फ्रान्स पुन्हा एकदा

आयुष्य म्हणजे एक पर्यटन नाही काय? जो पर्यंत माणूस हालचाल करून आपल्या पोटा-पाण्यासाठी काहीतरी व्यवसाय वा नोकरी करतो, त्याला अनेक ठिकाणी फिरावे लागते, खूप माणसे भेटतील; आनंदाचे, दुःखाचे अनेक अनुभव घ्यावे लागतील; कधी कुणा विषयी कणव वाटेल तर कधी भय, वा क्रोध.आपण अशा मोठ्या ‘पर्यटनातून‘ अनुभव  करतो, तो, कधी व्यावसाईक, कधी सांस्कृतिक, कधी निसर्ग-पर्यटन, तर कधी साहस-पर्यटन. रोजच्या या धावपळीच्या जीवनातून काही तरी वेगळे, आनंदाचे क्षण शोधण्याचा हा प्रयत्न असतो. 

आपल्या कुटुंबाच्या सदस्यांबरोबर देशांत वा परदेशात काही दिवस घालविणे या सारखा उत्साहवर्धक अनुभव आयुष्यात घ्यावा असे प्रत्येकालाच वाटत असते. आम्ही सर्व कुटुंबीय -श्रीदत्त व त्याचे कुटुंब -स्वाती, अजय, इशा, तसेच दीप्ती -प्रशांतचे क्रिशा आणि आर्यन,- कधी तरी एकत्र येऊन फिरायचा किती वर्षापासून बेत ठरवित होतो. दादा (श्रीदत्त) राहिला अमेरीकेत, तर प्रशांतच्या फिरत्या नोकरीमुळे आज अहमदाबाद तर उद्या बेंगलोर असे चालेले! त्यामुळे २०१७ च्या एप्रिल / मे  महिन्यात फ्रान्समध्ये सर्वांनी एकत्र येऊन आठवडाभर कौटुंबीक जिव्हाळ्याचे, क्षण अनुभवावे असे ठरविले.

दीप्ती – स्वातीने या बाबतीत, ‘गुगल बाबा’ कडून बरीचशी माहिती जमा करून, तिकीटे, राहण्याची सोय, ट्रान्स्पोर्ट व सर्वच लहान-सहान बाबींचा विचार करून, छान आराखडा तयार केला!! परदेशांत एव्हढ्या कुटुंबासहीत, विशेषतः मुलांना घेऊन फिरायचे, म्हणजे हा तपशील आधीच ठरविणे जरुरीचे होते. कोणत्याच प्रवासी कंपनीची ‘मदतीची काठी’ न घेता आम्ही हा प्रवास करणार  होतो. आणि तो खरोखर उत्कृष्ट झाला. याचे श्रेय या दोघींनाच दिले पाहिजे!

पहिला फ्रान्स- पॅरीस हा १९८९ मध्ये आमच्या HPCLकंपनीच्या मार्फत, व्यावसायीक कामासाठी होता व त्यावेळी आम्ही एका नामांकित आंतरराष्ट्रीय, फ्रेंच कंपनीचे पाहुणे होतो. त्यामुळे आम्हाला कोणतीच तोशीस वा काळजी नव्हती. यावेळी मात्र सबकुछ हमे करना था व हे काम ह्या दोघींनी अगदी उत्कृष्ठ केले. 
दादाची कंपनी शिकागोहून, पॅरीसला पोहोचणार होती. तर आम्ही दोघे व चौधरी कुटुंबीय एकत्र, मुंबईहून निघून पॅरीसला त्यांना भेटणार होतो व पुढील दौरा एकत्र करणार होतो. मे महिना हा मुलांच्या सुट्ट्यांच्य़ा दृष्टीने सोईस्कर असल्याने, २०१७ च्या मे शेवटच्या आठवड्यात ही सफर सुरु केली होती!

