माझगावची मजा!

हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन (HPC) म्हणजे पूर्वीची ‘ एस्सो’ (Esso) ही अमेरिकन कंपनी. या कंपनीचे माझगाव- टर्मिनल हे उत्पादन, साठा व वितरणाचे (production, storage, & distribution) एक प्रमुख केंद्र होते. कंपनीची सर्व ल्युब्रिकंट्स (वंगणे- Lubricants) या ठिकाणी तयार करण्याचा मोठा कारखाना आहे व येथूनच ती देशभर व परदेशात सुद्धा वितरित केली जातात. माझगांव हे बंदर  असल्याने व मुख्य इंदिरा गोदींपासूनही जवळ असल्याने, कच्च्या मालाची आयात व पक्क्या मालाची निर्यात या दृष्टीने खूप सोयीची जागा आहे. ह्या अमेरिकन कंपन्यांनी समुद्र किनाऱ्यास आपल्या सर्व प्रमुख उत्पादन केंद्रांची स्थापना केली असून त्यांच्या धंदेवाईक दृष्टिकोनाचा तो एक भाग होता. 

१९७० साली जेव्हा मी ‘एस्सो’ कंपनीत रुजू झालो त्यावेळी तेल शुद्धीकरण व ल्युब्रिकंट उत्पादनाच्या बाबतीत तीन प्रमुख परदेशी कंपन्या होत्या त्यात ‘एस्सो’ ही नंबर १ ची कंपनी होती; बर्मा-शेल Burma-Shell (पुढे भारत पेट्रोलियम -BPCL) व Caltex कॅल्टेक्स (पुढे हिंदुस्थान पेट्रोलियम -HPCL मध्ये विलिन) ह्या इतर दोन परदेशी कंपन्या होत्या. एस्सो, शेलचे शुद्धीकरण कारखाने व उत्पादन केंद्रे मुखतः मुंबईत, तर कॅल्टेक्सची रिफायनरी विशाखापट्टम येथे आहे. त्या काळात ह्या कंपन्यांत नोकरी मिळणे म्हणजे तुम्हास लॉटरी लागली असेच तरुण इंजिनीअर समजत! व त्यासाठी खूप स्पर्धेस तोंड द्यावे लागे, कारण त्या कंपन्या खूपच चांगले वेतनमान देत असत! मात्र मी ज्यावेळी या पेट्रोलियम उद्योगात शिरलो, त्या १९७० च्या काळात, राष्ट्रीयकरणाचे वारे वाहू लागले होते, बरेचसे सिनियर ऑफीसर्स त्या कंपन्या सोडू लागले होते; व या कंपन्यांना देखील आपले दिवस आता भरत आले आहेत याची चाहूल लागल्याने त्यांनी देखील बिस्तरा कमी करून काही ठिकाणची आपली केंद्रे व डेपो बंद करण्यास सुरुवात केली होती. 

HPCL माझगाव टर्मिनल

         त्या वेळी मी दादरच्या वर्तक हाॅल वरील तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृहात राहत होतो व रेक्टर म्हणून जबाबदारी देखील सांभाळत होतो. एम. एस्सी. (टेक) झाल्या-झाल्या विक्रोळीच्या गोदरेज कंपनीत चांगली नोकरी मिळाली होती. गोदरेज ही आजही एक उत्तम कंपनी आहे व त्यावेळी तर तिचा विस्तार सुरु होता व पुढे ही चांगल्या जागा मिळण्याची शक्यता होती. माझी गोदरेज कंपनीत मिळालेली नोकरी व तेथे कायम नोकरी करण्याचा माझा विचार, हा एक वेगळा विषय आहे. त्यामुळे तेथे काम करत असतांना दुसरी नोकरी व राहण्यासाठी घर ह्या साठी माझा सतत प्रयत्न सुरु होता. 

मनासारखी नोकरी मिळेना व गोदरेज कंपनीत काम करणेही आवडेना या द्विधा मनस्थितीत असताना मुंबईच्या प्रसिद्ध VJTI (व्ही. जे. टी. आय.) कॉलेजात काही लेक्चरर्स च्या जागा भरायची जाहिरात आली. त्या वेळी त्यांच्या कडे इंजिनीरिंग डिग्री बरोबरच L.T.C. हा डिप्लोमा देखील मिळत असे व त्यास बाहेर खूप मागणी देखील होती. हा डिप्लोमा रसायनशास्त्र व तंत्रज्ञान याच्याशी संबंधित असल्याने त्यास M.Sc (Tech) पदवीधरांची गरज होती. मी तेथे प्रयत्न करण्याचं ठरविले. पगार अगदी कमी मिळणार होता पण व्ही. जे. टी. आय. च्या समोरच माझे कॉलेज UDCT (आता ICT) यु. डी. सी. टी. असल्याने, फावल्या वेळात पुढचा अभ्यासक्रम म्हणजे पीएच.डी. (Ph.D) चा अभ्यास करावा असे वाटले. त्या प्रमाणे मी त्यावेळीच माझे यु.डी.सी.टी. तील प्राध्यापक डाॅ. सुब्रम्हण्यम यांच्याशी बोललो. त्यांनीही माझ्या या योजनेला मंजुरी दिली. लेक्चरर म्हणून दिवसाला २-३ लेक्चर्स असत. त्यामुळे रिकामा वेळ भरपूर असे व त्या वेळांत इतर काही उद्योग करण्यापेक्षा समोरच्याच युडीसीटी मधील प्रयोगशाळा /वाचनालयांत आपला डॉक्टरेटचा अभ्यासक्रम सुरु ठेवावा हा सुज्ञ विचार करत मी गोदरेज सोडून व्ही.जे.टी.आय. मध्ये आलो. मला माझ्या मित्रांनी, हितचिंतकांनीं त्या वेळी वेड्यात काढले- एवढी सुंदर कंपनी, मोठा पगार सोडून शेवटी ‘मास्तरकी’ करण्यासाठी कमी पगारावर कशाला जातोस असे त्यांचे म्हणणे व्यावहारिक नव्हते का? पण विधिलिखित काही वेगळेच होते व ‘डॉक्टरेट’ ही उपाधी मला मिळणार नव्हती तसेच मास्तरकी करण्याचे ‘दुर्भाग्य’ ही नशिबात नव्हते हे पुढील घडामोडींची सिद्ध झाले. कॉलेजांतील मुलांना शिकवणे व तेही व्ही. जे. टी. आय. सारख्या, हे सोपे काम नव्हते! खूप तयारी करावी लागे, रेक्टरच्या कामाची जबाबदारी होती तसेच राहण्यासाठीही निवारा शोधण्याचे काम चालू होते – या सर्वांमुळे पी.एच. डी. चा अभ्यास होत नव्हता. सर्वच-सर्व एकावेळी जमत नव्हते – मात्र या शिकविण्याच्या नोकरीत एक आनंद मिळत होता. मी एका हाडाच्या शिक्षकाचाच मुलगा त्यामुळे ही कला तशी अवगत होती व मुले ही अशी असतात, की तुमच्या चांगल्या कामाची पावती वर्गातच त्यांच्या चेहऱ्यावरुन व शिस्तबद्ध वागण्यात दिसून येते. सर्व ठीक चालले होते! मात्र एक वर्षभर ही शिकवणी केल्यावर, आपल्या शिक्षणसंस्थासुद्धा भ्रष्टाचाराने व स्वार्थी शिक्षकांनी कशा बरबटलेल्या आहेत याचे विदारक दर्शन होऊ लागले. व्ही. जे. टी. आय. ही तर त्यावेळी व आजही एक नामांकित शिक्षणसंस्था –  तेथे जर एवढी कारस्थाने त्यावेळी पडद्या मागे चालत होती तर इतर सामान्य संस्थांचे काय? कॉर्पोरेट जग सोडून मी या अकॅडेमिक पेशाकडे याच ‘राजकारणाला’ त्रासून आलो होतो व येथेही तेच चित्र दिसू लागल्यावर खूपच अस्वस्थ झालो – वाटू लागले आपली मोठी चूक झाली आहे!

सुदैवाने त्याच मनःस्थितीत असतांना एक दिवस टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एस्सो कंपनीची मोठी जाहिरात पाहण्यांत आली. त्यांना काही केमिकल इंजिनीअर्स, टेक्नॉलॉजिस्ट, मुंबईतील संशोधन प्रयोगशाळेत (R & D) पाहिजे होते व त्यामुळे सर्व भारतांतील टाइम्स च्या आवृत्ती मध्ये त्यांनी जाहिरात दिली होती – केवळ चार जागा होत्या!

अर्ज टाकून पाहण्यांत काय आहे असा विचार करून त्यावेळी आम्ही बहुतेक युडीसीटी च्या वर्ग मित्रांनी अर्ज टाकून दिले. त्यांत माझे यु.डी.सी.टी. मधील काही वरिष्ठ सहकारी व ज्यांनी PhD पदवी प्राप्त केली होती असे ही मित्र होते! या कंपन्या केवळ गुणवत्तेवर नव्हे तर तुमचे सामाजिक, राजकीय वजन किती आहे या निकषावर देखील निवड करतात अशी त्यांची ख्याती होती व कित्येक मंत्री, खासदार, पोलीस कमिशनर्स, अशांचे नातेवाईक वा उत्तम खेळाडू असे लोक एस्सो मध्ये होते. माजी मुख्यमंत्री कै.कन्नमवार यांचे चिरंजीव, सातारचे सरदार घाटगे यांचे चिरंजीव नंदू नाटेकर ही महाराष्ट्रांतील काही उदाहरणे होत! ही  परेरा, मूर्ती मंडळी त्यावेळी एस्सो मध्ये होती. 

मला निवडीची अजिबात अपेक्षा नव्हती कारण पेट्रोलियम क्षेत्राचा अनुभव नव्हता व कोणी मोठा ‘गॉडफादार’ ही माझ्या मागे नव्हता! पहिली स्क्रिनिंग टेस्ट झाली त्यावेळीच कळले कि काम मोठे कठीण आहे, कारण केवळ मुंबई केंद्रातच सुमारे तीनशे जण त्यावेळी मुलाखतीसाठी (interview) आले होते. अशी केंद्रे दिल्ली, कलकत्ता व मद्रास येथे ही ठेवली होती!

पहिल्या टेस्टनंतरमला दुसऱ्या interview चा call लगेचच थोड्या दिवसांत आला – खूप आश्चर्यही वाटले व बरेही! दुसरा Interview एक पूर्ण दिवस ५-६ अधिकाऱ्यांनी घेतला. काही मार्केटिंगचे, काही तांत्रिक विभागाचे तर काही संशोधन विभागाचे अधिकारी होते. त्यावेळी माझा परिचय श्रीयुत बोरकर ह्या एस्सो मधील मराठी अधिकाऱ्याशी झाला. ते श्री. विजय राघवन ह्या मुख्य अधिकाऱ्याचे सहाय्यक होते व अतिशय सज्जन गृहस्थ वाटले! त्यानंतर बोरकरांशी पुन्हा माझा संबंध त्यांच्याशी काम करतांना आला व आजही ते माझे गुरु आहेत!

बोरकरांच्या सांगण्यावरून कळले कि ह्या दुसऱ्या interview मधून पंचवीस जणांपैकी केवळ पांच जण शेवटच्या interview साठी निवडणार आहेत व त्यातून केवळ चार जण घेतील. म्हणजे मी बरीच मजल मारली होती व आता नशिबाने साथ दिली तरच पुढील गोष्टी! कोणाची तरी साथ – देवाचीच – होती व आश्चर्य म्हणजे मला तिसऱ्या मुलाखती साठीही बोलविण्यांत आले. ह्या पांच जाणत यु. डी. सी. टी. चे नवे आम्ही दोघे – मी व माझा मित्र रंगराजन, परेरा हे बामर-लॉरी (Balmer Lawrie) या प्रख्यात कंपनीत काम करणारे, डॉ. रामन हे ICI- आय.सी.आय. (Imperial Chemcal Industries) ह्या इंग्लिश कंपनीत काम करणारे व श्री. नायर हे Cochine Fertilisers कोचीन फर्टीलाइझरस् मधील अधिकारी असे होते व या पैकी चार जण विजय राघवन निवडणार होते.

श्री विजय राघवन त्यावेळी ‘Head of Operations Dept.’ ह्या मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी तिसरी मुलाखत घेतली. बराच वेळ ते विविध विषयावर बोलत होते त्यांचे व्यक्तिमत्व मात्र खूपच गंभीर व दुसऱ्याला भेदक वाटणारे असे होते. हाता खालील अधिकारी त्यांस खूप घाबरत असले पाहिजेत! माझ्या दृष्टीने मुलाखत चांगली झाली. 

मात्र पुढे दोन-तीन महिने कोणतेच पत्र एस्सो कडून येईना – याचा अर्थ माझा पत्ता कटला गेला होता व आता व्ही. जे. टी. आय. झिंदाबाद म्हणून मी माझ्या कामास लागलो. श्री बोरकरांकडेही चौकशी केली, त्यांनी ही तर्काने असेच सांगितले – ते म्हणाले राघवन मद्रासी आहे, तेव्हा त्याने रंगराजन, सेतुरामन नायर ही तीन माणसे नक्कीच निवडली असणार; परेरा व तुझ्यात तुलना केल्यास परेरा खूप अनुभवी आहे, तुला पेट्रोलियम क्षेत्राचा अनुभव नाही तेव्हा तुझा नंबर लागणे कठीण आणि तसेच झाले होते ह्या चार जणांना अपॉइंटमेंट लेटर्स आली होती व मेडिकल चाचण्यांनंतर त्यांना कामाला सुरवात करायची होती! मी एस्सो चा विषय विसरलो!

साधारण तीन एक महिने होऊन गेले होते व कॉलेजची दुसरी सहामाही सुरु झाली होती. डिसेंबर चा महिना असावा. एक दिवस दुपारच्यावेळी कॉलेजमध्ये मला राघवन साहेबांचा फोन आला. म्हणत होते, तुला अजून आमच्या कंपनीत काम करायची इच्छा आहे काय? असेल तर त्वरित उद्या मला ऑफिसांत येऊन भेट! मला काही अर्थबोध होईना, चार माणसे – तीन मद्रासी व एक परेरा घेतले होते, मग मला पाचवा घेणार होते काय? जागा तर चारच होत्या. दुसरे दिवशी एस्सो च्या मुख्य ऑफिसांत गेल्यावर प्रथम श्री. बोरकरांस भेटलो. त्यांनी माझे हसत स्वागत केले व अभिनंदन केले! त्यांच्या बोलण्यावरून कळले कि नायर हा जरी राघवननी खास आपला गाववाला म्हणून निवडला होता तरी वैद्यकीय चाचण्यांत त्याला ‘रंग आंधळेपणा’ (color Blindness) असल्याच्या कारणावरून मेडिकल डायरेक्टर डॉ. भन्साली यांनी नाकारले होते. व डॉ. भन्साली ही एस्सो मधीलच नव्हे तर भारतींतील वैद्यकीय क्षेत्रांतील मोठी व्यक्ती होती. त्यांचा निर्णय बदलण्याची कोणाची ताकद नव्हती. त्यामुळे नाइलाजाने राघवन साहेबांनी तीन महिन्यानंतर मला बोलवून माझी मेडिकल केली. सुदैवाने मी सर्व चाचण्यांत उत्तीर्ण झालो व आठ एक दिवसांत मला नेमणूक पत्र मिळाले. १९७० चे नवीन वर्ष मला मोठीच गिफ्ट देणार होते! एक आंतरराष्ट्रीय अमेरिकन कंपनीचा मी अधिकारी होणार होतो – कित्येक दिवस बाळगलेले स्वप्न साकार होत होते व ते देखील कोणा दादा-मामाचा वशिला न लावता माझे कष्ट व आप्पांचे – देवाचे आशीर्वाद या पुण्याईवर !

मला दिलेल्या नेमणुकपत्रांत (Appointment Letter) माझी नेमणूक माझगांव टर्मिनल येथे ‘Operations Officer’ म्हणून करण्यांत आल्याचे लिहले होते व बाकीच्या नेहमीच्याच अटी- नियम यांचा त्यात उल्लेख होता! मात्र पगाराचा आकडा पाहून माझा स्वतःवरच विस्वास बसेना! सत्य आकडे मोडीत कोठे चेक तर झाली नाही ना असे ही वाटून गेले! चक्क १००० रुपये मूळ पगार + २०० रुपये घरभाडे भत्ता मिळून एकूण १२००/- रुपये १९७० साली मला एस्सो ने वेतन दिले होते. गोदरेज सोडतांना मला ५५०/- रु. पगार होता व्ही. जे. टी. आय. मध्ये मी ४००/- रु पगारावर आलो आणि एस्सो चक्क १२००/- रु. देते म्हणजे काय? त्यावेळी हिंदुस्थान लिव्हर या दुसऱ्या नामांकित कंपनीत रुजू झालेल्या यु. डी. सी. टी.च्या माझ्या मित्रास ४००/- रु पगार कंपनी देत होती! आठ अाणे लिटर पेट्रोल आणि दोन रुपयांत मामा काणे कडे माझे राईस प्लेटचे जेवण होत होते. विलेपार्ल्यात २५०००/- रुपया पर्यंत दोन रूम – किचेन चा फ्लॅट मिळत होता! मला खूपच हर्षवायू झाला होता व ही बातमी माझ्या यु. डी. सी. टी. तील इतर मित्रांस कधी सांगेन असे झाले होते! त्यांच्यापॆकी अनेक जणांनी या नोकरी साठी प्रयत्न केले होते पण एक रंगराजन सोडता दुसरा कोणीच येऊ शकला नाही. मी दुसरे दिवशी माझे नेमणूक पत्र माझ्या खास मित्रास दाखविल्यावर तेही चक्क उडालेच! त्यावेळी डॉ. काणे, जे आमच्या Oils Department चे मुख्य होते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी M. Sc. (Tech) पदवी संशोधनाद्वारे मिळवीली होती, ते यु. डी. सी. टी. चे डायरेक्टर होते. हे माझे वरिष्ठ मित्र मला सरळ त्यांच्या केबिन मध्येच घेऊन गेले व माझे नेमणूक पत्र त्यांचे हातात देऊन त्यांना पगार पाहण्यास सांगितला. मला हे काय चालले आहे काहीच काळात नव्हते मी आपला हवेतच होतो. डॉ. काणेंनी माझे अभिनंदन केले, हसले व म्हणाले राऊत मी डॉ. कामाशी बोलतो व तुझा पगार कमी करावयास लावतो ! डॉक्टर गमतीत म्हणाले होते परंतु त्या वेळी मला माझी चूक कळली. त्यांच्या समोर हे प्रदर्शन व्हायला नको होतो कारण यु. डी. सी. टी. प्रोफेसर – ज्याला तेथे नोकरीसाठी परदेशाची PhD पदवी घ्यावी लागे. त्यावेळी जेमतेम १५००/- रुपये पगार मिळे! हे सर्व सांगण्याचे कारण असे कि एस्सो ने मला एक जबरदस्त धक्का व आयुष्यात चांगल्या कामाची उत्तम वेतनासहित एक संधी दिली होती व त्याचे सोने करणे माझ्या हातात होते. अाप्पांना मी ही बातमी जेव्हा सांगितली तेव्हा त्यांनाही आनंद झाला व एवढेच म्हणाले – “बेटा तू केलेल्या कष्टाची फळ तुला मिळाले आहे!”

