सकारात्मक विचारांचा ऊत्स्फूर्त प्रवाह, श्री. दिपक जगन्नाथ ठाकूर

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् ।

अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः|| श्रीमद्‍भगवद्‍गीता

   स्थिरचित्त, समाधानी, आत्मसंतोषी, आपल्यापाशी जे आहे ते विद्या वा वित्त, समाजासाठी देण्यास तत्पर असलेला व एवढे करूनही आनंदात व दुःखात सदैव समतोल वृत्ती बाळगणाऱ्या आपल्या भक्ताचे वर्णन भगवंतांनी वरील प्रमाणे केले आहे.

      “अशा निरलस वृत्तीच्या समाजसेवकाचे बांधवांनी गोडवे गावेत, त्याच्या गुणांचे अलंकार आपल्या वाचेला द्यावेत आणि ‘त्याची कीर्ती हाच आपलाही बहुमान असे समजून त्याचा गौरव करावा’ असे ज्ञानेश्वरांनी  सांगितले आहे.

     तयाचिया गुणांचीं लेणीं । लेववूं अपुलिये वाणी ।

     तयाची कीर्ति श्रवणीं । आम्हीं लेवूं ॥  ज्ञाने.अ 12.

     या ओव्यांचे स्मरण होण्याचे कारण माझे मित्रवर्य व आमच्या सो. क्ष. समाजातीलच नव्हे तर अखिल मुंबईतील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे एक महान वास्तुविशारद श्री. दिपक जगन्नाथ ठाकूर यांची यावर्षी सोमवंशी क्षत्रिय संघाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी झालेली निवड! आमच्या समाजाच्या दादर येथील व केळवे येथील वास्तूंच्या उभारणीत व सध्या कै.अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर पुनर्बांधणीच्या प्रकल्पात, निष्काम, नि:शुल्क सेवा देऊन समाजासाठी व समाज बांधवांसाठी त्यांनी दाखविलेल्या सात्विक वृत्तीचा, औदार्याचा व अमूल्य योगदानाचा हा गौरव आहे! गेली सुमारे तीस वर्षे  सामाजिक उत्थापनासाठी हा नंदादीप सतत तेवतो आहे!

    दिपकना मी गेली 50 वर्षांहून अधिक काळापासून  ओळखतो. त्यांचे आपल्या व्यवसायातील नैपुण्य आणि समाजासाठी निरपेक्ष, नीरलसपणे काहीतरी करीत राहण्याची त्यांची आंतरिक तळमळ मी अनेक वेळा पाहिली व अनुभवली आहे. विशेषतः आमच्या विश्वस्तीय कालखंडात (2002ते2014) एक उत्तम वास्तुविशारद म्हणून त्यांच्या  निस्वार्थी मार्गदर्शन व सेवेचा  लाभ आम्ही घेतला आहे. खरे तर हा “जीवन-गौरव पुरस्कार”त्यांना या आधीच मिळावयास हवा होता. पण उशीरा का असेना त्यांना मिळत असलेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचेच नव्हे,  आमच्या आजच्या समाजवधुरीणांचेही अभिनंदन करावयास हवे.  ते अशासाठी की समाजसेवेसाठी कोणतेही पद न भूषविता केवळ’ “मी या समाजाचे काही तरी देणे आहे”  या पवित्र व उदात्त भावनेने ज्यांनी गेली अनेक वर्षे सतत आपल्या अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग निशुल्कपणे  समाजाला करून दिला अशा एका व्यक्तीचा आज प्रथमच असा गौरव होत आहे!

    अशा परमप्रिय मित्राविषयी लिहिताना मी त्यांचा उल्लेख दिपक असाच करणार आहे. त्यांच्याविषयी दोन शब्द लिहिण्याची संधी घेताना मला मनापासून आनंद झाला आहे. 

