मी मोठी आई बोलते, भाग १५ – पुणे प्रशिक्षण
मोठीआई आता आमच्यात नाही. पण मोठीआईची १०४ वर्षाची कहाणी तिच्याच शब्दात लिहिली होती, अनेकांच्या विनंतीनुसार त्याचे लेखांक चालू ठेवीत आहे.

आमच्या राऊत घराण्यातील पूर्वजांची ही ढाल-तलवार .. अंदाजे 20 किलोची असावी!
आप्पा धुळ्याचे प्रशिक्षण संपवून पुन्हा बोर्डी शाळेत रुजू झाले ते वर्ष मला वाटते १९४८-४९ असावे. दिगूची प्राथमिक शाळा सुरू झाली होती. बाळू बालवाडीत जात होता. छोटी अरुणा घरीच असे. आम्ही आमच्या बोर्डीच्या घरातच राहत होतो.
घर लहान होते. घर म्हणजे काय, झोपडीचेच दोन भाग होते. एका भागात दादांचे कुटुंब व दुसऱ्या भागात आम्ही राहत असू. जागा अपुरी, घरा मागे-पुढे थोडीही मोकळी जागा नसल्याने वावर फक्त घरातच असे. त्यातही, शेजाऱ्यांच्या कडून मुद्दाम आमचे बाजूस फेकलेल्या घाणीचा व सीमा वादाचा प्रश्न होताच. आमची दोन्ही कुटुंबे त्यामुळे त्रस्त होतो. समोरून वाहणारी गटारगंगा मात्र आप्पांच्या सत्याग्रहामुळे बंद झाली होती.
आप्पांचे शाळेतील अध्यापन सुरू झाले होते. धुळ्यात आप्पांना शेतीचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे प्राथमिक शाळेतील मुलांना त्यांनी शेती शिक्षणाचे प्राथमिक ज्ञान देण्यास सुरुवात केली होती. शेतकी शाळेत शाळेच्या मालकीची मोकळी जमीन असल्याने तेथे मशागत करून हे शेतीचे प्रयोग सुरू झाले. कधी सुट्टीच्या दिवसातही ते दिगुला घेऊन शेतकी शाळेच्या बागेत जात. तेथे लावलेल्या बागेतील रोपांना पाणी देणे, कचरा काढणे, मेथी-धणे सारख्या भाज्या तयार झाल्या असल्यास त्यांच्या जुड्या करून मावशीला विकावयास देणे, अशी कामे करीत. शाळेला थोडे उत्पन्नही मिळे. कधी कधी टोपले घेऊन रस्त्यावर पडलेले शेण टिपावयास दिगुला सांगत. शेण खत म्हणून शेतकी शाळेत लावलेल्या रोपांना दिले जाई. शाळेत पेरूचे एक झाड होते. झाडाला पेरू लागलेले असले तरी दिगूला ते तोडण्याची परवानगी नसे. ज्या दिवशी तो बागेत काम करी अथवा शेण वेचून आणी, त्या दिवशी एक पेरू बक्षीस असे. पेरूच्या आशेने का असेना पण दिगू ते काम हौसेने करी हे खरे!
पलीकडील कुटुंबांकडून अनेक कटकटी असल्या तरी आमची दोन कुटुंबे मात्र आनंदात असत. मुलांना खेळण्यासाठी खूप भावंडे होती. घरात जागा नव्हती पण समोरच्या मोकळ्या वाड्यात कोणाचा मज्जाव नव्हता. मलाही बाय बरोबर कधीमधी गप्पा करण्यास मिळत. मात्र आम्ही दोघीही कामाच्या रगड्यात सतत गुंतलेल्या असल्याने फुरसत क्वचितच मिळे. बायची सात व माझी पाच मुले मिळून पूर्ण डझन मुलांचा वापर घरात असे. आम्ही दोघी त्यांचे सर्व करण्यात गुंतलेल्या असू. कधी सुयोग असल्यास मी, बाय, शेजारची पार्वती, गांडीया काकाची ऊकड्डी, टांगेवाल्या बत्तु काकाची फातीमा.. सर्वांचा एक छान मेळावा जमा होई. मग विषयांना तोटा नसे. सर्व गावाची बीत्तम बातमी बसल्या जागी मिळे… आजही ते दिवस आठवले की त्यातील मजा आठवते.
