आमचे लक्ष्मण काका

कै. श्री लक्ष्मण दमणकर काका

काळ बदलला, माणसे बदलली असं म्हणतात पण माझ्या आयुष्यात मी अशीही काही माणसे बालपणी पाहिली ती तशीच माझ्या मोठेपणीही दिसली.  बदलत्या काळाप्रमाणे त्यांनी आपले रंगरूप बदलले नाही. आपला साधा स्वभाव बदलला नाही. त्यांनी खूप काही कमावले नसेल किंवा त्यांच्या नावाचा डंका वाजला नसेल पण तरी मोठी झाली .. .कारण माझ्या मते ती खूप मोठी माणसे होती. ती अतिशय साधी असल्यामुळे यांची समाजात एक वेगळी ओळख आहे.या साध्या सरळ माणसांमुळेच आज ही समाजाचा समतोल ढळलेला नाही. अशी ही साधी माणसं स्वतःच्या चांगल्या वर्तणुकीने माणसांचा, एकमेकांवरचा विश्वास,आजही कायम असल्याची साक्ष देतात. हे किती मोठे ऋण ही माणसे समाजावर ठेवून जातात!

       अशा साध्या माणसांपैकी माझ्यासमोर येतात ते आमचे लक्ष्मण काका! लक्ष्मण काकांचे संपूर्ण नाव लक्ष्मण माणक्या दमणकर. आप्पांचे शाळेतील अगदी जिवलग स्नेही आणि आमचे मित्र राजाभाऊ दमणकर, भास्कर दमणकर यांचे पिताश्री. आप्पांच्या काही थोडक्या शाळू सोबत्यांनी शेवटपर्यंत आप्पांशी असलेला बालपणीचा स्नेह जपला, वाढवला एवढेच नव्हे तर आपल्या पुढच्या पिढीत देखील हा स्नेह असाच चालत राहील याची जाणीव ठेवली. त्यातले एक म्हणजे लक्ष्मण काका. खरेतर काकांचे बालपण खूपच लाडाकोडात गेलेले. बहिणींच्या पाठीवरचा हा एकुलता एक नवसाचा झालेला मुलगा. वडील माणक्या भाऊ हे त्यावेळी आमच्या बोर्डी,घोलवड, देहरी या पंचक्रोशीतील मासळी व्यापाराचे मोठे प्रस्थ होते. त्याकाळी म्हणजे सुमारे शंभर वर्षांपूर्वी त्यांनी बांधलेला आपला वाडा आजही शाबूत आहे .यावरूनच त्यांच्या तत्कालीन श्रीमंतीची खात्री पटते. अशा सुस्थितीत  वाढलेल्या काकांवर, वडिलांच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा भार अंगावर पडला. शिक्षण जास्त करता आले नाही. मला वाटते व्हर्नाकुलर फायनल या त्यावेळच्या शिक्षकाची नोकरी मिळण्याची साठी आवश्यक असलेले शिक्षण घेतले असावे. घरची शेती होती, व्यापार होता पण का कोण जाणे हे न करता काकांनी एका मोठ्या पारशी गृहस्थाकडे नोकरी केली. दुर्दैवाचे अनेक दशावतार त्यांना आयुष्यामध्ये पाहायला मिळाले .मोठा मुलगा अनंता बालपणातच गेला. वडिलांनी थोडेफार कर्ज ही मागे ठेवले होते. ते फेडण्यात ही बरीच ओढाताण झाली. साध्या सरळ स्वभावामुळे नातेवाईकांनी फक्त त्यांचेकडून फायदे उपटले आणि सात मुलांचे संगोपन शिक्षण करताना दमछाक झाली असेल,  ती वेगळी यामुळे कदाचित काकांनी आपला पिढीजात उद्योग व्यवसाय,शेती न करता सुखाची नोकरी बरी, असा विचार करून घोलवडमधील, माणेकशा मसानी, या पारशी  गृहस्थाकडे नोकरी केली. वास्तविक त्या काळात अशा मोठ्या पारशी, इराणी गृहस्थांच्या कडे नोकरी मिळणे म्हणजे तुमच्यासाठी एक सोन्याची खाण उघडणे अशीच स्थिती होती. अनेक लोकांनी यावेळी अशा नोकऱ्या करून त्या पारशांचेही भले केले व आपलेही भले करून घेतले .मात्र संपूर्ण वाडीची बागायती व पिठाच्या गिरणीचा व्यवसाय,पैशांचा गल्ला  काकांच्या हाती असून देखील या माणसाने एकही नया पैसा अवाजवी प्रकाराने त्यातून  घेतला नाही, हे मी अतिशयोक्तीने नाही सांगत. परोपकारी  स्वभाव व वेळोवेळी  दाखविलेले दातृत्व मी जवळून पाहिले आहे. त्यांच्या बोलण्यातून त्यांचा स्पष्टवक्तेपणा दिसत असे, भाबडेपणाही जाणवत असे. आमच्या लहानपणी त्यांच्याशी वागण्या-बोलण्यासआम्हास काही ही संकोच वाटत नसे. आपल्या कामाशी असलेल्या त्यांच्या निष्ठेमुळे, त्यांच्या मालकांनी, त्यांना जाण्यायेण्यासाठी बग्गीची सोय  केली होती. बग्गीतून घरून आणून पुन्हा घरी सोडण्याचा बहुमान त्याकाळी,आपल्या  सेवेतील एका कर्मचार्‍याला मालकाकडून मिळणे, हा मोठाच  आदर, सन्मान व बहुमान होता. त्या दिवसात अशा खास घोडागाडी तून प्रवास म्हणजे आज काल मर्सिडीज गाडीतून प्रवास करण्या सारखे होते.काकांना पैसे कमविण्याची मोठी संधी होती, परिस्थिती देखील ओढग्रस्तीची, असूनही काकांनी आपल्या मुलांना प्रसंगी अर्धी भाकरी खायला घातली , पण मालकाच्या पैशाचा, अवास्तव लोभ त्यांना झाला नाही .आपल्या पगाराशिवाय, कोणत्याही ईतर वस्तूला त्यांनी कधीही हात लावलेला नाही. कधी कधी त्यांच्या घरी गेलो असताना काकुंचे संतापाचे उदगार मी ऐकले आहेत की” हे बघ तुझे काका, संध्याकाळच्या भाजीसाठी चार वांगी ही ही वाडीतून आणीत नाहीत”, धर्मपत्नीच्या उद्गारावरूनही  त्यांच्या सचोटीची  कल्पना यावी .आपण इतिहासात दादोजी  कोंडदेव व संत एकनाथ अशा महान लोकांच्या प्रामाणिकपणाच्या व सचोटीच्या गोष्टी ऐकतो, आधुनिक काळात देखील पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री सारख्या माणसांनी उच्चपदी असून देखील आपल्या सचोटीची अनेक उदाहरणे घालून दिली आहेत. कलियुगात अशा सचोटीच्या  माणसांची  वानवा आहे एवढे खरे! आमचे भाग्य मोठे,की त्या परंपरेतील एक माणूस आम्ही प्रत्यक्ष पाहिला, पाहिलाच नाही तर त्यांचे आशीर्वाद ही मिळाले. 

