UDCT Days

UDCT- now known as ICT (Institute Of Chemical Technology)

यु.डी.सी.टी. म्हणजे युनिवर्सिटी डिपार्टमेन्टं ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (University Department of Chemical Technology). मुंबई विद्यापीठाच्या तंत्र-रसायन विभागाला काही विशिष्ट आकार व  अधिकार देऊन हा स्वतंत्र विभाग विद्यापीठाचे एक डिपार्टमेन्टं म्हणून काम करीत. हल्ली त्यास आय. सी. टी. म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (Institute of Chemical Technology -ICT) असे म्हणतात. आता या डिपार्टमेंटचे रूपांतर इन्स्टिट्यूटमध्ये झाले असून संपूर्णपणे स्वतंत्र अशी ही मुंबई विद्यापीठाशी संलग्न संस्था आहे. मी जेव्हा तेथे प्रवेश घेतला, त्याचे आधीपासून व आजही भारतातीलच नव्हे, तर जगातील एक अव्वल शिक्षण संस्थांमध्ये या कॉलेजची गणना होते.  भारतातील असा एकही केमिकल कारखाना नसेल जेथे या संस्थेतून शिक्षण घेतलेला पदवीधर काम करत नाही. या संस्थेने डॉ. वेंकट रामन, डॉ. काणे, डॉ. नाबर, डॉ. टिळक, यांसारखे उत्तम गुरुवर्यं व मुकेश अंबानी सारखे उद्योगपती, डॉ. शर्मा, डॉ. माशेलकर, यांसारखे उत्तम कर्तृत्वाचे माजी विद्यार्थी दिले आहेत.

आजही येथील पदवीधराची नोकरी त्याची शेवटची परीक्षा पास होण्याआधीच कॅम्पस इंटरव्हुतून (campus interview) ते उद्योगपती करीत असतात. मागणी पेक्षा पुरवठा कमी असल्याने, येथील पदवीधरास नोकरीसाठी कधीच प्रश्न आलेला नाही. बरेच पदवीधर संशोधन कार्यात वाहून घेतात, तर काही व्यवसाय-धंदा काढून आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवितात. परदेशी शिक्षणसंस्थांमध्ये सुद्धा या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी एवढा लौकिक कमावलेला आहे, की बहुतेक परदेशी जाणारे पदवीधर गेल्या गेल्याच शिष्यवृत्ती वा आर्थिक मदत मिळवितात! 

मला या संस्थेत प्रवेश मिळाला हे मी माझे परमभाग्य समजतो, कारण त्यामुळे माझ्या दिशाहीन शिक्षणास एक  निश्चित दिशा प्राप्त झाली व उच्चमोत्तम अशा देशी-परदेशी कंपन्यात काम करण्याची संधी मिळाली. डॉ. काणे, डॉ. टिळक, डॉ. शर्मा यांसारख्या दिग्गज गुरुजींची शिकवणी मिळाली, अनेक हुषार विद्यार्थ्यांशी मैत्री झाली.

बी. एससी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डीहून मी मुंबईत माटुंग्याला युडीसीटीचे माहिती पत्रक व अर्जाचा नमुना घेण्यासाठी एक दिवस आलो. राजाभाऊ दमणकर माझ्या बरोबर आला होता. कॉलेजात मला माझा इस्माईल वसतिगृहांतील सहाध्यायी शेट्टी देखील भेटला. त्यालाही युडीसीटीमध्ये  प्रवेश हवा होता. माहिती पत्रक घेतल्यानंतर आम्ही परिसरातून फेरी मारली. तेथील अद्यावत प्रयोग शाळा, सुटाबूटातून फिरणारे प्राध्यापक, चेहऱ्यावर गंभीरतेचा आव आणून आपल्याच विश्वात दंग असणारे रिसर्च स्टुडंट्स, प्रचंड वर्ग व एकूणच मनावर प्रचंडपणाचे दडपण आणणारा तो परिसर पाहून माझ्या मनाची चल बिचल झाली. साताऱ्याच्या विहिरीतून मी इस्माईलच्या सरोवरात आलो; पण हा तर महासागर होता. आपला टिकाव या कॉलेजात लागेल काय? या वातावरणात आपण कसे सामावले जाऊ? अशा प्रकारची एक न्यूनगंडाची भावना माझे मनांत आली. घरी आल्यावर मी आप्पांस मनापासून माझी अवस्था सांगितली व मी एम.एस सी (M. Sc.) चा फॉर्म भरतो, तो अभ्यासक्रम मला झेपेल असे सांगू लागलो. आप्पांनी ताड्कन उत्तर दिले, “तुला करायचे तर हाच अभ्यासक्रम करावा लागेल, अथवा तुला काय करायचे ते कर!” आप्पा एवढी पटकन व तोडून टाकणारी प्रतिक्रीया कधी देत नसत, त्यामुळे त्यांची ही प्रतिक्रीया ऐेकून मी शांत राहिलो, तेथून निघून गेलो. थोड्या वेळाने आप्पाच माझे जवळ आले आणि त्यांच्या नेहमीच्या प्रेमळ शब्दांत, पाठीवर हात फिरवित, त्यांनी मला समजावले. “तुला अपयश आले तरी, मी तुझ्या पाठीशी राहीन, तुझे प्रयन्त तू कर!” 

आप्पांनी हा धीर दिल्यावर, मी दुसरा कोणताच विचार केला नाही. आजही आप्पांच्या त्या अचूक मार्गदर्शनाची व त्यासाठी त्यांच्या पोट तिडीकेची आठवण झाली की त्यांच्या दूरदृष्टीची कल्पना येते. वास्तविक त्यावेळी, ‘ठीक आहे एम एसी तर एम एसी, तो अभ्यासक्रम व्यवस्थित कर!’ असे आप्पा सांगू शकले असते. पण त्यांनी सुध्दा या विषयाचा अभ्यास केला होता, माहिती मागविली होती.

