इंग्लंड स्कॉटलंड

पॅरीस ट्रिपच्या यशस्वी नियोजनानंतर नंतर, दीप्ती-स्वातीला सर्वांनी,तशीच एक छोटी सफर सर्व कुटुंबीयांसाठी, नियोजित करावी अशी गळ घातली. त्यांनी देखील, पुन्हा एकदा ही जबाबदारी स्विकारुन सन 2018 च्या मे महिन्यात पुनःमिलनाचा योग घडवून आणला.

दादा-कंपनी, शिकागोहून लंडनला येणार होती, तर आम्ही व चौधरी मंडळी मुंबईहून हीर्थ्रोला (London’s international airport) पोहोचणार होतो. दादा कंपनी आमचे आधी लंडन विमानतळावरील ‘ हॉलीडे इन (holiday Inn)‘ या हॉटेल मध्ये, आमच्या आधी काही तास पोहोचणार होते व आम्ही काही तासांनंतर! आम्ही लंडनच्या विमानतळावर तेथील संध्या. ६ चे सुमारास पोहोचलो व हॉटेल अगदी विमानतळ परिसरांतच असल्याने, चक्क आमच्या सामान हातगाड्या ढकलत विमानतळावरून निघालो. गंमत म्हणजे हॉटेलच्या स्वागत कक्षात, चक्क मराठी पाचवारी नेसलेल्या, ह्या मराठी मॅडम भेटल्या -श्रीमती मेहेंदळे बाई, तेथेच सेवा देत होत्या, तेथे आम्हाला भरपूर टीप्स मिळाल्या!

 थकलेलो असल्याने विश्रांती घेणे पसंत केले. दुसरे दिवशी सकाळीच १० सिटर  आलिशान मिनीबस आमचे हॉटेल मध्ये, आमची चौकशी करीत आली. लंडन मधील ती सोनेरी पहाट, सूर्य किरणांनी उज्वल केली होती, त्यामुळे प्रवास सुंदर होणार होता, याची सर्वांना खात्री पटली. आमच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे  – “गणपती बाप्पा मोरया -”  च्या गजरा नंतर गाडी निघाली. दीप्ती – स्वातिने लंडन – स्कॉटलंडच्या प्रवासासाठी व पुन्हा स्कॉटलंड – लंडन परतीसाठी ही बस भाड्याने ठरविली होती, त्यामुळे आमचा प्रवास अगदी बिनधोक, ऐसपैस जागेत, सर्व सामना सहित व प्रवासाचा भरपूर आनंद घेत झाला, यात नवल कसले? सर्व कुटुंबीय एक वेगळ्याच ‘सफारी’ मूड मध्ये आहेत, फक्त आपणच आपल्या वाहनामध्ये  बसले आहोत, खाणे-पिणे व भेंड्यांचा कार्यक्रम दिलखुलास पणे चालेला आहे मग “नाही आनंदा तोटा —” अशीच स्थिति असणार! 

लंडनहून सकाळी निघून ‘स्टोन हेंज’ व ‘रोमन बाथ’ ही दोन ऐतिहासिक स्थळेपाहून पुठे जायचे व वार्विक (Warwick) या गावी संध्याकाळी पोहोचून, तेथे रात्रीचा निवास करून पुढील दिवशी पहाटे पुन्हा एडीनबर्ग Edinburgh (स्कॉटलंड) येथे प्रस्थान ठेवायचे, असा नियोजित कार्यक्रम होता.

‘स्टोन हेंज’ (Stonehenge), हे लंडन पासून सुमारे २ तासाच्या प्रवासानंतर लागणारे, ऐतिहासिक स्थळ आहे. उभ्या (सुमारे १३ फूट उंच) दगडाची वर्तुळाकार रचना असून, प्रत्येक दगड सुमारे २४ टन असावा असा अंदाज आहे. याचे ऐतिहासिक महत्व म्हणजे, अश्मयुगांतील मानवांनी ती बनविली असून, प्रत्येक दगड अजून त्याच स्थितीत उभा आहे. बहुधा त्या काळातील ही दफन भूमी असावी असे म्हणतात. इंग्लिश लोकांस या स्मारकाचा खूप गौरव असून त्यासाठी जबरदस्त सुरक्षा व्यवस्था व प्रवाशी व्यवस्था एक खास ट्रस्ट मार्फत केली जाते. केवळ एक अति-प्राचीन (सुमारे १०,००० वर्षा पूर्वी) ठिकाण हे याचे खास महत्व!

