सागर सम्राट अशोक !

          कै. अशोक भालचंद्र पाटील

   24 मे सकाळची पहाट. सकाळी आठ, साडेआठ वाजता नेहमीप्रमाणे चहा पीत बसलो होतो. व्हाट्सअप वरील बातम्या वाचत होतो. आणि तेवढ्यात एका  ग्रुप वरील या ओळी वाचनात आल्या, कशातरी वाचल्या…

”दुःखद निधन. सुप्रसिद्ध उद्योगपती, बोर्डी गावचे सुपुत्र, श्री. अशोक भालचंद्र पाटील यांचे वयाच्या 71 व्या वर्षी पुणे येथे निधन झाले आहे. अंत्यविधी पुणे येथे आज दुपारी चार वाजता…”

   क्षणभर तर मी काय वाचतो आहे यावर विश्वास बसेना. अशोक भालचंद्र पाटील…. म्हणजे तेच आमच्या बोर्डीचे… पुण्यात राहत असलेले. प्रसिद्ध उद्योगपती…. माझे मित्र…. काही दिवसापूर्वीच ज्यांच्याशी व्हाट्सअप वरून बोलणे झाले होते…“सफाळा दातीव-याला  येतोय, तेव्हा भेटू या”…. तेच का हे अशोक पाटील की आणि कोणी दुसरे आहेत??..मनाचा गोंधळ… ..क्षणभर मन शांत करण्याचा प्रयत्न केला. परत बातमी वाचली.. आता खात्री होऊ लागली… तोच, आमचाच अशोक पाटील..माझा मित्र श्रीकांत पाटील, अशोकचा काका,त्याला  फोन लावला.. आणि.. आणि.. त्यांनी ही दुःखद बातमी खरी असल्याची निश्चिती केली. ..”मी पुण्यास निघालो आहे..” असेही सांगितले… झाले आता सारे संपले होते.

  … अशोक पाटील, एक दिलदार मित्र, महान उद्योगपती…  बोर्डीचे सुपुत्र,  सो क्ष समाजाचे भूषण ,विनयशील समाजसेवक… परवा माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला खास पुण्याहून बोर्डीला येऊन उपस्थित राहणारा..  “माझ्या पहिल्या  बोटीच्या लॉन्चिंग कार्यक्रमाला तुम्हाला मुद्दामच बोलावले नाही, कारण मी पण गेलो नाही..”, असे मनापासून बोलणारा ….आपली पहिली  जेजुरीची फॅक्टरी आम्हा खास मित्रांना दाखविण्यासाठी पुणा क्लब मध्ये आमची सोय करून मोठ्या कौतुकाने जेजुरीला घेऊन जाणारा…. नचिकेतचे बाबा …जयश्री वहिनींचा पती..  श्रीकांतचा पुतण्या.. आपले स्वतःचे विमान बाळगून मोठ्या मोठ्या उद्योगपतींना ते भाड्याने देणारा आणि अजूनही खूप खूप.. हो, तोच अशोक पाटील होता…कपातला चहा केव्हाच थंड झाला होता….आणि मी कोसळलो होतो. …!!

   अशोक पाटील…. आयुष्यात कोणा मोठ्याचा हात पकडून मोठे होण्यापेक्षा व असे पोकळ मोठेपण घेऊन मिरवण्यापेक्षा कोणाला तरी हात देऊन त्याला मोठं करण्याचे मोठं मन असणारा एक उद्योगपती ! माणूसकीच्या अस्सल साच्या मधून निर्माण एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व ! कठीण परिस्थितीवर मात करीत विजय मिळविणारा एक जिगरबाज माणूस.  आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सहका-यांना सोबत घेऊन त्यांच्याही आयुष्यात आशेचे नवे किरण पसरविणारा आगळा उद्योगपती.. !  एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आपण आलो याची जाणीव ठेवून आजूबाजूच्या उपेक्षित समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने आजवर अनेकांच्या अडीअडचणीत मदत करणारे ‘दिलदरीया’  व्यक्तिमत्व..!

