वरदाईनी, माऊली धनबाई

पारशी धर्म झरथृस्ट (Zarathustra/ Zoroaster) या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक धर्म व तत्त्वज्ञान आहे. इसवी सनपूर्व सहाव्या शतकात पर्शिया मध्ये स्थापन झालेला हा धर्म, एकेकाळी जगातील मोठा धर्म होता. पारशी हा इराणी लोकांचा राष्ट्रीय धर्म होता. सातव्या शतकांत इस्लामचा उदय झाला आणि पारशी धर्माचा ऱ्हास सुरू झाला. अंदाजे आठव्या शतकात पारशी इराणमधून भारतामध्ये आले. ते प्रथम गुजरात मध्ये आले व त्यानंतर हळूहळू भारतभर पसरले. भारत देशामध्ये जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय राहतात. पारशी लोक व भारतातील वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये खूप प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. पारशी धर्माचा पवित्र ग्रंथ झेंद अवेस्ता आणि भारतीयांचा ऋग्वेद यांच्यामध्ये ही भाषेचे खूप मोठे साम्य आढळते. पारशी धर्मीय भारतात संख्येने जरी कमी असले तरी भारतामध्ये उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे काम हे स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही पारशी धर्मीय यांनीच केलेले आहे.  भारतातील राजकीय चळवळ व सामाजिक चळवळींमध्येही या लहान जमातीचे मोठे योगदान आहे.

जमशेदजी टाटा, जे. आर. डी. टाटा, रतन टाटा, डाॅ.गोदरेज, ही औद्योगिक साम्राज्य निर्माण करणारी मंडळी, जनरल माणेकशा, परमवीर चक्र धारक, कर्नल अर्देशीर तारापोर, व्हाइस एडमिरल रुस्तम गांधी, हे रणधुरंधर, सोली सोराबजी, नानी पालखीवाला यासारखे कायदेपंडित, पोली उमरिगर, फारोख इंजिनियर हे नामवंत क्रिकेटपटू आणि भारतातच नव्हे तर सर्व विश्वामध्ये वंद्य असलेले, होमी भाभा सारखे अणुशास्त्रज्ञ. कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये सर्व जगाला, COVACCINE, या लसीच्या रूपाने आशेचा किरण दाखविणारे ,अदर पूनावाला हे प्रसिद्ध उद्योगपतीही पारशीच! ही महान माणसे, या लहान जमातीची, भारताला व जगाला अनमोल देणगीच!! ही वानगीदाखल काही नावे! औदार्य हा या पारशी लोकांचा एक विशेष गुण आहे. निस्वार्थी वृत्ती दुसऱ्या बद्दल मनापासून प्रेमाची भावना व त्यापायी कोणताही त्याग करण्याची वृत्ती म्हणजे औदार्य. हा मनाचा गुण आहे. ती व्यक्ती श्रीमंतच असली पाहिजे असे नव्हे. अगदी गरीबातील गरीब सर्वसाधारण व्यक्तीच्या मनात सुद्धा अशीभावना असू शकते .ज्या दिवशी ही भावना मनात रूजू लागेल, त्यादिवशी तुमचे आयुष्य परिपूर्ण  होऊन जाईल! अफाट होऊन जाईल! म्हणूनच ज्या दिवशी  तुकारामाचे मनात ही भावना जागी झाली त्यादिवशी तुकाराम, वाणी राहिला नाही म्हणू लागला:

 अणु रेणू या थोकडा, तुका आकाशाएवढा ।

आपण सामान्य माणसे तुकारामासारखी आकाशाएवढी नाहीत. तरी, आजूबाजूच्या स्वार्थी, आसक्त, बुटुक बैंगणाचे तुलनेत मनाचा मोठेपणा दाखवत, दुरितांचे तिमीर जावो, अशी मनोकामना केली तर आकाशा एवढे नाही पण निदान ताडामाडा एवढे तरी होऊ शकतो ! पारशी ही जमात, त्यांच्या अंगभूत औदार्य, दानशूरता आणि माणुसकीचा गहिवर,  या गुणासाठी भारतात प्रसिद्ध आहेत. मागे उल्लेखिलेली मी काही पारसी व्यक्तीमत्वे आभाळाएवढी उंच  आहेत.  सर्वसाधरण  पारशी जमातीत अशी ताडामाडा एवढी उंच, मात्र एरवी सामान्य माणसांसारखेच जीवन जगणारी अनेक व्यक्तीमत्वे पहायला मिळतात. त्याच अशा एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वापैकी आमच्या घोलवडच्या बाई धनबाई हकीमजी,या पारशी महिला!!

बाई धनबाई पेस्तनजी हकिमजी १८७०-१९६०

ज्यांनी निर्माण केलेल्या घोलवडच्या प्रसुतीगृहात माझ्यासारख्या अनेकांनी जगात आल्यावर, पहिला टाहो फोडला, ज्यांच्या उदार देणगी मधून 1920 साली स्थापन झालेल्या सुनाबाई  पेस्तनजी हकीमजी (SPH) हायस्कूलमध्ये माझ्या प्रमाणेच हजारोनी विद्यार्जनाचे धडे घेतले, ज्यांच्या भरीव व आर्थिक साहाय्याने निर्माण झालेल्या मशिना हॉस्पिटलमध्ये ,आमच्या गुरुवर्य आचार्य भिसे गुरुजी यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्यांनी दाखविलेल्या मनाच्या मोठेपणामुळे ,त्या वेळी,आचार्य चित्रे गुरुजींनी आपले राजीनामा पत्र मागे घेऊन,बोर्डी शाळेतच आपली सेवा देण्याचे व्रत पुढे चालू ठेवले ,विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांना,  एका महान  आचार्यांचा लाभ झाला आणि ज्यांच्या  पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या या  घोलवडच्या भूमीवर  व परिसरांत, राहण्याचे सद्भाग्य आज आम्हाला मिळते आहे. अशा मानवतावादी, दातृत्व शिरोमणी, संतस्वरूप ,धनबाईंबद्दल काहीतरी लिहून, आपली कृतज्ञता व्यक्त करावी ,असा खूप दिवसांचा मानस होता  .मात्र बाईंचे एकूण जीवन इतके रहस्यमय व जगावेगळे की त्यांचे विषयी कोठे काहीच माहिती मिळत नव्हती. साधे कृष्णधवल छायाचित्र, पेंटिंग पोर्ट्रेट तर नाहीच पण त्यांच्या आयुष्यावर लिहिलेल्या चार ओळींचा लेखही  कुठे मिळाला नाही. 

