माझे सातारा कॉलेजमधील कांही संस्मरणीय शिक्षक

Dr. Bhaurao Patil

   5 सप्टेम्बर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर राधाकृष्णन, स्वतः एक महान गुरु आणि भारतीय वैदिक तत्वज्ञानाचे एक महान विद्वान म्हणून गणले जातात. या दिवशी शासनाकडून भारतातल्या काही उत्कृष्ट, शिक्षकी पेशाला वाहून घेतलेल्या, शिक्षकांचा शासकीय सन्मान केला जातो. गुरुपौर्णिमा हादेखील भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा, गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला अगदी देवाप्रमाणे मानले जाते. भारतात पुराणकाळापासून गुरु-शिष्यांच्या अनेक जोड्या होऊन गेल्या, गुरु-शिष्य परंपरा मानली जाते. आधुनिक काळातदेखील अनेक प्रसिद्ध गुरु-शिष्य आपल्याला पाहायला मिळतात .कधी गुरुमुळे शिष्य मोठा होतो तर कधी शिष्यामुळेही गुरूला लौकिक प्राप्त झाल्याचे दिसते. भारतातील गुरुकुल परंपरा नष्ट झाली आणि शिक्षक परंपरा सुरू झाली. गुरु या शब्दामागे असलेले वलय आज  ‘शिक्षका’ मध्ये नाही. अगदी आधुनिक काळांत तर शिक्षक या पेशाचे अवमूल्यन झाल्यासारखे वाटते .त्याला केवळ शिक्षक जबाबदार नाहीत तर एकंदरीत शिक्षणव्यवस्था, समाजौ विद्यार्थी हे सर्वच जबाबदार आहेत .असू द्या तो विषय वेगळा आहे .आजच्या या शिक्षक दिनानिमित्त मला माझ्या कांही गुरुजींची ,शिक्षकांची आठवण झाली.त्यांचे स्मरण करून  माझी आदरांजली देणे हे माझे कर्तव्य  समजतो. त्यांचे बद्दल दोन शब्द लिहावे वाटतात .अगदी मराठी प्राथमिक शाळेपासून ते पुढे पदवी शिक्षण,पदव्युत्तर शिक्षण, घेतांना मला अनेक गुरुजन मिळाले. काही लक्षात राहिले ,काही विस्मरणात गेले .काहींनी माझ्या  आयुष्यावर खूप छाप पाडली ,अंतर्मुख केले .तर काहींचे विस्मरण होऊन ते आयुष्यात आले होते याचेही भान राहिले नाही. त्याला कदाचित मी स्वतः जबाबदार असेन.  एक गोष्ट खरी आहे की  आपले प्रथम गुरू म्हणजे आपले आई-वडील. माझ्या बाबतीत माझे वडील हे माझे पहिले गुरू हे मी नेहमी मानत आलो. वडील आप्पा,  एक स्वतः आदर्श शिक्षक तर होतेच पण एक आदर्श पिता म्हणून देखील त्यांनी आम्हाला शाळेत जाण्यापूर्वीच चांगले संस्कार देऊन घडविले. पुढे मराठी शाळेतही अनेक चांगले गुरुजी भेटले .हायस्कुलातही आचार्य  भिसे, चित्रे, सावे  अशा महान गुरूंकडून आशीर्वाद व ज्ञान मिळाले.  त्यांच्याविषयी मी इतरत्र लिहिले आहे. पुढे मात्र आज यानिमित्ताने माझे छत्रपती शिवाजी महाविद्यालय सातारा येथील काही गुरुजनांच्या बद्दल लिहावेसे वाटते. बोर्डी सोडून साताऱ्याला गेल्यानंतर एक मोठा परिवर्तनाचा कालखंड जीवनात सुरू झाला होता. आपले गाव, आपला समाज, आपले नातेवाईक, इष्ट मित्र, आवडते शिक्षक हा सर्व माहोल एकदम बदलून एका नवीनच वातावरणात आपल्या गावापासून शेकडो मैल दूर असणाऱ्या या मुलुखात मी आलो होतो, ते महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरता. मोठ्या खडतर आर्थिक  परिस्थितीशी सामना होता.करण्यासाठी, एक तर या नव्या मुलखात आमच्या ओळखीचे असे कोणीच नव्हते व दुसरी गोष्ट येथील  वातावरण हेही अगदी भिन्न तसेच ज्या माध्यमातून शिकायचे होते ते माध्यमही आता बदलले होते .कॉलेजमध्ये  फक्त शिक्षण घेणे एवढेच काम नव्हते.त्यासाठी थोडे कष्ट करून पैसे कमावणे, देखील मला करावे लागणार होते . या परिस्थितीत,ज्या गुरूजनांनी  प्रेम,विश्वास  दिला ,आस्था दाखिवली आणि पाठीवर थाप देऊन, “तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना..” ,असे आश्वासित केले, अशा काही गुरुजनांची आठवण आयुष्यभर राहणे साहजिक आहे. त्यांची आठवण करून आज मी त्यांना मानाचा मुजरा,अंतःकरणापासून करीत आहे.

   बोर्डीच्या हायस्कूलमधील गुरुवर्य भिसे, गुरूवर्य चित्रे आणि त्यांचे सर्व आदर्श सहकारी शिक्षक यांनी आमच्यासाठी शिक्षक म्हणजे कसा असावा याचा एक खूप उंच मानदंड ठरवून दिला होता .त्यामुळे यापुढे जे कोणी शिक्षक  भेटले त्यांची पारख, मी या प्रमाणित मानांकनावर..Bench mark..वर करीत असे. ज्या र’यत शिक्षण संस्थेचे’, हे, ‘छत्रपती शिवाजी महाविद्यालय’ होते ,त्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक ,कर्मवीर भाऊराव पाटील,हेसुद्धा आमच्या चित्रे, भिसे यांच्या  पंगतीतलेच होते.आयुष्यात शिक्षण दानाचाचा वसा घेऊन महाराष्ट्रभर वणवण करून ,गरीब, अनाथ परंतु हुशार असे विद्यार्थी निवडून काढून,त्यांना साताऱ्याला आणून फुकट शिक्षण दिले .त्या कर्मवीर भाऊराव पाटीलांचीअशी कीर्ति ऐकूनच आम्हीसुद्धा बोर्डी हून साताऱ्यात गेलो होतो. 

  मध्यभागी असलेल्या विस्तीर्ण पटांगणात आता सुंदर हिरवळ तयार झाली असून तेथील कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा

“महाराष्ट्रातीलच नाही,तर देशातील, कोणत्याही विद्यार्थ्याला, केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नसेल, त्याने माझ्या संस्थेमध्ये यावे ,त्याला जेवढे शिक्षण घ्यावयाचे ते देण्यासाठी मी समर्थ आहे”,अशीच त्यांची भूमिका होती.’बहुजन सुखाय बहुजन हिताय’हेच त्यांच्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य आहे .त्या प्रमाणे त्यांचे काम चालू होते .दुर्दैवाने आम्ही ज्या वर्षी साताऱ्यास गेलो,त्याच वर्षी कर्मवीर अण्णांचा अचानक मृत्यू झाला .त्यांचा सहवास आम्हाला मिळाला नाही ,मात्र त्यांनी पेरलेले बीज त्यावेळी अंकुरले होते .त्यांच्याच पठडीत तयार झालेले, त्यांच्या कामाने प्रेरित होऊन, इतरत्र मिळणाऱ्या चांगल्या संधी सोडून ,त्यांचेच कांही शिष्य, संस्थेत शिक्षण दानाचे काम करीत होते.सुदैवाने आम्हाला ते तेथे भेटले.

