यलोस्टोन नॅशनल पार्क सफारी

यलोस्टोन,ग्रँट नॅशनल पार्क मधील निसर्गाने बहाल केलेला खजिना!! येलोस्टोन ,ग्रॅन्डटेटाॅन नॅशनल पार्कमधून अमेरीकन सफारी!

 नाना देशी पाषाणभेद नाना जीनसी मृत्तिका भेद।

 नाना विभूती छंद बंद, नाना खाणी।।

  बहुरत्ना ही वसुंधरा, ऐसा पदार्थ कैसा दुसरा।

  अफाट पडले सैरावैरा , जिकडे तिकडे।।

 दगडामध्ये संगमरवरा पासून ते साध्या कडप्पा पर्यंतचे विविध प्रकार, मातीचे रंगही प्रदेशानुसार बदलणारे, साहित्य कला आणि अध्यात्मातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती ही जगभर पसरलेल्या हेच सर्व पृथ्वीचे वैभव.

लक्षावधी सजीवांना, वनस्पतींना, पशु, पक्षी, जलचर यांना आसरा देणारी ही पृथ्वीच, तिला वसुंधराही म्हणतात. वसु म्हणजे रत्न व धरा म्हणजे धारण करणारी म्हणून ती बहुरत्नाही आहे!

पृथ्वीला संपूर्ण ब्रह्मांडात तोड नाही. अफाट मूल्यवान पदार्थ तिच्या पृष्ठभागावर व अंतर्भागात जागोजागी इतस्ततः पडलेले दिसतात.’

-दासबोध.

  रामदासांनी बहुप्रसवा धरतीचे किती नेमके वर्णन केले आहे! ज्ञानेश्वरा, तुकोबा ही आपणा सर्वांच्या या जीवनदायीनीचे असेच भरभरून वर्णन करतात, तरी त्यांचे समाधान होत नाही.  महान प्रतिभावंतांना जी शब्दातही पकडता येत नाही तर आम्हा सामान्य माणसांना तिचे संपूर्ण अवलोकन एका जन्मी करणे शक्य होईल काय ?

  या बहुरत्ना बहुप्रसवा धरती मातेचे जमेल तेव्हा जमेल तसे, होईल तेवढे पर्यटन करावे, पाहता येईल तो नवा नवा प्रदेश डोळ्यांनी पाहावा, कृतकृत्य व्हावे व एक अनोखे समाधान मिळवावे एवढे तरी आपण करू शकतो!

  आम्ही गेली  कित्येक वर्षे तेच करीत आलो आहोत. आम्ही म्हणजे आम्ही दोघे व श्रीदत्त-स्वातीचे, दीप्ती-प्रशांतचे कुटंब!

  दरवर्षी आम्ही  देशात वा परप्रदेशात काहीतरी नवे स्थलदर्शन करून येतो. त्याप्रमाणे यावर्षी आम्ही मे अखेरीस अमेरिकेतील येलोस्टोन या नॅशनल पार्क मध्ये सफारी करण्याचे ठरविले. आणि मे 25, 2024  ते1 जून 2024, दरम्यान आठवडाभरात हा प्रवास केला.

 आमचा सफारी संघ!

   या वेळी आमच्या या ‘सफारी गटात’ प्रशांत-दीप्तीचे,  श्रीदत्त-स्वातीचे व उन्मेष-मोनूचे अशी तीन चौकोनी कुटुंबे व आणि आम्ही दोघे अशी बरोबर 14 रत्ने होती!!

  अशा चवदा(र), रत्नांनी एकत्र येऊन एका अनोख्या सुंदर प्रदेशाची  अनुभूती घेण्याचे ठरविल्यावर  ते पर्यटन आनंददायी , सुखदायी व ‘चव’दार होणारच यात काय शंका? 

   या सर्व एक आठवड्याच्या भ्रमंतीचे संपूर्ण आलेखन स्वाती दीप्ती मोनू या तीन टीम लिडर्सनी केले व त्याला क्रिशा, ईशा यांच्या पुरवणीची जोड आणि श्रीदत्त प्रशांत उन्मेश यांच्या समीक्षेची झालर. मग काय विचारता? एकदम परफेक्ट  प्लॅनिंग!!

     आम्ही दोघे दीप्तीकडे ऑस्टीन मुक्कामी असल्याने त्यांचे बरोबरच 25मे रोजी सकाळी  ऑस्टीन विमानतळावरून, सॉल्ट लेक सिटी(SLC) ते यलोस्टोन (YS)  असा विमान  प्रवास करून संध्याकाळी येलोस्टोनला पोहोचलो. आम्हाला SLC  विमानतळावर दादा, स्वाती, अजय, इशा शिकागोहून येऊन मिळाले. पुढचा प्रवास आम्ही एकत्रितपणे केला. तेथून दोन कार भाड्याने घेऊन आम्ही  केली-इन या हॉटेलवर आलो. हे हॉटेल विमानतळाच्या अगदी जवळ आहे येथे एक रात्र राहून  सकाळी आम्ही प्रवासाला सुरुवात करू. याच दोन गाड्यामधून आठ दिवसाचा यलोस्टोन व टिटोन नॅशनल पार्कचा संपूर्ण प्रवास होईल. यलोस्टोन विमानतळावरच या गाड्या मालकांकडे सुपूर्त करून आम्ही विमानाने घरी जाऊ.

    त्यादिवशी पावसाची थोडी रिपरिप  चालू होती. त्यामुळे जास्त कुठे फिरता आले नाही.जेवणही आम्ही हॉटेलवरच मागवले. जवळच असलेला यलोस्टोन म्युझियम पाहिला.त्यामुळे आपणास पुढे काय पहावयास मिळणार आहे याची कल्पना आली .

   उन्मेष-मोनू कंपनी मात्र डेनव्हर पासून आपल्या गाडीने ड्राईव्ह करत यलोस्टोन नॅशनल पार्क मधील, ’ फेथफुल ईन’, या एका ‘राष्ट्रीय पुरातन वास्तु’ म्हणून नामांकन मिळालेल्या लॉजमध्ये  येऊन राहिले होते. दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना भेटणार होतो. आमचाही मुक्काम याच जुन्या व राष्ट्रीय नामांकन मिळालेल्या हॉटेलात झाला. पुढे आमचा प्रवास एकत्र होणार होता. सर्व व्यवस्थित जमून आले.

       साधारणता असा कार्यक्रम ठरला होता:

  •   25 मे :YS नॅशनल पार्क मध्ये पोहोचणे, निवास, ‘केली इन’,
  •   26मे : सकाळचा नाश्ता करून प्रवासाला सुरुवात.  पाहण्याची ठिकाणे लोवर गिझर बेसिन, फेअरी फॉल्स ट्रेल, मिडवे गिझर बेसिन, ग्रँड बिस्कुट बेसिन,  ब्लॅक सेंड बेसिन ,ओल्ड फेथफुल अप्पर गिझर बेसिन. निवासस्थान ओल्ड फेथफुल इन.
  •    27मे: ‘ओल्ड फेथफुल इन’, सोडून ‘मॅमथ हॉटेल’च्या मार्गावर.

     नॉरीस गिझर बेसिन, बनसेन पिक ट्रेलर

    निवासस्थान मॅमथ हॉटेल.