तेथून पुन्हा ३०-४० मि. प्रवास केल्यानंतर ‘रोमन बाथ’ हे दुसरे असेच ऐतिहासिक, प्राचिन स्थान असून, अवश्य भेट देण्याजोगे स्थान आहे. पूर्वी इंग्लंडमध्ये रोमन लोकांचे ही वास्तव्य होते (सुमारे १६०० सालांत) व त्या लोकांनी, सार्वजनीक स्वच्छता व स्नानगृहे म्हणून ही व्यवस्था केली. एका डोंगराळ झऱ्याचे पाणी आपल्याला हवे तसे फिरवून व थंड-गरम असे तापमान त्याकाळी देखील सूर्य किरणांचा वापर करून बनविलेली ही व्यवस्था एक स्थापत्यशास्त्र कलेचा ही उत्तम नमुना असून सुमारे १५० वर्षापासून लोकांसाठी खुली केली आहे! लंडनला भेट देणारा प्रत्येक मुसाफिर ही स्थाने जरूर पाहतो व त्यामुळे ऐवढ्या आडवळणाच्या जागी असून, जबरदस्त तिकीटदर असूनही लोक येथे भेट देतात.

दुपार झाली होती, तरी आम्ही केवळ काही खाण्याचे घेतलेले पदार्थ आमच्या बसमध्ये हादडले व वार्विक कडे प्रस्थान ठेवले. सुमारे तीन तास प्रवासानंतर, संध्याकाळी ४ च्या सुमारास आमचे वार्विक (Warwick) येथील निवासस्थान आले. वार्विक हे एक छोटे खेडे असले तरी अतिशय निसर्गरम्य असे आहे. वार्विक युनिव्हर्सिटी तर प्रसिध्द आहे, मात्र आम्हाला कोठेच बाहेर जायचे नव्हते. हॉटेलच्या अवतीभवतीचा भाग पायी फिरून ड्रायव्हरला विश्रांती दिली व आम्ही लवकरच झोपी गेलो!

दुसऱ्या दिवशीचा प्रवास वार्विक — ते जवळ असलेल्या स्ट्रॅटफोर्ड अपोन अेवोन (Stratford-upon-Avon) या अवोन नदीकाठीच्या गावी.  शेक्सपिअरचे हे जन्म-गाव व त्यांची पत्नी ऐना हैथवे (Anne Hathway) हिचे निवासस्थान हे दोन्ही बघून, सरळ एडीनबर्ग कडे गेलो.

विल्यम शेक्सपिअर (1564-1616) बाबत मी काय लिहिणार? जगातील आजवर होऊन गेलेल्या वा असलेल्या, लेखक, कवी, नाटककारांचा हा शिरोमणी! याचे बद्दल इंग्लीश लोकांचे उद्गार- “आम्ही इंग्लंडचे राज्य देऊ पण आमचा शेक्सपियर नाही” यात सर्व काही आले. सोळाव्या शतकातील हे लाकडी घर, त्याच्या वडिलांनी बांधलेले असून, दुरुस्ती केल्याने आता व्यवस्थित आहे. विशेषतः शेक्सपियरच्या ‘जन्म खोली’ मध्ये त्या भूमिच्या पद स्पर्शाने आपण पावन व्हावे हीच मोठी बक्षिसी  येथे मिळते. घर छोटेशे एक मजली आहे, बाजूला सुंदर फुलबागा आहे व खूप जुनी फुलझाडे मुद्दामहून तेथे जोपासली आहेत! आता तेथे म्युझियम तयार केले आहे. 

तेथून थोड्या अंतरावरील त्याची पत्नी  ऍनी हॅथवे (Anne Hathaway) हिचे cottage असून तेथे ही गेलो. ऍनी ही शेक्सपियरची पत्नी, त्याचे पेक्षा वयाने ८ वर्ष मोठी होती. त्यांचे वैवाहिक जीवनबद्दल व शेक्सपियरच्या लेखक – कलावंत म्हणून वाटचालीत हिचा वाटा किती, या बद्दल जास्त माहीती नाही. खरेतर ऍनी निवासस्थान (बालपणीचे), तिच्या वडीलांचे फार्म हाऊस असून सुमारे १० एकर जागेत पसरलेल्या १२ प्रशस्त खोल्यांचे हे आलिशान निवासस्थान आहे. आता तेथे ही म्युझियम असून, मोठी बाग जोपासली आहे! ही दोन्ही स्थाने पाहून खूपच कृतकृत्यता वाटली! शालेय जीवनात अभ्यास करतांना, ऐकलेले या महानभूमीचे महत्व,प्रत्यक्ष  जन्मस्थान पाहून धन्य वाटले!

तेथून पुन्हा थोडा ‘पोटोबा’ करून एडीनबर्गकडे प्रस्थान ठेवले, तेव्हा सुमारे २ वाजले असतील. प्रवास छान झाला. स्कॉटलंडचा प्रदेश लागला तेव्हा तर संध्याकाळ झाली  होती. थोडा अंधार ही पडू लागला होता, तरी माझे डोळे बसगाडीच्या, काचेच्या तावदानातून बाहेर पाहत होते- स्कॉटलंडचा ओबड-धोबड, दगडी पहाडी प्रदेश, त्याच्या पायथ्याशी असलेले पठार व कोठे तरी सपाटीवर दिसणारी भरलेली धान्याची शेते!