     एवढ्या मोठ्या इस्टेट मॅनेजर व खास घोडागाडीतून फिरणा-या या माणसाची राहणी ही सदैव साधीच राहिली. साधे धोतर शर्ट ,त्याच्यावर पिवळट रंगाचा एक कोट आणि डोक्यावर पांढरी टोपी ,पायात साध्या चपला आणि चेहर्‍यावर झळकणारे सात्विकतेचे एक सुस्मित अशीच काकांची मूर्ती डोळ्यासमोर येते. काका रंगाने जरी शामल वर्णाचे होते तरी मनाने मात्र एवढे साधे व सरळ होते  त्यांच्या स्वभावाला पारदर्शक स्फटिकाची उपमा शोभून लिहावी. कोणी  अपरिचित, अनभिज्ञ, व्यक्ती त्यांना प्रसंगी बावळट म्हणूनही समजे, मात्र  यांचा साधेपणा, मनाचा पारदर्शीपणा ज्यांना माहीत होता त्यांनाच कळत होते ,की लक्ष्मण काका किती मोठ्या मनाचे आहेत. ज्यावेळेस ते आमच्या घरी येत व आप्पांशी  गप्पा करीत त्यावेळी, दिवसभरात  घडलेल्या सर्व गोष्टी आप्पांना मोकळेपणाने सांगत.  “गल्ल्यावर बसल्याने पैसा कमवायला, संधी होती पण आपण  तसे केले नाही व करणार नाही..” असे नम्रपणे, पण ठासून सांगत असत. लहान वय असून सुद्धा अशा गोष्टी माझ्या लक्षात राहिल्या, कारण आप्पांचे कडून ही असेच प्रामाणिक पणाचे महत्व सांगणारे विचार आम्हाला मिळत असत. काकांचा स्वभाव भिडस्त खरा पण अतिशय प्रेमळ व प्रसंगी रोखठोक. असे बोलताना त्यांची एक विशिष्ट अशी  लकब होती. एखादे वाक्य दोनदा ही म्हणत,  तरी त्यातून त्यांच्या ,लपवाछपवी न करता साधे सरळ पणाने आपले विचार सांगण्याची सवय, लक्षात येई. त्यामुळे ती सरळ  साधी भाषा व खालच्या आवाजात बोलण्याचा परिणाम ऐकणाऱ्याच्या मनावर होई व हा माणूस जे सांगतो ते मनापासून आहे त्यात कोणताही धूर्तपणा नाही, हा सच्चा आहे, अशीच जाणीव ऐकणाराची होई.आणि हेच त्यांच्या स्वभावाचे मोठे वैशिष्ट्य होते, ते मनावर ठसे..कोणताच मोठा अविर्भाव वा अद्वातद्वा बोलणे त्यांना कधीच जमले नाही. मात्र त्यांच्या बोलण्यातून, समोरच्या माणसाबद्दल प्रेम आणि वात्सल्य  प्रतीत होत असे. आपण आपल्या आयुष्यात अनेक लोकांना काका म्हणत असतो मात्र त्यापैकी काही थोडीच आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात. लक्ष्मण काकांची आज मुद्दाम आठवण होत आहे, ते लक्षात राहिले आहेत ते ,आप्पांचे स्नेही वर्गमित्र होते म्हणूनच नव्हे, तर आमच्या कुटुंबाविषयी विशेषतः आप्पांच्या प्रकृतीविषयी व आम्हा मुलांविषयी त्यांना असलेली ममता, आस्था व आत्मीयता! मला आठवते त्याकाळी काका टांग्यातून आमच्या घरी येत.आमचे त्या कालांतील घर म्हणजे  डॉक्टर चुरी यांच्या बंगल्यात पहिल्या माळ्यावर राहत असू.