पद्मभूषण कै.ताराबाई मोडक

असं म्हणतात ,ज्यांच्या आयुष्याच्या कुंडलीत, राजयोग असतो, अशी माणसे अमाप सत्ता व अफाट संपत्ती मिळवून राज्यपदी विराजमान होतात! होय, माझ्याही आयुष्यात हा राजयोग असला पाहिजे. संपत्ती नाही मिळाली, सत्ताही नाही मिळाली, तरीही हा ‘राजयोग’ कुंडलीत आहे असे मी मानतो!! कारण, मला मिळाली, लाख-मोलाची, लोकमान्य, राजमान्य व सम्राटाला ही ज्यांचा हेवा वाटावा अशी दुर्मिळ व दुरापास्त माणसे! ही माणसे माझ्या आयुष्याच्या कोणत्यातरी कालखंडात आली. कोणी बालपणी, कोणी शालेय जीवनात, कोणी महाविद्यालयीन जीवनात, तर कोणी गृहस्थाश्रमात. आयुष्यातील त्यांचा सहवास काही दिवसांचा तर कधी काही वर्षांचा! सहवास किती होता, ह्यापेक्षा त्यांनी मला काय दिले, हे मोलाचे ! प्रत्येकाने काही ना काही वेगळे दिले. मात्र एक दान, अगदी  समान… भविष्यकाळातील, अंधाऱ्या वाटचालीतून, मार्गक्रमणा करण्यासाठी दिलेला,संस्कार रुपी प्रकाशाचा कवडसा व आठवणींचे  अमाप धन!!

    बालवाडीत,शालेय,जीवनात, प्राथमिक शाळेच्या कालखंडात भेटलेले कवी ग. ह .पाटील, कवी बा. भ .बोरकर, कवियत्री इंदिरा संत, विदुशी डॉक्टर सुलभा पाणंदीकर, पुढील हायस्कूल शिक्षणामध्ये भेटलेले, आचार्य भिसे, गुरुवर्य चित्रे, महाविद्यालयीन जीवनात आलेले कर्मवीर भाऊराव पाटील, प्राध्यापक एस .ए .पाटील, शिवाजी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू झालेले प्रिन्सिपल पांडुरंग भाऊराव पाटील, राष्ट्रसेवा दल शिबिरात आठवडाभर, ज्यांची पावन संगती मिळाली, ते सेवा महर्षी एस् .एम .जोशी, माजी अर्थमंत्री मधु दंडवते, इस्माईल युसुफ कॉलेजांतील कविवर्य पु .शि .रेगे, विनोदी लेखक कवि मा. दी ,पटवर्धन, पुढे ऊच्च शिक्षण घेताना यु डी सि टी मध्ये  प्राध्यापक डॉक्टर काणे, भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पहिले एफ आर एस, FRS प्राध्यापक मनमोहन शर्मा,  सहाध्यायी असलेले रघुनाथ माशेलकर ही त्यातली  लक्षात असलेली, महत्त्वाची लोकविलक्षण नावे. याच मांदियाळी मध्ये, अगदी बालपणीच्या, बालवाडी मध्ये भेटलेल्या कै. पद्मविभूषण ताराबाई मोडक!

होय आमच्या बालपणीच्या ताराताई, त्यावेळी ‘पद्मभूषण’ नसलेल्या ताराताई, .. आनंदाच्या अत्युच्च शिखरावर आरुढ होऊन ,समाधानाचा सुस्कारा सोडत आहेत,तोच .. दुर्दैवाच्या खोल गर्तेत पडून, असहाय वाटणाऱ्या ताराताई … आयुष्यभर.नियतीच्या  लहरी पुढे, सुखदुःखाच्या,  अनाकलनीय खेळाला, इतक्याच निर्धाराने तोंड देऊन,शेवटी नियतीलाही नामोहरम करून, कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेल्या, भारताच्या मॉंटेसरी ,ताराबाई मोडक!!  ताईंचा हा आयुष्यभराचा  जीवन-मरणाचा लढा, आणि शेवटी काळालाही नमवून,आपली कीर्ती पताका जगांत फडकवणाऱ्या ताराताईंसाठी, कविवर्य भा रा तांबे यांच्या, या ओळी किती सार्थ वाटतात…..

       कालाच्या अति कराल दाढा, 

      सकल वस्तूंचा करिती चुराडा.

     काल शिरी झडे तुझा चौघडा, 

     जय मृत्युंजय,जयभवनायक !

