कै. वासुदेव काशिनाथ सावे, ती.भाऊ भाग २

उत्साह म्हणजे कोणत्याही ही कार्याचा प्राण. उत्साह म्हणजे धडकती आग. या वाटेवरच महत्त्वाकांक्षी माणसाचे पुढील यश अवलंबून असते. आपल्या सिद्धी च्या स्टेशन वर पोहोचण्यासाठी हा उत्साह रुपी इंधन साठा भरपूर हवा. मनुष्य विद्वान असो की गावंढळ ,संपन्न असो की कंगाल, एकदा का ही उत्साहरुपी अग्नीची ठिणगी त्याच्या मनात पडली की आपली कार्यसिद्धी करून घेतल्याशिवाय थांबणार नाही, हे जगाच्या इतिहासावरून आपल्याला कळून येते.
भाऊंनी आपल्या जमिनीवर पावसाळ्यात भात शेती व इतर वेळी भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली. तोंडली वांगी मिरची टोमॅटो अशा भाज्या भाऊ पिकवू लागले .आता थोडी आर्थिक बाजू देखील मजबूत होत होती भाऊंना तोंडली हे पीक उत्तम प्रकारे घ्यायचे होते .त्याकाळी समाजातील काही थोडेच लोक तोंडली पिकवत असत व उत्पादन कमी असल्यामुळे त्यांना भावदेखील चांगला मिळे. विशेषतः बोर्डी विभागात काही मोठे व वजनदार शेतकरी तोंडली हे पीक घेत असत मात्र त्याचे बियाणे इतर कोणाला देण्याची टाळाटाळ करीत कारण त्यांची मोनोपोली इतरांनी घेऊ नये ,हेच त्यामागचे तत्त्व होते. मात्र भाऊंनी तोंडली बीज कसे मिळविले,याची कथा पुढे सांगतो .मात्र एकदा हे बियाणे हस्तगत केल्यानंतर त्यांनी आपला स्वतःचा अनुभव व अनुभवातून तयार झालेले तंत्रज्ञान वापरून,एक उत्कृष्ट तोंडली उत्पादक म्हणून नाव कमावले.भाऊंची तोंडली मुंबई व अहमदाबाद मार्केटमध्ये एवढी प्रसिद्धी पावली की व्यापारी लोक “आमच्याकडेही ही वासुदेव सावे यांची तोंडली येतात”असे कौतुकाने इतर मित्रांना सांगत व भाऊंच्या तोंडल्याच्या गोण्यांचे प्रदर्शन, आपल्या गाळ्यामध्ये दर्शनी भागात ठेवीत,असे त्यावेळचे लोक सांगत.भाजीच्या केळ्याचे पीक देखील मोठ्या प्रमाणावर आमच्या भागात होत असे परंतु ती आकाराने कमी लांबीची व घड लहान असलेली होती . कलकत्ता केळ्याचे पीक बंगालमध्ये , कलकत्ता भागात होई व तेथून बी आणून फक्त एक दोन शेतकर्यानी आमच्या भागात, या केळीची लागवड केली होती. ते देखील या बीजाचे दुसऱ्या कोणाशीही ही वाटप करीत नसत. हे बिज देखील भाऊंनी कसे मिळविले व एक उत्कृष्ट केळीचे उत्पादक म्हणून असे नाव कमावले ही कथा देखील मोठी रोमांचक आहे. हेदेखील पुढे सांगीन.
भाऊंच्या सबंध शेतकरी जीवनात त्यांनी एक पथ्य पाळले म्हणजे शेतीतून जे काही आर्थिक उत्पन्न मिळेल त्याचा मुख्य भाग पुन्हा शेतीच्या विकासासाठीच उपयोगात आणायचा .उत्पादनाचे काही नवे स्रोत निवडायचे आणि त्यासाठी जरुरी पडल्यास नवीन प्रयोग आणि यांत्रिकीकरण करून आपले मुख्य ध्येय “उत्कृष्ट बागायतदार होणे”.. ही वाटचाल त्यांनी सदैव सुरू ठेवली.

