माझी आज्जी, मोठी आई …१०१ नाबाद!

  आजी म्हटली की आपसूक जाणवते ती भावना म्हणजे, “उबदार माया”. संध्याछाया हृदयाला भिववित असतांना शक्यतितकी संसार-गाड्यातून विरक्ती घेऊन, फक्त नातवंडामध्ये जीव रमविणारी, आयुष्यातील कडू गोड आठवणींच्या गाठोड्यात रमणारी मृदू व्यक्तिमत्त्व! इ. इ… थोडक्यात ,

   ” आजी म्हणजे काय? आजी म्हणजे दुधावरची साय!” अशी कल्पना.  

    पण सगळ्याच आज्या काही सारख्या नसतात . आजीला आम्ही  ‘मोठीआई’ म्हणतो, तिला मात्र  ही व्याख्या लागू पडत नाही ! अजूनही जीवनेच्छेने रसरसलेल्या माझ्या आजीच्या बाबतीत   मात्र  काहीतरी वेगळे अनुभावयास मिळते ..  मला काहीतरी अनोखे दिसते …म्हणून माझ्या आजीसाठी मी म्हणेन..

  “चालते वाकून काठी टेकून ,

  हळूहळू आहे तिची चाल,

  शंभरी गाठली असली,

  तरी माझी आजी आहे  एक ‘कमाल’!!” 

   तिच्या दीर्घायुष्याचे रहस्यसुद्धा या वेगळेपणातच सामावलेले आहे. आजही एखादा छान आंबा खाल्ल्यानंतर ती त्याचा बाठा(बी),कोणाच्या तरी हातात ठेवून म्हणेल ,”जा,वाडीत कुठेतरी  लाव, थोड्याच वर्षात आपल्याला छान आंबे मिळतील!” हीच तर  सकारात्मकता ! ती म्हणते,

  “म्हातारी न मी  इतुकी, अवघे एकशे-एक वयमान!”

   हीच मानसिकता तिला भविष्याबाबत निराशा आणत नाही ,उलट  वर्तमानात  आनंदी, आशावादी बनवते. आपण नेहमी बरोबरच होतो हा तिला आत्मविश्वास. कुणा वृध्द व्यक्तिच्या  मृत्यूचे वृत्त ऐकले तर ती व्यक्ती   तिच्यापेक्षा  मोठीच होती असे  म्हणणार!!

    अगदी पहिल्यापासून तिच्या खाण्याच्या आवडीनिवडीही, आधुनिक आहारतज्ञांनी प्रमाणित केल्यासारख्या. सगळ्या भाज्या, फळे रोजच्या आहारात असणारच. रोज जेवणात सॅलड पाहिजेच. कडू भाज्या ही नियमितपणे खाणार. पालेभाज्या हव्यातच . कुठलीच वस्तू अगदी आईस्क्रीम, चीज ,बटर  देखील तिला वर्ज्य नाही .पण खाण्याचा  अतिरेक नाही. अगदी आवडीचे मासे असले तरी! प्रत्येक पदार्थ कसा बनवावा यांच्या टिप्स आम्हाला अजूनही  देत असते. 

     तिची आई म्हणजे आमची आक्कासुद्धा शतायुषी होती.मात्र तिचे वडील अल्पायुषी होते. वयाच्या चाळीशीतच ते गेले. तेव्हा सर्व भावंडात मोठी असलेली मोठीआई फक्त नऊ वर्षाची, तर सर्वांत लहान भाऊ काही महिन्यांचा . मोडक्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी तिला तिच्या आईच्या बरोबरीने कष्ट करावे लागले. बोर्डीपासून दहा मैला वरील उंबरगाव( आज गुजरातमध्ये आहे), येथे भाजी विक्रीसाठी आक्का जात असे. तेव्हा घरकाम आणि लहान भावंडांची जबाबदारी हिनेच उचलली. लग्नानंतरही आर्थिक स्थिति गरिबीचीच त्यामुळे संसाराला हातभार लावण्यासाठी दुस-यांच्या शेतात मजुरीही करावी लागली.

