स्वातंत्र्य सैनिक, यशवंत बारक्या पाटील

        विस्मृतीत गेलेले स्वातंत्र्य सैनिक कै यशवंत पाटील उर्फ अण्णा

         “ओठी कधीतरीचे स्वातंत्र्यगान आहे,

          माझ्याच मायदेशी,मी बंदिवान आहे.

          मागू नकोस माझा, संदर्भ मागचा तू?

          केव्हाच फाटलेले मी एक पान आहे..”

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या एका महान क्रांतिकारकाची ही भावना आहे खंत आहे.

बुद्धीला व मनाला पटलेल्या एका स्वातंत्र्याच्या कल्पनेपायी हे वीर वेडे झाले होते. ते झपाटले गेले होते. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास अशा मोजक्या लोकांची आत्मकथा आहे. त्यांना काही ध्यास होता. मोह नव्हता. पाश नव्हता. माझा देश व माझा समाज यांचे उत्थान व्हावे, धर्म जागा व्हावा, गिरीकंदरातून, मठा मठांतून तो बाहेर पडून माणसासाठी कामी यावा. माझा भारतीय बांधव, माणूस म्हणून जगात सन्मानाने राहावा हीच त्यांची प्रांजळ भावना होती . लढण्यात, झगडण्यात, परिस्थितीशी दोन हात करण्यात त्यांनी पुरुषार्थ मानला व तो  सिद्ध केला.

    मात्र स्वातंत्र्य मिळाले आणि ज्या भारतीय बांधवांसाठी त्यांनी आपले जीवन सर्वस्व पणाला लावला त्या समाजालाच या  उपकारकर्त्यांचा विसर पडला. “माझ्याच मायदेशी मी बंदिवान आहे ..”.माझेच  बांधव मला विसरले ,तर जग कशाला माझी पर्वा करील?.. अशी प्रांजळ, रास्त खंत हा स्वातंत्र्यवीर व्यक्त करीत आहे…

   महान स्वातंत्र्य सैनिकांची, स्वातंत्र्योत्तर भारतात ही स्थिती, तर सामान्य सैनिकांना कोण विचारणार? स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांबाबत, “नाही चिरा, नाही पणती.. ही स्थिती तर त्यांच्या अनुयायांबाबत किती दारूण परिस्थिती असेल? त्यांच्यासाठी दोन शब्द तरी बोलावयास व लिहावयास कोणाला फुरसत आहे?

      ही एवढी प्रस्तावना करावयाचे कारण आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजातील, माकुणसार गावचे एक स्वातंत्र्य सैनिक कै. यशवंत बारक्या पाटील उर्फ अण्णा यांची या महिन्यात येणारी शंभरावी जयंती! भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वातंत्र्यसैनिक अण्णांचे जन्मशताब्दी वर्ष, या ‘मणीकांचन’ योगावर, आज विस्मृतीत गेलेल्या यशवंत अण्णांच्या महान कार्याला व पवित्र स्मृतीला वंदन करण्यासाठी हा लेखन प्रपंच!

     अण्णांचा जन्म, दिनांक 20 ऑगस्ट 1922 रोजी एका सामान्य, एकत्रित शेतकरी कुटुंबात झाला. माकूणसार हे पालघर तालुक्यातील एक आडवळणी खेडेगाव, हे त्यांचे जन्मग्राम. अण्णा हे कुटुंबात सर्व भावंडात लहान होते. मात्र पहिल्यापासून ते स्वतंत्र विचारांचे होते .त्यांचे विचार पुरोगामी होते .समाजातील जातीयता,असमानता,अंधश्रद्धा याबाबत त्यांना प्रथमपासूनच तिरस्कार होता. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा तो कालखंड होता.  शहराप्रमाणेच खेड्यातील वातावरण देखील गांधीजींच्या आदेशानुसार देशप्रेमाने भारावलेले होते. विशेषतः तरुण मंडळी देखील आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचे बलिदान करण्यास तयार होती. अशा चळवळींच्या कालखंडात, पुरोगामी विचारांचे अण्णा कसे स्वस्थ बसतील?  ते सुद्धा तरुणपणी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ओढले गेले.

