कै. वासुदेव काशिनाथ सावे, ती.भाऊ भाग १

All artwork by Ravikant Save

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेऊन आपल्या असीम आशावादाने आणि सतत केलेल्या कष्टांनी आयुष्यात काहीतरी मिळवू पाहणाऱ्या धडपड्या युवकाची व्याख्या एका प्राचीन ऋषीने उपनिषदांत करताना म्हटले आहे “युवास्यात, अशिष्ठो, दृढिष्ठो, बलिष्ठः”. म्हणजे युवक जर आशावादी श्रद्धावान आणि बलवान असेल आणि आपले ध्येय निश्चित करून ते मिळवण्यासाठी पडतील ते कष्ट करीत असेल तर एक ना एक दिवस आपले इप्सित त्याला साध्य होईलच. या वचनाची आठवण होण्याचे कारण आमच्या कै. भाऊंची आम्ही पाहिलेली जीवनाची वाटचाल. एका सामान्य कष्टकरी शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन कोणत्याही प्रकारची सुबत्ता नसतांना आणि शिक्षणापासून ही वंचित राहून आपल्या अथक प्रयत्नांनी आणि जिद्दीने एक आदर्श शेतकरी होण्याचे आपले स्वप्न त्यांनी कसे साध्य केले, ती रोमांचक हकीकत.
भाऊंनी केवळ आपलीच महत्वकांक्षा पूर्ण केली नाही तर आपल्या परिसरातील, अशाच धडपडणार्‍या कष्ट करणाऱ्या अनेक गरजूंना आपल्या अनुभवाचे ज्ञान देऊन त्यांनाही पुढे येण्यासाठी मदत केली, मार्गदर्शन केले. आपण आपले ध्येय गाठावे आणि आजूबाजूच्या मित्रांनाही त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी वाटेल ती मदत करावी हीच तर आयुष्याची सार्थकता आहे.
भाऊंचे वडील, कैलासवासी काशिनाथ सावे हे एक साधे शेतकरी. त्याकाळच्या कायद्याप्रमाणे जमीनदाराच्या शेतीवर काम करणारे खंडाने शेती करणारे व आपला बैलगाडीचा व्यवसाय माल व इतर साहित्य वाहतुकीसाठी करून आपला उदरनिर्वाह चालविणारे .त्याकाळी प्रचलित कूळ कायद्याप्रमाणे मोठे जमीनदार आपली जमीन काही शेतकऱ्यास कसण्यासाठी देत व त्याबदल्यात धान्य पिकल्यावर आपला हिस्सा काढून घेत या व्यवहारांमध्ये फायदा हा मूळ जमीन मालकाचा होई. मात्र पुढे ”कसेल त्याची जमीन”, हा कूळ कायदा आला आणि ही अन्यायकारक प्रथा दूर झाली. भाऊ ज्येष्ठ पुत्र असल्याने सहाजिकच यांनी आपल्या वडिलांच्या उद्योगात त्यांना मदत करावी व इतर लहान भावंडांच्या संगोपनासाठी, थोडे आर्थिक उत्पन्न मिळवून वडिलांना मदत करावी, हीच अपेक्षा त्यांच्याकडून असणार. त्यामुळे त्या काळात शिक्षणाची अपेक्षा करणे गुन्हाच होता म्हणून भाऊंना तसे शिक्षणाचे संस्कार मिळाले नाही. मात्र मराठी शाळेत सातवी पर्यंत शिक्षण घेतले व आपल्या वडिलांच्या उद्योगातच त्यांनी आपल्या शेतकरी जीवनाला सुरुवात केली.

