आमचे गुरु, कल्पतरू
।। श्री गुरुदेव दत्त ।।
आप्पा म्हणजे माझे वडील, जे वा. दे. राऊत गुरुजी म्हणून त्यांच्या परीचितांमध्ये ओळखले जात. आज त्यांना जाऊन 36 वर्षे झाली. त्यांच्या या स्मुतिदिनी मी येथे अमेरिकेतील शिकागो शहरातील माझा मुलगा श्रीदत्त – त्यांचा लाडका नातू ‘बापू’ याच्या घरात, आप्पांच्या तसबिरीला प्रणाम करून आठवणींना उजाळा देत आहे. आज, १ नोव्हेंबर – आप्पांचा स्मृतिदिन ! १९८१ साली एक नोव्हेंबर रोजी आप्पा हे जग सोडून गेले. त्यांच्या स्मृतिदिनी आम्ही सर्व भावंडे व आप्पांची नातवंडे, जवळची हितचिंतक मंडळी घोलवडच्या घरी एकत्र येतो व श्रीदत्त-गुरूंच्या तसबिरी समोर बसून आप्पांच्या आवडत्या प्रार्थना म्हणतो. एकत्र भोजन करून आप्पांच्या आठवणींना उजाळा देतो. गेली कित्येक वर्षे आप्पा गेल्या पासून हा नित्य क्रम सुरु आहे. आज मात्र मी ह्या स्मृतिदिनी परदेशात असल्याने घोलवडला जाऊ शकत नाही – आप्पांच्या हा आठवणींचा, गतस्मृतींचा कल्लोळ मनात उसळला आहे – त्याला शब्दरूप द्यावे. माझ्या प्रिय वडिलांस त्यांच्या स्मृतिदिनी अक्षर-सुमने अर्पण करावीत असे वाटले म्हणून हा नम्र प्रयत्न !
आप्पांचे आमच्या जीवनातील अन्यनसाधारण स्थान रेखांकित करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एक साध्या, दमेकरी, गरीब, कोणाचे कसलेही पाठबळ नसताना व आपल्या घरांतूनच पाय ओढले जात असतांना केवळ आपले सत्व आणि स्वतःच्या बळावर आपले सबंध जीवन सार्थकी लावणाऱ्या एका महान आध्यात्मिक साधकाचे व्यक्तिमत्व व नेमकेपण शब्दात पकडणे मला शक्य नाही. जगाच्या दृष्टीने आप्पा म्हणजे ‘वामन मास्तर’, एक चारचौघांसारखी मास्तरकी करून आपल्या मुलांना मार्गी लावून या जगाचा निरोप घेतलेला एक सर्वसामान्य! या बाहेरून सामान्य दिसणाऱ्या एका कृश शरीरामध्ये वास करणाऱ्या महान आत्मतेजाची माहिती नाही व ती आप्पांची आगळी ओळख देता यावी म्हणून हा प्रयत्न.
माणसाचे मोठेपण सत्ता आणि संपत्तीमध्येच मोजणाऱ्या आजच्या व्यवहारी जगांत आप्पा जरूर एक ‘मास्तर’ पण या व्यवहारी जगापलीकडे असणाऱ्या त्या ईश्वरीय जगात आप्पा एक महान साधक होते – आणि ती साधना त्यांना वश झाल्यामुळे बाहेरून सर्व सामान्य दिसणाऱ्या या मास्तरांचे अंतरंग मात्र एका परमेश्वरी आशिष प्राप्त अशा योग्याचे होते ! आप्पांविषयी काही लिहताना ह्याच त्यांच्या महान पैलूचा उलगडा करून त्यांचे दर्शन आमच्या भावी पिढयांना करून देता आले तर पाहावे म्हणून हा प्रपंच.
