कृषीसाधक, सेवाव्रती, डाॅ. जयंतराव पाटील

कृषीसाधक, सेवाव्रती, डाॅ.जयंतराव पाटील
             28 मार्च,1927 – 7 एप्रील,2015

 जगातील खूपच कमी विद्वानांना माहित आहे की विश्वकवी रविंद्रनाथ टागोर हे शेतमळ्यात रमले, दऱ्याखोऱ्यात फिरले. आपल्या शेतीमध्ये काम करणाऱ्या श्रमिक व मजुरांना त्यांनी आपले आप्त मानले.

“परमेश्वर प्राप्तीसाठी मठा-मंदिरात, जप  करण्यापेक्षा, श्रमिकांच्या घामाचे थेंब ज्या भूमीवर पडतात, त्या मातीचा टिळा कपाळाला लावा”, असे ते म्हणत. या जगावेगळ्या, नोबेल पुरस्कार विजेत्या भारतीय कवीची कविता, अखिल भारतीयांची भावकविता झाली होती. भारत मातेची कविता झाली होती!!  गीतांजलीच्या एका कवनात रवींद्रनाथ म्हणतात,

“Leave this chanting and singing and telling of beads.  He’s there, where the tiller is tilling the hard ground and where the pathmaker is breaking stones ..come down on the dusty soil”

     रस्त्यावर खडी फोडणाऱ्या कामगारांच्या सावलीत देव उभा आहे. शेत नांगरणाऱ्या कृषीवलाच्या पाठीशी देव उभा आहे. देवासारखा थोडा धुळीने माखून घे. देव तुला धनीकांच्या दरबारात नाही, मजुरांच्या दारात भेटणार आहे!”

    रवींद्रनाथ हे लोकनिष्ठ लोक कवी होते हे जग सुंदर करण्याच्या निश्चयाने, निढळाचा घाम गाळणाऱ्या श्रमदेवतेचे ते उपासक होते. या भारतातील घरेदारे, शेतमळे, फुलेफळे, आनंदाने भरून येऊ दे, देशाचे सुपुत्र आणि सुकन्या एका दिलाने नांदोत, सर्वांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा, स्वप्ने, आश्वासने सत्य प्रेरित असोत, अशी प्रार्थना करणाऱ्या टागोरांची कविता ही पसायतदानाच्या कुळीतील होती. आणि म्हणून ही कविता भारताच्या घराघरात गुणगुणली जात होती. नाव हाकारणारा कोळी, दळणकांडण करणारी मोलकरीण, शाळेत शिकणारी मुले, मळ्यात राबणारा शेतमजूर, सर्वांच्या मनी-मुखी ती होती. 

   टागोरांच्या स्वप्नातील असा भारत प्रत्यक्षात उतरावा म्हणून देशांतील अनेक विचारवंत, कीर्तीवंत खेड्यापाड्यातून हा संदेश भारतवासीयांना देत होते. 

   स्वातंत्र्य पूर्वीचा तो काळ होता. आमच्या बोर्डी गावी आचार्य भिसे, आचार्य चित्रे, प्रिं. सावे या गुरुवर्यांनी आपल्या गुरुकुलांतून हीच शिकवण आपल्या शिष्यांना देण्याचे व्रत सुरू केले होते.

   त्यांच्या अनेक शिष्योत्तमांनी, प्रथम दास्यशृंखलेत अडकलेल्या आपल्या भारतमातेला स्वतंत्र करून, तिला सुजलाम सुफलाम करण्याचा ध्यास  घेतला होता. आचार्यांप्रमाणेच कामासाठी भटकावे लागले तरी, शेवटी आपल्या कामाचा केंद्रबिंदू हा बोर्डी घोलवड, कोसबाड हाच असेल ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांच्या या शिष्य परंपरेतील सुप्रसिद्ध दोन  नावे म्हणजे, पद्मश्री हरिश्चंद्र पाटील व डॉक्टर जयंतराव पाटील ही होत!!

    “आपण सारे विश्वस्त आहोत. आपण नेहमी देत गेले पाहिजे. जो दानी, परोपकारी, विश्वासू आणि वैश्विक दृष्टि  लाभलेला आहे तोच जगाला काहीतरी देऊ शकतो. खऱ्या अर्थाने तोच विश्वस्त असतो!!

  “पद ,पैसा, सत्ता आणि संपत्ती पासून दूर राहूनच खरी  प्रतिष्ठा मिळते.  सामाजिक बांधिलकी आणि समर्पणाच्या भावनेतून सतत कार्यशील राहिले म्हणजे सार्वत्रिक आदर आणि प्रेम लाभते जीवन सार्थकी लागते…”  हीच या आचार्यांची आपल्या समस्त शिष्यांना शिकवण होती. आचार्यांनी स्वतः, ती आयुष्यभर अवलंबिली. त्यांच्या या शिष्यांनी देखील तसेच केले.

    आचार्य भिसे यांच्या प्रेरणेने पद्मश्री हरिश्चंद्र पाटील, बोर्डी शाळेत सुरू झालेल्या शेतकी विभागात, शिकविण्याचे  काम करीत असताना, पुढे कोसबाड येथील विशाल प्रांगणात, प्रत्यक्ष जमिनीवर मेहनत करण्याचे शिक्षण देणाऱ्या शाळेत त्यांनी शिकविले. 1951 साली,हरिश्चंद्र पाटील जपान मध्ये तेथील भात शेतीचा अभ्यास करण्यासाठी गेले. भारतात परत आल्यावर, कोसबाड आणि कोरा केंद्र बोरिवली येथे जपानी भातशेतीचे यशस्वी प्रयोग करून दाखविले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, या महाराष्ट्रातील पहिल्या कृषी विद्यापीठाचे, पहिले कुलगुरू होण्याचा मान पद्मश्री हरिश्चंद्र पाटील यांना मिळाला होता.  1967 साली  पद्मश्री हा पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांना गौरविले… भारतांतील शेती उद्योगात त्यांचे योगदान खूप आहे. अखेर पर्यंत त्यांची सेवा बोर्डी कोसबाड या त्यांच्या कर्मभूमीला मिळाली .

    पद्मश्री हरिश्चंद्र पाटील आमच्या सो क्ष संघ फंड ट्रस्टचे विश्वस्त असताना, त्यांच्याशी परिचय दृढ झाला. हे महान व्यक्तिमत्त्व जवळून पाहता आले. त्यांचे जीवन कार्यावर ही स्वतंत्रपणे लिहावे लागेल.  

   पद्मश्री हरिश्चंद्र पाटलांचे एकेकाळचे सहकारी व आचार्य भिसे यांची अपूर्ण स्वप्न साकार करण्यासाठी, आदिवासी  वनवासी, शेत मजुरांना चांगले दिवस यावेत, त्यांचे भले व्हावे,याकरिता आपले सर्व ज्ञान, अनुभव, कौशल्य व कीर्तीचा वापर करीत,शेवटपर्यंत बोर्डी, घोलवड, कोसबाड हीच आपली कर्मभूमी मानून, अखेरचा श्वास ही बोर्डीच्याच भूमीत घेणारे, डॉ.जयंतराव शामराव पाटील उर्फ आमचे जयंत दादा, यांना वंदन करण्यासाठी या लेखाचा प्रपंच मी करीत आहे.

       दादांविषयी अनेक विद्वानांनी अनेक प्रसंगी लिहिले आहे, बोलले आहे. दादांनी स्वतः देखील आपल्या विपुल लिखाणातून, आपल्या व्यक्तिमत्त्वाचे व अंगीभूत शालीनतेचे दर्शन घडविले आहे. दादा एक प्रकांड शेतीशास्त्रज्ञ, एक निरलस समाजसेवक व एक जगद्विख्यात  व्यक्तिमत्व कसे होते ,हे सांगण्याचा माझा प्रयत्न नाही. कारण ती माझी योग्यता नाही. मात्र डाॅ. जयंतराव दादा हे माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, व माझ्या भोवताली असलेल्या माझ्या समाजासाठी एक भला माणूस म्हणून मला कसे दिसले, का भावले व त्यांच्या प्रेमाने उपकृत झालेलो आम्ही ,त्यांचे आदरपूर्वक स्मरण करताना, ते प्रेम,अक्षर स्वरूपात कुठेतरी बद्ध व्हावे, एवढाच माझा नम्र हेतू आहे.मी त्यात कितपत यशस्वी झालो हे मला माहीत नाही. मात्र ते कसेही असले, तरी माझा हा प्रयत्न प्रांजळपूर्वक मनापासून केला आहे,याचे मला समाधान आहे.

    महाभारतात आपले गुरु द्रोणाचार्य यांच्या महतीचे वर्णन करताना अर्जुन म्हणतो,

  “यांना राग म्हणजे काय हे माहीत सुद्धा नाही, यांचे अंतकरण इतके सखोल की त्याचे मोजमाप मुष्कील, मायेचा मूर्तीमंत निवास असेल तर तो यांचेच ठायी.या सर्व गोष्टींनी हे श्रेष्ठ असूनही, माझ्यासाठी ते वंदनीय अशासाठी की, आम्हा विषयी ते पूर्ण कृपावंत आहेत,

   ” हा येणे माने महंतु,वरी आम्हालागी  कृपावंतू l”

  मला वाटते, या एवढ्या एका ओळीने,माझ्या दादांच्या विषयी असलेल्या भावना यथार्थपणे व्यक्त व्हाव्यात!!

   पुढे मी सांगितलेल्या काही आठवणीवरून दादांचा आमच्या कुटुंबावर कृपा कटाक्ष होता याची प्रचिती येईल. प्रेम आणि जिव्हाळा देऊन ही माणसांना ऋणी करते येते! 

    जयंतरावांचा( दादा), जन्म 28 मार्च 1927 रोजी बोर्डी मध्ये झाला यावेळी स्वातंत्र्य लढ्याची चळवळ बोर्डीत मोठ्या जोशाने चालू होती. आचार्य भिसे यांचे नेतृत्व तरुणांना स्फूर्ती  देत होते. वडील शामराव पाटील हे त्यात सर्वार्थाने सहभागी झाले होते. चरखा आणि सूतकताई यांचे व्रतच त्यांनी घेतले होते. खादी हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग होते. वडिलांचे हेच संस्कार जयंतरावांनी पुढे चालविले. खादीचा आयुष्यभर अंगीकार केला.

      वडील शामराव, याचप्रमाणे आई जानकीबाई आणि आजी सखुबाई यांच्या संस्कारांचाही दादांचे जीवनावर मोठा प्रभाव होता. घरच्या संस्कारा बरोबरच शालेय जीवनातही पुढे गुरुजनांचे ऊत्तम संस्कार त्यांना लाभले. बोर्डीच्या सुनाबाई पेस्तनजी  हकीमजी हायस्कूल मधील, आचार्य भिसेआचार्य चित्रेआत्मारामपंत सावे, आप्पा साने (साने गुरुजींचे धाकटे बंधू ), असे ध्येयवादी शिक्षक त्यांना मिळाले. आपल्या गुरुजनांच्या शिकवणीचे मूल्य दादांनी सदैव कबूल केले. 

दादांना विद्यार्थी दशेत, लाभलेले दोन महान गुरु, आचार्य चित्रे व आचार्य भिसे गुरुजी!

     जयंतरावांच्या संपूर्ण आयुष्यात एक दुर्मिळ योगायोग दिसून येतो. अगदी बालपणापासून ते अखेरपर्यंत त्यांचे जीवनात प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर,  मान्यवर, सेवाभावी, निःस्वार्थी माणसे त्यांना भेटत गेली. आपल्या पावन स्पर्शाने प्रसंगी उत्तेजनपर शब्दांनीही, दादांचे जीवन संस्कारित व संपन्न केले.दादांनी आपल्या लिखाणात, अनेक ठिकाणी, आपल्याला उपकृत करून गेलेल्या, अशा मान्यवरांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे.

    दादांचे शाळेतील पहिले गुरुवर्य, आचार्य भिसे. आचार्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेशी  घनिष्ठ संबंध होता. दोघांचेही जीवनध्येय, ‘दलित, वंचित, कष्टकरी, वनवासी  यांचेसाठी काहीतरी करावे’, हेच होते. डॉ. आंबेडकर कधीकाळी, सुट्टीमध्ये बोर्डीस विश्रांतीसाठी येत. त्यावेळी त्यांची व्याख्याने बोर्डीत आयोजित केली जात. जयंतरावांच्या संस्कारक्षम मनावर ,डॉ.आंबेडकरांच्या, दलित आदिवासींच्या सेवेसाठी, तरुणांना आवाहन करणाऱ्या विचारांचा, खोल परिणाम झाला असणार. अगदी कोवळ्या वयात आदिवासी व दलितांच्या सेवेचा विचार त्यांच्या मनात रुजला तो या दोन महान लोकांच्या आवाहनातूनच व प्रत्यक्ष सहवासातून!

    मॅट्रिकची परीक्षा चांगल्या रीतीने उत्तीर्ण झाल्यावर मुंबईतील खालसा महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. तिथेही त्यांना श्रीमती सरोजिनी नायडू, कन्हैयालाल मुन्शी अशा दिग्गज लोकांची व्याख्याने ऐकावयास मिळाली. पुढे पुण्यातील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर निश्चितच त्यांना महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांच्या बागायती,शेती व त्यांच्या समस्यांचा अभ्यास करता आला.

    याच काळात पुण्यातील सेवादला मध्ये ते जात असत.तेथील वातावरणात एस एम जोशी, नानासाहेब गोरे,अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, अशा विचारवंत देशभक्तांची भाषणे ही त्यांना ऐकावयास मिळाली. त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या मनावर निश्चितच झाला असणार.