येथे मला भेटणार होती, ‘वर्डस्वर्थच्या ‘The Solitary Reaper’ कवीतेमधली – भात कापणारी ललना.  (The Solitary reaper) आमच्या दुग्गल गुरुजींनी आमच्यासाठी ही कविता ‘अजरामर’ केली होती व आयुष्यात कधी तरी हा स्कॉटलंड हायलॅन्ड चा प्रदेश पाहताना ती पुन्हा दिसली तर पहावी ही मनीषा होती. ती हकीकत पुढे येईलच!

संध्याकाळ झाली होती व सर्वजण दमले ही होते, मुलांनी तर गाडीतच डुलक्या घेण्यास सुरवात केली होती, एकदाचे, स्कॉटलंडच्या, एडींबर्ग शहरातील समुद्रकिनाऱ्यावरचे आमचे  Holiday inn हॉटेल आले, आमच्या तीन खोल्या ताब्यात घेतल्या व हुश्श केले! जेवणासाठी हॉटेलवर न जाता, समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या काही घरगुती खानावळीची माहीती आमच्या ‘संयोजकांनी’ आधीच मिळवली होती, त्यामुळे जवळच असलेल्या अशा एका कौटुंबीक भोजनालयात छान पैकी स्कॉटीश माशाचे, स्कॉटीश पेयासह जेवण झाले! 

पुढचा दिवस हा एडीनबर्ग किल्ला ,फोर्ट विल्यीयम, राष्ट्रीय म्युझीयम इ. दर्शन झाले. येथील पुराणे किल्ले बघतांना निश्चितच एक धन्यता वाटते की, आज ४०० ते ५०० वर्षाच्या या जुन्या वास्तु, अत्यंत पध्दतशीर पणे, योजनाबद्ध रितीने जतन केल्या आहेत. नुसते किल्ल्यांचे तर व आतील बांधकाम जोपासलेले नाही, तर तेथे राहून गेलेल्या राजघराण्यातील व्यक्तींची छायाचित्रे, त्यांचे काही पेहरावाचे कपडे, दाग-दागिने व शौचालये देखील व्यवस्थित ठेवलेली आहेत. लिखीत स्वरूपात इतिहास ही आहे. आपण पर्यटक म्हणून हे सहज एक-दोन तासात फेरी मारून बाहेर निघून जातो, मात्र थोडे आत्मचिंतन केल्यास या इंग्रज-स्कॉटीश लोकांच्या अंगात भिनलेल्या या राष्ट्र प्रेमामुळेच या छोट्या देशाने एकेकाळी जगावर राज्य करण्याची हिम्मत करून दाखवली, त्याची करणे काय याचा बोध घेऊ शकतो!

संध्याकाळी एका ‘माल्ट व्हिस्की’ बनविणाऱ्या कारखान्यात भेट दिली व त्यांची उत्पादने असलेल्या ३/४ प्रकारच्या व्हिस्की पेयांची आम्ही चव देखील घेतली. ही दीड तासांची टूर होती. एका ट्रॉली सारख्या रुळावरून घसरणाऱ्या गाडीत बसून आपण बोगद्यातून फिरतो व बाजूला व्हिस्कीचे मूळ धान्य, बार्ली शेतातून जमा करण्यापासून, ते शेवटी -बाटलीत भरून, पॅक बंद करण्यापर्यंतचा सर्व प्रवास ध्वनि-चित्रण (Audio-visual) स्वरूपात छान दाखविले जाते. घसरत्या गाडीने खालीवर होत, कधी कंपने तर कधी एकदम घसरण, असा अनुभव घेत ही माहीती घेत असतो. नंतर त्यांच्या हॉलमध्ये व्हिस्की हे पेय कसे तपासावे व त्याची चव कशी घ्यावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवितात. प्रत्येकास $15 -पंधरा डॉलर्स इतकी जबरी फी (ticket per head) घेतली व चार प्रकारची पेये, चवीसाठी दिली. मुलांना शीत पेये होती. आम्हाला त्यातील इतर तांत्रीक बाबी विशेष कळल्या नाहीत, मात्र ‘स्कॉच-व्हिस्की’ स्कॉटलंड मधील कारखान्यात ‘चाखणे’  हा अनुभव खूपच ‘तरतरी’ आणणारा वाटला! शेवटी त्यांच्या कोठारात (stores) नेऊन अनेक प्रकारची त्यांची उत्पादने सवलतीच्या दारात विक्रीसाठी ठेवली होती, त्यातील अत्यंत आवडलेली व खिशाला परवडलेली, वस्तु घेऊन आम्ही बाहेर निघालो! रात्री, स्कॉटलंड समुद्रकिनाऱ्या वरील, एडीनबर्ग मासळी-मार्केट, नजीक असलेल्या एका कौटुंबिक खानावळीत भोजनाचा आस्वाद घेतला! 