विमान प्रवास छान झाला. मुंबईहून रात्री निघून आम्ही त्याच दिवसाच्या दुपारी पॅरीसला पोहोचलो! दादा कंपनी आमच्या आधी येऊन हॉटेलांत दाखल झाली होती. 

सर्व थकले होते, तरी सीन नदीची (Seine river) क्रुझ करणे शक्य होते. कारण, जास्त कष्ट नव्हते — विशेषतः मुलांचा उत्साह तर उतू जात होता. खूप दिवसांनी ही चार भावंडे एकत्र आली होती व ती देखील पॅरीससारख्या एका सुंदर ‘स्वप्ननगरी’ मध्ये, त्यामुळे सीन नदीची सफर गप्पा-टप्पा करण्यात व पॅरीस नगरीचे सौंदर्य, दोन्ही काठावरून पाहण्यात, एक और मजा. मला तर ‘आयफेल’ टॉवरचे दर्शन एवढ्या वर्षांनी पुन्हा झाले. (टॉवरपासून क्रुझ सुरु झाली होती), त्यामुळे गतस्मृती ढवळुन निघाल्या!

संध्याकाळची रम्य वेळ, सीनचे सुंदर नीळेशार पाणी, शांतपणे सरकणारी बोट, दोन्ही काठावर उभा असलेला फ्रान्स व पॅरीस शहराचा इतिहास, सोप्या इंग्रजीत चाललेली कॉमेंट्री – सर्व माहोल छान जमला होता! पहिला दिवस खूप मजेत गेला!

दुसरे दिवशी ‘आयफेल’ टॉवरची सविस्तर ट्रीप होती. आयफेलच्या सर्वात ऊंच मजल्यावरून पॅरीस पाहणे हा एक वेगळाच अनुभव. त्याच बरोबर एकमेकांचे फोटो काढणे व त्या स्मृती जतन करणे निराळा आनंद!    

ह्या ट्रीप मध्ये लंच देखील आयफेलच्या एका मजल्यावर असलेल्या कॅफे मध्ये घ्यावयाचे होते. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ व पेय येथे ठेवली होती, मात्र आम्ही भोजनाला सुरुवात करतो तोच सेक्युरीटी पोलीसांची फौज शिट्ट्या वाजवत तेथे आली व ‘आयफेल टॉवर’ च्या एखाद्या मजल्यावर ‘बॉम्ब’ ठेवल्याचा संशय असल्याचे सांगत, सर्वांना पटापट लिफ्टने खाली उतरण्यास सांगत होते. रंग जमत होता – तेवढ्यात ‘रंगाचा भंग’ झाला. काही वेळाने कळले ती केवळ अफवा होती. मात्र आमचा तो आनंद हिरावला गेला हे खरे!तरी ,सर्व कुटुंबासह ,ईफेल वरून ,पॅरिस नगरी न्याहाळणे,फोटो काढणे, एक अनोखा आनंद! दुपारी पॅरीसमधील इतर काही स्थळ दर्शन झाले. मॅरी अँटोनीयो (Marie Antoinette) या फ्रान्सच्या राणीला ज्या तुरुंगात डांबले होते, तो तुरुंग व तिची ती बंदिवासाची  – कोठडी पाहतांना पुन्हा एकदा, “कालाय तस्मे नमः” हि ओळ आठवली. “ब्रेड मिळत नसेल तर ‘केक’ खा” असे गरीब प्रजेला सांगणारी ही गर्विष्ठ राणी, एकेकाळी व्हर्साय सारख्या वैभवशाली राजवाड्यात (Palace of Versailles)सर्व सुखे ऊपभोगीत होती, तिला या ४x६ च्या कोठडीत सुरक्षा रक्षकांच्या कैदेत कसे वाटले असेल? ज्या दिवशी फासावर देण्यासाठी तिला तेथून बाहेर काढले असेल, तेव्हा पश्चातापाचे दोन तरी अश्रु या इथे  फरशीवर ओघळले असतील काय? असे काही विचार त्रस्त करीत होते.