    ‘असामान्य’ आयुष्य घडवण्यासाठी आपल्याला इतरांपेक्षा वेगळी बुद्धिमता असावी लागते, असे नाही. तसे असते तर अचाट बुद्धीची सगळी माणसे ‘असामान्य’ झाली असती.  त्यासाठी इतरांना मिळत नाही अशी ‘संधी’ मिळायला हवी, असेही नाही. उत्तम संधी मिळूनसुद्धा अनेकांचे पानिपत झाले आहे. कारण, विचारांचा दुष्काळ. आपल्याला काहीतरी अचाट आणि अफाट करायचे तर इतरांपेक्षा वेगळी वैचारिक बैठक असायला हवी.  एकदा का ही बैठक जमली की  मग अधिक प्रयत्न करून   आपल्या बौद्धिक व शारीरिक क्षमता विकसित करायला हव्यात.  त्यातूनच पुढे इतरेजनापेक्षा वेगळे असे व्यक्तिमत्व विकसित होते. दिपक आज समाज बांधवांत वेगळे वाटतात त्याचे कारण हेच असावे.

दीपक,सौ. शुभांगी ताई व स्मितल, एका निवांत क्षणी, पॅरिस.

    दिपक यांच्याकडे फार असामान्य बुद्धिमत्ता आहे अथवा त्याच्या कुटुंबात शिक्षणाचा मोठा वारसा आहे असे नाहीच पण दुर्दैवाने सामान्य शरीर प्रकृतीची साथही त्याला मिळाली नाही. वाड-वडिलांचे संस्कार व पूर्वापार चालत आलेली धार्मिकता, समाजसेवा, दातृत्व बुद्धी आणि प्रचंड आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी आपल्या सर्व कमतरतेवर मात करून  हे अफाट यश मिळविले आहे!  काम-कांचन, द्वेष-मत्सर, स्वार्थीपणा यांनी भरलेल्या आजच्या जगात लोक  दौलतीसाठी हमऱ्या तुमऱ्या, हाणामाऱ्या करीत असतात. आणि जे काही आहे त्याचा उपभोग न घेता शांतीला पारखे होत असतात. दिपकनी आजवरच्या जीवनातील वाटचालीत दाखवून दिले आहे की भाव-भक्ती आणि समाधान प्राप्ती केल्याने, आयुष्याची वाटचाल यशस्वी होऊ शकते. त्याग, वैराग्य, संयम आणि ईश्वरावर निष्ठा यांच्या दृढपायावर जर कोणी खंबीरपणे उभा राहील तर देवाने दिलेल्या पायात थोडी अधूता असली तरी तुमचे जीवन निश्चितच मेरूवत् अढळ होईल व तुम्ही आयुष्यात येणाऱ्या अनेक दुःख-कष्टांनी विचलित होणार नाही !

    ” यं लब्ध्वा चापरं लाभः मन्यते नाधिकं तत्!.”.

   जे लाभल्याने इतर काहीही ‘त्याहून श्रेष्ठ’, वाटत नाही असे तुम्हास मिळेल.

    स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे अशा व्यक्ती ज्या समाजात आहेत व जो समाज अशा आदर्श व्यक्तींना, सन्मानीत , गुणगौरवीत करतो, त्या समाजाला ही तितकेच शांती-सौख्य मिळेल. तो समाज ही खऱ्या अर्थाने सभ्य समाज गणला जाईल. आज आम्ही सर्व समाज बांधव, दिपक ठाकूर यांचा करीत असलेला गौरव आमच्या समाजाचा ही गौरव आहे!!

  दिपक यांनी आपल्या शैक्षणिक कालखंडात फार मानसन्मान, गौरव प्राप्त केले नसले तरी तो आलेख निश्चितच सदैव चढता राहिला आहे. जगन्नाथ उर्फ आपले मामा ठाकूर व विमल ताई या दांपत्याचे पोटी सधन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मातोश्री विमल ताईंचे बालपण खूप कष्टात गेले कारण त्यांचे आई आणि बाबा, दोघांचे निधन तत्कालीन प्लेग महामारीत अकालीच झाले!  किंगजाॅर्ज शाळेत एसएससी पर्यंत शिक्षणा पूर्ण केले. ‘ अकॅडमी आर्किटेक्चर ऑफ रचना संसद’, या मुंबईतील प्रसिद्ध स्थापत्य महाविद्यालयात, बी आर्क(B.Arch) ही पदवी घेतली व आपल्या व्यवसाय नैपुण्याने,  AIIA, PEATA अशा भारतातील  सन्माननीय व्यवसायिक संस्थांचे सभासदत्व प्राप्त केले. स्थापत्य विशारदांच्या व्यवसायात असे सन्मान प्राप्त होणे ही  बहुमानाची गोष्ट आहे !