मला ऑइल, फॅट्स, आणि वेक्सेस (OFW- oil, fats, waxes) या शाखेसाठी प्रवेश मिळाला. वर्ग सुरु झाले आणि एके दिवशी आमच्या कॉलेजचे रजिस्ट्रार श्री. गुप्ते यांनी मला चिठ्ठी पाठवून भेटावयास बोलाविले, मी मनातून घाबरलो कारण एवढा मोठा माणूस मला का बरे बोलावित असेल? गुप्ते साहेबांची प्रेमळ व हसरी मुद्रा पाहून आर्धी भीती पळाली. त्यांनी मला बसण्यास सांगितले व माझी जुजबी चौकशी करुन आप्पांचे पत्र दाखविले. नेहमी प्रमाणे आप्पांनी आपल्या स्थितिचे वर्णन करुन कोणत्या परिस्थितीत मी मुलास या उच्च शिक्षणासाठी पाठवित आहे हे लिहले होते व शेवटी आपल्या मार्गदर्शनाची अपेक्षा करीत असल्याचे लिहले होते. गुप्ते साहेब त्या पत्राने भारवून गेले होते. त्यांनी मला खरेच खूप मोठे मार्गदर्शन केले व मदत देखील केली! आप्पांना देखील त्यांनी पत्र पाठवून हाच अभ्यासक्रम मी का करावा याचे सविस्तर विवेचन केले होते व म्हणूनच आप्पा माझ्या बाबतीत निच्छित निणर्य घेऊन,  मला त्यादिवशी समजावून सांगत होते, मला आता आप्पांच्या या सद्हेतूचा उलगडा झाला. गुप्ते सरांनी मला मुद्दामून OFW या विभागात पहिल्या क्रमांकाने प्रवेश दिला होता. ज्यामुळे मला युनिव्हर्सिटीची तीस रुपये महिना स्कॉलरशीप मिळणार होती व माझा मोठा आर्थिक प्रश्न सुटणार होता. त्यावेळी डाईज टेक्नॉलॉजी (dyes technology) ही एक उच्च शाखा गणली जात असे. मला त्याचे तळाचे ऍडमिशन मिळाले असते, परंतु तसे न करता रजिस्ट्रारसाहेबांनी खास माझ्या आर्थिक क्षमतेचा विचार करून, मला OFW मध्ये पहिला नंबर देऊन माझ्या शिष्यवृत्तीची सोय केली होती. गुप्ते साहेब म्हणाले, बी.एससी (टेक) ( B.Sc Tech.) पदवी घेणे महत्त्वाचे, कोणती शाखा हे गौण आहे. कारण पुढील सर्व वाटचाल आपल्या हुषारी वर करायची असते, गुप्ते स्वतः ओ.एफ.डब्ल्यू. मध्ये  बी.एससी (टेक) होते व विद्यापीठात ऑडमिनिस्ट्रेशन मध्ये येवढ्या उच्च हुद्द्यावर पोहोचले होते! 

त्यावेळी U.D.T.C मध्ये खालील सात विभागांतून बी.एसी.टेक ( B.Sc.tech) चा अभ्यासक्रम शिकविला जाई –

 • डाईज टेक्नॉलॉजी (dyes technology)
 • प्लास्टिकस  (plastics)
 • पेन्ट्स अँड पिगमेंट (paints and pigments)
 • ऑईल , फॅट्स , अँड वॅक्स (oil, fats, and, waxes)
 •  फुड्स (foods)
 • फार्मास्युटिकल (pharmaceuticals)
 • टेक्सटाईल केमिस्टरी (textile chemistry)

या शिवाय B.Pharm (बी. फार्म- Pharmacy) हा अभ्यासक्रम व B.Chem. Engg. हा इंजिनियरींग कोर्स १२ वी नंतर असे.

या सर्व अभ्यासक्रमासाठी अत्यंत तज्ञ व उच्चशिक्षित व्यासंगी प्राध्यापक मंडळी होती. काही प्रमुख प्राध्यापक मंडळीची नावे खालील प्रमाणे,

 • डायरेक्टर: डॉ. नाबर
 • केमिकल इंजिनियरींग: डॉ. एम एम शर्मा
 • डाईज टेक्नॉलॉजी: डॉ. बाळ टिळक
 • ऑईल्स टेक्नॉलॉजी: डॉ. काणे
 • पेन्ट्स अँड पिगमेंटस: डॉ. पुणतां बाकर
 • प्लास्टिक्स: डॉ. पोतनीस
 • फूड्स: डॉ. रेगे
 • टेक्सटाईल: डॉ. दारुवाला.

बहुतेक मराठी शास्त्रज्ञांचा, यु.डी.सी.टी मध्ये वर्चस्व होता व त्यामुळेही असेल, कारभार अत्यंत स्वछ व शिस्तीने चालू होता.  त्यावेळी यू.डी.सी.टी मध्ये प्रोफेसर वा डिपार्टमेंट हेड ही जागा मिळवण्यासाठी परदेशी विद्यापिठाची डॉक्टरेट व तेथील संशोधनाचा अनुभव ही एक मुख्य अट होती व त्यामुळे सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रात तज्ञ म्हणून ओळखली जात.

ही सर्व मंडळी केवळ पुस्तकी ज्ञानाने तज्ञ नव्हती तर प्रत्यक्ष कारखान्यांत व संशोधन संस्थात जे काम चालते, त्याचेही संपूर्ण ज्ञान त्यांस असे. UDCT व इतर कॉलेजातील प्राध्यापकवर्ग यांत हाच मोठा फरक होता, की UDCT मधील मंडळी प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्राशी संपूर्ण परिचित होती व बहुतेक प्राध्यापक अनेक मोठ्या कंपन्यांचे सल्लागार असत. तसेच त्यांचे हाताखाली पदव्युत्तर डॉक्टरीचा अभ्यास करणारे विद्यार्थी प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्राशी संबंधीत समस्यांवरच आपला प्रबंध तयार करीत, त्यामुळे मिळणारे शिक्षण व प्रत्यक्ष परिस्थिति यामध्ये तफावत नसे.

आमचा ओ एफ डब्ल्यू चा अभ्यासक्रम हा खाद्य व अखाद्य तेले (vegitable oils) तसेच विविध प्राणीतन्य तेले (animal fats), सागरी तेले (marine oils), व मेणे (waxes) यांचे उत्पादन, शुध्दीकरण, व विविध औद्योगिक कामासाठी त्यांचा उपयोग या संबंधात होता. पेट्रोलियम तेलाचा संबंध आला नव्हता तरी वॅक्स (waxes)चा अभ्यास करतांना थोडा संबंध येई! डॉ. काणे हे त्यावेळी साठीच्या आसपास पोहोचले होते व या क्षेत्रात त्यांचे आंतराष्ट्रीय स्तरावर नाव होते. अमेरिकेतील विस्कॉन्सिन (University of Wisconsin) विद्यापीठात त्यांनी पी. एच.डी (Ph.d) चा अभ्यास केला होता व तेथील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. हिल्डीच यांचे मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केले होते. आमच्या विविध पाठ्य-पुस्तकांत या दोघांनी या क्षेत्रात केलेल्या कामाचा उल्लेख येई व त्या वरुन डॉ. काणेंचे काम आंतरराष्ट्रीय क्षेत्रात किती मोलाचे आहे याची जाणीव आम्हास होई. मात्र आपल्या कामाने येवढे मोठे असलेले डॉक्टर, अगदीच साधे व निर्गर्वी असे होते. कॉलेजच्या शेजारील व ‘दुर्गा- निवास’ या इमारतीत ते राहत. कॉलेजमध्ये प्रवेश करतांना त्यांच्या वेष ‘Three piece suit’ टाय-सूट-बूट असा असे मात्र बाहेर पडले, की धोतर शर्ट काळी टोपी असा असे!

