प्रभाकर राऊत जीवन गौरव पुरस्कार

त्यागाचा वसा, ज्ञानाचा वारसा: सन्मित्र प्रभाकर राऊत यांची गुरुदक्षिणा.

   गोखले एज्युकेशन सोसायटी, बोधवाक्य.

     मित्रवर्य प्रि.राऊत सरांना नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीने जीवन गौरव पुरस्कार दिला व त्या पुरस्काराचा गौरव  झाला. त्यानिमित्त  सोसायटीच्या पालघर शाखेने दिनांक आठ एप्रिल 2026 रोजी बोर्डी हायस्कूलांत त्यांचा सत्कार केला. त्यानिमित्ताने काही आठवणी व  विचार.

  प्रभाकर राऊत सर हे माझे प्राथमिक शाळेपासून सहाध्यायी मित्र. आजही मला त्यांच्या संगतीचा, सहकार्याचा व मार्गदर्शनाचा लाभ होतो आहे हे माझे महाभाग्य ! 

त्यांच्या माझ्या मैत्रीचे वर्णन  मी पु. ल. देशपांडे यांच्याच शब्दात  करतो…

  “ रोज भेट व्हावी असं काही नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री …!”

  खरोखर आमच्या मैत्रीला ही व्याख्या चपखल लागू पडते. सध्या नाही पण आपापल्या व्यवसायांत असताना कधीतरी आमच्या भेटी होत असत, कधी पत्राने तर जाऊ द्या फोनवरून ही बोलणे होत नसे, पण भेटल्यावर मात्र दिलखुलास गप्पा होत. किती दिवसांनी आपण भेटत आहोत, कोणताच संपर्क कोणी का केला नाही यावर जराही अवाक्षर न बोलता जणू कालच आपण भेटलो होतो या उमेदीने मनसोक्त गप्पा होतात.. कधीही कोणताच किंतु ,अपेक्षा बोलण्यात नसते आणि परत कधी भेटू याची खात्रीही नसते त्यामुळे आजही ही मैत्री  टिकून आहे .

 असे मित्र केवळ, ऋणानुबंधाने मिळतात. मी खूप भाग्यवान. आजही मैत्रीतील तो गोडवा आठ दशकापूर्वी होता तसाच आहे.  पुढेही तो दीर्घकाळ असाच मिळावा  ही परमेश्वराकडे प्रार्थना आहे!

   काही व्यक्तींच्या केवळ संपर्कात आल्याने आपण एखाद्या विद्यापीठाच्या परिसरात आहोत असाच भास होतो. मित्र प्रभाकर राऊत सर हे असेच एक व्यक्तिमत्व.

  या मित्राचा त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या सत्कारा निमित्त मला व आमचे दुसरे सहाध्यायी मित्र डॉ. श्रीकांत सांम्ब्राणी  यांना मुख्य अतिथी म्हणून बोलाविले. आमचाही गौरव केला. त्या समारंभाच्या निमित्ताने माझ्या भावनांना दिलेले हे शब्द रूप!! 

 आमच्या या मित्राचे  वेगळेपण अशासाठी की बोर्डी शाळेतील त्या महान गुरुजनांची परंपरा , आपली जीवननिष्ठा म्हणून आयुष्यभर जोपासली. आणि  विद्यार्थ्यांना आपल्या आचरणाने ,कृतीने तशी शिकवण देऊन ही परंपरा वृद्धिंगत केली.  

  “ मी या गावातील व परिसरातील एकही दिवा शिक्षणाशिवाय विझु देणार नाही…”  आचार्य भिसे गुरुजींनी शंभर वर्षांपूर्वी घेतलेली ती प्रतिज्ञा राऊत सरांनी सुद्धा घेतली आणि ती खरी करून दाखविली. सेवानिवृत्तीनंतरही  सुमारे 25 वर्षे आजतागायत हा ज्ञानयज्ञ चालूच आहे..!

  आज राऊत सरांचे अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक, फौजी ,राजकारणी झाले आहेत. आपल्या सरांचे उपकार स्मरून त्यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. हाच त्यांना मिळालेला खरा जीवनगौरव . तो गेली अनेक वर्ष मिळतच होता. आज तो जाहीर झाला एवढेच !!

कार्यक्रमास उपस्थित असलेला श्रोतृवर्ग.