तारापूरचा गणेशोत्सव. आईचा उत्साह


माझा आणि आमच्या कुटुंबाचा परिचय,भाऊंशी, 1970 साली झाला . त्यांची कन्या मंदा हिच्याबरोबर माझा विवाह ठरला होता आणि त्याबाबतीत पुढील बोलणी करण्यासाठी गोरेगावला रवी बंधूच्या ब्लॉक वर एके दिवशी संध्याकाळी मला जेवणाचे आमंत्रण होते मी त्यावेळी दादरच्या अण्णासाहेब वर्तक विद्यार्थीगृहात रेक्टर ,व्यवस्थापक म्हणून काम पहात होतो व दादरलाच राहत होतो. त्याआधी मी आप्पा बरोबर याबाबतीत बोललो होतो व त्यांच्या सल्ल्याप्रमाणे बोलणी करण्यासाठी आलो होतो त्यावेळी भाऊंच्या प्रथम भेटीतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने व प्रभावी बोलण्याने माझ्यावर छाप पडली . लग्नाची तारीख ,ठिकाण व इतर काही देण्याघेण्याच्या या बाबीवर सविस्तर चर्चा झाली.सामंजस्याने निर्णय घेण्यात आले मात्र कळीचा मुद्दा म्हणजे मला मुंबईत राहण्यासाठी स्वतःची जागा नव्हती .मला त्या बाबतीत आर्थिक अडचण ही होती. जागेचा शोध चालू होता .मुंबईच्या पश्चिम उपनगरात जागा मिळावी अशी अपेक्षा होती मात्र आर्थिक बजेट व जागेचा भाव याचा मेळ कुठे जमत नव्हता, आणि आपली स्वतःची जागा झाल्याशिवाय लग्नाचा कार्यक्रम करू नये असे मला प्रामाणिकपणे वाटत होते. मी भाऊंना तसे सांगितले . भाऊंनी माझ्या प्रश्न समजावून घेऊन मला निसंकोचपणे सांगितले की “माझ्याकडून,याबाबतीत जेवढी आर्थिक मदत करता येईल की मी करेन तुम्ही जागा निश्चित करा आणि त्याप्रमाणे मला सांगा. मला वाटते .तुमचा ,प्रथम जागा हा विचार बरोबर आहे व आपणही तसेच करू” माझ्या सुदैवाने पार्र्ल्याचे ,कै. अनंतराव वर्तक, तेही भाऊंच,यांच्या मदतीने व सल्ल्याने मला विलेपार्ले पूर्व येथे त्यांनीच निर्माण केलेल्या सर्वोदय सोसायटी या गृहसंकुलात जागा मिळवून दिली ,ही जागा माझ्या बजेटमध्ये असली तरी संपूर्ण आर्थिक भार आम्हाला पेलणे शक्य नव्हते .
भाऊंनी कबूल केल्याप्रमाणे पुढे आम्हाला कमी पडत असलेली, थोडी आर्थिक मदतही दिली आणि अशा रीतीने मला विलेपार्ले मधील सर्वोदय सोसायटी मधील जागा मिळाली आणि लग्न करण्याच्या मार्गातील मुख्य अडचण ही दूर झाली . मात्र या भेटीत भाऊंची निर्णय क्षमता आणि समोरच्या माणसाचा प्रश्न व्यवस्थित समजावून घेऊन,आपला निर्णय त्याला शांतपणे पटवून देणे व त्या बाबतीत स्वतःलाही काही तोशीस लागत असेल तर मागेपुढे न पाहता त्या प्रश्नांची उकल करणे अशा अनेक गोष्टींचा प्रभाव माझ्या मनावर पडला. भावी आयुष्यात देखील त्यांच्या अशा अनेक पैलूंची जाणीव झाली, आणि माझ्या समस्या सोडविण्यात त्यांचा सल्लाही मोलाचा ठरला
आमच्या बोलण्यानंतर भाऊंनी चिंचणीला जाऊन आप्पा आणि इतर कुटुंबीय यांची भेट घेतली आणि त्यांच्याही अडचणी जाणून घेऊन लग्नाचे ठिकाण चिंचणी हेच निश्चित केले .आमचे घर बोर्डीला मात्र तेथील जागा खूप अपुरी असल्याने हे लग्न चिंचणीच्या घरात व्हावे अशी इच्छा आमच्या कुटुंबाची. विशेषतः आमचे चिंचणी च्या घराचे मालक कै. जगन भाऊ यांची होती आणि भाऊनाही तो विचार सोईस्कर वाटल्याने आमचे लग्न चिंचणी ला 3 मार्च 1971 रोजी पार पडले. लग्नासाठी मुंबई बोरवली व इतर गावाहून बरीच मंडळी चिंचणीला आली होती आणि लग्न साधेपणाने व शानदार , निर्विघ्न पणे पार पडले. विशेषतः माझ्या मुंबईच्या कार्यालयातील काही मित्रमंडळी मुद्दाम चिंचणीला आली होती काहीजण तर रात्री मुक्काम ही केला आणि लग्नाच्या गोड आठवणी घेऊन मुंबई गेली हा समारंभ ,निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी कै. जगन भाऊ ,बोर्डीच्या आमच्या मावश्या आणि भाऊ यांचे पूर्ण सहकार्य मिळाल्यामुळे आम्हाला परक्या गावात हे शुभ कार्य व्यवस्थितपणे करता आले. आप्पानाही खूप समाधान झाले.या लग्नाच्या निमित्ताने भाऊ आणि आप्पा यांचे संबंधच केवळ व्याही म्हणून नाही, तर चांगले मित्र म्हणून ही ते जवळ आले व त्यामुळे दोन कुटुंबे अतिशय चांगल्या प्रकारे जोडली गेलो .
