सेवाभावी डाॅ. दीनानाथ चुरी

कै.भाऊ उर्फ मा. डाॅ. दीनानाथ बाळकृष्ण चुरी..(1900-1978)

          भारतीय राजकारणात स्वातंत्र्यपूर्वकालांत, लाल, बाल, पाल ही त्रिवेणी, जगप्रसिद्ध झाली. स्वातंत्र्याची  संवेदना  हरवलेल्या, भारतीय समाजजीवनात, स्वातंत्र्य  व स्वदेशीचा मंत्र जागवून, त्यांनी भारतीयांचे उत्थापन केले. त्यांच्या प्रेरणेतूनच पुढे अनेक क्रांतीवीर आणि स्वातंत्र्यसैनिक तयार झाले. लाला लजपत राय हे पंजाब केसरी,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे महाराष्ट्र केसरी, तर बिपिनचंद्र पाॅल हे बंगाली वाघ!!

          श्यामराव, खंडेराव व दीनानाथ, ही बोर्डीकर सुपुत्रांची त्रिवेणी,आमच्या सोमव॔शी क्षत्रिय समाजात तशीच अजरामर झाली आहे. शामराव पाटील, खंडेराव सावे, व दीनानाथ चुरी हे स्वातंत्र्यपूर्व काळातील तिघे मित्रआयुष्याच्या अखेरपर्यंत समाजाची उत्थापना व समाज बांधवांच्या उत्तम भविष्यासाठी समर्पित होते. शामराव पाटील हे  महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री, त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा केली. खंडेराव सावे हे उच्च विद्याविभूषित IAS सनदी अधिकारी, त्यांनी शासनाच्या माध्यमातून आपले योगदान दिले. डॉक्टर दीनानाथ चुरी यांनी केवळ आपल्या जिद्दीच्या जोरावर अत्यंत खडतर प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय पदवी मिळवून आपल्या या वैद्यकीय सेवेमधून सामाजिक ऋण  फेडण्याचे काम आयुष्यभर केले.

          डॉक्टरांना आम्ही कुटुंबीय भाऊ म्हणत असू. भाऊं एक स्वातंत्र्य सैनिक, 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात, त्यांचा सक्रिय सहभाग व त्यासाठी भोगलेला कारावास. ठाणे जिल्हा खादी ग्रामोद्योग  प्रमुख, जिल्हा स्कूल बोर्ड सदस्य. वैद्यकीय,सहकारी व शैक्षणिक क्षेत्रात,उल्लेखनीय पायाभूत कामगिरी, सो क्ष  समाजाच्या स्थापनेच्या काळातील, निस्पृह, तडफदार, पुरोगामी विचारांचे संघटक व पदाधिकारी!!  ज्ञानेश्वर महाराजांनी परिपूर्ण, आनंदी, मानवी जीवनाची आकांक्षा केली.या मानवता धर्माच्या पायावरच त्यांनी

        अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक !  

असा आत्मविश्वासही प्रकट केला. लोकजागराचा अगदी तोच मंत्र घेऊन, महाराष्ट्रातील अनेक संतांनी, समाजसेवकांनी व अगदी तळागाळातील समाजकार्यकर्त्यांनी आपल्या आजूबाजूचा समाज आनंदी करण्यासाठी आपले जीवन सार्थकी लावले. भाऊ, मला वाटते, त्याच पठडीमधील एक, समाज कार्यकर्ते होते. उण्यापु-या 78 वर्षांच्या आयुष्यात, त्यांनी अवतीभवतीच्या समाजबांधवांच्या आयुष्यात आपल्यापरीने देता येईल तेवढा आनंद देऊन त्यांचे  जीवन सुगंधीत करण्याचा प्रयत्न केला व आपल्या जीवनाचे सोने केले.

           भाऊंच्या आयुष्यात तरुणपणी घडलेल्या, एका प्रसंगामुळे,त्यांच्या मनातील सुप्त आकांक्षेचे स्फुल्लिंग, जागृत झाले ती गोष्ट पुढे येईलच. एका साधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या, कोणतीच  शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या व ‘शिक्षण घेणे म्हणजे वेळ फुकट घालविणे’, अशीच समज असलेल्या, या मुलाचे मनावर, लहानपणीच, एक गोष्ट कशी कोण जाणे, पण मनात, पक्की ठसली, ती म्हणजे, ‘अज्ञानी माणूस हा कितीही हुशार असला, तरी त्याच्या कुवतीला, कल्पनाशक्तीला व क्षमतेला मर्यादा पडणारच! शिक्षित माणसापेक्षा तो मोठा नसतो. तुम्हाला जर ‘सोशल स्टेटस’ हवे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही!’

          स्वातंत्र्य प्राप्तीचा पूर्वकाल होता तो! आपल्या सार्वजनिक व सामाजिक जगण्याची प्रत सुधारावी, उंची वाढावी म्हणून काम करणाऱ्या लहान मोठ्या अनेक संस्था तेव्हा होत्या. त्यांना उभे राहायला, वाढायला, मदत करणारी हजारो माणसे, स्वयंसेवक तेव्हां होते. फार सुखद असे ते चित्र होते.त्यातील काही संस्था तर आजही कार्यरत आहेत, हेच महाराष्ट्राचं आणि समाजाचं खरं वैभव आहे.त्या कालखंडात स्वकष्टावर, वैद्यकीय पदवी मिळवून, त्यासाठी आधारभूत झालेल्या, उपकार कर्त्यांचे ऋण मनात ठेवून, त्याची शतपटीने परतफेड करण्यासाठी, आयुष्यभर  झटलेल्या, अशाच एका  कार्यकर्त्याचे नाव म्हणजे डॉक्टर दीनानाथ बा.चुरी, होय !

          डाॅक्टर, माझे आजोबा. माझ्या वडिलांचे वडील, अकाली गेले. माझ्या आईचे वडील अकाली गेले. त्यामुळे मला सख्खे आजोबा असे कोणीच मिळाले नाही. आईचे दोन काका, एक नाना काका,म्हणजे कै.लक्ष्मण बाळकृष्ण चुरी.भाऊंचे ज्येष्ठ बंधू व दुसरे, डॉक्टर दीनानाथ चुरी. दोघांनाच मी आजोबा मानत आलो.डॉक्टरांना त्यांचे  सगळेच कुटुंबीय  भाऊ म्हणूनच  संबोधीत असत. गावातही ते सगळ्यांचे भाऊ, अथवा ‘चुरी डॉक्टर’! विविधांगी, कर्तृत्वाने बहरलेल्या, भाऊंच्या जीवनाची  झलक माझ्या परीने दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. 