नोकरी मिळाल्याचा  पहिला उन्माद ओसरल्यावर नवीन नोकरीत रुजू होण्याचा विचार सुरु झाला. एक महिन्याची नोटीस V.J.T.I. ला हवी होती – व त्यामुळे २० फेब्रुवारी १९७० पासून मी एस्सो कंपनीत कायदेशीर पणे रुजू होऊ शकत होतो. मला प्रथम वाटले होते कि विजयराघवनच्याच खात्यात काम करायचे म्हणजे चर्चगेट मधील मुख्य कार्यालयातच रोज जावे लागेल. मुलाखती साठी अनेक फेऱ्या तेथे झाल्या होत्या त्यावेळी तेथील थाटमाट खाली अंथरलेले उंची गालिचे, लाकडाची व पाॅलिश केलेली चकचकीत केबिन्स टाय-सूट घालून फिरणारे कर्मचारी, अत्तराचे फवारे मारून फिरणाऱ्या सुंदर मुली, तसेच परदेशी लोकांचाही भरपूर वावर, हे सगळे अगदी नवीन होते. एकदा तेथील कँटीन मधील भोजन घेण्याचा योग्य आला तेव्हा तर तेथील अन्न-पदार्थांचा दर्जा – चव अगदी पंचतारांकित हॉटेलांतील जेवणापेक्षा सरस वाटली आणि खरेच त्यावेळी एस्सो कंपनीची इमारत, तेथील कँटीन हे मुंबापुरींतील एक नाव घेण्याजोगे ठिकाण होते व त्यामुळेच तेथे काम करणाऱ्या कर्मचारीकडे लोक एक आदराने बघत.

मला वाटते आमच्या समाजांतील दोन व्यक्ती तेव्हा त्या वेळी एस्सो मधून नुकत्याच सेवनिवृत्त झाल्या होत्या, ज्यांची नावे मी नंतर ऐकली एक आगाशीचे श्री म्हात्रे व दुसरे बोर्डीचे श्री चिंतामण राऊत. माझा त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आला नाही श्री म्हात्रेंची मुले आप्पांकडे बोर्डीस शिकवणीस येत व ती बोर्डीस मामाकडेच राहत त्यामुळे बोर्डीस कधीतरी म्हात्रेंशी बोलणे झाल्याचे आठवते, त्यावेळी मी शाळकरी विद्यार्थी होतो. 

मुख्य कार्यालयात काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार नव्हते कारण माझ्या नेमणूक पत्रात कामाची जागा ‘माझगांव केंद्र’ असे लिहले होते. २० फेब्रुवारी- आम्ही दोघे, मी व सेतुरामन प्रथम मुख्यकार्यालयात गेलो. इतर दोघे नंतर रुजू होणार होते. आम्ही देखील टाय बांधून व मी नवीनच खरेदी केलेला सूट घालून राघवन साहेबांसमोर गेलो — “First Impression is the Last Impression!” असे म्हणतात ना! साहेबांनी तास भर आमची शिकवणी घेतली व नंतर श्री बोरकरांच्या हवाली केले व दुपारी जेवणानंतर आम्हास माझगांव ऑफिसकडे पाठवा अशा सूचना केल्या! बोरकरांनाही आम्हाला माझगांव बद्दल कामाच्या काही टिप्स देऊन, कँटीनमध्ये ‘पंचतारांकित जेवण’ भरपेट खाऊ घातले! बकऱ्याला सुळावर देण्याआधी बदाम-पिस्ते खाऊ घालतात तसेच हे झाले होते!

आमची गाडी माझगांवच्या मुख्य दरवाज्यासमोर येऊन सूट-बुटातले आम्ही दोघे त्या जागेकडे जरा निरखून पाहतही नाही तेवढ्यांत तेथील असिस्टंट सुप्रिटेंडन्ट श्रीवास्तव साहेब यांची हिंदीतून मोठी गर्जना ऐकू आली – “जल्दी जाके वो कोट सूट उतारो और जिस गाडीसे आए हो उसीसे जल्दी गोदी मे चले जाइये… टाईम बहोत कम है!” आम्हाला ते काय बोलताहेत कळेना – आम्ही एकमेकांकडे पाहत आहोत काही अधिकारी, कामगार आमच्याकडे कुतूहलाने बघत आहेत असे ते दृश्य होते. कळकट कपड्यातला, तेलाने बरबटलेला एक अधिकारी आमच्या जवळ आला नंतर कळले त्यांचे नांव श्री बाळ राऊत ! चिंचणीचे बाळ राऊत ही माझी वाट तेथे पाहत होते – ते तेथेच काम करीत होते!

त्यांनी सर्व परिस्थिती नीट समजावून सांगितली – माझगांवला दर आठवड्याला एस्सोची जहाजे (टँकर) अमेरिकेहून तेल घेऊन येत असत व गोदीतुन ते तेल फॅक्टरी पर्यंत टॅंक-ट्रकने आणित असत व हे काम पाच – सहा दिवस अहोरात्र चाले त्यासही आठ -दहा अधिकारी देखरेखीसाठी लागत – असाच टँकर त्या दिवशीही नेमका आला होता व त्यामुळेच श्रीवास्तव साहेबानी आनंदातिशयाने आमचे दारातच स्वागत करून आतमध्ये प्रवेश ही न करू देता त्याच गाडीतून आम्हास बंदरावर संध्याकाळचे ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ अश्या १२ तासाच्या ड्युटीवर रवाना केले होते – ट्रेनिंग ही तेच होते, व कामही तेच! माझगांवच्या एकूण कामाची तेथील work Culture ची, व कामगारांच्या व्यवस्थापनाची जी कल्पना पहिल्याच दिवशी आली ते खूप बरे झाले!

First export to Indonesia

बाळ राऊतांनी आम्हाला येथे येण्याआधी दोन गोष्टी पक्क्या सांगितल्या होत्या एक म्हणजे जहाजांतून ट्रकमध्ये तेल भरल्यावर त्याची मोजमाप करूनच ‘चलान तयार करायचे व खात्री झाल्यावरच आपली सही करायची. दुसरे टँकर जो पर्यंत आपले तेल घेऊन बंदरात उभा आहे, बंदर सोडून येथे तेथे फिरायचे नाही! याला कारण असे होते कि त्यावेळी जहाजांतून फॅक्टरी पर्यंत तेल घेऊन येणारे ट्रक चे चालक अनेक प्रकारचे गैरव्यवहार करीत. सुमारे ५००० ते १०००० टन एवढे तेल एकावेळेस जहाजांत असे व त्यांतील एक दोन ट्रक (२० ते ३० टन ) परस्पर ऑफिसरच्या चलान शिवाय बाहेर नेल्यास ते तेल त्यांना बाहेर विकता येई. त्याच प्रमाणे ऑफिर्सचा डोळा चुकवून ट्रक मध्ये १०टन ऐवजी १-२ टन जास्त तेल १० टनाचेच चलान बनवून व ऑफिर्सची सही घेतली कि तेवढेच दोन टन तेल त्यांचे होई. – अशा रीतीने ५० – १०० ट्रक मधून, २०० टन तेल ते सहज लाटू शकत व १० हजार टनांत १००-२०० टन तेल सहज चोरीला जाई! मोठी जिकिरीची, कष्टाची, व खूपच जबाबदारीची अशी ही ड्युटी होती. आम्हाला काहीच अनुभव नव्हता व ह्या मुसीबतीत आम्ही पडलो होतो! शेवटी सर्व जहाजावरील तेल फॅक्टरीतील टाक्यांमध्ये येऊन पडल्यावर जहाजावरील तेलाचा आकारमान (volume) व टाक्यामध्ये येऊन पडलेले  तेल यांचा टाळा (tally) होई व आलेले तेल कमी असेल तर गोदीतील ड्युटी ऑफिसरला त्याचा जवाब द्यावा लागे!

आमच्या आधी कित्येक प्रामाणिक ऑफिसर्सना आपल्या नोकऱ्या आपली काही चूक नसताना या ट्रान्सपोर्टर लोकांच्या चलाखी मुळे गमवाव्या लागल्या होत्या. हे चालक/ड्राइव्हर खूप खुनशी देखील असत; काही वर्षांपूर्वी अशाच काही बोलाचाली वरून त्यांनी एका प्रामाणिक ऑफिसरवर राग धरून त्याला रात्रीच्या अंधारात, गोदीमधील पाण्यात ढकलून दिले होते व तेव्हा पासून तो कायमचा बेपत्ता झाला होता. ही मंडळी एका गँगशीच संबंधित असत कारण पटकन व खूप नफा कमावण्याचे आपल्या देशांतील जे उद्योग गँगस्टर लोकांकडे आहेत त्यातील हा एक धंदा आहे – अजूनही तो वेगळ्या स्वरूपात (कारण आता पाइपलाइनने तेल घेतले जाते, ट्रकचे दिवस गेले) चालू आहे. 

आम्ही बाळच्या सूचनेप्रमाणे खरेच अगदी तेथून हललो नाही, प्रत्येक भरलेला ट्रक वजन घेतल्याखेरीज त्याच्या चलनावर सही केली नाही व जराही रात्री झोप न घेता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला सोडविण्यास येणाऱ्या दोन ऑफिसरची आतुरतेने वाट पाहत बसलो. सकाळचे आठ झाले तरी कोणी येईना — काम तर पुन्हा जोरात सुरु होते – साडे आठ ला श्रीवास्तव साहेबांचा निरोप आला, “तुम्ही दोघेच आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत गोदीत रहा, तुम्हाला सोडवायला येणारे दोघे आजारी झाले आहेत…” त्या वेळी काय वाटले ते शब्दांत सांगणे कठीण आहे, वाटले हे सर्व कागदपत्र समुद्रात फेकून सरळ घरी जाऊन आडवे व्हावे… पण काय करणार एस्सोची नोकरी सांभाळायची होती ना!

शेवटी अंगातील सर्व बळ एकवटून देवाची प्रार्थना करीत संध्या. ७ पर्यंत ड्युटी केली. संध्याकाळी आम्हाला सोडविण्यास दोघे ऑफिसर्स आले. त्यांना व्यवस्थीत चार्ज दिला व जिवंतपणीच मढ्या सारखे वाटणारे आम्ही दोघे – दाढी वाढलेली, कपड्यावर तेलाचे डाग, पोटांत भुकेचा डोंब, डोळ्यांत झोपेविना सूज अशा भ्रमिष्ट अवस्थेत पार्ल्याला घरी कधी आलो ते कळलेही नाही!

ख्रिश्चन लोकांमध्ये, जातीमध्ये दाखल करून घेण्यासाठी धर्मगुरू बाप्तीस्मा देतात. एखाद्या कडवट ख्रिश्चनाला त्याच्या इच्छेप्रमाणे अग्निदिव्य करून  बाप्तीस्मा दिला जातो त्याला ‘बाप्तीस्मा बाय फायर (Baptism by fire)’ असे म्हणतात. आम्हालाही एस्सो मध्ये दाखल होताना हा ‘बाप्तीस्मा बाय फायर मिळाला’, त्यामुळे मी पुढे कट्टर माझगांव वाला झालो! अशा रीतीने माझी पहिल्या दिवसापासून ड्युटी सुरु झाली. कोणाला नोकरीच्या पहिल्याच दिवशी असा ‘जबरदस्त अनुभव’ मिळाला असेल?

या माझगाव टर्मिनल बद्दल देखील थोडे सांगायला हवे. भायखळा स्टेशन वरून किंवा हार्बरलाईनच्या रे रोड स्टेशन वरून येथे जाण्यास बस होती. तसेच वेस्टर्न रेल्वेच्या महालक्ष्मी स्टेशन वरूनही BEST च्या बसेस होत्या. मी महालक्ष्मी वरूनच सुरवातीस माझगाव ला जात असे. शिवडी-माझगाव-वडाळा हा भाग आजही पेट्रोलियम कंपन्यांच्या टाक्या व त्यांची वितरण केंद्रे यांनी व्यापलेला आहे. मुंबईचा सर्वात स्फोटक विभाग कोणता म्हणून जर विचारलं तर तो वडाळा – शिवडी – माझगाव हाच विभाग होय. लाखो टन पेट्रोल व पेट्रोलजन्य पदार्थाचा साठा तेथे रोज असतो. याच भागांत हिंदुस्थान लिव्हर , टाटा ऑइल मिलस् व फायरस्टोन या प्रसिद्ध कंपन्या एकेकाळी होत्या. आज त्या हिंदुस्थान लिव्हर सोडून नामशेष झाल्या आहेत. बंदराचा भाग असल्याने माझगाव – हाजी बंदर त्या भागांतून लहान – सहान पार्सल येथून मचव्यांतून batches मधून निर्यात होतात. तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust) ची रेल्वे देखील याच परीसरातून जात असल्याने त्यांची ही बरेच कार्यालये, तसेच अनेक रासायनिक व इतर इंजिनीरिंग कंपन्या, लोखंडी सामानाची गोदामे व लाकडाच्या वखारी या भागांत आहेत. त्यामुळे नागरी वसती पेक्षा कारखानदारी व झोपडपट्टीची येथे मक्तेदारी आहे. त्यामुळे रात्रीचे वेळी सर्रास दारूचे गुत्ते, वेशाव्यवसाय व असेच लुटमारीचे अनेक अनैतीक व्यवहार येथे नेहमी चाललेले असत. 

याच परीसरात हे आमचे माझगांव टर्मिनल, हे बंदर रोड ह्या भायखळा शिवडीला जोडणाऱ्या रस्त्यावर आहे. समोरच्या बाजूला टाटा ऑइल मिल तर शेजारी फायरस्टोन ही  प्रसिद्ध अमेरिकन कंपनी तेथे त्या वेळी होती. तेथे ट्रक मोटारींचे टायर ट्यूब तयार होत. एस्सो कंपनी व कॅल्टेक्स कंपनीची कार्यालये शेजारी-शेजारी होती व दोन्ही अमेरिकन कंपन्या असल्याने दोघांना ही कधी कधी एकमेकांची मदत घ्यावी लागे. पुढे एस्सो चे व कॅल्टेक्स  चे राष्ट्रीयीकरण झाल्यावर ह्या दोन्ही टर्मिनल चे ही विलीनीकरण झाले व त्यांस ‘हिंदुस्थान पेट्रोलियम” हे नाव मिळाले. मी ज्यावेळी माझगांवला रुजू झालो त्या १९७० साली मात्र त्या दोन वेगळ्या कंपन्या होत्या. 

बी.एस.सी. टेक चा अभ्यास पूर्ण करीत असताना  या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून पहिल्या वर्षाच्या परीक्षेनंतर दोन महिने कोणत्यातरी कारखान्यांत उमेदवारी (Factory training) करावे लागते त्यामुळे १९६४ च्या मे महिन्यांत मी या माझगांव भागात टाटा ऑइल मिल मध्ये येत असे व त्यावेळी समोरच्याच या एस्सोच्या माझगांव टर्मिनल मध्ये आपल्याला आयुष्याची 20 वर्षे काढावी लागतील याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. 

पेट्रोलियमचा धंदा त्यावेळी खूप तेजीत होता. सर्व कारभार हा एस्सो, बर्माशेल, कॅल्टेक्स या तीन परदेशी कंपन्यांच्या हातात होता व इंडियन ऑइल ही भारत सरकारची तेल कंपनी नुकतीच जन्मास आली होती त्यावेळचे पेट्रोलियम मंत्री केशवदेव मालवीय  यांनी त्या सर्व बाबींचा विचार करूनच देशांतून परदेशी जाणाऱ्या अफाट पैशाला वेसण घालण्याचे डावपेच चालविले होते व आजना-उद्या या परदेशी कंपन्या सरकारी मालकीच्या होणार हे या कंपन्यांच्या चालक वर्गाला ही कळून चुकले होते; परंतु तोपर्यंत या कंपन्यांत काम करणारे कामगार व अधिकारीच नव्हे तर कंपनीचे ठेकेदार, वाहतूकदार, कंत्राटदार अशा सर्व लोकांनी खूप मजा चालविली होती. कारण कंपनीला रिझल्ट हवे असून पैशाची कमतरता नव्हती. माझगाव हे एस्सोचे एकमेव असे केंद्र होते की जेथे कंपनी सर्व प्रकारची उत्पादने करी, सर्व कच्चामाल येथे येई व सर्व उत्पादनाचे वितरण येथूनच केले जाई! त्यामुळे येथे जरा काही खट्ट झाले की त्याचा परिणाम संबंध भारतावरच नव्हे तर अमेरिकेवरही उमटत असे. कारण लष्कर, विमानसेवा, नेव्ही, रेल्वे या सर्वांस लागणारी इंधने व वंगणे यात कधीच खंड पडू देण्यासारखे नव्हते व हीच गोष्ट येथील अधिकारी व कामगार यांस माहित असल्याने आपली किंमत ते बरोबर वसूल करीत! अधिकारीवर्गाची वसुलीची पद्धत अतिशय सफाईदार व नियोजनबद्ध असे काही प्रामाणीक अधिकारी देखील असत पण ९०% हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपला हिस्सा व्यवस्थित वसूल करीत. त्यावेळी एका माझगावच्या मॅनेजरने बांधलेल्या मुंबईतील बंगल्याची जपानी वकिलातीने (embassy) आपल्या कर्मचाऱ्यांना भाड्याने निवड केली होती यावरून त्या वास्तुच्या आलिशानतेची कल्पना यावी; अशा अनेक दंतकथा अधिकारी वर्गाविषयी ऐकू येत!

कामगार वर्गाची कमाई दुसऱ्या प्रकारची असे. दादागिरी दाखवून व प्रसंगी धाकदपटशा करून अगदी मुख्य मॅनेजरला ही आव्हान देऊन ते आपली कामे करून घेत.  त्यांचा मार्गही अगदी सरळसोट असे आणि ते म्हणजे ‘ओव्हर टाइम’, महिन्याला प्रत्येक कामगाराची आपल्याला मिळणाऱ्या ओ.टी.ची आखणी तयार असे आणि त्या अनुषंगाने एकाच खात्यातील मंडळी परस्परात तसेच इतर खात्यातील कर्मचार्‍यांशी संधान बांधून महिन्यात तो प्लॅन बरोबर अमलात आणीत! कोणी कधी रजा घ्यायची त्यावेळी कोणी O.T. करायची हे पक्के ठरवलेले असे आणि या सर्वांना त्यांच्या कामगार संघटनेचा ही आशीर्वाद असल्याने, अधिकारी वर्ग हतबल असे. खरे तर अधिकारी वर्ग आपला अधिकार गाजवण्याचा हक्कच गमावून बसला होता व त्यांची इच्छाशक्ती नष्ट झाली होती. याला कारण तेथील स्थानिक मॅनेजमेंटपेक्षा वरिष्ठ मॅनेजमेंट (Head Office) ही जबाबदार होती, कारण हे मोठे हेड ऑफिस वाले फक्त फतवे काढीत व स्थानिक लोकांवर सर्व जबाबदारी टाकून चांगले झाल्यास त्याचे क्रेडिट स्वतः घेत तर काही गडबड झाल्यास खापर मात्र स्थानिक अधिकारी अधिकाऱ्यांवर फोडीत. या दुष्टचक्राचा फायदा कामगार व क्लेरिकल (लिपीक) वर्गाने नाही घेतला तरच नवल! ही शिकली-सवरलेली क्लर्क मंडळी देखील आपला समभाग व्यवस्थित वसूल करी व स्वतः मागे राहून कामगारांमार्फत शरसंधान करीत. 

त्यावेळी काही कामगारांच्या मोटरगाड्या, अलिशान टॅक्सी व गावाला मोठे बगीचे ही होते. मात्र बहुतेक कामगार अति पैसा मिळाल्याने व्यसनाधीन झाले होते; नको ते आजार त्यांच्या मागे होते व पुष्कळशा कामगारांची कौटुंबिक जीवनाची घडी ही उध्वस्त झाली होती. दैव एका बाजूने काही देते व दुसर्‍या बाजूने कसे काढून घेते याचे हे टर्मिनल म्हणजे समाज-संशोधनासाठी उत्तम उदाहरण होते. 

