कै. वासुदेव काशिनाथ सावे, ती.भाऊ भाग ३

पावसाळी भातशेती मोठ्या प्रमाणावर असे. इतर वेळी भाऊ सर्व भाज्यांची लागवड करीत. मिरची, तोंडली, वांगी दुधी, भोपळा, शिराळे, काकडी अशा अनेक भाज्या त्या वेळी सर्व जण करीतच, तथापि, भाऊ मात्र त्या भागात न होणारी पिके प्रयोग म्हणून करून पाहात. कलिंगडे, हरभरे, हळद गहू मका अशी लागवड करून पाहात. प्रसंगी फळ झाड कलमांची विक्रीही करीत. आंब्याचा विक्रीही सीझनमध्ये व्यवस्थित होई. भोकराची लागवड हादेखील भाऊंचा एक हुकमी एक्का होता. या झाडांची रोपे सफाळे या भागातून आणून त्यांनी त्याचे ही मोठे पीक घेतले. भोकराचे अशाप्रकारे भरपूर उत्पादन घेऊन हे एक जोड पीक म्हणून घेणारे भाऊ आमच्या ठाणे जिल्ह्यातील अपवादात्मक शेतकरी होते. सतत काहीतरी वेगळे करत राहणे हा त्यांचा छंद होता आणि बदलती सामाजिक परिस्थिती आणि सतत बदलणारा निसर्ग यांचा परिणाम आपल्या उत्पन्नावर पडू नये याकरिता शेतकऱ्याने आपल्या या नियोजनात बदल करीत राहिले पाहिजे असे असे त्यांचे धोरण असे आणि त्याकरिताच असे विविध प्रयोग चालू असत आणि त्यामुळे प्रसंगी थोडे आर्थिक नुकसान झाले तरी त्यांनी आपली प्रयोगशीलता कधीच थांबविली नाही. शेतीला जोड धंदे करायलाच पाहिजे, तरच शेतकऱ्याला भविष्यकाळ आहे हे त्यांचे ठाम मत होते व त्याप्रमाणे त्यांनी आयुष्यभर आपला व्यवसाय केला त्यांच्या अखेरच्या दिवसात त्यांना मशरूम या भाजीची लागवड करायची होती त्याप्रमाणे सर्व साहित्य व इतर जमवाजमव त्यांनी करून ठेवली होती मात्र देवाजीच्या मनात काही दुसरेच होते आणि आणि हे सर्व नियोजन करून इस्पितळात दाखल झालेले भाऊ पुन्हा तारापूरला येऊ शकले नाहीत.