          भाऊंचे वडील, बाळकृष्ण चुरी,यांना चार मुलगे व तीन मुली.  देवजी, लक्ष्मण, काशिनाथ व दीनानाथ अशी त्यांची नावे. पैकी देवजी चुरींची जेष्ठ मुलगी, म्हणजे माझी आई इंदुमती.म्हणून डॉक्टर दीनानाथ चुरी हे माझ्या आईचे सख्खे काका व माझे आजोबा! भाऊंचे  दोन ज्येष्ठ बंधू,  देवजी व काशिनाथ, अगदी अकालीच निधन पावले. तसेच चिंचणीस  दिलेली  बहिण आवडी ही लग्नानंतर काही वर्षातच मृत्यु पावली. त्यामुळे  नाना काका व भाऊ,  या दोन हयात  बंधुद्वयावर, आपल्या दोन मृत भावांच्या, अशा ऊघड्या पडलेल्या संसाराची जबाबदारी आली. वास्तविक ही सर्व भावंडे लग्नानंतर  विभक्त होती. तरीदेखील एक  ‘मानवधर्म’ म्हणून या दोघांही हयात बंधूंनी, या दोन दुर्दैवी कुटुंबीयांची होता होईल तो देखभाल केली आहे. वास्तविक त्यांचीही त्या वेळची परिस्थिती ओढग्रस्तीची होती. भाऊंसाठी तर तो मोठा संघर्षाचा कालखंड होता, शिक्षण नुकतेच संपले होते, कालांतराने त्यांचा विवाहही झाला होता व पुढे स्वातंत्र्य चळवळीचे आव्हानही खुणावत होते. तरीही त्यांनी आपल्या या दोन दुर्दैवी कुटुंबियांना, होता होईल ते सहाय्य केलेले आहे, त्याची हकीकत ही पुढे येईलच. माझे  देवजी आजोबा जेव्हा वारले तेव्हा  त्यांच्या  सहा अपत्यांपैकी सर्वांत मोठी, माझी आई दहा वर्षाची, तर सर्वात लहान खंडेराव, हा मामा, केवळ काही महिन्याचा होता. आणि  चार वर्षाचा अनंत  मामा, मुका होता. यावरून  त्यावेळच्या त्यांच्या एकूणच दारुण परिस्थितीची कल्पना यावी. मात्र  भाऊंची  आई, भागीरथी बाई, ही खूपच खमकी व धीरोदात्त बाई असली पाहिजे. तिने या आपल्या दोन, मृत मुलांच्या,भरल्या संसाराकडे,  लक्ष दिले. सगळ्यात लहान दीनानाथला ही शिक्षणासाठी संपूर्ण सहकार्य केले, त्याच्या महत्त्वाकांक्षेनुसार वैद्यकीय शिक्षण घेण्यात ऊतेजन दिले. सर्व सात मुलांच्या कुटुंबीयांत,अखेरपर्यंत एक संतुलन ठेवले. धन्य त्या माऊलीची! माझी आई,तिच्या तिन्ही बहिणी, मुका मामा अनंत, नव्वदीच्या घरात असून, हयात आहेत.माझ्या आईने, मावशीने, तसेच भाऊंची मुलगी, सौ. उज्वला विवेक चुरी, यांनी सांगितलेल्या आठवणींचा हे लिखाण करतांना मला खूप उपयोग झाला.

          भाऊंचा  जन्म 18 नोव्हेंबर 1900, साली झाला त्यादिवशी कार्तिकी एकादशीचा पवित्र दिवस होता. त्यांच्या वडिलांचे नाव बाळकृष्ण, आईचे नाव भागीरथीबाई. बहिणींची नावे आवडी बाई, धाकुबाई व मंगळी अशी होती. दुर्दैवाने वडिलांचे निधन अगदी तरुण वयातच झाल्यामुळे संसाराचा सर्व भार त्यांची आई भागीरथीबाई यांचे वर पडला.आधीच घरची गरीबी व त्यांत वडीलही लवकर गेलेले. त्यामुळे या सात भावंडांचा पालन-पोषण, शिक्षण असा सर्व भार त्यांचेवर आला. शिवाय वर सांगितल्याप्रमाणे एक मोठी विवाहित मुलगी,व दोन कर्ते मुलगे,  यांचा अचानक मृत्यू  झाल्यामुळे, त्यांच्या संसाराची ही जबाबदारी, आई म्हणून भागुबाईवर आली. आज विचार केल्यानंतर,तो कालखंड, त्या मातेसाठी किती खडतर व कसोटीचा असला पाहिजे याची कल्पना आपणास येणार नाही. मात्र हे नियतीचे व नशिबाचे खेळ सहन करीत,न डगमगता त्या माऊलीने,आपल्या या सर्वात लहान ‘दीनानाथ, उत्तमरीत्या जतन करून, त्याला हवे ते शिक्षण घेण्यासाठी, जे करावयाचे ते सर्व केले. धन्य त्याभागुबाईंची! विशेष म्हणजे भागूबाई  त्या काळांत, एक उत्तम ‘सुईण’ म्हणून, ख्यातनाम होत्या. गावांतील कोणी बाई ‘अडली’ असेल तर पहिले आमंत्रण भागुबाईना जायचे. बाई दिवसा, रात्री, कोणत्याही वेळी मदतीस धावून जात असत. बाळंतपणासाठी प्रसुतीगृहात जाण्याचा  काळ सुरू झाला नव्हता. अगदी थोरामोठ्यांच्या बायकांचेही बाळंतपण घरीच होई. भागुबाईंना, त्या अर्थाने, थोडे वैद्यकीय ज्ञान ही होते. कदाचित त्यामुळेही भाऊंचा कल वैद्यकीय शिक्षणाकडे असावा.

          छोट्या दीनानाथला, कोणतेतरी शिक्षण घेऊन नुसते सुशिक्षित व्हायचे नव्हते, तर आधुनिक वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टरच व्हायचे होते!!. आयुष्यात घडलेल्या त्या बालपणीच्या एका प्रसंगाने निश्चय पक्का झाला, तो प्रसंग असा: भाऊंच्या  बालपणी, एका नातेवाईकांना, ऑपरेशनसाठी, डहाणूच्या इस्पितळात दाखल केले होते.त्यावेळी छोटा दीनानाथ त्यांना पाहण्यासाठी इस्पितळांत गेला असताना, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला प्रवेश दिला नाही. “तू डॉक्टर नाहीस,तेव्हा तुला प्रवेश मिळणार नाही,!”..  असे त्याला सांगितले गेले. ही गोष्ट जिद्दी दीनानाथच्या जिव्हारी लागली. लहान होता तरी त्याला तो अपमान वाटला. पण त्या प्रसंगातून त्यांच्या बालमनात, एक ईर्षेची  ठिणगी प्रज्वलित झाली. मी सुध्दा एक दिवस डॉक्टर होईन ही मनोमनी प्रतिज्ञा त्यानी केली. भावी आयुष्यात  ती प्रतिज्ञा प्रत्यक्षात आणली. प्रतिज्ञा करणे  सोपे होते, मात्र ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अनुकूलता तर काहीच नव्हती. दोन मोठे भाऊ  हयात नाहीत, मोठ्या बहिणीचा ही आधार गेलेला, वडील नाहीत, आई अशिक्षित,आर्थिक स्थिती अगदीच बेताची. अशा सर्व खडतर व बिकट मार्गावरून चालत पुढे जात आपले ‘वैद्यकीय शिक्षणाचे शिखर’ सर करावयाचे होते. त्यांचेजवळ होते ते दृढनिश्चयी मन, आणि कोणतेही कष्ट करण्यास तयार  असलेले  सुदृढ शरीर!!  म्हणतात ना सत्य संकल्पाचा दाता असतो परमेश्वर! भाऊंनाही त्यांच्या संकल्पपूर्तीसाठी परशराम धर्माजी उर्फ तात्यासाहेब चुरी या समाजसेवकाचे रूपात परमेश्वरच भेटला. तात्यासाहेब चुरी हे  चिंचणीचे रहिवासी. त्या काळातील  इन्शुरन्स क्षेत्रातील मोठे नाव. अनेक परदेशी कंपन्यांना त्यांनी सल्ला दिलेला होता. सोमवंशी क्षत्रिय समाजातील एक उत्कृष्ट शेतकरी म्हणूनही त्यांचा दबदबा होता. तात्यासाहेब एक तडफदार,दानशूर व्यक्तिमत्व होते.समाज सेवकही होते. आपल्या दोन मुलींना, त्यांनी त्या काळात उत्तमरित्या पदवी शिक्षण दिले होते. समाजातील होतकरू, गरीब, हुषार विद्यार्थ्यांकडेही त्यांचे लक्ष असे. मुंबईतील आपले निवासस्थान त्यांनीअशा मुंबई बाहेरील गरजू मुलांना राहण्यासाठी उपलब्ध केले होते. तात्यासाहेबांनी, भाऊंना त्या अत्यंत  बिकटकाळी आपल्या मुंबईतील निवासस्थानी आश्रय देऊन त्यांच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी बहुमोल मदत केली. तेथे राहूनच भाऊंनी, आपली  L.C.P.S ही त्याकाळी वैद्यकीय क्षेत्रातील बहुमानाची पदवी घेतली. तात्यासाहेबांचे हे उपकार ते कधीच विसरले नाहीत. किंबहुना, ‘गरजू विद्यार्थ्यांना व पीडितांना आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा व्हावा‘ हीच सद्भावना  भाऊंनी पुढील आयुष्यात सतत बाळगली.