त्यामुळे शक्यतो सरळमार्गी अधिकारी, या माझगावला नेमणूक नाकारीत असत. बढती देखील नाकारल्याची उदाहरणे आहेत! बाहेरच्या लोकांकडून यासाठीच माझगांव चा उल्लेख मझा-गाव असा होत असे व त्यात काही तथ्य देखील होते!

अधिकारी लोकांचे पैसे कमावण्याचे मार्ग हे राजमार्ग होते सुमारे अडीचशे कोटी रुपयांची त्यावेळी उलाढाल करण्याऱ्या या टर्मिनलमध्ये सुमारे शंभर कोटी रुपयांचे कच्चे माल खरेदी होत असे-  त्यात वनस्पती तेल, चरबी, ड्रम, डबे, पॅकेजिंग, सामान, केमिकल्स ही मुख्य होती. ज्यांच्या हातात ते असे व ज्यांचा त्यांच्याशी वापराबाबत संबंध येई त्यांची कमिशन पुरवठादार आधीच निश्चित करीत त्यामुळे हा सर्व कारभार बिन-बोभाट होई! इतरही अनेक मार्ग होते, ज्या सगळ्याच बद्दल येथे सांगणे कठीण होईल!

कामगारांचे ओ. टी. साठीचे मार्ग म्हणजे अद्भुत होते; त्याबद्दल सुद्धा एक स्वतंत्र पुस्तकच लिहावे लागेल, एवढे सुरस किस्से ऐकावयास मिळतील. मात्र एवढे सांगता येईल की मॅनेजमेंटचा दबदबा एवढा कमी झाला होता की आठ तासाचा ओ.टी. कमावणाऱ्या कामगाराने सोळा तास काम करणे जरूरीच नव्हते! केवळ आठ तासांच्या कामात कामगार सोळा तासांचे काम करून घेत व कधीतरी एवढी हद्द होई की कामावर सुद्धा न आलेल्या कामगारास रोजची हजेरी तर मिळेच पण शिवाय आठ तासांचा ओ.टी.चा बोनस ही मिळे! हे सर्व ते कसे शक्य करीत व त्याबाबत मॅनेजमेंटचे  प्रयत्न कसे अपुरे होत, वैगरे गोष्टी स्वतंत्रपणे सांगाव्या लागतील.- तो खरेच मॅनेजमेंट विषयाचा अभ्यास करणाऱ्याला आव्हान असून ह्या सर्व प्रकारांना आमच्या मॅनेजमेंटने ‘अनिर्बंध प्रथा’ (Restrictive Practice) असे नाव देऊन त्या गोंडस नावाखाली कदाचित आजही ह्या प्रथा तेथे सुरू आहेत असे मला वाटते! त्यामुळे माझगाव मध्ये काम करणाऱ्या कामगारा हा “मझा-गाव” मध्ये आहे असे कंपनीतील इतर कर्मचारी म्हणत. 

राजाभाऊ कुलकर्णी यांची इंटक प्रणित कामगार संघटना त्यावेळी माझगाव मध्ये होती.  श्री. हरिभाऊ चौबळ, सूर्यकांत कार्लेकर, कृष्णन इत्यादी मंडळी येथील स्थानिक नेते मंडळी होती.  कधी एखादा अधिकारी त्यांच्याकडे कोणा कामगारा विरोधी काही तक्रार घेऊन गेलाच तर ते देखील हतबलता दाखवीत- कामगाराला समजवण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत व शेवटी साहेब तुम्हाला काय ऍक्शन घ्यायची असेल ती घ्या – आम्ही मध्ये येणार नाही अशी पळवाट शोधून आपली सुटका करून घेत!

एवढी कामगारांची व कर्मचाऱ्यांची दादागिरी असली तरी त्या वेळी त्या टर्मिनलचे प्रमुख असलेले टर्मिनल सुपरिटेंडंट श्री. चार्ली जॉर्डन (Mr. Charlie  Jordon) हे एक ‘अँग्लो-इंडियन’ (Anglo-Indian) गृहस्थ होते. ब्रिटिश आर्मीत लढाईवर जाऊन आलेला हा एक जबरदस्त असामी होता. उंच, गोरा, निळे डोळे व आवाजात जरब असलेल्या जॉर्डन साहेबांस मात्र कामगारांपासून सर्व टरकून असत.  कारण ते शिस्तीच्या बाबतीत आपल्या वरिष्ठांशी व पर्सनल डिपार्टमेंटचे काही मानत नसत! माझ्या आयुष्यात जे काही उत्तम व्यवस्थापक माझ्या पाहण्यात आले त्यात जॉर्डन साहेबांचा नंबर पहिला आहे. असा जबरदस्त वचक ठेऊन काम करवून घेणारा व तरीही सर्वांचे प्रेम संपादन करणारा दुसरा माणूस मी पाहिला नाही.  जॉर्डन साहेबांच्या शिस्तपालनाच्या एक-दोन गोष्टी मी सांगेनच. त्यांचा एकच ‘वीक पॉइंट’ होता. माझगावच्या परंपरेप्रमाणे तो म्हणजे संध्याकाळी ऑफिस संपल्यावर ६नंतर ते आपल्या ‘धुंदीत’ असत व तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधणे मूर्खपणा असे- (त्यांच्या दुर्दैवाने ते माझगाव टर्मिनल मध्ये सुपरिटेंडंटच्या बंगल्यात रहात; त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनात कोणती  गुप्तता नव्हती.) सर्व कर्मचाऱ्यांच्या लक्षात त्यांचे वैयक्तिक जीवन येई! त्यामुळे त्यांचे हितशत्रू, त्यांच्या कर्तबगारीच्या गोष्टी वरिष्ठांना सांगण्याऐवजी त्यांच्या व्यसनाच्या वा कौटुंबिक कलहाच्या गोष्टीच पसरवीत व त्यांस बदनाम करण्याचा प्रयत्न करीत. इतरांशी कठोरपणे, Bloody Fool, you idiot अशी सुरुवात करून बोलणारे जॉर्डन साहेब माझ्याशी का कोण जाणे खूप मार्दवपणे वागत. जॉर्डन स्वतः विशेष शिकलेले नव्हते त्यामुळे उच्चशिक्षण घेऊन नुकत्याच बाहेर पडलेल्या व या ‘मायानगरीत’ आलेल्या मुलाला दोन धीराचे बोल ऐकवावेत असा कदाचित त्यांचा विचार असेल. मला का ते काही सांगता येणार नाही, मात्र जेव्हा कधी माझी काही कारणाने त्यांच्या केबिनमध्ये भेट होई ‘काही अडचण असली तर जरूर माझ्याकडे केव्हाही ये’ हे त्यांनी मला सांगितले होते एवढे खरे! 

राजकारण हे केवळ राजकीय पुढाऱ्यांनी करायचे असा नियम आपल्या देशात नाही! ऑफिसांत, शाळा-कॉलेजं अगदी आपल्या घरात देखील वैयक्तिक संबंधात राजकारण करणारे लोक आपल्याकडे आहेत! त्यामुळे आम्ही चौघे जण या कंपनीत खूप वर्षानी भरती झालो होतो चांगले  शिक्षण पदव्या होत्या, व त्यामुळेच कंपनीने काही विशिष्ट हेतूने, काही प्रमुख जबाबदाऱ्या आमच्यावर देण्याचा निश्चय केला असावा – व याची कल्पना आमचा द्वेष करणाऱ्या काही अधिकाऱ्यांस होती त्यात इतर दोघे राघवनचेच लोक होते त्यामुळे त्यांना डिचवण्याची कोणाची हिम्मत नव्हती – जास्त डोळा माझे वरच असे व शक्यतोवर मी कामात मागे कसा पडेन, माझी तक्रार वरिष्ठांना कशी पुरवता येईल व शेवटी मला येथून कसे काढता येईल इथपर्यंत या लोकांची मजल गेली होती. विशेषतः काही पंजाबी सिंधी अधिकारी हे या बाबतीत खूपच खूप निष्ठुर असतात व त्यांतील एक अधिकारी अगदी सतत माझ्यावर लक्ष ठेवून असे! मला काही समजत नसे, पण कधी तरी राघवन साहेब फोन करून “काय रे त्या दिवशी तू एक तास लवकर का गेलास?” असे विचारीत तेव्हा समजे की कोणीतरी चुगली केली आहे! वास्तविक माझे काम संपूर्ण आटोपलेले असे, कामगारही प्रोडक्शन झाल्याने प्रथेनुसार रेस्ट रूममध्ये गेलेले असत, काही घरी जात म्हणूनच एक दिवस तासभर लवकर गेलो व ही चुगली राघवन ना कोणीतरी मला नकळत केली होती – तेव्हापासून मी खूप दक्ष राहू लागलो! काही अधिकारी आपल्याला येथून काढून टाकण्यासाठी प्रयत्नशील आहेत हे मला पक्के कळले होते, पण आता मी कॉलेजांतून नुकताच बाहेर पडलेला कोकरू नव्हतो गोदरेज मध्ये व्ही. जे. टी. आय. मध्ये बारा गावचे पाणी चाखले होते, त्यामुळे बऱ्यापैकी लोकांची ओळख झाली होती!

माझ्या वरच्या अधिकाऱ्यांस त्यांची जागा ही काळजी तर केमिस्ट क्लेरिकल मंडळी होती त्यांना ऑफिसर ग्रेडमध्ये प्रमोशन हवे होते आम्ही चारजण डायरेक्ट ऑफिसर म्हणून आल्याने त्यांचे प्रमोशन हुकले होते म्हणून ती मंडळी देखील आमच्यावर नाराज होती त्यावेळी सुमारे 35 केमिस्ट क्लार्क माझगाव मध्ये होते ज्यांना मागील दहा पंधरा वर्षात कोणतेच प्रमोशन मिळाले नव्हते! बाळ राऊत सुदैवी होते त्यांना दोन एक वर्षांपूर्वी अखेर केमिस्ट मधून ऑफिसरचे प्रमोशन मिळाले होते. ते खुशी होते व त्यांच्याकडून कधी या आतील राजकारणाच्या गोष्टी कळत कधी-कधी या सर्वचा वीट येई पण मैदान सोडून पळ काढणारा ‘रडत राऊत’ मी नव्हतो हे त्यांस लवकरच समजणार होते!

टँकर-जहाजावरची ड्युटी संपवून आल्यावर माझे ओरिएंटेशन सुरू झाले. संशोधन विभागात जबाबदारी सांभाळण्यापूर्वी कंपनीतील विविध खात्यात महिना-दोन महिने काम करायचे व हा सगळा अनुभव घेऊन मग आपल्या मूळ खात्यात जायचे असा हा प्लॅन होता व  त्याप्रमाणे माझगाव मध्ये प्रथम वेअर हाऊस म्हणजे जेथे कंपनीचा सर्व तयार माल साठविला जाई व तेथून रेल्वे, बोटी, रस्ते यामार्गे भारतभर जाई – त्या खात्यात मला प्रथम धाडण्यात आले तेथून ग्रीस प्लांट, ब्लेंडिंग प्लांट, Quality Control (QC), प्रयोगशाळा इत्यादी खात्यात फिरवून, साधारणतः सप्टेंबर पर्यंत मी संशोधन खात्यात जावे असे मला सांगण्यात आले! या सहा महिन्यानंतर माझा Confidential Report (CR) राघवनकडे जाणार होता व तो ठीक असल्यास मला कंपनी Confirm करणार होती. हा CR कसा बिघडवता येईल हेच ही विघ्नसंतोषीमंडळी पाहत होती व म्हणून हा ऑगस्ट पर्यंतचा काळ माझ्यासाठी खूप महत्वाचा होता!

चर्चगेट मुख्य-कार्यालय, चेंबूरची रिफायनरी, माहुल टर्मिनल, शिवडी टर्मिनल अशा ठिकाणी Orientation (ट्रेनिंग) झाल्यावर, मी एप्रिल मध्ये ह्या माझगांवच्या वितरण विभागात रुजू झालो. श्री बिजूर नावाचे अधिकारी ह्या विभागाचे मुख्य होते, श्री कुलकर्णी, डिसूजा व मी असे आम्ही तिघे मिळून दोन शिफ्ट मध्ये काम करत असू. 

जरी हा विभाग सकाळी ७ ते ३ व दु. ३ ते ११ असा दोन पाळ्यांत चाले, कधी-कधी डिलिव्हरी जास्त असल्यास ११ नंतर ही थांबावे लागे. बहुतेक माल हा ट्रक ने वा रेल्वे वाघिणीतून पाठविला जाई. भारतातील प्रत्येक डेपो आपली मागणी माझगांव कडे eq पाठवी व त्याप्रमाणे ड्रम (२१० लिटर चे बॅरल्स) व लहान डब्बे भरून ट्रक माझगांव हुन वर चंडीगढ – श्रीनगर पर्यंत, तर कधी दक्षिणे कडे कन्याकुमारी , कोचीन पर्यंत पाठविले जात. त्यावेळी सुमारे  दोन ते अडीच हजार ड्रम रोज माझगांव वरून रवाना होत! विशेषतः रेल्वे डेपो नाही वा सेना दलासाठी पाठविल्या जाणाऱ्या मालाबाबतीत खूप सतर्क राहावे लागे कारण त्यांचे अधिकारी स्वतः येऊन मालाची पाहणी – दर्जा तपासून घेऊन आपल्याच गाड्यांतून हा माल भरून पाठवीत अगदी उत्तरेकडे कारगिल लदाख पर्यंत आमचा माल जाई!

श्री बिजूर सकाळी आल्यावर फक्त तक्ता पहात व त्यावर कुठे लाल खूण दिसली की त्यांचा पारा वर जाई लाल खुणेचा अर्थ त्या विशिष्ट डेपोची ऑर्डर अजून गोदामात माल पडला असून तो ट्रकने गेला नाही असा असे, त्यामुळेची  विशेषतः दुसऱ्या पाळीतील ऑफिसरला ही जबाबदारी असे! आणि त्यावेळी सर्व वरिष्ठ अधिकारी घरी गेलेले असत त्यामुळे कामगारांकडून काम करविण्याची संपूर्ण जबाबदारी तुमची असे!

‘वेअर हाऊस’ हा विभाग माझगाव मध्ये सर्वांत संवेदनशील आहे! प्रोडक्शन वगैरे इतर विभाग सांभाळणे सोपे आहे पण, सर्वात कठीण काम येथील. वास्तविक ऑफिसरचे काम काय तर डेपोंनी केलेल्या मालाच्या मागणीनुसार दुपारच्या शिफ्टमध्ये जे पंचवीस-तीस ट्रक भरले जात त्यासाठी त्यांची डेपो वार विभागणी करणे व प्रत्येक ट्रक मध्ये कोणते ड्रम  टाकायची याची चिठ्ठी तयार करणे अशा ३० चिठ्ठ्या ड्रायव्हर चेकर यांस कडे दिल्या की काम झालं! पण एवढ्या सोप्या रीतीने काम झाले असते तर मग ऑफीसरची जरुरत कशाला होती?

साधारणतः तीस ट्रक भरण्यासाठी येथे चार फोर्क लिफ्ट ड्रायव्हर व प्रत्येक ड्रायव्हर बरोबर एक चेकर (checker) असे. फोर्क लिफ्ट ही मोटर लाकडी फळीवर ठेवलेले ड्रम उचलून ट्रकमध्ये ठेवते व त्याच्या ड्रायव्हर हा थोडा कुशल असावा लागे कारण फळी वरील चार ड्रम एकावेळी उचलताना जर खाली पडले तर तेल वाहून जाई. 

तसेच ड्रम 4-4 प्रमाणे एकावर एक अशा चार फळ्या असत म्हणजे एका उंच रांगेत  सोळा ड्रम असत त्यातून नेमकी हवी असलेली ड्रमची फळी, इतर फळ्या न पाडता उचलणे व ट्रकमध्ये नेऊन टाकणे हे कुशलतेचे काम असे! त्यामुळे या विभागात सर्वस्वी ड्रायव्हर दादांच्या मेहरबानीवर काम संपविणे व नुकसान न होऊ देणे हे अवलंबून असे! ड्रायव्हरला एखाद्या ऑफिसरवर खुन्नस काढायचीच असल्यास तो अगदी सहज त्याची वाट लावून स्वतः नामानिराळा राहू शके. “फोर्क लिफ्ट (fork-lift) में हवा ठीक नही, ड्रम बराबर नही लगाया था, लाईट ठीक नही, बराबर दिखता नही” अशी अनेक कारणे नुकसान केल्यावर त्यांच्याकडे तयार असत. 

चेकर चे  काम ड्रायव्हरला माल बरोबर कोठे ठेवला आहे ते दाखविणे व ड्रम ने ट्रक भरल्यावर मोजणी करून तो पुढे गेटवर पाठविणे असे. एकावेळी लोडींग प्लॅटफॉर्मवर चार ट्रक उभे असत व ह्या ड्रायव्हर चेकर च्या चार जोड्या एकावेळी चार ट्रक भरत साधारण प्रत्येक जोडीचे काम तीन एक तासात संपून जाई, मग ही मंडळी चकाट्या पिटीत किंवा पळ काढीत पण त्यांचे काम झाल्यावर एकदा ट्रक ज्यादा आला तर चक्क त्या एक ट्रक साठी ओ.टी. (८ तास जादा) ची बिनादिक्कत मागणी करीत. 

हे सर्व विस्तृत सांगण्याचे कारण मी नवीन होतो व यासर्व पार्श्वभूमीचा अभ्यास प्रथम मला करावा लागला – कारण एकदा का तुम्ही जराशी चूक करून काही फायदा, एक दिवस एखाद्या कामगारास दिला की तो नियम होऊन जाई व त्या कामगाराऐवजी तो अधिकारीच पापाचा धनी होई! मी हे सर्व अभ्यासले होते तरी माझ्या नवखेपणाचा फायदा करून घेण्यासाठी ही ड्रायव्हर मंडळी टपलेलीच होती व कदाचित काही अधिकारी मित्रांची देखील  फुस असावी – “अरे वो नया है, जरा उसको भी अपना पानी दिखाना!”

त्यावेळी माझगांव मध्ये असलेल्या ड्राइवर मंडळीत (सुमारे वीस एक ड्राइवर फोर्क-लिफ्ट चालवीत) कासम व हसन ही मुसलमान जोडी व यदु व पडू ही मराठी जोडगोळी कुप्रसिद्ध होती! हे लोक अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांस ही जेरीस आणीत तर माझ्या सारख्या नवख्या अधिकाऱ्याचे काय? ह्या ड्राइवर लोकांची प्रत्येक महिन्याला रोटेशन होत असे!

माझी पण वेअर हाऊस मध्ये दुपारची पाळी चालू झाली आणि दुर्दैवाने त्याचवेळी रोटेशन प्रमाणे कासम-हसन हे राहू-केतू व यदु हा मावळा माझ्या खात्यात सेवेसाठी हजर झाले! चौथा ड्राइवर कृष्णा नावाचा एक अबोल मराठी माणूस होता! यदु-पडू व कासम-हसन यांच्या निष्ठुरतेच्या गोष्टी जशा ऐकल्या होत्या तसे कृष्णा विषयी देखील कानावर आले होते कि हा खूप अबोल असला तरी कामात वाघ आहे व स्वतःच्याच तंद्रीत असतो; त्याला कधी छेडू नये – आपले काम तो चोख करतो!