   भारतात पदवी घेतल्यानंतर दिपकनी भरारी घेतली ती लंडनच्या,’ युनिव्हर्सिटी कॉलेज’ मध्ये. तेथील ‘डेव्हलपमेंट प्लॅनिंग युनिट’ मध्ये त्यांनी ‘डिप्लोमा इन डेव्हलपमेंट प्लॅनिंग’ ही सन्माननीय पदविका प्राप्त केली. विशेष म्हणजे हा अभ्यासक्रम पूर्ण करताना त्यांना खास शिष्यवृत्ती दिली गेली. या अभ्यासक्रमात अर्थशास्त्राचा अभ्यासही आवश्यक होता. दिपकच्या सुदैवाने मि. नायजेल हॅरीस या तत्कालीन जगद्विख्यात इंग्रज अर्थशास्त्रज्ञांचे मार्गदर्शन तेथे त्यांना मिळाले. आयुष्यातील तो मोठा सुयोग होता. आपल्या व्यावसायिक यशात  दिपक आपल्या या गुणी प्राध्यापकांचे ऋण मान्य करतात.

   हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करून इंग्लंडमध्ये कामाचा अनुभव घेऊन ते भारतात परतले. यथाकाल  विवाह झाला.  सौ. शुभांगीताईसारख्या एका सुस्वाभावी, प्रेमळ गृहिणीचा संसारिक सहवास त्यांना अर्धांगी म्हणून मिळाला. त्यांच्या जीवनवेलीवर स्मितल या कन्येचे पुष्प उमलले. सर्व काही व्यवस्थित चालू होते. मात्र काही वर्षांपूर्वी सौ. शुभांगी ताईंचे अकाली निधन झाले.  मात्र तरीही वर सांगितल्याप्रमाणे, ‘सुख-दुःखे समेकृत्वा’ या वृत्तीप्रमाणे दीपक यानी  नियतीचा तो आघात समर्थपणे, धैर्याने झेलला. कन्या सौ.स्मितल हिचा विवाह श्री. अमोघ चिटणीस यांच्याशी झाला असून उभयतांचे उदंड प्रेम व मदत त्यांना मिळत  सतत आहे. सौ. स्मितल आपल्या व्यवसायाबरोबरच इतरही अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात सहभागी होत असते. या लाडक्या लेकीचे आपल्या बाबांवरील प्रेम वाखाणण्याजोगे!  मी ते पाहिले आहे. माझ्या सुदैवाने या सर्व कुटुंबाशी माझी चांगली ओळख आहे. दादरला असताना मी त्यांचे घरी अनेक वेळा गेलो आहे. मात्र आता तो योग क्वचितच येतो. कै. शुभांगीताईच्या प्रेमळ आठवणी मनात येतात.

  कै. मामासाहेब ठाकूर व कै. सौ. विमलताई, एका प्रसन्न क्षणी.

     भारतात आल्यावर दिपकनी “प्रेमनाथ अँड असोसिएट्स” या जगद्विख्यात कंपनीत एक वर्ष काम करून उत्तम अनुभव मिळविला. नेहरू प्लॅनेटोरियम वरळी, तसेच जुहु येथील  ‘हरे राम हरे कृष्णा मंदिर’  या वास्तूंच्या उभारणीत योगदान दिले.

   थोड्याच कालावधीत आपल्या, “कर्णिक-ठाकूर असोसिएट” या कंपनीची स्थापना करून गेली सुमारे 30 वर्षे आर्किटेक्ट, प्लॅनर्स आणि इंटेरियर कन्सल्टंट म्हणून ते काम करीत आहेत.

