुरुजींची मुद्रा एकदम आश्चर्यचकित, प्रसन्न झाली. त्यांनी मला “गोदरेज कंपनी चे जनरल मॅनेजर, भिसे गुरुजींना भेटण्यासाठी आले आहेत आणि दुपारी ते शारदाश्रम मध्ये  त्यांना येणार आहेत. तू त्वरित एक अर्ज लिहून आचार्यांकडे नेऊन दे. कर्मधर्मसंयोगाने ते आत्ता त्यांच्या खोलीमध्ये आहेत!”

ही तर  माझ्यासाठी, ‘God given opportunity’, परमेश्वराने पाठवलेली सुवर्णसंधी होती! मी त्वरित कसाबसा एक अर्ज, ऑफिसमध्ये येऊन लिहिला. गुरुजींना दाखविला. नेहमीप्रमाणे त्यात 2,3 चुका गुरुजींनी काढल्या. पुन्हा लिहिला.  अर्ज लिफाफ्यात घालून आचार्य भिसे गुरुजींच्या खोलीत गेलो. आचार्य खुर्चीवर बसून काहीतरी लिहिण्यात गर्क होते. मान वर करून माझ्याकडे पाहिले. मी माझी ओळख देऊन,” चित्रे गुरुजींनी हा माझा नोकरीसाठीचा अर्ज आपल्याला देण्यास सांगितले आहे. गोदरेजचे अधिकारी आले आहेत त्यांना आपण द्यावा, मला गोदरेज मध्ये नोकरी हवी आहे.” एवढेच मी कसेतरी  सांगितले. गुरुजींनी लिफाफा उघडला अर्ज, संपूर्ण वाचला आणि आपल्या टेबलावर ठेवून, मला म्हणाले,” ठीक आहे बाळा, मी हा अर्ज त्यांना देऊन, तुझ्या बाबत त्यांच्याशी बोलीन”. बस्स… त्यांचा व माझा, समोरासमोर, झालेला, बोर्डी शाळेतील, पहिला व शेवटचा, एवढाच संवाद! त्यानंतर बरोबर एक महिन्यांनी मला गोदरेज कंपनी कडून मुलाखतीसाठी बोलावणे आले. मुलाखत झाली. प्रत्यक्ष मालक डॉ. बरजोर्जी गोदरेज यांनी मुलाखत घेतली. एक-दोन जुजबी प्रश्न विचारून, डॉ. गोदरेज शेवटी म्हणाले,  “तू बोर्डीच्या, आचार्य भिसे यांच्या शाळेचा विद्यार्थी, आहेस. तुला नोकरी देणे माझे कामच आहे.” 

आचार्यांविषयी एवढा आदर दाखविताना, त्यांना कधीही न भेटलेला, भारताचा एक अग्रगण्य उद्योगपती, माझ्या सारख्या एका लहान माणसाला, त्यांच्या कंपनीत नोकरी देणे हे आपले कर्तव्य  समजतो… मला वाटते यात सर्व काही आले!! ..मला नोकरी मिळाली. त्या दिवशी आचार्यांच्या शब्दाला, बोर्डीबाहेरील जगात, किती  मान आहे, याची जाणीव झाली. कामाच्या ठिकाणी, माझ्या गुरुजींचे  नावाला थोडाही कमीपणा येणार नाही, असे काम करण्याची जबाबदारी माझ्यावर आली.आयुष्यात जेथे-जेथे,कोणतेही  काम करण्याची संधी मिळाली,  त्या  जागी माझ्या शाळेचे, गुरुजनांचे नावाला कमीपणा न येईल असे वर्तन मी केले.

गरजवंताला, अडलेल्याला, सहजगत्या  मदत देऊन, त्यात आपण  काहीतरी विशेष केले, अशी अजिबात जाणीव न ठेवणे, हेच तर संतांचे लक्षण! अशा  विभूतींबद्दल तुकाराम महाराजांनी म्हटले आहे….

  पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा। आणिक नाही जोडा, तुझा यासी।

 माझे वडील आप्पा यांनाही आचार्य भिसे गुरूजी  बद्दल अत्यंत आदर भाव होता.  त्यांच्या आयुष्यात आचार्य ,’परमेश्वरा समान’, व्यक्तिमत्व होते एवढेच सांगितले म्हणजे मला काय सांगावयाचे आहे ते कळेल .त्याला कारणही तसेच होते. 1935, 36 सालच्या कालखंडात ,आप्पा इयत्ता सातवीची प्राथमिक शालांत परीक्षा, चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊन ,नोकरीच्या शोधात होते .एवढी शैक्षणिक पात्रता, त्याकाळी प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळण्या साठी,ठीक असे. मात्र  कोणाची तरी शिफारस जरुरी असे. आपले व्यायाम गुरु नाना मळेकर सर यांच्यामार्फत आप्पा आचार्य भिसे गुरुजींच्या पर्यंत पोहोचले.आचार्यांनी विना विलंब त्यांना नोकरी देण्याचे काम केले.आप्पां साठी त्यावेळी ही खूप मोठी गोष्ट होती. वडिलांचा आधार गेला होता व घरात कमावणारे कोणीच नव्हते. संपूर्ण कुटुंबाला जगण्यासाठी एक मोठा आधार आचार्यांनी त्यावेळी, निर्माण करून दिला होता. या उपकाराची जाणीव आप्पांना आयुष्यभर होती व त्याची प्रचीती,  आचार्यांच्या निर्वाण दिनी आम्हाला प्रकर्षाने आली.

 मला अजूनही ती संध्याकाळ आठवते. ज्या दिवशी ऑगस्ट 1971 मधील त्या संध्याकाळी आचार्यांच्या मृत्यूची बातमी आकाशवाणीवरून देण्यात आली.आप्पा त्यावेळी माझ्या कुटुंबासह बरोबर ,पार्ल्यातील घरी होते.आम्ही गप्पा करीत बसलो होतो.रातारीचे जेवणाची वेळ झाली होती.तेवढ्यात आचार्यांच्या दुःखद निधनाची वार्ता आली. आप्पां तात्काळ हात जोडून उभे राहिले , घरातील, दत्त मूर्तीपुढे गेले.  नेहमीची सायंप्रार्थना झाली होती,तरी पुन्हा  प्रार्थना म्हणण्याचा प्रयत्न करीत होते.. शब्द येत नव्हते ..केवळ अश्रूवाटेच भावना व्यक्त होत होत्या.  त्यांनी संध्याकाळचे जेवण वर्ज्य केले.मौन पाळून, ध्यानस्थ बसले. त्यांची ती अवस्था पाहून आम्ही कोणीही त्यांना काही बोललो नाही. तशाच अवस्थेत कधीतरी ते निद्राधीन झाले.. दुसऱ्या दिवशी त्यांनी,पू भिसे गुरुजींच्या, त्यांना ज्ञात व्यक्तीसाठी केलेल्या, अनेक उपकार  कथा आम्हाला ऐकवल्या.

तारीख ४ जून 19 63 रोजी भरलेल्या शिक्षकांच्या सभेत झालेले आचार्य भिसे यांचे मार्गदर्शन, श्रीयुत ग. रा. अमृते सर यांनी केलेली नोंद, काही ओळी.

 श्री. प्रभाकर राऊत सर यांनी आठवणी  सांगताना, एक कागद माझ्या हाती दिला. 1963 साली शाळेला सुमारे 42 वर्षे होत असताना,आचार्यांनी आपल्या शिक्षक सहकाऱ्यांना जे मार्गदर्शन केले होते, त्याचे टिपण श्री. अमृते सर यांनी करून ठेवले आहे. त्यातील मजकूर थोडासा अस्पष्ट दिसत असला तरी, मी खूपच काळजीपूर्वक निरीक्षण करून, तो संपूर्ण मजकूर खाली टाईप केला आहे…

 “आपण 44 व्या वर्षात पदार्पण करीत आहोत या काळाचा इतिहास लिहिला जाणार आहे. 25 व्या वर्षी मी ते करण्यास प्रारंभ केला होता पण ते अपूर्ण राहिले. पन्नास वर्षाचा इतिहास लिहावयाचा आहे. कामाचा व्याप वाढल्यामुळे मला भीती वाटते. जाणिवेने व ध्येयवादाने काम होईल की नाही याबद्दल शंका वाटते प्रारंभीच्या ध्येयवादाची तुम्हाला कल्पना नाही. अडचणी फार आल्या. पगार वेळेवर मिळाला नाही म्हणून कोणीही सोडून गेला नाही. साठ हजार रुपये कर्ज झाले होते. श्री सावे यांनी 1931 पासून पगार अर्धाच घेतला. इतरांनीही असाच त्याग केला. अगदी गड्यांनी देखील त्याग केला.अशी उदाहरणे ईश्वर कृपेनेच कुठेतरी पहावयास मिळतात.