  1920 साली आचार्य भिसे ,गुरुवर्य चित्रे, प्रिन्सि. आत्माराम पंत सावे या त्रिमूर्तीने ज्या गावात रस्ते वीज तर सोडा एस् टी  देखील येत नव्हती अशा  दुर्लक्षित बोर्डी नामक खेड्यात हायस्कूल स्थापन केले. गोखले एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन प्रमुख प्रिन्सि. टी ए कुलकर्णी यांनी त्यांना मार्गदर्शन केले. ज्ञानाचा उजेड देणारी एक लहान पणती अज्ञानाच्या अंधकारात लावली. गेल्या शंभर वर्षात त्या पणतीचे रूपांतर एका झगमगत्या विद्युत दिपात  झाले आहे…. कारण, ती पहिली पणती पेटविणारांचे आशीर्वाद आणि प्रभाकर राऊत सरांसारख्या ध्येयवेड्या शिष्यांचे संपूर्ण समर्पित कार्य !

  आपल्या बोर्डी शाळेतून विद्या विभूषित होऊन ,पुढे उच्च पदव्या प्राप्त करून राऊत सरांनी इतर सर्व मोह बाजूला सारून शिक्षकी पेशाच स्वीकारला. आपल्या गुरुजनांचे कार्य व त्यांची स्वप्ने त्यांना खुणावत होती. ती साकार करण्याचे त्यांचेही स्वप्न होते.  1965 साली ते कोसबाड येथील आदिवासीसाठी उघडलेल्या विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले .

         पुढे काही काळ ओझर येथील विद्यालयात सेवा देऊन 1975 साली आजीव सभासद झाले. पुढे 1992 मध्ये बोर्डी हायस्कूलात मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली. बोर्डी हायस्कूलमधून प्रिन्सिपॉल म्हणून ते सेवानिवृत्त झाले..सेवेचे एक वर्तुळ  पूर्ण झाले.

      पण एवढ्यावर थांबून निवृत्तीनंतर आपल्या शेती वाडीत लक्ष घालण्याचे त्यांनी ठरविले असते तर कोणी दोष दिला नसता. पण निवृत्तीनंतरही आज गेली सुमारे 25 वर्षे अधिक जोमाने त्यांनी आपले काम पुढे ठेवले. ते देखील अगदी विनावेतन. असा कार्यकर्ता केवळ विरळा. सरांनी गेल्या दोन अडीच दशकात येथे विविध शिक्षण शाखांचा  ज्ञानवृक्ष फुलविला.

    “माझ्या शाळेत के.जी मध्ये प्रवेश घेतलेला आदिवासी विद्यार्थी, पी.जी (डॉक्टरेट)घेऊन बाहेर पडला पाहिजे . “

  ही गुरुवर्य आचार्य भिसे गुरुवर्य यांची मनिषा पूर्ण करून दाखविली. ते पाहण्यास आज आचार्य हयात नसले तरी आपल्या एका शिष्याने दाखविलेले हे कर्तृत्व पाहून त्यांनाही स्वर्गात अभिमान वाटला असेल. आचार्यांना खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली ! हे सामान्य काम नव्हते. अनेक अडचणी, अडथळे, आव्हाने होती. त्या सर्वावर मात करून सरांनी भगीरथ प्रयत्नाने ही ज्ञानगंगा बोर्डीच्या पावनभूमीवर अवतरविली. म्हणूनच मी प्रारंभी म्हटले  आहे,

 “सरांना मिळालेल्या जीवन गौरव पुरस्काराने त्या पुरस्काराचाच गौरव झाला आहे .”

 “बोर्डी ही शिक्षण पंढरी आहे” असे उद्गार कै. मधुकरराव चौधरी या महाराष्ट्राच्या माजी  शिक्षण मंत्र्यांनी बोर्डीस भेट दिल्यावर म्हटले होते.

  “आज या शिक्षण पंढरीच्या विठ्ठल मंदिरातील ‘विठोबा’ म्हणजे प्रि. प्रभाकर राऊत सर“ असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होऊ नये..

 कारण सरांचे बोर्डीतील कार्य व येथील बहुजन आदिवासी विद्यार्थ्यांना त्या सुविधामुळे होणारा लाभ , जीवन परिवर्तन ही क्रांतीच आहे. सर मला एकदा म्हणाले होते की या बोर्डीच्या शिक्षण संकुलात विशेषतः महाविद्यालयात जवळजवळ 90% आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत. ज्याआदिवासी बांधवांना एके काळी प्राथमिक शाळेचा दरवाजाही खुला नव्हता त्यांना आज पदवी, पदव्युत्तर शिक्षणाचे दरवाजे सताड उघडे व्हावेत याहून जास्त समाज परिवर्तन कोणते ?

   परवाच्या सत्कार समारंभात मी व आमचे मित्र डॉ. श्रीकांत साम्ब्राणी यांना विशेष अतिथी म्हणून बोलाविले होते. डॉ. सुहासिनी संत या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या. पालघर विभागातील सर्व शिक्षण संस्थांचे शिक्षक व कर्मचारी हजर होते. सुमारे 400 शिक्षक सहकाऱ्यांचा समुदाय मोठ्या आत्मियतेने व अभिमानाने उपस्थित होता.

