केल्याने देशाटन… चार देश, चार प्रकार!!

केनिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, बँकोक दौरा – 1995-96

    आमच्या कार्पोरेशनच्या व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने हा दौरा निश्चितच खूप उपयोगी ठरला. मात्र वैयक्तिक आयुष्यातही मला खूप काही देऊन गेला. आफ्रिकन जंगल सफारीतील चित्त थरारक अनुभव, इंडोनेशिया या मुस्लिमबहुल देशात प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन, व्हिएतनाम मधील छचोर-विलासी कुटुंब व्यवस्था, बँकॉक मधील ‘नाईटलाईफ’, सर्व अनुभव अद्भुत व जीवनाच्या कक्षा विस्तारित करणारे..!!

    मी व माझा सहकारी महेश, त्या दृष्टीने भाग्यवान होतो. माझ्या कंपनीलाही व्यापार वृद्धी चे समाधान व आम्हाला जगावेगळे काही अनुभव. त्याचाच थोडक्यात लेखाजोगा येथे देण्याचा प्रयत्न मी केला आहे.. …

     नेपाळ, बांगलादेश, सिलोन या तीन देशात आम्ही प्रथमतः व्यवसाय वृद्धीसाठी (Market Development) दौरे केले. त्या देशात उत्तम प्रतिसाद मिळाला. विशेषतः नेपाळ व बांगलादेशमध्ये तर दोन-तीन महिन्यात आमच्या वितरकांची नेमणूक पक्की होऊन, निर्यातही सुरू झाली. कलकत्त्या जवळील, बजबज या उपनगरात आमचा वंगण बनविण्याचा कारखाना (LUBE BLENDING PLANT), असल्याने ही निर्यात तिथूनच सुरू झाली. आमच्या कंपनीची ‘हाय कमांड’ खूश झाली. प्रथमतःच, एच पी सी एल चे प्रोडक्टस्  परदेशी जाऊ लागले. देशाच्या पेट्रोलियम कंपन्यांमध्ये आमचा बोलबाला होऊ लागला. विशेषतः इंडियन ऑइल कार्पोरेशन, या ‘बिग ब्रदर’, ना थोडी असूया वाटू लागली. कारण तोपर्यंत परदेशी माल पाठविण्याची संपूर्ण मक्तेदारी त्यांचीच होती.

     इतर देशांतही असा प्रयोग करावयास हरकत नाही असे मॅनेजमेंटनेच ठरविले. त्यादृष्टीने आता दुसरा टप्पा आफ्रिका खंड व आशियातील काही इतर देश,येथे वितरक नेमावेत असे ठरले. विशेष म्हणजे इतर कोणत्याही भारतीय सरकारी कंपनीने, इंडियन ऑइल कार्पोरेशन सुद्धा, आफ्रिका खंडात अजूनपावेतो निर्यात केली नव्हती. त्या खंडातील बहुतेक देशांमध्ये असलेले अस्थिर  राजकीय वातावरण व व्यापारातील, ‘अनैतिकता’ यामुळे सरकारी कंपन्या तेथे, संधी असूनही, आपला माल आफ्रिकेत पाठवू इच्छित नव्हत्या. मात्र आमच्या कार्पोरेशनने याबाबतीत  धाडसी निर्णय घेऊन, आमच्या ‘इंटरनॅशनल मार्केटिंग डिपार्टमेंट’ वर ती जबाबदारी सोपवली. ही आम्हाला संधी होती व मोठी जोखीम पण होती!  माझ्या सहकाऱ्यांनी हे आव्हान स्वीकारून ते यशस्वी करून दाखविण्याचे ठरविले. 

       आमच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे, प्रथमतः आम्ही ज्या देशात निर्यात करावयाची त्या देशांतील पेट्रोलियम पदार्थांच्या व्यापारासंबंधी माहिती गोळा करीत असू. त्या देशांतर्गत होणारे उत्पादन इतर परदेशी कंपन्यांकडून तेथे होणारी निर्यात व त्या विशिष्ट देशातील उद्योगधंद्यांना लागणाऱ्या एकंदर  पेट्रोलियम पदार्थांची जरुरी, यावरून तो देश पेट्रोलियम निर्यातीसाठी जरुरीपेक्षा अधिक(Surplus) की जरुरी पेक्षा कमी(Deficient),क्षमतेचा आहे हे ठरविले जात असे. भारताची त्या विशिष्ठ देशांतील वकिलातिशी संपर्क करून त्यांचाही सल्ला घेतला जात असे. भारताचे त्या देशाशी असलेले राजनैतिक संबंध व आंतरराष्ट्रीय व्यापारी करार( Bilateral Trade Agreements),यांचाही अभ्यास करावा लागे. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे,याबाबतीत, आम्ही ज्या ज्या भारतीय वकिलातिशी संपर्क करीत असू, अत्यंत तत्परतेने आम्हास ही माहिती मिळे.तेथे गेल्यावर तेथील हायकमिशनर आम्हास प्रत्यक्ष मुलाखातही देत असत. या सर्व माहितीच्या आधाराने,’ ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’, तयार होत असे. हा अहवाल आमच्या डायरेक्टर बोर्डाकडे पाठवून त्यांची संमती मिळवावी लागे. 

    ही मंजुरी मिळाल्यावर दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होई. यात आम्हाला हव्या असलेल्या वितरका कडून अपेक्षित कामाचे स्वरूप व आमच्या सरकारी कंपनीचे काही मूलभूत नियम, यांचे आधारे त्या देशांतील स्थानिक वृत्तपत्रांत आम्ही जाहिरात देत असू. जाहिरातीतून आलेल्या अर्जापैकी, निवडक लायक उमेदवारांची निवड करून त्या व्यक्तींशी, भारतातून संपर्क साधला जाई. त्यांचे मदतीने, तेथील भावी वितरकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम, देशांतर्गत प्रवास, कार्यालयीन व ऊत्पादन केंद्रांना भेटी, येथील डीलर्स-डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनशी सम्पर्क ई. कार्यक्रम आखला जाई.

    तिसऱ्या टप्प्यात  भावि वितरकांबरोबर करावयाचा कायदेशीर वैयक्तिक करार, (Distributor Legal Agreement), कंपनीच्या कायदे तज्ञाकडून तयार केला जाई. त्याला मॅनेजमेंट ची मान्यता घेतल्यावर आमच्या प्रत्यक्ष प्रवासाची आखणी,तिकिटे ,हॉटेल बुकिंग ई. होत असे.

    वरील प्रमाणे आफ्रिका दौऱ्याची तयारी होत असताना, आमच्या व्यवस्थापनाने, जवळच असलेल्या इंडोनेशिया व व्हिएतनाम या देशातही काही निर्यातीची संधी आहे का हे तपासून घ्यावे, असे सुचविले. म्हणजे आता केनिया-टांजानीया बरोबर इंडोनेशिया व व्हिएतनाम मध्ये ही दौरा करावा लागणार होता. त्या देशाविषयी,आंतरराष्ट्रीय व्यापाराची माहिती, भारताबरोबर व्यापारी संबंध इत्यादी माहिती गोळा करणे आलेच. तेथील वितरकासाठी, त्यानुसार करार पत्र तयार करावे लागणार होते. प्रत्येक देशासाठी नियम व एग्रीमेंट  वेगळे वेगळे करावे लागत .त्यामुळे थोडी घाई गडबड उडाली.  केनिया मधील वितरक जर केनिया- टांजानीया, दोन्ही देशातील काम पाहील, तर तसेही आजमावयाचे होते. नैरोबी-केनिया मध्ये मुक्काम करून दोन्ही देशांतील उमेदवारांना तेथेच बोलाविण्याचे ठरविले.

     मागील दौऱ्याप्रमाणे या दौऱ्यासाठीही मी व माझे सहकारी श्री महेश, जे मार्केटिंग विभागाचे प्रमुख होते,दोघांची टीम निवडली गेली. कंपनीच्या शिरस्त्याप्रमाणे प्रत्येक देशात फक्त तीन दिवस मुक्काम करून, वर उल्लेख केलेली सर्व कामे आटोपून ,अंतिम निवडीचा मसुदा तयार करावयाचा होता.  चौथा एक दिवस आम्ही खास विनंती करून त्या देशाची सांस्कृतिक माहिती करून घेण्यासाठी, आमच्या वैयक्तिक आनंदासाठी, मागत असू. कंपनी मॅनेजमेंट मोठ्या मनाने ती परवानगी देई, कारण डॉलर मध्ये दिला जाणारा,”डेली भक्ता”, फक्त सरकारी कामासाठी दिला जात असे.चौथ्या दिवसाचा भत्ता आम्ही घेत नसू! खरे तर वेळ थोडा असल्याने, सर्व कामाची आखणी अतिशय काळजी पूर्वक करावी लागे.या तीन देशांच्या दौर् या साठी आम्हाला एकूण अकरा दिवस मिळाले.

      प्रथम केनियातील नैरोबी ला जाऊन, तेथे मुक्काम करून, दोन्ही देशातून निवडलेल्या व्यक्तींना मुलाखती साठी बोलाविण्याचे ठरविले. पुढे इंडोनेशिया त्यानंतर व्हिएतनाम असा दौऱ्याचा कार्यक्रम होता. हनोई-मुंबई  सरळ विमान नसल्याने, हनोई-बँकॉक  व तेथून बँकाॅक- मुंबई हे विमान पकडावयाचे होते. असा कार्यक्रम ठरला होता..