मला वाचनाची आवड असल्याने मिळतील ती पुस्तके वाचत असे. दिगू वाचनालयातून पुस्तके आणी. फावल्या वेळात मी देखील पुस्तके वाची. कधी कोणाच्या वाडीत, शेतात जाऊन दिवसभर मजुरी करून पैसे मिळवी, विशेषतः पावसाळ्यात मला खूप काम मिळे.
दिवाळीच्या आधी आठवडाभर ही भावंडे खूपच धमाल करीत. समोरील ‘बारशेता’तून( बारा शेते असल्याने बारशेत नाव होते). अथवा शेतकी शाळे शेजारील अवाडी (वाडीची जागा पण कोणी वाडी करीत नसे म्हणून ‘अवाडी’!) मधून मऊ माती वाहून आणीत. आमच्या ओटीलगत अंगणात जमा करीत. माती ओली करून, चांगली चापून चोपून सपाट पायरी केली जाई. तिला ‘ओटली’ असे म्हणत. त्यावर दिवाळीच्या दिवसात शेणाचे छान सारवण करून विविधरंगी रांगोळ्या काढल्या जात. ओटली बनविणे मुलांचे काम असे तर त्यावर छान रांगोळ्या काढणे बहिणींचे काम! दोघांनाही त्यात खूप आनंद मिळे. दिवाळीतील खाद्यपदार्थांपेक्षा व प्रत्यक्ष दिवाळीपेक्षा आधीचा हा आनंद अफाट असे. गरीबी श्रीमंतीचा त्यात कोणताही लवलेश नसे. फक्त निर्भेळ आनंद!!

एकदा दिवाळीची रंगीबेरंगी रांगोळी बनवून तयार झाली की कोंबड्यांनी आपल्या पायांनी त्या रंगांचा बेरंग करू नये म्हणून बहिणींनी काढलेल्या रांगोळीचे रक्षण करण्याची जबाबदारी भावांना घ्यावी लागे.
दिवाळीचे दुसरे आकर्षण म्हणजे आकाश कंदील! तो बनविण्याचे काम मुलांचे असे. बांबूच्या कामट्यापासून लहान काड्या काढून त्याचा सांगाडा बनवून त्यावर रंगीबेरंगी पारदर्शक कागदाचे तुकडे चिकटविले जात . पर्यावरण स्नेही आकाश कंदील तयार होई. आकाश कंदील दिवाळीत लावण्याआधी तो बनविण्यात जी मजा आणि उत्साह असे त्यालाही सीमा नसे. आप्पा देखील या कामात मुलांना मदत करीत. सुताच्या दोरीने त्या कंदीलाला उंच काठीवर बांधून त्याला उंचावर बांधणे हे काम आप्पानाच करावे लागे. अंधाऱ्या रात्री पणत्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात रंगीबेरंगी आकाश कंदीलाकडे पाहत राहण्यात एक वेगळाच आनंद व अभिमान असे!
खरे तर आज प्रत्येकाने आपले बालपण आठवून पाहिले तर कळेल की किती लहान लहान गोष्टीतून आनंद मिळत असे तेथे कोणत्या प्रकारची पक्वान्ने, सुख सोयी, पैसा याची गरज नव्हती. केवळ मनाची निरागसता या एका स्वभाव वैशिष्ट्याने आनंदाचा ठेवा प्राप्त होत होता. दुर्दैवाने पुढे हळूहळू पैसा प्रिय होतो. ही निष्पापता निघून जाते. आणि ..’दुःख शेवटी पदराला..’! ही स्थिती होते.
“‘बालपण देगा देवा..’”म्हणतात ते किती खरे आहे !!