    बी एस्सी ,कृषी, पदवी संपादन केल्यावर, पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून जयंत दादांनी ,’ प्लांट फिजिओलॉजी’,या विषयात एम एस सी, उत्तम रित्या प्राप्त केली.  तेथेही  सुदैवाने त्यांना प्राध्यापक ऊपेंद्र कानिटकर,यासारख्या एका ,’तत्त्वज्ञानी शेतीतज्ञाचे’,  मार्गदर्शन लाभले.

   महात्मा गांधींची  प्रवचने त्यांना ऐकावयास मिळाली, ती याच दिवसात. एके प्रसंगी तेथे ठक्कर बाप्पा ही आले होते.त्यांनी पीडितांसाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले होते. ठक्कर बाप्पांच्या कार्याची ,गांधीजींनी ओळख करून दिल्यावर, जयंतरावांना आदिवासीसाठी कार्य करण्याची प्रेरणा न मिळती तरच ते आश्चर्य ठरले असते! दादांनी एके ठिकाणी म्हटले आहे,” तो दिवस व तो प्रसंग माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा होता!”

    पुढे 1962 साली, कोसबाड विज्ञान केंद्रात काम करीत असतानाच, त्यांना अमेरिकन सरकारची सुप्रसिद्ध ‘फुल ब्राईट शिष्यवृत्ती’, प्राप्त झाली. दक्षिण अमेरिकेतील, कॅन्सस विद्यापीठात त्यांनी एम. एस. ही शेतीशास्त्रातील उच्च पदवी, ‘कृषी विस्तार’ या विषयाचा विशेष अभ्यास करून मिळविली. हा त्यांच्यासाठीच नव्हे तर कोसबाड कृषी विज्ञान संस्था व गोखले एज्युकेशन सोसायटीसाठी मोठा बहुमान होता.

     पुढे 1967 साली  व्हर्माऊंट,अमेरिका, येथे दादांना आमंत्रित केले गेले. अमेरिकन ‘शांती सेनेला’ आहार विषयक विशेष प्रशिक्षण देण्यासाठी हे खास आवतण होते. तोही एक छान अनुभव होता. तेथे त्यांना सहकारी दुग्ध व्यवसायाचाही अभ्यास करता आला. ‘एस्परागस’हे भाजीपाल्याचे मौल्यवान पीक दादांनी भारतात आणले ते इथल्या हवामानात रूजविले. त्याचाही व्यापारी लागवड म्हणून आज खूप उपयोग होतो आहे.

    1971 मध्ये”कम्युनिटी एड अब्रॉड”, या संस्थेने स्कॉलरशिप देऊन त्यांना ऑस्ट्रेलिया भेटीसाठी निमंत्रित केले, भात शेती, वने, दुग्ध व्यवसाय, गवती कुरणे या विषयांचा अभ्यास दादांनी तेथे केला. गवताच्या काही विशेष जाती भारतात आणून त्यापैकी दोन जाती कोसबाड येथे रुजवण्यातही त्यांना यश आले.

   1976 मध्ये, भारत सरकारच्या,’ इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च’, या संस्थेने शिष्यवृत्ती देऊन त्यांना, स्टँन्फोर्डशायर,व लॅन्केशायर, या इंग्लंडमधील परगण्यात, इंग्लंड मधील शेती व दुग्ध व्यवसाय यांचा अभ्यासासाठी पाठविले. इंग्लंड मधील शेती ही व्यापारी तत्त्वावर होत असल्याने तो एक वेगळा अनुभव होता. दादांच्या शिरपेचात हा  मानाचा तुरा होता.

     दादांच्या कामामुळे व भारताच्या सुदैवाने दादांना, हॉलंड मधील समुद्र हटवून केलेले शेतीचे प्रयोग, इस्त्रायल मधील वाळवंटातील शेती व दुग्ध व्यवसाय, फिलिपाईन्स मधील मिश्र शेती अशा जगातील अनेक भूभागात, विविध प्रकारे केल्या जाणाऱ्या शेतीचा अभ्यास करता आला. “जगाची शेती”, या आपल्या पुस्तकात त्यांनी आपले हे अनुभव अत्यंत मनोज्ञ व साध्या, सोप्या शब्दात नमूद केलेले आहेत. महाराष्ट्राच्या साहित्य आणि संस्कृती मंडळानेच हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष श्री. सुरेंद्र बारलिंगे यांनी एका ओळीतच या पुस्तकाची महती सांगताना म्हटले आहे,

  ” हा ग्रंथ प्रसिद्ध करून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ एका अर्थी कृतकृत्य होत आहे!”

   मी दादांचे हे पुस्तक आवडीने वाचले आहे .माझ्या सुदैवाने ज्या इलिनॉय राज्यातील शिकागो शहरात, दादांनी, अमेरिकेतील,’ संकरित मका’ पिकाचा अभ्यास केला, त्याच शिकागो शहरात माझा मुक्काम अनेक वेळा झाल्याने ईलीनाॅय विद्यापीठाच्या,’संकरीत मका’ संशोधन केंद्रांना भेट देण्याचे भाग्य मिळाले. टपोऱ्या दाण्यांनी भरलेली फिक्कट पिवळ्या रंगाची, मक्याची लांबलचक कणसे बघताना, मला त्यावेळी दादांची आठवण आली!

     दादांनी आयुष्यभर अथक केलेल्या या कृषी साधनेचा उपयोग महाराष्ट्र सरकार व भारत सरकारनेही करून घेतला

  • सन 1981 मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना एका विशेष नियुक्ती द्वारे,फलोत्पादन सल्लागार म्हणून नियुक्त केले.
  • सन 1987 मध्ये भारताच्या खादी ग्रामोद्योग मंडळांने त्यांना अध्यक्षपदाचा बहुमान दिला
  • सन 1991 मध्ये भारत सरकारने आपल्या सर्वोच्च नियोजन मंडळात योजना आयोगाचे सदस्य म्हणून दादांची नियुक्ति केली. त्यांना कृषी, ग्रामविकास, सहकार, पंचायत राज, ग्रामीण ऊर्जा आणि जलसिंचन विभागांची  जबाबदारी सोपविण्यात आली होती. या नेमणुकी संदर्भात  तत्कालीन पंतप्रधान श्री नरसिंहराव मी केलेले भाष्य बोलके होते.ते म्हणाले होते,

  ” Fortunately, we have a very knowledgeable Dr,Jayant Patil, Who with his long practical experience ,would make a great contribution in agricultural sector for improving its productivity and also for the generation of employment in rural areas”

     दादांनी नियोजन मंडळावर पाच वर्षे उत्तम काम करून आपल्या पंतप्रधानांचा विश्वास सार्थ ठरविला.

   बोर्डी ग्रामस्था तर्फे झालेल्या सत्कार समारंभात,अध्यक्ष श्री राधाकृष्ण नार्वेकर, मुख्य पाहुणे बॅरिस्टर पालव,यांचे समावेश दादा.

   सन 2000 मध्ये महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून दादांनी योगदान दिले. 

      2006 साली, भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी,भारत सरकारने नेमलेल्या डॉ.स्वामीनाथन कमिटीचे सदस्य म्हणून काम पाहिले. दादांनी केलेल्या अनेक मौल्यवान सूचनांचा प्रत्यक्ष डॉक्टर स्वामीनाथन यांनी गौरव केला होता.

   दादांनी आयुष्यभर दिलेल्या या निरलस निस्वार्थी व समर्पित सेवेचे मोल जाणून सरकार व अनेक सेवाभावी संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांचा उचित गौरव केला होता त्यांतील काही ठळक पुरस्कार,

  • कै.जमनालाल बजाज पुरस्कार नोव्हेंबर 1979.
  • कोकण कृषी विद्यापीठाची,”डॉक्टर ऑफ सायन्स” ही मानद ऊपाधी, 1981.
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे, महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक समाज रचनेत,उल्लेखनीय कामाबद्दल,यशवंतराव चव्हाण पुरस्कार, नोव्हेंबर 1998.
  • महाराष्ट्र शासनाचा ,”कृषिरत्न “,हा सर्वोच्च पुरस्कार, 2000 

   दादांच्या आयुष्यात, वर थोडक्यात उल्लेख केल्याप्रमाणे अनेक मानसन्मानाचे व बहुमानाचे प्रसंग आले. दुसरा कोणी सामान्य माणूस असता तर अशा स्तुति सुमनांच्या वर्षावाने हुरळून जाऊन आपल्या ध्येयपथावरून विचलित झाला असता. दादांना ही कोसबाड ऐवजी दुसऱ्या अनेक मोठ्या संधी निश्चितच चालून आल्या असतील  .मात्र दादांना, दृष्टीसमोर आपल्या ध्येयाचा ध्रुवतारा सदैव दिसत होता . ते कधीही  विचलित झाले नाहीत. कोसबाड सोडून जेथे मोठी संधी जास्त पैसा मिळेल तेथे जाण्याचा विचार त्यांच्या मनाला कधीही शिवलेला नाही.

   “कृषी साधना”, हाच तो मार्ग होता.आपल्या अवतीभवती पसरलेल्या दीन, दुःखी ,आदिवासी कष्टकऱ्यांच्या जीवनात कधीतरी सुखाची पहाट उगवावी, हा त्यांचा ध्यास होता !

     आदिवासी व गरीब कृषीवलांसाठी मांडलेल्या अख॔ड कर्मयज्ञातून, आपल्या गुरुवर्य आचार्य भिसे यांचेप्रमाणेच, निष्ठावंत, कृषीसाधक, डाॅ. जयंतराव पाटील  ‘जीवनमुक्त’ जगले!! त्यांची ही साधना,अवतीभवती असलेल्या दीनदु:खी जीवांना,ऊपेक्षित सर्वस्वी दुर्लक्षित जीवनापासून मुक्ती देणारी व स्वतःलाही कर्मबंधनांतून मोकळे करणारी!! 

    . दादां मानसन्मान,पुरस्कारांनी जसे हुरळून गेले नाहीत, तसेच आयुष्यात आलेल्या मानहानी व अवहेलनेच्या प्रसंगातही त्यांनी कधी आक्रमकताळेपणा केला नाही .एवढेच नव्हे तर अशा प्रसंगाबद्दल त्यांनी भविष्यात कधीही कटुता न दाखविता, जाहीर वाच्यता केली नाही. आपल्या सार्वजनिक व खाजगी आयुष्यातही अशा क्लेशकारक प्रसंगाची कोणी वाच्यता करू लागल्यास ,दादा त्यास त्वरित थांबवित व अतिशय शांतपणे विषयाला बगल देत.

  स्वतः आपल्या आयुष्यात तृप्त समाधानी असल्याशिवाय आणि व आपल्या सचोटीवर विश्वास असल्या शिवाय ही अशी

  ,”सुखदुःखे समेकृत्वा”,वृत्ती येत नाही. साधनेतूनच अशी सिध्दता येते.

       गोखले एज्युकेशन सोसायटी बरोबर झालेला संघर्ष असो वा आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे अध्यक्ष म्हणून, एका सभेत झालेली मानहानी असो, दादांनी तीच स्थिरबुद्धी, स्थितप्रज्ञता ,दाखविली.मी याप्रसंगी प्रत्यक्ष साक्षीदार होतो. दादांचे त्या प्रत्यक्ष प्रसंगातील वागणे जसे धीरोदात्त होते, त्यानंतरही या प्रसंगावर बोलताना त्यांनी कधीच कटूता दाखविली नाही. .दादा नेहमी म्हणत,

 “चांगले काम करणाऱ्या समाजसेवकाने परमेश्वरावर विश्वास ठेवून काम करीत राहावे. तो नेहमीच सहाय्यभूत होतो. संकटे दूर करतो.”

दादांची परमेश्वरावर अढळ निष्ठा होती ,हे मी अनेक प्रसंगांतून अनुभवीले आहे.

आपले पिताश्री शामराव पाटील व गुरुवर्य आचार्य भिसे यांच्या आयुष्यातील दाखले ते अशा प्रसंगी देत.

त्यांच्या आयुष्यातील अशा क्लेशकारक प्रसंगांतून, दादांची उज्वल, धवल कीर्ती आणखीच झळाळून निघाली .जसे शंभर नंबरी सोने, भट्टीतून ताऊन, सुलाखून निघते, तसे !!

        ज्ञानाने, बुद्धीने, कर्तुत्वाने मी दादांपुढे अगदीच नगण्य! तरीही दादांच्या मनाचा मोठेपणा एवढा की त्यांना मिळालेल्या अनेक मानसन्मानातील आनंदात त्यांनी मला सहभागी केले. कुटुंबाचा सदस्य म्हणून मानले ! आयुष्यातील  कटूप्रसंगी, मनमोकळे केले. अनेक संस्थांनी त्यांना दिलेले पुरस्कार समारंभ असोत, जमनालाल बजाज पुरस्कारांचे वितरण असो,महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे त्यांचे कार्यालय असो ,राज्य नियोजन मंडळांचे त्यांचे सचिवालयातील ऑफिस असो, वा भारताच्या योजना आयोगाचे सदस्य म्हणून दिल्लीतील त्यांचे निवासस्थान असो, दादांनी मला विविध प्रसंगी, व्यक्तिशः तेथे येण्याचे आमंत्रण देऊन माझ्याविषयीचे ममत्व व जिव्हाळा व्यक्त करून मला उपकृत केले आहे. एवढेच नव्हे, माझ्यासारख्या एका सर्वसामान्य  सरकारी अधिकाऱ्याच्या कार्यालयात ,स्वतःहून सदिच्छा भेट देऊन, स्वतः राज्य सरकारी नियोजन मंडळाचे सदस्य असतानाही, माझ्याबरोबर, माझ्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये सर्व कर्मचाऱ्या बरोबर बसून, आमच्या कार्यालयाचा गौरव त्यांनी वाढविला! ती आठवण मी पुढे देणारच आहे. या सर्वप्रसंगी जाणवला तो “एका मोठ्या माणसाच्या मनाचा मोठेपणा”! आज अशी माणसे दुर्मिळ आहोत म्हणून त्यांच्या या आठवणी!!

