मी मोठी आई बोलते, भाग १३

मोठीआई आता आमच्यात नाही. पण मोठीआईची १०४ वर्षाची कहाणी तिच्याच शब्दात लिहिली होती, अनेकांच्या विनंतीनुसार त्याचे लेखांक चालू ठेवीत आहे.

 बेटेगाव बाजार, गोशाळा…

   त्या  रात्री पावसाळी-संध्याकाळी मदत करून गेलेला देवदूत…

   मागच्या भागात  उमरोळी गावातील आमच्या दीर्घ वास्तव्याबद्दल मी  सांगितले. संसारिक आयुष्यातील ते एक आनंदी, समाधानी पर्व होते. आप्पांची बोर्डी शाळेत बदली झाली. उमरोळीतीला मुक्काम संपवून आम्ही बोर्डीत पुन्हा परत आलो. 1947, 48 साल असावे. आता दिगू बाळू बरोबर छोटी अरुणाही आमच्या घरात आली होती. संसार वाढत होता. जबाबदाऱ्या वाढत होत्या. तरीही  समाधान व आनंद वृद्धिंगत होत होता‌.

   ऊमरोळीचा निरोप घेण्यापूर्वी ऊमरोळी शेजारील  बेटेगाव, तेथील आठवड्याचा बाजार, बाजार आटोपून परत येताना घडलेला एक जीवघेणा प्रसंग, बेटेगावची गोशाळा, गोपीनाथ पाटील (दादा), या माझ्या बंधूंची बेटेगाव गोशाळेतील सेवा, याबद्दल काही आठवणी सांगून हे प्रकरण संपविते.

गोपीनाथ दादा व सुशीला दादी.

   ऊमरोळीपासून चार-पाच किलोमीटर अंतरावर बेटेगाव हे एक छोटे गाव आहे. गेले कित्येक वर्षापासून अजूनही दर आठवड्याला  तेथे बाजार भरत असतो.भाजीपाला, फळे , धान्य, डाळी, मसाले, सुके ओले मासे,दैनंदिन उपयोगाच्यावस्तू, कपडे ,कोंबड्या, बकऱ्या, गाई बैलासारखी जनावरे, अशा अनेक वस्तूंचा व जनावरांचा बाजार  तेथे भरतो. आजूबाजूच्या गावातीलच नव्हे तर अगदी पालघर डहाणू सारख्या शहरांतूनही त्यावेळी लोक हा बाजार करण्यासाठी येत असत.  कधीतरी मी देखील त्या बाजारात उमरोळीहून सकाळच्या वेळी जाई. खरेदी करून संध्याकाळी उमरोळीस येई. कधी माझे बरोबर माझ्या मैत्रिणी दुर्गा,भागु यमू असत. कधी दिगूही हट्ट करून आमचे बरोबर  बेटेगाव बाजार पाहायला येत असे.

  कै.सौ. सुशीला दादी व बंधू कै.गोपीनाथ पाटील.

  बेटेगाव बाजारात जाण्याचे दुसरे कारण म्हणजे माझे बंधू गोपीनाथ पाटी,तेथील गोशाळे मध्ये व्यवस्थापक म्हणून काम करीत होते.हिंदू गोरक्षक मंडळींनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी भारतात काही गोशाळा स्थापन केल्या आहेत. त्यातील बेटेगावची गोशाळा ही खूप जुनी गोशाळा आहे. आज तर ती अद्ययावत झाली आहे.

   आजची अत्याधुनिक बेटेगाव गोशाळा.
   बेटेगाव गोशाळेतील गाईंचे  शास्त्रीय पद्धतीने संगोपन व प्रजनन.

