आमची मोठी आई भाग ९.
अनेकांच्या विनंतीनुसार मोठीआईची १०४ वर्षाची कहाणी तिच्याच शब्दात लिहिली होती, त्याचे लेखांक चालू ठेवीत आहे.

दिनू काका यांना आक्काची खूप दया येई. नाना-नानीने मला आपल्या घरी ठेवून माझा सांभाळ करण्याची तयारी दाखविली तसे आक्काला सांगितले. आक्का, मावशीने अर्थात आनंदाने संमती दिली. मी आक्काला सोडून नाना नानी चे घरी राहावयास आले. त्यांचे घर आमच्या घरासमोरच होते. गोंडूला दिनू काकांनी आश्रय दिला. अशा रीतीने आम्ही दोघी बहिणी घरातून बाहेर पडल्याने आक्काचा भार निश्चितच थोडा कमी झाला. घरकामात मिळणारी मदत कमी झाली. तरीही आक्काला निश्चितच मानसिक दृष्ट्या दिलासा मिळाला होता. तिच्या दोन लेकी चांगल्या निगराणी खाली वाढत होत्या.
कमळी, हिरु, मुका, खंडू सगळे लहानच होते. त्यामुळे आक्का आता त्यांचे कडे अधिक लक्ष देऊ शकत होती. आक्काचा स्वभाव शांत व कोणतेही कष्ट करण्यास नेहमी तयार! त्यासाठी कोणतीही कटकट वा त्रागा न करता! कितीही बाका प्रसंग आला तरी तिने मनाची शांतता व समाधान कधीच घालविले नाही. आपला उंबरगाव बाजार व या चार पिल्लांची काळजी हेच त्यावेळी तिचे विश्व होते. त्या काळात ती कधीही कोणत्याही कौटुंबिक सामाजिक समारंभात गेली नाही. त्यामुळे माझी ही चार भावंडे व्यवस्थित वाढली. आकाने हे सगळे कसे सांभाळले ते तिलाच ठावे!
माझ्या व गोंडूच्या जीवनात एक नवा कालखंड सुरू झाला. दैव आमची ही सत्वपरीक्षा घेत होते! बाबा तर नव्हते पण प्रेमळ आई-मावशीचा सहवास सोडून आम्ही घराबाहेर पडलो होतो. काका काकूंनीही मला आई बाबांचे प्रेम दिले. आजही ती जाणीव मला आहे. बालपणी आई बाबांचे छत्र निघून गेल्याने परक्या घरी तुकडे मोडण्याचे दुर्भाग्य बालपणीच ज्यांचे नशिबी येते, त्यांच्यापेक्षा कमनशिबी मुले आणि कोण असणार? सुदैवाने नाना-नानी व दिनू काकां-काकू सारखे प्रेमळ सगेसोयरे भेटले हेच त्या दुःखातील सुख!
कधीतरी मी एकटीच कामात असताना उंबरगावच्या वाडीतील ते दिवस आठवत असे. आप्पा मला कडेवर घेऊन पहाटेच्या वातावरणात बागेतून फिरवत आहेत. सकाळी सबंध बागेत फेरफटका मारणे त्यांचा नित्यक्रम होता…एखादे चांगले पेरू चिकू दिसले तर मला भरवीत.. लाडाने त्यांच्या कडेवर बसून मी पहाट शोभा व तो शांत सुंदर निसर्ग न्याहाळीत आहे..आप्पा हळूच माझ्या गालावरून डोक्यावरून लांब केसावरून हात फिरवीत मला तो परिसर दाखवीत आहेत…अशी दिवा स्वप्ने मला आजही निवांत क्षणी पडत असतात. माझ्या लाडक्या पण अल्पायुषी पित्याच्या कडेवर बसून अनुभविलेले ते क्षण माझ्या आयुष्याचा अनमोल ठेवा आहे. मी तो हृदयाशी जपून ठेवला आहे कारण ते भाग्य आम्हा सर्व भावंडात फक्त मला आणि मलाच मिळाले त्यानंतर आप्पा जगात राहिलेच नाहीत!!
नानी कडे कामात असतानाही मी जुन्या आठवणीत तल्लीन होत असे.. हातातील काम तसेच राही. मी एकटक कुठेतरी पहात राही. अशा स्थितीत कितीतरी वेळा नानीने मला हटकले आहे. ”तू कसला विचार करतेस? कामात लक्ष ठेव “असे सांगितले आहे. पण मी नानीला माझे ते दिवास्वप्न कधीच सांगितले नाही. पटकन ओले डोळे पुसून कामाला लागे!!