       मला वाटते 1995-96 मधील डिसेंबर महिना असावा. आम्ही मुंबईहून दुपारी मुंबई -नैरोबी विमान पकडले. विमान सुटताना थोडा उशीरच झाला होता. त्यामुळे नैरोबी विमानतळावर उतरलो तेव्हा स्थानिक वेळेनुसार रात्रीचे बारा वाजले होते. प्रवासाच्या त्रासाने दमल्यामुळे आम्हाला सरळ हॉटेलवर जाऊन विश्रांती घ्यावयाची होती.  हॉटेलचे गाडी पिकअप साठी येणार होती. गाडी नआल्याने हॉटेल मॅनेजर ला फोन केला, तेव्हा,

    “रात्रीच्या वेळी आम्ही गाडी बाहेर काढत नाही,आपण देखील कोणतीच टॅक्सी वगैरे न करता विमानतळावरच रात्र घालवा.पहाटे सहा वाजता आमची गाडी येईल”.

    असा निरोप मिळाला.अनेक टॅक्सीवाले येऊन आम्हाला हॉटेलपर्यंत घेऊन जाण्याची तयारी दाखविता होते. आम्ही त्यांना नकार दिला. बाकीचेही काही प्रवासी रात्रभर आमचे बरोबर थांबले होते. रात्रीच्या वेळी, या शहरात बाहेर पडणे अत्यंत धोक्याचे असते, हे त्यांचे कडून देखील कळले.  नैरोबी विमानतळावर, बसल्या बसल्या झोप घेतच रात्र काढली. कारण झोपणेही धोकादायक होते.

      सकाळी सहा वाजता चे सुमारास हॉटेलची गाडी आली. आम्ही निघालो .विमानतळ ते ‘हॉटेल आफ्रिकन-सफारी’, पाऊण तासाचे प्रवासात, या शहरातील कायदा-सुव्यवस्था व एकूणच सामाजिक जीवनाचे ओझरते दर्शन झाले. उंच, धिप्पाड,राकट, काळ्या तरुण,तरुणींचे घोळके, सकाळीच हातात बियरच्या बाटल्या घेऊन, त्यांच्या वसाहतीतील चौकात हसत खिदळत होते. आमच्यासारख्या परदेशी लोकांना पाहून त्यांना आणि चेव चढत होता.काहीतरी विचित्र हातवारे करीत हसत होते. भाषा जरी कळत नसली तरी आम्हा पाहुण्याकडे बघून त्यांची थट्टा मस्करी टिंगल चालली असावी,असे वाटत होते.  पाहताना एक प्रकारची भीतीही वाटत होती. रात्री आपण प्रवास केला नाही हे योग्यच केले याची खात्री झाली.  केनिया मधील राजकीय, सामाजिक परिस्थिती इतर आफ्रिकन देशापेक्षा उत्तम आहे,असे समजले होते. तेथे जर ही परिस्थिती, तर बाकीच्या आफ्रिकन देशात काय होत असेल,या कल्पनेने अंगावर शहारे आले??

नाश्त्यासाठी डायनिंग हॉलमध्ये जात असताना,स्वागत कक्षातील अधिकाऱ्याने आम्हाला दोन सूचना स्पष्टपणे दिल्या. 

एक, “दिवसा कधीही, बाहेर कामासाठी अथवा फिरण्यासाठी जावयाचे असल्यास गाडी शिवाय अजिबात फिरू नका”

 व दोन,”संध्याकाळी आठ नंतर अजिबात रस्त्यावर पडू नका”.

    हे आदेश आंम्ही  येथे मुक्काम असेपर्यंत तंतोतंत पाळले. जेव्हा जेव्हा कामासाठी कारमधून बाहेर फिरलो ,सूचनांचे पालन करण्याचे महत्त्व कळले! 

नैरोबी शहराचे विहंगम दर्शन

   ‘हॉटेल सफारी’उत्तम होते. मात्र आता विश्रांती घेता येणार नव्हती. कारण आम्हाला उशीर झाला होता. सकाळची नैमित्तीक कामे आटोपून, ब्रेकफास्ट करून घेतला. तयार झालो. आज दहा वाजता पासून आम्ही बोलाविलेल्या उमेदवार वितरकांच्या मुलाखती नियोजित केल्या होत्या.त्यास उशीर झाला तरी आलेल्या उमेदवारांनी आम्हाला पूर्ण सहकार्य दिले.

      पहिल्या दिवशी सर्व मुलाखती झाल्यावर तीन उमेदवारांना आम्ही अधोरेखित (शॉर्टलिस्ट) केले.त्यातील काहींची कार्यालये, कार्यशाळा,गोदामे नैरोबी व आसपासच्या भागात होती., त्यांनाही भेट देऊन झाली.   

       एका उमेदवाराचे कार्यालय व फॅक्टरी मोंबासा  येथे होती. त्यांचे कार्यालय व उद्योगाची पाहणी करण्यासाठी विमानाने,नैरोबी -मोंबासा -नैरोबी प्रवास झाला. मोंबासा हे समुद्रकिनारी वसलेले सुंदर शहर आहे. हे गृहस्थ आफ्रिकन होते व त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून व दिलेल्या माहितीवरून माणूस सरळ सीधा  वाटला.  मात्र या गृहस्थांना ऑइल पेक्षा डांबर(Asphalt), या आमच्या प्रॉडक्टमध्ये रस होता. डांबर वितरणाचा त्यांचा मोठा उद्योग होता.आम्हाला यात गम्य नव्हते.त्यामुळे त्यांच्याशी करार होऊ शकला नाही. मात्र त्यानिमित्ताने आफ्रिकेतील मोंबासा हे सुंदर शहर पाहिले.तेथील समुद्रकिनाऱ्यावर ही फेरफटका मारला. हा समुद्रकिनारा अत्यंत स्वच्छ व सुरक्षित असल्याने,जगातील अनेक परदेशी नागरिक दुपारच्या वेळी तेथे समुद्र स्नानाचा आनंद घेताना दिसले. भोजनानंतर, दुपारी आम्ही पुन्हा  मोंबासा- नैरोबी विमान प्रवास करून हॉटेलवर आलो.

नारळी पोफळीच्या झाडांनी वेढलेला हा मोंबासाचा समुद्र किनारा. निळे स्वच्छ पाणी.

    शेवटच्या दिवशी,निवडलेल्या दोन उमेदवारांना आमच्या करार पत्राची संपूर्ण माहिती देऊन,त्यातील काही कलमे त्यांच्या विनंतीनुसार सुधारण्यासाठी,आमच्या मुंबईतील कार्यालयाशी संपर्क साधला. ती थोडी बदलण्यात आली. हे करण्यात अर्धा दिवस गेला. श्री.शहा व श्री  खग्राम या दोन भारतीय वंशांच्या उद्योगपतींची आम्ही वितरक म्हणून नेमणूक केली. दोघेही येथे नावाजलेले उद्योगपती असून त्यांचे उद्योग समूह अनेक वर्षापासून या देशात व आफ्रिकेतील इतरही देशात आहेत. श्री शहा हे केनिया प्रमाणेच टांझानिया मधील वितरणाचे ही काम पाहणार होते. त्यामुळे आता टान्झानियास जाण्याची गरज नव्हती.श्री.खग्राम  यांची केनियन राजकारण्याशी ही चांगली जान पहचान होती.त्यांचेही कुटुंब अनेक वर्षापासून,’ लुब्रिकंट डिस्ट्रीब्यूशन’, उद्योग करीत होते.

   श्री खग्ग्राम यांचे मध्यस्थीने,आम्ही केनियाच्या त्या वेळच्या व्यापार मंत्र्यांची भेट घेतली.या मंत्री महोदयांना  देशातील पेट्रोलियम व्यवसायाची काहीही कल्पना दिसली नाही. आम्ही भेटावयास दुपारी गेलो तेव्हा ते ‘तर्र’अवस्थेत आमच्याशी बोलत होते. यावरूनच सर्व परिस्थितीची कल्पना यावी. शेवटी सगळीकडे राजकारण्यांची रीत म्हणजे , “पळसाला पाने तीनच”,जास्त काय बोलायचे??

   श्री खग्राम यांचेशी, मंत्री महोदयांची  खूप जवळीक असल्याचे दिसून आले. “आमच्याकडून पूर्ण सहकार्य देऊ”, एवढे आश्वासन आम्हास पुरे होते.

       केनियामध्ये भारतीय वंशाच्या गुजराती-कच्छी लोकांची सर्व व्यापारावर हुकूमत असून ही  मंडळी त्याच समाजांतील होती. आमच्या या अनेक मुलाखती व भेटीतून, या देशात निश्चितच पेट्रोलियम लुब्रीकंट्स ,या व्यवसायाला निश्चित खूप वाव आहे, याची जाणीव झाली. हे दोन वितरक,आमच्या उद्देशाला न्याय देतील, असा विश्वास वाटला.

      श्री शहा व श्री खग्राम यांच्या कार्यालयात गेलो तेव्हा तेथेही आम्हाला कार्यालया भोवती सशस्त्र सुरक्षा व्यवस्था दिसली. कार्यालय म्हणजे तुरुंगच वाटत होता. एका मागे एक अशा तीन कुंपणांना ओलांडून ऑफिसमध्ये जावे लागले. प्रत्येक ठिकाणी बंदुकाधारी सशस्त्र सुरक्षा रक्षक नमूद होते. सर्व वातावरणच एकंदरीत खूप भीतीदायक, त्रासदायक वाटत होते. अशा अस्थिर, असुरक्षित वातावरणात ही भारतीय मंडळी येथे व्यापार करतात याचे कौतुक वाटते!

  पुढे आमचे ट्रॅव्हलर चेकस् वटविण्यासाठी बँकेत गेलो, तर तेथील सुरक्षा काय वर्णावी? एका मागे एक अशा तीन सुरक्षा कवचां मधून, बँकेत रस्ता जात होता. प्रत्येक सुरक्षा कवचात, बंदूकधारी सैनिक उभे होते. कॅशियरच्या केबिन समोर उभे राहिल्यावर,आमच्या मागे, दोन बंदूकधारी उभे राहिले!!