आज अनेक प्रकारचे आकाश कंदील मिळतात. मात्र त्यात प्लास्टिकचा अमाप वापर झाल्यामुळे ते पर्यावरण स्नेही राहिलेले नाहीत. आणि विकत घेऊन आणण्यात मजा पण राहिलेली नाही.
खास दिवाळीत बनविली जाणारी दुसरी वस्तू म्हणजे निवडुंगाचे छोटे दिवे ? अश्विन अमावस्येच्या दिवशी पहाटे, घरातील केरकचरा गावाच्या सीमेवर ठेवून त्याबरोबर निवडुंगाच्या खोडातून कोरलेले, तेल वातीने पेटविलेले, छोटे दिवे लावतात. त्यांना आम्ही ‘बेरीये’ असे म्हणत असू.
“ खरुज खोकला ईडा पिडा, रोगराई घेऊन जा रे मारबत…”
असे तोंडाने ओरडत असू! ‘मारबत’ हे समाजातील अनिष्ट तेचे ,वाईट प्रवृत्तीचे प्रतीक व ते कायमचे नष्ट व्हावे यासाठी ही प्रार्थना असे.आपल्या सुंदर संस्कृतीचे ते एक ते प्रदर्शन होते.
बेरिये बनवण्यास सकाळी एक लांब निवडुंग तोडून आणून त्याचे सर्व काटे सोलून काढल्यावर खोडाचे लहान तुकडे केले जात. आतील मगज फेकून दिल्यावर ते पोकळ तुकडे उन्हात सुकवीत.त्यात तेल टाकून रात्री वातीने पेटविले जात.
सकाळी कचरा काढतांना बरोबर हे पेटते दिवे कचऱ्यासोबत ठेवले जात.
यामागे कोणते शास्त्र होते माहित नाही. मात्र सर्व प्रक्रिया अगदी पर्यावरणास्नेही होत्या यात शंका नाही !
खरेच अगदी लहान सहान, बिना खर्चिक, पर्यावरण स्नेही अशा गोष्टीतून आमच्या लहान मुलांची दिवाळी साजरी होत असे. काहीचांगले संस्कार आपोआप मनावर बिंबविले जात ..!!
प्रतिपदेच्या दिवशी मी मुलांना व आप्पांना ओवाळीत असे. वर्षातील हा असा एकच दिवस असे जेव्हा मी अशी माझ्या आपल्या सर्वांना ओवाळणी करी..ती एक आनंदाची, अभिमानाची पर्वणी होती. आता भाऊबीजेच्या दिवशी माझ्या नातवंडाना ओवाळण्या करतांना समाधानाने पाहते. त्या प्रतिपदेच्या ओवाळण्या आठवतात.
दिवाळीत मोजक्या प्रमाणात का असेना करंज्या लाडू चकल्या देखील तयार होत. खाण्यापेक्षा त्या बनविताना दरवळणाऱ्या वासाच्या आनंदानेच पोट भरून जाई. जमल्यास एखादे दिवाळीत मुलांना नवीन शर्ट ,पॅन्ट मिळे ती त्यांना पर्वणी असे. पण मला आठवते माझ्या मुलांनी नवीन कपड्यांसाठी कधीच हट्ट केला नाही. जसे जेवढे कपडे मिळतील तेवढे आनंदाने वापरले.
बोर्डी घरातील त्या चंद्रमौळी घरात आम्ही सर्वांनी एकत्रित साजरा केलेल्या त्या दिवाळी सणांचा आनंद पुन्हा कधी आला नाही . पुढे आम्ही घोलवडला नवीन घर घेतल्यावर असाच आनंद मिळाला. पण बोर्डीच्या घरातील आम्हा दोन्ही कुटुंबीयांनी साजरी केलेली दिवाळी काही वेगळीच होती ..अविस्मरणीय होती!!