मी मागे म्हटल्याप्रमाणे भिमी मावशी आमच्या मामाकडे तिच्या आईबरोबर आजी बरोबर वर्षभर राहिली होती. ती देखील मामीला नको होती. पुढे तिनेही भावाचे घर सोडले. आमच्या बोर्डीच्या घरीच आक्का बरोबर राहावयास आली. भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. काहीही असो मावशीचे आमच्या घरी येणे हा आमच्यासाठी एक शुभ शकुन ठरला हे निश्चित! आता ती सुद्था बोर्डीतील बहुतेक वसतीगृहे व शारदाश्रम यांना भाजीपाला व फळ फळावर यांची रसद पुरवू लागली.. तिलाही रोज टोपलीचा भरलेला हारा घेऊन बोर्डी पासून ते घोलवड व रेल्वे पलीकडील पूर्व भागातही जावे लागे..आचार्य भिसे-चित्रे गुरुजींनी तिला या व्यवसायात स्थिर होण्यासाठी खूप मदत केली. मावशीने लवकरच आपला जम बसविला. तिला चांगली कमाई होऊ लागली. आक्काला एक आधार मिळाला.

आक्काच्या उंबरगाव बाजाराच्या दिवसातील एक आठवण तिने मला सांगितली होती. ऊंबरगाव च्या हद्दीवर एक गरीब फाटक्या कपड्यातील माणूस तिची वाट पाहत असे. आक्का तेथ पर्यंत आली की तिचे भरलेले टोपले तो स्वतः आपल्या डोईवर घेऊन बाजारापर्यंत घेऊन जाई. त्याला कोणतीच बिदागी नको असे. आक्कालाही खूप बरे वाटे. काही बिदागी देऊ केल्यास तो घेत नसे. त्याबद्दल आक्काने त्याला एकदा विचारले, तर म्हणाला, “ताई, देवजी काकांनी माझ्यावर खूप उपकार केले आहेत. त्यांनी मला वाडीत काम दिले. माझा संसार मार्गी लावला. माझ्या आजारपणात औषधाचाही खर्च त्यांनी केला. अचानक गेले. त्यांच्या उपकाराची थोडीफार फेड मी आज करतो आहे. मला त्यामुळे खूप बरे वाटते! ”
आप्पांच्या वेवजी वाडीत तो एक गडी होता. आप्पांनी त्याला रोजगार दिला होता. प्रेम दिले होते. थोडी आर्थिक मदत केली होती. आता तो स्वतःची शेतीवाडी करत होता. आप्पांनी केलेल्या उपकाराची फेड अशा रीतीने करत होता. गरीब होता पण मनाने श्रीमंत होता. कृतज्ञता होती. माणुसकी होती. ही खरी श्रीमंत माणसे.. कृतज्ञता व उपकारांची जाणीव ठेवून परतफेड करण्याची अंतरीक भावना असलेली अशी माणसे आत्ताशा खूप दुर्मिळ होत चालली आहेत!
मावशीचे बोर्डीत व्यवस्थित बस्तान बसले व भाजी विक्री सुरू झाली. त्यामुळेआक्काने उंबरगाव बाजार हळूहळू कमी केला .पुढे आक्का आठवड्यातून फक्त दोन-तीन दिवसच उंबरगावला जाऊ लागली. मावशीनेच या धंद्याचे सूत्र हाती घेतले. ती जास्त मेहनत करू लागली. आक्का घरकाम व मुलांसाठी जास्त वेळ देऊ लागली. आता आक्का मुलांच्या वाट्याला येऊ लागली. विशेषतः लहानग्या खंडूला तिची खूप जरुरी होती. आई व वडील या दोन्ही भूमिका तिला करावयाच्या होत्या. मावशी खूपच धडाडीची बाई होती. केवळ भाजी-फळे विक्रीच नव्हे तर इतरही अनेक लहान लहान उद्योग ती करू लागली. लग्नामध्ये वाडवळी पद्धतीचे शाकाहारी भोजन बनविण्यासाठी तिला आमंत्रणे येऊ लागली. स्वयंपाक बनविण्यात खूप हुशार होती. कोणत्याही कौटुंबिक वा सामाजिक कार्यात सर्वतोपरी हवी ती मदत देणे, एवढेनव्हे तर गावातील गरजू लोकांना त्यांच्या शेतीसाठी ,उद्योग धंद्यासाठी लहान सहान रक्कम कर्जाऊ देणे हा उद्योगही तिने सुरू केला. परिसरात तिला” फिरती बँक” ही उपाधी प्राप्त झाली. झाई बोर्डीतील मच्छीमारांना मच्छीमारीसाठी जाण्याआधी काही आगावू रक्कम हवी असे. मावशी त्यांना मदत करी. मासे विकले म्हणजे त्यांच्या हाती पैसा येई तेव्हाच कर्जाची परतफेड होई. आमच्या बोर्डीतील व परिसरातील अनेक धनिक शेतकरीही प्रसंगी तिच्याकडून मोठी रक्कम कर्जाऊ घेत. शेतजमिनी खरेदी करीत. व्याजाच्या बदली कधी चांगले ताजे मासे घरी येत. आंबे, चिकदूध चांगला तांदूळ, लग्न समारंभातील हक्काने मावशीला घरपोच मिळत. मे महिन्यात सुके खारेही येऊन पडे. एकंदरीत मावशीचा बोलबाला परिसरात खूप झाला होता. गरजू लोकांना आर्थिक मदत मिळे व मावशीलाही चार पैसे मिळत. माझ्या भावंडांनाही चांगलेचुंगले खावयास मिळे.

