“निरोप कसला माझा घेता?” श्रीमती कल्पलता प्रमोद चुरी

 परवा, दिनांक 3 मार्च शुक्रवार रोजी विलास बंधूंचा फोन सकाळी खणखणला. नेहमीच्या खर्जातील आवाजााऐवजी सौम्य आवाजातील “दिगंबरजी” हा पहिलाच शब्द ज्या गंभीरतेने त्यांनी उच्चारला तो ऐकून मी थोडा धास्तावलो…पुढे त्यांनी जे सांगितले ते ते ऐकून पायाखालची जमीन सरकली मी कसाबसा खुर्चीत बसलो.. जे ऐकले ते खरंच वाटेना…” आपल्या कल्पलता ताई सकाळी गेल्या” एवढेच ते म्हणाले. पुढेही आमचे थोडे संभाषण झाले मात्र आम्ही काय बोललो ते तेव्हाही कळत नव्हते, आजही आठवत नाही. त्या सून्न अवस्थेत  मी किती वेळ बसून राहिलो माहित नाही… कल्पलताताई गेल्या.. आजही खरंच वाटत नाही

  “काळ कठोर आहे”, “मानवी जीवन क्षणभंगुर आहे”, “जीवन म्हणजे एक बुडबुडा”, हे सर्व ऐकले होते. आजवरच्या आयुष्यात अनेकदा प्रत्यंतरेही आली होती, मात्र या बातमीने त्या सर्वावर मात करून माझा विश्वास उध्वस्त केला होता! केवळ दीड-एक महिन्यापूर्वी मित्रवर्य प्रमोद चुुरी यांचे निधन होते काय, आत्ताच कुठे त्या धक्क्यातून सावरून लताताई आपले कौटुंबिक व सामाजिक जीवन पुन्हा सुरू करू पाहतात काय, आपल्या लाडक्या कन्येेकडे थोडे दिवस जाऊन दुःख विसरण्याचा प्रयत्न करून पुन्हा मुंबईत येतात काय आणि त्याच रात्री या मर्त्य जगालाच अलविदा करून अंतर्धान पावतात.. काय सारेच विलक्षण ,चक्रावून टाकणारे !! अहमदाबाद येथे जाण्यापूर्वी त्यांनी फोन करून मला सांगितले होते. मी देखील “आता नातवंडात खूप दिवस राहा”, अशी विनंती त्यांना केली होती. मात्र त्या  मुंबईत आल्या कधी हे ज्या दिवशी कळले त्याआधीची रात्र ही काळरात्र ठरली होती! सारे अतर्क्य, अगम्य, मानवी जीवनाचे फोलपण पुन्हा एकदा अधोरेखीत करणारे!!

      14 जानेवारी 2023 रोजी प्रमोदच्या अंत्यदर्शनास गेलो असताना मला लताताई दुःखातही सावरलेल्या दिसल्या. त्यानंतर कित्येकवेळा फोनवर बोलणे झाले, त्याही वेळेस त्या अगदी नाॅर्मल वाटल्या. केळवे येथील शोकसभेत व्यासपीठावर बसलेल्या लताताई, त्यानंतर निरोप घेतांना पाणवलेल्या डोळ्यांनी नमस्कार करणाऱ्या लताताई कणखरपणे पुन्हा उभारी घेत आहेत असे वाटले. तेच त्यांचे अखेरचे दर्शन ठरले!!.

      आज वाटते, तो त्यांचा खरा कणखरपणा होता काय? की मनाच्या उभारीचा केवळ आभास होता ? प्रिय पतीच्या विरहाने खचल्या होत्या परंतु तसे दाखविणे त्यांच्या आजवर जपलेल्या प्रतिमेला कुठेतरी छेद देत असल्याने, त्यांनी अंतःकरणातील वेदना दाबून ठेऊन, “मी ठीक आहे” असा देखावा केला होता ? कोणीच नक्की सांगू शकणार नाही. मात्र प्रमोद व लताताईंचे एकमेकांवरील अवलंबन व उभयतांचे भावनिक अद्वैत मला काही प्रसंगातून खूप जवळून पहावयास मिळाले होते. त्यावरून मला वाटते  आपल्या सहचराच्या दीर्घवियोगाची कल्पनाच त्या सहन करू शकत नव्हत्या. तसे सांगत नव्हत्या, दाखवत नव्हत्या, मात्र ती मनोवेदना त्यांना सतत एकाकीपणाची जाणीव करून देत असावी.. मनातले असे ताण-तणाव प्रमाणााबाहेर साठले,  त्याचा निचरा झाला नाही, नकारात्मक उर्जेला वाट न मिळता ती वाढत गेली तर रक्तदाबासारख्या विकारांना आमंत्रण ठरते, असे आपले वैद्यकर-शास्त्र म्हणते. कधीकधी मनसोक्त रडणेदेखील मनःशांतीवर औषध असते… पण आता हे सर्व सांगून काय उपयोग ?व्हायचे ते होऊन गेले. लताताई  आपल्या प्रिय पतीला भेटण्यासाठी निघून गेल्या .  