  •    28मे: मॅमथ हॉटेल सोडून ‘कॅनियन लॉज’, च्या मार्गावर

        टॉवर फॉल, माऊंट वॉशबर्न ट्रेल.

        निवास, कॅनियन लॉज.

  •    29 मे: कॅनियन लाॅज सोडून ,’हार्ट सिक्स रॅच’,मोरान, च्या मार्गावर.

        ग्रँड कॅनियन ऑफ दि येलो स्टोन, हेडन व्हॅली, मड वोल्कॅनो, स्टॉर्म पॉईंट ट्रेल,  वेस्ट थंप गिझर बेसिन लोअर फॉल्स ऑफ ऑफ यलो स्टोन रिव्हर्स, अप्पर फॉल्स ऑफ येलो स्टोन रिव्हर.

        निवास हार्ट सिक्स रॅन्च.

  •    30, 31 मे.

        ग्रँड टे.नॅशनल पार्क  इन्स्पिरेशन पॉईंट,आर्टिस्ट पॉईंट, एडवेंचर ऍक्टिव्हिटीज जेनी लेक ट्रेल.

  •   1 जून: पुन्हा यलोस्टोन विमानतळावर जाऊन ,भाड्याने घेतलेल्या गाड्या परत करून विमान मार्गे आपापल्या मुक्कामी.

     असा एकंदरीत प्रवासाचा आराखडा होता. त्यात वेळेनुसार प्रसंगानुसार काही बदल केले. मात्र आमच्या वेळापत्रकानुसार बहुतांश स्थलदर्शने करण्यात आम्ही यशस्वी झालो. आम्हा दोन सिनिअर सिटीजन ते आठ वर्षाचा नील, असा हा विस्तारित वयोगटांचा ग्रुप होता. त्यामुळे सर्वांच्या फिरण्यापासून, जेवणे-खाण्यापासून ते आरोग्यापर्यंत सर्व सोयी पहावयाच्या होत्या. त्यादृष्टीने कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट झाले होते.. रोजची धावपळ करून व मिळेल ते भोजन-निवासात आनंद मानून, शेवटी सर्वांच्या प्रकृती ईश्वर कृपेने ठीक राहिल्या, एक वेगळा आनंद घेऊन सर्वजण आपापल्या घरी परत गेलो, ही खरोखर परमेश्वराची कृपाच मानली पाहिजे.

सफारीचे नियोजन, निसर्गाने दिलेली साथ यामुळे  व विशेष करून या दुर्गम अशा गाठ माथ्यावरील नागवणी वळणे घेत जाणाऱ्या अरुंद रस्त्यावरून महा कठीण गोष्ट आहे. येथे गाडी चालवण्याचा कोणताही अनुभव नसतांना आमच्या श्री, प्रशांत, उन्मेश यांनी केलेले सारथ्य  केवळ लाजवाब! त्यांच्या या  कौशल्याचाही आमच्या निर्विघ्न प्रवासात खूप मोठा हिस्सा! विशेषतः या सिझनमध्ये येथे पाऊस व बर्फ वृष्टीही होते. आणि आम्ही तेथे असताना काही ठिकाणी ही बर्फदृष्टी झाली देखील! मात्र सुदैवाने स्थलदर्शनात विघ्न आले नाही तरी गाडी चालवण्यावर निश्चितच प्रभाव पडला. त्यांनाही धन्यवाद दिलेच पाहिजेत!

      ही सफर सुरू करण्याआधी आम्हा सर्वांनाच काही पथ्ये पाळावयाची होती. बरोबर आणावयाच्य वस्तूमध्ये  आपली नेहमीची औषधे, थंडीपासून रक्षणासाठी उबदार जॅकेट्स, हातमोजे, पायासाठी लोकरी मोजे, कानटोप्या आणि  खाचखळगे, सरपटणारे प्राणी, कीटक यापासून रक्षणासाठी व बर्फावरून चालण्यासाठी  विशेष बूट घेणे आवश्यक होते..मोबाईल फोन येथे निरोपयोगी ठरतो कारण जंगलामध्ये वायफाय, मोबाईल डेटा अजिबात मिळत नाही. फक्त हॉटेलमध्ये वाय-फाय असते. तिथून बाहेर संपर्क करता येतो. फिरताना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी खूपच काळजी घ्यावी लागते. विशेषतः नवख्या, परक्या लोकांनी येथे एकटे अजिबात फिरू नये. अमेरिकन सरकारला  मोठी शाबासकी द्यायला हवी, त्यांनी या संपूर्ण प्रदेशात सुंदर रस्ते व पायवाटा निर्माण केल्या आहेत. तसेच ठीक ठिकाणी विश्रामाची,  शौचालयांची सोय  करून प्रवाशांना खूप दिलासा दिला आहे. येथे जंगलात अनेक वन्य जीवांचे निवासस्थान असल्याने त्यांच्यापासून रक्षणासाठी खूप काळजी घ्यावी लागते. आखून दिलेल्या पायवाटे पलिकडे अजिबात जाऊ नये.त्यासाठी वन्य जीव संरक्षक येथे नेहमी देखरेख ठेवीत असतात. प्रवाशांना मार्गदर्शन करीत असतात. मी एकदा अशा संकटातून नकळत सापडलो व सुदैवाने निसटलो ती हकीगत पुढे देतच आहे.

     नॅशनल पार्कमध्ये वैद्यकीय सेवा अजिबात नाहीत. त्याचप्रमाणे उपलब्ध हॉटेल्स व लाॅजेस अगदी प्राथमिक स्वरूपाच्या सोयी देतात. विशेष अपेक्षा करू नये. बुकिंगही वर्ष वर्ष आधी करावे लागते.

      आता या यलोस्टोन, ग्रँड टेटाॅन राष्ट्रीय उद्यानाबाबत उपलब्ध माहितीचा मागोवा घेऊया.

    १८७२ साली निर्माण झालेले हे पार्क अमेरिकेतलं (आणि  जगातलंही) सगळ्यात पहिलं पार्क आहे. जागतिक वारसा-स्थळ म्हणून मान्यता असलेलं येलोस्टोन पार्क म्हणजे एक सध्या उद्रेक होत नसलेला पण ‘सक्रीय’ असलेला महा -ज्वालामुखी आहे. अमेरिकेच्या वायोमिंग राज्याच्या वायव्य भागात याचा ९६ टक्के भाग येतो, तसंच ते मोन्टाना आणि आयडाहो या दोन राज्यांच्या सीमातही येतो.. या पार्कचं नाव त्या प्रदेशातून वाहणाऱ्या ‘येलो-स्टोन‘ नदीच्या नावावरून पडलं आहे. नदीला देखील हे नाव येथील लाखो वर्षापासून राहणाऱ्या मिन्नेटरी इंडियन(Minne taree Indians) या आदिम जमातीच्या लोकांनी ठेवलेल्या मित्सेअ दा झी(Mitse a da zi) यावरून पडले, ज्याचे इंग्रजी भाषांतर, ’यलो राॅक रिव्हर’ असे आहे. 

       लाव्हा थंड झाल्यानंतर तयार झालेल्या खडकांच्या थरातून वाहताना खडक झिजून खूप खोल घळई तयार होत गेली. आता तर १२०० फूट खोल आणि ४००० फूट रुंद, ४० किलोमीटर लांब अशा महा-घळई मधून नदी वाहते आहे. आणि तिच्या दोन्ही बाजूना लालसर, गुलाबी, जांभळट, नारिंगी अशा विविध छटा असणाऱ्या पण मुख्यत्वे करून पिवळ्या रंग असणाऱ्या खडकांचा डोंगराळ भाग दिसतो.