…. किती विशेषणे लावावी या एका माणसासाठी! किती स्तुती सुमने उधाळावीत या सन्मित्रासाठी..… पण आता काय उपयोग ? ज्या कानांनी हे ऐकावे, ज्या डोळ्यांनी मायेचा वर्षाव करावा, ज्या ओठांनी ते मधुर हास्य करावे ज्या हातांनी आश्वासक स्पर्श करावा, ते  सारेच आता निमाले.. कायमचे लोपले .. अशोक भाई गेले, अचानक गेले, चटका लावून गेले, आपल्या बोर्डाला पुन्हा कधीच न येण्यासाठी गेले…!!

  “मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे.. 

   तुझे पवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे…”

पुढे काय होईल ते होऊ दे, आज तरी आमचा प्रतिभावंत मित्र कायमचा शांत झाला आहे….’राजहंस  निजला‘ आहे .

  आयुष्यामध्ये खूप मेहनत करून, आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला झिजवून ,जगातल्या कानाकोपऱ्यात धावपळ करून,आपले साम्राज्य जगभर दिमाखात उभारणारा हा सम्राट आता चीरविश्रांती घेण्यासाठी निघून गेला आहे .… हो ..श्री.अशोक भालचंद्र पाटील आता कै. अशोक पाटील झाले आहेत …!!

  कीं टिटिभू चांचुवरी । माप सूये सागरीं ।मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें येथ.

 या अफाट गुणसंपदा व महान कर्तृत्व दाखवून गेलेल्या मित्रासंबंधी  लिहिण्याचा प्रयत्न करणे म्हणजे टिटवीने समुद्र आटविण्यासाठी आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.. हे महान व्यक्तिमत्व थोडक्यात शब्दांकित करताना मी ऊणा  पडेन याची खात्री आहे .आपण समजून घ्या!

     अशोकभाईं ,”बोर्डीतील एका शेतकऱ्याचा मुलगा ते सातासमुद्राचा बादशाह..”  त्यांच्या  केवळ एकाहत्तर वर्षांच्या कर्तुत्वाचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात.

  ‘अल्फा फ्लॉक’ च्या धाग्यापासून बनविलेली ही वस्त्र प्रावरणे उच्च दर्जाच्या फर्निचर व पडद्या साठी वापरली जातात.

  आपल्या “अल्फा फ्लोक” या पहिल्या कंपनीपासून हा झंझावात सुरू झाला. अल्फा फ्लॉक ने बनविलेले खास तंतू  विशेषतः वस्त्रोद्योग व पडदे बनवण्यासाठी त्याचप्रमाणे उंची फर्निचर, कोच खुर्च्या लोड इत्यादीवर आच्छादाने बसविण्यासाठी जगभर वापरली जातात. हे स्वदेशी तंत्रज्ञान अशोक भाईंनी स्वतःच्या प्रयोगशाळेत  निर्माण केले. भारतात आजही ते कोणी निर्माण करीत  ते त्यांनी 40 वर्षांपूर्वी केले. विशेष म्हणजे एका इंजिनियरने रासायनिक क्षेत्रात केलेली ती क्रांती आहे!

  भारताबाहेर मलेशिया इंडोनेशिया सौदी अरेबिया यूएई अशा मुस्लिम बहुल देशांमध्येच नव्हे तर ऑस्ट्रेलिया,युरोप मधील कित्येक देश देशात त्यांचा माल आज निर्यात होत असतो. स्वतःची  एक बाजारपेठ जगभरात निर्माण केली.

   बोर्डीच्या शेतकरी कुटुंबातील ,सुनाबाई पेस्टनजी हकीमजी हायस्कूलचा एक सर्वसाधारण विद्यार्थी, व्ही जे टी आय कॉलेजातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन ,नोकरी करता करता फक्त निर्यातक्षम(EO), उत्पादने तयार करून जगाची बाजारपेठ काबीज करतो, ही  केवळ सुरवात होती!

   ‘एअर कंडिशनिंग’ त्याची पॅशन होती .नोकरी व्यवसायाची सुरुवात येथूनच झाली होती. अनुभवही घेतला.ते तंत्र व्यावसायिक रित्या आत्मसात करून आपला मोर्चा एयर कंडीशनिंग क्षेत्राकडे वळविला”.Air Control India”, कंपनी तयार झाली .