 “A WILL WILL FIND A WAY.. हा आयुष्यातील माझा गुरुमंत्र !  अनेक वेळा  त्याचं प्रत्यंतर आयुष्यात आले. यावेळीही तसेच झाले .माझ्या “लक्ष्मण काका “..या लेखाची माहिती मिळवितांना,काकांनी जेथे सेवा दिली ,त्या कै.  माणेकशा मसाणी,यांच्या, “एवर ग्रीन” ,बागेची व आंतील बंगल्याची मी काही  छायाचित्रे बाहेरून काढत होतो. तेवढ्यात त्या बागेच्या प्रवेशद्वारातून एक व्यक्ती बाहेर आली. मला, “मी आपल्याला काय मदत करू शकतो?”, असे  प्रेमाने विचारले. मात्र  त्यावेळी असे विचारणे , म्हणजे माझ्याविषयी  मनात आलेला संदेह आहे , असे मला तरी वाटले. मी माझा उद्देश सांगीतला. मी मनात थोडा घाबरलो होतो ,कारण कोणाची  कोणतीही, परवानगी न घेता,मी त्या बागेची व आतील बंगल्याची, काही छायाचित्रे घेतली होती. या व्यक्तीने मला आश्चर्याचा गोड धक्का दिला. हसत म्हणाले, “अरे, मग बाहेरून कशाला फोटो घेतोस, माझ्याबरोबर आत ये, मी तुला माणेकशा साहेबांचा संपूर्ण बंगला, वाडी, आतून दाखवितो. आणि खरेच त्या गृहस्थांनी मला त्या शंभर वर्षे जुन्या बंगल्याचा कानाकोपरा,, त्यांच्या कुटुंबाचे जुने फोटो ,पुस्तक संग्रहालय अगदी रेडिओ आणि संगीत ऐकण्यासाठी ठेवलेला जुना ग्रामोफोन,  सगळे व्यवस्थित ठेवले होते.ती माहिती मला लक्ष्मण काकांच्या लेखात उपयोगी पडली.बोलता बोलता त्यांनी मला कै. माणेकशा व कै.धनबाई यांचे कौटुंबिक स्नेहसंबंध व त्या वास्तूमध्ये बाईंचे नेहमीचे येणे जाणे याबद्दल माहिती सांगितली.मी त्यांना माझा पुढचा लेख ,धनबाई विषयी लिहावयाचा मानस आहे असे सांगितले. त्यांनी “सावकाशीने एक दिवशी परत ये, मी तुला माझ्याकडील जी माहिती आहे ती व काही इतर छायाचित्रे देईन, त्याचा उपयोग कर!” असे सांगितले..’आंधळा मागतो एक डोळा’.. अशी माझी स्थिती झाली. खरोखरच या गृहस्थांनी काही दिवसांनी, मला त्यांचे जवळ असलेली माहिती दिली. त्यात, ‘पारशी पंचायत’, या स॔स्थेने, बाईंनी दिलेल्या देणग्यांची  माहिती व श्री. दिनकर राऊत सर यांनी खूप वर्षांपूर्वी, हायस्कूलच्या वार्षिक पत्रिकेत लिहिलेला एक छोटा लेख यांचे कात्रण दिले. त्यांच्याकडेही बाईंचे  एखादे छायाचित्र मिळाले नाही. काहीही असो श्री. जमशेदजी यांनी दिलेल्या या सहकार्यामुळे हा लेख लिहिण्याची माझी इच्छा प्रबळ झाली व त्यामुळे हे आज होत आहे. जमशेदजी हे आज माणेकशा यांच्या, ‘एव्हरग्रीन’, या विशाल व नावाप्रमाणे सदाहरित बागेचे मॅनेजर म्हणून काम  करतात. म्हणून त्यांचा खूप कृतज्ञता पूर्वक उल्लेख मी सुरुवातीलाच करतो.

अखेरच्या दिवसांतील धन बाईचे हे निवासस्थान व प्रवेश दरवाजा डावीकडे त्यांचे स्वयंपाकघर तर समोर त्यांची प्रार्थना खोली.  समोरील व्हरांड्यात,बाईंचा लाडका कुत्रा, पहारा देत असे                   .
   बाईचा शयनकक्ष.