     इथला तसराळ्यासारखा थोडासा खोलगट पठारी प्रदेश म्हणजे ‘बेसिन’. नऊ मुख्य ‘बेसिन्स’ आहेत. प्रत्येक बेसिन मध्ये असंख्य मोठमोठे उष्ण पाण्याचे झरे आणि त्यातून निर्माण होणारे छोटे मोठे हजारो ‘गिझर्स‘ म्हणजेच कारंजी आहेत.

 हा ‘येलो- स्टोन ज्वालामुखी’ म्हणजे आत्तापर्यंत तीनदा महा- उद्रेक झालेला ज्वालामुखी. पहिला उद्रेक एकवीस लाख वर्षांपूर्वी, दुसरा तेरा लाख वर्षांपूर्वी, आणि शेवटचा सहा लाख चाळीस हजार वर्षांपूर्वी. हे सगळे तप्त लाव्हाचे शक्तिशाली उद्रेक भयंकर विनाशकारी होते. त्या त्या वेळच्या सृष्टीला क्षणात होत्याची नव्हती करून सोडणारे. हजारो किलोमीटर जमिनीवर राखेचे थर पसरवणारे. शेवटच्या उद्रेक झाला तेव्हा ज्वालामुखीचं मुख आत कोसळले. आत ओढल्या गेलेल्या त्या भागामुळे तेथे पंधराशे स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळाच्या राक्षसी आकाराचा उथळ वाडगा तयार झाला. त्यानंतरही एक लाख साठ हजार वर्षांपूर्वी अजून एक छोटा उद्रेक झाला. आता यावर कोणी म्हणेल कि, ‘ह्या! .. लाखो वर्षांपूर्वी झाला ना उद्रेक.. मग आता काय त्याचे’…पण, तेव्हा तयार झालेल्या ‘मॅग्मा‘ मधली उष्णता अजूनही भूपृष्ठाखाली आहे. पृथ्वीवरील जमिनीखालील उष्णेतेमुळे निर्माण होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी पैकी अर्ध्या या भागात एकवटल्या आहेत. दरवर्षी छोटे छोटे हजार एक भूकंप तेथे होत असतात; तर सर्व मिळून दहा हजार भू-औष्मिक( Geothermal) वैशिष्ठ्ये आहेत. असं म्हणतात की, तांत्रिक दृष्ट्या- पुढचा उद्रेक कधीही होऊ शकतो. म्हणूनच त्या विषयातले तज्ज्ञ, इथल्या हवामान आणि भू-स्तरीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. अर्थात काही तज्ज्ञांच्या मते अगदी नजीकच्या काळात उद्रेक होणार नसल्याने तेथे जाणे सध्या तरी सुरक्षित मानले जाते.

     लोकांसाठी हे पार्क 1972 साली खुले झाले .याचा विस्तार सुमारे 22 लाख चौ. एकर इतक्या विशाल क्षेत्रामध्ये आहे. या उद्यानातील ओल्ड फेथफुल गिझर, ग्रँड प्रिज्मॅटिक स्प्रिंग, नॉरीस स्प्रिंग, येलो स्टोन रिव्हर व तिच्यावरील धबधबे, जेनी लेक ट्रेल तसेच जंगली काळी ग्रिजली अस्वले, लांडगे, बायसन अशा अनेक  वन्य प्राण्यासहित इतरही जंगली प्राण्यांना हा पार्क गेली हजारो वर्षे आश्रय देतो आहे.  येथील नैसर्गिक वाफेचे फवारे, ज्यांना गिझर्स म्हणतात, ते हजारोने आहेत. तसेच हिरवीगार कुरणे ,हिमाच्छादित पर्वत शिखरे,रंगीबेरंगी पक्षांचे थवे ,रानटी फुलांचे गालीचे, नागमोडी वळणे घेत जाणाऱ्या ग्रँड कॅनियन नदीसारख्या नद्या, सुंदर लहान मोठी सरोवरे अनेक आकर्षणे या नॅशनल पार्कमध्ये आहेत .. हे अमेरिकेचे’ संरक्षित उद्यान’ आहे.

     “देता अनंत हस्ते वसुंधरेने,घेता घेशील किती दो करांनी..”

    अक्षरशः अशी अवस्था पर्यटकांची होते . त्यामुळेच जगातील सुमारे 40 लाख पर्यटक दरवर्षी इथे भेट देतात.

     येथील गिजर्स आणि हॉट स्प्रिंग जरी हजारोने असले तरी ओल्ड फेथफुल गिझर, प्रिस्मॅटीक स्प्रींग, नाॅरीस हॉट स्प्रिंग, यलो स्टोन कॅनियन, त्यातील  धबधबे अशी काही मुख्य आकर्षणे आहेत. त्यासाठी जगातील अनेक पर्यटक मुद्दाम येथे येतात .

    जगातील अनेक वन्यजीव प्रजाती येथे गेल्या कित्येक वर्षापासून राहत आहेत.  हे  एक प्राणी संग्रहालय नाही, येथे  सर्व प्राणी मुक्त स्वरूपात वावरत असतात. बायसनच्या झुंडी पहावयास मिळतात. मात्र,जंगली अस्वलांची कुटुंबे, मगर,सुसरी लांडगे हरणे,काळवीट असे प्राणी येथे नशिबाने पहावयास मिळतात.

    हे निसर्ग चमत्कार प्राणीसृष्टी, पक्षीसृष्टी ,सुंदर तळी सरोवरे, पर्वत शिखरे हे सर्वच मिळून या नॅशनल पार्कचा एक अद्भुत नजारा मानवी जीवसृष्टीसाठी पेश करतात. ग्रँड कॅनियन नदीवरील धबधबे  गुलाबी आणि पिवळ्या पत्थरांच्या पार्श्वभूमीवर उंचावरून पडताना दिसणारे दृश्य केवळ अलौकिक! हे सौंदर्य एका विशिष्ट ठिकाणाहून पहाण्यासाठी त्या ठिकाणाचे नाव आर्टिस्ट पॉईंट असेच दिले गेले आहे.  पुढे त्यांचे सविस्तर वर्णन पुढे पाहू.

  .ट्रेकिंगची हौस असलेली मंडळी येथील बनसन पीक,माउंट वॉशबर्न , जेनी लेक अशा ट्रेक करतात.जवळजवळ 1300 मैलाची एकूण वाटचाल आहे.  ते करताना या जंगलातील अनेक विभिन्न जंगली प्रजातींचे दर्शन होते.  वनस्पती पक्षी आणि अशाच अनेक वन्य सौंदर्याचे दर्शनही होते..

   काही हौशी व धाडसी पर्यटक या नॅशनल पार्कमधील  निवांत जागी कॅम्पिंग करून रात्री दोन रात्री घालवितात. तशी परवानगी आहे..खुल्या आकाशाखाली तंबू ठोकून एखाद्या तळ्याच्या काठी राहण्यातील आनंद, स्वर्गीय आनंदाची आठवण करून देत असेल!! तलावात मासेमारीची परवानगी आहे .