 नागरी व व्यावसायिक  एअर कंडिशनिंग करता करता त्यांच्या कंपनीने  बोटीवरील एअर कंडिशनिंगचे अवघड तंत्रज्ञान ही आत्मसात केले. दुबईसारख्या जागतिक व्यापार केंद्रात या क्षेत्रात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. नावलौकिक मिळविला. जगातील नामांकित शिपिंग कंपन्यांच्या बोटींना आपले तंत्रज्ञान देऊन त्या क्षेत्रातही ठसा उमटविला .

एवढ्यावर न थांबता अशोकभाई सारख्या भविष्याचा वेध घेणा-या व्यावसायिकाने अख्खी बोटच आपण का बांधू नये असा विचार केला.सफाळ्याजवळ दातिवरे किनाऱ्यावर स्वतंत्र जागा घेतली. ‘दातिवरे मरीन्टाईम’,ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली त्यांची दुसरी व्यवसायिक सहकारी कंपनी’ साधना मरीन’ यांनी ही बोट बनविली. अशोक भाईंच्या कंपनीने त्यांना सर्व पायाभूत सुविधा पुरविल्या.

.काही महिन्यापूर्वी पहिल्या बोटीचे अवतरण समुद्रात झाले. दुसरे महान स्वप्न साकार झाले…

    असीम जिद्द, अपार कष्ट ,आणि भविष्य काळाचा वेध घेणारी धंदेवाईक व्यावसायिक प्रतिभा असणारा उद्योजक अशी स्वप्ने पाहून ती पूर्ण करूशकतो!!

   हे सर्व करीत असताना आपला गाव, आपली शाळा, आणि आपले पर्यावरण यांचे ऋण न विसरता आपल्या मातीशी इमान राखणारा उद्योजक म्हणजे अशोक भालचंद्र पाटील!  सागराच्या पर्यावरणाची हानी  होऊ नये म्हणून   ‘ग्रीन मरीन तंत्रज्ञान’ निर्माण करणारे अशोक भाई म्हणूनच एक जगा वेगळे उद्योजक ठरतात! 

       अशोक भाई एवढे विनम्र आहेत की या सर्व अफाट कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी त्यांचे अभिनंदन करू गेल्यास सर्व यशाचे श्रेय  आपले आई-वडील,गुरूजन आपली बोर्डीची शाळा व आपले कुटुंब, याला देतात. प्रामाणिकपणे कष्ट करण्याचे धडे आई वडिलांकडून, तंत्रज्ञानाचे, शिस्तीचे व स्वावलंबनाचे धडे बोर्डीची शाळा व गुरुजन यांचेकडून ,आणि कोणत्याही अडचणीत मला सतत पाठिंबा प्रोत्साहन देणारे माझे कुटुंब यामुळेच मी हे करू शकलो, असं त्यांनी  एका मुलाखतीत म्हटले आहे.

    बोर्डीतील शेतकरी कुटुंबातून आलेल्या या मुलाने खऱ्या अर्थाने आकाशी झेप घेतली.. आपल्या उद्योगाचा एक भाग म्हणून त्यांनी एक आलिशान विमान विकत घेतले व त्याचा उपयोग स्वतःसाठी व इतरांना भाड्याने देण्यासाठीही(Charter), त्याकाळी या विमानातून अनेक व्हीआयपी व नामांकित लोकांनी केला होता.

   ते दिवस आठवले म्हणजे आमचे समाज बांधव 

 “आपले स्वतःचे विमान घेऊन फिरणारा पुण्याचा बोर्डीकर उद्योगपती..” अशीच अशोकची ओळख देत!

   ‘दातिवरे मेरीटाईम इन्फ्रा. चे सहाय्य घेऊन “साधना मरीन”, कंपनीने तयार केलेली पहिली बोट. 

    बोर्डी मध्ये अशोकचे घर आणि माझे मामाचे घर शेजारी आहेत. त्याची आजी भिमीकाकू माझ्या आजीकडे संध्याकाळी निवांतपणे गप्पा करण्यासाठी येत असे. आजीचा हात धरून छोटा अशोक कधीतरी तिच्याबरोबर असे. आई बाबा कोसबाडला कामानिमित्त राहत असल्याने अशोकचे बालपण आजीच्या सानिध्यात  गेले. त्यामुळे आजीवर त्याचे जीवापाड प्रेम होते. आजी बरोबर शेतावर जाऊन संध्याकाळी तिच्याबरोबर चालत येणारा अशोक मी पाहिला. हाफ पॅन्ट व पांढरा सदरा खोचून शाळेला निघालेला अशोकही नजरेसमोर येतो. पुढे मी समाजसेवेच्या काही उपक्रमात सहभागी असताना आमच्या माजी विद्यार्थी संघटनेसाठी, सेतू को-ऑपरेटिव्ह सोसायटी साठी आणि सो क्ष समाज संघासाठीही विविध प्रकारे आर्थिक व इतर सहाय्य देणारा अशोकही भेटला तो एक कृतज्ञ समाजसेवक म्हणून. 