    सुरुवातीलाच कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांनी सुरु केलेली रयत शिक्षण संस्था याबद्दल थोडक्यात सांगतो. भाऊराव पाटील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते .काही काळ त्यांनी सत्यशोधक समाजाच्या प्रचाराचे कार्य केले.1919 आली सातारा जिल्हा शाखेची एक परिषद काले या गावी भरविण्यात आली होती.भाऊराव त्या सभेला उपस्थित होते. या परिषदेत भाऊरावांनी सूचना केली की,जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एक संस्था स्थापन करावी. ही सूचना सर्वांना पसंत पडली .त्याप्रमाणे चार ऑक्टोबर,1919 साली ,काले येथेच रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. तिची जबाबदारी भाऊराव पाटील यांनी स्वीकारली. पुढे ते सातारा येथे वास्तव्यास गेले असताना, 1924 मध्ये रयत शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे आले.1924 सालीच कर्मवीरांनी सातारा येथे छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस हे वसतिगृह सुरू केले. या वसतिगृहात सर्व जाती धर्माचे विद्यार्थी एकत्र रहात. भाऊराव पाटील स्वतः खेड्यापाड्यात फिरून बहुजन समाजातील गरीब हुशार विद्यार्थ्यांना गोळा करीत.त्यांना साताऱ्याला घेऊन येतं. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तसेच राहण्याच्या जेवण्याच्या सर्व जबाबदाऱ्या ते उचलीत.इतकेच नव्हे तर आई वडीला पासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांची  सर्व प्रकारची काळजी घेतली जाई. त्या विद्यार्थ्यांपैकी बहुसंख्य असे होते की त्यांना भाऊरावांचा आधार मिळाला नसता तर त्यांच्या शिक्षणाची द्वारे कधीच बंद झाली असती. विद्यार्थ्यासाठी भाऊरावांनी अविश्रांत कष्ट उपसले. ऊन्हा पावसांत वणवण करीत ,मिळेल तेथून त्यांनी मदत गोळा केली.कर्मवीरांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचाही मोठा वाटा होता. वसतिगृहातील विद्यार्थ्यावर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून,एक वेळी या माउलीने आपले मंगळसूत्र विकण्यासही मागेपुढे पाहिले नाही. पुढे 1935 सालीच प्राथमिक शिक्षकांसाठी सिल्वर जुबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज सुरू झाले.1937 पासून खाजगी संस्थांना प्राथमिक शाळा सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला. रयत शिक्षण संस्थेने पहिल्या वर्षीच 68 प्राथमिक शाळा सुरू केल्या. दोन वर्षात ही संख्या 168 वर गेली. नंतरच्या काळात सरकारने प्राथमिक शाळा स्वतः चालवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार जवळपास सातशे प्राथमिक शाळा संस्थेने महाराष्ट्र शासनाला सुपूर्त केल्या .अशा पद्धतीने पाहता पाहता कर्मवीरांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेची सुरुवात झाली.

           1959 मधील कॉलेजचा परिसर आता संपूर्णपणे बदलला असून विविध विषयांतील पदवी अभ्यासक्रम शिकविले जातात. अनेक बहुमजली इमारती आता परिसरात आहेत.

   1947 साली  छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची सुरुवात झाली.त्या वेळी  पूर्णपणे फी माफ असलेले एकमेव कॉलेज होते.पुढे 1951 सालापासून आर्थिक परिस्थितीमुळे फी आकारणे सुरू झाले. ह्याच कॉलेज मध्ये पुढे, 1954,55  साली,सायन्स विभाग सुरू झाला.  1959 खाली आम्ही या छत्रपती शिवाजी सायन्स कॉलेज मध्ये रुजू झालो.  आर्ट्स व सायन्स  या दोन्ही शाखांचे पदवी अभ्यासक्रम येथे शिकवले जात.  आज शास्त्र साठी साठी स्वतंत्र महाविद्यालय सातारा शहरातच सुरू झाले असून त्याचे नाव या ,’यशवंतराव चव्हाण महाविद्यालय’, असे झाले असून सातारा शहरात हे महाविद्यालय आहे .शास्त्र शाखेतील अनेक विषयांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवीत आहेत . सबंध महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात, रयत शिक्षण संस्थेची सुमारे 45 महाविद्यालये असून, शिक्षणाच्या विविध क्षेत्रांत ,कॉमर्स, इंजीनियरिंग, व्यवस्थापन,  शिक्षण शास्त्र,  पत्रकारिता,  असे  विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. भाऊरावांनी 1919 मध्ये लावलेल्या या लहान रोपट्याचा महा वेलू गगनावरी जाऊन पोचला आहे.कर्मवीरांच्या या अफाट ज्ञानयज्ञाला अभिवादन करूनच मी पुढे जातो.

  डॉक्टर बॅरिस्टर पांडुरंग जी पाटील आमचे कॉलेज प्रिन्सिपल पुढे शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू

 तेथील माझा दोन वर्षांचा कालखंड खूपच मजेत गेला. मलप्रथम स्मरण होते त्या कॉलेजचे त्यावेळेचे आमचे प्रिन्सिपल पांडुरंग ग. पाटील. त्यांना सर्वजण बॅरिस्टर पी. जी. पाटील म्हणून ओळखत असत. अण्णांच्या भटकंतीत त्यांना सापडलेला हा मातीत पडलेला तळपता हिरा .ज्याला आई होती ,वडील नव्हते.शिक्षकांनी त्याचे गुण ओळखून अण्णांना हा हिरा पैलू पाडण्यासाठी सुपूर्त केला.पुढील सर्व कामअण्णांनी केले . भारतातील उत्तम शिक्षण पूर्ण झाल्यावर, अगदी इंग्लंडला पाठवून बॅरिस्टर होण्यापर्यंत अण्णांनी सर्व जबाबदारी घेतली. म्हणूनच पाटील सर बॅरिस्टर झाल्यानंतर इतर कोठेही  मोठी नोकरी वा स्वतः ची वकिली करण्याऐवजी, संस्थेच्या त्यावेळी नुकत्याच सुरू झालेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्रिन्सिपॉल म्हणून रुजू झाले होते. वेतनही अगदी अल्प होते. तरीही अण्णांच्या वरील भक्ती व निष्ठेमुळे स्वतः बॅरिस्टर पाटील आणि त्यांच्या विदुषी पत्नी सुमती पाटील, दोघेही आमच्या कॉलेजमध्ये शिक्षणदानाचे पवित्र काम जवळ जवळ विनावेतन म्हणा, करत होते .बॅरिस्टर पाटील हे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी इंग्रजी शिकवित असत. त्यांच्या पत्नी देखील मानसशास्त्र आणि इंग्रजी या विषयाच्या प्राध्यापिका होत्या. आम्हाला त्यांच्याकडून प्रत्यक्ष शिकवणी मिळाली नाही तरी एक गंमत व अनुभव म्हणून त्यांचे इंग्रजी वर्गाला आम्ही जाऊन बसत असू .आप्पांनी, मी साताऱ्याला जाण्याआधी, बॅरिस्टर पाटलांना एक पत्र पाठविले होते .त्यात आपली स्वतःची आर्थिक परिस्थिती, व मला शिक्षणासाठी काही आर्थिक मदत मिळू शकल्यास ती मिळावी अशी विनंती होती .त्यामुळे मी कॉलेजात हजर होताच पाटीलांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेऊन, माझी विस्तृत चौकशी केली. माझ्या शालेय शिक्षणाचा आढावा घेतला. माझ्या शिक्षणाबद्दल आस्थेची त्यांना खात्री पटली..’आमच्याकडून तुला पूर्ण सहाय्य मिळेल’ याची ग्वाही दिली, मात्र काम करण्याची व अभ्यास करण्याची तुझी तयारी असली पाहिजे हे त्यांनी मला निक्षून सांगितले. ‘शिका व काम करा’,म्हणजेच अर्न  अँड लर्न   EARN N LEARN..अशी, काम करून, पैसे मिळवून, शिक्षण घेण्याची योजना तिथे चालू होती. प्रिन्सिपल साहेबांनी मला त्या स्कीम मध्ये तीन तासाचे काम देऊन,त्या वेळच्या तीन रुपयांची कमाई, दिवसाला ,करून दिली होती .त्यावेळी  दगड फोडाई चे काम,जे दगड,  कॉलेजच्या नवीन इमारतीसाठी लागत होते। मला मिळाले – ते मला झेपेना तेव्हा त्यांनी थोडे हलके असे रात्री पहारा करण्याचे  व बागेतील साफसफाई  असे थोडेसे कमी श्रमाचे काम दिले .खरोखरच ते त्यांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत .त्यामुळे मी इथे काम करू शकलो ,थोडेसे अर्थार्जन करू शकलो व तेथील माझ्या एकूण खर्चामध्ये मला ही कमाई खूप उपयोगाची ठरली .ते मध्ये मध्ये मला बोलवीत किंवा आमच्या वसतिगृहाचे सुपरिंटेंडेंट स्वामी सर होते ,त्यांच्या मार्फत माझी  चौकशी करीत असत .बॅ.  पी .जी .पाटीलसर पुढे शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले आणि तेथूनच ते निवृत्त होऊन पुढे साताऱ्यात स्थाईक झाले.ते आज या जगात नाहीत . प्रिन्सिपल पाटीलांच्या अनेक आठवणी आहेत. आम्ही त्यांची इंग्रजी शिकविण्याची ख्याती ऐकून एक-दोन वेळा त्यांची परवानगी घेऊन बीएच्या इंग्रजी तासात जाऊन बसलो होतो आणि त्यांचे वक्तृत्व व इंग्रजीवरील प्रभुत्व पाहून ,विस्मयचकित झालो होतो .त्यांच्या वक्तृत्वाची व इंग्रजीची ख्याती ऐकून कराड कोल्हापूर या आजूबाजूच्या कॉलेजांतील काही विद्यार्थी मुद्दाम त्यांच्या इंग्रजीच्या तासाला येऊन बसत असत. यावरून त्याकाळी त्यांच्या ख्यातीची कल्पना यावी. ओघवती इंग्रजी भाषा आणि मधाळ आवाज या संगमामुळे, त्यांचा तास म्हणजे एक अपूर्व मेजवानी असे. त्यामुळेच  दुसऱ्या कॉलेजांतून देखील काही विद्यार्थी  त्यांची विशेष परवानगी घेऊन  उपस्थित राहत  पाटील सर देखील मोठ्या कौतुकाने अशा विद्यार्थ्यांना बसू देत.

