कवी हृदयी, स्वानंदी, कै. दुगल सर
बोर्डी हायस्कूलमधील आमच्या शैक्षणिक कालखंडातील एक विद्यार्थीप्रिय तसेच प्रभावी शिक्षक म्हणजे न.दि.दुगल सर! त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वातून प्रथम दर्शनीच, त्यांच्या विद्वतेची छाप विद्यार्थ्यावर पडत असे. गोरेपान, उंचीने कमी असणारे दुगल सर आपल्या मराठी, इंग्रजी व संस्कृतच्या अफाट व्यासंगामुळे शिकवतांना विद्यार्थ्यांवर जबरदस्त छाप पाडीत. वर्गात शिरतानाच त्यांच्या चेहऱ्या वरील आत्मविश्वास व स्मितहास्य जणू दर्शवित असे ,
” मुलांनो आज मी जे काही शिकवणार आहे ते तुम्हाला अजून कोणी शिकवलेले नाही व शिकवणारही नाही!”