कवी हृदयी, स्वानंदी, कै. दुगल सर
निन्दन्तु नीतिनिपुणा यदी वा स्तुवन्तु |
लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् ||
अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा |
न्याय्यात्पथः प्रविचलन्ति पदं न धीरः ||
या सुवचनाप्रमाणे स्तुती-निंदा, यश-अपयश, लाभ-हानी, जगणे-मरणे, या सर्वांपलीकडे जाऊन आपल्या मार्गाने ते चालत राहिले. आर्थिक समस्यांमुळे आपल्या महत्त्वाकांक्षांना आवर घालावा लागला तरी कौटुंबिक जबाबदारीला नेहमी प्राधान्य देत एक उत्कृष्ट शिक्षक, एक सच्चा समाजसेवक व आदर्श कुटुंबप्रमुख असे जीवन ते जगले. ज्ञानेश्वर माऊलींच्या सांगण्याप्रमाणे:
“अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक”
या न्यायाने आपला स्वतःचा चौकोनी संसार सुखाचा केलाच परंतु आपले सर्व विद्यार्थी, सहकारी व भोवतालच्या समाज जीवनातही त्यांनी सतत आनंद निर्माण केला व स्वतःही स्वानंदी जीवन जगले. सतत तीन तपे शिक्षक, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक या नात्यांनी त्यांनी ज्ञानदान केले. आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी समरस होऊन शालेय ज्ञान देतानाच त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल व ते देशप्रेमी नागरिक कसे होतील यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आश्वासन दिल्याप्रमाणे जातीभेद नाहीसे करण्यासाठी रोटीबंदी, बेटीबंदी तोडणे या गोष्टी स्वतःपासून सुरू केल्या. आपल्या पुढील पिढीतही चालू ठेवल्या. ‘करेंगे या मरेंगे’ या १९४२ च्या लढ्यात सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले. नेताजी सुभाषचंद्र यांच्या आझाद हिंद सेनेने चालविलेल्या दुसऱ्या स्वातंत्र्यसमराचे यथार्थ आकलन करण्यासाठी युवकांना मदत केली. “थोर देशभक्तां बद्दल आदर व प्रेम बाळगून त्यांच्याकडून घेता येईल तेवढे घ्या, स्वतःचे जीवन उज्वल करा”, असे आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविण्याचा सतत प्रयत्न केला. जीवनाच्या अंतिम टप्प्यातही आपल्याजवळ जे देण्यासारखे होते ते अक्षर वांग्ड़मय समाजातील गोरगरीब मुलांसाठी वाटत राहिले. ते जितके कणखर होते तितकेच कोणाचे भले झालेले पाहण्यासाठी उत्सुकही होते. त्यांनी आत्मसन्मान जपण्यासाठी कधीही अन्याय सहन केला नाही. होय, हेच ते बोर्डी शाळेतील आमचे वंदनीय गुरूवर्य कै. नरहर दि. दुगल सर, यांना आदरांजली देण्यासाठी हे आजचे लिखाण!!
बोर्डी हायस्कूलमधील आमच्या शैक्षणिक कालखंडातील एक विद्यार्थीप्रिय तसेच प्रभावी शिक्षक म्हणजे न.दि.दुगल सर! त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वातून प्रथम दर्शनीच, त्यांच्या विद्वतेची छाप विद्यार्थ्यावर पडत असे. गोरेपान, उंचीने कमी असणारे दुगल सर आपल्या मराठी, इंग्रजी व संस्कृतच्या अफाट व्यासंगामुळे शिकवतांना विद्यार्थ्यांवर जबरदस्त छाप पाडीत. वर्गात शिरतानाच त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास व स्मितहास्य जणू दर्शवित असे ,
” मुलांनो आज मी जे काही शिकवणार आहे ते तुम्हाला अजून कोणी शिकवलेले नाही व शिकवणारही नाही!”
ते वर्गात कधीही बसून शिकवत नसत. स्तब्ध उभे ही नसत. बोलताना सतत वर्गभर त्यांच्या फेऱ्या चालू असत. विषय व पाठाच्या अनुषंगाने हावभाव व चेहऱ्यावरील भावही बदलत असत. त्यामुळे वर्गात सतत एक प्रकारचा जीवंतपणा व उत्साह भरून राही. त्यांच्या ज्ञानाचा व शिकविण्याचा आवाका एवढा मोठा होता की आम्हा विद्यार्थ्यांना ‘ते एखाद्या प्रख्यात महाविद्यालयात प्रोफेसरच असावयास हवेत, आमचे भाग्य ते आमच्या हायस्कूलात आले!’ अशी भावना होई.
आज त्यांची जीवनकथा ऐकल्यानंतर ते तसे का झाले नाही याचा उलगडा जसा मला झाला तसा आपणासही होईल! जन्मजात बुद्धिमत्तेला थोडी नशिबाची साथ मिळती तर दुगलसर महाविद्यालय कशाला, ऑक्सफर्ड, केम्ब्रीज विद्यापीठातच प्राध्यापक शोभून दिसले असते! पण ते होणारे नव्हते! का? कन्या सौ.नीलोत्पला पुरव यांच्याकडून कळलेली दादांची ही जीवनकहाणी आपणही वाचा म्हणजे कळेल! ती एक चित्तरकथाच आहे!!
दादांचे ( कुटुंबीय मंडळी सरांना दादा म्हणत असत) कुटुंब मूळचे कोकणातले. मात्र त्यांचे पूर्वज नोकरी धंदा व उद्योगासाठी खानदेशातील धुळ्यात स्थायिक झाले होते. दादांचा जन्म 10डिसेंबर 1914 रोजी धुळ्यातच झाला. खरे तर दादांचे वडील दिनकरराव हे पेशाने इंजिनियर.(व्ही जे टी आय् महाविद्यालय) व चांगल्या सरकारी नोकरीत होते. मात्र त्या काळातील स्वातंत्र्यप्रेमाने भारलेल्या अनेक तरुणांप्रमाणे त्यांनाही आपल्या भारत मातेला स्वतंत्र झालेले पहावयाचे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे दैवत होते. त्यांच्या वरिष्ठांना हे समजले होते. सरकारी नोकरीत असल्याने त्यांच्यामागे वरिष्ठांचा व पोलिसांचाही नेहमी ससेमिरा लागलेला असे. वरचेवर बदल्या होत असत . शिवाय संपूर्ण कुटुंबाला त्रास होई तो वेगळाच ! आपल्यामुळे आपल्या कुटुंबीयास होणारा जाच वाचावा म्हणून श्री. दिनकररावांनी सरकारला,
“माझा या कुटुंबाशी काहीही संबंध नाही, कौटुंबिक संपत्तीवरील माझे सर्व हक्कही मी सोडून दिलेले आहेत” असे लिहून देऊनही काही फायदा झाला नाही. सरकारचा ससेमिरा चुकला नाही. शेवटी त्यांनी चांगली सरकारी नोकरी सोडून दिली व खाजगी कंपन्यांत नोकऱ्या केल्या. मात्र त्यामुळे सर्व कुटुंबाला सतत मानसिक त्रास व आर्थिक हलाखी सोसावी लागली.
हे एक विशाल कुटुंब होते. दादांना सहा भाऊ व दोन बहिणी. मोठा मुलगा म्हणून त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी आली. अकाली प्रौढत्व आले. जन्मजात अत्यंत हुशार असल्याने दादांनी तशा परिस्थितीतसुद्धा आपल्या कुटुंबाला सहाय्यभूत होत आपले प्राथमिक व मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण धुळ्यात चांगल्या रितीने पूर्ण केले. उत्तमरित्या ते मॅट्रिक पास झाले. काही शिष्यवृत्त्याही मिळाल्या. डॉक्टर व्हावे ही त्यांची बालपणापासूनची महत्त्वकांक्षा होती.
त्याकाळी धुळ्यात महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध नसल्याने ते पुण्यातील एस्. पी. महाविद्यालयात सायन्स शाखेत रुजू झाले. अभ्यास चांगला होता. तरी शिष्यवृत्तीची रक्कम कमी पडत असल्याने शिकवण्या कराव्या लागल्या. वर्गातील हजेरीवर परिणाम झाला. परिणामी पहिल्या वर्षाच्या अखेरीस त्यांची कॉलेजची पूर्ण टर्म (हजेरी) न भरल्याने, कॉलेजने वार्षिक परीक्षेस सायन्स विषय घेऊन बसण्यास मज्जाव केला. वर्ष फुकट जाऊन शिष्यवृत्ती बंद होण्याची पाळी आली होती. शेवटी त्यांच्या काही प्राध्यापकांनी मध्यस्थी करून ‘सायन्स’ ऐवजी ‘आर्टस्’ विषयांच्या परीक्षेस बसण्यास परवानगी दिली. वर्ष फुकट गेले नाही. पण जीवनाला एक नवी कलाटणी मिळाली ! डॉक्टरकीचे स्वप्न भंग पावले ते कायमचेच!
डॉक्टरकीचे शिक्षण नको, निदान आर्ट्सचे (कला शाखेचे) शिक्षण तरी मनाप्रमाणे घेता यावे, तर तिथेही परिस्थिती आडवी आली. बी ए चांगल्या प्रकारे ऑनर्स मिळवून उत्तीर्ण झाले. कुटुंबातील जबाबदाऱ्याही वाढल्या होत्या. बहिणींचे शिक्षण व लग्ने, लहान भावांचे शिक्षण यासाठी पैसे मिळविणे आवश्यक झाले होते. ही सर्व बहिण भावंडे अभ्यासात हुशार होती .आपणासं डॉक्टर होणे नाही जमले तरी आपल्या हुशार, धाकट्या भावाला तरी मेडिकलचे शिक्षण मिळावे ही त्यांची आंतरिक तळमळ होती. त्यासाठी थोडी अधिक आर्थिक कमाई करणे जरुरीचे झाले. एम ए ला मिळालेला प्रवेश रद्द करून दादांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. बी. ए आॅनर्स असलेल्या तरुणाला त्या काळात अनेक चांगल्या नोकऱ्या मिळू शकत होत्या. मात्र दादांना सरकारी नोकरी करावयाची नव्हती. नोकरी करावयाची तर ती वृत्तपत्र क्षेत्रात अथवा शिक्षकी क्षेत्रात असे दोन पर्याय त्यांनी ठेवले होते. एका छोट्या वर्तमानपत्र कार्यालयात नोकरी मिळाली. काम आवडीचे होते. लेखनाचा छंद जपता येत होता. मामा वरेरकरां सारख्या एका वरिष्ठ साहित्यिकाशी संपर्क होता. मात्र पगाराचे पैसे खूप कमी मिळत होते. कौटुंबिक आर्थिक गरजा वाढल्या होत्या व भावाच्या शिक्षणासाठीही पैसे पाठविणे गरजेचे होते. अपुरा पगार व तोही अनियमित त्यामुळे ही नोकरी सोडावी लागली.
आता शिक्षकाची नोकरी करावी असे त्यांच्या मनाने घेतले .सुदैवाने त्याच वेळी गोव्यातील एका हायस्कूलमध्ये नोकरी मिळाली. गोव्याचे निसर्गसौंदर्य , शांत समाजजीवन , तेथील पोर्तुगीज राजवट या सगळ्या वेगळेपणामुळे त्यांच्या सौंदर्यवादी वृत्तीला गोव्यात जावेसे वाटले असावे.