  आपल्याला  वेळ व आवड असल्यास व अमेरिकन संस्कृती विशेषतः या नॅशनल पार्कमधील आदीमानवांची संस्कृती पहावयाची असल्यास येथे या आदिवासींसाठी खास राखीव क्षेत्र आहे. तेथे त्यांच्या पारंपारिक जीवनपद्धती पाहण्यासाठी आपण भेट देऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता.

      ग्रॅन्ड टेटॉन नॅशनल पार्क मधील ‘सिक्स हार्ट रेंज’ हे आमचे निवासस्थान. हौशी लोकांसाठी तंबूची सोय होती. सभोवतालच्या जंगलाची कल्पना येईल

     येथील संपूर्ण लाकडी बांधणीची जुनी ऐतिहासिक लाॅजेस  सुद्धा खूपच सुंदर आहेत. त्यातही ओल्ड फेेथफुल गिझरच्या परिसरातील, ओल्ड फेथफुल लाॅज, आतून बाहेरून अतिशय देखणे आहे. या हॉटेलमध्ये एक रात्र तरी राहणे म्हणजे जगावेगळा अनुभव आहे. फक्त लाकूड आणि लाकूड, शिवाय दुसरा कसलाही उपयोग केलेला नाही. एकही खिळा अथवा किलोभर सिमेंट काँक्रीटचा कोठेही वापर न करता अत्यंत मजबूत, सुरक्षित आणि देखणे असे हे लाॅज आहे.अमेरिकन सरकारने ‘राष्ट्रीयप्रतीक’ म्हणून दर्जा दिला आहे. अशी काही छोटी लाजेस अमेरिकन सरकारच्या पर्यटन विभागाने बांधली असून इतर काहीही बांधकाम त्यांच्या परवानगीशिवाय करता येत नाही. म्हणूनच या परिसरात एकही सिमेंटची वास्तू दिसणार नाही! आम्ही एक रात्र या ‘ओल्ड फेथफुल लाॅज’ मध्येच राहिलो. समोरच प्रसिद्ध ’ओल्ड फेथफुल गिझर’ असून अगदी हॉटेलच्या समोर बसून त्याचे दर्शन घेता येते. ही हॉटेल्स राहण्याच्या दृष्टीने देखील माफक खर्चाची आहेत. मात्र यांचे बुकिंग अनेक महिने आधी करावे लागते.

    या नॅशनल पार्कमध्ये भ्रमंती करताना भारतीय जेवण अथवा संपूर्ण शाकाहारी जेवण मिळणे कठीणच आहे. मांसाहारी व अमेरिकन पद्धतीचे जेवण छान मिळते. व्हेजिटेबल बर्गर,सँडविच, सूप मिळते. मांसाहारी जेवणात, चिकन, बेकन (डुकराचे मांस), त्याप्रमाणे येथील बायसन प्राण्याचे मांस मिळते. मात्र जे मिळते ते स्वादिष्ट व रुचकर भोजन असते. आम्ही काही पदार्थ घरून तयार करून नेले होते, मात्र येथील जेवणाचा आस्वाद घेतल्यावर त्यांची विशेष गरज लागली नाही.

   यलोस्टोन नॅशनल पार्क, हॉटेलमध्ये मिळणारे जेवण! 

   येथील वन्यजीव संरक्षक हे सरकारी फॉरेस्ट गार्ड्स खूप चांगली सेवा देतात. प्रवाशांना मार्गदर्शन करतात. यात तरुणींचा भरणा जास्त आहे. पगार कमी व बर्फामुळे कामाचे दिवस ही कमी त्यामुळे सहसा कोणी हा पेशा पत्करत नाहीत. मात्र ज्यांना अशा डोंगरात द-याखोऱ्यांत फिरण्यास आनंद मिळतो व वन्यजीवांच्या निरिक्षणाचा छंद आहे असे लोक ही नोकरी पत्करतात. शिक्षणकालात दोन-तीन महिन्यात थोडे पैसे कमावून निसर्गसृष्टीच्या सान्निध्यात राहता यावे असाच त्यांचा उद्देश असतो. त्याचप्रमाणे अनेक अमेरिकन सिनियर सिटीजन रिटायरमेंट नंतर या पार्कमध्ये फिरताना दिसतात. हे पर्यटनाबरोबर  वन्यजीव निरीक्षणे करतात, फोटोग्राफी, दुर्मिळ माहिती मिळवून पैसेही कमावतात. एखाद्या तळ्याकाठी हिरवळीवर  खुर्च्या टाकून, आपले झूम कॅमेरे लावून निवांतपणे वाचत बसलेले असतात. दोन-तीन महिने ते येथे राहतात. मिळाल्यास काही हॉटेलमध्ये छोटी मोठी कामे करतात. पैसेही जमा होतात आणि भटकंती, फोटोग्राफी होते.

यलोस्टोन नॅशनल पार्क मध्ये  अगदी सहज सर्वत्र आढळणारा प्राणी म्हणजे बायसन. त्याचेही एकट्याने अथवा कळपाने दर्शन होते.  बायसन इथे लाखोच्या संख्येत आहेत. बघावे तिकडे  दिसतात. जरी तो शांतपणे फिरताना दिसला व त्याच्याच मस्तीत असला तरी त्याची मर्जी कधी खप्पा झाली तर त्याच्याइतका महाभयंकर प्राणी नाही .सुमारे एक टन वजनाचा हा प्राणी रस्त्यावरही येऊन उभा राहतो. चुकून जरी त्याचा धक्का आपल्या गाडीला बसला तरी आपली गाडी आकाशात भिरकावली जाईल एवढी त्याची ताकद आहे! माणसा साठीअसलेल्या रस्त्यात येऊन बसला असला, तरी कोणी रेंजर येऊन त्यांना हाकलत नाहीत! त्यांचे म्हणणे आहे ,”This park belongs to them and they are the Kings!

  यलोस्टोन नॅशनल पार्कचे महाराज, बायसन..

  हे अरण्य त्यांचे आहे, ते येथील राजे आहेत, त्यामुळे आम्ही,  पाहुण्यांनी त्यांना सन्मान दिला पाहिजे! त्यांचे म्हणणेही बरोबर नाही का?

   आमच्या भ्रमंतीत आम्हालाही एक-दोन प्रसंगी बायसनने  आम्हाला इंगा दाखविलाच.आमच्यातील भगिनी मंडळांनी चार एक मैलाचा एक ट्रेक ग्रँड  टेटान नॅशनल पार्कमध्ये सकाळीच करण्याचे ठरविले. नाश्ताही न करता मंडळी हॉटेलमधून बाहेर पडली, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर गेल्यावर त्याच मार्गावरून विरुद्ध दिशेने एक बायसन महाराज  चालत येताना दिसले.. मग काय विचारता ,तसेच अबाउट टर्न करून देवाचा धावा करीत सर्व मंडळी झपाझप चालत परत हॉटेलवर येऊन धडकली. पहिले घटाघटा पाणी पिऊन ब्रेकफास्टसाठी गेली. त्याचे असे बोजड  शरीर जर मनांत आणले तर सुमारे 40 किलोमीटर ताशी या वेगाने धावूही शकते!