     गरीबी आणि अशी अटीतटीची  कौटुंबिक परिस्थिती त्यामुळे ती इयत्ता तिसरीच्या पुढे शालेय शिक्षण घेऊ शकली नाही.माझा आजोबा  प्राथमिक शिक्षक होते.  जात्याच हुशार असलेल्या मोठ्या आईची बुद्धिमत्ता आमच्या हाडाचे शिक्षक असलेल्या आजोबांनी हेरलीअसावी. त्यांनी तिला जुजबी शिक्षण दिले आणि वाचनाची आवड लावली. माझे वडील आणि दोन्ही काका यांच्याकडे स्वतःचा भरपूर पुस्तक संग्रह .त्यामुळे तिने नुसती देवादीकांचीच नाही तर गाजलेल्या कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे ,प्रवासवर्णने असे चौफेर वाचन केले. दृष्टी असेपर्यंत  त्यावर मनन करून आमच्याशी  चर्चाही ती करीत असे .तेव्हा ठीक  पण आताही ती एखाद्या पुस्तकाविषयी बोलताना लेखक,विषय, सांगू शकतेअशी स्मरणशक्तीची देणगी तिला मिळालेली आहे. मला आठवते  बाबा आमटे यांचे चरित्र वाचून ती भारावून गेली होती. पण तिची टिप्पणी होती,”हा माणूस थोर पण त्याला सांभाळणारी त्याची पत्नी ही किती महान!”

  पुढे ‘समिधा’ हे साधना आमटेंचे पुस्तक वाचल्यानंतर त्यातील अनेक प्रसंगावर ती आजही भावुक होऊन बोलते. तिच्या आवडत्या पुस्तकांपैकी ते एक.

   तिच्या पिढीतील अनेक लोकांप्रमाणे तिला गांधीजी वंदनीय आहेत. ‘अग्निपंख’, पुस्तक वाचल्यापासून ए पी जे अब्दुल कलाम सुद्धा तिला तितकेच आदरणीय वाटतात.  सुधा मूर्ती तिच्या आवडत्या लेखिका. त्यांचे नवीन पुस्तक आले आहे का याची ती अजून  चौकशी करते .या वाचनाचे संदर्भही तिच्या डोक्यात अगदी पक्के बसलेले असतात आणि कुठेही तो आला की पटकन  व्यक्त करते.मी हुबळीला जाणार कळल्यावर ती पहिले वाक्य बोलली, “अरे वा, म्हणजे तू सुधा मूर्तीच्या गावाला जाणार तर !”ही गोष्ट इतर कोणाच्या जाऊद्या, माझ्याही लक्षात आली नव्हती.

    आता तिला डोळ्यांनी दिसत नसल्याने वाचता येत नाही. पण रोजचा पेपर आणि पुस्तकाची काही पाने वाचून दाखविण्यासाठी एका व्यक्तिची नियुक्ती केली आहे.भारतातील राजकीय उलथापालथी, निवडणुका ,साथींचे आजार,काही विशेष घटना यांच्या नोंदी तिच्या स्मरणात नेहमी असतात. सर्व घडामोडींचा वेध ती रोज पेपर वाचनातून घेत असते .पुढे काय झाले हे जाणण्यासाठी दुसऱ्या दिवशी उत्सुक असते.

     वाचनाप्रमाणेच तिची दुसरी आवड म्हणजे पर्यटन.निकोप प्रकृती आणि प्रवासातल्या धकाधकींचा बाऊ न करता केवळ आनंद घेण्याची वृत्ती. यामुळे ती आमच्याबरोबर भारतातील अनेक शहरें फिरली आहे. दरवर्षी ती माझ्याकडे ,”यंदा बाबा कुठे घेऊन जाणार,”, याची चौकशी करत असे. विमानातही, व्हील-चेअरची मदत न घेता सराईताप्रमाणे प्रवास करत असे. कुठे चढउताराचा प्रवास असला तरी हात धरलेलाही तिला आवडत नसे. ऐशी वर्षापर्यंत तिने असा प्रवास केलाय.  प्रवासाच्या ठिकाणाची ऐतिहासिक, भौगोलिक माहिती तिच्या वाचनात आलेली असेच, तरी  जाण्याआधी आणि गेल्यावर, फिरताना आवर्जून उत्सुकतेने सर्व इतिहास जाणून घेई. डोळसपणे स्थलदर्शन करी. दिल्लीत फिरताना इंदिरा गांधींची ‘शक्तीस्थल’ पाहून तेथील थोडी माती ती घेऊन आली.अंदमानमध्ये सेल्युलर जेलमधील वीर सावरकरांच्या कोठडीतील धूळ कपाळी लावली. कलकत्त्याला बेलूर मठ आणि कन्याकुमारीला स्वामी विवेकानंद शिळा तिने भाऊकतेने पाहिल्या .चित्तोडगढ बघताना ती पद्मिनीच्या आठवणीने हळवी झाली. ही सारी ठिकाणे तिने मनःपटलावर कोरून ठेवली आहेत. आता डोळ्यासमोर अंधार असल्याने ती पाहिलेली ठिकाणे तिच्या मनःचक्षुसमोर निश्चित येत असावीत.मी ओरिसाला राहायला जाणार म्हटल्यावर ,तिकडची देवळे,त्यांचा इतिहास ,निसर्ग याचे तिने अगदी परवाच जाऊन आल्यासारखे वर्णन केले.जेथे जेथे जाऊन आलीय तिथे जे काही विशेष पाहिले किवा घडले असेल तेही ती सुसंगतपणे सांगत असते  .एकदा आम्ही हिमाचल प्रदेश मध्ये फिरायला गेलो असताना आमच्या हॉटेलच्या खिडकीतून, तिचे वाळत घातलेले कपडे माकडाने पळवले.ते परत मिळवण्यासाठी आम्ही कोणीच मदत करत नाही हे पाहिल्यावर ही एकटीच खाली गेली. हॉटेलच्या गुरख्याला आपल्या मोडक्यातोडक्या  हिंदीत काय झाले ते सांगून त्याला घेऊन बाजूच्या जंगलात शिरली. ते कपडे मिळऊनच परत आली.  ती अशी धडाडीची आहे. डर हा शब्दच तिच्या शब्दकोशात नाही! 