    नैरोबी मधील भारतीय वकिलातीत ही आमची मुलाखत ठरली होती. त्याप्रमाणे तेथे जाऊन आमचे हायकमिशनर व कार्मिक अधिकारी(Commercial Attache),यांची भेट घेतली. त्यांनी ही आम्हाला हवी ती माहिती दिली.

    “या देशात, पेट्रोलियम लुब्रिकंट व्यवसाय करणे निश्चित फायदेशीर ठरेल”,असा सल्ला त्यांच्याकडून ही मिळाल्याने आम्हाला खूप बरे वाटले. या दोन व्यावसायिकांची ,’व्यापारी कुंडली’, ही त्यांच्याकडून मिळाली. त्यांचे बँके व्यवहार स्वच्छ   होते.

      तिसऱ्या दिवशी बहुतेक वेळ, हे करार-मदार निश्चित करून,त्याप्रमाणे दोन्ही कंपन्यांच्या डायरेक्टर्स अथवा चेअरमन कडून त्यावर मंजुरी घेऊन,सही शिक्के झाले. 

 त्यादिवशी सकाळी, येथील,’गावचा बाजार’, पाहण्यास नैरोबी बाहेर गेलो होतो.आपल्याकडील आठवड्याचे बाजार पाहण्याची सवय व आवड असल्याने हा देखील एक आगळा आनंद होता. येथील समाज जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन अशा बाजारातून होते. अंगावर धड वस्त्रेही नसलेली, स्त्री-पुरुष मंडळी,काहीतरी विक्री होऊन चार पैसे मिळतील, या भावनेने, विविध वस्तू घेऊन आली होती. हस्तिदंत, बांबू ,लाकूड,धातू ,पथ्थर,अशा विविध माध्यमातून तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी होत्या.अनेक प्रकारचा ताजा भाजीपाला, फळे,मध स्थानिक जडीबुटीची औषधे. देखील होती. वस्तूंचे दर ही अगदीच माफक वाटले.मात्र या वनवासी लोकांच्या हातातील

 हस्त कौशल्य,वस्तूतील सौंदर्याने प्रतीत होते! मी देखील काही वस्तू खरेदी केल्या. आजही माझ्या शोरूम मध्ये त्या ठेवलेल्या आहेत. येथे फिरत असताना आमच्या बोर्डी-घोलवडच्या आठवडा बाजार आठवला. तेथेही अशाच विविध वस्तू विकत बसलेली आदिवासी बाया मंडळी डोळ्यासमोर आली. वनवासी तो भारतातला,आफ्रिकेतला वा अमेरिकेतला असू दे, तो उपाशी,अर्धनग्नच असला पाहिजे काय!!

नैरोबी जवळील एका खेड्यात आठवड्याचा भरलेला बाजार! विविध वस्तू, फुले, फळे,भाज्या यांनी संपन्न!!

     एक गोष्ट मात्र सत्य आहे. हा देशउद्योगधंद्याच्या बाबतीत मागासलेला राहिला,मात्र त्यामुळे येथील  निसर्गाचे जतन आपोआप झाले!अशी जंगले,वृक्षलता,इतक्या विविध प्रकारची जंगली श्वापदे, पक्षी, शुद्ध हवा, निळे आकाश, जगात कोठेच पहावयास मिळणार नाही.माणसाला प्रगतीचा व उद्योगाचा हव्यास आहे, तर त्याने असा निसर्ग उपभोगण्याचे विसरून जावे!

  कधी कधी,’आजचे जग विकास व प्रगती करीत आहे की अधोगती’,असा प्रश्न,येथील नितांत सुंदर निसर्ग पाहिल्यानंतर मनात येतो… आम्ही तथाकथित, ‘सुधारलेले’अथवा ‘सुधारत असलेले’ देश, प्रथम वसुंधरेला ओरबाडतो आणि नंतर ‘वसुंधरा बचाव’, म्हणून अभियाने चालवितो!!

      नैरोबीत तीन दिवस झाले होते. ऑफिसची कामेही समाधानकारकरीत्या आटोपली होती. चौथ्या दिवशी रात्री नैरोबी- जकार्ता विमान पकडावयाचे होते. त्यामुळे दिवसभर मोकळा होता. अर्थातच आफ्रिकेत येऊन येथील,नॅशनल पार्क व वाइल्ड लाईफ न पाहणे म्हणजे, आग्र्याला जाऊन ताजमहाल न पाहणे असे झाले असते!सुदैवाने  महेश चे एक मित्र श्री.साठे हे सहकुटुंब नैरोबीतच व्यवसायानिमित्त वास्तव्यास होते.त्यांनीही आम्हाला नैरोबी नॅशनल पार्कची सफर करण्याचे सुचविले. श्री व सौ साठे आपल्या दहा-बारा वर्षाच्या कन्येसह या सफारीत सहभागी होणार होते. चौथ्या दिवशी सकाळीच,नैरोबी नॅशनल पार्कला जाऊन आफ्रिकेतील वन्य जीवनाचा अनुभव घेण्याचे आम्ही ठरविले.

     श्री.साठे यांचे घरी आम्ही चहा पाण्यास गेलो असताना, तेथेही त्यांच्या घराभोवती सशस्त्र सैनिकांचा पहारा दिसला. “येथे जर असे सुरक्षारक्षक  ठेवले नाहीत तर सहकुटुंब राहणे शक्यच नाही,” असे श्री साठे म्हणाले. घरामध्ये एकट्या दुकट्या गृहिणीला गाठून, घरातील सर्व सामान,पैसे लंपास करून,प्रसंगी बाईची हत्या करण्यासही हे रानटी लोक मागे पुढे पाहत नाही. श्री.साठे यांचे मनापासून कौतुक केले. अशाही परिस्थितीत, हा ‘मराठी वीर’,आपल्या कुटुंबासह नैरोबीत,काही वर्षापासून व्यवसाय करीत आहे,हे निश्चित कौतुकास्पद! साठे कुटुंबाचा नंतर काहीच संपर्क राहिला नाही. ते कुठेही असू देत,आनंदात असू देत हीच माझी प्रार्थना आहे,

नैरोबी नॅशनल पार्क मधील वन्यजीवन

        येथे नॅशनल पार्क पाहणे म्हणजे ,तिकीट काढून आंतप्रवेश घेणे एवढेच नसते. तुम्हाला एक तर स्वतःची जीप घेऊन जावे लागते अथवा ती येथे भाड्याने घ्यावी लागते. काही विशेष गोष्टींनी जीप सज्ज असल्याशिवाय, साध्या जीपला  प्रवेश नाही.जीपला तिन्ही  बाजूंनी मजबूत लोखंडी जाळी, वर उघडता-बंद करता येणारे टप असणे गरजेचे असते. वन्य प्राण्यांपासून सुरक्षितता मिळविणे हा त्याचा उद्देश आहे. आम्ही त्या प्रकारची एक खास जीपभाड्याने घेतली. ड्रायव्हर अर्थातच एक आफ्रिकन मनुष्य होता. अनुभवी होता. या नॅशनल पार्क मध्ये  पर्यटकांना फिरवून आणणे त्याचा नेहमीचा उद्योगच होता. 

नैरोबी येथील, राष्ट्रीयअरण्यात, वन्यजीवन दर्शनासाठी, वापरण्यात येणारी जीप.

   आत शिरण्याआधी व्यवस्थापनाला, एक अर्ज भरून द्यावा लागतो. त्यात आपली जुजबी माहिती व एक महत्त्वाची अट  मान्य करावी लागते,

 ..” मी सर्वस्वी माझ्या जबाबदारीवर या पार्कमध्ये प्रवेश करीत असून, वन्य प्राण्यांस कोणतीही हानी पोहोचविणार नाही. प्राण्यांकडून  मला हानी पोहोचल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील”  असे शपथेवर लिहून द्यावे लागते.

येथील  व्यवस्थापन संपूर्ण जबाबदारी पर्यटकावर सोपवून मोकळे होते.  आपल्याला अतिशय काळजीपूर्वक प्रवास करावा लागतो. संपूर्ण नियम वाचून त्याप्रमाणे वागावे लागते.मात्र एवढी नियमावली वाचत बसण्यात वेळ असतो कोणाला?

        आम्ही  थोडेसे पुढे गेलो असू, जंगलांतील अनेक प्राणी आम्हाला दोन्ही बाजूस दिसू लागले .येथे प्रवाशांच्या वाहनासाठी एक रस्ता आखून दिला आहे,त्यावरूनच आपली जीप चालवावयाची असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील परिसर हा जंगली श्रापदासाठी मुक्त असतो. कोणत्याच प्रकारचे कुंपण रस्त्याच्या बाजूला नसते. त्यामुळे आपला रस्ता सोडून मध्ये जाणे म्हणजे जंगली प्राण्यांच्या हद्दीत आक्रमण करणे ,असे होते.त्यावेळी हे प्राणी माणसावर ,कधी व कसे आक्रमण करतील काहीच सांगता येत नाही? 

   सुरुवातीलाच आम्हाला अभयारण्याच्या रस्त्याच्या एका कोपऱ्यात राखेचा मोठा ऊंच ढिगारा दिसला.आमच्या अनुभवी ड्रायव्हरने, तो हस्तिदंताच्या राखेचा(Ivory Ash)असल्याचे सांगितले. काही वर्षांपूर्वी येथील अस्थिदंताचा चोरटा व्यापार करणाऱ्या लोकांनी, अभयारण्यातील हत्तींचे, हस्तिदंत कापून, प्रसंगी हत्तींना मारून, मोठ्या प्रमाणावर हस्तिदंत जमविले होते. सरकारी रक्षकांनी ते पकडल्यामुळे, अरण्या बाहेर जाऊ शकले नाहीत.चोरट्यांना शिक्षा झाली. हस्तीदंत जाळून टाकण्यात आले. त्याचीच ही राख होती .अस्थिदंताची चोरटी निर्यात हा येथे प्रसिद्ध उद्योग होता.  आंतरराष्ट्रीय बाजारात हस्तीदंतास  मोठी किंमत मिळते. एका किलोला,1800.$ व एका हत्ती पासून फक्त  10किलो हस्तीदंत  मिळते,यावरून एवढा हजारो टनांचा हा हस्तिदंत, किती किमतीचा, त्यासाठी किती हत्तींनी बलिदान दिले असेल…?? विचारच करवत नाही! मन उद्विग्न झाले!!