धनबाईंचा जन्म, एका सधन पारशी कुटुंबात झाला. त्यांचे पिताजी त्याकाळी चीन देशाबरोबर कापूस व रेशीम यांचा व्यापार करीत होते .त्यांना त्यात अमाप पैसा मिळाला. त्यांना चार पुत्र आणि दोन कन्या. त्यातील एक सुकन्या म्हणजे धन बाई. आपल्या अंतिम काळी वडिलांनी आपल्या संपत्तीचे वाटप या मुलांना करतेवेळी त्यांनी धनबाईनाही त्यांचा हिस्सा देऊ केला. मात्र धनबाईंनी प्रथम ती संपत्ती स्वीकारण्यास नकार दिला. एकतर त्या अविवाहित होत्या व दुसरे असे, ही संपत्ती जर मला मिळाली, तर ती मला दान धर्मातच खर्च करावयाची आहे. हे तुम्हास पटत असेल तरच मला तुमचे मिळकतीचा हिस्सा द्या. असे आपल्या तरुण वयातच त्यांनी आपल्या पिताजींना सांगितले होते. आपल्या संपत्तीचा उपभोग खरेतर त्यांनी सुखात व ऐश्वर्यात भावी जीवन जगण्यासाठी केला असता तरी त्यांना कोणी दोष दिला नसता. पण त्यांची वृत्तीच वेगळी होती !त्यांचा पिंड वेगळा होता! त्यांनी भावी जीवनात केवळ दानाचे व सेवेचे व्रत स्विकारले व ते अखेरपर्यंत पाळले. वडिलांनी दिलेल्या या संपत्तीच्या आपण मालक नव्हे तर विश्वस्त आहोत, हीच भावना त्यांनी अखेरपर्यंत ठेवली व त्या सर्व संपत्तीचा उपयोग लोककल्याणासाठी केला. मी वर सांगितल्याप्रमाणे औदार्य व दानशूरता ही पारशी जमातीची  वैशिष्ट्ये खरी. पण धनबाई या  सर्व पारशी जमातीतही आपल्या दानशूरता  व निर्मोही वृत्तीमुळे झळाळून दिसतात !

      हेच आजचे, घोलवड मधील,सरकारी आरोग्य केंद्र असून  अनेक गरीब गरजूंना येथे वैद्यकीय सेवा विनामूल्य मिळते

  प्रसूतिगृह ऊद् घाटन सोहळा.1935: मध्यभागी बसलेल्या लेडी ब्रेबॉर्न, त्यांचे डावीकडून पहिले कलेक्टर खान बहादुर शेख,दुसरे,माणेकशा. या फोटोसाठी प्रत्यक्ष लेडी ब्रेबॉर्न आणि कलेक्टर यांनीविनंती करूनही ,धनबाई ,फोटोसाठी तयार झाल्या नाहीत. 

   साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय. आणि ते आचरणात आणताना त्यांना कोणताही मोह रोखू शकला नाही .हजारो रुपये जवळ असलेल्या या बाईंचा पोशाख अगदी साधा असे .कधी तर अगदीं ठिगळं लावलेली वस्त्रे त्या  परिधान करीत, अशी त्यांची आठवण माणेकशा सांगत. पोषाखावरून कधीकधी,त्यांना प्रथमच भेटणारी व्यक्ती, ‘ही बाई किती कंजूष आहे’,असा गैरसमज करून घेत असे. त्यांनी दानधर्माचा दिलेल्या काही प्रमुख देणग्यांची मिळालेली माहिती पाहिल्यानंतर यांच्या संपत्तीची व निरलस निर्मोही वृत्तीचे प्रत्यंतर येते व आदराने कर जुळतात. 

 श्री. जमशेदजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलेल्या देणग्या अशा:

  • 56,000 रू. बोर्डी हायस्कूल,जमीनआणि इमारतबांधण्यासाठी.
  •  50,000 रू. सुनाबाई पी हकिमजी मॅटर्निटी होम घोलवड साठी
  •  1,50,000 रू. दोन मजली पारशी मुलांचे   वसतिगृह,घोलवड , बाजूची, पाच एकर, समुद्रकाठची जमीन,दान.
  •  6000 रू. डहाणू सरकारी हॉस्पिटल साठी.
  •  10,000 रू. झाई,बोर्डी, येथील अग्यारी बांधण्यासाठी. 
  •  20,000रू. दादर ,मुंबई ,येथे पारशी धर्मगुरू(दस्तुर) पाठशाळा उभारणीसाठी.
  •  40,000 रू. बांदरे,मुंबई  व बेळगाव, येथील अग्यारी बांधण्यासाठी.
  • 75,000रू बी डी पेटिट पारसी जनरल हॉस्पिटल,साठी
  • 35,000रू. मासिना हॉस्पिटल भायखळा मुंबई देणगी
  • 65,000रू. पारशी पंचायत ट्रस्टला गरिबांचे मदतीसाठी

याशिवाय बॉर्डी, घोलवड परिसरांतील कित्येक अनाथ, अपंग, गरजूंना, जन्म, मृत्यू, लग्न इत्यादी प्रसंगी मदत म्हणून सढळ हाताने मदत केली आहे- त्याची कुठेच नोंद नाही.

हे सर्व मदतीचे आकडे सन 1920 ते 40 या दरम्यानचे आहेत. त्यावरून त्यांच्या आजच्या किमतीचा अंदाज करता येईल. तसेच ही मदत संस्थांना अथवा सरकारला देताना स्वतःच्या नावाचा उल्लेख कोठेही नाही. प्रत्येक ठिकाणी आपले पिताश्री, पेस्तनजी  हकिमजी अथवा माता सुनाबाई यांचेच नावे या देणग्या दिल्या गेल्या आहेत.  कौटुंबिक स्नेही माणेकशा मसानी यांचा सल्ला प्रत्येक मदत देताना बाई घेत असत हे जमशेटजी आदरपूर्वक  सांगतात. 

