जागतिक वारसा मिरविणारा देश – “इटली”
गेल्या तीन-चार वर्षांपासून भारता बाहेर दरवर्षी एका देशाला भेट द्यायचे ठरवत असतो. यंदा आम्ही ‘इटली’ला भेट देण्याचे ठरविले. प्रत्येक वेळी आपले ‘गंतव्य स्थान’ निवडतांना आम्हा कुटुंबीयांची जरुर काही खलबते होतात; विशेषतः बच्चे कंपनीची मते ही अधिक ग्राह्य ठरविली जातात. यंदा इटलीला प्राधान्य मिळण्याचे कारण आम्ही वाचलेले, डॉ. मिना प्रभु यांचे “रोम राज्य” हे पुस्तक व शालेय जीवनात कधी तरी अभ्यास करतांना- “पिसाचा झुलता मनोरा”, “धडधडणारा ज्वालामुखी वेसुव्हीयस”, मायकल एंजेलो, लिओनार्दो दा. विंसी यांच्या अप्रतिम चित्रकृति- अशा काही आठवणी होत. त्यामुळे यंदा मार्चमध्ये, इटली दर्शनाचे पक्के ठरले. आम्ही त्यानुसार १२ दिवसांची ‘कार्यक्रम पत्रिका’ तयार केली. याबाबतीत ‘सर्व हक्क’ दिप्तीच्या (आमची कन्या) स्वाधिन केले व तिने अतिशय कष्टपूर्वक, इंटरनेटचा वापर व ‘MakeMyTrip’ या प्रवासी कंपनी कडून थोडी मदत घेऊन, प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम, भेट देण्याची शहरे, तेथील वास्तु, हॉटेल व्यवस्था, प्रवास (विमान व अंतर्गत) हे सर्व छान पैकी तयार केले, यावर्षी दादा-स्वाती (आमचा थोरला मुलगा व सून), कंपनी नसल्यामुळे आमचा हिरमोड झाला होता, मात्र दीप्तीने माघार न घेता, खूप जिद्दीने हे सर्व तयार केले. आम्ही संमती दिली.
साधारण पणे १२ दिवसांचा हा एकूण प्रवास आम्ही बेंगलोरहून सुरु करणार होतो. मुंबईत आम्ही मात्र “चौधरी” बेंगलोर मध्ये असल्याने आम्ही मुंबई – बेंगलोर विमान प्रवास करुन त्यांना भेटायचे व सर्वांनी बेंगलोरहून रोमकडे प्रवास करायचे ठरले.
बेंगलोर → रोम, रोम ला तीन दिवस,
पुढे रोम → नपेल्स, नपेल्सला ३ दिवस,
नपेल्स ते फ्लोरेंन्स (3 दिवस),
फ्लोरेंन्स व वेनिस एक दिवस,
वेनिस ते मिलान १ दिवस व
मिलान हून, विमान पकडून पुन्हा बेंगलोर.
असा प्रवासाचा बेत होता.
विमान प्रवास हा ‘कतार ऐअरवेज’च्या विमानाने, तर इटली अंतर्गतचा प्रवास. हा, ट्रेन, बस, बोट, टॅक्सी, असा सोईस्कररित्या करावयाचा होता. हॉटेल व्यवस्था देखील Make My Trip च्या मदतीने, उत्तम अशा ठिकाणी केली होती. तसेच, मार्गदर्शक ही काही ठिकाणी आधीच ठरविले होते व काही ठिकाण गरजेनुसार आम्ही निवडले.
काही लोकांना पूर्वी इटली प्रवासात भामटेगिरीचे वाईट अनुभव आले होते, त्यामुळे आम्ही याबाबतीत खूप सावधगिरी बाळगण्याचे ठरविले होते. मात्र सुदैवाने आम्हाला असा वाईट अनुभव संपूर्ण प्रवासात कोठेच आला नाही.
प्रथम ग्रासे मक्षिका– या न्यायाप्रमाणे, आम्ही दोघे मुंबईहून बेंगलोरला, १३ तारखेस संध्याकाळी ५:३० pm च्या ‘जेट कंपनीच्या’ विमानाने निघणार होतो, मात्र त्यादिवशी जेट कंपनीने आपली बरीच उड्डाणे, DG- CA च्या नवीन नियमामुळे रद्द केली व आम्हाला तसे कळविले देखील नाही. ऐअर बस ( Air Bus ) 737 Max – ह्या प्रकारच्या विमानांना, त्यांत असलेल्या तांत्रिक दोषामुळे, उड्डाण करण्यास परवानगी नाकारली गेली व त्यामुळे ही उड्डाणे रद्द झाली. मात्र त्यामुळे आमची खूपच तारांबळ उडाली व दीप्तीने, विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून, सतत संपर्क साधून व थोडी दमदाटी देखील करुन कसे तरी मुंबई – बेंगलोर हे रात्री ९:४५ वा. चे उड्डाण मिळविले, व आम्ही एकदाचे मार्गस्थ झालो. रात्री १२:४५ वाजता बेंगलोर घरी पोहोचलो. दीप्ती, प्रशांत जागे होते व विमानतळावर आले होते. क्रिशा, आर्यन देखील खूपच आनंदीत झाले, आम्हाला ही त्यांना खूप दिवसांनी पाहून बरे वाटले.