आकाशवाणीचे त्यावेळचे प्रबंधक कै. कवीवर्य मंगेश पाडगावकर व कविवर्य कै. वा रा कांत हे तारापूर गावातील काही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी, रेकॉर्डींग करण्यासाठी गावात आले होते. हे सारे भाऊंच्या घरी होते. त्यांनी प्रत्यक्ष भाऊंचे काम त्यांची मेहनत शेतीमधील कसब आणि आणि नवीन नवीन प्रयोग करण्याची वृत्ती हे पाहून ते भारावून गेले व एक छानशी मुलाखत रेकॉर्ड करून ती, आकाशवाणीवर प्रस्तुत केली त्यामुळे भाऊंच्या कर्तृत्वाची ओळख महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना झाली आणि महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी त्यानंतर भाऊ बरोबर संधान बांधून यांचे अभिनंदन केले व मार्गदर्शन ही घेतले. कविवर्य पाडगावकर इतके भारावून गेले की मुंबईत गेल्यावर त्यांनी आपल्या सौभाग्यवतीनाही ही हकीकत सांगितली होती. त्यांनी भाऊंना मुंबईच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. रविकांत बंधु जेव्हा भाऊंना यांचे घरी घेऊन गेला त्यावेळी भाऊंचा घरात प्रवेश होताच कविवर्य यांनी आपल्या पत्नीस सांगितले” हेच ते वासुदेव सावे”, मला वाटते हे वाक्य भाऊंच्या बद्दल कविवर्यांच्या भावना योग्य रीतीने व्यक्त करतात.
आमच्या सोमवंशी क्षत्रिय संघाचे एक वार्षिक महाअधिवेशन 1965 सालच्या सुमारास तारापूर शाखेमध्ये झाले होते त्यावेळी त्यावेळचे प्रसिद्ध दैनिक नवशक्ती चे संपादक कै. पा. वा. गाडगीळ, मुख्य पाहुणे म्हणून तारापूरला आले होते. आमच्या समाजाचे त्यावेळेचे धुरीण त्याना स्वतः भाऊसाहेब वर्तक खास भाऊंची शेती दाखवण्यासाठी त्यांना शेतीवर आणले. गाडगीळ साहेब खूपच प्रभावित झाले आणि आपल्या नवशक्ति मध्ये त्यांनी अधिवेशनाची, बातमी तर दिलीच पण भाऊ आणि त्यांची शेती यावर एक छोटेखानी लेख सुद्धा प्रसिद्ध केला. भाऊंना समाजातून व समाजा बाहेरुन देखील प्रसिद्धी मिळाली व कौतुक केले गेले. दुर्दैवाने आज त्या मुलाखतीची टेप अथवा या बातमीचे कात्रण उपलब्ध नाही. आकाशवाणीच्या त्या मुलाखतीत सांगितलेली एक हकीकत भाऊ पुढे नेहमी सांगत व दोन्ही कविवर्यानी याचै खूप कौतुक केले होते. शेती आणि लागणारी खते याबाबत बोलताना भाऊ म्हणाले होते की “तुमच्या बागेला सेंद्रिय व असेंद्रिय खत देऊ शकत असाल ते द्या मात्र जमिनीला सुफला करण्यासाठी मिळणार खरं खत हे या शेतकऱ्याच्या पायातूनच पडत असते” शेती आणि शेतकऱ्याचा, शेतीशी ऋणानुबंध सांगताना किती महत्त्वाचे विचार आहेत. जो शेतकरी आपली जमिनीची मशागत केवळ गडीमाणसं मार्फत न करून घेता स्वतःचा घाम गाळतो त्याची शेती उत्तम होणारच हे तत्त्व भाऊनी किती सुंदरपणे सांगितले. यशाची ही गुरुकिल्ली भाऊंनी स्वतः सदैव वापरली म्हणूनच ते एक उत्कृष्ट यशस्वी शेतकरी होऊ शकले.
भाऊंचा मला भावलेला एक दुर्लभ गुण म्हणजे कोणाच्याही एखाद्या लहानश्या यशाचे तोंड भरून कौतुक करणे आणि परिचयातील गावांतील मित्रमंडळीत त्याविषयी मनापासून प्रसार करणे. मग ही व्यक्ती आपल्याशी संबंधित नसेल तरीसुद्धा भाऊ त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना भेटून कौतुक करीत असत. ही व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील असेल यांच्या नात्यातील असेल तर त्यांच्या कौतुकाला पारावार रहात नसे. परीक्षेतील चांगले गुण, एखाद बक्षिस, कोणाची परदेशवारी, शेतीमधील कोणी केलेला एखादा नवीन प्रयोग, कोणाला मिळालेली छान नोकरी, अशा कोणत्याही गोष्टीबद्दल भाऊंना खूप कौतुक असे. याबाबतीत त्यांच्या प्रत्येक नातवंडाचे तोंड भरून केलेले कौतुक मी स्वतः ऐकले आहे.

श्रीदत्त पाचव्या इयत्तेत असताना त्याला मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन तर्फे झालेल्या स्पर्धा परीक्षेत “बालवैज्ञानिक” असा पुरस्कार मिळाला. ते या परीक्षेचे पहिलेच वर्ष होते त्यामुळे या पुरस्काराचा खूप गवगवा आणि कौतुक झाले शाळेने समाजानेही श्रीदत्तचे खूप कौतुक केले. त्यानंतर तो तारापूरला आला असताना भाऊंनी त्याला आपल्या टांग्यात बसवले आणि तारापूर गावांतील आपल्या इष्ट मित्र नातेवाईक आणि संबंधितांच्या घरी फिरविले. प्रत्येक घरी श्रीदत्त कडे बोट दाखवून म्हणत होते हाच तो “बालवैज्ञानिक”. कारण त्याआधी या पुरस्काराबद्दल भाऊंनी त्यांना खूप सांगून झाले होते वास्तविक ही परीक्षा कशासाठी घेतली कशी घेतली वगैरे काही माहिती या लोकांना नव्हती पण कौतुक करण्याची पद्धती कशी होती याची कल्पना यावी.