   प्रभाकर सरांचे कुटुंबीय डॉ.इंद्रनील ,त्यांच्या सौभाग्यवती आले होते.

  सत्कार समारंभातील काही कृतज्ञतेचे क्षण (खालील छायाचित्र ): राऊत सरांचे चिरंजीव  डॉ. इंद्रनील राऊत (डावीकडे) व डॉ. सुहासिनी संत.  (उजवीकडे)

  डॉ. अंजली कुलकर्णी मॅडम व डॉ.वीणा मॅडम यांनी कार्यक्रमाची सुनियोजित आखणी केल्यामुळे कार्यक्रम जरी उशिरा सुरू झाला तरी तो विहित वेळेत पार पडला. डॉ.अंजली कुलकर्णी यांनी  उपस्थित न राहू शकलेल्या काही  सन्माननीयांचे संदेश वाचन केले.  त्यांच्या बोर्डी येथील एन बी मेहता कॉलेजच्या प्राचार्या या नात्याने सेवा देत असताना  मिळालेले राऊत सरांचे मार्गदर्शन व सहकार्य या बद्दल विस्तृत माहिती दिली. त्या काळात कॉलेजला मिळालेले अनेक बहुमान सरांच्या दूरदृष्टीने मिळाले हे त्यांनी आवर्जून सांगितले.

  डॉ. वीणा माच्छी यांनीही त्यांच्या स्वतःच्या सेवाकालात आलेले विविध अनुभव तसेच सध्या सरांच्या सहाय्यक म्हणून काम करताना मिळणारे मार्गदर्शन याचा उल्लेख केला.  सहका-यानी  तयार केलेले सन्मानपत्र वाचून दाखवले. अत्यंत समर्पक व कृतज्ञता भावनेने लिहिलेले हे मानपत्र या लेखात जोडले आहे. वाचनीय आहे.

   डॉ. सुहासिनी संत मॅडमनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रभाकर राऊतसर यांचे गोखले एज्युकेशन सोसायटी मधील योगदान व त्यांना मिळत असलेला सन्मान याबद्दल  माहिती दिली .हा बहुमान सोसायटी प्रथमच एखाद्या  सेवकाला देत असल्याचे त्यांनी सांगितले. सरांच्या बहुमोल निरपेक्ष निरलस कार्याबद्दल आजच्या व्यवस्थापनाला किती आदर आहे याची जाणीव या पुरस्कार प्रदानामुळे होते असे त्या म्हणाल्या.

   त्यानंतर पालघर विभागातील विविध शिक्षण संस्थांतील शिक्षक व कर्मचारी वर्गाने वैयक्तिकरित्या व सामूहिकरीत्या सरांना शुभेच्छा दिल्या, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला ,त्यांचे आशीर्वाद घेतले .पालघर जिल्ह्यातील या सुमारे 15 संस्थांचा कारभार विभागीय सचिव म्हणून राऊत सर पाहत असून या कामाची व्याप्ती किती अफाट आहे याची कल्पना उपस्थितांना आली . सरांचे सर्व सहकारी व कर्मचारी त्यांचे चरण स्पर्श करीत आशीर्वाद घेताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारी कृतज्ञता व समाधानाची भावना आपल्या या गुरूवर्याबद्दल यांना असलेल्या कृतज्ञता ,आदर व समाधानाची जाणीव करून देत होती.  एवढे प्रेम  आपुलकी ,आदर केवळ एका आदर्श आचार्यालाच मिळू शकतो .ते सरांना मिळत आहे. यापेक्षा जास्त दौलत व पुरस्कार कोणते?

      सरांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या शैक्षणिक जीवनाचा व गोखले एज्युकेशन सोसायटीमधील योगदानाचा विस्तृत शब्दात आढावा घेतला. ते म्हणाले..

  1965 साली आचार्य भिसे यांच्या इच्छेनुसार आदिवासी मुलांसाठी सुरू केलेल्या माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झालो..

1975 साली संस्थेने आजीव सदस्य केल्यामुळे संस्थेच्या व्यवस्थापन कमिटीचा पदसिद्ध सभासद झालो.

प्रिन्सिपल प्रभाकर राऊत सत्कारास उत्तर देताना.

     1992 साली बोर्डी शाळेत मुख्याध्यापक म्हणून बदली करण्यात आली .आचार्य भिसे गुरुजी, चित्रे गुरुजी बसत त्या खुर्चीत बसण्याचे मी  प्रथमच धाडस केले.  माझ्या कामाचे मूल्यमापन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या तुलनेत केले जाणार होते.