  याच  कंपनीच्या  माध्यमातून  देश-परदेशात निर्माण झालेल्या काही प्रकल्पांची नावे व व्याप्ती पाहिल्यानंतर , एक मान्यता प्राप्त वास्तुविशारद म्हणून, दिपक यांची  प्रगल्भता व नैपुण्याचा प्रत्यय येईल .  

  1. CORNICHE TOWER..ABU DHABI अबुधाबीच्या सुलतान बिन खालीद बिन झाहीद, यांच्या निवासासाठी व कार्मिक उपयोगासाठी भव्य, विलासी, बहुमजली कॉम्प्लेक्स इमारतीची उभारणी.

   2. MAJLIS AND VILLAS at ABU DHABI

  अबुधाबीच्या  सुलतानासाठी आंतरराष्ट्रीय परिषदा व उच्चस्तरीय बैठकीसाठीची संपूर्ण सोयींनी युक्त अशा राजेशाही इमारतीची बांधणी.

   3. INLAC AND BUDHRANI HOSPITAL AND MEDICAL RESEARCH CENTRE,KOREGAON PARK PUNE..

  साधू वासवानी  मिशनकरीता  ‘इस्पितळ इमारत-नियोजना’ साठी आयोजित स्पर्धेतून, दीपक यांच्या कंपनीचा आराखडा सर्वोत्तम ठरला. ही इमारत पुण्यातील एक आयकॉनिक इमारत ठरली आहे. डॉ. संचेती यांनीच ही निवड केली व प्रशंसोद्गार काढले.

  4. FOUR TECH ENGINEERING PVT LTD.

या कंपनीसाठी, खडकाळ टेकडीयुक्त भागात, या फॅक्टरीची इमारत बांधकाम एक आव्हान होते. मात्र उत्तम नियोजन व नमुनेदार आराखडा आखून ते यशस्वीपणे पूर्ण केले. या फॅक्टरीमध्ये दिवसा, कोणत्याही कृत्रिम यांत्रिक सामग्री वा विजेशिवाय, खेळती हवा व भरपूर प्रकाश उपलब्ध असतो.

  5. RE HABILIATION OF BASERA CHS LTD,MUMBAI.

  झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन प्रकल्पाचा भाग म्हणून हे काम दीपक यांच्या कंपनीकडे आले होते . याबाबतीत त्यांचा  ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ हा म्हाडा आणि महाराष्ट्र सरकारकडून गौरविला गेला आहे.

  6. WHITE HOUSE ,BANGLURU. मधील, राजेशाही अनेक सोयींनी युक्त अशा वास्तूचे निर्माण जी पाहण्यासाठी लोक आवर्जून तेथे  येत असतात.

WHITE HOUSE BUNGALOW, ICONIC BLDG.

    काही महत्त्वाच्या वास्तु , फॅक्टरीज व नागरीवस्ती निर्माण प्रकल्पाबद्दल  थोडक्यात  माहिती दिली आहे. अशाच अनेक प्रकल्पांचे निर्माणात दीपक यांनी आपल्या सहका-यां बरोबर योगदान देऊन ते प्रकल्प देश परदेशात यशस्वीपणे चालू करून दिले आहेत. काही आत्ताही चालू आहेत.

   याशिवाय वर उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या समाजाचे केळवे रोड येथील विश्राम-धाम, आरोग्यधाम हे दोन मोठे प्रकल्प यशस्वीपणे उभारून  मार्गी लावण्यात दिपकनी खूप मोठा हातभार लावला आहे. सध्या कै.अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर पुनःनिर्माण  प्रकल्पात दिपक यांचे  मार्गदर्शन व सहकार्य सतत मिळतेच आहे. आपण सर्व समाजबांधव हे जाणताच .