मी खात्यात गेल्या गेल्या ह्या चौघांस सलाम/ नमस्कार करत असे व कामाची कल्पना, चिठ्ठ्या कसुन देत असे. कासम तंबाखू मळत मळत त्याच्या लालबुंद डोळ्यांतून माझ्याकडे पाहत “क्या नये साहेब कुछ O. T. का बंदोबस्त आज किजीये।”  म्हणून इशारा देत असे तर कृष्णा फक्त गालात हसून दाखवी! पहिले दोन दिवस कसे बसे टार्गेट पूर्ण करू शकलो – मला त्रास देण्याचा प्रयत्न या तिघांनी करून पाहिला, ड्रम फोडले, काम संपल्यावर आलेल्या एक दोन गाड्या भरण्यासाठी खूप आर्जवे करावी लागली. मात्र तिसऱ्या दिवशी स्फोट झाला. एकदम चार गाड्या सं. ७ वाजता आल्या. वास्तविक ३ ते ७ पर्यंत ह्या लोकांचे बहुतेक काम आटोपत आले होते व चार ड्रायव्हरच्या जोड्यांनी एक एक जोडी गाडी भरली असती तरी जास्तीत जास्त रात्री ८ पर्यंत सर्व काम व्यवस्थित झाले असते – कारण रात्री ११ वाजेपर्यंत ह्या लोकांची ड्युटी होती! पण म्हणतात ना लातों के भूत बातों से नहीं मानते। कासम, हसत माझ्याकडे आला व म्हणाला “साहब आजतो हम चारोंको आठ-आठ घंटो का O. T. चाहिये, तोही ये गाडी भारंगी – नाही तो आप देखलो!” हे ऐकून माझ्या डोक्यात तिडिकच गेली. जरी नवीन होतो – अजून नोकरीत confirmation झाले नव्हते, तरी त्या वेळी माझ्या डोक्यांत हा कोणताच विचार आला नाही हे लोक केवळ पैशासाठी कंपनीचे नुकसान करत आहेत व काम संपायची वेळ झालेली नसताना सुद्धा मुद्दाम मला त्रास देण्यासाठी हे नाटक करीत आहेत. Nothing Doing जे होईल ते होवो – असाच काहीसा संतप्त विचार त्या वेळी माझ्या मनात आला व मी कासमला जोरांत बजावलं – ‘O. T. वगैरे कुछ मिलने वाला नहीं, पहले आप को ये चार ट्रक लोड करने पडेंगे!’ माझ्या सारख्या नवख्या अधिकाऱ्यांकडून त्यांना ही प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती कारण वरिष्ठ अधिकारी देखील अशा वेळी वाटाघाटी सुरु करून चार नाही तर दोन O. T.  घ्या वगैरे असे काही तरी सूतोवाच करीत – त्या मुळे माझीही रोखठोक प्रतिक्रिया ऐकून कासम, हसन, यदु यांची माथी भडकली व चालू असलेले काम देखील तसेच टाकून फोर्क लिफ्ट बंद करून हि मंडळी रेस्ट रूम मध्ये तंबाखू खाण्यास निघून गेली! माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली! आपण घेतलेला हा निर्णय माझ्या वरिष्ठांना मान्य होईल काय? उद्या हा माल गेला नाही तर बिजूर प्रथम मला फाडून खाईल? परत जाऊन ह्यांना O. T. देऊन टाकावेत काय? अनेक विचारांचे थैमान माजून मी माझ्या केबिन मध्ये डोके धरून बसलो! सर्व कामगार माझी गंमत पाहत होते – कारण ड्राइवर लोकांसमोर बोलायची कोणाची हिम्मत नव्हती!

मान खाली घालून नाशिबाला दोष देत, त्या खोलीत खुर्चीत बसलो असतांना पाठी मागून टप-टप बुटांचे आवाज व माझ्या दिशेने कोणीतरी येत असण्याचे जाणवले. मात्र मागे बघून पाहण्याची देखील इच्छा नव्हती! व पाठीवर हात पडल्यावर शब्द आले – “साहेब, काळजी कसली करताय – इकडे बघा” मागे पहिले तो कृष्णा ड्राइव्हर माझ्याकडे सहानुभूतीपूर्वक, परंतु आश्वासक नजरेने पाहत होता व त्याच्या डोळ्यांत मला एक वेगळीच चमक दिसत होती. कृष्णाने अपूर्ण कामाच्या चिठ्ठ्या मजकडू घेतल्या, ज्या इतर ड्राइव्हर्सनी  माझ्या कडे परत दिल्या होत्या! तसेच नवीन आलेल्या ट्रकसाठी माझ्या कडून चार नव्या चिठ्ठ्या करून घेतल्या व मला म्हणाला, तुम्ही आता येथून उठू सुद्धा नका आराम करा! त्यानंतर अर्धा तास तेथे जे चालले होते तो नुसता चमत्कार होता! जनीला दळण-कांडण करण्यासाठी भेटलेला ‘विठू नाथाघरी पाणी भरणारा पांडुरंग’ आणि कबिराघरी शेले विणणारा ‘राम’ हा कृष्णा ड्राइव्हरच्या रूपात तेथे प्रकट झाला होता. प्रथम कृष्णाने प्लॅटफॉर्मवर उभे असलेले चार ट्रक धडाधड भरून ते पाठवून दिले, नवीन चार ट्रक प्लॅटफॉर्मवर लावण्यास सांगून, चेकरच्या मदतीशिवाय एकटा गोदामात आपली फोर्क-लिफ्ट घेऊन शिरला व धडाधड ड्रमच्या फळ्या एकटा ट्रक मध्ये फेकू लागला. त्याच्या कामाचा आवाका एवढा जबरदस्त होता कि पहिला-दुसरा-तिसरा-चौथा व पुन्हा पहिल्या ट्रक मध्ये ड्रम सोडण्यास तो येई तो पर्यन्त पहिला ट्रक जेमतेम फळीवरील ड्रम मध्ये रेटीत असे. तो एका वेळी चार ट्रक भरीत असूनही त्याचेच काम वेगात होत होते. केवळ ३०-३५ मिनिटांत त्याने हे काम संपूर्ण केले काहीतरी गडबड प्लॅटफॉर्मवर चाले आहे हे ऐकून आमचे तिघे मित्र पाहावयास आले तो कृष्णा धडाधड ड्रम रेटीत असलेला त्यांना दिसला! कृष्णाला थोपवायची त्यांच्या ‘बा’ची पण हिंमत नव्हती! कासम, हुसेन, यदु काळे-तोंड लपवीत खोटे हसू तोंडावर आणीत माझ्या कडे आले! ‘बहोत अच्छा किया!’ एवढेच म्हणाले पण माझ्याबद्दल तेव्हापासून एक अढी मात्र त्यांनी ठेवली व योग्य संधीची वाट पाहत राहिले! मात्र माझ्या आयुष्यांतील ही अशा कर्म-धर्म संयोगाची आता मला सवय झाली होती. काळा-फुत्कार करणारा कालिया जसा माझ्या आयुष्यात आला तास मर्दन करणारा कृष्णा देखील मला भेटत गेला!

दुसरे दिवशी श्री. बिजूर यांस जेव्हा हे नाटक कळाले तेव्हा त्यांनी कासम व कंपनीस ऑफिस मध्ये बोलावून तंबी देण्याचे नाटक केले! खरे तर त्यांना या प्रसंगावरून कमीत कमी एखादे सूचना पत्र (Warning Letter) द्यायला हरकत नव्हती; पण आमच्या मॅनेजमेण्ट मध्ये तेवढी हिम्मत नव्हती व म्हणून असे प्रसंग वारंवार होताच रहात असत! दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्णा ड्राइव्हरला तरी एखादे शिफारस पत्र देण्यास काही हरकत नव्हती कारण या सर्व बदमाषांच्या धाकाला व युनियनच्या शिस्तीला ठोकरून त्याने कंपनीचे काम कोणताही जादा मेहतांना, (ओव्हर टाइम- ओ. टी.) न मागता केले होते, ही खूपच मोठी गोष्ट होती. पण हे देखील करण्याची हिम्मत अधिकाऱ्यांत नव्हती, त्यामुळे सुद्धा ही इतर ड्राइव्हर मंडळी मॅनेजमेंट वर बिथरली असती! खरे तर या अडचणीच्या प्रसंगातून काम निभावून नेण्याबद्दल माझी तरी तोंडी स्तुती व्हावयास हवी होती – पण ती खूपच दूरची गोष्ट झाली! या घटनेमुळे एक चांगली गोष्ट माझ्या साठी झाली ती म्हणजे कृष्णा चांगला मित्र झाला व तो माझ्या खात्यात कधी असला, तर कोणी गैरवर्तन करण्याची हिम्मत करत नसे. कृष्णा एक माणूस म्हणून खूपच चांगला होता व त्यानंतर दोन एक वर्षात सेवानिवृत्त होऊन कऱ्हाड सांगली कडील गावाला निघून गेला.      

ह्या चौकडी बरोबर एक महिना काम करायचे होते. कारण एक महिन्यांनी ड्राइव्हर लोकांचे रोटेशन बदलत असे! कासम आणि कंपनीला मला पेचात पकडण्याची संधी थोड्याच दिवसात त्यांना मिळाली! कृष्णा काही दिवसांसाठी रजेवर गेल्याने यदूचा जोडीदार पडू कृष्णाच्या जागी आला आणि ही पुरती चांडाळ चौकडी नव्या आलेल्या व थोडाज्यादा असणाऱ्या साहेबाला वटणीवर आणायचे बेत करू लागली!

 त्यादिवशी दुपारचे पाळीला काम जरा जास्तच होते व नेहमी पेक्षा जास्त काम ड्राइव्हर ला द्यावे लागले. तरी ते आठ तासा पैकी चार तसा होणारच होते! मात्र अशीच काहीतरी फालतू सबब ही मंडळी सांगू लागली व आज तर O. T. घेणारच, येऊ दे कृष्णाला, अशा प्रकारची बडबड करू लागली. सर्व वरिष्ठ अधिकारी ५ वाजेनंतर ऑफिसांतून निघून गेल्यावर हे असे प्रकार होत असत. मी ह्या लोकांची खूप समजूत काढली, ग्रीस उत्पादन खात्यामध्ये पंडित नावाचे अधिकारी दुसऱ्या पाळीस होते – खूप वर्षे माझगांव मध्ये काम करीत होते, त्यांची शिष्टाई देखील असफल झाली. वेळ निघून चालला होता व सात वाजत आले होते. मी तसा शांत होतो, पंडित म्हणाले ‘जाऊदे O. T. कबूल करून टाक, बघू या उद्या; आज तर काम करून टाक” पण मला माहीत होते ह्या मंडळीने मुद्दाम हे ‘झोपण्याचे सोंग’ घेतले आहे व आज यांच्या पुढे नमालो तर हे लोक मला रोजच त्रास देतील. नको त्या ठिकाणी O. T. देत राहाण्यास मॅनेजमेंट ही मला दोष देईल! मला काही सुचेना, मी पंडितना सहजच विचारले, जॉर्डन साहेब बंगाल्यांत असतील का? त्यांना जाऊन भेटु काय?

पंडित एकदम गंभीर झाले, म्हणाले “असा मूर्खपणा करू नको, यावेळी जॉर्डन साहेब ऐष करीत असतील व त्यात तू असा मोठा problem घेऊन गेलास तर भडकतील,  तू Probation वर आहेस तेव्हा काहीही होऊ शकते – त्यांचे कडे न जाणेच उत्तम!”

पंडितानी असा सल्ला दिल्यावर मी खूपच निराश झालो, कारण दुसऱ्या कोणाला सांगणे त्या वेळी शक्य नव्हते! बिजूरला घरी फोन केला असता तर त्यांनी देखील काहीतरी थातुर-मातुर सल्ला मलाच दिला असता व दुसरे दिवशी मी ‘labour handaling’ कसे करू शकतनाही असे सुचवले असते! त्या पेक्षा मी थोडी risk घेण्याचे ठरविले व जॉर्डन साहेबांसच भेटण्याचे ठरविले. सुदैवाने ते बंगल्यातच असल्याचे कळाले! मी ऑफिससोडून कोठे जात आहे हे, ही चौकडी पाहताच होती. पण मी जॉर्डन कडे जाईन का? ह्या संबधी यांना शंका होती, तसेच जॉर्डन साहेब यालाच ओरडून परत पाठवितील असा जॉर्डन साहेबांबद्दल ही यांना जुन्या अनुभवावरून पक्का भरवसा होता!

साहेबांचे निवासस्थान बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर होते! तो जिना चढतांना जणू मी फाशीच्या तख्ताच्या पायऱ्या चढतो आहे असे वाटत होते. मनाचा मोह हिय्या करून दारावरची बेल वाजवली त्यांच्या नोकराने दार उघडले. समोरच्या कोचवर व्हिस्कीचा ग्लास हातात घेऊन बसलेल्या जॉर्डन साहेबांनी माझ्याकडे पहिले व मंदस्मित केले! बस्स तेवढयानेच मला खूप धीर आला. इंग्रजीत संभाषण झाले त्याचा तर्जुमा असा – 

‘सर मी आत येऊ का?’

‘Yes, yes, come in, तेथे काय ऊभा आहे? ये बस!’

‘सर मला Ware House मध्ये प्रॉब्लेम आहे, ड्राइव्हर लोकांनी काम बंद केले आहे व आज खूप डिलिव्हरी आहेत!’ मी ऊभा राहताच सांगितले. 

“अरे काम-बीम, प्रॉब्लेम वगैरे नंतर बोल, प्रथम सांग तू काय घेणार, व्हिस्की – बिअर?”

मी तर उडालोच! टर्मिनलचा मुख्य माणूसच मला कामावर असतांना ड्रिंक घ्यायला सांगत होता आणि ते देखील मी एक मोठ्ठी समस्या घेऊन आलो असतानां! मी खाली बसलो व जास्त आग्रह न धरता ग्लास मध्ये थोडी बिअर घेतली. जॉर्डन सरांनी माझी चौकशी केली, मी अजून वेअर-हाऊस मध्ये कसा, मी  R&D मध्ये का जात नाही वगैरे, मलाच ते विचारू लागले. मी त्यांना माझ्या Orientaion चे सांगितले व विजय राघवन सांगतील तेव्हा R&D मध्ये जाईन, वगैरे आमच्या इतर विषयावरील गप्पाच सुरु झाल्या. 

साधारणतः तीन-चार पेग जॉर्डन साहेबांनी घेतले असतील, ते मुख्य विषयावर आले व माझ्याकडून त्यांनी नक्की समस्या समजावून घेतली. मी त्यांना मागे घडलेला कृष्णा ड्राइव्हरच्या मदतीच्या वेळीचा प्रसंग ही सांगितला. त्यांच्या चेहऱ्यावर आलेली चीड मला स्पष्ट जाणवली- व ते म्हणाले,

Raut, you go to the warehouse, and I will come and see those ba*****!

मला तर खरेच वाटेना, जॉर्डन साहेब स्वतः माझ्या ऑफिसांत येत आहेत! मी आता विजयी वीराच्या मुद्रेने परत माझ्या ऑफिसमध्ये चालत आलो. इकडे ही चांडाळ चौकडी मनांत खुशीचे मांडे खात होती, जॉर्डन साहेबांचा ओरडा खाऊन आला असेल, म्हणून! मी देखील काही काही  न बोलता गुपचूप खुर्चीत बसून, आता पुढे काय होते म्हणून बघत राहिलो!

थोड्याच वेळात मला, माझ्या केबिनच्या काचेतून लांबलचक पायघोळ गाऊन घातलेली, घरघुती वेषातील, जॉर्डन साहेबांची मूर्ती टप-टप बुटाचा आवाज करीत वेअर-हाऊसच्या दिशेने येतांना दिसली! आणि क्षणार्धांत सर्व टर्मिनल मध्ये धावपळ सुरु झाल्याचे दिसू लागले. जो तो कामगार, अधिकारी आपापल्या खात्यात पटकन निघून गेले. जॉर्डन सरळ वेअर-हाऊस मध्ये न येता पंधरा- वीस फूट बाहेर, मैदानातच येऊन दोन हात बांधून उभे राहिले. फक्त उभे राहिले, कोणालाही एका शब्दाने काही विचारले नाही! तशीच पाच एक मिनिटे गेली असतील. यदु-पदू-कासम कंपनी रेस्ट-रूम मधून वेअर-हाऊस मध्ये आली होती, पण अजून आपापल्या गाड्यांवर आली नव्हती. एकमेकांकडे पाहून काही खाणाखुणा सुरु होत्या! आता मजा बघायची माझी पाळी होती! मी देखील आता काय होते शांतपणे बसून बघत होतो! आणखी पांच एक मिनिटे गेली असतील, जॉर्डन फक्त हात बांधून उभेच होते – थोड्याच वेळांत एक गाडी स्टार्ट झाल्याचा आवाज आला, मिनिटभरांत दुसरी, तिसरी करीत चारही गाड्या स्टार्ट झाल्या होत्या- यदु-पदू, कासम – हुसेन काहीही न बोलता गुपचूप आपापल्या गाड्यावर बसून गोडाऊन मधील माल ट्रक मध्ये आणून सोडत होती! चमत्कार झाला होता! एक चकार शब्द न उच्चारता, ऑफिसमध्ये न शिरता जॉर्डननी  एखाद्या कसलेल्या योध्याप्रमाणे लढाई जिंकली होती- ते आले होते तसेच टप-टप बूट वाजवीत आपल्या बंगल्यात निघून गेले!

त्या दिवशी संपूर्ण काम १० वाजेपयंत चालले, कोणीच कोणाशी बोलले नाही, मात्र यदु-पदु कंपनी त्या दिवसापासून ते मी माझगांव मध्ये असे पर्यंत माझ्या वाटेला आली नाही.  दोन वर्षांनी जॉर्डन साहेबांची बदली कांडला टर्मिनलला झाली, तरी देखील माझगांवमध्ये जो थोडा दबदबा या प्रसंगाने जॉर्डनच्या आशीर्वादाने निर्माण झाला त्याचा मला भविष्यात खूपच फायदा झाला! अशी मॅनेजमेंट जॉर्डन नंतर माझगांवला पुन्हा दिसला नाही! जॉर्डन साहेब ते जॉर्डनच! ते जर माझगांवला जास्त काळ राहिले असते तर माझगांवची शिस्त आणखी सुधारली असती, पण त्यांच्या हितशत्रूंनी त्यांना मुंबई बाहेर काढलेच! त्यांच्या कार्य-कौशल्याच्या, शिस्तप्रियतेच्या गोष्टी आजही माझगांवचे जुने लोक सांगत असतात! असा जबरदस्त माणूस मी आयुष्यात पहिला नाही.

अशीच एक गमतीशीर गोष्ट जॉर्डन साहेब माझगांव मध्ये असताना त्या नंतर घडली होती ती देखील थोडक्यात सांगतो. कामगार मंडळी विशेषतः दुपारच्या पाळीतील कर्मचारी, जॉर्डन संध्याकाळी घरात आहेत किंवा नाही याही खबर घेऊन तास दोन तास आधी पळून जायची तयारी करीत, कारण ते असले की वरच्या मजल्यावरील खिडकीतून त्यांची खाली नजर असे व कोणी इथे तिथे फिरताना दिसले कि त्वरित त्याची नोंद ते घेत असत! असेच एकदा ते बंगाल्यात नाहीत असे लोकांना समजले व एकदा बाहेर गेले कि रात्रौ १२-१ वाजेपर्यंत सहसा ते येत नाहीत  हे ही लोकांस माहीत असे! त्या मुळे त्या दिवशी अधिकारी वर्गास न जुमानता पंधरा एक कामगार रात्रौ ९ च्या सुमारास नळावर आंघोळी वगैरे करून,  कपडे बदलण्याच्या तयारीत होते – दुसऱ्या दिवशी काही सण वगैरे असावा त्यामुळे त्यांस लवकर पाळायचे होते! त्यांच्या दुर्दैवाने साहेबांची गाडी त्याच वेळी फॅक्टरी मध्ये शिरली आणि धावपळ सुरु झाली. साहेबांस ही त्याचा कानोसा लागला व गाडीतून सरळ ते बाथरूम मध्ये गेले, येथे काही कामगार कपडे काढून व्यवस्थित आंघोळ वगैरे घेत होते. साहेबांनी त्वरित सेक्युरिटीच्या तीन चार लोकांस बोलावून त्या तशाच अवघडलेल्या स्थितीत असलेल्या कामगारांना सरळ पकडून गेटवर आणून त्यांची कार्डे काढली व ‘Absent’ असा शेरा मारला! त्या वेळी काही कामगार चड्ड्या, लंगोट तर काही फक्त अंडरवेअर वर होते – तशीच त्यांची धिंड जॉर्डननी काढली होती व  कामगारांनी त्या बाबतीत हुं कि चू केले नाही. केवळ जॉर्डन साहेबांत अशी हिम्मत होती व म्हणून ते फॅक्टरी आवारात असताना ‘ब्र’ म्हणण्याची कोणाची टाप नव्हती! मात्र दुसरे दिवशी हा विषय सर्व कामगार एकमेकांस सांगून ज्यांची फजिती झाली आहे, त्यांची मजा करीत होते. खूप दिवस हा विषय चर्चिला गेला!

