UDCT Days

UDCT – वर्ष २ व पुढे!

दुसरे वर्षे भराभर गेले, विषय थोडे व विद्यार्थी फक्त आम्ही सोळा जण होतो, त्यामुळे शेवटच्या वर्षाचा अभ्यास भरपूर रमतगमत करता आला. जेवणाची सोय UDCT च्या वसतिगृहांतील खानावळीतच होती व अभ्यासासाठी कॉलेजचे प्रशस्त वाचनालय होते. रविवारी पंचाईत होई- कारण कॉलेजचे वाचनालय बंद असे व वर्तक हॉल वर हमखास लग्नाचा ठणाणा असल्याने आमच्या खोलीत अभ्यास करणे अशक्य होई. त्यासाठी दादर सार्वजनीक वाचनालयाच्या लायब्ररीयन ना मी तेथे अभ्यास करु देण्याची विनंती केली होती. आजही हे वाचनालय विसावा हॉटेल समोर आहे. त्या भल्या माणसाने नियमांची आडकाठी माझ्यासाठी  दूर करून मला एका निवांत टेबलावर बसून माला अभ्यास करण्याची परवानगी दिली. तेथे फक्त पेपर्स, मासिके वाचण्यासाठी परवानगी असतांना मला ही सवलत मिळू शकली व माझी शनिवारी, रविवारची मोठी समस्या संपली. आमच्या सोळा जणांचा ग्रुप मोठा मजेशीर होता. ती जणू काही ‘आंतरभारती’ होती. पंजाब, दिल्ली, गुजरात, मुंबई, मद्रास, बनारस आणि भारतातील सर्व भागांतून आलेले मित्र होते. विद्यापीठाच्या नियमानुसार सुमारे ४०% जागा इतर विद्यपीढांस होत्या त्यामुळे भारतातील सर्व भागांतुन विद्यार्थी येत व अभ्यासाचे वातावरण तर असेच पण अनेक गंमतीशीर प्रसंग घडत व ‘शैक्षणिक भारताचे’ दर्शन होई. आमच्या सोळा जणांच्या ग्रुप मधील प्रत्येकाचे नाव वैशिष्ट्य आजही इतक्या वर्षांनी मला आठवते.

1दिगंबर राऊत मुंबई
2सुधीर नार्वेकर मुंबई
3अरविंद इनामदार मुंबई
4यशवंत झव्हेरी मुंबई
5सिद्धार्थ मोदी मुंबई
6रुपारेलमुंबई
7श्री. शहा पुणे
8श्री. जाफर बॉयमुंबई
9शरद मर्चंट बडोदा
10मेहता गुजराथ
11सोनी    वल्लभनगर
12भीमराव माळी मराठवाडा
13गुप्ता दिल्ली
14अहुजा    पंजाब
15श्री. कुंभोजकर कर्नाटक
16श्री. यादव उत्तर प्रदेश

मी व नार्वेकर आम्ही पार्टनर्स होतो व त्यामुळे आमची जी जोडी जमली ती शेवट पर्यंत. आजही नार्वेकर अधूनमधून भेटतो. आम्ही दोघे व जाफर बॉय गोदरेज मध्ये कामाला होतो, त्यावेळी अनेक सुख-दुःखाचे प्रसंग आम्ही अनुभवले आहेत. जाफर आता पाकिस्तानी झाला आहे. इनामदार, मोदी ही हुषार मुले होती. इनामदार थोडा बडबड्या होता, रिबेल्लोच्या आवडत्या विद्यार्थ्यांत होता! तो पुढे एम. एम. एस (MMS) झाला, मुंबई विद्यापीठाची MMS ची ती पहिलीच तुकडी होती- खूपच चांगल्या हुद्यावरुन निवृत्त झाला. मोदीने स्वतःचा व्यवसाय केला. दोघेही अजून संपर्कात आहेत!

झव्हेरी हा पक्का ‘व्यापारी’ स्वतः काही न करता दुसऱ्याच्या ज्ञानाचा फायदा करून आपले उद्देश साधत होता.  मात्र स्वतः चांगला उद्योगपति होऊन वासु केमिकल कंपनीचा मालक झाला आहे. श्री. वागळे या आमच्या सरांचा त्याने तेथेही वापर करुन नंतर त्यांस ‘बाय’ केले! मर्चंट, रुपारेल, सोनी, मेहता हे स्वतिक ऑईल मिल मध्ये विविध भागांत उच्च पदांपर्यंत गेले व सध्या सल्लागार (consultant) म्हणून कामे करतात. गुप्ता- आहुजाही दिल्ली-पंजाब कडील मंडळी, कॉलेज संपल्यावर जी तेथे गेली, पुन्हा भेटली नाहीत. गुप्ता हा हैप्पी गो लक्की (happy go lucky) या प्रकारचा माणूस, नेहमी मस्त असायचा, कसलीच फिकीर नसे. अहुजा हा त्यामानाने खूप गंभीर व अभ्यासू होता. यादव हुषार होता पण अभ्यासू नव्हता. डॉ रिबेल्लोच्या आवडत्या मध्ये अग्रभागी व त्याचा फायदा त्याने भरपूर घेतला! भैया असून इंग्रजी सुंदर बोलून छाप पाडायचा. शहा हा पुण्याचा होता व त्याचा देखील नंतर काही पत्ता लागला नाही. गुजराथी असून उत्तम मराठी बोले व बहुधा स्वतःचा व्यापार करीत असावा. 