एस.एस.सी .,एच.एस.सी.चे निकाल  वाढवणे हे पालकांचे शैक्षणिक दर्जाचे दिशादर्शक असतात. त्यासाठी प्रथम शिक्षकांमधील आत्मविश्वास वाढवणे आवश्यक आहे ते जाणवले. त्यानुसार प्रयत्न केले. पालकांचे सहकार्य मिळवले. शाळेचा निकाल वाढवण्यासाठी प्रयत्न केले. यशस्वी झालो.

1994 साली आचार्य  भिसे गुरुजींच्या कर्मभूमीत जन्मशताब्दी  वर्ष. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात एन. बी. मेहता कॉलेज  सुरू केले. बोर्डी सारख्या छोट्या गावात विज्ञान महाविद्यालय सुरू झाले. विज्ञानाबरोबर वाणिज्य शाखेकडे जाण्याचा  विद्यार्थ्यांचा कल त्यामुळे विज्ञान शाखेबरोबर बी. कॉम., एम.कॉम. पर्यंत महाविद्यालयात सुविधा. कटगरा पॉलिटेक्निक 2011 ‌साली सुरू  केले.

तीस वर्षाच्या कालखंडात विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, माहिती तंत्रज्ञान इन्स्टिट्यूट तंत्रनिकेतन, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा अशा प्रकारचा शैक्षणिक विस्तार होत गेला. आज संस्थेच्या बोर्डी संकुलामध्ये साडेसात हजार विद्यार्थी शिकत आहेत.

  1992 साली पहिली ते बारावी पर्यंत चौदाशे विद्यार्थी होते. हे सर्व बदल घडून आणण्यासाठी योग यावे लागतात कुणीतरी पुढाकार घ्यावा लागतो त्यासाठी संस्थेचे मोठे सहकार्य लाभले. 2020 हे शाळेचे शताब्दी वर्ष. शंभर वर्षाच्या कालखंडामध्ये एक मोठा  महत्त्वाचा टप्पा शाळेने गाठला.

माझ्या आयुष्याच्या 85 वर्षाचा टप्पा पूर्ण झालेला आहे .सेवानिवृत्तीनंतर संस्थेने सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल संस्थेचा ऋणी आहे. संस्थेचे सचिव माननीय सर डॉ. गोसावी, अध्यक्ष पंडित सर यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवून मला संस्थेच्या विविध केंद्रात काम  करण्यास प्रवृत्त केले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे..

      “शिक्षक हा माझा धर्म आहे 

      शाळा माझे मंदिर आहे 

शाळेतील माझे विद्यार्थी माझे देव आहेत

आणि त्यांच्यासाठी मनोभावे  अध्यापन करणे ही माझी खरी देवपूजा आहे.”

   आयुष्यात मिळालेल्या यशाचे श्रेय त्यांनी आपले सर्व गुरुजन व सहकारी यांना दिले. आपण केवळ निमित्तमात्र आहोत अशी भावना व्यक्त केली. आपली पत्नी सौ. रेखा, दोन्ही चिरंजीव, स्नुषा, नातवंडे व कुटुंबीय यांचे सहकार्य, प्रेम याविना हे योगदान देऊ शकलो नसतो, असेही प्रामाणिकपणे सांगितले.

  प्रिन्सिपल स्वाती सावे मॅडमनी मोजक्या शब्दात सर्व उपस्थितांचे आभार मानले. एक सुंदर हृद्य कार्यक्रम संपला. विशेषत: बोर्डीतील सर्व शिक्षक व सहकारी यांनी या कामासाठी खूप सहकार्य दिल्याचे नमूद केले.

  कार्यक्रमाचे अत्यंत समर्पक, परिणामकारक शब्दात समालोचन  शिक्षिका श्रीमती मानसी पाटील व कल्पना मॅडम यांनी केले .

   सुग्रास भोजनाचा आनंद घेताना.. भोजनापेक्षा या संगतीचा आस्वाद अधिक होता!

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना भोजनाचे आमंत्रण होते. व सुग्रास भोजनाचा आस्वाद अनेकांनी घेतला.

        माझ्या भाषणात मला राऊत सरांबद्दल खूप बोलता येण्यासारखे होते. गेल्या अनेक दशकातील मैत्रीत खूपच विविध प्रसंग आले. सर्व भावना शब्दातून सांगणे कठीण होते. वेळेचे बंधन होते. अगदी थोडक्यात दहा-बारा मिनिटात मी माझे हृदगत व्यक्त केले . त्या भावनांना दिलेले हे शब्द रूप…

   सत्कार समारंभाचे जाहीर आमंत्रण.