   लोकांचे परमाणुतुल्य गुण जे मेरूपरी वानिती; ।

    चित्तीं तोषहि पावती, सुजन ते नेणों किती नांदती

     दादांची,’ कळवळ्याची जाती’, या प्रकारची होती म्हणूनच आज या आठवणी काढून त्यांचे स्मरण करावेसे वाटले!

              कोसबाडला रुजू झाल्यावर जयंतरावांनी धडाडीने आपले काम सुरू केले. अनेक उपक्रम राबविले.आश्रम शाळा, सर्वोदय विद्यालय,महात्मा गांधी आदिवासी जनता विद्यालय, पंचायत राज्य प्रशिक्षण केंद्र,ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र,अशा संस्था आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाल्या .सर्व कार्यक्रम राबविण्यामागे, सभोवतालीच्या आदिवासी शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावेल हाच केंद्रबिंदू  होता.त्यासाठी पाण्याची साठवणूक, जास्त उत्पन्न देणारी भातशेती, गुरांसाठी सकस चारा, वनीकरण आणि फलोद्यान यावर त्यांनी आपले संशोधन केंद्रीत केले .

    आदिवासींच्या मुलांनाही सुशिक्षित केले पाहिजे.  “आदिवासींची पुढची पिढी सुशिक्षित होईल तर आपले काम खूपच सोपे होईल”,या धोरणाने त्यांनी आदिवासी मुलांसाठी “आदिवासी जनता विद्यालय”, सुरू केले.तेथेही विविध उपक्रम सुरू झाले. ठाणे जिल्ह्या बाहेरून ही,नाशिक, धुळे, जळगाव येथील आदिवासी मुले प्रशिक्षणासाठी येऊ लागली. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उत्थानाला या विविध प्रकल्पामुळे चालना मिळाली.

               1951 साली पत्नी म्हणून, सौ मीनाताई यांनी जयंतरावांचे आयुष्यात प्रवेश केला. त्या एम .ए ,बी एड, या पदव्या घेतलेल्या, उच्चशिक्षित, बुद्धिमान, कष्टाळू अशा होत्या. श्री खंडेराव सावे यासारख्या एका कर्तुत्ववान प्रशासकीय अधिकाऱ्याचा शैक्षणिक व व्यवस्थापकीय कौशल्याचा वारसा त्यांना मिळाला होता. मीनाताईंच्या साथीमुळे जयंतरावांच्या एकूणच जीवनाला एक वेगळे परिमाण प्राप्त झाले.

      हो,आता कै. खंडेराव सावे यांचे नाव आलेच आहे तर ,कोण होते खंडेराव सावे? वारल्यांचे पहिले, समाज शास्त्रीय अभ्यासक म्हणजे खंडेराव सावे! आपल्या पदवीपरिक्षा  प्रबंधासाठी त्यांनी, “The Varlis” (आदिवासी), या विषयावर ,महाराष्ट्रातील आदिवासी जमाती वरती अत्यंत अभ्यासपूर्ण संशोधन केले आहे.. आदिवासी जमातीचा इतिहास, संस्कृती, परंपरा व त्यांची सद्यस्थिती ,यावर हा एक संदर्भ ग्रंथ आहे. आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजांतीलव ते पहिले, आई ए एस( भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकारी. हुशार, स्पष्ट वक्ते व रामशास्त्री बाण्याचे  खंडेराव सावे, त्यांचाच वारसा सौ मीनाताईंना मिळालेला होता.

   खंडेराव सावे यांचे मुंबईतील निवासस्थान, दादरला आमच्या कै.तात्यासाहेब चुरी,विद्यार्थी वससतीगृहा शेजारी असल्याने, आमच्या काही कार्यक्रमांना ते अगत्याने हजर राहात. माझाही त्यांच्याशी चांगला परिचय होता. त्यांचे मार्गदर्शन ही मला त्या काळांत मिळाले आहे.

        कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल,डॉ.जयंतराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचे मूर्तिमंत स्मारक.

   केंद्राचे संचालक म्हणून सूत्रे हाती घेतल्यावर, जयंतरावांनी कोसबाडला, “कृषी विज्ञान केंद्र”, सुरू केले. शेतकऱ्यांतील अंगीभूत कौशल्याला वाव मिळून त्यांची उत्पादकता कशी वाढवता येईल हा या कृषी विज्ञान केंद्र स्थापने मागील उद्देश होता. येथे काम करताना जयंतरावांना ,इंग्लंड मधील स्टॅन्फर्डशायर व लॅन्केशायर येथील अनुभव खूप कामास आला. याच दरम्यान तेव्हाचे भारताचे कृषी राज्यमंत्री श्री भानु प्रताप सिंग यांनी कोसबाडला भेट देऊन त्यांनी जयंतरावांचे काम पाहिले. त्यांना शाबासकी दिली.

    परिसरातील आदिवासींच्या  बालकांनाही शिक्षण मिळावे व अभ्यासाची गोडी लहानपणीच लागावी,यासाठी सौ मीनाताईंनी ही अथक कष्ट घेतले. त्यांनी स्वतः पूर्व प्राथमिक शिक्षणाचा, एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. बालशिक्षणाच्या प्रणेत्या पद्मभूषण ताराबाई मोडक व पद्मश्री अनुताई वाघ यांचे आशीर्वाद, या कामासाठी त्यांना मिळाले.  मीनाताईंनी वरई पाडा,वाकी,मानपाडा या तीन पाड्यावर बालवाड्या ऊभारल्या आणि पाळणाघरे सुरू केली. ‘आहार बगीचे’, ही नवीन कल्पना राबविली. तेथे या बालकांना दुपारी भात,भाजी, अंडी, फळे असा पौष्टिक आहार दिला जाई.  पाळणा घरातल्या बालकांना, दूध ,पेज असे सकस अन्न मिळे. नियमित व आरोग्यवर्धक आहारामुळे या आदिवासी बालकांचे आरोग्य सुधारण्यास खूपच मदत झाली. हे नाविन्यपूर्ण प्रकल्प पाहण्यासाठी देशोदेशीचे तज्ञ कोसबाडला येत. इस्त्रायल देशाचे पथक या कार्यामुळे खूपच प्रभावित झाले. त्यांनी मीनाताईंना या बाल शिक्षणाच्या पुढील प्रशिक्षणासाठी इजरायल येथे आमंत्रित केले. आपल्या अर्धांगिनीची संसाराबरोबरच शैक्षणिक व सामाजिक कार्यातील साथ दादांच्या जीवनाला मोठीच उभारणी देणारी ठरली.

    आदिवासींना उत्तम स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे ही मोठी उणीव जयंतरावांनी कित्येक आदिवासी पाड्यावर, विहिरी निर्माण करून दूर केली. पिढ्यानपिढ्या स्वच्छ पाण्याला वंचित राहिलेल्या आदिवासींना,पहिल्यांदाच पिण्याचे स्वच्छ पाणी मिळू लागले. याच पाण्याचा उपयोग,आदिवासींनी भाजीपाला, फळझाडे यासाठीही केला. अनेक पिढ्यानपिढ्या मोलमजुरी करणारे आदिवासी, स्वतः आपल्या बागेचे मालक झाले. भाताच्या भरपूर पीक देणाऱ्या जातींचे संवर्धन विज्ञान केंद्रामार्फत झाले. आदिवासींना पोटभर अन्नाची हमी झाली.हे परिवर्तन प्रत्यक्ष पाहण्यासाठी जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन स्वतः कोसबाड येथे येऊन गेले होते.त्यांनी जयंत रावांचे त्याबद्दल अभिनंदन केले होते.

     माझे स्वतःचे छोटेसे शेतघर(Farm House), कोसबाड टेकडीच्या पाठीमागे असलेल्या, घाटाळ पाडा,या भागात आहे., गेल्या कित्येक वर्षापासून जयंतराव दादांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या या मातीतील, त्यांच्या कृपा कटाक्षाने जीवनातील नवी पहाट पाहिलेल्या, घाटळपाडा ,भोनरपाड्या मधील आदिवासी कुटुंबांशी माझ्या तेथे ओळखी झाल्या आहेत।.आदिवासींच्या उत्थानासाठी दादांनी दिलेले योगदान मला प्रत्यक्ष पाहावयास मिळाले. आमच्या पाड्यावरील, भोनार कुटुंबाचे प्रमुख असलेले ,श्री चमार भोनार हे,सुमारे 82 वर्षाचे आदिवासी गृहस्थ, माझ्या पाड्यावरील घराशेजारी राहत असून, त्यांनी मला याबाबतीत सांगितलेली आठवण मुद्दाम पुढे दिली आहे.

आजही मागच्या पिढीतील कित्येक आदिवासी शेतकरी दादांच्या आठवणीने खूप गहिवरून बोलतात गंमत म्हणजे सुरुवातीला मी ,” कोसबाडचे जयंत पाटील आपण ओळखता का”, असे विचारीत होतो .मात्र त्यांच्या डोक्यात काहीच प्रकाश पडत नव्हता. एका गृहस्थांनी मात्र, “हां, ते ‘जैंत सर’ व्हय..”,असा खुलासा केला आणि मग माझे काम सोपे झाले !. या सर्व आदिवासी परिसरात दादा,” जैंत सर”या लाडक्या नावानेच आजही ओळखले जातात. श्री चमार भोनर म्हणतात,

    “जयंतराव पाटील सर यांनी कोसबाड परिसरामधील अनेक पाड्यावरील आदिवासी व इतरही शेतकऱ्यांना मदत केली. त्यांच्यामुळेच आम्ही शेतकरी,आमच्या शेतीत व जीवनात सुधारणा करू शकलो.त्यांनी आम्हाला भात लागवडीसाठी बियाणे वाटप केले. तसेच आमच्या शेती बागायतीसाठी लागणारी अवजारे व रोपे वाटप केली. आंबा,चिकू, नारळ, फणस , यांची उत्तम कलमे वाटली, शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून आम्हाला विहिरी खोदून देण्यात मदत केली. आधुनिक शेती कशी करावी या विषयी आमच्या पाड्यावर येऊन ते प्रात्यक्षिके करून दाखवीत. मी स्वतः जयंत दादांच्या मार्गदर्शना मुळे शेतीत प्रगती करू शकलो. त्या दिवसात अनेक परदेशी पाहुणे,कोसबाडला येत असत. जयंत दादा त्यांना आमच्या पाड्यावर घेऊन येत व आमची घरे व शेती दाखवीत. काही पाहुणे पुन्हा पुन्हा आमच्या पाड्यावर येत असत.आमची प्रगती पाहून आम्हालाही शाबासकी देत असत. प्रथम माझ्या झोपडीवर नारळाच्या झापांचे  छप्पर होते.शेतीत प्रगती करत गेलो,तसे पुढे  छपरावर पत्रे आले, विलायती  कौले आली, व आज सिमेंटचा स्लॅब आहे.जयंत दादांनी हे स्वतः पाहिले व पाहुण्यांनाही दाखविले आहे.जयंत दादांनी मला,”तू जरी अशिक्षित असलास तरी मुलांना मात्र शिक्षण दे” असा सल्ला दिला होता.व तो मी मानला. आधुनिक शेती तर केली, मुलांनाही चांगले शिक्षण दिले.माझी मुले सुशिक्षित झाली ,नातवंडे आज, एम एस सी ,चे शिक्षण घेत आहेत. अजूनही मी माझी शेती करतो व जयंत दादांची आठवण सतत ठेवतो”.

    कोसबाडच्या,भोनर पाड्यावरील हेच ते श्री.चमार भोनर. आजही 82 व्या वर्षी कार्यरत आहेत, दादांच्या आठवणी सह!

      श्री चमार भोनर यांची ही प्रतिक्रिया प्रातिनिधिक आहे . अनेक शेतकऱ्यांच्या मनात असलेला, दादांचे विषयी आदर त्यातून प्रकट होतो . दादांनी आदिवासी व गरीब शेतकऱ्यांसाठी सेवा केली हे सर्व ज्ञात आहे. मात्र त्यांनी, काय सेवा केली, हे येथील अनेक शेतकऱ्यांशी बोलताना विदीत होते .श्री चमार यांच्या, एम एस सी, करत असलेल्या नातीने,त्यांचे हे विचार लिहून मला पाठविले.विशेष म्हणजे दादांच्या, ‘माझे समाज रचनेचे प्रयोग’, या पुस्तकात याच श्री चमार यांचे बद्दल दादांनी,’एक प्रगतिशील शेतकरी’, म्हणून उल्लेख केलेला आहे . त्याच शेतकऱ्याची आज मला प्रत्यक्ष गाठ पडावी, हा ही एक योगायोग!!

     सर्व तंत्रज्ञान विकसित करीत असताना पर्यावरणाचा समतोल टिकून राहील याची काळजी ही घेण्यात आली. त्यामुळे  वनवासींचा शाश्वत विकास होऊ शकला.जयंतरावांच्या शिक्षणाचा ज्ञानाचा अनुभवाचा ऊपयोग, बोर्डी परिसरातील इतरही अनेक संस्थांना होत आला. दादांनी कोसबाड कृषी संस्थेत 34 वर्षे काम केले.

   1971 मधील ऑस्ट्रेलिया भेटीत त्यांनी चारा पिकांच्या संशोधनाचा अभ्यास केला.भारतात परत आल्यावर कोसबाड येथे त्या संशोधनाचे प्रयोग केले. पैकी स्टायलो व सिराटो ही पिके त्या हवामानात यशस्वी ठरली. या पिकांचा चारा गुरांना दिल्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाली. 

तिळाची शेती, चिकूची कलमे ,ऑस्ट्रेलियातून आणलेल्या ‘स्टायलो’ गवताची लागवड, यांचे प्रात्यक्षिक देताना डॉ.जयंतराव. 