       मला वाटते 1945 साली, ताराताईंचे  बालवाडी व ग्राम बाल शिक्षणाचे प्रयोग बोर्डी मध्ये नुकतेच सुरू झाले होते. गावाच्या अगदी बाहेर, हरिजन बांधवांच्या वस्ती लगत, समुद्रकिनारी दोन-तीन खोल्यांच्या छोट्या प्रांगणात ,ही पहिली बालवाडी भरत असे. या वस्तीतच बाल शिक्षणाचा पाया रचण्यास सुरुवात झाली होती .अनुताई वाघ यांच्यासारख्या सहकारी येथेच त्यांना येऊन मिळाल्या . एका मोठ्या दीर्घ प्रवासाची सुरुवात येथून झाली. याच कालखंडात 1946 ते 51 या काळात ताराताई, मुंबई राज्याच्या विधानसभा सदस्य होत्या. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शाळा पाठ्यपुस्तक समितीवर त्यांनी  अनेक वर्षे काम केले. हे काम चालू असतानाच त्या अखिल भारतीय बाल शिक्षण विभागाच्या दोन वेळा अध्यक्षा होत्या.केंद्र सरकारच्या शिक्षण समिती वर ही काम केले. महात्मा गांधींनी,त्यांच्या संकल्पनेतील ‘बुनियादी शिक्षण’ पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. तो आराखडा येथेच तयार झाला. येथूनच 1949 मध्ये इटली मध्ये भरलेल्या ‘आंतरराष्ट्रीय बाल शिक्षण परिषदे’मध्ये भाषण करण्याची संधी त्यांना मिळाली. इथेच माझ्यासारख्या त्यावेळच्या अनेक भाग्यवान बालकांनी, ताराबाईंचे  निर्व्याज प्रेम, वात्सल्य, ममता ,अनुभवली. त्यांचा पवित्र पावन स्पर्श, आमच्या बालपणातले, काही क्षण,दिव्य स्पर्शाने पुलकित   करून गेला. येथेच आम्ही अनुताई,खंडूभाई,मालिनीताई खेर,कडून,चिऊ-काऊची गाणी शिकलो आणि धमाल केली. भारतातीलच नव्हे  तर सबंध जगातील  होणारा  एका महान  प्रयोगाच्या  नांदी चा तो काळ आणि त्यात आम्हीही भागीदार होतो हे आज आठवले म्हणजे मलाच माझी धन्यता वाटते !!

  ताराबाईं मोडक यांचे जीवन म्हणजे एक विलक्षण चित्तरकथाच आहे. सुशिक्षित, प्रतिष्ठीत, सधन  , पुरोगामी आई-वडिलांचे पोटी जन्म .मुंबईला एलफिन्स्टन, विल्सन सारख्या  प्रख्यात महाविद्यालयांत पदवी व पदव्युत्तर शिक्षण. याच कालखंडात आई-वडिलांचा थोड्याशा अंतराने मृत्यू, पुढे कृष्णाजी मोडक,  या  हुशार , प्रतिथयश  वकिलांशी  प्रेमविवाह,  त्यांचे पासून एक कन्यारत्नाचा लाभ, आता संसार सुखाची परमावधी होत आहे,  तोच पतीपासून घ्यावा लागणारा घटस्फोट.. या  विस्कटत असलेल्या संसाराची  वाताहात बघून कन्येच्या आयुष्याची झालेली ससेहोलपट व शेवटी तिचाही चिरविरह नशिबी आला.. अर्ध्यावरती डाव मोडला.. आणि एक रंगत असलेली कहाणी अधुरीच राहीली..  राजकोटला ,सुप्रसिद्ध ‘बर्टन फीमेल कॉलेजांत’ प्राचार्य. त्याच वेळी, राजकोटच्या युवराजांना त्यांनी  प्राथमिक शिक्षणाचे धडेही दिले. पुढे भावनगरच्या गिजुभाई बधेका, यांचा परिचय होऊन,त्यांच्या ‘दक्षिणामूर्ति’ या माँटेसरी शिक्षण पद्धतीवर आधारित  संस्थेत  दाखल . तेथे गिजूभाईं बरोबर भारतातील, ‘बाल शिक्षणाचा’ नवा प्रयोग! महात्मा गांधींच्या आदेशानुसार व शिक्षण महर्षी भारतरत्न कर्वे यांच्या सूचनेप्रमाणे खेड्याकडे जाण्याची प्रेरणा .थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन तत्कालीन समाजाच्या रोषाला न जुमानता ,प्रथम दादरला सुरू केलेल्या, नूतन बाल शिक्षण संघामार्फत ,शिशुविहार.. तेथून आदिवासींसाठी काहीतरी करण्याची झालेली अंतर्यामी  उर्मी म्हणून बोर्डी कोसबाड कडे केलेले प्रयाण..बोर्डी  येथील एकोणीसशे पंचेचाळीस सालात  स्थापन झालेले  ग्रामीण  प्रशिक्षण केंद्र, ग्रामीण बालवाडी..  पुढे सर्व पसारा कोसबाड टेकडीवर, तेथे खऱ्या अर्थाने त्यांनी घेतलेली  गगन भरारी … इथेच  मिळालेली राजमान्यता,  लोकमान्यता. पद्मविभूषण किताब … चिरविश्रांती ही येथेच घेतली!! बाई जन्मल्या कुठे वाढल्या कुठे,शिक्षण घेतले कोठे,कामाला सुरुवात कोठे  आणि शेवटी बोर्डी कोसबाडच्या या पवित्र भूमीत येऊन येथील वंचितांची  आमरण सेवा करून कायमच्या विसावल्या .येथीलच कोसबाड टेकडीवर.. . जीवनाच्या  या दीर्घ प्रवासात दैवाचे अनेक उलट सुलट फासे पडूनही,आपल्या निरपेक्ष ,स्थितप्रज्ञ वृत्ती मुळे,  जे मिळवायचे होते ते मिळवून, अजरामर झाल्या, ही एक चित्तरकथाच नाही काय?