  “ हिंदू गोरक्षक समिती” ही एक पुरातन भारतीय संस्था आहे. गाईंचे रक्षण,त्यांचे संगोपन व संवर्धन करणे, चांगल्या देशी गाईच्या प्रजाती निर्माण करणे व एकंदरीतच समाजात गाईं बद्दल आस्था, पूज्य भाव निर्माण करून आपल्या सनातन भारतीय धर्माने सांगितलेले गोमातेचे पावित्र्य व महत्त्व लोकांना पटविणे हे त्यांचे मुख्य कार्य आहे.बेटेगावच्या  गोशाळेत गाई तसेच इतर जनावरांना एका छत्राखाली एकत्र आणून चारा पाणी आणि औषधे अशा सुविधा पुरविल्या जातात. चांगल्या वळूंची शास्त्रीय पद्धतीने निपज केली जाते.गाईपासून निर्माण होणाऱ्या दूध व इतर दुग्धजन्य पदार्थांची  सवलतीच्या दरात विक्री केली जाते. गोपीनाथ दादांनी याबाबतीत शास्त्रीय प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे त्या गोशाळेचे व्यवस्थापक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. तेथील शेती बागायत, फळफळावळ ,जनावरांची शास्त्रीय पद्धतीने केलेली निगा, दूध व इतर दुग्धजन्य पदार्थांचे निर्माण, सर्वच खूप पाहण्यजोगे होते.

   आज उपलब्ध झालेल्या संशोधनानुसार भारतीय देशी गायीचे दूध व त्यापासून निर्माण झालेले पदार्थ हे गुणवत्ता व पोषणद्रव्याच्या दृष्टीने खूप सरस मानले गेले आहेत.त्यांचे औषधी गुण सिद्ध झालेले आहेत. भरपूर दूध देणाऱ्या संकरित गाईंच्या दुधापेक्षा आमच्या या कमी दूध देणाऱ्या देशी गाईंचे महत्त्व आज जगाला पटले आहे. याचे मोठे श्रेय त्यावर संशोधन करून ते जगाला पटवून देणाऱ्या गोरक्षक मंडळीला आहे.आमच्या पूर्वजांनी हे ज्ञान कितीतरी वर्षांपूर्वी मिळविले होते .त्याचा ते वापरही करीत होते. दुर्दैवाने पारतंत्र्याच्या काळात समाजाला या ज्ञानाचा व परंपरेचा  विसर पडला होता.आज त्या विस्मृतीत गेलेल्या ज्ञानाला व  परंपरेला विविध प्रकारे सन्मान मिळतो आहे, त्याचे महत्त्व वाढते आहे,ही आनंदाची गोष्ट आहे. माझे बंधू गोपीनाथ यांचा हातभार बेटेगाव गोशाळेतील सेवेमुळे या चांगल्या कामास लागत होता. त्यामुळे मला अभिमान होता व ती गोशाळा पाहण्याचे औत्सुक्यही होते. 

   सकाळी उमरोळीहून निघून मी बेटेगाव बाजारात जाई. बाजार करी‌. दादांच्या घरी जाऊन तेथेच भोजन व विश्रांती घेई.दुपारी परत घरी येण्यासाठी निघे. दादांची पत्नी दादी(,सुशीला) खूप प्रेमळ व आदरातिथ्यशील होती. सुगरण होती. भोजनोत्तर आमच्या मनसोक्त गप्पा होत. बोर्डीच्या आठवणी निघत. तिची मुले शारदा, विपिन त्यावेळी बोर्डीत शिक्षणासाठी होती. छोटी उषा ,उत्कर्ष, खूप लहान होते. दिगू तेथे गेल्यावर त्याचे खूप लाड होत. म्हणून त्याला बेटेगाव आवडे.

 दादी भरपूर खावयास देई. निघतानाही त्याच्यासाठी बाटलीभर दूध व फळे भरून देई. दिगुला बेटेगावची भेट म्हणजे एक उत्सव वाटत असे. दादांना स्वतंत्र टुमदार बंगला असल्याने येथील सर्वच वातावरण उत्साहाने भरलेले असे. खूप प्रसन्न वाटे. दोन घटका समाधानात जात.