बोर्डी घरात साजरा होणारा दुसरा सण म्हणजे विजयादशमी ,दसरा!. माझे दीर दादा यांच्या माळावर लाल कापडात बांधून ठेवलेली एक ढाल व तलवार होती. आम्ही राऊत. आमचे पूर्वज हे मराठी सैन्यात घोडेस्वार होते. (त्यावरूनच, ‘रडत राऊत घोड्यावर बसले..’अशी म्हण आली असेल?! पण ते जाऊ द्या …कारण सगळेच राऊत रडत राऊत नव्हते. आमच्यासारखे ‘शूर राऊत’ ही होते!!)
आमच्या कोणा पूर्वजांनी लढाईत मर्दुमकी गाजविलेली. त्यांची ती ढाल व तलवार दादांकडे वारसा हक्काने आली असावी. दर दसऱ्याच्या दिवशी दादा त्या पवित्र हत्यारांना बाहेर काढून स्वच्छ पुसून पूजा करत. त्यांना कोंबड्याचा बळी दिला जाई. अर्थात त्याचे मटण प्रसाद म्हणून आम्ही सर्व चापत असू. आज ती ढाल- तलवार नक्कीच आमच्या बोर्डी घराच्या माळावर असेल. तिचे वजन अंदाजे वीस किलो असावे. एवढी भली भारी तलवार घेऊन हे पूर्वज ती लढाईत वापरताना, शत्रूवर वार करण्यासाठी किती शक्ती व शौर्य लागत असेल? दादा आमच्या मुलांना मुद्दाम ती उचलून दाखविण्याचे आव्हान देत. मुलांनी ते आव्हान कधीच स्विकारले नाही!
आपल्या पूर्वजांनी गाजवलेल्या पराक्रमाचे व त्यांच्या शौर्याच्या पराक्रमाची ती ढाल, तलवार आठवली की आजही धन्यता वाटते !!
आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी आप्पांनी मुलांना रोज नाही तरी आठवड्यातून तीन दिवस तरी कच्चे अंडे खाऊ घालण्याचा रतीब लावला होता. ही अंडी कधी आमच्या घरच्या कोंबड्यांनी दिलेली असत तर कधी आदिवासी बायांकडून विकत घेतलेली असत. मला आठवते एक आण्याला एक कोंबडीचे अंडे मिळे. आदिवासी बायांना आम्ही अंडी विकत घेतो हे माहीत झाल्याने त्या स्वतःहून आम्हाला घरची अंडी आणून देत.
गावदेवीतील रंगू आक्काच्या सुरेश, सुभाषची शिकवणी आप्पा करीत असल्याने, रोज एक लिटर दूध तिच्याकडून मिळे. दिगू,बाळू सकाळी तेथून दूध घेऊन येत. रंगू आक्का कधी लोण्यापासून तूप बनवी आणि आम्हाला तूप नाही पण छान सकस ताक त्या दिवशी मिळे.कधी आप्पा गहू भिजत घालून त्याचा रस काढून त्यात गुळाचा खडा टाकून ते शिजवीत. त्याचे सत्व बनवीत.. तेदेखील मुलांना खावयास देत. थोड्या पैशात खूप मौल्यवान सात्विक पेय आहे ते.
आमच्या मुलांना खूप चैनीचे अथवा मासे मटणाचे जेवण क्वचितच मिळत असले तरी या अंडी-दुधामुळे त्यांना खूपच फायदा झाला. आहारात सात्विकता आली व प्रकृती स्वास्थ्य चांगले राहिले.
दिगू, बाळूला रोज सकाळी बारा सूर्यनमस्कार काढण्याची आप्पांची सक्ती असे. जातीने ते त्यांच्याकडून व्यायाम करून घेत. आपल्याला असलेला प्रकृतीचा त्रास मुलांना होऊ नये यासाठी त्यांची ही धडपड असे . आप्पा स्वतः लहानपणी उत्कृष्ट व्यायामपटू व तरणपटू होते. योगासने व अनेक व्यायाम प्रकार स्वतः करीत.