कुंभोजकर देखील अभ्यासू होता. काही दिवस एशियन पेंट्स ह्या कंपनीत काम केल्यावर तो बेळगांव-बेंगलोर कडे गेला, त्यामुळे संपर्कात राहिला नाही. एरव्ही तो देखील दादरलाच रहात होता व पुष्कळ वेळा संध्याकाळचे आम्ही भेटत असू! भीमराव माळी हा सर्वांत दुर्दैवी प्राणी आमच्या बॅच मध्ये ठरला. अतिशय अभ्यासू व मेहनती असणारा माळी, चांगला खेळाडू होता व कबड्डी, हॉली-बॉल खेळांत मराठवाड्याचे त्याने प्रतिनिधित्व केले होते. मात्र पदवी घेतल्यावर आईच्या परिचयातील ज्या मुलीशी लग्न केले, ती सुशिक्षित ही नव्हती व सुसंस्कृत देखील नव्हती! दोघांचे संसारात जमेना व त्याचा परिणाम या मनस्वी माणसाने एक दिवस आपले आयुष्य स्वतःच संपविण्यांत झाला! जेमतेम वर्षभर संसार केला असेल. माळी देखील दादरलाच रहात असे व त्यामुळे आम्ही खूप जवळ आलो होतो. अशा रितीने भारतांतील वेगवेगळ्या विद्यापीठातून व निरनिराळ्या सांस्कृतिक वातावरणांतून आलेल्या मंडळींचा आमचा संच खूपच मजेशीर होता व अभ्यासांत चढाओढ, स्पर्धा असून देखील प्रत्येक जण दुसऱ्यास अभ्यास व त्या व्यतिरिक्त देखील कांहीही मदत करण्यास तयार असे. विशेषतः या बाबतीत जाफर हा आघाडीवर असे व तोच आमचा प्रवक्ता असे. पिकनीक, गेट-टूगेदर, पार्टी, असे थेर करण्यास आजिबात वेळ नसे, कधी जमलेच तर सर्वजण जवळच्या इराण्याच्या हॉटेलात जाऊन चहा-पाव, नाहीतर आईस्क्रीम, सोडा पित असू! मधेच वार्षिक परीक्षेआधी कॅम्पस इंटरव्यु झाले. अनेक मोठया कंपन्यांचे लोक येऊन मुलाखती घेऊन गेले. काही जणांना निकाल लागण्याआधीच नोकरीची शाश्वती झाली. बहुतेक जणांची कोठेना कोठे सोय झाली, ज्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत त्यांना काणे-रिबेल्लो यांनी आपल्या शिफारशी नुसार पाठविले. मला ही एकदोन कंपन्यांची आमंत्रणे होती पण पुढे शिकावे की नोकरी करावी हा संभ्रम माझ्या मनात होता. कोठे नोकरी चांगली वाटत होती तर पगार ठीक वाटत नव्हता, काही कंपन्यानी पगार ठीक दिला तर काम योग्य वाटले नाही. रजिस्ट्रार गुप्तेचे वाक्य नोकरी शोधत असतांना मला आठवले, डिग्री हवी कोणत्या विषयात त्याची काळजी करु नकोस!’ 

मला मिळालेल्या एका ऑफर मध्ये ‘टाटा इलेक्ट्रीक’ या कंपनीची देखील एक होती. कोठे ऑईलस् आणि कोठे इलेक्ट्रीसीटी? त्यांच्या थर्मल-पॉवर स्टेशन (Thermal Power Station) मध्ये कोळशाचे गुणधर्म तपासण्याच्या लॅब  मध्ये मला काम देत होते, पगार ही ठीक होता, पण मला माझ्या क्षेत्राबाहेर जायचे नव्हते! पण शेवटी या पदवीमुळे कोठेही कामास मज्जाव नाही हे कळले एवढे खरे! आमच्या बॅचचा कुंभोजकर एशियन पेंटस् या रंग बनविणाऱ्या कंपनीत गेला, तर यादव हा भोर इंडस्ट्री मध्ये (रसायने, प्लास्टिक्स) रुजू झाला. हीच गत अनेक विद्यार्थ्यांची होती, कोण कुठे काम करील याचा नेम नसे, तुमची ग्रहणशक्ति व काम करण्याची आवड असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रांत काम करु शकता व यशस्वी देखील होऊ शकता. मी सुद्धा एस्सो या खनिज तेलाशी संबंधीत कंपनीत रुजू झालो, तेव्हा मला तरी या क्षेत्राचे किती ज्ञान होते? 

बी.एस.सी. (टेक) चा निकाल जाहीर झाला तो दिवस मला आठवतो. मे महिन्याची ती पहाट असावी. मी व अण्णा आम्ही दोघे तात्यासाहेब चुरी वसतिगृहांतील आमच्या खोलीत मुक्कामास  होतो. पास होण्याची खात्री होती पण पहिला वर्ग अपेक्षित होता. धाकधूक होतीच. निकाल पेपरात जाहीर होत असे, त्यामुळे सकाळीच अण्णा उठून बाजारात जाऊन पेपर खरेदी केला व माझा नंबर पाहिला! पहिल्या वर्गांत मी पास झालो होतो. मी खाली अण्णांची उत्सुकतेने वाट पाहत होतो. झपाझप पडणारी त्यांची पाऊले व चेहऱ्या वरील स्मित मला दूरूनच सांगून गेले, मी चांगल्या प्रकारे पास झालो आहे! एक खूप मोठा पल्ला आज पूर्ण झाला व आप्पांना याचे खूप मोठे समाधान होणार, या जाणिवेन आम्ही तो दिवस साजरा केला व आप्पांस तसे कळविले! 