पुढे व्यवसायासाठी श्रीदत्त अमेरिकेला गेला. जया देखील कालांतराने अमेरिकेत गेली. मात्र त्यांच्या नातवंडातून पहिल्यांदा अमेरिकेला गेलेला म्हणजे श्रीदत्त. अमेरिका देशाचे तर भाऊंना विशेष कौतुक त्यांच्या मित्रांची व इतर नातेवाईकांची मुले जेव्हा अमेरिकेत गेली होती तेव्हासुद्धा भाऊंना त्याचे कोण कौतुक आणि किती आनंद, त्यामूळे, आपला मोठा नातू अमेरिकेला जातो म्हटल्यानंतर भाऊंना तर केवळ स्वर्ग दोन बोटे उरला होता. त्यांना अतीव आनंद झाला होता आणि त्यावेळी देखील त्यांनी आपल्याला झालेला आनंद लपवून ठेवला नाही. मला आजही एका गोष्टीचे खूप दुःख होते. अमेरिके बद्दल भाऊंना एवढी नवलाई पण त्या भाऊंची तीन नातवंडे आज अमेरिकेत सुस्थितीत आहेत पण भाऊंना त्यांच्या आयुष्यात या मुलांकडे एक तरी फेरी मारता आली असती तर त्यांना केवढे समाधान मिळाले असते. भाऊ त्यांच्या अमेरिकेतील नातवंडांच्या प्रशस्त घराच्या अंगणातील बागेत आरामखुर्चीत विसावले आहेत आणि निवांतपणे त्या देशात आल्याचे समाधान चेहऱ्यावर पसरले आहे असे चित्र माझ्या डोळ्यासमोर नेहमी येत असते परंतु ही केवळ कल्पनाच राहिली. हा योग आला नाही. अमेरिका कौतुकास्पद होती पण आपल्या सर्व नातवंडांचे लहान मोठे यश जे भाऊंना त्यांच्या हयातीत पहावयास मिळाले त्याचे त्यांनी मनापासून खूप कौतुक केले आहे. गौरी, चारू, विभा, सई, प्रसाद, श्रीदत्त, दीप्ती, जया, कार्तिकी, आरती, आदित्य, सिद्धार्थ, श्रद्धा, गौरव यांनी काही करून दाखवले त्या प्रत्येक गोष्टीचे भाऊंनी अगदी मनःपूत गुणगान केले आहे. त्यांचा तो गुणधर्मच होता. गौरव तर नोकरी सांभाळून शेतीमधेही लक्ष घालून, ऊत्तम शेतीही करतोय, हे पाहायला भाऊ हवे होते.

संतांचे लक्षण सांगताना एक सुभाषित. “पर गुण परमाणून, पर्वतीकृत्य नित्यम, नीज हृदी विकसंती, संती संतः कियन्तः?”… अर्थात दुसऱ्याचे लहान-सहान गुणही पर्वताएवढे मोठे करून सर्वांना त्याचे कौतुक सांगणारा माणूस हा संत आहे. म्हणून मला वाटते भाऊ मनाने संत प्रवृत्तीचे होते.