स्वातंत्र्याच्या लढ्यात मुले व शिक्षकांचे कार्य सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे झाले होते. 14 ऑगस्टला मुलांनी शाळेवर बहिष्कार घातला होता. प्रांत साहेबांनी येऊन मुलांना शाळेत जाण्यास फर्मावले. शारदाश्रमांत ही ते गेले. परंतु मुलांनी शाळेत जाण्यास नकार दिला. शिक्षकांनी (चित्र्यानी) मुलांवर सक्ती करण्याचे नाकारले. शाळेची ग्रॅन्ट कमी झाली.हा वारसा स्वाभिमानाचा, तुम्हास मिळाला आहे.

आता आर्थिक अडचणी नाहीत. आता कारभार चांगला करा. प्रारंभी फक्त दोन वर्ग व पस्तीस मुले होती. आता पसारा वाढला आहे. दोन शिक्षकांचे 50 शिक्षक झाले. आम्ही भावाप्रमाणे काम केले म्हणून हे वैभव प्राप्त झाले आह. मात्र माझ्या प्रारंभापासून तीन अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत.

  1. गावातील कोणताही मुलगा आपल्या शाळेत आल्याशिवाय राहू नये.
  2. मॅट्रिक (एस एस सी) च्या वर्गातील सर्व मुले पास व्हावीत. आणि,
  3. पहिल्या नंबरात (मेरिट) आपली मुले यावीत.

आपली मुले क्रीडा क्षेत्राप्रमाणे विद्यालयीन क्षेत्रात ही अव्वल असावीत. यासाठी मुलांना चांगले मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे.

शिस्तपालन:- हल्ली सर्व मुलांचे वर्तन चिंताजनक दिसते. वातावरणाला घाबरून पालक मुलांना वसतिगृहात ठेवतात. या अपेक्षा आपण पूर्ण करू शकतो का हे पहा. तुम्ही सर्वच दक्षतेने वागा. त्याचा मुलांवर चांगला परिणाम होईल. प्रयत्नांची पराकाष्ठा करा. शाळेप्रमाणे बाहेर रस्त्यावर देखील मुलांचे वर्तन चांगले असावे. मुलांच्या हातून चांगले वर्तन व्हावे म्हणून मी उपवास देखील केले, परंतु त्यांना शिक्षा केली नाही. प्रवासांत देखील मला या शाळेबद्दल,अभिमानाने बोलताना लोकांना मी पाहिले आहे. म्हणून स्वतःच्या व मुलांच्या वर्तनाकडे चांगले लक्ष द्यावे लागेल.

शारदाश्रमाचे उदाहरण पाहून इतर छात्रालये त्याचे अनुकरण करीत आहेत. वाईट मुलांचा दोष आपल्यावरही आहे .आपण डॉक्टर आहोत. रईस साहेबांचा मुलगा बाबुभाई नापास झाला. रईस रडले पण त्याला पास केले नाही. त्यांचा स्नेह गमावला नाही.धनबाई ,(शाळेच्या डोनर), एका नापास झालेल्या मुलाला पास करण्यासाठी आग्रह करीत होत्या. पण आम्ही सर्वांशी समान वर्तन ठेवले. पक्षपात करू नका.श्रीमंत म्हणून पक्षपात नको.उलट गरिबांकडे जास्त लक्ष द्यावे.

सर्वांगीण उन्नती होण्यासाठी कल्चरल प्रोग्राम्स,खेळ, व्यायाम व वक्तृत्व वगैरे चळवळी ठेवल्या होत्या. नाना मळेकर त्याचे तज्ञ होते. त्या आता होत नाहीत. व्यायामाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी मुलांचे गावोगावी दौरे काढले होते.