 प्रसिध्द ‘नोत्रेदाम’ चर्च (Notre Dame) धावते पाहिले, कारण पुन्हा एकदा तेथे सावकाश यावयाचे होते. मात्र ओझरते का असेना या प्रसिध्द वास्तुचे आम्ही घेतलेले दर्शन अखेरचेच ठरले, कारण आणि दोन दिवसांनी ज्या वेळी आम्ही तेथे जाण्याचे ठरविले होते – तेथे कोण्या दहशतवाद्याने आत शिरून नासधूस करण्याचा प्रयत्न केला व त्याचा तेथे खातमा झाला. त्यामुळे आम्हाला त्या दिवशी प्रवेश न देताच पोलीसांनी परतवून लावले. त्यानंत दोन वर्षांतच या सुंदर, पुरातन व प्रसिध्द वास्तुला आग लागून आता ती जवळ जवळ ऊध्वस्तच आहे! ‘नोत्रेदाम’ हि वास्तु भव्य, प्रेक्षणीय, पुरातन व ऐतिहासिक आहेच पण फ्रान्सच नव्हे, तर जगातील सर्वच ख्रिश्चनांची प्रिय आहे. सुमारे ८५० वर्षापूर्वी ऊभारलेली ही वास्तु, मुळात काही ‘रोमन मंदिराचा’ समुह होता व तेथे चर्चची उभारणी केली गेली. साडे आठशे वर्षापूर्वी ही चर्चेस पाडून त्या जागी ‘नोत्रे-दाम’ उभे राहिले. अनेकदा नासधूस होऊन देखील ही वास्तु दिमाखात उभी आहे.  वर्षापूर्वीच्या आगी नंतर देखील, निश्चितच भविष्यात ती त्याच दिमाखात उभी राहिल! उत्तम वास्तुशास्त्राचा व पुरातन ‘रंगीत काचकामाचा’ (stained glass) उत्कृष्ठ नमुना येथे पहावयास मिळेल!  

पुढचा एक दिवस हा ‘लूव्र’ म्युझियमसाठी राखून ठेवला होता. जगातील सर्वांत भव्य असे हे संग्रहालय ज्यांत आज घडीला सुमारे ४०,००० वस्तु, पेंटींग्ज, शिल्पे, इ. नानाविध प्रकारच्या उत्तम गोष्टींचा संग्रह आहे. नेपोलीयन बोनापार्टने त्याच्या कारकिर्दीत, जगज्जेता राजा,या भूमिकेमुळे ज्या देशांवर त्याने विजय मिळविला, तेथील उत्तम वस्तु आणून येथे भरती केल्या. त्यामुळे रोमन, ग्रीक, इजिप्शियन, इस्लामिक इ. विविध संस्कृतीत निर्माण झालेल्या,  सर्वोत्तम वस्तु येथे आणल्या आहेत. हे २५० वर्ष जुने चर्च आहे.
राष्ट्राची अस्मिता, संस्कृती, भव्यतेचे वेड, कसे निर्माण होते? 