   त्यांचे शालेय शिक्षण फायनल,म्हणजे आत्ताची सातवी इयत्ता पर्यंत,त्यांच्या गावीच झाले. शाळेत अनेक मित्र होते. त्यात काही अस्पृश्य मित्रही होते. मात्र घरच्यांचा विरोध सहन करूनही अण्णांनी सर्व मित्रांशी दोस्ती केली होती. ही दोस्ती दिखाऊ नव्हती तर ती सच्ची मैत्री होती. पुढे दिलेल्या एका प्रसंगातून त्याचे प्रत्यंतर आपणास येईल.

    अतिशय बुद्धिमान असल्याने त्यांना पुढील शिक्षणाची ओढ होती. मात्र गावी तशी सोय नसल्याने त्यांना दादर ,मुंबई येथे  पाठविण्यात आले. तेथे या कुटुंबाचे एक कौलारू छोटेसे घर होते. अण्णांनी आपल्या इश्वरदत्त बुद्धिमत्तेचा उपयोग शिक्षणासाठी न करता ,आपल्या कौटुंबिक, पारंपारिक, दुग्धव्यवसाय वृद्धीसाठी केला. नैसर्गिक बुद्धिमत्तेची जोड असताना, अण्णांनी मुंबईत शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करण्याऐवजी व्यवसाय वृद्धी करण्यास का प्राधान्य दिले, याचे कारण कदाचित कौटुंबिक परिस्थिती व आपल्या मनाचा कौल हेच असावे.

     दादर येथे निवासस्थान झाल्यावर अण्णा, केवळ व्यवसाया कडेच लक्ष ठेवून नव्हते. त्यांच्यातील हाडाचा समाजसेवक त्यांना काहीतरी राष्ट्रीय कार्यात भाग घेण्यासाठी सतत खुणावीत राहिला. दादर भागात त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य जोरात चालू होते. डॉक्टर हेडगेवार, पू.गोलवलकर गुरुजी यांचे विचार अण्णांनी ऐकले होते , त्यांना ते आवडले होते .अण्णांनी आर एस एस च्या समाजकार्यात भाग घेऊन मोठे योगदान दिले. त्यांचे कार्य येथील स्थानिक नेतृत्वाच्या नजरेत भरले.  त्यांनीही अण्णांना प्रोत्साहन दिले. मुंबईपासून दूर असलेल्या खेड्यातील एक मुलगा मुंबईत येऊन अशा सफाईने, तळमळीने व जिद्दीने कामे करतो हे त्यांच्या लक्षात आले. दादरमधील स्थानिक मंडळीला अण्णांच्या कार्यकर्तृत्वाचा झपाटा समजला. त्यांना अण्णांचे कौतुके वाटले. त्यांनी संघाच्या ,”उत्कृष्ट कार्यकर्ता”, पुरस्कारासाठी त्यांचे नाव नागपूर येथील मध्यवर्ती कार्यालयात  शिफारस करून पाठवले.परंतु दुर्दैवाने तेथील काही उच्चपदस्थांच्या धोरणामुळे, पुरस्कारास मात्र असूनही, त्यांना तो पुरस्कार मिळू शकला नाही. अण्णांसारख्या स्वाभिमानी व्यक्तिमत्त्वास त्यामुळे कुठेतरी धक्का बसला .जेथे आपली  कदर केवळ कामाच्या दर्जावर न होता,इतर काही निकषावर ठरते, त्या संघटनेतून आपण बाहेर पडणे हे चांगले, असा सूज्ञ विचार करून अण्णांनी आर एस एस संघटना सोडली.ते राष्ट्रीयसेवा दलात रुजू झाले. या दलांतून त्यांनी अनेक राष्ट्रीय  व सामाजिक चळवळीत भाग घेऊन, आपले योगदान दिले आहे.

     अण्णांचे कार्य त्यांच्या माकुणसार गाव व परिसरात तसेच मुंबई, दादर भागातही चालू होते.त्यांनी राष्ट्रीय चळवळीत सक्रिय सहभाग घेतल्याने गावांतील काही आपमतलबी पुढाऱ्यांचा विरोध त्यांना पत्करावा लागला. प्रभात फेऱ्या, लोकांत स्वातंत्र्याच्या जागृतीसाठी पत्रके वाटणे, समाजामध्ये स्वातंत्र्य चळवळीविषयी जागृती निर्माण करणे,ही कामे ते करीत राहिले. 1942 मधील चले जाव चळवळीतही त्यांनी सक्रिय भाग घेतला. त्यावेळी दादर येथे झालेल्या गोळीबारात त्यांच्या डाव्या पायाला गोळी लागून ते जायबंदी झाले. मात्र त्याही परिस्थितीत इंग्रज पोलिसांच्या तावडीत सापडू नये व आपल्या सहकाऱ्यांची नावे सांगण्याची पाळी येऊ नये,म्हणून अण्णांनी आपल्या मित्रांच्या मदतीने मोठ्या धीराने, जखमी पायावर उपचार करून घेण्यासाठी, दादर मधील डॉ. जोशी कडून वैद्यकीय उपचार करून घेतले. पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