मी गरीब विद्यार्थी होतो गरीब मुलांचा तपास ,शोध घ्या. माझी रात्रीची शाळा सुरू करण्याची कल्पना आहे. आपली शाळा, प्रथम गावांतील मुलांसाठी आहे. गावाचे गट पाडून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवा.

एन डी एस (NDS), च्या जगन्नाथराव भोसले यांची माझी चर्चा झाली. आपणास NDS ची खूप जरुरी आहे. ती पार पाडण्यासाठी सहकार्य करा. विविध विषयासाठी, वर्गासाठी,व्याख्यानमाला ठेवा. मुख्यतः SSC. वर्गासाठी बहिःशाल व्याख्यानमाला योजावी . लायब्ररीत भर घाला. तुम्ही आपल्या व्यासंगाकडे लक्ष देत नाहीत.POOR BOYS  साठी मदत मिळवा.EXTRA CURRICULAR ACTIVITIES , कडे लक्ष द्या व त्यात भाग घ्या.”..

 

भविष्यकाळाचा वेध घेताना त्यांनी केलेले मार्गदर्शन,शाळेला शंभर वर्षे होत असतांना आजही तितकेच समयोचित आहे. स्वतः आचार्य, त्यांचे सर्व शिक्षक सहकारी, गावातील व शारदाश्रमातील विद्यार्थी, परिसरातील सर्व नागरिक, यांनी शाळेसाठी व स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या  योगदानाला तोड नाही. मात्र शाळेच्या गड्यांनी देखील ,आर्थिक अडचणीच्या प्रसंगी, आपल्या वेतनात स्वखुशीने कपात करून घेतली, असे उदाहरण जगाच्या इतिहासात कुठे सापडेल असे मला वाटत नाही. धन्य ते त्यावेळचे शाळेचे कर्मचारी आणि धन्य त्यांचे गुरु , आचार्य भिसे!!.

  आचार्यांचे मनी त्यावेळी खंत होती आजही ती पूर्ण झालेली नाही त्याची जाणीव असावयास हवी. विशेषतः आजचे या शाळेचे विद्यार्थी व  शिक्षक ,यांनी याबाबत दृढनिश्चयाने, आचार्यांची इच्छा पूर्ण करावयास हवी. एस .एस .सी .परीक्षेत शाळेचा एकही विद्यार्थी नापास होता कामा नये व एक तरी विद्यार्थी एस एस सी च्या मेरिट लिस्ट मध्ये यावा, या आचार्यांच्या इच्छा, लवकरात लवकर, पूर्ण करून दाखविण्याचा,  शाळेच्या स्थापनेच्या शतकोत्तर वर्षात ,निश्चय करूया.ती त्यांना खरेच खूप मोठी श्रद्धांजली असेल ! 

      पानभर असलेल्या या टीपणातील विचार ,केवळ शब्दांची फेक, वा एका हेडमास्तर ने ऊपशिक्षकांना दिलेला उपदेशाचा डोस नाही. त्यांत दांभिकतेचा जराही अंश नाही. विद्यार्थी, सहकारी शिक्षक, सेवक वर्ग, गावकरी व सर्व समाज, याविषयी आचार्यांना वाटणारी अनुकंपा, प्रेम, आस्था याचा अनुपम मिलाफ  असलेले, आचार्यांच्या शुद्ध आरस्पानी  व्यक्तिमत्त्वाचे ते प्रत्यक्ष प्रतिबिंब आहे. प्रि.प्रभाकर राऊत यांनी हा कागद जपून ठेवला होता. मला तो जबाबदारीने दिला. मोठ्या भक्तीभावाने,मी तो प्रसिद्ध करीत आहे.त्या दिवशी, हे  टिपण व्यवस्थित लिहून ठेवणाऱ्या, कै.ग. रा. अमृते सर यांचे विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. 

      या टीपणावर जास्त भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत  नाही … वाचल्यानंतर प्रत्येकाला, स्वतःच यावर मनन व चिंतन करावे वाटेल. .

आचार्यांच्या हस्तलिखित नोंदवहीत पहिले पान. “एकूण तीनशे सहा पाने या वहीत आहेत”, असा आचार्यांचा शेरा. डाव्या कोपऱ्यात 24.7.41
अशी तारीख व उजव्या कोपऱ्यात जेलर ची सही.

