अजातशत्रु, लोभस व्यक्तिमत्त्व कै. मदनराव लक्ष्मण राऊत

कै. मदनराव राऊत, नाना, २२ ऑगस्ट १८९२ – २७ जानेवारी १९५५

 कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा ।

 चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा ।|

संत शिरोमणी ज्ञानेश्वरांच्या दैवी चमत्कारांचे व त्यांच्या दिव्य दर्शनाचे वर्णन करताना एकनाथ महाराजांनी या दोन ओळी लिहिल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचा काळ हजारो वर्षापूर्वीचा. ज्ञानेश्वर म्हणजे  पृथ्वीवरील एक अद्वितीय, असामान्य, न भूतो न भविष्यती असा दैवी चमत्कार. आजच्या काळात असे असामान्य व्यक्तिमत्व कुठे पहावयास मिळणार? आम्ही सामान्य माणसे, आम्हाला ही कवीकल्पना वाटल्यास त्यात वावगे काय? 

   ज्ञानोबाएवढी  कैवल्यची, चैतन्याची पुंजी जरी जवळ नसली तरी आपल्या पूर्वसंचिताने, अंगीभूत सौजन्याने, माणुसकीच्या गहिवराने, उभे आयुष्य एखाद्या मिणमिणत्या मेणबत्तीप्रमाणे , परिसराला उजळून टाकण्यासाठी खर्च करून, आणि आपले आयुष्य सार्थकी लावून सामान्यातील काही असामान्य माणसे, आजच्या काळातही भेटतात!

  आम्ही बोर्डीकर खरोखरच भाग्यवान. आमच्या बोर्डीच्या भूमीत अशी अनेक तेजस्वी, कैवल्यस्वरूप, चैतन्यदायी, व्यक्तिमत्वे जन्माला आली अथवा वास्तव्यास आली. त्यांच्या परिसस्पर्शाने पावन झालेल्या या बोर्डीच्या  मातीत, आम्हीही वावरलो. त्याचा सार्थ अभिमान हा प्रत्येक बोर्डीकराला आहे !

      सव्वाशे वर्षांपूर्वी आमच्या बोर्डी गावातील प्रसिद्ध ‘राऊत’ कुटुंबात जन्म घेतलेल्या व आपल्या केवळ परिसरासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी आयुष्यभर, त्यांना कोणत्याही प्रकारचे योगदान देत, केवळ बासष्ट वर्षाच्या आयुष्यात अफाट पुण्यसंचय  करून गेलेले कै.मदनराव राऊत  बोर्डीकरांचे, ‘नाना’ हे असेच एक कैवल्याचा स्पर्श असलेले चैतन्याचा सुगंध लाभलेले, राजस व्यक्तिमत्त्व !

त्यांच्या चरित्राचा अभ्यास करू लागलो आणि अगदी विस्मय चकितच झालो. वैद्यकीय पदवी, वैद्यक म्हणून सरकार दरबारी नोंदणी, तरीही “वैद्यकी हा माझा ऊदरभरणाचा पेशा असू शकत नाही, ते ज्ञान मी गरीबांच्या सेवेसाठी वापरीन” असे म्हणत, ‘लंडन चेंबर ऑफ कॉमर्स’ च्या पदविका पहिल्या वर्गात पास केल्या. ब्रिटिशकालीन ,’बी ई एस टी’,या मुंबई नगरपालिकेच्या आस्थापनात, कॅशियरची भरपूर मोठ्या अधिकाराची नोकरी मिळविली. आपल्या आदरणीय गुरुजींनी स्थापन केलेल्या बोर्डीच्या शाळेत  योगदान देणे आपले कर्तव्य आहे असे मानून आजन्म विनावेतन बोर्डी हायस्कूल मध्ये सेवा देणारे,’ ते काम करीत असताना,आपल्या सो. क्ष. समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान दूर करण्यासाठी समाज बांधवांना एकत्र आणून सो क्ष संघाची स्थापना करण्यात पुढाकार घेणारे, शाळेतील  सेवेबरोबरच, सो क्ष संघातही सलग 32 वर्षे, इमानेइतबारे सेवा देणारे मदनराव राऊत एक अद्भुत, अविस्मरणीय, अजोड असे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. आपली नैमित्तिक, सांसारिक, सामाजिक व राजकीय व्यवधाने सांभाळताना, त्याच निष्ठेने, योगसाधना व योगीयांशी, जवळीक साधणारे मदनराव राऊत यांचे जीवन अनेक  योगायोगानीं, भरलेले, निस्सीम, निर्व्याज त्यागाने ओथंबलेले आहे, हे मला जाणवले. ते समाजापुढे आलेच पाहिजे, या एवढ्याच उर्मीने लिहिलेले हे लिखाण आहे. 

    विशेष म्हणजे ज्या बोर्डी हायस्कूलमध्ये त्यांनी तहहयात ,विनावेतन ज्ञानदान केले व ज्या सो क्ष संघाच्या निर्मितीत सहाय्यभूत होऊन एक आदर्श समाजसेवक कसा असतो, याचा नमुना पेश केला, त्या दोन्ही संस्था आज शंभर वर्षानंतरही,त्याच ध्येयधोरणांनुसार, आजही  यशस्वी वाटचाल करीत आहेत, हे त्या संस्थापकांच्या निरलस सेवेचे  व दूरदृष्टीचे यश! त्यांचे आज विनम्रभावे स्मरण करूया !!

       कै.मदंन रावांचे चिरंजीव माननीय दिनकर राऊत सर,यांनी दिलेली माहिती, कै.मदनरावांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त (1992), प्रसिद्ध केलेली पुस्तिका ,आणि सोमवंशी क्षत्रिय समाजोउन्नती संघाचे दप्तरातून मिळालेली काही जुनी कागदपत्रे, यांच्या सहाय्याने हे लिखाण केले आहे. प्रथमतः च त्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो.

  कै. मदनराव राऊत यांच्या अर्धांगिनी, सौ लक्ष्मीबाई राऊत, संसाराची पूर्ण जबाबदारी शिरावर घेऊन साथ देणारी समर्थ सहचारिणी..

       माझ्या लहानपणी मी बारा तेरा वर्षांचा असतानाच 1955 साली मदन मामा वारले. मात्र त्यांचे निवासस्थान आमच्या त्यावेळेच्या बोर्डीतील घरासमोरच असल्याने त्यांच्या परसदारी मी त्यांना नेहमी पहात असे. गोरेपान ऊंच, मध्यम बांध्याचे,चेहऱ्यावर सतत स्मितहास्य बाळगणारे, त्यांचे  लोभस राजस व्यक्तिमत्व माझ्या बाल मनात ठसलेले होते, आज ही तेच आहे. माझा बालमित्र जयप्रकाश उर्फ बाळू त्यांचा नातू. बाळूबरोबर आम्ही त्यांच्या बंगल्यात कधीतरी, एखादे रविवारी पत्त्याचा डाव मांडून खेळत असू. घरातील सर्व मंडळी त्यांना आदराने “नाना” म्हणत असत, ते तेव्हाच कळले. एके दिवशी नानांनी, आम्हा मुलांना पत्ते खेळत असताना पाहिले. अत्यंत सौम्य आवाजात त्यांनी आम्हाला सांगितलेली दोन वाक्य आजही माझ्या लक्षात आहेत.

   “बाळांनो जरूर खेळा, पण खेळामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका बरे!”

    ज्या आत्मीयतेने, अधिकारवाणीने तरी मार्दवाने त्यांनी  सांगितले ते एवढे परिणामकारक होते की त्यापुढे शालेयकाल संपेपर्यंत,आम्ही मित्रांनी, कधीही पत्ते कुटत बसल्याचे आठवत नाही. त्यांनी येथे खेळत असलेल्या आम्हा तीन-चार मित्रांची  आस्थेने चौकशीही केली. त्यांचा आणि माझा, आयुष्यात, प्रत्यक्षात झालेला तेवढाच संवाद! पुढे एक-दोन वर्षातच ते गेले.