   दिपकचे नाव मी पूज्य  कै. तात्यासाहेब चुरी वस्तीगृहाचा रेक्टर असल्यापासून म्हणजे साधारणतः 1965 पासूनच ऐकत आलो. त्याचे वडील कै. मामा ठाकूर हे आमच्या सो. क्ष. संघ फंड ट्रस्टचे  त्यावेळी विश्वस्त होते. मुख्य विश्वस्त कै. भाऊसाहेब त्यांच्या राजकीय व्यापामुळे विशेष लक्ष देऊ शकत नव्हते. कार्यकारी विश्वस्त कै. चिंतामणराव वर्तक मुंबईत नसल्याने ट्रस्टचा दैनंदिन व्यवहार बहुतेक मामाच पाहत असत. त्यांची माझी वारंवार भेट होई. मामांची भाऊसाहेबांवरील निष्ठा व समाजाप्रती तळमळ याला तोड नव्हती. कधी कधी मामांबरोबर चर्चा करताना दिपकच्या भावी शिक्षणाविषयी बोलणे होई. त्याना इंग्लंडला पाठवून उच्च शिक्षण देण्याची  इच्छा ते प्रकट करीत. दिपकनी  ते स्वप्न पूर्ण करून पित्याचे आशीर्वाद मिळविले आहेत. पिताश्रींचे समाजसेवा व दातृत्वाचे गुणदेखील त्यानी उपजत घेतले आहेत.

   तत्कालीन  संघअध्यक्ष श्री. सदानंद राऊत व मुख्य विश्वस्त कै. प्रमोद चुरी यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही मंडळींनी कै. अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर दुरुस्ती, कै. तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वस्तीगृह नूतनीकरण, कै. इंदुताई व भाऊसाहेब वर्तक विश्रामधाम नवनिर्माण इत्यादी काही कामे यशस्वीपणे केली. तेव्हा माझा दीपकशी अगदी जवळून परिचय झाला. त्यांची आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा व निरपेक्ष वृत्ती यांचे दर्शन झाले. आपले समाजाप्रति योगदान देताना, मोबदला तर सोडा पण अगदी चहा जेवणाची ही अपेक्षा न करता, आपल्या स्वतःच्या गाडीने ते बांधकाम स्थळी हजर राहत असत. हे अगदी विलक्षण वाटत होते. स्वतःच्या प्रकृतीच्या तक्रारी, संसारिक अडचणी व आपल्या  उद्योगव्यवसायाची अनेक बंधने असतानाही हे काम चालू असे. आजही ते तसेच चालू आहे. त्यामुळेच आम्ही  मंडळी अगदी निर्धास्तपणे दीपकवर काम सोपवून निश्चिंत असू. कामाचा दर्जा ,कंत्राटदार, कामगारास अदा करावयाची रक्कम यात कोणतीही तफावत संभ्रम कधीच झाला नाही. दिलेल्या वेळेत सर्व काम गुणवत्तेनुसार, योग्य खर्चात पूर्ण होत असे. हीच त्याच्या व्यवसायिक निष्ठेची पावती आहे. वर नमूद केलेली काही प्रकल्पांची यादी पाहिल्यानंतर आमची  कामे तर  त्याच्यासाठी अगदीच सामान्य होती. देशपरदेशातही आपल्या कर्तृत्वाचा झेंडा  फडकविणा-या दिपकच्या यशाचे गमक त्यात आहे.

     केवळ आपल्या समाजाप्रतीच नव्हे तर इतरही गरजू लोकांसाठी काहीतरी करण्याची दिपक यांची धडपड चालूच असते. आपल्या समाजाव्यतिरिक्त  चंद्रेश्वर देवालय ट्रस्ट, ऑपेरा हाऊस(173वर्षे ) आणि विठ्ठल रखुमाई मंदिर शिरगाव(102 वर्षे)या दोन पुरातन देवालयांच्या विश्वस्त मंडळावरही ते काम करतात .त्यांनाही योग्य ती मदत व मार्गदर्शन करत असतात . ही दोन्ही देवालये त्यांच्याच पूर्वजांनी निर्माण केली आहेत व आजतागायत सुस्थितीत चालू आहेत. ठाकूर कुटुंब त्या काळी फ्रेंच ब्रिज, ऑपेरा हाऊस जवळ रहात असत. समाजसेवेचा व पुण्याईचा एवढा मोठा वारसा दिपकना  मिळाला आहे. अगदी समर्थपणे आजही ते तो पुढे चालवीत आहेत. दिपक यांच्या यशस्वी व समाधानी जीवनाचा संदर्भ येथे लागतो.