विशेष म्हणजे मावशीचा हा सर्व व्यवहार तिच्या डोक्यात असे. कोणतीही कागदपत्रे वा लेखी नोंद नसे. त्यामुळे पुढे मावशीला खूप मनस्ताप सहन करावा लागला. काही लोकांनी तर मुद्देमाल ही हडप करून टाकला. लोक कर्जावरील व्याज व्यवस्थित देत. मात्र मुद्दल रक्कम तशीच राहू देत. मोठी कर्जाऊ रक्कम थकली होती. मावशी चालती फिरती असेपर्यंत व्याज तरी व्यवस्थित येईल पुढे मावशी थकल्यावर व्याजही नाही व मुद्दलही नाही अशी स्थिती झाली.
आपल्या फेड न झालेल्या कर्जाची व ऋणकोंची तिला पूर्ण जाणीव होती. अंथरुणाला खिळल्यावर काही लोकांची नावे घेत ती बडबडत राही. लबाड लोकांनी त्याचा फायदा घेतला. ते कानावर हात ठेवीत. “आम्ही पैसे घेतलेच नव्हते ..”असेही सांगत. मावशी आपल्या त्या पैशाच्या आठवणीने बेचैन होई. पुढे पुढे तर अखेरच्या अवस्थेत काहीतरी एकटीच.. स्वतःशीच पैशाबाबत बोलत राही…”माझे पैसे.. माझे पैसे आणा…तो.. तो.. अमुक माणूस त्याने अजून पैसे दिले नाहीत..” अशी तिची अवस्था झाली. अंतः काळी घरच्या लोकांनी नोटांची चवड तिच्या हाती ठेवली…त्या कागदाच्या नोटा हातात घेऊनच तिने अखेर प्राण सोडला. तिने अनेकावर केलेल्या उपकारांची फेड अशी अपकाराने झाली!!
मावशीचा पैसा कष्टाचा होता. खूप मेहनतीने तिने तो जमवला होता. आपल्या भविष्य काळासाठी तिला तो हवा होता. कारण तिला कोणाचा आधार नव्हता. ज्यांच्यावर उपकार केले त्यांनीच फसविले. मावशीला माणसे ओळखता आली नाहीत. त्यामुळे शेवटी पश्चाताप सहन करावा लागला तरुणपणी डोईवरून ओझी वाहल्याने तिची मान धरली होती व ती मान वळवून पाहू शकत नसे. भीमी मावशी त्या कृतघ्न नातेवाईकांना शाप देतच गेली!
खंडू मामा व पुढे दिगू तिच्या या रोजच्या भाजी विक्रीचे हिशोब लिहून ठेवत असत. एवढेच तिच्या आर्थिक व्यवहारांचे लेखी टिपण. महिना झाला की ते फाडून टाकले जाई. कर्जाचे व्यवहार फक्त मावशीलाच माहीत असतं. त्या व्यवहारा बद्दल ती तोंडी सुद्धा कुणाला माहिती देत नसे. त्यामुळे तो सर्व व्यवहार गुलदस्त्यात राहिला.. मावशी बरोबरच लुप्त झाला.. मावशीच्या आर्थिक व्यवहारांची कहाणी खूप मोठी आहे. ती येथे नको.