ते येऊन बसले, आईने चहा करून दिला की थोड्याच वेळात पिशवीतून एक बॉक्स काढीत असत, त्या बॉक्समध्ये बिस्किटांची मोठी चवड लावलेली असे. अतिशय सुंदर प्रकारची वेगवेगळी बिस्किटे आमच्यासाठी ते नेहमी घेऊन येत. हे बिस्कीटांचे पुडे  त्यावेळी कागदी वेष्टनात नसून छानदार अशा चौकोनी पत्र्याच्या पेटीमध्ये असत. आणि ती पेटी सुद्धा बिस्किटे संपल्यावर खास कामासाठी वापरता येई. अशा एक दोन पेट्या आजही आम्ही  जपून ठेवल्या होत्या. त्या अजून आमच्या संग्रही आहेत. बाजारात वा दुकानात, अगदी मुंबईतसुद्धा,तशा प्रकारची उत्तम बिस्किटे, अशा सुंदर वेस्टनातून त्यावेळीकुठेही  मिळत नव्हती. मात्र माणेक  साहेबांच्या  उच्चपदस्थांशी असलेल्याओळखीमुळे,कदाचित परदेशातून अशा वस्तू त्यांच्याकडे येत असाव्यात. खास “लक्ष्मण च्या मुलांसाठी” ते मालक काकांना  अशा गोष्टी देत असावेत. त्या दिवसात काकांनी खास आमच्यासाठी म्हणून आणलेली  ती चविष्ठ,खुसखुशीत , बिस्किटांची आज आठवण येऊन कृतज्ञ वाटते. काॅड लिवर तेलाच्या गोळ्या त्यावेळी  खूप उत्तम टाॅनीक म्हणून ओळखल्या जात. हीसुद्धा श्रीमंतांचीच, त्या दिवसात चैन होती. मात्र त्यांना आपल्या मालकाकडून मिळणारी ही दुर्मिळ वस्तू काका आमच्यासाठी घेऊन येत. अशा अनेक लहान सहान वस्तू ज्या त्या वेळी आम्हाला दुर्मीळ होत्या त्या काकांनी खास आम्हाला म्हणून दिलेल्या आहेत त्याची कृतज्ञतेने आठवण होते.  त्या गरिबीच्या  आर्थिक  ओढग्रस्तिच्या दिवसात  अशा वस्तू  म्हणजे फक्त श्रीमंतांची चैन होती, “माझ्या मुलांना  त्याचा लाभ होतो आहे  तर माझ्या मित्राच्या मुलांनाही ते मिळाले पाहिजे” ही केवढी मोठी ऊदात्त भावना होती आणि त्याचेच मला आज खूप अप्रूप वाटते . काकांच्या विषयी आदर दुणावतो .मसानी मालकांचे जवळचेनातेवाईक,मुले,त्याकाळी परदेशात  होती व त्या गोष्टी तेथून त्यांना मिळत असाव्यात. त्यातील काही ते काकांना भेट म्हणून देत. आपल्याच  मुलांना न देता, आम्हालाही त्यांच्या मुलाप्रमाणे समजून  देत. मला तर आज  कधी कधी वाटते, कदाचित आपल्या मुलांना ही न देता, आम्हाला अशा गोष्टी देत असावेत. त्यांचा स्वभावच तसा होता. माणसाच्या गरीबीच्या दिवसात नातेवाईक ,मित्र,बहुतेक सहाध्यायी साधी चौकशीही करीत नसतात. अशावेळी केवळ मैत्रीच्या भावनेने, आपले कोणतेही रक्ताचे संबंध नसताना एखाद्या माणसाने एवढी आस्था प्रेम आणि कनवाळू पणा आपल्या मित्रासाठी व त्यांच्या मुलासाठी दाखवावा ही गोष्ट खूपच अलौकिक वाटते. याची आम्हाला आजही जाणीव आहे. आणि म्हणूनच काकांची आठवण येते. जगाचा एवढा अनुभव घेतल्यावर, त्यांच्या  मनाचा मोठेपणा व  त्यांची मानवी मूल्ये  अधिक जाणवतात व आदर दुणावतो. वास्तविक तेव्हां  मालकांनी बग्गी त्यांच्या वापरासाठी दिली होती. काका काटेकोरपणे, आपल्या मुलांनाही  त्यात कधी बसवीत नसतात. मात्र मला अजूनही कृतज्ञतापूर्वक स्मरण होते ते, आम्ही टांग्यात बसण्याची उत्सुकता दाखवल्यावर आम्हा मुलांना बसवून त्यांनी बोर्डी गावात एक फेरी मारली होती. एरवी अतिशय  “इदं न मम ” म्हणणाऱ्या लक्ष्मण काकांनी त्या दिवशी, मनाला न पटणारी गोष्ट केवळ आमच्या समाधानासाठी आपली मूल्ये थोडी बाजूला ठेवून, आम्हा मुलांचा हिरमोड होऊ नये म्हणून केली होती.