   जयंतरावांनी  आणलेले एस्परागस, हे भाजीपाल्याचे मौल्यवान पीक इथल्या हवामानात रुजविले. त्याचाही व्यापारी लागवड म्हणून आज खूप उपयोग होतो आहे. 

    दादांनी कॅनडा, इंग्लंड,हॉलंड ,इज्राइल व फिलिपिन्स या देशांमधल्या शेती व ग्राम सुधार योजना विषयी सखोल अभ्यास  केला होता.त्या ज्ञानाचा संपूर्ण उपयोग त्यांनी कोसबाड येथील आपल्या संशोधनातात  करून, त्याचा लाभ परिसरातील गरीब आदिवासींच्या शेतीमध्ये कसा  करता येईल याचा ध्यास घेतला होता.

    बोर्डीतील अस्वाली पाड्यावरील हेच ते,अस्वाली धरण.

  आमच्या बोर्डी कोसबाड परिसरातील ,अस्वाली धरण,शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना वरदान ठरले आहे.या धरणाचे रखडलेले काम, दादांनी मार्गी लावून 1996 साली, हे धरण पूर्ण करून घेण्यात, मोठे योगदान दिले आहे. 

     दादा जसे एक उत्कृष्ट संशोधक, समाजसेवक,प्रशिक्षक होते तसेच दूरदृष्टी असलेले एक दृष्टे नेतृत्व होते. भविष्यकाळातील शेतीला पाण्याची किती गरज आहे हे त्यांना कळून चुकले होते. आपल्या भागातील सर्वच शेतकऱ्यांना, शेतीच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर त्यांच्या भविष्यातील पाण्याचे नियोजन आज केले पाहिजे, हे त्यांना कळून चुकले होते.

    1975 साली अस्वाली धरणाचे भूमिपूजन पार पडले होते.मात्र धरणाचे काम दप्तर दिरंगाई मुळे रखडले होते. जयंतरावांनी नियोजन आयोगाचे सदस्य पद स्वीकारल्यावर,1991मध्ये,त्या कामाला गती देण्याचे ठरविले. विविध मंत्रालयांतून परवानग्या मिळविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मध्ये फार मोठा कालावधी गेल्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढला होता ती वाढीव रक्कम शासनाकडून मंजूर करून घेतली आणि शेवटी 1996 साली,हे धरण पूर्ण झाले. या धरणामुळे मत्स्य उत्पादन, विंधन विहिरींना पाणीपुरवठा, पेयजल, जलसिंचन व त्यामुळे दुबारपिक पद्धत, भूजलाच्या पातळीत वाढ हे फायदे सर्व शेतकरी व ग्रामस्थांना मिळू लागले.

    घोलवड ते उंबरगाव रोड या भागातल्या प्रवाशांची रेल्वे प्रवासात खूप गैरसोय होत होती. डाॅ. जयंतराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून,बोर्डी रोड हे नवे रेल्वे स्थानक तयार झाले. त्याचे उद्घाटन 1994 साली झाले.  आमच्या भागातील लोकांची रेल्वे प्रवासाची मोठी गैरसोय त्यामुळे दूर झाली. 

    जयंतरावांनी कृषी व ग्राम विकासावर भरपूर लेखन केले असून जवळजवळ तीस,पस्तीस, पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘जग हा त्यांचा बगीचा’, ‘माझे ग्राम पुनर्रचनेचे प्रयोग’, ‘आदर्श गाव बोर्डी’,” एग्रीकल्चरल आणि,’ रुरल रीकन्स्ट्रक्शन'”,इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. कृषी साहित्या बद्दल त्यांना” वसंतराव नाईक”,पुरस्कारही मिळालेला होता.

       कै वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वापर केल्याने महाराष्ट्रातील शेतीची उत्पादकता वाढवता येईल हा संदेश महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या पदाचा उपयोग त्यांनी करून घेतला. अनेक परिसंवादातून भाग घेत,वृत्तपत्र, रेडिओ,टेलिविजन, या प्रसार माध्यमामार्फत हा संदेश देशभर पोहोचविण्याचे अथक प्रयत्न केले.

       समाजातील इतरही अनेक संस्थांचे कै.जयंतराव हे मार्गदर्शक आणि आधारवड होते. समाज उन्नती शिक्षण संस्था बोरिवली, या संस्थेसाठी, गोराई येथील भूखंडासाठी जयंतरावांनी ,शिक्षणखात्याच्या सचिवास विनंती पत्र लिहून ते काम करून दिले .

         वसई विद्यावर्धिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, या संस्थेस मान्यता मिळवण्यासाठी जयंतरावांनी डॉ. स्वामीनाथन यांच्या मार्फत, ए आय सी टी इ ची मान्यता मिळवून दिली.

        सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी क्लि. या संस्थेच्या कार्य विस्तारासाठी, दादांनी जातीने प्रयत्न करून, ते काम करून दिले.या संस्थेशी मी स्वतः, पहिला संस्थापक अध्यक्ष, म्हणून जवळून संबंधित असल्यामुळे, जयंतरावांनी आमच्या संस्थेसाठी दिलेल्या योगदानाचा मी साक्षीदार आहे. कै. श्री रामभाऊ वर्तक यांचेही आम्हाला उल्लेखनीय सहकार्य मिळाले.

    दादांनी अथक, निरलस व समर्पित बुद्धीने केलेल्या सेवेची पावती अनेक सेवाभावी संस्था, राज्य शासन ,केंद्रशासन त्याचप्रमाणे काही परदेशांनी ही दादांना वेळोवेळी दिली आहे. मला ज्ञात असलेल्या कामाचा  उल्लेख  केला आहे.

       कदाचित याहीपेक्षा मोठे बहुमान व पुरस्कार  दादांना मिळावयास हवे होते. निरिच्छ, सदा -समाधानी वृत्तीमुळे, त्यांनी स्वतःहून याबाबतीत, कोठेही कधीच प्रयत्न केले नाहीत. हे पुरस्कार त्यांच्या मागे चालत आले.  भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री श्री नरसिंहराव, तत्कालीन अर्थमंत्री व पुढे राष्ट्रपती झालेले श्री.प्रणव मुखर्जी,अशा दिग्गज राजकारणी नेत्यांशी दादांचे खूप जवळचे संबंध होते.मात्र त्या ओळखीचा उपयोग,दादांनी स्वतःला मोठेपणा मिळवण्यात कधीच केला नाही.दादांनी त्याचा उपयोग इतर गरजू व्यक्ती व संस्थांना करून दिला.

भारताचे माजी संरक्षणव शेती  मंत्री, श्री शरदचंद्र पवार साहेब यांचे सोबत डॉ. जयंतराव पाटील

    वडील शामरावजी व गुरुजी आचार्य भिसे यांची शिकवणच तशी होती .आचार्य भिसेंना, तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी बोर्डीस भेट दिल्यानंतर ,”दिल्लीत सल्लागार म्हणून या”, अशी विनंती केली होती .त्यावेळी आचार्यांनी प्रत्यक्ष देशाच्या राष्ट्रपतींना नम्र परंतु ठामपणे दिलेले उत्तर सुप्रसिद्ध आहे.. आचार्य म्हणाले होते,

 “Nothing doing, sir, माझे येथील काम अजून संपलेले नाही!”

    राजकारणातील अनेक प्रलोभने दादांनाही आली असतील. पण दादाना आपला मार्ग व आपले ध्येय निश्चित माहित होते!!

  दादांना लोकांनी दिलेले ,”सेवाव्रती ,भला माणूस”,या बिरूदावली समोर,  बाकीचे सर्व पुरस्कार नगण्य आहेत,असे मला प्रामाणिकपणे वाटते.

      दादांनी जपलेली सेवाभावी वृत्ती व माणुसकीचा प्रत्यय अनेकांना अनेक प्रसंगी आलेला आहे.

   दादांनी दिलेल्या अकृत्रिम प्रेमाच्या, खूप आठवणी आज येतात….

      माझी आई आज शंभर वर्षाची असून तिची स्मरणशक्ती आजही तल्लख आहे. लहानपणच्या आठवणी सांगताना, त्या वेळच्या सवंगड्यात, ‘जयंत’ चाही उल्लेख येतो. आई ही बोर्डीच्या पाटील कुटुंबातील. तिचे माहेर, पाटील कुटुंबीयांच्या, तत्कालीन प्रसिद्ध, ‘मोठेघर ‘, या प्रसिद्ध वास्तु समोरच ! त्या वेळची (सन 1930-35), पाटलांची ही बालगोपाळ मंडळी कधीतरी एकत्र खेळली असतीलच. दादा देखील मला कधी भेटले की “सोमू  ताई कशी आहे?” ही चौकशी जातीने करीत. माझी आई एक गृहिणी म्हणूनच राहिली, मात्र हा जयंत पुढे डॉ. जयंतराव पाटील, नावाचा जागतिक कीर्तीचा,शेती शास्त्रज्ञ झाला. तरीही ते ऋणानुबंध दादा कधीच विसरले नाहीत. आमच्या कुटुंबाकडे त्यांचा एक विशेष कृपा कटाक्ष सदोदित राहिला, तो कदाचित त्यामुळेही असेल!. 

    माझा धाकटा बंधू प्रदीप (सध्या सेवानिवृत्त प्रिन्सिपाॅल, पद्मभूषण ताराबाई मोडक यांच्या नूतन बाल शिक्षण संस्थेचे, डी.एड.कॉलेज,कोसबाड), बी एस सी परीक्षा पास झाल्यानंतर कोठे तरी काम शोधत होता. त्याकाळी , कोसबाड आणि जयंत सर (“जैंत” सर), ही आम्हा बोर्डी-घोलवडकर मंडळीसाठी नोकरी मिळविण्याचे ‘परवलीचे शब्द’होते. वडिलांनी माझ्यामार्फत दादांना प्रदीपच्या नोकरीसाठी शब्द टाकला. दादांनी त्वरित त्याला आपल्या कृषी संस्थेत सामावून घेतले. प्रदीप साठी आयुष्यातील उमेदीच्या काळात, ती मोठी पर्वणी होती.. त्यानेही त्या संधीचे सोने केले. कृषी संशोधनाचे  कार्यासाठी, ,कोसबाडच्या कृषी संस्थेला,”पदव्युत्तर संशोधन केंद्राचा” दर्जा मिळाला होता. हे केंद्र पुणे विद्यापीठाशी संलग्न होते. या पदव्युत्तर संशोधन केंद्रातच दादांनी, प्रदीपला प्रयोगशाळेतील नोकरी दिली होती. या विज्ञान संशोधन केंद्रात, दादांचे शेतकी महाविद्यालयातील गुरु डॉ. उपेंद्र कानिटकर, डॉ. एन जी मगर, डॉ. एस सालोमन अशी अनेक दिग्गज मंडळी  मानद प्राध्यापक म्हणून काम करीत होती. आपल्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात करताना,अशा मातब्बर,असामींचे सहकार्य व मार्गदर्शन मिळणे ही केवढी भाग्याची गोष्ट !दादांमुळे प्रदीपला ते मिळाले. या सर्वांच्या आशीर्वादाने, प्रदीपची भावी जीवनातील वाटचाल सुखकर झाली. पुढे पद्मभूषण ताराबाई मोडक,अनुताई वाघ यांचा, सहवास व आशीर्वाद ही त्याला मिळाला. बाल विकास शिक्षण संस्थेतून, डी  एड कॉलेजचा प्रिन्सिपल म्हणून तो निवृत्त झाला. एक आदर्श व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेले त्याचे विद्यार्थी त्याला मानतात. त्याने आपल्या त्या दिवसातील आठवणीचे  एक छोटे टिपण मला दिले. ते त्याच्या शब्दातच देत आहे..

     ” पदवीधर झालो व नोकरीच्या शोधात असताना योगायोगाने कोसबाड मधील कृषी संशोधन संस्थेत काम करण्याचा योग आला. तेथे संस्था प्रमुख म्हणून डॉ.जयंतराव पाटील भेटले. माझे वडील वामन देवजी राऊत गुरुजी व माझे बंधू श्री दिगंबर राऊत यांनी जयंतसरांशी ओळख होती, त्यामुळे हे सहज शक्य झाले.”

       “पुढे संस्थेत काम करताना, जयंतरावांना माझ्या वडिलांबद्दल असलेल्या आदराची मला जाणीव झाली. माझे वडील हे बोर्डी गावात एकआदर्श शिक्षक म्हणून समजले जात. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीवनकार्याचा शैक्षणिक कामाचा आढावा घेणारा एक लेख,’ दैनिक सकाळच्या’या वृत्तपत्रात, जयंत दादांनी छापून आणला होता.”

      “सन 1976 सालची नोकरी निमित्ताने माझी भेट. मी सुरुवातीला खूप घाबरलो होतो. जयंत सरांचा तो भारदार आवाज,कृषी तज्ञ म्हणून त्यांचा जागतिक लौकिक, त्यांचे उत्तम वकृत्व पाहून व अनुभवून मी थोडा दडपणाखालीच होतो. संस्थेतील रासायनिक प्रयोगशाळेत माझी नेमणूक झाली होती. त्या संस्थेत अनेक विभाग होते, जसे की गवतफार्म, हॉर्टिकल्चर, मधुमक्षिक केंद्र जनावरांची निगा केंद्र, ई. या सर्व विभागातील माझे सहकारी व त्यांचे तेथील कार्य सुद्धा मला रोज जवळून पाहता येत होते. जयंत सर दररोज सकाळी आठ वाजता आपल्या घरातून निघून पायी चालतच ऑफिसला येत. प्रत्येक विभागांना ते भेट देत. तेथे विचारणा करीत. काही अडचणी असल्यास त्याचे निराकरण करीत. अनेक भारतीय व जागतिक कृषी तज्ञांची माहिती ते आम्हाला सहजपणे सांगत. “त्यांची जीवनचरित्रे  वाचा”, असा आम्हास प्रेमाचा आग्रह करीत. जॉर्ज  वॉशिंग्टन कार्व्हर याचे जीवन चरित्र त्यांनी एकदा प्रयोगशाळेत आले असताना, कार्व्हरच्या फोटोकडे पाहून आम्हाला सांगितले होते, तेआजही आठवते.”