      आमचे दुसरे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणजे डॉक्टर बी .एस .पाटील हे होत. ते व्हॉइस प्रिन्सिपॉल होते आणि पदार्थविज्ञान फिजिक्स या डिपार्टमेंटचे मुख्य व प्रोफेसर होते .यांचे विशेष म्हणजे पदार्थविज्ञान फिजिक्स या विषयावर  एवढे प्रभूत्व  होते की कोणत्याही प्रकारचे लिखाण ,पुस्तक  काहीही न उघडता  वर्गात येऊन,  मोठमोठी सूत्रे, प्रमेये ,नियम मुखोद्गत असल्यामुळे अगदी सहजतेने शिकवीत .सहसा ‘मास्टर्स’ पदवीनंतर विद्यार्थी ‘पीएचडी’ म्हणजे ‘डॉक्टर’ डीग्री कडे जातात .मात्र बी एस पाटील सरांच्या मार्गदर्शकांनी म्हणजे गाईडने त्यांचे विषयावरील प्रभुत्व पाहून बीएस्सी या पदवी नंतरच ,त्यांना पीएचडी साठी पुरस्कृत केले होते .  एम एस सी न होता सरळ पीएचडी मिळालेले ते एकमेवाद्वितीय असे उदाहरण पुणे विद्यापीठात त्यावेळी होते..पाटीलसरां ना ही अण्णांनी उपकृत केलेले असल्यामुळे,,एवढी विद्वत्ता व हुशारी असून,केवळ अण्णांच्या प्रेमाखातर व व कृतज्ञता बुद्धीने ते रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून आले.

 सातार्‍याच्या कॉलेजात पदार्थविज्ञान डिपार्टमेंट चे प्रमुख म्हणून नाममात्र पगारावर काम करीत होते. त्यांचे व्यक्तिमत्त्वही मोठे भारदस्त  होते मध्यम ऊंची ,गोरा वर्ण ,तजेलदार चेहरा व सुटाबुटात असत .आवाजही अतिशय मधुर असल्याने त्यांचे तासदेखील खूप विद्यार्थीप्रिय होत असत. मला त्यांची नेहमीच गरज लागे, कारण कोणत्याही शिष्यवृत्तीसाठी अथवा इतर काही अर्ज विनंत्यासाठी, शिफारस पत्र त्यांचेकडून घ्यावे लागे. त्यामुळे माझा त्यांच्याशी चांगला परिचय झाला होता .मला त्यांनी खूपच प्रोत्साहन दिलेले आहे .

   आमचे बायोलॉजी या विषयाचे प्राध्यापक डॉक्टर आप्पासाहेब वरुटे होते .हे गृहस्थ अण्णांचे विद्यार्थी वगैरे काही नव्हते. कर्नाटक  विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट मिळवून ,साताऱ्याला कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून प्रथमच सुरुवात करीत होते .मात्र त्यांचीही राहणी  व एकंदर व्यक्तिमत्व अत्यंत रुबाबदार आणि इंग्रजीवरील प्रभुत्व तर वाखाणण्याजोगे . उच्चार इंग्रजी वळणाचे व अतिशय स्पष्ट असत. आवाज भरदार असल्यामुळे त्यांच्या वर्गात नेहमी पिन ड्रॉप सायलेन्स होई . विषय नेमका समजून सांगण्याची हातोटी आणि विषयाचे ज्ञान यामुळे ते देखील विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय आणि विद्यार्थ्यांचे आदरणीय असे होते .यांचा माझा विशेष काही परिचय झाला नाही .कारण बायोलॉजी साठी मला विशेष अभ्यास करायचा नव्हता .मात्र कधीही कॉलेज बाहेर जरी भेटले तरी नेहमी हसत व गप्पा करीत .डॉक्टर वरूटे , पुढे बॅ. पी.जी .पाटीलांच्या प्रमाणेच शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले .आणि तेथूनच निवृत्त झाले. दुर्दैवाने सुमारे 65 व्या वर्षीच त्यांचेही निधन झाले आणि एक उत्कृष्ट शिक्षणतज्ञ महाराष्ट्राने गमावला .

डॉक्टर आप्पासाहेब वरूटे. आमचे BIOLOGY  विषयाचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक .पुढे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले.

बाॅटनी विषयाचे डाॅ.चव्हाण सुद्धा भाऊरावांच्या कामाने प्रभावित होऊन तेथे आले होते नुकतीच पीएचडी संपवून सातारच्या कॉलेजात वनस्पतिशास्त्र (Botany) विषय शिकवीत. डॉक्टर वरूटे यांच्या खात्यातच तेही काम करीत. तिथे आले होते पहिल्या वर्गात एमएस्सी झाले होते. अतिशय  कमी पण मार्मिक बोलणारे चव्हाण सर ,सोप्या सोप्या उदाहरणांनी  वनस्पतीशास्त्र विषय रंजक करून शिकवीत असत.