त्यांच्या या साधेपणामुळे आमची एकदा खूप फजिती झाली. कॉलेजचा दुसरा-तिसरा दिवस असेल, सकाळीच डॉ. काणेंचे सूटा बूटांतील दर्शन आम्ही घेतले होते. संध्याकाळी त्यांनीच दिलेल्या काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आम्ही वाचनालयात (मी व नार्वेकर) काही पुस्तके, संदर्भ शोधित होतो. इतरही बरीच मुले, प्राध्यापक, आपले काम करीत होती. काम करतांनाच आम्हा दोघांची ‘टवळी’ चालू होती व त्यांना मधे-मधे डॉ. काणेचा ‘उद्धार’ ही आम्ही करीत होतो. या डॉ. काणेंनी आता पासूनच आम्हाला कशाला कामाला लावले असे काही तरी आम्ही बोललो असू. आमच्या समोरील खुर्चीवर धोतर – टोपी घालून बसलेल्या एका गृहस्थानी आम्हास हसत उत्तर दिले – “मी डॉ. काणेंना तुमची तक्रार सांगेन बरे का” आम्हास आवाज ओळखीचा वाटल्याने आम्ही त्या व्यक्तिला थोडे निरखून पहिले, आपल्या घरच्या वेषातील डॉ. काणेच समोर बसले होते! पुढील दोन दिवस त्यांच्या वर्गात मानवर करुन बघण्याची हिमंत झाली नाही. डॉक्टरांनी देखील आमचे म्हणणे हसण्यावारीच नेले! परदेशात इतकी वर्षे काढून डॉक्टरांचा मूळचा ‘भटजी पिंड’ बदलला नव्हता. कोणतेही व्यसन तर सोडाच पण अत्यंत काटकसरीपणा हा त्यांचा स्थायी भाव होता. त्याचा उपद्रव त्यांच्या विद्यार्त्यांस कधी-कधी होई. त्यावेळी कॅम्पस इंटरव्यू मधून कंपन्या विद्यार्थ्यास कामासाठी निवडत, व पगार मात्र आमचे प्रोफेसर सांगतील तसा देत. बाकीच्या सर्व विभागाचे प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांस बी. एससी. (टेक) नंतर सुमारे ४०० रुपये शिफारस करीत. डॉक्टर काणे जेमतेम ३०० ते ३५० रुपयांची शिफारस देत! ते असे का वागत कोण जाणे? मी बी. एससी (टेक) नंतर जेव्हां मुलाखती देत होतो तेव्हा एका प्रसिध्द अमेरिकन कंपनीत मुलाखतीनंतर निवड झाली. मात्र जेव्हा पगाराची गोष्ट निघाली तेव्हां त्यांचे पर्सनल मॅनेजर म्हणाले, ‘राऊत, आमच्या कंपनीच्या नियमानुसार तुला ४५० रु. पगार द्यायला हवा , पण डॉ. काणेंनी आम्हाला ३५० रु ची शिफारस केली आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या शिफारशी बाहेर जाऊ शकत नाही!’ अर्थातच, मी त्या नोकरीवर पाणी सोडले व माझ्या Food Dept. चा मित्र तेथे ४५० रु  वर गेला. डॉक्टर स्वतः गोदरेज, लिव्हर्स, टाटा, अशा मोठ्या कंपन्यांचे सल्लागार होते पण अत्यंत अल्प मेहनताना घेत व त्यांतीलही मोठा हिस्सा युनिव्हर्सिटीस परत करीत! त्यांचे हाताखाली एम. एससी (टेक) (M.Sc tech) किंवा पी. एचडी (टेक) (PhD tech )चा पदव्युत्तर अभ्यास करणे म्हणजे दुसरे मोठे दिव्य असे! अत्यंत सखोल व परिपूर्ण अशी माहिती गोळा करुन, त्याचे प्रयोगाद्वारे परिशिलन करावे लागे, आणि डॉक्टरांचे संपूर्ण समाधान झाल्याशिवाय ते काम पूर्ण झाले सांगत नसत. इतर विद्यार्थी साधारणत: दोन ते तीन वर्षांत एम एससी टेक व चार ते पाच वर्षांत पी.एचडी पर्यंत मजल मारीत, डॉक्टरांकडे मात्र (M.Sc. tech) लाच सर्व साधारण पणे चार वर्षे लागत. काही विद्यार्थ्यांनी ४ वर्षांनंतर काहीच प्रगति झाली नाही म्हणून अभ्यासक्रम सोडून दिल्याची देखील उदाहरणे होती! मी मात्र या बाबतीत खूपच नशिबवान ठरलो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रबंध लिहून मी (M.Sc tech)ची पदवी मिळविली. आज ही पदवी लेखी परीक्षा देऊन मिळविता येते, आमचे वेळी ही पदवी केवळ संशोधनाद्वारे प्रबंध सादर करुनच मिळत होती व त्यामुळेच वेळेला बंधन नसे. डॉक्टरांची व माझी तर अशी छान जुळली होती की मी केवळ अडीज वर्षांत पदवी हातात घेणारा त्यांचा पहिला विद्यार्थी. कदाचित त्यावेळी ते सेवानिवृत्तीच्या जवळ आले होते, त्यामुळेही असेल, माझे काम पटापट प्रसिध्द होऊ शकले व लवकर पदवी मिळाली. तो इतिहास ही पुढे येईलच.