परंतु भाऊ हे रसायन अगदी वेगळे होते. शालेय कालखंडात जे काही थोडे प्राथमिक शिक्षण घेता आले तेवढीच शिदोरी.परंतु त्यांना वडिलांच्या मोलमजुरी च्या कामात मदतीचा हात देत असताना अंतरंगात कोठेतरी आपल्या भावी जीवनाच्या कार्याची निश्चिती झाली होती. परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे भविष्यकाळ निराशाजनक दिसतो आहे मात्र हे असेच चालू राहता कामा नये एक दिवस तरी हे आपल्याला बदलायचे आहे मला एक आदर्श शेतकरी म्हणून नाम कमावता आले पाहिजे. ‘अशी शेती करून दाखवीन की माझ्या परिसरातीलच नव्हे पण सबंध महाराष्ट्रातून माझे काम बघण्यासाठी शेतकऱ्यांनी यावे आणि माझ्या ज्ञानाचा फायदा माझ्या समाजाला व्हावा’ अशा प्रकारची आकांक्षा धरून भाऊंनी आपले भावी आयुष्याचे ध्येय म्हणजे एक उत्तम शेतकरी हे निश्चित केले.
हे स्फुल्लींग भाऊंच्या त्या बालपणीच्या दिवसातच कसे उपजले याबाबत सांगताना भाऊ म्हणत की “लहानपणी मी जेव्हा बोर्डीला माझ्या मामाकडे जात असे त्यावेळी माझे मामा आणि माझे आत्याजी चिंतामण पाटील यांची शेती मी बघत असे.. चिंतामण पाटील केवळ बोर्डीच नव्हे तर सबंध ठाणे जिल्ह्यात एक प्रगतिशील व आदर्श शेतकरी होते भाऊ त्यांच्याशी बोलत व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत. चिंतामण पाटील यांचा उल्लेख भाऊ नेहमीच खूप आदराने करीत असत .त्यावेळी बोर्डी मध्ये अनेक उत्तम बागायतदार होते विशेषतः काही इराणी पारशी या लोकांच्या चिकूच्या व आंब्याच्या बागा खूप नावाजलेल्या होत्या. त्यामुळे भाऊंच्या चाणाक्ष नजरेत या लोकांच्या कामाची महती आल्यामुळे आपणही भविष्यात असेच काहीतरी भव्यदिव्य करावे ही महत्त्वाकांक्षा त्यावेळी रुजली असेल. भाऊ केवळ स्वप्नरंजन करीत बसले नाहीत तर त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कामाची व कष्टाची ही तयारी केली. आपले ध्येय गाठण्यासाठी आपल्याला आपल्या कुटुंबातून काही विशेष मार्गदर्शन व आर्थिक मदत मिळेल अशी त्यांची अपेक्षा नव्हती .त्यांचे वडील एक शांत संयमी व मृदू स्वभावाचे व्यक्तिमत्व होते आणि ठेविले अनंते तैसेची रहावे अशा समाधानी वृत्तीने जगणारे होते .त्यामुळे मदत अथवा पाठिंबा राहू द्या, कदाचित आपल्याला विरोध होण्याचाही धोका आहे हेदेखील भाऊंनी त्यावेळी ओळखले होते. त्यामुळे भाऊंच्या स्वभावात आलेला थोडा बंडखोरपणा त्यांना उपयोगी पडला व केवळ आपल्या मनगटाच्या बळावर भाऊंनी आपल्या पुढील वाटचालीला सुरुवात केली.
ज्यावेळी प्रतिभावान व सतत उद्योगी माणूस,आपल्या नियत कार्याकडे आकर्षिला जातो आणि त्या वाटेने मार्गक्रमण करतो, त्या वाटेतील धोके ओळखून ही आपले प्रयत्न सोडत नाही यावेळी नियती सुद्धा त्याची सत्वपरीक्षा घेते आणि आणि त्यानंतरच दैवही त्याला सहाय्यभूत होते; पुढे जाण्याची प्रेरणा देते भाऊंच्या सुरुवातीच्या कालखंडात हाच नियतीचा खेळ बघायला मिळतो.