          काकांच्या ताब्यांत खरेतर आपल्या मालकाचा गल्ला होता. मात्र ते आप्पांना नेहमी सांगत,  ‘वामन ,सबंध पैशाचा व्यवहार माझ्याकडे असतो तरी मधून मधून मी माझ्या हाताखाली गडी माणसांनाही मुद्दाम त्या गल्ल्यावर बसवतो आणि मी वाडीमध्ये स्वतः काम करतो. त्याचे कारण असे की त्या माणसांनाही वाटू दे की हा पैसा आपला नाही आणि हा मॅनेजर नुसता, सांगत नाही, तर त्याप्रमाणे वर्तन करून राहतो ” गोष्ट दिसायला खूप साधी आहे केवढा मोठा विचार या साऱ्या गोष्टी मागे आहे त्याची आज जाणीव झाली की मन भरून येते. 

     कालांतराने मी बोर्डी सोडून कॉलेजसाठी साताऱ्याला गेलो. दोन वर्षांनी पुन्हा मुंबईच्या इस्माईल कॉलेज मध्ये रुजू झालो .त्याच वेळी  त्यांचा मुलगा,  राजाभाऊ एसएससी पास झाले होते व त्यांनाही पुढचे शिक्षण घ्यावयाचे होते. अर्थातच काकांची एवढी ऐपत नव्हती .येथील वस्तीगृह शाळा व कॉलेज चा खर्च त्यांना झेपण्या सारखा नव्हता, पण त्यांची पुण्याई एवढी जबरदस्त होती की , माणेकशा मसानीचे पुतणे  म्हणजे होमीभाई  मसानी यांनी राजाची आर्थिक नड  पूर्ण करण्याचे मान्य केले.  योगायोग असा  की होमी भाई घोलवडला आपल्या काकांचे  वाडीला वारंवार भेट देत असत.लक्ष्मण काकांची त्यांची भेट वरचेवर होत असे आणि  लक्ष्मण काकांची सचोटीची वृत्ती  त्यांनी  ओळखली होती. त्यामुळे राजा जेव्हा मुंबईला वसतिगृहावर राहणार हे होमी भाईंना कळले,तेव्हा त्यांनी राजाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी उचलली.लक्ष्मण काकांच्या पुण्याईला ,ही परमेश्वराने दिलेली साद होती.एवढेच नव्हे तर पू. भिसे  गुरुजींनी, त्यावेळचे आमचे इस्माईल युसूफ कॉलेजचे प्रिन्सिपल, डॉक्टर पोतदार साहेब, जे आमच्या बोर्डी हायस्कूलचे माजी विद्यार्थी देखील होते, त्यांना राजाविषयी  शब्द टाकला व त्याला वस्तीगृहात ही खूपच माफक सवलतीच्या दरात राहाण्या, जेवणाची सोय केली. अशा रीतीने त्याच्या राहण्याचा खाण्याचा खर्च परमेश्वरी कृपेने व काकांच्या पुण्याईने चांगल्या प्रकारे  सुटला. मी व अण्णा देखील त्याच वेळेला वसतिगृहात असल्याने राजाचे व आमचे नेहमी बोलणे चालणे होई. पोतदार सरांनी त्यावेळचे आमचे वसतिगृहाचे सुपरिंटेंड , व्ही  वि  मा  दी. पटवर्धन सर जे स्वतः मराठीचे विनोदी लेखक होते त्यांना विनंती करून राजाला आमच्या भोजनालया शेजारील एक स्वतंत्र खोली रहावयास दिली होती. मला वाटते ती कशी स्वतंत्र खोली देण्यापेक्षा त्याला आमच्या बरोबरच ठेवले असते, तर त्याचा अभ्यास चांगला झाला असता. काही दिवस तसा प्रयत्नही अण्णाने केला होता. राजा प्रथम वस्तीगृहात आल्यावर, जोपर्यंत त्याला ही खोली मिळाली नाही तोपर्यंत अण्णाने त्याला आपल्या खोलीत ठेवून घेतले होते. त्यावेळी इस्माईल युसुफ कॉलेजच्या वस्तीगृहात प्रत्येक खोलीत दोन विद्यार्थी राहत असत.अण्णांचा रूम पार्टनर चौधरी हा खानदेशी  विद्यार्थी होता. त्यानेही मोठ्या मनाने राजाला आपल्या खोलीत सामावून घेण्याबद्दल अण्णाला परवानगी दिली होती. हीच व्यवस्था  पुढे राहिली असती  तर खूप बरे झाले असते .राजाला इस्माईल कॉलेजात पाठवण्यात काकांचा व आप्पांचा  मुख्य हेतू होता की,आम्हा दोघांचाही सहवास आणि मार्गदर्शन त्याला मिळावे. मात्र राजा स्वतंत्र खोलीत राहावयास गेल्यामुळे  अभ्यास व मार्गदर्शनाचा हेतू तेवढा सफल होऊ शकला नाही व राजाचा पहिल्या वर्षाचा अभ्यास त्याला जड जावू लागला .कारण सायन्सचा अभ्यास विशेषतः गणित व पदार्थविज्ञान यासारखे विषय इंग्रजीतून प्रथम शिकणे कोणत्याही  विद्यार्थ्यांना थोडे जडच जाते. त्यात घरापासून दूर असल्याने थोडेफार होमसिकनेस ही वाटत असावा व खोलीत कुणी जोडीदार नसल्याने त्याला अभ्यास करण्यास  सहकार्य मिळाले नाही हे खरे आहे. ज्या  होमी मसानी यांनी  लक्ष्मण काकांना, राजाचे शिक्षणासाठी  आर्थिक मदत देऊ केली होती तेही खरोखरच खूप दयाळू ,दानशूर व आपल्या काकांचे वाडीतील  सेवकांनाही,आपल्या कुटुंबाचे सदस्य समजणारे, एवढे मोठ्या मनाचे होते. जेव्हा मी राजा बरोबर,एक दिवस,त्यांचे मुंबईमधील घरी स्कॉलरशिप चे पैसे घेण्यासाठी गेलो होतो त्यावेळी त्यांनी राजाला प्रेमळ सल्ला दिलेला मला आजही आठवतो ते म्हणाले, ” तू म्हारा लक्ष्मण नो डीकरो छे, भणवानी जिम्मेदारी तारी अने पैसानी जिम्मेदारी म्हारी.. तन्हे भणऊ होय एटलो भणजे, पैसानी चिंता करवानी नथी.तारे परदेश जाऊ होय तो पण जिम्मेदारी म्हारी .या गुजराती म्हणण्याचा अर्थ असा, की” तू  माझ्या लक्ष्मण चा मुलगा आहेत हे ध्यानात ठेव अभ्यास करायची जबाबदारी तझी, पैशांची जबाबदारी माझी. तुला जेवढे शिकायचे तेवढे शिक, भविष्यकाळात जरी परदेशी जायचे असेल, तरी त्याची जबाबदारी माझी.”