     कै.मदनराव उर्फ नाना आमच्या सो क्ष संघाचे अगदी स्थापनेपासून चिटणीस. या संस्थेसाठी त्यांनी खूप काम केले, अनेक पदे भूषविली. त्याचा परामर्ष पुढे घेणारच आहे. समाजाचे पहिले अध्यक्ष भाईजी जगू राऊत यांचे वरील टिपण करताना, चिटणीस मदनरावांनी स्वहस्ताक्षरात, लिहिलेली, प्रत्येक सभेची मिनिट्स, वृत्तांत, वाचनात आले .सुंदर हस्ताक्षरातील,कोठेही खोडा खोड न करता लिहिलेली मार्मिक, समर्पक टिपणे पाहून मला खूप अप्रुप वाटले. मी देखील या संस्थेसाठी थोडे फार योगदान दिले असल्याने त्यांच्या सुरुवातीच्या काळातील कामाचे महत्त्व मला जाणवले.त्यांच्यावर हे टिपण करण्याचा तो ही एक उद्देश आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे कर्तव्य  समजतो. व म्हणूनच हा प्रपंच! केवळ श्रेयनामावली साठी, समाजकार्याचे कातडे पांघरून, कार्यकर्ता म्हणविणार्‍यांच्या आजच्या जगात मदनरावांची समाजसेवा किती शुद्ध व निस्पृह होती याचा प्रत्यय येईल. तेवढीच माझी, हे लिखाण करण्यात अपेक्षा आहे.

   आपल्या पिताजींचे शिक्षण आणि  प्रारंभीच्या काळातील धडपडीविषयी माहिती, दिनकर राऊत सरांनी मला दिली. त्यांच्या या आठवणीतून नानांनी बोर्डी हायस्कूलच्या स्थापनेतही अप्रत्यक्षरीत्या कसा भाग घेतला,आयुष्यात विविध वळणे घेत शेवटी बोर्डी हायस्कूलात, एका कर्तव्यभावनेने,अखेरपर्यंत, विनावेतन योगदान का दिले. एक पिता म्हणून त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी  प्रोत्साहन देत उच्चशिक्षित कसे केले, प्रिं. कुलकर्णी व डॉक्टर सौ कुलकर्णी, किती महान दांपत्य होते याचीही माहिती सरांकडून मिळते. सरांच्या शब्दात..

          “नानांचा जन्म बोर्डी मध्ये 22 ऑगस्ट अठराशे 92 रोजी झाला.बोर्डीत हायस्कूल शिक्षणाची त्यावेळी सुविधा नसल्याने ते मुंबईत शिक्षणासाठी गेले व आर्यन हायस्कूल मधून मॅट्रिक पास झाले पुढे अहमदनगर व पुणे येथे मेडिकल कॉलेजांत शिक्षण घेऊन त्यांनी ही पदवी मिळविली.डॉक्टरकीची सनददेखील त्यांना मिळाली. काही काळ त्यांनी डॉक्टर म्हणून सेवाही दिली. परंतु त्यात त्यांचे मन रमेना. मुंबईत असतानाच त्यांनी लंडन चेंबर ऑफ कॉमर्स या जगप्रसिद्ध संस्थेच्या विविध शाखेतील पदवीकांचा अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा दिल्या व सर्व परीक्षांत,पहिल्या वर्गात पास झाले. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच त्यांनी  अकाउंटिंगच्या क्षेत्रातही पारंगतता मिळविली. वैद्यकीय सेवा केवळ योगक्षेमासाठी करणार नाही यासाठी ही कॉमर्स क्षेत्रातील या ऊच्च पदविका त्यांनी मिळविल्या..त्या पात्रतेनुसार, ब्रिटिश कालीन, मुंबई महापालिकेच्या, बी ई एस टी कंपनीत  कॅशीयर म्हणून त्यांना नोकरी मिळाली .त्याकाळी बी ई एस्  टी मध्ये एवढ्या मोठ्या हुद्याची नोकरी मिळणे हे मोठे भूषणावह होते. कर्मधर्म संयोगाने 1920 साली, त्यांचे गुरूजी,टी ए कुलकर्णी यांच्या पुढाकाराने बोर्डीत हायस्कूल सुरू झाले होते.” ही शाळा माझ्या गुरूंनी,माझ्या गावी, स्थापना केली आहे. तेथे माझे योगदान जास्त आवश्यक आहे”, केवळ या उदात्त भावनेने, आपली मोठ्या पगाराची, मोठ्या मानाची नोकरी तडकाफडकी सोडून ते बोर्डी हायस्कुलात दाखल झाले..या शाळेत त्यांनी विनावेतन अखेरपर्यंत सेवा दिली.याच भावनेने कै. आत्माराम पंत सावे यांनी आपल्या गावांतील या शाळेला सेवा दिली आहे.

      “प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्णी हे वडिलांचे गुरुजी. शिक्षणानंतर ही त्यांच्याशी वडील संपर्कात होते. त्यांनी आग्रह करून कुलकर्णी सरांना बोर्डीस घरी आणले. माधव मामांची गाठ घालून दिली. ही गाठभेट बोर्डीच्या शैक्षणिक, सांस्कृतिक जीवनाला कलाटणी देणारी ठरली. त्यावेळी श्री गोविंदराव चुरी बोर्डीत चौथीपर्यंत इंग्रजीचा वर्ग चालवीत होते. पुढे आत्माराम पंत सावे पदवीधर होऊन आले आणि त्या क्लासमध्येच शिकवू लागले. माधव मामांनी कुलकर्णी सरांना विनंती केली, ” सर आम्हाला चौथीपर्यंत शाळा गावात काढून द्या” तेव्हा कुलकर्णी सरांनी म्हटले ,”चौथी कशाला तुम्ही गावकरी मला सहकार्य देत असाल, तर आपण मॅट्रिकपर्यंत शाळा सुरू करू!” व खरोखर त्यावेळी गावांतील अनेक  लोकांनी, विशेषतः, मुकुंदराव सावे ,गोपाळराव पाटील, यानी पूर्ण सहकार्य देण्याचे मान्य करून, बोर्डीत मॅट्रिक पर्यंत शाळा सुरू झाली. पुढे यथावकाश आचार्य भिसे, आचार्य चित्रे या गुरुवर्यांनी या शाळेत सेवा देऊन एक  नवा इतिहास घडविला, तो सर्वांनाच ज्ञात आहे. एका कल्पवृक्षाचे बीज लावण्याला माझे बाबा आणि आमच्या  राऊत कुटुंबाचा हातभार लागला हे आम्ही सद्भाग्य समजतो. डाॅ.जयंतरावांनी हा इतिहास त्यांच्या लिखाणात लिहून ठेवला आहे.”

      ” विशेष म्हणजे कुलकर्णी सरांच्या पत्नीही डॉक्टर होत्या.  त्यांना ही बोर्डीचे खूप आकर्षण होते. त्याही सेवाभावी वृत्तीच्या होत्या. त्यांनी त्या काळात बोर्डी गावातील आदिवासी विभागात अनेक उपक्रम राबविले आहेत. 1919 च्या इन्फ्लूएंजा  साथीत यांनी  औषधे पुरविली व घरी जाऊन रुग्णांची सेवा केली आहे. संतती नियमनाचा प्रचार ही या मॅडमनी, आदिवासी भागात केला होता. विशेष म्हणजे,  आपल्या पतीच्या व  आपल्या समाजसेवेत व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी,स्वतः, संतती नियमनाची शस्त्रक्रिया करवून घेऊन मुले होऊ दिली नव्हती. कुलकर्णी दांपत्य खरेच खूप महान पती-पत्नी होते, त्यांचे आशीर्वाद आमच्या गावास मिळाल्याने आज आमच्या शाळेला, गावाला हे वैभवाचै दिवस पहावयास मिळतात अशी माझी भावना आहे “

 आपल्या ज्येष्ठ व कनिष्ठ बंधूंना, त्यांच्या राजकीय व समाज कार्यासाठी, संपूर्ण सहकार्य देणारे कै.दामोदराव राऊत,आप्पा

    दिनकरसरांनी आपल्या वडीलांविषयी  सांगितलेल्या आठवणी खूप बोलक्या आहेत. प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्णीसारख्या एका महान समाजसेवक व शिक्षणतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला व आचार्य भिसे, आचार्य चित्रे, गुरुवर्य आत्माराम पंत सावे या सारख्यांच्या संपर्कात राहून काम केलेला एक हाडाचा शिक्षक, कधीच समाजसेवेत मागे पडणार नाही. आपल्या केवळ 62 वर्षांच्या आयुष्यात मदनरावांनी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात, समरसतेने भाग घेऊन, अनेक समस्यांचे आपल्यापरीने निराकरण करण्यासाठी, जे योगदान दिले आहे त्याचा वर केलेला  ओझरता उल्लेख जरी पाहिला तरी या त्यांच्या निरलस निरपेक्ष कार्याची ओळख पटते. 

     बोर्डी येथील नव्याने सुरू झालेल्या ,पद्मभूषण ताराबाई मोडक यांच्या ग्रामबाल विकास केंद्रात ,त्यांना सर्वतोपरी सहकार्य, संस्थेचे पहिले उपाध्यक्ष म्हणून भरीव योगदान, ,बोर्डीतील सरकारी ट्रेनिंग कॉलेज मध्ये शिकाऊ शिक्षकांना  मार्गदर्शन, सतत संपर्क, आचार्य भिसे यांच्या आदिवासी सेवा कार्यात त्यांना मदतीचा हात, तसेच आमच्या परिसरातील कोणत्याही सामाजिक ,शैक्षणिक संस्थेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या मनापासून योगदान, हे सर्व त्यांच्या,निरलस,अखंड,सेवावृत्तीचे निदर्शकआहे !