     आमच्या बोर्डी गावात आजी, आजोबांच्या नावे एक सुंदर हाॅल  उभारून देताना लाडक्या आजीचे  व गावाचेही ऋण अंशतः फेडले. बोटी तयार करण्याच्या आपल्या भावी उद्योगाला  जाणते कुशल अधिकारी महाविद्यालयातून निर्माण व्हावेत ही त्याची मनोमन इच्छा होती. 

  कोरोनाच्या  बंदीवासाच्या कालखंडात मी माझ्या गुरुजनांचे अंशतः ऋण फेडण्यासाठी   “तस्मै श्री गुरवे नमः “ या पुस्तकाचे लिखाण केले. ग्रंथाली सारख्या एका मान्यवर संस्थेने त्याचे प्रकाशन केले. आमच्या ठाणे पालघर जिल्हा परिसरातील काही ज्ञात अज्ञात समाजसेवक स्वातंत्र्यसैनिकांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे, “ पूजनीय आधारवड” हे दुसरे पुस्तक लिहिले.

मराठी पुस्तकाला मिळालेली लोकप्रियता पाहून पहिल्या पुस्तकाचे, THE REVERED BORDI TEACHERS…”

    हे इंग्रजी भाषांतरित पुस्तक तयार केले. प्रत्येक पुस्तक प्रकाशनाचे वेळी अशोक भाई आवर्जून समारंभास हजर राहिले.. तिसऱ्या इंग्रजी भाषांतरित पुस्तकाच्या प्रकाशनात मला मोठी आर्थिक मदत केली.काही  पुस्तके विकत घेऊन मुलांना विनामूल्य वाटली.

 “ दिगंबर भाई पुढेही काही मदत लागल्यास मला अवश्य सांगा “ असे मनापासून आश्वासन दिले.

  “तुम्ही बोर्डीच्या मातीचा, आपल्या गुरुजनांच्या थोरवीचा इतिहास लिहीत आहात. त्याचा मला अभिमान आहे.  त्यात थोडा माझाही सहभाग असू दे असे उद्गार त्या प्रसंगी काढले. 

  “THE REVERED TEACHERS.. “पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ची काही क्षणचित्रे .

  खरे तर आदल्या दिवशीच ते परदेश दौऱ्यावरून पुण्यात आले होते. थकले होते .येताना ट्रॅफिक खूप असल्याने वाटेत दीर्घकात थांबावे लागले होते . बोर्डीत कार्यक्रमाची वेळ होऊन गेली होती . फोनवरून माझ्या संपर्कात होते. . माझी “कृपया येण्याची तसदी घेऊ नका.” ही विनंती  अमान्य करून उशिरा का होईना कार्यक्रमाला आले. छोटेसे अर्थपूर्ण भाषण केले व संध्याकाळी परत पुण्यास रवाना झाले … हे कशासाठी? केवळ आपला गाव, आपले गावकरी व आपला एक मित्र यांना  दिलेला शब्द पाळण्यासाठी? अशोक भाई चे वेगळेपण येथेच दिसून येते !तो दिवस व तो अशोक माझ्यासाठी केवळ अविस्मरणीय आहे.

   इतक्या सर्व व्यासंगातून व उद्योग व्यापातून अशोक आपल्या शाळेतील जुन्या वर्गमित्र-मैत्रिणींना विसरले नव्हते.  बोर्डी हायस्कूल मधील एक बाल मैत्रीण शोभना बेन, आज सत्तरीत आहे. शोभना ही अशोकचे गुरुजी एन बी  मेहता सर यांची कन्या व बोर्डीचे प्रसिद्ध एन बी मेहता कॉलेज बांधून देणाऱ्या नितीन भाईंची धाकटी बहीण!