 मला वाटते काकांनी आपली सेवा देताना पुण्याई सुद्धा किती कमावली होती याचे प्रत्यंतर त्या दयाळू गृहस्था च्या उद्गारावरून समजून यावे. आयुष्यात ‘कमावलेली पुण्याई’ कधी व कशी कामाला येते याचे हे माझ्या डोळ्यासमोर घडलेले उदाहरण आहे. त्या गृहस्थांनी माझी देखील खूप आस्थेने चौकशी केली व मी सुद्धा एका शिष्यवृत्तीवर माझे शिक्षण करीत आहे व मोठ्या काटकसरीच्या परिस्थितीमधून मार्ग शोधत आहे, हे त्यांनी जाणले शाबासकी दिली व कधी तुलाही मदत लागली तर मला सांग एवढेही वर सांगितले. कारण बोलताना त्यांना कळले होते की माझे वडील आणि राजाचे वडील म्हणजे त्यांचा लक्ष्मण हे दोघे जवळचे मित्र होते. ह्या  माणेकशा ना त्यांचे घोलवडचे घरी भेटण्याचा योग आला होता. हा काल 1963 असावा. यावेळी त्यांची मुलगी अमेरिकेतील प्रसिद्ध नासा NASA या  संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून कामाला होती. स्वतः माणेकशा शेठ देखील  पुणे कृषी विद्यापीठाचे  पहिल्या तुकडीतील पदवीधर होते. पद्मश्री डॉक्टर हरिश्चंद्र पाटील, जे पुढे राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू झाले,ते त्यांच समकालीन होते. त्यावरून त्यांच्या त्या वेळच्या बौद्धिक कुवतीची व मसानी कुटुंबाच्या एकूण राहणीमानाची कल्पना यावी . माणेशांच्या कन्या धनबाई, ज्या नासा’मध्ये कामाला होत्या, मला घोलवडला भेटल्या होत्या व त्यांनी राजाला बरेच प्रोत्साहन दिले होते. दुर्दैवाने, काहीही कारणे असोत, स्वत राजाभाऊंना हा सायन्स चा अभ्यास झेपला नाही हे खरे त्यामुळे एक मोठी संधी त्याच्या हातून गेली आम्हालाही खूप खूप वाईट वाटले आजहि वाटते. पण राजाभाऊ पहिल्या वर्षी अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांच्या पुढच्या शिक्षणाचा सर्वच खेळखंडोबा झाला मात्र त्यांनी जिद्द न हरता पुढे शिक्षण क्षेत्रात चांगल्या प्रकारे पदविका घेऊन, कोसबाड येथील हायस्कुलात एक उत्तम शिक्षक म्हणून आयुष्यात नाव कमावले. विशेषतः इंग्रजी विषयातील त्यांच्या शिकवणीचे आजही त्यांचे विद्यार्थी “दमनकर सरांचे” नाव काढतात. राजाभाऊ खरेच खूप होतकरू आहेत, आयुष्यात खूप मेहनत केली आहे. त्यांनी देखील एक विद्यार्थी वसतिगृह काही वर्षे उत्तम रित्या चालविले. पुढे ते काही कारणांनी बंद पडले, मुख्यत्वे जागेची अडचण होती पण तरीसुद्धा आयुष्यामध्ये जे काही शक्य होते व प्राप्त परिस्थितीला तोंड देण्यासाठी जे करावे लागले ते त्यांनी केले. ज्येष्ठ बंधू म्हणून इतर भावंडांसाठी  करता येईल तेवढे सहाय्य देखील त्यांनी केलेले आहे. आज सेवानिवृत्तीचे जीवन आपल्या कुटुंबासह आनंदाने जगत आहेत. समाजसेवेचा थोडा वारसाही त्यांच्याजवळ आहे आणि आजही आमचे चांगले मित्र आहेत.. दुर्दैवाने राजाभाऊंचा थोरला मुलगा चारूहास, ऐन उमेदीत अकाली गेला. चारू अतिशय हुशार उमदा व होतकरू, प्रेमळ मुलगा होता आयुष्यात खूप मोठी स्वप्ने त्याच्याबद्दल आम्ही पाहिली होती. पण नियतीला ते मंजूर नव्हते. राजाभाऊ या मोठ्या धक्क्यातून सावरले व त्यांनी आपल्या तीनही कन्याना  शिक्षण देऊन संसारास लावल्या .जावई व नातवंडांच्या गोतावळ्यात राजाभाऊ सुखासमाधानाने आपले ऊत्तर आयुष्य व्यतीत करीत आहेत. विशेषतः त्यांची नातवंडे आज शिक्षणाचे बाबतीत खूपच मोठी मजल मारीत आहेत. ही त्यांच्या या उतारवयात त्याना मोठी आनंद देणारी गोष्ट आहे.