   पुढे 1947 साली भारत स्वतंत्र झाला. मात्र अण्णांचे कार्य चालूच राहिले. आता राजकीय चळवळी ऐवजी अण्णांनी समाज कार्यात लक्ष घातले. त्याचा एक भाग म्हणून 1950 साली त्यांनी गावात,’विकास मंडळ”, स्थापन करून, सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.गावात एकी राहावी, सांस्कृतिक व शैक्षणिक जागृती करून भावी पिढीला देशाचे जागरूक नागरिक म्हणून बाळकडू मिळावे हे त्यांचे धोरण होते. पालघर तालुक्यातील पहिली प्रभात फेरी अण्णांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी निघाली.  गावातील व परिसरातील तरुणांनी त्यांना चांगली साथ दिली. हे सर्व कार्य अण्णा स्वतःच्या व मित्रांच्या आर्थिक सहकार्याने करीत होते. वैयक्तिक दृष्ट्या कोणताही फायदा घेण्याचा प्रश्नच नव्हता..

  अण्णांचे हे निस्पृह समाजकार्य निश्चितपणे तत्कालीन समाज बांधवांच्या लक्षात आले. लोकांच्या आग्रहास्तव,1970 साली  ते गावचे सरपंच म्हणून निवडून आले . सात वर्षे उत्तम काम करून त्यांनी त्या पदाची शान वाढविली. त्यावेळी त्यांनी अनेक लोकोपयोगी, सरकारी योजना आपल्या गावात राबविल्या. त्यात पाणी योजना, स्वच्छता योजना, सार्वजनिक विहिरी बांधकाम, पाझर तलाव, अशी अनेक कामे, गावाच्या दूरगामी विकासाच्या दृष्टीने आखली व पार पाडली.

     ही कामे करीत असताना, सरपंच म्हणून प्रथमतः गावातील गरीब, होतकरू, दुर्लक्षित अशा हरिजन व मागासवर्गीय समाज घटकांना कसा लाभ मिळेल हा दृष्टिकोन ठेवला.येथेही समाजातील काही उच्चवर्गीय मतलबी लोकांनी अण्णांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु अण्णा आपल्या निर्णयावर ठाम  व कार्यावर निष्ठा ठेवून असल्याने,हितशत्रू लोकांचे डाव कधीच यशस्वी झाले नाहीत. सर्वसामान्य लोकांनी  अण्णांना नेहमीच पाठिंबा दिला.

     अण्णांचे हे आदर्श समाजकार्य  मुंबईतील एस आय ई एस कॉलेजचे तत्कालीन प्रिन्सिपल डॉक्टर राम जोशी यांच्या नजरेंत आले. डॉ. राम जोशी हे देखील एक उदारमतवादी व पुरोगामी विचार असलेले समाज सेवक व शिक्षण तज्ञ होते.त्यांच्या सहकार्याने, एस आय ई एस कॉलेज व मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या शिबिर आयोजनांतून,खूप मदत मिळाली. अनेक समाजोपयोगी कामे माकूणसार गावात व आजूबाजूच्या छोट्या खेड्यात करण्यात आली. अण्णांची दूरदृष्टी व सर्व समावेशक वृत्ती यामुळेच हे शक्य झाले.

     हे सर्व कार्य करीत असताना अण्णांना सरकारी तिजोरीतून काही मिळविण्याचा मोह कधीच झाला नाही. सर्व आर्थिक भार  आपले वैयक्तिक प्रयत्न ,खाजगी संस्थां व व्यक्तींच्या देणग्यांतून निभावला. अर्थातच अशी कामे ,उपक्रम राबवताना आपला वैयक्तिक लाभ करून घेण्याच्या मोह त्यांच्या मनाला शिवणे शक्यच नव्हते.

     गावात दळणवळणाची सोय व्हावी व त्यायोगे गावच्या सर्वांगीण विकासास मदत व्हावी या दूरदृष्टीने अण्णांनी ‘पोंडा रस्त्या’,ची योजना तयार करून ती पूर्णत्वास नेली.पाझर तलावासारखे पाणीपुरवठ्याचे प्रकल्प त्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविले व या कामी देखील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या श्रमदान शिबिरांचे खूप सहकार्य झाले.