  दुसऱ्या एका प्रसंगी आम्ही सर्व दुपारच्या वेळी एक ट्रेक करून आमच्या ओल्ड फेथफुल इन या हॉटेलकडे येत होतो .सर्व मंडळी मुख्य रस्त्यावरून चालली होती, तो थोडा दूरचा रस्ता होता. मी शॉर्टकट म्हणून एक पायवाटेने जाऊ लागलो. मला फक्त समोरचे हॉटेल दिसत होते कारण थकलो होतो. दादाने मला तेथून न जाण्याचे बजावले तरी गेलोच. कोणीतरी माझ्या नावाने मोठ मोठ्याने बोंबलत होते ते मला प्रथम कळले नाही. शेवटी ती वनरक्षक बाई माझ्या अगदी जवळ येऊन तिने मला इंग्रजीत काही शिव्या दिल्या (मला त्याही  कळल्या नाहीत) आणि उजवीकडे बघ म्हणून सांगितले. एक मोठा बायसन माझ्या उजवीकडे थोड्याच अंतरावर चरत होता. ती वाट बंद केली होती. मी अगदी झटक्यात मुख्य वाटेवर आलो आणि त्या बाईचे, मला शिव्या दिल्या तरी, आभार मानले!!

      या नॅशनल पार्क मध्ये आठवडाभर भरपूर फिरलो तरी काही ठराविकच गिझर्स, स्प्रिंग्स, आणि ट्रेल करता आले. अनेक गोष्टी पाहायच्या राहूनही गेल्या. ते शक्यच नव्हते. विशेषतः आमच्यासारख्या सिनियर सिटीजनने सतत उंच सखल पृष्ठभागावर चालणे, एका मर्यादेपर्यंतच शक्य होते. आम्ही वाटेत बसून राहत असू व मंडळी स्थलदर्शन करून आल्यावर पुन्हा त्यांचे बरोबर जात असू.

   या भ्रमंतीत ज्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पाहिल्या त्यातील काहींचे थोडक्यात वर्णन.

  1.ओल्ड फेथफुल गिझर :

  Old faithful inn …. लाकडी काम

यलोस्टोन नॅशनल नॅशनल पार्कमध्ये येऊन ओल्ड फेथफुल गिझर  जर पाहिला नाही तर तुमची ट्रीप फुकट गेली असेच समजावे. नावाप्रमाणे हा वाफेचा फवारा अत्यंत एकनिष्ठ असून एका ठराविक वेळेच्या अंतराने त्यातून अति उष्ण वाफ बाहेर येते. सुमारे 90 मिनिटानी तो आपले वाफेचे भपकारे सोडीत असतो. म्हणून हा सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक पाच दहा मिनिटे आधीच बाकावर बसून राहतात. हळूहळू  सुरुवात होऊन शेवटी सुमारे 250ते300 फूट उंच एवढा हा फवारा जातो. हजारो किलोग्रॅम उष्ण वाफ अस्मानात सोडली जाते. त्याचा शिडकावा आजूबाजूच्या दोन-तीन मैलापर्यंत होतो. ही मजा अनुभवण्यासाठी एखाद्या क्रिकेट मॅचची मजा घेण्यासाठी लोक जसे चहूबाजूंनी स्टेडियम मध्ये बसतात तशी पुन्हा पुन्हा गर्दी जमा होते. ओल्ड फेथफुल इन या हॉटेल समोरच हा धबधबा असल्याने आम्ही अनेक वेळा हे विलोभनीय दृश्य पाहिले व कृतकृत्य झालो .

   2.ग्रँड प्रिजमेटिक स्प्रिंगः

ग्रँड प्रिज्मॅटिक स्प्रिंग.  .लांबून दिसणारे सौंदर्य

   अमेरिकेतील  सगळ्यात मोठे आणि जगातले तीन नंबरचे ‘ग्रँड प्रिझमॅटिक’ कुंड पाहिले. अबब….. एखाद्या दहा मजली बिल्डिंगला पोटात घेईल एवढं खोल आहे म्हणे! मध्यभागी स्फटिकासारखे निळे पाणी असणाऱ्या या कुंडाच्या कडे-कडेला मात्र ईंद्र- धनुच्या तांबडा, पिवळा,लाल- नारिंगी, हिरवा, निळा, जांभळा अशा स्फटिकातून दिसाव्यात तशा रंगाच्या छटा दिसतात. तीनशे सत्तर फूट व्यास व दीडशे फूट खोली असणारे हे ‘महा-कुंड’ पाहण्यासाठी भोवती लाकडाचा रस्ता केला आहे. त्यावरूनच चालायचे असते. त्याशिवाय सगळीकडे जागोजागी ‘असुरक्षित जागा’ अशा पाट्या लावल्या होत्या. अशा ठिकाणी भू-कवच पातळ असल्याने भूपृष्ठाखालील मॅग्माची उष्णता कोणत्याही रूपात बाहेर पडण्याची शक्यता होती. त्यामुळे जपून फिरण्याच्या सूचना होत्या. जून २०१६ मध्ये एक अति उत्साही पर्यटक ‘नॉरीस गिझर बेसिन’ मध्ये धोक्याची सूचना असतानाही असाच गेला. आजूबाजूला भटकायला. गंधकाच्या गरम पाण्याच्या कुंडात पाय घसरून पडला आणि त्या आम्लधर्मी द्रवात चक्क विरघळून गेला !!

 या क्षारवलयांवर जेव्हा सूर्यकिरणे पडतात तेव्हा  हवेतील बाष्पाचे कण आणि हे विरघळलेले विविध क्षार यांच्या विलक्षण संयोगाने सूर्यकिरणांचे पृथक्करण होऊन  इंद्रधनुष्यातील काही रंग दिसू लागतात. तळ्याच्या भोवतालची रंगांची वर्तुळे आणि हे वर निर्माण झालेले रंगांचे वलय हा एक अनुपम असा देखावा आहे. ते पाहायलाच पाहिजे आम्हाला थोडी झलक पाहायला मिळाली.

    3.यलोस्टोन रिव्हर धबधबे  

  यलोस्टोन रिव्हर बेसिन धबधबे. टेटाॅन नॅशनल पार्क।

  लाव्हा थंड झाल्यानंतर तयार झालेल्या खडकांच्या थरातून नदी वाहताना खडक झिजून खूप खोल घळई तयार होत गेली. आता तर १२०० फूट खोल आणि ४००० फूट रुंद, ४० किलोमीटर लांब अशा महा-घळई मधून नदी वाहते आहे. आणि तिच्या दोन्ही बाजूना लालसर, गुलाबी, जांभळट, नारिंगी अशा विविध छटा असणाऱ्या पण मुख्यत्वे करून पिवळ्या रंग असणाऱ्या खडकांचा डोंगराळ भाग दिसतो. अच्छा! म्हणून तिचं नाव ‘येलो – स्टोन’!