    ज्यावेळी सन 1945 मध्ये ताराताई  बोर्डी मध्ये आल्या, त्यांनी बोर्डी येथे गावाबाहेरील दलीत वस्तीत   आपली लहान बालवाडी सुरू केली. तो अगदी छोटा परिसर होता. तोही गावाबाहेर,आमच्या घरापासून सुमारे एक मैल अंतरावर. माझे वय त्यावेळी 4,5 वर्षांचे असेल. खेळण्या-बागडण्याच्या त्या वयात सुरू केलेली ही बालवाडी म्हणजे आम्हाला व आमच्या पालकांनाही  विशेष आकर्षित करू शकली नाही. आम्ही ही त्या काळात उमरोळी येथे वस्तीस होतो.मात्र मे महिना, दिवाळी, ख्रिसमस, अशा सुट्ट्यांमध्ये सगळे कुटुंब बोर्डीस येई . त्या सुट्टीच्या दिवसांत, मला ही  बालवाडी म्हणजे जाच वाटे. ताराताईंच्या स्वयंसेविका आम्हाला पकडून मैलभर चालवत, बालवाडीत नेत असत. आज त्या बालवाडीचे व त्या काळांत आम्हाला मिळालेल्या सुवर्णसंधीचे किती अप्रूप वाटते. त्यावेळी मात्र “सुट्टीत महिनाभर मजा करायला आलो तर, ही कोणती नवी कटकट निर्माण झाली ?” असेच वाटत होते. मला खरोखरीच काही दिवसांनी तेथील आकर्षण वाटू लागले होते मात्र गावात  कायमचा मुक्काम नसल्याने मला सतत जाणे जमलेच नाही, हे आज दुर्दैव वाटते. एकंदरीत, सुरुवातीच्या बालवाडीच्या दिवसांत, बहुतेक मुले, ताराताईंच्या सेविका गावांत मुलांना बोलवण्यासाठी आल्या की घरातून पळून,  बाहेर कुठेतरी जाऊन लपून बसत.एवढा धसका सुरुवातीला आम्ही  घेतला होता.  म्हणतात ना दैव देते पण कर्म नेते,  अशी त्या वेळेची आम्हा मुलांची अवस्था होती. त्यात आमचा ही दोष नव्हता, कारण एकूण सामाजिक परिस्थिती तशीच होती. जेथे सहा वर्षापासून  प्राथमिक शिक्षणसुद्धा दुर्लक्षित  होते, तेथे बालवाडीतील शिक्षणाला कोण विचारणार ?  मला त्यापैकी आठवतात त्या चंपूताई, कै.मदनराव राऊत यांच्या कन्या, बालवाडीत स्वयंसेविका म्हणून काम करीत असाव्यात. आणखीनही 1,2 मदतनीस मुली होत्या.त्या सबंध बोर्डी,घोलवड,परिसरात फिरून, खाऊचे आमिष दाखवून, मुलांना हाताला धरून बालवाडीत नेत असत. अर्थात चालतच जावे लागे. मात्र वर्गात गेल्यावर काहीतरी हस्तव्यवसाय ,अथवा,असेच  काहीतरी,  गाणी, गोष्टी झाल्या की  चॉकलेट मिळाल्या बरोबर, आमची नजर बाहेरच्या दरवाजाकडे जाई  व  येथून कसे पळता  येईल, याचा  बेत सुरू होई. काही पोरे हंबरडा फोडून, भोकांड पसरून आता आम्हाला घरी पोहोचवा असा घोषा लावत. त्या काळी  ताराताई बालवाडीत अधून मधून येत असत. त्यांची इतरही अनेक कामे,त्याच वेळी चालू होती. मात्र अनुताई, खंडूभाई देसाई ,मालिनी ताई खरे, अशी काही  नावेच आज आठवतात. ही सर्व मंडळी खरेतर  आम्हा मुलांना  जीव लावत होती .आम्ही तेथे रोज ,नियमित यावे, म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होती. त्यांचे ते निरागस ,प्रेमळ , बोलणे ,वागणे, आजही डोळ्यासमोर आले की,माझीच मला खंत वाटते .विशेषतः ज्या  दिवशी ,माझ्या  मुलांसाठी, एका चांगल्या नर्सरी स्कूल मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी,मी रांग लावून, हजारो रुपयांची प्रवेश फी भरून,यातायात केली, त्यादिवशी माझे  बालवाडीचे हे दिवस आठवले. प्रत्यक्ष सरस्वती देवी आम्हाला  हाताला धरून  विद्या मंदिरात नेत होती , आणि आम्ही मात्र  पळपुट्यासारखे ,तिला चुकवीत होतो .हे चित्र आज आठवले की, विषाद  वाटतो . पण आमचा तरी त्यात काय दोष ? आणि    आमच्या  पालकांचीही चूक नाही.  हे एक नवीन पर्व,आमच्या गावातच कशाला अगदी महाराष्ट्रात ,भारतात,काहीतरी नवल घडत होते!  प्रत्यक्ष शारदेच्या पवित्र चरणकमलांतून निघालेले, ते तीर्थ  आम्ही साधे पाणी म्हणून  फेकून देत होतो! ताईंचेही  त्यात काही चुकत नव्हते. जगाचा इतिहास सांगतो, ज्या कोणी महात्म्याने , कोणत्याही कालखंडात, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला,त्याचे पदरी, प्रथमतः,अवहेलना, टीका आणि निंदाच आलेली आहे. ताईंचे कामही त्याला कसे अपवाद होईल? मात्र ही प्राथमिक अवस्था होती. पुढे याच गंगोत्रीचा ,प्रचंड गंगौघ झाला ! भारतातील, ‘ज्ञान-संस्कारतृषित’ बालके पावन झाली, संस्कारित झाली, अगदी अनंत कालासाठी!! 