अशा प्रकारचा आहार व व्यायाम यामुळे माझ्या मुलांना खूपच फायदा झाला. पुढे वसतिगृहात बाहेरचे जेवण घेऊनही त्यांनी सर्व व्यवस्थित निभावून नेले. शिक्षण कालांत कष्ट करूनही प्रकृती स्वास्थ छान राहिले. विशेषता दिगूला साताऱ्यात अंग मेहनत करताना त्याचा फायदा झाला!

शालेय वयात दिगू-बाळूचा दुसरा उद्योग म्हणजे शेजारच्या झाई बंदरावर मासेमारी करून येणाऱ्या जहाजावरून ताजे मासे घेऊन येणे. दिगू-बाळू व शेजारची श्याम ,सुरेश, बाबू, बुली ही मुले कधीतरी दुपारी शाळेतून आल्यावर संध्याकाळी झाई बंदरावर जात व मासेमारी करून आलेल्या जहाजावर जाऊन मासे घेऊन येत. हे काम धाडसाचे व मेहनतीचे असले तरी त्यांना ते आवडे .स्वस्त व मस्त मासे भरपूर मिळत. बाजारातून मासे आणण्याचा माझा त्रासही वाचत असे. आप्पांची देखील या गोष्टीला ना नसे कारण त्यांनाही ताजे व आवडीचे मासे मिळत.
झाई बंदरात जहाजावर असे ताजे तडफडते मासे मिळत!
एकदा दिगू , सुरेश, बुली, शाम ही मुले मासे घेण्यासाठी झाईला गेली असताना संकटात सापडली होती. पाण्यातून चालत असताना पाण्याखाली असलेला चिखल दिसला नाही. पाय सरकू लागले..या चिखलाला ‘कादवी’ असे म्हणतात. त्यातून चालणे कठीण असते. पाय घसरतात. कमरे एवढ्या भरतीच्या पाण्यातून, खाली कादवी असलेल्या पृष्ठभागावरून चालणे खूप मुश्किल होते. कादवीत सापडून माणसे बुडाल्याच्या अनेक घटना आमच्या भागात घडल्या आहेत. सुदैवाने त्यादिवशी एका लहान होडीवाल्याने यांची त्वरित सुटका केली. मुले सुखरूप घरी आली.मात्र तेव्हापासून त्या विशिष्ट भागात जाणे त्यांनी सोडून दिले पण मासे आणण्याचे सोडले नाही!!
धुळ्याला आप्पांची तब्येत खूप छान राहिली कारण कोरडी हवा व मानसिक शांती! बोर्डीत आल्यावर पुन्हा आप्पाना प्रकृतीचा त्रास सुरू झाला. कधी रात्री जागरण होई. शाळेत रजा होई. स्वभाव चिडचिडा होई. पण त्याला इलाज नव्हता. त्याकाळी दम्यावर आजच्याप्रमाणे त्वरित आराम देणारी औषधे ,फवारे (spray) उपलब्ध नव्हते! डॉ.पाठक अथवा डॉ. हरिभाऊ सावे(पाटणवाला,आयुर्वेदिक डॉक्टर) यांचीच औषधे आप्पा घेत.
1952 साली आमच्या संसारात नीलमचा प्रवेश झाला. लहानपणी ती गोरी गुटगुटीत होती. सर्वांची लाडकी होती. आप्पांची तर खूपच प्रिय होती. बारशातील नाव जरी ‘नीलम’ होते तरी ते तिला प्रेमाने ‘ममा’ असेच म्हणत. शाळेत दाखल करतानाही त्यांनी तेच नाव कायम ठेवले.
माणसाच्या दीर्घायुष्याला प्रियजनांच्या वियोगाचाही शाप असतो. माझ्या दीर्घआयुष्यात ज्या क्षणांनी मला अतीव दुःखाचे चटके दिले त्यातील एक क्षण म्हणजे माझ्या लाडक्या ममाचा अकाली मृत्यू ..! लग्न होऊन सुखी संसार चालू असताना दोन चिमण्या पिलांना मागे ठेवून ती आम्हाला सोडून गेली. सर्वांसाठीच तो खूप कठीण प्रसंग होता…आयुष्यात कधीही न विसरता येणारा…त्याबद्दल पुढे काही सांगायचा प्रयत्न करीन!… कारण त्या आठवणीही आता नकोत असे वाटते!