   पार्कमधील यलोस्टोन नदीवरील धबधबे हे एक आगळे आकर्षण असल्याने जगभरातील प्रवासी त्याचे दर्शन घेतात. लोअर फॉल्स हा सुमारे 308 फुटावरून पडणारा छोटा धबधबा असून पुढे असलेला अप्परफॉल धबधबा हा सुमारे 100 फुटावरून पडतो. याला कारण लोअर फॉल मध्ये  नदी  लाव्हाच्या दगडावरून वाहत असल्याने तेथे झिज कमी झाली आहे. उलट पुढे नदीचे पात्र साध्या पत्थरावरून वाहत असल्याने तेथे झीज भरपूर झाली आहे. दोन्ही धबधबे पाहणे ही देखील एक मेजवानी आहे.उभ्या डोंगर कडांवर सूर्यकिरण पडल्यावर होणारे प्रकाशाचे परिवर्तन खूपच विलोभनीय रंगसंगती निर्माण करते . अनेक रंगांची उधळण त्या उभ्या उघड्या कातळावर झालेली आहे. दोन्ही बाजूचे हे रंगीत कातळ व त्यावर उंचावरून पडणाऱ्या पाण्याचे शुभ्र हिमतुषार, त्यातून दिसणारे इंद्रधनुष्य आहा हा..मी काय वर्णन करणार? अशी दगडांना जिवंत करणारी कलाकारी केवळ परमेश्वरच करू शकतो. त्यामुळेच येथील एका पॉईंटला ‘आर्टिस्ट पॉईंट’ असेही नाव मिळाले आहे. आम्ही त्या आर्टिस्ट पॉईंटचेही दर्शन घेतले. 

  आर्टिस्ट पॉईंट वरून दिसणारे रंगीबेरंगी डोंगर कड्यांचे नयन मनोहर दृश्य!

    4.मॅमथ हॉट स्प्रिंग:

मॅमध हॉट स्प्रिंग.. पाण्यात विरघळलेले क्षार त्यावर झालेली सूक्ष्मजंतूंची वस्ती, अल्गी यामुळे तयार झालेले रंगीबेरंगी स्फटिक.

मॅमथ हाॅटस्प्रिंग हे ऊंच टेकडीवरील अनेक उष्ण झऱ्यांचे एक संकुल आहे.या टेकडीची उंची सुमारे 6000 फूट असल्याने पाणी झिरपत झिरपत खाली येते. या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेट क्षार विरघळलेले असल्याने, पाण्याचे तापमान कमी होत गेल्यास, त्याचे स्पटिक गेल्या लाखो वर्षापासून टेकडीच्या पृष्ठभागाला कापून खडकावर जमले आहेत. त्यावर वाढणारी अल्गी आणि काही रंगीबेरंगी सूक्ष्मजीव यांच्या कॉलनीज वाढल्याने  या विविध आकाराच्या विविध रंगी फटिकांना आणखीनच शोभा प्राप्त झाली आहे. आजही त्यावरून ऊष्ण पाणी वाहते आहे व त्या स्फटिकांचा आकार वाढतोच आहे. टेकडी व टेकडीखाली जमिनीत असलेल्या उष्णतेमुळे हे धातू पाण्यात विरघळून पृष्ठभागावरील काही लहान लहान फटीतून बाहेर येतात व हे चमत्कार दिसतात. आमचे ‘हॉटेल मॅमथ’  जवळच असल्याने आम्हाला या सर्व परिसराचा सावकाशपणे आस्वाद घेता आला.

     काही वर्षांपूर्वी आम्ही तुर्कस्थानमधील पामाकुले या एका अशाच रमणीय स्थळाला भेट दिली होती. तेथेही पाण्यातील कॅल्शियम क्षारापासून  तयार झालेल्या कमळाच्या आकाराच्या स्फटिकांनी सुंदर सुंदर नक्षीकाम जमिनीवर कोरले आहे. शुभ्र रंगाचे हे स्फटिक जणू काही  पाण्यातून वर आलेली  कमळे वाटतात! या ठिकाणी त्यांची आठवण झाली.

    5. नॉरीस गिझर बेसिन:

  नाॅरीस गिजर लोअर बेसिन, अनेक उष्ण, आम्लधर्मीय गिझर्सचे संकुल.

   नॉरिस गिझर बेसिन हा अति तप्त आणि सतत बदलणारा भाग आहे. पांढऱ्या खडकांच्या पोर्सेलीन बेसिन मध्ये लोह- ऑक्साईड मुळे लालसर -नारिंगी पट्टे एवरून खूपच छान दिसतात.

बरेच ठिकाणी राख, साठलेले क्षार यांची दलदल आणि चिखलाच्या डबक्यातून सतत बुडबुडे येत होते. कारण, जमिनीखाली असलेल्या उष्णतेमुळे तिथला चिखल अक्षरशः ‘उकळायला’ लागला होता. चिखलातल्या राखेत असलेल्या सल्फर मुळे, इथेही हवेत त्याचा दर्प जाणवत होता. अजून बऱ्याच ठिकाणी तर जमिनीवरच्या छोटी छोट्या उंचवट्यांना गोल भोक होते, आणि त्यातून सतत पाण्याची वाफ बाहेर येत होती. ही धुरांडी म्हणजे जणू उद्रेक होण्यापूर्वीचे लहान – लहान ज्वालामुखीच! जमिनीखाली अजूनही बरीच उष्णता साठली आहे ती अशा धुराड्यांच्या स्वरूपात बाहेर पडू पहाते.

याशिवाय, इथले मोठमोठे विविध डोह त्यांच्या नैसर्गीक सौन्दर्याने जागीच खिळवून ठेवतात. इंद्रनीळ खड्याच्या निळाईचा शांत आणि सुंदर ‘सफायर पूल’  आकाशी रंगाचा ‘ओपल पूल’  नॉरीस गिझर बेसिनमध्ये असणारा आणि पाण्यातल्या सल्फरमुळे पिवळ्या झालेल्या पाण्यात निळ्या आकाशाचे प्रतिबिंब पडल्याने पाचूच्या रंगाचा झालेला ‘इमराल्ड स्प्रिंग’ ही खरोखरीच डोळे तृप्त करणारी सुंदर स्थळे आहेत.

    नाॅरीस गिझर बेसिन हे या नॅशनल पार्क मधील व जगातील एक अत्यंत वेगळे आकर्षण आहे. कारण या विशिष्ठ भागातील हे झरे जगातील सर्वात उष्ण,खूप जुने आणि सतत गुणधर्म बदलणारे (Dynamic)असे आहेत. या परिसरात फक्त केवळ हजार फूट खाली असलेल्या द्रवाचे तापमान मोजले असता ते सुमारे 250 डि.सेल्सियस( पाण्याचे वाफ होण्याचे तापमान 100 डिग्री सेल्सिअस ) एवढे भरते आणि विशेष म्हणजे बाहेर येणाऱ्या या पाण्याच्या वाफेची आम्लता ही सल्फ्युरिक आम्लाएवढी आहे( पी एच् 2) त्यामुळे परिसरात कोणतेही झाडझुडुप वा गवतही दिसत नाही. या भागातील ही औष्णिक प्रक्रिया काही लाख वर्षापासून सुरू असून काही झरे आपले रूप  दिवसाकाठीही बदलतात. पोरसेलीन बेसिन आणि बॅक बेसिन असे दोन भागात हे सर्व संकुल असून आम्ही संपूर्ण ट्रेल केली नाही.आमच्या तरुण सदस्यांनी  सबंध पाच किलोमीटरचा परिसर फिरून घेतला. या परिसरात हवेचा गंधही वेगळा वाटतो.त्यामुळे खरे तर येथे नाकाला रुमाल अथवा अथवा मुखपट्टी, मास्क लावून फिरणे उत्तम.  अशा प्रकारचे एसिड भूगर्भातून सतत फेकणारे हे फवारे पाहिले म्हणजे देवाजीच्या या  ममताळू सृष्टीचा एक संहारक पैलूही समोर येतो!!