     बेटेगाव बाजार दृश्य.

   एक-दोन वेळेस माझ्याबरोबर माझ्या शेजारच्या मैत्रिणी दुर्गा,भागुही बेटेगाव बाजारात आल्या होत्या. त्यांचेही दादीने खूप प्रेमाने स्वागत केले. दोघींनाही दादी विषयी खूप आत्मीयता होती. त्याही बेटेगावला बाजारात येऊन दादीला भेटण्यास उत्सुक असत.

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ,यांनी बेटेगाव गोशाळे ला दिलेले शिफारस पत्र.

    दादांनी मला हा गोशाळेचा संपूर्ण परिसर फिरून दाखविला होता. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद स्वातंत्र्यापूर्वी, बेटेगावला येऊन राहिले होते.भारतीय गायी व जनावरावर कोणत्या प्रकारचे संशोधन चालते हे त्यांना प्रत्यक्ष पाहावयाचे होते .आठवडाभर ते बेटेगाव  गोशाळेतच एका छोट्या खोलीत राहिले होते. त्यांचे तेथील निवासस्थान व त्यांनी गोशाळेला दिलेले शिफारस पत्र तेथे जपून ठेवले होते. या लेखातच राष्ट्रपतींच्या हस्ताक्षरातील त्या पत्राची प्रत मुद्दाम दिली आहे .यावरून त्या गोशाळेचे त्यावेळी असणारे महत्त्व व लौकिक याची कल्पना येते. गोशाळेत प्रजनन केलेला एक महाकाय वळू मी त्या काळात पाहिल्याचे आठवते. त्याचे फोटोही तेथे  लावले होते. 

  विशेष पद्धतीने प्रजनन करून जोपासलेला महाकाय वळू.

   आमची बदली बोर्डीला झाली व काही अंतराने दादा -दादींची बदली कांदिवली येथील गोशाळेत झाली. दुर्दैवाने कांदिवली गोशाळेत वास्तव्यास असताना आमची लाडकी सुशीला दादी हिचे दुःखद निधन झाले. अगदी अचानक ही घटना घडली. या कुटुंबावर एक महान आघात होता. तिची पाच छोटी मुले निराधार झाली. छोटा गजू काही महिन्याचा असलेल? दादांचा सुखी संसार क्षणात उध्वस्त झाला. माझी जीवाभावाची मैत्रीण गेली. सुशीला दादी आज नसली तरी तिच्या प्रेमाच्या व सहवासाच्या अनेक आठवणी माझ्या हृदयात आहेत. अतिशय सात्विक वृत्तीची, हसरी समाधानी व दुसऱ्याबद्दल सदैव आपुलकी बाळगणारी अशी ती व्यक्ती होती. आमच्या पाटील कुटुंबातील सर्वांचे अगत्य ती करी. अगदी मोजके बोलणे व हसरा चेहरा व ठेगणी सुबक अशी तिची ठेवण होती. कोणीही बेटेगावला आल्यास त्याचे मनापासून आदरातिथ्य  करी. तिने सर्वांना प्रेम दिले ,सर्वांची हृदये जिंकली. पण म्हणतात ना ..”जो आवडतो सर्वांना…”  देवाने तिला लवकर बोलावून घेतले! तिच्या निधनाने सर्वांनाच अति दुःख झाले.

  आप्पांची बोर्डी शाळेत बदली झाल्यावर सातव्या इयत्तेतील मुला मुलींची एक वार्षिक सहल बेटेगावला गेली होती. त्यावेळचे जुने विद्यार्थी आजही त्या सहलीची आठवण करतात. दादीचे अगत्य व पाहुणचार आठवतात. रात्री सर्वांना दादीने स्वतः जेवण करून वाढले होते. अशी माणसे आयुष्यात भेटणे हे सद्भाग्यच !