  मित्रवर्य, प्रभाकर राऊत सर, यांनी दुसरा एक मोठा खजिना माझ्या हाती सोपवला आहे.ही तीनशे सहा पानांची, आचार्यांच्या हस्ताक्षरातील,एक वही आहे.मला वाटते आचार्यांनी 1941साली झालेल्या   बंदिवासात  हे लिखाण, चिंतनातून, केले आहे.आपल्या  सुंदर व वळणदार अक्षरांत,पानाच्या एका बाजूलाच हे लिखाण केले आहे. कारण पहिल्या पानावर लिखाणाला सुरुवात केल्याची तारीख व जेलरची सही आहे. या पहिल्या पानावरच मजकूर फक्त इंग्रजीत आहे बाकी सर्व मजकूर  मराठीत आहे. 

पहिले पान असे…

_______________________________________

                                                          SRBhise.

This notebook contains,306 (Three Hundred &

six) pages.

24.7.41.                            s/d.  Jailor           

_________________________________________     

    आचार्य भिसे यांच्या ठाणे जेल मधील दैनंदिनी चे हे पहिले पान.

दुर्दैवाने या वहीतील शेवटची सुमारे 40 पाने गहाळ झालेली आहेत तरी देखील जे काही शिल्लक आहे ते बहुमोल आहे. मला वाटते आचार्यांना,आपल्या “वैयक्तिक सत्याग्रहातील”, सहभागामुळे ,1941साली झालेल्या कारावासाचे दरम्यान, गांधीजींच्या ‘वर्धा शिक्षणपद्धती’, वर चिंतन करून ,पहिली श्रेणी व दुसरी श्रेणी मधील विद्यार्थ्यांचा, “सामान्य ज्ञान”,विषयाचा अभ्यासक्रम काय असावा व त्या अभ्यासक्रमानुसार शिक्षकांनी पहिली श्रेणी व दुसरी श्रेणी मधील विद्यार्थ्यांना कोणती माहिती द्यावी याचे खूपच मनोज्ञ लेखन, अत्यंत सोप्या पद्धतीने केलेले आहे.

तुरुंगात जेलरच्या परवानगीनेच लेखन करता येत असे. जेलरची  सही पहिल्या पानावर आहे. या लिखाणाचे ठिकाण ठाण्यातील कैदखाना असावा. प्रत्येक पानावर नंबर टाकलेला आहे. 

मुलांना, सूर्याच्या  स्थानावरून दिशा ऋतू, दिवस, रात्र, महिना वगैरे कसे ओळखावे याची अगदी सोप्या शब्दात माहिती देताना आचार्य काय म्हणतात पहा…

हस्तलिखित नोंदवहीत पान क्रमांक 2,वर्धा शिक्षण. प्रथम श्रेणी अभ्यासक्रम .सामान्य विज्ञान.

 “सूर्याच्या स्थानाच्या अनुरोधाने दिशा ओळखणे. वर्षाचे ऋतू दिवस-रात्र महिप ,व माणसे या वर होणारे परिणाम.सूर्य दिसू लागला म्हणजे तो उगवला, आणि दृष्टीआड झाला म्हणजे मावळला, असे म्हणतात. जेव्हा तो उगवतो तेव्हा सकाळ आणि मावळतो तेव्हा सायंकाळ ,संध्याकाळ झाली असे म्हणतात. दिशा म्हणजे बाजू .ज्या बाजूला सूर्य उगवतो ती पूर्व.आणि जिकडे तो मावळतो ती पश्चिम. पूर्व दिशेला उगवती आणि पश्चिम दिशेला मावळती असे ही म्हणतात. पूर्वेकडे तोंड करून उभे राहिलो म्हणजे आपल्या उजव्या हाताला जी बाजू येते ती दक्षिण दिशा आणि डाव्या बाजूला उत्तर दिशा.

सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्त होईपर्यंतचा जो वेळ तो दिवस. त्या वेळी सगळीकडे उजेड असतो. हा उजेड सूर्यापासून मिळतो. या उजेडामुळे आपल्याला आनंद होतो. आपण आपले काम धंदे करू शकतो. आपल्याला उष्णता मिळते. त्यामुळे आपण, पशू, पक्षी, झाडे ,जीवजंतू जगू शकतो. सूर्याच्या उष्णतेमुळे पाऊस पडतो. सूर्याला, जगाला जीवन देणाऱ्याला जग वंदन करते.”….