        खरेतर ताराताई  बोर्डीला आल्या ते एक वेगळे स्वप्न घेऊनच. भावनगरला बाल मंदिरात त्यांचे काम बघून ,भारतरत्न धोंडोपंत कर्वे, शिक्षण महर्षी व भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते,धोंडो केशव कर्वे यांनी, त्यांचे काम बघून खूप कौतुक केले. पण “तुमचं काम शहरात ठीक आहे,ग्रामीण भागातील मुलांना ही साधने कुठे परवडणार.. म्हणून तेथे जाऊन त्यांच्या साठी काहीतरी करणे आवश्यक आहे”, असा सल्ला दिला होता. महात्माजींनी आपल्या’ बुनियादी तालीम’, योजनेचा आराखडा, ताराताई  कडूनच करून घेतला होता.त्याचेही प्रयोग ,ताईंनी  खेड्यातच करावे, अशी त्यांचीही इच्छा होती. या दोन महात्म्यांचे आशीर्वाद पाठीशी घेऊन, व त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, बाईंनी आपले आयुष्य खर्ची घालण्याचे ठरविले होते. त्या करिता त्यांनी बोर्डी या आदिवासीबहुल खेड्याचीच निवड का केली असावी? महाराष्ट्रातील  इतर अनेक परिचित  गावे व खेडी सोडून  ताराताई बोर्डीलाच आल्या, हा केवळ योगायोग समजावा का ? नाही, मला हा निव्वळ योगायोग वाटत नाही. माझी अशी श्रद्धा आहे की या बोर्डी, घोलवड, परिसरांत येथील सुंदर सागर किनारी, प्राचीनकाळी, कांही महान तपस्व्यांनी, दीर्घ आराधना केलेली आहे. त्या अज्ञात ऋषींच्या पदस्पर्शाने, पुनीत झालेल्या या बोर्डी व परिसराच्या भूमीला, तोच पावन पदस्पर्श, परत-परत होत रहावा असे वाटत असले पाहिजे. म्हणूनच येथे आचार्य भिसे आले,आचार्य चित्रे आले, साने गुरुजी आले, स्वामी आनंद आले,  विदुषी डॉक्टर सुलभा पाणंदीकर आल्या, आणि ताराबाई मोडक ही आल्या!! योगायोग केवळ एखाद दुसऱ्या बाबतीत  होईल, पण अनेक महान विभूती जेव्हा या परिसरात येऊन आपले जीवन कार्य  करून जातात, तेव्हा तो केवळ योगायोग नसतो, ती असते या मातीची  पुण्याई !

 देशातील पहिली बालवाडी बोर्डीला सुरू झाली होती. ताराताईंचे  शिक्षण विषयक, निसर्ग विषयक,विचार अत्यंत दूरगामी होते .बालक म्हणजे पृथ्वीवरील देव आहे. तीच देवांची दैवते आहेत , निसर्ग परिचय हा ही,मनुष्य परिचयाइतकाच, विशाल आहे. आत्मविकासाची खरी दिशा शिक्षकापुढे असली, तरच तो बालकाला त्या मार्गाने जाण्यास मदत करू शकेल.’ ‘मुलांना बोन्साय करू नका तर वटवृक्ष करा,बोन्साय फक्त घराला, तर वटवृक्ष संपूर्ण परिसराला,शोभा आणतो ‘असे त्यांचे मूलगामी विचार होते.

   ताराताई कधीतरी बालवाडीत येत असल्या तरी खंडूभाई ,मालिनीताई, अनुताई आमचे बरोबर  सतत असत. गिजूभाई व ताराताईंनी लिहिलेली बडबड गीते  आम्हाला शिकवीत. मराठी आणि गुजराथी दोन्ही प्रकारच्या लोकगीतांमधून,काही गीतांचे संपादन करुन ती गीते आम्हाला शिकवली जात, आणि गायला सांगत. रास-गरबा हे नृत्यप्रकार ही मंदिरात होते. गाण्या वरून अभिनय करून, मुलांना अर्थ समजेल, अशी छोटी नाटुकली बसवीत. त्याच बरोबर, चित्रकला, हस्तकला, शिवणकाम, भरतकाम ,रांगोळी काढणे, शिकवत असत.आमचा सर्वांत आवडता व्यवसाय, म्हणजे समोरील अथांग सागरावरील ओल्या वाळूत बसून किल्ले करणे ,वाळूचे लाडू वळणे, डोंगर करून त्यात बोगदा करणे, किल्ल्याभोवती पाण्याचे खंदक करणे, ही हस्तकला!!सकाळी दहा, साडेदहाला आम्ही,थोड्या नाराजीने, पडक्या चेहऱ्याने,बालवाडीत येत असू. मात्र एक,दीड वाजण्याच्या सुमारास,एक निराळे चैतन्य व ऊर्जा घेऊन,जेवणासाठी घरी परत येत असू. परत दुसऱ्या दिवशी लपंडाव चालूच असे. म्हणूनच विक्रम वेताळ गोष्टीतील, त्या विक्रमाप्रमाणे ,ताराताईंच्या स्वयंसेविकांचे ते अथक प्रयत्न, आज आठवून, त्यांचे खूप खूप कौतुक वाटते . आमच्या  त्यावेळच्या  अशा  नकारात्मक  प्रतिसादामुळे  जराही निराश न होता, त्यांनी  जे निरलसपणे व अथक काम केले  त्यांच्यामुळेच, आज बालशिक्षणाचा हा डोलारा, भक्कम पायावर उभा आहे!!आम्ही केलेल्या अभिनय नाट्याची, काही मराठी गुजराथी गीते आजही आठवतात ती अशी 

   ” मामा नु घेर,क्यां छे?दिवो बळे, त्यां छे..”