त्याच दिवशी संध्याकाळी घरी चिचंणीस गेलो. आप्पांना व सर्वच कुटुंबीयांना आनंद झाला होता. विशेषतः आप्पांना झालेला हर्ष त्यांच्या प्रेमळ स्पर्षाने मला जाणवला. मी ह्या कोर्ससाठी जाण्याचे टाळत होतो पण त्यांनी निश्चय पूर्वक मला या अभ्यासक्रमास पाठविले होते, जेवणासाठी कॉलेजच्याच वसतिगृहात सोय कर, असे सांगून तो आर्थिक भार उचलला होता, पांडुरंग म्हात्रे शिष्यवृत्ती बंद झालेली असतांना सुध्दा माझ्या अभ्यासासाठी सर्वतोपरी मदत करुन स्वतः खूप खस्ता खाल्या होत्या. त्यावेळी आमच्या सबंध समाजातून माझ्या आधी केवळ दोनच जणांनी बी एस सी (टेक) ही पदवी घेतली होती. ते म्हणजे श्री वसंतराव सावे व श्री रघुनंदन चुरी. दोघेही योगायोगाने बोर्डीचेच होते.  त्यामुळे समाजात देखील खूप कौतुक होऊ लागले. वर्तक हॉलवर राहून व अनेक अडचणींशी मुकाबला करून हे यश मिळाले होते म्हणून वसतिगृहावरील व्यवस्थापक मंडळींनी देखील तोंड भरून कौतुक केले. चिंतामणराव वर्तक, मामा ठाकूर, दादा ठाकूर तसेच आमचे रेक्टर ठाकूर यांनी देखील शाबासकी दिली.

त्याच वेळी सो.क्ष.संघाचे (सोमवंशी क्षत्रिय समाज) वार्षिक अधिवेशन (परिषद) १९६५ साली तारापूर येथे भरली होती. डॉ. दिनानाथ चुरींनी विश्वस्त म्हणून त्यावेळी केलेल्या भाषणांत माझ्या या यशा बद्दल खास गौरवोदगार काढले होते व त्यामुळे एका दिवसात मी सर्व समाज बांधवांसमोर आलो! डॉक्टरांनी त्यानंतर मला घरी बोलावून माझ्या पाठीवर शाबासकी दिली होती.

आता पुढचा प्रश्न होता, What Next? पुढे काय? मला स्वतःला मनापासून वाटत होते, आपण पुढची पदवी M.Sc(tech) घ्यावी, मग पुढे काय ते ठरवू. पण घरची परिस्थिती व आप्पांवरील ताण ह्या निर्णयापासून मला परावृत्त करीत होता. माझ्या पाठची सर्वच भावंडे शिकत होती, अण्णा मुंबईतच होता, अरुणा, पपी, निलम शिकत होती. आप्पां थकत चालले होते व सर्व एकखांबी तंबू होता. म्हणून वाटे आता आपण थोडा आर्थिक भार सोसायला हवा. 

आप्पांशी बोललो तर त्यांनी मला पुढील शिक्षण चालू ठेव असे म्हटले. आप्पां नेहमीचेच वाक्य म्हणाले “तुझ्या इच्छेच्या आड मी येणार नाही, पैशाची चिंता तुम्ही करू नका, तुला योग्य वाटेल तेच तू कर!” आता निर्णय मीच घ्यायचा होता. मात्र कोणताही निर्णय असला, तरी आप्पांना व कुटुंबाला आता काही तरी भरीव आर्थिक सहाय्य झालेच पाहिजे ही माझी मनोमन भावना होती.

डॉ. काणेंना कॉलेजांत येऊन भेटलो. माझे मनोगत त्यांचे पुढे मी सांगितले. डॉक्टर, माणूस म्हणूनही खूपच मोठे होते, एका विद्यार्थ्यासाठी त्यांनी त्यावेळी खूपच वेळ दिला. मला म्हणाले तुला पुढचा अभ्यास करायचा असला, तर मी प्रवेश देतो वा नोकरी करायची असेल तरी २५०/- रुपयांची युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC)ची शिष्यवृत्ती मिळेल. मात्र मी काउन्सिल ऑफ सायंटिफीक अँड इंडस्ट्रीय रिसर्च (CSIR- Council of Scientific and Industrial Research) या दिल्लीच्या विख्यात संस्थेच्या फेलोशिपसाठी तुझ्या नावाची शिफारस करीन. फेलोशिप (Fellowship) महिना ४००/- रुपये आहे त्यामुळे तुला नोकरी इतकाच मोबदला मिळून पुढील शिक्षण ही घेता येईल – मात्र ह्याची मी हमी देत नाही!”

डॉ. काणे हा त्यावेळचा आम्हा विद्यार्थ्यांसाठी ‘कल्पवृक्ष’ होता. त्यांनी एखादी शिफारस दिली व त्या विद्यार्थ्याचे भारतातच काय परदेशांतही ते काम झाले नाही असे कधीच झाले नाही. त्यामुळे माझा निर्णय आता पक्का झाला होता. आप्पांना देखील मी ही माहिती दिली व डॉ. काणेंचा विद्यार्थी म्हणून MSc. tech. ह्या पदवी परीक्षेसाठी मी नाव नोंदविले. त्यावेळी केवळ संशोधनाद्वारे, मार्गदर्शक प्राध्यापकांच्या शिफारसीनंतरच हे रजिस्ट्रेशन होत असे! आमच्या सोळा विद्यार्थ्यांतून फक्त मी एकटाच पुढील पदवीसाठी पुन्हा कॉलेजात दाखल झालो होतो! ते देखील डॉ.  काण्यांबरोबर, ज्यांचे की ४ वर्षाआधी पदवी मिळत नाही अशी त्यावेळी वंदता होती! माझ्या सहाध्यायांनी माझ्या या निर्णयाची थट्टाच केली होती.