आमच्या पार्ल्याच्या घरी आमचा नवीन संसार सुरु झाला त्यावेळी आम्हा कुटुंबाकडे हीच जागा मुंबईत ऊपलब्ध होती, त्यामुळे माझे बंधू श्रीकांत आणि प्रदीप हे सुद्धा काही काळ आमच्या बरोबरच होते. श्रीकांत चे लग्न होऊन त्याचाही नवा संसार, आमचे बरोबर सुरू झाला आणि कालांतराने तो, गोरेगावला गेला. तर प्रदीप येथे कॉलेजचे शिक्षण संपल्यावर पुढील व्यवसायासाठी बोर्डीला गेला मात्र भाऊ जेव्हा कधी आमच्या घरी येत अतिशय आनंदात असत आणि आणि जरी त्यांचेही घर गोरेगावला असले तरी कधीमधी आमच्या घरी मुक्कामास ही येत. येताना न चुकता पिशव्या भरून भाजी आणि आपल्या वाडीतील फळफळावळ घेऊन येत. ह्या पार्ल्यातील वास्तुने आम्हाला खूप काही दिले आहे याचे सर्व श्रेय आप्पा, भाऊ आणि अनंतराव भाऊ या तिघांचे मिळालेले आशीर्वाद यालाच दिले पाहिजे .प्रत्येक वास्तूमध्ये एक वास्तुपुरुष वास्तव्य करून असतो आणि प्रथमतः प्रवेश करताना त्या वास्तुपुरुषाची शांती करून गृहप्रवेश करावा अशी आपली धारणा आहे आम्ही याबाबतीत तसा विशेष कार्यक्रम केला नाही. आप्पांनी स्वतः यांच्या दत्त गुरूच्या प्रतिमेसमोर प्रार्थना करून एक श्रीफल वाढवले आणि सर्वांना प्रसाद वाटला आजही या त्रिमूर्तींचे आशीर्वाद आमच्या पाठीशी त्या घरामध्ये आहेत व अनेक आनंदाचे क्षण आम्ही तिथे व्यतीत केले आहेत .
माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने मला देशात परदेशात अनेक ठिकाणी कामासाठी जावे लागले आणि त्यानंतर झालेल्या तारापूर भेटींत भाऊंना त्या प्रवासाचा वृत्तांत सांगून त्यावर चर्चा करणे मोठा आनंदाचा अनुभव असे. भाऊ एक शेतकरी , त्यांना आमच्या पेट्रोलियम व्यवसायाबद्दल विशेष माहिती असणे आवश्यक नव्हते तरीदेखील रोजच्या वृत्तपत्र वाचनातून चौकस वृत्तीतून आणि मित्रांकडून मिळालेल्या अशा चर्चेतून त्यांच्याकडे बरीच माहिती आपल्या देशाच्या तेल व्यवसायाबद्दल होती आणि त्याचा प्रत्यय मला त्यांच्याबरोबर होणाऱ्या अशा चर्चेतून येत असे. मात्र यावेळी जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे अति सामान्य प्रश्न,निरागसपणे विचारताना देखील भाऊंना संकोच वाटत नसे. एखाद्या लहान मुलाने जसे प्रश्न विचारावेत अशाप्रकारचे प्रश्नही ते मला आमच्या व्यवसाया बद्दल विचारीत आणि त्यानंतर त्यांच्या कुतुहलाचे समाधान करताना मलाही खूप खूप आनंद होई आणि काही नवीन गोष्टी मला शिकावयास मिळत .