राष्ट्रपुरुषांनी दिलेला असा वारसा, पिढ्यानपिढ्या जतन करीत लोक पुढे नेतात व प्रत्येक येणारी पिढी त्यात योग्य ती भर घालते, तेव्हाच तर , राष्ट्राची अस्मिता व राष्ट्र प्रेम जपले जाते, आज महान असणाऱ्या सर्वच राष्ट्रांना, असाच वारसा मिळालेला आहे व पुढे येणाऱ्या पिढीने त्याचे जतन केले आहे! आम्ही सर्वांनी, विशेषतः मुलांनी या भव्य व कलाकुसरीने सजलेल्या वास्तुचा खूप आनंद घेतला.
चौथा दिवस ‘व्हर्साय राजवाडा’ (Palace of Versailles) व इतर काही लगतची ठिकाणे पाहण्यासाठी ठेवला होता. हा राजवाडा देखील १७ व्या शतकांतील, चौदाव्या लुई राजाने आपल्या कुटूबांच्या मौज मजेसाठी तयार केला. तेथे करमणूक तर होई, मात्र राज्यकारभार देखील त्याचे काळांत येथूनच होई. शेकडो एकरात पसरलेल्या या वास्तुच्या भव्यते बाबत काय बोलावे? स्फटीकांचे महाल, भिंतीवरील व छतावरील पेंटींग्ज, सुंदर शिल्पांची जागोजागी पखरणे व बाहेरील भव्य बागेत उघडलेला निसर्गाचा खजीना. एकेकाळी (लुईच्या काळात) २०,००० लोक येथे सेवा देत असत व त्यापैकी १०,००० लोक राजाच्या परिवारासाठी तात्काळ ऊपल्ब्ध व्हावेत म्हणून राजवाड्यातच निवास करीत! सर्व पाहत असतांना पुन्हा एकदा, त्या कालखंडाने पाहिलेले ऐश्वर्य, विलास, चैन काय असेल, याची नुसती कल्पना केली. पुढे झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीची मुळे या व्हार्सायच्या राजवाड्यातील रंगेल व विलासी जीवन-शैलीतच पेरली गेली होती!

पाचवा दिवस सेंट मायकेल ऐबे (Mont-Saint-Michel Abbey) व नॉर्मंडी (Normandy) युद्धभूमीला भेट द्यायचा, खूपच उत्सुकता पूर्ण! बहुतेक सफारी कंपन्या फ्रान्स, पॅरीसच्या भेटीत या आडवळणी असलेल्या ठिकाणांना भेट देण्याचे टाळतात किंवा ही ठिकाणे, optional ठेवतात, मात्र दीप्ती – स्वातीने, परिश्रम पूर्वक आखलेल्या आमच्या टूर योजनेमध्ये ह्या ठिकाणासाठी एक दिवस ठेवला होता व ते किती योग्य होते, हे आम्हाला तेथे जाऊन आल्यावर कळले!

पॅरीसपासून सुमारे ४ तासाचा हा प्रवास आम्ही स्पेशल कारने केला व पहाटेच्या वेळी, रमतगमत, दोन्ही बाजूला फ्रान्सच्या ऊत्तरे कडील टुमदार खेड्यांचे दर्शन घेत हा, छान प्रवास झाला. सेंट मायकेल हा किल्ला एका बेटावर असून, गाडी पार्क केल्यानंतर सुमारे किलोमीटर चालत जाऊन, पुढे किल्ल्यावर चढाई करावी लागते. ११ व्या शतकांतील ही वास्तु युनोस्कीच्या जागतीक वारसा स्थळाच्या यादीत असून, अजून देखील काल परवा बांधल्या सारखी वाटते. त्यावेळी राजांनी आपल्या व आपल्या खास लोकांचे राहण्यासाठी, नंतर धर्म-गुरुंना मठ म्हणून, कधी तुरुंग…  अशा विविध प्रकारे वापरण्यासाठी उपयोगात आणली. आज देखील पायथ्याशी व किल्ल्यात तुरळक वस्ती असून, विक्रेत्यांच्या दुकानांची गर्दी जास्त आहे.

तेथून सरळ नॉर्मंडीच्या युद्धा भूमिवर पाय ठेवले! शालेय इतिहासात, दुसरे महायुद्धाचा अभ्यास करतांना, ब्रिटीश-अमेरीकन व कॅनेडीयन संयुक्त फौजांनी जून १९४४ ते १९४५, जवळ जवळ सतत एक वर्ष पराक्रमाची पराकाष्ठा करून फ्रान्सचा, जर्मनीने गिळंकृत केलेला हा उत्तरेकडील भूभाग, मुक्त केला- हे वाचले होते मात्र या युद्धभूमीवर कधी पाय ठेवता येईल असे वाटले नव्हते! दैवयोगाने तो योग जुळून आला होता!