मी आप्पांचा सर्वात मोठा मुलगा. त्यांचा जास्तीत जास्त सहवास आम्हा सर्व भावंडात मला मिळाला. त्यांच्या आयुष्यातील – जाणता झाल्यापासून अनेक चढ-उतार जवळून पहिले. त्यांना अनुभवावे लागलेले कौतुक व मानहानीचे अनेक प्रसंग – याचा साक्षीदार. त्यांच्या सतत आजारपणाला आराम पडावा म्हणून केलेल्या अनेक धडपडीमध्ये भागीदार आणि एक पिता, शिक्षक म्हणून त्यांच्यापासून मिळालेल्या पुण्याईचा मोठा वारसदार ! आप्पांना मी खूप जवळून पहिले. लहानपणाचा सात-आठ वर्षाचा काळ सोडल्यास त्यांच्या अखेरच्या वर्षापर्यंत मी आप्पांजवळ राहिलो. सुरुवातीला विध्यार्थी दशेत त्यांचा विध्यार्थी मुलगा, पुढे कॉलेजला शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागले तेव्हा त्यांचा शिष्य मार्गदर्शनार्थी, गृहस्थाश्रमात आल्यावर त्यांचा मित्र आणि आज त्यांच्या मृत्यूनंतर चोवीस वर्षांनीसुद्धा त्यांचा भक्त!
होय! मी आप्पांना ‘देवपण’ दिले आहे व नुसता त्यांचा फोटो माझ्या देवघरांत – रामकृष्ण, श्रीदत्तगुरु यांच्याबरोबर लावण्यांत धन्यता मानीत नाही तर माझ्या हृदयमंदिरांत जर प्रथम कोणत्या देवाची मूर्ती स्थानापन्न झाली असेल व माझी जीवापाड श्रद्धा असेल तर ती मूर्ती आहे माझ्या प्रिय वडिलांची, आप्पांची!
कै. विनोबा भावे यांनी भगवद गीतेचा मराठीत अनुवाद ‘गीताई’ म्हणून केला त्यावेळी प्रस्तावनेतील त्यांच्या त्या दोन ओळींनी माझ्या मनातही कायमचे घर केले आहे – गीतेतील शिकवणीसारखेच ! विनोबांनी लिहले आहे, “या अनुवादाचे श्रेय माझ्या आईला ! आई तू जे जिवंतपणी मला दिलेस ते त्यावेळी मला कोणीच देऊ शकले नाही. पण आई तू आज तुझ्या मृत्यूनंतर देखील आज जे मला काही देत आहेस ते आई तू मला जिवंतपणी देऊ शकली नाहीस! जिवंतपणी आपल्यावर उत्तम संस्कार करून मृत्यूनंतरही आपल्याला सदोदीत मार्गदर्शक ठरणाऱ्या आपल्या प्रिय व्यक्तीचा याहून वेगळ्या शब्दात काय गौरव करणार?”
मला स्वतःला आजही या संध्यासमयी, तीव्रतेने, मनापासून वाटते – आप्पा तुम्ही मला व माझ्या कुटुंबाला जे जिवंतपणी दिलेत ते कोणाकडूनही मला मिळालेलले नाही; पण आजदेखील तुम्हाला जाऊन पंचवीस वर्षे होत आली आहेत व तुम्ही जे काही आम्हाला देत आहात, ते तुम्ही जिवंतपणीही देऊ शकला नाहीत ! माझ्या जीवनातील आप्प्पाच्या स्थानाबद्दल सांगताना भावनांच्या कल्लोळाचे सार हे केवळ या एका वाक्यात आहे !
सानेगुरुजींनी आपल्या आईसंबंधी म्हटले आहे – ‘आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू’! खरेच जिवंतपणी आप्पा माझे गुरु होते – समोर बसवून उपदेश देणारे, प्रसंगी कान-उघडणी करणारे तर कधी फट्याक मुस्काटात देऊन कठोर शिक्षाही करणारे! पण आज आप्पा आहेत आमचे कल्पतरू!कल्पतरू कोणता? जो आपल्या सावलीत बसून मनात आलेल्या इच्छेची पूर्तता करतो, मागितलेले दान देतो. मी माझ्या पत्नीने व मुलांनी गेल्या अनेक वर्षाच्या वाटचालीत जे सत्वपरीक्षेचे क्षण अनुभवले त्या वेळी आप्पा नावाचा कल्पतरू आमच्या पाठीशी नसता तर… मला काही कल्पनाच करवत नाही!