    पुढे गोपीनाथ दादांनी पुनर्विवाह केला. आपल्या लहान मुलांना आईचा आधार दिला. नव्या पत्नीलाही आम्ही दादीच म्हणत असू.   सुशीला दादी ,बेटेगाव, बाजाराच्या निमित्ताने झालेल्या आमच्याभेटी, गप्पा  तिच्या सुंदर भोजनाचा आस्वाद.. तिचे प्रेम आणि दुर्दैवी अकाली अंत.…सगळ्या गोष्टींची आठवण झाली की मन दु:खी होते. तिच्या प्रेमळ स्मृतीला नकळत वंदन होते.

    बेटेगावचा बाजार करून उमरोळीस घरी परत येत असताना एकदा खूपच बिकट प्रसंग माझ्यावर ओढवला होता. केवळ सद्गुरूकृपेमुळे मी त्यातून सुखरूप पार पडले. .. तेव्हापासून आप्पांनी मला बेटेगाव बाजार बंद केला.!. 

   तो प्रसंग असा ..

 त्यादिवशी छोट्या दिगुला घेऊन मी बेटेगाव बाजाराला गेले होते. बहुदा जुलै महिन्याचे पावसाळी दिवस असावेत. सकाळी छान ऊन असल्याने पावसाची भीती नव्हती. बाजार करून दादीकडे भोजन करून गप्पा मारीत असताना संध्याकाळ कशी झाली कळले नाही.  निघाले तेव्हा थोडे झाकोळून आले होते. पावसाची चिन्हे दिसू लागली होती. डोक्यावर सामानाने भरलेले टोपले व खाकोटीला दिगू घेऊन मी झपाझप पावले टाकीत निघाले. रेल्वे रूळांजवळ आले आणि थोडासा पाऊस सुरू झाला.जमीन भिजली . पाऊस हळूहळू वाढतच राहिला..उंचावर असलेला रेल्वे रूळ मार्ग चढणे कठीण झाले. भरलेले टोपले व दिगूला घेऊन त्या ओल्या, चढणीच्या पृष्ठभागावरून चढताना पाय सरकू लागले.आम्ही दोघेही घसरून खाली येत होतो. काय करावे कळेना.रुळांपलीकडे उमरोळी मार्गावर जाणे शक्य होईना..पाऊस वाढत होता. अंधारही झाला होता. दिगू शांत होता. मी मनात घाबरले होते. मध्येच एक दोन रेल्वे गाड्या येऊन गेल्या. त्यांच्या प्रकाशाच्या उजेडात उजळलेला तो भकास निर्जन परिसर पाहून मनात धस्स झाले.. मी आता पलीकडे कशी जाऊ.. ? नाही जाऊ शकले तर येथे अंधारात काय करू? ….रात्र वाढते आहे .. जागाही निर्जन आहे लहान पोर बरोबर आहे .. कोणतीही वस्ती नाही..आमचे कसे होणार.. कोणी लबाड लफंगा आला तर… थोड्या लवकर निघायला हवे होते ..सगळ्या चिंता…देवाचा धावा आपोआपच सुरू झाला.. “दत्तगुरु मला मदत करा‌..‌?”

  विशेष पद्धतीने प्रजनन करून जोपासलेला महाकाय वळू.

 ….आणि .. आणि समोरच्या भयाण  अंधारात थोडी हालचाल दिसली‌.. काळ्या कुट्ट अंधारात पांढऱ्या रंगाचा भास झाला ..हलणारे पागोटे दिसले. ..ती आकृती आमच्याकडे येत आहे असे वाटले.. भीती आणखीन वाढली.. हा कोण दरोडेखोर डाकू येथे येतो आहे का .. आम्हाला लुटून मारून पळून जाणार नाही ना.. माझ्या पोराला इजा होईल का..मी एकटी कसा प्रतिकार करू.. ?.पावसातही अंगाला घाम सुटला …दिगूला छातीशी घट्ट धरून ठेवले.. ती आकृती जवळ आली. डोक्याला मुंडासे बांधलेला ,तरुण वयाचा, हातात काठी घेतलेला पोरसवदा गुराखी असावा तो! गुरे तर दिसत नव्हती.. ? काही अंतरावर उभा राहिला.. माझी धाकधूक वाढली होती.. माझ्या तोंडून शब्द निघत नव्हता. तोच आपल्या खेडवळ भाषेत म्हणाला.. 