 आमच्या बोर्डी, घोलवड गावांवर त्यांचे निरतिशय प्रेम होते.  1923 साली,बोर्डी हायस्कूलच्या इमारतीसाठी ,जमीन व देणगी देताना, त्यांनी श्री.माणेकशा यांचा सल्ला व आचार्य भिसे, चित्रे, सावे या त्रिमूर्तीच्या कर्तृत्वावर भरोसा ठेवून ही देणगी दिली आहे. एका छोट्या खेड्यात, नुकत्याच सुरू झालेल्या शाळेला  एवढी भरीव देणगी देताना,  या परिसराचा शैक्षणिक विकास व्हावा एवढीच आंतरिक इच्छा होती. त्यासाठी, काम करणारी ही मंडळी निश्चित विश्वासपात्र आहेत, हा भरोसा होता. आज बोर्डी ,घोलवड ,कोसबाड, झाई या परिसराचा हायस्कूलमुळे झालेला दैदिप्यमान विकास पाहता ,तत्कालीन गुरुजनांनी व नंतर आलेल्या पिढ्यांनी बाईंचा हा विश्‍वास सार्थ ठरविला!

पण मुंबईला राहणाऱ्या धन बाई बोर्डीला आल्या कशाला आल्या पण कायमच्या इथेच का राहिल्या  तीपण हकीगत मोठी गमतीशीर आणि विचार करायला लावणारी आहे .पारशी असल्यामुळे धनबाई मुंबईहून संजान येथील त्यांच्या अग्निमंदिरात प्रार्थनेसाठी महिन्या-दोन महिन्याला जात असत. त्यावेळेला काही थोड्या  रेल्वे गाड्या मुंबईहून गुजरातकडे जात. बाई सौराष्ट्र एक्सप्रेस या जलद गाडीने त्यावेळी कल्याणला जात असत गंमत म्हणजे ही गाडी घोलवड स्टेशनवर उभी रहात नसतानाही सिग्नलच्या बिघाडामुळे म्हणा अथवा अन्य काही अडथळ्यामुळे घोलवड स्टेशनला सतत तीन वेळा उभी राहिली. बाईनाही मोठे आश्चर्य वाटले. ही गाडी जलद असूनही,घोलवड स्टेशन वरच मी प्रवास करीत असताना, एकदा दोनदा नव्हे तर तीनदा का बरे थांबली असावी? त्यांची एक मावशी घोलवडला राहत होती. त्यांच्या घरी आल्या असताना त्यांनी हा विचित्र योगायोग मावशींना सांगितला. त्यांची मावशी ही मोठी  श्रद्धाळू आणि देवभोळी होती. तिने सांगितले ,मला वाटते देवाची इच्छा तू मुंबई सोडून घोलवडला यावे अशी दिसते. नाहीतरी तू एकटीच  मुंबईस राहून एकाकी जीवन जगते आहेस, तर घोलवडला ये. मी सुद्धा तुझ्या सोबत असेन. बाईंना काय वाटले कोणास ठाऊक, त्यांनी गाडी थांबण्याचा हा संकेत आणि मावशीचा उपदेश  मनावर घेतला आणि एके दिवशी आपला बाडबिस्तरा आवरून मावशीच्या घरी आणून टाकला. मावशीने या भाचीला खूपच आधार दिला. आणि भावी जीवनासाठी मार्गदर्शनही केले. मावशीचा बंगला माणेकशा मसानी यांच्या वाडीला लागूनच असल्यामुळे, त्यांचाही माणेकशाबरोबर घनिष्ठ संबंध होता. आणि त्याच मुळे पुढे धनबाईना प्रेमळ सहवास मिळून, त्यांचे कौटुंबिक संबंध प्रस्थापित झाले. आणि त्यांच्या पुढील आयुष्यात ते  महत्त्वाचे मार्गदर्शक  ठरले.