कै.पूज्य तात्यासाहेब चुरी, भाऊंना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी   मुंबईत, आपल्या घरी निवारा दिला.

          भाऊ आणि तात्यासाहेबांच्या कुटुंबीयांचे, जिव्हाळ्याचे संबंध  प्रस्थापित झालेच. पण तात्यासाहेब चुरी यांनी भावी जीवनात केलेल्या अनेक सांस्कृतिक व सामाजिक कार्यातही डॉक्टरांनी हिरिरीने भाग घेऊन आपले महत्त्वाचे योगदान दिले. मला वाटते, मुंबईतील तो शैक्षणिक कालखंड,भाऊंच्या आयुष्याला महत्त्वाची कलाटणी देणारा  होता. आमच्या भारतीय संस्कृतीच्या बहुमोल मूल्यांची जाणीव त्यांना येथे झाली. ‘मी एकटा नव्हे, आपण सगळे’, ‘ऐकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हे आमच्या संस्कृतीचे तत्व आहे. आपण जे कमावले, ते सर्वांमुळेच. म्हणून आधी सर्वांना द्यावे, नंतर आपण खावे. अगदी गायीगुरांसह, सगळ्यांसाठी घास काढून ठेवावे हा या संस्कृतीचा गाभा आहे याची जाणीव या कालखंडात भाऊंना झाली असावी. त्यांचे पुढील आयुष्याची दिशा,काम व योगदान पाहिले की याची खात्री पटते. नाहीतरी संस्कृती म्हणजे तरी काय? संस्कृतीची व्याख्या विनोबांनी फार सोपी केली आहे. प्रकृती हा निसर्गाचा स्वभाव, विकृती म्हणजे या नैसर्गिक स्वभावांत होणारा बिघाड,आणि संस्कृती म्हणजे सुसंस्कारित मनाचा आविष्कार!! भूक लागली म्हणून खाणे ही प्रकृती, दुसऱ्याचे हिसकावून घेऊन खाणे ही विकृती,आणि स्वतः मधले, थोडे उपाशी राहून, भुकेल्याला खाऊ घालणे, ही संस्कृती! वैद्यकीय पदवीबरोबरच, एक सुसंस्कारित मन घेऊन, भाऊ मुंबईहून गावी आले. पुढील आयुष्यात त्यांनी जोपासलेल्या काही मूल्यांची जाणीव झाल्यावर, आपल्याला हे पटते.

     डॉक्टर झाल्यानंतर,भाऊंनी,आपली सेवा,आपल्या गावातच देण्याचे ठरविले. बोर्डी गावातच त्यांचा दवाखाना होता. तात्यासाहेबांचे कुटुंबांला वेळोवेळी, स्वखुशीने वैद्यकीय सेवा दिली. तात्यासाहेबांच्या अर्धांगिनी, अनेक वेळा भाऊंचे घरी,बोर्डीला राहून,वैद्यकीय उपचार घेऊन गेलेल्या आहेत. ते  सहाजिकच होते,  ती कृतज्ञता होती. मात्र आपल्या गावांत, वा परिसरात,कोणीही व्यक्ती, कोणत्याही वेळी, घरी आली, तर प्रसंगी मोफत इलाज करून त्यांनी अशा लोकांना सेवा दिली. दवाखाना बंद असला तरी आपल्या घरीदेखील भाऊ रुग्णाईतावर उपचार करीत.  

     बोर्डी हायस्कूलमध्ये शरीरशास्त्र व आरोग्य शास्त्र हे (Physiology and Hygiene),विषय शिकविण्यासाठी, त्याकाळी पदवीधर शिक्षक नसल्याने, भाऊ बोर्डी हायस्कूलमध्येदेखील हे दोन विषय विद्यार्थ्यांना शिकवीत असत! मीही, त्यांचा असा भाग्यवान विद्यार्थी आहे. गंमत म्हणजे, हायस्कूलमध्ये  यावेळी  बाकी सर्व विषय शिकविण्यासाठी,मराठी व गुजराथी  विद्यार्थ्यांसाठी, वेगळ्या तुकड्या होत्या.फक्त भाऊंचा, ‘शरीरशास्त्र  व  आरोग्य’,एकच विषय असा होता,जेव्हां,मराठी व गुजराथी अशा दोन्ही तुकड्यांचे आम्ही विद्यार्थी एकत्र बसत असू. भाऊ प्रथम मराठीतून व नंतर गुजराती मधून,तोच विषय,अस्खलितपणे मांडत असत.गुजराथी भाषेवर त्यांचे तेवढेच प्रभुत्व होते.त्यामुळे भाऊंच्या शिकवण्यामुळे  विषय  तर  व्यवस्थित समजलाच,पण  आम्ही  सर्व विद्यार्थी,  उभय भाषा, उत्तम तऱ्हेने  बोलू  लागलो.आपल्या विषयाचे त्यांचे ज्ञान अगदी पक्के होते.वयाच्या सत्तरीपर्यंत, सायकलवर बसून, ते शाळेत येत.शिकविताना भराभर आकृत्या काढून विषयाची माहिती अगदी सोप्या पद्धतीने आम्हाला मिळे. तसा हा रुक्ष विषय पण भाऊ मध्ये मध्ये काही गमती सांगून, वर्गात हास्य तुषारांचा शिडकावा करीत  विषय शिकवीत. पद्मभूषण ताराबाई मोडक यांच्या कोसबाड येथील बाल सेविका ट्रेनिंग कोर्स, त्याचप्रमाणे कृषी विद्यालयात व बोर्डीच्या ट्रेनिंग कॉलेज मध्येही भाऊ हे विषय शिकवीत असत. कोसबाडला ते टांग्याने जात व शिकवून झाले की, तेथेही  कोणा गरजू रुग्णाला, औषधपाणी व मलमपट्टी करीत. विशेषतः आदिवासी बांधवांना याचा खूप फायदा होई. बहुतकरून विनामूल्य सेवा त्यांना डॉक्टरांकडून मिळत असे. या विषयाबरोबरच, ते एक दोन  पीरियड्स, ‘आहार शास्त्राचे’ महत्व व त्या संबंधी काही महत्त्वाच्या टिप्स देत असत. आजपासून सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीच्या त्या काळात, आम्ही त्यांचेकडून, पदार्थांतील पोषकतत्वे, शरीराला आवश्यक आहार, कोणत्या भाज्या व फळांमधून कोणती पोषणमूल्ये मिळतात. विशेषतः,आमच्या परिसरात होणाऱ्या विविध पालेभाज्या फळे  इत्यादींचा  वापर  कसा  करता येईल, फळांच्या सालीचे महत्त्व, मोड आलेल्या धान्यांचे महत्त्व, पालेभाज्या व पदार्थ शिजविण्याची पद्धत, याबाबत आम्हाला शालेय वयातच, त्यांच्याकडून अमूल्य माहिती मिळाली. आज त्यांच्या दूरदृष्टीची आठवण होते. आदर दुणावतो. मला वाटते, भाऊंनी हे सर्व ज्ञानदान, विनावेतन केलेले आहे.