दिवस चालले होते मुले मोठी होत होती शिक्षण ही चालू होते. पुन्हा 1955 साली आप्पांना पुणे येथे ‘मुलोद्योग सुतकताई-विणकाम’प्रशिक्षण घेण्यासाठी सरकारी हुकूम आला. अप्पांनी नेहमीप्रमाणे कोणताच विरोध न करता जाण्याची तयारी केली. या वेळेला त्यांना कोणी विरोधही केला नाही. त्याचा काही उपयोग होणार नाही हे आम्ही सर्वजण समजून चुकलो होतो .

आप्पांच्या त्या पुण्यातील वर्षभराच्या प्रशिक्षण काळात माझा चुलत भाऊ, दिनू काकांचा मुलगा, रमेश (डाॅक्टर), पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेत होता. त्यामुळे आप्पांच्या पुणे वास्तव्यात त्यांना फायदा झाला. माझा भाऊ खंडू व त्याचे काही मित्र नोकरीच्या मुलाखतीसाठी त्याच सुमारास पुण्यात गेले होते. मुलाखती आटोपल्यावर आप्पांना भेटून त्यांचे बरोबर एक दिवस पुणे पाहणार होते. आप्पांनी दिगुलाही त्यांचे बरोबर आणण्यास सांगितले होते. त्याचाही पुण्यापर्यंतचा प्रवास त्यावेळी घडला. त्याच्या आयुष्यातील तोच पहिला मोठा प्रवास. तो मराठी सहाव्या इयत्तेत असावा. आप्पानी या सर्वांबरोबर एक दिवस पुणे दर्शन करण्यात आनंदाने घालविला. रमेश मामानेही आपले वस्तीगृह व निवासस्थान त्यांना दाखविले. सर्व मंडळी समाधानाने परत बोर्डीत आली. दिगुने या सफरीचा विस्तृत वृत्तांत मला अगदी आठवणीने सांगितला. त्या प्रवासात खंडाळा घाटातील बोगद्यातून जाणारी आगगाडी व पावसाळा असल्याने बाजूला दिसणारे धबधबे याचे त्याला खूप अप्रूप वाटले होते. पुढे अनेक दिवस,
‘गाडी डोंगरातून जाताना अचानक कशी गुप्त होते ,काही वेळाने पुन्हा कशी प्रकट होते.’
ही जादू तो मित्रांना सांगत असे. तो प्रवास त्याला त्या वयात जादुई प्रवास ठरला!!
पुण्याची हवा कोरडी व आप्पांच्या प्रकृतीला उपकारक होती. त्यांची प्रकृती खूपच चांगली राहिली. ते प्रशिक्षण आनंदाने, समाधानाने पार पडले.आप्पा पुन्हा बोर्डीत आले.
नीलम नंतर चार वर्षात,1956 साली पपीचा जन्म झाला. आमच्या संसाराला आता पूर्णत्व आले .आम्ही सर्व बोर्डीच्या छोट्या घरात आनंदाने राहू लागलो. आप्पांच्या तुटपुंज्या पगारात, इतर कोणताही आर्थिक आधार नसताना, शिकवण्यांचा पैसाही न घेता, काटकसरीने, स्वाभिमानाने तरी समाधानात संसार चालू होता. शेवटी सुख म्हणजे तरी काय? सर्वांनी एकत्रित आनंदात राहून मिळालेली भाकरी प्रेमाने वाटून खाण्यात जो आनंद आहे त्यालाच तर सुख म्हणतात !
एकच त्रास होता तो म्हणजे आमच्या शेजाऱ्यांच्या वाढत्या कटकटी…त्यांना आमच्याबद्दल एवढी असूया, तिटकारा का होता, आजही समजत नाही. ते आम्हाला गरिबीचा घासही सुखाने घेऊ देत नव्हते, हे खरे! आम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नसू. आप्पा तर त्या बाबतीत स्थितप्रज्ञ होते. कौटुंबिक कटकटीत जास्त लक्ष घालत नसत. कारण त्यांच्या प्रकृतीला व प्रवृत्तीला ते मानवतच नव्हते.