पुढील दिवशी स्कॉटलंडचा ‘हायलँड’ (High Land) बघायचा होता व त्यासाठी सर्व उत्सुक होतो, कारण हा (स्कॉटीश हायलँड) अत्यंत प्रसिध्द असून इंग्लंड, स्कॉटलंडला भेट देणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला आकर्षित करतो. आमच्या दीप्ती-स्वाति या संयोजकांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाद्वारे या भागाला भेट देण्यासाठी, पूर्ण दिवस ठेवला होता व आमची ‘मिनी जीप’ आम्हाला तेथ घेऊन जाणार होती.

यथे भेट देणाऱ्या टुरिस्टला येथील रमणीय पर्वतरांगा, डोंगरदऱ्या, मनमोहक वृक्षराजी,बर्फाच्छादीत शिखरे, लाॅचेस (Loch- बर्फाच्या वितळण्याने डोंगर पायथ्याशी तयार झालेली सुंदर तळी) नॅशनल पार्क, अनेक विविध रंगी  पक्षी – जगताशी ओळख, ऊत्तुंग ‘बेन नेव्हिस’ (Ben Nevis) पर्वताचा पायथा, येथील ‘स्कॉच- व्हिस्की’ तयार करणारे भरपूर कारखाने (distilleries) अशा अनेक विध गोष्टी पाहण्यासाठी, यावयाचे असते.अर्थात आम्हाला देखील अगदी शेवटचा टप्पा म्हणजे, ‘ बेन नेव्हीस ‘च्या पायथ्यापर्यंत, आजुबाजुचा प्रदेश पहात जावयाचे होते. मात्र रमत गमत, वाटेतील अनेक छोट्या सरोवर तलावांची शोभा, पक्षी-वृक्ष सृष्टी पहात निघाल्याने आम्हाला शेवट पर्यंत जाता आले नाही. संध्या. ४ वाजण्याचे  सुमारास पायथ्यापासून २०-२५ कि.मि.अंतरावर असतांना, सर्वांना, विशेषतः मुलांना खूप भूका लागल्याने, वाटेतील एका McDonald गृहांत सर्वांनी भरपेट जेवण घेऊन थोडी विश्रांती व आजूबाजूचा प्रदेश पायी भटकून पाहिला. पुढे जाण्याचा उत्साह मावळला  व आम्ही तेथूनच पुन्हा मागे फिरलो.

जेवणानंतरच्या पायी भ्रमंतीत, तेथील गवताळ प्रदेश व बार्लीची शेते पाहताना, मनाचा एक हळूवार कप्पा उघडला व मनाचे पाखरू ५० वर्षापूर्वी, बोर्डी हायस्कूलांत शिकत असतांना, कै.दुगल गुरुजींच्या इंग्रजी तासाला जाऊन बसले…

आमच्या ९ वी च्या वर्गाला विल्यम वर्ड्सवर्थ या प्रसिध्द इंग्लिश कवीची  The solitary reaper ही प्रसिध्द कविता होती. दुगल सर आम्हाला इंग्रजी विषय शिकवीत. काही कालावधी साठी, दुगल गुरुजी, प्रकृति अस्वस्था मुळे शाळेत येऊ शकले नाहीत ! त्यांचे गैरहजेरीत, चित्रे गुरुजी आम्हास इंग्रजी शिकवू लागले व त्यांनी वरील कविता आम्हास शिकविली! पुढे दुगल गुरुजी कामावर रुजू झाले व त्यांनी चित्रे गुरुजींनी शिकविलेला अभ्यासक्रम आमचे कडून तपासून घेतला ! जेव्हा ‘Reaper’ ही कविता सुद्धा शिकवून झाली आहे, असे  त्यांना कळले तेव्हा त्यांचा चेहरा थोडा नाराजीचा वाटला — आम्हाला काहीच समजत नव्हते, की सर या कविते बाबत येवढे चौकट का आहेत ? उलगडा दुसरे दिवशी झाला! दुसरे दिवशी वर्गात शिरतानाच दुगल गुरुजी हसतमुख चेहऱ्याने आले आणि आम्हाला म्हणाले “मी काल चित्रे गुरुजींशी बोलून, Reaper ही कविता तुम्हाला पुन्हा शिकविण्याची परवानगी त्यांचे कडून घेतली आहे व आज मी ती कविता शिकविणार! खरेतर, एकदा होऊन गेलेला ‘पोर्शन’ शिकवायची खटाटोप कोणतेच गुरुजी सहसा करणार नाहीत, मात्र हे दुगल गुरुजी होते – ते होते हाडाचे शिक्षक व प्रकृतिचे कवी ! चित्रे गुरुजींसारख्या महान शिक्षकाने एक कविता शिकविली असता, आपण पुन्हा ती कविता शिकवावी का? तो चित्रे गुरुजींचा अपमान होईल, म्हणून या गुरूने, त्या ‘महागुरु’ची परवानगी घेतली! धन्य ते आमचे दोघे ही गुरुजन!   