        त्यावेळी खादी ग्रामोद्योग संघटनेचे मुख्य कार्यालय ठाणे या जिल्ह्याच्या ठिकाणी होते. त्यांचे केंद्र भाऊंनी, मुद्दाम बोर्डीमध्ये ठेवण्याची विनंती शासनाला केली होती. भाऊ, खादी ग्रामोद्योग संस्थेचे जिल्हा संघटक, म्हणूनही  काम पहात असत. या केंद्रामार्फत मधुमक्षिकापालन उद्योग, शेतकऱ्यांना एक जोडध॔दा म्हणून मिळत असे. येथेही भाऊंची दूरदृष्टी होती कारण आमचा बोर्डी,घोलवड  बोरिगाव,हा परिसर फुला फळांच्या बागांनी भरगच्च बहरलेला, निसर्गाचा, वरदहस्त लाभलेला, सुजलाम् सुफलाम्, भूप्रदेश आहे. मध संकलनाचे काम येथे खूप जोरात होते .लोकांनाही शुद्ध, सात्विक,मकरंद मिळतो व चार पैसेही कमावता येतात. आजही अनेक शेतकरी हा जोडव्यवसाय म्हणून करत आहेत.

        बोर्डी गावांत ‘शेतकरी सहकारी सोसायटीची’ स्थापना कोणी, कधी केली, ते मला निश्चित माहीत नाही. साधारणपणे 1950 ते 60 या कालखंडात भाऊ त्या सोसायटीचे अध्यक्ष होते.. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, खात्रीचे व किफायतशीर भावाने मिळावे, हाच मुख्य हेतू होता. तो सफलही झालेला आहे. सर्वसामान्य जनतेला रेशन, शिधावाटप, रास्त भावात  व चांगल्या दर्जाचे मिळावे हे ध्येय,  भाऊ व त्यांच्या संस्थापक सदस्यांनी ठेवले होते. ठाणे जिल्ह्यातील, अगदी सुरुवातीसच, स्थापन झालेल्या, अशा मोजक्या शेतकरी सहकारी सोसायटीत, आमची बोर्डीची ही सोसायटी आहे.’सहकारी सोसायट्यां’चा कालखंड  त्या वेळेपर्यंत आला नव्हता. तरीही काळाची पावले ओळखून, गावांतील धुरिणांनी, या सोसायटीची स्थापना केली. ही सोसायटी, आज गावाला वरदान ठरली आहे. शेतकरी व सामान्य नागरिक यांना बी-बियाणे, खते, तांदूळ, गहू  इतकेच नव्हे तर अगदी  स्वयंपाकाचा गॅस देखील  सोसायटीमार्फत  पुरविला जातो.

  1955-60  च्या कालांत मी हायस्कूलमध्ये शिकत होतो. आम्हा कुटुंबीयांचे वास्तव्य,भाऊंच्या जुन्या वडिलोपार्जित घरी,म्हणजे आज जेथे सोसायटीचे गोदाम आहे, त्याच्या मागील बाजूस असलेल्या घरांत होते. भाऊंचे हे घर त्यावेळी रिकामी होते. आमचे त्यावेळचे राहते घर, खूपअडचणीचे, अभ्यासाला गैरसोयीचे व आप्पांच्या प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टीने देखील योग्य  नव्हते. भाऊंनी आपले पहिल्या मजल्यावरील निवासस्थान,आम्हाला राहण्यासाठी, बिना भाड्याने दिले होते. हे, भाऊंचे आम्हां कुटुंबीयांवरील मोठे उपकारच आहेत. आप्पांच्या मनाला खरे तर ते योग्य वाटत नव्हते पण भाऊंचा प्रेमळ आग्रह त्यांना अव्हेरता आला नाही. त्याबदल्यात आप्पांनी भाऊंच्या मुलांना शिकवणी देऊ केली. भाऊ त्याचे पैसे घेण्याचा आग्रह करीत होते, पण आप्पांनी ते साभार नाकारले. भाऊंच्या या उपकारांची, त्यांनी केवळ अंशतः फेड केली.

        ते दिवस आजही डोळ्यासमोर येतात. मी त्या माडीवर कंदील घेवून अभ्यास करीत असे कारण त्यावेळी वीज आलेली नव्हती. भाऊ साधारण,संध्याकाळीच, सहा ते सात या दरम्यान रेशनिंग बंद झाल्यावर, माडीवरच असलेल्या, एका लहान खोलीतील ऑफिसांत,दिवसाचा हिशोब व ताळा पाहण्यासाठी येत असत.त्यांचेबरोबर, श्री दा. म. पाटील गुरुजी, जे सोसायटीचे खजिनदार होते, तेही येत असत. ही जोडगोळी कधीकधी रात्री दहा अकरा वाजेपर्यंत, हिशोब लिहिण्याचे काम पूर्ण करूनच, घरी जात असत. फक्त पैशाचा हिशोब  नव्हे,तर विकल्या गेलेल्या व शिल्लक असलेल्या मालाचा ताळमेळही पडताळला जाई(INVENTORY CONTROL). त्यावेळी, मला त्यांतले काही कळत नव्हते. मात्र भाऊ आणि पाटील गुरुजी आपला अमूल्य वेळ खर्च करून तासन तास, येथे का बसतात याचे कोडे उलगडत नव्हते. दोघांचेही खूप अप्रूप वाटे. आज ते दिवस आठवले म्हणजे आदराने मान खाली लवते. महाराष्ट्रातील सहकारी सोसायट्या, सहकारी बँकामध्ये आलेली भ्रष्टाचाराची लाट, आणि लोकांचा पैसा लुबाडून, झटपट श्रीमंत होण्याची सहकार सम्राटांची मस्ती बघून, भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी  घेतलेल्या कष्टांची प्रकर्षाने जाणीव होते. अशा भक्कम, पायावर ही आमची सोसायटी उभी असल्यामुळे,आजही, या जुन्या  संस्थेचा व्याप व कार्यविस्तार दिवसेंदिवस वाढतोच आहे. भाऊंच्या सारख्या अनेक, निरलस, कष्टाळू, कार्यकर्त्यांच्या सचोटीच्या कामाची ही पावती आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत.

बसलेले:डावीकडून,.. मुकुंदराव सावे, अण्णासाहेब वर्तक, तात्यासाहेब चुरी,नारायणराव म्हात्रे, बळवंतराव वर्तक, गोपाळराव पाटील.
उभे: डावीकडून,..श्री हि बा पाटील, मदनराव राऊत, आत्माराम पंत सावे, भास्करराव राऊत, व डॉक्टर दीनानाथ चुरी.

        आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नति संघाची स्थापना, एकोणीसशे वीस 1920,साली झाली. भाऊंचे वय त्यावेळी शिक्षण घेण्याचे होते. मागे  सांगितल्याप्रमाणे  ते तात्यासाहेब चुरी यांचे मुंबईतील निवासस्थानी  शिक्षणासाठी राहिले होते. त्यामुळे त्या विद्यार्थिदशेतच त्यांचा, तात्यासाहेब व त्यांचे घरी येणारे  समाजधुरीण  मा. अण्णासाहेब वर्तक, नारायणराव म्हात्रे, बळवंतराव वर्तक, भास्करराव राऊत, या नेत्यांशी परिचय झालेला होता. सन्माननीय मुकुंदराव सावे, गोपाळराव पाटील, मदनराव राऊत, आत्माराम पंत सावे ही बोर्डीकर मंडळी त्यांच्या परिचयाची होतीच. याच मंडळींनी, सोमवंशी क्षत्रिय समाज उन्नती संघाची व ट्रस्टची स्थापना करून,ठाणे जिल्हा व बाहेर पसरलेला हा समाज एकत्र आणण्याचे व  समाजांतील व्यसनाधीनता व शिक्षण  याबाबतीत मार्गदर्शन केले आहे.या लेखासोबत दिलेल्या छायाचित्रात, भाऊ, या सर्व माननीय मंडळी बरोबर दिसत आहेत. भाऊ हेच, या सर्वांत तरूण कार्यकर्ते असून, अगदी सुरुवातीपासूनच समाजकार्याशी  बांधील राहिले आहेत. पुढे भाऊंनी संघाचे चिटणीस, विश्वस्त, अशी बहुमानाची पदे भूषविली व अखेरपर्यंत समाजाच्या कामाशी ते निगडित होते. त्या वेळच्या त्या कथा भाऊ मला कधीतरी फावल्या वेळेत, त्यांच्या सेवानिवृत्तीच्या, अखेरच्या कालखंडात सांगत असत.