   ” माझ्या अंगणात कोण कोण येते??…”

    ” नान्ही सी झोपडी मा, गंगा डोसी रेहती थी”..

    व आजच्याबालकांचे ही आवडते असलेले,

   ” चल रे भोपळ्या टुणुक टुणुक..”… एवढी थोडीफार आठवतात.

    ताराताईंनी, केवळ भारतात सुरू केलेला हा पहिला प्रयोग नव्हता ,तर जगामधील देखील हे एक असामान्य व अद्वितीय असे काम होते. इटलीतील, रोममधील, मॉन्टेसरी बाईंचे काम पहिले ,अमेरिकेतील या प्रकारचे काम दुसरे,त्यानंतर ताराबाई मोडकांचा, बोर्डी, कोसबाड मधील, जगांतील,केवळ तिसरा प्रयोग ! क्रमवारीच्या  दृष्टीने हे काम तिसरे असेल, पण या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे, देशाच्या एका खेड्यात, अशिक्षित,अडाणी, निर्धन, अनेक पिढ्या शिक्षणापासून वंचित, अशा बालकांसाठी सुरू केलेले हे काम होते . जगांतील पहिले दोन प्रयोग,  जरी बालकांसाठी असले तरी ती बालके  सधन, सुखवस्तू व सुशिक्षित  कुटुंबातील होती. सामाजिक अनुकूलता होती. ताराताईंच्या कामाचे  वैशिष्ट्य हेच की, ज्या बालकांसाठी हे काम सुरू केले,  ना त्यांना त्याची गरज वाटत होती, ना त्यांच्या पालकांना याची  आवश्यकता भासत होती. साधन सामुग्री तसेच आर्थिक बाबतीत तर सगळा आनंदीआनंदच ! अशा सर्व बाजूंनी प्रतिकूल परिस्थितीत,ताईंनी आपले काम सुरू केले व पुढे नेले . म्हणून मला कधी कधी वाटते , भारतीय ताराबाई ,इटालियन मॉन्टेसरी होऊ शकल्या, पण इटालियन मादाम मॉंटेसरी, भारताच्या ताराबाई होऊ शकल्या नाहीत!! इंग्रजीत म्हण आहे ना ..” U can not compare, Oranges and Apples..”… संत्री आणि सफरचंद ते यांची तुलना होऊ शकत नाही !! ताराताईंचे वेगळेपण आणि मोठेपण या परिस्थितीत सामावले आहे !

    ताराताईंचा जन्म मुंबईत एप्रिल 1892 मध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिवराव केळकर आईचे नाव उमाबाई . दोघेही अतिशय बुद्धिमान आणि पुढारलेल्या विचारांचे होते. सदाशिवराव केळकर यांचा हा विवाह एका विधवेशी होता.  वडील,’कामगार,’ ‘हितोपदेश’, ही साप्ताहिके आणि ‘ज्ञानदीप’ हे मासिक संपादन करीत असत.मुंबईच्या प्रार्थना समाजाचे कामही ते करीत. आईही, स्त्री शिक्षण, विधवा विवाह, यासाठी काम करीत. बुद्धिमत्ता,पुरोगामीपणा,आणि बंडखोरीचा वारसा, अशा रीतीने ताराताईंच्या रक्तातच होता. प्राथमिक शिक्षण कालांत,सनातन्याकडून , ताराताई व त्यांच्या छोट्या बहिणीला ,या साठी,समाजाची हेटाळणी सहन करावी लागली आहे

लहानपणीच, हिंदी आणि मराठी, भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते . त्यांच्या  प्रखर बुद्धिमत्तेची चमक  अगदी शालेय वयातच दिसून आली होती. हुजूरपागा शाळेत शिकत असताना,   ग्रंथपाला कडे, “भास्कराचार्यांचे,” लीलावती” हे पुस्तक मिळेल का?”, अशी विचारणा करून त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला होता..मुंबईतील एल्फिन्स्टन आणि विल्सन, या प्रख्यात महाविद्यालयातून त्यांनी,  बी ए पदवी ,प्राप्त केली.त्यादरम्यानच दुर्दैवाने ,त्यांच्या वडिलांचे प्रथम,आणि दोनच वर्षानंतर आईचे निधन झाले.हे सर्व आघात पचवून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कॉलेजांत शिकत असतानाच,  कृष्णराव मोडक  ,या रुबाबदार  हुशार तरुणाशी, त्यांची  ओळख झाली.त्याचे रूपांतर पुढे विवाहात झाले.  कृष्णराव  खूप हुशार वकील होते. वकिली ही ऊत्तम चालली होती .मात्र पुढे,कुसंगती व व्यसनाधीनतेमुळे,त्यांचे  संसारिक जीवन  यशस्वी होऊ शकले नाही.ताईंना हा विवाह   लाभदायक ठरला नाही. घटस्फोट घ्यावा लागला. हे सगळे, दुर्दैवाचे दशावतार ,मुलीनेही  पाहिले असतील आणि त्या कोवळ्या जिवाच्या बालमनावर ,त्याचा  विपरीत परिणाम होऊन, तिचाही वियोग ताईंना सोसावा लागला.वैवाहिक जीवनातील, हे दोन विषाचे प्याले पचवून,ताईंनी जीवनाची पुढील मार्गक्रमणा कशी केली असेल ,याची  कल्पना करवत नाही.पुढे त्यांना राजकोट,येथे प्राचार्या म्हणून ,सरकारी नोकरी मिळाली. राजकोट नरेशांच्या  युवराजाला, प्राथमिक शिक्षणाचे  धडेही दिले .त्यादरम्यान भावनगर मधील गिरीजा शंकर उर्फ गिजुभाई बधेका,यांच्या ‘बाल शिक्षण’विषयक कामाची माहिती झाली. त्यांची ‘बालमंदिर’ ही संकल्पना त्यांना मनापासून आवडली.त्यांनी सरकारी नोकरी सोडून दिली. पूर्णवेळ बाल शिक्षणाच्या कामालाच पूर्णतः वाहून घेण्याचे ठरविले. तेथेच त्या, गुजराती भाषाही शिकल्या. सुमारे नऊ वर्षे हे काम केल्यानंतर, महर्षी कर्वे आणि आणि गांधीजी यांच्या आदेशानुसार,खेड्यांमध्ये, आपले प्रयोग करण्याचे त्यांनी ठरविले. व 1945 आली त्या बोर्डी मध्ये दाखल झाल्या.. पुढचा इतिहास तर सर्वज्ञात आहे!!