महिना अडीचशे रुपये शिष्यवृत्ती वाईट नव्हती. शंभर रुपयांत, मी जेवणासहीत सर्व खर्च वसतिगृहावर राहून भागवित असे. त्यामुळे घरी ही मदत करू शकत होतो. मात्र हे पैसे दर महिन्यास मिळत नसत- ३-४ महिन्यांनी एकदम मिळत! सुरुवात चांगली झाली होती. मला ‘Studies on Built Soaps’ ह्या विषयावर प्रबंध लिहावयाचा होता. ‘पूरक  साबणांचा अभ्यास’ अशी याची मराठीत व्याख्या सांगता येईल. साबणात वापरण्यात येणाऱ्या खाद्य-वनस्पती तेलाचे (edible-vegetable oils) प्रमाण कमी करुन, त्या ऐवजी काही रसायने वापरून साबणांचे चांगले गुणधर्म देखील बिघडू न देणे असा काहीसा हा संशोधनाचा प्रकल्प होता. त्यावेळी खाद्य तेलाची खूपच टंचाई जाणवत होती. बरीच तेले परदेशातून आयात होत असत व त्यामुळे साबणामधे मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या अशा तेलांचे प्रमाण कमी करता आल्यास राष्ट्रीय संपत्तीचा योग्य विनियोग होण्याचा मार्ग सुकर होणार होता. विषय खूप महत्त्वाचा होता. मी जोरदार कामास सुरुवात केली.

येथे वसतिगृहावर देखील एक नवीन समस्या निर्माण झाली होती. आमचे रेक्टर श्री. मधुकर ठाकूर परदेशी शिक्षणासाठी इंग्लंडला चालले होते, त्यामुळे त्यांचे जागी नवीन रेक्टरची नेमणूक करावयाची होती. ठाकूरांनी खूपच चांगल्या प्रकारे चार एक वर्षे हे काम केले होते व शिस्त लावली होती. अनेक जुन्या वसतिगृह वासीयांस त्या जागे मध्ये रस होता व मला ही ती जागा मिळाल्यास हवी होती. मात्र अंतिम निर्णय, त्यावेळचे संघाचे सर्वे-सर्वा श्री. भाऊसाहेब वर्तक यांनी घ्यावयाचा होता. श्री. चिंतामण राव, मामा, दादा, ही मंडळी मला चांगल्या प्रकारे ओळखत होती व भाऊसाहेबांनी त्यांचेशी सल्लामसलत केलीच असणार. त्यामुळे चिंतामण रावांनी माझेकडे हे काम तू स्विकारशील काय अशी विचारणा केली. मी ना कारण्याचे कारण नव्हते, त्यामुळे ही एक नवीन जबाबदारी अंगावर आली. परंतु आव्हाने स्विकारणे हा माझा स्वभावधर्म आहे. वसतिगृह, तसेच वर्तक हॉल व्यवस्था ह्या दोन्ही जबाबदाऱ्या अभ्यास सांभाळून मी घेण्याचे ठरविले. 

त्यावेळी ही संपूर्ण कामे एका व्यक्तीलाच ऑनररी (honorary, बिन-पगारी) म्हणून बघावी लागत. आज ह्या कामासाठी दोन स्वतंत्र माणसे पगार देऊन नियुक्त आहेत. एम.एससी टेक चा वेळ खाऊ अभ्यासक्रम सांभाळून ह्या जबाबदाऱ्या, तारेवरील कसरत होती. तसेच काही असंतुष्ट जुन्या विद्यार्थ्याना सांभाळून, हे काम करायचे होते ह्या सेक्टरच्या कामा बद्दल स्वतंत्रपणे लिहता येईल…

डॉ. काणेंनी कबूल केल्या प्रमाणे माझ्या नावाची शिफारस CSIR च्या ४००/- रु फेलोशिपसाठी दिल्लीला पाठविली व मला खात्री असल्याप्रमाणे त्यांची शिफारस मंजूर होऊन मला ती फेलोशिप मिळाली. मला खूपच बरे वाटले. विषेश म्हणजे माझ्या बरोबर डॉक्टरांचे इतर ही ८ – १० विद्यार्थी त्यावेळी MSc.(Tech) व PhD (Tech) अभ्यास, संशोधन त्यांचे हाताखाली करत होती, त्यांना शिफारस न देता डॉक्टरांनी माझेच नाव पाठविले व मला ही सन्माननीय फेलोशिप मिळाल्याने त्यांना ही आश्चर्य वाटले. थोडी नाराजी निर्माण झाली, पण सर्वांस माहित होते हा डॉक्टरांचा निर्णय आहे का म्हणून विचारण्याची कोणाची हिम्मत नव्हती!

या फेलोशिपने आम्हाला खूपच मोठा आर्थिक आधार दिला. मला तीन महिन्यांची रक्कम १२००/- रुपये जेव्हां एक रकमी मिळाली तेव्हां त्याच सुमारास (१९६६-६७ साल) अरुणाचे लग्न काढले होते व आमच्या सारख्या मध्यम वर्गीयांच्या लग्नासाठी त्यावेळी ही खूपच उपयुक्त ठरणारी रक्कम होती. अर्थात भाईंनी त्यावेळी कोणताच मानपान वा हुंड्याचा प्रश्न उपस्थित केला नव्हता ही बाब ही महत्त्वाची! 

मला आयुष्यांत ‘खूप’ पैसा मिळविता आला नाही. कारण एक तर पैसा मिळविणे हा हेतू मला कधीच महत्त्वाचा वाटला नाही. व जे पैसे मिळत, त्याची व्यवस्थित गुंतवणूक वा व्यवहारीपणा जमला नाही. कधी महिन्याचे हिशोब देखील मी ठेवलेले नाहीत! मात्र हवा तेवढा पैसा नेहमीच मिळत गेला व कोणत्याही खर्चासाठी कधी कोणापुढे हात पसरण्याचा प्रसंग आला नाही, हे मला वेळोवेळी जाणवले आहे.