    6.जेनी लेक व पर्वतराजी ट्रेल:

   जेनी लेक हे एक विशाल व निळ्याशार पाण्याचे एक सरोवर  ग्टेटाॅन पार्कमध्ये आहे. भोवताली अनेक डोंगरदऱ्या, जंगल व धबधबे आहेत.टेटाॅन पार्क मध्ये हा परिसर येतो. येथून अनेक ट्रेल्स निघतात. जगातील अनेक हौशी ट्रेकर्स या प्रदेशात येऊन येथील धाडशी ट्रेकिंगचा अनुभव घेतात . येथे धाडशी लोकासाठो डोंगर द-यातून, दुर्गम भागातून जाणारी ट्रेक आहे. सरळ मार्गी साठी जास्त लांबीची जास्त वेळाची म्हणजे सुमारे तीन तासाची वाट आहे. काही लोक येथे खास राखून ठेवलेल्या प्रदेशात येऊन तंबू ठोकून रात्रभर निवास करतात, एक वेगळा आनंद घेतात.  रविवार असल्याने खूप गर्दी होती .पार्किंगला जागा नव्हती.  बोटीचे तिकीट मिळवण्यासाठी मोठी रांग होती. पण हे सर्व दिव्य पार पाडले. सुमारे 30-35 मिनिटानंतर बोटीचे तिकीट हातात पडले. आम्हा सिनिअर सिटीजनना सर्व प्रवास फुकट असल्याने  रांगेत घालवलेल्या वेळेचे दुःख झाले नाही! जेनी लेक मधून बोटीचा प्रवास हा देखील एक अद्भुत आनंद आहे! हौशी मंडळींनी साधा व अडीच तासाचा ट्रेक केला.  या ट्रेकमध्ये आपल्याजवळ पाणी बर्फावरून चालण्याचे बूट व जंगली श्वापदापासून रक्षण करण्यासाठी एखादी काठी असलेली बरी असते.  अत्यंत दुर्गम व बर्फाळ अशा टेकड्या मधून रस्ता जातो, प्रसंगी जंगली श्वापदांशी सामना करावा लागू शकतो. आम्ही एका सुंदर टेकडीवर बसून भोवतालचा परिसर पाहत राहिलो. ट्रेक पूर्ण करून आलेल्यांकडून  गमती जमती ऐकण्यात समाधान मानले.

   ग्रॅन्डटेटाॅन नॅशनल पार्क मधील बर्फाच्छादित शिखरे

7. येथील वन्य जीवन व जैव विविधता व मानवी अस्तित्व:

   या सफारीत आम्हाला पृथ्वीवरील जैवविविधता व तिचे सर्वच सजीवांच्या अस्तित्वासाठी असलेले महत्त्व यासंबंधी एक गोष्ट ऐकावयास मिळाली ती सांगितलीच पाहिजे!

 यलोस्टोन, टेटाॅन नॅशनल पार्क मधील वन्यजीवन।

    यलोस्टोन व टिटाॅन नॅशनल पार्कच्या या परिसरात  सुरुवातीला खूप लांडगे होते. मात्र येथील रहिवाशांनी त्यांचे कातडे (फर), काढण्यासाठी त्यांची हत्या केली. ह्या फरपासून थंडीतून बचाव करण्यासाठी सुंदर जॅकेट तयार होतात. सन 1900 पर्यंत लांडग्यां ची संपूर्ण प्रजाती नष्ट झाली.

 परिणाम असा झाला की पुढील शंभर वर्षात येलोस्टोन नदी हळूहळू आटत गेली. फक्त पावसाळ्यातच वाहू लागली. पावसाळ्यानंतर ती कोरडी पडे. लोकांना याचा उलगडा होईना. काही सृष्टी शास्त्रज्ञांनी येथे येऊन अभ्यास केला.  त्यांना कळले की या नदीच्या प्रवाहाचा व लांडग्यांच्या अस्तित्वाचा घनिष्ठ संबंध आहे.त्यांनी सन 1995 साली पार्कच्या जंगलात फक्त 14 लांडगे आणून सोडले. आणि पुढील 25 वर्षात चमत्कार झाला. 2019 मध्ये नदी पुन्हा वाहू लागली. असंख्य जीव नदीच्या आश्रयाला देखील आले. त्यातून एक समृद्ध जैव विविधतेचा मोठा खजिना तयार झाला.

    लांडग्यांची शिकार झाल्यामुळे जंगलातील हरणांची संख्या वाढत गेली, हरणांनी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील झाडे, गवत नष्ट करून टाकले,  थोड्याच वर्षात संबंध क्षेत्र बोडखं झालं. गवत  वृक्ष नसल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत व पुढे खडकात मुरण्याचे प्रमाण शून्य झाले. जमिनीची झीज होऊन माती वाहून गेली. लांडगे परत आल्यामुळे हरणांची संख्या कमी होऊ लागली. हरणे जंगलाच्या इतर भागात पळून गेली.  साहजिकच सहा सात वर्षात पुन्हा जंगल फोफावले. गवतामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरू लागले. मातीची धूप थांबली. नदीत गाळ येण्याचे प्रमाण कमी झाले.  मुरलेल्या पाण्याने खडक पाण्याने भरून गेले. पावसाळ्यानंतर याच खडकातले पाणी झऱ्याद्वारे नदीत येऊ लागले. नदी वाहू लागली. जंगलात वाढलेल्या गवतात विविध किडे आले बेडूक ,सरडे, साप आणि इतर सरपटणारे प्राणी आले. त्यामुळे शिकारी पक्षी देखील येण्यास सुरुवात झाली. गरुड गिधाडे आली..या पक्षांनी टाकलेल्या विष्टेतून बिया पेरल्या गेल्या. अनेक झाडे उगवली. त्यांचे वृक्ष झाले. सूक्ष्मजीव आले. हळूहळू नदीत मासे उत्पन्न झाले. ते पकडण्यासाठी बदके आली. हेरान सारख्या बगळ्यांच्या प्रजाती आल्या. जंगलात बेरीची झाडे वाढली. बेरी आणि मासे हे अस्वलांचे आवडते खाद्य त्यामुळे अस्वले आली. याशिवाय इतरही बऱ्याच वनस्पती प्राणी यांची सृष्टी पुनर्स्थापित झाली. एक समृद्ध अन्नसाखळी जंगलात तयार झाली, ती केवळ 14 लांडग्यामुळेच! हीच गंमत आहे. अन्नसाखळीतला एक दुवा जरी तुटला तर जीवन कसे भकास होऊन जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे. माणसांनी याच्यापासून खूप शिकावयास हवे.

ही सत्यकथा आहे. निसर्गातल्या सगळ्याच अन्नसाखळ्या अशा अजोड, अद्वैत म्हणता येतील. माणसाच्या बेफाम आणि बेफिकीर वागण्यानेच आज माणसावर व जीवसृष्टीवर पाण्याचे दुर्भिक्ष व हवामानातील विध्वंसक बदल दिसून येत आहेत.