   माझे बाबा तिचे पहिले अपत्य. त्यामुळे गेली 80 वर्षे त्यांनी तिला अगदी जवळून पाहिले. त्यांच्या मते त्यांची आई एक अजब रसायन आहे.लहान वयात आणि विवाहानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांत कराव्या लागलेल्या अस्तित्वासाठीच्या लढतीने तिच्यात धाडस आणि खंबीरपणा आलेला आहे. लहानपणी सुबत्ता नसली तरी घरात सौख्य होते !ते दिवस आठवले की या भावंडांना वाटते. 

      ” राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली,

       ती सर्व प्राप्त झाली, त्या झोपडीत आमुच्या!!

  तिचे  विवाहानंतरचे दिवस देखील  सोपे नव्हते.त्या चंद्रमौळी झोपडीतूनही  या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी त्याकाळी  काही  लोक  त्रास देत होते. त्यांच्यासमोर ही आपल्या हक्कांसाठी व मुलांच्या रक्षणासाठी कणखरपणे उभी राहिली. लढली. माझे आजोबा विरक्त व्यक्तिमत्व होते. अध्यात्माकडे त्यांचा कल होता. त्यामुळे ऐहिक सुखाकडे त्यांनी पाठ फिरवलेली होती. अशा ‘संत तुकारामां’चा संसार चालवायला ‘आवली ‘ ला कणखर आणि लढाऊ व्हावेच लागले. पण पुढे तिच्या मुलांनी तिच्या सर्व हौस-मौजा पुरविल्या .तिला स्वतःच्या मोठ्या घरात राहावयास आणले. आपल्या उच्च शिक्षित मुला-नातवंडांचा तिला कोण अभिमान आहे.” मी खूप नशीबवान आहे”, असे ती नेहमी बोलून दाखविते.तीक्ष्ण बुद्धिमत्ता, वाचनाने व्यक्तिमत्त्वात आलेले चातुर्य,आयुष्यातील  कडू गोड अनुभवामुळे आलेला आत्मविश्वास, स्वतःची धमक यातून तिचे एक प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण झाले आहे. अंध असूनही मनःचक्षुनी  जग पाहणाऱ्या, तिच्या या अद्भुत व्यक्तिमत्त्वाबद्दल माझे काका, सेवानिवृत्त प्राचार्य प्रदीप राऊत म्हणतात,

  “आजही शारीरिक दृष्ट्या अंध असलेल्या माझ्या आईचे आयुष्य एका डोळस माणसासारखे आहे.तिच्या वैचारिक संस्कारातून आम्हा भावंडांचे, कुटुंबीयांचे आयुष्य उजळून गेले आहे .हे तिचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही “..