      “त्याकाळी अनेक भारतीय व परदेशी पाहुणे विशेषतः अमेरिकन ,ऑस्ट्रेलियन व इझ्राएल मधून येत असत. ते संस्थेला  आर्थिक मदत ही करीत होते. त्या मदतीतूनच ,सभोवतालच्या अनेक आदिवासी कुटुंबांना विहिरी व शेतीची अवजारे पुरवून, आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न होत असे.”

    “या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी मुंबईहून डॉ. मगर, डॉ. सालोमंन अशी दिग्गज मंडळी येत असत. डॉ. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करीत होतो. माझी त्यांची पहिलीच भेट. त्यांच्या हाताखाली अनेकांनी मुंबई व पुणे विद्यापीठा मार्फत, रसायन शास्त्रात पीएचडी पदवी मिळविली होती. त्यावेळीही अनेक जण तो शिक्षणक्रम करीत होते. डॉ. मगर यांचे वागणे बोलणे अत्यंत साधे व निगर्वीपणाचे होते. एवढी शैक्षणिक व बौद्धिक उंची असूनही माझ्यासारख्या एका नवोदित विद्यार्थ्यास ते सतत प्रोत्साहन देत व हळू आवाजात बोलत. कोसबाडला खजुरीची(शिंदी )झाडे पाहून ते मला म्हणत, “अरे,या झाडाची बी म्हणजे एक चमत्कार आहे. वाळवंटात देखील पाण्याशिवाय ती रुजते, वाढते व फळे देते. यावर अभ्यास केला पाहिजे. त्याचे रासायनिक पृथ्थकरण करून  गुणधर्म तपासले पाहिजेत. तू हे काम कर. मी तुला सर्व मार्गदर्शन व सहकार्य करतो !”

 “मी होकार दिला व  काम ही सुरू केले ! माझ्या दुर्दैवाने डॉ. मगर सरांचे अचानक निधन झाले. माझ्यासाठी ही खूप दुर्दैवी व धक्कादायक घटना होती. डाॅ.मगर सरांचे मार्गदर्शन माझ्या नशिबी नव्हते हेच खरे. दोन वर्षाच्या जयंत सरांच्या सानिध्यात, त्यांचे कामाचे महत्त्व मला कळून आले. आधुनिक शेती व पारंपारिक शेती यांची व्यावहारिक सांगड घालण्याचे त्यांचे ध्येय होते. एकाच शेतात डॉ. जयंत सरांनी, खरीप भात, हिवाळी गहू व वैशाखी मूग पिकवून दाखविला व आदिवासींसाठी एक आदर्श पीकचक्र प्रत्यक्ष कृतीतून उतरवून दाखविले. ‘आदिवासींचे जीवनमान शेतीतून उंचावणे’ हा त्यांचा ध्यास होता. मी ते अनुभवीत होतो. आदिवासी जीवन पद्धतीशी निगडित असे विषय जयंतराव सरांनी कृषी प्रयोगातून हाताळले”

  “संस्थेचा लौकिक एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे जयंत सर हे खूप वेगळे व्यक्तिमत्व होते. शिक्षण, कृषी संशोधन, ,कार्यविस्तार व त्याचा ग्रामीण विकासात हातभार, या सर्व आनुषंगिक कार्यामध्ये नुसते संशोधन केले नाही तर त्या क्षेत्रात नेत्र दीपक यश मिळवले. त्यामुळे कोसबाडचे नाव सर्वतोपरी झाले. अनेक शास्त्रज्ञ, राजकारणी, मंत्री, परदेशी पाहुणे त्याकाळी कोसबाडला येऊन त्यांच्या कामाची माहिती करून घेत व त्याचा प्रसार करीत. आजही कोसबाड म्हटले कृषी संस्था आठवते व कृषी संस्था म्हटले की आदरणीय जयंतराव सरांची मला आठवण येऊन माझी मान आदराने लवते.”

   प्रि. प्रदीप सरांनी सांगितलेल्या, जयंतरावांच्या या आठवणी वाचल्यानंतर, अगदी पहिल्यापासून, त्यांचा ध्यास हा “आदिवासींचे जीवनमान उंचावणे”, हाच होता,हे प्रतीत होते!!. नवीन काम सुरू करणाऱ्या तरुणांना  सांभाळून कार्यप्रवृत्त(Motivate) ही कसे करावे ,याचेही एक आदर्श उदाहरण आहे.

    प्रदीपने वर उल्लेख केल्याप्रमाणे ,माझ्या वडिलांचे म्हणजे आप्पांचे ,निधन नोव्हेंबर 1981 मध्ये झाले. दोन एक दिवसात जयंतराव सांत्वनाचे निमित्ताने आमचे घोलवडच्या घरी आले. त्यावेळीही त्यांच्या मागे कामाचा मोठा व्याप होता. त्यांनी आम्हा भावंडांशी चर्चा करताना, आप्पांचा शेवटचा आजार, त्यांनी मुलांसाठी तयार केलेले काही तक्ते, स्वतः विणलेल्या खादीच्या कापडाचे नमुने, त्यांचे काही लिखाण,  त्यांचे स्वहस्ताक्षरातील अंतिम इच्छापत्र हे सर्व वाचून पाहून दादा मनोमन भारावले. आम्हाला काही कल्पनाही नसतांना, त्यानंतर काही दिवसातच, ‘सकाळ’ या वृत्तपत्रात त्यांनी आमचे वडील,आप्पांना श्रद्धांजलीपर, एक लेख प्रसिद्ध केला. सुदैवाने आजही त्या लेखाचे कात्रण आम्ही खूप जपून ठेवले आहे. त्याचे छायाचित्र ही या लेखात दिले आहे .त्या लेखात जयंतरावांनी म्हटले होते..

दिनांक 4 नोव्हेंबर,1981,दैनिक सकाळच्या अंकाचे हेच ते कात्रण. दादांनी,  कै.आप्पा वर लिहिलेला श्रद्धांजलीपर लेख.

   ” कै. वामन गुरुजी हे महात्मा गांधींच्या शिकवणुकीचे मूर्तीमंत प्रतीक होते. त्यांनी साऱ्या जीवनभर गांधीजींच्या तत्त्वांची जोपासना केली. मिठाच्या सत्याग्रहाच्या चळवळीपासून, जीवनात साधेपणा जोपासला. चप्पल त्यागून, अनवाणी पायांनी फिरले.साध्या कांबळीवर झोपले.स्वतःच्या चरख्यावर कातलेल्या सुताची खादी विणून ,त्याचेच कपडे अंगात घातले. त्यांना कोणतेही व्यसन नव्हते.मृत्यूच्या थोडेच दिवस आधी त्यांनी आपली अंतिम इच्छा लिहून ठेवली. त्यात त्यांनी म्हटले आहे,

  ‘माझ्या अंत्ययात्रेच्या वेळी, मी कातलेल्या व विणलेल्या खादीचे, धोतर शर्ट व गांधी टोपी मला घालावी. सुतक फक्त तीन दिवस पाळावे.चौथ्या दिवशी मंदिरात जाऊन प्रार्थना करावी व सुतक सोडून द्यावे. माझ्या स्मरणार्थ ,दत्ताची तसबीर मंदिराला भेट द्यावी. माझ्या पश्चात कोणत्याही प्रकारचा धार्मिक विधी, अस्थि विसर्जन व पिंडदान करण्यात येऊ नये.त्यासाठी लोकनिंदेची परवा करू नये. बारावे, तेराव्याचा विधी न करता, जो खर्च ऊरेल ,त्याचा उपयोग गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत म्हणून करावा.’

     खरोखर राऊत गुरुजी हे भारतीय संस्कृतीचे खरेखुरे उपासक होते”

      आमचे पिताजी एक साधे ,सामान्य ,प्राथमिक शिक्षक.  त्यांचे विषयी श्रद्धांजलीपर लेखन करून त्याला वृत्तपत्रांतून प्रसिद्धी देऊन,  त्यांचा व पर्यायाने आमच्या सर्वच कुटुंबाचा गुणगौरव करताना ,दादांनी आम्हाला उपकृत केले आहे. कै. आप्पांच्या इच्छेनुसार, कोणतेच धार्मिक विधी वगैरे करावयाचे नसल्याने आमच्यासाठी ते एक मोठे आव्हान होते.मात्र दादांसारख्या ज्येष्ठ व श्रेष्ठ मंडळींनी आधार दिल्यामुळे, त्याकाळी आम्हाला खूपच धीर वाटला.

      कै.आप्पांच्या पंचविसाव्या  पुण्यस्मरण दिनानिमित्त,सन 2007 एप्रील महिन्यात, आम्ही  “औदुंबराची छाया” या नावाचा आप्पांच्या  आठवणींचा संग्रह प्रसिद्ध केला. त्याप्रसंगी तत्कालीन मुंबईच्या महापौर डाॅ. शुभा राऊळ, शिक्षक प्रतिनिधी आमदार कपिल पाटील , सहलसम्राट श्री केसरी पाटील व स्वतः, जयंतरावांनी उपस्थित राहून आम्हाला सन्मानित केले. दादांनी  या कार्यक्रमाची आखणी करताना आम्हाला भरपूर सहाय्य व मार्गदर्शन केले.प्रिन्सिपल प्रभाकर राऊतसर  यांनी देखील, बोर्डी हायस्कूलचे प्रशस्त, कै.वसंतराव सावे स्मारक सभागृह  उपलब्ध करून देत मोठी मदत दिली. 

सकाळ पेपर मधील कात्रण:”औदुंबराची छाया”, स्मृती ग्रंथाचे उद्घाटन प्रसंगी, दिनांक 14 एप्रिल 2007. डावीकडून, श्री केसरी भाऊ पाटील, डाॅ.सौ. शुभा राऊळ, डॉ. जयंतराव पाटील, श्री.कपील पाटील.

    हा कार्यक्रम अतिशय भव्य व दिमाखदार स्वरूपात पार पडला. आमची परदेशस्थ सर्व मुले व नातवंडे ही कार्यक्रमास आवर्जून हजर होती. गावातील मंडळी तर उपस्थित होतीच पण आप्पांचे काही वयोवृद्ध विद्यार्थी व सहकारी बाहेरगावाहून खास उपस्थित राहिले होते. त्याप्रसंगी केलेल्या भाषणात दादा म्हणाले होते,

    ” बोर्डीतील आदर्श शिक्षक वामन राऊत यांनी, साने गुरुजी ,आचार्य भिसे गुरुजी, चित्रे गुरुजी, ताराबाई मोडक अशा व्रतधारी शिक्षकांची परंपरा सुरू ठेवून,आदर्श विद्यार्थी घडविण्याचे मोलाचे कार्य केले आहे. त्यांचा हा आदर्श इतरांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने, त्यांच्या मुलांनी,”औदुंबराची छाया”,हे आपल्या पित्याचे लिहिलेले चरित्र ,भावी पिढ्यांना दीपस्तंभ प्रमाणे प्रकाश देत राहील.”

   या आठवणी संग्रहात आपला अभिप्राय नोंदविताना दादांनी लिहिले आहे,

   ” बोर्डीतील व्रतधारी शिक्षकांची परंपरा ,कै. वामन देवजी राऊत गुरुजींनी, पुढे चालू ठेवली, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सुंदर संस्कार देऊन शीलवान बनविले. राष्ट्रभक्तीचे धडे देऊन त्यांना देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यास प्रेरणा दिली. गांधीजींचे विचार स्वतः अमलात आणले. स्वतः चरख्यावर सुत कातून ,त्यापासून स्वतः बनविलेल्या खादी चे कपडे ते परिधान करीत. ते अनवाणी चालत असत. साधी राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाचे ते पालन करीत असत.

   त्यावेळी दादा नियोजन मंडळाचे सदस्य होते. अनेक व्यवधाने सांभाळीत त्यांनी एवढा वेळ, आमच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी दिला. स्मरण ग्रंथाची समर्पक  प्रस्तावना लिहून दिली ..केवळ आम्हावरील प्रेमाखातर!!