कै. मदनरावांचे ज्येष्ठ बंधू,” बोर्डीचा सिंह”, कै. महादेवराव  राऊत उर्फ माधव मामा

       मदनरावांनी  अनेक उपक्रम  आपल्या गावासाठी समाजासाठी, वंचीत जनतेसाठी ,समाज बांधवांसाठी केले. मात्र त्यांच्या वागण्या-बोलण्यात अहंकाराचा दर्प कधीच नव्हता सदैव त्यांच्या चेहऱ्यावरील ते मृदू हास्य व वागण्यातील ऋजुता तीच होती. हेच त्यांच्या जीवनाचे मोठे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही प्रकारचे आकांडतांडव न करता सौम्य, शांत, मृदू, मधाळ शब्दात, लोकांशी व सरकारी अधिकाऱ्यांशी आपल्या मुलांशी बोलून, आपली कामे व्यवस्थित करता येतात, हे त्यांच्या आयुष्याचे मोठे रहस्य आहे. त्या विषयीदेखील त्यांच्या आठवणी व माझे  थोडे विवेचन, माझ्या परीने पुढे करणारच आहे.

      मनात श्रध्दा आणि समाजाविषयी तळमळ असेल तर या गोष्टी शक्य होतात. जगांतील सर्व महान मानवतावादीं लोकांच्या  चरित्रात  या दोन गोष्टींचेच नेहमी  दर्शन होते. समाजाच्या उन्नतीसाठी आपण काय करावे याचे चिंतन सतत असावे लागते. देशाच्या उत्थापनासाठी अगदी तळागाळातील नागरिकांचे वर्तन वा आचरण कसे असावे,या विषयी ‘ग्रामगीते’त, संत तुकडोजी महाराज म्हणाले होते,

    प्रथम पाया मानव वर्तन। यास करावे उत्तम जतन। 

     गाव करावे सर्वांगपूर्ण। आदर्श चित्र विश्वाचे।|

मानवी संस्कृती चांगली राहण्यासाठी प्रत्येक मानवात चांगले विचार असतील, तरच एकमेकांना पूरक कामे होतील. त्यांच्यात परोपकार दिसून येईल. त्यामुळे खेडे हे देशाचेच नव्हे, तर विश्वाचे पहिले प्रतिक आहे. या खेड्यावरून देशाचीच नव्हे, विश्वाची ओळख होत असते. इतके सर्वव्यापी आणि विशाल हृदयाचे दर्शन, ग्रामगीतेत संत तुकडोजी यांनी सांगितले आहे. कै.मदनरावांनी, ही गीता वाचली होती किंवा नाही मला खरेच कल्पना नाही, मात्र ज्या तळमळीने, निष्ठेने त्यांनी आपली ग्रामसुधारणांची, तळागाळातील माणसाच्या हितासाठी, व समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनाची कामे केली ते पाहून आपण आश्चर्याने थक्क होतो, नतमस्तकहोतो.  

        कै.मदन रावांच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वाटचालीस त्यांचे गुरू प्रिन्सिपल कुलकर्णी ,ज्येष्ठ बंधू माधव मामा यांचा मोठा वाटा जरूर बरोबर त्यांचे वडील लक्ष्मणराव राऊत यांच्या मानवतावादी व कृतिशील जीवनातचा मोठा परिणाम झाला होता. बोर्डीतील जुनी मंडळी नानांचे वडील,  कै. लक्ष्मणराव राऊत यांच्या विषयी एक गोष्ट सांगत असत, त्यावरून कै.मदनरावांच्या बालमनावर झालेल्या सुसंस्कारांची जाणीव होते.

     वडील लक्ष्मण रामा राऊत हे प्रथमपासून एक ईश्वरनिष्ठ सज्जन व्यक्तिमत्व. नागणकस, अस्वाली या  पूर्वेच्या डोंगर रांगांत त्यांची जमीन, शेती होती. तेथे जावयास ते दोन घोड्यांचा टांगा वापरीत, म्हणून गावातील लोक,’ घोडे राऊत’, या सन्माननीय नावानं त्यांना ओळखीत. लक्ष्मणरावांना गरीबाबद्दल खूप आपुलकी, आस्था.. गावाच्या बाहेर हरीजन, दलितांची वस्ती होती, आजही आहे. त्या वाड्यातील हरिजनांना अर्थप्राप्तीचा व्यवसाय नसल्याने खूप हलाखीत दिवस काढावे लागत होते. लक्ष्मण राऊतांनी जंगलातले बांबू आणून या हरिजन वस्तीला बुरुड काम करण्याचा सल्ला दिला, मार्गदर्शन केले. हरिजनांनी विणलेल्या टोपल्या, करंडे, खरेदी करून शेतातला भाजीपाला मुंबईच्या मंडईत ते स्वतः पाठवू लागले. स्पृश्यास्पृश्यता कडक असलेल्या त्या जमान्यात हे फार मोठे धाडस होते. तत्कालिन गावकऱ्यांना ही कृती पटली नाही. ‘घोडे राऊत’, या सन्माना ऐवजी,’धेडू राऊत’ हे अवहेलनात्मक संबोधन त्यांच्या पदरी आले. प्रस्थापित प्रवाहाविरुद्ध काम करणाऱ्या लोकांना समाजाचा रोष सहन करावाच लागतो. हळूहळू बोर्डी गावांतील शेतकऱ्यांचा रोष कमी झाला, लोक हरिजनांनी विणलेल्या बांबूच्या टोपल्या, करंडे विकत घेऊ लागले.निश्चितच दीडशे वर्षांपूर्वी टाकलेले हे खूप धाडसी पाऊल होते. हीच दूरदृष्टी, धाडस व सहसंवेदना मदन मामांच्या रक्तात आली असावी.

        मदनरावांच्या व्यक्तिमत्वात  एक वेगळेपण होते.  त्यांच्या वागण्या-बोलण्यात त्याचा प्रत्यय येई. व्यक्तिमत्वातील ही शालीनता, मार्दव  योगायोगाने आले नव्हते. पूर्वजांची पुण्याई व त्याचबरोबर अध्यात्मिक साधनेतील उंची, नित्य ध्यानधारणा, अध्यात्मिक वाचन या सर्वांचा तो अनोखा संगम होता. नाशिकच्या श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराजांना ते गुरुस्थानी मानीत. अध्यात्म क्षेत्रातील अनेक अधिकारी व्यक्तींबरोबर त्यांची मैत्री होती.

    मदन रावांना पाच अपत्ये, हरिहर, पुरुषोत्तम व दिनकर हे तीन पुत्र व बेबी ताई,चंपू ताई या दोन कन्या.

     ज्येष्ठ पुत्र हरिहर अतिशय अभ्यासू व मितभाषी होते. बोर्डी हायस्कूल मधून मॅट्रिक झाल्यावर, मुंबईत वकिलीचा अभ्यास केला. तेथे उत्तम रित्या कायद्याची पदवी घेऊन,1945 आली ते इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी रवाना झाले. ही मानाची पदवी घेणारे आमच्या समाजातील से पहिले नामांकित बॅरिस्टर. येथून त्यांनी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात  उमेदवारी करून अनुभव घेतला त्याचीही सनद मिळविली. आमच्या समाजातच काय ,संपूर्ण महाराष्ट्रात, कायद्याच्या क्षेत्रात एवढे ऊच्च शिक्षण घेणाऱ्या व्यक्ती अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या होत्या. भारतात आल्यावर,” इंटरनॅशनल लाॅ”, या नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. मुंबईतील प्रख्यात कायदे विषयक सल्ला देणारी कंपनी ,”मुल्ला अँड मुल्ला” या कंपनीत  नोकरी केली. अनेक मोठ्या अशीलांसाठी, कंपनीतर्फे बाजू मांडली. अनेक किचकट, कायदेशीर लढतीत त्यांनी आपल्या कंपनीमार्फत, अशिलांना विजय मिळवून दिला.बोर्डी  ग्रामपंचायतीस, धर्मशाळेचा कब्जा मिळवून देण्यात ,अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत लढत देऊन, कायदेशीर लढाई जिंकली. त्यामुळे आमच्या परिसरांतील शेतकरी व नागरीक त्यांचे ऋण नेहमीच मान्य करतात.