     रसायन शास्त्र उर्फ केमेस्ट्री या विषयासाठी श्रीयुत शेख हे एक उत्साही  प्राध्यापक होते.आमच्याकडे येण्यापूर्वी ते कोल्हापुरातील कॉलेजात प्रोफेसर होते.आमच्या कॉलेजात प्रमोशन घेऊन ते आले होते हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून त्यांची नेमणूक होती. अत्यंत सुंदर मराठी बोलत असत. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषा वरउत्तम प्रभुत्व असल्यामुळे  विषय  स्पष्टीकरण देताना व मुलांना समजावताना  सोपे जाई. मुलांच्या विषयी खूप कळवळा असलेले व प्रत्येकाला विषय समजल्या नंतरच पुढे जाणारे असे आमचे शेख सर होते.माझ्यावर त्यांची विशेष मेहेरनजर होती. कारण एकदा त्यांनी ‘सल्फ्युरिक ॲसिड’,(SULFURIC SCID )या विषयावर,एक छोटा निबंध लिहिण्यास सांगितले होते.माझ्या निबंधाची सुरूवातच मी, 

  ” जर, जगातील सर्व रसायनांचे एक साम्राज्य आहे अशी कल्पना केली व विविध रसायने ही त्या राज्यातील त्यांच्या उपयोग आणि महत्तवानुसार, गरीब ,श्रीमंत ,सरदार ,उमराव, अशा प्रकारचे नागरिक म्हणून समजली गेली, तर सल्फ्युरिक आम्ल हे या साम्राज्याचे अनभिषिक्त सम्राट आहे, असेच समजावे लागेल”, 

 अशा सुरुवातीनंतर या  आम्लाच्या  उपयुक्त ते चा  परामर्श घेऊन, ते नसेल तर  या  शिवाय  संपूर्ण रसायनशास्त्र कसे  निष्प्रभ ठरते याचा परामर्श घेतला होता . सरांना शेखर सरांना माझा निबंध खूप आवडला व सर्व वर्गात तो वाचून दाखविला होता मला शाबासकी दिली होती .तेव्हापासूनच मी प्रोफेसर शेख यांचा आवडता विद्यार्थी झालो होतो.

   आमचे इंग्रजीचे प्राध्यापक प्रोफेसर अब्दुल गणी सत्तार हेदेखील एक मुसलमान गृहस्थ व अण्णांचाच्या कृपाछत्राखाली शिक्षण घेतलेले असे गृहस्थ होते. त्यामुळे त्यांनीदेखील  परदेशात शिक्षण घेऊनही  ही इतर कोठे न जाता अण्णांच्या  सेवा कार्यात झोकून दिले होते. आम्ही प्रथम वर्षात असताना ते निवृत्तीच्या  वयांत  आले होते. शिकवण्याचा उत्साह जबरदस्त होता.त्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व नक्कीच होते तरीही शिकवण्याची एक विशेष हातोटी होती आपल्या नाट्यमय बोलण्याने व अभिनयाने ते विषयाचे स्पष्टीकरण व मर्म उलगडून दाखवीत त्यामुळे यांचा तास नेहमीच हलकाफुलका रंजकतेने भरलेला, वेळ पटकन निघून जाई.

      कॉलेजच्या पहिल्या वर्षाला प्री डिग्री वर्ष म्हणून संबोधले जाई.परीक्षाही यूनिवर्सिटी ची असे. अर्थशास्त्र हा देखील आम्हाला एक विषय त्यावेळी होता.त्या विषयाचे प्राध्यापक बी के पाटील हे देखिल विद्वान गृहस्थ. ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ मध्ये पदवी घेऊन, लंडनमध्येच काही काळ सेवा करून ,अण्णा वरील निष्ठेमुळे, रयत शिक्षण संस्थेत आले होते. वास्तविक त्या काळी नव्हे, तर आजही, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स चा पदवीधर, जगात कोठेही खूप बहु मानाचे पद भूषवतो.  1960 सालांत,हा माणूस, ते सगळे बहुमान सोडून साताऱ्याला आला.परदेशांतअनेक वर्षे असल्यामुळे ,त्यांचा  पेहराव संपूर्ण परदेशी. सुट, बुट  टाय ,घालून वर्गात येत.  झुपकेदार मिशा करडा चेहरा त्यामुळे प्रथमदर्शनी जरी थोडे रागीट व गंभीर वाटत असले तरी मनाने खूप प्रेमळ व मोकळ्या स्वभावाचे होते. विनोदी होते. स्थानिक भाषेतील व ग्रामीण  लोकांची  नावे घेऊन  सिद्धांत  सोपा करून सांगत. ढेबेवाडी हे गांव, तेथील रहिवासी धोंडीबा त्यांच्या प्रत्येक उदाहरणात अनिवार्य होते.त्यांचा व माझा असा विशेष परिचय होण्याचे काही कारण नव्हते.  उच्च पगाराच्या अनेक मोठ्या संधी सोडून कर्मवीरांच्या या समाजपयोगी कामांत झोकून देणारे,प्रोफेसर बी के पाटील किती महान होते.

आमचे केमिस्ट्री विषयाचे डेमोनस्ट्रेटर, श्री रायकर ,अतिशय काटेकोर,वक्तशीर आणि आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते.मूर्ती लहान पण कीर्ती महान असे त्यांचे वर्णन करता येईल.प्रॅक्टिकल च्या वेळी प्रत्येक विद्यार्थ्याला अतिशय सुस्पष्टपणे सूचना देऊन कोणाच्याही काहीही शंका असल्यास ते वैयक्तिक लक्ष देऊन स्पष्ट करीत असत. त्यांची आठवण त्यांच्या काटेकोरपणा व विद्यार्थ्या बद्दल असलेल्या आस्थे मुळे नेहमी येते.केमिस्ट्री विषयात, मूल्यमापनाची,सूक्ष्मता लागते .त्यासाठी खूप संयम व  कष्ट घ्यावे लागतात . रायकर सरांकडे  त्याची कमी नव्हती. म्त्यांचे  काम अतिशय  तंतोतंत व  चोख असे. आमच्याकडून ही त्यांची तीच अपेक्षा असे .

  श्रीयुत काकतकर हे आमचे फिजिक्स चे लेक्चर कम डेमोनस्ट्रेटर होते. या विषयात माणसांची वानवा असल्यामुळे काकोडकर साहेब हे वर्गात शिकवणे व प्रयोगशाळेत ही ही सूचना देणे प्रयोग समजावून सांगणे इत्यादी कामे करीत. डॉक्टर बी एस पाटील यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे प्रोफेसर अडके व व प्रा.काकोडकर हे दोघे फिजिक्स प्रयोगशाळेचा, लेक्चरचा सर्व भार उचलीत असत.काकोडकर गोव्याचे असल्याने सहाजिकच गाणे बजावणे त्यांच्या रक्तातच होते त्यामुळे  तासांमध्ये थोडा तरी वेळ काढून फिजिक्सच्या वृक्ष विषयांमध्ये थोडी गम्मत जम्मत म्हणून, एखाद्या नाट्यगीत अथवा एखादे सिनेसंगीत आई कविता  ऐकवीत  त्यावेळी क्लासरुमचे दरवाजे  बंद करून घेण्याची ताकीद असे . चोरीचा मामला  गुपचूप बोंबला असाच मामला असे . त्यांचे शिकवणे जरी बेताचे  असले तरी या करमणुकीच्या कार्यक्रमामुळे त्यांची वाट बघत असू. या काकतकर साहेबांमुळे घडलेल्या गमतीदार प्रसंगाची आठवण आजही येते. आमच्या Physics  प्रॅक्टिकल्स म्हणजे प्रात्यक्षिका वेळी ही गंमत झाली.दोन तासाचे हे प्रॅक्टिकल असे या वेळेत पदार्थविज्ञान शाखेतील अनेक प्रयोग प्रत्यक्ष करावे लागत आणखी कॉलेज नवीनच सुरू झाले असल्यामुळे लागणाऱ्या सामानांची व उपकरणांची वानवाच होती. वर्गातील पाच मुली एकत्रितपणे एक गट करून काम करीत. बाकीच्या 50 विद्यार्थ्यांचे दहा दहा प्रमाणे प्रत्येकी असे पाच गट होते हे काकतकर साहेब दोन तासात पैकी जवळजवळ एक तास मुलींनाच व्यवस्थित स्पष्टीकरण देण्यात घालवीत असत. त्यामुळे उरलेल्या एक तासात पाच गटांना दहा-बारा मिनिटे प्रत्येकी अशा तऱ्हेने वाट्याला येत. आमची खूपच कुचंबणा होई  आमच्या वर्गातील काही शूरविरांनी एक दिवस पाच-सहा लोकांचे एक शिष्टमंडळ प्रोफेसर अडके  यांच्याकडे नेले व त्यांनी काकतकर सर मुलांच्या बाबतीत कशी पार्शलिटी करतात, आम्हाला फक्त दहा-पंधरा मिनिटात प्रयोगाचे स्पष्टीकरण देतात, त्यामुळे आम्हाला विषय नीट समजत नाही वगैरे तक्रार केली.प्रो.अडके मोठे विनोदी गृहस्थ होते..आडके साहेब आम्हा मुलांना म्हणाले,” अरे ,तुम्ही पदार्थविज्ञान शास्त्रात चुंबकीय आकर्षणाचा नियम शिकलात की नाही?विरुद्ध धॄव( Poles), एकमेकांना आकर्षून घेतात व समान ध्रुव  एकमेकांना विकर्षित करतात,बरोबर ना?  मुलींच्या कडे असलेला चुंबक  या काकोडकर सारख्या लोखंडाला आकर्षून घेतो,!! आम्ही काय समजायचे ते समजलो,, हंसत ह॔सत निघून गेले. मात्र काही दिवसांनी काकतकर यांना,अडके कडून,योग्य ति समज मिळाली व काकतकर सर मुलांनाही योग्य वेळ देऊ लागले, मुलां कडे जास्त लक्ष देऊ लागले  