     त्या आधी, माझे स्वतःचे बाबतीत घडलेली, एक घटना मला स्पष्टपणे स्मरते. मी ती विसरू शकणार नाही.  आजच्या जमान्यांतच कशाला, 1960-70 च्या दशकात सुध्दा ऊच्च शिक्षणासाठी परदेशी प्रयाण करणे, विशेषतः अमेरिकेत ,हे बहुसंख्य  विद्यार्थ्यांचे स्वप्न होते. माझेही ते स्वप्न  होते.. तेव्हाची यु डी सी टी म्हणजे आजची आय सी टी मधून,M Sc (Tech) पदवी मी मिळविली होती.माझे मार्गदर्शक(Guide),,डॉ.जे जी काणे यांचे शिफारस पत्र मला मिळाले होते. डॉ. काणे, हे त्या काळातील प्ररदेशातील,विशेषतः अमेरिकन विद्यापीठातही एक प्रतिष्ठित नाव गणले गेले होते.अमेरिकेतील विद्यापीठांना हवा असलेला, Teaching Experience, शिकविण्याचा अनुभव, मलाही होता.V J T I,या  सुप्रसिद्ध महाविद्यालयात मी दोन वर्षे अध्यापनाचे काम केले होते.माझी शैक्षणिक पात्रता व विद्यापीठाकडून मिळणाऱ्या आर्थिक सवलती या दृष्टीने योग्य अमेरीकन विद्यापीठात मला प्रवेश हवा होता. काही वर्षांपूर्वीच दादा अमेरिकेतील, कॅन्सस  विद्यापीठात, फुल ब्राईट शिष्यवृत्ती मिळवून एम एस ही शेतीशास्त्रातील उच्च पदवी मिळवून भारतात आले होते. त्यामुळे अर्थातच मी त्यांना जाऊन भेटलो. दादांनी माझे मनोगत खूप आस्थापूर्वक जाणून घेतले. त्वरित,श्री जयराम चव्हाण या’युसीस’,(UNITED STATES INFORMATION SERVICES), च्या मुंबई मधील एका उच्च अधिकारी व्यक्तीचे नावे मला पत्र देऊन त्यांना भेटण्याचे सांगितले. दादांना अमेरिकेत जाण्याआधी, मौलिक माहिती श्री चव्हाण यांनीच दिली होती. त्याप्रमाणे मी श्री चव्हाण साहेबांना भेटलो. दादांकडून मी आलो आहे कळल्यावर त्यांनीही मला बहुमोल माहिती पुरविली. मला अमेरिकेतील एक-दोन विद्यापीठात थोड्या आर्थिक मदतीसह प्रवेश ही मिळाला. हे उद्योग आप्पांचे अपरोक्ष चालू होते. प्रवेश पत्र आप्पांना दाखवून त्यांची शाबासकी मिळणार, या अपेक्षेने मी त्यांना ही हकीकत सांगितली. आप्पा काहीच बोलले नाहीत. माझी कागदपत्रे ही पाहिली नाहीत. त्यांच्या नजरेचा एक कटाक्ष व डोळ्यातील आसवे मला सर्व काही सांगून गेली. मी पुन्हा कधीही परदेशी शिक्षणासाठी वा परदेशी नोकरीसाठी जाण्याचा विचार केला नाही. त्या वेळची आमची कौटुंबिक परिस्थिती,आप्पांचे शरीरस्वास्थ्य व कुटुंबातील मोठा मुलगा म्हणून माझे कर्तव्य, याचा विचार मी केला नव्हता. मला वाटतं ,आप्पांना भविष्यांतील,दिसत होते. तो निर्णय अगदी योग्य होता,मला त्याबद्दल आज कोणतीच खंत नाही. 

   मी दादांना भेटून सर्व वृत्तांत दिला. माझा पक्का निर्णय कळविला. त्यांनी मला खूप धीर दिला. मी त्यांचे आभार मानले. दादांनी त्या दिवसांत ज्या तळमळीने आत्मीयतेने मला मार्गदर्शन केले, त्याची नोंद माझ्या स्मरणात कायमची झाली आहे. 

     त्यावेळी आप्पा व दादा या माझ्याविषयी मनःपूर्वक आस्था असलेल्या दोन व्यक्तींनी, माझी निराशा दूर करण्यासाठी आशीर्वाद दिले होते, “निराश होऊ नकोस. भविष्यात तुला परदेशी अभ्यासाच्या खूप संधी मिळतील. देवावर विश्वास ठेव.”

   सत्पुरुषांचे शब्द कधीच खोटे होत नाहीत..पुढे ,मी माझ्या सरकारी आस्थापना मार्फत,’पेट्रोलियम ऊद्योग’विषयाच्या अभ्यासानिमित्त, सुमारे 17 विविध देशात फिरलो. प्रत्येक परदेश फेरीचे वेळी मला या दोन प्रेमळ व्यक्तींची आठवण होत असे. त्यांचे शब्द आठवत असत..त्यांच्या स्मृतीला मी आज विनम्र वंदन करतो.

   दादा ज्यावेळेस सरकारी कामानिमित्त मुंबईत येत,त्या दिवसात  चिरंजीव दीपक कडे विलेपार्ले येथे राहत असत. माझे घर ही त्याच परिसरातील असल्याने मी त्यांना फावल्या वेळात भेटावयास जाई. दादा मनापासून स्वागत करून एकंदर समाजकारण राजकारण याबाबत आपली मते सांगत. मीही चर्चेत भाग घेई. दादांचे अनुभव, संपन्न विचार ऐकून घेण्यातच मला जास्त रस असे. माझ्या प्रत्येक परदेश दौऱ्यानंतर,दादा हेच माझे पहिला श्रोता असत. त्यांनाही माझे अनुभव,विशेषतः त्या देशातील पेट्रोलियम उत्पादनाची स्थिती व आपल्या देशाला निर्यातीसाठी तेथे असलेली संधी, याबाबत माहिती हवी असे.

   पुढे सन 2000 मध्ये दादांची नियुक्ती राज्यसरकारच्या, नियोजन मंडळ सदस्य म्हणून झाली. दीपक कडे राहत असल्याने भेट होई. बोलता बोलता सहज त्यांच्या एका ठराविक लोकलची वेळ त्यांनी मला सांगितली. मी देखील लोकलनेच माझ्या कार्यालयात जाण्यासाठी,विलेपार्ले स्थानकापासूनच  प्रवास करीत असल्याने दादांशी वेळ साधून मी त्यांचे बरोबर प्रवास करू लागलो. जेव्हा कधी दादा मुंबईत असत मी त्यांची लोकल पकडून त्यांचे बरोबर प्रवास केला. माझे ऑफिस ही त्या दिवसात भायखळ्यात असल्याने मी दादरपर्यंत बरोबर असे. सरकारी वाहन उपलब्ध असतानाही आपल्या ‘साधी राहणी’ तत्त्वानुसार दादा लोकल ने प्रवास करीत व मलाही त्यांचे बरोबर प्रवास करण्याचे संधी मिळे.

     आश्चर्याची गोष्ट म्हणजे दादांनी माझ्या विनंतीला मान देऊन एके दिवशी माझ्या भायखळा येथील ऑफिसला भेट दिली. टॅक्सीने आले. माझ्या कार्यालयात अगदी कोणताच बडेजाव न मिरविता वावरले. त्या काळात त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा बहाल केला होता. माझ्या काही सहकाऱ्यांशी चर्चा केली व जेवणाच्या वेळी आमच्या कॅन्टीनमध्येच, रांगेत उभे राहून जेवण घेतले. बाहेर जेवण घेण्याची माझी विनंती त्यांनी सपशेल नाकारली. मात्र ज्या काही मित्रांना दादांचा त्यावेळेचा हुद्दा व नियोजन मंडळाचे माजी सदस्य ही ओळख समजली, त्यांना त्यांच्या साधेपणाचे कौतुक वाटले. मात्र त्यामुळे थोडा घोटाळाही झाला. माझे वरिष्ठ त्यावेळचे एच पी सी एल चे एक डायरेक्टर, श्री अरुण बालकृष्णा साहेब हे चर्चगेटच्या ऑफिसमध्ये असत त्यांना ही गोष्ट कळली. त्यांनी माझी बरीच खरडपट्टी काढली. “तू मला भायखळा ऑफिसमध्ये बोलावून त्यांची ओळख करून द्यावयास हवी होती. आपण बाहेरच त्यांना भोजनासाठी न्यावयास हवे होते.” आमच्या सरकारी कंपनीच्या प्रोटोकॉल प्रमाणे, नियोजन मंडळाचा माजी सदस्य व राज्य सरकारच्या मंत्री दर्जाची व्यक्ती कार्यालयात आली असताना, कंपनीचे डायरेक्टर भेटले नाहीत तर त्या उच्च सरकारी अधिकाऱ्याचीही गच्छंती होऊ शकते. हेच श्री अरूण बाळकृष्ण साहेबांना खटकले होते. “दादांचा स्वभाव व त्यांचे साधे वागणे, याबाबतीत तुम्ही कोणतीच काळजी करण्याचे कारण नाही.” असे मी सांगितल्यावर ते शांत झाले. त्यांनी त्वरित दुसऱ्या दिवशी दादांना फोन केला. क्षमा याचना केली. दादांनी ही त्यांना “तूम्ही अजिबात काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतःच असे शिष्टाचार मानत नाही. आपण पुन्हा कधीतरी भेटू” असे मोघम आश्वासनही दिले. अरुण साहेब शांत झाले असे मला त्यावेळी वाटले. या वेगळ्या सरकारी ‘नेता’ बाबूचे साधे सरळ वागणे त्यांच्या मनावर कुठेतरी  कोरले गेले.

मी हे सर्व विसरून गेलो. मात्र ही गोष्ट येथे संपतनाही..अनेक  राजकारण्यांच्या,मिजाशी,अहंकारी, स्वार्थी वृत्ती ,विलक्षण मागण्या, यांचा या मोठ्या सरकारी अधिकाऱ्याला अनुभव होता. त्यांचे साठी हा एक वेगळाच सरकारी पाहुणा होता. दादांना न भेटल्याची रुखरुख त्यांना लागून राहिली होती, पण मला कधीतरी त्यांच्याशी बोलताना जाणवे.मात्र मी त्याकडे विशेष लक्ष देतच नव्हतो.

पुढे हेच अरुण बालकृष्णा साहेब एच पी सी एल चे सर्वेसर्वा म्हणजे चेअरमन झाले. त्यांनी मला एक दिवस बोर्डीला विश्रांतीसाठी जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. नेहमीच्या कामाच्या धावपळीत, दोन दिवस विसाव्याचे मिळावेत, म्हणून सर्वच जण असे करतात. त्यांना सहकुटुंब बोर्डीस घेऊन आलो. आमच्या बालमभाईंच्या (श्री प्रभाकर सावे), ‘तारपा’ रिसॉर्ट मध्ये सोय केली. त्या सर्व कुटुंबाला बोर्डी परिसर, तारपा खूप आवडले. ती संध्याकाळ तारपाच्या निसर्गरम्य परिसरात  सर्वांनी खूपच आनंदात घालविली.   

        दुसरे दिवशी न्याहारी  आटोपल्यावर, टेबलावरच बसलो असताना, एका प्रश्नाने साहेबांनी मला सपशेल त्रिफळाचीत  केले.. .

  ” राऊत,जयंतराव पाटील बोर्डीत कोठे राहतात?त्यांना मला भेटता येईल काय ?”

    अचानक केलेल्या त्या प्रश्नाने मी भांबावलो मात्र पटकन काही वर्षांपूर्वीचा तो सर्व प्रसंग माझ्या नजरेसमोर आला व त्या प्रश्ना मागील भावना व गांभीर्य कळले ?

    मी दादांना घरी फोन केला. ते 2009 साल असावे. दादा बोर्डीच्या घरीच विश्रांती साठी जास्त करून राहत.ते  घरी होते. त्यांनी आमच्या भेटीची विनंती मान्य केली. सुमारे अकराचे सुमारास मी अरुण बाळकृष्ण,त्यांच्या सौभाग्यवती व कन्या, दादांच्या घरी त्यांना जाऊन भेटलो . विशेष म्हणजे दादांच्या लक्षातही अरुण बाळकृष्णा होते. भेटल्या भेटल्याच अरुणनी दादांचा चरणस्पर्श घेऊन त्यांचे आशीर्वाद मागितले. जुन्या प्रसंगाची आठवण करून पुन्हा क्षमा याचना केली. थोड्या गप्पा गोष्टी झाल्या. सौ. मीनाताईंनी चहाही दिला. आम्ही निघणार तो श्री अरुण साहेबांनी दादांना व मीनाताईंना आपले बरोबर भोजनासाठी  येण्याची विनंती केली. दादा त्यावेळी जास्त बाहेर पडत नसत. अरुण यांचे आर्जव पाहून ते आमचे बरोबर आले. जेवण न घेता फ्रुट सॅलड, कॉफी असे काहीतरी घेतले. मात्र आम्हाला सहभोजनाचा आनंद दिला. आमच्या अरुण साहेबांना त्यादिवशी झालेला आनंद माझ्या  अजून  स्मरणात आहे . सौ.बालकृष्णा यांनीही भरभरून दादांना धन्यवाद दिले, आशीर्वाद मागितले. मला वाटते अरुण साहेबांच्या  घरी या प्रसंगावर चर्चा झाली असावी. दोघांनाही दादांचे खूप अप्रूप वाटत होते. त्यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरून व ओसंडून वाहणाऱ्या आनंदावरून, ते प्रतीत होत होते.

   नऊ वर्षांपूर्वी घडून गेलेला एक प्रसंग. पण दादांच्या व्यक्तिमत्त्वात जादूच अशी होती, एवढा मोठा अधिकारी भारावून गेला होता. आपल्या कुटुंबालाही दादांचे आशीर्वाद मिळावेत या प्रांजल इच्छेने तो बोर्डीपर्यंत येऊन, त्यांचे आशीर्वाद मिळवून कृत्य कृत्य झाला होता.

    धन्य ते दादा, जयंतराव व धन्य ते अरुण बाळकृष्ण! 

  ” गुणी गुणम् वेत्ती”, हेच या प्रसंगातून सिद्ध झाले. एका परक्या, त्रयस्थ व्यक्तीने, केवळ एका प्रसंगांतून दादांची पारख केली व त्यांना अभिवादन करण्यात धन्यता मानली यात त्या व्यक्तीचा व दादांचाही मोठेपणा होता.

    अरूण सर एक अत्यंत सचोटीचे ,कार्यक्षम व वेगळे सरकारी अधिकारी होते. जगातील.एक, ‘फॉर्च्यून फाईव्ह हंड्रेड'(FORTUNE 500),व भारतातील नंबर दोनच्या पेट्रोलियम कंपनीत चा ,नंबर एक चा अधिकारी म्हणून काम करणे, किती सन्मानाचे व जोखमीचेही असते, हे तेथे बसल्याशिवाय कळणार नाही.श्री अरुण हे त्या उच्च पदावर विराजमान होऊन सुद्धा, नेहमी सर्वांशीच साधेपणाने वागत.  मला प्रत्यक्ष त्यांचे हाताखाली  काम करण्याची संधी मिळाली हे माझेही भाग्यच!  आजही अरुण साहेब बेंगलोर स्थित असून सेवानिवृत्तीचे समाधानी जीवन जगत असतात.  मी त्यांच्या संपर्कात असतो.