     वयाच्या  आजच्या टप्प्यावर बरेच साथी सोबती पुढे निघून गेल्यावर, संवादासाठी एकटेपणा जाणवतो. मात्र तिचा स्वतःशीच अखंड संवाद चालू असतो. जे मनात तेच ओठावर असणार. ती सतत व्यक्त होत असते.नवीन जाणून घेत असते.कोणी भेटायला आले तर तिला खूप आवडते. प्रथम त्यांच्याबद्दल जाणून घेते आणि त्यांच्या सर्व नातेवाईकांची नावानिशी आत्मीयतेने चौकशी करते.अगदी दूरदूरची नातीही अचूक सांगते. ज्यामुळे समोरची व्यक्ती आश्चर्यचकित होते.  ती व्यक्ती जर काही विशेष वेगळे करत असेल तर तेही ती कौतुकाने ऐकते, शाबासकी देते. इतरांना ते कौतुक सांगते. दूर दूर पसरलेल्या तिच्या नातवंडाबद्दल जाणून घेतांनाही त्यांच्या कौटुंबिक चौकशी बरोबर ती त्या प्रदेशाची, निसर्गाची व येथील हवामानाचीपण खबरबात घेते.तिच्या शतायुषी निरोगी आयुष्याचे गमक थोडक्यात सांगायचे तर स्वतःची सकारात्मक प्रतिमा बनवून तिने मनाची कवाडे सतत उघडी ठेवली आहेत. त्यातून नवीन ज्ञानाचा ,कुतूहलाचा, घेतलेला मोकळा श्वास तिला जगण्याची उर्मी देत राहतो. आयुष्याचे तत्त्वज्ञान वगैरे बोजड शब्दात ती अडकत नाही. पूर्वायुष्यातील संघर्षामुळे कटुता नसली तरी,

  ” दुनिया ने मुझको दिया क्या, हम सबकी परवा करे तो 

   सबने हमारा किया क्या ?”

  अशीच आजही तिची बाणेदार व रोखठोक वृत्ती आहे.ती स्वतःला असहाय, बिच्चारी कधीच समजत नाही.” हेच तिच्या आयुष्याचे तत्त्वज्ञान !”वाघ म्हातारा झाला,दात पडले तरी गवत खात नाही !”,असे ती आजही आम्हाला ठणकावून सांगते.अंधत्व आले तरी ती हतबल झाली नाही.आजूबाजूला काय चाललेय याचा अंदाज घेत असतेच पण कुणी खोटे बोलण्याचा तिला फसविण्याचा प्रयत्न केला तरी असे काही प्रश्न विचारते की, उलट तपासणीतून खोटे बोलणा-याचे  पितळ उघडे पडावे!

   मात्र या लढवय्या स्त्रीमध्ये आई बरोबरच आमची आजी, म्हणून सर्व नातवंडासाठी एक हळुवार कोपरा निश्चित आहे. आपल्या सर्व नातवंडाबद्दल नात-सुना आणि नात-जावयाबद्दलही ती कौतुकाने भरभरून बोलते. पतवंडांचा आजूबाजूचा वावर तिला आज दिसत नसला तरी संवेदनांनी तिला तो खूप सुखावतो. ती त्यांच्याशी गप्पा मारत बसते.त्यांच्यात रमते, त्यांच्याशी संपर्क साधू शकते ! सर्वांची नावें, इयत्ता सारे तिला माहीत!!

    माझा मुलगा लहानपणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. बातमी मोठ्याआईपर्यंत पोहोचली .ती असहायपणे देवाचा धावा करीत राहिली. तो बरा झाल्यानंतर जेव्हा मी त्याला घेऊन तिला भेटण्यासाठी गावी गेले, तेव्हा त्याच्या डोक्यावरून हात फिरवून पाणावल्या डोळ्यांनी ती म्हणाली,

   “मी आंधळी काय करणार? येथूनच देवाला नवस बोलले होते. जा,आपल्या गावदेवी आणि झोटिंग देवाला नारळ वाहून  ये!”

    हे वाक्य आजही माझ्या काळजात घर करून आहे. आमच्या लेकरांसाठी आमची आजी तिच्या सुरकुतलेल्या हातांनी आणि थरथरत्या मानेनेे देवाजवळ प्रार्थना करते ही भावना केवढी सुखावणारी?

  “या थाटल्या प्रपंचात, अहो झालो आम्हीच मायतात!”

   तरीही हे शतकोत्तर वयोमानाचे, अमाप मायेचे, प्रेमळ छत्र आजही आमच्या डोक्यावर विराजते आहे! आम्ही खरेच किती भाग्यवान .हे भाग्य आम्हाला यापुढेही दीर्घकाळ लाभो, हीच त्या जगनियंत्यापुढे नम्र प्रार्थना .

 …” आजीची माया असतेच अशी,

   तूप रोटी साखर खावी जशी.

   आजीची माया असतेच अशी,

  मनाच्या कुपीत जपून ठेवावी जशी .. “

  आम्ही  सर्व नातवंडे,पतवंडे ,आमच्या भावी आयुष्यात ,

मोठी-आईच्या मायेच्या स्मृती, मनाच्या कुपीत तशाच कायमच्या जपून ठेवणार आहोत!

आमच्या मोठीआईला निरोगी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देते!!

दीप्ति प्रशांत चौधरी
ऑस्टीन,टेक्सास राज्य,
अमेरिका.