   नॅशनल पार्कमधील जंगली अस्वल, ब्लॅक ग्रीझली बेअर

   यलोस्टोन  नॅशनल पार्कमध्ये आढळणाऱ्या अनेक वन्यजीवाविषयी मागे सांगितलेच आहे. मात्र आमच्या भ्रमंतीत बायसनच्या झुंडी सोडल्यास इतर वन्य प्राण्यांचे दर्शन झाले नाही. मला व स्वातीला एकदा धावत जाणा-या अस्वलाचे धावते दर्शन झाले! उन्मेष मोनू सारख्या सुदैवी लोकांना जंगली अस्वलेही पहावयास मिळाली. उन्मेषने आम्हाला घरी पोहोचल्यावर फोन करून सांगितले, त्यांच्या डेनव्हर मधील घराजवळ झाडीतही  त्यांना अस्वल दिसले …आता काय म्हणावे हा योगायोग की ग्रिझली अस्वलांशी झालेली घनिष्ठ मैत्री..या अस्वलांशी जवळीक करणे बरे नव्हे!!

    आठवड्याची ही सफारी शेवटी व्यवस्थित संपली. साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण झाली! प्रत्येक जण प्रकृती सांभाळीत घरी गेला.या भ्रमंतीतील सर्व हॉटेल्स स्टारहॉटेल्स नसली तरी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व माफक दरात आवश्यक सोयी देणारी होती. आमचे शेवटचे निवासस्थान,”हार्ट सिक्स रॅच”, टेटाॅन नॅशनल पार्क मधील निवासस्थान सर्वाहून वेगळे होते. जंगलातील एका छोट्या टेकडीवर लहान लहान लाकडी खोल्यांचा हा परिसर होता. अगदीच दुसरी सोय मिळत नसेल तर कापडी तंबूही ठोकले होते. आमच्या खोल्यातील सोयी पाहता भाडे मात्र खूपच जास्त वाटले. फक्त झोपण्याची आंघोळीची व टॉयलेटची सोय होती. चहासाठी ही थंडीत हॉटेलच्या मुख्य किचनपर्यंत चालत जावे लागे. एका अमेरिकन शेतकरी कुटुंबाने आपल्या घोड्याच्या व जनावरांच्या पागा लगतच ही लहान लहान लाकडी घरे बांधली असून वर्षातून केवळ तीन-चार महिने हा उद्योग ते करू शकतात. बाकीच्या वेळी बर्फ पडल्याने येथील पर्यटन बंद असते.

    “आपले भाडे सोयींच्या मानाने निश्चितच जास्त आहे, आपण इथे थोड्या सोयी का वाढवत नाही?”हे आम्ही विचारल्यावर त्यांनी दिलेले उत्तर खूपच वेदना देणारे व भयावहही होते. मालक म्हणाला, ” दोन वर्षांपूर्वी आमच्या या रॅन्चवर काही जंगली श्वापदांनी हल्ला करून अनेक  जनावरे फस्त  केली,काही पळऊन नेली, वा जखमी अवस्थेत सोडून दिली. निर्वाहाचे साधनच नष्ट झाले. फक्त या हॉटेलच्या धंद्यावर आज आम्हा सर्व कुटुंबीयांची  उपजीविका चालू आहे!” हा व्यवसाय देखील वर्षातून फार तर तीन-चार महिने होऊ शकतो ,कारण बाकीच्या कालात  तेथे जोरदार बर्फ दृष्टी होत असल्याने पर्यटन व्यवसाय बंद असतो.

  आम्ही कोणत्या मनस्थितीत त्या तीन रात्री घालविल्या याची कल्पना येईल!

  फरशीवर पडलेला छोट्या-मण्या एवढ्या शुभ्र गारांचा थर!

  शेवटच्या दिवशी निघताना जोरदार गारांची वृष्टी झाली.  व मी तरी पहिल्यांदाच छोट्या छोट्या गारांचा सडा काही मिनिटासाठी जमिनीवर पडलेला पाहिला.

   सध्या उद्रेक होत नाही-पण जागृत आहे – अशा एका महाज्वालामुखीच्या प्रदेशात तीन दिवस फिरून आलो. अक्षरशः कल्पनातीत सुंदर, भव्य, त्याचबरोबर आपल्याला खुजेपणाची जाणीव करून देणारे निसर्गाचे वेगवेगळे अविष्कार तिथे पाहायला मिळाले.

हा सुंदर प्रवास  संपला आज या सुंदर भव्य निसर्गाचा माणसाने सुरू केलेला  विध्वंस बघून  एक विचार मनांत आला, तोही  सांगतो.. 

  8.भारतीय सनातन संस्कृती व निसर्ग संवर्धन:

    भारतीय संस्कृती निसर्गपूजक आहे. वेदकालापासून ते अगदी आजही आपल्या सणा उत्सवातून  हे लक्षात येते.आपला धर्म, अध्यात्म, कला, साहित्य सर्व निसर्गाने व्यापले आहे. निसर्गाचा व मानवी जीवनाचा अन्योन्य संबंध आहे हेच आमचे पूर्वज मानत होते. आपल्या संतांनीदेखील तोच विचार त्यांच्या साहित्यात मांडला. फक्त ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी जरी पाहिली तरी निसर्गातील अनेक घटकांचा उल्लेख त्यांच्या साहित्यात येतो. ज्ञानेश्वर केवळ संत नव्हते तर ते एक सौंदर्यवादी तत्त्वज्ञही होते !

   हजार वर्षापूर्वी ज्ञानेदेव म्हणतात,

   जयाशी भुकेलिया आमिषा, हे विश्व न पुरेसी घासा।

    कुळवाडीयांचीया आशा, चाळीत असे।।

   “काही लोकांची भूक  इतकी अफाट आहे की त्यांना खाण्यासाठी हे संपूर्ण विश्व ही पुरत नाही. त्यांनीच पृथ्वीवरील सर्व नद्या नाले डोंगर उद्याने झाडे भुई सपाट करून तेथे आपले साम्राज्य वसविले!”

सुंदर निसर्ग सौंदर्याने फुललेले नॅशनल पार्क आणि आज सुरू झालेला विध्वंस

   मला वाटते त्यांच्या या उद्विग्नतेवर आणि काही सांगण्याची आवश्यकता नाही. हजार वर्षांपूर्वीची ही व्यथा आहे तर आज काय बोलणार? परमेश्वरच या मानव जातीचे भले करो त्यांना सद्बुद्धी देवो एवढेच मला सांगावयाचे होते!!

    मोनू-उमेश कंपनी त्यांच्या गाडीने ङेनव्हरला  निघून गेली. आम्ही दोन कुटुंबे येलोस्टोन विमानतळावरून सॉल्टलेक सिटी पर्यंत एकत्र होतो.  तेथून प्रशांत-दीप्ती ऑस्टीनला तर आम्ही शिकागोला आलो.

संपूर्ण प्रवासात एकच संकट आले ते म्हणजे आमचे सॉल्ट लेक सिटी ते शिकागो हे विमान जवळजवळ आठ तास उशिरा सुटल्याने खूपच खोळंबा झाला. पण नशिबाने उशिरा का असेना विमानाने आम्हाला व्यवस्थित शिकागोला आणून सोडले. एका अभूतपूर्व विस्मयकारक सुंदर प्रवासाचा गोड शेवट झाला.. शेवटी प्रत्येक चांगली गोष्ट संपणारच!.. मात्र आठवणींचा भरपूर ठेवा मागे ठेऊन!! त्यातील या थोड्या आठवणी जपून ठेवण्याचा हा प्रयत्न!!

      दिगंबर वा राऊत.