       अनेक प्रकारचे प्राणी,जसे की, चित्ते, सिंह,आफ्रिकन म्हशी, जिराफ,पाणघोडे, हायना, झेब्रे, मोठी माकडे, काळे पट्टी असलेले कोल्हे, शहामृग, नीलगाई व इतरही अनेक प्रकारचे आम्ही ओळखू शकत नसलेले प्राणी  जंगलात दिसले. हे सगळे प्राणी एकटे दुकटे नसून आपल्या कुटुंब- कबिल्यासहित फिरत होते. कोणत्याही प्रकारची पर्यटकांची भीती न बाळगता मनसोक्तपणे दर्शन देत होते. कारण हे वन्य प्राणी त्यांच्या मालकीच्या परिसरात फिरत होते,आम्ही तेथे पाहुणे होतो.

    विशेष म्हणजे वाघोबांचे दर्शन कुठेच झाले नाही!!

   अनेक प्रकारचे रंगीबेरंगी विविध आकारांचे पक्षीही येथे झाडावरून बागडत होते.

  युरोपियन व अमेरिकन पर्यटकांची गर्दी जास्त वाटली. अध्ययावत कॅमेरे घेऊन ते फोटो शूटिंग करीत होते. काही हौशी व धन्देवाईक लोकांनी,बाजूला असलेल्या झाडांचे फांद्यावर कॅमेरे बांधूनच ठेवलेले होते.आपणास’डिस्कवरी’, टीव्ही चॅनेलवर वन्य प्राण्यांचे जे अनुपम दर्शन होते, ते बहुदा अशाच प्रकारे केलेले असते.

     ड्रायव्हरने गाडी थांबवली.अनेक परदेशी प्रवासीही येथे आपल्या गाड्या उभ्या करून, फोटो घेण्यासाठी सरसावले  होते! आमचा सारथी म्हणाला,” समोर काय चालले आहे ते पहा, असे दृश्य नेहमीच्या जगात किंवा प्राणी संग्रहालयात पहावयास मिळणार नाही!!”

आणि खरंच समोरचे दृश्य अत्यंत दुर्मिळ होते…

      डावीकडील रस्त्यावर, आमच्यापासून काही फुटाच्या अंतरावर, सिंहाचे दोन बछडे त्यांच्या आई बाबा बरोबर खेळत होते. आई बाबा ऐटीत बसले होते. पिल्ले त्यांच्या अंगा, पायावर खेळत होती. एवढ्यात काय झाले कोणास ठाऊक, आईने बछड्यांना काही इशारा केल्याचे जाणवले. आमचा अनुभवी ड्रायव्हर म्हणाला,” यांना कोणत्या तरी श्वापदाचा वास लागला आहे व हे आता बछड्यांना शिकारीसाठी पाठवीत आहेत” आणि खरेच ही दोन पिल्ले, पवित्रा घेऊन,हळूहळू दबकत ,आई-बाबा समोरून सावकाश पुढे जाऊ लागली. ते दृश्य मोठे मजेशीर दिसत होते .थोड्या वेळात  एक गलेलठ्ठ जंगली म्हैस झाडाझुडपांतून समोरून येताना दिसली. आपल्या टप्प्यामध्ये येताच, या दोन बछड्यांनी म्हशीच्या पुढे जाऊन तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला . बलदंड म्हशीने,फक्त जोराने हंबरडा फोडला.. बछड्याच्या अंगावरती धावून आली..  हे दोघेही ‘रणछोडदास’, शेपटी घालून, मागे पळत सुटले .म्हैस  जागेवर उभी होती. दृश्यही मोठे गमतीशीर दिसत होते…दोघे आपल्या आई-बाबांच्या मागे जाऊन लपले..

     वनराज, वनराणी पिल्लावर गुरगुरण्याचा आवाज आला. त्यांनाही बहुदा आपल्या राजपुत्रांचे शौर्य माहीत असावे .त्यांच्या भाषेत त्यांनी “हत तुमची,कशाला सिंहांच्या पोटी जन्माला आलात..?”असे काहीतरी सांगितले असावे.

आता दोघेही,पिल्लांना मागे घेत,म्हशीच्या दिशेने, ऐटीत पावले टाकीत,आपल्या कीर्तीला साजेशा हिम्मतीने, गजगतीने,चाल करून गेले. म्हशीलाही आपल्या भवितव्याची जाणीव झाली असावी. ती देखील मागे फिरून परत झुडपात शिरू लागली… क्षणार्धात म्हशीचा माग काढून ,वनराजांनी समोर जाऊन,तिचा रस्ता अडवला. वनराणीने म्हशीच्या उजवीकडून ,मागून, तिचा मागील-उजवा  पाय पकडला….  मागे बघून सिंहीणीला शिंगे मारायचा प्रयत्न म्हैस करते न करते, तेवढ्यात पुढून सिंहाने तिच्या मानगुटीवर उडी मारून, मानेत आपले दात खूपसले.. मानेतील मुख्य शीर तोडली…  रक्ताचे कारंजे उडाले..   म्हैशीने जमीनीवर लोळण घेतली…पुढचे दृश्य आम्हाला पाहावले नाही… ड्रायव्हरला सूचना करून आम्ही पुढे निघालो… सिंहच वनराज का, याचा प्रत्यय आला?

     सर्व हे सर्व नाट्य आमच्या डोळ्यासमोर केवळ अर्धा एक तासांमध्ये घडले. हा ‘जंगलचा राजा’, आपल्या राजपुत्रांना, राजेशाही शिकार कशी करावी,याचे शिक्षण कसे देतो, ते नाट्य आमच्या डोळ्यासमोर घडले.. एक विलक्षण अनुभव वाट्याला आला !! खरे तर सिंहाला आपल्या शिंगावर घेऊन ती महाकाय म्हैस,शेकडो फुटावर उडवून देऊ शकली असती, मात्र ज्या सफाईने त्या दोघांनी रणनीती तयार करून, म्हशीचा फडशा पाडला.. ‘जंगलात नुसती शक्ती नाही तर युक्तीही कामाला येते’, आणि तेथेच तर वाघ-सिंह ,शक्तीला कमी पडूनही, केवळ युक्ती आणि हिम्मत या जोरावर,मोठ्या मोठ्या शिकारी करतात !! प्रात्यक्षिक पहावयास मिळाले!

      आम्ही पुढे निघालो. दुपार होत आली होती. पोटात कावळे ही कोकलत होते .बरोबर आणलेली न्याहारी करून घ्यावी व थोडी विश्रांती घेऊन आता निघून जावे असा विचार चालला होता. त्याप्रमाणे न्याहारी झाल्यावर आम्ही ड्रायव्हरला, ‘जीप, पार्कबाहेर नेण्याची’, सूचना केली. मात्र  ड्रायव्हरचे समाधान झाले नव्हते. “आमच्या आफ्रिकेचा खास प्राणी, एक शिंगी काळा गेंडा,’African Rhino’,, पाहिल्याशिवाय तुम्ही कसे जाणार? तुम्हाला  तो देखील दाखवायचा प्रयत्न करतो..” असे म्हणत त्याने थोडा अधिक वेळ,सफारी चालू ठेवण्याची विनंती केली. गळ घातली. आफ्रिकन काळ्या गेंड्याच्या शोधात आम्ही पुढे चाललो…

   या प्राण्याला पाहण्यासाठीच आम्ही खूप धडपड केली व संकटात सापडलो.

    त्यादिवशी आमचे दैव की  दुर्दैव, जोरावर होते हे सांगता येत नाही? पण आफ्रिकन गेंड्याचे दर्शन झाले, ते करताना गुजरलेल्या भयानक संकटातून शेवटी आम्ही सही सलामत बाहेर आलो, म्हणून त्यावेळी आमचे नशीबच जोरावर होते असे म्हटले पाहिजे!!

      आम्ही पुढे जात होतो.थोड्याच वेळात रस्त्यापासून थोडे दूर,काही अंतरावर ,ड्रायव्हरला, पाणथळ जागेत  काळ्या मातीसारखा भाग, पाण्यावर हलताना दिसला. त्याच्या अनुभवी नजरेने, तेथे निश्चितच कोणता तरी प्राणी असावा ,हे हेरले.त्या आनंदाच्या व उत्साहाच्या भरात,  जवळून पाहण्यासाठी त्याने आमची जीप रस्ता सोडून, त्या डबक्याजवळ नेली.. बस्स, तेवढ्या आवाजाने ते जनावर सावध झाले आणि पटकन पाण्याबाहेर येऊन त्याने आमच्या जीपवरच धडक घेतली… होय तो आफ्रिकन एक शिंगी काळा गेंडाच होता.. चवताळला होता!  ड्रायव्हरने चपळाई दाखवून गाडी झटक्यात मागे नेल्यामुळे आम्ही वाचलो. गेंड्याने त्याचा नियम पाळला. तो रस्त्यावर आला नाही,हे आमचे नशीब!गेंड्याचे दर्शन अशा रीतीने झाले हे खरे, पण आमच्याकडून एक मोठी गफलत झाली होती.. जंगलचा कानून आम्ही तोडला होता ! गेंड्याच्यी किंकाळी व आमच्या गाडीच्या इंजिनचा कर्कश आवाज, दोन्ही कुठेतरी नोंदले गेले होते! मला वाटते जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने ही माहिती वनरक्षकाच्या जीप पर्यंत पोहोचविली होती.. आणि केवळ पाचच मिनिटात लाल दिव्याची गाडी, प्रकाशाचे झोत,सिग्नलचे भपकारे सोडीत,  आमच्या जीप समोर येऊन उभी राहिली!! प्रत्यक्ष कर्दनकाळच जणू आमच्यासमोर उभा ठाकला..