 त्या काळी आमच्या समाजातील बहुतांशी मंडळी अशिक्षित व व्यसनाधीन असल्यामुळे, स्थिती हलाखीची होती. विशेषतः सफाळा स्टेशनचे पूर्वेकडील परिसरांतील आमचे बांधव पाण्याचेही दुर्भिक्ष असल्याने, खूपच कष्टाचे व समाजापासून अलिप्त, असे जीवन जगत होते. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे मोठे आव्हान होते. भाऊ सांगत, ते व त्यांचे सहकारी, सुट्टीच्या दिवशी, आपल्या बरोबर, पुस्तके, वह्या, कपडे यांचे गठ्ठे सोबत घेऊन,  विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी  घेऊन जात. प्रसंगी, त्यांना स्वतःलाच ही ओझी उचलावी लागत. रस्तेच नव्हते तर वाहने कोठून मिळणार? त्यावेळी कधीतरी, “मॅजिक लॅन्टर्न”  नावाचे, पडद्यावर प्रतिमा  उमटविणारे उपकरण ते घेऊन जात. ‘करमणूकीतून लोकांचे प्रबोधन’, करणे असा उद्देश असे. सुरुवातीला त्याचा  विपरीत परिणाम  होऊ लागला. ही मंडळी, जादू-टोणा करणारी आहेत, आपल्याला व मुलांना, यांचेपासून धोका तर नाही ना? अशी भावना लोकांची  होऊ लागली  मात्र काही  दिवसांनी त्यांना, या मंडळीच्या कामातील  प्रामाणिपणा व उपयुक्तता पटली. प्रतिसाद उत्तम मिळू लागला. लष्कराच्या भाकऱ्या भाजताना अशा अनेक मजेशीर अडचणींतून त्यांना जावे लागले. पण त्यांनी आपले काम थांबविले नाही. पुढे संघाची स्थापना झाल्यावर गरजू लोकांना शिक्षणासाठी पैशाच्या रूपात ही मदत मिळू लागली. जसजसा शिक्षण प्रसार होऊ लागला, अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता ही कमी झाली. आज हाच परिसर, शिक्षणाचे बाबतीत सर्व समाजात अग्रेसर असून, या परिसरातील अनेक तरुण, सुशिक्षित मंडळी, देशात व परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेली आहेत. भाऊ सारख्या अनेक समाजसेवकांनी त्या वेळी केलेल्या अथक परिश्रमाचे चीज झाले आहे, त्यांना ही मानवंदनाच आहे!

1940 च्या दशकांत, लोकजागरणासाठी व लोकशिक्षणासाठी वापरांत असलेले हे मॅजिक लॅन्टर्न, कै.भाऊ व त्यांचे सहकारी गावागावांतून शिक्षण प्रसार, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता निर्मूलनकार्यासाठी वापरीत असत.

        भाऊंनी मला सांगितलेले एक वाक्य समाजाचे काम करताना माझ्या कायमचे लक्षात राहिले आहे भाऊ मला म्हणाले होते.  “दिगू, सामाजिक कामात पैसा वापरतांना, कार्यकर्त्याची भूमिका, ही गव्हाणीतील कुत्र्यासारखी असली पाहिजे. The Barking Dog in the Manger… मी खाणार नाही, व कोणालाही खाऊ देणार नाही!” मी विश्वस्त झालो त्यावेळी भाऊंचे हेच वाक्य कानांत गुणगुणत असे,  ती भूमिका प्रामाणिकपणे निभावली हे नम्रपणे नमूद करु शकतो.

        भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आमचे बोर्डी  गाव आघाडीवर राहिले आहे.  अनेक बोर्डीकर स्वातंत्र्यसैनिकांनी,मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी तनमनधन अर्पण केले.  तो काळ भाऊंच्या उमेदीचा होता, नुकतेच शिक्षण पूर्ण झाले होते. विवाह झाल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी होती. माननीय भिसे, चित्रे, मुकुंदराव सावे,  यांच्या  आवाहनाला  भाऊंनीही प्रतिसाद दिला.अनेकांनी ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरूद्ध  प्रतिकार करताना  तुरुंगवासही भोगला. भाऊनांही त्या उमेदीच्या  वर्षांत, कारावास भोगावा लागला. तरुण वय, नुकतेच लग्नही झालेले, घरची परिस्थितीही यथा तथा,अनेकांची जबाबदारी माथ्यावर. कसलीही तमा न बाळगता, केवळ, गांधीजींच्या आदेशाचे पालन, करण्यासाठी, ही मंडळी खुषीने तुरुंगात गेली. विशेष गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यानंतर देऊ करण्यात आलेले ‘स्वातंत्र्य सैनिकांचे पेन्शन’, भाऊंनी नाकारले. “मी तुरुंगात गेलो ती माझी इच्छा होती, मायभूमीसाठी कर्तव्य होते, त्यासाठी मोबदला कसला?” 

        विनोबाजींच्या ‘भूदान यज्ञ’, चळवळीत, आमचे बोर्डी गाव आघाडीवर होते. 1950च्या त्या शतकांत, आचार्य शंकरराव देव आमच्या गावात पदयात्रा करून, ‘भू दाना’ चे  आवाहन करीत होते. भाऊंनी आपल्या सकस भातशेतीच्या जमिनीतील,एक मोठा तुकडा, आपल्या शेतीवर काम करणाऱ्या गड्यांसाठी, दान केला. ही गोष्ट देखील, त्यांच्या, ‘आधी केले, मग सांगितले’, या स्वभावाचे द्योतक आहे!

        आमच्या बोर्डी गावात, विजयस्तंभावर दर वर्षी,  15 ऑगस्ट रोजी, ध्वजवंदन होते. त्यावेळी गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी देखील झेंडा वंदनासाठी येतात. भाऊ हयात असेपर्यंत या सर्वांना चहापानासाठी आपल्या घरी घेऊन येत. कित्येक वर्षे ही प्रथा चालली. त्यानिमित्ताने, पद्मश्री अनुताई वाघ, ताराबाई मोडक, स्वामी आनंद, भिसे गुरुजी, चित्रे गुरुजी,यासारखी अनेक थोर व्यक्तिमत्वे, त्यांच्या घरी पायधूळ झाडून गेलेली आहेत. त्याशिवाय, बोर्डी  गावात, काही काळासाठी वास्तव्यासाठी आलेल्या, अनेक विद्वानांनी,  लेखक कवींनी, त्यांच्या घरामागे असलेल्या, बंगल्यात वास्तव्य केले. डॉक्टर सुलभा पाण॔दीकर,कविवर्य ग. ह. पाटील, आचार्य काका कालेलकर, ही, त्यांतील काही नावे. कविवर्य ग. ह. पाटलांचे घरी आलेल्या पाहुणेमंडळीत, भारतरत्न धोंडो केशव कर्वे, कवी सोपानदेव चौधरी, ह्यांनी आपल्या पदस्पर्शाने, तो परिसर पावन केलाआहे. ती हकीकत पुढे, माझ्या, कविवर्य ग. ह. पाटील यांचे आठवणीं संबंधित लेखांत येईलच. त्याशिवाय भाऊंच्या सामाजिक कार्याच्या निमित्ताने, सोमवंशी क्षत्रिय समाजातील अण्णासाहेब वर्तक, तात्यासाहेब चुरी अशी दिग्गज मंडळी नेहमीच कामानिमित्त बोर्डीत आली की त्यांचाही मुक्काम भाऊंच्या घरीच असे. प्रत्येक अतिथीची काळजी व्यवस्थित घेण्याबाबत भाऊंचा कटाक्ष असे. त्यासाठी ते घरांतील मुलांनाही  कामाला लावीत. मात्र या सर्व कामाचा ताण, पत्नी नर्मदा काकूंवर निश्चितच पडे. त्या माऊलीने अत्यंत सोशिकतेने हे सर्व केले. पाहुणचारांत कधीच काहीही उणे पडू दिले नाही. संगती ही खूप महत्त्वाची. तुम्ही कोणाच्या  संगतीत राहता, यावरून तुमचे चरित्र, चारित्र्य व व्यक्तिमत्व ठरत असते, घडत असते. गतजन्मीच्या व वाडवडिलांच्या पुण्याइने माणसाला संत्संगती मिळते. भाऊंना, ही मोठी माणसे, सतत भेटत गेली. ज्ञानोबांनी म्हटले आहे ना, “बहुत सुकृताची जोडी, म्हणुनी विठ्ठली आवडी!”