 दुसऱ्या श्रेणीच्या विद्यार्थ्यासाठी काही ओळखीच्या पक्ष्यांची ओळख कशी करावी, हे विद्यार्थ्यांना सांगताना कोंबडा कोंबडी बद्दल आचार्य कसे गमतीशीर लिहू शकतात ते वाचा.. 

 हस्तलिखित नोंदवहीत, पान क्रमांक 11. द्वितीय श्रेणीचा अभ्यासक्रम.

“आता आपण बागेच्या मागच्या बाजूस जाऊया तिकडून क्लॅक…  क्लॅक.. असा मंद आवाज निघत आहे ते ऐकलात का? तो आवाज कोंबडीचा आहे. तो आवाज ती पिल्लांना बोलावण्यासाठी करीत असते. कोंबडीच्या भोवती तिच्या लहान लहान पिल्लांचे सैन्यच्या सैन्यच असतं .आणि ती सैरावैरा धावू लागली म्हणजे त्यांना सांभाळताना कोंबडीला त्रास होतो.त्यांची शिस्त मोठी वाखाणण्यासारखी आहे हो.आईने धोक्याची सूचना देणारा एक प्रकारचा आवाज काढला की सारी चट्दिशी आईच्या पंखाखाली घेऊन लपतील.

कोंबडीची गणना पक्षात असली तरी त्यांचा सारा व्यवहार जमिनीवर चाललेला असतो. कोंबडीचा आकार वाटोळा असतो. चोचीच्या खाली आणि वर लाल रंगाची चामड्याची लोळी असते.पाय साधारण पिवळसर आणि नाजूक. शेपटी तु-यासारखी पसरलेली व उभी.

कोंबडीपेक्षा कोंबडा सौंदर्याने अधिक आकर्षणीय असतो. एवढेच नव्हे तर तारुण्यात असताना तो पक्षी जातीतील एक अत्यंत सुंदर प्राणी आहे. त्याचा बांधा सडपातळ, ठेवण उंच, मान उंच, डौलदार, शेपूट थोडा बांक असलेली आणि नाना रंगांच्या पिसांनी भरगच्च झालेली. तशीच पंखांची पिसे सुद्धा नानारंगी आणि लकाकणारी. त्यावर इंद्रधनुष्याची चमक दिसून येते. पिसारा तर काय एक सौंदर्याची कमानच . चमकदार व बाकदार पिसांच्या गर्दीने किती शोभतो तो.आणि जेव्हा डौलाने पावले टाकीत तो चालतो किंवा मातीच्या  ढिगाऱ्यावर अथवा एखाद्या माचणीवर बसून तो कुकुरेेssकु.. कुक अशी खणखणीत आरोळी ठोकतो तेव्हा तो पक्षीराज गरुडाच वंशज असावा असं वाटतं. पण खरे पाहिले तर तो एखाद्या नाटकातील सेनापती सारखा किंवा राजा सारखा नकली आहे असं दिसून येईल. त्यांच्यात नाही अवसान, उंच भरारी मारून मित्राकडे तुच्छतेने पाहण्याचे, की नाही धैर्य,प्रतिस्पर्ध्याशी झुंज खेळून त्याला गारद करण्याच.एखादी मांजर एखादा कुत्रा किंवा एखादी घार दिसावयाची खोटी की, कोंबडीच्या भोवती नेहमी पिंगा घालणारा हा  शेळपट शिलेदार पळालाच म्हणून समजावे! आपसांत भांडतांना मात्र हे कोंबडे अगदी भान विसरून जातात, एकमेकांना रक्तबंबाळ करतील पण हार जाणार नाहीत.”

 अशाच रीतीने, फुले, पाखरे, झाडे ,व निसर्गातील अनेक घटक यांचा अतिशय ओघवत्या, साध्या ,सरळ भाषेत आचार्यांनी लहान मुलांना परिचय करून दिलेला आहे.हे सर्व लिखाण खरे तर व्यवस्थित पुन्हा लिहून काढून त्याचे एक सुंदर टिपण तयार केले पाहिजे.  पहिली दुसरी ,तिसरीतील मुलांना ते उपलब्ध झाले,तर त्यांना ,इतर कोणतीही पुस्तके सामान्य विज्ञान या विषयासाठी वाचावयाची गरज नाही. बघू या, या सुंदर मौल्यवान खजिन्याला कसे सर्वांसमोर आणता येईल?

