आप्पांची पत्रे भाग-४

आप्पांच्या पत्राचा चौथा भाग आज प्रसिद्ध करीत आहोत. ही पत्रे देखील 1965 कालामधील असून त्यावेळी आम्ही महाविद्यालयीन शिक्षणासाठी दादर येथील तात्यासाहेब चुरी,वसतिगृहात राहत होतो. अण्णा VJTI, या प्रसिद्ध इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता, तर मी यु. डी. सी. टी. UDCT, मध्ये शिक्षण घेत होतो. मागे सांगितल्याप्रमाणे वसतिगृहाचा व अण्णासाहेब वर्तक हॉलचा व्यवस्थापक म्हणून ही ऑनररी काम बघत होतो व मला कॉलेज कडून शिष्यवृत्ती मिळत होती. मला इतरही शिष्यवृत्या जसे की वनमाळी ट्रस्ट यांचे कडेही प्रयत्न करण्यात आप्पांच्या सूचना असंत. कारण शिष्यवृत्तीचे पैसे दर महिन्यात न येता तीन-चार महिन्यांनी मिळत व त्यामुळे सुरुवातीला काही काळ पैशाची टंचाई भासत असे. म्हणून प्रत्येक वेळी आप्पांनी या पत्रात. “पैशाची टंचाई असल्यास त्वरित कळवा” असे लिहिले आहे आणि एके वेळी श्री जोशी गुरुजी बरोबर २० रुपये पाठविल्याचा ऊलेख आहे. त्या काळात वीस रुपये देखील आम्हाला मोठी रक्कम होती. जोशी गुरुजी चिंचणीला आमच्या शेजारी रहात व अधून-मधून मुंबईस आले की आम्हाला दादरला भेटून जात, त्यामुळे त्यांचे मार्फत काही खाऊच्या वस्तू आप्पा नेहमी पाठवत असत. ही पत्रे थोडीशी अस्पष्ट असून चिंचणीहुन लिहिलेली आहेत. मात्र प्रत्येक पत्रात, आप्पांचा कोणत्याही धर्मादाय ट्रस्ट अथवा मदत करणाऱ्या आर्थिक संस्था, यांचेकडे अर्ज करण्याबद्दल सूचना असत. मला मिळालेली बाबासाहेब म्हात्रे यांची शिष्यवृत्ती बंद झाली होती कारण माझा पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला होता. ती अण्णाला मिळावी असे प्रयत्न चालू होते. कोणत्याही परिस्थितीत कर्जाऊ अथवा कोणाकडून उसने पैसे द्यायचे नाही असा आप्पांचा बाणा आणि त्या बाबतीत. ” माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे ,परमेश्वरच तुमचा पाठीराखा आहे “. अशी आश्वासक वाक्ये पत्रात दिसून येतील. मंदा,अरूणा दोन्ही सुनांना देखील त्यांनी काही प्रेमळ सल्ला दिलेला आहे. पपीला शालेय निबंध लेखन स्पर्धेत बक्षीस मिळाले यांचाही मोठ्या कौतुकाने उल्लेख एका पत्रात आहे.

एका पत्रातील उल्लेख थोडा करुण वाटतो. छोटी नीलम, गजा भाऊंना, आमच्यासाठी खाऊचा डबा देण्यासाठी बस स्टॉप वर गेली व तिची चुकामूक होऊ खाऊचा डबा घरी परत आणावा लागला. “आम्ही तो खाऊ घरी खाऊ शकलो नाहीत “…असे वाक्य आप्पांनी लिहीले आहे व विशेष म्हणजे छोटी नीलम त्यामुळे खूप दुःखी त्याच वेळी वसतिगृहात रामु म्हणजे जगन दादांचा मुलगा ,आमचे बरोबर वस्तीगृहात राहत होता व त्यामुळे गजाभाऊ त्याचे साठी खाऊ घेऊन दादरला येत. या पत्रातून आप्पांच्या, त्यावेळी पासून, ढासळत चाललेल्या प्रकृतीबद्दल, काही तक्रारी दिसतात. त्यासाठी डॉक्टरांना विचारून, मीच औषध पाठवून द्यावे अशी विनंती केलेली आहे. माझ्या आधीचे व्यवस्थापक श्री मधुकर ठाकूर यांचीही, एक मला लिहिलेली जुनी चिठ्ठी यात सामील आहे . त्यावेळचे श्री ठाकूर आज डॉक्टर ठाकूर आहेत आणि अमेरिकेतील न्यूक्लियर मेडिसिन या विषयातील तज्ज्ञ समजले जातात. खरोखरच वाचनीय अशी ही पत्रे आहेत आणि आप्पांची तळमळ धडपड आणि आणि आमच्यावर असलेला विश्वास यात दिसून येतो.