      इतर ही अनेक गुरुजन  त्यांच्या क्षेत्रात विद्वान ,कार्यक्षम, व उच्च विद्याविभूषित होते. परदेशात शिकून आले होते.या सर्वांच्या मनामध्ये एक आदर्श शी तत्त्वनिष्ठा होती आणि ती म्हणजे भाऊराव पाटलांच्या या या पवित्र अशा ज्ञानदानाच्या कार्यामध्ये आपला थोडासा तरी हातभार लागावा मागे सांगितल्याप्रमाणे यातील बहुतेक प्राध्यापक तर भाऊरावांच्या कृपाछत्र हल्लीच वाढले होते त्यामुळे त्यांचा सहभाग तर अपेक्षित होता पण पण तो नसतानाही प्रोफेसर बी एस्-पाटील अथवा डॉक्टर वरुटे यासारखी मंडळी केवळ भाऊराव अतिशय आदर्श व अद्वितीय असे काम महाराष्ट्रात करून राहिले आहेत त्यामुळे अशा कामासाठी बाकीच्या सर्व सुखसोयी युवा चांगले वेतन सोडून आपण येथे योगदान दिले पाहिजे या पवित्र भावनेने तेथे आली होती आणि त्यामुळे प्रसंगी घरी यांच्या शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्ये अथवा त्यांच्या विशिष्ट विषयातील ज्ञानामध्ये थोडी कमतरता भासत असली तरी अंतरीचा जोगाळा त्यांच्या कडे होता आणि आम्हा विद्यार्थ्यांबद्दल जो प्रेमा त्यांच्या मनी दाटत होता त्यामुळे या सगळ्या मंडळींचे शिकवण आम्हाला खूपच नाही झालं आणि आजही त्यांची आठवण आम्ही काढतो आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण व शिक्षका बद्दल बोलताना एक सुंदर वाक्य सांगितले आहे, ते म्हणतात, 

  The importance of education is not only in knowledge and skills,but is to help us,to live with others.

   आज  माणूस आणि समाज एकमेकापासून तुटत चालला असताना हा विचार किती मोलाचा आहे. त्यांनी शिक्षक व शिक्षण यांचा एक आदर्श राजपथ तयार केला आहे .प्रत्येक शिक्षकाने सुशिक्षित, सुसंस्कृत, विज्ञाननिष्ठ असा भारत घडविण्याचे स्वप्न पाहिले तरच डॉक्टर राधाकृष्णन यांच्या म्हणण्याला आपण न्याय दिला असे होईल. आणि त्या अर्थाने ,माझे सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयांतील शिक्षक, खरोखर आदर्श होते. भले  त्यांचे जवळ  सुविधा  साधनसामुग्री यांची  कमतरता होती. जे होते  त्याचा योग्य वापर करून त्यांनी  आम्हा  विद्यार्थ्यांना  भावी आयुष्यात,डॉक्टर राधाकृष्णन यांचा,

“TO HELP US TO LIVE WITH OTHERS”

हा मंत्र  अंगी बाणवला.त्यामुळे आम्ही आयुष्यात जे काही उपलब्ध होईल त्याचा उपयोग करून त्याच समाधान मानून आयुष्याचा उपभोग आनंदाने कसा घेता येईल हे पण शिकलो.

  हे सर्व शिक्षक केवळ अध्यापन  न राहता, आमचे मार्गदर्शक व प्रसंगी समुपदेशक देखील झाले. असे म्हटले जाते ही शिक्षक जितका विनयशील व व्यासंगी, तितका विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर व विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून मिळणाऱ्या प्रेरणेवर ,अधिक परिणाम होत असतो. शिक्षणाच्या पद्धती कितीही बदलल्या, शिक्षणाचे अभ्यासक्रम कितीही बदलले,तरी संस्कारक्षम शिक्षकांचे महत्त्व हे आजही ही आहे, काल ही होते ,भविष्यात ही ते राहणार आहे.खरा शिक्षक हा केवळ पुस्तकी धडे शिकवणारा अध्यापक नाही. तो एक शिल्पकार आहे. कलावंत आहे .प्रसंगी पालकांची जबाबदारी  पेलणारा आहे. आमचे सातारा महाविद्यालयातील अध्यापक हे खऱ्या अर्थाने असे आदर्श   शिक्षक होते. म्हणून आजही त्यांची आठवण आहे या शिक्षकांमध्ये एक महत्त्वाचे नाव मी मुद्दामच शेवटी घेत आहे.ते आहेत प्रोफेसर एस ए पाटील!त्यांचे  विषयी थोडे विस्तृत लिहीत आहे.

 कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी समोर, त्यांचा आणि सौ लक्ष्मीबाई पाटील यांचा पुतळा. ‘अजिंक्यतारा’ किल्ल्याच्या  पायथ्याशी,चार एकराच्या भव्य परिसरात हे पावन ठिकाण 

    छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये जेव्हा मे 1959 साली मी, प्रथम वर्षाला दाखल झालो तेव्हा मागे सांगितल्याप्रमाणे,कॉलेजला नुकतीच सुरुवात झाली होती. प्रयोगशाळा इतर सं साधने याप्रमाणेच प्राध्यापक वर्गही अपुराच होता.गणितासाठी आम्हाला ऑगस्ट महिन्यापर्यंत कोणीच नियमित प्राध्यापक नव्हते.असेच कोणीतरी पदार्थविज्ञान अथवा रसायनशास्त्राचे प्राध्यापक वेळ मारून नेत होते. ‘थोड्याच दिवसात गणितासाठी अध्यापक येत आहेत’, अशी बातमी होती. त्यांचे नाव जरी आम्हाला कळले नव्हते तरी,’एक हुशार व पदवी-पदव्युत्तर  परीक्षांत उत्तम यश संपादन केलेली व्यक्ती, गणितासाठी प्राध्यापक म्हणून येणार आहे ‘,अशी बातमी आम्हाला कळली होती त्यामुळे आम्ही खूप मोठ्या उत्सुकतेने नव्या प्रोफेसरांची वाट पाहत होतो.जेव्हा प्रोफेसर शिवगोंडा  पाटील ,कॉलेजात पहिल्या दिवशी आम्हाला गणिताच्या तासावर आले, तेव्हा त्यांना पाहून आम्ही विद्यार्थी थोडे निराश झालो. अतिशय सामान्य असे त्यांचे बाहेरून दिसणारे व्यक्तिमत्व होते जेमतेम पाच फूट उंची,अगदीच किरकोळ म्हणावी अशी शरीरयष्टी, मिसरूड हि फुटलेले नाहीअशी चेहरेपट्टी, अर्ध्या बाह्यांचा बुश शर्ट,ढगाळ पॅन्ट आणि पायात साध्या वहाणा.डॉक्टर बाहेरून व्यक्तिमत्व असे  आकर्षक  वाटत नसले तरी त्यांच्या सौम्य हळूवार बोलण्यातून,आंत दडलेलं  एक  सज्जन, प्रेमळ,निरागस, व्यक्तिमत्व मात्र  जाणवत होतं. डाॅ.वरुटे डॉ.बी एस पाटील, यासारख्या रुबाबदार प्रोफेसरांशी तुलना करता, हे पाटील सर अगदीच साधे वाटत होते.इंग्रजी बोलणे ही तेवढे सफाईदार नव्हते. चेहऱ्यावरील नेहमीचे स्मित आणि प्रतीत आत्मविश्वास ,ही त्यांची जमेची बाजू वाटली. पहिल्याच दिवशी त्यांनी जेव्हा आपली ओळख करून दिली ,त्यावेळी पुणे विद्यापीठात एम एस सी परीक्षेत पहिला वर्ग व सुवर्णपदक मिळवून ही व्यक्ती, केवळ कर्तव्यबुद्धीने, कर्मवीरांच्या महायज्ञात आपल्याही  समिधा टाकण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन, येथे आल्याचे समजले. इतरत्र चांगली नोकरी अथवा शिष्यवृत्ती मिळवून परदेशी जाणे हा, उद्योग सोडून ते येथे का आले याचा  आम्हाला ऊलगडा झाला. ते बेळगाव निपाणी या कर्नाटकातील भागाचे रहिवासी होते  त्यामुळे  कानडी  ही मातृभाषा होती . मराठी सुद्धा छान बोलत . पुढे हळूहळू त्यांच्या  जीवनाचा एक एक एक पैलूही उलगडत गेला.घरची अतिशय गरिबीची, शिक्षण घेण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती.  स्काॅलरशिप  व  खडतर कष्ट या भांडवलावर त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. उज्वल यश मिळवले.भाऊरावांची कीर्ती कानावर आल्यानंतर, आपल्यासारख्या, शिक्षणासाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीतरी मदत व्हावी,या उदात्त हेतूने ते सातारा महाविद्यालयात हजर झाले होते. स्वतःबद्दल ते कधी जास्त बोलत नसत.मात्र कधीतरी वर्गाबाहेर, आम्हा विद्यार्थ्यांना, कष्टाचे महत्त्व सांगताना,त्यांच्या जीवनाची पार्श्वभूमी कळे. त्यांच्या पहिल्या तासाचे शिकवणे अगदीच सामान्य वाटले कानडी वळणाचे इंग्रजी उच्चार व शिक्षकी पेशाचा अनुभव नसल्याने असलेले ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात ते कमी पडत होते. शिक्षक तर आले पण अभ्यास कसा होणा,या चिंतेत आम्ही पुन्हा पडलो. त्यावेळी पुणे विद्यापीठाची प्रथम वर्षाची परीक्षा विद्यापीठाकडून घेतली जाई.  गणिताचा  अभ्यासक्रम  बराच मागे पडला होता. सर शिकवितात तेही नीट आकलन होत नव्हते .पहिल्या वर्षी  गणिताच्या पेपरात,कॅलक्युलस(Calculus) ट्रिग्नोमेट्री(Ttivnometry),आणि भूमिती(Geometry), मिळून हा विषय होता.आम्हाला अकरावीत देखील या विषयांचा गंध नसल्याने, विषय समजावून घेताना खूप वेळ लागत असे. पाटील सरांची सुरुवातीची लेक्चर्स थोडीशी गोंधळून टाकणारी व विषय सोपा वाटण्याऐवजी आणखीनच कठीण वाटावा अशी होती.त्यांचे इंग्रजी समजणे थोडे कठीण जात होते. ते भरभर बोलत आणि उच्चारही तेवढे स्पष्ट येत नसत.एकदा गंमत झाली. मला वाटते दहा-बारा दिवस झाले असतील .असाच सरांनी मुलांना नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला, ‘Do u follow me?’. बहुतेक वेळा आम्ही सवयीने ‘हो’,म्हणून माना डोलावत असू किंवा,’आपण पुन्हा सांगाल तर ठीक ‘,असे सांगत असू. एक दिवशी मात्र  गंमतच झाली  एका मुलाच्या संयमाचा बांध फुटला असावा.  सरांनी नेहमीप्रमाणे ,”डू यू फोलो मी”?  असे विचारतात  त्याने बोट वर करून  उभा राहिला  व म्हणाला

  “सर,आय अम नोट फॉलोविंग यु बिकॉज  युवर  इंग्लिश इस व्हेरी पॉवर्फुल!” 

वर्गात एकदम अशा विकला व आता सर काय करणार याची उत्कंठा .त्या दिवशी, ‘चेहरा पडणे म्हणजे काय’, त्याचे प्रात्यक्षिक मुलांना पहावयास मिळाले. सर थोडे खजील झाले. त्यांची चूक त्यांना कळली असावी. तो प्रसंग खिलाडूपणे घेऊन ते म्हणाले, “ठीक आहे, आय एम सॉरी, याच्यापुढे मी तुम्हाला थोडे सावकाश शिकवण्याचा प्रयत्न करीन”. त्या मुलाला कोणतीच शिक्षा वगैरे न करता, बसण्यास सांगितले. खरोखरच पुढील तासापासून ते अगदी सावकाश व उच्चार शक्यतोवर स्पष्ट करीत विषय शिकवू लागले. आम्हालाही आता विषय व्यवस्थित समजू लागला  व  गणिताची भीती खूप कमी झाली .माझी व त्यांची ही छान जान पेहचान झाली.त्यावेळी  पहिल्या आमच्या वर्गात एस एस सीला सर्वात जास्त मार्क मिळवणारा व गणितात  100 पैकी 100 गुण मिळविणारा मी विद्यार्थी होतो.  असे असूनही मी मुंबई पुण्याची कॉलेज सोडून साताऱ्यास का आलो, याचे कारण जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांनाही माझ्याविषयी खूप आस्था,वाटू लागली.