आमचे दुसरे प्राध्यापक म्हणजे डॉ. रिबेल्लो बुटक्या-चणीचे व विव्दत्तेचा चेहऱ्यावर डौल मिरविणारे, रिबेल्लो देखील अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यालयाचे डॉक्टरेट होते व त्यांनी ही या क्षेत्रात मोठे नाव मिळविले होते. मात्र रिबेल्लो व काणे दोघांचे तेवढे पटत नसावे कारण रिबेल्लोचा स्वभाव डॉ. काण्यांच्या अगदी विरुध्द! त्यांना मोठेपणा, पैसा व प्रसिध्दी याचा खूप हव्यास होता. तसेच हलक्या कानाचे असल्याने, एखाद्या विषयी चुकीचा ग्रह करुन घेतला, की कायमचे त्याला कमीच लेखत, त्यामुळे वर्गात त्यांचे आवडते व नावडते असे दोन प्रकारचे विद्यार्थी असत. मी त्यांचा ‘नावडता’ विद्यार्थी होतो. पुढे मी गोदरेज मध्ये कामाला लागल्यावर, रिबेल्लो देखील त्या कंपनीचे सल्लागार म्हणून आले. आमचे मॅनेजर ठाकूर यांचेशी त्यांचे पटत नव्हते म्हणून त्यांनी मला जवळ केले व आमची चांगली मैत्री झाली होती. ‘नावडतीचे मीठ अळणी’ या म्हणींचा प्रत्यय रिबेल्लो आम्हा नावडत्या मुलांस नेहमी देत. आमच्या प्रत्येक विषयाच्या चाचणी परीक्षा होत व त्यात A,B,C,D, अशा ग्रेड्स मिळत. त्यानुसार वार्षिक परीक्षेत मार्कांची बेरीज होई व A ग्रेड सर्वोत्तम समजली जाई तर D म्हणजे नापास! एका चाचणीत मी उत्तर पत्रिकेच्या पहिल्या पानापासून सुरुवात न करता दुसऱ्या पानापासून लिहावयास सुरुवात केली. उत्तर पत्रिका डॉ. रिबेल्लोने परत दिली तेव्हा मला ‘B’ ग्रेड दिली होती व शेरा होता “तू पहिल्या पानावर का लिहले नाहीस, म्हणून ही शिक्षा!”

त्यांच्या आवडते विद्यार्थी पहिल्याच काय, पण कोणत्याही पानावर काही न लिहता त्यांची A ग्रेड ठरलेली असे! श्री. वागले व पद्मनाभन हे आम्हास डेमोस्ट्रेटर (demonstrator) होते. वागळेंची नुकतीच M.Sc tech. झाली होती व ते नोकरीच्या शोधात होते, तर पद्मनाभन गेली आठ वर्षे M.Sc Tech करीत असून त्यांचा कोठेच काही पत्ता लागत नव्हता.

अत्यंत हुषार चिकित्सक व स्पष्ट वक्ते असणारे वागळे विद्यार्थ्यांवर दरारा ठेवून तर होतेच, पण प्रसंगी आपल्या प्राध्यापकांस देखील दोन शब्द सुनावण्यास कमी करत नसत. मात्र त्यांचे शिकविणे अगदी पध्दतशीर असे. वागळे सर पुढे ‘जनरल सुप्रिटेंडन्स’ या परदेशी कंपनीत रुजू झाले, काही काळ त्यांनी स्वतःचा व्यवसाय केला व सध्या मुंबईत ‘ग्राहक चळवळीचे’ एक सल्लागार म्हणून काम करतात, पार्ल्यात असल्याने मला ही कधी अधून मधून भेटतात. पद्मनाभन खरेच दुर्दैवी प्राणी. हुषारी असून त्यांना त्याचा फायदा करुन घेता आला नाही, यांचे कारण त्यांच्या स्वभावांतील ‘धरसोड’ पणा व सर्वानाच खुश ठेवण्यास जाण्याची वृत्ती असावी. डॉ. रिबेल्लोचे विद्यार्थी असलेले ‘पद्दु’ डॉ. काणेंशी देखील खूपच सलगी दाखवित व विद्यार्थ्याना देखील खुश ठेवीत, हेच रिबेल्लोना खटकले असावे व त्यामुळे त्यांना पदवीपासून वंचित राहावे लागले. शेवटी ते UDCT मधून त्याच पदावरुन निवृत्त झाले. ना-पदवी, ना धड नोकरी अशी ‘ना घरका ना घाटका’ अशी त्यांची अवस्था झाली. मात्र आम्हा विद्यार्थ्यांना ते खूप जवळचे वाटत व त्यांचेकडे कोणताही प्रश्न निःसंकोच पणे आम्ही घेऊन जात असू. श्री. मेल्वीन डिकून्हा हे आणखी एक डेमो. आमच्या साठी होते व त्यांची डॉ. काणेनी वाट लावली होती. पद्मनाभनप्रमाणे डिकून्हा डॉ. काणेंकडे आठ वर्षे M.Sc tech साठी संशोधन करीत होते व त्यांचे ही पदवीचे काम होत नव्हते. डॉ. काणेंशी काही मतभेद झाल्याने त्यांना ही शेवटी एवढे वर्षानंतर ते काम अपुर्णच सोडून द्यावे लागले व त्या डिकुन्हानी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु केला. मी मागे सांगितल्या प्रमाणे त्यावेळी हा M.Sc tech वा PhD चा अभ्यासक्रम मार्गदर्शकाच्या हाताखाली करणे म्हणजे ‘सुळा वरची पोळी’ असे व जर कधी आपल्या गुरुवर्यांची खप्पा मर्जी झाली तर अनेक वर्षाच्या मेहनतीवर पाणी पडत असे. वागळे सरांनंतर श्री. थापर हे देखील आम्हास डेमो. म्हणून आले होते. मात्र त्यांनी डॉ. काणेंकडून आपली PhD  घेतली व ते औद्योगिक जगात काम करण्यासाठी निघून गेले. 