एम एससी (टेक), संशोधन कालखंडाची सुरुवात चांगल्या मुहूर्तावर  झाली असावी, कारण भरघोस फेलोशिप, कच्च्या साबणाचे हवे असलेले कारखान्यांतील नमुने, त्यांत मिसळावयाची सिलीकेट्स- फॉस्फेट्स सारखी रसायने, गुणधर्म तपासण्यासाठी हवी असेलल्या उपकरणाची उपलब्धी, व मिळणाऱ्या निकालाची गुणवत्ता, सारेच मनासारखे होत होते. गोदरेज, टाटा ऑईल, स्वस्तिक ऑईल, या कंपन्यांनी त्यांच्या ‘कच्च्या’ साबणाचे नमुने दिले; फिनीक्स केमिकल, एक्सो केमिकल सारख्या कंपन्यांनी केमिकल्स दिली, युडीसीटी मुख्य प्रयोग शाळेतून हवी असलेली उपकरणे उपलब्ध झाली व नसलेली काचेची उपकरणे, माझ्या गरजेनुसार त्यावेळी तेथे ‘ग्लास ब्लोअर’ म्हणून काम करणाऱ्या श्री. द्रविड या निष्णात तज्ञानी मला ग्लास बनवून दिले. विशेष म्हणजे डॉ. काणेंनी देखील माझ्या कामात वेळोवेळी खूप रस दाखविला. साधारणपणे आठ-पंधरा दिवसांनी मी माझे मिळालेले निकाल (Results) घेऊन त्यांचे कडे जाई; त्यावेळी माझेसाठी ते खास वेळ राखून ठेवत कारण एवढया साऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना मार्गदर्शन करावयाचे होते व शिवाय भारतभर भ्रमंती चालुच असे, त्यामुळे त्यांची उपलब्धी खूप महत्वाची असे, शिवाय मिळालेले रिजल्टस त्यांनी मान्य केल्या शिवाय पुढे जाणेच शक्य नसे. बहुतेक वेळा त्यांची संमतीच मिळत गेली, क्वचित प्रसंगी झालेले काम पुन्हा करावे लागले. त्यामुळे माझा हुरूप वाढत गेला व जादा वेळेची, खाण्याच्या वेळांची वा कधी-कधी रात्री पर्यंत प्रयोग चालू ठेऊन काम लवकर संपविण्याच्या माझ्या जिद्दीला प्रोत्साहन मिळाले.

डॉ. काणेंनी मला दिलेले सहकार्य अगदीच ऊठून दिसावे असे होते. कारण त्यावेळी सुध्दा त्यांचेकडे सुमारे पंधरा विद्यार्थी PhD/ MSc. (tech) चे अभ्यास मार्गदर्शन घेत होते. त्याचे कारण काय असावे?

एक घडलेला प्रसंग आठवतो: 

डॉक्टर स्वतःहून कधीच आमच्या प्रयोग शाळेत काय चालले आहे पाहण्यास येत नसत. आम्हीच त्यांचे सोयी नुसार त्यांना आमचे झालेले काम दाखविण्यास जात असू. त्यामुळे कधी-कधी कामाच्या सतत रेट्याखाली असलेले आम्ही मंडळी ‘काव्य, शास्त्र, विनोद’ करीत थोडी धमाल करीत असू. कदाचित ही गोष्ट कशीतरी त्यांचे पर्यंत पोहचली असावी. त्यामुळे एके दिवशी जेवणाच्या वेळेनंतर १ वाजण्याच्या सुमारास अचानक डॉक्टर आमच्या लॅब मध्ये आले! बहुतेक मंडळी जेवणे आटोपून आलीच नव्हती तर आलेले काही मित्र विरंगुळा म्हणून काही मासिके, पुस्तके चाळीत वा गप्पा मारीत घोळका करून बसले होते. मी कसा कोण जाणे त्यावेळी माझे टेबलावर काही निरिक्षणे करीत उभा होतो, डॉक्टर आले तेव्हा त्यांना ते जाणवले असले पाहिजे. ते कोणालाच कधी रागावून बोलत नसत, काही तरी विनोद करुन हसत निघून गेले. मात्र निश्चितच माझे विषयी त्या दिवशी त्यांचे मनात एक चांगला ग्रह निर्माण झाला असेल!

डॉ. कल्याणपूर, डॉ. चमनलाल, डॉ. राव, डॉ. बंबानी, वैद्य यांसारखे पीएचडीचे विद्यार्थी गाडगोळी, साबळे, जोशी, केळकर, नायर, आदी एम.एससी.(टेक) चे विद्यार्थी मिळून पंधरा जणांची मोठी टीम त्यावेळी डॉक्टरांबरोबर काम करी. पुढे ही सर्व मंडळी खूप मोठ्या पदावर पोहचली. त्या आधी शंभराहून अधिक लोकांनी डॉक्टरांकडून आपल्या पदव्या- पी.एच डी (टेक) /एम.एससी(टेक) घेतल्या होत्या. मी म्हणजे त्यांच्या असामान्य विद्यार्थ्यांच्या मांदीयाळीतली ‘शेंडेफळ’ अगदीच शेवटच्या नंबरा वरील विद्यार्थी! डॉ. कामा  (एस्सोचे पहिले भारतीय जनरल मॅनेजर), डॉ. होल्ला (टाटा ऑईल चे जनरल मॅनेजर), डॉ. भावे ( स्वास्तिक ऑईल चे डायरेक्टर), अशी अनेक मोठी मंडळी डॉक्टरांचे पहिले विद्यार्थी त्यामुळे ही असेल. आई बाबा आपल्या शेंडेफळा बद्दल जी सहानुभुतीची वागणूक असते वागणूक देतात तसेही माझे बद्दल झाले असेल. पण डॉक्टरांबद्दल भीतीयुक्त आदर असून देखील त्यांचे केबिन मध्ये कधीही मी प्रवेश करीत असे व त्यामुळे मला डॉक्टर खूपच आत्मीयतेने मार्गदर्शन करीत हे सर्वस्वी सत्य आहे! 