     जेव्हा माझ्या बी एस् सी.टेक् पदवी  परीक्षेत पहिला वर्ग मिळाला व पेढे घेऊन काकांच्या घरी गेलो तेव्हा, त्यांनी माझ्या हातावर बक्षीस म्हणून दहा रुपये ठेवले व त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्या दहा रुपयाची किंमत त्यावेळीही आणि आजही मला लाखो रुपयांची आहे. आपल्या  मित्राच्या मुलाने मिळवलेले हे यश जणू  आपल्याच मुलाने मिळवले आहे या सद्भावनेने  सदैव काकांनी आम्हाला नेहमी वागविले  व तीच त्यांची दातृत्वाची,स्नेहार्द्र  वृत्ती त्या त्यावेळच्या त्या लहान देणगीतून दिसून आली .दुसऱ्याच्या या यशात व आनंदात अतीव समाधान  मानणारी माणसे जगामध्ये खूपच विरळा.एका संस्कृत सुभाषितात ही म्हटले आहे.      

   परगुण परमाणुन्,पर्वतीकृत्य नित्यम्, निजहृदी  विकसन्ती  संती संतः कियन्तः?

  दुसऱ्याच्या आनंदाने,व यशाने,स्वतः मनापासून आनंदित होणारी किती माणसे जगात आहेत? फारच थोडी, कारण ही वृत्ती संतान्  जवळ असते .लक्ष्मण काका त्यातील एक होते म्हणून ते संत होते,हीमाझी भावना आहे.