कल्पलताताईंच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या दोन महान व्यक्ती. डावीकडे: कै. प्राचार्य आत्माराम पंत सावे. ऊजवीकडे: पू.कै.अण्णासाहेब वर्तक 

    कल्पलता प्रमोद चुरी माझ्यासाठी लताताई ! प्रसिद्ध वर्तक घराण्यातील एक वलयांकित व्यक्ती !खरे तर या  वर्तकांच्या घरातील व्यक्तीला जरी समाजातील प्रत्येक व्यक्ती माहीत नसली तरी समाजातील प्रत्येकाला  या  घराण्यातील प्रत्येकाची  माहीती असते .समाज संस्थापक पूज्य अण्णासाहेब वर्तकाांपासून ते आजतागायत प्रत्येकाने  समाजासाठी काही ना काही योगदान दिले आहे. . कल्पलताताई  तरी त्याला कशा अपवाद ठरतील?लताताईंना तर त्यांच्या वडिलांकडील(वर्तक) आणि आईकडून (सावे) अशा दोन्ही घराण्याकडून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय सेवेचा वारसा होता. प्रमोद चुरी हे माझे  मित्र, त्यांच्याशी विवाह झाल्यापासून माझा त्यांच्याशी जवळून वैयक्तिक परिचय झाला. पुढे 1993 साली त्या आमच्या समाजाच्या स्थायीसमिती सदस्य  झाल्यानंतर, मी ही त्यावेळी समाजसेवेत थोडा कार्यरत असल्याने ,त्यांचे काम मला जवळून पाहता आले. विशेषतः 1996 ते 2005 अशी नऊ वर्षे लताताई आमच्या संघाच्या चिटणीसपदाची धुरा सांभाळत असताना, मीदेखील त्या कालखंडात(2002-2005) सो क्ष संघघ फंड ट्रस्टच्या विश्वस्त पदावर असताना त्यांच्या कामाची तडफ मला दिसून आली. पुढे त्या आमच्या संघाच्या उपाध्यक्ष झाल्या(2005-2008). त्या संपूर्ण काळात मी कार्यकारी विश्वस्त होतो. त्यांचे यजमान श्री. प्रमोद चुरी मुख्य विश्वस्त होते. जवळजवळ आठ वर्षे आम्ही सोक्षसंघात  एकत्र काम केले . तो खूप आनंदाचा व समाजाच्या उर्जेतावस्थेचा कालखंड होता. आम्ही त्या काळाचे साक्षीदार होऊ शकलो हे आमचे भाग्य. लताताईंच्या कामाची पद्धत व समाज बांधवांची विशेषतः समाज भगिनींची त्यांना असलेली तळमळ मी जवळून पाहिली. समाज महिला मंडळाच्या सल्लागार म्हणून त्यांची कारकीर्द याची साक्ष देते. संघ फंड ट्रस्टच्या विश्वस्तपदी, 2014 ते 2023 या कालखंडासाठी त्यांची नेमणूक झाली होती. त्या पदाचा कालखंड अजूनही थोडा बाकी आहे. त्या आधीच त्या आपल्यातून निघून गेल्या. 

मातोश्री कै. तारामाई वर्तक यांचे नंतर विश्वस्त पद भूषविणाऱ्या समाजातील केवळ दुसऱ्या महिला,कल्पलता ताई!

    1993ते 2023,सतत 30 वर्षे एका महिलेने आपला संसार,, आपल्या समाजाभिमुख पतीचा उद्योगव्यवसाय व आपल्या कर्तबगार मुलांची शैक्षणिक ध्येयपूर्ती करण्यासाठी, आई म्हणून करावी लागणारी धडपड,अशी तारेवरची कसरत करीत प्रत्येक आघाडीवर यश मिळवून दाखविले, समाजाची ही वाहवा मिळविली, त्या माऊलीची धन्य होय!.