    तो एक गोरा इंग्रज वनरक्षक अधिकारी होता. त्याने गाडीतून उतरून प्रथम आमच्या ड्रायव्हरचे ड्रायव्हिंग लायसन्स व आमचे सर्वांचे पासपोर्ट जमा केले. आपल्या जीप मागून येण्याची सूचना आम्हाला केली. त्याची गाडी पुढे निघाली,आम्ही त्याच्या मागून !आम्हाला अजून भावी संकटाची कल्पना तेवढी आली नव्हती. पण आमच्या ड्रायव्हरला ती कल्पना आली होती. आपल्या मोडक्या तोडक्या इंग्रजीत तो एकच वाक्य म्हणत होता.. “I am finished..I am finished..”मी मेलो..

       आम्ही पार्क बाहेर आलो. एका बराकवजा इमारती समोर गाडी उभी करून त्या रक्षकाने आम्हाला जीपमध्येच थांबण्यास सांगितले. स्वतः ड्रायव्हरला घेऊन आत गेला.त्या बराकीवर,”सफारी पार्क कोर्ट”, अशी पाटी होती. आमचे आफ्रिकेतील मित्र श्री साठे यांनाही आता पुढे काय होणार याची कल्पना आली होती. “अशा प्रकारे वन्यजीवन कायदा मोडल्या नंतर, तुम्हाला तुरुंगाची ही शिक्षा होऊ शकते. ड्रायव्हरचे तर लायसन्स जप्त होईल” असे ते म्हणाले. सौ.साठे देखील काळजीत पडल्या.  काही शिक्षा झाल्यास त्यांना आफ्रिका सोडावी लागली असती. आमच्या डोळ्यासमोरही काजवे चमकले.आज संध्याकाळचे, नैरोबी जकार्ता विमान चुकले, तर ऑफिसला काय जबाब द्यायचा? आमच्या पुढे मोठा अनावस्था प्रसंग होता. मी सरकारी अधिकारी होतो व काही कारवाई झाल्यास आमच्यासाठीही अनावस्था प्रसंग ओढवला असता. फक्त परमेश्वराचा धावा आम्ही करीत होतो.ड्रायव्हर तरच काही बोलतच नव्हता…

     सुमारे 40,45 मिनिटानंतर तो सुरक्षारक्षक बाहेर आला. आमचे पासपोर्ट आमच्या हातात देत त्याने आम्हाला तंबी दिली,” तुम्ही परदेशी आहात म्हणून तुम्हाला आम्ही माफी करीत आहोत. मात्र या ड्रायव्हरचे लायसन्स एक वर्षासाठी आम्ही जप्त केले आहे”. त्याला एक चलान देऊन, त्या दिवसा पुरते, गाडी चालविण्यास परवानगी दिली होती. 

         एका महान संकटातून आमची बालंबाल सुटका झाली होती. या प्रसंगाने आम्ही सगळेच मोठा धडा शिकलो..” परदेशात असताना कधीही, तेथील कोणताही कायदा भंग होईल, असे वागता कामा नये. तशी संधीही घेता कामा नये!!”

    या सर्व प्रकरणात आणखीही एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे ब्रिटिश लोकांचे व्यवस्थापन कौशल्य!! त्या पार्कमधील वन्य प्राण्यांची सुरक्षितता, पर्यटकांना पुरविलेल्या सुविधा, नियमांचे काटेकोर पालन व स्वच्छ पारदर्शक कारभार. अन्यथा बाहेर एवढी अनागोंदी अनावस्था असताना या अभयारण्यात मात्र इतका चोख व्यवहार होत होता!!

    पुढे भारतात आल्यावर, माझा भाचा आशुतोष सावे यांने ही  रोमांचकारी हकीकत ऐकून मला मुंबई आकाशवाणीवर एक छोटे भाषण देण्यासाठी बोलविले होते. तो स्वतः दूरदर्शन व आकाशवाणीवर निवेदक असल्याने, मला ही संधी मिळाली. परिचितांना हे भाषण आवडल्याचे त्यांनी मला कळविले होते.

रात्रीच्या प्रकाशात झगमगते जकार्ता शहर

  जकार्ता-इंडोनेशिया: संध्याकाळी नऊ वाजताचे नैरोबी-जकार्ता विमान आम्हाला व्यवस्थित मिळाले. विमान वेळेवरच होते. दहा तासाची ही विमानाची सफर होती. आंतरराष्ट्रीय वेळेप्रमाणे जकार्ता,नैरोबीच्या चार तास पुढे असल्याने,सकाळी  सुमारे अकरा वाजता आम्ही जकार्ता विमानतळावर उतरलो.  हॉटेलची गाडी आली होती.

    गंमत म्हणजे आणखीनही एक व्यक्ती आमच्या नावाचा फलक घेऊन विमानतळावर आमचा शोध घेत होती. त्या व्यक्तीकडे चौकशी केल्यावर,आम्ही  मुलाखतीसाठी बोलाविलेल्या उमेदवारापैकी एकाने  ही व्यवस्था केली होती असे कळले.आम्हाला खूश करण्याची संधी, विमानतळावरच घेण्याचा त्याचा इरादा होता. अर्थातच आम्ही ती मदत नाकारली.  हॉटेलच्या गाडीतून हॉटेलवर पोहोचलो.

    हॉटेलवर जाऊन विश्रांती घेतली व त्वरितच मुलाखतींना सुरुवात केली. पाच-सहा उमेदवार होते.मात्र कोणत्याच उमेदवारा मध्ये आम्हाला वितरक म्हणून योग्यता वाटली नाही.  येथे त्या काळी लष्करी राजवट असल्याने, दोन उमेदवार,कोणा जनरल साहेबांचे शिफारस पत्र घेऊन आले होते. या तेलाचे धंद्यात अगदी नवखेच होते. त्यामुळे मोठ्या हुशारीने त्यांना नाकारावे लागले. 

   एक उच्चभ्रू  मॅडम ही मुलाखतीसाठी आल्या होत्या. त्यांनी आम्हाला ” पैशाची काळजी करू नका ,तुमच्या मालाचे पैसे मी आधीच पाठवून देईन, नंतर तुमचा माल निर्यात होऊ दे”, अशी खूप ऊदार ऑफर दिली होती. मात्र त्यांची एकूण ‘गुणवत्ता’पाहून ,आम्ही त्यांना सन्मानाने नकार दिला.

    नेहमीची पद्धत, म्हणून दुसरे दिवशी काही उमेदवारांची कार्यालये, गोडाऊन,फॅक्टरी वगैरे पाहून आलो. कशाचाच कुठे मेळ बसत नव्हता.

आपल्या कोकणाप्रमाणेच,लाल मातीत केळी नारळ, पिकविणारे इंडोनेशियन शेतकऱ्याचे घर.जकार्ता.

      जकार्ता मधील एका टेक्स्टाईल कंपनीला आम्ही माझगाव प्लांट मधील ,काही लुब्रिकंट निर्यात करीत होतो. त्या फॅक्टरीतही जाऊन यावयाचे होते. ही केवळ सौजन्य भेट होती .तिसरा दिवस संपूर्णपणे त्यात गेला . जकार्ता पासून चार तासाच्या ड्राइव्ह वर ही फॅक्टरी होती . त्यांच्या काही शंकांचे निरसन करून आम्ही दुपारी तिथून निघालो.आम्ही मंडळी खास भारतातून त्यांना भेटावयास आलो,याचेच त्यांना खूप अप्रुप वाटले.  या प्रवासादरम्यान जकार्ता शहराबाहेरी इंडोनेशियन खेड्यांचे रम्य दर्शन झाले. मला भारताचीच आठवण झाली. विशेषतः आमच्या वसई भागात ज्या प्रकारे केळ्यांची लागवड होते, या भागातही भरपूर केळी होतात. शेतकऱ्यांच्या झोपड्याही तशाच.  गरिबी, दैन्यही तसेच. सर्वत्र तांबडी माती ची जमीन होती.  शेतकरी, तो भारतातला काय इंडोनेशियातला काय त्याच्या नशिबी विपन्नताच! 

     आमच्या सुदैवाने,डाॅ. जयंतराव पाटील यांचे चिरंजीव,श्री. दीपक पाटील त्याच वेळी जकार्तामध्ये व्यवसायानिमित्त वास्तव्यास होते. दीपक यांचा आम्हाला खूप उपयोग झाला. जकार्तामधील एकंदरीत औद्योगिक व राजकीय परिस्थितीचे आकलन होण्यात व त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आम्हाला  त्यांची मदत झाली.त्यांचेबरोबर आम्ही शेवटचे दिवशी संध्याकाळी जकार्ता शहरात फेरफटका मारला. रात्रीचे भोजन ही घेतले. 