आप्पांकडे नेहमी सातवी इयत्ता असे. सातवीमधील व इतर इयत्तामधील देखील काही विद्यार्थी शिकवणीस येत. घरात जागा नसे म्हणून समोरील वेणूबाईच्या वाड्यात, उघड्या आकाशाखाली ही सर्व मुले बसत. अभ्यास करीत. फायनल परीक्षेचा रिझल्ट चांगला लागावा म्हणून आप्पा ही मेहनत घेत. काही पालकांना फुकट शिकवणी आवडत नसे, म्हणून ते वस्तू स्वरूपात जसे की तांदूळ, भाजीपाला, एखादा मासा, पाठवून देत. त्यावेळी रॉकेलचे कंदील उजेडासाठी वापरीत. कधी रॉकेल साठीही घरात पैसे नसत. वाण्याकडून उधारीने राॅकेल आणून शिकवणी होई. यामुळे कधी माझे व आप्पांचे भांडण होई.
“ जर इतर शिक्षक शिकवणीचे पैसे घेतात तर आपण का नाही..?”
हा माझा सवाल असे. शेतकरी असूनही आमचे जवळ कोणतीच शेतजमीन, वाडी नसल्याने आम्हाला तांदूळ भाजीपाला विकतच आणावा लागे. मात्र आप्पा प्रत्येक वेळी शांत व स्वस्थ असत.
“ज्ञान हे दानासाठी, धंद्यासाठी नाही.. माझा दत्तगुरु या शिकवण्यांची फी मला कधीतरी देईलच..!” असे म्हणत.
आप्पांचे त्यावेळचे बोल भविष्यात खरे ठरले. हे दिवस पाहण्यास आप्पा जगात नाहीत ही आज माझी मोठी खंत.
आज माझ्या मुलांनी, नातवंडांनी शिक्षणात घेतलेली झेप बघून आप्पांचे उद्गार आठवतात. हे ‘ज्ञानवैभव’पहायला ते नाहीत म्हणून वाईट वाटते. मला खात्री आहे, आप्पांनी पेरलेल्या सत्कार्याच्या बिजाला आलेले हे भरघोस पीक पाहून ते स्वर्गातून आनंदाश्रू गाळीत असतील..आशीर्वाद देत असतील !
‘ मी म्हणत होतो ना .. हेच माझ्या फुकट शिकवण्याची मुद्दल व्याजासहित दत्त दत्तगुरुंनी केलेली भरघोस फेड!’
पुढे सरकारने ‘प्रौढसाक्षर शिक्षण योजना’ सुरू केली. बोर्डीचे आचार्य भिसे गुरुजी यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र सरकारने ही योजना आखली होती. गावातील अशिक्षित गरीब आदिवासी, वनवासी यांना शिक्षणाचे प्राथमिक धडे देण्यासाठी ही योजना होती. प्राथमिक शिक्षकांनी स्वेच्छेने विनावेतन हे काम रात्रीच्या वेळी करावयाचे होते. आप्पांनी, व हिराजीमामाने या योजनेत भरघोस योगदान दिले आहे. घरच्या मुलांच्या शिकवण्या आटोपल्यावर रात्री ही मंडळी बाबूळ पाड्यावर जाऊन प्रौढ शिक्षण वर्ग घेत. साधारणता रात्री अकरा ते साडे अकरा वाजता घरी येऊन आराम करीत. त्या दिवसातील आप्पांची दिनचर्या आठवली की त्यांच्या मनशक्तीची व ज्ञानसाधनेची धडपड पाहून अचंबा वाटतो. कधी कधी रात्री घरी आल्यावर धाप लागे. तसेच बसून रहात. थोडे बरे वाटले की सकाळी पुन्हा शाळेत हजर होत. एवढे सर्व करून पगाराव्यतिरिक्त कोणताही आर्थिक मोबदला त्यांनी घेतला नाही.