        त्या कालांत अरविंद मामा,  भाऊंचे सर्वात धाकटे पुत्र,म्हणजे आमचे सर्व खेळांतील कप्तान होते. बहुतकरून खेळण्यासाठी, मी या परिसरांत नेहमीच येत असे. असेच एकदा खेळत असताना, भाऊंकडे काही कामानिमित्त आलेल्या,अण्णासाहेब वर्तक व तात्यासाहेब चुरी ही दिग्गज मंडळी पहिल्यांदा व शेवटचीच पाहिली. अण्णा साहेबांची ती उंच टोपी, पायघोळ कोट, धोतर अशी मूर्ती, त्याप्रमाणे तात्या साहेबांचा फेटा व बंडी परिधान केलेला, करारी चेहरा आजही डोळ्यासमोर येतात!

        The charity begins at home, या  उक्तीप्रमाणे भाऊंनी समाजसेवेचे व्रत आपल्या कुटुंबापासूनच घेतले. भाऊंचे दोन बंधू, त्यापैकी एक माझे सख्खे आजोबा देवजी व दुसरे काशिनाथ, हे अगदी अकाली निधन पावले. त्यांची मुले उघड्यावर पडली. भाऊंनी काका या नात्याने  या दोन्हीही कुटुंबाकडे  सतत लक्ष ठेवले. माझी मावशी सुनंदा, जिला, आम्ही  गोंडू मावशी म्हणतो, आज 96 वर्षांची आहे. अगदी लहान वयापासून, प्राथमिक शिक्षण व पुढे विवाह होईपर्यंत भाऊंनी तिचे पूर्ण संगोपन केले. भाऊंच्या या उपकाराचे तिने एका वाक्यात महत्त्व सांगितले. ही म्हणते,  “भाऊंनी, त्या काळांत मला आश्रय दिला नसता, तर माझ्या आयुष्याचे मातेरे झाले असते! मुलीला जन्म देणे हा आईचा व मुलीचाही, घोर अपराध आहे, अशा त्या कालखंडात ज्या दुर्दैवी मुलींचे पितृछत्रही हरपले त्या मुलींना आधार केवळ देवाचा. भाऊ देवाच्या रुपाने मावशीला भेटले. त्या काळच्या आठवणी सांगताना मावशी म्हणते,..” आपल्या मुलांपेक्षा भाऊंची बारीक नजर माझ्या अभ्यासावर, प्रकृतीवर असे कारण मला वडील नव्हते. मी माझ्याच  घरांत राहते  असेच मला सदैव वाटले. संध्याकाळी, दवाखाना व इतर सार्वजनिक कामे संपवून,व तेथून थकून भागून, घरी आलेले भाऊ आमच्याशी खूप हसत खेळत वागत असत. आमच्या खाण्यापिण्याची,अभ्यासाची, चौकशी करूनच झोपावयास जात.   मी चांगल्या मार्काने  फायनल परीक्षा पास झाले. मला इंग्रजीचे शिक्षण हायस्कुलात न जाताही मिळाले, याला कारण भाऊ होते. भाऊ मला घरी इंग्रजी शिकवित असत. त्यामुळे मला शिक्षिकेची नोकरी  मिळाली. थोडे दिवस मी ती नोकरी केली देखील, मात्र त्या काळच्या चालीरीतीप्रमाणे, लवकरच लग्न झाल्यामुळे, ती नोकरी सोडून मला भाऊंचा प्रेमळ सहवासही सोडावा लागला.” तिचे यजमान मुंबईत सरकारी नोकरीत असल्यामुळे, तिची विरारमध्ये राहण्याची सोयही भाऊंच्यामुळेच झाली. ज्या ‘वर्तक विहार’, या परिसरात हे कुटुंब राहीले होते त्या इमारती अण्णासाहेब वर्तक यांनी निर्माण केल्या होत्या. केवळ भाऊंच्या शब्दाखातर अण्णासाहेबांनी तेथील एक खोली या नवविवाहित  दाम्पत्याला दिली. आमच्या ज्ञातीतील, अनेक  कुटुंबे, वर्तक विहार परिसरात  निवासासाठी होती. मुंबईत असेपर्यंत याच निवासस्थानी मावशी अखेरपर्यंत राहिली.

        मागे सांगितल्याप्रमाणे भाऊंच्या घरी अनेक वडीलधारी, थोर मंडळी, त्यांच्या सामाजिक कार्यामुळे  येत असत. मावशींला त्या सर्वांच्या सहवासाचा लाभ झाला आहे. त्यांच्या आठवणीही ती खूप कौतुकाने सांगते. भाऊंचे विवाहाच्या संदर्भात एक आठवण मला  तिच्याकडून कळली. भाऊंच्या शिक्षणामुळे  समाजांत  त्यांचे नाव झाले होते. चिंचणीचे  श्री.बाबुराव सावे  त्यावेळी  मुंबई महानगर पालिकेच्या  शिक्षण खात्यात मोठे अधिकारी होते. त्यांची व भाऊंची मुंबईत भेट झाली होती. बाबूरावांचे निवासस्थान दादरला होते. भावी पत्नी  सुशिक्षित असावी, एवढी माफक अपेक्षा, आपल्या भावी वधूबाबत भाऊंची होती. कारण त्याकाळी आमच्या समाजांत मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण अगदीच नगण्य होते. बाबुरावांचे पूर्ण कुटुंब चांगले सुशिक्षित होते. त्यांच्या सर्व भगिनी देखील शिकलेल्या होत्या. नर्मदा सुशिक्षित होती. ह्याच  नर्मदेशी भाऊंचा विवाह पुढे संपन्न झाला. व आम्हा सर्वांच्या  नर्मदाकाकू म्हणून त्या भाऊंच्या जीवनांत आल्या. काकूंची साथ भाऊंना अखेर पर्यंत मिळाली व त्यांचा संसार यशस्वी झाला.