भाऊंच्या विवाह पूर्व आयुष्यात नियतीने सतत त्यांची परीक्षा घेतली खूप मेहनत कष्ट करूनही यश मिळत नव्हते. आपल्या धेय्या पर्यंत जाण्यासाठी मार्ग मिळत नव्हता मात्र त्या काळच्या प्रथेप्रमाणे यांचा विवाह वयाच्या एकविसाव्या वर्षी झाला आणि त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. पत्नी कमल ही लक्ष्मीच्या रूपात,सोनियाच्या पावलांनी त्यांच्या या कुटुंबात प्रवेशीत झाली . श्वशुर मोरेश्वर राऊत ऊर्फ तात्या हे फ्रेंड, फिलोसोफर, अँड गाईड या रूपात त्यांना मिळाले आणि सुदैवाने त्यासुमारास म्हणजे अंदाजे 1950 च्या आसपास सरकारने एक नवीन योजना शेतकऱ्यांसाठी आणली त्यानुसार गरजू शेतकऱ्यांना गावाबाहेरील पडीक जमिनी “लीज”तत्वावर शेतीसाठी देण्याची सरकारी योजना आली. या जमिनी गावाबाहेर पण अत्यंत दुर्लक्षित आणि कुठल्याही प्रकारची सुविधा नसलेल्या ठिकाणी होत्या. त्यामुळे सरकार मोफत देत असूनही अशा जमिनी कसण्यास त्यावर शेती करण्यासाठी खूपच थोडे शेतकरी पुढे येत होते. भाऊंनी ती संधी सोडली नाही. सासरे मोरेश्वर राऊत तात्या मदतीला होते व त्यांचा पूर्ण पाठिंबाही होता. काही आप्तस्वकीयांनी त्यावेळी भाऊंची थट्टा देखील केली. तारापूर गावाबाहेर अशा ठिकाणी ओसाड पडलेली ,खडकाळ जमीन स्मशानभूमीजवळ होती यावरून परिस्थितीची कल्पना यावी व इतर लोक अशा जमिनी घेण्यासाठी पुढे का येत नव्हते याची कल्पना यावी. मात्र भाऊंचे खरे हितचिंतक त्यांच्या पाठीशी उभे राहिले व आयुष्याचे एक नवे पर्व सुरु झाले.

आयुष्यात अपयशी ठरलेली माणसे आयुष्यात असाधारण संधीची वाट पाहत असतात. त्यांना वाटते सामान्य संधी मधून दिव्य यश कसे मिळणार मात्र संधी ती संधीच असते. कोणतीच संधी कमी वा अधिक महत्त्वाची नसते. योग्य मार्गाने प्रयत्न केल्यास संधीचे सोने करता येते मात्र त्यासाठी लागतो तो दूरदर्शीपणा कष्ट करण्याची तयारी आणि आणि जबरा आशावाद त्या तरुण वयात ही भाऊ हे सर्व जाणून होते व आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मिळालेली ही उत्तम संधी त्यांनी सोडली नाही. तारापूर गावाबाहेर ही पडीक जमीन भाऊंना सरकार कडून भाडेतत्वावर मिळाली. पावले योग्य दिशेने पडू लागली.