      पाटील सर आमच्या वसतिगृहाच्या परिसरातच एका खोलीमध्ये,एकटेच राहत.सडेफटिंग होते.  त्यांना शिकवणे हळू करावे लागले होते, आधीच उशीर झाल्यामुळे अभ्यासक्रम खूप मागे पडला होता . वार्षिक परीक्षेपर्यंत अभ्यास क्रम पूर्ण होईल का  याची त्यांनाही चिंता वाटू लागली .त्यांनी कॉलेज संपल्यावर आमच्यासाठी काही खास स्पेशल वर्गही घेणे सुरू केले. एवढेच नव्हे तर काही वैयक्तिक अडचणी असतील तर, कधीही टीचर  रूम मध्ये जाऊन त्यांना विनंती केल्यास ते त्या विद्यार्थ्याला तो विषय ती समस्या सोडवून सांगत. आम्ही वसतिगृहात राहत असल्यामुळे व त्या परिसरातच त्यांचे निवासस्थान असल्याने रोज सकाळी साडेपाच सहाच्या सुमारास हातात कंदील घेऊन ते आम्हा विद्यार्थ्यांच्या खोलीवर टक् टक्  आवाज करून,चक्क आम्हाला उठविण्याचे ,वॉचमन चे काम, करू लागले.. रोज सकाळी साडेपाचच्या सुमारास दारावर टक टक आवाज आला म्हणजे प्रोफेसर पाटील आम्हाला जागवण्यासाठी आले हा नियम झाला. पुढे आम्हालाच आमची लाज वाटू लागली व सर येऊन आम्हाला उठवण्याचे आधीच आम्ही उठून तोंड धुऊन ,कंदील लावून ,तयारीत राहात असू. हो, त्यावेळी विजेचे बल्ब नव्हते ,रॉकेलच्या क॔दीला वर आमचा अभ्यास होई. खरे तर आमचे वसतिगृह व्यवस्थापक ही आमचे बरोबर रहात पण त्यांनी याबाबतीत काही आस्था दाखविली नाही..त्या सकाळच्या राम प्रहरी मिळणारे गणिताचे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त होऊ लागले. . संध्याकाळी  किंवा रात्रीचे वेळी  आम्ही जेव्हा लायब्ररीमध्ये अभ्यासाला जात असू  त्यावेळी हे गृहस्थ  लायब्ररी चे बाहेर  एका दगडावर बसून , कोणाला  मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर तेथेही हजर होत. दिवसा वर्गांत शिकविणे, पहाटे आमच्या वसतिगृह  रूमवर येऊन  जागवणे, आणि रात्री आम्ही  लायब्ररीत गेलो असताना, तिकडे ही   आवश्यकता असल्यास मार्गदर्शन करण्याची  त्यांची तयारी होती.  फक्त झोपेची वेळ सोडली  तर  बाकी सर्व वेळ त्यांनी आम्हा मुलांना  तनमनधनाने वाहून घेतले होते. आणि त्यामागे होती एक तळमळ, एक ध्यास,आईची ममता .आम्ही आमच्या विषयात मागे पडू नये, उज्वल यश मिळवावे  ही  सदिच्छा !मुलांच्या विषयी खरी आस्था व लागण असलेला  प्राध्यापक च एवढे करू शकतो.आम्हाला गणित विषयांमध्ये एक  गोडी निर्माण झाली. ज्या विषयांत  परीक्षेत पास तरी होता येईल का  अशी धास्ती वाटत होती  त्या विषयात रुची निर्माण होऊन आम्ही आमचा अभ्यासक्रम चांगल्या रीतीने ,दिलेल्या मुदतीत पूर्ण केला.  मी त्यावेळी गणितात चांगले गुण मिळवले.पाटील सरांना खूपच आनंद झाला.  दुसऱ्या वर्षी  इंटरसायन्स च्या  वर्गात गेलो. पाटील सरांचे आम्हाला तेथेही अधिक मार्गदर्शन मिळाले. दुसऱ्या वर्षाच्या  परीक्षेला  फ्री प्रोफेशनल परीक्षा असे नाव होते  सरांच्या विषयात जरी चांगले मार्क मिळाले तरी एकूण  परीक्षेत समाधान कारक  गुण न मिळऊ शकल्याने  मी  इंजीनियरिंग  विषयाकडे जाण्याचा  विचार  काढून टाकला. मी सातारा कॉलेज सोडले.  मुंबईतील  महाविद्यालयात  बीएससी  हा  अभ्यासक्रम करण्यासाठी दाखल झालो.  तो  एक स्वतंत्र विषय आहे. त्यावरही मी लिहिणार आहे . प्रोफेसर  शिवगोंडा पाटला विषयी म्हणूनच मला विस्तृतपणे लिहिण्याची गरज भासली.  त्या दिवसांत  हातात कंदील घेऊन   मुलांसाठी ‘जागल्या”चे  काम करणारा हा प्रोफेसर ,आमच्यासाठी खऱ्या अर्थाने एक देवदूतच होता !त्यांनी केवळ इंग्रजी शिकवले नाही ,’आयुष्यात  तुम्ही कितीही मोठे असा ,दुसऱ्याला  आपले  ज्ञान ,आपले धन,  आपले विचारवाटण्यांत  खरा मोठेपणा आहे’ हा धडा आपल्या उदाहरणाने शिकविला! गुरुवर्य शिवगोंडा पाटील, माझ्या महाविद्यालयीन शैक्षणिक कालांतील, एकमेवाद्वितीय असा गुरू आहे. आयुष्यातील एका अवघड वळणावर अगदी योग्य वेळी एस ए पाटील सर माझ्या आयुष्यात आले. महाविद्यालयीन शिक्षणाचे ते पहिलेच वर्ष होते. एका कठीण विषयाचा अभ्यास करावयाचा होता. परीक्षाही विद्यापीठाची होती. घरा,माणसापासून खूप दूर होतो. कोणाचा आधार नव्हता. काम करून शिक्षण घ्यावयाचे होते. अनेक प्रश्नांची गुंतागुंत होती. या परिस्थितीत,यदाकदाचित परीक्षेत अपयश आले असते, तर माझ्या सर्व शिष्यवृत्या  बंद झाल्या असत्या. पुढील शिक्षणाचा विचार तेथेच सोडून द्यावा लागला असता. हा सर्व विचार जेव्हा आज करतो केव्हा प्रोफेसर पाटलांची त्या दिवसांतील वसतीगृहातील उपस्थिती व त्यांनी दिलेले मार्गदर्शन हे अनमोल आहे. मला त्यांची आठवण आजही आहे, व पुढेही राहील. मला वाटते, 4ते5 वर्षे ते साताऱ्याच्या कॉलेजमध्ये शिकवत होते.पुढे त्यांनी आपला मार्ग बदलला. नंतर कळले ते असे की ,पाटील सर अमेरिकेत गेले .त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. अमेरिकेतील  एका  प्रसिद्ध विद्यापीठात त्यांनी डॉक्टरेट केली.  पुढे हार्वर्ड किंवा तत्सम  ख्यातनाम  विद्यापीठात  त्यांनी  प्राध्यापकी ही केली.  माझ्या त्या माहितीला  आधार काही नाही. कारण आज त्यांचे विषयी काही माहिती देणारी व्यक्ती कोणीच नाही.ते काहीही असो  आपली  गुणवत्ता,  बुद्धिमत्ता, कष्ट करून शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यासाठी  खर्च व्हावी, या  उदात्त हेतूने,आमच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात, थोड्या वर्षासाठी येऊन,  आम्हा विद्यार्थ्यांना उपकृत करून जाणाऱ्या,  प्रोफेसर  पाटलांचा  भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल होता.  ते कोठेही असोत, आनंदात सुखासमाधानात असतील  ही  खात्री आहे आणि परमेश्वराला तशी प्रार्थनाही आहे .मी एक गोष्ट मोठ्या गर्वाने व  गमतीने सांगत असतो. हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्याची माझी औकाद नव्हती. मात्र ज्या प्राध्यापकाने हार्वर्डमध्ये शिकवले,त्याच प्राध्यापकाने मलाही एकेकाळी शिकवले अगदी माझ्या  वस्तीगृहात येऊन शिकवले  हे   केवढे महान भाग्य!!..डॉक्टर पाटील आज कुठे हीअसोत  त्यांना माझा विनम्र प्रणिपात.