    “शुद्ध विचार व त्याला अनुसरून घडणारा आचार हाच व्यक्ती आणि समाज यांच्या उन्नतीचा मार्ग असला पाहिजे.आत्मकल्याण व समाजकल्याण या गोष्टी परस्पर विरोधी नाहीत. काही तत्वे, मूल्ये, नीतिमत्ता यांचे अधिष्ठान लाभल्याशिवाय चांगली कामे  होत नसतात. विवेकाच्या, प्रयत्नांच्या, तत्त्वांच्या वाटेने चालणारा समाज आणि अशा समाजाच्या उत्कर्षात सहभागी होणाऱ्या व्यक्ती यांनी परस्परांचे योगदान जाणायला पाहिजे. व्यक्तीला घराचा व घराला समाजाचा आधार मिळतो .व्यक्तीमुळे घरे,घरामुळे गावे व गावामुळे समाज अस्तित्वात येतो”.., ही अल्पशिक्षित अण्णांची भूमिका होती. व त्याप्रमाणे ते सदैव वागले व आपले कार्य करीत राहिले.

 ” सामर्थ्य आहे चळवळीचे ,

 जो जो करील तयाचे ।

  परंतु तेथे भगवंताचे ,अधिष्ठान पाहिजे।”

    समर्थांनी पण हीच शिकवण सर्व राज्यकर्त्यांना व कार्यकर्त्यांनाही दिली होती.

    निर्मळ मनाने, सद्बुद्धीचा कौल घेऊन, समाजासाठी काही चांगले काम करू इच्छिणाऱ्या लोकांचे भलेपण हे जगाच्या लेखी अडचणीचे ठरते.हा नियमच आहे. अनेक संत, महात्मे समाजसेवकांना आयुष्यात त्यामुळे मनस्ताप झालेला आहे.  चांगल्या लोकांची मानहानीही झाली आहे.यशवंत अण्णा देखील या जगनियमाला अपवाद कसे ठरतील?

     अण्णांच्या अशा उत्तम ,निरलस ,निस्वार्थी ,समाजकार्यामुळे काही समाजकंटकांच्या स्वार्थाची पूर्ती होऊ शकली नाही. त्यामुळे ते त्यांचेवर सतत नाराज असत. त्यांना कोणत्यातरी घोटाळ्यात अडकवायचा प्रयत्न करीत. मात्र अण्णांचे व्यवहार एवढे चोख व पारदर्शक होते ,अशी संधी आपल्या विरोधकांना त्यांनी कधीच मिळू दिली नाही. आपण अण्णांचे काहीच वाईट करू शकत नाही, हे कळल्यावर, या हितशत्रूंनी,गुरांच्या गोठ्यातील चाऱ्याला आग लावून लाखो रुपयांचे नुकसान केले. त्याही परिस्थितीत अण्णांनी नुकसान भरपाई म्हणून सरकारची कोणतीच मदत मागितली नाही. असे धीरोदात्त वर्तन अण्णांसारखी स्थितप्रज्ञ माणसेच करू शकतात!!.

      मी मागे लिहिल्याप्रमाणे अण्णांनी स्पृश्य अस्पृश्यता कधीच मानली नाही बालपणीच त्यांचे कित्येक शालेय मित्र अस्पृश्य होते व समाजाचा घरच्यांचा विरोध पत्करूनदेखील त्यांनी आपल्या अशा मित्रांची मैत्री ठेवली होती .घरोबा होता.शंभर वर्षापूर्वी ही गोष्ट करून दाखविणे हे सोपे कामं नव्हते. पण मानवतावादी, पुरोगामी दृष्टिकोन प्रथमपासून अवलंबिणारे अण्णा, याबाबतीत आपल्या मतावर ठाम होते. या संबंधीत एक आठवण त्यांचे सुपुत्र व माझे मित्र श्री. दिलीप पाटील यांनी सांगितली. दिलीप हे उत्कृष्ट खानपान सेवा देणारे ,एक मोठे कॅटरर म्हणून नावाजलेले आहेत. त्यांचे शब्दात …