      जकार्ता शहरात फिरताना, जणू ,हे एखाद्या हिंदू राष्ट्रातील शहर आहे असे जाणवते. कारण शहरात ठीक ठिकाणी, मुख्य चौकात, आपल्या महाभारतातील अनेक दृश्ये चित्रित अथवा शिल्प स्वरूपात साकारलेली आहेत. खरे तर, 90% मुस्लीम लोकसंख्या असलेले हे राष्ट्र आहे. येथील बाली बेटावर तर प्रत्येक वर्षी एक मोठा रामायण उत्सव होत असतो व तेथे रामायणाची कथा नाट्यरूपाने सादर केली जाते, हे माहित होते. मात्र राजधानी जकार्ता शहरात, हिंदू संस्कृतीची एवढी जतन केली असेल केले असेल,हे पाहिल्यावरच खरे वाटले 

  दीपक यांनीही याबाबतीत आम्हाला खूप माहिती दिली. हजारो वर्षांपूर्वी आमचे पूर्वज, सागरी मार्गाने इंडोनेशियात व्यापारासाठी आले होते.त्या मुळे,या प्रदेशात आमच्या संस्कृतीचा प्रसार झाला.धर्म बदलला तरी हिंदू संस्कृती आजही येथे टिकून आहे.येथील भाषा,स्थापत्य, दंतकथा व लोकांचे रीती रिवाजा वर, भारतीय संस्कृतीची छाप आहे .इंडोनेशियन राजभाषेवर संस्कृतचा पगडा असून त्या भाषेचे नाव, “बहासा इंडोनेशिया”, असे आहे. येथील पुराण्या राजवंशांची नावे देखील 

श्रीविजया, गजाह-मधा, अशी आहेत.

    भारतीय व्यापाऱ्या नंतर ,अनेक वर्षांनी मुस्लिम धर्मप्रसारक येथे आले व त्यांनी धर्माचा प्रसार येथे केला. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे येथील साध्या,सरळ मार्गी जनतेचे  धर्मांतर ,करून आजचा मुस्लिम बहुल इंडोनेशिया तयार झाला आहे.

    नुकतीच तेथे राजकीय उलथापालथ होऊन गेली होती. अमेरिकन वकिलातीसमोर बरीच जाळपोळ व नुकसान झालेले दिसले.लोकांनी धर्म बदलला, पण संस्कृती तीच राहिली. धन्य त्या आमच्या भारतीय पूर्वजांची !!

   जकार्ता आंतरराष्ट्रीय विमानतळ (खालील चित्र). वर, जकार्तामध्ये,चौकात, महाभारतातील प्रसंगांची काही शिल्पे. हिंदू धर्माचा प्रभाव  या देशावर किती आहे हे दर्शवितात ! 

    असे असले तरी एकंदरीत कायदा व सुव्यवस्था केनिया पेक्षा जकार्तामध्ये आम्हाला बरी वाटली.येथे आम्ही दिवसा व रात्रीही विनासायास फिरू शकत होतो.

  खरे तर येथे पेट्रोलियम उद्योग धंदा बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.’पेट्रोमीना’,ही इंडोनेशियाची राष्ट्रीय तेल कंपनी आहे.  जगात बऱ्यापैकी तिचे नाव आहे.मात्र राजकीय अस्थिरतेमुळे येथे भारतीय कंपन्या तेल उद्योग करू इच्छित नाहीत. आमच्या आधीही कोणत्याच भारतीय कंपनीने येथे प्रयत्न केले नव्हते. आम्ही देखील प्रत्यक्ष पाहणी नंतर हा विचार सोडून दिला. येथील जकार्ता येथील भारतीय वकिलातीनेही आम्हाला तसाच सल्ला दिला होता. येथेही भारतीय वंशाची मंडळी उद्योग क्षेत्रात बरीच आढळली.

    हनोई-व्हिएतनाम: आता जकार्तामधील तीन दिवसाची मुदत संपली होती. कामे  विशेष समाधानकारक झाली नव्हती.आता पुढील इच्छित स्थान होते हनोई- व्हिएतनाम. दीपक भाईंचा निरोप घेतला. सुमारे नऊ वाजण्याचे सुमारास जकार्ता विमानतळावर आलो.जकार्ता-हनोई विमान प्रवास सुमारे सात तासांचा होता. दोन्हीही शहरांची आंतरराष्ट्रीय वेळ एकच आहे.त्यामुळे संध्याकाळी पाच च्या सुमारास आम्ही हनोई विमानतळावर उतरलो.आमच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या उमेदवार अर्जदारास आम्ही त्या शहरातील चांगले हॉटेल बुकिंग करणे, विमानतळ ते हॉटेल तसेच शहरात फिरण्यासाठी कार व्यवस्था करणे, अशी स्थानिक कामे सोपवीत असू. त्यामुळेच ही कामे व्यवस्थित होत असत.  पुढे ही सर्व बिले आम्हीच अदा करित असल्याने कोणाची भीड बाळगण्याचेही कारण नसे.

     विमानतळावर उतरल्यावर आम्हाला काही  डॉलर्सचे, व्हिएतनामी चलनात रूपांतर करून घ्यायचे होते. फक्त शंभर डॉलर दिल्यावर आम्हाला दहा लाख व्हिएटनामी  रुपये बहाल करण्यात आले. आता एवढे रोख पैसे खिशातून घेऊन फिरणे जोखमीचे होते. कारण येथे चोरा-चिलटांचीही खूप भीती होती. मात्र इलाज नव्हता. त्यांच्या चलनाची घसरणच एवढी झाली होती की बाहेर गेल्यावर एक 

पायमोजा ची किंमत विचारली ती हजार वेतनामी रुपये सांगण्यात आली .यावरून चलन वाढीमुळे  एकंदर सामाजिक जीवन व कौटुंबिक जीवन किती अस्थिर झाले होते याचीही कल्पना आली! पुढे त्याचे प्रत्यक्ष प्रत्यंतर ही आले!!

    पहिल्या दिवशी काही कामे झाली नाहीत. दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये मुलाखतीचा कार्यक्रम होता.सकाळी दहाचे सुमारास आम्ही ब्रेकफास्ट आटोपून ,आमच्या रूममध्ये तयारी करीत असताना हॉटेलच्या लॉबी मधून मला फोन आला “आपणास भेटण्यासाठी दोन मुली, रिसेप्शन मध्ये आलेल्या आहेत , त्यांना आम्ही आपल्या खोल्यांत पाठवू का?”

    मला थोडी शंका आली व मी स्वतःच खाली स्वागत कक्षात आलो.दोन तरुण ,सुंदर ,व्हिएतनामी मुली,पुष्पगुच्छ घेऊन आमची वाट पाहत होत्या.

“काय काम आहे?”विचारल्यावर म्हणाल्या. “अमुक अमुक कंपनी तर्फे आम्हाला आपल्या स्वागतासाठी पाठविले आहे. आम्ही, एका एका खोलीत येऊन आपले, स्वागत करू इच्छितो. मी आपल्या खोलीत येते माझी मैत्रीण श्री महेश यांच्या खोलीत पुष्पगुच्छ देण्यास एजाईल.”

    स्वागताचा असा प्रकार अजून पर्यंत कुठे अनुभवला नव्हता. मनात काही शंकाआल्या.

लॉबी मॅनेजरच्या चेहऱ्यावरील भाव काही वेगळेच सांगत होते. मला परिस्थितीची पूर्ण कल्पना आली.  पुष्पगुच्छ घेऊन,थँक्यू म्हणून, दोघींनाही तेथूनच परत पाठवून दिले. पुष्पगुच्छ घेऊन खोलीत आलो. महेश यांनाही सर्व कथा सांगितली. त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. व चीड आली. 

   व्यवसायात प्रगती करण्यासाठी,अशा प्रकारे लालूच दाखविणे, भ्रष्टाचारी मार्ग अवलंबन करणे, येथील नित्याचाच प्रकार आहे, व्यवसायाचाच तो एक भाग आहे,असे नंतर समजले. शांत राहून, इष्ट तेेच करणे हाच येथे शहाणपणाचा मार्ग होता.

ईंडोनेशीयातही थोडीशी झलक मिळाली होती.

    त्या कंपनीचा मॅनेजर पुढे मुलाखतीसाठी आल्यावर त्यालाही आम्ही व्यवस्थितपणे, पण न दुखवता, वाटाण्याच्या अक्षता लावल्या ,हे सांगणे नलगे !

हनोई शहरात व एकंदरीत व्हिएतनाम, देशात दुचाकी वाहनांचा सुळसुळाट दिसून येतो.

    हनोई शहरात फिरताना या शहरातील रंगेल संस्कृतीची कल्पना आली होती. जगातील गुलछबू लोक येथे मजा करण्यासाठी येत असतात. चांगल्या वस्तीतील कांही घरावर,” एका दिवसासाठी सोबत करण्यास, मैत्रिण मिळेल” अथवा,”येथे गृहिणी कडून आपणास खास व्हिएतनामी मसाज केली जाईल..” अशा सूचक अर्थाच्या पाट्या वाचल्या होत्या!! त्याचा अर्थबोध प्रथम झाला नाही. या अनुभवा नंतर मात्र अर्थबोध झाला. सावधता बाळगणे हाच उपाय होता. काही दिवसापूर्वीच एका जबरदस्त संकटातून आम्ही बाहेर आलो होतो. 

   सरकारी कंपनीच्या कामासाठी फिरताना अशी अनेक प्रलोभने परदेशात व देशात आम्हाला टाळावी लागली. त्याही कथा वेगळ्याच आहेत!!  परमेश्वरी कृपेने  अशी प्रलोभने व गैर मार्गांनी होणाऱ्या धंद्यापासून ,आम्ही सतत दूर राहिलो ,हे सांगताना आज खूप बरे वाटते मात्र त्यावेळी मोह आवरणे खूप कठीण असते ..!