दादांना शिक्षकी पेशाची आवड होती कारण त्यांच्या आदर्शवादी वृत्तीला ‘आपला विद्यार्थी हा केवळ पुस्तके शिकून शिक्षित झालेला नको होता. जीवनाचे सर्वांगीण ज्ञान मिळवून एक अष्टपैलू विद्यार्थी व देशाचा समर्थ भावी नागरिक असा हवा होता. ‘खेळ ,व्यायाम, राष्ट्रीय वृत्ती व सुसंस्कृत व्यक्तिमत्व, असा माझा विद्यार्थी परिपूर्ण झाला पाहिजे’ ही त्यांची धडपड असे!
दादांनी या आपल्या पहिल्या शिक्षकी व्यवसायात व पुढेही सदैव, याच एका ध्येयाने प्रेरित होऊन काम केले. ते विद्यार्थ्यात खूप प्रिय झाले. या नोकरीत पगारही चांगला होता. तो नियमित मिळत होता. सर्व स्थिरस्थावर होत आहे तेवढ्यात… धुळ्याला आई आजारी असल्याची बातमी त्यांना कळली!…. मातृप्रेमी, कुटुंब वत्सल दादा गोव्यात उत्तम प्रकारे सुरू असलेला आपला व्यवसाय, शाळा सोडून धुळ्यात हजर झाले..
नियती दादांची परिक्षा पहात होती..!!
आईच्या स्वास्थ्यासाठी दादांनी तिच्या औषधोपचार व सेवेत जराही कुचराई केली नाही. जे करता येईल ते सर्व केले . मात्र दुर्दैवाने आई वाचू शकली नाही. ती आपल्या लाडक्या अजाण मुलांना सोडून देवा घरी गेली. सर्व कुटुंबावरच दुर्दैवाची कुऱ्हाड कोसळली ..अगदी छोटा भाऊ तर लहान बाळ होता.
म्हणतात ना “माय मरो मावशी जगो..” या न्यायाने गिरगावातील मावशीने या चिमुकल्याचा सांभाळ करण्याचे कबूल केले. त्यामुळे दादा धुळे सोडून मुंबईत दाखल झाले. लहान भावाचे मावशीकडे संगोपन होऊ लागले .गिरगावातील आर्यन हायस्कूलात त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. ‘पुनश्च हरी ओम.,’ सुरू झाले.
येथील वास्तव्यात त्यांनी विद्यार्थी व संस्थेचेही प्रेम मिळविले. खूप चांगले काम केले. विद्यार्थी-प्रिय शिक्षक ठरले. आता शिक्षकीच करावयाची असल्याने बी टी करणे भाग आहे हे ओळखून आर्यन हायस्कूलचा राजीनामा देऊन पुण्यात बी टी चा अभ्यासक्रम पूर्ण करावा असे त्यांच्या मनाने घेतले. आर्यन हायस्कूलच्या मुलांना खूप दुःख झाले. त्यांनी आपल्या सरांना मोठ्या सन्मानाने निरोप दिला व एक मानपत्रही दिले .पुण्यात त्यांनी केवळ बी टी ची पदवीच मिळविली नाही तर येथेच आपली भावी जीवन-साथीही मिळविली! त्यांची भावी वधू ललिता (सामंत) त्यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयात बी ए करीत होती.. एके दिवशी योगायोगाने दोघांची गाठ पडली. मने जुळली. त्यांनी विवाह बंधनात अडकण्याचे ठरविले. कु.ललिता सामंत सौ. ललिता नरहर दुगल झाल्या !
लग्नानंतर दोघेही सांगलीस गेले. तेथेही दादांनी शिक्षकाची नोकरी केली. मात्र आपल्या इंग्रजी ज्ञानाचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांशिवाय इतरांनाही मिळावा या उद्देशाने त्यांनी तेथे एक इंग्रजी कोचिंग क्लास उघडला. त्याची ख्याती सांगली व परिसरात एवढी झाली की बाहेरूनही इतर शिक्षणसंस्थामधील कित्येक विद्यार्थी त्यांच्या क्लासमध्ये इंग्रजी शिकण्यासाठी येऊ लागले .सर्व ठीक चालू होते.
पण नियतीला दादांचे हे सुख फार वेळ पहावले नाही! सांगलीत प्लेगचा कहर सुरू झाला आणि दादांना स्वतःलाच प्लेग झाला! त्यांच्यासाठी ते जीवावरचे दुखणे ठरायचे, मात्र ‘पोटावर’ निभावले! दादांची पचनसंस्था बिघडली ती कायमचीच! नोकरी व आपला उत्तम चाललेला क्लास सोडून दोघेही एका जवळच्या नातेवाईकांच्या सल्ल्यावरून ठाणे जिल्ह्यातील वसई सारख्या कोकणातील शांत सुंदर गावी शिक्षक म्हणून रूजू झाले! ही बदली दादांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली!
एका समारंभाच्या प्रसंगी दादा आणि आचार्य भिसे यांची वसईत गाठ पडली. रत्नपारख्याला एक जातीवंत हिरा गवसला! आचार्यांनी दुगल सरांना मोठ्याआग्रहाने बोर्डी हायस्कूलात येण्याचे आमंत्रण दिले. दादांना ते नाकारणे शक्यच नव्हते. दादा बोर्डीत आचार्यांचे सहकारी म्हणून रुजू झाले. ते वर्ष होते जून 1950 !
भिसे-चित्रेंच्या प्रेमळ आग्रहामुळे ते बोर्डी हायस्कूलात शिक्षक म्हणून रुजू झाले! आणि म्हणूनच सदभाग्यामुळे आम्हाला शिक्षक म्हणून बोर्डीच्या हायस्कूलमध्ये चार वर्षे लाभले. मी जरी फार हुषार विद्यार्थी नसलो तरी माझ्याबद्दल त्यांना विशेष आपुलकी वाटण्याचे कारण म्हणजे माझा शालेय व शालाबाह्य सांस्कृतिक चळवळीतील (वक्तृत्व, वाचन, निबंध लेखन इ.) सहभाग. त्यांची जेष्ठकन्या जयप्रभासुध्दा, अशा स्पर्धांमध्ये सहभागी होत असे. विशेषतः वत्कृत्व स्पर्धेत जिल्हा पातळीवर तिने बक्षीसे मिळविली होती. त्यामुळे वर्गाबाहेरही कधी भेटले तर सर माझ्या या आवडीबद्दल आस्थेने चौकशी करीत व मला प्रोत्साहन देत.
“शिक्षण, विद्यार्थ्यांच्या जीवन घडणीची एक प्रक्रिया’ असली पाहिजे ,माझा विद्यार्थी ‘ संपूर्ण जीवन शिक्षण’ घेऊनच बाहेर पडला पाहिजे” अशी त्यांची प्रामाणिक भावना होती. शिक्षकाने विषय शिकवितांना शिकविण्याचा आनंदही घेतला पाहिजे’ ही त्यांची मानसिकता होती. आम्हा विद्यार्थ्यांना ते सहज जाणवे. विशेषतः कविता, काव्य शिकवितांना तर ते देहभान विसरून जात. सर्व वर्ग उत्साह व आनंदाच्या वेगळ्या पातळीवर तल्लीन होऊन डोलत राही .
आंग्ल कवी वर्ड्स्वर्थची प्रसिद्ध कविता,’ द सॉलिटरी रीपर'(The Solitary Reaper) ही इयत्ता नववीत आमच्या वर्गाला त्यांनी शिकविली. माझ्यासाठी ती एक दंतकथा झाली आहे. तो किस्सा मी शाळेचा विषय निघाला की आवर्जून सांगत असतो. माझ्या इतर लिखाणातूनही ओघाने आला आहे. मात्र आज खास त्यांच्यावरील लेखात मी तो प्रसंग मुद्दाम येथे सांगणार आहे. कै. पू. आचार्य चित्रे सरावरील लेखात लिहिलेला हा प्रसंग पुन्हा उद्धृत करीत आहे!
“एकदा दुगल सर, रजेवर असताना आपण(चित्रे सर) आम्हाला इंग्रजी शिकविण्यास आला होतात. त्यावेळी इतर इंग्रजी अभ्यासाबरोबर, कवी वर्डस्वर्थची ‘THE SOLITARY REAPER ‘ ही प्रसिद्ध कविता आपण शिकवलीत. आपल्या शिकवण्याबद्दल काय बोलावे? नेहमीप्रमाणेच पिन ड्रॉप सायलेन्स. विषयाचा आशय समजून देण्याची आपली कला आणि प्रत्येकाला समजले आहे ना, ही खात्री केल्यावरच पुढे जाणे ही आपली खासियत. आम्ही आपल्या मुखातून या कवितेचा सुंदर आस्वाद घेतला. तो एक वेगळाच अनुभव होता.”
“दुगल गुरुजी कामावर रुजू झाले. त्यांनी रजेच्या कालांत झालेल्या अभ्यासक्रमाची चौकशी केली. त्यांना वरील कविता शिकवून झाल्याचे कळले. दुगल गुरुजींच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसली. मात्र ते काही बोलले नाहीत. तिसऱ्या दिवशी ते वर्गात आले. अगदी खुशीत येऊन म्हणाले ,
“आज मी तुम्हाला चित्रे गुरुजींनी शिकवलेली ‘द साॅलीटरी रीपर’(The Solitary Reaper) ही कविता पुन्हा शिकविणार आहे. यासाठी, मी चित्रे सरांची परवानगी घेऊन आलेलो आहे.” आम्हाला प्रथम हा काय प्रकार आहे, हेच कळले नाही. एकदा शिकवून झालेला अभ्यास पुन्हा कोणीतरी शिक्षक शिकवितो, हे तोपर्यंत आम्हाला नवलच होते! दुगल सर म्हणाले,
”ही माझी आवडती कविता आहे. या कवितेवर मी खूप चिंतन केलेले आहे. चित्रे गुरुजींनी मला परवानगी दिली, म्हणूनच माझी ही कविता तुम्हाला शिकवण्याची हौस मी पुरी करतो आहे, पुन्हा शिकवीतो आहे!”
त्यादिवशी दुगल सरांनी तो स्कॉटलांड देश, त्यातील खडकाळ हायलँड नावाचा प्रदेश, पायथ्याशी असलेले, भरलेले बार्ली पिकाचे शेत, डाव्या हातातील काड्यांचा चूड आणि उजव्या हातात कोयता घेऊन, कमरेत थोडी वाकलेली, गाणे गुणगुणणारी, अवखळ एकटी, वनबाला.. क्षणभर काही विचार मनात आल्याने तशीच थांबली आहे. नेमका तो क्षण पकडून कवीने हे सुंदर काव्य केले आहे.. एका प्रतिभावान कवीच्या भावना तेवढाच संवेदनाशील शिक्षक आम्हाला हळुवारपणे उलगडून दाखवीत होता.. वाह, नुसती बहार आली.. !नवरसांच्या त्या सरींनी आम्हाला चिंब भिजविले…दुगल गुरुजी जणू स्वतःबरोबर संपूर्ण वर्गाला स्कॉटलंडच्या त्या हायलँड भागात घेऊन गेले होते..आणि आम्हाला समोर शेत कापणारी, अल्लड ,खेडवळ,तरुणी डोळ्यासमोर प्रत्यक्ष दाखवीत होते! एक चमत्कार आम्ही अनुभवत होतो ..त्याचे गारुड आजही मनावर आहे.. आठवण झाली की ते दृश्य डोळ्यासमोरून हलत नाही…!!