या समारंभाच्या जाहीर आमंत्रणातील पहिल्या दोन ओळीबद्दल खूप कौतुकाने बोललो. त्या दोन ओळीतच निमंत्रण कर्त्यांनी सरांच्या संपूर्ण शैक्षणिक कार्याचा आलेख बंदिस्त केला आहे. मला  खूप भावलेल्या त्या ओळी..

   ..”ज्ञान ,संस्कार, सचोटी आणि प्रेरणेचा अखंड स्त्रोत असणारे ,शिक्षण सेवेचे असीधारा व्रत ज्यांनी अविरत जोपासले ते आपल्या गो ए सोसायटीचे पालघर विभाग सचिव प्राचार्य प्रभाकर राऊत यांना त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याची दखल घेत जीवन गौरव पुरस्काराने  गौरविण्यात आले आहे….”

  त्या  ओळींचा आधार घेत सरांच्या कर्तुत्वाचा व आमच्या मैत्रीचा ,सोदाहरण आलेख मांडण्याचा मी प्रयत्न केला.माझ्या आठवणी आणि आमच्या तत्कालीन गुरुजनांचा राऊत सरांच्या जीवननिष्ठेवरील प्रभाव त्यातून दिसून यावा ,एवढी अपेक्षा होती. 

  ज्ञान संस्कार सचोटी आणि प्रेरणेचा स्त्रोत म्हणजेच राऊत सर ,….का..?

   मुख्य अतिथी म्हणून सत्कार व दोन शब्द बोलण्याचा बहुमान.

   ज्ञान. ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातून ,शाळेतून पदव्यांतून मिळविलेले पुस्तकी ज्ञान नव्हे. फक्त तेवढे ज्ञान मिळवणारा ,ज्ञानी  संज्ञेस लायक होत नाही. . खरे ज्ञान म्हणजे ,

 “ जे अनोळखी, अनाम क्षणांमध्येही दिव्यत्व पाहण्याची दृष्टी देते, भविष्याचा वेध घेते..”

  माझ्या ज्ञानाचा उपयोग माझ्या समाजासाठी आणि देशासाठी व्हावा ही दिव्यत्वाची भावना एके क्षणी प्रभाकर राऊत सरांना झाली.त्यांनी त्या भावनेचा सन्मान करून . आपल्या जीवनात ते सार्थ करून दाखविले. भविष्याचा वेध घेत ध्येयाचा पाठपुरावा केला, म्हणून ते खरे ज्ञानी!!अगदी सेवानिवृत्तीनंतर आजतागायत ते काम चालू आहे. एका  संस्कृत सुभाषितात म्हटले आहे…

  “विद्या विवादाय धनं मदाय

 शक्ति: परेषां परिपीडनाय |

   खलस्य साधो: विपरीतमेतद्

ज्ञानाय दानाय च रक्षणाय|”

 अनेक लोक आपली  विद्या विवादासाठी, धन गर्व करण्यासाठी आणि शक्ती इतरांना पीडा देण्यासाठी वापरतात .  ज्ञानी आपली विद्या लोकांना शहाणे करण्यासाठी,  धन दान करण्यासाठी, तर शक्ती दुर्बलांच्या रक्षणासाठी वापरतात.. 

 प्रि.राऊत सरांनी आपल्यापाशी जे काही होते ते सर्व  गरिबांना, विद्यार्थ्यांना सहकाऱ्यांना त्याचा लाभ मिळावा  यासाठी केला.

     आमचे गुरु आचार्य भिसे एक तपस्वी कर्मयोगी याच अर्थाने ज्ञानी  होते. आपले सेवा व्रत त्यांनी एकनिष्ठेने तळमळीने फक्त या घोलवड बोर्डी कोसबाड परिसरा पुरते सीमित ठेवले. प्रत्यक्ष भारताच्या राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्रिमंडळात देऊ केलेली संधी त्यांनी नम्रपणे नाकारली. ज्ञानामुळे दिव्यत्वाची प्रचिती येते ती अशी !!आजच्या जगात ही केवळ दंतकथा वाटावी अशी सत्यकथा. राऊत सरांनी तोच आदर्श पुढे चालविला आहे.

   आता संस्कार ‌राजाला राज्याभिषेकाचा संस्कार करून आपण राजे झालो आहोत हे जगाला सांगावे लागते. आज शैक्षणिक जगतात अनेक शिक्षण महर्षीना, 

  अनेक  शाळा कॉलेजे स्थापन करून आपण किती कार्यसम्राट झालो आहोत हे सांगावे लागते. विविध माध्यमांतून तशा जाहिराती लाखो रुपये खर्च करीत रोज प्रसिद्ध कराव्या लागतात. आणि ही शिक्षणाची साधने  केवळ धनाची लूट करण्यासाठी  वापरली जातात .