      दुर्दैवाची गोष्ट अशी की भारतात परतल्यावर बोर्डी गावाने ही, त्यांनी मिळविलेल्या या उज्वल यशाची दखल न घेता त्यांचा साधा सत्कारही केला नाही .कारण? कारण ते समाजवादी विचारसरणीचे होते व त्यावेळी बोर्डी गावात काँग्रेसी विचारांचा जबरदस्त पगडा होता. मात्र , समाजवादी विचारांच्या पंढरीनाथ चौधरी, नवनीत भाई शहा, अशा कार्यकर्त्यांनी विरार येथे, साने गुरुजींच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार केला. त्यानंतर बोर्डी येथील एक समाजवादी नेते आत्माराम सावे यांनी, बोर्डी गावात ,सानेगुरुजींच्या हस्ते त्यांचा मोठा सत्कार केला..

           माझा व बॅ. हरिहर रावांच्या कुटुंबाचा वैयक्तिक परिचय होता. त्यांना आम्ही दादा म्हणत असू. दादांच्या सुविद्य पत्नी सौ सुशीला ताई आमच्या दादी होत! या कुटुंबाचे वास्तव्य वेळी,दादर मधील, शारदाश्रम गृहसंकुलात असल्याने व माझेही वास्तव्य शिक्षणानिमित्त व विद्यार्थी  वसतिगृह रेक्टर म्हणून,दादरच्या अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरातील, तात्यासाहेब स्मारक चुरी वसतिगृहात, असल्यामुळे,ही ओळख झाली .दादी आमच्या सो क्ष समाजाच्या चिटणीसही होत्या. त्यामुळे कार्यालयात आल्यावर वस्तीगृहातील मुलांचीही आस्थेने चौकशी करीत. अडचणी असल्यास अगदी स्वतः कोशिश करून प्रसंगी आर्थिक बाजू सांभाळून निराकरण करीत. आमच्या वस्तीगृहाची एका वर्षीची वार्षिक सहलदेखील त्यांच्या भांडुप येथील फार्म हाऊसवर ,आम्ही नेली होती. सकाळच्या चहा नाश्ता पासून ते दुपारचे भोजन व सर्व व्यवस्था, दादींनी जातीने व उत्तम प्रकारे केली होती, याची आजही वसतिगृहवासी आठवण करतात. हे दांपत्य अतिशय प्रेमळ, सेवाभावी व शिक्षणप्रेमी असे होते. दुर्दैवाने आज हे दोघेही पती पत्नी हयात नाहीत. 

   दादांबद्दल सांगावयाची विशेष गोष्ट म्हणजे त्या वेळी पालघर विधानसभा मतदार संघातून त्यांनी समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढविली व जिंकून आले.  नवनीत भाई शहा व श्री. नाना पिलाजी राऊत यांनी खूप मेहनत घेऊन हा विजय मिळवून दिला होता. मात्र राजकारण हा दादांचा पिंड नव्हता ,त्यामुळे त्यांनी  या क्षेत्रात पुढे लक्ष दिले नाही.

    नानांचे  दुसरे चिरंजीव श्री. पुरुषोत्तम हेदेखील उच्चविद्याविभूषित होते. त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम ए पदवी घेतल्यानंतर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून कामगार विषयक कायद्यांची पदविका घेतली. एक उत्कृष्ट व्यवस्थापन तज्ञ म्हणून उद्योग क्षेत्रात काम केले. झंडू फार्मास्युटीकल या प्रसिद्ध उद्योग समूहात लेबर ऑफिसर म्हणूनच  काम करीत असताना तेथे युनियन व कामगार संपामुळे वातावरण  बिघडले होते. डॉ. दत्ता सामंत,आर. जे. मेहता, अशी कामगार क्षेत्रात  मोठी मंडळी कामगारांचे नेतृत्व करीत होती. पुरुषोत्तम यांनी आपल्या कामगारांना विश्वासात घेतले, कंपनी बरोबरील वाद सामोपचाराने ,मिटविला. कामगारांना  त्यांचे न्याय्य हक्कही मिळवून दिले. कामगार संघटनांना कंपनीत काहीच महत्व राहिले नाही. कर्मचारी पुरुषोत्तम त्यांना ‘कामगारांचा देव’, मानू लागले. एक चमत्कार त्यांनी या उद्योग समुहात घडवून आणला. 

        पुरुषोत्तम जरी व्यवस्थापन क्षेत्रात असले तरी त्यांचा पिंड हा लेखकाचा होता. वाङ्मयीन क्षेत्रातही मुशाफिरी चालू होती. फावल्या वेळात त्यांनी ‘मेढेकोट’- कादंबरी, ‘विविधांगी’-चरित्रकथा, ‘ठेव प्रीतीची’- कादंबरी अशी तीन पुस्तके लिहिली. प्रख्यात साहित्यिका दुर्गाबाई भागवत यांचे हस्ते या तिन्ही पुस्तकांचे उद्घाटन त्यावेळी झाले होते. मराठी वाङ्मयीन क्षेत्रात पुरूषोत्तम यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. प्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार माधव गडकरी, पा. वा. गाडगीळ, प्रभाकर पाध्ये यांच्याशी त्यांचा वैयक्तिक परिचय होता.

     संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही पुरुषोत्तम यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन राजकीय क्षेत्रही गाजविले. शिरगाव -गुजरात येथील परिषदेत त्यांनी केलेल्या प्रभावी वक्तव्यामुळे नियामक समितीत त्यांची निवड झाली व त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा फायदा तत्कालीन नेतृत्वाला झाला.या चळवळीच्या निमित्ताने प्रबोधनकार ठाकरे व आचार्य अत्रे ही दिग्गज मंडळी त्यांनी त्या काळी बोर्डी गावात आणली होती. त्या सभा गाजल्या होत्या.

    व्यवस्थापन वांग्ङमय व राजकारण या क्षेत्रात यशस्वीपणे संचार करून एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून पुरुषोत्तमरावांनी आपला ठसा उमटविला. त्यांचा व माझा विशेष परिचय नव्हता. एक दोन वेळा आपले ज्येष्ठ बंधू दादा, यांचेकडे दादरला आले असताना त्यांची व माझी  ओझरती भेट झाली होती. मात्र पुढे तो परिचय पुढे राहिला नाही.

    तिसरे चिरंजीव म्हणजे दिनकर राऊत सर. आपल्या पिताजींचा, ज्ञानदान व समाजसेवेचा वारसा, खऱ्या अर्थाने बोर्डी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करताना पुढे चालविला. मॅट्रिकनंतर पुण्याच्या शेतकी महाविद्यालयात,’ एग्रीकल्चर डिप्लोमा’, ‘टीचर्स  डिप्लोमा’, आणि माध्यमिक शिक्षकांसाठी आवश्यक,’ एस टी सी’,( सेकंडरी टीचर्स कोर्स) पूर्ण करून चित्रे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली  हायस्कुलात दीर्घकाल सेवा केली.

    अर्थातच शेती विषयात पदविका व कामाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे, शाळेत त्यांनी एस एस सी साठी,क्राॅप अँड ऍनिमल हजबन्ड्री, तसेच  ‘विलेज अंड साॅईल मॅनेजमेंट’, हे दोन विषय अतिशय समर्थपणे शिकविले.अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित या विषयांचे वावडे असल्याने ते शेती विषय घेऊन एस एस सी परीक्षा सहज उत्तीर्ण होत असत.एक विद्यार्थीप्रिय, तज्ञ शिक्षक असा लौकिक दिनकर सरांनी मिळविला.  त्यांच्या नोकरीच्या अखेरच्या  काळात उद्भवलेल्या संघर्षाविषयी व्यथित अंतकरणाने ते म्हणतात,

      “दुर्दैवाने  शाळेची अनेक वर्षे सेवा झाल्यानंतर, अखेरच्या सेवाकालांत ,अचानक सोसायटी विरुद्ध गाव असा तात्त्विक संघर्ष सुरू झाला. त्यावेळी मी व माझ्या काही जुन्या सहकाऱ्यांनी, शिक्षकांनी गावाच्या बाजूने उभे राहून, संस्थेचा रोष ओढवून घेतला. माझी बदली अहमदनगर येथील संस्थेच्या शाळेत केली गेली. हा माझ्यावर अन्याय होता. मी संस्थेकडे त्याचा निषेध व्यक्त केला. वकिली सल्ला घेऊन न्यायालयात केस दाखल केली. चित्रे गुरुजींना, ही बदलीची बातमी समजली होती, त्यांनाही खूप वाईट वाटले. त्यांनी मला धीर दिला. मी वैद्यकीय रजा घेऊन नगरला गेलोच नाही.अर्थातच काही महिन्यातच, माझा सेवाकाल  संपला व मी संस्थेच्या सेवेतून मुक्त झालो. अजूनही समाज सेवा करण्याची उर्मी संपलेली नाही. बोरीगाव येथील आचार्य भिसे शिक्षण संस्थेत उपाध्यक्ष म्हणून योगदान देतो आहे. ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघात दोन वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले.  बोर्डीच्या माजी विद्यार्थी संघातही सेक्रेटरी म्हणून काही काळ सेवा दिली.”