    आमच्या सो क्षत्रिय संघाच्या कार्यात दादांनी योगदान दिले आहे.सन 1994 ते 96 या काळात ते संघाचे विश्वस्त होते .तसेच सन1999 ते 2002 या काळात त्यांनी संघाचे अध्यक्षपद भूषविले. शेती विज्ञानाच्या क्षेत्रात,आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुमोल संशोधन चालू असताना व आदिवासी सेवा कार्यातही अंतर न पडू देता, दादा आपल्या ज्ञाती बांधवांनाही विसरले नाहीत. जीवनात असा समतोल साधणारी ,डाॅ.जयंतराव पाटलांसारखी,  मंडळी खूप दुर्मिळ.. 

डॉ.जयंतराव पाटील यांचे पू. कैअण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरातील सभागारात लावलेले हे तैलचित्र. दादा सो क्ष समाजोन्नती संघाचे काही काळासाठी अध्यक्ष व विश्वस्त होते.

     “व्यक्ती पेक्षा संस्था मोठी, आणि कार्यकर्त्याच्या मानसन्मानापेक्षा संस्थेचे हित महत्त्वाचे !”हे त्यांचे ब्रीद होते.व आमच्या ज्ञाती संस्थेत काम करताना  अनेकविध प्रसंगांतून सर्वांना दादांच्या या वृत्तीचा  प्रत्यय  आला आहे… संकटकाळी जे समाजाला निभावून नेते, तेच खरे नेतृत्व! दादांसारख्या एका कृषी वैज्ञानिकाकडे, असे सर्वंकष नेतृत्वगुण ही होते,

         बाहेरून अत्यंत सौम्य शांत व मवाळ भासणारे दादा आपल्या तत्त्वाविरुद्ध एखादी गोष्ट घडत असल्यास अथवा कोणावरही अन्याय होत असल्यास मात्र ऊद्विग्न होत. गोखले एज्युकेशन सोसायटी बरोबर झालेल्या संघर्षातही दादांची हीच वृत्ती दिसली! या प्रकरणीही त्यांना खूप मनस्ताप झाला असावा, मात्र वर म्हटल्याप्रमाणे दादा या सर्व ‘मानापमान नाट्या’ पलिकडे  गेलेले व्यक्तिमत्व होते. आपले गुरु आचार्य भिसे,आचार्य चित्रे व पिताश्री शामरावजी पाटील यांच्याही आयुष्यात आलेले अनेक चढउतार त्यांनी पाहिले होते. त्यामुळे अशा प्रसंगी कसे वागावे याचे बाळकडू जणू त्यांना मिळाले होते. आयुष्यातील कोणत्याही बिकट प्रसंगात दादांच्या चित्तवृत्ती कधीच ढळल्या नाहीत. दादा कधीच हतबल व निराश झाले नाहीत. “विजय हा नैतीकतेचा  व सत्याचा होतो” हे त्यांना पूर्ण ज्ञात होते. 

   दादा कधीही असे अप्रिय विषय निघाले की त्यावर काहीच मतप्रदर्शन न करता,अत्यंत शांतपणे, वादग्रस्त विषयावरील चर्चा टाळीत.

     सो क्ष क्षत्रिय संघाने दादांच्या मौलिक सेवेबद्दल, त्यांच्या तैलचित्राचे अनावरण कै. अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिराचे मुख्य सभागृहात केले असून, त्यांचा गौरव केला आहे. समाजाच्या 100 वर्षाच्या वाटचाली चा मागोवा घेताना, काढलेल्या,” सोमश्री” या गौरव ग्रंथात दादांबद्दल आदराने लिहिताना, संपादक म्हणतात, ,

           “सो क्ष समाजोन्नती संघाच्या कार्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.संघाच्या सुवर्ण महोत्सवात ,1970 साली त्यांनी कृषी विषयक परिसंवादाचे संचालन केले. या महोत्सवात त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ,कृषी ,औद्योगिक व कला प्रदर्शनाचे आयोजन केले होते .संघाच्या माहीम येथे आयोजित हीरक महोत्सवाचे अध्यक्ष स्थान त्यांनी भूषविले. त्याच समारंभात त्यांनी लिहिलेल्या “शेती व आपला समाज”, या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. सण 1994 ते 96 या काळात ते सो क्ष संघ फंड ट्रस्टचे विश्वस्त होते. तसेच 1999 ते 2002 या काळात त्यांनी संघाचे अध्यक्षपद ही भूषविले. त्यांच्या सेवाकाळात, संघाचा अमृत महोत्सव चिंचणी येथे संपन्न झाला. त्यांच्या कार्यकाळात संघ कार्याची व्याप्ती वाढविणारे काही घटना बदल ही संमत झाले. त्या काळात केळवे रोड येथील भूखंड ही संस्थेला प्राप्त झाला.

    ते आदर्श कृषी वैज्ञानिक आणि थोर विचारवंत होते. त्यांनी कृषी क्षेत्रात केलेले प्रयोग आमच्या शेतकऱ्यासाठी वरदान ठरले आहेत. त्यांची तत्त्वनिष्ठा, स्वभावातील सरळता, सेवाभावी आणि शांत स्वभाव अनुकरणीय आहे.यांच्या तेजः पुंज चेहऱ्यावरील शालीनता त्यांच्यातील सात्विकतेचे दर्शन घडविते.”

     ज्या संघात दादांनी विश्वस्त म्हणून काम केले, त्याच ट्रस्ट संघामध्ये मलाही कार्यकारी विश्वस्त म्हणून योगदान देण्याचे भाग्य मिळाले. त्यावेळी मी दादांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलो असताना ,त्यांनी माझे कौतुक तर केलेच पण आपल्या अनुभवावरून दोन मौलिक उपदेशाचे शब्द सांगितले. ” आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवणे, हीच विश्वस्ताची पहिली कसोटी आहे”, माझ्या वैयक्तिक आयुष्यातही दादांचा हा सल्ला मी नेहमीच आठवणीत ठेवला आहे. 

दिल्लीतील भारत सरकारच्या याच “योजनाभवना”,त दादांनी नियोजन मंडळ सदस्य म्हणून योगदान दिले. मलाही त्यांच्यामुळे या वास्तूचे दर्शन झाले होते.

       दादा नियोजन मंडळाचे सदस्य असताना त्यांना दिल्लीत निवासस्थाना साठी बंगला मिळाला होता. मी देखील ऑफिसचे कामासाठी अधून मधून दिल्लीत जात असे हे त्यांना माहीत होते. माझ्या एका दिल्ली फेरीत त्यांनी माझ्याशी संपर्क करून मला त्यांच्या निवासस्थानी बोलावून मला ते दाखविले होते. तेथून त्यांचे बरोबर दिल्लीच्या ‘योजना भवनात’ ही मला जाण्याचे भाग्य लाभले. त्यावेळी येथे हजर असलेल्या काही उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांची मला ओळख करून दिली. दादांच्या प्रेमाची जाती वेगळीच होती. 

    स्वतः जमनालाल बजाज पारितोषिकाचे मानकरी असलेले दादा पुढे त्यांच्या निवड समितीवरही होते. प्रत्येक वर्षीच्या या पुरस्कार समारंभास दादांनी मला न चुकता आमंत्रण पाठविले व मी देखील बहुतेक समारंभास उपस्थित राहिलो. अनेक मोठी माणसे, उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय नेते, तेथे मला पहावयास मिळाले त्यांचे विचार ऐकता आले. विशेषतः कै. भास्करराव सावे, देहेरी यांना ज्यावर्षी हा पुरस्कार मिळाला, त्यावर्षी आम्हा बोर्डी, घोलवड, देहेरी परिसरातील अनेकांचे जणू स्नेहसंमेलनच त्यानिमित्ताने बजाज भवनात भरले होते. दादांनी आम्हा सर्वांना तेथील उच्च पदाधिकारी व बजाज कुटुंबातील काही सदस्यांची ओळख करून दिली होती. 

      दादांच्या अर्धांगिनी कै. सौ. मीनाताई यांचे विषयी मी मागे उल्लेख केला आहे. दादांचे सुपुत्र दीपक, प्रदीप आणि कन्या सौ. लता हर्षवर्धन पाटील, हे सर्व आपापल्या क्षेत्रात अतिशय यशस्वीपणे मार्गक्रमणा करीत आहेत.

    श्री दीपक यांनी बी,एससी आणि एम बी ए ,पदव्या प्राप्त केल्यानंतर भारतातील व परदेशातील अनेक उद्योग समूहातील व्यवस्थापनात उच्च पदावर काम केले आहे. त्यानी फिलिपाईन्स मधील “आंतरराष्ट्रीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेत”, नेतृत्व विकास, हा अभ्यासक्रम पूर्ण केला. योगायोग म्हणजे दीपकजी जकार्ता, इंडोनेशियामधील टेक्समॅको उद्योग समूहात, एच आर डी चे प्रमुख असताना, मलाही कार्यालयीन कामानिमित्त इंडोनेशियात जाण्याचा योग आला होता. त्यावेळी श्री दीपक यांनी माझे व माझे सहकारी श्री दामले यांचे मनापासून आदरातिथ्य करून, संपूर्ण जकार्ता शहर आपल्या आलिशान गाडीतून फिरविले होते. त्यांच्या पत्नी सौ. नीलिमा या बी एससी पदवीधर असून त्यांनीही इज्रायलमधील,” गोल्डा मायर आंतरराष्ट्रीय संस्थे”तून, उत्पादक रोजगार हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. कृषी व ग्रामविकास कामात नीलिमा ताई कार्यरत असतात.

  सौ मीनाताई ,नातू चि.नीरज व स्नुषा सौ.सुनीता,सह दादा.

     दुसरे चिरंजीव श्री. प्रदीप यांनी दापोलीच्या कृषी विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर शेतीचा व्यवसाय सुरू केला. एक धडाडीचे, कर्तबगार व कल्पक शेतकरी म्हणून आमच्या परिसरात त्यांचे नाव आहे. प्रदीपनी अमेरिकेतील इंडियाना राज्यातील, पर्ड्यू  विद्यापीठात कृषी व फलोद्यानातील तंत्रज्ञानाचाही अभ्यास केला आहे. इज्राइलचा दौरा करून तेथील शेती अभ्यासलेली आहे. श्री प्रदीप यांची पत्नी सौ.सुनीता या देखील, बी ए असून, बोर्डी मध्ये अनेक सामाजिकव  शैक्षणिक उपक्रमात  सहभागी होतात. पतीच्या शेती व्यवसायातही त्यांची मोठी मदत असते.

   दादांच्या कन्या सौ.लता हर्षवर्धन पाटील यांनी, “इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स” मधून वनस्पती शास्त्रात, एम एस सी पदवी, मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांकाने प्राप्त केली आहे. पती डॉ.हर्षवर्धन पाटील हे प्रख्यात,’पेडीयाक्ट्रीक सर्जन’आहेत. आगाशी येथे त्यांनी ‘सुश्रुषा’,रुग्णालय सुरू केले आहे. तसेच विरार येथील, ‘सहयोग हॉस्पिटल’, देखील त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत असते. डॉ. हर्षवर्धन हे आमच्या पूज्य तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृहाचे माजी विद्यार्थी असून, मी त्या वसतिगृहाचा रेक्टर असतानाच ते वैद्यकीय शिक्षण घेत होते. एक अत्यंत हुशार व सालस असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. सौ लता ताईंनी इंग्लंडमधील’, सेलि ओक कॉलेज’ येथे ‘आंतरराष्ट्रीय विकासाचा अभ्यास’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. पतीचा व्यवसाय व महिला विकासाच्या क्षेत्रात त्या आजही कार्यरत आहेत.

    या लेखाचे पूर्तीसाठी सौ.लता ताईंनी मला विनाविलंब ,बहुमोल मदत केली.त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. मी विनंती केल्यावरून, आपले पिताश्री जयंत दादा यांचे विषयी त्यांनी लिहिलेल्या आठवणी खूपच बोलक्या व भाऊकआहेत. ‘डॉ.जयंतराव पाटील नावाचा एक विश्वविख्यात शेतीशास्त्रज्ञ, कुटुंब प्रमुख व आदर्श पिता म्हणूनही  कसा  होता’, याचे अत्यंत मनोज्ञदर्शन त्यातून होते. त्यांच्याच शब्दात मी त्या देत आहे …

डॉ.जयंतराव पाटील व सौ मीनाताई आपल्या कुटुंबासोबत. मागे उभे,चि. प्रदीप ,दीपक ,स्नुषा सुनीता, निलीमा व कन्या सौ.लता पाटील

        “सुप्रसिद्ध शेतीतज्ञ व केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ जयंतराव शामराव पाटील हे माझे वडील. कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रात असताना, परिसरातील आदिवासी समाजामध्ये शेती व शिक्षण प्रसाराचे महत्त्वपूर्ण काम ते करीत होते. हे बघतच आम्ही लहानाचे मोठे झालो. घरातील आम्ही सर्वजण त्यांना” दादा”,असे संबोधत असू. दादांचा घरात धाक होता परंतु वडील म्हणून मला कधीही त्यांची भीती वाटली नाही. त्यांचे व्यक्तिमत्व असे होते की ,मला समजायला लागल्यापासून त्यांच्याबद्दल आदरच निर्माण झाला आणि अभिमान वाटायला लागला”

    “मी बोर्डीस शाळेत शिकत असताना,इयत्ता पाचवीपासून वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत असे.विषय कोणताही असो दादा मला त्या विषयावर भाषणाचे मुद्दे सांगत.कोणत्याही पुस्तकाच्या संदर्भाची त्यांना गरज भासत नसे. इतर स्पर्धकांपेक्षा माझे भाषण वेगळे व प्रभावी असे, त्यामुळे माझा पहिला क्रमांक ठरलेला असे.”