ही आठवण येथे सांगण्याचे प्रयोजन एवढेच की आपण शिकवलेला एक धडा, दुय्यम शिक्षक पुन्हा शिकवू इच्छितो, तरी त्याला परवानगी देणारे आचार्य मोठे, की शिकवून झालेले असून सुद्धा, आपल्या मनाच्या समाधानासाठी , हेडमास्तरांची माफी मागून, पुन्हा तो धडा शिकवणारे दुय्यम शिक्षक मोठे? मला वाटते, हे दोघेही महान आचार्य होते! तस्मै श्री गुरवे नमः”
या संदर्भातील एक सुंदर आठवणही मुद्दाम सांगतो. त्या दिवशीच्या सरांच्या शिकविण्यानंतर, हा स्कॉटलंड देश आणि त्यांतीली ‘हायलँड’भागातील शेते, आयुष्यात कधी तरी बघावी अशी ऊर्मी मनाच्या कोपऱ्यात राहून गेली होती . ते माझे स्वप्न होते .पूर्तीचा योग येत नव्हता. एकदा व्यवसायानिमित्त फ्रान्स ते इंग्लंड असा बोटीने प्रवास केला होता. त्यावेळी इंग्लंडच्या डोव्हर बंदरापासून ते लंडन शहरापर्यंत प्रवास करताना मध्ये कुठे स्कॉटलंडचा भाग दिसतो का म्हणून भाबडेपणाने पाहात होतो. मात्र ते शक्यच नव्हते. पण काय सांगू? काही वर्षांपूर्वी तो योग अचानक आला.. आमच्या कौटुंबिक पर्यटनात मुलांनी इंग्लंड-फ्रान्स या देशांची सफर करण्याचे ठरविले होते. मी मुलांना, “जमल्यास आपण दोन दिवस वाढवून स्कॉटलंडची सफर ही करता आल्यास करूया का?” अशी विनंती केली. आणि ती मान्य झाली. कशासाठी हे तेव्हा कोणी विचारले नाही. लंडनहून पॅरिसला जाण्याआधी आम्ही लंडन-स्कॉटलंड हा प्रवास भाड्याने घेतलेल्या मिनी बस बसने केला. स्कॉटलंडमधून जाताना ” हायलँड प्राॅव्हीअन्स्” अशी पाटी दिसली आणि थोड्या विश्रांतीसाठी थांबून तेथे चहा घेऊया ही माझी विनंती ही सर्वांनी मान्य केली. सर्वजण आरामशीर चहापान करताना मी हळूच उठून रस्ता ओलांडून समोरील शेतात, एका कोपऱ्यात उभा राहून शांतपणे समोरील दृश्य पहात राहिलो.. उंच सखल टेकड्यामध्ये सपाट जमीन आणि जमिनीवर तसेच डोंगर पठारावर पिवळीशार बार्लीची शेती दिसत होती. मी अगदी स्तब्धपणे ते दृश्य पाहत होतो आणि पाहता पाहता त्या शेतात मला हातात विळा घेऊन कापणी करणारी एक अल्लड खेडवळ बालिका दिसू लागली… हो, तीच ती ‘सॉलिटरी रीपर’.. दुगल गुरुजींनी त्या दिवशी कविता शिकवितांना आम्हाला दाखविलेली… १९५७ सालच्या सरांच्या त्या ९वी च्या वर्गात मी कधी पोहोचलो हे मला कळलेच नाही.. मला कसलेच भान नव्हते.. मंडळींच्या हाका ऐकून तंद्री भंगली…बसमध्ये बसण्यासाठी पावले मागे वळली. “बाबा तुम्ही मन लावून एवढे काय पाहत होतात?” हा प्रश्न आला आणि मी ही सर्व कथा त्यांना ऐकविली …सर्वांनीच चहापानानंतर त्यादिवशी काव्यरसपान केले! एक हाडाचा शिक्षक, मुलांच्या मनावर किती गारुड करू शकतो याचे हे ज्वलंत उदाहरण!!
चार वर्षे दुगल सरांकडून इंग्रजी, संस्कृत, मराठी विषय शिकताना असे अनेक प्रसंग आले आहेत!
दुगल कुटुंबीय सुरुवातीपासून बोर्डीचा निरोप येईपर्यंत, बोर्डीच्या प्रसिद्ध ‘बर्वे-चाळीत’ राहिले. आजही ही चाळ तशीच आहे. बर्वे-चाळीचा व दुगल कुटुंबीयांच्या अगदी डावीकडील खोलीचा फोटो मी मुद्दाम या लेखात दिला आहे. घोलवडहून बोर्डीला जाताना माझी नजर या वास्तूकडे जाते आणि त्या खोली समोर आल्यावर माझी मान आपोआप आदराने लवते!
सन 1950 पासून 1962- 63 पर्यंतची वर्षे आनंदात गेली. सरांनी शाळेला खूप दिले. संस्थेने सरांना सन्मान दिला. विद्यार्थी ही भरभरून ज्ञानकुंभ घेऊन गेले. त्या काळांत आमच्या बोर्डीची शाळा ठाणे जिल्ह्यातच नव्हे, महाराष्ट्रात एक आदर्श शाळा म्हणून गणली जात होती. बोर्डीच्या शारदाश्रमच्या कीर्तीचा डंका अखंड भारतात वाजत होता. आमच्या शाळेचे काही चांगले उपक्रम, सुंदर संकल्पना इतर शाळाही राबवू लागल्या होत्या .आमच्या शाळेत पूर्वीपासून एक सुंदर व्यवस्था मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सेवा समिती’ मार्फत सुरु होती. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची वाटणी निरनिराळ्या सहा गटांत होत असे. मुलांचे चार मुलींचे दोन असे सहा गट असत. त्यांचे संघनायक असत व त्यांना विशिष्ट नावेही दिली जात. मी शाळेत असताना ‘प्रभात’, ‘लोकमान्य’, ‘धनुर्धर’ अशी माझ्या संघाची नावे मला आठवतात. वर्षभर विविध स्पर्धांमधून या सहा संघांची चढाओढ चालू असे. खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, अभ्यास अशा विभागात स्पर्धा असत. वर्षाअखेरीस, या सर्व विभागातून गुणांनुक्रमे उत्कृष्ट ठरणाऱ्या संघाला ‘चॅम्पियनशिप’ चषक दिला जात असे. नाट्यकला व सांस्कृतिक कार्यक्रमांची एक स्पर्धा होत असे. बोर्डी घोलवड व संपूर्ण परिसरातील नागरिकही तेथे हजेरी लावीत. प्रत्येक गटाला आपल्या संघाचे ‘संघचिन्ह व संघघोष’ म्हणून गीत सादर करावे लागे. मला आठवते त्याप्रमाणे या सर्व संघांची संघगीते ही गुरुवर्य दुगल सरांनी लिहून दिलेली असत. प्रत्येक संघाचा कार्यक्रम त्या गीतानेच सुरू होई. परीक्षक कार्यक्रमांचे परीक्षण करीत व क्रमवारी देत. परिसरातील सर्वांसाठी तो एक मोठा आनंदमय असा कौटुंबिक सोहळाच होता. मुलांनी सादर केलेली, दुगल सरांनी लिहिलेली संघगीते ऐकणे हा त्या सर्व कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असे.
त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या क्रीडा स्पर्धा ही बहुदा आमच्या शाळेच्या विस्तीर्ण मैदानावरच होत असत. त्यावेळी खेळाडूंना सांघिक शपथ देण्यासाठी त्यांनी गावयाचे गाणे सरांनी तयार केले होते. त्या स्फूर्तीदायक गाण्याच्या काही ओळी आजही माझ्या ओठावर आहेत.
“असावे मोकळे मैदान, समस्ता संधीही समान, जडावे प्रेम खेळांचे, वागणे शूरवीरांचे!
झटू या नियम पाळाया, यशाचा तो असो पाया,आम्हाला ईश्वरा देई, शक्ती अन् शील फलदायी!
विषादा कधीही ना मानू, पराभव हसूनिया झेलू. नव्हे रे नाही हे माझे, यशाचे श्रेय हे तुझे!….
आजही या गाण्याने खेळाडूंना शपथ दिली जाते किंवा कसे मला माहीत नाही. त्या काळात एकमुखाने सर्व खेळाडू मैदानावर हे गाणे गाऊ लागले की सर्वांच्याच अंगात वीरश्री संचारत असे हे खरे!!
दुगल सर व त्यांच्याप्रमाणेच आमच्या सर्व गुरुजनांनी या शाळेतून अनेक ख्यातकीर्त विद्यार्थी निर्माण केले .त्यांनी विविध क्षेत्रात आपला स्वतःचा व आपल्या शाळेचा लौकिक वाढविला आहे. प्रसिद्ध रंगकर्मी श्री.अमोल पालेकर हे त्यातील एक नांव. नाट्यकलेचे प्राथमिक धडे यांनी याच शाळेत अशाच कार्यक्रमांतून घेतले आहेत. दुगल सरांविषयी आठवणी सांगताना त्यांनी म्हटले आहे…
“दहावी अकरावीच्या शिक्षणासाठी बोर्डीतील शारदाश्रमात रहावयास मी आलो. मी अभ्यासात चांगला होतो. पण मी केवळ पुस्तकी किडा बनू नये, माझे आयुष्य सर्व बाजूंनी फुलायला हवे, माझा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी माझ्या आई-वडिलांनी मला होस्टेलवर पाठविले होते. मला असे वाटते की हा त्यांचा दृष्टिकोन नक्कीच व्यापक होता. होस्टेलवर राहिल्याने मलाही जगाकडे पहायची वेगळी दृष्टी मिळाली. एक छोटे उदाहरण देतो. मी एकदा निबंध म्हणून ‘प्रवास वर्णन’ लिहिले होते. ते आमच्या शाळेतील श्री. दुगल सरांना खूप आवडले. म्हणून त्यांनी वर्गात वाचून दाखविले. नंतर ते मला म्हणाले,” ‘ऋतुचक्र’ वाचले आहेस का?” मी म्हणालो, “नाही”. मग त्यांनी विचारले,” दुर्गा भागवत हे नाव माहीत आहे का?” माझे उत्तर परत नाहीच होते. तेव्हा त्यांनी मला ग्रंथालयात जाऊन ते पुस्तक वाचायला आणि नंतर त्यावर चर्चा करायला सांगितले. प्रत्येक गोष्ट केवळ परीक्षेसाठी करायची नसते, ‘स्वतःला शोधण्यासाठी’ ही काही गोष्टी करून पहायच्या असतात, याची जाण निर्माण होण्याच्या प्रक्रियेची ती सुरुवात होती, असे मी मानतो .”
श्री. पालेकरांची ही टिप्पणी बोर्डी शाळा, शारदाश्रम व दुगल सर यांच्या शिक्षणाविषयक दृष्टिकोनाची जाणीव करून देते.