        माझ्या आईने सांगितलेली एक आठवण खूपच मन हेलावणारी वाटते. त्यावेळी या अनाथ मुली, किती अजाण  होत्या याचीही जाणीव होते.आजोबा देवजी बाबा वारले त्यावेळी   माझी आई व गोंडू मावशी प्राथमिक शाळेत दुसऱ्या तिसऱ्या  इयत्तेत शिकत होत्या  व सकाळीच, शाळेत गेलेल्या होत्या, क्रीडांगणावर खेळत होत्या. या मुलींना घरी आणून आपल्या वडिलांचे अंत्यदर्शन घडवावे असेही कोणास वाटले नाही. ज्यावेळी त्यांच्या वडिलांची प्रेतयात्रा,शेतकी शाळेसमोरुन जाऊ लागली, त्यावेळी कोणीतरी मोठ्या जाणत्या मुलीने या दोघा बहिणींना सांगितले, “ही बघा, तुमच्या वडिलांची प्रेतयात्रा जाते आहे,  नमस्कार तरी करा”.  तेवढ्यांत देवाला जसा मनोभावे,मात्र निर्विकार मनाने नमस्कार करतात तसा, दोन्ही हात जोडून नमस्कार केला, आणि, जसे काही घडलेच नाही तसे, सर्व विसरून,  पुन्हा  खेळू लागल्या. घरी आल्यावर मात्र त्यांना काहीतरी गंभीर घडले आहे याची जाणीव झाली. ही आठवण सांगताना आज दोन्ही बहिणींचे डोळे ओले होतात. दोघींनाही,आयुष्यभर सतावणारी, ती एक, दुखरी व्यथा..एक खंत,..” त्यादिवशी आपल्या वडिलांचे तसे अंत्यदर्शन घेताना, एक टिपूसभर तरी पाणी, डोळ्यांत का आले नाही? “…आई दहा वर्षाची, मावशी आठ वर्षाची आणि बाकीची चार भावंडे, वय वर्षे सहा, चार, दोन व सहा महिने फक्त. माझ्या आईचा सांभाळ तिचे दुसरे काका लक्ष्मण बाळकृष्ण चुरी उर्फ नाना यांनी व काकी नानी, यांनीही,खूप प्रेमळपणे केला ती वेगळी कहाणी आहे. 

        भाऊंचा स्वभाव थोडासा तापट, ‘उद्याचे काम आज झाले पाहिजे’ अशा वृत्तीचा. भाऊ  चेहऱ्या वरून गंभीर वाटत असले तरी मनाने मात्र खूप निर्मळ व   सोशिक स्वभावाचे होते. आयुष्यात काढलेल्या अनेक काबाडकष्टामुळे त्यांच्या स्वभावात एक  प्रकारचा सडेतोडपणा, स्पष्टवक्तेपणा व नियमितपणा असे. गावांतून ते आपल्या सायकलवरूनच फिरत. डोक्यावर खाकी साहेबी हॅट व  पॅन्ट, बुशशर्ट,चप्पल असा  त्यांचा नेहमीचा साधा खादीचा पोशाख असे. मात्र कधी लग्नकार्य व विवाह समारंभात  डोक्यावर गांधी टोपी असे. काकू अत्यंत शांत व समाधानी वृत्तीच्या. त्यांचे बोलणेही  हळुवार, सौम्य व मोजके. चेहऱ्यावर नेहमी एक खानदानी प्रसन्नता. पाहुण्यांची व घरांतील मुलांची  देखभाल करणे  यात त्या आनंद घेत, कामाचा कधीच कंटाळा केला नाही. काकूंची आयुष्याची सोबत, हा भाऊंच्या यशस्वी व सेवाभावी जीवनाचा मोठा आधार होता. संसार सांभाळताना, इतरांचे संसाराकडे  भाऊंनी लक्ष पुरविले, त्यात काकूंनी दिलेले योगदान खूपच महत्त्वाचे. पत्नीच्या माहेरांतील, दुर्दैवी मुलांनाही भाऊंचे घरी आश्रय मिळाला होता. काकूंच्या, चिंचणी येथील ज्येष्ठ भगिनी व त्यांचे यजमान,दोघेही अकालीच गेले. त्यांची दोन्ही मुले उघडी पडली. त्यांचाही भाऊंनी सांभाळ करून त्यांना मार्गी लावले आहे. आपली मुले व दुसऱ्यांची मुले  असा आपपरभाव भाऊंनी कधीच बाळगला नाही.त्यामुळे, आजही भाऊंच्या आश्रयाला राहून मोठी झालेली ही  पिढी  व त्यांची पुढची ही पिढी, कै.भाऊंचे स्मरण मोठ्या कृतज्ञतेने करते, यावरूनच भाऊंनी त्यांचा सांभाळ किती आत्मीयतेने केला असेल,याची कल्पना येते. माझ्या मावशीची, भाऊ व काकूंबद्दलची, कृतार्थतेची भावना, मी वर सांगितली आहे. आजकाल इतक्या सद्भावनेने व कृतज्ञतापूर्वक, कोणाबद्दल, क्वचितच बोलले जात असेल  ! 

        भाऊंना तीन मुलगे व एक कन्या. मोठे ज्येष्ठ चिरंजीव वसंत बंधू  व पत्नी कांचन, ऊर्फ माई,  दोघांनीही मुंबईत  प्रख्यात शिक्षण संस्थांमध्ये  ज्ञानदानाचे पवित्र काम केले. दुसरे चिरंजीव डॉक्टर रमेश दादा, यांनी भाऊंचा,वैद्यकीय व्यवसायाचा, वारसा यशस्वीपणे पुढे चालविला. आमच्या बोर्डी, झाई परिसरांतील, एक निष्णात  डाॅक्टर,म्हणून त्यांनी आयुष्यभर सेवा दिली. दादांच्या  पत्नी,  श्रीमती मालती चुरी या, प्रख्यात समाजसेवक,शिक्षण तज्ञ, बोर्डी हायस्कूलचे एक संस्थापक.  कै.आत्माराम पंत सावे यांच्या कन्या. मालतीबाईं, बोर्डी  शाळेतच अध्यापिका  म्हणून काम करून, प्राचार्या म्हणून निवृत्त झाल्या. मालतीबाईंच्याच  मार्गदर्शनाखाली मी हायस्कूल मधील माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला. त्याच आमच्या, त्यावेळच्या ‘आठवी ड’व ‘नववी ड ‘ या वर्गांच्या,सतत दोन वर्षे वर्गशिक्षिका होत्या. माझ्या आवडत्या व शिस्तप्रिय बाई, म्हणून त्यांचे विषयी आजही मला सदैव अभिमान व आदर राहिला आहे. धाकटे चिरंजीव अरविंद हे टेक्स्टाईल इंजिनिअर होते. त्यांनी  मुंबईत वस्त्रोद्योगव्यवसायांत,’डाईंग मास्टर'(Dying Master),सारख्या, खूप मोठ्या  हुद्द्यावर  सुरुवातीला नोकरी व नंतर सल्लागार म्हणून काम केले आहे. त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई  याही उच्चशिक्षित असून त्यांनी गृहिणी म्हणूनच राहणे पसंत केले. 

        अरविंद मामा, हे मला मामापेक्षा, एक मित्र म्हणूनच खूप जवळचे होते. आमच्या वयांत एक दोन वर्षाचाच फरक असल्यामुळे, सर्व खेळांत ते सहभागी असत. उत्कृष्ट क्रिकेटपटु व दिलदार मित्र! असा मित्र, मामा म्हणून मिळणे हेही मोठे सद्भाग्य! सर्वांत धाकटी,एकुलती कन्या, उज्वला  शास्त्र विषयात पदवीधर असून मुंबईच्या प्रख्यात,  ‘पार्ले टिळक माध्यमिक  विद्यालयात’, शिक्षिका म्हणून उत्तम काम केले. ‘चुरी बाईं’ चे नाव आमच्या पार्ल्यात  आदराने घेतले जाते. यजमान श्रीयुत विवेक चुरी, उच्चशिक्षित असून, मुंबईतील एका प्रख्यात रासायनिक उद्योगात, वरिष्ठ पदावर काम करून, निवृत्त झाले. भाऊंची नातवंडे ही आता आई-बाबा झाले असून देशांत व परदेशांत आपल्या आजोबांची कीर्ती पताका फडकवीत आहेत. भाऊंची कन्या, सौ. उज्वला, आज हयात आहे. दुर्दैवाने तिघेही चिरंजीव आज या जगात नाहीत.