त्या दिवशी आमच्या इंग्रजीच्या वर्गात, स्कॉटलंडचा हा ‘हायलॅन्ड’ भाग, दुगल गुरुजींनी आपल्या अमोघ इंग्रजी वाणीने आणि कवितेवरील आपल्या निस्वार्थ प्रेमाने, डोळ्यासमोर उभा केला — इतक्या रोमांचकारीकपणे की, त्या दिवशीचे ते रोमांचकरी क्षण आयुष्यात सतत जपून ठेवले होते …. कधी इंग्लंड, स्कॉटलंडला गेलो तर ह्या ‘हायलॅन्ड’ मध्ये जाऊन ‘ते शेत’ पहायचे, विळ्याचे, एकटीच भाताचे रोप कापणारी बाई भेटली तर बहारच..  वर्डस्वर्थला दिसलेली “ती”  आमच्या  दुगल गुरुजींनी  मनात कायमची ठसविली ,आज कित्येक वर्षांनी, मनाच्या कुपीत जपलेली ती आठवण मूर्त रूप घेत होती. 

प्रसंग साधा- एक शेतकरी बाई, एकटीच, स्वतःशी गुणगुणत, शेत कापते आहे, कोणते गाणे – ते ही कवीला माहीत नाही, मात्र तिचे आत्मरंगी  रूप,गाणे गातांना ऐकू येणारा मंजूळ स्वर, कवीला मोहीत करतो, काही क्षण कवी ते दृष्य व ते सूर कानांत साठवतो व जातांना म्हणतो 

And as I mounted up the hill,
The music in my heart, I bore,
Long after, it was heard, no more !!”

 कै. दुगल गुरुजींसारख्या एका प्रतिभावान शिक्षकाचे, त्या दिवशीचे ते सुंदर विवेचन, आज एवढ्या वर्षानंतर देखील, हृदयात कोरले गेले होते! मी एकटाच त्या भागात फिरलो, वाऱ्याची भिरभिर आणि गवताची सळसळ हेच मला ऐकू आलेले गीत होते —- तेच मनात साठवून, मनोमन माझ्या त्या दोन गुरूंना वंदन करून, भारलेल्या अंत:करणाने आम्ही मागे फिरलो!
येतांना वाटेत काही छोटी ‘लॉचेस’ पाहिली, खूप समाधान वाटले. ह्या लोकांनी ही सौंदर्य स्थळ, तितक्याच  सुंदर तऱ्हेने जोपासली आहे. आता उद्या स्कॉटलंडचा निरोप घेऊन, सकाळी पुन्हा जीपने इंग्लंडला प्रस्थान करायचे!  

सकाळी नाश्ता आटोपून आम्ही सर्व आमच्या वाहनात बसून स्कॉटलंड –> इंग्लंड प्रवासासाठी तयार झालो. आता सरळ, कोठेही थांबा न घेता, लंडनला आमच्या holiday inn हॉटेलवर पोहोचावयाचे होते. सुमारे ७-६ तासाचा प्रवास होता वातावरण धुसर व थोडे वादळी वाटत होते. इंग्लंड – स्कॉटलंड मधील हे ‘खास’ नेहमीचेच वातावरण त्यामुळे येथे कधी सूर्य दर्शन झाले तर येथील लोक “Oh! it is sunny day, today!” असा आनंदाने चित्कार करतात. आमचे कडे रोजच “सनी डे” त्यामुळे आम्हाला या सूर्य प्रकाशाचे कौतुक नाही!

परतीच्या वाटेवर, स्कॉटलंडची हद्द संपे पर्यंत माझे डोळे, एका गावाचा बोर्ड कुठे दिसतो काय हे पाहण्यासाठी अधीर झाले होते. त्या गावाचे नाव होते – ‘डारवेल (Darvel), आणि ते लक्षात राहण्याचे कारण एक जगप्रसिद्ध मानवतावादी शास्त्रज्ञाचे ते जन्मस्थळ! स्कॉटलंडच्या एका लहान खेडे गावात शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या व अत्यंत नगण्य प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन ‘योगायोगाने’ लंडनला पुढील कॉलेज शिक्षणासाठी येणाऱ्या अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाची जन्मभूमि स्कॉटलंड व कर्मभूमि इंग्लंड! ‘पेनिसिलीन’ या ‘रामबाण’ औषधाचा शोध लावणारा हा शास्त्रज्ञ अतिशय नम्र व प्रसिद्धी-परांमुख होता. त्याचे जीवनातील काही योगायोगाची माहीती मला होती, म्हणून मी रस्त्यावर लक्ष ठेवुन होतो. दुर्देवाने इंग्लंडची हद्द सुरु झाली तरी ‘डारवेल’ गावाचा पत्ता कोठे दिसला नाही!फ्लेमिंग साहेबांना मनोमन नमस्कार करून निघालो. 