   माणेकशा यांचे, ‘EVER GREEN’, निवास स्थान 

वर म्हटल्याप्रमाणे दीड लाख रुपयांची देणगी कावसजी जहांगीर ट्रस्टला देवून, यांच्यामार्फत 2 मजली इमारतीत गरीब पारशी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. पारशी होस्टेल हे त्याकाळी बोर्डी-घोलवड गावची मोठी शान होती. आणि अनेक होतकरू गरीब पारशी विद्यार्थी या वसतिगृहात राहून आपले भवितव्य उज्वल करून गेलेले आहेत. होस्टेल समोर बांधलेल्या बराकी वजा चाळीत एका खोलीत ,बाईंनी आपले निवासस्थान केले .बाजूलाच त्यांचे स्वयंपाकघर होते व त्याचे  नजीकच त्यांची प्रार्थनेची खोली होती. दहा बाय दहा राहण्याची खोली, तेवढेच स्वयंपाक घर ,आणि पाच बाय आठ अशी प्रार्थनेची खोली .बाईंचा घोलवड मधील निवासाचा एवढाच पसारा.ज्या बाईंनी  त्याकाळी  लाखो  रुपयाचे दान आपली कोणतीही नामो निशाणी न ठेवता  गरजू व्यक्ती व संस्थांना दिले  त्या  वंदनीय  व्यक्ती, स्वतः मात्र  अशा चंद्रमौळी निवासस्थानात अखेरपर्यंत राहिल्या. सोबत दिलेली छायाचित्रे मला  मोठ्या मिनतवारीने मिळाली  कारण  येथे तैनात असलेल्या  सुरक्षा रक्षकांमुळे येथे प्रवेशास व फोटोग्राफी करण्यास बंदी आहे कारण हा सर्व परिसर आता पडीक दयनीय अवस्थेत असून काही लोकांनी येथे अनधिकृतरित्या आक्रमण करणे सुरू केल्यामुळे पारशी पंचायतीला हे पाऊल उचलावे लागले आहे.  तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना बाईंच्या त्या लहान खोलीचे माहात्म्य अथवा पावित्र्य याचे गम्य काही नाही .त्यांच्या दृष्टीने ही एक मौल्यवान अशी मालमत्ता आहे आणि तेथे कोणी प्रवेश करू नये त्यांच्या निवास खोलीची ,व स्वयंपाक घराची अवस्था पाहून आम्ही त्यांना त्या खोल्या साफ करून देऊ का व त्याचे कारणही सांगितले मात्र त्यांनी त्यास स्पष्ट नकार देऊन मुंबईहून परमिशन घेऊन या असे फर्मावले .जास्त  न बोलता  प्रथम  मी त्या पावन खोलीत शिरण्याआधी  उंबरठ्याला हात लावून तेथील मृत्तिकेचे कण कपाळाला लावले . बाईंच्या पदस्पर्शाने, पावन झालेल्या ,काही रजःकणांचे अस्तित्व,अजूनही तेथे असेल तर माझ्या कपाळी त्यातील एक क्षण तरी लागावा ही माझी भाबडी आशा. मी धन्य झालो ! निदान आज तरी हीच ती चार भिंतीची खोली, हाच तो फरशीचा पृष्ठभाग, आणि हाच तो आसमंत , जिथे बाईंनी  आपला अखेरचा श्वास घेतला. दयनीय पडिक अवस्थेत का असेना पण त्या मूळच्या स्थितीत हे सर्व अस्तित्वाचा आहे. न जाणो भविष्यात काही थोड्याच वर्षात ही सर्व वास्तू जमीनदोस्त होऊन येथे बहुमजली इमारतीत एखादा मोठा मॉल निघेल आणि त्यावेळी या इथे पूर्वी धनबाईंची खोली होती असे म्हटले जाईल. कदाचित एवढी आठवण कोणाला येणारही  नाही. खरेच किती अभागी आमची पिढी, पूर्वजांचे वैभव वाढविणे सोडा,आम्हाला ते नीट जतनही करतात आले नाही !!

बाईंना एकच शौक होता तो म्हणजे कुत्रे आणि मांजरी पाळणे . याच परिसरात त्यांचा एक उमदा अल्सेशियन कुत्रा ही व्हरांड्यात झोपत असे. बाईंचे रक्षण करणे आणि त्यांना  एकलेपणाची जाणीव न होऊ देणे हेच त्याचे काम. बाईंच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत हा इमानी प्राणी त्यांचे बरोबर होता.