मित्र सैन्याने खूप प्रयत्न करून देखील त्यांना फ्रान्सचा हा नॉर्मंडी मधील भूभाग घेता येत नव्हता. कारण जर्मन सैन्याने, सर्वबाजूनी भूभाग तर संरक्षित केला होताच, पण जेथे समुद्रावरून हल्ला होऊन शकेल अश्या या भागात त्यांनी ‘मेझी बॅटरी’ नावाने इतिहासात प्रसिध्द असलेली संरक्षक भिंतीची रांग येथे उभी केली होती. वरून भिंत वाटणाऱ्या या तटाच्या आत खंदक होते व तेथे शस्त्रधारी जर्मन सैनिक, अहोरात्र पाहरा देत बसलेले असत! आजही ह्या भिंतीचे व आत खंदकाच्या रचनेचे दृष्य पाहून अंगावर काटा उभा राहतो – सुमारे तीन वर्ष हे सैनिक ह्या खंदकात लपून आपले सर्व जीवन व्यवहार कसे करत असतील?

इंग्लिश सैन्याचा नायक मॉंटगो मेरी याच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या कल्पने मधून याच समुद्र मार्गे मित्र सेनेने जून ‘४४ मध्ये हल्ला चढविला, सुमारे १२०० विमाने, ५००० जहाजे आणि १६०,००० सैनीक फौज यांच्या प्रथम हल्ल्याला जर्मनांनी दाद दिली नाही, तरी सतत वर्षभर विश्रांती न घेता हे युध्द सुरु होते, व शेवटी जर्मन सैन्याला हार पत्करावी लागली. हे सर्व पाहतांना जेत्या इंग्रज व अमेरीकन सैन्या बद्दल आदर वाटतोच पण ज्या स्थितीत जर्मन फौजा रोमेलच्या नेतृत्वाखाली येथे लढल्या, त्यांना ही दाद द्यावीशी वाटते.

तेथून जवळ असलेल्या युद्ध स्मारकाला देखील भेट दिली. आमचेकडे “परी तयांच्या, दहन भूमीवर, नाही चिरा, नाही पणती—” 

असे म्हणण्याचा प्रघात आहे, मात्र येथे फ्रान्स सरकारने उत्तम असे उद्द्यान तयार करून, मृत सैनिकांचे नाव, देश व त्याचा पराक्रम, नोंदून ठेवला आहे. सरकार तर्फेच त्या स्मारकाची उत्तम देखभाल ठेवली जाते. आम्ही गेलो होतो, त्या दिवशी अनेक अमेरीकन मंडळी आपल्या शूर पूर्वजांचे स्मरण ठेऊन, त्यांच्या थडग्यावर पुष्पांजली देण्यासाठी आली होती. आपल्यावर उपकार करणाऱ्या सैनिकाबद्दल कृतज्ञता भावना जपून त्यांचा आदर करणारा समाज, स्वतः ही पराक्रमी निपजतो, हेच खरे!
संध्याकाळ होत आली होती, मुलांना भुका ही लागल्या होत्या, तेव्हा ह्या ‘मेझी’ खेड्यात एक चक्कर मारली, काही खाद्यपदार्थ मिळाले तेही घेतले. एवढ्या जागतिक वारशाचे गाव मात्र अगदी ‘सुशेगात’ वाटले!