आम्ही, गर्दी व रस्त्यावरील वाहतुकीमुळे लंडनला हॉटेलवर पोहोचण्यास संध्याकाळचे ५ वाजले होते. आमच्या अंदाजापेक्षा तासभर उशिराने आम्ही येथे पोहोचलो होतो. त्यामुळे येथे आल्यानंतर करावयाची काही कामे (उद्याच्या भ्रमंती-सबंधी काही तिकीटे व पास गोळा करणे) राहून गेली. उद्या सकाळीच ते करू असे ठरले! संध्याकाळी थोडी, आजूबाजूला भ्रमंती केली, आमचे हॉटेल लंडनच्या मध्य-भागी होते व लंडन ब्रीजच्या जवळ होते, त्यामुळे तसे गजबजलेल्या भागात होते. जवळ एक सुंदर बाग देखील होती तेथे थोडे फिरलो. 

आता आमच्या या कौटुंबीक सहलीचे सात दिवस पूर्ण झाले होते. बाकी, तीन दिवसांत लंडन दर्शन करायचे होते. आज सकाळी ,दीप्ती _स्वातीने, आधीच  ठरविलेल्या प्लॅनप्रमाणे, लंडनच्या टूरसाठी बसची ‘hop on Hop off‘ (कुठेही बसमध्ये चढा वा उतरा), आधी तिकीटे, राखीव केली होती व बस कंपनीच्या ऑफिसमधून ती गोळाकरून पुढील प्रवास करावयाचा होता. ते काम करतांना खूप वेळ गेला व आम्ही सर्वांनी विशेष रितीने तयार केलेल्या खास प्रवासी  बसमधून मुसाफिरी केली. बस मध्ये, कॉमेंट्रीची सोय होती व फोन मधून व लिहून दिलेल्या  सूचना प्रमाणे,  head phone मधून, स्थळांची माहीती, इंग्रजी मधून मिळत होती. त्यामुळे आपण कोणत्या ठिकाणी आहोत व समोर दिसणारी वास्तु काय  हे व्यवस्थित कळत होते. जर इच्छा असेल तर त्या थांब्यावर उतरावे, त्या वास्तुच्या आत जाऊन, प्रत्यक्षात दर्शन व माहिती घेऊन पुन्हा थांब्यावर यावे व पुढील येणाऱ्या बस ने पुढे जावे अशी सुंदर व्यवस्था होती. आम्ही बसच्या टपावर, मोकळ्या आकाशाखाली बसून प्रवास करीत होतो. मध्ये पावसाची बारीक सर देखील येत होती. त्यासाठी कंपनीने फुकट रेनकोट ही पुरविले होते. असा आगळा, आनंदी प्रवास होता. सर्व कुटुंबीय एकत्र असल्याने तो देखील आनंदात भर टाकणारा अनुभव. मागे अमेरीकेत ‘न्युयॉर्क’ दर्शन करतांना आम्ही असा प्रवास केला होता – मात्र त्यावेळी आम्ही दोघेच होतो, आता सर्व राऊत कुटुंबीय हा आगळा प्रवास एकत्र करत होते, म्हणून त्याची लज्जत वेगळी!

दिवसभर आम्ही ब्रिटीश म्युझियम, टॉवर ऑफ लंडन, बार्मिंगहॅॅम राजवाडा, वेस्ट्मिन्स्टर ऍबी, ब्रिटीश पार्लमेन्टची इमारत, बिग बेन घड्याळ एवढी स्थळे पाहिली. आम्ही सर्वांनी या सर्व प्रसिध्द स्थळाची माहिती internet वरून घेतली होती. तसेच, मीना प्रभु यांचे ‘माझे लंडन’ हे सुंदर प्रवास वर्णनात्मक पुस्तक ही वाचले होते त्यामुळे नेमके काय बघायचे व कोठे थांबायचे हे आधीच ठरविता आले. लंडन हे शहरच खूप ऐतिहासिक, येथील बहुतेक वास्तुंचा निर्माण व इतिहास १० व्या अकराव्या शतकापासून सुरु होतो, तसेच येथील राजघराण्याने हा सर्व इतिहास अगदी व्यवस्थित आजतागायत जपून ठेवलेला आहे, त्यामुळे ही सर्व स्थळे पाहतांना भारावल्यासारखे होते!

टॅावर ऑफ लंडन हा राजघराण्याचा निवासाचा किल्ला असून, तेथे १० व्या शतकांपासून या राजघराण्यातील शस्त्रागार, दागदागिने, कपडे, राजमुकुट, व  सोन्याचांंदीचे राजदंड पाहून ब्रिटीश राजांच्या अफाट वैभवाची कल्पना येते! आपला भारतीय ‘कोहिनूर हिरा’ राणीच्या मुकुटात स्थानापन्न झालेला पाहताना अभिमानापेक्षा विषाद  जास्त वाटतो!