दीप्तीला एमबीए पदवी घेतल्यानंतर मुंबईत स्टाॅकएक्सचेंज मध्ये नोकरी लागली. अर्थातच एका भेटीत भाऊंना सांगितले. शेअर बाजार म्हणजे काय तिकडे व्यवहार कसे चालतात आपली नात नक्की कोणते काम करते याचे खरे तर भाऊंना गम्य होतेच. पण पूर्वी दूरचित्रवाणी वर बातम्याआधी काही क्षणचित्रे दाखवत. भाऊनी एके दिवशी रात्री बातम्या सुरु होण्यापूर्वी आधी आईला बोलवून घेतले. त्यातील BSE च्या बिल्डींगचे चित्र दाखवून इथे दीप्ती काम करते हे सांगितले. ही गोष्ट आमच्या लक्षात आली नव्हती. पण त्यांनी कोठून माहिती घेऊन, आईला सारे समजावून दिलं. चौकसपणा आणि बालसुलभ वृत्ती हे भाऊंच्या स्वभावाच्या वैशिष्ट होते आणि त्यातच त्यांच्या मनाचा मोठेपणा ही दडलेला होता. ही निरागसता व पारदर्शकता भाऊंच्या बोलण्यात होती आणि म्हणून त्यांचे बोलणे नेहमी सुस्पष्ट सडेतोड व रोखठोक असे. कधी त्यामुळे त्यांच्याविषयी लोकांनी गैरसमज देखील करून घेतले मात्र कालांतराने आपला झालेला गैरसमज त्या लोकांना कळल्यावर पुन्हा त्यांनी भाऊंची माफी मागून दोस्ती ही केलेली आहे अशी अनेक उदाहरणे आहेत. मी स्वतः अशी अनेक घटनांचा साक्षीदार आहे त्यापैकी एक अत्यंत मासलेदार व आमच्या जीवनात कलाटणी देणारे उदाहरण थोडक्यात सांगतो.

आता मुंबईत आमचे स्वतःचे घर भाऊंच्या मदतीने झाले होते मात्र बोर्डीलाही घराचा प्रश्न सोडवायचा होता कारण आता आमचे कुटुंब विस्तारत होते आणि आणि बोर्डीच्या घराची जागा अत्यंत अपुरी होती व तेथे मोठे घर बांधणे ही शक्य नव्हते आम्हा भावंडांचा आप्पांच्या सल्याने जागेचे संशोधन सुरू होते मात्र तत्कालीन जागांचे भाव आणि आमचे बजेट याचा मेळ जमत नव्हता भाऊंच्या कानावर ही बातमी गेली होती आणि आमच्या अपरोक्ष त्यांनीही बोर्डी व आसपास जागा चौकशी चालू केली होती शेवटी आम्ही अधिकृतपणे भाऊंच्या कानावर ही गोष्ट घातली आणि आम्ही तोपर्यंत केलेल्या संशोधन मोहिमेची कथा त्यांना सांगितली. मागे सांगितल्याप्रमाणे एकदा का भाऊंनी एखादे काम काम मनावर घेतले मग शेंडी तुटेल अथवा पारंबी तुटेल पण काम यशस्वी होणार याची खात्री असे. भाऊ तारापूर, बोर्डी, बोरीगाव पासून घोलवड पर्यंत मला घेऊन हरीच्या टांग्यात बसवून अनेक ठिकाणी आमचे फिरणे सुरू झाले. एके दिवशी गावात फिरून त्यांच्या मित्रांनी सांगितलेल्या काही जागा बघून आम्हाला दुपारचे बारा साडेबारा वाजले होते. जेवणाची वेळ झाली होती आणि आम्ही घोलवडच्या मराठे आळीतून खेड पाड्यात वाडीत भोजनासाठी निघालो होतो. रस्त्यात कर्मधर्मसंयोगाने भाल्याभाऊ कै. भालचंद्र चुरी भेटले. त्यांचे घर जवळच होते व त्यांनी पाच मिनिटांसाठी तरी घरी वळून जा अशी आम्हाला विनंती केली. त्यांचे आग्रहाखातर आम्ही त्यांच्या घोलवड पोस्ट ऑफिस जवळील घरी चहा पाण्यासाठी आलो. त्यांना आमच्या भ्रमंतीचे कारण सांगितले व तुमच्या पाहण्यात अशी एखादी जागा असेल तर आम्हाला सुचवा अशी विनंती केली. त्यांच्या सौभाग्यवती चंपू ताई चहा करता करता आमचे संभाषण ऐकत होत्या चंपू ताई चहाचे कप घेऊन बाहेर आल्या आणि भाऊंना म्हणाल्या “भाऊ, आमच्या घरासमोरील ही जागा बघाना अनेक वर्षे पडीक आहे व मालक ही थोडा लहरी व श्रीमंत असल्याने त्याला जागा विकण्याची घाई वाटत नाही. अनेक लोक जागा पाहून गेले मात्र अजून सौदा होत नाही. तुम्ही प्रयत्न केल्यास कदाचित तुम्हाला यश मिळेल”. चंपू ताईचे वाक्य संपत नाही एवढ्यातच भाऊंनी समोरचा चहा तसाच ठेवला, नंतर येऊ म्हणाले व मला घेऊन त्यांच्या घराच्या समोरील जागेची पाहणी सुरू केली. दहा पंधरा मिनिटात आम्ही त्या जागेच्या भोवती बाहेरून एक फेरी मारली. जागा वर्तुळाकृती आकाराची होती, कंपाउंड अगदीच मोडकळीस आले होते. आत गवत व कचरा वाढल्यामुळे आतील एक जुनाट पडके घर नीट दिसतही नव्हते. अस्ताव्यस्त वाढलेली काही चिकूची झाडे व काही नारळ तिथे दिसत होते आणि जागेच्या टोकाला एक आदिवासी झोपडी दिसत होती. मला तरी प्रथमदर्शनी ही जागा विशेष वाटली नाही. मात्र भाऊ परत भाल्या भाऊंच्या घरी चहासाठी येऊन बसले व चंपू ताईंना म्हणाले मला ही जागा पसंत आहे पुढे कसे जायचे ते सांगा. झाले, भाऊंचा झपाटा सुरू झाला.