सर्व ठीक चालले होते. 1962 साली श्री. साने सर मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आणि श्री. दुगल सरांना ज्येष्ठताक्रम आणि त्यांचे शाळेतील उत्तम काम यामुळे निश्चितच मुख्याध्यापकाची जागा मिळणार असे सर्वांना वाटत होते. आचार्य भिसे यांना देखील गोखले एज्युकेशन सोसायटी कडून त्याच निर्णयाची अपेक्षा होती. मात्र यावेळी सोसायटीने, “मुख्याध्यापक हा सोसायटीचा आजीव सेवक असला पाहिजे” असा नियम केला. दुगल सर आजीव सेवक नव्हते. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार केला गेला नाही. आचार्यांची मध्यस्थीही कामी आली नाही. शाळेतील अनेक सहकारी शिक्षकांना हा निर्णय न पटल्याने काहींनी राजीनामे देण्याचीही तयारी केली. मात्र सरांनीच आपल्या सहकाऱ्यांना तसे न करण्याची विनंती करून आचार्यांची माफी मागून, स्वतः शाळा सोडण्याचा कठोर निर्णय घेतला. बोर्डी हायस्कूल सरांसाठी केवळ एक शाळा नव्हती तर अनेक शिक्षण महर्षींनी आपल्या जीवननिष्ठा अर्पण करून तयार केलेले ते एक उत्तम संस्कार केंद्र होते आणि तेथे आचार्य भिसे आचार्य चित्रे ही त्यांची दोन श्रद्धास्थाने तेथे होती!!
बोर्डी शाळा सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरांना अनेक शाळांमधून बोलावणी येत होती. मात्र त्यांनी केळवे माहीम येथील भुवनेश किर्तने विद्यालयाची विनंती मान्य केली. कारण ते विद्यालयदेखील भुवनेश महाराज किर्तने यांचे सारख्या एका ध्येयवेढ्या शिक्षकाने काही मूल्याधिष्ठित तत्वावर उभे केले होते. सरांनी तेथे जाण्याचा निर्णय घेतला. बोर्डी शाळा एका कर्तृत्ववान, निष्ठावान ध्येयवादी शिक्षकाला कायमची अंतरली एवढे खरे !!
आता मुख्याध्यापक म्हणून आपल्या संकल्पनेनुसार शाळेचे व्यवस्थापन करणे सरांना शक्य झाले होते. त्यांच्या स्वतःच्या ‘आदर्श शाळे’ बद्दल काही निश्चित कल्पना होत्या. आपल्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देत, आपल्या मनाप्रमाणे मुलांची जडणघडण करण्याची संपूर्ण मुभा त्यांना आता होती. सरांनी भुवनेश कीर्तने विद्यालयाचा कायापालट केला. वाचनालय, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान व अगदी शाळेची नवी ईमारत सर्व त्यांच्या मनाप्रमाणे तयार झाली. अतोनात कष्ट करावे लागले. मात्र सरांनी आपले स्वप्न पूर्ण केले. आपल्यानंतर आपले वारसदारही तयार केले. भुवनेश कीर्तने विद्यालयात त्यांनी एक नवा इतिहास रचला. मुलांचे, पालकांचे, ग्रामस्थांचे प्रेम मिळविले ! तो इतिहासही मोठा रोमांचक. 1972 साली दुगल सर भुवनेश कीर्तने विद्यालयातून सेवानिवृत्त झाले.
दुगल सरांचे बरोबर काम केलेल्या व पुढे शाळेचे मुख्याध्यापक झालेल्या त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी त्यांच्याविषयी जे लिहिले आहे त्यावरून सरांनी मुख्याध्यापक म्हणून शाळेला दिलेल्या योगदानाची कल्पना येऊ शकते…
शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. भा. मुं. राऊत सर म्हणतात,
“श्री. नरहर दिनकर दुगल हे आमच्या भुवनेश कीर्तने विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक. ध्येयानिष्ठ कर्तव्यशील आदरणीय व्यक्तिमत्व . त्यांच्या कार्यकाळामध्ये विद्यालयाला सुस्थिती प्राप्त झाली आणि असलेल्या लौकिकात आणखी भर पडली!
‘विद्यालय हे विद्यादानाचे पवित्र केंद्र आहे. तेथे इतर कोणत्याही प्रकारच्या शालाबाह्य गोष्टींना वाव नाही’ अशी त्यांची धारणा होती. विद्यार्थी केंद्रस्थानी मानून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते अविरत कार्यरत राहिले. विद्यार्थी-शिक्षक-पालक आणि समाज ही त्यांच्या कामाची चौकट होती. विद्यार्थ्यांच्या बरोबर जुनियर शिक्षकांनादेखील त्यांचे मार्गदर्शन असे. शिक्षकांच्या पाठाचे निरिक्षण झाल्यानंतर त्याला ऑफिसमध्ये बोलावून मार्गदर्शक सूचना करीत असत. आपला शिक्षक एक ‘ऊत्तम शिक्षकही’ तयार झाला पाहिजे असे त्यांना सतत वाटत असे.”
“इंग्रजी हा सरांचा मूळ विषय. विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत ते शिकवीत असत. ज्युनिअर शिक्षकांच्या दृष्टीने, शिकविण्यास कठीण अशा या विषयाबाबतीत अनेक वेळा त्यांचे मार्गदर्शन मला मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतर दहावी अकरावीला इंग्रजी विषय शिकवण्याची जबाबदारी माझ्यावर आली, तेव्हा मला अडचणी वाटल्या नाहीत. ते लेखन आणि कविता करीत. ‘माझी शाळा कल्पतरू’ ही कविता आजही माझ्या स्मरणात आहे. कवि आणि नवलेखकांना त्यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत असे. शाळेत विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक प्रकल्प राबविले.’ विद्यार्थी सभा’, उपक्रम भारतीय संसदेच्या धर्तीवर राबवून, त्या माध्यमातून भवितव्यात समाजातील अनेक जबाबदाऱ्या पेलण्यासाठी विद्यार्थी घडवावयाचे होते. हा फार दूरदृष्टीचा विचार होता.
‘किं जीर्णं तृणमत्ति मानमहतामग्रेसरः केसरी’,.( सिंह जरी म्हातारा झाला तरी तो वाळलेले गवत कधीच राहणार नाही) असे त्यांचे तात्विक विचार होते.
विचाराचे पक्के होते. आपल्या विचारातून त्यांनी कधीच माघार घेतली नाही. गांधीवादी विचारसरणी आणि आचार्य भिसे यांचे जीवन विषयक मार्गदर्शन या अनुसार त्यांचे आचरण असे.ते फुलझाडात रमत असत. त्यांनी आपल्या घराभोवती सुंदर बाग तयार केली होती. अनेक फुलझाडे लावली होती. माझ्या या शिक्षणाक्षेत्रातील गुरूला कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन करतो.”
त्यांचे दुसरे एक सहकारी व पुढे शाळेचे मुख्याध्यापक झालेले श्री. परशुराम ल. पाटील सर म्हणतात,
“श्री. दुगलसर कीर्तने विद्यालयात 1963 साली मुख्याध्यापक म्हणून कार्यरत झाले. शाळेची जबाबदारी अत्यंत कठीण समयी त्यांनी स्वीकारली . ‘माझ्या दृष्टीने जेवढे चांगले काम करता येईल ते मी करीन’ अशी यावेळी त्यांची भावना होती. एक अनुभवसंपन्न व इंग्रजी विषय शिकविण्यासाठी चांगले शिक्षक आम्हाला मिळाले .दुगल सर हे कवी मनाचे प्रेमळ आणि शिस्तप्रिय होते. त्यांचे चौकोनी कुटुंब हे आदर्श होते .त्यांच्या दोन्ही मुली परमेश्वरी देणगी लाभलेल्या होत्या. त्यांची दुसरी मुलगी(नीलोत्पला) एस. एस. सी. पास झाली तेव्हा ती बोर्डात इंग्रजी विषयात पहिली आली .तिला इंग्रजी विषयाचे ‘ कमळाबाई पारितोषिक’ मिळाले होते. त्यांची मोठी मुलगी प्रभा एम. एस. सी. झाली होती. विद्यालयाला शास्त्र शिक्षक मिळणे दुरापास्त होते, अशावेळी तिने दोन वर्षे शास्त्र शिक्षकांची जबाबदारी पार पाडली. ट्रेंड नसूनसुद्धा ती शिकवत असलेला वर्ग अगदी शांत असे. तिचा वर्ग म्हणजे एक वस्तूपाठ असे. दुगल सरांनी शाळा हलती बोलती केली. विद्यार्थ्यांचा अभ्यास, शिक्षकांचे शिकवणे, शालेय कार्यक्रम याकडे दुगल सर कटाक्षाने लक्ष देत. याशिवाय शालेतर कार्यक्रमात भाग घेण्यासाठी उद्युक्त करीत. मासिक सभेत पुढील महिन्याचे नियोजन असे. त्यामुळे शाळेचे काम आखल्याप्रमाणे चाले. अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विषयशिक्षकांनी काय करायला पाहिजे याचे मार्गदर्शन होई. जादा तासीका घेऊन अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे करून घेतला जात असे. त्यामुळे शाळेचा दर्जा वाढून एस. एस. सी. ची गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली.
दुगलसर कवी होते. त्यांनी लिहिलेली अनेक प्रासंगीक गीते मलाआठवतात.
शाळेविषयी ते म्हणतात,
‘ माझी शाळा कल्पतरू, कुणीही येवो वाटसरू वाटसरू,’
कार्यक्रमाचे निमित्ताने कोणी पाहुणा येणार असल्यास त्यानिमित्ताने ते स्वागत गीत लिहीत व ते विद्यार्थ्यांकडून सादर करीत.
‘ भुवनेशाच्या ज्ञानमंदिरी, गुरुवरा स्विकारा स्वागता’ अशा स्वागत गीताच्या ओळी असत.
लहान मुलांकरिता ते कथासंग्रह लिहित. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून दर आठवड्याला सुंदर गोष्टींची पुस्तके, पुस्तक-पेढीतून वाचावयास देत. स्वर्गीय इंदिरा गांधींनी बांगलादेशात शांतीसैनिक पाठवून बांगलादेश स्वतंत्र केला तेव्हा दुगल सरांनी
‘आमार सोनार बांगला..’
अशी सुंदर कविता लिहून ती विद्यार्थ्यांकडून सुरात गाऊन घेतली. विद्यार्थ्याबरोबरच शिक्षकांच्या गरजांकडेही लक्ष देत. त्यांच्या कालखंडात आम्हा तीन शिक्षकांना त्यांनी एक, एक वर्षाच्या अंतराने बी. एड. साठी पाठवून आमचे ट्रेनिंग पूर्ण करून घेतले. दुगल सरांनी विद्यालयास नऊ वर्षे सेवा दिली व दहा डिसेंबर 1972 मध्ये ते निवृत्त झाले”.
दोन सहकार्-यानी दिलेल्या अभिप्रायांमधून दुगल सरांची एक उत्तम प्रशासक म्हणून कार्यक्षमता, विद्यार्थी प्रेम, तरल कवी मन, निसर्ग प्रेम आणि आपल्या सहकार-या विषयीची तळमळ अशा अनेक गुणांचे दर्शन होते!
भुवनेश कीर्तने विद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर गोवा येथील ‘भाऊसाहेब बांदोडकर विद्यालयात रुजू झाले. केळवे माहीम शाळेत असतानाच कधीतरी एकदा साहित्य संमेलनात त्यांची गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्याशी गाठ पडली होती. त्यावेळी सरांनी निवृत्तीनंतर आपल्या शाळेत यावे अशी इच्छा भाऊसाहेबांनी प्रदर्शित केली होती. सरांचे व्यक्तिमत्व व त्यांची गुणवत्ता भाऊसाहेबांनी बरोबर हेरली होती.