माझ्या कामा दरम्यान, शुध्द साबण (genuine soap) व पूरक साबण (built soap) याचे गुणधर्म- विशेषतः त्यांची घाण कपड्यापासून अलग करण्याची क्षमता तपासण्यासाठी एक मानक अस्वछ कापड (standard dirty cloth) लागत असे व त्यावेळी तो परदेशातून मागवावा लागे! (अस्वच्छता देखील त्यावेळी आयात होई!) डॉक्टरांनी मला सहज एकदा असे ‘Standard dirty cloth’ आपल्याला करता येईल तर पहा असे सुचविले. हा माझ्या संशोधनाच्या कक्षेत येणारा भाग नव्हता, तरी मी ह्या बाबतीत बरीच माहिती मिळवून ह्या परदेशी कपड्याचे पूर्ण पृथक्करणकरून त्यांतील घटक शोधून काढले व त्याप्रमाणे एक ‘मानक घाण’/‘मळ’ (standard dirt) तयार करून त्याचे द्रावण बनविले. द्रावणांत हा ‘मळ’ समानतेने तरंगत ठेवणे व त्यासाठी योग्य द्रावक व इमल्सिफायर (Emulsifier) शोधणे महत्वाचे होते. ते काम ही व्यवस्थित झाले. आता स्वछ सफेद कपडयावर हा मळ पसरवून तो सुकविणे हे काम होते. त्यासाठी आमच्याच प्रयोग शाळेत मी एक छोटे उपकरण तयार करून ज्यामुळे एका विशिष्ठ गतीने हा कपडा त्या द्रावणांतून सतत बुडून बाहेर येईल असे केले. आमचा प्रयोग खूपच यशस्वी झाला. परदेशी कपड्याशी ९३% गुणधर्म जमले व डॉक्टरांनी शाबासकी दिली. आमच्या कामासाठी हाच कपडा वापरला. त्याचे पेटंट घेण्याचे देखील ठरवत होतो, पण त्यांतील अनेक कायदेशीर व इतर बाबींमुळे आम्हास जमले नाही! मात्र या गोष्टीमुळे देखील डॉक्टर काण्यांचा माझ्यावरील विश्वास वाढण्यास मदत झाली.

त्यावेळी (आज आहे की नाही ते ठाऊक नाही) PhD अथवा MSc (tech) अशा संशोधनाद्वारे मिळणाऱ्या पदव्यांसाठी जर्मन भाषांतर परीक्षा विद्यापीठातून उतीर्ण व्हावे लागे. UDCT मध्ये त्यासाठी खास जर्मन भाषेचे वर्ग चालविले जात व तेथे मी उपस्थित रहात असे. मात्र ह्या सर्व कामाच्या धावपळीत वसतिगृह, हॉल या सामाजिक बांधीलकीच्या बंधनातून, हा जर्मन भाषा अभ्यास मला व्यवस्थित जमला नाही. परीक्षेला काही ऊताऱ्याचे जर्मन भाषेतून इंग्रजीत भाषांतर करावे लागे. परीक्षेला बसे पर्यंत मला अजिबात आत्मविश्वास नव्हता तरी बघूया प्रयत्न करून असे म्हणत सर्वस्वी देवावर भरंवसा ठेवून परीक्षा दिली. मला स्वतःलाच मी केलेल्या भाषांतराबद्दल खात्री वाटत नव्हती, पण तेवढया कठोरतेने ह्या परीक्षेकडे पाहिले जात नसावे वा माझे नशीब त्यावेळी खूप चांगले असावे, मी ही परीक्षा उत्तीर्ण झालो व माझ्या संशोधन प्रबंधातील एक महत्वाचा अडथळा दूर झाला, ह्यांत देखील काहीजण अनुत्तीर्ण होत असत!

आता कामाला दोन वर्ष पूर्ण होत आली होती. बहुतेक काम पूर्ण होत आले होते. त्यामुळे विद्यापीठाला ‘कामाचा सारांश’ (synopsis) पाठविणे जरुरी होते. मात्र त्यासाठी डॉक्टरांची संमती हवी होती व केवळ दोन वर्षांत अशा प्रकारे सारांश पाठविण्यास डॉक्टरांच अपवादात्मक  विद्यार्थी वेगळा होता. मात्र मी एक दिवस हा विषय डॉक्टरांन कडे काढला व आश्चर्य म्हणजे डॉक्टरांनी मला संमती दिली! मी दोन पानांचा सारांश तयार करून, डॉक्टरांकडून तो मंजूर करून घेतला व विद्यापीठाकडे माझ्या प्रबंध सादरीकरणाची परवानगी मागितली. महिन्याभरांत विद्यापीठाने ती परवानगी देखील दिली. त्यामुळे आता उरलेले थोडे काम सुरु करणे हे महत्वाचे काम होते. 

लिखाणाबरोबर कोष्टके (tables), आकृत्या (diagrams), व आलेख (graphs) तयार करून त्यांची योग्य ठिकाणी मांडणी करणे हे देखील महत्वाचे काम होते. त्यावेळी कॉम्प्युटर्सचा तेवढा प्रसार नसल्याने लिखाण काम हे टाईपराईटरवर करून घ्यावे लागे, आकृत्या वगैरे हातानी काढून त्यांचे अमोनिया प्रिंट्स घ्यावे लागत  व योग्य मांडणी झाल्यावर प्रबंधाच्या पाच प्रति बाईंडींग करून विद्यापीठास त्यांतील तीन प्रति द्यावा लागत. एक प्रत कॉलेज कडे तर एक आपल्याकडे राही. श्री. गोखले नावाचे एक निष्णात टाईपीस्ट त्यावेळी युडीसीटी मध्ये काम करीत. मला वाटते ९०% विद्यार्थी त्यांचे कडून हे काम करवून घेत, कारण ह्या किचकट व तांत्रिक (Technical) विषयांचे टाईपिंग करणे खूप जबाबदारीचे असे. गोखले अजिबात चूक नकरता, ते काम खूप कसोशीने व काळजीपूर्वक करीत.