भाल्या भाऊंनी त्या जागेच्या मुंबईतील मालकाच्या घोलवड मधील नातेवाईकाचा पत्ता दिला. खरेतर जेवणाची वेळ टळून गेली होती. दुसरा कोणी माणूस घरी जाऊन भोजन करू आणि मग पुढे काय ते बघू असा विचार करून जेवणासाठी घरी आला असता मात्र भाऊंनी तडक बाबा भाई नामक त्या गृहस्थाचे घोलवड मधील घर जे झेंडा चौकात होते, ते गाठले आणि चौकशी केली. बाबा देखील भाऊंना तुम्ही या भानगडीत पडू नका, बोर्डी येथील अनेक महामहीम या जागेवर डोळा ठेवून आहेत, सौदा करण्यासाठी ते मालकाकडे मुंबईत ही जाऊन आले आहेत, मात्र अपमानित होऊन अयशस्वी झाले आहेत असे सांगितले. भाऊंनी बाबा भाईंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व शेवटी त्यानी सांगितले “ठीक आहे, मी प्रयत्न करणार.” आपण उद्या सकाळी फ्लाइंग राणी गाडीने मुंबईत मालकांच्या घरी जायचे. तुम्ही देखील आमच्या बरोबर यायचे आहे सकाळी साडेसहा वाजता मी तुमचे तिकिट काढून प्लॅटफॉर्मवर वाट पहात आहे. कबूल केले, आम्ही घरी आलो, जेवण घेतले थोडीशी विश्रांती घेऊन परत दुपारी खेडी मध्येच शेजारी असलेल्या गजा भाईंच्या घरी मला घेऊन गेले आणि उद्या या आपल्याला मुंबई अमुक-अमुक करण्यासाठी जावयाचे आहे तुम्ही पण आमच्याबरोबर या अशी विनंती करून त्यांनाही मुंबईत भेटीसाठी तयार केले.