आता सहावा व शेवटचा दिवस, खरे तर आम्ही ‘नोत्रेदाम’ आरामशीरपणे पाहण्यात व काही ‘shopping’ करण्यासाठी ठेवला होता, मात्र मागे सांगितल्याप्रमाणे मी व दादा टॅक्सी करून जेवणानंतर तेथे जाण्यासाठी निघालो व ‘नोत्रेदाम’ च्या जवळ आलो असतांना तो संपूर्ण भाग पोलीसांनी वेढलेला दिसला व पोलीस रक्षक, फ्रेंच भाषेत काही सांगत असलेले आम्हाला समजले नाही, मात्र आमचा टॅक्सी ड्रायव्हर पाकिस्तानी व त्याने ‘नोत्रेदाम’ मध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, तेथे कोणालाही जाऊ देत नाही असे सांगून, ‘आता काय करावयाचे?’ असे आम्हाला विचारले. चौधरी मंडळी शोप्पिंग साठी इतरत्र गेली होती, तेव्हा आम्ही दोघांनी देखील तेथेच टॅक्सीला रजा देऊन ‘काही खरेदी करता येते का पाहुया‘ असे ठरवून भ्रमंति सुरु केली.
माझ्या पॅरिसच्या पहिल्या प्रवासामध्ये (१९८९) याचे वर्णन आले आहे., मी असे ऐकले होते की, फ्रेंच राज्यक्रांतीनंतर येणाऱ्या लोक-नियुक्त सरकारांनी एक धोरण ठरविले होते की ‘वाईन व ब्रेड’ हा सामान्य फ्रेंच नागरीकांचा आहार आहे, त्यामुळे या दोन वस्तुची दरवाढ अगदी कमीतकमी असावी. त्यावेळी, खरेच आमचे संध्याकाळचे जेवण पॅरीस मध्ये असतांना, या menu वर भागवीत असू १५-१६  फ्रँकची वाईन बॉटल व नऊ इंच लांबीचा ब्रेडचा तुकडा (loaf) एवढे आम्हाला पुरेसे होते. हा मोठा ब्रेड त्यावेळी २ फ्रँकला होता – म्हणजे अगदीच स्वस्त. मी मुद्दाम अनेक दुकानांमध्ये या दोन वस्तुची चौकशी केली व मला आश्चर्य वाटले.
ब्रेडच्या किमती १ डॉलर्स पासून पुढे होत्या व वाईन बॉटल जरी १००० अमेरीकन डॉलर्स पर्यंत होती तरी, सामन्यासाठी १० usd मध्ये ही, मध्यम प्रकारची फ्रेंच वाईन व शॅम्पेन खरेदी केल्या. तसेच भेटवस्तु  काही (soveneir) म्हणून काही पोस्टकार्ड, आयफेलची छोटी प्रतिकृती, ‘मोनालिसा’ची नकली चित्रे असे खरेदी केले. संध्याकाळी हॉटेलवर आल्यावर, विशेषत: फ्रेंच TV वर दहशतवादी हल्याची बातमी पुनः पुनः सांगत होते! एका दहशदवाद्याला ‘नोत्रेदाम’ परिसरातच कंठस्नान घालण्यात आले होते! खरोखर आम्ही बालं बाल वाचलो होतो!

रात्री आमचे भारतात परतीचे विमान होते! दादा व अजय आमचे बरोबर आले, मात्र त्यांचे विमान आमच्या आधी होते व मुंबईत ते चार पाच तास आधीच पोहचले. आम्ही चौधरी कुटुंबीयांबरोबर मुंबईस व्यवस्थित आलो. 

साठा उताराची ही आम्हा कुटुंबाची पर्यटन-कहाणी, पाचा उत्तरी सफल संपूर्ण झाली, एक आगळा उत्साह व कौटुंबिक आनंदाचे अनेक क्षण आदान करून!

स्वाती, दीप्तीचे नियोजन सर्वच बाबतीत इतके स्पष्ट व निर्धोक होते की, वाजवी खर्चात, कोणतेही विघ्न न येता, आम्हा सर्वांचा मोठा कुटुंबकबीला व्यवस्थीत आपल्या मुक्कामी पोहचला, तो देखील ‘नोर्मंडी’ सारखे एक आडवळणाचे परंतु प्रेक्षणीय स्थळाचे दर्शन करून.

अर्थातच पुढची, अशीच ‘कौटुंबिक सहल’ या दोघीनीच नियोजित करावी असा प्रेमाचा आग्रह झाला, हे सांगणे न लगे! तसा योग पुढील वर्षी ‘लंडन-स्कॉटलॅड, सफारी या दोघींनी आम्हाला घडविली , त्याचा वृत्तांत पुढे येईलच!