मशागतीचे काम गावातील घरात राहून करता आले असते मात्र भाऊंनी आपला मुक्काम त्या वैराण जमिनीवरच हलवला .कुठलेही काम करायचे तर ते पूर्ण ताकतदीनिशी हे भाऊंचे तत्व होते व त्या स्वभावानुसार त्यांनी प्रत्यक्ष रणभूमीवर राहूनच परिस्थितीशी दोन हात करण्याचे ठरविले. पत्नी कमल तात्यांच्या खानदानी व सुसंस्कृत कुटुंबातून आली होती .आपल्या पतीचे स्वप्न हेच आपलेही स्वप्न,या भावनेने तिनेही भाऊंचे बरोबर कामाला व कष्टाला, कोणताच त्रागा न करता, सुरुवात केली. पतीच्या खांद्याला खांदा लावून कंबर कसून कार्याला हातभार लावणे,व संसार गाडा ही ओढत रहाणे, हाच तिचाही नित्यक्रम. त्या उजाड माळरानावर भाऊंनी सहकुटुंब मुक्काम ठोकला. एक छोटेसे झोपडीवजा घर तयार झाले. आई वडील दोघे कनिष्ठ बंधू व मुले असा मोठा गोतावळा होता. सर्वजण त्या पडीक जमिनीचे नंदनवन करण्याच्या प्रयत्नात लागले. कर्तृत्ववान माणसे जेव्हा आपली यश प्राप्त करण्यासाठी झटू लागतात त्यावेळी नियती देखील त्यांची सत्वपरीक्षा घेते. भाऊंचे हे काम सुरू झाले आणि त्याच वर्षी म्हणजे साधारण 1952 महाराष्ट्रातला मोठा अवर्षण दुष्काळाचा फटका बसला.येथे पिण्यासाठीही पाणी मिळत नव्हते तेथे शेतीसाठी पाणी कुठून आणणार? सरकार कडून रेशनिंग मध्ये लाल ज्वारी व अमेरिकन गहू मिळत होता आणि पिण्यासाठी पाणी दूर गावातून, कोणा इतर, बागाईतदाराकडून आणावे लागत होते. ह्या अवर्षणाच्या आपत्तीने भाऊ थांबले नाही .शेतकऱ्याला स्वतःची विहीर असणे अत्यावश्यक आहे… डोक्यात अशी ठिणगी पडली की त्या कल्पनेचे रुपांतर प्रत्यक्ष कार्यात करणे हा भाऊंचा स्वभाव. विहीर खणायचीच. मात्र त्यासाठी पैशाची आवश्यकता होती .पण म्हणतात ना हिम्मत मर्दा तर मदत खुदा. तात्यांनी थोडी मदत दिली,भाऊंनी स्वतःही आपल्या तुटपुंज्या कमाईतून थोडी गंगाजळी जमवली असेल. आणि विहीर खोदण्याचे निश्चित झाले घरची मंडळी कष्ट करायला तयार होतीच तात्यांनी चिंचणी गावातून काही आदिवासी व कामगार कुटुंबे भाऊंच्या या प्रकल्पासाठी पुनर्वसित केली होती त्यामुळे भाऊंना शेजार मिळाला आधार मिळाला व मनुष्यबळही मिळाले. स्वतः तात्या काही दिवस भाऊंच्या या नवीन विहीर प्रकल्पासाठी हजर राहून मार्गदर्शन करीत होते .काम सुरू झाले त्याकाळी पाण्याचे स्थान निश्चित कोठे आहे,हे विहीर खणण्या आधी ठरविण्याचे शास्त्र, एवढे प्रगत झाले नव्हते त्यामुळे अनुभव आणि दैव या दोन गोष्टी करूनच विहीर खणण्याची जागा ठरविली जात असे.
तात्या स्वतः उत्तम शेतकरी होते त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अशा विहिरी निर्माण करण्याचे काम स्वतःसाठी व इतरांसाठीही केले होते शिवाय त्यांचा मित्रपरिवार मोठा असल्याने त्यांच्याकडूनही काही सल्ला व मार्गदर्शन मिळाले .तात्यांनी सुचविलेल्या जागेवर खोदकाम सुरू झाले दैवाने साथ दिली .पाण्याचा झरा गवसला .भरपूर आणि गोड पाणी लागले. या सर्व कामात तात्यांचा सहभाग फार मोलाचा होता .विहीर बांधणीसाठी आवश्यक दगड पुरेसे मिळाले नाही तेव्हा स्वतःचे घर बांधण्यासाठी तयार केलेल्या विटा तात्यांनी, भाऊना दिल्या. सर्व सावे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना असा झाला भाऊंनी त्यावेळेला काढलेले उद्गार म्हणजे..”तो पाण्याचा एक साधा झरा नव्हता तर माझ्यासाठी अवतरलेली ती गंगा होती.” भाऊंचे हे उद्गार किती सार्थ होते हे पुढे त्या ओसाड माळरानाचे या पवित्र जलाने, भाऊंनी फुलवलेले नंदनवन ज्यांनी पाहिले त्यांनाच कळेल.