 बोर्डी घोलवडमधील बाईंनी केलेले लोकोपयोगी,प्रसिद्ध काम म्हणजे सुनाबाई  पेस्तनजी प्रसूती गृहाची बांधणी. हे काम हे सुमारे 1935 सालीच केले गेले आहे. या प्रसूतीगृहाच्या बांधण्याची हकीकत ही मोठी योगायोगाची. बाई एके दिवशी सकाळी मावशीच्या घरापासून निघून घोलवड स्टेशनकडे काही कामासाठी जात असताना एक गरीब दुबळा जातीची महिला रस्त्याच्या कडेलाच प्रसूत झालेली त्यांना आढळली. जाणाऱ्या येणाऱ्या काही बायांनी थोडा आड पडला उभारून तिची प्रसूती केली. बाईंनी हे पाहिले व त्यांचे मन या एका घटनेने द्रवले. मोठ्यांच्या  स्त्रिया डहाणू इस्पितळात जाऊन प्रसूत होतात मग गरीब बापड्या स्त्रियांसाठी काही सोय आपल्या गावात का असू नये हे त्यांच्या मनाने घेतले आणि त्वरित एका सुंदर प्रसूतिगृहाची उभारणी घोलवड गावांत समुद्रकिनारी झाली. अर्थात त्याला नावही बाईंनी आपल्या आईचे म्हणजे सुनाबाईंचे दिले. त्या  इस्पितळाचे उद्घाटन  त्या वेळेच्या मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्या पत्नी लेडी ब्रेबॉर्न यांच्या हस्ते झाले.त्यासाठी मुंबईहून व परिसरांतीलही बरीच बुजुर्ग मंडळी हजर होती. त्यावेळेची आठवण   माणेकशांनी सांगितली होती, तीही बाईंच्या प्रसिद्धीपरान्मुख  व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकते. त्याप्रसंगीचा फोटो मला माणेकशा यांच्या घरीच मिळाला तो येथे जोडला आहे. त्या फोटोत धनबाई कुठेच दिसत नाही. तेव्हा मला कळलेली हकीकत ही सत्य असली तरी आज खरी वाटत नाही. यावेळी जिल्ह्याचे कलेक्टर खान हेही हजर होते. फोटोचे वेळी मॅडमबाईंच्या शेजारी एक खुर्ची रिकामी ठेवली होती. बाईंना घरून बोलविण्यात आले व त्या खुर्चीवर बसून मॅडम सहित फोटो देण्याची विनंती त्यांनी केली. बाई आल्या, मात्र त्यांनी तेथे बसणे नाकारले. अगदी कलेक्टर पत्नी यांनीसुद्धा आपल्या शेजारी बसण्याची विनंती केली पण बाईंनी त्यांनाही अत्यंत नम्रपणे फोटोसाठी नकार दिला. कलेक्टर थोडेसे मनात घाबरले .कारण मुंबईहून खास त्यांच्या आग्रहावरून मॅडम घोलवडला आल्या होत्या आणि त्यांचे बरोबर फोटो घेण्यास प्रत्यक्ष त्या गोऱ्या बाईंनी विनंती करूनही बाई नकार देत होत्या. ही त्यांची अवघडलेली परिस्थिती पाहून लेडी ब्रेबोर्न यांनी त्यावेळी काढलेले उद्गार, ईंग्रज लोकांच्या कदरदान वृत्तीची, आणि त्यांना अशा माणसाविषयी, मग ती कोणत्याही देशातली असोत,किती आदर वाटत असे, हे दर्शविते.लेडी ब्रेबॉर्न म्हणाल्या,’ मॅडम, मी तुमच्या या निस्पृहतेची प्रशंसा करते. अहो, अजूनपर्यंत माझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी कित्येक लोक धडपडताना दिसले. मात्र मी स्वतः बोलाऊन सुद्धा, फोटोस नम्रपणे नकार देणाऱ्या आपण एकच मला अजून पर्यंत भेटल्या आहात. मला तुमचा अभिमान आहे !’ही गोष्ट ऐकून माझ्या अंगावर रोमांच आले. आणि अशाच एका दुसऱ्या ,माझ्यासमोर घडलेल्या व प्रसंगाची आठवण झाली. 1959 साली डाॅ. राजेंद्रप्रसाद बोर्डीला,हायस्कुलात, काही  कार्यक्रमासाठी आले होते. आचार्य भिसेसर  त्यावेळी होते आणि त्यांच्या आमंत्रणामुळेच भारताचे पहिले राष्ट्रपती पहिल्यांदाच बोर्डीत आले होते. हायस्कूलसमोरील पटांगणावर उंच जागी स्टेज तयार केले होते आणि राष्ट्रपतींच्या शेजारी आचार्यासाठी एक खुर्ची रिकामी होती. अनेक लहानसहान कार्यकर्त्यांनीही  खटपटी लटपटी करून स्टेजवर प्रवेश मिळवून स्टेजवर गर्दी केली होती. त्यावेळी सुरक्षा एवढ्या तंतोतंतपणे पाळली जात नव्हती. राजेंद्र बाबू शेजारील खुर्ची रिकामी पाहून थोडे आश्चर्यचकित झाले. त्यांनी मागे उभ्या असलेल्या त्यांच्या अंगरक्षकाला आचार्य भिसेना तेथे आणून बसव म्हणून सूचना केली असावी. तो त्वरित तेथून उतरून आचार्यांना शोधू लागला. इतर कार्यकर्त्यांना ते कुठे आहेत म्हणून विचारू लागला. आचार्य यावेळी तेथे जमलेल्या विराट गर्दीला थोपवण्यासाठी लोकांनी कार्यक्रमाला, कोणतेही  गालबोट लागू नये या चिंतेने गर्दीमधून फिरत होते . मीदेखील समोरील गर्दीत उन्हात उभा होतो आणि आचार्यांची ती घामाघूम झालेली, उन्हात, लोकांना दोन्ही हात जोडून विनवणी करत फिरणारी आणि खांद्यावरील छोट्या टॉवेलने सतत घाम पुशीत धावपळ करणारी मूर्ती पहात होतो. म्हणूनच ती आठवण आजही मनात कोरली गेलेली आहे. बाईंच्या या निरपेक्षतेचा किस्सा मी ऐकला आणि माझ्या डोळ्यासमोर ते त्या दिवशीचे आचार्यही आले खरेच किती जबरदस्त होती ही माणसे ! ह्याच आचार्यांनी  उत्कृष्ट  शिक्षणासाठी असलेला, राष्ट्रीय  स्तरावरील “राष्ट्रपतीपुरस्कार ”  नम्रपणे नाकारून त्यावेळेचे शाळेचे हेडमास्टर साने सर यांना मिळावे, अशी शिफारस केली होती .आजच्या खोट्या नाण्यांची चलती असलेल्या जमान्यात, कधी एके काळी एवढी खणखणीत नाणी या भारतातच नव्हे तर या गावात होती हे पुढे येणाऱ्या पिढ्यांना  कदाचित खरेही वाटणार नाही, म्हणून असा इतिहास जपून ठेवणे महत्त्वाचे.

बाईनी प्रसूतिगृह बांधून दिले पण ज्या दुर्दैवी मुलाला रस्त्यावर जन्म घ्यावा लागला त्या मुलाला बाईंनी रस्त्यावर सोडून दिले नाही .बाईंनी त्या मुलाला दत्तक घेतले. त्याच्या भरण-पोषण शिक्षणाची सर्व जबाबदारी घेऊन त्या मातेचाही त्यांनी  सांभाळ केला . दुर्दैवाची गोष्ट एवढीच की हा बाईंचा दत्तक मुलगा व्यसनी निघाला आणि अल्पायुषी ठरला .बोर्डी घोलवड परिसरांतील त्यावेळेच्या अनेक गावकऱ्यांना ही कथा माहित आहे .मी स्वतः देखील हा बाईंचा दत्तक मुलगा धुंद अवस्थेत फिरताना पाहिला आहे. हादेखील एक दैवदुर्विलास. बाईंनी मुंबईतसुद्धा अशाच एका गरीब कुटुंबातील मुलाला दत्तक घेतले होते व त्याला शिक्षणासाठी खूप मदत केली होती. बाईंचा हा मुलगा पुढे खरोखरच मोठा झाला लक्षाधीश झाला व आयुष्यात नाव कमावले असे  मी ऐकले आहे . मात्र या गृहस्थांची आज कोणाकडूनही विशेष माहिती मिळाली नाही. त्यांचा संपर्क झाला असता तर बाई विषयी काही मौलिक माहिती मिळू शकली असती.