गोव्यातही त्यांनी उत्तम प्रकारे काम केले. शाळेची गुणवत्ता व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुरू होता. मात्र दुर्दैवाने भाऊसाहेबांचे अकाली निधन झाले. सरांनी गोवा सोडले. कोल्हापूरला आपल्या बंधूच्या शेजारी एक घर भाड्याने घेऊन त्यांनी तेथे मुक्काम केला. तेथे स्वस्थ बसले नाहीत. आपल्या आवडीचा लेखनाचा छंद जपण्यासाठी भरपूर वेळ मिळू लागला.
‘कुमार पुष्पक’ हा काव्यसंग्रह बराच जुना. बोर्डीत असताना प्रसिद्ध झाला. त्याच्या सर्व प्रती भराभर संपल्या. ‘मंगलवाडी’ ही कुमारांसाठी असलेली कादंबरीका बोर्डीत असताना प्रकाशित झाली. त्याच्याही अनेक आवृत्त्या निघाल्या. ‘मंतरलेली तलवार’, ही नाटिका आकाशवाणीवर सादर झाली. ‘आधुनिक सांदीपनी आश्रम’, ‘समीर पाहिला कुणी?’, ‘गुलाबी कावळा’, ‘सॅमी हॅमि’ ही त्यांची काही गाजलेली पुस्तके! दुगल सरांचे अनेक लेख कथा आणि काव्य त्याकाळी प्रसाद, शालापत्रक, अशा मासिकामधून प्रसिद्ध होत असत.
“आपले वांग्डमय आर्थिक दृष्टीने दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, त्यामुळे ते माफक किमतीत उपलब्ध व्हावे” अशी त्यांची आपल्या प्रकाशकांना विनंती असे. मात्र प्रकाशकांचे ‘नफा’ हेच उद्दिष्ट असल्याने सरांनी आपली स्वतःची प्रकाशन संस्था ‘बाल कुमार साहित्य सरिता’ निर्माण केली. आपली पुस्तके अत्यंत माफक दरात मुलांसाठी उपलब्ध करून दिली. स्वतः खोट खाऊन हा उद्योग त्यांनी सुरू केला होता. त्यांचे एक शिष्योत्तम श्री. अमोल पालेकर, श्री. पणशीकर यांनी याबाबतीत सरांना खूपच सहाय्य केल्याचे मला समजले. शेवटी आर्थिक नुकसानीतील हा उद्योग जास्त काळ चालू शकला नाही. सरांसाठी ही खूप वेदनादायक घटना होती मात्र त्यांचा नाईलाज होता.
त्या वयातही वितरणासाठी त्यांनी साध्या एसटी बस मधून अनेक गावोगावी प्रवास केला. त्यांच्या तब्येतीला बराच त्रासही झाला .पण हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने ते थांबले नाहीत.
‘मंगल वाडी’ या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत आपल्याआजी विषयी व गुरुवर्याविषयी व्यक्त केलेले भाव त्यांच्या शब्दात ….
“कै. सौ. गं. भा. माईस ..
गंगा भागीरथीप्रमाणेच धवल निर्मल होतीस तू . अंतर बाह्य परमपवित्र होते तुझे चरित्र आणि चारित्र्य. तुझ्या त्यागाला, सेवेला ,निरलसतेला सीमा नव्हती. आप-परभावाचा तुला स्पर्शही नसल्यामुळे सावत्र मुलाच्या मुलांची, सख्याआजी पेक्षाही जास्त मायेने काळजी घेतलीस तू. तूच आमच्यामध्ये सात्विक भाव निर्माण केलेस .
तुझ्या पवित्र स्मृतीला तुझा बाळू आपली ‘मंगलवाडी’ प्रेमाने अर्पण करीत आहे.
शिक्षणक्षेत्रातील माझे आदर्श पूज्य कै. आचार्य भिसे व पूज्य श्री. चित्रे गुरुजी या थोर विभूतींना मंगलवाडीची तिसरी आवृत्ती प्रेमादरपूर्वक अर्पण करीत आहे.”
आपले बालपण , त्यावेळची कौटुंबिक स्थिती, शिक्षणकालात करावे लागलेले कष्ट स्वातंत्र्याच्या प्रेरणेने विद्यार्थीदशेतील धडपड, स्वातंत्र्यवीर सावरकराविषयी असलेला जाज्वल्य अभिमान व शेवटी त्यांची झालेली भेट याविषयी सरांनी स्वतःच एके ठिकाणी लिहून ठेवले आहे ते म्हणतात..
“माझे वडील क्रांतिकारकांच्या ‘अभिनव भारत’ मध्ये होते. आमच्या घरातल्या एका गुप्त जागी तलवारी, भालेबरच्या, एक बंदूक अशी आमच्या पूर्वजांची शस्त्रास्त्रे होती. खंडे नवमीला आम्ही त्यांची पूजा करायचो.”
” कुमार वयांत माझ्या हाती सावरकरांचे मॅझिनीचे पुस्तक लागले. पुस्तक वाचून संपवले तेव्हा मी अगदी भारावला गेलो होतो.पुस्तकाची प्रस्तावना मी तोंड पाठ केली. सावरकरां बद्दलच्या चित्त थरारक गोष्टी ऐकणे व सोबत्यांना सांगणे हा माझा छंद होता. ब्रिटिश सरकारची नोकरी करावयाची नाही, अशी शपथ मी घेतली अगदी कुमार वयात!”
“देशभक्तीपर गाणी गात प्रभात फेऱ्या काढणे, दारू दुकानावर निरोधन करणे, गांधी टोपी घालणे, इंग्रजी सरकार विरुद्ध बोलणे लिहिणे, याबद्दल हेडमास्तरांकडून दोन्ही हातावर छड्या खाल्ल्या. पोलिसांच्या दंडुक्यांचा व बंदुकीच्या दस्त्यांचा प्रसाद ही खाल्ला. तरी ‘लेंगे स्वराज्य लेंगे’ म्हणत झुंजत राहिलो. सतत पहिल्या प्रतीचे यश मिळवून पदवी संपादन केली. थकलेल्या वडिलांच्या शिरावरची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली. ती पार पाडण्यासाठी अर्थार्जन करणे आवश्यक होते.”
“मी गोमांतकात खाजगी विद्यालयात शिक्षक म्हणून जाण्याचे ठरविले. त्याच वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्थानबद्धेतून सुटका होऊन ते मुंबईत दादर भागातल्या ‘भास्कर भुवना’मध्ये आलेले ऐकताच अंगात वीज सळसळून गेली. गोव्याला जाण्यापूर्वी त्यांची भेट घ्यायचीच असे माझ्या मनाने घेतले. त्या दिवशी पहाटे उठून मी दादरचा समुद्र किनारा गाठला. ‘भास्कर भुवन’चा जिना चढून वर जाताच बाबाराव सावरकर भेटले. त्यांना माझा येण्याचा हेतू सांगताच ते म्हणाले, “तात्याची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी त्याला भेटी-गाठी बंद केल्यात”. माझ्या वडिलांची व माझी थोडक्यात माहिती दिली. ते विरघळले आणि म्हणाले, “थांब मी बघून येतो!”
“थोड्या वेळाने बाहेर येऊन ते म्हणाले, “दुगल तुम्ही भाग्यवान आहात. तात्या येत आहेत”. तेथेच आनंदाच्या आवेगात मी उठून उभा राहिलो. तो समोरच मनोमनी पूजिलेली स्वातंत्र्यवीर सावरकरांची तेजस्वी मूर्ती! त्या भावदर्शी अवर्णनीय नेत्रांनी सारं अंग रोमांचित होऊन मी खाली वाकून नमस्कार केला. त्या पवित्र चरणांचा स्पर्श माझ्या हातांना होतोय तोच तात्यांनी आपल्या हातांनी मला उठवून आपल्या जवळ बसवून घेतले. माझी पाठ थोपटून ते म्हणाले, ‘असेच तुझ्यासारखे आणखी ध्येयवेडे तयार कर. तू गोमांतकात शिक्षण कार्य करायला जातोस हे ऐकून मला आनंद झाला’ असे म्हणून त्याबाबतीत त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी मला सांगितल्या. त्यांचे स्फूर्तीदायी शब्द माझ्या अंतःकरणावर कोरले गेले”.
ज्या शब्दात सरांनी स्वातंत्र्यवीरांशी झालेल्या पहिल्या भेटीचे वर्णन केले आहे ते वाचून आपल्याही अंगावर रोमांच उभे राहतात! तात्यांना दिलेले वचन सरांनी अखेरपर्यंत पाळले.
सरांच्या धर्मपत्नी कै. सौ. ललिता दुगल यादेखील पदवीधर होत्या. मॅट्रिकच्या परीक्षेत त्या पूर्ण गोव्यात प्रथम आल्या होत्या. विणकाम भरतकाम रांगोळी काढणे यातही त्या अत्यंत पारंगत होत्या. अत्यंत रुचकर पदार्थ बनवणे हा त्यांचा छंद होता. अनेक स्पर्धांमधून त्यांनी बक्षीसेही मिळविली होती. दादांच्या पुस्तकांचे हस्तलिखित तयार करण्यात त्यांचीच मोठी मदत असे. कै. सौ. ललिता बाईंनी बोर्डीत आल्यावर कै. पद्मभूषण ताराबाई मोडक यांचे विकासवाडी संस्थेत अध्यापनाचे कार्य केले. त्या संस्थेतील शिक्षकांना प्रशिक्षण देत असत. पुढे त्यांनी हिंदीच्या परीक्षा देऊन तो विषयही तेथील शिक्षकांना शिकविला. अशा कर्तृत्ववान, हुशार, व संसारासाठी स्वतःच्या कर्तृत्वाला आवर घालून पतीला सर्व प्रकारे सहाय्यभूत ठरलेल्या अर्धांगिनीमुळे सरांचे संसारिक जीवन निश्चितच यशस्वी झाले! कै.ललिता दुगल यांच्या कर्तृत्वाला सलाम ! त्यांच्या स्मृतीला वंदन!!
सरांच्या सर्वात धाकट्या बंधूनी आपल्या दादाविषयी जे सांगितले आहे त्यावरून दादां व ललिता ताईंनी या संपूर्ण कुटुंबासाठी घेतलेले कष्ट, उभयतांनी दिलेले संपूर्ण योगदान व त्याची कुटुंबीयांना असलेली जाणीव याचे दर्शन घडते. ते म्हणतात,
” ‘Today, for the second time, I experienced the loss of my father..’, Shashi Kapoor said when Raj Kapoor died. My feelings were no different when I lost my eldest brother, Dada.
From my early childhood, I observed him shouldering the responsibility of our large family with my siblings and my old father, but never grudging it or even making us aware that his own career and prospects were being sacrificed for it.”
” Having suffered immense hardships and hard work for his own education till graduation, he protected us from going through the same ordeal till completion of our college education. One of my brothers had opted for the arts course due to our economic condition, but Dada knew his potential and made him join the science branch; he became a successful doctor.”
” During all these years, we did not even realize what great support he had given us. He was fortunate to have a wife who, having come from a well-to-do family, never grumbled about the compromise she had to make for our family. Both of them treated us with love and consideration, as any parents would do for their children.”
” He was an ardent supporter of women’s liberation and women’s rights. He used to be highly critical of traditional customs and beliefs, which, according to him, were based on blind faith and often ignorance. At the same time, he was a worshiper of values like loyalty, integrity, honesty, and high moral standards. He was secular to the core, and religious or casteist fanaticism was anathema to him. An excellent teacher, he took pains to make students aware of the finer points in the subject he taught. He was fastidious about neatness and cleanliness and always insisted on being punctual in every activity or program, “
” He was a Puritan in his tastes and Spartan in his lifestyle. He never compromised with his principles; he hated a casual and easygoing approach to life”.