पुढे वेस्ट्मिन्स्टर ऍबी (Westminister Abbey) या चर्च मध्ये वेगळे दर्शन! इ. १० व्या शतकातील ऐतिहासिक चर्च, गोथीक शैलीत बांधला असून राजा – राण्याचे राज्याभिषेक येथे होतात. तसेच शेवटी, राजघराण्यातील सर्व सदस्यांची दफनभूमी हीच आहे. सर्व पुरातन राजा-राण्यांच्या थडग्यावर, त्यांची माहीती व्यवस्थित लिहीलेली आहे. ज्यांनी जगावर राज्य करतांना, लाखो निरपराध लोकांना मातीस मिळविले ते सर्व राजधुरंदर, ईथे असे मातीत चिर विश्रांती घेत असलेले पाहून, गदिमांच्या ओळी आठवतात

माती सांगे कुभाराला, पायी मज तुडविशी तुझाच आहे शेवट वेड्या, माझ्या पायाशी” 

आताची महाराणी एलिझाबेथ, हिच्या दफनाची जागा देखील, निश्चित केलेली आहे व या चर्चच्या सेंट जॉर्जेस चॅपेल या प्रार्थनागृहाजवळ ती आहे ! येथे फोटो घेता येत नाहीत!

पुढील दिवस ‘मादाम तुसा’ म्युझियम व विंडसर राजवाडा पाहण्यासाठी ठेवला होता. मादाम तुसा तर जगप्रसिध्द संग्रहालय आहे व जगातील होऊन गेलेल्या व असलेल्या प्रसिध्द व्यक्तिंचे मेणाचे पुतळे येथे आहेत. आपले सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन येथे विराजमान पाहून खूप अभिमान झाला. जगातील इतरही अनेक प्रसिध्द व्यक्तिंचे पुतळे होते- लोकांची गर्दी अमेरीकेचे आजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या पुतळ्या जवळ जास्त होती, अनेक टवाळक्या करीत लोक तेथे आपले फोटो काढून घेत होती. मात्र काही भागात,अत्यंत अर्रुंद मार्ग असून, गर्दीचे दिवशी, तेथील अपुऱ्या प्रकाशात फिरणे खूप धोक्याचे वाटले.

‘विंडसर’ राजवाडा हा ११ व्या शतकातील राजा हेन्‍री १ याने ऊभारलेला हा विलासी राजमहाल आहे. लंडन बाहेर, राजघराण्यातील लोकांना विलास करण्यासाठी उभारलेले हे निवासस्थान, लंडनपासून सुमारे ३१ -३५ कि.मी असावे! अत्यंत दिमाखदार असा हा राजवाडा युरोपातील, जास्तीत जास्त वास्तव्य झालेला असा महाल आहे. राणी एलिझाबेथ (सध्याची) देखील येथे कधी जाऊन रहात असे! आजच आलेल्या बातमी नुसार, Covid19 विषाणु प्रादुर्भाव लंडन मध्ये झाल्याने राणी व तिचे यजमान विंडसर पॅलेस मध्ये राहण्यास आले आहेत!

एक हजार वर्षे जुन्या वास्तुमध्ये ,बलाढ्य राणीला राहावयास आज ही राजेशाही व्यवस्था आहे, यावरून या लोकांची पुरातन वास्तु जतन किती कमालीची आहे हे लक्षात यावे! संध्याकाळी शा‍‍‌र्ड (Shard) या लंडन मधील अत्युच्च टॉवर वरून लंडन दर्शनासाठी गेलो. हे एक हॉटेल देखील आहे व तिकीट घेऊन आपल्याला लिफ्टने शेवटच्या मजल्या वरील ‘डेक’ (Deck) वर जाता येते व ३६० कोनातून, लंडन शहराचे मनोहारी दर्शन घेता येते! रात्रीचे जेवण, आमच्या हॉटेल पासून नजीक असलेल्या एका तुर्की (Turki) हॉटेल मध्ये घेतले. सर्वांनाच वेगळेपण जाणवले व आवडले! 

आता लंडन मुक्कामाचा शेवटचा दिवस ऊजाडला, अर्धा दिवस ‘ग्रीनवीच’ ह्या जागतिक महत्वाच्या ठिकाणी जायचे होते. सर्व जगाचे घड्याळ ज्या संदर्भ रेषे वरून ठरविले जाते, त्या ग्रीनवीच रेषेला भेट देणे हे लंडनला भेट देणारा प्रत्येक मुसाफीर, अगत्याने करतो.

आम्ही सकाळी लवकर हॉटेल बाहेर पडून ‘लंडन आय’ ह्या आकाश पाळण्यात बसून, लंडन शहराचे पुन्हा एकदा विहंगम दृष्य घ्यावयाचे होते, हा आकाश पाळणा थेम्स नदीवर ऊभारला असून लंडन शहरातून बऱ्याच भागातून त्याचे दर्शन होत असते, एवढी त्याची ऊंची आहे, एका पाळण्यात १० – १२ प्रवासी एका वेळी बसून, ऊंच जात असतात. त्यामुळे आम्हा सर्वांना एका स्वतंत्र पाळण्यात बसून, एकत्रीत मज्जा घेण्याची संधी मिळाली. हलत-झुलत हळूहळू वर जाणाऱ्या या आकाश मार्गीकेतून थेम्स नदीच्या दोन्ही तीरावर असणाऱ्या लंडन मधील अनेक ऐतिहासिक वास्तुंचे दर्शन एकावेळी घेणे हा वेगळा आनंद!