या लेखासोबत जोडलेल्या बाईंचे निवास स्थान त्यांच्या स्वयंपाकाची खोली व लागून असलेला व्हरांडा यात त्यांचा लाडका कुत्रा राहत असे. यांची छायाचित्रे आज ज्या अवस्थेत आहेत ,निश्चितपणे त्या पवित्र वास्तूची आज कोणीच देखभाल करीत नाही.त्या वास्तूवरून   त्यांच्या साध्या राहणीची कल्पना येते .पुष्कळदा त्या एकच वेळ जेवण करीत असत .खाणे देखील अगदी साधे असे .बहुतेक शाकाहारीच जास्त .विशेष म्हणजे शेजारील त्यांनीच सुरू केलेल्या विद्यार्थी  वसतीगृहाच्या  स्वयंपाक घरात मुलांसाठी सुग्रास जेवण बनत असे.  पण त्या अन्नासही  बाईंनी नम्र नकार दिला होता. आपले जेवण जोपर्यंत शक्य होते ,त्यांनी स्वतः आपल्या हाताने बनविले होते. धन्य त्या माऊलीची!आपल्या तत्वाला आजीवन चिकटून राहण्याचा किती प्रामाणिक आटापिटा!

दिनकर राऊत सर सुदैवी. ते शाळेंत शिकत असताना त्यांना बाईंना भेटण्याचा योग आला होता. ते म्हणतात एके दिवशी आम्ही शाळेतील मुले आणि शिक्षक त्यांना भेटण्यासाठी पारशी  होस्टेलमधील त्यांच्या ‘त्या’ खोलीमध्ये भेटण्यासाठी गेलो होतो. शाळेतील एवढी सारी मुले व शिक्षक पाहून त्यांना फार आनंद झाला. शिक्षकांना त्या म्हणाल्या माझ्या मुलांना चांगले शिकवा .बाईंचे माझ्या मुलांना हे उद्गार किती सार्थ आहेत! अंतःकरणात अभूतपूर्व अशी माया ,प्रेम, ममता असल्याशिवाय पटकन असे उद्गार येऊच शकणार नाहीत. गोरगरिबाबद्दल व विशेषतः गरीब मुलांबद्दल ,बाईंना असलेला कळवळा त्यांच्या त्या उत्स्फूर्त शब्दांतून दिसून येतो !

बाईंकडे  निगर्वी  व  प्रसंगी स्वतःकडे कमीपणा घेऊन, दुसऱ्याचे म्हणणे  योग्य वाटल्यास, त्याचा आदर करण्याचा महान  दुर्मिळ गुण होता. त्याविषयी एक अतिशय हृदयस्पर्शी आठवण प्रिं. प्रभाकर राऊत सरांनी मला सांगितली.1923 साली  बाईंनी शाळेची स्थापना करण्यात  मोठी मदत दिली .शाळा व्यवस्थित सुरू झाली. त्यावेळी  घडलेला प्रसंग बाईंच्या निरपेक्ष व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकतो. त्यांच्या घरी काम करणाऱ्या एका आदिवासी महिलेचा मुलगा वार्षिक परीक्षेत नापास झाला. मुलाने शिकावे ही बाईंची आंतरिक तळमळ. बाईंनी गुरुजींकडे मुलाला पास करण्याबाबत  काही करता आले तर पहा असा शब्द टाकला. आचार्य  भिसे गुरुजींनी त्यांच्या नेहमीच्या व्यस्ततेमुळे चित्रे गुरुजींना हे काम दिले व  त्याप्रमाणे बाईंना तुम्ही कळवा असा सल्ला दिला. चित्रे गुरुजींच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे त्वरित त्यांनी त्या विद्यार्थ्याच्या सर्व पेपरांची फेरतपासणी करून  परीक्षेतील निकाल बदलता येणे शक्य नाही असे त्यांचे मत झाले. आता काय करावे? हा यक्ष प्रश्न निर्माण झाला. ज्या दानशूर व्यक्तीने शाळा बांधून दिली त्याची एक  विनंती. ती आपण मान्य केली नाही. मनाला पटत नसून  नापासाचे  पास करावे तर तेही आपल्या तत्वाविरुद्ध जाणार. गुरुजींनी काय करावे… त्यांनी एक दिवस सरळ सकाळी बाईंच्या घरी भेट दिली. बाईंना आपण केलेल्या सर्व प्रयत्नांची जाणीव दिली आणि आपण तुम्ही सुचवलेल्या विद्यार्थ्याचे बाबतीत निकाल बदलू शकत नाही याचा अत्यंत नम्रपणे खेद व्यक्त केला. धनबाई काहीच बोलल्या नाहीत, फक्त गुरूजीकडे बघत राहिल्या. गुरुजींनी तात्काळ खिशातून एक कागद काढून बाईंच्या पुढे ठेवला. तो गुरुजींच्या राजीनाम्याचा कागद होता. बाईंनी कागद वाचला आणि तेथेच फाडून टाकला. गुरुजींना म्हणाल्या गुरुजी, तुम्ही शाळा सोडून जायचा विचारच कसा केलात? मला तुमचा अभिमान आहे, तुमच्यासारखे स्पष्टवक्ते  व सत्यप्रिय शिक्षक शाळेला हवे आहेत. मुलगा नापास झाला… होऊ दे. मलाही आता पटते आहे, तो नापास व्हायला हवा, केवळ त्याच्या भल्यासाठी! हेदेखील बाईंचे आमच्या हायस्कूलवर आणि गावावर किती मोठे उपकार आहेत! चित्रे गुरुजींनी,भविष्यकाळात केलेली, शारदाश्रम व शाळेची सेवा आणि घडविलेली हजारो सुसंस्कृत, सुविद्य मने ह्यामागे धन बाईंचाही वाटा मानावा लागेल!