दादांच्या बंधूंची प्रतिक्रिया मुद्दाम इंग्रजीत दिली आहे, आदर भावना व बंधुप्रेमाचे दर्शन त्यांच्याच शब्दात व्हावे म्हणून!
” दादा व वहिनीने आम्हा सर्वांचे, आई-वडील आपल्या मुलांचे संगोपन ज्या प्रेमाने करतील तसे केले..” या शब्दातच सर्व काही आले!
दुगल दांपत्याला दोन कन्या. मोठी जयप्रभा व छोटी नीलोत्पला. जयप्रभाने एम. एस. सी. केल्यानंतर काही काल भुवनेश कीर्तने विद्यालयात उत्तम प्रकारे शिक्षकी पेशा केल्याचे मागे आलेले आहे. पुढे अमेरिकेत एम एस चा अभ्यास करीत असतानाच श्री. जयंतराव सरदेशपांडे या उच्चशिक्षित (M S, USA) तरुणाशी तिचा विवाह होऊन, अमेरिका सोडून दोघांनीही काही काळ( Montrial) कॅनडात वास्तव्य केले. आता हे कुटुंब गेली तीस वर्षे इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. जयंतरावांचा स्वतःचा व्यवसाय तेथे आहे. मोठा मुलगा समीर ऑक्सफर्ड व कॉर्नेल (युएसए) या विद्यापीठातून उच्चशिक्षित झाला आहे. तो कॅनडामध्ये वास्तव्यास असतो . या मंडळीचे आपल्या व्यवसायाबरोबर समाजकार्य ही जोरात सुरू असते. अपंग मुलांना शिक्षणात मदत, कॅन्सर संशोधन संस्थेला सहकार्य, तसेच काही इतर सामाजिक संस्थांसाठी निधी उभारण्याचे कामही हे दोघे करतात. धाकटा सागर उच्च शिक्षणानंतर( M S, पेनसिल्वानिया) इंग्लंडमध्येच स्थित असून ‘अॅपल’ कंपनीत काम करीत असतो.
सरांची धाकटी कन्या नीलोत्पला, एम्. फिल होऊन तिचा विवाह श्री. सुभाष पुरव यांचे बरोबर झाला आहे. श्री. सुभाष हे पेशाने मरीन इंजिनियर असून आता दोघेही पुण्यात निवृत्तीचे जीवन जगत आहेत. त्यांचा मोठा मुलगा आशिष अमेरिकेत उच्च शिक्षित असून तेथेच मोठ्या पदावर नोकरी करीत असतो. मुलगी चिकीता अमेरिकेतील एम. एस. शिक्षणानंतर भारतात परतली आहे. आपल्या आजोबांच्या समाजकार्याचा वसा घेऊन पुण्यात तिचे समाजकार्य चालू आहे. महानगरपालिका शाळेतील गरीब मुलांसाठी तिने दोन वर्षे अध्यापन केले, एका सामाजिक कर्तव्याच्या भावनेने! आजही कित्येक विद्यार्थी अडचणीच्या प्रसंगी तिचा सल्ला घेतात व त्यांना मदत मिळते. सर्वात लहान कन्या शब्दुली, एम बी ए नंतर अमेरिकेतच वास्तव्यास असते. आजोबांचे कवित्व गुण तिच्यात उतरले असून छान कविता करते.
ही मुले जेव्हा लहान होती तेव्हा दादांच्या,
” शृंग जिंकिले आम्ही, एव्हरेस्ट बापुडे..
तेनसिंग संगती आम्ही चाललो पुढे…”हे संघगीत म्हणत जोरात ‘मार्च’ करीत हा त्यांचा खूप आवडता खेळ होता!
गौरवाची बाब म्हणजे या सर्व मुलांनी व नातवंडांनी आपले प्राथमिक ते परदेशातील उच्च शिक्षण बहुतांशी स्कॉलरशीपस् वर, केले आहे. आणि एवढ्या उच्च शिक्षणानंतर समाजकार्यातही उत्साह दाखवीत असतात. कै. दुगल सरांचा वारसा सर्वजण सर्वार्थाने पुढे चालवित आहेत.
ज्येष्ठ कन्या जयप्रभा तिने इंग्लंडहून आपल्या दादां बद्दल हे लिहून पाठविले..
“ He named me Jayaprabha, the light of victory, and my younger sister a blue lotus. I am so proud of my poetic father. When we shifted to Bordi, I was about three years old. Dada and I had chosen a house that was right on the seashore. There was a huge Suru tree garden in front of our house, and then the sea shore walking on the deserted C sure and little me enjoyed walking and talking with him on the shore walk. Dada, the nature lover, named my sons Sameer and Sagar when I first visited India after moving to Canada. My son Sameer was only one and a half years old. He was fond of the grandparents he called Dada Abo for Ajuba and soon picked up the word Venice to show him bright Venus in the evening sky.
समीर दादांना एवढा बिलगला होता की आम्ही कॅनडाला परत जायला निघालो तेव्हा आबू बरोबर नाही हे लक्षात आल्यावर समीरने रडून रडून इतका आकांत केला की एअर लाईन्सचा एक ऑफिसर बाहेर येऊन आबू कोण आहेत म्हणून अबोना शोधून आत घेऊन आला तेव्हाच समीर शांत झाला
Dada visited us in Montreal, Canada. They also traveled to New York and Washington. They enjoyed visiting the historical places. Dada had an open mind and was ready to listen to different ideas and views. From people living a different way of life, his grandchildren are very attached to him and can chit-chat with him freely and confidently. a
Abo imbibed a love for nature in his grandchildren.
कॅनडा ट्रिप बद्दल दादांनी लिहिले आहे प्रभाकडे कॅनडात घालविलेले दिवस हे माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचे शांततेचे आणि समाधानाची दिवस होते
या लेखासाठी कौटुंबिक व इतर माहिती मला नीलोत्पला ताई कडूनच मिळाली. त्यामुळेच हा लेख लिहणे मला शक्य झाले आहे. पुरव दांपत्याचा संपर्क माझे मित्र के. माहीमचे श्री. अनिल पाटील यांच्यामुळे होऊ शकला. म्हणून अनिलचे मला आभार मानले पाहिजेत.
नीलोत्पला ताईंनी आपल्या दादाविषयी सांगितलेली बोर्डीच्या बालपणातील एक आठवण मला खूपच हृदयस्पर्शी वाटली, ती त्यांच्या शब्दातच सांगतो..
“बोर्डीच्या मुक्कामात मी चार-पाच वर्षाची असेन. मात्र दादांचा रोजचा जीवनक्रम मला अजूनही आठवतो. पहाटेचे साडेतीन-चार वाजताच त्यांना जाग येई. नित्य कर्मै आटोपून आपल्या प्रार्थना हळू आवाजात म्हणत. उपनिषदांतील, ‘इशा वास्यम् ईदं सर्वम्… ‘ या वचनाने सुरू होई. भगवद्गीतेतील श्लोक ,पसायदान म्हणत, छान आवाजात आपल्या कविताही म्हणत ,शेवटी ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा ..’,ही भूपाळी होत असे.आमच्या घराला बाहेरून असणाऱ्या लाकडी चौकट्यातून दिसणारा निसर्ग पाहायला मला खूप गंमत वाटे. मीही बाबांचा आवाज ऐकून कधी कधी पहाटेस उठून त्यांच्या बाजूला बसून ते सर्व ऐकत असे. बाहेरील शांत वातावरण, समोरच्या समुद्राची हळू आवाजातील गाज व दादांच्या मंजुळ आवाजातील प्रार्थना मला मंत्रमुग्ध करीत. हे सर्व वातावरणच जादुई होते .आजही त्या दिवसांची आठवण झाली म्हणजे, प्रार्थना करणारे दादा व त्यांच्या शेजारी हात जोडून बसलेली मी, असे दृश्य माझ्या डोळ्यासमोर येते…!”
” दादांचा स्वच्छता व टापटीप याबाबत विशेष कटाक्ष असे. नेहमी खादीचे कपडे साधी राहणी असे. त्यांचा दिनक्रम ठरलेला असे. पहाटे चारला उठणे कधीही चुकले नाही. कधीतरी लवकर ही उठत. त्यानंतर रोजची प्रार्थना, व्यायाम, चालणे हेही होतच असे. वक्तशीरपणा त्यांच्या रक्तातच होता. समुद्राचे त्यांना विशेष आकर्षण होते. त्याला ते ‘माझा सागर सखा’ असे म्हणत. वेळ मिळाल्यास संध्याकाळी समुद्राच्या वाळूवर फे-या घालताना आपली आवडती गाणी गुणगुणत. त्यांच्या एका नातवाचे नाव सागर आहे! आकाशदर्शनातही त्यांना खूप आनंद होई. आपल्या मुलांना ,नातवंडांना त्याची माहिती करून देत.
त्यांच्या चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज दिसून येई. ते जेथे जात तेथे त्यांची छाप पडत असे. परदेशात गेले असताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने तेथील लोकांनाही त्यांचे वेगळेपण जाणवले”
” ते कलासक्त होते. संगीताची विशेष आवड होती. प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांच्याशी त्यांची वैयक्तिक मैत्री होती. बालनाट्य प्रणेत्या श्रीमती सुधा करमरकर यांचादेखील आमच्या कुटुंबाशी चांगला परिचय होता. पुण्यात राहायला आल्यावर दादांचे आवडते लेखक गो. नी. दांडेकर यांना भेटायला ते गेले होते. गो. नी. दांच्या कन्या प्रसिद्ध लेखिका, वीणा देव या त्यांच्या दोन्ही कन्यांना घेऊन दादांना भेटण्यासाठी आमच्या घरी आल्या होत्या. दादा गेल्यानंतर त्या आईला भेटायला आल्या व म्हणाल्या
“इतक्या थोड्या वेळात, एक दोन भेटीत दादांनी केवढी माया मला दिली. किती आपुलकी निर्माण केली!” कला क्षेत्रातील अनेक व्यक्तींशी दादांनी वैयक्तिक मैत्रीचे संबंध स्थापित केले होते.”
“आचार्य विनोबा आणि जयप्रकाश नारायण या विचारवंताबद्दल दादांना अत्यंत आदर होता. भूदान चळवळीला त्यांचा संपूर्ण पाठिंबा होता. ते वर्ध्याला पवनार आश्रमात विनोबाजींना भेटूनही आले होते. विनोबाजींचे अभ्यासपूर्ण चरित्र दादांनी लिहिले आहे, परंतु ते अप्रकाशीत राहिले. आमच्या घरात शेकड्यांनी पुस्तके होती. उपनिषदे, ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवरील टीका, गीता रहस्य, लोकमान्य टिळक, गांधी विनोबाजी, सावरकर रवींद्रनाथ टागोर ,गो नि दा अशांची मराठी इंग्रजीतील पुस्तके होती. दादा पुस्तके स्वतः विकत घेऊन वाचत. पुस्तकांचा संग्रह करणे हा त्यांच्या छंद होता. तीच आमच्या घरातील मोठी संपत्ती होती. आम्हाला सर्वांना वाढदिवसाला पुस्तकेच भेट मिळत असत.”
कन्येच्या या आठवणीतून दुगल सरांच्या कलासक्त, शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्वाचा व एक प्रेमळ कुटुंब प्रमुख म्हणून परिचय होतो !
गोव्यातील कार्यकाल आटोपल्यानंतर दुगल सर कोल्हापूर येथे आपल्या धाकट्या भावाच्या घराशेजारी रहावयास आले. तेथेच लेखन ,वाचन हे आपले आवडीचे छंद जोपासत राहू लागले. तेथून पुण्या मुंबईत व प्रभाकडे कॅनडात त्यांच्या फेऱ्या होत असत. आपल्या दोन्ही कन्यांचे त्यांना खूप कौतुक होते. दोघींनाही त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण घेण्यास, व्यवसाय करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. घरातील वातावरण नेहमी आनंदी समाधानी असे. 1991 साली पुण्यात आपल्या कन्येच्या घराशेजारी ते रहावयास आले.1993मध्ये त्यांची प्रकृती बिघडली. अवघ्या काही दिवसातच त्यांचे दुःखद निधन झाले. ती तारीख होती 23 एप्रिल 1993.. त्यादिवशी एका आदर्श ध्येयवादी शिक्षकाचे, समर्पित उज्वल, निष्कलंक जीवन संपले!!
संपूर्ण आयुष्यभर जगाचे भलेबुरे अनुभव घेत घेत ,आयुष्याकडे निर्लेप सकारात्मक दृष्टीने कसे बघावे, आपल्याजवळ देण्यासारखे जे असेल ते सतत कसे देत राहावे, याचा एक आदर्श वस्तुपाठ म्हणजे दुगल सरांचे जीवन होते! त्यांच्याबद्दल अनेकांना एक प्रेम आदरयुक्त दरारा असे.
“सत्यास ठाव देई । वृत्तीस ठेवि न्यायी । सत्यास मानि राजा …”
अशा जीवन-मूल्यांचे पालन करीत, स्वतः आनंदी राहून जगावर आनंदाची बरसात करणाऱ्या, आयुष्यभर स्वानंदी वृत्ती जपणाऱ्या आमच्या कै. न. दि. दुगल सरांच्या स्मृतीला वंदन करून इथे थांबतो.
दिगंबर वा राऊत.
छान लेख. माझ्या भुवनेश कीर्तने विद्यालयातील ५वी ते १०वी या कालखंडात दुगल गुरुजी मुख्याध्यापक होते. माझे वडील शिक्षण संस्थेत सेक्रेटरी असल्यामुळे त्यांच्याशी तसाही संबंध आला होता.
सर,
तुमच्या दुगल सारांविषयी लिहिलेल्या लेखातला हा भाग मनाला फारच भावला
तुमच्या परवानगी शिवाय हा माझ्या मित्रांना, शिक्षकाना फॉरवर्ड केला.
एका शिक्षकाचा मोठेपणा आणि दुसऱ्या शिक्षकाचे काव्यावर असलेले निस्सीम प्रेम हा दुर्मिळ योग आहे
दुगल सरांचे इंग्लिश कवी आणि त्यांची काव्यरचना यांवर निस्सीम प्रेम होते
हे मी भुवनेश्वर कीर्तने शाळेत इयता 10 वी मध्ये अनुभवले आहे.
मुख्याध्याक पदाची मोठी जबाबदारी असूनदेखील ते कवी वर्डस्वर्थ वरील प्रेमापोटी ते स्वतः शिक वायला यायचे.
घनश्याम सावे,
माहीम
तुमच्या रेक्टर कालावधीतील वसतीगृहातील विद्यार्थी
Sir, Presently such people are very rare in this world. You have put it very nicely. Excellent. I also had gone back to my childhood life of school and high school who taught me equally good.
दुगल सरांवर अतिशय विस्तृत लेख. नीलोत्पला माझी प्रार्थमिक शाळेतील वर्गमित्र. त्यामुळे गुरुजी बद्दल साहजिकच आदर. वाचून पुष्कळ माहिती मिळाली
धन्य ते दुगल सर. आणि भाग्यवान ते विद्यार्थी ज्यांना त्यांचा सहवास लाभला.
उत्कृष्ट लेख.
फारच छान लेख?
लेख वाचल्यावर आपल्या नशीबी दुगल सर नव्हते ह्याचे खुपच वाईट वाटले.
मी शाळेत १९६५ साली पाचवीत जॅाईन झालो तेव्हा ते अगोदरच SPH सोडुन गेले होते, मात्र त्यांच्या शिक्षण कार्याची चर्चा कायम कानावर पडे.हा लेख वाचल्यावर असे वाटले की आपण एका महान शिक्षकाला मुकलो ?
???
*प्रिय दिगंबर बंधू*
आपल्या प्रिय गुरूबद्दल लिहितांना आपली लेखणी किती झरझर व भरभर एक जीवनपट मांडतेय… सर्व कौतुकास्पद.
आपण रेखाटलेले पेपरवरील शब्दचित्र हे खरोखर इतके बोलके आहे की मी एक बोलपटच पाहातोय.
एखादा कलाकार कॅनवास वर चित्र रेखाटताना ज्या तन्मयतेने भारलेला असतो तद्वत आपली विषय तन्मयता दिसते.
दुगल सरांचा यशोमय व तेवढाच संघर्षमय जीवनपट वाचला खूप भावला.
जीवनांने सरांना सायन्स ये आर्टस् अशी कलाटणी देऊन आपल्या पर्यंत पोहोचविले…. एक निसर्गदत्त योजनाच म्हणावी.
धुळे पुणे कोल्हापूर वसई बोर्डी ते गोवा व्हाया केळवे …. किती विविध ठिकाणी कार्यक्षेत्र मिळाले व तेवढाच अनेकाविध विद्यार्थ्यांना लाभ…. हा एक परमेश्वरी संकेत समजावा.
असेच गुरुजन लाभोत व विद्यार्थीवर्गाचा विकास होऊन…विकसित भारताकडे वाटचाल व्हावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
सरांच्या स्मृतीस माझी शब्दसुमनांजली.
डाॅ. मधुकर राऊत 9/9/23
कै. दुगल सर आम्हाला आठवी किंवा नवव्या इयत्तेत इंग्रजी विषय शिकवत होते. त्यानंतर ते शाळा सोडून गेले त्यामुळे त्यांचा फारसा परिचय आम्हाला झाला नाही. परंतु हा लेख वाचताना दुगल सरांच्या महान तसेच बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची प्रचिती येत गेली.
लेख खूपच माहितीपूर्ण असून आवडला.
तुझे सगळेच लेख वाचण्या सारखे. असेच लेख लिहीत जा.लेख वाचताना भुतकाळात जातो.आठवणीत रमतो.हा लेख तर उत्कृष्ट आहे ?
दुगल सरांवर फारच छान लेख लिहीला आहे .
मला तसा सरांचा जास्त संबंध आला नाही .
माहीमच्या शाळेत प्रिन्सिपल होते तेव्हा मामांकडे घरी येत असत तीच आमची ओळख.
तुझा सरां विषयी लेख वाचून
फार सुंदर माहिती मिळाली.
धन्यवाद!!?
??
तुमचे सर्वच लेख काही लखलखणाऱ्या तेजस्वी हिऱ्याची ओळख करून देतात… त्यातील हा लेख अतिशय सुंदर आहे. एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा अतिशय समर्पक वेध घेतला आहे आणि खूप सुंदररित्या ते लेखणीतून साकारले आहे.
अरुण,
Duggal sir! Ah! Very loving sir. Handsome, smar & pleasing personality.
आम्हाला कधी, कवचित , नेहमीचे sir गैरहजर असल्यास ते शिकवायला यायचे. वर्गात प्रसन्नता पसरवून जायचे. मी जवळपास सर्वच शिक्षकांशी ओळख करून घेत असे. तशी त्यांची पण ओळख करून घेतली होती. शाळेतल्या जवळपास सर्वच शिक्षकांना माझी व श्री अप्पा अमृतेंशी विशेष संबंध असल्याने मला तसे ही शिक्षकवर्ग ओळखत असे. दुपारच्या सुट्टीत मी घरी जेवायला जात असे तेव्हा स्टाफ रूम मध्ये ॲपांना मी “सायकल घेऊन जातोय” है सांगायला जात असे तेव्हा बहुतेक अप्पांच्या शेजारच्या आराम खुर्चीत दूग्गल सर गप्पा मारीत असायचे. इथे कोणालाही माहीत नाही अशी गोष्ट सांगावीशी वाटते. अप्पा मला सायकल घेऊन जा म्हणताना खिशातून प्रत्येक वेळी एक आणा काढून देत असत! त्यांच्या सुचने प्रमाणे शाळेच्या बाहेर अजूनही असलेल्या रस्त्याला लागून असलेल्या चौथऱ्यावर/पारावर एक माणूस चणे व खारे शेंगदाणे विकत असे, त्याच्या कडून दोन pyramidal पुडीत भरपूर चणे व खारे दाणे घेऊन त्यातील एक पुडी, मुलींच्या घोळक्यात जाऊन, अप्पांच्या पुतणी ला “मंजुळा” अशी जोरात हाक मारून, ती पुढे आल्यावर तिला एक पुडी देत असे, हा आठवी ते अकरावी पर्यंतचा नित्य नियम ठरलेला होता. हे सत्य मी आज उघडकीस आणल आहे.
मधली सुट्टी ही एक तासाची असायची. मंजुळेला खाऊची पुडी देऊन सायकलवर सुसाट घरी जायला निघायचो. जेवायचो. जेवायचो. घरी मी झाडावरून पाडून, आणून, घरी ठेवलेले आवळे, खाकी half पँटच्या खिशात कोंबून परत शाळेत धूम ठोकत असे. मी तुफान वेगाने सायकल चालवत असे. जणूकाही ती माझी वर्षभराची प्रॅक्टिस च असे.
आमच्या घोलवड गावात, समुद्र किनाऱ्या लगतच्या मैदानावर दसर्याच्या दिवशी विविध खेळांची स्पर्धा भरत असे. लाऊड स्पीकर ची सोय केलेली असे. चमचा गोटी, तीन पायाची शर्यत, slow सायकलिंग, fast cycling, घोड्यांची रेस, लंगडी, खोखो इत्यादी. त्या खेळात विद्याधर slow cycling मध्ये नेहमी प्रथम येत असे आणि अस्माकं/मी फास्ट सायकलिंग मध्ये प्रथम येत असे. मी व विद्याधर तीन पायांच्या शर्यतीत नेहमी बक्षीस पत्कावत्वसू!
तर…शाळेत पोचल्यावर सायकल लावून पटापट स्टाफ रूम मध्ये जाऊन, बसलेल्या सरांना आवळे देऊन, वेळेच्या आत वर्गात पोहोचत असे कारण मी क्लास मॉनिटर म्हणून असे.
दसऱ्याच्या एका घोड्याच्या शर्यतीत शंकर इंदुलकर चा मोठा भाऊ नेहमी प्रथम येत असे. ही शर्यत समुद्र किनारी भरवली जात असे. एका दसऱ्याला तो प्रथम आला, घोड्यावरून खाली उतरला, आणि तो जमिनीवर आडवा झाला आणि तर्फडू लागला आणि बोलता बोलता त्याला मृत्यूनी ग्रासले! तो दसरा आम्हाला फार वाईट गेला.
एक अतिशय विचित्र आठवण पण आहे. आमच्या त्या ग्राऊंडवर, रोज संध्याकाळी विविध प्रकारांच्या खेळात मुल, तरुण लोक खेळ खेळत असे. आम्ही व्हॉलीबॉल खेळत असे. खेळून झाल्यावर सर्वजण एकत्र बसून गप्पा मारत असू. एक दिवशी पुंड्या कदम मुख्य वक्ता/बडबड्या! असे. समोर थोड्या अंतरावर अरुण मळेकर ( ज्यांनी हा दूग्गल सरांवरचा लेख पाठवला आहे ते गृहस्थ ) हा मुलगा बसला होता. गप्पांच्या ओघात पूंड्या, म्हणाला की मी जादूने साप आत्ता इथे आणू शकतो. आम्हाला ती त्याची नेहमी सारखी थाप वाटली म्हणून त्याला चॅलेंज केलं. तो म्हणाला कोणाला चावला तर मी जबाबदार नाही. सर्वच म्हणाले की एकदा आणून तर दाखव. आणि त्यांनी आम्हाला शांत राहायला सांगुन तो ध्यानात बसला व काही तरी जोराने पुटपुटत ,हातवारे करत, हिंदी मध्ये, आवाहन करत छु छा करत असताना च अरुण मळे कर नी किंकाळी फोडली आणि उभा राहून, साप साप असा ओरडायला लागला; आणि आम्ही गाभरून अरुण कडे बघतोय तर काय!? त्याच्या गळ्या भोवती भला मोठा साप वेटोळ घालून लोमकळत होता! अरुण किंचाळत रडत होता. मग पुंड्याने त्याच्या जवळ जाऊन त्या सापाला त्याच्या गळ्यातून काढून लांब फेकून दिला. अरुण तेव्हा तेरा चौदा वर्षांचा असावा. त्याला आता हा प्रसंग आठवत असेल की नाही ते माहीत नाही.
माझ्याकडे दुग्गल सरांच्या फारशा आठवणी नाहीत. पण जेव्हा लो.टिळकांची, 23 जुलै 1956 ला जन्म शताब्दी असातांना त्यांनी वर्गात टिळकांन बद्दल एक निबंध दिला होता, टिळकांच्या स्वातंत्र्य चळवळीला *”विप्लव का बंड”* असा काहीतरी निबंधाचा विषय होता, हे मला चांगलच आठवतंय.
ह्या आठवणी चे सर्व प्रसंग हे सत्य आहेत. आमच्या शाळेतील दिवस Golden days होते. आंतर शालेय खेळात,वक्तृत्व स्पर्धेत, नाट्यात, गाण्याच्या स्पर्धेत नेहमी भर भरून बक्षिसे आणत असे. भाल्या,तात्या इत्यादी उत्कृष्ट खेळाडू अजूनही मला उत्कृष्ठ खेळ करताना दिसतात! Dolly Zaayvala मुलींच्या ग्रुपची leader ला कसं काय विसरता येईल? सर्व शिक्षक व शिक्षिकांना कसे काय विसरता येईल? आणि ते संत समान आचार्य भिसे, चित्रे,सावे सर? आपली शाळा ही गुरुकुल सारखी वाटायची. एक नायक सर होते जे कृषी/शेतीचा वर्ग घ्यायचे. त्यांच्या हाताखाली प्रत्यक्ष बागेत व शेतीची कामे केलीत. चिखलात,भरपावसात भाताची रोपणी पण केली होती! मला शाळेचा,फी,पुस्तके,note books, इत्यादी खर्च पाचवी पासून ते अकरावी पर्यंत इतर विद्यार्थ्यांची ट्यूशन / शिकवणी करून स्वतच्या पायावर उभे राहावे लागले होते. त्याचाच एक भाग म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेच्या बागेत मजुरीचे काम करून जादा पैशांची सोय करावी लागत असे. एक राऊत सर होते, त्यांच्या instructions प्रमाणे ते काम करून घ्यायचे. दिवस भर ते जराशी पण उसंत घेऊन देत नसे. मला कंपनी द्यायला विद्याधर पण माझ्या बरोबर येत असे. आम्हाला रोजची दीड रुपया मजुरी मिळत असे!
बापरे! शाळेच्या व दुग्गल्ल सरांच्या आठवणीत मी वाहवत गेलो त्याचे भानच राहिले नाही! ? ???
: हरीश अमृते,
नाशिक.
भाई,
दुदैव आणि सुदैव म्हणजे काय?
हे कळले.
“माझा विद्यार्थी हा राष्ट्रप्रेमी व सर्वांगांनी परिपूर्ण असला पाहिजे,”
ह्या जीवननिष्ठाने आयुष्यभर शिकवत राहिलेल्या सरांना विनम्र अभिवादन.?
तुम्हीं अत्यंत सुंदर व माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. दुगलसरां विषयीची फार महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या लेखामुळेच समजली. मोठं काम केलं आहे तुम्ही ! किती उंचीचे थोर, त्यागी, निष्ठावान, ज्ञानी शिक्षक बोर्डी च्या शाळेला लाभले होते त्याची माहिती तुम्ही हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे सर्वांना होईल व त्यातून आजच्या तरूण शिक्षकांना प्रेरणा मिळेल.
Life style of extraordinary teacher Late Dugal sir and his life struggle is fantastic ! We both of us enjoyed the emotional story .
Thanks saheb and you are also like him !
With warm regards
Uday
लेख वाचला,खुप आवडला . एखाद्या विद्यार्थ्यांची आपल्या गुरुजनांविषयी असलेला आदर, प्रेम व आस्था ह्या लेखात सर्वत्र दिसुन येतो .आपले सर्वच लेख मी आवडीने वाचतो व पुढील लेख कधी येतोय याची अपेक्षा करतो .लिहित रहा ही विनंती
होय खूप चांगले लेखन केले आहे सर
आमच्या माहीम शाळेला सुध्दा त्यांचें खूप मोठे योगदान आहे.
आजही आमचे गावकरी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करीत असतात त्यांच्या स्मृतीला माझा प्रणाम.
भाई,आपल्या कडे अफाट क्षमता आहे कीं, एखाद्या सन्मानीय तसेच आदर्श व्यक्तीचे सहज चरित्र रेखाटणे आणि हुबेहूब त्यांचा चलत चित्रपट निर्माण करणे. पुन्हा लिहण्यात काहीच त्रुटी नसतात. भाई आपल्याना हे कसे काय जमते हो?
कै. दुगल सर मी सुद्धा अनुभवले आहेत.अत्यंत प्रेमळ आणि कडक शिस्तीत त्यांचा भुवनेश कीर्तने शाळेचा कार्यकाळ होता. त्यांच्या काळात मी आठवी नववी इयतेत शिकत होतो. आज भाई आपल्या मुळे दुगल सरांचे यशस्वी कार्य आठवण्या साठी माझे मन बरेच वर्ष माग माग गेलं. आणि माझं शालेय जीवन डोळ्यासमोर उभ राहिलं. आजच्या घडीला असे शिक्षक मिळणे फार दुर्मिळ. असो. आपणा कडे शब्द रचना फारच सुंदर आहे. एखादा तेजस्वी हार गुफणे अशीच ही कला आपल्या कडे आहे. पुढील लेखनाला माझ्या कडून मनःपूर्वक शुभेच्छा ??
खूपच छान लेख
आठवणी
आम्हाला प्रोत्साहन मिळते
प्रेरणादीयी लेख प्रत्येक लेखातून एक नवीन व्यक्तिमत्व उघडले जाते व खूप आनंद मिळतो. बोर्डीचे विद्यार्थी खूपच भाग्यवान आहेत.
?????
दुगल सरांसारखे भुवनेश्वर कीर्तने त्यांना आम्ही महाराज म्हणायचे ते सुद्धा तेसुद्धा इंग्रजी मराठी संस्कृत छान छान शिकवत रवींद्रनाथ टागोर काबुलीवाला अजून स्मरणात आहे. दुगल सरांनी आम्हालाही ‘सॉलिटरी रिपर’, कविता शिकवली होती. आपण लिहिले आहे ते अगदी सत्य आहे .आम्हालाही तसाच अनुभव त्यावेळी आला.
गुरूवर्य कै.दुगल सरानं बद्दल २/९/२३ रोजी झालेल्या शाळेतील कार्यक्रमात आपण एक उत्तम शिक्षक त्याची तळमळ शिकवण्याची जिद्द ,ध्येय,त्याचे विचार, देशप्रेम,एक नवीन पिढी घडवूने हे आज होताना दिसत नाही याची खंत आहे. आज ही काही शिक्षक खूप सुंदर कार्य करीत आहेत. काका तुम्ही खूप नशीबवान आहात असे गुरूवर्य कडून शिक्षण घेऊन आपण धन्य आहात.शत शत नमन.
काका धन्यवाद ?
दुगल सरांचा लेख वाचला. सर भुवनेश कीर्तने माहीम शाळेत मुख्याध्यापक होते. ते दिवस आठवले. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे होते. शिस्तप्रिय होते. तसेच प्रेमळ होते. त्याचे चालणे, बोलणे खूप करारी होते. शांत होते.
आमच्याकडून त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.। आपल्या लेखातून त्यांच्याविषयी खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली..
बोर्डीच्या उत्तमोत्तम रत्नांची ओळख तुमच्यासारख्या कुशल आणि बुद्धिवान रत्नपारख्याने आम्हाला अगोदर करुन दिली आहे. आचार्य भिसे, आचार्य चित्रे हे फक्त शिक्षण तज्ज्ञ नव्हते तर समाजसेवेचा वसा घेतलेले आणि विद्यार्थ्यांच्या सर्वतोपरी उन्नतीसाठी झटणारे होते. दुगल सरांचे कर्तृत्व तितक्याच प्रतीचे होते. स्वतःचे ध्येय परिस्थितीने पुरे करता आले नाही पण तरीसुद्धा मार्ग बदलून नवीन ध्येयाने प्रेरित होऊन पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत शिक्षण क्षेत्रात अद्वितीय काम केले आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांनी ठेवलेली त्यांची आठवण हे त्यांच्या यशाचे प्रतिक आहे. धन्य ती बोर्डी जेथे असे महारथी एक म्हणजे जन्मले किंवा बाहेरून येऊन रुजले आणि स्वतःचा एक ठसा उमटवून गेले. विशेष म्हणजे त्याच बोर्डीतून तुमच्यासारखे हुशार, यशस्वी टेक्नोक्रॅट आणि उत्तम लेखक बोर्डीच्या कुशीत निपजले, फुलले आणि त्या परिसराचा सुगंध आमच्यापर्यंत पोचवला म्हणून लाख लाख धन्यवाद.
दिगंबर भाऊ,
. अप्रतिम लेख.
श्री.दुगल सरांचे व्यक्तीमत्व विविध पैलू द्वारे उलगडून दाखविण्याचे तुमचे कसब फारच सुरेख आहे.दुगल सरांची ओळख सुंदर रसाळ भाषेतून केली आहे.प्रत्येक लेखागणिक वाढणारी लेखनातील प्रगल्भता मन अचंबित करते.लेखन मनाचा ठाव घेते.
लहानपणी बाबांकडून दुगल सरांबद्दल व निलोत्त्पलेबद्दल ऐकले होते.तेच या लेखातून सविस्तरपणे वाचले. शाळेत समारंभाची सुरूवात “माझी शाळा कल्पतरू”या स्वागतगीताने होत असे.काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
????