 प्रभाकर राऊत सरांना आपल्या कामाबद्दल तसा आक्रोश कधीच करावा लागला नाही. शाळा कॉलेज यांच्या प्रवेशातून गरिबांना नाडण्याचा हेतू तर अजिबात नव्हता. उलट सर्वांना जमेल तेवढी मदत करावयाची, योग्य विद्यार्थ्याला थोडे कमी मार्क  असले तरी परिस्थितीनुसार त्यालाही प्रवेश द्यायचा. हेच तत्व त्यांनी पाळले आहे .हा त्यांचा धर्म होता. आपण सर्वजण त्यांचा सन्मान करीत आहोत कारण,  सरांच्या बाबतीत आहे ,

   “स्वयमेव मृगेंद्रिता.. 

   “वनराजाला कधीच राज्याभिषेक करावा लागत नाही. त्याचे केवळ अस्तित्व म्हणजेच त्याचे श्रेष्ठत्व असते. सर्व वनचर, वनवासी त्याला आपोआप राजेपद बहाल करतात. सन्मान देतात. राऊत सरांना हा संस्कार त्यांच्या शिष्यांनी, मित्रांनी सहकाऱ्यांनी कधीच बहाल केला आहे. आजचा सत्कार एक दाखला आहे!

     प्रभाकर राऊत सर आणि सचोटी याबद्दल काय बोलावे ? आपल्या कामातील प्रामाणिकपणा, निष्ठा, नैतिकता या सर्वांचे सुंदर मिश्रण म्हणजे राऊत सरांचे व्यक्तिमत्व ! त्यांच्या कारकीर्दीत बोर्डी विभागात कितीतरी नवीन शिक्षण संस्था उभ्या  राहिल्या. दात्यांकडून रोख पैसे न घेता सर्व उभारणीची जबाबदारी दात्यावरच सोपविली. त्यामुळे आज एवढा पसारा उभा करूनही सरांच्या सचोटीबद्दल शंका घेऊन त्यांच्याकडे कोणीही अंगुली निर्देश करू शकलेला नाही, भविष्यात करणार नाही.

  बाहेरच्या शिक्षण संस्थेतून आलेली एक विद्यार्थिनी एन बी मेहता कॉलेजमध्ये  प्रवेशासाठी  आली होती. तिचे पालक बरोबर होते .काहीतरी डोनेशन द्यावे लागणार या तयारीनेच ते आले होते .तशी इच्छा  त्यांनी सरांजवळ अप्रत्यक्ष दर्शविली. सर गप्प होते…म्हणाले ,”तुमच्या मुलीला मी प्रवेश देतो आहे   आमच्या संस्थेला त्याबाबत कोणतेही डोनेशन नको तिने चांगला अभ्यास करून स्वतःचे व आमच्या कॉलेजचे नाव उज्वल करावे ही आमची अपेक्षा आहे! ..”

 त्या पालकांचे ओले झालेले डोळे व त्या विद्यार्थ्यिनीच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव पाहणारा मी साक्षीदार होतो. कारण त्यावेळी मी सरांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो .

   हे किती मोठे यश आहे, हे किती पुण्य कर्म आहे !

  एका महान शैक्षणिक प्रतिष्ठानात काम करताना  सर्वांची मने राखावी लागतात. सत्यही बोलायचे व मनेही दुखवायचे नाहीत आणि सर्वांकडून सहकार्य मिळवून आपले साध्य साध्य करायचे …हेच ते असीधाराव्रत.. 

   “सत्यम ब्रुयात ,प्रियम् ब्रुयात. 

   न ब्रुयात सत्यम अप्रियम्.

    प्रियं च नानृतं ब्रूयात्..”.

सत्य बोला पण ते प्रिय बोला, अप्रिय सत्य बोलू नका. प्रिय असलेले असत्य ही बोलू नका.

आयुष्यात ,सचोटीची ही कसोटी आहे .राऊत सर या कसोटीस उतरले म्हणून ते सचोटीस पात्र झाले.

    भिसे चित्रे गुरुजींचा  शिष्य, प्रभाकर राऊत, जगातील कोणत्याही कसोटीस नक्की उतरेल. व प्रशंसेस  पात्र होईल कारण त्यांच्या चारित्र्यात पुरेपूर नैतिकता भरलेली आहे.

   राऊत सरांकडून मिळणारी प्रेरणा? आपण एखाद्या कार्याचे सिद्धीसाठी आपण स्वतः अविरत कष्ट करणे, ते कार्य सिद्धीस नेणे व एवढे करूनही त्या केलेल्या यशस्वी कामाचे श्रेय आपल्या सहकाऱ्यांना देणे, हीच राऊत सरांकडून सतत मिळणारी ऊर्जा ! 