सन1989 मध्ये, फ्रान्स इंग्लंड दुबई अशा देशांचा दौरा माझ्या हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीतर्फे केला.माझा ही हा प्रथम परदेश प्रवास!”एल्फ” या फ्रेंच कंपनीशी आमचा एक सामंजस्य करार झाला होता व त्यानुसार त्या कंपनीच्या पॅरिसमधील व्यवस्थापनाला भेट देऊन तेथील प्रगत तांत्रिक व्यवस्थापन आपल्या भारतात आणून त्याचा फायदा उत्पादन वाढीसाठी कसा करता येईल हा या भेटीचा उद्देश होता .मी तारापूरला भाऊंच्या भेटीला आलो या नियोजित भेटीवर ,आमची खूप मनोरंजक चर्चा झाली अर्थात माझा पहिला परदेश प्रवास असल्याने भाऊनाही त्याचे कौतुक होते आणि तेथे काय झाले हे समजून घेण्यासाठी त्यांची ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यांच्या अनेक शंकाकुशंका यांना उत्तरे देताना माझी दमछाक झाली होती. एल्फ कंपनीच्या कारखान्यात एका पाळी मध्ये तीन माणसांनी काढलेले उत्पादन हे आमच्याकडे वीस माणसे काढतात ही माहिती दिल्यावर भाऊंना अचंबा वाटला मात्र आपल्याकडे पाश्चात्य लोकांप्रमाणे यांत्रिकीकरण करून चालणार नाही आपल्या अफाट लोकसंख्येला रोजगार मिळवून देण्यासाठी अशाप्रकारे माणसांची कपात योग्य नव्हे ,या मुद्द्यावर भाऊंनी माझ्याशी खूप चर्चा केली. मलाही त्यांचे खूप कौतुक वाटले कारण हा सुद्धा एक वेगळा विचार होता आणि उत्पादन क्षमता वाढवताना निश्‍चितपणे आपल्या देशात तरी हा विचार महत्त्वाचा आहे. गंमत म्हणजे हे सर्व झाल्यावर भाऊंमधला मला शेतकरी जागा झाला. मग तुम्ही पॅरिसमध्ये शेतकरी बघितले का, येथील शेतीची तुम्हाला पाहणी करता आली का हा प्रश्न विचारला आणि माझी दांडी गुल झाली मात्र सुदैवाने काही द्राक्ष बागांना व वायनरीना (winerys)… आम्ही ही भेट दिली होती आणि तेथील माहिती घेतल्यानंतर भाऊंनी पुन्हा एक सुंदर विचार त्यावेळी दिला की, शेतकर्‍याला अशाप्रकारे जोडधंदा असल्याशिवाय त्याचा भाग्योदय होणार नाही.त्यांनी स्वतः असे अनेक प्रयोग आपल्या शेतीवर केले आणि इतर शेतकऱ्यांना आदर्श घालून दिला. भाऊंचे विचार काळाच्या खूप पुढे होते आणि भारतातल्या प्रत्येक शेतकरी भाऊंसारखा विचार करील तर मला वाटते आज भारतात शेतकऱ्याची अवस्था आहे तशी राहणार नाही.

तारापूरच्या भेटीत भाऊ बरोबर गप्पांचा कार्यक्रम, रात्रीस रंगत असे दिवसा भाऊंचे अनेक कार्यक्रम व गावात फेरी मारणे वगैरे असे त्यामुळे कमीत कमी मी एक रात्र तरी मला तारापूरला राहावेच लागे आणि तो एक मोठा आनंद सोहळाच असे सकाळी मात्र माझ्यासाठी खास प्रभात फेरी चा कार्यक्रम ठरलेला असे.आ ने दिलेली गरम गरम भाकरी ऑम्लेट लोणच्याबरोबर खाऊन झाल्यावर, भाऊ मला तास दीड तास वाडीमध्ये फिरवत तो एक अवर्णनीय अनुभव असे. बागेमधील लागवड ,काही नवीन प्रयोग त्यांची वैशिष्ट्ये तसेच त्या लागवडीची आर्थिक बाजू ,विविध अंगांनी भाऊ माहिती देत. एखाद्या या अनुभवी प्राध्यापकाने त्याच्याकडे आलेल्या ट्रेन विद्यार्थ्याला जसे सांगावे त्या प्रकारे अत्यंत निरागस पणे भाऊ माहिती देत .मी देखील खूप एकाग्रतेने ऐकून माझ्या शंका विचारीत असे भाऊंनाही त्यामुळे खूप आनंद होई. तारापूरच्या प्रत्येक भेटीत,भाऊ असेपर्यंत हा कार्यक्रम कधी चुकला नाही .मी तर म्हणेन की तारापूर भेटीत ते एक मोठे आकर्षण माझ्यासाठी असे,भाऊ बरोबर त्यांच्या वाडीतून फेरफटका मारणे म्हणजे शेतीचा वस्तुनिष्ठ पाठ!!