 बोर्डी येथील कालखंड हा ताराताईंच्या आयुष्यातील परमोच्च प्रगतीचा व जीवनातील स्थिरस्थावरतेचाही काल होता. येथेच ताईंनी अंगणवाडी, अंगणवाडी सेविका प्रशिक्षण केंद्र ,अध्यापक विद्यालय,ह्यासारखे प्रकल्प उभे केले. आपल्या व एकूणच बाल शिक्षणाच्या कार्याला सहाय्यभूत होतील, असे प्रशिक्षित शिक्षक व सेविका तयार केल्या.या कॉलेजांतून हजारो शिक्षक व शिक्षिका प्रशिक्षित होऊन, शिक्षणक्षेत्रात  सचोटीने,काम करीत आहेत .ह्याच कोसबाडच्या टेकडीवरून ताईंनी, कुरण शाळा, घंटा शाळा, रात्रशाळा ,व्यवसाय शिक्षण असे अनेकविध उपक्रम, मुलांसाठी व एकूणच आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी, सुरू केले. अंगणवाडी या प्रयोगाला तर पुढे शासकीय मान्यताही मिळाली. हे  सर्व कार्य  ताईंनी मादाम मॉंटेसरी यांच्या मूळ तत्त्वाशी फारकत न घेता केले ,म्हणून ते कालातीत  ठरले आहे. ताराताईंनी स्वतः व गिजुभाई यांच्यासमवेत सुमारे 105 पुस्तकांचेही संपादन केलेले आहे. असे सर्वसमावेशक, सर्वांग पूर्ण ,व चौफेर कार्य ताईंनी कोसबाडच्या टेकडीवरून केले. आणि म्हणूनच त्यांना ‘पद्मभूषण’,किताब शासनातर्फे देण्यात आला.

      ताराताई बोर्डीला आल्या, तेव्हा त्यांची पन्नाशी उलटून गेली  होती.  आयुष्यातील कठोर नियतीचे, अनेक आघात पचवून, मनोधैर्य प्रबळ झाले होते. आपल्या मूल्यांवरील  निष्ठा अधिक तीव्र झाल्या होत्या. आयुष्याची निश्‍चित दिशा ठरली होती. मला आजही त्या काळांतील, एकोणीसशे पंचेचाळीसच्या कालखंडातील , ताराताईंचे दर्शन  मनात ठसले आहे,मनःचक्षू समोर येते आहे .शांत ,सोज्वळ, गौरवर्णीय, व्यक्तिमत्त्व, चेहऱ्यावर हुशारीचे तेज विलसत असणाऱे मंद स्मित,असे ताराताईंचे व्यक्तिमत्व अजोड  होते. त्या सात्विक धीरगंभीर ,प्रसन्न  चेहऱ्यामागे, नियतीने केलेल्या,अनेक, कठोर आघातामुळे आलेली,कारुण्याची सूक्ष्म झलकही, कोठेतरी, दृग्गोचर होत असे. अगदी हळुवार,सौम्य आवाजात त्या आम्हा मुलांशी हितगुज करत .त्या,आश्वासक, मधाळ,मवाळ,आणि रसाळ स्वरांचे वर्णन, मला करताच येणार नाही. इतका सोज्वळ,अमृत माधुरी असलेला आवाज, मी तरी कधीही अनुभवलेला नाही ..त्यासाठी ज्ञानोबांची ही ओवीच यथार्थ ठरेल…. 

       ” तैसे साच आणि मवाळ,

         मितले आणि रसाळ,

          शब्द जैसे की, कल्लोळ अमृताचे!”..