        ” आमच्या गावी, कुटुंबातील  लग्न समारंभात रीती रिवाजाप्रमाणे सर्व गावकऱ्यांना आमंत्रण केले होते  त्याप्रमाणे काही अस्पृश्य मंडळी देखील विवाहासमारंभास आली.त्या वेळेच्या प्रथेनुसार अशा मंडळीसाठी चहा पाण्याची वेगळी व्यवस्था असे. मात्र ही मंडळी अण्णांशी परिचित व त्यांचे बालमित्रही असल्यामुळे, अण्णांनी त्यांना सर्वसामान्य सर्वांसाठी असलेल्या व्यवस्थेमध्येच सामावून घेतले. त्यांना भोजन दिले. ही गोष्ट काही उच्चभ्रुना आवडली नाही. अण्णांसमोर काहीही  न बोलता त्यांनी परस्पर  पोलिसात तक्रार नोंदवून, उलटा अपप्रचार केला की, “अण्णांनी अस्पृश्य मंडळींना लग्न समारंभातून बाहेर घालविले”. पोलीस प्रत्यक्ष चौकशीस आले .अण्णांनी विवाहास उपस्थित सर्व अस्पृश्य मंडळींना प्रत्यक्ष पोलिसांसमोर म्हणून उभे केले व त्यांनाच जाब विचारण्यास सांगितले . हरिजन बांधवांनी सत्य कथन केले, अण्णाना साथ दिली. विरोधकांचे पितळ उघडे पडले. त्यांचा कुटील डाव उधळला गेला. मात्र या सर्व प्रकारात अण्णांना खूपच मनस्ताप झाला हे खरे.

    त्या काळी, अंधश्रद्धा ,व जातीपाती जपणाऱ्या समाजात असे धारिष्ट दाखविणे खूप मोठी गोष्ट होती.अण्णानी काहीही किंमत द्यावी लागली तरी आपल्या तत्त्वाशी कधीही फारकत घेतली नाही. माझ्या आयुष्यात ,मी अण्णांची ही शिकवण तंतोतंत पाळली आहे “

  दिलीपभाईंची ही हृदयस्पर्शी आठवण ,अण्णांच्या चारित्र्यावर खूप प्रकाश टाकते.

    अण्णांना एकूण पाच अपत्त्ये. पाचही सुपुत्रांनी, अण्णांच्या सुविचारांचा व सुसंस्कारांचा वारसा पुढे चालवून  पित्याचे नाव उज्वल केले आहे.  श्री विकास पाटील हे एम एस सी पॅथॉलॉजी  असून,ते प्रसिद्ध वाडिया हॉस्पिटलमध्ये पॅथॉलॉजी प्रयोगशाळेचे प्रमुख होते.बोरिवलीत सेवानिवृत्तीचे समाधानी जीवन जगत आहेत… दुसरे चिरंजीव श्री रघुवीर पाटील हे बी ए एल एल बी,द्विपदवीधर असून त्यांनी शेती व दुग्ध व्यवसाय केला. ते सध्या माकूणसार गावी असतात. श्री ज्ञानेश्वर पाटील हे बी एससी( ऍग्री) असून भारताच्या स्टेट बँकेमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते.सध्या निवृत्त असून बोरिवली येथे राहतात. श्री लीलाधर पाटील यांनीही 11वी नंतर,कुटुंबाचा, शेती व दुग्ध व्यवसाया पुढे चालविला. दिलीप पाटील हे ,बारावी असून मागे मी म्हटल्याप्रमाणे केटरिंग चा व्यवसाय करतात. दादर येथे त्यांचे स्वतःचे कार्यालय असून या क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव आहे. त्यांच्या  कामात त्यांच्या सौभाग्यवती ज्योतीताई (बी काॅम)यांची मोलाची साध असते.

    अण्णांचे सामाजिक व राजकीय कार्य चालू असताना संसाराचा गाडा व्यवस्थित रूळावर ठेवून ,आपल्या पाच मुलांसह तो यशस्वीपणे पुढे नेण्याचे काम, अण्णांच्या सौभाग्यवतीनी केले. त्या माऊलीची संपूर्ण साथ आपल्या पतीला होती म्हणूनच अण्णा आपल्या सामाजिक  कार्यात तसेच कुटुंबप्रमुख म्हणून ही यशस्वी ठरले.

   अण्णांना वंदन करताना त्यांच्या सहधर्माचारीणीलाही मी मनोभावे प्रणाम करतो.