कै माधवराव राऊत यांचे समवेत ,त्यांच्या पुढच्या पिढीतील शिलेदार..

     आज नव्वदीत असलेल्या दिनकरसरांचा उत्साह, स्मरण शक्ती, शाबूत असून अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची त्यांची जिद्द ही वाखाणण्याजोगी आहे.

      मदनरावांना दोन कन्याही होत्या. मोठ्या  बेबीताई या आगाशी येथील सदानंद म्हात्रे यांच्या पत्नी होत. बेबीताई मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने बोर्डीला  नेहमी येत असत.माझा त्यांचेशी परिचय होता. त्यांचे यजमान सदानंदराव म्हात्रे हे आमच्या सोक्ष संघाचे एक सक्रिय कार्यकर्ते. त्यांचा व माझा खूप चांगला परिचय होता. त्यांच्या आगाशी चे घरीही एक दोनदा  जाऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारण्याचा योग आला होता. अतिशय सेवाभावी व समाधानी असे हे दांपत्य होते.

    दुसऱ्या कन्या चंपू ताई यांचा विवाह अमरावतीचे प्रोफेसर वासुदेवराव काळे यांच्याशी झाला होता. विवाहानंतर त्यांचा बोर्डीशी संपर्क खूपच कमी झाला. मात्र विवाहापूर्वी पद्मविभूषण ताराबाई मोडक यांनी नव्यानेच सुरू केलेल्या बालवाडीत शिक्षिका म्हणून त्या सेवा देत होत्या. माझ्या, “पद्मविभूषण ताराबाई मोडक”, लेखात मी त्यांचा विशेष उल्लेख केला आहे . त्या काळातील,आम्हा मुलांना, मोठ्या मिनतवारीने,गोडी गुलाबीने, घरून अक्षरशः  पकडून ,बालवाडीत आणणे व बालवाडी संपल्यावर पुन्हा घरी पोचविणे हे अतिशय  कष्टाचे व जोखमीचे काम चम्पूताईंनी खूपच तळमळीने केले.त्यांचे बोलणे, वागणे ही  वडिलांप्रमाणेच अत्यंत प्रेमळ व लाघवी असे होते.  बालवाडीच्या अगदी प्राथमिक अवस्थेत अशाप्रकारे मुलांना गोळा करून त्यांचेवर सुसंस्कार करण्याचे महान काम चंपूताईंनी ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. आम्हालाही उपकृत केले आहे.

  कै. नानांचे द्वितीय पुत्र पुरुषोत्तमराव हे थोडे तापट स्वभावाचे. ‘भावी आयुष्यात असा शीघ्रकोपी स्वभाव कसा हानीकारक ठरू शकतो’, ही जाणीव आपल्या पिताजींनी किती, सहज,सुंदर रीतीने आपल्याला करून दिली, याची एक आठवण त्यांच्याच शब्दात देतो..

    “आज प्रकर्षाने आठवतो तो नानांचा प्रेमळ सोनस्पर्श. त्यांनी आयुष्यभर प्रेमचं वाटलं. ते वाटतांना गरीब-श्रीमंत, गावचे गावाबाहेर जातीचे,  जातीचे परजातीचे  असा भेदभाव कधीच केला नाही. ‘आपल्या जवळ देण्यासारखं जे चांगलं आहे, ते निर्विकार आणि निर्मोही भावाने दुसऱ्यांना द्यावं’, हीच त्यांची वृत्ती होती. मी कॉलेजात दाखल झालो आणि ती नाना यांनी पितापुत्र नात्याऐवजी एक मित्र, सहकारी या नात्याने वागविले. त्यांना येणाऱ्या पत्रावर सुद्धा आम्ही मोकळेपणानं चर्चा करीत होतो. एकदा पालघर तालुक्यातील एका कार्यकर्त्यांचे त्यांच्यावर रागाचा वर्षाव करणारे पत्र आले होते. त्याचा आरोप होता की,पालघर तालुक्यातील एका कार्यक्रमाचे त्याला आमंत्रण नव्हते.”तुम्हा नेत्यांना फक्त काम करण्यासाठीच कार्यकर्ते हवे असतात, इतर वेळी आमचा सोयीस्कर विसर पडतो”, असा त्यांचा आक्षेप होता. ते पत्र वाचून माझा राग अनावर झाला. मी म्हणालो,” मी या पत्राचे उत्तर लिहितो.चांगली हजामत करतो.” त्यावर नाना म्हणाले,” हे पत्र त्यांनी मला लिहिले आहे.तुला नाही.त्याला उत्तर देणं हे माझं काम आहे.” टेबलावर पत्र जोराने आपटून मी निघून गेलो.त्या पत्राचा विषय मी काढला नाही. आठवड्यानंतर नानांनी मला बोलून त्या पत्र लेखकाचं,त्यांना आलेला उत्तर मला वाचायला दिलं. त्या कार्यकर्त्यांनी त्या पत्रात क्षमा मागितली होती, कारण नानांनी त्या कार्यकर्त्याला सौम्य शब्दात लिहिलं होतं, 

  “सदर कार्यक्रमाचे मला आलेले निमंत्रण पत्र तुमच्या माहितीसाठी पाठवीत आहे. कार्यक्रम आयोजकांना तुमचा विसर पडला असेल तर तो माझा दोष आहे का?” 

  ती. पू.नाना मला म्हणाले “असं रागावून चालत नसतं. सार्वजनिक जीवनात मन शांत ठेवूनच लोकांशी वागलं पाहिजे, कडक भाषा शत्रुत्व निर्माण करते “. न रागावता नानांनी दिलेला हा बोधपाठ माझ्या पुढील आयुष्याच्या वाटचालीत खूप उपयोगी ठरला.”

     ” कै,पू. नाना बरोबर आणखी एका प्रेमळ झटापटीची आज नव्याने आठवण होते. 1947साली मी विल्सन कॉलेजात शिकत होतो.एके दिवशी ती. नाना मला भेटावयास कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये आले होते. माझ्या टेबलावर गुजराती साहित्यिक झवेरचंद मेघाणी  यांची तीन चार पुस्तके पडलेली होती. खोलीत जमलेले मित्रही गुजरातीच होते. बोलणं गुजरातीत. मित्र ऊठून गेल्यावर, ती. नाना यांनी माझी फिरकी घेतली. “पुरुषोत्तम मला वाटतं, चार शुद्ध ओळी मराठी भाषेत लिहिणे तुला जमणार नाही!” त्यावर मी त्यांना काहीच उत्तर न देता त्यांचे आव्हान मनातल्या मनात स्वीकारने. त्यावेळी आमच्या घरी पुण्याचे’ चित्रमय जगत’, हे भारदस्त मासिक येत असे. त्या मासिकाला’ मेढेकोट’, ही कथा लिहून लगेच पाठवून दिली. लेखकाचं नाव, मदनकुमार राऊत, असं मुद्दाम लिहिलं. आठवड्याच्या आतच चित्रमय जगतच या संपादकांचे “कथा आवडली, पुढच्या महिन्याच्या अंकात छापली जाईल”,असे ऊत्तरआले. मला खूप आनंद झाला. ही गोष्ट मी नानांना न कळवता पुढच्या महिन्यात, ‘चित्रमय जगत’ चा अंक घरी आल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होते याची वाट पाहत स्वस्थ बसलो. अंकातील माझी सदर कथा नानांनी वाचली. त्यांचं पत्र आलं,

   “तू इतकं सुंदर मराठी लिहू शकतोस, याची मला कल्पना नव्हती. तुझं अभिनंदन. माझा पराजय मी अभिमानपूर्वक स्विकारतो!” 

   नाना यांनी माझा स्वाभिमान डिवचला म्हणून माझ्यातला सुप्त लेखक जागा झाला.त्याचबरोबर नानांच्या खिलाडूवृत्तीचं सुद्धा मनोहर दर्शन लाभलं .स्वतःहून मुलांपुढे आपला पराजय मान्य करण्याचा दिलदारपणा कोणता बाप दाखवील?

पुरुषोत्तम रावांच्या या आठवणींतून नाना,एक धीरोदात्त समाजसेवक,  एक वत्सल पिता,आणि एक संवेदनशील माणूस म्हणून किती थोर होते यांचे दर्शन होते.

