आप्पांची पत्रे भाग-१०

आप्पांच्या पत्राचा दहावा भाग- मार्च 1976 ते सप्टेंबर 1977 असा सुमारे दीड वर्षाचा हा कालखंड आहे. अनेक घटनांचा उहापोह केलेला आहे. रमेश, म्हणजे आमचा आत्येभाऊ, त्याच्या लग्नाचे मोशाळे आप्पांना करावयाचे होते. त्याची हकीकत, सर्व नातवंडांच्या प्रकृतीची, अभ्यासाची व त्यांच्यासाठी काही सूचनांचा पत्रांत उल्लेख आहे. विहिरीचे काम चालू आहे, माणसे कमी पडत होती म्हणून थोडेसे काम अडकले होते, त्याचाही उल्लेख आहे. पपीला अभ्यासाच्या जागरणामुळे चष्मा लागला, त्याबाबत ही आपली काळजी व्यक्त केलेली आहे, बापूचेअक्षर वळणदार यावे म्हणून काय केले पाहिजे, स्वाता, ताया म्हणजे स्वाती व दीप्ती, यांना आशीर्वाद आहेत. भाई, हर्षु अरुणा, आशु, यांनी, ‘मे महिन्यात थोडे दिवस घोलवडला विश्रांतीसाठी या’, असेही सुचविले आहे. नीलम, बी.ए. बाहेरून करणार होती, तिच्या पुस्तकाबद्दल आम्हाला सुचना आहेत.

आप्पांची प्रकृती आता तेवढी साथ देत नाही आहे.., कुठेतरी एक अभद्र शंका मनांत डोकावते आहे. सूर्य आता अस्ताला आला आहे… खालील वाक्यावरून ते दिसून येते-
“आता माझे काम संपले आहे, सर्व काही मी आनंदाने पाहिले. माझे जीवन सार्थक झाले. तुमच्यासारखी गुणी मुले खचितच आईबापांना मिळतात. सर्व मुलांना, बापूला खूप शिकवा. चांगले संस्कार द्या. आता फार सांगणे नाही. श्रीदत्त तुम्हा सर्वांचे रक्षण करील. तुमचे वैभव वाढवीत राहील. तुमच्या सर्व अपेक्षा पूर्णकरील. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. हे सर्व आज वाचतांना डोळ्याच्या कडा नक्कीच पाणावतील… एवढी मोठी, आशीर्वादाची देणगी, आप्पानी आपणा सर्वांना दिलेली आहे, ही किती मोठी संपत्ती, पुण्याई आप्पांनी, येणाऱ्या पिढ्यांसाठी मागे ठेवली. त्याची अनुभूती येते की नाही हे प्रत्येकावर अवलःबून… त्यांचे विस्मरण होता कामा नये असे वाटते.

श्री गुरूदेव दत्त।?