    अशा एका थोर स्वातंत्र्यसैनिक यशवंत अण्णांची प्राणज्योत 13 जानेवारी 2005 रोजी निमाली. त्यांचे जीवन म्हणजे स्वदेश व समाजाच्या भल्यासाठी धगधगणारे एक यज्ञकुंड होते. लोकांनी भले म्हणावे, भविष्यात आपले पुतळे व्हावेत,स्मारके व्हावीत अशी अपेक्षा त्यांना कधीच नव्हती. मात्र आजच्या व भविष्यातील भावी पिढ्यांनी अशा निस्वार्थी,निरलस स्वातंत्र्य सैनिकांची आठवण ठेवून, त्यांनी दिलेला उच्च विचारांचा व स्वदेश प्रेमाचा, उज्वल वारसा जतन करण्याचे प्रयत्न जरूर केले पाहिजेत.

       पण…पण …आज काय अवस्था झाली आहे, देशाची?

  “या साठीच,आम्ही आपला जीव धोक्यात घातला होता का?” असा प्रश्न ,या स्वातंत्र्यसैनिकांचे आत्मे आम्हाला विचारत असतील. भ्रष्टाचार, बेकारी, हिंसा, गुंडगिरी, अपहरण, खुन-दरोडे. असे प्रकार इतके बोकाळले आहेत की, या देशाच्या भवितव्याची चिंता वाटते. ज्याच्या हाती सत्ता आहे,तोच देशाला लुबाडतो,खुर्चीसाठी दंगे घडवून आणतो. स्वार्था पोटी माणूस माणुसकी विसरला आहे, आणि नरराक्षस बनत चालला आहे. आधुनिकतेच्या नावाखाली नितिमत्ता, नैतिकता लिलावात निघाली आहे. हे सर्व कधी थांबणार? काय होणार आहे भविष्यात?  हे सर्व पाहून या दिवंगत स्वतंत्रता सेनानींना  स्वर्गात काय वाटत असेल? 

  “यापेक्षा आपण पारतंत्र्यात होतो, हे काय वाईट होते?” असे त्यांना वाटत असेल का? काहीही असो, त्यांना आजतरी आनंद,समाधान वाटण्याजोगी परिस्थिती दिसत नाही. 

    असू दे अशीच परिस्थिती कायम राहील हेही खरे नाही.

 “ये भी नही रहेगा”,हाच सृष्टीचा नियम आहे. निश्चितपणे परिस्थिती सुधारेल ,कृतज्ञता बुद्धी जागृत होईल आणि अण्णां सारख्या अनेक, ज्ञात ,अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण आम्हाला आदरपूर्वक होईल अशी आशा करूया . त्यादिवशीच, भारत मातेच्या या स्वर्गस्थ स्वातंत्र्य सैनिकांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती मिळेल.

   आज तरी आम्हाला आमच्या या वीरपुत्रांचा विसर पडला असला, तरी त्यांना त्याची फिकीर निश्चित नाही. मी मागे सांगितल्याप्रमाणे कीर्तीसाठी, मोठेपणासाठी त्यांनी  त्याग केलाच नव्हता.  ती स्वातंत्र्याची लढाई लढत असताना त्यांच्यापुढे,” समोर तारा एकच होता”, आणि तो म्हणजे स्वातंत्र्य ,भारतीय स्वातंत्र्य!! त्यापुढे इतर सर्व गोष्टी त्यांना तुच्छ होत्या. तुम्ही त्यांची आठवण ठेवणे वा न ठेवणे ही तुमची संस्कृती!मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करून समाधान पावलेले त्यांचे अंतरात्मे आजही म्हणत असतील……

         “आले जीवनी सुख जरी

         कधीच मी हुरळलो नाही..

         कधी ना सोडली कास सत्याची

         खोट्यात कधीच मळलो नाही…

         रुसून राहिले ,माझ्या अगदी जवळचेच, पण

         मी कुणाला कळलोच नाही…!

         मी कुणाला कळलोच नाही…!”

  आज आम्ही भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात आहोत.भारतदेश स्वतंत्र होऊन आज 75 वर्षाचा काल लोटला आहे. कै. यशवंत अण्णांच्या जन्मशताब्दीचेही हे वर्ष आहे.त्यांची आठवण निदान आजच्या मंगल दिवशी तरी करूया.…आजही,’ कुणाला न कळलेल्या’, दुर्लक्षित स्वातंत्र्य सैनिक, कै. यशवंत बारक्या पाटील उर्फ ती. अण्णा यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन!!