       मला  पुढे शिक्षणासाठी मुंबईत राहावे लागल्याने बोर्डीचा संपर्क जास्त येत नव्हता .कधीतरी सुट्टीत आल्यावर, वेळ असल्यास मी काकांच्या घरी जाई, काकां,काकूला  नमस्कार करी .दोघेही खूप प्रेमाने आस्थापूर्वक चौकशी करीत. यावेळी मी शिक्षणात करीत असलेल्या प्रगतीचा  त्यांना खूप आनंद होई. त्यांचा  चेहरा आनंदाने फुलून जाई.  मात्र आता ते थकलेले दिसत होते व हळूहळू या लौकिक जगा पासून दूर जात आहेत, सुख दुःखाच्या जाणिवा पलीकडे  जात आहेत ,असे वाटे. तरी देखील कामाचा उत्साह मात्र दांडगा होता. काहीना काही घरातला उद्योग  चालू असे .बसून राहणे कदाचित त्यांना जमत नसावे.

   काकू म्हणजे काकांच्या धर्मपत्नी या मात्र काकांच्या अगदी  विरुद्ध व्यक्तिमत्वाच्या होत्या. मला वाटते हा निसर्ग नियमच असावा की नवरा बायकोचा संसार यशस्वी व्हायचा असेल आणि नवरा जर अगदी भावडा साधाभोळा,’ संत तुकाराम’ स्वभावाचा असेल, तर त्याच्या पत्नीने कठोरत्वच स्वीकारले पाहिजे व रोखठोक स्वभावच धरला पाहिजे .त्यानुसार काकू अतिशय स्पष्ट ,शिघ्र कोपि व व्यवहाराला पक्क्या होत्या. काकूंचे माहेर तसे बऱ्यापैकी सुखवस्तु होते तरीदेखील ,एकेकाळी वैभवात नांदणारी ही स्त्री ,सुरुवातीला सासरीदेखील काही काळ वैभवात राहिली. पण गरीबीचे दिवस आल्यानंतर भांबावून गेली नाही. काकूंनी ही कंबर कसली  ,खूप कष्ट केले, चार पैसे काम करून मिळवले. काकांचा अपुरा प्रगार, सरळ धोपट वागणे आणि सढळ हात यामुळे त्यांना कष्ट करून चार पैसे मिळवावेच लागले आणि त्यांनीही ते खूप सचोटीने केले. आपल्या नवऱ्याच्या संसाराला हातभार लावला. विशेष म्हणजे काकांसारख्या भाबड्या, दयाळू व  सढळ हात असणाऱ्या नवऱ्याला सांभाळून घेतले .त्यामुळेच काकांचा मोठा संसार निभावू शकला . प्रसंगी कठोर बोलून रोखठोक वाटणारी ही बाई मनाने अत्यंत प्रेमळ होती .फणसाच्या फळाची उपमाच तिला समर्पक…  बाहेरून काटेरी पण आतून मात्र गोड गरे .मला अजून आठवते त्यांच्याकडे जर कधी चांगला मासा आला असेल तर त्यातील काही हिस्सा राजा मार्फत आमच्या घरी पाठवल्याशिवाय त्यांचे जेवण होत नसे. आमच्या दोन कुटूंबाचा जिव्हाळा एवढा होता की काही काळ राजा हा आप्पांचा मुलगा आहे असे आमच्याकडे येणार्‍या काही पाहुण्यांना वाटत असे. कारण अभ्यासासाठी व कधीकधी  रात्री  झोपण्यासाठी ही राजा आम्हा भावंडा बरोबर असे. काकांच्या नंतर काकू बरीच वर्षे जगल्या शेवटपर्यंत या काबाडकष्ट करीतच राहिल्या. मात्र  त्यांचा तो रोखठोक स्वभाव, मला अजून आठवते शेवटपर्यंत तसाच होता व आम्हाला त्यांच्याकडून शेवटपर्यंत प्रेम आणि माया मिळाली. काकू म्हणजे माझ्या पाहण्यात आलेल्या फार थोड्या विलोभनीय व्यक्तीमत्वा पैकी एक होत्या असे मला मनापासून वाटते.