   “ Ashok was senior than me in SPH School , He was with my brother Nitin,so used to visit our house and that is how I knew him. Of late I used to meet him at high schoo and ,college functions. We used  to reminiscent  about those old days.That is how we became good friends.

He was very helpful,, kind & down to earth person & naughty too .

   We used to fight  in friends groups on political ,filmy or any subject He used to call me sometime ” gujju” sometime “Guruji chi mulgi”..

    Gone but never forgotten… losing a friend like Ashok is like losing your own sibling…may his soul rest in eternal peace..

एवढ्या अफाट व्यापातून आपल्या जुन्या मित्रांची आठवण ठेवून त्या आठवणी जोपासणे ही मोठी दुर्मिळ गोष्ट आहे. त्याकरीता  पाय जमिनीवर असावे लागतात.

 अनेक महान लोकांचे जीवन असेच तळपत्या वीजे सारखे होते. ते कधी आले. वीजे सारखे तळपले व बघता बघता  निघून गेले ते  जगाला कळले नाही . अशा व्यक्तीबद्दल बहिणाबाईंच्या खालील ओळी खूप काही सांगून जातात…

  “ऐसे हे विजेचे चपळेपण, तैसा जन्म गेला क्षण”

 “वीज जशी क्षणार्धात चमकून नाहीशी होते,  त्याचप्रमाणे महान मानवी जीवन जन्मते कधी, झळकते कधी, अंतर्धान पावते कधी  समजत नाही…” मानवी जीवनाच्या क्षणभंगूरतेची आणि आयुष्यातील वेळेच्या अमूल्यत्वाची जाणीव बहिणाईने केवळ या दोन ओळीत करून दिली आहे 

  अशोकच्या दैदीप्यमान जीवनातूनही  या क्षणभंगुरतेची कल्पना येते..

“उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः ।

न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः ॥”

केवळ स्वप्ने पाहून चालत नाही, तर ती पूर्ण करण्यासाठी जबरदस्त परिश्रम करावे लागतात. अशोकन भाईंनी आपल्या संपूर्ण जीवनात या उद्यमशीलतेचा व त्यातून निर्माण केलेल्या उद्योग साम्राज्याचा परिचय दिला आहे ..

    अशोकभाईंचे संपूर्ण जीवन हे एक चालते-बोलते विद्यापीठ होते.त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असे. त्यांची सामाजिक बांधिलकी, ज्ञानयोग आणि कर्मनिष्ठा ही आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहे. उद्योग म्हणजे  केवळ खोऱ्याने पैसा ओढून चैन विलास करणे नव्हे तर मिळालेला प्रत्येक रुपया आपला नसून त्यातील काही हिस्सा समाजाचा आहे आहे आणि तो त्याला परत करणे हे माझे कर्तव्य आहे..” अशी ऊदात्त भावना ठेवून त्याप्रमाणे आचरण करणारे एक अलौकिक आगळे व्यक्तिमत्व होते!.

मानवी जीवनाची उंची तो किती जगतो यावर नाही, तर तो इतरांसाठी किती जगतो यावर ठरते. संतांनी सांगितलेला हाच परमार्थ आपल्या आचरणातून प्रत्यक्ष उतरवणारे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. अशोक पाटील.!! हातातील ‘दातृत्व’ आणि  हृदयातील  जपलेले ‘मित्रत्व’ म्हणजे अशोक!!

अशोकनी याच भावनेने आपल्या संपत्ती मधून समाजातील गरजू, वंचित आणि अडलेल्या हातांना नेहमीच बळ दिले. त्यांच्या दातृत्वाची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्यात कुठेही अहंकाराचा लवलेश नव्हता.

  आजच्या आधुनिक आणि स्वार्थी जगात जिथे नाती पैशाने तोलली जातात, तिथे अशोक पाटील यांनी ‘मैत्री’ या शब्दाला एक वेगळीच उंची दिली आहे. त्यांच्यासाठी मित्रत्व हे केवळ सुखामध्ये एकत्र येणे नव्हे तर  संकटात सावलीसारखे उभे राहणे, असे होते. 

अशोकजींनी आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी मित्रत्वाचे नाते जोडलेले दिसते . एकदा निर्माण केलेले नाते जिवापाड  जपले आहे.त्यांच्या अशा वागण्यामुळेच फार मोठा लोकसंग्रह करू शकले .