श्री केशवराव धारप व श्री.सहस्त्रबुध्दे ही जोड गोळी आम्हास Lab Assistant (प्रयोगशाळा मदतनीस) म्हणून होती. दोघेही जुने जाणकार होते व स्वभावाने एकमेकांच्या विरुध्द होते. मात्र दोघांनाही एकमेकाबद्दल खूप आदर असे! सहस्त्रबुध्दे हे त्यावेळचे B.Sc होते व एकंदरीतच QC (quality control) या विषयावर त्यांना सखोल ज्ञान होते, खूप कमी बोलत व काम अगदी पध्दतशीर करीत. कोणतेही केमिकल आम्हास प्रयोगासाठी हवे असल्यास त्वरीत मिळवून देत. डोंबिवलीहून रोज माटुंग्यास येत, तरी कधी उशीरा आल्याचे लक्षात नाही. माझ्याशी त्यांचे खूपच मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले होते. ते तेथे असे पर्यंत माझा त्यांच्याशी संपर्क होता, त्यानंतर मात्र तो तुटला. धारप एक अजब नमुना होता. शुभ्र रुपेरी केसांचे 6 फूट उंचीचे व तांबुस अंगकांती, घारे डोळे, धारप आपल्या धार-धार आवाजाने विद्यार्थ्यांवर जरब निर्माण करीत. नेहमी हरीॐ चा जप करणारे धारप गोंदवलेकर महाराजांचे भक्त होते व वरचेवर तेथे जात ही असत. शिवाय त्यांना अभंग-कविता करण्याचा ही शौक होता व कधी-मधी ते ‘काव्य’ आम्हास जबरदस्तीने ऐकावे लागे. व्यक्तिमत्त्व- ‘मुख मे राम व बगल मे छुरी’ असे वाटे कारण डॉ. काण्यांशी त्यांचे काही नाते असल्याने आमची तक्रार सरळ डॉक्टरांकडे जाई व त्यामुळे काही जणांस अचानक डॉक्टरांचा ‘धोबीपछाड’ पडे! वैयक्तिक व जीवनात ही थोडे वैफल्यग्रस्त असल्याने राग ही लवकर येई. त्यांची एकुलती एक मुलगी खूपच वर्षांपासून अविवाहित होती व जावई मिळत नव्हता. त्यामुळे ही असेल, धारप काही विद्यार्थ्याना खूपच जवळ करीत, त्यांचे विषयी आस्था दाखवित! मी धारपांच्या खूपच जवळ होतो ह्याला कारण रोज जेवल्यावर धारप मला आपल्या चंचीतील मसाल्याचे छान पान जमवून देत! त्यामुळे काही दिवस इतर ‘नाराज’ मित्र मला धारपांचा होणारा जावई म्हणूनही चिडवीत. ते काहीही असले, तरी माझ्या बाबतीत शेवट पर्यंत धारप खूपच हळवे असत व मी ज्यावेळी UDCT सोडून गोदरेजमध्ये गेलो त्यावेळी त्यांनी माझ्यावर एक निरोपाची छान कविता केली होती! मला त्यांनी गोरेगांवच्या त्यांच्या घरीही येण्याचे आमंत्रण दिले होते पण ते काही जमले नाही व दुर्देवाने सेवानिवृत्त झाल्यावर लवकरच धारप बुवा कैलासवासी झाले. ‘निरोप आम्ही घेतो, आज रवत्या तुझा’ अशी त्यांची माझ्यावरील कवितेची पहिली ओळ आठवते!  

या शिवाय हाटे, पाताडे, गरूड, वेंकट, लक्ष्मण ही मंडळी देखील आमच्या खात्यामध्ये विविध कामे पहात होती. हाटे हा खानदेशी माणूस वयाच्या पस्तीशीत असून अविवाहीतच राहीला होता, त्यामुळे नेहमी ‘चिंतातूर जंतू’ सारखा काळजीत असे व कधीही काम कसे होणार नाही याचे विचार करी. तर पाताडेंना आम्ही ‘बाताडे’ म्हणत असू कारण गप्पा खूप व काम कमी अशी त्यांची परिस्थिती. वेंकट नेहमी पैशाच्या चिंतेत व विद्यार्थ्यांपैकी कोणी ‘बकरा’ ‘धनको’ म्हणून मिळतो का याच्या शोधात असे! गरूड सरळमार्गी होता! लक्ष्मण ही एक आणखीन वल्ली होता. मुंबईतच वाढलेल्या पंचवीस-एक वर्षाचा हा तरुण पद्मनाभनच्या शब्दा खातर, आमच्या लॅब मध्ये कर्मचारी म्हणून, आमची उपकरणे सफाईचे काम करी. कधी-कधी खिडकी समोरील सिंक समोर काम करतांना साहेब मी पाच मिनिटांत आलोच म्हणून कुठे गडप होई तो अर्ध्या पाऊण तासाने प्रकट होई. कामात ही नीट लक्ष नसे. हा काय प्रकार आहे म्हणून काही ‘संशोधक’ विद्यार्थ्यांनी आपले मुख्य संशोधन काही काळ सोडून लक्ष्मण वर ‘संशोधन’ केले. व मोठे घबाड त्यांच्या हाती आले!  आमची ही प्रयोग शाळा (research lab) मुख्य इमारतीपासून दूर व DonBosco-UDCT मधून जाणाऱ्या गल्लीच्या तोंडाशी होती. त्या गल्लीत दुपारी-संध्याकाळी काही मोटर गाड्या उभ्या रहात व काही रंगेल जोडपी आपले प्रेमाचे रंग ढंग, गाडीच्या काचा वरकरुन येथे उधळीत. मुंबईत वाढलेल्या लक्ष्मणच्या नजरेतून अशी गाडी सुटत नसे व तो गाडीच्या आसपास घोटाळत राहून आपला “आंबट शौक” पुरा करी! आमच्या काही ‘संशोधकांनी’ त्यानंतर लक्ष्मणाला ही एक कामगिरीच दिली व “एकटा जाऊ नकोस अम्हाला ही सांग” अशी तंबी देखील दिली! डॉ. काणेंचा सेक्रेटरी, एक अनोखा नमुना आम्हास त्यावेळी भेटला. वयाच्या तिशीत असलेला हा गृहस्थ मूळ अणजूर या कुलाबा जिल्ह्यातील गांवचा. तेथे खूप शेती-जमीन असलेला, पण शेतीमध्ये त्याला रस नव्हता, म्हणून पदवीधर होऊन स्टेनो झाला. मराठी मातृभाषा असून,  एक उत्कृष्ठ इंग्रजी स्टेनो म्हणून त्याने प्रसिद्धी मिळविली. रुबाबदार व्यक्तिमत्त्व व त्याला सफाईदार इंग्रजी-मराठी बोलण्याची जोड, त्यामुळे तो कोणावरही त्वरीत छाप पाडी. ह्याच गुणांचा उपयोग करुन या गृहस्थाने विवाहित खूप मौत्रिणी जमविल्या होत्या व तरीही हा ‘जमवा जमवीचा’ छंद काही सुटत नव्हता. डोंबिवलीहून माटुंग्यास येण्यास तो सकाळी ७ ला घरुन निघे व ११ पर्यंत ऑफिसात येई. मधल्या वेळात कोठे काही ‘टेहळणी’ किंवा ‘शिकार’ मिळते काय वगैरे उद्योग चाले. सरळ कधी माटुंग्यास उतरत नसे. मनाचा ही सरळ असल्याने, आपल्या या ‘शिकार कथा’ मोठ्या रसपूर्ण रितीने सांगे. त्यावेळी आम्हा बॅचलर लोकांचा लंच किवा इतर फावल्या वेळी पाटीलच्या ‘युध्दस्थ रम्य कथा’  ऐकण्यासाठी त्याचे भोवती गराडा असे. तो सांगत असे त्यांत सत्य किती व मसाला किती हे जरी सोडले तरी काही तथ्य नक्कीच व काही मैत्रिणींना माटुंग्यास भेटण्यास बोलावित असल्याचे आम्ही ही पाहत असू! 