त्यानंतर माझे ‘Ware House’ मधील वास्तव्य व्यवस्थित गेले- विशेष समस्या आल्या नाहीत. बिजूर साहेब ही आदबशीर वागू लागले. इतर सहकारी देखील माझ्या कामा बद्दल वाहवा करू लागले, बरे वाटले!

जॉर्डन साहेबांनीच राघवनशी काही बोलणी केली किंवा कसे माहीत नाही पण त्वरित माझी बदली ‘गुणवत्ता – दर्जा तपासणी’ प्रयोगशाळेत (Quality Control Labotarory) मध्ये झाली! माझ्या शिक्षणाच्या दृष्टीने येथे जास्त वाव मिळणार होता व ड्रम मोजून गाड्या भरण्यापेक्षा हे काम चांगले होते. कामगारांशी देखील संघर्ष नव्हता – मात्र येथे काही केमिस्ट मंडळी होती ती कामगारांपेक्षा खतरनाक होती! सुमारे १०-१२ केमिस्ट दोन पाळ्यांमध्ये येथे कामे करीत व त्यांचे वर दोन अधिकारी दोन पाळ्यांमध्ये अधीक्षक म्हणून असत . श्री. गुप्ता हे आमचे साहेब होते, ते जनरल शिफ्ट मध्ये येत. तर मी व श्री. मूर्ती नावाचे दुसरे अधिकारी, आम्ही ७ ते ३ व ३ ते रात्रौ. ११ अशा दोन पाळ्या सांभाळीत असू. कंपनीमध्ये तयार होणारा सर्व पक्का माल, त्याच्या दर्जासाठी तपासणे, येणारा कच्चा माल ठीक असेल तर ‘ठीक (OK/approved)’ सांगणे वा परत पाठविणे, कंपनीच्या ग्राहकांकडून येणारे, आमचेच प्रॉडक्ट्स तपासून ग्राहकांना रिपोर्ट देणे, तसेच पेट्रोल, डिझेल, रॉकेल ही सर्व इंधने दर्जा पाहण्यासाठी तपासणे अशी कामे असत. ह्या सर्वांत विमानाचे इंधन तपासणीचे काम खूप जोखीमीचे असे व ते खूप काळजीपूर्वक केले जाई. विशेषतः एस्सो त्यावेळी सर्व आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांस हे इंधन पुरवीत असल्याने कधी महत्वाची व्यक्ती (VIP) विमानाने जावयाची असल्यास V. I. Flight च्या इंधनाची तपासणी कारतांना अधिकाऱ्याला आपल्या  सहीने ‘सील’ केलेला इंधनाचा एक सॅम्पल DGCA च्या सरकारी यंत्रणेकडे पाठवावा लागे, व कधी काही समस्या निर्माण झाल्यास तो अधिकारी निश्चित गंभीर परिस्थितीत येई. त्यावेळी रशियाचे अध्यक्ष ब्रेझनेव्ह, क्रुश्चेव्ह, पंतप्रधान शास्त्री, इंदिरा गांधी व इतरही अनेक महत्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या विमानाचे इंधन आम्ही तपासल्याचे आठवते!

श्री. गुप्ता हे आमचे Incharge तरुण होते व खूप महत्वाकांक्षी तसेच हुशारही होते त्यामुळे आम्हा चार लोकांची (सेतुरामन, परेरा, रंगराजन व मी) कंपनीने केलेली नेमणूक त्यांना खटकत होती, कारण कदाचित त्यांच्या प्रमोशनवर आमच्या नेमणुकीचा परिणाम होईल अशी त्यांना धास्ती वाटे! त्यातच माझे सहकारी मूर्ती हे गुप्तापेक्षा सिनिअर होते तरी ते गुप्ताच्या हाताखाली काम करीत, त्यामुळे मूर्तींचे गुप्ता यांचेशी पटत नसे. दोघेही मी त्याच्यापेक्षा खूप कनिष्ठ असून मला एकमेकांच्या कहाण्या सांगत! केमिस्ट लोकांत काही पंधरा वर्षे नोकरी झालेली व एम. एस. सी. शिकलेली मंडळी होती व त्यांना प्रमोशन मिळविण्यात सहाजिक अपेक्षा होती, पण मी बाहेरून येऊन प्रयोगशाळेत त्यांचा साहेब झाल्याने ह्या मंडळींचा माझ्यावर रोष होता. वरून जरी दाखवित असले तरी ही मंडळी मनापासून मला सहकार्य करीत नसत व मला या कामाचा तेवढा अनुभव नसल्याने माझ्या चुगल्या गुप्ताकडे करीत व गुप्ताही अशा गोष्टी विजयराघवनला सांगून माझी बदनामी करण्याची एकही संधी सोडत नसे! श्री. बोरकर या बाबतीत मला वारंवार सूचना देऊन सावध राहण्याची, सर्व Analytical Work लवकर शिकून घेण्याची सूचना करीत! त्यावेळी सिनिअर असलेली मंडळी, प्रमोशन न झाल्याने दुखावली गेली होती. ह्यांतील काही मंडळी उघडपणे मला आव्हान देत व माझ्याशी फटकून वागत. ह्या लोकांची सतत तक्रार गुप्तांकडे चालू असे. त्यामुळे गुप्ता पुढेही प्रश्न होता कि या जुन्या केमिस्ट लोकांना खुश ठेऊन, ह्या राऊतच्या प्रश्नाचा एकदा निकाल लावला पाहिजे! वास्तविक राघवन साहेबानी मला तेथे नेमले होते, त्यामुळे शेवटी ह्या प्रश्नांची उकल देखील त्यांनाच करायची होती. मला या थोड्या मंडळींचा विरोध जाणवत असला तरी, माझ्या पाठीमागे ही मंडळी कोणते कुभांड रचत असतात याची विशेष कल्पना नव्हती. मी माझे काम व्यवस्थित करून जास्तीत जास्त वाचन करण्याचा व शिफ्टमध्ये शिकून घेण्याचा प्रयत्न करीत असे!

मला वाटते गुप्तांच्या रोजच्या तक्रारीस कंटाळून राघवननी एकदाचा या प्रश्नाचा कायमचा निकाल इस पार या उस पार लावण्याचे ठरविले असावे. मी लॅबमध्ये रुजू झाल्याच्या साधारण महिनाभरांत राघवन, एक दिवस सकाळी आठ वाजता कोणालाही काही पूर्व सूचना न देता माझगाव मध्ये हजर झाले. आदल्या दिवशी यांनी गुप्ताला फोने करून काही महत्वाचे काम येणार असल्याने सर्व केमिस्टना पहिल्या पाळीत बोलावं अशी सूचना केली होती. मी देखील पहिल्या पाळीतच होतो – त्यामुळे सकाळी अचानक लॅबमध्ये उगवलेल्या राघवनना बघून गुप्ता सहित सर्वांस धक्काच बसला होता! कारण एवढे वरिष्ठ अधिकारी जेव्हा अचानक असे न सांगता येतात तेव्हा कोणाची तरी ‘कंबख्ती’ भरली आहे एवढे नक्की!

श्री राघवन यांनी आम्हा सहा जणांस गुप्तांच्या केबिन मध्ये बोलविले व अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले- “मी राऊतला बाहेरून आणून तुमच्या लॅब मध्ये अधिकारी म्हणून नेमले ह्या मुळे तुमची नाराजी आहे, असे मला गुप्ताकडून कळले. मी तुमची नाराजी समजू शकतो त्यामुळे आता या प्रश्नाचा सोक्ष-मोक्ष लावण्याचे मी ठरविले आहे. कारण राऊत अजून प्रोबेशनवर आहे व त्यामुळे त्याचे काम समाधानकारक नसल्यास मी त्याला कमी करू शकतो. तेव्हा तुम्हा सर्वांस समान संधी देऊन मी आज शंभर मार्कांचा एक पेपर (प्रश्नपत्रिका) तुम्हाला देतो. दोन तासांत तुम्ही तो पूर्ण करायचा आहे व त्यानंतर गुणवत्तेच्या निकषावर मी अंतिम निर्णय घेईन – त्यानंतर कोणाच्या तक्रार मला नको!”

राघवन खूप स्पष्टवक्ते व सडेतोड व्यक्तिमत्वाचे होते. त्याच बरोबर त्यांनीच मला निवडले असल्याने माझ्यावरही अन्याय होणार नाही याची त्यांना काळजी होती. त्यामुळे हा मध्यम मार्ग त्यांनी निवडला होता. 

हा पेपर देखील वैशिष्ठ पूर्ण होता. सुमारे ५० गुण हे लॅबमध्ये रोज होणाऱ्या काम संबंधित होते, तर उरलेले ५० गुण हे पेट्रोलियम क्षेत्रांतील इतर घडामोडी व तंत्रज्ञानावर होते! त्यामुळे दुसऱ्या भागांतील प्रश्नांची उत्तरे मला व्यवस्थित येत होती, जी ह्या केमिस्ट मंडळींना जमत नव्हती. मात्र पहिल्या भागांत केमिस्ट लोकांस सोपी उत्तरे होती व मी देखील त्यांत काही तरी करू शकलो. त्यामुळे आठ दिवसांनी पुन्हा राघवन जेव्हा उत्तर पत्रिका तपासून घेऊन आले तेव्हा त्यांनी त्या सहा पत्रिका सर्वांसमोर ठेवल्या व विचारले, आता तुम्हीच सांगा मी काय करू? मला सर्वात जास्त गुण होते व त्यामुळे सर्वांची तोंडे बंद झाली होती. या पुढे उघडपणे ह्या मंडळींनी प्रमोशनची नाराजी दर्शवली नाही. मात्र पुढे थोडे दिवसांनी एस्सो ची हिंदुस्थान पेट्रोलियम झाली व ही सर्व मंडळी ऑफिसर झाली. मात्र तो पर्यंत त्यांची नाराजी लपून राहिली नाही व मला थोडे दिवस तो त्रास झाला. मी सर्व कामाची तोवर माहिती करून घेतली होती व त्यामुळे कोणावर अवलंबून राहावे लागत नसल्याने, माझे काम व्यवस्थित सुरु झाले होते! राघवन साहेबांचा हा फैसला जरी मोठ्या मनाने मानला होता, तरी त्यातील एक बंगाली बाबू हे मात्र त्याबाबत अजिबात खुश नव्हते. हा खूपच मनस्वी होता व प्रमोशन मिळावे यासाठी खूप धडपडत होता. आपल्या आकांक्षेवर पाणी पडलेले त्याला सहन होत नव्हते म्हणून ह्या परीक्षेनंतर सुद्धा हर प्रकारे हा माणूस मला त्रास द्यायचा प्रयन्त करी. वयाच्या पस्तिशीतही अविवाहितच होता व घराच्या मंडळी बरोबर देखील फारसे सख्य  ठेऊन नव्हता, असे कळले होते!

माझी नोकरी पक्की झाली होती व एक वर्षाच्या काळात या प्रयोगशाळेत माझे काम व्यवस्थित झाले होते! बंगाली बाबूच्या कुरबुरी चालूच होत्या. कधी तरी महत्वाचे उपकरण नादुरुस्त करून ठेव, कधी कामाच्या वेळी बाहेरच निघून गप्पा मारी, कधी काही प्रोडक्टसचे पृथक्करण करतांना मुद्दाम चुकीचे रिझल्ट देई अशा प्रकारचे चाळे तो करीत होता व मी त्याला व्यवस्थित हाताळत होतो. 

मधल्या काळात श्री. गुप्ता यांची बदली झाली होती – मूर्ती देखील रिफायनरीत गेला होता व श्री. वाडीलाल मेहता हे नवीन लॅब इनचार्ज म्हणून आले होते. तसेच घोषला ‘हंगामी’ (Ad-hoc) म्हणून लॅब मध्ये अधिकारी बनविले होते, त्यामुळे मेहता Incharge, मी आणि घोष दोन पाळ्या सांभाळू लागलो. घोष, बंगाली बाबू पेक्षा वरिष्ठ होता त्यामुळे बाबू ने नाराज होण्याचे कारण नव्हते पण झाले उलटेच, आता त्याने घोषची देखील बदनामी सुरु केली होती. खरे तर मेहतांना हे कळत होते व आवडतही नव्हते,  त्यामुळे ते कधी-कधी त्याला खूप झापीत, पण हा एवढा बनेल होता कि त्यावर विशेष परिणाम होत नसे, तो युनियनचाही सदस्य होता. मेहतांशी देखील तो वाकडे वागू लागला!

त्यामुळे त्या काळांत घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत ह्याचा प्रत्यक्ष सहभाग सापडला नाही, तरी आमचा संशय, ‘पडद्यामागचा सूत्रधार’ तोच असला पाहिजे असा होता. ती घटना अशी: 

विविध पदार्थांचे पृथक्करण करण्यासाठी लॅबमध्ये विविध प्रकारची उपकरणे होती. बहुतेक भांडी ही काचेची असत तर काही चिनी मातीची. एक डिश, वाटीच्या आकाराची व सुमारे २०० ग्रॅम वजनाची – प्लॅटिनमची होती. प्लॅटिनम हा धातू सोन्यापेक्षा ही महाग आहे, त्यामुळे त्यावेळी त्या डिशची किमंत सुमारे लाखभर रुपये तरी होती. जरी कपाटामध्ये, कुलुपात ही ठेवलेली असे तरी विश्वासामुळे किल्ली मेहता जवळच न राहता कधी कोण्या केमिस्टकडे वा लॅबमध्ये अटेंडन्टकडे (attendant) ही ते देत असत. त्या दिवशी दुपारी माझी शिफ्ट होती, बंगाली बाबू पहिल्या पाळीतच येऊन गेला होता. आम्हाला काही कामासाठी ती डिश हवी होती त्यामुळे आमच्या एका केमिस्टने ती डिश कपाटातून काढून, भोलानाथ नावाच्या त्या मदतनीसकडे दिली. काम झाल्यावर केमिस्टने ती भोलानाथच्या मार्फत साफ करून कपाटात परत ठेऊन द्यावी अशी अपेक्षा होती. रात्रौ ११ वा. लॅब बंद करतांना माझ्या लक्षात न आल्याने ती डिश कपाटात ठेवली गेली कि नाही हे मी पहिले नाही व घरी आलो! दुसऱ्या दिवशी दुपारी माझगावच्या मुख्य गेट मध्ये प्रवेश करताना दाराशी खूप गर्दी व मेहता आणि माझ्या नावाची बोंबाबोंब होत असलेली दिसली. प्रयोगशाळेत प्रवेश करतो तो मेहतांनी मला केबिन मध्ये बोलावून घेऊन ती डिश सकाळी कामासाठी मिळाली नाही. त्यामुळे आम्ही भोलानाथ हेल्परकडे चौकशी केली- त्याने युनिअन लीडर कडे जाऊन “मेहता माझेवर चोरीचा आरोप करीत आहे,” अशी तक्रार केली व त्यामुळे सर्व गदारोळ उठला.

एकंदरीत ती मूल्यवान प्लॅटिनम डिश काल हरवली होती व त्यामुळे आता दोष कोणाचा हे ठरवून त्याप्रमाणे पुढची कारवाई करायची होती. मेहतांनी माझे म्हणणे ऐकून घेऊन, माझी चूक मला दाखवून दिली. मी रात्रौ ती डिश कपाटात ठेवली गेली कि नाही हे पडताळून पाहावयास हवे होते! केमिस्टच्या म्हणण्याप्रमाणे काम झाल्यावर त्याने डिश भोलानाथकडे साफ करावयास दिली होती व भोला म्हणत होता साफ करून मी डिश टेबलवरच ठेवली, पुन्हा कपाटात ठेवायचे विसरून गेलो, मात्र डिश लॅबमध्ये कोठे तरी गहाळ झाली आहे. त्या प्रमाणे त्वरित एकतर पोलीस कम्प्लेंट करावयास हवी किंवा लॅब मधून ते उपकरण लवकर शोधून तरी काढावयास हवे! काय करावे मेहतांस समजेना, बोरकरांशी देखील आम्ही बोललो व शेवटी दुपारी पोलीस ठाण्यावर (शिवडी) जाऊन चोरीची तक्रार नोंदवली. अर्थात त्यावेळी पोलीसांस सर्व इत्यंभूत माहिती देतांना केमिस्टचे नाव व भोलाचे नावं आम्हास तक्रारीत द्यावेच लागले! त्वरित पोलिसांनी येऊन आम्हा सर्व संबंधितांची साक्ष घेण्यास सुरुवात केली. येथे माझगाव टर्मिनल मध्ये हा मुख्य विषय झाला होता व कामगार बाहेर जमून आता काय होते याचीच चर्चा करत होते! त्यांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले. पोलिसांनी भोलानाथला अधिक चौकशीसाठी चौकीवर नेण्याचे ठरविले त्या प्रमाणे ते घेऊन गेले! बस्स! येथे संपूर्ण माझगांव टर्मिनल मध्ये कामाचा ‘आर्या’ करून टर्मिनल बंद केले. तेथे हेड-ऑफिस मधून आम्हास फोन वर फोन! कि तुम्ही हे काय चालविले आहे? सुदैवाने टर्मिन मॅनेजर जॉर्डन साहेबांनी राघवनना फोन करून “तुम्ही काळजी करू नका, मी टर्मिनल सांभाळतो!” अशी ग्वाही दिल्याने, आम्हाला जास्त त्रास झाला नाही!

तिकडे पोलिसांनी भोलानाथला आपला ‘खाक्या’ दाखवून दोन तडाखे दिले होते त्यामुळे कामगारांना हे कळल्यावर संबंध माझगांवत तणाव निर्माण झाला होता, ही गोष्ट भारतभर बाकीच्या टर्मिनलमध्ये पसरू नये यासाठी जॉर्डन प्रयत्नशील होते. मला वाटते रात्रौ त्यांचे राघवन व इतर वरिष्ठांशी बोलणे झाले असावे व शेवटी काहीतरी Compromise म्हणून ही तक्रारच मागे घेण्याचे मॅनेजमेंटने ठरविले! जॉर्डन दुसऱ्या दिवशी पोलीस चौकीवर मला घेऊन गेले व आम्ही तक्रार मागे घेतल्याचे लिहून दिले. माझगांव शांत झाले व पुढे संपाचे लोण गेले नाही, हे ठीक. मात्र ती डिश गेली कुठे व ती कोणी नेली, त्यामागे सूत्रधार कोण हे सर्व गुलदस्त्यात राहिले! तरी संशयाची सुई या दोन बंगाली बाबू भोवतीच फिरत राहिली. कारण त्या घटनेमुळे मेहता, मी व घोष या तिघांना थोडा मनःस्ताप झाला व जॉर्डनने प्रकरण नीट हाताळल्याने आम्हाला पुढील प्रसंगांना तोंड द्यावे लागले नाही. १ लाख रुपये एस्सोला जास्त नव्हते मात्र ज्या प्रकारे हे झाले ते ठीक झाले नाही. मात्र यापुढे आम्ही अधिक सावध झालो!