दुसरे दिवशी सकाळी बरोबर सहा वाजता मी, अण्णा, गजाभाऊ, भाऊ व व बाबा भाई असे पंचक गिरगावातील श्री कटारिया शेठ या जागेच्या मालकाला भेटण्यासाठी बोलणी करण्यासाठी प्रस्थान ठेवते झालो. आगगाडीच्या संपूर्ण प्रवासात मुंबई सेंट्रल स्टेशन येईपर्यंत बाबा हेच जास्त बोलत होते भाऊ शांतपणे ऐकत होते व मध्येच काहीतरी प्रश्न विचारीत होते आणि बाबा भाई भाऊंना परोपरीने सांगत होते, कृपा करून जरी हा सौदा झाला नाही तरी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका कारण हा सौदा तेव्हाच होईल ज्यावेळी कटारिया शेठच्या तोंडून निघालेली जागेची किंमत ठीक आहे म्हणून स्वीकारली जाईल. नाही तर इथे बोलणी दुसरी होतच नाही. तुम्ही थोडाही वाटाघाटीचा प्रश्न उपस्थित केला तर कटारीया शेठ तुमचा अपमान ही करू शकतात कारण बोर्डी च्या काही मान्यवरांनी सौदे करताना थोडेसे प्रयत्न केले आणि त्यांना चक्क गेट आऊट म्हणून त्यांनी बाहेर काढले. भाऊ सर्व शांतपणे ऐकत होते. आम्ही आणि गजाभाऊ प्रेक्षक म्हणून हा सर्व संवाद उत्सुकतेने ऐकत होतो.

गाडीमध्ये बाबा भाईंनी सांगितलेल्या या माहितीवरून कटारिया शेठ संबंधित जे काही समजले ते असे – हे गृहस्थ मुंबईमधील त्या काळातील मोठे शेअर ब्रोकर म्हणजे दलाल होते. अर्थातच अफाट संपत्तीचे मालक होते आणि त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या काही इमारती गिरगावात होत्या. अर्थातच पैशाचा गर्व आणि अहंभावीपणा स्वभावात होता. त्यांची सौभाग्यवती घोलवडची असल्यामुळे त्यांनी समुद्रकिनारी असलेली ही जागा घेऊन तेथे छोटेसे घर बांधले होते व बाजूला थोडी शेतीची लागवड करून छंद म्हणून पोल्ट्री ही सुरू केली होती. या संबंध कामावर देखरेख करण्यासाठी एक आदिवासी जोडपे कोप-यामधील एका झोपडीत राहत असे आणि कटारिया शेठ अधून मधून मुंबईहून सुट्टी घालवण्यासाठी येथे येऊन राहात. कालांतराने वयोमानाप्रमाणे त्यांना घोलवडला येणे जाणे कठीण होऊ लागले आणि त्यामुळे ते घर व पोल्ट्री पडू लागली. त्यांना विकण्याची अजिबात घाई नव्हती आणि म्हणूनच कोणी गिऱ्हाईक स्वतःहून आल्यास त्यांना वाटेल ती किंमत सांगून अपमान करून परत पाठवीत असत. एक प्रकारे त्यांच्या अहंमन्य स्वभावाला धरून तो छंद झाला होता.