       मुलाखती झाल्या .आलेल्या उमेदवारांतून  कोणी अपेक्षीत,गुणवत्ता प्राप्त उमेदवार दिसले नाहीत. त्यामुळे आम्हीही नाराज झालो. तरी दोन उमेदवारांची प्रत्यक्षात चाचपणी करण्यासाठी,दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काही उमेदवारांच्या कार्यालयात गेलो. तेथे अगदी वेगळे चित्र दिसले .त्यांचा पेट्रोलियम उद्योगाशी सुतारामही संबंध नव्हता. खोटी माहिती ठोकून दिली होती. सर्व काही’मॅनेज’करता येते ,हाच येथील व्यवसायाचा गाभा म्हटल्यानंतर,हेच अपेक्षित होते.

   एक महिला उमेदवार होत्या. त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांनी आमचीच शिकवणी  सुरू केली. 

   “तुम्ही माझी  निवड करा. संपूर्णपणे निर्यातकर(Import Duty), कसा वाचवावयाचा ते मी पाहते.त्यामुळे आपल्याला एच पी सी चे प्रॉडक्टस् खूप स्वस्त किमतीत विकता येतील.भरपूर खप होईल. फायद्यातील काही टक्के  मी आपणा दोघाशी  शेअर करत जाईन… “वगैरे मुक्ताफळे ऐकून आम्ही तर गारच झालो…

   भारतीय दूतावासात झालेल्या भेटीतही आम्हाला ” खूप वाव असला तरी सरकारी कंपनी म्हणून येथे उद्योग करण्याचे शक्यतो टाळा “, असाच सल्ला मिळाला.

    त्यामुळे व्हिएतनाम सध्या तरी विचार करू नये असे ठरविले. त्याप्रमाणे आमच्या मॅनेजमेंटशी देखील आम्ही बोलून घेतले.निवडीची प्रक्रिया थांबवली. 

     व्हिएतनाम मध्ये हनोईत असताना, येथील व्हिएतनाम युद्धाचे हिरो, हो चि मिन्ह,यांच्या स्मृति मंदिराचे दर्शन घेण्याची इच्छा होती. जनतेने व सैन्याने त्यांचेवर अफाट प्रेम केले. आजही त्यांच्या मृतशरीराची रासायनिक प्रक्रिये द्वारे जपणूक करण्यात आली आहे. नागरिकांनाव पर्यटकांना ते पाहता येते. या शहरात जास्त न फिरण्याचा आम्ही निर्णय घेतल्याने, तो बेत रद्द केला.

  व्हिएतनामचा स्वातंत्र्य योद्धा, माजी पंतप्रधान, हो ची मीन्ह.

   हो ची मिन् यांचे विषयी माझे मनात खूप आदर आहे. त्यांची एक गोष्ट मी वाचली होती. शक्तिमान अमेरिकी सैन्याशी अनेक वर्षे लढून शेवटी विजय मिळवणारा हा स्वातंत्र्य योद्धा,आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानित असे. “व्हिएतनामी  सैन्याने शिवछत्रपतींचा, ‘गनिमीकावा’  अवलंबन केल्यानेच, आमचा विजय झाला”,असे ते जाहीरपणे सांगत. भारत भेटीवर आले असताना त्यांनी खास रायगडावर छत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेण्याचा इरादा व्यक्त केला होता. रायगडावरील मूठभर माती व्हिएतनामला घेऊन गेले होते.

    युद्धात जरी, बलशाली अमेरिकन सैन्य  व्हिएतनामी सैन्याला,हातबल करू शकले नाही, तरी या युद्ध कालखंडात,जनतेची उपासमार झाली, खूप परवड झाली. विजयापेक्षा पोटाची आग प्रभावशाली ठरली. विजय मिळविला तरी,त्या कालखंडात समाजाचे जे नैतिकपतन झाले त्याला सीमा नाही .काही अनुभव मी वर दिले आहेत. अनेक अनुभवावरून , शहरात फिरताना ,आम्हाला याची कल्पना आली. त्या गोष्टी येथे लिहिता येण्यासारख्या नाहीत. व्हिएतनामी समाजाला अजून खूप काही मिळवावयाचे आहे.

  व्हिएतनाम, खेड्यातील भाताची लागवड आपल्या गावाची आठवण करून देते.

    हनोईत  थोडेफार फिरणे झाले.शहराच्या नजीक भात शेती पिकविणारी खेडी आहेत. भारतीय वातावरण व भारताच्या भौगोलिक परिस्थितीशी खूप साम्य वाटले. भात-शेताची लागवड करणारा व्हिएतनामी शेतकरी भारतीय शेतकऱ्याचेच  प्रातिनिधिक रुप वाटले. दुचाकी वाहनांचा सुळसुळाट आहे. बेरोजगारी अगदीच कमी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरीक दोन वेळा खाऊन पिऊन तरी सुखी आहे.

     हनोईमध्ये असताना आम्हाला जेवणासाठी, एका कारवारी भारतीय गृहस्थाचे हॉटेल मिळाले. त्यामुळे सुंदर भारतीय अन्न मिळत असे. हा गृहस्थ  आपले व्हिएतनाम मधील दीर्घ वास्तव्य व उद्योगातील अनुभव आम्हाला सांगत असे.,भ्रष्टाचाराच्या व येथील रंगेल समाज- जीवनाच्या अनेक सुरस गोष्टी कळल्या. आमचे अनुभव ही त्याला सांगितले. त्याने आमचे कौतुकही केले.सावधानतेने येथील कामे करण्याचा इशारा दिला.

     बॅन्काॅक: आता मुंबईस परत जाण्याचे वेध लागले होते. मात्र हनोई- मुंबई असे विमान नसल्याने, हनोई-बँकॉक व बँकॉक-मुंबई असा प्रवास होता.त्याप्रमाणे हनोईला आम्ही पहाटेचे विमान पकडले. दोन तासाची सफर होती.मला वाटते दहाचे सुमारास आम्ही बँकाॅक विमानतळावर पोहोचलो.येथे आम्हाला आमचे एक फ्रेंच मित्र भेटणार होते.

‘ हिंदुस्तान कोलास’,या फ्रान्स च्या ‘कोलास कंपनी’ बरोबरील आमच्या भारतातील संयुक्त उपक्रमाशी (Joint Venture) ते संबंधित होते.

विमानातून बँकॉक शहराचे विहंगम प्रेक्षणीय दृश्य

        हॉटेलवर पोहोचवून त्यांनी आम्हाला ‘बँकॉक सिटीदर्शन’ ची दोन तिकीटे दिली.अर्ध्या दिवसाची ही ट्रीप होती. बँकाॅक मधील प्रसिद्ध  ‘पहुडलेला बुद्ध'(Reclining Budhha)हे मंदिर पाहिल्याचे आठवते. सोन्याचा मुलांना दिलेली, बुद्धाची विश्रांती घेत जमिनीवर आडवी झालेली भव्य मूर्ती पाहून आपण  अचंबित होतो.त्याचप्रमाणे दोन प्रसिद्ध प्राणी संग्रहालये Zoo) पाहिली. खूपच प्रेक्षणीय व विविध प्रकारच्या प्राणी, पक्षी संग्रहाने भरलेली होती.

    जेवणाचे वेळेस एका कृत्रिम मोती,(cultured Pearls)  बनविणाऱ्या कारखान्यात भेट देऊन तेथे काही मोत्यांची खरेदी केली. अतिशय सुंदर झळाळी असलेले ते मोती  घेण्याचा मोह कोणालाही झाला असता?

    बँकोक बुद्ध मंदिरातील पडलेल्या बुद्धाची सुवर्णमूर्ती

    हे असे मोती तयार करण्याची शेती बँकांमध्ये होते. त्यासाठी समुद्रातील कालवे पकडून (Oysrer), त्यात विशिष्ट प्रकारचे सामुद्रिक बीज सोडतात. त्याच शिंपल्यात, नशीब असल्यास,मोती तयार होतो. अतिशय जोखमीचा धंदा आहे.दैवावर अवलंबून असलेला धंदा आहे. कधीकधी ही संपूर्ण मेहनत फुकट जाते व काहीच फायदा न झाल्याने व्यवसाय करणारा कफल्लक ही होतो.

  त्या फॅक्टरीच्या प्रांगणातील खानावळीतच जेवण घेतले.  

विविध आकाराचे,कमी जास्त झळाळी असलेले, मोती..

   दुपारच्या विश्रांतीनंतर थोडा वेळ हॉटेलमध्येच आराम केला.  फ्रेंच मित्राने,आमच्यासाठी बँकॉकच्या प्रसिद्ध,’नाईट लाईफ शो’, पाहण्यासाठी एका कार्यक्रमाची तिकिटे काढली होती. अशा,”शो”, बद्दल आम्ही ऐकून असल्याने, तेथे जाण्याची आमची इच्छा नव्हती. मागील अनुभव ताजे असल्याने परत कोणताही धोका पत्करण्याची तयारी नव्हती. आपण कशासाठी आलो आहोत, हे पक्के ध्यानात होते .हे गृहस्थही आमच्याबरोबर येणार होते . त्यांनी जवळजवळ बळजबरी केली. ते आमच्या व्यवसायाशी निगडित असल्याने, आमचे व्यवसाय बंधू व आमच्या कंपनीशी संबंधित असल्याने ,त्यांना दुखावणे ही जीवावर आले.

    “अरे पुन्हा तुम्ही कधी बँकॉक ला येणार? आणि मी बरोबर असताना तुम्हाला काय काळजी आहे?”

    आम्ही जावयास राजी झालो. धीर केला. पॅरिस मध्ये असताना आम्ही मागे अशा कार्यक्रमांची झलक पाहिली होती. 