सौ मीनाताई पाटील यांचे औक्षण करताना स्नुषा, सौ नीलिमा दीपक पाटील. मागे उभे डॉ. जयंतराव पाटील व श्री दीपक पाटील

      “माझी आई सौ.मीना पाटील, कोसबाड येथील आदिवासी मुलांच्या शाळेची मुख्याध्यापिका होती. हे विद्यार्थी आश्रम शाळेत राहात. दादा आम्हा भावंडांना आश्रम शाळेत भेट देण्यास सांगत.त्याप्रमाणे आम्ही तेथे जात असू. ते आम्हाला अनेक वेळा आदिवासी पाड्यावर घेऊन जात, त्यामुळे दादांचे प्रत्यक्ष काम कसे चालते याची कल्पनाही आम्हा तिन्ही भावंडांना आली होती. आमच्या मनात बाजूच्या आदिवासी समाजाविषयी आत्मीयता निर्माण होतं होती.”

      “दादा केंद्र व राज्य सरकारच्या अनेक समित्यांसाठी काम करीत. त्यानिमित्त त्यांचे भारतभर दौरे होत असत. घरी आल्यानंतर आम्हाला सर्व वृत्तांत सांगत. लोकोपयोगी कामे कशी चालली आहेत नवनवीन प्रयोग कोणते होत आहेत व ते आपल्याला कसे करता येतील याचा त्यात उल्लेख असे.

     कोसबाड संस्थेमध्ये, त्यांनी असे अनेक प्रकल्प राबविले. दादा ही माहिती इतकी छान सांगत की, ती ऐकणे आमच्यासाठी पर्वणीच असे.”

    “दादांना स्वतःच्या कॅमेऱ्याने फोटो काढायला खूप आवडत असे. त्यांनी स्वतःसाठी विकत घेतलेला कॅमेरा ही एकमेव वस्तू असावी! 1971 साली,  CAA, ‘कम्युनिटी एड अब्राॅड’, या ऑस्ट्रेलियातील संस्थेने, दादांना तेथील गवतांची  पिके व शेतीचा अभ्यास करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्या भेटीत दादांनी तेथील कुरणे, मेंढ्या, वने, शेते यांचे खूप फोटो काढले. भारतात आल्यानंतर त्याच्या स्लाइड्स बनविल्या. एक स्लाईड प्रोजेक्टर विकत घेतला. संध्याकाळी अंधार झाल्यानंतर सर्वांना ओटीवर बसून प्रोजेक्टर वर भिंतीवर सर्व स्लाईड्स दाखविल्या. आजी,आजोबांनाही त्यात सहभागी केले होते. छान माहिती मिळाली. काय मजा आली होती ते सर्व बघतांना!!”

      “संस्थेत त्यावेळी महात्मा गांधीजींचे सहकारी पूज्य स्वामी आनंद यांचे वास्तव्य होते. रोज सायंकाळी आमच्या घरासमोरील अंगणात, ते प्रार्थनेसाठी येत. दादा स्वामीजींच्या प्रार्थनेत सहभागी होतं. आई व आम्ही भावंडेही प्रार्थनेस बसत असू. दादांचा आवाज खूप सुरेल होता. छान भजने गात असत. ‘गुरुकृपांजन पायो मेरे भाई..’, ‘पायोजी मैने ..’,’मोरी लागी लगन ,गुरु चरणनन की.’.. ही त्यांची काही आवडती भजने होती. मला त्यांनी शिकवली होती. पुढे दादांनी सर्व नातवंडांना,आश्रम भजनावलीची पुस्तके भेट दिली, ती अजून जपून ठेवली आहेत”

        “भारताच्या नियोजन आयोगात असताना दादांनी भारतांतील अनेक संस्थांना भेट दिली. त्या शहरांतील व गावातील असलेली शेती, ऐतिहासिक वास्तू, भौगोलिक स्थान व इतर प्रसिद्ध गोष्टी याविषयी दादा व आई दोघांनी, चारही नातवंडांना खूप सुरेख माहितीपूर्ण पत्रे लिहिली आहेत. नातवंडे इंग्रजी माध्यमांत शिकत असल्याने काही पत्रे इंग्रजीत लिहिली आहेत, ती आम्हीपण वाचत असू.वाचताना, पंडित नेहरूंची, “ईंदिरेस पत्रे’ या पुस्तकाची आम्हाला आठवण होई.”

श्री कोटणीस सरांबरोबर दादा व कुटुंबीय आगाशी येथे. दादा आपल्या सुशील व शलील या नातवासोबत. “शेती रत्न”,  महाराष्ट्र सरकारच्या मानपत्रा सोबत ,दादा.

         ” दादांनी लिहिलेली पत्रे व साहित्य हे अत्यंत सोप्या भाषेत व ओघवत्या शैलीत असायचे.”वाचणाऱ्याला त्याचा आशय समजला पाहिजे”, हे ते नेहमी सांगायचे. त्यांनी जवळपास 35 पुस्तके लिहिली. या सर्वांचे ‘प्रूफ रीडिंग’ आई करत असे. पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वप्रथम स्वतःच्या हस्ताक्षरात स्वाक्षरी करून आम्हाला देत असत. आमचा हा अमूल्य ठेवा आहे.”

    ” दीपक भाई, प्रदीप भाई व मी महाविद्यालयीन शिक्षणानिमित्त होस्टेलमध्ये बाहेरगावी राहिलो. पत्रव्यवहार, फी, मनीऑर्डर ही कामे आई करत असे. कामाच्या निमित्ताने दादांचे त्या गावी दौरे असल्यास,दादा आम्हाला आवर्जून भेटायला येत. पैसे व खाऊ देऊन जात.”

         “दादांनी आजन्म खादीची वस्त्रे वापरली. माझी आजी खादीचे नऊवारी पातळ नेसत असे.त्यावेळी ही पातळं सर्व ठिकाणी उपलब्ध नसत. जेव्हा कधी दादांचा नागपूरला दौरा असे तेव्हा आजीसाठी व आईसाठी खादीची पातळं घेऊन येत. आजीची दादांवर खूप माया होती. दादा इंडोनेशियाला, दीपक भाईकडे गेले असताना अचानक आजीची तब्येत बिघडली. दादांना समजल्यावर त्वरित दादा परत आले. त्यानंतर काही दिवसांतच आजीने प्राण सोडले. घरात कोणीही आजारी आहे हे समजल्यानंतर दादा त्याची काळजी घेत, लगेच डॉक्टर कडे घेऊन जात.बरेचदा कोणी ऍडमिट असल्यास हॉस्पिटलमध्ये बसून रहात.’कुटुंब वत्सलता’,हा विशेष गुण त्यांच्या कडे असल्यामुळे, आम्ही मुले खरेच भाग्यवान आहोत,

 दादांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!”

दादांचे इंग्रजी व मराठी हस्ताक्षर. त्यांच्या दैनंदिन रोजनिशीतील  एक पान.

   एक प्रेमळ पिता व आदर्श कुटुंब प्रमुख म्हणूही दादा किती मोठे होते याची जाणीव या आठवणीतून झाल्याशिवाय राहत नाही. खरेच असा कर्तृत्ववान, महान, परंतु तितकाच प्रेमळ पिता मिळणे हे मुलांचे सद्भाग्यच असते!!

       दादांनी व त्यांच्याप्रमाणेच अनेक कृषी साधकांनी, भारतीय शेतकऱ्याला चांगले दिवस येण्यासाठी, खऱ्या अर्थाने तो,’ शेतकरी राजा’, होण्यासाठी, आयुष्यभर कष्ट केले. दुर्दैवाने आजही सर्वसाधारण भारतीय शेतकरी ,राजा तर नाहीच,  सुख- समाधानाचे दोन घासही खाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या देशात,कृषी हे एकमेव क्षेत्र असे आहे जेथे उत्पादक आपल्या उत्पादनाची किंमत स्वतः ठरवू शकत नाही. ही किंमत सरकार द्वारा नियमन केलेल्या किंमत धोरणावरून, व्यापारी आणि मध्यस्तांच्या लहरी वरून ठरविली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नफ्याचे प्रमाण घटताना दिसते. कधी तरी शेतकरी सर्वस्वी तोट्यात गेलेला दिसतो. आपण अपेक्षा करूया,आमच्या भारतीय शेतकऱ्याचा ही “एक दिवस”, कधी तरी असेल व दादांसारख्या अनेक कृषी साधकांचे अपुरे स्वप्न, त्यादिवशी खऱ्या अर्थाने पूर्ण होईल.

        दादांच्या जीवनाबद्दल आठवणी रूपाने मला जे काही सांगायचे होते ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांच्या कन्या,सौ.लता ताई, सुपुत्र दीपक, प्रिं. प्रदीप सर, कोसबाड मधील एक वयोवृद्ध आदिवासी शेतकरी श्री.चमार, सो.क्ष. संघातील सहकारी, यांनी दादांविषयी सांगितलेल्या आठवणींचाही मला उपयोग झाला. सर्वांचा मी मनःपूर्वक आभारी आहे.  डॉ.जयंतराव पाटील, एक, ‘परिपूर्ण व्यक्ति’,म्हणून माझ्या दृष्टिकोनातून,साकारण्याचा मी प्रयत्न केला.त्यातून, मी सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे, एक गोष्ट स्पष्ट दिसून येते. दादांनी आपल्या यशस्वी जीवनात,आई, वडील गुरुजन व महाजन यांनी दाखविलेला मार्ग निःशंकपणे चोखाळला. सेवा कार्य करीत असताना, कोणाताही अहंपणा, मोह, मत्सर, निंदा-स्तुती बाजूला सारून, जे घडते आहे ती रामेच्छा, या प्रांजळ भावनेने ते आयुष्याची वाटचाल करीत राहिले. दादांचे जीवन अभ्यासल्यावर मला म्हणून मला,ज्ञानोबांची ती प्रसिद्ध ओवी ऊद्धृत करावी वाटते,

   “माळीये जेउतें नेलें | तेउतें निवांतचि गेलें | 

   तया पाणिया ऐसे केलें | होआवें गा ||”

माळी पाण्याला नेईल ,तिकडे पाण्यानं जाणं आणि ते सुद्धां निवांतपणें! असं भगवत् रूपी माळ्यावर सर्व सोपवून, ‘निवांतपणें’ कर्म करण्यासाठी, मनाची जबरदस्त तयारी असावी लागते. युद्धाआधी अर्जुनाची तशी मनाची तयारी करण्यासाठी भगवंताला हे सांगावे लागले. 

त्या पाण्याप्रमाणें, जगण्यासाठी ‘मी’पणा मारून कर्तव्य करावें लागते. आणि अशी साधनाच माणसाचा अहंकार दूर करते! जयंतरावांनी, आपला अहंकार, विषाद, मोह, आसक्ती आणि ‘मी’ पणा पूर्ण बाजूस करून,  लौकिक व अलौकिक दोन्ही प्रकारे,आपल्या परिसरातील गरीब ,दुर्लक्षीत,गरजू ,आदिवासी व शेतकऱ्यांची सेवा केली. म्हणून ते वंदनीय झाले !

    दादांच्या जीवनचरित्रातून,नियतीच्या चक्रामधील अनेक गोष्टींचा उलगडा व बोध घेण्यासारखा आहे .आयुष्याला वळण देणाऱ्या काही गोष्टी अकल्पितपणे वाट्याला येतात.अंगभूत क्षमतांना आकार देण्याचे काम त्या करतात.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे ही आयुष्य असेच अनेक अकल्पित घटनांनी भरलेले होते. आपल्या आत्मकथनात सर्वपल्ली म्हणतात,

     “Life is a mysterious fabric woven by chance, fate, and character!”

  जीवनाचे महावस्त्र ज्या धाग्यांनी विणलेले असते, त्यातील काही धागे दैवाधीनतेचे ,काही स्वभावगुणांचे तर काही चालून येणाऱ्या संधीचे असतात. यात दैव आणि संधी यांची चक्रे फिरतात ती कधी? कर्तृत्वाचे, गुणवत्तेचे, चारित्र्याचे इंधन मिळेल तेव्हा! भारतात ,महाराष्ट्रात आणि बोर्डी गावात जन्माला येणे हे झाले दादांचे दैव; तेथे उत्तम शाळा, कॉलेज व गुरुजन वाट्याला आले हे त्यांचे सुदैव; त्यांच्या मार्गदर्शनाने आत्मोन्नती साधणे हा झाला स्वभाव; जगातील अनेक विद्वत सभांमध्ये जाण्याची, बोलण्याची संधी मिळणे हा झाला योग; आणि नियोजन मंडळाचे सभासदत्व व कृषीरत्न असे पुरस्कार प्राप्त होणे हे झाले भाग्य; तीच पदे, पदव्या आणि मोठेपण अनेकांच्या वाट्याला दादां प्रमाणे आले असेल, पण संस्कारसंपन्न दादांच्या, “व्यक्तिमत्त्वाची एकमेवता”, ही झाली दादांची व्यक्तिगत कमाई!! काही गोष्टी दैवाने द्याव्यात आणि माणसाने घ्याव्यात अशा असतात. या उलट काही गोष्टी माणसाने कराव्यात, दैवाने पहाव्यात व नियतीने नोंदवाव्यात अशा असतात.

    दादांनी, सफल,सार्थक केलेल्या आयुष्यातील अनेक गोष्टींची नोंद नियतीने केली आहे. ती अनंत कालपर्यंत राहणार आहे. अशा चिरस्मरणीय, पूज्य दादांच्या स्मृतीला मनोभावे वंदना!!