 एवढी मोठी संस्थाने प्रस्थापित करताना त्यांना किती भ्रमंती व कष्ट करावे लागले असतील याची कल्पना आम्हाला येणार नाही .त्यांनी उभ्या केलेल्या प्रत्येक संस्थेच्या निर्मितीमागे कष्टाचा डोंगर आहे. दात्यांनी देणग्या दिल्या. मात्र देणगीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी  बारीक देखरेख ठेवण्यासाठी ,केलेल्या कष्टांची मोजदाद कोण करणार ? त्यांच्याशी बोलताना या भ्रमंतीची ,श्रमांची  कल्पना येते त्याबद्दल ते कधीही कुणाशी बोलणारही नाहीत एक मित्र म्हणून कधीतरी माझ्याशी या आठवणी सांगतात. ते सर्व कष्ट त्यांनी कर्तव्य म्हणून केले आणि ही विद्यानगरी उभी राहिली.

   म्हटले आहेना..

 “ उद्यमेन ही सिद्धंति कार्याणी न मनोरथे,

  न ही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृग: !”

   एवढ्या मोठ्या कार्याचा मोठा डोलारा उभारताना केलेल्या मेहनतीची परवा न करता प्रसंगी मानापमानाची ही पर्वा न करता केवळ आपल्या गुरुजनांच्या आणि कामाच्या निष्ठेपायी सरांनी अगदी आपल्या निवृत्तीनंतरच्या काळातही हे दैदिप्यमान काम करून दाखविले त्यांच्या जीवनापासून सर्वांना मिळणारी हीच ती चिरकाल प्रेरणा!!

   आमचे गुरुवर्य आचार्य भिसे हे तर प्रेरणेचा एक महान स्त्रोत होते आम्ही विद्यार्थी इतर त्यांचे सहकारी ,इतकेच नव्हे तर परिसरातील वनवासी आदिवासींना संघटित करून एक नवजीवन देण्याचा प्रयत्न केला. अनेक जंगल सहकारी सोसायटी स्थापन केल्या. हे एक महान परिवर्तन होते.

  स्वातंत्र्य लढ्याच्या काळात तरुणांना उत्तेजन देऊन अन्यायाविरुद्ध लढताना स्वतः  तुरुंगवास भोगला आहे.

निवृत्तीनंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला ,तेव्हा आकाशाकडे बोट दाखवून ते म्हणत ..

  “तेथेच मला विश्रांती मिळेल..”

   आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत आचार्य सतत काम करीत राहिले.. शेवटच्या घटके पर्यंत!

अशा आचार्याच्या जीवनातून त्यांच्या शिष्यांना प्रेरणा न मिळेल तरच नवल. आचार्यांच्या पावलावर पाऊल ठेवतच प्रभाकर राऊत सरांनी आपले कार्य केले . म्हणून त्यांचेही जीवन एक प्रेरणास्थान  झाले आहे.!!

  गोखले एज्युकेशन सोसायटी ,पालघर विभागाने प्रि.प्रभाकर राऊत सरांना दिलेले मानपत्र.

   भिसे चित्रे सावे या त्रिमूर्तीने  शंभर वर्षांपूर्वी रोपलेल्या व त्यांच्या अनेक अनुयायांनी पुढे जोपासलेल्या त्या ज्ञानवृक्षाचा आज अनेक पारंब्यांनी बहरलेला आधारवड झाला आहे. प्रिन्सिपल टी ए कुलकर्णी सर यांचे आशीर्वाद या त्रिमूर्तीला  होते म्हणून हे काम सुलभ झाले.गोखले एज्युकेशन सोसायटीतील  भूतकालांत व वर्तमानात कार्यरत असलेले अनेक पदाधिकारी  व धुरीण विशेषतः कै.डॉ. सर एम .एस .गोसावी, डॉक्टर पंडित सर यांचा या दैदिप्यमान वाटचालीत खूप मोठा वाटा आहे. राऊत सरांना आपल्या शैक्षणिक वाटचालीत अनेक मान्यवरांनी आशीर्वाद व मार्गदर्शन दिले आहे व त्याचा ते नेहमी कृतज्ञतापूर्वक उल्लेखही करतात.

    या बोर्डी घोलवड आणि परिसरात आमच्या गुरुजनांनी काही श्रेष्ठ परंपरा निर्माण केल्या. प्रि. प्रभाकर राऊत सरांनी त्यांचे जतन करीत  आजतागायत सांभाळल्या. त्यांच्या सहकाऱ्यांना भविष्यात ही त्यांचे जतन करावयाचे आहे.याच संदर्भात आचार्य भिसे  गुरुजींवरील तस्मै श्री गुरुवे नमः माझ्या पुस्तकातील खालील ओळी मी पुन्हा उद्धृत करीत आहे..