      साताऱ्याचे कॉलेज सोडले.मुंबईस आलो. दहा वर्ष महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. यु डी सी टी. मधून तंत्र विज्ञानाची पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले. व्यवसाय,नोकरीत रममाण झालो. साताऱ्याची आठवण होती. मात्र तेथे जाण्याचा योग येत नव्हता.सेवानिवृत्तीनंतर, साताऱ्यात एकदा जावे ,माझी वसतीगृहाची ती खोली पहावी, माळरानावरील कॉलेज, तेथील ती लायब्ररी,  ज्या मोठ्या दगडावर बसून पाटील सर आम्हाला रात्रीही मार्गदर्शन करीत त्या दगडाला, तो अजून तेथेअसेल तर, वंदन करून यावे, असे तीव्रतेने वाटू लागले. तो योग  चार वर्षांपूर्वी अचानक आला. आम्ही  दोघे, व अण्णा,-अण्णी, अशा चौघांनी, कांसचे पठार ,valley of flowers,पाहण्यासाठी एका  सहल कंपनीतर्फे  जाण्याचे ठरविले. मुंबईहून निघून  पहिला रात्रीचा मुक्काम सातारा शहरात होता.मात्र पहिल्या दिवशी सज्जनगड ठोसेघर धबधबा इत्यादी पहातांना उशीर झाल्याने ,मी माझे कॉलेज पाहण्यास जाऊ शकलो नाही. मात्र सुदैवाने दुसरे दिवशी साताऱ्याच्या गोडोली नाक्यावर,आमची प्रवासी बस कंदी पेढे घेण्यासाठी थांबली असताना  मी आयोजकांना विनंती करून दहा मिनिटे मागून घेतली .या नाक्यापासून अगदी थोड्या अंतरावर, आमचे कॉलेज आहे हे आठवले.मात्र तेथे एवढ्या कमी भाड्यासाठी जाऊन येण्यास कुणी रिक्षावाला तयार होईना.शेवटी दुप्पट भाडे देण्याच्या बोलीवर एक रिक्षावाले सज्जन तयार झाले.  सुमारे पाच मिनिटात कॉलेजचे मुख्य प्रवेशद्वार दिसले.तेथेच पहिला आश्‍चर्याचा धक्का बसला. पूर्वी कॉलेजला प्रवेश द्वार असे नव्हतेच.सर्व खुल्ला मांमला.मी बाजूच्या छोट्या द्वाराने आत शिरलो. माझी नजर शोधत होती ..आमचा जुना , पत्र्याचे छप्पर असलेला लेक्चर हॉल..पडवी मधली आमची  लहान प्रयोग शाळा, त्यावेळचे दोन-तीन खोल्यांचे कार्यालय, …प्रिन्सिपल  पी जी पाटील साहेबांची खोली,.. मध्यभागी असलेल्या मैदानात आता कर्मवीर भाऊरावांचा सुंदर पुतळा बागेत उभा होता .त्यांच्या पुतळ्याला वंदन करून मी थोडा पुढे गेलो ..लायब्ररीची इमारत अजून त्याच जागी,मात्र एका प्रशस्त इमारतीच्या तळमजल्यावर होती. समोरील मैदानात नवीन बांधकाम चालू होते. मात्र मैदानाच्या कडेला असलेला तो पत्थर अजूनही तेथेच होता.. तो दुनियेसाठी  असलेला पत्थर  माझ्यासाठी  विक्रमादित्याचे सिंहासन होते , ज्यावर आमचे प्राध्यापक एस ए पाटील रात्री बसून ,अर्ध्या प्रकाशात आम्हाला मार्गदर्शन करीत. मी धावत,धावत तेथे गेलो.. त्या दगडावर माथा टेकवला .. थोडीशी माती उचलून पुडीत बांधली.. गंमत म्हणजे रिक्षावाले भाऊ हे सर्व मोठ्या विस्मयाने पहात होते.. ह्या दगडाला वंदन करून मी परत मागे वळलो, कारण वेळेचे भान ठेवावयाचे होते.. बस जवळ रिक्षातून उतरलो.. बायको बस खाली उतरून माझी आतुरतेने वाट पाहत होती झालेल्या भाड्याच्या दुप्पट पैसे मी रिक्षा वाल्या च्या हातावर टेकवले तर त्या भल्या माणसाने पैसे घेण्याचे नाकारले एक दोन मिनिट आमची हुज्जत चालू होती. शेवटी माझा पराभव झाला कारण रिक्षावाले मला म्हणाले.. ” सर तुम्ही एवढ्या लांबून माझ्या गावी आलात,  त्या गेल्या दिवसांच्या आठवणीने तुमच्या डोळ्यात अश्रू आले.. माझे भाडे मिळाले… पुन्हा मुंबई जाल ,तेव्हा कॉलेजच्या आठवणी बरोबरच माझीही आठवण ठेवा..”, एवढे सांगून तो  भला माणूस भर्रकन निघून गेला..  माझ्या कॉलेजच्या आठवणी बरोबर तो रिक्षावालाही आता माझ्या स्मरणात कायमचा राहील.. मला खूप खूप समाधान वाटत होते .साठ वर्षांनी कर्मवीरांच्या पावनभूमी ला पुन्हा वंदन करता आले.  एस ए पाटील सरांच्या च्या “सिंहासना” खालील थोडी माती  जमा करता आली.. तो परिसर आज नखशिखांत बदलला आहे. कदाचित माझे जुने वस्तीगृह देखील बदलले असेल. कधीनाकधी तेथेही जाण्याची माझी इच्छा आहे. परमेश्वर ही इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना आहे. अजिंक्यतारा किल्ल्या जवळून जाताना कर्मवीरांच्या त्या पवित्र स्मारकाला वंदन केले मात्र पुन्हा एकदा साताऱ्याला निवांतपणे जाऊन माझ्या वसतिगृहाची ही खोली अजून असल्यास पाहून यावी एवढी मनीषा आहे.

        भारताच्या इतिहासात,ज्यांनी आपल्या विचारांमधून आणि कृतीमधून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणले ,आणि त्यांच्या विचारांची व कृतीची  परिणीती,  सामान्यजनांचा जीवनस्तर उंचावण्यात  झाली,अशा थोड्याच महाजनामध्ये आमचे आचार्य भिसे  चित्रे ,पद्मभूषण ताराबाई मोडक आणि कर्मवीर भाऊराव पाटील ही मंडळी निश्चित आहेत. माझे सौभाग्य अशा या विभूतींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहवास मिळाला. त्यांचे आशीर्वाद मिळाले. आमच्या देशाची  दिसणारी आजची  सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील भरारी  या  महर्षींच्या  निरलस  सेवे मुळेच  शक्य झालेली आहे  हे मान्य करावे लागेल. अशा महान विभूतींनी प्रज्वलित केलेल्या ज्ञानदान यज्ञामध्ये ,आपला छोटासा हविर्भाग देणाऱ्या, प्राध्यापक एस ए पाटील, प्रिन्सिपल पी जी पाटील, डॉक्टर वरुटे,डॉक्टर बी एस पाटील ,प्रोफेसर अब्दुल गणी सत्तार, प्राध्यापक बी के पाटील,व त्यांचे सर्व सहकारी  यांनी आपला खारीचा वाटा उचललेला आहे. आमचे नशीब थोर म्हणून ही माणसे आमच्या आयुष्याच्या योग्य कालखंडात आमच्या वाट्याला आली..शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनावर दूरगामी परिणाम करतात,त्यांना ध्येयनिश्चितीसाठी ,आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी, येणाऱ्या संकटांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी, सक्षम बनवितात.एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणतो. आणि आमच्या गुरुजनांनी तर्से,सकारात्मक परिवर्तन निश्चितपणे आमच्या जीवनात घडवून आणले. म्हणून आमच्यासाठी ते सदैव वंदनीय आणि पूजनीय आहेत. त्या त्यागमूर्ती नी आमच्यासाठी ज्ञानाचा,प्रेमाचा अफाट खजिना ऊघडा केला होता. शिक्षणाचा बाजार मांडून वर्षा-दोन वर्षात ‘शिक्षण महर्षी’,होणाऱ्या  आजच्या व्यवहारी जगात, शिक्षणसंस्था वारेमाप झाल्या आहेत. मात्र शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्या प्रती कणव,  या बाबी दुर्मिळ झाल्या आहेत . आजच्या या शिक्षक दिनी, माझ्या त्या प्रिय गुरुजनांचे अंतःकरणपूर्वक स्मरण करीत असताना,आम्ही त्यांचे कोणीही नसताना  आम्हाला ज्ञाना बरोबरच प्रेम, आस्था, शाबासकी आणि जीवन जगण्याचा अमाप आनंद  दिला.जीवनाला,अर्थ दिशा,व गती दिली. त्या गुरुजनांचे ऋण आठवतांना, श्रद्धापूर्वक  त्यांचे स्मरण करतो.शेवटी एवढेच सांगतो …..

           पसरला अंधार जगती, तेजाळले आम्हास त्यांनी. 

           संस्कृती ,संस्कार करूनी, घडविले आम्हास त्यांनी.

           सागरी त्यांच्या स्मृतीच्या,मनसोक्त मी पोहीन म्हणतो,

           अर्ध्य मी अर्पीन म्हणतो..,  

           ते जरी येथून गेले ,हृदयात अन् प्राणात वसती!

           गंधा परी वाहती फुलांच्या, जागेपणी स्वप्नात दिसती .

            फुल श्रद्धेचे,तयांच्या चरणावरी वाहीन म्हणतो, 

            उतराई ,मी होईन म्हणतो.

            अजून घुमती शब्द त्यांचे ज्ञानीयाच्या मुलुखातूनी.

            अमृताची धार अजुनी,अश्रूत मिळते लोचनी.

            भावल्या मूर्तीपुढे त्या ,आरती मी, गाईन म्हणतो, 

            उतराई मी होईन म्हणतो…..ऊतराई मी होईन म्हणतो. ….???

                        लेखातील प्रतिमा, सौजन्य:डॉ.सापटे, रजिस्ट्रार,रयतशिक्षणसंस्था,सातारा.