अशा दुर्मिळ व्यक्तिमत्वा बद्दल सुभाषितकार म्हणतात:

शैलै शैलै न माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे ।

साधवो नहि सर्वत्र चन्दनं न वने वने ॥

 प्रत्येक पर्वतावर रत्न मिळत नाही, प्रत्येक हत्तीच्या मस्तकात मोती नसतो, सर्व वनांमध्ये चंदनाचे झाड नसते; त्याचप्रमाणे अशोक भाई सारखे ‘दातृत्व’ आणि ‘मित्रत्व’ जपणारे सुजाण, सज्जन पुरुष,  क्वचितच  निर्माण होतात.. आम्ही भाग्यवान असा हा दुर्मिळ माणूस  आमच्या बोर्डी गावात आमच्या सोक्ष समाजात आमच्या महाराष्ट्रात निर्माण झाला . !!

   एक महान उद्योजक , एक सच्चा मित्र!

  श्री. अशोकभाई एक महान व्यवसायिक होते यात काही शंकाच नाही. त्यांच्याही पेक्षाही  मोठे उद्योजक समाजात निश्चितच असतील. पण अशोक भाईंचे  वेगळेपण म्हणजे त्यांचे जीवन सत्कर्मांच्या पुष्पांनी जोडला  एक सुंदर गुच्छ आहे. 

   अशोक भाईंचे तेवढेच कर्तुत्ववान व प्रतिभाशाली पुत्र नचिकेत यांनाही आपल्या पित्याचा उज्वल व अफाट वारसा मिळालेला आहे . आपल्या महान पित्याचा वारसा ते तितक्याच समर्थपणे पुढे नेतील याची खात्री आहे. आपल्या वडिलांचे ऋण व्यक्त करताना नशिकेत यांनी खालील प्रमाणे श्रद्धांजली अर्पित केली आहे ती त्यांच्याच शब्दात..

   *माझे वडील* — व्यवसायातील कुशाग्र बुद्धिमत्ता आणि आयुष्याविषयीचा संसर्गजन्य उत्साह एकत्र जोडण्याची त्यांच्याकडे विलक्षण क्षमता होती. कोणताही यशस्वी व्यवसाय उभारण्याआधी आधी तांत्रिक पाया पक्का करावा लागतो, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच “कसं” करण्याआधी “का” करायचं हे मला समजावं, यासाठी त्यांनी असंख्य तास खर्च केले. त्यांची जिज्ञासा अथांग होती आणि ते सतत पुढच्या कल्पनेच्या मागे धावत असत. युरोपियन बाजारासाठीची प्रीमियम मॅट्रेसेस, आघाडीच्या वाहन उत्पादकांसाठी ऑटो कंपोनंट्स, आणि चलनी नोटांमध्ये वापरले जाणारे विशेष सिक्युरिटी फायबर्स — हे त्यांचे काहीसे अपरिचित पण उल्लेखनीय उद्योग होते. त्यांच्यासाठी प्रत्येक नवीन तंत्रज्ञान म्हणजे सोडवायला आलेलं एक कोडं आणि सापडायला आलेली एक व्यावसायिक संधी होती.”

  “नवनिर्मितीची त्यांना जेवढी आवड होती, तेवढीच आर्थिक शिस्तीचीही. प्रत्येक रुपया कुठून येतो आणि कुठे जातो, हे त्यांना बरोबर माहीत असायचं. “नफा फक्त जास्त कमावून होत नाही, तर शहाणपणाने खर्च करूनही होतो,” हे ते नेहमी सांगायचे. कर्जाकडे ते अत्यंत सावध नजरेने पाहायचे. त्यांचं तत्त्व साधं होतं: स्वतःच्या भांडवलावर वाढा, संयम ठेवा आणि वेळेला त्याचं काम करू द्या. कितीही आकर्षक संधी समोर आली तरी ते मला हळूच कर्जापासून दूर ठेवायचे, कारण “संथ पण स्थिर वाढीमुळेच पाया मजबूत होतो,” हे त्यांना पक्कं ठाऊक होतं.”