 बंदी काळातही ,विश्रांती न घेता ,केलेले हे चिंतन करून केलेले लिखाण त्यांच्या ,”सतत दुसऱ्यासाठी काहीतरी करीत राहण्याच्या”..,वृत्तीचे द्योतक  आहे. प्राथमिक शाळेतील छोट्या मुलांसाठी हा सुटसुटीत ज्ञानाचा अमोल खजिना आहे. 

बोर्डी सागर किनाऱ्यावर, गुरूदक्षिणा मंदिरासमोर असलेला, आचार्य भिसे यांचा पूर्णाकृती पुतळा

          अशा या महामानवाच्या जीवन यात्रेचा धावता आढावा घेतल्यावर वाटतं,ही देव माणसं  केवळ दुसर् या साठी, आपले संपूर्ण जीवन झोकून देण्यासाठी कां बरे तयार झाली असतील?? आपलंही एक छान चौकोनी कुटुंब असावे, एकदाच मिळणाऱ्या या आयुष्यात,थोडी चैन करावी, मौज करावी असे त्यांना कधीच वाटले नसेल काय ?

स्वातंत्र्यवीर सावरकरांनीया सर्व देशभक्तांच्या वतीने त्याचे उत्तर दिले आहे.. 

     ‘की घेतले न हे व्रत आम्ही अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने        

      जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे । बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे।।’ 

 “आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य करून दाखवावयाचे असेल तर निश्चितच ते दाहक असणार पण सतीचे वाण घेतल्याप्रमाणे, आम्ही स्वतःहून ते व्रत घेतले होते. परिणामांची कल्पना आम्हाला पूर्ण होती.” 

 पुढील  प्रश्न पडतो हे “सतीचे तरी कशासाठी, कोणासाठी का घ्यावयाचे? कोणता तो एक क्षण येतो, संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलून टाकतो? महात्मा गांधींनी त्यांच्या आत्मचरित्रात आपल्या “आतल्या आवाजाचा” हवाला दिलेला आहे. 21 वर्षे, दक्षिण आफ्रिकेतील उत्तम वकीली सोडून, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी, तेथे जाण्याचे संकेत त्यांना कोणी दिले? गांधीजींनी म्हटले आहे, “माझा आतला आवाज त्यावेळी मला तसे सांगत होता” अनेकदा महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्या ‘आतल्या आवाजाचा’, हवाला त्यांनी दिला आहे. 

हा आवाज म्हणजे अंतराआत्म्याचा आवाज असू शकतो, नैतिक विवेकाचा ही असू शकतो.

आपण सामान्य माणसं, आपल्या ही नक्कीच कधी तरी, “आतला आवाज” ऐकू येतो पण आजूबाजूच्या स्वार्थाने बरबटलेल्या या  जगात त्या दैवी आवाजाची आम्ही दखल घेत नाही. जगाच्या इतिहासातील अनेक महान व्यक्तींच्या जीवनातले असे  निर्णायक, क्षण आठवले म्हणजे त्या क्षणाच्या पोटात, भविष्यातील  किती उलथापालथ सामावली होती हे कळून येईल.मिठाईच्या पेटा-यात बसून सुटका करून घेता येईल, हे महाराजांना  या आवाजानेच सुचवलं असाव का? ज्या क्षणी, पोलादपूर मध्ये त्या मिशनऱ्यांचे थडगे, व त्यावर लिहिलेल्या दोन ओळी  वाचल्या., आचार्यांच्या त्यांचे श्रेयस मिळाल्याचा साक्षात्कार झाला!

 हा आवाज खरेतर प्रत्येकालाच साद घालतो, मात्र त्यासाठी सदसद्विवेकाचे भान व आपला अंतरात्मा तितकाच स्वच्छ आणि पारदर्शक असावा लागतो. सर्व ज्ञानेंद्रिये मतलबाच्या चिखलाने बरबटलेले गेली असतील तर,आम्हाला हा ‘आवाज’, कसा ऐकू येणार ?तो अलौकिक आवाज ऐकण्यासाठी, विचार, विवेक, संयम, निष्ठा,  याकडे पाठ न फिरविता,बाजारू आवाजाच्या कोलाहलापासून दूर राहावयास हवे.