मावशी मुळे आम्हा भावंडांना लहानपणी मोठा आधार मिळाला. तिच्या कडव्या शिस्तीमुळे संस्कारही मिळाले.मावशीने आम्हा भावंडांच्या संसारालाही हातभार लावला. माझे यजमान आप्पा खूप स्वाभिमानी होते. गरिबी असली तरी त्यांनी कधीच त्याचे प्रदर्शन केले नाही. दिगू च्या महाविद्यालयीन शिक्षण काळात आम्हाला पैशाची निकड होती. आप्पांनी त्याला साताऱ्याला भाऊराव पाटलांच्या संस्थेत “ कमवा आणि शिका “या योजने तून शिक्षणासाठी पाठवले. कोणाकडून आर्थिक मदत घेण्याची आवश्यकता भासली नाही.

गोंडू पहिल्यापासूनच मेहनती व गुणी मुलगी होती. तिच्या नावाप्रमाणेच ती गोंडस होती .कदाचित त्या गोंडस रूपामुळेच लहानपणी तिला गोंडू हे नाव आक्का, आप्पांनी दिले असावे. डॉक्टर काकांकडील वास्तव्याचा तिने चांगला उपयोग करून घेतला. आपले शिक्षण चालू ठेवले. दिनू काका, काकू तिच्या अभ्यासाकडे वैयक्तिकरित्या लक्ष ठेवीत. त्यामुळे गोंडू त्यावेळची व्हर्नाक्युलर फायनल(ई 7 वी), परीक्षा चांगल्या रीतीने उत्तीर्ण झाली. माझ्या बाबतीत, दोष माझाच म्हटला पाहिजे. कारण मला अभ्यास करणे, शाळेत जाणे आवडत नव्हते. मला वाचन करणे खूप आवडे, पण घरी बसून! शाळेत जाण्याचा व अभ्यासाचा कंटाळा येई. नाना खरे तर एक आदर्श शिक्षक होते. पूर्ण जिल्ह्यात त्यांचे एक उत्तम हुशार शिक्षक म्हणून नाव होते.. विशेषतः गणित विषय तर त्यांच्या हातचा मळ होता, पण मी त्याचा फायदा घेऊ शकले नाही. मला अभ्यास व शाळेत जाण्याबाबत नाना खूप समजावीत पण मी त्यावेळी ते मनावर घेतले नाही मोठी चूक झाली आता त्याचा शोक करून काय उपयोग ? खूप वाईट वाटते. मी तिसऱ्या इयत्तेतच शाळा सोडून दिली. मी माझेच नुकसान केले. मला अक्षर ओळख झाली. त्यामुळे पुढे मी चांगली पुस्तके रोजचे वर्तमानपत्र नियमित वाचत असे. थोडेफार लिहतही असे. गोंडू प्रमाणे थोडे शिक्षण घेतले असते तर खूपच फायदा झाला असता. आयुष्यात जे काही होते ते बऱ्यासाठीच असे समजून मी मनाची समजूत घालते. माझ्या मुलांनी, नातवंडानी जे मला जमले नाही ते शिक्षण देशा परदेशात घेऊन मला आनंदी व उपकृत केले. ती कहाणी पुढे सांगेनच.
पुढे भाग नववा…




मोठ्या आईंची कहाणी .
शंभर वर्षांपूर्वीच्या एकूण समाजातलं सो.क्ष .समाजातल्या एका घर -गोतावळ्याच्या वावराचं चित्रण मोठ्या आईंच्या कहाणीच्या रूपात वाचायला, पाहायला मिळालं. मोठी आई कोणी मोठी नेती नसेल, पुढारी नसेल. पण आपल्या घर- गोतावळ्याची वाटचाल नीटपणे होईल हे स्वतःच्या चांगल्या वर्तन- वागणूकीनं तिनं जपलं.
सो.क्ष .समाजात जन्माला येणं हे परमभाग्य असं मला वाटत आलं आहे. शंभर वर्षांपूर्वी ,पन्नास वर्षांपूर्वी तर तसं निश्चितच. आता काळ बदलताना दिसतो आहे.
जगातल्या
एकूण समाजात सो.क्ष.समाज तसा लहान समाज. पूर्वीच्या काळी सर्वसाधारणपणे गरिबीत जगणारा, काहीसा अशिक्षित.
जन्मापासून अंतापर्यंत माती, पानंफुलं, गाईगुरं, झाडंपानं ….
निसर्गाशी घट्ट नाळ जोडलेला जगाच्या पाठीवर असा समाज अन्यत्र कुठे असेल असं वाटत नाही.मात्र काळ बदलतो आहे.
मी प्रत्यक्ष अनुभवलं त्याच्या आधीचं कांही काळाचं घर गोतावळ्यातलं जगणं मोठ्या आईंच्या कथनात मला दिसलं.
मोठ्या आईंच्या स्मृतीला अभिवादन!