    बँकॉक मधील या ‘शो’ मध्ये ‘सर्वकाही’ उघडपणे दाखविले जात होते. मानवी, स्त्री-पुरुष संबंधातील काही व्यवहारांचे नाटकीकरण करून, उघडपणे स्टेजवर प्रकटीकरण होत होते. कलासक्तता कुठेच नव्हती. होता तो बिभत्सपणा,ऊथळपणा.बहुतेक उपस्थित मंडळी  टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होती. गंमत म्हणजे उपस्थित मंडळीत, विशेष करून भारतीय होते. धनिक भारतीय स्त्री वर्गही उत्साहाने शामिल होता. आश्चर्य व वाईटही वाटले. आमचा उच्चभ्रू भारतीय समाजाला, कोणत्या प्रकारचे मनोरंजन आवडते याची कल्पना आली.

    पुन्हा,’न घेण्यासारखा’,घेतलेला एकअनुभव, असे समजून आम्ही त्या कार्यक्रमाची रजा घेतली.

   जगातील बरीच रंगेल मंडळी बँकॉक मधील ‘नाईट लाईफ’ अनुभवण्यासाठी येथे येतात.

    दुसऱ्या दिवशी पहाटे बँकोक-मुंबई विमान पकडून मुंबईत परत आलो. एका मोठ्या दौऱ्याची यशस्वी सांगता झाली.

     पुढे सन 2002 मध्ये, पुन्हा एकदा बँकाॅकचा दौरा करावा लागला. यावेळेस मी व महेश सोबत श्री.अनील भान  हे आमच्या संशोधन विभागाचे प्रमुख ही बरोबर होते. मागे म्हटल्याप्रमाणे,’हिंदुस्तान कोलास’ या फ्रेंच कंपनीच्या बरोबर, भारतातील आमच्या संयुक्त उपक्रमा(JV) मुळे, थायलंड मधील,’थाय-कोलास’ कंपनीशी आमचा पत्रव्यवहार चालू होता. त्या कंपनीला लागणारी वंगणे( लुब्रिकंट्स) आम्ही भारतातून द्यावी असा प्रस्ताव आम्ही  दिला होता. त्या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या कंपनीने आम्हास तेथे बोलाविले होते. आम्ही पूर्ण तयारीनिशी येथे गेलो होतो. एक अभ्यासात्मक टिपण, प्रेझेंटेशन, बनवले होते. त्यात थायलंड मधून इतर कंपन्यांची वंगणे वापरण्यापेक्षा, भारतातून, एच पी सी एल ची वंगणे आयात केल्यास, आमचे उत्पादन दर्जेदार असूनही, कसे स्वस्त असेल, याची संपूर्ण माहिती दिली होती. ‘थाई कोलास’, च्या अधिकाऱ्यांना ते मान्य झाले. हा व्यवहार  हिंदुस्थान पेट्रोलियमशी करण्याचे ठरले. 

    त्याप्रमाणे एक कच्चा सामंजस्यकरार,(Draft MOU),आम्ही तेथेच तयार करून,संबंधितांच्या सह्या घेऊन भारतात परत आलो. सुमारे 6000 मॅट्रिक टन वार्षिक एवढा विशाल  क्षमतेचा हा व्यवहार होता.आम्ही निश्चितच आनंदी झालो. आमच्या मॅनेजमेंटनेही धन्यवाद दिले. आमच्या कंपनीला,प्रथमतःच एका परदेशी कंपनीकडून एवढा मोठा निर्यात व्यापार(Export), करण्याची संधी मिळाली होती.

   या वेळेला कोणताच सांस्कृतिक कार्यक्रम बघण्याचा इरादा नव्हता विशेष कोठे फिरलो हे नाही दोन दिवसाची ही ट्रीप लवकरच आटोपती घेतली.

     पुढे थोडेच अवधीत, मी हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन, या एका महान जागतीक कंपनीच्या सेवेतून सेवा-निवृत्ती घेतली. कारकिर्दीच्या अखेर माझ्या या ‘अन्नदात्या’, कंपनीसाठी ,शेवटच्या कार्यकालांत, काहीतरी उपयुक्त काम करीत असल्याचे समाधान घेऊन, मी माझ्या  आस्थापनाची व सहकाऱ्यांची रजा घेतली.

   हे काम सुरू झाले खरे, मात्र जेवढा पाठपुरावा करावयास हवा तो झाला नाही. आमच्या तेलशुद्धीकरण कारखान्याकडून,(रिफायनरी) अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. ही निर्यात थोडे दिवसातच बंद पडली. सरकारी कंपन्यामध्ये आपापसातील हेवेदावे, कंपनीचे किती नुकसान करतात,याचे हे एक ज्वलंत उदाहरण!!

    हा प्रवास करून आज अनेक वर्षे झाली.फावला वेळ मिळतो आहे,व आठवणींची टिप्पणे होती,,त्यामुळे हे लेखन आज एवढ्या वर्षांनी करू शकलो. 

    आत्ता हे सर्व आठवताना व घडून गेलेल्या त्या प्रसंगांचा विचार करताना ,काही प्रश्न मनांत उभे राहिले. त्यांची नोंद घेऊन, त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो आहे.

   आफ्रिका खंडाच्या केनिया मधील, त्या जंगल सफारीत आलेले अनुभव खूप अंतर्मूख  करून गेले.  त्या ब्रिटिश  वनरक्षकाने, ईमाने-इतबारे बजावलेली कामगिरी, हा त्याच्या नोकरीचा एक भाग म्हणून त्यांने केले. त्यात कोणताही अभिनेवेश नव्हता. आमच्यासारख्या,नियम मोडणाऱ्या, प्रवाशाकडून, त्याला सहज काही डॉलर्स मिळू शकले असते. त्यापेक्षा आपले कर्तव्य व आपल्या देशाची प्रतिष्ठा त्याला महत्त्वाची वाटली. हे पाहिल्यावर वाटते, निष्ठावान माणसे नोकरीसाठी आयात करता येतील ,पण प्रामाणिक व चोख राज्यकारभार चालवण्यासाठी, राज्यकर्ते, आपल्या समाजातूनच निर्माण करावे लागतील. आफ्रिका व आशिया खंडातील बहुतेक राष्ट्रांची होत असलेली दुर्दशा त्यामुळेच आहे, असे मला वाटते. निष्ठा प्रामाणिकपणा,देशप्रेम हे गुण रक्तातच असले पाहिजेत.  ब्रिटन सारखे छोटे राष्ट्र एकेकाळी आपल्या देशावर व जगातील अनेक देशावर, का राज्य करू शकले, याचा दाखला या लहान प्रसंगातून मिळाला.

    इंडोनेशियात मुस्लिम-बहुल समाज असून देखील येथे प्राचीन भारतीय संस्कृतीचे रक्षण व संवर्धन आज शेकडो वर्षे झाली तरी चालू आहे.हे कसे होते ?माणसे तीच, धर्म ही तोच, मग जगाच्या विविध भागात मुस्लीम समाजाचे वर्तन, वेगळे वेगळे का? आमच्या शेजारील देशात हिंदूंची मंदिरे प्रार्थनास्थळे राजरोज राज्यकर्त्यांच्या डोळ्यासमोर फोडली जात आहेत. मात्र जकार्तामध्ये आमच्या रामायण ,महाभारताची गौरव गाथा,चौका चौकातून, शतकानुशतके प्रदर्शित केली जाते. बाली बेटावर दरवर्षी रामायणचा उत्सव केला जातो. हे कसे घडते? शेवटी देशाचा राज्यकर्ता, राजकारणी हाच त्याला जबाबदार आहे. तेथील मुस्लिम राज्यकर्त्यांनी, ‘भारतीय संस्कृती एक राष्ट्रीय ठेवा’समजून जपली व तिचा सन्मान केला.  ज्या दिवशी जगातील सर्व राज्यकर्ते अशी धर्मनिरपेक्षता दाखवतील व जनतेतील  सामंजस्य वाढीस लावतील, त्या दिवशी तो देश व सारे जग सुखी झाल्याशिवाय राहणार नाही!

 व्हिएटनाम च्या हनोई मधील झालेले नैतिकतेचे दर्शन, मनाला विषण्ण करून गेले. पारतंत्र्यात केवळ राजकीय स्वातंत्र्यच जात नाही, तर नैतिकता व अस्मिता देखील धुळीला मिळते,हा इतिहासाचा दाखला आहे,.तेच आम्हाला तेथे प्रत्ययास आले. केवळ पोटाची खळगी भरणे, हेच समाजाचे ध्येय असेल,तर माणूस काय व इतर प्राणी काय यांच्यात काय भेद उरला? जेथे माणसे जनावरांचे धर्म पाळतात, तो समाज व तो देश कधीही भविष्यात आपले अस्तित्व निर्माण करू शकणार नाही. दोन वेळ पोट भरण्याच्या पलीकडेही मानवी अस्तित्वाला काही अर्थ आहे हे तेथील समाज बांधवांना कोण सांगणार?

     बँकाॅक दौऱ्यातून प्राप्त झालेली, मोठ्या उद्योगाची संधी, आमच्या सरकारी कंपनीने शेवटी घालवली. आपले स्वतःचे हितसंबंध, राग लोभ,स्पर्धा व बढती साठी आपल्या कंपनीच्या हिताचे नुकसान करणे, हे दुर्दैवाने, आज तरी बहुतांश सरकारी आस्थापनात दिसून येते.  अनेक वर्षे  सेवा दिल्यावर झालेले हे माझे मत आहे. कधीतरी ते चुकीचे ठरो,अशी माझी मनोमन इच्छा आहे. अनेक पाश्चात्य व अमेरिकन आस्थापनात फिरून आल्यावर तेथील अनुभव वेगळेच काही सांगतात.  आपल्या आस्थापनाला ,कोणामुळेही, कोणतीही संधी प्राप्त झालेली असो,तिचे सोने केले पाहिजे, हीच मानसिकता तेथे आढळते. याबाबत जास्त सांगण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. आपणास याबाबत काय वाटते हे वाचकांनी प्रतिक्रिया देऊन  अवश्य सांगावे.. धन्यवाद!!

  दिगंबर वा राऊत