यु.डी.सी.टी सोडल्यानंतर तो चर्चगेटला मुंबई युनिव्हर्सिटीच्या कार्यालयात कामास गेला. तेथे तर त्यास मोकळे रान मिळाले. मध्यंतरी त्याचा माझा संपर्क तुटला होता पण आठ-एक वर्षा पूर्वी अचानक माझा पत्ता विचारत तो आमच्या हिंदुस्थान-भवन कार्यालयात आला व आमच्या गप्पा गोष्टी झाल्या. त्यावेळी मात्र त्याला मुलीसाठी गॅस हवा होता व मुलाबाळांच्या  लग्न-नोकरी या प्रश्नांनी ग्रस्त होता, पूर्वीचा जोश आता नव्हता ! शेवटी मानवी स्वभाव हा सर्वत्र सारखाच! ज्या युडीसीटी मध्ये प्रकांड विद्वतेचे प्राध्यापक व जबर प्रतिभेचे विद्यार्थी पाहिले तेथे अशी रंगी-ढंगी माणसे ही पहिली. पळसाला पाने तीनच, कोठेही जा. युडीसीटीत भेटलेल्या या अनेक व्यक्ती आणि वल्लीपैकी एक अलौकीक व्यक्तीची त्यावेळी झालेली ओळख ही आयुष्याची मोठी कमाई वाटते. आजही मनाला अतीव समाधान होते की – त्यावेळी आम्ही ‘त्यांचे’ सहाध्यार्य होतो… 

आमच्या १९६३-६४ च्या युडीसीटी मधिल पहिल्या वर्षी कधी खेळांच्या वा सभा, सेमिनारच्या निमित्ताने एक केमिकल इंजिनियरीगंच्या पहिल्या वर्षालाच आलेला विद्यार्थी, माझे तरी लक्ष वेधून घेत असे. शरीर यष्टीने अगदीच किरकोळ, डोळ्यावर चष्मा आणि गालावर देवीचे खोल व्रण असलेला मुलगा नेहमी खाकी हाफ पँट व सफेद साधा शर्ट अशा वेषात असे. झकपक कपड्यावर उच्ची अत्तराचे फवारे उडविणाऱ्या मुलांच्या त्या गर्दीत म्हणूनच तो मुलगा ‘उठून’ दिसे. मात्र त्याची चौकशी करावी,  ओळख वाढवावी असे कुणाला कशाला वाटेल? वर्षभर तसा तो दुर्लक्षित राहिला. मात्र तो हुषार आहे असे काही विद्यार्थी सांगत असत. तसे सगळेच तेथे हुषार होते! मात्र पहिल्या वर्षाच्या युनिव्हर्सिटी परीक्षेचे निकाल आले आणि सर्व युडीसीटी मध्ये  एकाच विषय चर्चेला जाऊ लागला ‘रघुनाथ माशेलकर’ नावाच्या त्या दुर्मखलेल्या मुलाने नवीन विक्रम स्थापन करुन विद्यापिठाची सर्व पारितोषिके मिळवली होती! 

जागतीक किर्तीचे, आजचे प्रसिध्द भारतीय शास्त्रज्ञ आमच्या CSIR सी. एस. आय. आर. (Council of Scientific and Industrial Research) या महान भारतीय संंघटनेचे प्रमुख डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे त्यांच्या कॉलेजच्या दिवसांत झालेले ते दर्शन व त्यांचा सहवास माझ्या दृष्टीने एक आनंद विधान ठेवा आहे. कित्येक वेळी आम्ही संवाद ही साधत असू पण मैत्री अशी काही झाली नाही! कोणाला माहित होते हा माणूस एवढा आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून भारतातच राहिला! कारण त्यावेळचे  बहुतेक अति-हुषार केमिकल इंजिनियरर्स परदेशांतच स्थायिक होत असत! एवढ्या मोठ्या माणसाला साडेचार वर्षाचे सहवासात खूप जवळून पाहता आले व एकाच युडीसीटीचे आम्ही विद्यार्थी एवढी दोन कारणे अतीव समाधान देण्यास पुरेशी आहेत! त्यावेळी सभा, सेमिनार यांचे निमित्ताने भारतातील शैक्षणिक व तांत्रिक क्षेत्रात काम करणारी अनेक नामवंत मंडळी पाहता आली, त्यांचे विचार ऐकता आले. परदेशातील शास्त्रज्ञ देखील वरचेवर भाषणे देण्यासाठी येत. त्यातील आमचा संबंध येत असलेली संघटना म्हणजे ओटीए-OTA (Ori Technologist Association) ही सर्व तेल तज्ञांची संस्था होय! डॉ. काणे हे त्यावेळी त्याचे प्रमुख असल्याने आम्हा त्यांच्या विद्यार्थ्यांना  त्यावेळी ताजमहाल हॉटेलांत झालेल्या सेमिनार मध्ये दोन दिवस स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली व ‘ताजचा’ पाहुणचार व तेथे दोन रात्रीचे वास्तव करण्याचा दुर्मिळ योग आला! १९६४ सालचे ताजमहाल हा एक अनोखा अनुभव होता. तोपर्यंत वर्तक हॉल वरील वसतिगृहात फाटक्या बिछान्यावरील भोके, वर टाकलेल्या चादरीने बुजवून महिनोन-महिने पाणी न दाखविलेल्या त्या चादरीवर अंग टाकणाऱ्या मला, ताजच्या  

डनलॉप गादी व परीट घडीच्या स्वच्छ सफेद चादरीवर, स्प्रिंगच्या पलंगावर झोपण्याचा योग म्हणजे स्वप्नच होते. दोन दिवस तेथे न्याहरी पासून रात्रीच्या जेवणापर्यंत मिळणारे आथित्य तर वर्णना पलीकडेचे! काय खाऊ निकाय काय नको  ही अवस्था! खरेच तो एक आयुष्यातील वेगळाच अनुभव. त्यानंतर भारतातीलच काय पण परदेशातील पंचतारांकीत व अति-आलिशान हॉटेलात मी राहिलो पण ‘पहिला अनुभव’ तो पहिलाच, त्याची आठवण कायमची राहते! 