 बोर्डीच्या भूमीवरील वास्तव्य व,बोर्डी हायस्कूलमधून शिकून, महान गुरुजनांचा आशीर्वाद लाभलेले विद्यार्थी यांनी आपलं वेगळेपण जपलं पाहिजे.पश्चिमेचा अरबी सागर,आमच्या  साऱ्या परिसराला गेली हजारो वर्षे शुचिर्भूत करत आहे. ‘सागरे सर्वतीर्थाणी’, असे म्हणतात. अशी, बोर्डीत सर्व तीर्थे एकवटली आहेत. आदिवासींची अनगड संस्कृती, दर्यावर्दींची सागर संस्कृती, शेतकऱ्यांची ग्रामीण संस्कृती, आणि शहरांतून आलेल्यांची नागर संस्कृती,यांचा अनोखा संगम येथे झाला आहे. गुजराथी आणि मराठी भाषा यांचा अनोखा संगम येथे  आहे. अनेक बोलींचे ओहोळही त्यात मिसळून गेले आहेत. हिंदू ,मुस्लिम, सिख ,इसाई ,आणि झरथुष्ट्र या विविध धर्मपंथीयांचे मिलन येथे आहे. सत्याचे आचरण,वाईटाचे निर्गमन व शिक्षणाचे आचमन ही इथली परंपरा झाली आहे. त्यामुळे येथील नागरिक व या शाळेचा विद्यार्थी जगात कुठेही वेगळा वाटतो. हे वेगळे पण आम्ही जपले पाहिजे ,एवढेच नव्हे तर पुढच्या पिढीत संक्रमित  केले पाहिजे.

 जग काहीही म्हणो, दुनिया काहीही म्हणो,आचार्य भिसे, चित्रे, सावे यांच्या शाळेत शिकलेल्या  विद्यार्थ्यांनी, जोवर, नैतिकता व विवेक शाबूत ठेवून,  जीवनाची वाटचाल चालू असेल ,तोवर त्यांना कोणाचीही  पर्वा करण्याची गरज नाही, त्यांचे जीवन सफल,सुफल च होणार आहे.  गुरुजनांनी त्यांना, यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली दिली आहे.

आचार्यांनी आपल्या कार्य संपन्नतेने समाज संपन्न केला. ज्ञानाने अनेक  जीवने उजळली. निर्मळ ,निरपेक्ष, सेवेने, समाजातील वंचित दुःखीतांना जगण्याची उमेद दिली. आपल्या क्षर जीवनातून चिर प्रेरणादायी अशी एक,’अक्षर समाज मूर्ती’, घडवली. नरदेहा चे माध्यमातून  ते नारायण स्वरूप झाले.

  आम्हा विद्यार्थ्यांसाठी,

         आचार्य, ‘ देवो भव’ झाले!

         रंजल्या गांजलेल्यांना आपले म्हणून, त्यांना जवळ करणारे आचार्य 

    ,’देव तेथेची जाणावा’, या तुकोबाच्या उक्ती प्रमाणे  ‘भगवंताची मूर्ती’, झाले .

अशा आचार्य यांच्या स्मृतीला शतशः  प्रणाम..!!

  • या लेखासाठी संदर्भ म्हणून मला, ‘सेवामयी आचार्य भिसे’,हे डॉ. जयंतराव पाटील यांचे पुस्तक उपलब्ध करून देणारे त्यांचे सुपुत्र ,श्री दीपक  पाटील, अनेक संदर्भ साहित्य पुरविणारे  प्रि.प्रभाकर राऊत, स्वहस्ते काढलेले आचार्यांचे रेखाचित्र देणारे बोर्डी हायस्कूलचे माजी शिक्षक ,मित्रवर्य श्री.हरीहर चुरी, या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानतो.

दिगंबर वा. राऊत.

माजी विद्यार्थी, सु पे ह हायस्कूल,बोर्डी.

माजी डे.जनरल मॅनेजर,हिंदुस्थानपेट्रोलियम कार्पोरेशन लि.