या सकाळच्या चालण्यात मला तर खूपच माहिती मिळे मात्र एक वैशिष्ट्य असे जाणवत असे ही भाऊ यांच्या या फेरी मध्ये नुसते चालत नसत, निरीक्षण असे, व प्रत्येक झाडाशी त्यांचा मुक्त संवाद होत , असे वाटत असे की जणू त्यांचे प्रत्येक झाड भाऊंशी संवाद करताना, आपला आनंद व आपली व्यथा त्यांचे जवळ व्यक्त करीत आहे कारण त्या या फेरीनंतर ताबडतोब महादु ला बोलवून प्रत्येक झाडाला काय हवे याच्या सूचना मिळत .कोणत्या झाडाला कोणते खत पाहिजे ,कोठे पाणी कमी पडले आहे, कोणत्या ठिकाणी तण वाढले आहे ,कोणाला काही औषध दिले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना देऊन त्वरित त्याची अंमलबजावणी झाली की नाही याची दुसऱ्या दिवशी चौकशी होत असे. मला वाटते आदर्श शेतकरी होण्यासाठी त्याला आपल्या झाडा पानाशी असा संवाद साधता आला पाहिजे नाहीतर शेती म्हणजे नुसती रोपांची लागवड एवढेच काम होईल.. या मूक सजीवांशी संवाद साधता आला तर शेतीमध्ये भव्यदिव्य असे करून दाखवता येते हे भाऊंनी आपल्या कामाने सिद्ध केले आहे. या नंतर भाऊंच्या डोक्यात प्रत्येक माणसाला काय काम द्यावयाचे आहे याची जंत्री तयार होई. त्यावेळी यांच्याकडे सुमारे 50/ 55 माणसे रोज काम करीत आणि त्यांचा मुकादम याबाबतीत भाऊना सहकार्य करी. पावसाळ्याच्या आधी बरीच कामे निघत असत आणि त्यावेळी मनुष्यबळ वाढवावे लागेल. जंगलातील काही आदिवासी मंडळी त्यावेळी शेतीवर येत आणि तेथेच मुक्काम करीत. त्यांची गवताने शाकारलेली एस्किमो सारखी घरे पाहणे मोठा आनंद होता!हा वेगळा विचार होता आणि भाऊ सारखे खूपच थोडे शेतकरी अशाप्रकारे काही काळापुरते, मनुष्यबळ वाढवून आपली शेतीचीकामे वेळेत करण्याचे कौशल्य, साध्य करीत होते.
कधीकधी भाऊ रात्री बारा एक वाजता सुद्धा झोपेतून उठून एकटेच हातात कंदील व एक काठी घेऊन फेरी मारून येत कधीकधी रात्रीसुद्धा पाण्याचे शिंपण चालू असे. त्यावेळी पाण्याचे प्रवाह व्यवस्थित झाडापर्यंत जातो की नाही व विशेषतः पाणी कोठे वाया तर जात नाही ना ह्या पाहणीसाठी ही रात्रीची फेरी असे. पाण्याचे व झाडाचे मोल भाऊंच्या पदरी सोन्याहून जास्त होते.

पश्चिम महाराष्ट्रात साखरेने निर्माण केलेली सुबत्ता ही भाऊंनी हेरली होती. त्या मुळे पालघरला खांडसरी साखर कारखाना काढायचा प्रस्ताव पुढे आला तेव्हा त्यांनी पुढाकार घेतला. भाग भांडवल उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. इतर बागाईतदारांचा फारसा प्रतिसाद नसल्याने स्वत: आठ एकर क्षेत्रावर उस लागवड केली. पण दोन तीन वर्षांतच राजकारण्यांनी कारखाना दिवाळखोरीत काढला. भाऊंचे भाग भांडवल तर बुडलेच पण शेतातील उभ्या उसाचे काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला. भाऊंना साखरेच्या भानगडीत न पडण्याचा सल्ला देणारे त्यांची मजा बघत होते. सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला असता. पण भाऊंनी गुऱ्हाळ चालू केले आणि ऊसापासून गुळ तयार केला.

त्या वेळी गुळ फार स्वस्त होता व आर्द्र हवामानात तो चिघळत असे. भाऊंनी तरीही जिद्द सोडली नाही. त्यांनी उसाचे वाण बदलले व त्यातून यशस्वी असा ‘रसवंती’ चा व्यवसाय उभा केला व बऱ्यापैकी अर्थार्जन केले. हे भाऊंच्या जिद्दी स्वभावाचे व ऊद्यमशीलतेच् आणिक एक उदाहरण ठरावे.