  “कुळधर्मु चाळी, विधीनिषेध पाळी।

    मग सर्व सुखे तुझं सरळी दिधली आहेत!”

” आपल्या वाडवडिलांनी दिलेल्या सदाचाराचे आचरण, शास्त्रांनी जी कर्मे करावी अथवा करू नयेत सांगितले आहे त्याचे पालन  केल्यास तू सुखाचा वाटेकरी होणारच ” अशी ग्वाही ज्ञानोबांनीच दिली आहे !.

    व्यवसायाची  तसेच सामाजिक कार्याची  अनेक अवधाने सांभाळताना दिपकनी आपल्या कौटुंबिक जीवनातील आनंदही भरपूर  उपभोगला. जगातील अनेक देशात त्यानी सफरी केल्या असून जग पाहिले आहे. दक्षिण पूर्व आशियातील अनेक देश, युरोप, पूर्व व पश्चिम अमेरिका, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इत्यादी अनेक देशात  त्यांनी  पर्यटनाचा आनंद सहकुटुंब घेतला आहे.

     समाजासाठी काहीतरी करीत असतानाही, “हे मी करीत आहे” असे न मानता अत्यंत निराभिमानाने कर्म करीत राहणारा तो एक सत्शील प्रवृत्तीचा माणूस आहे. तो आमचा समाज बंधू आहे. म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आज त्यांचा गौरव अखिल  समाज करीत आहे. उद्योगधंद्यात असून वैभव-कीर्ती  मिळवूनसुद्धा माणुसकी जपता येते, निस्पृहपणे काम करता येते, लोकांचे प्रेम, विश्वास मिळविता येतो हे अशा माणसांच्या जीवनातून समाजाला कळते!!

  बुद्धिमत्ता सगळ्यांकडे आहे मात्र आपल्या दैनंदिन जीवनात उद्योगधंद्यात माणूस चलाखी  करतो की इमानदारी हे त्याच्या संस्कारावर अवलंबून असते. दिपकनी आयुष्यात सदैव इमानदारी केली. ही इमानदारीच आयुष्यभर पुरते . आमच्या पुढच्या पिढ्यांना ही व्यक्ती कोण हे कळणे नितांत गरजेचे आहे . समाज धारणेसाठी अशा  माणसांचीच आवश्यकता असते.

    दिपकच्या आयुष्यात सुखाचे  तसेच बिकट संकटाचेही दिवस आले. अर्धांगी शुभांगी अर्ध्या वाटेवरच आयुष्याची साथ सोडून गेली . मात्र कठीण परिस्थिती आणि गैरसोयीशी जुळवून घेत आपली ऊर्जा व प्रेरणा त्यानी जीवंत ठेवली. अशीच माणसे शेवटी समाजात वेगळी उठून दिसतात. म्हणूनच त्या अलौकिकापुढे आपण कर जोडोनी नत-मस्तक होतो. आम्ही दिपकसाठी आज तेच करीत आहोत.  पुढील वाटचालीसाठी परमेश्वर दिपकना  चांगले आरोग्य व दीर्घआयुष्य देवो अशी प्रार्थना करतो. त्याच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा, मदतीचा  लाभ आम्हा सर्व समाज बांधवांना भविष्यातही असाच मिळत राहो अशी आशा करतो. जसे वाटेने येणाऱ्या पांथस्थाला एखादा वृक्ष, पाने, फुले, मुळे, छाया काहीतरी देण्यास कधीच चुकत नाही तसा…

  पुष्प छाया, फळें,मूळ धनंजया ।

  वाटेचा न चुके आलिया, वृक्षु जैसा ||

मित्रवर्य दिपक यांना  खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.

दिगंबर वा राऊत, माजी कार्यकारी विश्वस्त, सो क्ष संघ फंड ट्रस्ट.