कशीबशी का असेना जमीन मिळाली, विहीर बांधून झाली, छान पाण्याचा स्त्रोत्र मिळाला ,असा प्रगतीचा एक एक टप्पा ओलांडणे सुरू होते.हातखर्चासाठी पैसाही शेतीमधून मिळत होता त्यातील मोठा हिस्सा कुटुंबाच्या उदरभरणासाठी खर्च होत होता. जी काही थोडी शिल्लक पुरत असे एवढी रक्कम रहाट बांधणीसाठी पुरेशी नव्हती कारण विहिरीतील पाणी बाहेर काढून झाडापर्यंत पोहोचवणे हे आता आवश्यक होते .पैशासाठी कोणापुढे दीनवाणे पणे हात पसरणे हे भाऊंच्या स्वभावातच नव्हते त्यामुळे रहाट बांधणीच्या कामासाठी पैसा कसा उभारावा या चिंतेत भाऊ होते मात्र अजून पर्यंत च्या त्यांच्या शिस्तबद्ध व यशस्वी वाटचालीमुळे, एक धडाडीचा तरुण शेतकरी अशी त्यांची प्रतिमा परिसरात तयार झाली होती. सर्व जाती धर्मातील व शेतीच्या उद्योगातील माणसे त्यांना ओळखू लागली होती त्याच बरोबर या माणसाला आज दिलेली मदत ही भविष्यात व्यर्थ जाणार नाही ,तो स्वतः त्याचे चीज करील अशी खात्री लोकांना वाटू लागली होती.
त्या दिवसांच्या आठवणी सांगताना भाऊ म्हणत असत, ”मला केवळ अडीचशे ते तीनशे रुपयांची त्यावेळी गरज होती मात्र तेवढे पैसे माझ्याकडे शिल्लक नव्हते, पक्की खात्री होती की कुठून तरी हे पैसे मला मिळणार..” ,आणि तसेच झाले भाऊंच्या एका परिचिताने त्यांना थोडी आर्थिक मदत देऊ केली जेणेकरून कामाला सुरवात करता यावी आणि त्या भल्या माणसाने आश्वासनही दिले तू कामाला सुरुवात तर कर पुढे आपण बघू .त्याप्रमाणे गवंडी, सुतार, लोहार अशी मंडळीदेखील भाऊंच्या कामाने प्रभावित होऊन त्यांना आपापल्या क्षेत्रातील मदत करण्यास पुढे आली. छान योग जमून आला आणि रहाट बांधणीचे काम सुरु झाले. पूर्ण झाले.

कोणतेही आर्थिक पाठबळ वा कौटुंबिक परंपरा नसताना भाऊंनी आपले उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नात मोठा टप्पा गाठला होता. आता घ्यायची होती – गगनभरारी! इंधन भरलेले रॉकेट प्रक्षेपणासाठी तयार झाले होते व काउंट डाऊन सुरु झाला होता. आधीच उत्साह मूर्ती असलेल्या भाऊंच्या अंगी आता पुढील कामासंबंधी आडाखे आणि नियोजन सुरू झाले होते. कोणती पिके घ्यावीत, कशापद्धतीने घ्यावीत, बाजारपेठ कुठे मिळवावी अशा अनेक विविधांगी बाबींचा विचारकल्लोळ सुरु झाला होता आणि केवळ स्वतःच्या हिमतीवर हे सर्व करावयाचे होते.

(क्रमशः)

आप्तजनांना पुनश्च विनंति : आपल्या कडे पू. भाऊंविषयी छान आठवणी, विचार, प्रसंग, फोटो असल्यास अवश्य पाठवावेत… त्यामुळे हे स्मृति साहित्य अधिक परिपूर्ण, प्रेरक आणि रोचक होईल…