तेथून बोटीने आम्हास ग्रीनवीच पीयर या बंदरात जावयाचे होते, म्हणून बोटी सुटणाऱ्या जेट्टीवर आलो. सतत आर्ध्या तासाचे अंतराने येथून ग्रीनवीचला जातात. प्रवास खूपच सुखकर, बसून बीअर चे घुटके घेत करता येतो. सुमारे ३० – ३५ मिनीटांचा हा प्रवास आहे. पीयर वर ऊतरल्यानंतर सुमारे १५ – २० मिनीटे चालत जावे लागते. अत्यंत हिरव्यागार वनश्रीतून रस्ता असल्याने, श्रम जाणवत नाहीत. जेवणासाठी थोडा वेळ गेल्याने, आम्हास रॉयल ग्रीनवीच वेध शाळेत प्रवेश मिळू शकला नाही, त्यामुळे ही प्रसिध्द वेधशाळा बाहेरूनच बघावी लागली.

ग्रीनविच मेरिडियन ही उत्तर दक्षिण दिशा दाखविणारी रेखांश रेषा असून, ती रेषा (०) (शून्य) रेखांश म्हणून संदर्भ रेषा मानण्यात येते. जगातील सर्व घड्याळांची वेळ ग्रीनवीच वेळेच्या संदर्भात लावण्यात येते! स्टील पट्टीची रेषा ओलांडताना आपण क्षणांत पृथ्वीच्या पूर्व व पश्चिम भागात जाऊ शकतो, ही कल्पनाच मोठी गमतीची वाटते. तेथे परिसरात सुंदर ऊपवन तयार केले आहे. तेथे बसून आयस्क्रीमची मजा चाखून, आम्ही पुन्हा चालत, बोटीच्या बंदरा  वर आलो, व परतीची बोट पकडून लंडन पीयर व तेथून टॅक्सीने आमच्या हॉटेल वर आलो. संध्याकाळ झाली होती. आम्हास (मी व मंदा) भेटायला आमचे एच.पी. मधील जुने सहकारी श्री. घोष  येणार होते. घोष बाबू आज ९० वर्षाचे असून, त्यांचे चिरंजीव डॉ. घोष यांचे बरोबर लंडनच्या उपनगरात राहतात. 

खूप वर्षांनी हा लंडन भेटीचा माझा योग पाहून, त्यांनी मला भेटण्यासाठी येतो असा निरोप दिला होता व त्याप्रमाणे, ५० – ६० कि.मि प्रवास करून ते आमचे हॉटेलवर आले. त्यांचे चिरंजीव .डाॅ.देबाशिष घोष हे लंडन मधील व जगातील एक प्रसिध्द शल्यविषारद (Surgeon ) असून खास वेळ काढून आले होते. त्यांचे बरोबर एका भारतीय उपाहारगृहात आम्ही दोघे, डॉ. घोष. सौ. घोष,व श्रीयुत घोष, अशा आम्ही सुंदर भोजनाचा आस्वाद घेतला. रात्री डॉ. घोष यांनी आम्हाला हॉटेलवर आणून सोडले, स्वाती, दादा, प्रशांत, दीप्ती व मुले यांची ओळख मी घोष कुटुंबीयांस करून दिली. आता उद्या लंडनचा निरोप घ्यायचा होता!

सकाळी उठून प्रथम, चौधरी कंपनी विमानतळावर निघाले. कारण त्यांचे विमान (हिथ्रो – मुंबई) आमचे आधी होते. आम्ही दोघे, दादा-स्वाती कंपनी बरोबर शिकागोला जाणार असल्याने, आम्ही उशीरा निघालो! दहा दिवसांचा हा ‘सह- प्रवास’ कुटुंबासकट करावयास मिळणे व तो देखील आपल्या स्वतःच्या, ऐसपैस वाहनातून, हा खूपच आनंददाई अनुभव होता —every single thing of joy, has to come to an end ह्या न्यायाप्रमाणे, दहा दिवसांची ही रंगत-संगत, पटकन संपली आणि आम्ही आपापल्या मार्गाने घरी निघालो! 

माझी ही दुसरी लंडन वारी खूप काही देऊन गेली, विशेषतः म्हणजे सर्व कुटुंबासोबत, मुला नातवंडा सोबत एकत्र घालविलेले आनंदाचे क्षण! ईशा – अजय ,अमेरीकेत,क्रीशा-आर्य भारतात असल्याने त्यांना परस्परांशी  वारंवार भेटणे  कठीण ! त्यामुळे या चौघांना एकत्र येणे ही म्हणजे पर्वणीच असते व या वेळी, ते प्रकर्षाने दिसले….. असे क्षण वारंवार यावेत असे मनापासून वाटते खरे, पण ते कसे शक्य आहे? मात्र असे दिवस पुन्हा येऊदे हीच देवा जवळ प्रार्थना.