पती प्रमोद सह  कल्पलता ताई एका निवांत क्षणी.

 .  एवढे करूनही आपल्या कामाबद्दल ,आपल्या यशाबद्दल आपल्या मुलांच्या असामान्य यशाबद्दल कोणताही गवगवा न करता, सर्वांचे प्रसन्न व सुहास्यवदनाने स्वागत करण्याची त्यांची जीवनशैली केवळ एकमेव होती.सार्वजनिक वा सामाजिक आयुष्यात कोठेही आपले मत मांडण्याचा प्रसंग आल्यास ते शांतपणे पटवून देण्याची त्यांची हातोटी ही केवळ अप्रतिम!! कधीही त्यांनी आकांड तांडव केल्याचे वा विरोधी मत मांडणाऱ्या ला दुखविल्याचे, माझ्या एवढ्या वर्षाच्या सहवासात मी पाहिले नाही..  गुजरातमध्ये भरूच येथे प्रमोदजीचे वास्तव्य असताना मुंबईतील वांद्रे येथे रोटरी क्लबच्या सदस्या म्हणूनही त्यांनीी तितक्याच आत्मीयतेने योगदान दिले केवळ खानदानी समाजसेविकाच  एवढी अवधाने सांभाळू शकते.

     स्थायीसमिती सदस्य ते संघचिटणीस, संघउपाध्यक्षा, महिला समिती सल्लागार व विश्वस्त अशा तीस वर्षाच्या दीर्घ, तरीही उज्वल कालखंडात आज आमच्या समाजात सुरू असलेल्या प्रत्येक चळवळीत व उपक्रमात त्यांचा प्रामुख्याने हातभार होता हे नमूद करावे लागेल.. विश्वस्त म्हणून त्या समाजातील केवळ दुसऱ्या महिला.. पती-पत्नी उभयतांनी विश्वस्त पदाचा बहुमान मिळवणारी प्रमोद चुरी – कल्पलता चुरी ही पहिली जोडी. श्रीमती कल्पकताताईंच्या रूपाने संघ संस्थापकांची नात ,संघाच्या शताब्दी महोत्सवात, संघाला विश्वस्त पदावरून सेवा देत होती, हा केवढा दुर्मिळ योगायोग!! ही  समाजासाठी मोठी अभिमानाची आणि प्रेरणादायी गोष्ट होती! गेली अनेक वर्षे समाज-भल्यासाठी अखंडपणे तेवणारी ही  कल्पलतारूपी ज्योत परवा निमाली. अखेरची!

       कै.प्रमोद चुरी यांचे वरील स्मृती लेखात मी या उभयतांच्या काही आठवणींचा उल्लेख केला आहे. त्याकाळी या दोघांचा विवाह ही एक धक्कादायक बातमी झाली होती. केवळ कै.पद्मश्री भाऊसाहेबांच्या भावी जावयावरील  विश्वासामुळे हा विवाह झाला होता. कोणत्याही सभासमारंभासाठी, बोर्डीपासून ते मुंबई पर्यंत अनेकदा त्यांच्या होंडा गाडीतूनच मी प्रवास केला. त्यांचा कमल ड्रायव्हर आणि आम्ही तिघे हे जणू समिकरण ठरलेले असे. त्यावेळी सामाजिक बाबीसह काही कौटुंबिक वैयक्तिक गोष्टींचीही चर्चा होई. भोजनाची वेळ झाल्यास रस्त्यावरील एखाद्या चांगल्या उपहारगृहात भोजन नाष्टा घेत असू. लताताईंचा आपल्या मुलांवरील जिव्हाळा आणि प्रमोदच्या प्रकृतीची  काळजी, याचा अनेकदा प्रत्यय आला आहे. एकदा आम्ही केळवे येथील  एक कार्यक्रम आटोपून मुंबईस येत असताना, कार्यक्रमाचे निमित्ताने प्रमोदना खाली-वर असे खूप चालावे लागले. त्यांना गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला होताच. कार्यक्रमाचे प्रसंगाने अनियमीत चालणे झाल्याने प्रमोदचे पाय दुखू लागले. लता ताईंना त्याचा अंदाज आलाच. “आपण घरी जाऊनच यावर उपाय करू”, असे प्रमोद म्हणत असतानाही वाटेतील एका उपहारगृहाजवळ ताईंनी कमलला गाडी थांबविण्यास सांगितले. नेहमीच्या औषधाच्या गोळ्या जवळील केमिस्ट्शॉप मधून खरेदी केल्या. चहा बरोबरच एका बाटलीत गरम पाणी मागविले. प्रमोदच्या गुडघ्यांना तेथे बसल्या बसल्या थोडा शेक दिला.  प्रमोदला खूप दिलासा मिळाला. त्यानंतरच आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. घटना छोटी आहे पण लता ताईंना प्रमोदबद्दल वाटणारी काळजी व तळमळ दिसून येते. एकमेकांना समर्पित अशी ही संसारातील एक जोडी होती! लताताईनाही  गुडघेदुखी सतावत होती.आपल्या पतीच्या वेदना काय असतील हे त्यांनी स्वतःवरून ओळखले  व म्हणून एवढे  त्वरित विचार करण्याची तत्परता दाखविली. यावरून पुढे काही दिवस मी” हा खूप मोठ्या लोकांचा आजार आहे”, असे म्हणत त्यांची गंमत करीत असे. मी व विलास बंधू लता ताईंना ‘ताई’ म्हणत असल्याने प्रमोदलाही ‘भाऊजी’ म्हणत असू. आज ताई गेल्या, परवा भावजी गेले, दोन  सुंदर नाती अचानक संपली!