या लॅबोरेटरीतील तीन वर्षाच्या कालखंडातील पहिले दोन वर्षे खूपच सत्वपरीक्षेची गेली. माझा काही दोष नसतांना काही दुर्घटना होत गेल्या व त्याचा मनस्ताप झाला; मात्र परमेश्वराची कृपा व काही सज्जन माणसांचे सहाय्य या मुळे हे निभावून गेले. मधल्या काळात १९७१ साली माझे लग्न झाले व आमच्या विलेपार्ले येथील नवीन घरमध्ये मंदा राहावयास आली. थोड्या महिन्यापूर्वीच ती. अनंतराव वर्तकांच्या मदतीमुळे ही जागा त्यांनी मला अल्प किंमतीत मिळवून दिली होती. व आम्हा उभयतांबरोबर अण्णा, पप्पी देखील त्यावेळी आमच्या बरोबर राहत. माझ्या अशा विचित्र कामाच्या वेळामुळे मंदाला त्यांची मदत होई. मात्र मंदामुळे आमचे सर्वांचे काम सुकर झाले होते व विशेषतः मला खूप मदत होत होती. एकाच वर्षात पुढे श्रीदत्तचा जन्म झाला व त्याच्या कोडकौतुकाने आमचे घर भरून गेले! घराला आता घरपण ही आले होते व माझी जबाबदारी वाढली होती! पुढे अण्णाचेही ही वर्षभरात लग्न झाले – अरुणा व तो गोरेगांवला नवीन घरी राहावयास गेले व पप्पी देखील कोसबाडच्या संस्थेत रुजू होण्यासाठी गेला! त्यामुळे १९७० ते १९७३ ही तीन वर्षे माझ्या आयुष्यांत खूप महत्वाची मी मानतो.

एस्सोची नोकरी मिळाली, लग्न होऊन पत्नी मिळाली, संसार वेलीवर छान फुल उमलले, भाऊ मार्गी लागले, व विशेष म्हणजे हक्काचा निवारा मुंबईत मिळाला! 

ह्या प्रयोगशाळेत काम करतांना, शेवटी आणखी एक फटका मला बसणार होता व त्यानंतरच येथून माझी सुटका होती! अशा सगळ्या ‘अतर्क्य घटना’ ह्या माझगांव मध्ये शक्यतो दुसरया पाळीतच होतात, त्यामुळे ह्या पाळीत काम करणारा प्रत्येक अधिकारी बिचारा देवाचे नाव घेऊन मुख्य गेटमधून आत येत असे कारण संध्याकाळी ६ नंतर सर्व मॅनेजर्स गेले कि त्यांचा निर्बंध नसे व दुसरे म्हणजे कामाचा खरा जोश व दबाव ह्या पाळीतच असे. 

त्या दिवशी माझी पण संध्याकाळची कामाची वेळ होती, व अनंत नावाचा एक हंगामी केमिस्ट माझ्या बरोबर प्रयोगशाळेत होता. दुसरी जुनी माणसे ही होती. त्या दिवशी कामाचा खूप दबाव होता व हा अनंत नवीन असल्याने खूप उत्साह दाखवीत असे. मनाने चांगला पण सिगारेट पिण्याचे व्यसन होते. गुपचूप संडासात वगैरे जाऊन, बाहेर सिगारेट पीत असे. प्रयोग शाळेत सिगारेट शिलगविण्यास बंदी होती! काडेपेटी देखील आतमध्ये आणण्यास बंदी होती!

दुर्दैवाने त्या दिवशी आठचे सुमारास वीज गेली व प्रयोग शाळेत अंधार झाला! त्वरित इमर्जन्सी दिवे लावून थोडा उजेड आला. मात्र आमच्या उपकरणे साफ करायच्या खोलीत अंधारच होता, तेथे काहीतरी शोधण्यासाठी हा अति उत्साही अनंत आत शिरला व अंधार पाहून, नकळत खिशांत चोरून ठेवलेली काडेपेटी काढून पटकन शिलगावली -उजेडांत पाहण्यासाठी! आम्ही सगळे मुख्य हॉलमध्ये बसलो होतो – तोच ‘Oh my God!’ अशी अनंतची मोठ्ठी आरोळी आणि जबरदस्त आगीचा लोळ आम्हाला त्या सफाई खोलीत दिसला! धावत तेथे गेलो, तो घासलेट, पेट्रोल ठेवलेल्या काही सॅम्पलना आग लागली होती. ती आग प्रचंड होती! अनंतने काडी शिलगावली, तिचे जळते टोक खाली पेट्रोल असलेल्या उघड्या डब्यात पडले होते कोणीतरी काचेचे भांडे स्वछ करण्यासाठी, डब्यातून पेट्रोल काढले होते व डबा उघडला होता, तो बंद केला नव्हता. ह्या छोट्या ठिणगीने मोठा ‘प्रलय’ केला होता! पेट्रोल हे एवढे ज्वालाग्राही आहे कि दोन-तीन फुटावर जरी ठिणगी पडली तरी ते पेट घेते! येथे तर डब्यातच ठिणगी पडली होती!

सर्व कामगार धावून आले, अधिकारी ही आले, फायर एक्सटिंगविशर फोडले, पाणी मारले जे करता येईल तेवढे आम्ही करीत होते पण आग वाढतच होती- लॅब मध्ये तर हर  प्रकारची रसायने साठवलेली होती. कामगारांनीही खूप मदत केली, सुदैवाने माझे सहकारी बाळ राऊत त्याच वेळी कामावर असल्याने त्यांची खूप मदत झाली. आग विझत नव्हती, पण आग जास्त पसरणार नाही, बाजूलाच आमचे तेलाचे मोठे साठे होते… एवढेच आम्ही पाहत होतो. कोणीतरी आगीच्या बंबास फोन केला व थोड्याच वेळात ठणाणा करीत ही मंडळी आली. शेवटी त्यांच्या प्रयत्नाने आग तासाभरात विझली! 

झाले. आग विझली. पण आमच्या कंपनीच्या शेकडो चौकश्या सुरु झाल्या. रिपोर्ट करा, जबान्या घ्या, आगीची कारणे शोधा, प्रतिबंधक योजलेल्या सोयी होत्या का नाही? आमची विविध खात्याची मंडळी येणार, ते पाहणी करणार! हे सर्व सोपस्कार मी पुरे पाडले.  कारण शिफ्ट इन्चार्ज मी होतो ना! अनंताला ही मी सांभाळले कारण, तसा अतिउत्साही होता तो, यांत गोवाला गेला होता! मात्र तेव्हा पासून त्याने सिगारेट पिणे सोडले हे खरे! मी गंमतीने त्यानंतर सांगत असे, लोक आगी लावण्यात तरबेज असतात, मी माझगांव मधील आग विझविण्यांत अनुभवी आहे!

अशा रीतीने खूपच घडामोडींनी युक्त असा माझा हा एस्सोतील पहिल्या तीन वर्षांचा प्रवास! मात्र हे एवढे घडून एस्सोच्या मॅनेजमेंटने म्हणजे मुख्यतः श्री राघवन यांनी मला तीन वर्षाचे आताच ‘बढती’ दिली मी ‘सिनियर ऑफिसर – संशोधन प्रयोगशाळा (Sr. Officer, Research Lab)!’ म्हणून बढती मिळविली. त्यावेळी एस्सो मध्ये हा चर्चेचा विषय झाला होता, कारण पंधरा वर्षे काम केलेल्या माझ्या बरोबरीच्या लोकांस बढती नव्हती व एस्सोने तर लोकांना कमी करण्याची (Voluntary Retirement) योजना राबिविली होती. तेथे बढती कोठून? पण राघवन ही पुढील एक वर्षांत सेवानिवृत्त होत होते. त्यांच्याच शिफारसी मुळे हे झाले, त्यामुळे पुढील एक वर्ष मी संशोधन प्रयोगशाळेत दाखल होऊन राघवनच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. पण तेथेहि दैव माझी परीक्षा घेणारच होते!

संशोधन प्रयोग शाळेतील काम माझ्या आवडीचे होते. राघवनबरोबर आमची तार  चांगली जुळली होती, त्यामुळे कामांत आनंद होता. त्याचवेळी एस्सोने परदेशांतून तेल आयात करण्याचे कमी करून स्वतःची तेलासाठी एक शुद्धीकरण कारखाना (Lube India) मुंबईतच सुरु केला होता व ही स्थानिक तेले सर्व वंगणात वापरून नवीन फॉर्म्युले तयार करावयाचे होते – ते काम आम्ही करत होतो येथे बनविलेली ही ऑइल स्वस्त होती त्यामुळे कंपनीचे सर्व प्रॉडक्ट्स स्वस्त झाले होते – profit जास्त वाढला होता. या संशोधन विभागात त्यावेळी मी, पद्मनाभ शर्मा व सेतुरामन असे तिघेजण काम करीत होतो. येथील काम खूप गुप्त स्वरूपाचे असते, कारण प्रत्येक कंपनीच्या प्रोडक्टसचा फॉर्म्युला आम्हाला ठाऊक करण्याचा हक्क होता, त्याची खरी किंमत, फायद्याचे मार्जिन, अशी सर्व माहिती असल्याने त्याला खूप महत्व होते. आपापसांतील विश्वास व team work महत्वाचे असते. त्यावेळी एस्सोच्या न्यूजर्सी (New Jersey, USA) येथील मुख्य प्रयोगशाळेशी आमचा संपर्क असे व तेथूनही खूपशी महत्वाची माहिती येई. 

राघवन साहेब असे पर्यंत सेतुरामन – शर्मा यांची माझ्या बरोबरील वागणूक ठीक होती. मात्र वर्षांनंतर राघवांच्या जागी श्री वेणुगोपाल हे गृहस्थ आमचे साहेब झाले. वेणू हा गृहस्थ संशयी, हेकट व मराठी द्वेष्टा होता. त्वरित्च सेतुरामन-शर्मा-वेणू असे त्रिकुट तयार झाले व मी वेगळा पडू लागलो. माझ्यापासून काही लपविले जात आहे, अशी माझी रास्त भावना होऊ लागली. विशेषतः मला वगळण्यांत सेतुरामनचा हात जास्त होता तो माझ्या बरोबरच भरती झाला होता- तरुण होता व महत्वकांक्षी होता. शेवटी ऑफिसमध्ये प्रमोशनची आंस हीच खूप जबरदस्त असते! 

रामनचे वेणूच्या घरी येणेजाणेही होते, असे कळले. तसेच दोघे मिळून काही वैयक्तीक Consulting देखील करीत असावेत व त्याचा पैसा परस्पर वाटून घेत असावेत असाही मला संशय येऊ लागला. कारण लॅब मध्ये येणाऱ्या प्रत्येक सॅम्पलचे टेस्ट होण्यापूर्वी, रजिस्टरमध्ये त्याची नोंद करणे आवश्यक होते व काही सॅम्पलसाठी तसे होत नव्हते. मला यांतले काही कळू नये ह्यासाठी देखील मला अज्ञानात ठेवले जाई! मात्र एक दिवस माझी व्यथा मी वेणुगोपाल यांस सांगितली व त्याचा उलटाच परिणाम झाला! तूच विनाकारण मराठी-मद्रासी असा वाद निर्माण करतो आहेस, असा माझ्यावरच त्यांनी ठपका ठेवला. दर शनिवारी ते ऑफिसातून आमच्या प्रयोगशाळेत माझगावला येऊ लागले व आठवड्याचा माझ्याच कामाचा होशोब घेऊ लागले- हे का नाही केले, ते का नाही केले व सहा महिन्यांनी मला Sr. Officer म्हणून Confirm न करता हा कालखंड त्यांनी १ वर्षाचा केला!

वेणूनी माझा Confirmation पिरियड वाढवून माझे रेकॉर्ड खराब केले. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत, मला लेखी पत्रे पाठवून मी कसा कामात चुकतो वगैरे लिहून माझी फाईल तयार करावयास सुरुवात केली. कोणत्याही कंपनीत अशा प्रकारे वरिष्ठ व कनिष्ठ पत्रोपत्रीस सुरुवात झाल्यास त्यात कनिष्ठांचीच हार होते व एक तर त्याची त्वरीत तेथून बदली करतात वा कंपनीतून हाकलून देतात. रामन-वेणू द्वयींचा हाच बेत असावा. शर्मा या बाबतीती मौन बाळगून असे! परिस्थिती कठीण होती – पुढील सहा महिन्यात Confirm व्हायलाच हवे होते व वेणू तर फाईल बनवीत होता!

आमच्या क्वालिटी कंट्रोल लॅब मध्ये जेथून मी बढती मिळविली होती, तेथे श्री नाडकर्णी नावाचे केमिस्ट होते, व माझे चांगले मित्र झाले होते. एके दिवशी सहज बोलतांना मी त्यांस ही परिस्थिती सांगितली. नाडकर्णी तसे खूप हुशार होते व वरून जरी शांत वाटत असले तरी अशा कामांत खूप रस दाखवून, मदत करता येत असल्यास मदत करीत असत. त्यामुळे टर्मिनल मधील कामगारांतही प्रिय होते! नाडकर्णी दादरला राहत होते व त्याच वेळी ‘शिवसेना’ आकाराला येत होती, ‘मराठी माणसांसाठी’ लढा देण्याचे त्यावेळी निश्चियच शिवसेनेचे ब्रीद होते! नाडकर्णी मला थोडे थांबून म्हणाले “राऊत साहेब माझ्या भावाची व श्री मनोहर जोशींची चांगली ओळख आहे – तो देखील शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. तुमची इच्छा असेल तर एकदा माझ्या भावाशी या बद्दल बोलू या का?” आम्ही एक दिवस दादरला जाऊन त्यांच्या भावाशी बोललो व वेणू कडून होणाऱ्या त्रासाची पूर्ण कल्पना त्याला दिली. त्यानेही मला सहानुभूती दाखविली व म्हणाला, “तुमची तयारी असेल तर आपण आज जाऊ व जोशी सरांना भेटू या का?”

मी विचारात पडलो कारण हे सर्व करण्यांत, एका राजकीय पक्षाकडे माझा प्रश्न नेण्यांत खूपच धोका  होता व ही बातमी जरा कोठे फुटली असती तर मला कोणत्याही चौकशी विना कंपनीतून बडतर्फच केले असते! मात्र पाणी आता डोक्यावरून जायची वेळ आली होती, त्यामुळे मी देखील मागचा – पुढचा विचार न करता ही रिस्क घ्यायचे ठरविले व तडक आम्ही तिघेही श्री जोशी सरांना ‘कोहिनुर टेक्निकल’ मध्ये भेटावयास गेलो. त्यावेळी श्री मनोहर जोशी शिवसेनेचे एक कार्यकर्ते होते व नगरसेवक ही झाले नव्हते. नाडकर्णीनी सर्व परिस्थिती त्यांस सांगितली. शिवसेनेची त्यावेळी दाक्षिणात्य लोकांवर खप्पा मर्जी होती व ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी!’ असे काहिसे शिवसैनिक बोलत असत. जोशी सरांना देखील माझ्या या गोष्टीत तथ्थ वाटले व “येत्या शनिवारी तुम्ही मातोश्रीवर या, मी साहेबांशी तुमची गाठ घालून देतो” असा निर्णय त्यांनी घेऊन टाकला. बापरे, माझी तर पांचावर धारणाच बसली. कोठून या भानगडीत पडलो, बाळासाहेबांस भेटण्यास मातोश्रीवर जाणे मला खूपच भीतीदायक वाटू लागले! पण आता इलाज नव्हता, चक्रव्यूहात शिरलो होतो. आता इसपार या उसपार. पुढील शनिवारी आमची जत्रा मातोश्रीवर हजार झाली – द्वारपालांनी आमची झडती घेऊन आम्हाला हॉल मध्ये बसविले. आणखीन दहा-पंधरा माणसे तेथे आधीच बसली होती. सकाळची वेळ होती. थोड्याच वेळांत बाळासाहेबांचा प्रवेश तेथे झाला, सर्वांनी उठून साहेबांना वाकून हात कपाळाला लावत जोहार केला व खाली बसलो. साहेबांनी उपस्थित पैकी एका जणांकडे बोट दाखविले कि त्यानेच बोलायचे, बाकीच्यांनी गप्प राहायचे व साहेबांनी ‘थांब’ असा हात केला कि सांगणाऱ्याने गप्प राहायचे असे चालले होते. तक्रार ऐकल्यावर साहेबांशी काही तथ्थ दिसले कि ते त्या तक्रार दाराशी कोणत्याही सेनेच्या कार्यकर्त्यांकडे त्याची रवानगी करीत व त्या कार्यकर्त्याने पुढील कारवाई करावी असा आदेश देत. काही तथ्थ न वाटल्यास त्या माणसास बाहेरचा दरवाजा दाखविला जाई. माझा नंबर ही लगेचच आला – जोशी मास्तरांनी सूचना दिल्याप्रमाणे केवळ दोन-तीन मिनिटेच मी वेणुगोपाल, त्याच्या कारवाया, व एस्सो मध्ये नोकरी मिळालेला मी एक विरळा मराठी माणूस या वर जोर देत माझे म्हणणे सांगितले. आणि अचानक साहेबांचा आवाज एकदम धारधार झालेला दिसला. म्हणाले “जोशी मास्टर, बघा हा मुलगा काय म्हणतोय, कोण हा वेणू आहे? त्याची लुंगी सोडा!” 

बापरे पुढील होणाऱ्या घटनांचा अंदाज आम्हाला आला व आम्ही तिघांनीही ही गोष्ट कोणालाही बोलायची नाही अशी शपथ घेतली!

चारच दिवसांनी एस्सोच्या चर्चगेट कार्यालयांत ‘बॉम्बस्फोट’ झाला! दहा-बारा शिवसैनिक सरळ जनरल मॅनेजर श्री. ऑटम नेफ या अमेरिकनच्या ऑफिसात शिरून त्याच्या खिडकीच्या, टेबलाच्या काचा फोडून मराठीत ‘वेणू’ ला शिव्या देऊ लागले! नेफ ना हे काय चालले आहे, कशासाठी हा गोंधळ काहीच समजेना. याला एवढेच कळले कि वेणुगोपाल नांवाच्या एका अधिकाऱ्याशी संबंधित हे प्रकरण आहे व त्याने काहीतरी गोंधळ केला आहे! पंधरा मिनिटांत हे सर्व सैनिक घोषणा देत निघून गेले!

गोळी बरोबर लागली होती व श्री. नेफ कडून वेणूला बोलावणे येऊन त्याने त्याची खूपच कान उघडणी केली – ‘तू काय गोंधळ केला आहेस तो निस्तर!’ असाच दम नेफने त्याला दिला व बहुधा वेणूने त्याचाशी बोलण्यांत माझा संशय ही व्यक्त केला असावा. पण हा अमेरिकन खूपच चाणाक्ष होता. त्याने माझ्या फाईलचा संपूर्ण अभ्यास करून आपली खात्री केली कि माझ्यावर अन्याय झालेला आहे. पुढील आठवड्यांतच मला एक वर्ष होण्याचे होते,  आता with retrospective effect (जेंव्हा माझे सहा महिने पूर्ण झाले होते त्या दिवसापासून) मला Confirm करण्यात आले. सर्व माझगाव मध्ये ह्या ‘स्फोटात’ कोणाचा हात असावा ह्याचा अंदाज होता मात्र कोणाचीही तसे उघड बोलण्याची ताकद नव्हती व वेणूला जरी स्वतःला याची कल्पना होती तरी तो एकदम सरळ सुतासारखा माझ्याशी वागू लागला! मात्र त्याने सापाप्रमाणे माझ्या बद्दल पक्का दुःख धरला होताच. पुढे दोन वर्षांत ‘एस्सो’ची ‘हिंदुस्थान पेट्रोलियम’ होण्याची प्रक्रिया सुरु झाली. नेफ हा अमेरिकन जनरल मॅनेजर परत गेला व त्यावेळी वेणूने माझे रेकॉर्ड चोरून- मारून न बोलता खराब केलेच, त्याचा परिणाम मला या खात्यात जवळजवळ सात वर्षे काढावी लागली! माझ्या ऐन कारकिर्दीमधील खूप मोठा कालखंड वाया गेला व त्याचा परिणाम माझ्या या कंपनीतील पुढील प्रगतीमध्ये झाला मात्र तेव्हा पासून कंपनीतील व विशेषतः माझगांव मधील अधिकारी, मॅनेजर्स, मला शाखा-प्रमुख  म्हणू लागले व काही खोडी काढण्यापासून दूर राहू लागले.  