     “कष्ट हा त्यांचा रोजचा मंत्र होता. त्यांनी कधीच शॉर्टकट शोधला नाही आणि त्वरित यशाची अपेक्षाही केली नाही. प्रामाणिकपणे काम करा, सातत्य ठेवा आणि श्रद्धा ठेवा — मग चांगलं घडून येतंच, हा त्यांचा विश्वास होता. आणि स्वतःच्या आयुष्यातून त्यांनी हा धडा वारंवार सिद्ध करून दाखवला.”

    “व्यवसायात कितीही व्यस्त असले तरी त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक नेहमी माणसांमध्ये होती. रोटरी आणि इतर सामाजिक उपक्रमांतून समाजाला परत देण्यात त्यांना मनापासून आनंद वाटायचा. इतरांना यशस्वी होताना पाहणं हाच त्यांच्यासाठी खरा आनंद होता. पण या सगळ्याहून अधिक, त्यांनी कुटुंबाला जपलं. वडील म्हणून कमी, पण मित्र म्हणून अधिक — सल्ला, प्रोत्साहन किंवा एखादी गोष्ट सांगायला ते कायम तयार असायचे. माझ्या मुलांना त्यांच्या बोर्डी आणि कोसबाड येथील लहानपणीच्या गोष्टी ऐकायला फार आवडायचं. आणि गंमत म्हणजे, प्रत्येक वेळी सांगताना त्या गोष्टी अजूनच रंगतदार होत जायच्या. आईला त्यांनी आयुष्यात आणि व्यवसायात खऱ्या अर्थाने सहजीवनी मानलं, प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात तिला सामील करून घेतलं. माझ्या पत्नीचंही त्यांनी लेकीप्रमाणे प्रेमाने आणि अभिमानाने स्वागत केलं. आणि मग होता आमचा स्नोवी — आमचा छोटा बिचॉन फ्रीझ. त्याला तर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळायची! बाबांना तो इतका प्रिय होता की कधीकधी त्याच्यासाठी खास खाऊ थेट दुबईहून मागवला जायचा”.

     “त्यांनी आम्हाला व्यवसाय, शिस्त आणि चिकाटी शिकवली, पण आम्ही जे धडे मनापासून जपतो ते त्यांनी शब्दांशिवाय शिकवले: जिज्ञासू राहा, नम्र राहा, कुटुंबाला जपा, जमेल तेव्हा इतरांना मदत करा आणि प्रवासाचा आनंद घ्या. हे धडे आजही आम्हाला रोज मार्ग दाखवतात — आणि सोबत येतात त्या असंख्य आठवणी, हसू आणि त्यांच्यासोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण…”

   एका कर्तुत्ववान पित्याला तितक्याच कर्तृत्ववान मुलाने वाहिलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली वाचल्यावर आणि काही बोलायची गरज नाही असे वाटते.

   बोर्डीच्या सामान्य शेतकरी कुटुंबापासून सुरुवात करीत ,ते स्वतःच्या विमानाने आकाशात भरारी घेणारा आणि सागरावर लहरणाऱ्या विशालकाय आगबोटीच्या निर्मितीची स्वप्न पाहून ती प्रत्यक्षात आणतांना, उद्योग”सम्राट अशोक” ही बिरूदावली सार्थ ठरविणा अशोक भाईंचे संपूर्ण जीवन म्हणजे एक महान यशोगाथा आहे . मी त्याची थोडी झलक येथे पेश करू शकलो .अजूनही खूप लिहिता येण्यासारखे आहे. ते पुन्हाकधीतरी?

     अशोक भाईंचे  चरित्र व चारित्र्य आजच्या तरुणपिढीसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. अशा या अजातशत्रू आणि दिलदार व्यक्तिमत्त्वाला मनापासून अभिवादन. त्यांच्या स्मृतीला लाख लाख वंदन!

  या लेखासाठी श्रीमती जयश्री ताई अशोक पाटील, श्री नचिकेत अशोक पाटील व श्री श्रीकांत हरी पाटील यांनी बहुमोल सहाय्य व मार्गदर्शन केले आहे त्यांचे मनःपूर्वक आभार.

दिगंबर राऊत. 

मा.डे.जनरल मॅनेजर( आंतरराष्ट्रीय व्यापार)

 हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड.

 माजी कार्यकारी विश्वस्त ,सो क्ष संघ फंड ट्रस्ट.