या पहिल्या वर्षाचा अभ्यास खूपच कठीण होता कारण विषयांची भारंभार होती. केमिकल इंजिनियरींग, जनरल इंजिनियरींग, गणित, केमिकल टेक्नॉलॉजी , इंजिनियरींग ड्रॉईंग असे विषय तर होतेच पण त्याच बरोबर आम्ही कधी न अभ्यास लेले अर्थ शास्त्र व कॉस्ट-अकाउटींग असे अगदी नवे विषय देखील होते. शिकविणारे काही प्रोफेसर खूपच चांगल्या रितीने विषय समजावून सांगत, मात्र काही जण वर्गात काय शिकवून जात तेच कळत नसे. गणित शिकविणारे प्रा. सुब्बु स्वतः खूप हुषार होते पण त्याचे मद्रासी उच्चार नीट कळत नसत व एवढे भराभर पुढे जात, की तासाच्या शेवटी आमची ‘पाटी कोरीच’ रहात असे! तीच गत कॉस्ट अकाउटींग शिकविणाऱ्या प्रा. दमानीयायांची. ते खरे तर औद्योगिक जगात नामांकित सल्लागार होते, पण शिकविण्याची हातोटी अजिबात नव्हती. त्यामुळे ह्या नवीन विषयाची मी धास्तीच घेतली व विशेष म्हणजे हा विवेचनाचा (descriptive) विषय नव्हता तर समस्या आकडे मोड करुन सोडविण्याचा होता (mathematical). त्यामुळे मिळाले तर पूर्ण नाहीतर शून्य गुण मिळे! आमच्या चाचणी परीक्षांत देखील मला हा अनुभव आला व चाचणी परीक्षेत मला चांगल्या ग्रेडस मिळाल्या नाहीत. तीच गत इंजिनियरींग ड्रॉईंग या विषयाची होती. समोर ठेवलेल्या वस्तुचे चित्रण (drawing), निरनिराळ्या कोनांतून व स्तरांतून करुन ते कागदावर, स्केलच्या सहाय्याने उतरविणे, मला कठीण वाटत असे.  मात्र ह्याची परीक्षा नव्हती, फक्त प्रॅक्टीकल्स व जरनल लिहून द्यावे लागे त्यामुळे ते कसेबसे पूर्ण केले. सर्व कामाच्या रगाड्यांत व विषयांच्या गराड्यांत वार्षिक परीक्षा कशी आली ते देखील कळले नाही! मार्च मध्येच वार्षिक परीक्षा होऊन पुढे सुट्टी असे. 

कोणत्यातरी कारखान्यांत उमेदवारी करावी लागे! त्यासाठी कंपनीचे लोक मुलाखती घेत व निवड करीत. त्यावेळी आम्हास हिंदुस्थान लिव्हर, टाटा ऑईल मिल, गोदरेज अशा कंपन्यांत काम करण्याची हौस असे, पण सर्वांना तेथे उमेदवारी मिळणे शक्य नव्हते, त्यामुळे मुलाखती मध्ये स्पर्धा असे. उरलेले लोक स्वस्तिक ऑईल मिल, राज ऑईल किंवा अशाच लहान कंपनीत उमेदवारी करीत. मला हिंदुस्थान लिव्हर उमेदवारी मिळू शकली नाही. त्यांनी ३ मुले घेतली होती. मात्र दुसरी चांगली कंपनी टाटा ऑईल मिल ने मला एकट्याला निवडले व माझगांवच्या त्यांच्या फॅक्टरीत मला दोन महिने काम करण्याची संधी मिळाली. योगायोगाने ज्या माझगांवच्या हिंदुस्थान पेट्रोलियम (त्यावेळी एस्सो कंपनी) माझा पुढे एवढा संबंध आला, त्यांच्या कारखान्यासमोरच ही टाटा ओईल मिल आहे! एप्रिल – मे दोन महिने हे काम करावे लागले. त्यामुळे घरी जाण्यासाठी अशी सुट्टी मिळालीच नाही. आयुष्यात कारखान्यांतील कामाचा अनुभव प्रत्यक्षात घेण्याची ही पहिलीच वेळ होती व मी त्याच्या चांगला फायदा करून घेतला. टाटाच्या कारखान्यांत साबण (कपडे धुण्याचे व आंघोळीचे), वनस्पती तूप, कूकींग ओईल, शाम्पू, डिटर्जंट पावडर, केसाला लावण्याची तेले इ. वस्तू तयार होत. भारतातील तीन कारखान्यांपैकी हा सर्वांत मोठा कारखाना होता. सुमारे ५०० कामगार, व १०० अधिकारी काम करीत. तसेच सुसज्ज अशी प्रयोग शाळा व संशोधन केंद्र येथेच होते. या संशोधन केंद्रात आमच्या युडीसीटीची ३-४ मंडळी काम करीत होती. त्यातील डॉ. शितोळे माझ्या चांगल्या परिचयाचे होते. गंमत म्हणजे या संशोधन केंद्रात सुमारे दहा डॉक्टर काम करीत होते. त्यांचे प्रमुख श्री. डेसिकाचारी हे होते व ते स्वतः डॉक्टर नव्हते, कदाचित असुये मुळे वा न्युनगंडा मुळे असेल त्यांना दुसऱ्यांना डॉक्टर म्हणणे जडजाई व नेहमी डॉक्टर लोकां बद्दल (पी.एचडी) बोलतांना त्यांचा स्वर हेटाळणीचा असे. अर्थात मी काही डॉक्टर नव्हतो त्यामुळे त्यांच्या संशोधन केंद्रात मी काही दिवस असतांना माझेशी ते मोकळे पणाने बोलत व असेच एकदा मला म्हणाले की माझे घरी एक पाळलेला कुत्रा आहे, त्याचे नाव  मी ‘डॉक्टर’ ठेवले आहे! अर्थात ही गोष्ट मी इतर संशोधक डॉक्टरांस सांगितली नाही!

क्वॉलिटी कंट्रोल लॅबचे प्रमुख डॉ. गुंडे हे मराठी गृहस्थ होते. अतिशय विद्वान, अनुभवी असून अगदी साधे असत. बुश-शर्ट पँट घालून येणारे डॉ. गुंडे कधी चप्पल घालून येत व गंमती ने म्हणत “मला आज बायकोने चहा उशिरा दिला, बूट घालायला वेळच मिळाला नाही! मात्र त्यांनी देखील परदेशात शिक्षण घेऊन तेलाच्या क्षेत्रात मोठे नाव कमाविले होते, आमच्या डॉ. काणेंचे चांगले मित्र होते.

दोन महिन्यांत मी या कंपनीच्या सर्व खात्यात थोडे थोडे दिवस काम करुन सर्व विभाग फिरलो व निरीक्षणेकरुन नोदंण टिपल कारण शेवटी आम्हास कंपनीस व कॉलेजला अहवाल द्यावा लागे! 