     कधी कोणी मुलगा रुसला ,रागावला’ ,रडू लागला, तर त्याला जवळ घेऊन डोक्यावरून, पाठीवरून थोपटून, पटकन शांत करीत व तो हसू लागे. त्यांचा केवळ प्रेमळ स्पर्श , रडणाऱ्या, भांबावलेल्या, मुलाला आनंदित करण्यासाठी  जादू घडवून आणीत असे,शांत करीत असे… हे सहज साध्य नाही त्यासाठी अतीवात्सल्य,ममता, बालकत्वाचे निर्व्याज्य शुद्ध भाव,तर हवेतच,पण कोवळी मऊ मऊ, भावनाप्रधान भाषा, आणि एखाद्या बालका सारखेच पारदर्शक शुद्ध मन हेही आवश्यक असते!ताईं जवळ हे सगळे होते.म्हणूनच त्या बालकाच्या अंतरंगात शिरून, त्याचे मनोभाव समजू शकल्या, म्हणूनच बालजगताचे दर्शनही त्या घेऊ शकल्या. आणि म्हणूनच ,पालकत्व करणाऱ्या, जन्मदात्या पासून ते शिक्षण दात्या पर्यंत,त्यांनी बाल जगताचे,आपल्याला झालेले दर्शन, त्यांनाही सुस्पष्टपणे घडविले. 

    मागे सांगितल्याप्रमाणे तारा ताईंनी  शेकडो पुस्तकांचे संपादन केले आहे.बालकांच्या व पालकांच्या मनोरंजनासाठी आणि बालक, सुखी, सुसंस्कारित, होण्यासाठी, घ्यावयाच्या काळजी संबंधी,आपले विचार मांडलेले आहेत. ‘घरपणा’,विषयी धारणा स्पष्ट करतांना,त्या म्हणतात, 

       घर,गरीब असो अथवा श्रीमंत,शिक्षित वा अशिक्षित, पण तेथे, ‘घरपण’, ही संवेदना जाणीवपूर्वक जोपासणे अत्यंत आवश्यक आहे.

          “घर माझे हे,मातीचे,पण प्रेमाच्या भावाचे”,

   अशी स्थिती म्हणजे घर होय! घरातल्या प्रत्येक सदस्याला, मानसन्मान,आपुलकी तिथे मिळते. प्रसन्नता,श्रमप्रतिष्ठा,स्नेह बंध ,समाज ऋणांची जाणीव,अतिथी सन्मान व ज्ञानार्जनाची ओढ अशी अनेक मूल्ये,इथेच दिली जातात. अर्थातच न सांगता ,हे दृश्य घरांत दिसणे आवश्यक आहे. 

 त्यांची सोपी व लयदार शब्दयोजना,सहज संवाद, या पुस्तकातील भावरम्यता वाढवतात.  स्पष्ट विचारांचे दर्शनही आपल्याला होते.

 बालवाडीत येणा-या सर्व मुलांशी ताई सारख्याच प्रेमाने आपुलकीने वागत असत. मुलगा दलीतवस्तीतील असो किंवा ब्राम्हण वस्तीतील ,ताईंच्या दृष्टीने, त्यांच्याकडे आलेले ते एक देवाघरचे फुल होते! त्यावेळचा एक प्रसंग अजूनही पक्का लक्षात आहे. आत्ता त्या प्रसंगाची आठवण करताना ताईंची त्यावेळची ममता, आणि सर्व धर्म समभाव, प्रकर्षाने जाणवतो.बालवाडी दलीतवस्तीलगतच असल्यामुळे, तेथील  दोन, तीन मुले बालवाडीत येत असत.आणि त्यांचीही  देखभाल  इतर सर्व मुला प्रमाणे होत असे. दलीत वस्तीतील, एक चुणचुणीत मुलगा,  आमचे बरोबर खूप मस्ती करीत असे .बहुदा रतन हे त्याचे नाव स्पष्टपणे आठवते .हा मुलगा ताईंचा थोडा जास्तच लाडका होता. कारण दिसावयास ही गोरापान, आणि वागण्यातही मोठा चुणचुणीत. एके दिवशी रतन बालवाडीत आला नाही .ते ताईंच्या पटकन लक्षांत आले .वास्तविक, कधीकधी, गावांतील इतर काही मुलेही, गैरहजर असत, त्यांची विशेष चौकशी होत नसे.  ताराताई त्या दिवशी बालवाडीत होत्या.मला वाटते ,रतनवर त्यांची विशेष नजर असली पाहिजे, म्हणून त्यांनी तेथील इतर मुलांना विचारून, रतनची चौकशी केली. त्यांचेकडून, रतन आजारी असल्याचे त्यांना कळले.त्यांनी काय करावं , आम्हा सर्व पंधरा एक मुलांना घेऊन, सरळ त्या रतनच्या घरा समोर आल्या. रतनची आई ,अंगणात बांबूच्या टोपल्या वा असेच काहीतरी विणीत बसली होती.  शेजारीच एका साध्या तरटावर, एक मळके कापड अंगावर घेऊन, तापाने फणफणलेला, रतन पडला होता. बाईंनी रतनच्या अंगातील ताप पाहून त्याला थोपटून शांत केले. त्याच्या आईशी बोलून, त्याच्या आजाराची चौकशी केली. तेथेच ठेवलेल्या काही लहान टोपल्या, सुपे, कणगे, बांबूचे तुकडे इत्यादी वस्तूंचा उपयोग करून, एक छोटेसे बालनाट्य आयत्यावेळी  बसऊन, आमच्याकडून करवून घेतले.तासभर सर्वांचेच खूप मनोरंजन झाले. वस्तीतील, शेजारची ही काही  मंडळी, गंमत बघण्यासाठी आली होती. गर्दी पाहून आम्हालाही थोडे स्फुरण चढले होते. तो प्रयोग खूपच यशस्वी झाला, झोपून राहिलेला, मलूल होऊन पडलेला रतन,  उठून बसला, टाळ्या पिटू लागला, आणि आपला आजार विसरून गेला. त्याच्या आईला काही सूचना देऊन,ताई आम्हाला परत वर्गावर घेऊन आल्या. आज हा प्रसंग आठवल्यानंतर ताईंचं मोठेपण, विशेषतः उपेक्षितांचे अंतरंग जाणून, त्यांच्यावर खऱ्या अर्थाने मायेची पखरण करणाऱ्या ताराबाई मोडक, एक माणूस म्हणूनही किती मोठ्या होत्या,याची जाणीव होते 