आजमीतीस कै,मदनरावांच्या अपत्यांपैकी वयाची ,नव्वदी पार केलेले  श्री दिनकर राऊत सर हे एकटेच हयात आहेत.

    कै लक्ष्मणराव रामा राऊत यांचे तीन चिरंजीव. ज्येष्ठ महादेवराव राऊत(तात्या), मधले दामोदरराव राऊत,(आप्पा) व कनिष्ठपुत्र मदनराव राऊत(नाना). कै महादेवरावांना सर्व समाज माधवराव राऊत म्हणूनच ओळखतो.

पिताश्री कै.लक्ष्मण रामा राऊत, यांचे समवेत त्यांचे तीन सुपुत्र, मागे उभे असलेले मदनराव, दामोदरराव व खाली खुर्चीवर बसलेले माधवराव. एक दुर्मिळ छायाचित्र

 श्री माधवराव हे ठाणे जिल्ह्यातले मोठे राजकीय नेते होते. लोकमान्य टिळकांचे अनुयायी. कामाचा व्यापही मोठा. त्यांचे दौरे, सभा-संमेलने सतत चालू असत.अनेक कार्यकर्ते त्यांचा सल्ला मागण्यास बोर्डीस येत. दिवसभर पाहुण्यांची वर्दळ असे. त्यांना जेवण, चहा, नाश्ता यात घरातल्या स्त्रियांचा सारा वेळ जाई. श्री माधवराव मनाने प्रेमळ पण त्यांचा आदर युक्त दरारा मोठा. ब्रिटिश सत्तेला निडरपणे, परखड शब्दात आव्हान देणाऱ्या या नेत्याची लोकातही जरब. राहते घर ब्रिटिश सरकारने जप्त करून पोलीस पहारा बसविला. पण माधवराव नमले नाहीत. सरकारने त्यांना स्थानबद्ध केले. मदनरावांनी भावाच्या कार्याची धुरा त्या कालांत वाहिली. माधव रावांना, ‘बोर्डीचा सिंह’, तर मदनरावांना, ‘बोर्डीची माता’, ही उपाधी लोकांनी उत्स्फूर्तपणे दिली होती.

         मधले बंधू श्री दामोदर राऊत ऊर्फ आप्पा, यांनी घराचा व संपूर्ण कुटुंबाचा प्रपंच सांभाळला.  राऊत कुटुंबाच्या घराची शान व मान कधीच कमी होऊ दिला नाही.आपल्या थोरल्या आणि पाठच्या भावांना, कुटुंबाच्या हितापेक्षा समाजाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी, मुक्तांगण देऊन राऊतांच्या प्रपंचाची विनातक्रार अहोरात्र धुरा सांभाळणाऱ्या कै. दामोदर राऊत यांनी अप्रत्यक्ष मोठी समाजसेवा आणि राष्ट्रसेवा केली, त्याचे मोल करता येणार  नाही. ती आप्पा, राऊत कुटुंबाचे खऱ्या अर्थाने आधारवड होते.

 कै.यमुनाबाई माधवराव, कै.जयाबाई दामोदरराव, व कै.लक्ष्मीबाई मदनराव या कै.लक्ष्मण रामा राऊत यांच्या तिन्ही स्नुषा साक्षात अन्नपूर्ण होत्या. तीनही बंधू आपापल्या क्षेत्रात कार्यरत असताना, येणाऱ्या अनेक पैपाहुण्यांचे,आल्यागेल्यांचे  आतिथ्य सांभाळणे, व मुलाबाळांवरही लक्ष ठेवणे हे सोपे काम नव्हते. ते त्यांनी यशस्वीपणे केले.

आपल्या पतींना त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याला आपली स्वतःची सुखदुःखे विसरून साथ देणाऱ्या या गृहलक्ष्मींनी, राऊत कुटुंबाच्या ऐक्याला जराही धक्का न लागू देता कुटूंबाची शान समाजात वाढविली.

कै.लक्ष्मणराव राऊतांच्या तीन स्नुषा, साक्षात अन्नपूर्णा! कै. यमुनाबाई माधवराव राऊत,कै. लक्ष्मीबाई मदनराव राऊत,कै. जयाबाई दामोदर राऊत.

  कै. मदनरावाप्रमाणेच कै. माधव मामा व कै. दामोदरराव यांच्या दर्शनाचा व सानिध्याचा लाभ, प्रसंगानुरूप मला बालपणी झाला. ही तीनही महान व्यक्तिमत्वे बोर्डीत त्यावेळी आमच्या आसपास वावरत होती हे केवढे महान सौभाग्य आमच्या वाट्याला आले होते, याची आज कल्पना येते. या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे, जयप्रकाश(बाळू) अरुण, प्रभाकर (बाबा) ही मंडळी शाळेत व हायस्कुलात माझ्या बरोबरच शिकत असल्याने राऊत कुटुंबीयांच्या घरी मधून मधून जात असे आणि तेव्हाच हे  भाग्य मिळे.

    मदनराव यांचा पिंड उपजतच गांधीवादी होता. हिंसेने आणि जबरदस्तीने समाजात बदल न घडवता, समाजाला सात्विक आणि निस्वार्थ प्रेमाने जिंकता येतं, यावर त्यांची श्रद्धा होती. आचार्य भिसे यांच्या आदिवासी सेवेच्या, मानवतेच्या सेवेत, श्री. मदनराव आघाडीवर होते. आदिवासी सेवा मंडळ, रचनात्मक गांधीवादी कार्य, सर्वोदय चळवळ आणि सामाजिक जागृतीच्या कार्याला त्यांनी सदैव वाहून घेतले होते.

      सर्व सामाजिक, राजकीय कार्य चालू असताना आपल्या गावाच्या हिताकडेही त्यांचे दुर्लक्ष झाले नाही. बोर्डीगावाचे, सरपंच म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत वाखाणली गेली होती. जिल्ह्याच्या, ‘व्हिलेज अपलिफ्टमेंट’, समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी बांधलेले लांबरुंद, भव्य रस्ते ही ठाणे जिल्ह्यासाठी त्यांची अविस्मरणीय कामगिरी होय. परिसरांतील गरीब व आदिवासींना ते मोफत औषधे देत असत.त्या काळात मदनरावांनी लोक हिताची अनेक कामे केली आहेत. बोर्डी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी अस्वाली नदीवर बंधारा घालण्याचे काम त्यांच्या प्रोत्साहनाने झाले आहे. दारूबंदीच्या कार्याला ही त्यांनी वाहून घेतले होते. 

आपल्यास आपणास दीर्घ आयुष्य नाही हे जणू त्यास कळून चुकले होते त्यामुळे उपलब्ध वेळेत जास्तीत जास्त समाजहिताची कामे पूर्ण करण्याचा झपाटा  त्यांनी लावला होता. 

    बोर्डीच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमधील प्राचार्य आणि शिक्षणार्थी शिक्षक तसेच पद्मभूषण ताराबाई मोडक यांच्या बालविकास केंद्रासाठी मदनराव आधारवडासारखेच होते हे मी मागे सांगितलेच आहे. सर्वांची आस्थेने विचारपूस करीत. 

    पाहता पाहता श्री. मदनराव ही एक संस्थाच झाली. अण्णासाहेब वर्तक, परशुराम धर्माजी चुरी( तात्यासाहेब),,बंधू माधवराव राऊत, तसेच वसईचे भाईजी जगू राऊत आणि गावोगावचे अनेक स्थानिक नेते यांनी सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाची स्थापना करून देहेरी ते वसई या परिसरात समाजोन्नती करण्याची चळवळ बांधली. मदनरावांनी या चळवळीतही स्वतःला झोकून दिले. समाजाला वेगळी कलाटणी देणाऱ्या या ऐतिहासिक कार्यात, एकूण 32 वर्षे हिशोब तपासनीस, चिटणीस, ट्रस्टी आणि उपाध्यक्ष या नात्याने समर्थपणे सेवा देऊन या चळवळीच्या रचनात्मक कार्याचा कणा त्यांनी सांभाळला. खूप वर्षापासून समाजात अनेक अनिष्ट प्रवृत्ती घर करून बसल्या होत्या.जुन्या अंधश्रद्धा पोषाखासंबंधीच्या सनातन रूढ कल्पना, विवाह ,हुंडा, मानपान, दारूव्यसन, अशिक्षित जीवन आदी अनिष्ट चालीरीती विरुद्ध अण्णासाहेब वर्तक आणि तत्कालीन समाज नेते यातील दुवा साधणारा एक मधाळ स्वभावाचा परंतु प्रभावी व्यक्तिमत्वाचा नेता म्हणून  मदनराव राऊत यांचे कार्य आजही हा समाज कृतज्ञतेने आठवतो .सोमवंशी क्षत्रिय संघाच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीने ठाणे जिल्ह्यातील मांगेला, भंडारी, वंजारी समाज  मागासलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या दबलेल्या समाजालाही परिवर्तनाची  स्फूर्ती मिळाली.म्हणून सर्व समाज या दूरदृष्टीनेतृत्वाचे ऋण आजही मान्य करतात. 