लिहून झालेली प्रकरणे (chapters), डॉक्टरांकडून तपासून घेऊन, ती गोखल्यांकडून टाईप करणे व त्यांत काही चुका निघाल्यास पुन्हा टाईप करवून घेणे, यातही खूप वेळ जाई. मात्र डॉक्टरांनी मला त्यांच्या मंजूरीचे काम जराही विलंब न लावता त्वरीत त्याच दिवशी केले. 

साधारणपणे १९६७ च्या सप्टेंबर-ऑक्टोबर सुमारास, मी एम.एससी(टेक) चे काम सुरु केल्यापासून अडीज वर्षाचे आंत माझा प्रबंध विद्यापीठास सादर झाला व मी बाहेरील परीक्षकांचे नाव व मुलाखत व परीक्षेची तारीख (External examinar, interview & viva voice exam) याची वाट पाहू लागलो. मधल्या काळांत माझी गोदरेज कंपनीत कामासाठी निवड झाली होती, त्यामुळे तेथील नोकरी व इतर व्याप सांभाळून हे प्रबंध तयार करण्याचे काम केले. गोदरेजमध्ये असलेली रात्रपाळी यावेळी खूप उपयोगी पडली! नागपूर येथील लक्ष्मीनारायण इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (LIT Nagpur) या संस्थेतील प्राध्यापक माझे External examiner म्हणून नियुक्त केले गेले व महिन्याभरांत viva परीक्षा झाली. डॉ. काणे व हे प्राध्यापक यांनी तासभर माझी मुलाखत घेतली व माझ्या कामाबद्दल उलट सुलट प्रश्न विचारुन केलेले काम खरोखर (genuine) आहे, की केवळ आंकडेमोड आहे हे पाहिले!

पुढील महिन्यातच मला विद्यापीठाचे पत्र आले व एम एससी (टेक) पदवी मिळाल्याचे त्यांनी कळविले! खूपच आनंद झाला व आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे गाठल्याचे आतीव समाधान मला, आप्पांना व माझ्या सर्व कुटुंबीयांस झाले! सो.क्ष.संघाने देखील त्या वर्षीचे विद्यार्थी सत्कार समारंभात मला १००/- रु चे पारितोषिक देऊन सत्कार केला, शाबासकी दिली. बोर्डीच्या मूलोद्योग अध्यापन शाळेत १९४८ साली सुरु केलेले एका मास्तरच्या खेडवळ पोराच्या अभ्यासाच्या हव्यासानीची वाटचाल अनेक वळणे घेत, चढउतार पाहात वीस वर्षांनी संपली! 

जेव्हा या शिक्षणासाठीचा प्रवास सुरु झाला त्यादिवशी आप्पा धुळ्यात होते,  हिराजी मामांनी बैलगाडीत जबरदस्तीने बसवून अंबूबाईच्या वर्गात आणून बसविले. त्या दिवशी पुढे सतत वीस वर्षे आपणास ही तपश्चर्या करावी लागणार आहे, हे कळले असते तर तेव्हांच कदाचित शिक्षण संपले असते! पण देवाच्या मनात काही वेगळे असावे, बोर्डी हायस्कूलने ह्या शिक्षणाच्या महत्वाकांक्षेला खतपाणी दिले, आधार दिला, साताऱ्याच्या दोन वर्षाच्या वास्तव्याने ‘आपण काही तरी करु शकतो’ हा आत्मविश्वास दिला, इस्माईलने पूरक वातावरण देऊन एका महत्वाच्या टप्प्यासाठी तयारी करवून घेतली तर युडीसीटीमध्ये बाळगलेले ‘स्वप्न साकार’ झाल्याचे समाधान दिले! शेवटी आई-वडिलांची पुण्याई, समाजातील सद्-भावनांचे सहाय्य, मित्रांचे सहकार्य व परमेश्वराचे आशिर्वाद हे देखील महत्वाचेच!

आता पुढे काय? हा प्रश्न आला होता. युडीसीटीतच पी.एचडी (टेक) चा अभ्यास सुरु ठेवावा, नोकरी होतीच, ती चालू ठेवावी, की परदेशी शिक्षणासाठी प्रवेशाचा प्रयत्न करावा, असे तीन पर्याय होते.

पुढील अभ्यास चालू ठेवण्यास माझी हरकत नव्हती. तरी मनांत एक अपराधीपणाची जाणीव होती, आता आप्पांना काही तरी भरपूर मदत केलीच पाहिजे असे वाटत होते. मुंबईत घर झाले पाहिजे, असे वाटत होते.

गोदरेज नाही, तर इतर दुसरी कडे, पण नोकरी चालू ठेवणे योग्य वाटत होते. परदेशी शिक्षण घेण्याची देखील ओढ वाटत होती कारण त्यावेळी GRE, TOEFL, अशा परीक्षा देण्याची जरुर नव्हती व केवळ आपल्या प्राध्यापकांनी दिलेल्या शिकारशीचे जोरावर युडीसीटी चे सुमारे ७०% विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी प्रवेश मिळवित होते. नुसता प्रवेश नाही तर काही आर्थिक मदत देखील मिळवित. मला तर आर्थिक मदती शिवाय (fellowship, assistant ship इ.) तेथे अभ्यास करणे केवळ अशक्यच होते.

एम. एससी (टेक) प्रबंध लिखाणाची काम सुरु असतांना, मी काही अमेरिकन विद्यापीठात पुढील अभ्यासक्रमासाठी अर्ज पाढविण्यास सुरवात केली होती. युडीसीटीतील माझे काही सहकारी व त्याच सुमारास अमेरिकेतून शेतीचे उच्च शिक्षण घेऊन आलेले डॉ. जयंतराव पाटील यांनी मला याबाबत मार्गदर्शन केले होते.