बरीच हुषार व अनुभवी माणसांबरोबर संबंध आला व पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचे ज्ञान किती उपयोगी असते याचा प्रत्यय आला. तसेच आपण कॉलेजांत शिकणाऱ्या गोष्टी व येथे आवश्यक असलेले ज्ञान  यांत खूप तफावत आहे ह्याची देखील जाणीव झाली. टाटा ऑईल मिल ही एक अतिशय व्यावसायीक दृष्टया काम कारणारी (professional) कंपनी होती व वेतनमान, त्यांना मिळणाऱ्या सुख सोयी भरपूर होत्या. कामगार देखील कामात आपले सर्वस्व देत होते. कँटीन मध्ये उत्तम जेवण अल्प खर्चात मिळे. मी देखील सकाळचे जेवण तेथेच घेई!

१९६४ सालचे ते वर्ष होते व मला आठवते २७मे ला माझ्या उमेदवारीचा काळ संपत आला असतांना भरपेट जेवण घेऊन दुपारी मी सहज माझ्या टेबलावर बसलो होतो व डुलकी लागली! कसले तरी दुःस्वप्न पडून मला जाग आली व मी व्यवस्थित शुध्दीवर येतो तोच बाहेर आरडा ऐकू आला काही कामगार ओरडत होते- “नेहरू चाचा नही रहे – नेहरूजी चल बसे” बरोबर दीड च्या सुमारास त्यादिवशी रेडिओ वरुन ही बातमी आली. फॅक्टरी सोडून दिली. मात्र मला आठवते ते स्वप्न व एक योगा योग!

या टाटा मिल मध्ये लक्षांत राहिलेले एक दुसरे व्यक्तिमत्त्व म्हणजे कारखान्याचे मुख्य इंजिनियर लालकाका. हा पारशी माणूस खरे तर खूप मोठ्या हुद्द्यावर काम करीत होता व हाता खाली खूप इंजिनियर होते मात्र सकाळी प्रथम ते बॉयलर हाऊस मध्ये जाऊन तेथील काम ठीक चालले आहे की नाही हे संपूर्ण तपासत व अंगावर चढवलेला मळका बॉयलर सूट तसाच ठेवून संपूर्ण कारखान्याच्या विविध विभागांतून जातीने फिरून तेथे बॉयलरची वाफ (steam) बरोबर मिळते आहे की नाही हे पहात, व नसल्यास त्वरीत दुरुस्ती करुन घेत. वाफ ही अत्यंत महत्त्वाचा घटक असून ती जर योग्य प्रमाणात व योग्य तापमानास येत नसेल तर सर्व उत्पादनावर त्याचा परिणाम होई म्हणून लालकाका जातीने ही तपासणी करीत, हे रोजच पाहायला मिळे.

एक दुसरा अनुभव देखील खूप बोलका आहे. त्यावेळी टाटा कंपनीच्या डिटर्जंट प्लांट (surf powder) चे काम चालू होते व इटालियन ‘मॅझोनी’ कंपनी कडे कंत्राट मिळाले होते. अनेक भारतीय कामगारांबरोबर दोन इटालियन लोक ह्या कामावर होते व कधी वेळ असल्यास त्या नवीन सामग्रीच्या उभारणीचे काम मी पहात राही. ह्या दोन इटालियना पैकी पर्यवेक्षक (supervisor) जो काही सूचना दुसऱ्या गृहस्थास देऊन ऑफिसात जाऊन बसे व दुसरा फिटर वा जुळवणी करणारा कामगार असावा जो सतत हत्यांर अवजारे घेऊन ठाक ठोक करीत बसे. माझ्या नेहमीच्या सवई प्रमाणे, त्याला थोडे रिकामपण मिळालेले पाहून मी इंग्रजीत विचारले, “तुम्हा इटालियन लोकांना पगार रुपयांत की डॉलर मध्ये मिळेल?” वास्तविक असले प्रश्न आपला पूर्व परिचय असल्या शिवाय परदेशी लोकांस विचारू नयेत पण तशी माझी तोंड ओळख खूप दिवसांपासून या माणसाशी होती म्हणून मी हे विचारले! तो त्वरीत, म्हणाला ‘डॉलर मध्ये अर्थातच!’ दुसरा प्रश्न मी थोडा खुबीने विचारला “तुझ्या सुपरवाझरला तुझ्या पेक्षा किती जास्त डॉलर मिळतात?” मला त्याचा पगार न विचारता थोडा अंदाज हवा होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता मला म्हटले, “माझा पगार सुपरवाझरपेक्षा खूप जास्त आहे, कळलं कारण मी हाताने काम करतो, तो नुसता पाहणी करून जातो! मी उडालोच, कारण आमच्या कडे परिस्थिती वेगळी असते. मात्र त्या उत्तराने परदेशी वर्क कल्चर (work culture) ची थोडी झांकी मिळाली. पुढे फ्रान्स बेल्जीयम मध्ये काही कारखाने पाहतांना ह्या ‘कौशल्य प्रमाणे दाम’ संस्कृतीचा प्रत्यय आला.

टाटा ऑईल चे काम संपले. खूपच फायदा झाला. डॉ. होल्ला, डॉ.मूर्ती, डॉ. शितोळे, जोशी, कुलकर्णी, इत्यादी लोकांचा परिचय झाला, जो पुढेही खूप उपयोगी पडला. श्री जोशी तर अजूनही माझ्या संपर्कात आहेत. मधेच कधी तरी प्रथम वर्ष परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मी उत्तीर्ण झालो होतो. मात्र मार्कस् लिस्ट पाहिल्यावर खरा शॉक बसला – एका विषयात पास असल्याने व ५५% पेक्षा जास्त मार्क असल्याने मला त्या विषयात ३५ चे ४० गुण करुन पास करण्यात आले होते! ४०% मार्कस् हे पासींग साठी लागत ! देवाचे आभार मानले कारण थोडा जरी घोटाळा आणि कुठे झाला असता तर सपशेल कॉलेज सोडायची पाळी होती व मोठी आर्थिक दुरावस्था झाली असती. मात्र “प्राणावर बेतलेले बोटावर निभावले होते!” आमच्या वर्गांतीलच नव्हे तर इतर वर्गांतील देखील बरेच जणांस ह्या एका विषयाने खूप दगा दिला होता व काही जण तर ATKT घेऊन वर आले होते. त्यांना ह्या विषयाची परीक्षा पुन्हा द्यावी लागणार होती. या परीक्षेत सहसा कोणी नापास होत नाही व ATKT घेऊन पुढे जातात. आता जीव भांडयात पडला होता. सर्व धडकी भरविणारे विषय संपले होते व केवळ आमच्या ओ एफ डब्ल्यू (OFW) मधील सर्व विषय पुढच्या व्दितीय वर्षा साठी असल्याने व  ती परीक्षा महत्वाची असल्याने मी निर्धास्त झालो.