असे अनेक प्रसंग आहेत जे वर्णन करण्यास येथे खूप कागद खर्च होतील. वानगीदाखल एकच उदाहरण पुरे – श्रीदत्त माझा मुलगा १९८९ साली बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला. गुणसंख्या कमी पडली व त्याला हव्या असलेल्या अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळवणे मुंबई-पुण्यात कठीण झाले. त्यावेळी आजच्यासारखी पेड सीट वैगरे प्रकार नव्हता, तरी ‘मॅनेजमेंट कोटा’ पद्धती होती. फी व्यतिरिक्त काही आणखी रक्कम दिल्यास कमी गुण असूनही प्रवेश देत असत. पैसे देऊन आपली योग्यता नसतानाही एखादी जागा ‘विकत घेणे’ पैशाचा खेळ करणे माझ्या तत्वाशी विसंगत होता. कारण माझ्या वडिलांचीच तशी मला शिकवण होती. त्यामुळे SSC ला उत्तम गुण मिळवूनदेखील त्यांनी मला मुंबई पुणे सोडून साताऱ्यास भाऊराव पाटीलांच्या कॉलेजत पाठवले होते. व पुढेही इंजिनीअरिंग करण्यापेक्षा “BSc कर” असा सल्ला दिला होता. मी देखील माझ्या मुलाची समजूत काढून BSc करणेच योग्य असा सल्ला त्याला दिला आणि पार्ले महाविद्यालयात प्रवेश घेऊन निश्चिन्त झालो.
मात्र विधिलिखित काही निराळेच होते. माझी पत्नी मला स्वस्थ झोपू देईना. त्याच्यासाठी काहीतरी प्रयन्त करा, कोठेतरी त्याला हव्या असलेल्या अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळेल माझे दागिने देऊन त्याची पैश्याची पूर्तता करू. अशा वाक् बाणानी तिने मला पुन्हा कामाला लावले. पुन्हा चौकशा केल्या जवळ जवळ पन्नासेक हजार रुपये अधिक दिल्यास मुंबईत जागा मिळू शकत होती. पण मला हे अजिबात मान्य नव्हते कारण तेवढे पैसे उभे करणे आम्हला त्यावेळी (१९८९ साली ) शक्य नव्हते. हिंदुस्थान पेट्रोलियम सारख्या सरकारी क्षेत्रातील मोठ्या कंपनीत मी व्यवस्थापकाच्या मोठ्या हुद्द्यावर असून ही परिस्थिती होती! शेवटी एका सद्-गृहस्थांकडून कळले कि पेण येथे कोकण एज्यूकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी कॉलेज नुकतेच सुरु झाले आहे. तेथे हव्या असलेल्या शाखेत अधिक अनुदान न देता प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. एका संमित्राच्या ओळखीने कॉलेजच्या प्राचार्य व संचालकास भेटलो. संस्थाचालकास थोडक्यात माझी व माझ्या प्राथमिक शिक्षक वडिलांची पार्श्वभूमी देखील सांगितली. कोठेतरी बर्फ विरघळते आहे असे वाटले मात्र शेवटी त्यांनी त्यांच्या फायद्यासाठीच तर कॉलेज काढले होते. शेवटी त्यांनी सहानुभूती दाखवून मला म्हटले – “ठीक आहे, तुम्ही आम्हाला कॉलेज फी व्यतिरिक्त जास्त रक्कम देऊ नका, मात्र दोन वर्षाची फी या वर्षी भरून टाका.” पंचवीस हजार रुपये भरण्याचा प्रश्न होताच. पुन्हा झोप उडाली होती धर्मसंकटच उभे राहिले. आता प्रवेश तर घ्यायला हवा पण पैसे कुठून उभे करणार? कोणाकडे जाऊन हात पसरणे शक्य नव्हते. काही आप्तेष्ट नातेवाइकांकडे शब्द टाकला असता तर थोडीफार मदत जरूर केली असती पण माझे अंतर्मन त्याला तयार नव्हते… म्हणत होते ‘नाही, ही प्रतारणा होईल! आता थोडा धीर धर’ – पण धीर किती धरणार? दिलेली मुदत जवळ येत होती, पैसे जमत नव्हते. अप्पांना ही गोष्ट कळली होती त्यांनी स्वतःहून काही रक्कम पाठवून दिली! पण तरी खूप मोठी तजवीज करायची होती. …आणि एके रात्री मला स्वप्नात आप्पा दिसले… हे लिहताना देखील माझ्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत… ध्यानी मनी स्वप्नी पैशाची जमवाजमव सुरु असताना आप्पांची ती आश्वासक वाणी ऐकू आली… ‘बेटा काळजी करू नको सर्व काही ठीक होईल’ तोच मायेने फिरणारा हात पुन्हा एकदा पाठीवर फिरला आणि एक नवी उत्तेजना घेऊन सकाळी उठलो.