बाईंनी अनेकांना अनेक प्रकारे आर्थिक मदत दिली .आयुष्यात मार्ग दाखवला. त्यांचे भवितव्य घडवले .त्यांची प्रकृती शेवटपर्यंत उत्तम होती. डॉक्टरांचे औषध त्यांना फक्त शेवटच्या थोडे दिवसाचे आजारात घ्यावी लागली .वयाच्या 90 व्या वर्षी वार्धक्यामुळे त्या निधन पावल्या .पण दातृत्व,कर्तृत्व आणि परिसरातील अनेक दीन दुबळ्यांच्या  प्रसूतीसाठी  हॉस्पिटलच्या रूपाने कारणीभूत,होऊन त्यांना “मातृत्व” ही मिळाले!

धनबाईंची मला ठाऊक असलेली  कहाणी संपली. पण मी इथेच थांबणार नाही. हे  लिखाण करीत असताना  व या आधी  आचार्य चित्रे  ताराबाई मोडक  आचार्य भिसे  या माझ्या   गुरुजनांबद्दल  लिहीत असताना  एक  भुंगा   कानात सतत गुणगुणत होता ..पैसे कमविण्याचे  व सुखलोलुप आयुष्य जगण्याचे  अनेक मार्ग व संधी असतानाही या  महात्म्यांनी  हे सर्व मोह सोडले.  सर्वांचा  त्याग करून,  एक  जगावेगळा मार्ग अवलंबिला . जनताजनार्दन म्हणजेच परमेश्वर मानून ,त्याची मनोभावे  आयुष्यभर, पूजा केली.  एक दिवस,अगदी सर्व सामान्य माणसाप्रमाणे,  ते  इहलोक सोडून निघून गेले.भारतीय संत ,महात्मे यांच्या बद्दल आम्ही ऐकले आहे.मात्र  ही माणसे आम्ही स्वतः पाहिली ,आम्हाला त्यांचा सहवासही मिळाला. आणि म्हणून  या  व्यक्तिमत्वांचे  हे असे आगळेवेगळेपण  कशासाठी  ह्या प्रश्नाचे  उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. मुळातून  समजून घेण्याच्या  वृत्तीमुळे मन सैरभैर  होऊ लागले .  विस्मरणाच्या  खोल दरीतून  एक साद ऐकू आली,.. “अत दीपो भव..” स्वयंप्रकाशित हो, स्वतः स्वतःचाच प्रकाश हो  आणि त्या प्रकाशाने शक्य होईल तेवढे  आजूबाजूचे सारे अंधारे कोपरे उजळून टाक! ही तर बुद्धाची वाणी ! तो देखील  नाही का,  राज्य,  सुंदर पत्नी,   मुलगा,आणि अफाट संपत्ती सोडून वनांत निघून गेला. मग  प्रश्न  आला,  गौतमच, का स्वयंप्रकाशित होऊ शकला? आम्ही का बरे तसे होऊ शकत नाही?  ज्ञानदेव म्हणाले आहेत…, “बहुत सुकृतांची जोडी, म्हणुनी विठ्ठल  आवडी”.पूर्व जन्मीचे सुकृत, वाडवडिलांची पुण्याई, या जन्मी केलेले नीतीचे आचरण ,अश्यांना  हे भाग्य प्राप्त होते.  आमचे कठोपनिषद  सुद्धा हेच सांगत नाही का,  त्येन  त्यक्त्येन भुंजीथा… त्यागातूनच तुला  उच्चतम आनंदाचा उपभोग घेता येईल. विरोधाभास वाटतो पण एक वैश्विक सत्य आहे. ज्यांना ते उमजते ते  सर्वस्व त्यागून हीआनंदाचे धनी होतात.. आणि हे सत्य आपल्या जीवनारंभीच समजून  त्याप्रमाणे जीवनाची वाटचाल करणारे,  कोणी शंकरराव आचार्य भिसे होतात, कृष्णराव आचार्य चित्रे गुरु होतात, एक ताराबाई पद्मभूषण  ताराबाई मोडक होतात व कोणी एक धनबाई… दीना दुःखीतांची माऊली होते!      ज्ञानेश्वर माऊलीच्या शब्दातच सांगायचे तर 

     ते वाट कृपेची पुसतु

     दिशाची स्नेहेची भरीतु

     जीवा तळी अंथरीतु ,

जीव आपुला।

ही देवतुल्य माणसे जिथे जातात तिथे स्नेह ,प्रेम,ही मानवी जीवनाची उच्चतम मुल्ये घेऊन जातात.   प्रेमाने जग बदलतात.दुसऱ्याच्या सुखासाठी आपल्या जीवालाही अर्पण करण्यासाठी उत्सुक असतात. आपल्या संवेदनाशील करूणेच्या प्रेरणेने दुःखीतांची दुःखे संपवुन त्यांचे सोयरे होतात. लौकिक आणि अलौकिकासाठी सोबती बनून ,बोटाला धरून ,मार्ग चालवतात अशी ही देवस्वरूप माणसे आमच्या बोर्डी घोलवड परिसरांत  कधीकाळी आली.आमचे सोबती बनून आमच्या साठी, “चालविशी हाती धरुनिया”.. अशी मार्गदर्शक बनली हेआमचे पूर्व जन्मीचे संचित.. त्या सर्वांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार .???

धनबाईंच्या पावनस्मृतीस दंडवत  ???         

श्री जमशेट, सध्याचे ग्रीन फार्म चे व्यवस्थापक, ज्यांनी आम्हाला ही माहिती गोळा करण्यात सर्वतोपरी मदत केली. पाठीमागे, कै. माणेकशा, यांच्या शंभर वर्षे जुन्या बंगल्याचे प्रवेशद्वार.