शाळेत सकाळ ते संध्याकाळपर्यंत शिकवणे, पुढे संध्याकाळी घरासमोर अंगणात मुलांच्या शिकवण्या, त्या संपल्यावर बाभळीपाड्यावर टोणग्यांच्या गाडीतून जाऊन आदिवासी प्रौढांना शिक्षण देणे, रात्री 11:30 वाजता घरी येऊन पुन्हा सकाळी शाळेत जाण्यासाठी तयारी करणे …पगाराशिवाय इतर सर्व गोष्टी विनावेतन!! हीच त्यांची तत्त्वनिष्ठा !!

आचार्यांवरील निष्ठेमुळे आप्पांनी स्वतःला प्रौढ शिक्षण कार्यात झोकून दिले होते. आचार्य भिसे हे त्यांचे आदर्श होते. फायनल सातवीची परीक्षा पास झाल्यावर आप्पांना जिल्हा बोर्डात शिक्षकाची नोकरी मिळवून देण्यात आचार्यांनीच मदत केली होती. त्याची जाणीव त्यांना आयुष्यभर होती. ज्या दिवशी आचार्यांचे मुंबईत निधन झाले त्या दिवशी आप्पा विलेपार्ल्यात दिगूकडे होते. रेडिओवर आचार्यांच्या निधनाची बातमी आल्यावर त्यांनी त्या संध्याकाळी दत्तगुरूपुढे हात जोडून भरल्या डोळ्यांनी प्रार्थना केली. रात्रीचे भोजन घेतले नाही. मीही त्यावेळी पार्ल्यात असल्याने माझ्या डोळ्यांनी हे पाहिले आहे.
एकदा आचार्यांनी आप्पा व हिराजी मामांना शारदाश्रमात बोलावून शाबासकीही दिली होती. आप्पांसाठी तेच मोठे बक्षीस होते. आचार्य भिसे गुरुजींचे आमच्या कुटुंबावर खूप उपकार आहेत. दिगुने त्यांचेवर एक स्वतंत्र लेख त्याच्या ‘तस्मै श्री गुरुवे नमः’ पुस्तकात लिहिला आहे.
हिराजी मामा स्वतः पायाने थोडे अधू होते. त्यांची जिद्द अफाट व आपल्या मित्रावर जीवापाड प्रेम होते. कोण होती ही माणसे ?स्वतःच्या प्रकृतीची, संसाराची, मुलाबाळांची काळजी न करता इतरांच्या भल्यासाठी राबून समाधान मानीत होती! तेही घरात आर्थिक अडचणी असतांना! त्यांच्या त्या कष्टांची आठवण झाली की थक्क व्हायला होते. त्यांनी खूप हाल सोसले, गरिबीत दिवस काढले. पण परमेश्वरी संकेत पहा – त्यांच्या पुढील पिढ्यांनी आपल्या शिक्षणात ,व्यवसायात दैदिप्यमान यश मिळवून वैभवही प्राप्त केले आहे !
माझी मुले, नातवंडे, पतवंडे देश परदेशात भरपूर शिकली आहेत. चांगल्या पदावर नोकऱ्या करताहेत. हिराजी मामांची मुले, नातवंडे यांनी उद्योगात आपला चांगला जम बसवून कमाई करीत सुखसमाधानात आहेत. समाजसेवा व दानधर्माचे व्रत दोन्ही कुटुंबांनी पुढे चालविले आहे.
आमचा संसार सुरू होता. बोर्डी आणि आप्पांची प्रकृती हे समीकरण कोठे जमत नव्हते. बोर्डीची हवा आप्पांना मानवत नव्हती. आप्पांचा प्रकृतीच्या तक्रारी अधून मधून सुरूच असत.
जो परमेश्वर आम्हाला संकटात टाकी, तो त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवी. कसा, ते पुढील लेखात सांगते.