वेणू हा खरे तर खूप हुशार व्यक्ती होता. एस्सोच्या जगांतील बहुतेक उत्पादन विभागास त्याने भेटी दिल्या होत्या व कंपनीतील लोक त्याला बृहस्पती असेच म्हणत! सेवानिवृत्त झाल्यावरही एक वर्षाचा वाढीव काळ मिळणारा  तो एकमेव मॅनेजर होता. तो आमचा विभाग प्रमुख म्हणून गेल्यावर रामनही सरळ झाला व सुंदरम हे आमचे साहेब झाले. कामही व्यवस्थित सुरु झाले. मात्र एक प्रसंग पुन्हा असा घडला कि तेथेही पुन्हा सत्व परीक्षा झाली! रामन हा देखील काळा नागाचं निघाला.  

वेणुगोपाल गेल्यावर श्री सुंदरम साहेब झाले. सुंदरम वेणूच्या मानाने टेक्निकल विषयांत खूपच मागे होते, अनुभव देखील विशेष नव्हता त्यामुळे साहजिकच रामनने त्यांच्याशी देखील संधान बांधण्याचे सुरु केले. सुरुवातीस थोडे दिवस रामनचे वागणे व्यवस्थित होते, मात्र एकदा का त्याची सुंदरम शी गोत्र जमले, पुन्हा तो मूळ पदावर येऊ लागला व माझ्याशी फटकून वांगे. मी काय करतो यांत जास्त रस घेई. स्वतःचे बुक कडीकुलपांत ठेवी! त्यावर बोलायचे टाळी कधी कधी मला हवी असलेली उपकरणे मुद्दाम स्वतःला हवीत म्हणून दोन-दोन दिवस अडकवून ठेवी! माझा संताप होत असे, पण मी सांभाळून घेई. एक दिवशी कहर झाला – मला तीन दिवसांपासून एक विशिष्ठ मिक्सर हवा होता, त्याने तो दोन दिवस अडवून ठेवला होता – उद्या देतो म्हणून बोलला पण तिसऱ्या दिवशी देखील देईना तेव्हा थोडी बोलाचाली झाली – शब्दावरून शब्द वाढत गेले व एकदम रामन म्हणाला – हा मिक्सर तुझ्या बापाचा आहे का? मी म्हटले – ‘तू काय बोलतोस पुन्हा बोल!

पुन्हा तेच उदगार झाल्यावर माझा सारासार विचारच गेला व फाडकन मी रामनच्या श्रीमुखांत भडकावून दिली. रामन कोलमडला, शेजारील लॅब मधून, मूर्ती, नाथन, ईश्वरन हे त्याचे मित्र काय गडबड आहे पाहण्यास आले. सर्व परिस्थिती मी त्यांस सांगितली माझी चुकी झाली, हे देखील मी मान्य केले रामननेही त्याची प्रथम चुकी मान्य होती. तेव्हा जास्त प्रकरण न वाढवता आम्ही एकमेकांशी हात मिळवले व प्रकरण आता संपले, या समाधानात ४ वाजता मी काम संपवून घरी आलो. 

इकडे नाथन – ईश्वरन, मूर्ती कंपनीचा माझ्यावर ‘मद्रासींद्वेष्टा’ असा वेणूने करून दिलेला समज होताच. त्यांनी सेतुरामनला खूप भरविले व हे प्रकरण तू पुढे घेऊन जा, स्वस्थ काय बसतोस असे चिथविले. तो ही त्यांच्या दबावाला बळी पडला. त्यांनी मुख्य कार्यालयांत सुंदरम साहेबांस मिठ-मसाला लावून या गोष्टींचा त्यांना रिपोर्ट दिला व सुंदरमने रामनला ताबडतोब चर्चगेटला ये असे फर्मावले! माझगाव मधील त्याच्या मित्रांनी त्याची व्यवस्थित वेशभूषा, केशभूषा सजवून कापडे फाडून, केस विस्कटून, अंगावर ग्रीसचे डाग लावून टॅक्सीत घालून त्याला पाठवून दिले. सुंदरामने सगळे ऐकल्यावर त्याला त्याचे साहेब व आम्हा सर्वांचे Dept. Head श्री. जो गोन्सालवीस यांचे कडे रामनला नेऊन त्यांनाही सर्व ‘हकीकत’ सांगितली. त्यांच्या दृष्टीने ही खूपच सिरीयस गोष्ट होती व गोन्सालवीस सुंदरमला त्वरित दुसरे दिवशी माझगावला जाऊन टर्मिनल सुप्रिटेंडन्ट सॅम्युएल व आणखी एक मॅनेजर घेऊन चौकशी करा, त्याचा ताबडतोब रिपोर्ट मला संध्याकाळी द्या, मग मी काय कारवाई करायची ते बघतो, असा आदेश दिला. (म्हणजे हे कोर्टमार्शलच होते)

गंमत म्हणजे दुसरे दिवशी मी व सुंदरम साहेब रिफायनरी मध्ये चेंबूरला जाणार होतो व जवळील एका पेट्रोलपंपावर भेटणार होतो, जेथून सुंदरम मला त्यांच्या गाडीतून पुढे घेऊन जाणार होते. मी सुंदरमच्या गाडीची बिनधास्त मानाने वाट पाहत होतो व मागे घडलेल्या या रामायणाची मला अजिबात कल्पना नव्हती. मी हसून सुंदरमना गुड मॉर्निंग सर केले, पण सुंदरम माझ्याकडे पाहीना – मान फिरवून म्हणाले – ‘आपल्याला रिफायनरीचा कार्यक्रम रद्द करून त्वरित माझगावला जायचे आहे – गाडीत बस!”

तरीही मला कोणतीच कल्पना येईना. रस्त्यात देखील जाताना सुंदरम एक चकार शब्द बोलले नाहीत, त्यामुळे मला थोडा संशय आला व कालचे प्रकरण अजून मिटलेले नाही असे काहीसे वाटू लागले!

माझगांवच्या गेटमध्येच माझे काही सहकारी व इतर अधिकारी तसेच कामगारांस, आज राऊतची चौकशी होणार ही बातमी कळलेली होती व माझे मित्र राऊतचा अवतार आज संपला अशा दृष्टीनेच माझ्याकडे पाहत होती. कारण प्रकरण तेवढे गंभीर होते, जो गोन्सालवीस ह्या अति-जेष्ठ अधिकाऱ्याकडे ते गेले होते!

चौकशीचा फार्सच झाला – सुंदरामनेच तर प्रकरण पुढे नेले होते व दुसरे अधिकारी सुम्युअल हे देखील त्यांचेच भाऊबंद होते. त्यामुळे प्रथम सेतुरामनाची बाजू ऐकली, नंतर माझी व नंतर नाथन, विशवनाथन हे साक्षीदार घेतले दुपारी ही चौकशी संपली व ४ वाजता गुप्त अहवाल श्री. जो यांचे कडे गेला. त्यांत काय निर्णय होता हे उघडच होते, मला त्याची कल्पनाही होती. त्यामुळे संध्याकाळी ५ वाजता जेव्हा, जो यांच्या सेक्रेटरीने मला फोन करून त्वरित चर्चगेटला त्यांचे ऑफिसात बोलावून घेतले तेव्हा मला आश्यर्य वाटले नाही. व मनाच्या पूर्ण तयारीने, मनाशी माझे बचावाचे मुद्दे तयार करूनच गेलो. जो गोन्साल्विस साहेब एक कर्तबगार अधिकारी म्हणून ख्यात होते व त्यांचं मन माझ्या विषयी कलुषित नसल्याने त्यांचेसमोर सर्व गोष्टी व्यवस्थित उघड केल्यास, मला फायदा होणार होता. 

मी जो यांना माझ्या, संशोधन शाळेतील नेमणुकीची पार्श्वभूमी, वेणूगोपाळने दिलेली अन्यायी वागणूक, वेणू-रामन यांचे वैयक्तिक धंदे व माझ्या कामाबद्दल माहिती दिली. मला वाटते जो ना देखील वेणूगोपालचा वाईट अनुभव आला होता व त्यामुळे मी दिलेली माहिती, त्यांचे जवळ असलेल्या माहितीशी कुठेतरी जुळत असावी, त्यामुळे मी काही सांगतोय ते खरे आहे अशी त्यांची खात्री झाली! त्यांनी प्रथम माझी खरडपट्टी काढली खरी, पण शेवटी एवढेच म्हणाले:

“तरुण माणसा (Young man), मी तुला आणखी एक कामाची संधी देतोय, आपले नशीब व आपला साहेब बदलता येत नाही, हे लक्षात ठेव व शांत डोक्याने या पुढे काम कर!” माझ्या पुढील वर्षांत जो. साहेबांचा हा उपदेश मी विसरलो नाही. त्यांचे आभार मानून मी सुंदरम साहेबांच्या केबिन मध्ये आलो. बहुधा मला बडतर्फ केले असावे अशी त्यांची कल्पना होती. पण मी हसतमुखाने आलेलो पाहून त्यांस आश्चर्य वाटले! बळें-बळेंच त्यांनी माझे सांत्वन केले!

अशा रीतीने ही आणखी एक ‘सत्वपरीक्षा’ मी पास झालो. ह्या सर्व गोष्टींनी त्यावेळी मनस्ताप झाला खरा, पण त्यामुळे या कंपनीत पुढे कामगार वर्गाशी काम करताना, त्यांचे दंगे व संप हाताळतांना एक आत्मविश्वास आला व शेवटी फायदाच झाला! त्यामुळे माझगाव व सर्व कंपनीतच ‘राऊत’ ह्या नावाविषयी एक वलय निर्माण झाले; व मी कोठेही भारतातील आमच्या ऑफिसमध्ये कामासाठी दौऱ्यावर गेलो कि लोक – ‘हाच तो माझगांवचा राऊत’ अशा प्रकारे बोलू ही लागले! तसेच काही लोकांची मी कायमची खप्पा मर्जी देखील ओढवून घेतली – सेतुरामन एस्सोची नोकरी सोडून जाईपर्यंत माझ्याशी नीट बोलला नाही, नाथन, ईश्वरन हे देखील थोडेसे लांबच राहत! मात्र ही सर्व माणसे पुढे माझी चांगली मित्र झाली!

वेणूच्या लेखणीच्या फटक्याने त्या वेळेचे माझे CR (confidential report) खराब झाले होते. त्याचा परिणाम या खात्यात मला साडे सात वर्षे राहावे लागले. मध्येच एस्सो गेली, HPCL आली त्याचाही फटका प्रमोशनवर तसेच पगारावर झाला. सरकारी वेतनमान लागू झाले व एकंदरीत सर्व कामाच्या संस्कृतीवर परिणाम झाला. अमेरिकन श्री. नेफ जाऊन श्री. कृष्णमूर्ती (IAS Officer) आय. ए. एस. अधिकारी कंपनीचे चेअरमन म्हणून आले. सात वर्षांनी मला डेप्युटी मॅनेजर म्हणून माझगाव उत्पादन खात्यात बदली झाली!

या संशोधन खात्यात काम करतांना खूपच भ्रमंती करता आली. काश्मीर, पंजाब, हरियाणा, बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, मद्रास, कोचीन, कर्नाटक इ. भारतांतील बहुतेक राज्यांत जेथे जेथे आमचे ग्राहक होते तेथे जाणे झाले. आमची उत्पादने प्रत्यक्ष कशी वापरतात ते पाहता आली. नवीन प्रॉडक्ट्स तयार झाल्यावर त्याची Field Trial कशी घ्यायची याचे ज्ञान झाले व एकंदरीत या पेट्रोलियम लुब्रिकेंट क्षेत्रातील खूपशी माहिती व अनुभव पदरी पडला!

येथे टर्मिनलमध्ये देखील आता बदल झाले होते. Caltex कंपनीचे एस्सोमध्ये विलीनीकरण होऊन ती मंडळी देखील HPCL मध्येच आली होती. त्यामुळे Esso चा माणूस व Caltex चा माणूस कोणता असा नवीन वाद कंपनीमध्ये सुरु झाला होता. व त्याचे दूरगामी परिणाम एकूण कंपनीच्या कामावर होत होते! दोन भिन्न प्रवाह एकत्र आल्याने कामाचे तंत्रच बिघडले होते. राजकारण सुरु झाले होते. श्री प्रभाकर या नावाचे Caltex चे मॅनेजर,  माझगांवचे मुख्य म्हणून आले होते व त्यांनी आपली माणसे जवळ करण्यास सुरुवात केली होती. याच वेळी मी देखील माझगांव उत्पादन विभागांत डेप्युटी मॅनेजर म्हणून त्यांचे काम करण्यास रुजू झालो होतो. शिवसेनेची युनियन आता प्रमुख युनियन होती. राजाभाऊ मागे पडले होते. श्री चंद्रकांत दळवी या युनियनचे नेते होते व ते देखील माझगांव मध्येच कामगार म्हणून काम करीत होते. त्यांचे बंधू सूर्यकांत दळवी हे देखील युनियनचे व शिवसेनेचे कार्यकर्ते होते. पुढे श्री सूर्यकांत रत्नागिरी भागांतून सेनेचे आमदार म्हणून ही निवडून आले!

साधारणतः १९८१-८२ चा हा सुमार होता व आता HPCL जरी एस्सोचा वारसा चालवत होती, तरी विक्रीच्या बाबतीत खूपच मागे पडली होती, कारण इंडियन ऑइल (Indian Oils) ही सरकारी कंपनी आता विक्रीच्या बाबतीत खूपच पुढे गेली होती व सर्व रेल्वे, डिफेन्स इ. सरकारी धंदा इंडियन ऑइल ने काबीज केला होता. उत्पादन कमी झाल्याने कामगारांचे फायदे ही कमी होतात व O.T. च्या संधी ही प्राप्त होत नाहीत, त्यामुळे ही मंडळी देखील दिवसेंदिवस चवताळत होती. त्यांना शिवसेनेसारखे आक्रमक नेतृत्व मिळाले होते त्यामुळे उत्पादन विभागांत कामगारांसोबत काम करणे कठीण होत होते! श्री. प्रभाकर सारखा माझगांव मध्ये कधीच काम न केलेला मुख्य आम्हास लाभला होता. माणूस सरळ व प्रामाणिक होता पण कामगारांचे तंटे हाताळण्यास अयोग्य होता. माझी उत्पादन खात्यात नेमणूक झाल्या बरोबर प्रभाकनने जाहीर केले कि कामगारांचे जे काही कामाचे बाबतीं गाऱ्हाणी असतील ती राऊतांकडे न्यावीत. त्यावेळी श्री मराठे नावाचे माझगांवचे लेबर ऑफिसर होते. त्यांना प्रभाकरन ही सूचना केल्याने दळवी आणि कंपनी पुढे प्रश्नासाठी मराठे बरोबर माझ्याकडे येऊ लागली, त्यामुळे उत्पादनाची टार्गेटस साधतांना आणखी एक नवी कटकट माझ्या मागे लागली!

श्री. प्रभाकरन यांनी जरी लेबर प्रॉब्लेम मी व मराठे यावर सोपविले होते तरी कधी कधी आमचा निर्णय अमान्य झाल्याने कामगार मंडळी प्रभाकरन साहेबांच्या केबिन मध्ये घुसत. कामगार हे कधी एकटे-दुकटे नसत तर झुंडच्या झुंड साहेबांच्या केबिन मध्ये शिरे. प्रभाकरन साहेबांना हा अनुभव खूप नवीन होता. Caltex चे कामगार खूपच आज्ञाधारक होते त्यामुळे माझगांवचा हा दुर्वास अवतार त्यांस सहन करण्यापलीकडे होता. अशावेळी त्यांच्या अंगास कंप सुटे व ते मोठमोठ्याने बेतालपणे कामगारांच्या अंगावर ओरडत. कामगारांसही मॅनेजरचा कच्चा दुवा काळाला कि ते मुद्दामच त्यावर हल्ला करतात. यामुळे कामगार प्रभाकरनच्या केबिन मध्ये मोठ्या संख्येनेच आरडा ओरडा करीतच घुसत व कधी कधी नुसतेच साहेबांशी हैराण करण्यासाठी हे होई! प्रभाकरन स्वतः कधीच कोणता निर्णय घेत नसत. अशा प्रसंगाने मोठ्या ऑफिसांतून I.R. Manager ला बोलावून घेत व शेवटी तो निर्णय देई तो मान्य करीत. वास्तविक I.R. Manager देखील कामगारांचे म्हणणे बहुतांश मान्यच करीत असे व प्रश्न सोडविल्याचे श्रेय आपल्याकडे घेत असे. पण प्रभाकरन ते समजत नसे व त्यामुळे कामगारांच्या दृष्टिकोनांतून प्रभाकरन हे एक प्रभावहीन साहेब ठरले! त्याचा त्रास आम्हा उत्पादन विभागांत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांस होई! कामगार आम्हाला जुमानीत नसत. 

मला ग्रीस प्लांट मध्ये काम दिले होते. मी ह्या विभागाचा मुख्य होतो. सोबत पाच अधिकारी होते व सुमारे ८० कामगार होते, तीन पाळ्यांत हे काम चाले. येथे ग्रीस व काही स्पेशल ऑईल्स यांचे उत्पादन होई. त्यावेळी ‘Greese making is a art and not a science’ असे म्हणत, आजही म्हणतात. त्यामुळे फॉर्म्युला तोच असला तरी कधी ग्रीस चांगले होईल व कधी एखादी बॅच नापास होईल, हे कोणीच सांगू शकत नसे. ग्रीस तयार करण्यासाठी ग्रीस मेकर नावाचा एक कामगार असे व सर्वस्वी त्याच्या कौशल्यावर अवलंबून राहावे लागे. मात्र कितीही म्हटले तरी शेवटी त्यांतही शास्त्र होतेच व आपण स्वतः नीट लक्षपूर्वक जर प्रॉसेस पहिली, तर निश्चितच नापास बॅच ची संख्या कमी करता येईल हे माझ्या लक्षात आले. त्या प्रमाणे मी काही Procedure (पद्धती) ठरवून ती प्रत्येक प्रकारच्या ग्रीससाठी कशी वापरावी हे लिहून काढले व कोणत्या वेळी काम तपासावे याचे Standard ठरविले. त्यामुळे सुमारे ९५% बॅचेस पास होऊ लागल्या, जे पुर्वी  प्रमाण फक्त ६०% होते! त्यामुळे कंपनीची Proccessing Cost कमी झाली व कामगारांवरील अवलंबित्व ही कमी झाले. त्यामुळे काही कामगार मंडळी नाराज झाली. कारण एखादी बॅच नापास झाली कि त्याचे O.T. व इतर फायदे मिळविण्याची संधी कमी होत असे. 