अर्जासोबत डॉ. काणेंचे शिफारस पत्र जोडणे आवश्यकच होते व त्यांची जोरदार शिफारस असल्यावर आपला आर्थिक मदतीसह प्रवेश निश्चित आहे, अशी मला खात्री होती. तसेच डॉ. काणेंनी मला शिक्षण काळांत दिलेल्या ऊत्तेजनावरुन त्यांची चांगली शिफारस देखील आपणास मिळेल असे मनोमन वाटत होते.

प्रत्येक प्रवेश अर्जासोबत जोडण्यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या शिफारस पत्राच्या तेवढ्या प्रती, बंद लिफाफ्यात घालून दिल्या होत्या. त्यामुळे मला नक्की शिफारस कशी केली आहे कळत नव्हते. त्यामुळे एक लिफाफा व्यवस्थित उघडून त्यांतील मजकूर पाहण्याची जिज्ञासा माझे मनात साहजिक निर्माण झाली! मी ही चांगली गोष्ट केली नाही हे खरे पण त्यावेळी माझी मनःस्थिती परदेश शिक्षणाचा हव्यास पाहता ते साहजिक नव्हते काय? मात्र शिफारशीचा मजकूर वाचून माझा भ्रमनिरास झाला. अगदीच मवाळ शब्दांत डॉक्टरांनी मला शिफारस दिली होती. त्या जोरावर मला प्रवेश मिळू शकला असता तरी विद्यापिठाची आर्थिक मदत मिळणे दुरापास्त होते व त्याशिवाय प्रवेश घेणे मला तरी शक्य नव्हते! मी अर्ज तर पाठवून दिले! 

आणि अपेक्षेप्रमाणे झाले. बहुतेक विद्यापीठांनी प्रवेश दिला मात्र आर्थिक मदतीसाठी, ‘तुम्ही येथे येऊन अभ्यास सुरु करा मग मदतीचे पाहू’ असा सल्ला दिला. तेवढी जोखीम घेणे मला शक्य नव्हते. आप्पांना याबाबतीत मी काही बोललो नव्हतो, मात्र माझे हे उपद्व्याप त्यांचे कानावर गेले होतेच व त्यांनी कोणतीच चौकशी माझे कडे केली नाही.

गोदरेज मध्ये काम चालू होते व मी परदेशी शिक्षणासाठीचे प्रयत्न आता जवळजवळ सोडून दिल्यासारखे होते. एके दिवशी डॉ. कण्यांस भेटण्यास गेलो असतांना त्यांनीच विषय काढला, “तुझ्या अमेरिकन विद्यापीठात पाठविलेल्या प्रवेश अर्जाचे काय झाले? “बहुतेक ठिकाणाहून असिस्टंटशिप विना प्रवेश” असे कळविले आहे – मी त्यांना सांगितले. 

डॉक्टर मंद हसले व त्यांनी मला, ‘सध्या तू तेथे जाण्याचा विचार करु नकोस, भारतातच चांगली नोकरी अथवा पुढील अभ्यासाचे बघ’ या बद्दल मला समजावले.

मी देखील त्यांना शिफारस पत्राबद्दल काहीही जाणवू न देता, आता येथेच नोकरी करण्याचा माझा विचार पक्का झाल्याचे, त्यांना सांगितले. हा विषय तेथेच संपला. आज मला डॉक्टरांच्या त्या कृतीचा अर्थ उमगला आहे, मात्र त्यावेळी मी त्यांचेवर मनातून नाराज झालो होतो हे नक्की. डॉक्टरांस माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीची पूर्ण कल्पना होती व त्यामुळे संपूर्ण विचारांनीच त्या ‘मार्गदर्शकाने’ माझ्या शिफारशी मधून त्यांना हवा असलेला पुढील मार्ग त्यांनी मला दाखविला होता. त्यांनी केले ते ठीकच केले असा मनोमन विश्वास मला आज आहे.   

त्यानंतर परदेशी शिक्षणाचा प्रयत्न म्हणून मी कोणत्याच विद्यापीठात अर्ज पाठविले नाहीत. मात्र डॉक्टरांनी केलेल्या कृतीचे समर्थन आणखी एका प्रसंगातून मला मिळाले.

कारखानदार सोमय्या यांनी नायजेरियांत आपला ‘तेल कारखाना’  सुरु केला होता व त्यासाठी त्यांस हवा असलेल्या तंत्रज्ञ निवडीची जाहीरात आली. पाच वर्षे नोकरीचा बॉण्ड होता, त्यामुळे  पगार चांगला असल्याने मी अर्ज केला. मुलाखत होऊन निवड ही झाली. मोठया खुशीने ही बातमी मी आप्पांस सांगण्यासाठी चिंचणीस आलो व त्यांस ‘निवडपत्र’ दाखविले! आप्पांचा उतरलेला चेहरा व “तुला तेथे जायलाच हवे का?” हे शब्द ऐकले आणि पुढील कोणताच संवाद न होता तो विषय तेथे संपला. आप्पा तेव्हा म्हणाले होते, “बेटा, तुला परदेशात जायची खूपच इच्छा आहे हे मला कळते, पण थोडा थांब, तू खूप फिरशील!”

त्यावेळी डॉ.काणे व आप्पा यांच्या कृतीचा नेमका अर्थ मला कळला नाही, नाराजी देखील झाली. मात्र आज आयुष्याच्या या टप्प्यावर उभे असताना त्या दोन मार्गदर्शकांनी माझ्याबद्दल त्यावेळी केलेल्या त्यांच्या कृतीचा अर्थ मला उमगला आहे व त्यांनी दिलेले आशिर्वाद फळफळून भविष्यात माझ्या आकांक्षा सार्थ झाल्याची कृतकृत्यता मनाला धन्य करते आहे.