       लताताई गेल्या हे  खरेच वाटत नाही कारण अगदी काल-परवापर्यंतच्या त्यांच्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत. प्रमोदवरील लेखासाठी त्यांनी मला  दिलेली शाबासकी आणि प्रमोदसाठीच्या शोकसभेतील माझ्या भाषणाबद्दल, फोन करून व्यक्त केलेल्या भावना, मी विसरलेलो नाही. त्या मानसिक अवस्थेतून मी अजून बाहेर आलो नाही, तोच प्रत्यक्ष लताताईवरही असा लेख लिहिण्याची माझ्यावर पाळी यावी हा किती दुर्दैवी योगायोग! हीच मानवी जीवनाची  एक शोकांतिका आहे असे वाटते. या दोन्ही घटनांचा मी अजूनही विचार करतो आहे.

    पती निधनानंतर, आपलेही आयुष्यातील इतिकर्तव्य आता संपले असे मानून आपली स्वतःची मुले-नातवंडे , प्रिय सगे-सोयरे आप्तेष्ट  याबद्दल कोणताही मोह न बाळगता  प्रिय पती पाठोपाठ ,देवाघरी निघून गेलेल्या अनेक नारी रत्नांची  उदात्त चरित्रे आपण पुराणापासून ते अगदी अर्वाचीन कालापर्यंत निश्चित जाणतो. प्रमोदनंतर लताताईंच्या मनातही तशीच भावना प्रबल झाली असेल का?  मला माहित नाही मात्र या लेखात प्रथम  मी जे काही लिहिले आहे, त्यामुळे तसे वाटण्यास माझे मन धजावते.

    कै.सुधीर फडके व गदिमा  यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या “गीत रामायणातील” काही ओळी आज येथे ऊधृत करणे मला  समर्पक वाटते.….

 “निरोप माझा कसला घेता,जेथे राघव तेथे सीता.

  कोणासाठी सदनी राहू,का विरहाच्या उन्हात न्हाऊ?

        वाल्मिकी रामायणात वाल्मिकींनी सुचविले होते,”रामाला वनवासात जाऊ दे ,मात्र सिंहासनावर सीता बसेल”.  कोणताच लोभ ऐहिक आयुष्यात न ठेवता, रामावरील अतूट प्रेमामुळे सीता देखील अज्ञातवासाला निघून गेली. तारामाईंची लाडकी लेक, संयोगिता-ऋषिकेश जी प्रिय आई, आम्हा सर्वांची आवडती लताताई, पती निधना नंतर लगेच  त्याचे मागोमाग स्वर्गारोहण करती झाली. हा निव्वळ योगायोग की एका प्रेमळ नात्याचे अद्वैत?या प्रश्नाचे उत्तर आता कधीच मिळणार नाही!

     भारतीय संस्कृतीमध्ये सर्वोच्च स्थानावरील ,काळातीत प्रतीक म्हणजे भारतीय नारी!. कधी ती वत्सल माता म्हणून भेटते ,कधी प्रेमळ पत्नी म्हणून दिसते,कधी स्वाधीनपतीका तर कधी प्रोषितभर्तृका,कधी रागावलेली तर कधी असहाय्य.. आणि कधी संपूर्ण समर्पिता ..तिची किती रूपे वर्णावी ?त्याच आदर्श भारतीय नारीचे हे एक आदर्श आगळेरूप,”संपूर्ण समर्पिता”  म्हणजे कल्पलता!!