दादर येथील,पू. कै.अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरातील श्री. मदनराव राऊत यांचे तैलचित्र. 

       आमच्या दादर येथील अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिराचे मुख्य सभागारात, कै.मदनराव राऊत यांनी दिलेल्या योगदानाची कृतज्ञतापूर्वक आठवण ठेवण्यासाठी, त्यांचे तैलचित्र आजही मौजूद आहे. गतवर्षी संघ स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने,समाजाला नेतृत्व देऊन संघाची वाटचाल यशस्वी करण्यासाठी, ज्या ज्या व्यक्तींनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले, त्यांच्या कार्याची ओळख करून देणारा,” सोमश्री” हा विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला.कै. मदनराव यांच्या कार्याचा गौरव करताना  संपादक म्हणतात,

      “समाज सेवेच्या संस्कारात वाढलेल्या त्यांनी आपल्या संघाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले.सन 1920 मध्ये स्थापन झालेल्या संघाच्या स्वयंसेवक मंडळाच्या कार्यकारिणीत त्यांनी हिशोब तपासणीस म्हणून भूमिका बजावली. संघस्धापनेनंतर,संघाची घडी बसविण्यासाठी त्यांनी 27 वर्षे,( सन 1925 ते 1952), चिटणीस म्हणून सेवा दिली.पुढेसन 1952- 1953 मध्ये हिशोब तपासणीस,आणि 1953-1955 या काळात विश्वस्त आणि उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली.संघाचा रौप्यमहोत्सव,9परिषदा,3खानेसुमारी,या त्यांच्या सेवाकाळातील महत्त्वाच्या बाबींची नोंद घेणे आवश्यक आहे. ते सुट्टीच्या दिवशीही, अन्य समाजधुरीणांसह थेट दातीवरे गावापर्यंत फिरून,शिक्षण प्रचार,दारूबंदी व आरोग्याविषयक काळजी याविषयी जनजागृती करीत.समाजातील तरुणांना सामाजिक व राष्ट्रीय कार्याची प्रेरणा देणे,पत्रके तयार करणे, अहवालाचे काम पाहणे, यात ते सतत गर्क असत.”

   “सेवाभावी वृत्ती आणि मायभूमी वरील प्रेम,यामुळे ते मुंबईतील चांगल्या पगाराच्या नोकरीचा त्याग करून बोर्डीस परतले.बोर्डीतील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, आणि तेथेच विनावेतन शिक्षकी सेवेत रुजू झाले. शाळेचा हिशोबही ठेवीत असत. त्यांनी बोर्डी ग्रामपंचायतीचे सरपंच पदही भूषविले. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या विविध चळवळी आणि स्वातंत्र कार्यात सहभागी झाले.त्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला.आपल्या समाजाच्या पाच पोटजातींचे एकत्रीकरण करण्यासाठीच क्षात्रैक्यपरिषद स्थापनेतही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. अस्वाली नदीवरील बंधारा हे त्यांचे स्वप्न होते. अजातशत्रू मदनराव हे, ‘विलेज अपलिफ्टमेंट’ समितीचे चेअरमन आणि गावांतील विविध संस्थांचे आधारस्तंभ होते. बोर्डी बाल विकासकेंद्र उपाध्यक्ष, सर्वोदय कार्याचे पाठीराखे, आणि आदिवासींच्या उन्नतीसाठी धडपडणारे थोर समाजसेवक होते.”

    सो क्ष संघाच्या स्थापनेपासून(1920) ते आपल्या स्वतःच्या निर्वाणापर्यंत(1955), सतत दीर्घ सेवा देऊन, शिवाय आपली इतरही राजकीय, सामाजिक कौटुंबीक व्यवधाने सांभाळणे हे केवळ मदनरावा सारखा एक तपस्वी योगीच  करू शकतो!! त्यांच्या कार्यबाहुल्याला सलाम!!

  सन 1970साली, बोर्डीस झालेल्या सो क्ष संघाच्या सुवर्णमहोत्सवी परिषद निमित्ताने निघालेल्या स्मरणिकेत, देखील वरील प्रमाणेच,मदनरावांच्या कार्याची जाणीव ठेवून समाज नेतृत्वाने, त्यांना आदरांजली वाहिली आहे.

        दिनांक 3ऑगस्ट 1925 रोजी झालेल्या सो क्ष संघ कार्यकारिणीच्या सभेतील वृत्तांताच्या टिपणाचे हे शेवटचे पान आहे.

    ‘धाग्या वरून धाग्याची परीक्षा येते’ धन्य ते चिटणीस कै. मदनराव व धन्य त्यांचे सर्व सहकारी. शेवटच्या पानावरील मजकूर खालीलप्रमाणे आहे.

“श्री.गोविंदराव वर्तक यांनी दर साल प्रमाणे गावी औषधे फुकट वाटण्याकरिता रुपये ची रक्कम मंजूर करून घेतली वार्षिक परीक्षेत पास झालेल्या प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी संघामार्फत बक्षिसे देण्याकरिता असलेली पुस्तके स्थानिक चिटणीसांना देण्यात येऊन आपापल्या गावी त्यांचे मार्फत ती पुस्तके विद्यार्थ्यास देण्यात यावी असे सुचविले त्याचप्रमाणे क्षेत्र सेवक चा संपादकांकडून त्रैमासिक अंक मंडळींना देण्यात येऊन सभेचा कार्यक्रम संपविण्यात आला”

चिटणीस  मदनराव लक्ष्‍मण राऊत                    

अध्यक्ष  भाईजी जगू राऊत, बोर्डी, तारीख 3 ऑगस्ट 1925

      आपल्या सेवा निवृत्तीनंतर मदनरावांना  खूप काही करावयाचे होते. त्याचे नियोजनही त्यांनी केले होते, मात्र दुर्दैवाने प्रकृतीची साथ मिळेनाशी झाली. पायाचे दुखणे, इतर किरकोळ आजारामुळे कामावर निर्बंध येऊ लागले. मात्र जिद्द कमी झाली नव्हती.  आपला,’स्थूला तून सूक्ष्मा’, कडील प्रवास आता सुरू झाला आहे याची जाणीव त्या संत पुरुषाला कोठे तरी झाली असावी. 1955 च्या,जानेवारीत. काही भौतिक आजाराचे कारण होऊन मुंबईतील शीव येथील इस्पितळात त्यांना भरती करावे लागले. त्यांचे जिवलग मित्र डॉक्टर मधुकर राऊत आपल्या मित्राच्या प्रकृतीने घेतलेले गंभीर वळण पाहून, लगेच इस्पितळांत आले. त्यांच्या आजारपणात त्यांनी खूप सेवा केली. जणू गतजन्मातील त्या दोघांत काही नातं असावं. पण शेवटी तो 27 जानेवारी 1955 चा घातवार उजाडलाच! ‘बहुत जनांसी आधारू’, असलेला आधारवड कोसळला, समाजसेवा व ज्ञानदानाच्या  तेजोमय प्रांगणांत तळपणारा चित्सूर्य त्यादिवशी मावळला!!

    त्यांचे शव खास गाडीने मुंबईहून बोर्डीस आणण्यात आले. वाटेत अनेक संस्थांनी ,व्यक्तींनी त्यांच्या मृतदेहाला पुष्पहार अर्पण करून  मानवंदना दिली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बोर्डीच्या त्यांच्या घरी अमाप जनसागर लोटला होता. माझ्या सुदैवानै त्या गर्दीतही मी या महान पुरुषाचे अंत्यदर्शन घेऊ शकलो, याची आठवण आजही आहे. एकीकडे दिवसाचा रवीराजा अरबीसमुद्रांत मावळत होता, दुसरीकडे हा समाजसूर्य अस्तंगत झाला होता.आचार्य भिसे यांनी अंतयात्रेचे नेतृत्व केले. सर्वांनी अश्रुपूर्ण नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा प्रणाम केला.

   मदनरावांचे मृत्यूनंतर तत्कालीन प्रमुख दैनिकांनी व नियतकालिकांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली वाचली म्हणजे ठाणे जिल्ह्यात त्यांच्या कामाचा किती दबदबा होता, जनसामान्यात त्यांना किती मान होता याची जाणीव होते.