मला आठवते, त्यांच्या गिरगाव मधील कुंकू लेनमध्ये असलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील आलिशान निवासस्थानाबाहेर आम्ही येऊन थांबलो. बाबा भाईंनी बेल वाजवून प्रवेश केला आणि आम्ही आल्याची वर्दी दिली. आम्हीही त्यांच्या प्रशस्त हॉलमध्ये प्रवेश घेतला तेव्हा शेटजी झोपाळ्यावर बसून झोके घेत होते. या, बसा वगैरे काहीच न बोलता सरळ गुजराती भाषेत तुम्ही कशासाठी आला आहात हे मला माहीत आहे माझ्या जागेची किंमत पंचवीस हजार रुपये आहे पसंत असेल तर थांबा नाही तर समोरचा दरवाजा उघडा आहे. हे ऐकून आम्ही तर निघालो. भाऊ मात्र शांत होते, ”बाबा भाईंनी आम्हाला सर्व माहिती दिली आहे आणि दुरून एवढे कष्ट घेत आम्ही तुमच्या घरी आलो आहोत ते जागेचा सौदा करण्यासाठी, मात्र अतिथीचे आपल्या घरी असे स्वागत होईल अशी कल्पना नव्हती.” भाऊंनी वरील वाक्य उच्चारले मात्र, आम्ही घाबरलो पण झोपाळ्यावर मग्रूर पुणे झोके घेत असलेल्या शेठजींच्या चेहऱ्यावर थोडे वेगळे भाव उमटलेले दिसले. शेटजी थोडे थोडे बॅकफुटवर जात म्हणाले मग तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? हा क्षण भाऊंनी झटकन पकडला व म्हणाले “आपल्या भारतीय संस्कृती मध्ये अतिथी देवो भव म्हटले जाते. आम्हाला देवासमान नको निदान माणसा समान आपण वागवाल अशी अपेक्षा होती.” आता शेटजींचा पूर्ण त्रिफळा उडाला होता शेटजी झोपाळा वरून उठले व चक्क भाऊंच्या हाताला धरून त्यांनी समोरील खुर्ची पुढे केली. आम्हालाही आसन देण्यात आले आणि मग पुढचा कार्यक्रम व्यवस्थित विनाविवाद ठरला हे सांगणे नलगे. त्यांच्या किमती तून दोन हजार रुपये स्वतःहून कमी केले. आम्हाला चहा पाजला व पुढील सोपस्कार यासाठी आम्हाला पूर्ण सहकार्य दिले. ते स्वतः डहाणू येथील रजिस्ट्रार कचेरीमध्ये त्या दिवशी आले आणि आम्हाला शुभेच्छा देऊन मुंबईला गेले. त्यादिवशी ज्या धीरोदात्तपणे व आपल्या रोखठोक स्वभावानुसार मात्र शांत डोके ठेवून भाऊंनी परिस्थितीला तोंड दिले त्यामुळेच त्या दिवशी आम्हाला मनाजोगता व्यवहार झाले आणि आमच्या आजच्या घोलवड येथील या जागेचे मालक आम्ही होऊ शकलो,

Art by Ravi Save

हे आम्ही विसरू शकत नाही. सर्व सरकारी सोपस्कार पूर्ण झाल्यावर आम्ही या जागेचा ताबा घेतला. मात्र अनेक दिवस दुर्लक्षित राहिल्याने जागेला कळा आली होती. अगदी पडीत घराच्या लाकडी खिडक्या तावदाने, कौले तुटली होती. वाडी तर सोडूनही दिली होती. कंपाऊंड पक्के नसल्यामुळे गुरा ढोरांचा स्वैर संचार चालू होता. शेजारील काही उडाणटप्पू मुले मुक्तपणे येथे येऊन जुगार ही खेळत असत. त्यामुळे प्रथम संपूर्ण कंपाऊंड, साफसफाई करून घेतली आणि आम्हाला लवकरात लवकर येथे वास्तव्यास येता येईल अशा रीतीने त्या पडक्या घराला थोडी डागडुजी करून ते राहण्यायोग्य केले. 1974 साली आम्ही या नवीन जागेत राहावयास आलो. यावेळी ज्यांनी हा परिसर पूर्वी पाहिला होता त्यांना तर हे नवे रूप पाहून विश्वासच बसला नाही अगदी भाल्या भाऊंनी सुद्धा भाऊंच्या या किमयागारीचा कौतुकाने उल्लेख केला आणि आम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य शेजारी म्हणून देण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे आप्पांना या नवीन परिसरामध्ये खूपच बरे वाटले. हवेशीर आणि स्वच्छ शुद्ध हवा मिळाल्याने त्यांचा दम्याचाआजार पळाला. त्यांच्या बांधकामाच्या छंदासाठी ही त्यांना मुबलक जागा मिळाली. आप्पांनी त्यांच्या अखेरच्या आयुष्यात आम्हाला अनेक प्रकारची शेतीची लागवड येथे करून दाखवली व त्यांचे अखेरचे दिवस या वास्तूत खूपच आनंदात, समाधानात गेले. आता पुन्हा सन 2017 साली आम्ही या वास्तूचे संपूर्ण नूतनीकरण करून विस्तार केला आहे व सर्व कुटुंबीय या वास्तूचा उपभोग आनंदाने घेत असतो. मात्र येथील परिसरात आम्हाला भाऊंच्या येथील पदस्पर्शाची जाणीव सतत असते.