कै अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरातील कै.पू. अण्णासाहेबांचे  पुतळ्यास वंदन करताना कल्पनाताई.

   मित्रवर्य प्रमोद चुरींचे अंत्यदर्शन घेण्यासाठी माझ्या मनाची थोडी तरी तयारी होती. लता ताईंच्या अखेरच्या दर्शनासाठी मन  धजावत नव्हते. आणि आजही त्या या जगात नाहीत, यावर विश्वास बसत नाही! आपल्या आवडत्या घरात, खुर्चीवर बसल्या अवस्थेत त्या कोसळलेल्या होत्या, असे ऐकले? कोणता अंतीम विचार त्यावेळी त्यांचे मनात असेल? कोणाची मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर असेल ?ज्या प्रिय पती समवेत आयुष्याची सायंकाळ या सुंदर सदनात व्यक्तित करावी, अशा आपल्या नुकत्याच चिरविरहाचे दुःख देऊन गेलेल्या प्रिय पतीचे चित्र अंतिमक्षणी त्यांच्या मनी असेल का?.. गीता म्हणते

    यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।

    तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भायवभावितः ॥ ६ ॥

 (हे कुंतिपुत्रा ज्या ज्या वस्तूचे स्मरण करत मनुष्य अंतकाली देहाचा त्याग करतो, त्या त्या वस्तुप्रत तो सर्वदा (तिच्या स्मरणामुळे) ,तिच्या ठिकाणी एकाग्रचित्त झालेला असल्यामुळे, जातो). 

   पती-चिंतनात  असलेल्या लताताई पतीप्रत एकरूप झाल्या.. खऱ्या अर्थाने, एक जीवनज्योत विश्वज्योतीला मिळून गेली..!!

   प्रमोद-लता सानिध्याने मला खूप काही दिले. अजूनही खूप काही  मिळण्याची उमेद भविष्यात बाळगून होतो. याच वर्षी त्यांचे ‘स्वप्नातील’ घर घोलवडमधील माझ्या घराशेजारीच तयार होणार होते. ते घर तयार होईल, पण ही दोन प्रेमळ माणसे आता मला तिथे भेटणार नाहीत. दुसरीही एक खंत माझ्या मनी तशीच राहील. लताताईंनी तिचे आजोबा कै. पू.अण्णासाहेब वर्तक यांचेवर एक स्मृती लेख लिहिण्यास मला विनंती केली होती. व त्यासाठी स्वहस्तॆ काही पाने लिहून मला पाठविली होती. तो लेखही होईल. पण तो वाचण्यास लताताई नसतील. स्वहस्ते लिहून पाठवलेला हा हस्तलिखित मजकूर माझ्यासाठी  एक अनमोल ठेव असेल.. 

लताताईनी आपल्या स्वहस्ताक्षरात मला पाठविलेल्या पत्राचे एक पान

अशा अनेक स्मृतींचा दरवळ मनी दाटतो. बीते हुए दिनों की याद येते, मन नाराज होते. पण कवी हरिवंश राय बच्चन यांच्या या ओळी मला उमेद देतात ..

         ” धीरे धीरे उम्र कट जाती है..

          जीवन यादों की पुस्तक बन जाती है,

        कभी किसी की याद बहुत तड़पाती है…_

         और कभी यादों के सहारे ज़िन्दगी कट जाती है ..”

  प्रमोद-लता यांच्या अशा गोड आनंदी आठवणीच्या आधाराने उर्वरित आयुष्य जगायचे आहे. कायमची हरवलेली अशी प्रेमळ माणसे आणि त्यांचे बरोबर घालविलेले ते आयुष्याचे सुंदर क्षण आता परत कधीच येणार नाहीत, हे लक्षात ठेवूनच…

   लताताई व प्रमोदभावोजी यांच्या स्मृतीना मनोभावे प्रणाम. ??

मित्रवर्य विलास बंधूजी यांनी हा लेख लिहिण्याची प्रेरणा मला दिली, त्यांचेही मनःपूर्वक आभार मानतो.

दिगंबर वा राऊत, माजी कार्यकारी विश्वस्त, सो क्ष संघ फंड ट्रस्ट.