        कॉलेज शिक्षणासाठी, मला दादर येथील, पूज्य तात्यासाहेब चुरी वसतीगृहात रहावे लागले. कालांतराने, तेथेच पूज्य अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर व्यवस्थापक व वसतिगृहात रेक्टर म्हणून चार वर्षे काम पाहिले. त्या काळात भाऊंबरोबर, बोर्डीस आल्यावर भेट होत असे. भाऊही खूप आस्थेने चौकशी करीत,मार्गदर्शन करीत.अभ्यासातील प्रगती बरोबरच, सामाजिक कामात, माझ्या योगदानाबद्दल भाऊंना खूप आनंद वाटत असे. सन 1970 साली,बोर्डी येथे, आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचा,सुवर्णमहोत्सव साजरा झाला. त्यावेळेच्या आम्ही ‘तरुण तुर्कांनी’ युवकासाठी एक परिसंवाद आयोजित केला होता.  “तरुणांच्या  समाजाकडून अपेक्षा..” असा काहीसा परिसंवादाचा विषय होता. प्रसिद्ध शिक्षणतज्ञ भानुदास सावे या परिसंवादाचे अध्यक्ष होते व आमच्या समाजातीलच तत्कालीन धुरीण मंडळीदेखील आम्ही काय बोलतो हे ऐकण्यासाठी आली होती. मी देखील माझे विचार, त्या परिसंवादात प्रकट केले.. मात्र तरुण रक्त, व आप्पांचे कडून आलेला स्पष्टवक्तेपणा, त्यामुळे माझे विचार, वरिष्ठ नेत्यांना पटले नाहीत. मंडळी माझ्यावर नाराज झाली. मलादेखील, ‘आपण थोडे जास्त आक्रमकपणे बोललो का?’ असेच वाटले. भाऊ त्या वेळी आजारी होते. कोणत्याच सभा समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. माझे, त्या भाषणांतील विचार त्यांचेपर्यंत कोणीतरी पोहोचविले असले पाहिजेत. कारण तात्काळ दुसऱ्या दिवशी त्यांनी मला, घरी येऊन भेटून जाण्याबद्दल निरोप पाठवला. भेटल्यावर प्रथम त्यांनी माझे अभिनंदन केले. मात्र ज्या ‘अतीस्पष्टवक्तेपणाने’,  मी विचार मांडले, त्याबद्दल मला स्पष्ट शब्दात समजही दिली. समाजकार्याचे  आपले योगदान देऊन  शरपंजरी पडलेल्या एका भीष्माचार्यांचा  तो अमूल्य सल्ला, मला, आयुष्यात अजूनही उपयोगी पडतो आहे. भाऊंनी मला सांगितले, “नुसती वैचारिक बैठक किंवा स्पष्टवक्तेपणा असून सामाजिक कार्य करता येणार नाही, त्यासाठी थोडा मुत्सद्दीपणाही दाखवावा लागतो, हे लक्षात ठेव!” भाऊंना काय म्हणायचे होते ते मला कळले. भावी जीवनात हा उपदेश मी माझ्यापरीने पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा मला खूप फायदाही झालेला आहे. संस्कृतमध्ये एक सुभाषित  आहे

    सत्यम ब्रुयात, प्रियम ब्रूयात!  अप्रिय सत्यम् न ब्रूयात!! 

 सत्य बोलावे, पण ते प्रियही असले पाहिजे. अप्रिय सत्य कोणालाच आवडत नाही, म्हणून ते  टाळावे.  प्रत्येक वक्त्याने आपल्या वागण्या, बोलण्यात व भाषणांत ही गोष्ट सांभाळली तर मला वाटते, जगातले खूपसे वाद संपुष्टात येतील. 

“सतत काहीतरी करत राहा, आळसात वेळ घालवू नका,जे काही करावयाचे ते तरुणपणीच केले पाहिजे, संधी आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाही!”.. असेच भाऊंचे आपल्या मुलांना व समाजाला सांगणे होते. त्यांनी स्वतः तसे केले होते, त्यामुळे ते सांगण्याचा त्यांना अधिकारही होता.

सदयता,परोपकार निष्काम कर्म आणि दान यांचा बडिवार आमच्या संस्कृतीत आहे. साधुत्वाची, दातृत्वाची आमची कल्पना, सर्वांना सहजपणे काहीतरी देण्याची आहे. ईश्वर सर्वांभूती आहे असं मानून सर्व जीवमात्रावर प्रेम करण्याची आहे. म्हणूनच,

     जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. 

अशी देवत्वाची खूण सांगितली जाते.आपला स्वार्थ, स्वतःपुरता फारतर कुटुंब आणि परिवारापुरता विस्तारतो.पण ओळखदेख नसतानाही भोवतालच्या गरीब, निर्धन परिवारांना,आपली वैद्यकीय सेवा, प्रसंगी फुकट देण्यासाठी मनाचे औदार्य  लागते. स्वतःच्या मर्यादेपलीकडे पुढे यावे लागते. आज अशी माणसे   समाजांत खूप विरळाच झालेली आहेत. म्हणून भाऊंसारख्या, ‘देण्याची वृत्ती’ ठेवणाऱ्या माणसांचे स्मरण, आवश्यक ठरते. भाऊंच्या काळांतील पोषण संस्कृतीला आज, ‘शोषण संस्कृतीचे’ रूप आले आहे. त्यासाठी समाजात समाजचिंतकांना प्रथम उभे राहावयाचे आहे. म्हणूनच भाऊंसारख्यां समाजसेवकांची उपयुक्तता जाणवते.

        आमचा भारतीय समाज व भारतीय संस्कृतीचा, मानवी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, केवळ इहवादी, यांत्रिक नाही. तो भावनिक आहे.सहजपणे भारतीय माणूस तत्वज्ञान जगत असतो. आपण एकटेच जगत नाही, तर भोवतीच्या समाजाला व निसर्गालाही तो तसे जगवतो. म्हणूनच संत तुकारामासारखा योगी म्हणतो,” वृक्षवल्ली आम्हा, सोयरी वनचरे..” तर, ‘जीवनाचे आपल्यावर ऋण आहे’, असे म्हणत, एक साधा कवी देखील सहज म्हणून जातो ….

      ऋण नक्षत्रांचे असते आभाळाला,

      ऋण फळा फुलांचे असते या धरतीला,

       ऋण फेडायचे, राहून माझे गेले, 

      ॠण फेडायास्तव, पुन्हा पाहिजे मेले !!

भाऊंनी ह्याच  ‘ऋणानुबंधां‘ ची आयुष्यभर जाणीव ठेवून, ते फेडण्याचा हयातभर प्रयत्न केला. आपले जीवन सार्थकी लावले.  खऱ्या अर्थाने त्यांचे स्मरण करावयाचे असेल, तर हीच, “आयुष्याचे ऋण”, फेडण्याची भावना आम्हालाही सतत जपावी लागेल.

भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, आम्हा सर्वांना मिळालेल्या स्मृती चिन्हावरील या चार ओळी पुन्हा उद्धृत करून भाऊंना वंदन करितो. ??

   ऊत्तुंग तुमचे जीवन, घडविते अद्भुत साक्षात्कार, 

   सत्कृतिगुणे आयु मापणे, तुमचे जीवनसार.

   अन्याया पुढे झुकणे नाही, हाची ठाम निर्धार,

   नतमस्तक होऊनी, तुम्हास करितो वंदन आम्ही त्रिवार!!

 भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त (सन,2000) कुटुंबीयांना देण्यात आलेले स्मृतिचिन्ह.

-दिगंबर वा. राऊत, माजी कार्यकारी विश्वस्त, सो.क्ष.स.संघ फंड ट्रस्ट.