नवशक्ती:  “सोमवंशी क्षत्रिय समाजांतील पुढारी व ठाणे जिल्ह्यातील एक प्रमुख समाज सेवक श्री मदनराव राऊत यांचे काल निधन झाले.कै. मदनराव म्हणजे बोर्डी ची एक संस्था होती. प्रेमळ निगर्वी परोपकारी वृत्ती व गोड स्वभाव यामुळे त्यांना अजातशत्रू म्हणून संबोधित असत. माजी सरपंच ,सो क्ष संघाचे सरचिटणीस, विविध संस्थांचे कार्यकारणी सदस्य ,बोर्डी बाल ग्राम विकास केंद्राचे उपाध्यक्ष, सर्वोदयी कार्यकर्ते, अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी धडाडीने पार पाडल्या. बोर्डी येथील सुप्रसिद्ध शाळेत यांनी अध्यापक म्हणून कार्य केले व तेथून निवृत्तीनंतरही त्यांचे कार्य सतत चालूच होते”

   लोकसत्ता: “कै. मदनराव राऊत यांनी लोकहिताची अनेक कामे केली आहेत. बोर्डीगावाला पाणीपुरवठा करण्यासाठी अस्वाली नदीवर पक्का बंधारा घालण्याचे काम त्यांच्या प्रोत्साहनाने झाले आहे. त्यांनी दारूबंदी प्रचार कार्यास वाहून घेतले होते. ते गरिबांना मोफत औषधेही देत असत. त्यांचा अनेक शिक्षण संस्थांशी संबंध होता”

चित्रमयजगत: “बोर्डी येथील गांधीवादी समाजसेवक व आदर्श शिक्षक श्री मदनराव राऊत यांस,27 जाने1955  रोजी देवाज्ञा झाली, हे कळविण्यास खेद होतो. बोर्डी शाळेच्या उत्कर्षाचे श्रेय कै.राऊत यांनाही द्यावे लागेल. त्यांनी आपल्या गावी सार्वजनिक वाचनालय, व ग्रंथालय काढले.तसेच अनेक सार्वजनिक कार्यात पुढाकार घेतला. जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांना स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते .त्यांचा सर्वोदय योजना  जपानी भात शेती,बाल विकास  ग्रामोद्योग, इत्यादी विविध कार्याशी संबंध होता. त्यांच्या निधनाने ठाणे जिल्ह्यातील एक कळकळीचा कार्यकर्ता हरपला आहे यात शंका नाही”.

   केसरी: बोर्डी येथील एक थोर समाजसेवक व सोमवंशी क्षत्रिय समाजाचे पुढारी श्री मदनराव लक्ष्‍मण राऊत हे दिनांक 27 जानेवारी1955 रोजी शिव हॉस्पिटल मध्ये निधन पावले.सोमवंशी क्षत्रिय समाजात शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याच्या कामी कै मदनराव यांनी अविश्रांत धडपड केली. सर्वोदय संघाचे कार्यकर्ते  बोर्डी विद्यालयातील अध्यापक म,व्हिलेज अपलीफ्टमेंट कमिटीचे सदस्य  म्हणून त्यांनी केलेली कामे या भागांतील जनता विसरणार नाही. कै.राऊत हे तरूण वयापासून राजकारणांत होते. लोकमान्यांचे ते कट्टर अनुयायी होते. 1942 सरकारने त्यांना सरकारने स्थानाबद्दल केले होते”. 

     जयभारत साप्ताहिक व मासिक या नियतकालिकांनी ही त्यांची विषयी श्रद्धांजलीपर लिखाण केले आहे.

मदनरावांना शोकसभेत श्रद्धांजली वहातांना बोर्डी सरकारी ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपल श्री वाणी साहेब म्हणाले होते, “मदनराव ही एक  प्रेमाची संस्था होती. ती  प्रेमाची बँक आज साफ बुडाली. आज आम्ही मातेच्या प्रेमाला आचवलो”

  मदनराव यांचे आपल्या संस्थे वरील प्रेमाची महती सांगताना, पद्मभूषण  श्रीमती ताराबाई मोडक यांना आपले हुंदके अनावर झाले. भाराऊन त्या म्हणाल्या, “श्री मदनरावांच्या अनपेक्षित निधनानं माझी स्थिती, त्यांच्या मुलांच्या सारखी झाली आहे. आमच्यावर चंद्राप्रमाणे प्रेम करणाऱ्या थोर व्यक्तीस आम्ही आज अंतरलो.

     राऊत कुटुंबातील सर्वस्नुषा कै. माधव मामा समवेत

        कै. मदनरावां विषयी बोलताना, लिहीतांना, सर्वांनी त्यांच्या एका ठळक वैशिष्ट्या बद्दल आवर्जून सांगितले आहे.  ते म्हणजे त्यांचा प्रेमळ स्वभाव व मधाळ बोलणे एक चैतन्य मूर्ती. आपल्या या लोभस गोड वागण्याने त्यांनी सरकार दरबारी ही आपली पत वाढविली. स्वराज्याची चळवळ आणि सरकारला आव्हान देणारी बोर्डीची राजकीय जागृती सरकारच्या डोळ्यात सलत होती. सरकारच्या गुप्त रेकॉर्डमध्ये, ‘सरकार द्रोही गाव’, म्हणून बोर्डीची नोंद होती. मदन रावांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने सरकारी अधिकाऱ्यांची मने जिंकली. रस्तेदुरुस्ती दुष्काळ वादळ या रोगात सरकारी अधिकाऱ्यांचे मौलिक सहाय्य मिळवून त्यांनी आर्थिक मदतीचा दिलासा गावाला मिळवून दिला. वनखात्याची मैत्रीचे संबंध जोडून आदिवासींचा छळ थांबविला. मराठी, गुजराती आणि इंग्रजी या भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. वाचनाचा नाद पहिल्यापासून होता. त्यांनी आपल्या बुद्धीचा व मृदू मधुर वाणीचा उपयोग विधायक कार्यासाठी केला. मीदेखील त्यांची अमृतवाणी लहानपणी कधीतरी ऐकली होती. तेव्हा कळायचे वय नव्हते. आज त्याचा थोडा अर्थबोध होतो.

  “बोलण्यातले आर्जव हे आपोआप येत नाही. आपल्यातल्या समदृष्टीचा तो परिपाक असतो. त्यात आपण समोरच्या माणसाला माणूस म्हणून आदर दिलेला असतो” हे वचन मदन रावांच्या आयुष्यात यथार्थ ठरते.

      कै. मदनराव, नानांचे  जीवन चरित्र अगदी थोडक्यात शब्दबद्ध करावयाचे काम मला तरी शक्य नाही. त्यासाठी माऊलीच्या शब्दांचीच मी मदत घेतो. नाना(मदनराव) म्हणजे,

‘लाभावीण प्रीती करणारी कळवळ्याची जाती!’  ‘निरंतर कारुण्यसिंधु ‘ अन ‘निर्व्याज प्रीती’! स्वच्छता! सुगंध! आणि साधना!

‘ते वाट कृपेची करितु । ते दिशाचि स्नेहाभरीतु । जीवातळी आंथरितु । आपुला जिवु’  असां साधुपुरूष!

‘शब्दापाठी अवतरे । कृपा आधी ।।’ चा अनुभव!

तुकोबांची ‘निरहंकारिता’ आणि माऊलींची ‘सहजसुंदरता,’ यांचा विलक्षण ‘मिलाफ’ म्हणजे नाना!

 नानांच हासणं, बोलणं, चालणं, वागणं, अगदी गोड आणि मधाळ  !

      आद्य शंकराचार्यांच्या शब्दांत सांगायचं तर

        “वचनं मधुरम चरितं मधुरम, वसनं मधुरम,वलितं मधुरम।

        चलितं मधुरम, भ्रमितं मधुरम, मधुराधिपते, अखिलं मधुरम ।।”

   “ज्यांच्या जिभेवर सरस्वतीचा वास, त्यांची वाणी शुद्ध आणि मधुर असते, एवढेच नव्हे तर त्या मधुराधिपतीचे नेसणे, हासणे, चालणे, भ्रमण करणे सर्वच मधुर. खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्ती झाली, तरच सर्वायुष्याला असे माधुर्य येते….”

नानांच्या व्यक्तीमत्वातील हे माधुर्य मी बालपणी, अगदी ओझरते का असेना, पण अनुभवले! ज्यांनी ते उपभोगले त्या भाग्यवंता विषयी मी काय बोलावे ?

           कै.मदनराव नाना,देहाने नसले तरीआपल्या कीर्ती सुगंधाने आजही जिवंत आहेत. त्यांनी आयुष्यभर, जनता जनार्दनाला वाहिलेल्या सत्कर्मरुपी सुमनांचा गंध असाच दरवळत राहणार आहे. नानांच्याच्या पवित्र स्मृतीला अनंतप्रणाम

????