    “राष्ट्रभक्तीची, औपचारिक व अनौपचारिक शिक्षणाची, सर्वोदयाची, रचनात्मक कार्याची, कृषी विकास आणि संघर्षाची ,अशा अनेक विविध परंपरा या बोर्डी परिसरात निर्माण झाल्या. कालांतराने त्या एकमेकात मिसळून त्यांचा एक ताकतवान प्रवाह निर्माण झाला…आणि त्यातून एक नवा समाज निर्माण झाला.सामाजिक कार्याचा अभ्यास करणाऱ्याला स्तिमित करणारे हे दृश्य आहे…”

    माझे मित्रवर्य व सहाध्यायी प्रभाकर राऊत सर या नवसमाज निर्मितीच्या कार्याचे एक साक्षीदार आहेत.एवढे म्हटले तरी त्यांच्या कामाचा आवाका लक्षात येईल.. 

  माझ्या व्यावसायिक निवृत्तीनंतरही शाळेच्या व एन बी मेहता कॉलेजच्या अनेक उपक्रमात प्रभाकरने  मला सहभागी करून घेतले. त्यांच्यामुळे शाळेशी आजपर्यंत जोडलेला राहिलो. एन बी मेहता कॉलेजच्या मा.प्राचार्या डॉ. अंजली कुलकर्णी व त्यांचे सर्व सहकारी यांचे बरोबर काम करताना मला  खूप गोष्टी शिकता आल्या. 

   आम्हा उभयतांच्या मैत्रीत जास्त लाभ मलाच झाला. त्या संदर्भात खूप आठवणी सांगता येतील पण त्या पुढे कधीतरी .. ?

  माझे पहिले पुस्तक “तस्मै श्री गुरुवे नमः” श्री. प्रभाकर राऊत, डॉ. श्रीकांत सांब्राणी या माझ्या दोन शालेय मित्रां घ्या सहकार्या मुळे प्रसिद्ध झाले. आमच्या महनीय गुरुजनांना माझ्यासारख्या एका लहान विद्यार्थ्याने दिलेली ती शब्दसुमनांजली आहे. 

    आपल्याला कधीही कोणतीही गरज पडली तर एक तरी व्यक्ती आपल्याला समजून घेण्यासाठी  उपलब्ध आहे, ही भावनाच किती उदात्त व सुखदायक आहे?प्रभाकर राऊत सरांच्या मैत्रीमुळे मला हे समाधान सतत असते. असे  मित्र मिळण्यासाठी,आपण कोणासाठी जगतो व कोण आपल्यासाठी जगतोय हे कधीतरी आयुष्यात कळायला हवे. माझ्या सुदैवाने योग्य वेळी मला ते कळले आणि हा मैत्रीचा लाभ आजपर्यंत मी घेतो आहे.

     मला वाटते आमची  मैत्री  स्वाती नक्षत्रातील  शिंपल्यात पडलेल्या पावसाच्या थेंबाप्रमाणे  आहे.  मैत्रीचे हे मौत्तीक आयुष्यातील  मर्मबंधातील ठेव आहे.,एवढेच सांगतो.

 आमच्या बोर्डी हायस्कूलातील गुरुजनांनी आम्हाला,

 “सत्याचे आचरण वाईटाचे निर्गमन आणि शिक्षणाचे आचमन”

 ही शिकवण दिली. प्रि.प्रभाकर राऊत यांनी ती शिकवण तंतोतंत पाळली. आजही त्यांचे “शिक्षणाचे आचमन”चालूच आहे .म्हणून त्त्यांचे खास कौतुक.!

    माननीय प्रभाकर राऊत सरांसारख्या महान गुरुवर्याचा विद्यार्थी, सहकारी, शिष्य, मित्र होणे सामान्य गोष्ट नाही. त्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतील. 

   “नैतिकता व विवेक शाबुत ठेवत आपल्या जीवनाची वाटचाल चालू ठेवा तर कोणाचीही परवा करण्याची गरज नाही. …जीवन सफल  होणारच आहे. ..”

 हाच त्यांच्याशी संबंधितांना संदेश. या गुरुने आपल्या स्वतःच्या आचरणातून  यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली दिली आहे..”  . 

           माझ्या या प्रिय मित्राला मनःपूर्वक वंदन करून मी  त्याच्या पुढील कार्यासाठी  निरोगी निरामय जीवन मिळो अशी प्रार्थना करतो .

दिगंबर राऊत.

माजी विद्यार्थी