    वयोमानाप्रमाणे काकांचे मन जरी काम करू इच्छित होते तरी शरीर थकले होते व हळूहळू थोडा विस्मृतीचा त्रास  ही त्यांना होऊ लागला होता .जबाबदारीचे काम असल्याने त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. व आनंदाने सेवानिवृत्तीचे जीवन जगत होते.मुलेही चांगल्या मार्गाला लागली होती. मोठा अनंता लहानपणीच गेला होता. रघु त्यांच्याच ओळखीमुळे रेल्वेत चांगल्या तऱ्हेने मुंबईस कामाला होता. राजाभाऊ, गोखले एज्युकेशन सोसायटी सारख्या एका ख्यातनाम शिक्षण संस्थेत, माध्यमिक शाळेत उत्तम प्रकारे शिक्षकी पेशा करीत होते. लीलाधर सरकारी नोकरीमध्ये आपले नशीब आजमावत होता. चंद्रकांत आणि वासुदेव दोघेही शेतीचा व्यवसाय आदर्शपणे करीत होते. भास्कर जेजे स्कूल सारख्या जगप्रसिद्ध शिक्षण संस्थेत चित्रकलेचे शिक्षण घेऊन एक आदर्श चित्रकार म्हणून पुढे येत होता. एकुलती एक मुलगी मंजुळा खूप सुखासमाधानाने आपल्या संसारात नांदत होती. भाऊजी सारखा अतिशय समंजस सद्गृहस्थ तिला पती म्हणून मिळाला होता. तिचाही संसार बहरत होता. काका हे सर्व पहात होते मात्र ,अगदी संन्यस्त आणि तटस्थ वृत्तीने!

     1981 साली आप्पा गेले यावेळी त्यांचा विस्मरणाचा आजार बळावला होता. आठवण कमी झाली होती. काही गोष्टी कळत ही नसत, त्यामुळे आप्पा गेल्याची बातमी जरी त्यांना कोणीतरी सांगितली होती, तरीही त्यांना त्याचे स्मरण होत नव्हते. मी त्यांना भेटावयास गेल्यानंतर त्यांनी “वामन कसा आहे ?प्रकृती ठीक आहे ना?” अशी चौकशी केली. माझ्या डोळ्यात आलेले पाणी कदाचित त्यांना थोडासा अर्थ सांगून गेले असेल!. दुर्दैवाने काका त्या दिवसात सुखदुःखाच्या पलीकडे गेले होते. थोड्याच दिवसानंतर काकांनीही या जगाचा निरोप घेतला.एक साधे भोळे,भाबडे सुंदर आणि प्रेमळ, आणि सर्वात विशेष म्हणजे आम्हा हा सर्व कुटुंबीयाबद्दल खरीखुरी आत्मीयता असणारे आणि प्रसंगी आमच्यासाठी तोंडातील अर्धा घासही काढून देणारे, असे व्यक्तिमत्व ,या जगातून कायमचे निघून गेले.

       आनंद हा मानण्यात असतो. तो तुमच्यातून एका निर्मळ झ-या  सारखा वाहत राहणारा असावा लागतो. त्यासाठी गाडी घोडे, पैसा-अडका, बंगले, दागिनेच असायला हवेत याची गरज नाही. सुखाची नक्की व्याख्या काय, असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, तेव्हा माझ्यासमोर ही साधीसुधी माणसं उभी राहतात. आपल्या सहजसुंदर जगण्यातून त्यांनी आपल्याबरोबर आजूबाजूच्या माणसांना जो आनंद दिलेला असतो त्याची किंमत कुठल्याच सोन्यानाण्याने होणार नाही. ही अशी माणसे त्या काळी होती, आजही आहेत आणि त्यांच्यामुळेच ह्या मानवीजीवनाचा समतोल राखला जातो आणि माणसाला जगण्याची उमेद येते. आमचे भाग्य म्हणजे,अशी माणसे कधीकाळी आमच्या वाट्याला आली. काका गेले, मात्र त्यांच्या व आमच्या कुटुंबातील मैत्रीचा तो धागा आजही अखंडपणे पुढे जात आह. त्यांचे सर्व हयात पुत्र व नातवंडे ,व कन्या मंजू ताई, तिच्या कुटुंबासह आमच्याशी तेवढेच निगडित आहेत जेवढे काकांच्या वेळी होते.  काकांच्या सार्थक जीवनाचे तेही फार मोठे फलित आहे.

      आजही काकांच्या घरी जातो तेव्हा त्यांच्या शेवटच्या दिवसांत, मला दिसलेले, थकलेले,तरीही मोकळ्या, हसऱ्या चेहऱ्याने, धोतर शर्ट,बनियन मध्ये, शांत प्रसन्न  हसत स्वागत करणारे एक निर्मळ मनाचे काका आठवले की जणू पारिजातकाचे बहरलेले, मंदसुवास पसरवणारे, झाड अंगणात उभे आहे असे वाटते…

सुख थोडं ,दुःख भारी ,दुनिया ही भली बुरी,  घाव बसंल घावावरी ,सोसायला झुंजायाला अंगी बळ येऊ दे …

   ह्या  गाण्याच्या ओळी ऐकल्या कि काकां सारख्या प्रेमळ माणसांच्या आठवणी जाग्या होतात. ते दिवस, आणि ती चांगली माणसे आठवतात. या जगामध्ये पुढील वाटचाल करण्यासाठी अंगी बळ येतं. काकांच्या स्मृतींना अनेक विनम्र प्रणाम. ?