त्यावेळी एक कामगार, ग्रीस प्लांटच्या कामगारांचे नेते होते. वास्तविक श्री. चंदू दळवी हे माझगावच्या कामगारांचे नेते (Union Leader) होते, पण ह्या ग्रीस प्लांट च्या नेत्याने  युनियन अंतर्गत आपला वेगळाच ‘सुभा’ थाटला होता. व ग्रीस प्लांटच्या लोकांस आपण कसे जास्त फायदे मिळवून देतो, हे इतर विभागांच्या कामगारांस दाखवून देऊन, नेतृत्व आपणांकडे खेचावे हा डाव होता. पण त्यांत ग्रीस प्लांटचा मॅनेजर म्हणून मला खूप त्रास होत असे. रोज सकाळी मी प्लांट मध्ये शिरलो कि हा गृहस्थ ३-४ कामगारांस घेऊन काही तरी नवीन मागणी घेऊन हजार असे. खूप कठोर शब्दात तो मला बोलत असे, व शेवटी मागणी मान्य होत नाही असे पाहिल्यावर – ‘तुम्हा मराठी अधिकाऱ्यांचा आम्हाला काय उपयोग? यापेक्षा हे बिगर मराठीच बरे!’ असे हे बोलून डिवचण्याचा प्रयत्न करी. त्याचा हा डाव श्री. दळवी यांचा लक्षात आला होता, त्यामुळे त्यांची मदत घेऊनच मी ह्याचा बंदोबस्त करण्याचे ठरविले. व त्याचा अभ्यास करू लागलो. हा ग्रीस पंत चा स्थानिक नेता, नेहमी रात्रौ ११ ते सकाळी ७ या पाळीत येई. त्याने ही पाळी कायमची निवडली होती. रात्रौ खूप विश्रांती घेई, झोपे व प्रोडक्शन मात्र होत नसे. मी हा प्रकार प्रभाकरन साहेबांना सांगितला व मी गृहस्थाला तिन्ही पाळ्यांत मध्ये आणीत आहे – तुम्ही यात ढवळाढवळ करू नका असे ही बजावले. कामगार नेतृत्वाच्या कानावर ही गोष्ट घातली. हे सांगितल्यावर हा ‘पुढारी’ भडकलाच! गेली एवढी वर्षे मला कोणी पाळी बदल सांगितले नाही – आता तुम्ही तसे का करता वगैरे म्हणू लागला! मात्र कामगार कायद्याप्रमाणे सुद्धा एखाद्या कामगाराला कायम रात्र पाळी देणे चूक आहे, गुन्हा आहे हे त्यास सांगितले तेव्हा गप्प झाला व जास्त आढेवेढे न घेता सरळ तिन्ही पाळ्या करू लागला. त्यामुळे त्याची सामाजिक कार्ये बंद झाली व राऊत साहेबांशी उगीच पंगा  घेऊ नये  हे धोरणही त्याने अंगीकारले! त्यामुळे इतर कामगारांवर ही वचक निर्माण झाला. 

या ग्रीस व स्पेशल ऑइल विभागांत काही खूप कुशल कामगार होते. एखादे कठीण ग्रीस वा ऑइल बनविण्यांत, एवढ्या वर्षांच्या अनुभवामुळे त्यांचा हातखंडा होता! श्री. अंद्राडे, मामा पिल्ले, सावंत, नायर हे ग्रीस मेकर तसेच कुंजू, जनक, चोरस हे स्पेशल ऑइल बनविणारे माझ्या लक्षात आहेत!

मामा पिल्ले हा तर एवढा तरबेज होता कि तयार होणाऱ्या ग्रीसची आम्ल वा अल्कली गुणधर्म तपासण्यासाठी त्याला केमिस्टची गरज नसे. ग्रीस केटल (Kettle) मधून थोडासा अंश घेऊन तो जिभेवर विशिष्ट प्रकारे ठेवी व त्वरित सांगे यांत एवढे ऍसिड वा अल्कली टाका! तसेच एखादे ग्रीस किती घट्ट वा पातळ आहे हे पाहण्यासाठी आम्ही टेस्ट घेत असू व त्याला तासभर जाई. मामा एक छोटीशी ग्रीसची गोळी बनवून ती समोरच्या भिंतीवर एका विशिष्ट अंतरावरून फेकी व त्याच्या सपाट होण्यावरून ग्रीस किती युनिट्स घट्ट आहे हे बरोबर सांगे!

स्पेशल तेल विभागांतील काम तर याहून अवघड असे. कारण येथे तयार होणारे काही प्रॉडक्ट्स पाण्यांत संपूर्ण विरघळावे लागत व त्यामुळे येथेही कामगारांचे कसब जास्त महत्वाचे असे. नुसत्या फॉर्म्युल्याप्रमाणे सर्व घटक टाकूनही काही वेळा Product ‘Off-spec’ होई. कुंजू, नायर ही मंडळी फारशी शिकलेली नव्हती पण अनुभवाने त्यांना हे बरोबर जमत असे व ह्या लोकांनी केलेल्या बॅचेस बरोबर येत. तोच फॉर्म्युला इतर कोणी वापरून प्रॉडक्ट्स बनविल्यास तो खराब होई! येथे रसायन शास्त्राचे ज्ञान आवश्यक होते!

कधी कधी या विभागात गमती होत, जराही तांत्रिक ज्ञान नसलेले साहेब लोक आपले ज्ञान दाखवीण्यासाठी काही तरी बोलत व आपले हंसे करून घेत! असेच एकदा एक टर्मिनल सुप्रिटेंडन्ट ग्रीस प्लांटला भेट देण्यासाठी सकाळच्या वेळी आले. काही kettles बंद होत्या, कारण विजेच्या तीन फेज वर चालणारी ही साधने, एक फेज मिळत नसल्याने चालत नव्हती. 

मॅनेजर साहेबांनी प्लांट का बंद आहे म्हणून विचारले तर आम्ही सांगितले- ‘सर एक फेज मिळत नाही आहे!

अरे जरा नीट शोध, खाली बघा, कपाटे शोध कोठेतरी ठेवली गेली असेल तो मिळेल!”- साहेब!

सर्व उपस्थितांस खूप हसू आले होते पण ते दाबत आम्ही त्यांच्या आज्ञेप्रमाणे फेज शोधण्यास पळालो!

ग्रीस नंतर ब्लेंडिंग विभागातही मला वर्षभर काम मिळाले. ह्या प्लांट मध्ये विशेष कसब लागत नसे, मात्र कामाचा पसारा मोठा होता. ग्रीसमध्ये दिवसाला १००-२०० ड्रम निघत, तर येथे एका पाळीत १५०० ड्रम निघत. त्यामुळे येथे ही ड्राइवर लोकांशी संबंध जास्त येई – पण तो प्रॉब्लेम आता नव्हता श्री. शिरोडकर नावाचे ऑफिसर माझे सहाय्यक होते व त्यांचे या बाबतीत ज्ञान व कामगारांशी संबंध चांगले असल्याने काही प्रॉब्लेम आला नाही! येथे मोटारगाड्यांसाठी तसेच विविध कारखान्यांत लागणारी हॅड्रोलिक ऑइल, गिअर ऑइल या प्रकारची वंगणे तयार होत! एकावेळी दोन-दोन हज्जार ड्रमची बॅच तयार होई, त्यामुळे खूप सावध राहावे लागे.

अधून मधून टँकर ड्युटी देखील सुरु झाली होती. त्यामुळे बंदराची हवा खाऊन येत असू. मात्र चोवीस तास ड्युटी करण्याची पाळी आली नाही! लहान-सहन तंटे कामगारांबरोबर चालूच असत, पण त्यांत आता विशेष काही वाटत नसे. प्रभाकर साहेब प्लांटमध्ये एक फेरी मारून जाई व सर्व ठीक ठाक चाललेले पाहून समाधानी होऊन परत जाई! जास्त ढवळाढवळ करीत नसे. मात्र आमचे दुसरे साहेब (नं. २) उगीच ढवळाढवळ करीत व चांगले चाललेले काम त्यांचे मुळे कधी कधी बंद होत असे! ही त्यांची सवयच झाली होती. त्यांना प्रभाकरन ची जागा हवी होती! पण ते काही त्यांना जमले नाही. 

माझगांव मध्ये प्रमुख मॅनेजरची जागा मिळावी ह्यासाठी  काही लोक प्रयत्नशील असत त्यांतील एक म्हणजे हे गृहस्थ होय. वास्तविक माझगांव मध्ये काम करण्यास बहुतांशी लोक नाखूष असतांना, ह्यांना इतके आकर्षण का वाटत असावे? त्यांची पैसा हाच देव मानण्याची वृत्ती पाहिल्यानंतर त्यातील ‘इंगीत’  कळणे सोपे होते. आणि मी जेव्हा त्या माझगांवचा पुढे Chief Manager झालो, त्यावेळी सर्व गोष्टींचा  व्यवस्थित उलगडा झाला!

ऑफिसर लोकांस माझगांव मधील सर्वांत डोकेदुखीची ड्युटी म्हणजे टँकर ड्युटी असे. माझ्या पहिल्या दिवसाचा वृत्तांत या डूटीचेच नशीब आहे! मात्र ही ड्युटी काही लोकांस विशेषतः ट्रक वाहतूकदारांस हवीशी वाटे व ते येणाऱ्या टँकरची वाट बघत असत, का ते वर आले आहे!

डेप्युटी मॅनेजर असतानांही मला ही ड्युटी करावी लागली, मात्र त्यावेळी गोदी ऐवजी माझगांव फॅक्टरीतच रहावे लागे. येणारे तेल तपासून घेऊन टाक्यांत साठवण्याचे हे काम असे. त्यामुळे येथे थोडी विश्रांती मिळे! त्यावेळी एक मजेशीर घडलेला प्रसंग सांगण्यासारखा आहे:

त्या दिवाशी रात्र पाळीसाठी मी ड्युटीवर होतो व माझे सहकारी श्री. पंड्या हे देखील मज बरोबरच कामाला होते. आठ-दहा ट्रक एके वेळी येत व ते रिकामी झाले कि पुढे अर्धा पाऊण तास विश्रांती मिळे! असेच चहाचे झुरके घेत आम्ही वेअर हाऊस मध्ये टेबल खुर्चीवर पाय पसरून पडलो होतो. तेथे एक गोष्ट सांगितली पाहिजे कि, माझगांवच्या वेअर-हाऊस संबंधी एक दांत कथा तेथे प्रचलित आहे. कोण्यातरी युरोपियन टर्मिनल सुप्रिटेंडेंट साहेबांचे भूत कधीतरी सफेद ड्रेस मध्ये रात्रीच्या वेळी वेअर-हाऊस मध्ये दिसते!  हे वेअर हाऊस प्रचंड मोठे असून ड्रम-डबे साठवून ठेवलेलले असल्याने खूप अडगळीचे ही आहे. काही ठिकाणी दिवसासुद्धा प्रकाश नसतो, तर रात्री काय? त्यामुळे सहसा एकटा माणूस येथे रात्री फिरकत नाही! मी आणि पंड्या दोघेजण असल्याने निर्धास्त होतो. पंड्यांची झोप अनावर होऊन ते थोडाच वेळात घोरू लागले. व त्या नादब्रम्हामुळे मला जाग येऊन मी आपला गाड्यांची (टँकर) वाट बघत बसलो! काही वेळाने बुटांचे आवाज येऊ लागले, मला वाटले, कोणी कामगार काही सांगावयास येत असेल! परंतु पटकन ड्रमच्या पलीकडे आमचे प्रभाकरन साहेब माझ्या समोर त्यांच्या रात्रीच्या नाईट ड्रेस मध्ये, पायघोळ गाऊन घालून माझ्या टेबलासमोर कधी आले ते कळलेच नाही . मी देखील चपापलो होतो. भुताची देखील क्षणभर जाणीव झाली! मात्र या गडबडीत पांड्याला जागे करण्याचे राहून गेले! प्रभाकरन साहेबाचा पारा पांड्याचे घोरणे ऐकून वर गेला व मोठ्ठ्याने त्यांनी ‘Mr. Pandya, What is this?’ असे काहीतरी जोराने म्हटले! पंड्याने क्षणमात्र डोळे उघडून पाहिले आणि सफेद पायघोळ गाऊन मधील प्रभाकनला न ओळखून – ते त्या अमेरिकन साहेबांचे भूतच समोर आहे असे त्याला वाटले असावे – मागचा पुढचा विचार न करता त्या अर्धवट झोपलेल्या अवस्थेत पंड्यासाहेब विरुद्ध दिशेने धूम पळत सुटले! त्यांना समजावून आणून पुन्हा प्रभाकरन समोर उभे करतांना आमची ही त्रेधा उडाली. मात्र या नंतर पंड्यांचा जो चेहरा पडला तो खूप दिवस कारण कामगारांनी ही गोष्ट अर्थातच षट्कर्णी केली होती! अजूनही पळणारा पंड्या आणि त्याच्या मागे त्याला धीर देत धावणारे दोघे कामगार असे चित्र डोळ्यासमोर दिसून खूप हसू येते. 

माझगांवची ही टँकर ड्युटी लक्षात राहण्यासाठी आणखी एक व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली पाहिजे, ते म्हणजे जॉन ड्रायव्हर! त्यावेळी आम्हा ऑफिसर लोकांना कंपनीच्या जीप मधून – गोदी- फॅक्टरी – कस्टम ऑफिस इ. ठिकाणी फिरविणारा हा जॉन, खरे तर टर्मिनल सुप्रीटेंडेंट चा ड्रायव्हर होता. व असे अनेक मोठे साहेब त्याच्या हात खालून गेले होते! रात्रीच्या वेळी कधी निवांतपणे गोदीमध्ये- फॅक्टरीमध्ये बसलेले असू त्यावेळी अगदी गोऱ्या साहेबांपासून ते अगदी परवाच्या जॉर्डन साहेबांपर्यंत सर्वांच्या सुरस व सरस कथा तो मोठ्या चवीष्ठपणे सांगे. होता मद्रास-देशीय पण हिंदी उत्कृष्ट बोले व अंगी नाना कला बाळगून होता! मुंबई गोदीचे त्याला संपूर्ण ज्ञान होते व एवढे वर्षांच्या कामामुळे गोदीचा कोपरा आणि कोपरा, तसेच कित्येक जुन्या गोदी ऑफीसरांशी ही ओळख होती! गोदीतील कोणत्या डॉक मध्ये काय माल गोदामात पडला आहे, हे देखील त्याला माहीत असे, त्यामुळे त्यावेळी जॉनच्या कृपेने उत्कृष्ठ खजूर, बदाम, पिस्ते असा नाश्ता आम्हाला रात्रीच्या वेळी होई! कारण अशा मालाची लूट प्रथम तेथील कर्मचारीच करत व नंतर त्यांना ओळखणारे जॉन सारखे लोक! एकदा एक लोकरी कपड्यांची ऑर्डर एका गोदामात पडली होती व सर्व उत्तम कपड्याची काही गाठोडी फोडून लोक खुशाल उंची स्वेटर पायपुसण्याप्रमाणे अंगावर लादून घेऊन चालले होते. जॉन मला घेऊन तेथे गेला व पाच-सहा उत्तम स्वेटर काढून दिले. खरे तर मी घाबरलो, बाहेर माल काढतांना कोणी विचारले तर? पण जॉनने तो ही प्रश्न सोडवून, व्यवस्थित जीपमध्ये हा माल कोंबला व अगदी घरापर्यंत पोहचविला. मी फक्त दोन स्वेटर्स घेतले होते. जॉन नंतर वर्षांत सेवानिवृत्त झाला व त्यानंतरही माझ्याकडे नवीन वर्षांची डायरी घेण्यासाठी येत असे. माझगांवमध्ये अशा अनेक वल्ली त्यावेळी होत्या, सर्वांबद्दल लिहायला गेल्यास ते खूपच होईल! बबन गुरव हा कँटीनचा कुक, देवका मुकादम हा बिल्डींगमधील मुकादम, तात्या सावंत हे टाईम-कीपर व अशी अनेकजण. 

ह्या सर्वांमुळे येथील पहिल्या चौदा वर्षाचा कालखंड कोठेही कटुता न येत काढता आला! हा एक विक्रमच होता व त्यामुळे माझे नावं ही माझगांवशी संबंधित झाले ते कायमचेच! राऊत म्हणजे ‘माझगांवचा राऊत’ असेच कंपनीत समीकरण झाले होते. एका दृष्ठीने ते ठीकही झाले, पण दुसऱ्या दृष्टीने माझा कंपनीतील विकास जेवढा व्हावा तेवढा होऊ शकला नाही. कारण मला मार्केटिंग विभागाचा अनुभव त्यावेळी घेता आला नाही व मार्केटिंग मध्ये, रिजनल ऑफिसात तुम्ही काम केल्याशिवाय तुमची General Manager च्या पुढील पदोन्नती होऊ शकत नाही असा अलिखित नियम होता!

मात्र या कालखंडात अनुभवाच्या दृष्टीने खूपच मिळाले, सर्व उत्पादन केंद्रे फिरता आली, क्वालिटी कंट्रोल, संशोधन, वेअर हाऊस, टँकर ड्युटी, इ. एका ऑपेरेशन मॅनेजरला हवा असलेला सर्व अनुभव पदरी पडला. जो पुढे खूप उपयोगास आला. संशोधन विभागांत असतांना खूप फिरता आले व आमच्या ग्राहकांशी संबंध आला. 

माझे हे प्लांट मधील काम चांगलेच झाले होते – व प्रभाकरन हे देखील सरळ गृहस्थ होते. माझा मागचा वेणुगोपाल रेकॉर्ड न पाहता मला पुढील प्रमोशन माझगांव मध्ये मिळाले! तीन वर्षांत ही बढती मिळाली होती व मी आता हिंदुस्थान भवन मध्ये ‘Technical Services’ ह्या खात्यात, मार्केटिंग विभागात जाणार होतो. प्रत्यक्ष रिजनल ऑफिस मध्ये मार्केटिंग मिळाले नाही, तरी तेथे थोडा तरी मार्केटिंगचा अनुभव मिळणार होता! माझ्या या बढती मागे प्रभाकरन साहेबांचा चांगला रिपोर्ट तर होताच पण त्यावेळी आमच्या विभागाचे प्रमुख म्हणून आलेले श्री. लोटलीकर साहेब हे देखील कारणीभूत होते! लोटलीकर हे एक अत्यंत हुशार, निस्पृह व एस्सोचे जुने अधिकारी होते व माझे हे प्रमोशन झाल्यावर त्यांनी मला खास ऑफिसात बोलावून घेणं काही Confidential गोष्टी सांगितल्या होत्या. त्याचमुळे श्री. वेणुगोपाल यांनी माझया वैयक्तिक फायलीत काही शेरे मारून माझे रेकॉर्ड कसे खराब केले व मला संशोधन खात्यात आठ वर्षे का काढावी लागली याचा मला थोडा उलगडा झाला. त्या वेळी लोटलीकर साहेबांनी कंपनीत काम करतांना ‘तुमचा साहेब देव आहे, ही भावना ठेवायची व त्याने माझे पाय दाबून दे सांगितले तरी, मनांत शिव्या देत त्यावेळी ते काम करून टाकायचे!’ असा मौलिक सल्ला दिला होता. श्री. लोटलीकरांनी मला तसे कधी करावयास लावले नाही, परंतु केवळ माझ्या बद्दलच्या सदिच्छे पोटी व माझे सर्व रेकॉर्ड, काम पाहूनच त्यांनी माझ्या प्रमोशनसाठी पुढाकार घेतला होता, हे मला नंतर कळले!

मी नेहमी मानतो त्याप्रमाणे अगदी भिन्न ठिकाणची माणसे या कालखंडात भेटली व त्यामुळे मी कंपनीत राहतो कि जातो या मनःस्थितीतुन दोन बढत्या घेऊन १४ वर्षांचा “वनवास” काढून कंपनीच्या मुख्य मार्केटिंग विभागात येऊन दाखल झालो! मात्र पुढेही मला माझगांवला यायचे आहे, हे तेव्हा माहीत नव्हते!