वास्तविक रतन ला विसरून, ताई आमचा वर्ग ,बालवाडीतच घेऊ शकल्या असत्या पण त्यात ताराताईंचे वेगळेपण दिसले नसते.ताराताईंनी पुढे केलेल्या,  भारत सरकारने  नव्हे तर,  जगाने ,’बाल शिक्षणातील एक ‘अभूतपूर्वप्रयोग’,म्हणून गणल्या गेलेल्या,”अंगणशाळा”, या अभूतपूर्व प्रयोगाची, ती नांदी होती!!आम्ही ती मुले व त्यातील मी एक,  किती भाग्यवान?  त्या दुर्लभ क्षणाचे, आम्ही केवळ साक्षीदारच नव्हतो तर त्यात सहभागी होतो,आणि प्रत्यक्ष  ताराताई मोडक, त्यादिवशी आमच्या नायिका होत्या!! 

अशी ही महान विभूती, आयुष्यातील,  अगदी कोवळ्या वयात,आमच्या डोक्यावरून,  पाठीवरून,हात फिरवून गेली, आम्हाला आशीर्वाद देऊन गेली, आमच्या बालपणी चे काही  क्षण,चिरस्मरणीय,अजरामर करून गेली. कोणाच्याही आयुष्यातील, ही अमाप अशी श्रीमंतीच आहे. गतजन्मीच्या काही सुकृतामुळेच अशी माणसे आयुष्यात येतात, आणि, जीवन सार्थकी लावण्यात,मदतरूप होतात! भविष्यकाळातही, बाईनी ,आमच्यासारख्या अनेक अजाण,निरागस,निर्धन,बालकां,साठी आपले आयुष्य वेचले. हा कर्म योग होता. कर्मयोग,परमेश्वर भक्तीचा सुलभ मार्ग गणला जातो. आपल्या  वाट्याला आलेली, नियतीने सोपविलेली, नित्यकर्मे, मनापासून,आनंदाने, कोणताही स्वार्थ मनी न बाळगता केली,तर कर्मयोग सिद्धीस जातो ,असे  आपली गीताई सांगते .म्हणूनच बाईंनी “सिद्धी” मिळविली असे म्हणावेसे वाटते. ताराताई कर्मयोगिनी ठरल्या. साने गुरुजी म्हणतात,

करील मनोरंजन जो मुलांचे ,जडेल नाते प्रभूशी तयाचे!”

 ताईंनी आयुष्यभर मुलांचे मनोरंजन केले ,म्हणून बाईंचे परमेश्वराशीही कायमचे नाते  जुळले,किंबहुना त्या स्वतःच देवरूप झाल्या ! मागे सांगितल्या प्रमाणे,नियतीचे, अनेक आघात सोसून,ही समाजाचे  ऋण फेडतांना, समाजालाच उपकृत  करून गेल्या,आम्हालाच ऋणात ठेऊन गेल्या.ताराताई ,हे सर्व अनासक्त वृत्तीने कसे करू शकल्या असतील? त्यांच्या अंतकरणात, सतत वाहत असलेला, अखंड प्रसन्नतेचा निर्झर त्यांना संसार दुःखाने कधीच लीप्त का  करू शकला नाही? याचे उत्तर ज्ञानोबांनी, छान पैकी दिले आहे….

         देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता समस्ता । तेथ रिगणे नाही,संसार दुःख।।

आम्हा राऊत कुटुंबीयांना पद्मविभूषण तारातांईबद्दल विशेष आस्था व आदर असण्याचे अजून एक कारण म्हणजे, आमच्यातील काहीं व्यक्तींचा, त्यांच्या संस्थांशी आलेला अगदी निकटचा संबंध! ग्रामीण बाल शिक्षण केंद्र जेव्हा एकोणीसशे पंचेचाळीस साली बोर्डीस सुरू झाले,  त्यावेळी आमचे मामा खंडेराव चुरी बालवाडीत कार्यालयीन कर्मचारी म्हणून काम करीत होते. माझी धाकटी बहिण कै ममा राऊत  व चुलत बहीणी, कै शालिनी चुरी,सौ उषा राऊत यांनी, कोसबाड येथील अध्यापन मंदिरात, अनुक्रमे विद्यार्थिनी व कार्यालयीन सेविका म्हणून योगदान दिले आहे.माझे बंधू, प्रदीप राऊत हे संस्थेच्या डी.एड .विद्यालयात, अनेक वर्षे प्राध्यापक व पुढे कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम करून ,सेवानिवृत्त झाले. माननीय तारा ताईंचे  मातृवत  प्रेम व छाया  आम्हा सर्वांवर सतत रहावी, ही परमेश्वर चरणी प्रार्थना करून ताराताईंच्या पावन स्मृतीला अनेक अनेक प्रणाम करतो.

कै.तारा बाईंच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या व कोसबाड येथील ग्राम बाल शिक्षा केंद्राने जतन केलेल्या, या अमूल्य वस्तू.

दिगंबर वामन राऊत. 

सेवा निवृत्त, डे.जनरल मॅनेजर, 

हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड.