कारूण्य सिंधू, चित्रेगुरूजी

      प्रा.हरिहर चुरी यांनी स्वहस्ते काढलेले गुरुजींचे चित्र

आदरणिय गुरुजी, मी तुम्हाला, मी विद्यार्थी दशेत असताना प्रथम पाहिले तेव्हां तुम्ही आयुष्याची सांज संध्या अनुभवीत होतात. आज मी आपणाविषयी काहीतरी लिहू पाहतो आहे, तेव्हा मी जीवनाची संध्याछाया अनुभवीत आहे. आपण, मला, तुमच्या “कृष्णराव” या नामाप्रमाणे, भगवंत रूपाने, ‘विश्वरूप दर्शन’ देत आहात. माझे मन अगदी सैरभैर होऊन, मी भांबावून गेल्यागत झालो आहे! काय लिहावे आणि कसे लिहावे हे समजेनासे झाले आहे. त्या विद्यार्थीदशेत आपण माझे केवळ गुरुजी होतात. माझे व माझ्यासारख्याच अनेक  मुलांचे ‘सर’ म्हणून आपले व्यक्तिमत्व समजून घेणे सोपे काम होते. तो अज्ञानातील आनंद होता. मात्र आज, आपल्या विषयी अनेक विद्यार्थ्यांनी, नातलगांनी, सहकारी शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी व ग्रामस्थांनी सांगितलेल्या, लिहिलेल्या आठवणींमधून आपले भव्य विश्वरूप मनांत साकार झाले आहे. आपल्या तेजपुंज व्यक्तिमत्त्वाची व दिव्यत्वाची प्रचिती आल्याने हा मनाचा गोंधळ, कागदावर काय उतरवू? कसा शब्दांत पकडू…. माझ्या मनाची चलबिचल झाली आहे. खरेच आपले महान व तेजपुंज व्यक्तिमत्व, मला गुरुजी म्हणून, माझ्या बालपणात लाभले, त्याची महती तेव्हा कळली नव्हती. मात्र आज  त्या दिव्यत्वाची प्रचिती आल्यानंतर मी खरेच गडबडून गेलो आहे. अर्जुनाला विश्वरूप दर्शनानंतर आपल्या, प्रिय सखा कृष्णाची महती समजली, कळली, आणि त्याचे मनी गोंधळ उडाला, तो घाबरला, ज्याला मी सारे, सारे करायला सांगितले, तो कृष्ण केवळ माझा मित्र एवढेच मी ओळखत होतो, तो प्रत्यक्ष’ विश्वकर्ता’ आहे हे समजले!  कृष्णाचे विश्वरूपदर्शन झाल्यावर, अर्जुनाच्या गोंधळलेल्या, घाबरलेल्या मानसिकतेचे वर्णन ज्ञानोबानी जसे केले तेच शब्द येथे मला उद्धृत करावेसे  वाटतात:

“या लागली जी देवा,  येथींचे भय ऊपजतसे जीवा, 

म्हणौनी येतुला लळा पाळावा,जे पुरे हे आता”…

  देवा,तुझे हे दिव्य दर्शन घेऊन माझ्या मनी भय उपजले आहे , एवढे समजून  घेण्याची  व  त्याचा  मतितार्थ लावण्याची, माझ्यात शक्ती व कुवत ही नाही.  माझा सखा ,मार्गदर्शक म्हणून मला तुझा लळा  होता तेवढेच  ठीक होते !

    गुरुजी आज तुमच्याविषयी लिहिताना, संभ्रम पडायचे कारण ही तसेच.. तरीपण मी लिहिणार ..झेपेल तेवढे लिहिणार, जमेल तसे लिहिणार… !

        ‘की टीटीभू चांचूवरी, माप सूये सागरी 

        मी नेणतु तया परी, प्रवर्ते येथ  !’

एक इवलीशी टिटवी, आपल्या इवल्याशा चोचीने, सागर उपसण्याचा प्रयत्न करीत आहे. संपूर्ण सागर नाही ऊपसू शकणार,पण एक घडाभर पाणी जरी तिने सागरातून उपसले, तरी ती धन्य होईल कारण तिला तिची मर्यादा ठाऊक आहे. 

गुरुजी तुम्ही, शिष्यावर नितांत प्रेम करणारे, आपल्या शिकवण्याच्या जादुई कलेने विषय सहज आकलन होईल असे शिकवणारे एक आदर्श गुरु द्रोण! शारदाश्रमांतील निवासींना, मायेची ममता देऊन त्यांना सुसंस्कारित करून, भावी जीवनासाठी अक्षय शिदोरी बांधून देणारे, एक तपस्वी मुनिवर!

हातात कंदील घेऊन जखमी सैनिकांच्या छावणीत सेवा करत फिरणारी फ्लॉरेन्स नाइटिंगेल ऐकून माहीत आहे, मात्र शारदाश्रमांतील आपले विद्यार्थी, रात्री व्यवस्थित झोपले आहेत ना? कोणाला काही त्रास तर नाही ना? हे जाणून घेण्यासाठी, रात्री उशिरापर्यंत, हातांत कंदील घेऊन, मुलांच्या खोल्यातून फिरणारे आपण, ऋषी सांदीपनी!!

सर्वांप्रती विशाल औदार्य  दाखवुन, तरीही स्वतः प्रसिध्दीपरान्मुख  राहणारे,  ऊदार कर्ण!

ज्या शाळेत व शिक्षण संस्थेत योगदान दिले ,त्यांच्या जडणघडणीत मोठा वाटा उचलून, आपली हाडे झिजविली,असे निर्मोही, त्यागी महात्मा दधिची!

‘वज्रादपी  कठोराणि, मृदुनी कुसुमादपी,’..हे संतांचे वर्णन ज्याला तंतोतंत लागू पडते,असे, अंतरी निर्मळ ,गळामाळा नसलेले, संत पुरुष  !

गरिबीचे चटके सहन करीत,पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन,आपल्या स्वतःचा स्वार्थ न पहाता, समाजातील बांधवांना शिकवून शहाणे करावे, या उदात्त भावनेने प्रेरित होऊन, बोर्डी येथे आलात आणि या परिसरात,भिसे- सावें सरांचे जोडीने, एक महान इतिहास निर्माण करणारे, भगीरथ !

आचार्य भिसे यांना गुरुस्थानी मानून त्यांच्या सर्व शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात झोकून देणारे, मागे राहून पूर्ण जबाबदारी उचलणारे शिष्य एकलव्य!

रामकृष्ण, विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव म्हणून निर्भयता, ज्ञानपिपासा, कर्तव्य कठोरता, द्रव्या संबंधी उदासीनता, पराकोटीचा त्याग, अशा अनेक गुणांचा समुच्चय असलेले, अध्यात्ममार्गाचे वाटसरु!  

कर्मकांडावर अजिबात विश्वास नसलेला, ‘भक्तीत कर्मयोग हा  सुलभ मार्ग आहे, वाटेला आलेली नित्यकर्मे निष्ठेने केली तर तो देखील  कर्मयोगच‘,असे समजून  आपल्या परिसरांतील भूतमात्रांतच विठ्ठल पाहणारे, भक्ती ज्ञान युक्त, मूर्तिमंत अखंड कर्मयोगी!

बोर्डी, घोलवड व परिसराला संजीवनी देऊन, पिढ्यानपिढ्या  संस्कारक्षम मने बनविण्याचे काम करण्यासाठी, आणि समाजाच्या ऊत्थापनासाठी, शिक्षण हे एक प्रभावी साधन आहे असे मानून निरलस सेवेचे व्रत घेतलेला, परमेश्वरानेच पाठविलेला एक देवदूत!

आपल्या प्रिय पत्नीच्या अकाली निधनानंतर, लग्नातील पैठणी जपून ठेवणारे आणि, “आपल्या अंत्यसंस्काराच्या वेळी आपल्या देहा बरोबरच ती पैठणीही अग्नीस अर्पण करण्यात यावी“, एवढीच अंतिम इच्छा बाळगणारे तुम्ही, स्थितप्रज्ञ, संन्यस्त गृहस्थाश्रमी!

 गुरुजी आपण  फार काही होतात. शिक्षण हे माध्यम वापरून, आयुष्यभर केलेले आपले काम, अत्यंत वैशिष्ट्पूर्ण, आगळेवेगळे असेच होते. मानवी जीवनात, जे जे उत्तुंग, त्याचा शोध घेण्याचा तुम्ही सतत प्रयत्न करून, त्या वाटेने आयुष्यभर वाटचाल सुरु ठेवली. म्हणूनच आपले जीवन अनेक पैलूंनी बहरून आले. मला आजही, प्रामाणिकपणे वाटते, आपण माझ्या करिता, एक “संत शिक्षक” होतात! हातात टाळ चिपळ्या, कपाळी गंध न लावता, ‘आत्मानुभवानी चोखाळलेल्या’ वाटांनी,आपल्या शिष्यांना सन्मार्गाला लावून, त्यांच्या आयुष्याचे सोने करणारे परीस होतात!!

गुरुजी, सन एकोणीसशे एकवीस (1921-1957) ,ते एकोणीसशे सत्तावन्न म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत, सतत36 वर्षे , आपण शाळेत प्रत्यक्ष शिकवण्याचे काम केले. इंग्रजी, संस्कृत आणि गणित हे आपले हातखंडा विषय. ते शिकविताना आपण तल्लीन होऊन जात व मुले ही तल्लीन होत असत. आवाज स्पष्ट खणखणीत असल्यामुळे, प्रत्येकाला  ऐकू जाई. वर्गात तुमचा दरारा असे. प्रत्येक मुलाला विषय कळला आहे हे  समजल्यानंतरच तुम्ही पुढे जात असत. आयुष्यात सेवानिवृत्त होईपर्यंत आपण कधीही रजा घेतली नाही. अगदी  सुट्टीत सुद्धा वर्ग घेतले. शाळेतून निवृत्त झालात, तरी आपण आपल्या ज्ञानाचा लाभ शाळेतील व  वस्तीगृहातील मुलांना दिला. आपल्या अध्यापनाची ख्याती त्यावेळी संपूर्ण मुंबई इलाखाभर पसरली होती. आपले आदर्श पाठ ऐकण्यासाठी मुंबई इलाख्याच्या शिक्षक संमेलनांत, इतर शिक्षकांची गर्दी होत असे, हे आम्ही ऐकले आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या हाताखाली शिक्षण घेण्याचे भाग्य मिळाले, ते खरोखरीच  धन्य होत. गुरूजी, मी ही, त्यातील एक भाग्यवान विद्यार्थी आहे!

गुरुजी, आपण शारदाश्रमात सेवा देत असताना,बोर्डी शारदाश्रमाचे नाव भारतभर झाले ,याचे कारण आपण ,  भिसे, चित्रे ,सावे यांची तपश्चर्या होय  ! आपल्या वसतीगृहात हुशार आदर्श मुलांना तर प्रवेश मिळेच पण उनाड मस्तीखोर मुलांना देखील प्रवेश दिला जाई. आणि अशी मुले येथे आल्यावर सुधारून, चांगले नागरिक बनवून, गेलेली आहेत.आई नसलेल्या मुलांचा प्रवेशासाठी आपण प्रथम विचार केलात. मुलांना शारदाश्रमांत ठेवले ,की पालक अगदी निर्धास्त होत असत . माता  ज्याप्रमाणे  आपल्या  अपत्यासाठी  सोसलेल्या कष्टांचे  कधी मोजमाप ठेवीत नाही , विचारही करीत  नाही त्याप्रमाणे तुम्ही गुरुमाऊली होऊन आपल्या विद्यार्थ्यासाठी  किती यातना सोसल्या  त्याची  गणती नाही!!  हे प्रयत्न कोणत्या अहवालात सापडणार नाहीत, अथवा त्याचे कुणी फोटो घेऊन ठेवलेले नाहीत.  त्यांच्या स्मृती ,तुमच्या  विद्यार्थ्यांच्या हृदयांत साठविलेल्या आहेत, हीच त्याची पावती आहे. .कधीकधी तापाची साथ येई,आणि वीस ,पंचवीस मुलेही एके वेळी आजारी असत. अशावेळी गावांतील डॉक्टर पाठक व डाॅ.चुरी यांच्या सहकार्याने, आपण रात्री बेरात्रीही मुलांची सुश्रुषा करीत, त्यांच्या उशाशी बसून राहिलेले आहात. पालकांना मुलांच्या अभ्यासासंबंधी प्रगतीची  नियमित पत्रे, आपल्याकडून जात असत. पालकांची व मुलांची आपली प्रत्यक्ष चर्चा होई, त्यामुळे पालकांना चित्रे सर म्हणजे प्रति परमेश्‍वर वाटत,यातच सर्व काही आले!

      गुरुजी आपल्या छत्तीस वर्षांच्या सेवा कालांत ,आपण कधी विनावेतन तर कधी अल्प वेतन  घेऊन सेवा दिलीत. त्या संपूर्ण कालखंडात, शारदाश्रमाचे अधीक्षक म्हणून काम पाहताना, एक पैसाही वेतन घेतले नाही. पुढे सेवानिवृत्तीनंतर शारदाश्रमातील सेवेचे मानधन म्हणून महिना काठी, केवळ दोनशे रुपये एवढेच मानधन घेतले. इतक्या अल्प मिळकतीत ही आपण इतरांच्या गरजांकडे बारीक लक्ष ठेवीत असत. वस्तीगृहातील विद्यार्थी गावांतील कोणीही गॄहस्थ,  सहकारी शिक्षक, वा ईतर ही,कोणी गरजू ,आला तर त्याला शक्य होईल तेवढे आर्थिक सहाय्य केले. ही मदत विचारल्यानंतरच नव्हे तर विचारण्याआधीच , आपण कित्येकांना दिलेली आहे. मला वाटते  महाभारतातील कर्णा कडे,याचक दान मागावयास जात असत व त्यांना हवी ती मदत मिळे. आपण मात्र याचकाने न मागताच त्याची गरज ओळखून,स्वतःहून त्यांना पैशाची मदत केल्याची उदाहरणे मला माहित आहेत. मी स्वतः साताऱ्याला, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कॉलेजात जाण्याआधी, केवळ तुमचा निरोप घेण्यासाठी भेटावयास आलो होतो,  तुम्ही ,”कधीही पैशाची गरज भासली तर,मला विनास॔कोच तसे कळव”..हे स्वतःहून सांगितलेत. मला वाटते त्या काळात कितीतरी हजारोंची रक्कम, आपल्या तुटपुंजा वेतनातून, आपण अनेकांना दिलेली आहे. अटी दोनच असत, ही रक्कम मदत म्हणून दिली आहे तेव्हा त्याची परतफेड नाही, आणि याबद्दल घेणाऱ्या व्यक्तीने कोठेही ,त्याचा उच्चार करू नये . गुरुजी,आपल्या या दातृत्वाला काय म्हणावे?

             सन 1921 साली  शाळा सुरू झाली. बाजीराव पुरंदरे यांच्या भाड्याने घेतलेल्या घरात ,केवळ वीस-पंचवीस विद्यार्थी घेऊन शाळेला सुरुवात झाली होती. आपण, आचार्य भिसे, आत्माराम पंत सावे, बरोबरीने, काम करीत होतात. त्यावेळी आपले पगारही मुलांच्या फी मधूनच मिळत असत,शाळेला  सरकार मान्यता नव्हती. सरकार कडून ग्रँट नव्हती. बेताचा पगार होता ,तरीही आपण सर्व शिक्षकांनी कोणतीच  तक्रार केली नाही. उलट स्वतःहून आपला पगार कमी करून घेतला.आज या शाळेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.शताब्दी मध्ये  शाळेचा विस्तार अनेक अंगाने झालाआहे. अगदी पूर्वप्राथमिक पासून ते पदव्युत्तर,तांत्रिक, संगणक शाखांत ,शिक्षणाची दालने येथे उघडली गेली आहेत. आणि आज त्या सर्व शैक्षणिक सोयींचा फायदा ,आमच्या परिसरातीलच  नव्हे तर, अगदी गुजरात राज्यांमधील सुद्धा,  सुमारे 7500 विद्यार्थी घेत आहेत. शाळा मोठी झाली,त्याचबरोबर गोखले एज्युकेशन सोसायटी ही मोठी झाली.  या शतकभराच्या कालावधीमध्ये, संस्थेने बोर्डी गावाच्या व तेथील रहिवाशांच्या, शैक्षणिक व एकंदरीतच सर्वांगीण विकासासाठी फार मोठे योगदान दिले आहे यात शंका नाही. गुरुजी, ही संस्था मोठी झाली ती विद्यार्थ्यांमुळे, त्याचबरोबर आपल्यासारख्या निष्ठावान, चारित्र्यवान व आदर्श अशा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मुळे ,हे प्रत्येकाला मान्य करावेच लागेल. त्यावेळी,व पुढे ,शाळेला व संस्थेला चांगले दिवस आल्यावर,आपण, कधीही आपल्या कामाचा व त्यागाचा गवगवा केला नाही. जाहिरात केली नाही,लौकिक मिळविला नाही. उलट ज्यावेळी, संस्थेने आपणास आजीव सभासद होण्याची विनंती केली, त्यावेळी अत्यंत नम्रपणे ही, न मागता मिळालेली संधी नाकारून, आपण म्हणालात ‘ नियतं  कुरू कर्म त्व॔” .. नियतीने सोपविलेले काम मी निष्ठेने केले यासाठी मोबदला कसला? साठाव्या वर्षी निवृत्त झाल्यावर भिसे सरांनी, सेवा वाढवून घेण्यासाठी, आपणास सोसायटीकडे विनंती अर्ज पाठविण्याची सूचना केली. त्यालाही आपण नम्रपणे नकार दिलात.मात्र गोखले सोसायटीला आपले महत्त्व व स्वभाव माहीत असल्याने,नियमाला अपवाद करून, आपण कोणतीही विनंती न करता, आपल्याला सेवानिवृत्तीनंतर ही ज्ञानदानाचे काम सुरू ठेवता आले.. गुरुजी आजच्या काळात हे सगळे अद्भुत आहे !!

    गुरुजी आपण एके ठिकाणी म्हटले आहे ..”जीवनात मी ज्या पद्धतीने वागण्याचे ठरविले होते त्याप्रमाणे मी जीवन व्यतीत केले. काळ बदलतो आहे, जीवन मूल्ये बदलत आहेत, म्हणून आपणही बदलावे ,वारा वाहील तशी पाठ फिरवावी यावर माझा विश्वास नाही. भिसे गुरुजी सांगतील तसे शिस्त म्हणून वागायचे. पण जेथे तत्त्वाचे बाबतीत मतभेद होईल,तेव्हा आपले मत स्पष्टपणे मांडायचे,हा माझा बाणा होता. आनंदाची गोष्ट म्हणजे त्याबद्दल भिसे सरांनी ही कधी विषाद मानला नाही”.. आपल्या जीवनाचे सार या दोन वाक्यात आपण सांगितले आहे.एरव्ही ,अत्यंत सौम्य,सात्विक, प्रेमळ व कोणत्याही सहाय्यासाठी तत्पर असणारे आपण, जेव्हा कधी आपले तत्त्वाचे बाबतीत मतभेद झाले,आपले कर्तव्यकठोर रूप,धारण करायलाही मागेपुढे पाहिले नाही.कोणावरही अन्याय होत असलेला पाहणे हे आपल्या निष्ठेत कधीच बसले नाही.  काही उदाहरणे मला माहित आहेत.  माझ्या बाबतीतील, एक उदाहरण मी याबाबतीत जरूर सांगू इच्छितो. 1954 मध्ये मी बोर्डी हायस्कूलांत प्रवेश घेतला. आपण मुख्याध्यापक होतात.मला हायस्कूल स्कॉलरशिप मिळाली होती.  परिस्थितीमुळे, शाळेकडून ही, फ्रीशिप मिळावी म्हणून मी अर्ज केला होता. आप्पा,वडील, आपणास एके दिवशी याबाबतीत विनंती करण्यासाठी भेटून गेले. ” मला जे करता येणे शक्य आहे ते मी करीन.. “असे निसंदिग्ध आश्वासन आपण त्यांना दिलेत. त्या काळी कोणत्याही विद्यार्थ्यास एक स्कॉलरशिप असल्यास, त्याला फ्रीशिप मिळू नये, असा सोसायटीचा अलिखित नियम होता. त्यानुसार,संस्थेने मला फ्रिशीप देणे नाकारले होते. मात्र हा नियम, प्रतिकूल परिस्थितीतील, होतकरू, हुशार विद्यार्थ्यांसाठी सोसायटीने अपवाद केला पाहिजे, हे आपण व्यवस्थापनाच्या निर्दर्शनास आणून दिले. ठामपणे आपला मुद्दा संस्थेच्या व्यवस्थापकांचे सभेत मांडून, मला फ्रीशिपचा लाभही मिळवून दिलात. ही गोष्टही आपण कधीच आम्हाला सांगितली नाही.त्याचे श्रेय कधीही घेतले नाही .मात्र व्यवस्थापनातील, त्या सभेस हजर असलेल्या दुसऱ्या एका सद्गृहस्थांनी, त्या सभेचा वृत्तांत दिला,  म्हणून आम्हाला खरी परिस्थिती कळली. जेव्हा आपल्या निष्ठेचा, मूल्यांचा प्रश्न उपस्थित होई  त्यावेळी, स्पष्ट व रोखठोक बोलण्याचे बाबतीत, समोर कोणती व्यक्ती आहे याचा कधीही विचार केला नाही, मुलाहिजा ठेवला नाही.. दुसऱ्याचेही श्रेय  घेऊ पाहणाऱ्या, आजच्या जगात, तुमच्यासारखी दुर्लभ माणसे ,खरोखरीच धन्य होत.

राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी यांचेसह आचार्य भिसे व तत्कालीन बोर्डी हायस्कूलांतील शिक्षक. चित्रे गुरुजी मागील रांगेत उजवीकडून तिसरे फोटो झूम करून बघावा

       गुरुजी तुमचे संपूर्ण जीवन, अतिशय पवित्र, धीरोदात्त होते. 1920 मध्ये मुंबई युनिव्हर्सिटीची, B.A. परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण होऊन आपण शिक्षक होण्याचे निश्चित केले होते. सरकारी नोकरी मिळत असूनही करावयाची नाही असा आपला पण होता.स्वतंत्र वृत्तीने काम करावयाचे असल्यामुळे, मला ,माझ्या कामात कोणाची बंधने नको, अशी शाळा हवी, एवढीच आपली अपेक्षा  होती. बोर्डी येथे हे गोखले एज्युकेशन सोसायटीने अशा प्रकारची,काही ध्येयवादी शिक्षकांद्वारे,  एक शाळा काढली आहे, असे आपणास कळले व आपण बोर्डीला आलात. आपले विचार येथील मंडळी बरोबर जमले.आपण शाळेत काम सुरू केले व एक नवा इतिहास निर्माण केलात. आत्माराम पंत सावे, आचार्य भिसे,गुरूवर्य चित्रे, या  तीन कर्मवीरांनी  एक वेगळीच नवसृष्टी निर्माण केली. येथील जनतेची आपण दैवते  झालात. तुम्ही आणलेली ही ज्ञानगंगा, अनेक शाखा उपशाखा यांनी समृद्ध होत, सतत पुढेच चालली आहे . “माझ्या  बोर्डी परिसरातील आदिवासी विद्यार्थी,  माझ्या संस्थेमधून , बालवर्गापासून ते ‘पी एच डी’ची पदवी घेऊन  बाहेर पडला पाहिजे”,हे आचार्य भिसे सरांचे स्वप्न आज साकार होत आहे. प्रिं. प्रभाकर राऊतसरांसारखा, आपलाच एक माजी विद्यार्थी, आपणा गुरुजनांच्या आशीर्वादाची पुण्याई व आपण शिकविलेल्या नैतिक मूल्यांचे बळ घेऊन, हा जगन्नाथाचा रथ पुढे पुढे नेत आहे, याचा आपल्यालाही आज खूप आनंद झाला असता.

हा सर्व पसारा उभा करण्यासाठी प्रि. राऊत सर यांनी खूपच परिश्रम घेतलेले आहेत. ते म्हणाले की हा सर्व पसारा उभा करतांना, जेव्हा आम्ही  देणग्या जमविण्यासाठी,माजी विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलो, तेव्हा  आम्हाला कोणतेच विशेष कष्ट पडले नाहीत. भिसे, चित्रे, सावे यांच्या संस्थेसाठी काम करावयाचे आहे, हे कळल्यावर,पालक अथवा माजी विद्यार्थी म्हणत ,’तुम्ही फक्त आकडा सांगा आणि माझ्या कडून तेवढी मदत घेऊन जा!’ हे कसे झाले??.. याचे कारण आपण जोडलेली मने …आपण मिळविलेले मुलांचे निर्व्याज प्रेम, आपण आपल्या,ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आलात ,त्यांचे  ‘हृदयस्थ ‘ झालात, म्हणून ! शाळेत, शारदाश्रमात, कधीही, कोणत्याही वेळी, कोणी पाहुणा, माजी विद्यार्थी अथवा पालक बाहेरगावाहून आल्यास, त्याची जातीने चौकशी आपल्याकडून होत असे. जेवणाची वेळ असेल तर ‘आपण जेवून आलात का? ‘हा आपला पहिला प्रश्न असे. जेवण झाले नसल्यास त्या पाहुण्याला जेवण करण्यासाठी भोजनालयात आपण स्वतः घेऊन जात असत. भोजन झाले असेल तर,’ चहा तरी  घ्या,’ असा आपला आग्रह असे. प्रभाकर राऊत सर म्हणतात, ‘आज बांधलेल्या या अनेक इमारतींच्या पायाची, एक, एक वीट ही मातीची नाही, तर चित्रे गुरुजींनी तृषार्तांना  दिलेल्या,  एक एक कप चहाच्या पुण्याईची ती वीट आहे !!’

  गुरुजी आपण आणि आचार्य भिसे  म्हणजे, ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथांची जोडी! आचार्यांना आपण ज्येष्ठ बंधू समान व गुरूसमान मान देत असत. शाळेत व शारदा आश्रमांत  व्यवस्थापन पाहतांना  आचार्यांच्या  सूचनांचा  आपण नेहमीच आदर केला. मात्र जेथे  मते पटली नाहीत,तेव्हा तसे स्पष्ट बोलूनही दाखविले.1942, चलेजाव चळवळींमध्ये , महात्मा गांधींनी,”करेंगे या मरेंगे..” अशी घोषणा दिली होती. भिसे  सरांनी स्वतःला ,त्या चळवळीत संपूर्ण पणे झोकून दिले होते. त्यांनी तुम्हाला, ‘ मी जात आहे, तुम्ही मात्र जाऊ नका, तुम्ही चळवळीत भाग घेऊन नका, शाळेची जबाबदारी सांभाळा’  अशी सूचना केली.वास्तविक आपल्यालाही गांधीजींच्या त्या घोषणे प्रमाणे, चळवळीत सामील व्हायचे होते. तरीही आचार्यांची सूचना, शिरसावंद्य मानून, आपण त्यांना म्हणालात, “तुम्ही सांगत आहात म्हणून मी स्वतःहून चळवळीत उडी घेणार नाही. येथे बरीच मंडळी येतील. त्यांच्याशी माझा संबंध येत राहील. कदाचित मलाही पकडून नेतील. अशा प्रसंगी मी माफी बिलकुल मागणार नाही. एरव्ही तुमची आज्ञा मान्य!”.  

स्वातंत्र्यलढ्यात पडद्या मागे राहून आपण दिलेले योगदान अपूर्व असेच होते. सुदैवाने तुम्हाला अटक झाली नाही हे विद्यार्थ्यांचे व शाळेचे सद्भाग्य!आचार्य भिसे सरांनी आपल्याला मिळणारे सर्व बहुमान, अगदी राष्ट्रपतींचा आदर्श शिक्षकाचा राष्ट्रीय बहुमान नाकारला होता. आपण देखील आपल्या गुरुचा कित्ता गिरविला व कधीही, कोणताही, मानसन्मान स्वीकारला नाही.

    आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन त्याप्रमाणेच कृती केल्याचे दुसरे एक उदाहरण मला प्रिं.प्रभाकर राऊत सरांनी सांगितले ते इथे उद्धृत करावेसे  वाटते .माननीय धन बाईंनी आपल्या मातोश्री सुनाबाई यांचे स्मरणार्थ शाळेला मोठी देणगी देऊन त्या  काळात संस्थेवर व शाळेवर मोठेच उपकार केले.त्यामुळे संस्थेत, त्यांच्या हयातीत त्यांना सदैव सन्मान मिळे. त्यांच्या शब्दाला ही किंमत दिली जाई . बाईंच्याकडे एक आदिवासी मोलकरीण कामाला येत असे व तिचा मुलगा त्याच वेळी हायस्कुलात शिकत असे. दुर्दैवाने एका परीक्षेत त्याला चांगले गुण न  मिळाल्याने अनुत्तीर्ण शेरा मिळाला. ही गोष्ट धनबाईंचे कानावर गेली . या माऊलीने  त्यामुळे करणी च्या मुलाला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले होते  व अशाच दीनदुबळ्यांनी,शिक्षण घेऊन पुढे जावे  ही त्यांची अंतर्यामी ची इच्छा. म्हणूनच त्यांनी  आमच्या हायस्कूल साठी मोठी देणगी ही दिलेली होती. मुलाने पुढे शिकावे असे सहाजिकच बाईंना वाटत होते.त्यांनी मुख्याध्यापक भिसे गुरुजींचे कानावर ही गोष्ट घातली. भिसे सर नेहमी सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र असल्याने, त्यांनी “चित्रे गुरुजींना ही गोष्ट सांगून काही करता आल्यास पहा” असे  संदिग्ध पणे सांगितले.आपण त्या मुलाचे सर्व पेपर व मार्क पुन्हा तपासले.त्याला पास करता येणे शक्य नाही, असे दिसले.आता मोठा यक्षप्रश्न आपल्याला पडला. मुलाला पास करावे,तर सत्सद्बुद्धी तसे करू देत नाही, नापास करावे तर कदाचित भिसे सर व धनबाई यांचे रोषाला पात्र व्हावे लागणार?….एके दिवशी आपण धनबाईना  विनंती करून,त्यांचेकडून थोडावेळ मागून घेऊन, सरळ बाईंच्या घरी गेलात.बाईंना ,नम्रपणे ,”तुमच्या मुलाला मी उत्तीर्ण करू शकत नाही”असे सांगून,थोडक्यात काय ते, विवेचन केले. बाई काही पुढे बोलण्याच्या आतच, खिशातून राजीनाम्याचा कागद काढून, बाईंचे समोर ठेवला. धनबाईंना तर एकदम आश्चर्याचा मोठा धक्का बसला. आपल्या मुळे,  शाळा एका कर्तबगार,आदर्शवादी शिक्षकाला मुकणार, हे ठीक नव्हे, असे मनापासून वाटले.बाई देखील तेवढ्याच तत्त्वनिष्ठ असल्यामुळे  त्यांनी तो कागद तेथेच फाडून टाकला व आपणास शाबासकी देऊन, त्या मुलाला पुन्हा मागच्याच वर्गात ठेवण्याचे ठरविले. गोष्ट खूप लहान आहे पण त्या गोष्टीतून  ,आपल्या, सद्सद्विवेकबुद्धीची आणि कर्तव्यकठोर स्वभावाची जाणीव होऊन नतमस्तक व्हायला होते!… वज्रादपी कठोराणी, मृदू नी कुसुमादपी…. असेच आपण आयुष्यभर होतात.

     गुरुजी आपले संपूर्ण नाव कृष्णराव महादेव चित्रे. जन्म 31 ऑगस्ट 1897 गोकुळ अष्टमीच्या पुढच्या, मागच्या दिवशीच,झाल्याने आईने आपले नाव कृष्ण ठेवले. मात्र आपल्या संपूर्ण आयुष्यात कृष्णापेक्षा त्याचे गुरु सांदिपनी यांचाच वारसा निष्ठेने जतन केला. ‘शारदाश्रम म्हणजे सांदिपनी आश्रम’ अशी ख्याती सर्वत्र पसरली. शुभ्र खादीचा साधासुधा पोशाख,खांद्यावर एक लहानसा टॉवेल ,सडसडीत अंगकाठी, निर्मळ व प्रसन्न चेहरा,आहार अगदी अल्प ,साधा व शाकाहारी. रहाणी साधी ,प्रकृती निकोप, अत्यंत थोर मनाचे,  थोर विचारांचे आणि मात्रृहृदयी, आधुनिक ऋषी, हीच आम्हा मुलांना आपल्या बद्दलची संक्षिप्त ओळख!

स्वामी विवेकानंदांचे तत्वज्ञान आपण केवळ पुस्तके वाचून ,त्यांची पूजा करून ,नुसते आत्मसात केले नाही ,आपण ‘विवेकानंद जगून दाखविले ‘!आपले सर्व जीवन म्हणजे रामकृष्ण विवेकानंद या विभूतींच्या, तत्त्वज्ञानाचे, मूर्तीमंत चालते-बोलते स्वरूप होते! भारतभूमीला कृतार्थ करणारी तेजस्वी व शीलवान माणसे निर्माण करणे हे विवेकानंदांच्या शिकवणुकीचे सार होते. आपण स्वतः तसे होऊन दाखविले व ते शिरोधार्य मानून, आपल्या विद्यार्थ्यांनाही तशी शिकवण दिली. आपला आदर्श त्यांचे पुढे ठेवला. बोर्डीच्या हायस्कूलातील कोणताही विद्यार्थी, जगाच्या बाजारपेठेत, सर्वाहूनी वेगळा ठरला, याचे कारण गुरूजी, आपली ही शिकवण व उदात्त आचरण हेच आहे !

      1954 साली, शाळेच्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा हा फोटो.प्रिन्सिपाल  चित्रे गुरुजी,  बसलेले उजवीकडून चौथे दिसत आहेत.

     गुरुजी एकोणीसशे पंचावन्न साली मी हायस्कुलात दाखल झालो त्या वेळी आपणच मुख्याध्यापक होतात, मात्र प्रत्यक्ष आपली  शिकवणी आम्हाला,  कधीतरी फ्री पीरियड्स मध्ये अथवा संस्कृत इंग्रजीचे शिक्षक रजेवर असताना  मिळे. 1957 मध्ये आपण सेवानिवृत्त झाला होतात. आपली नियमित शिकवणी मला मिळाली नाही मात्र  अशा रीतीने  इतर शिक्षकांच्या गैरहजेरीत शिकवणी भरपूर मिळाली.

     एकदा दुगल सर, रजेवर असताना आपण आम्हाला इंग्रजी शिकविण्यास आला होतात. त्यावेळी इतर ईंग्रजी अभ्यासा बरोबर,कवी वर्डस्वर्थची,’SOLITARY REAPER ‘  ही प्रसिद्ध कविता आपण शिकवलीत. आपल्या शिकवण्याबद्दल काय बोलावे?.नेहमी प्रमाणेच पिन ड्रॉप सायलेन्स  विषयाचा आशय समजून देण्याची आपली कला  आणि  प्रत्येकाला समजले आहे ना ही खात्री केल्यावरच पुढे जाणे  आम्ही  ही कविता उत्तम रित्या जाणून घेतली.तो एक वेगळाच अनुभव .दुगल गुरुजी कामावर  रुजू झाले आणि त्यांनी रजेच्या कालांत,झालेल्या  अभ्यासक्रमाची चौकशी केली. त्यांना वरील कविता  शिकऊन झाल्याचे कळले .दुगल गुरुजींच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसली. .मात्र ते काही बोलले नाहीत .तिसऱ्या दिवशी ते वर्गात आले . अगदी खुशीत येऊन,म्हणाले “आज मी तुम्हाला चित्रे गुरुजींनी शिकवलेली ‘साॅलीटरी रिपर’, ही कविता पुन्हा घेणार आहे. यासाठी, मी सरांची परवानगी घेऊन आलेलो आहे”. आम्हाला प्रथम हा काय प्रकार आहे,हेच कळले नाही. दुगल गुरुजींनी सांगितले, की ,”ही माझी अत्यंत आवडती कविता असून, माझ्या शिक्षण कालात, या कवितेवर मी थोडे चिंतन केलेले आहे, ही कविता शिकवण्याची माझी  आत्यंतिक  इच्छा होती.  चित्रे गुरुजींनी परवानगी दिली, म्हणूनच माझी हौस मी आज पुरी करतो आहे, पुन्हा शिकवीत आहे” .त्यादिवशी,दुगल सरांनी, तो स्कॉटलांड देश, त्यातील खडकाळ हायलँड नावाचा प्रदेश, पायथ्याशी असलेले, ते पिकाने भरलेले शेत, एका हातात धान्याचा चूड आणि एका हातात कोयता घेऊन, कमरेत थोडी वाकलेली ,ती अवखळ एकटी, वनबाला.. वाह, नुसती बहार आली ! काव्य कुसुमांचा नुसता पाऊस  पडत होता . दुगल गुरुजी जणू स्कॉटलंड देशातच जाऊन पोहोचले होते आणि आमच्या समोर ती एकाकी ,शेत कापणारी, अल्लड ,खेडवळ,तरुणी डोळ्यासमोर प्रत्यक्ष दिसत होती!! एक चमत्कार आम्ही अनुभवत होतो..   आजही ते दृश्य, आपण उभयता गुरुवर्यां ची आठवण झाली की, डोळ्यासमोरून हलत नाही!!  ही आठवण सांगण्याचे प्रयोजन एवढेच की,आपण शिकवलेला  एक धडा, दुय्यम शिक्षक पुन्हा शिकवू इच्छितो, तरी त्याला परवानगी देणारे आचार्य मोठे, की शिकवून झालेले असून सुद्धा, आपल्या मनाच्या समाधाना पोटी, हेडमास्तरां ची माफी मागून, पुन्हा तो धडा शिकवणारे दुय्यम शिक्षक मोठे?मला वाटते दोघेही महान, कारण उभयतांचा हेतू एकच.. माझ्या विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन, उत्तम देता यावे .  “.. तस्मै श्री गुरवे नमः”

गुरुजी याच संदर्भात एक सुंदर आठवणीही मुद्दाम सांगतो. त्या दिवशीच्या त्या दुग्गल सरांच्या कविते नंतर, हा स्कॉटलंड देश आणि त्यातली हायलँड भागातील शेते,आयुष्यात कधी तरी बघावी असा एक ऊर्मी  मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसली. योग येत नव्हता. पण काय सांगू? काही वर्षांपूर्वी हा योग आला. आमच्या पर्यटनात इंग्लंड देश होता, मात्र आम्ही मुद्दाम,थोडे आडवळण घेऊन, दोन दिवस जास्त वाढवून, स्कॉटलंड ला गेलो. हायलँड प्रदेशात गेलो. त्या दिवशी संध्याकाळी, एका डोंगराच्या कडेला उभा राहून जेव्हा उतारावरील, बार्लिची पिवळी शार शेते पहात राहिलो… भोळे मन शोधीत होते ती एकटी, हातात विळा घेऊन शेत कापत असलेली वनबाला ..डोळ्यासमोर आले ते 75 वर्षांपूर्वी 9 वी ‘ड’,च्या वर्गात, मस्त तल्लीन होऊन कविता शिकवणारे दुगल गुरुजी …आणि त्यांना परवानगी देणारे आपण चित्रे गुरुजी… गुरुजी , एक हाडाचा शिक्षक, मुलांच्या मनावर ,किती सुंदर संस्कार ,विचार कोरू शकतो..

तसेच दुसऱ्या या एका शिक्षकांच्या रजा कालांत, आपण आम्हाला भूमिती विषय शिकविण्यास काही दिवसा करिता आलात. त्यावेळी आपण हेडमास्तर होतात. मात्र तास सुरु होण्याचे दोन-तीन मिनिटे तरी आधीच, आपले पाऊल वर्गात पडे.बरोबर येताना, हातात भूमिती चे पाठ्यपुस्तक, कंपास बॉक्स, फुटपट्टीसहित खडू ची पेटी ,असे सर्व सामान दोन्ही हातात सांभाळत आपण स्वतः वर्गात येत असत. वास्तविक अशा वेळी, इतर काही शिक्षक, प्यून ची मदत घेत.आपणही घेऊ शकला असतात. पण तसे केले नाही. सर्व साहित्य का? तर फळ्यावर वर्तुळ काढताना, ते अगदी  तंतोतंत गोलच आले पाहिजे  हा आपला कटाक्ष. कधीही,नुसत्या हाताने, आपण वर्तुळ काढले नाही. त्यासाठी कंपासचा उपयोग करूनच वर्तुळ काढले. साधी सरळ रेषा काढावयाची असल्यास, फळ्यावर फुटपट्टी ठेवून, खडूने सरळ रेषा काढली जाई.गुरुजी आयुष्यामध्ये आम्ही खूप शिक्षक, प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत पाहिले, मात्र कोणीही ,खडूने,सरळ रेषा किंवा वर्तुळ काढण्यासाठी कंपास अथवा फुटपट्टी चा वापर केलेला आढळत नाही पण आपली जातकुळीच  वेगळी,  कारण… आपण होतात” मिस्टर परफेक्शनिस्ट!”

विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती हा शब्दप्रयोग, आजच कशाला, गुरुजी तुमच्या काळीही  वापरून वापरून तेवढा बोथट झाला होता.  त्याचा काही अर्थबोध होत नाही, असं कित्येकदा वाटले आहे .मात्र आपण शाळेत व शारदाश्रमात तो शब्दप्रयोग, प्रत्यक्ष कृतीत उतरवून दाखविला. मुलांना सुसंस्कारीत केले, ते, उपदेशाचे डोस पाजून नव्हे तर आपल्या आदर्श वर्तनाने व अगदी सहज लीलया घडलेल्या लहानशा प्रसंगातून.

मला वाटते मी त्यावेळी इयत्ता आठव्या ईयत्तेत ,नुकताच दाखल झालो होतो. रोजची सकाळची प्रार्थना गुरूदक्षिणा मंदिरात झाली नंतर गटागटाने आम्ही आमच्या वर्गाकडे निघालो होतो. चालताना सहज माझी नजर कुंपणाकडे पडलेल्या काही नोटांचे गुंडाळी कडे गेली .मी सहज रांग सोडून तेथे गेलो पुडी उघडली ही नाही आणि खिशात ठेवून तसाच धावत आपल्या कार्यालयात आलो. आपण थोड्या वेळापूर्वीच येऊन बसला होतात. माझ्या खिशातून त्या दोन, पाच रुपयांच्या नोटा मी आपल्या हातात दिल्या व त्या “मला प्रार्थना झाल्यावर, परत येताना, कुंपणाजवळ  मिळाल्या”, असे सांगितले. त्यावेळी माझी ओळखही आपल्याशी झाली नव्हती कारण आपण मला शिकवीत नव्हतात. मात्र माझे नाव आपण विचारून ठेवले इयत्ता विचारली व पाठीवर शाबासकी देऊन मला वर्गात जाण्यास सांगितले. हा प्रसंग मी संध्याकाळ पर्यंत विसरूनही गेलो होतो. दुसरे दिवशी पुन्हा नेहमी प्रमाणे प्रार्थनेसाठी गेलो. प्रार्थना संपली व आता सर्व विद्यार्थी पुन्हा वर्गाकडे जाण्यास निघणार तोच आपण उभे राहिलात व माझ्या नावाचा पुकारा करून मला उभे राहण्यास सांगितले. मला तर काय होते हे कळेना. खूप घाबरलो होतो. अशा रीतीने, प्रत्यक्ष हेडमास्तर आपल्याला सर्वासमक्ष का बरे उभे केरीत असतील? ज्यावेळी आपण, काल घडलेला तो प्रसंग सांगून, सर्वांसमक्ष मला शाबासकी दिलीत,त्यावेळी आपण उच्चारलेले एक वाक्य माझ्यासाठी चिरंतर मनःपटलावर कोरले गेलेले आहे. “मुलांनो दहा रुपयाची रक्कम महत्वाची नाही, त्यामागे या मुलाने दाखविलेली, सद्बुद्धी ही महत्त्वाची. स्वतःशी प्रामाणिक रहा”. गुरुजी त्या दिवशी मला खूप बरे वाटले. वर्ग शिक्षक, इतर शिक्षक, मित्र यांनीही शाबासकी दिली, विसरून गेलो. शाळा ही संपली .पुढे एके दिवशी ज्ञानोबांची ती  प्रसिद्ध ओवी वाचनात आली,

दीपकलिका धाकुटी, बहुत तेज प्रकटी, तैशी सदबुद्धी ही थेकुटी म्हणो नये.

गुरुजी आपल्या  सारख्या गुरुजनांच्या आशीर्वादाने  जगातील पहिल्या नंबरच्या कंपनीत  अगदी वरच्या हुद्द्यावर मी काम केले. आयुष्यात मोहाचे अनेक क्षण आले. पाय थरथरले, तरी तोल गेला नाही, याचे कारण मोहाच्या प्रत्येक क्षणी, त्या दिवशीच्या  प्रार्थना सभेत उभा असलेला मी, आणि समोर मला शाबासकी देणारे तुम्ही…,हा प्रसंग डोळ्यासमोर सतत येत असे…आजही सर्व तसेच आठवत असते.. मी मलाच शाबासकी देतो.

      शारदाश्रमांत अनेक प्रकारचे विद्यार्थी येत. नाठाळ, खट्याळ, बंडखोर विध्व॔सक प्रवृत्तीचे ही असत .आपण अशा विद्यार्थ्यावर मुद्दाम अधिक लक्ष ठेवले, त्यांची अनेकदा परीक्षा पाहून,  निरीक्षण करून ,त्याला सन्मार्गावर आणण्यासाठी ,स्वतःलाही प्रसंगी कष्ट दिले,यातना सोसल्या आहेत. त्यातील एक उदाहरण मुद्दाम सांगतो. एके दिवशी रात्री सर्व सामसूम झाल्यावर, वसतिगृहातील तीन विद्यार्थ्यांनी, झाडा वरचे नारळ काढून खाल्ले. ही गोष्ट रात्रीच्या पहारेकऱ्यांच्या नजरेस आली, मात्र विद्यार्थ्यांना हे समजले नाही. त्यांचा गोड गैरसमज होता आम्हाला कोणीच पाहिले नाही. अर्थातच  पहारेकऱ्याने  तुम्हाला ही गोष्ट  मुलांच्या नावासकट सांगितली .दुसरे दिवशी सकाळी प्रार्थनेचे वेळी ,आपण हा चोरीचा प्रसंग, उपस्थित करून ,’ज्या कोणी विद्यार्थ्यांनी नारळ चोरले आहेत त्यांनी हात वर करा’ अशी सूचना केली.कोणीच हात वर केला नाही.  संध्याकाळचे प्रार्थनेचे वेळी देखील हाच  प्रयोग केलात, मात्र तरीही,ही कोणी कबूल होईना .दोन दिवस असा प्रयत्न केल्यावर तिसरे दिवशी चे प्रार्थनेत ही, आपण केलेल्या आवाहनाला कोणी प्रतिसाद देत नाही, हे पाहून, आपण जाहीर केले, “मी आज पासून अन्न-पाणी वर्ज करायचे ठरविले आहे, कारण चोरीची जबाबदारी माझ्यावर आहे …”आणि काय चमत्कार…गुरूजी, तुमचे वाक्य संपते न संपते ,तोच तीन विद्यार्थी उठून उभे राहिले. त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्या  डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या! आपल्या नैतिकतेचा हा विजय होता. जेव्हा शिक्षक, मुलांची आई होऊन त्यांच्यावर ममता करतो, तोच गुरू असा चमत्कार घडवून, विद्यार्थ्यांना सन्मार्गावर आणू शकतो !गुरुजी पसायदानात, ज्ञानदेव म्हणतात,

    ‘ईये खळांची व्यंकटी सांडो,तया सत्कर्मी रती वाढो.’

 गुरुजी खरोखरच  तुमच्या स्वतःच्या  नैतिक अनुष्ठानाने, विद्यार्थ्यांमध्ये,  क्रांतिकारक बदल घडून आलेले आहेत. शारदा आश्रमात अनेक विद्यार्थ्यांना, प्रसंगी चोरीचा मोह झाला.प्रत्येक वेळी आपण अशा मुलांचा शोध घेऊन, त्यांना शिक्षा करून नव्हे तर प्रेम देऊन, जिंकून घेतले.अशी मुले भावी आयुष्यात कधीच,चोरीच्या वाटेला जाणे शक्य नाही.

     गुरुजी विद्यार्थीदशेत तुम्ही जे शिकविले, ते लक्षात ठेवून आम्ही शाळेच्या, कॉलेजच्या परीक्षा दिल्या.कदाचित ते पुस्तकी ज्ञान आज आम्ही  विसरलो असू .परंतु आपल्या आचार, विचारांतून जे शिक्षण व संस्कार आम्हाला आपण दिलेत, त्यामुळेच, जीवन जगण्याची परीक्षा अजूनही  यशस्वी रीतीने देऊ शकतो. वाटतं आम्हाला, कोणत्यातरी पूर्वपुण्याई मुळेच आपणासारखे गुरुजन त्या संस्कारक्षम वयात मिळाले.

   आपण मला फ्रीशिप मिळावी म्हणून केलेल्या प्रयत्नाची हकीकत आधी सांगितली आहे .तेव्हापासून मला वाटते माझ्या अभ्यासाच्या प्रगतीवर आपण नजर ठेवून असाल. मात्र मला हे माहीत नव्हते .आठवीची वार्षिक परीक्षा झाली .मी वर्गात चांगल्या गुणांनी पास झालो होतो मात्र यावेळी शाळेकडून मिळणारे प्रिन्सिपल प्राईज केवळ इंग्रजीत 70टक्क्याचे खाली मार्क मिळाल्यामुळे गेले होते. बाकी सर्व विषयात ऐंशी वर गुण मिळाले होते .आनंद ,थोडी नाराजी अशा मनाच्या अवस्थेत प्रगती पुस्तक वाचत असतानाच आपल्याकडून ,प्यून मार्फत, मला निरोप आला,  शाळा  सुटल्यावर कार्यालयांत भेटावयास येणे. कार्यालयांत गेल्यावर आपण आपल्या रूमवर गेल्याचे कळले व मला रूमवर भेटण्याचा निरोपही मिळाला. खरोखरच माझी अवस्था खूप बिकट झाली होती. कशासाठी आपण बोलविले आहे? हा विचार, तसेच ऑफिस ऐवजी आपल्या निवासस्थानी बोलविल्या ने तर माझी धडकन खूपच वाढली होती.  कसाबसा आपल्या खोलीचा जिना चढून दरवाजा समोर उभा राहिलो. त्याकाळी आपण शारद आश्रमाच्या भोजनालया वर असणाऱ्या एका खोलीत निवास करीत होतात. बंद दाराशी थोडा वेळ ऊभा राहिलो. आपल्याला मी येत असल्याची चाहूल लागली होती .आत येण्याचा हुकुम झाला. मी आपल्या खोलीत शिरून उजवीकडे वळलो ,प्रथम माझी नजर आपल्या  खोलीतील,त्या  प्रसिद्ध विवेकानंदांच्या भव्य तैलचित्राकडे गेली. वाटले, चित्रातले विवेकानंद मला आशीर्वादच देत आहेत. आपण मला समोरच्या खुर्चीत बसण्यात सांगितले.कोणतेही प्रास्तविक वगैरे न करता सरळ विषयाला हात घालून आपण ‘ रेन ऍन्ड मार्टिंन ‘ ,यांचे इंग्रजी व्याकरणाचे पुस्तक माझ्या हातात दिले. तोपर्यंत, मला का बोलाविले याचा उलगडा झाला नव्हता .मात्र त्यानंतर ,आपण अत्यंत सौम्य शब्दात,थोडक्यात मला जे सांगितले ते असे की ,”इंग्रजीतील कमी  मार्कांमुळे तुझे  प्रिन्सिपल प्राईज चुकले आहे. इंग्रजी कच्चे आहे. ते आपल्याला सुधारावेच  लागेल. त्यासाठी मी खूणा केलेले स्वाध्याय तू सुट्टीमध्ये सोडव. जमल्यास कधीही माझ्याकडे येऊन ते तपासून घे व बाकीचे स्वाध्याय पुढील वर्षात आपल्याला संपूर्णपणे सोडवावयाचे आहेत “…गुरुजी त्या  वेळेला मला उलगडा झाला व डोळ्यात अश्रुही आले. माझ्या वर्ग शिक्षकाकडून आपण माझ्या प्रगतीचा पूर्ण आलेख आधीच  घेतला होता व इंग्रजीतील कमी मार्कामुळे माझे झालेले नुकसान हे तात्पुरते नसून, भविष्यात ही ते खूपच नुकसानकारक होईल, ही दूरदृष्टी बाळगून मला आपण कामाला लावले होते. त्यासाठी स्वतः ,ते पुस्तक आणून मला अभ्यासासाठी दिले होते. अट एकच होती, जोपर्यंत त्या विशिष्ट स्वाध्यायातील उत्तरे, एकही चूक, अगदी स्पेलिंग वा शब्दाचीही, न होता लिहीली जातील,तोपर्यंत पुन्हा पुन्हा तो स्वाध्याय सोडवायचा होता .सुरुवातीला एकच स्वाध्याय मला चार-पाच वेळा करावा लागला .पुढे हळूहळू प्रगती होत गेली.  मात्र त्यातील पत्र लेखन ,निबंध लेखन ,स्टोरी रायटिंग इत्यादी सर्व स्वाध्याय मी सोडवल्यानंतर आपल्या शाबासकीने मला जो आत्मविश्वास दिला,त्याच मुळे पुढे अकरावीला मातृभाषा, मराठीपेक्षाही इंग्रजी पेपरामध्ये उत्तम  गुण मिळवून  मी पास झालो. परीक्षेतील मार्कापेक्षाही, इंग्रजी, ही एक भाषा म्हणून आलेली जाण, आणि निर्माण झालेला आत्मविश्वास मला, माझ्या भावी आयुष्यात, महाविद्यालयीन जीवनातच नव्हे, तर माझ्या व्यावसायिक जीवनात ही किती मोलाचा होता, हे काय सांगू? गुरुजी त्या दिवसाचा तो प्रसंग आणि त्यानंतर आपले प्रेमाचे समजावणे हा  माझ्या आयुष्यातील एक दिव्य अनुभव आहे . तो  कधीच विसरणार नाही .

  शाळेतून आल्यावर ,गुरुजी ज्या खुर्चीवर बसून निवांत होत, ती ही पवित्र वस्तू.. आजही संस्थेने जपून ठेवली आहे.

   ‘अंगीकार केला ज्याचा नारायणे, निंद्य तेही तेणे, वंद्य केले!

माझ्यासाठी तुम्ही खरोखरच नारायण होतात आणि एकदा आपला म्हटल्यावर माझ्या भल्यासाठी तुम्ही खूप  कष्ट घेतले . गुरुजी मी काही फार हुशार विद्यार्थी नव्हतो.मेहनती जरूर होतो माझ्यापेक्षाही  हुशार विद्यार्थी माझ्याच वर्गात होते. माझ्या कौटुंबिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरच, आपण माझ्यासाठी विशेष कष्ट घेतले याची मला जाणीव आहे.

गुरुजी हे लेखन संपविण्यापूर्वी एक दुसरी हृद्य आठवण मला मुद्दाम लिहावयाची आहे.  मी पहिल्याच वर्षी साताऱ्याला एफ. वाय. सायन्स ची परीक्षा देऊन सुट्टी मध्ये बोर्डीस आलो  होतो आणि त्यामुळे साताऱ्याचे माझे अनुभव सांगण्यासाठी तुम्हाला भेटण्यास शारदाश्रमात आलो .सहज बोलता बोलता मी  आपणास सांगितले कि, मी मे महिन्यामध्ये आय.आय.टी.,पवई या प्रख्यात संस्थे च्या प्रवेश परीक्षेसाठी बसणार आहे .ही संस्था फक्त  दोन वर्षांपूर्वीच मुंबईस सुरू झाली होती. त्यामुळे त्या परीक्षेसाठी असणारे अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचा नमुना, वगैरे काहीच माहीत नव्हते . मी माझ्या नेहमीचा, कॉलेजचा अभ्यासक्रमच केला होता. या प्रवेश परीक्षेस बसणार होतो.आपण हे ऐकले मात्र, “त्यासाठी , तुला काही मदत मार्गदर्शन हवे आहे का”?,असे विचारले.  मी त्याची काही आवश्यक नाही हे,सांगितले,कारण मी, ‘अज्ञानात ‘आनंदी होतो. परीक्षा काय ,अभ्यासक्रम काय ,माझी तयारी काय ,काहीच कल्पना नव्हती. माझ्या साताराच्या कॉलेजात ,त्यावेळी नेहमीचा विद्यापीठाचा अभ्यासक्रम शिकवणे ही कठीण जात होते, तेव्हा ही खास ,आय आय टी ची शिकवणी कोण देणार? आपण पटकन, वहीतून एक कागद काढून, त्यावर एक चिठ्ठी लिहिली व तो कागद  लिफाफ्यात ठेवून,वर पत्ता लिहिला 

गुरुजींच्या हस्त स्पर्शाने पावन झालेली ही काही स्मृतिचिन्हे. अखेरच्या दिवसांतील आधारासाठी ची काठी, निवांतपणे, चिंतनात असताना, खुर्चीत बसलेले गुरुजी आणि संग्रहातील स्वामी विवेकानंद चरित्र.

     …. श्रीयुत वसंत दीक्षित खांडके ,बिल्डिंग नंबर 3 दादर मुंबई , प्लाझा सिनेमा समोर.

  चित्रे गुरुजींचे भाचे कै. वसंतराव  दीक्षित. एक प्रचंड बुद्धिमान निगर्वी व नम्र व्यक्तिमत्व.

” या गृहस्थांना जाऊन भेट, ते माझे भाचे आहेत आणि आय आय टी पवई मध्येच काम करतात. त्या बाबतीत तुला ते मार्गदर्शन करतील”.. असे थोडक्यात सांगितले.अर्थात  ही तर खूप मोठी संधी होती, न मागता मिळालेले मोठे दान होते .त्वरित दोन-तीन दिवसातच मी बोर्डीहून, दादरला जाऊन वसंतरावांची ,त्यांच्या घरी दुपारी भेट घेतली. रविवार असल्याने ते घरीच होते .साधा पायजमा आणि शर्ट अशा वेशात, सडसडीत बांध्याचे,डोळ्याला जाड चष्मा लावलेले, गंभीर प्रवृत्तीचे,वसंतराव खुर्चीवर बसले होते. मलाही बसण्यास सांगितले. .चहा पान  झाले आणि त्यांनी मला, काही जुजबी प्रश्न विचारून माझी तयारी कितपत झाली आहे याचा अंदाज घेतला. मला त्यांच्या प्रथमदर्शनी झालेल्या जाणकारी वरून, हे गृहस्थ आय आय टी मध्ये फारतर ऑफिस सुपरिंटेंडेंट वगैरे असतील असा माझा अंदाज होता.आणि एवढे खोल व तांत्रिक प्रश्न हे मला कशासाठी विचारत आहेत हे समजत नव्हते .चेहऱ्यावरून माझ्या अभ्यासाबाबत यांना समाधान झालेले दिसले नाही, मात्र तसे काहीही न बोलता  त्यांनी मला परीक्षेस बसण्यास प्रोत्साहन दिले.  “अभ्यास चालू ठेव.आता फक्त पंधरा दिवस उरले आहेत तेव्हा व्यवस्थित पेपर लिही,, येथे प्रश्न पद्धती व उत्तराची अपेक्षा  अगदी  वेगळी आहेत,  तुमच्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षेशी तसा या परीक्षेचा संबंध नाही.. पुढे निकाल आल्यावर आपण पुन्हा भेटू..”वगैरे  .एकंदरीत  माझ्या  परीक्षेच्या तयारी विषयी  त्यांना विशेष समाधान झालेले दिसले नाही. मलाही ते कळले . दीक्षित साहेबांना  मनोमन धन्यवाद देऊन नमस्कार करून मी निघालो  परीक्षेलाही बसलो आणि अर्थातच दीक्षितांच्या अंदाजाप्रमाणे,मला आय आय टी मध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे दीक्षित साहेबांना पुन्हा भेटण्याचा प्रश्न आला नाही  मी देखिल तो प्रसंग  आणि ती भेट विसरून गेलो.. मी रसायनशास्त्र घेऊन पदवीची परीक्षा दिली आणि पुढे यु टी सी टी या संस्थेत पदव्युत्तर अभ्यासक्रम केले, तो भाग अलाहिदा . त्यानंतर, 25 वर्षानंतर 1985 साली,  चित्रे गुरुजींच्या दुःखद निधनानंतर,त्यांचे स्मृती प्रित्यर्थ  निघालेल्या  “स्मृती मंजुषा” या ग्रंथात माझाही  एक  छोटा लेख असल्याने, मला  ते पुस्तक पाठविण्यात आले होते.  मान.दीक्षित सर यांचे विषयी,त्यांचे कुटुंबीयांनी लिहिलेले  लेख वाचले तसेच दीक्षितांनी ही आपल्या मामान बद्दल लिहिलेल्या आठवणी वाचल्या.. आणि  मी  अतिशय आश्चर्यचकित झालो.  मला  1960 मध्ये,भेटलेले वसंत दीक्षित, म्हणजे  चित्रे कुटुंबाला मिळालेले एक मौल्यवान रत्न होते . 1949 मध्ये  मॅट्रिक परीक्षेपासून, पुढे प्रत्येक परीक्षा,पहिल्या क्रमांकाने, सुवर्णपदकासह  उत्तीर्ण झालेले एक दैदीप्यमान,  प्रखर बुद्धीमान ,व्यक्तिमत्व होते . मला वाटते  महाराष्ट्रात तरी, सी डी देशमुखानंतर,वसंतराव दीक्षित ,यांचेच नाव हुशारी मध्ये,जिनियस, म्हणून घ्यावे लागेल!  साने गुरुजींनी देखील या वसंतरावांचा, ,’सुधेस पत्रे’, या पुस्तकात गौरवाने उल्लेख केलेला आहे.  आता मला  वाईट एवढेच वाटते , त्यावेळी मला दीक्षित साहेबांची थोरवी  व ते आयआयटी पवई मध्ये एक नामवंत प्राध्यापक म्हणून काम करतात असे कळले असते तर, मी त्यांना साष्टांग दंडवत घालून आलो असतो !! किती महान व तितकेच नम्र,अशा व्यक्तीशी माझा, काही तासांपुरती का असेना परिचय झाला. ते काही असो, गुरुजी, मला आपण त्यांचेकडे पाठविले, मी काही न विचारताच पाठविले व एका महान व्यक्तीशी माझी गाठ घालून दिलीत, ते मौलिक,चिरस्मरणीय क्षण मी कधीच विसरणार नाही. तीन-चार वर्षांपूर्वीच माननीय वसंतराव निधन पावले ही दुःखद वार्ता ही कळली होती. त्यांचे स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो.

      गुरुजी,आपल्या  पावन स्पर्शाने माझे व माझ्या सारख्यांची अनेक आयुष्ये क्षणभर का असेना उजळून निघाली . माझ्या मुलांनाही आपले,आशीर्वाद मिळावे ही माझी खूप इच्छा होती 1981 चे सुमारास, मी माझ्या दोन्ही मुलांना, ती लहान असताना, आपल्या दर्शनासाठी व  चरणस्पर्शासाठी घेऊन आलो होतो. आपली प्रकृती त्यावेळेला थोडी नाजूक  होती.मात्र चेहऱ्यावर, तेच स्मितहास्य व तीच आत्मीयता होती. दोन्ही मुलांना त पाठीवरून हात फिरवून आपण लाखमोलाचे शुभाशीर्वाद दिलेत.माझी ती इच्छाही आपण पूर्ण केलीत.

     1985,मार्चमध्ये एस आर सावे सरांनी शारदाश्रम सोडले. ते आपल्या इच्छेविरुद्ध झाले. आपली व सरांची 42 वर्षानंतर ताटातूट झाली .मला वाटते, आपल्या शरीरावर व मनावर ही याचा खूप परिणाम झाला असावा. 23 जून 1985 रोजी, आपण जगाचा निरोप घेतला. आपल्या विद्यार्थ्यांनी, आपले स्मरण सतत राहावे, म्हणून आपली समाधी बांधली आहे. ही समाधी, आम्हा सर्वांना तसेच भावी पिढीसाठी, सतत स्फूरणदाई, प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही .

  सध्या प्रिन्सिपल प्रभाकर राऊत यांचे कार्यालय असलेली ही खोली, म्हणजे पूज्य चित्रे गुरुजी यांचे अखेरचे निवासस्थान.  गुरुजींच्या पदस्पर्शाने पावķन झालेल्या, त्यांच्या वापरातील काही वस्तू स्मृतिचिन्हे म्हणून येथे ठेवली आहेत. 

       मी आयुष्याचा एक वाटसरू, गतजन्मीची पुण्याई म्हणून  बोर्डीच्या परिसरात तुम्ही आम्हाला भेटलात. गुरुजी आता कुठे भेटाल? जिथे जिथे ज्ञान, नम्रता आणि विवेक असेल, जिथे गुणसंपन्नता, निस्वार्थी वृत्ती, जोपासली जात असेल, जिथे सर्जनशीलता समाज सौंदर्याचे, आणि माणुसकीचे दर्शन होत असेल, आणि शारदेची, वात्सल्याची पूजा बांधली  जात असेल, तिथे तिथे तुम्ही अदृश्य रुपाने निश्चित उपस्थित असाल, अशी आम्हा सर्व  विद्यार्थ्यांची, श्रद्धापूर्वक खात्री आहे .गुरुजी तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग दंडवत!!

ज्ञान देवांचे शब्दात 

तू कारूण्याचा आदि , सकल गुणांचा निधी,,

विद्या सिंधू निरवधि….

येणे माने मह॔तु, वरी आम्हा लागी कृपावंतु

दिगंबर राऊत. 

आपला एक माजी विद्यार्थी

Image result for flowers emoji

हा लेख लिहिताना प्रिन्सिपल प्रभाकर राऊत सर,.यांनी दिलेली माहिती व व ‘कै.पूज्य चित्रे गुरुजी स्मृती मंजुषा’, या पुस्तकाचा खूप उपयोग झाला आहे, त्याबद्दल मी आभारी आहे.

     शांतीसागर. बोर्डी येथील ,हायस्कूल समोरील पटांगणात, समुद्रकिनारी असलेली कै. पूज्य,चित्रे गुरुजींची समाधी. विद्यार्थ्यांच्या भावी पिढ्यांना सतत प्रेरणा देणारी ही वास्तू आमच्यासाठी तीर्थस्थान
गुरुजींच्या हस्ताक्षरात, आम्हा सर्वांसाठी त्यांचे अखेरचे आशीर्वाद आणि प्रार्थना.