चहा घेऊन पेपर वाचत पडलो होतो बेल वाजली दरवाजा उघडताच एक गृहस्थ घरात आले. म्हणाले “अमुक अमुक तुमच्या मित्राने मला हे पाकीट देऊन पाठवले आहे. त्यांना फोन करून विचारा.” चहाही न घेता गृहस्थ निघून गेले! मित्राला फोन केला म्हणाला अरे तुझ्या मुलाच्या इंजिनीअरिंग प्रवेशासाठी ही छोटी मदत, तुझा मुलगा इंजिनीअर झाला कि पैसे परत दे! काय बोलावे तेच समजेना ह्याला कोणी सांगितले मला पैशांची जरूर आहे म्हणून? तासाभराने दुसऱ्या एका परिचितांचा फोन – अरे तू पेणच्या कॉलेजात मुलाला प्रवेश घेण्यासाठी जात आहेस असे कळले, मला का बोलला नाहीस? माझी फॅक्टरी पेणजवळच आहे. मी पार्ल्यास येतो. आपण दोघे पेणला जाऊ. तुझ्याजवळ असतील तेवढे पैसे घे. उरलेल्याची सोया मी करतो आहे. … हे शब्दन शब्द सत्य आहे. लिहिताना अंगावर रोमांच आणि डोळ्यांत ओघळणारे अश्रू आहेत. कोणत्याही कार्यासाठी भगवंताचे अधिष्ठान हवे असे संत सांगतात तरच ते यशस्वी होते फलदायी होते. श्रीदत्त च्या आजच्या व्यावसायिक यशाचे अधिष्ठान हे असे सात्विक आहे आणि म्हणून ते समाधान देणारे आहे.
आमच्या पुतण्या, स्वाती-प्रीती यांनी शालान्त परीक्षेत उज्वल यश मिळविले. गुणवत्ता यादीत नाव कमावले, त्यावेळी आम्हास झालेला आनंद अवर्णनीय होता. एका पाठोपाठ एक दोन्ही बहिणींनी आमच्या कुटुंबाची यशोगाथा साऱ्या समाजांस सांगितली. या यशात त्यांच्या बुद्धिमत्तेचा, प्रयन्तांचा वाटा जरूर आहे पण त्यांच्याबरोबर त्यांच्या आप्पा आजोबांनी कधीतरी कोठे पेरलेल्या ज्ञानदानाच्या बीजाला आलेली ती सुमधुर फुले होती. हे खरे नाही काय?
आणि आप्पांचे शब्द कधी खोटे ठरले नाहीत, ठरणार ही नाहीत, कारण आमचे आप्पा आमच्यासाठी होते – “गुरु आणि कल्पतरू”!
*दिगंबरभाई, सौ. मंदा आणि गोड परिवार, हार्दिक अभिनंदन…!!!*
???
*आम्हा सर्वांना दिवाळीनिमित्त अनुपम, प्रेरक भेट मिळाली…!!!*
?
*धन्यवाद!*
??