  “बाई तुम्ही आथ अंदारात उब्या कस्या पाई? कोनाची वाट पावताय काय..? काय काम आसल तर माला सांगा की… !!

  त्या शब्दांनी मला उमेद आली . धीर वाटला. भरवसा वाटला.

   “माझ्या या पोराला घेऊन मला पलीकडे उमरोळी रस्त्यावर जावयाचे आहे. ही चढण आम्ही पार करू शकत नाही.. रस्ता दिसत नाही.  निसरडा ही झाला आहे” मी घाबरत पण धीराने सांगितले.

   त्याला माझी समस्या कळली. दया आली. त्याने माझे वजनी टोपले घेऊन पलीकडे नेऊन ठेवले. मला हात धरून दिगूसह उंच रस्ता चढण्यास मदत केली.. आम्हा दोघांना उमरोळी  मार्गास लावले ‌… मी त्याच्याकडे कृतज्ञतेच्या भावनेने पहात होते.. माझा जीव भांड्यात  पडलेला पाहून पटकन रेल्वे रुळापलीकडे  उडी मारून बेटेगाव रस्त्याला लागला. ..कोठून  आला तसा कोठेतरी अंधारात गडप  झाला…… मी अंधारात त्याच्या दिशेने पाहत राहिले.. चमत्कार!!

..अंधारातून आला ,अंधारात गुप्त झाला ..कोण होता तो..?

  माझ्या स्मृतीत असलेली त्याची मूर्ती छायाचित्राच्या रूपाने सुरुवातीला दिली आहे…

   दिगूला घेऊन मी हळूहळू  घरी आले. आप्पांना ही सर्व हकीकत सांगितली..त्यांनी प्रथम दिगूला जवळ घेऊन त्याचे भिजलेले अंग पुसले. त्याला सोबत घेऊन दत्तगुरूंची नेहमीप्रमाणे प्रार्थना केली. पाटील कुटुंबीयांना ही हकीगत कळली. त्यांना हा दैवी चमत्कार वाटला.. मात्र त्यानंतर मला एकटीने दिगूला घेऊन  बेटेगाव बाजारास जाण्यास बंदी झाली..!

  ..आज विचार करते तेव्हा त्या प्रसंगाचे गांभीर्य कळते. आम्हा दोघा मायलेकरांचे त्या संध्याकाळी काही विपरीत होऊ शकले असते!अचानक अंधारातून प्रकटलेल्या त्या गुराख्याचे स्मरण होते. कोण होता तो? बरोबर त्याचवेळी तो कसा आला? गुराख्याची काठी होती पण गुरे तर जवळ नव्हती? परमेश्वरानेच  त्याला आमच्या मदतीसाठी पाठवले होते का? माहित नाही. पण तो आमच्यासाठी देवदूत होऊन आला होता एवढे खरे. म्हणून त्या पावसाळी संध्याकाळी  आम्ही  सुखरूप घरी आलो..! नाहीतर..??

    त्यादिवशी माझ्यासाठी प्रत्यक्ष गुरुदेव गुराख्याच्या रूपात आले असतील असे आज ही मला मनापासून वाटत असते.!!

  आता बोर्डीला परत आलो आहोत. जुन्या घरात नवा संसार सुरू झाला आहे. त्याबाबत पुढील भागात अधिक सांगते!

शब्दांकन: दिगंबर राऊत

     .