पुढचा दिवस विश्रांतीत गेला. रात्री १२ वाजता बेंगलोर विमानतळावर सर्व जण आले. ३:३० AM वाजता बेंगलोर→ दोहा विमान होते.
दोहा→ रोम प्रवास देखील छान झाला. ‘कतार एअरवेज’ प्रवासाची चांगली व्यवस्था ठेवते – विमान बरेच रिकामी होते, त्यामुळे झोपून जाण्यास बरे पडले. संध्याकाळी ६ वाजता आम्ही ‘रोम’ आंतरराष्ट्रीय विमानतळावर हजर झालो. एक ‘स्वप्न पूर्ती’ आंनद झाला. ज्या रोम बद्दल पाठ्यपुस्तकांतून, “Rome was not built in a day”.. “रोम पहावे – मग राम म्हणावा – ” इ. वचने ऐकली होती व जे पाहण्यासाठी एवढी यातायात केली, त्या रोमच्या विमानतळावर आम्ही सुखरूप उतरलो होतो.
मात्र थोड्याच वेळात, ‘MakeMyTrip’ कंपनीचा एक छोटा धक्का मिळणार होता – त्याआधी थोडी, वीजा (visa) ची गोष्ट!
इटलीला जाण्यासाठी आम्हाला ‘सेनझेन’ वीजा द्यावा लागणार होता व तो आम्ही मुंबईतील, BKC येथील ऑफिस मधून घ्यावयाचे ठरविले होते. मात्र चौधरी कंपनी बेंगलोर ऑफिसातून वीजा घेणार होती, त्यामुळे आम्हा दोघांनाच, यावेळी मुलाखतीसाठी जावयाचे होते. प्रशांतने सर्व कागदपत्रे चोख उपलब्ध करुन पाठविली, व मुलाखतीचे दिवशी ‘खास’ व्यवस्था (लाइनीत न राहता), करुन दिली, त्यामुळे हे काम देखील सोपे झाले होते, व आम्हाला त्वरीत ४ दिवसात, एक महिन्याचा वीजा पाठविण्यात आला.
हां, तर आम्ही सर्व सामान-सुमान घेऊन विमानतळा बाहेर आलो व हॉटेलमध्ये जाण्यासाठी असलेल्या बसचा शोध घेण्यासाठी, ‘MakeMyTrip’ च्या येथील संबंधीताशी संपर्क केला. त्याने “आमची बस १० मिनिटा पूर्वीच गेली, तुम्हाला उशीर झाला..” असे फालतू कारण सांगितले. खूप राग आला होता, पण काय करु शकत होतो, दीप्तीने भारतात फोन करुन MakeMyTrip च्या ऑफिसात संबंधीताशी बोलण्याचा प्रयत्न केला, खूप वादावादी झाली. पण शेवटी आम्हाला €100 (१०० युरो) खर्चून, टँक्सी करुन, हॉटेल ‘मेर्केनारीयेस रोम’ (Mercenaries Rome) मध्ये पोहोचलो, ८ वाजले होते!
थोडा आराम केला. हॉटेल बरे होते, स्वच्छ व नीट नेटकेपणा असला, की आपणास छान वाटते. खोल्याही मोठ्या होत्या, दोन कुटुंबासाठी, दोन स्वतंत्र खोल्या व प्रत्येक खोलीत एक अधिक ‘बेड’ होता. क्रिशाचा मुक्काम आमच्या बरोबर होता.
विश्रांती नंतर, एक रपेट रोम शहराच्या, उपनगरांत मारली, मेट्रोने आम्ही प्रवास केला, ‘कलोसियम’ व ‘जादुई धबधबा’ (Magic fountain) ओझरते पाहिले, पायी चालून शहराचे अवलोकन झाले. रोमच्या या प्रथम दर्शनामुळे अगदी अचंबीत होऊन गेलो. जगातील एक सर्वांत मोहक देश, त्याच्या खूप अदभुत वारशासह पाहण्याची संधी आपणास मिळाली आहे, याची जाणीव झाली.
दुसऱ्या दिवशी वेटिकन शहर, तेथील पवित्र ‘सेंटपीट’ आणि कला कुसरीने भरलेली चित्र – वास्तु – संग्रहालये पाहीली. स्पॅनिश स्टेप्सचे विलोभनीय दृष्य पाहिले. त्रेवी फॉऊंटन (trevi fountain) मध्ये एक नाणे फेकून, भविष्यातील चांगल्या ‘नांदी’साठी बेगमी केले. संध्याकाळी “हायड्रेनीयन व्हीला” हे जुन्या रोमन सम्राटांनी उभी केलेली, पण आज उध्वस्त झालेली नगरी पाहिली. एक खंत सतत मनात येत होती. “कधी तरी येथे किती उत्तुंग वैभव नांदत असेल… आता उरले आहेत नुसते दगड!”
‘विषेश हाऊस’ व परिसरातील पाण्याची कलात्मक वापर करुन तयार केलेली कांरजी, धबधबे पाहून मन मोहून गेले. शेकडो वर्षापूर्वी, नैसर्गिक प्रवाहाला विविध प्रकारे उंच खाली फिरवून, तयार केलेले सौंदर्यशाली धबधबे केवळ अविस्मरणीय!
दुसऱ्या दिवशी ‘कलोसियम’ या, जुन्या सम्राटाच्या करमणूकीसाठी बांधलेले सार्वजनिक कला करमणूक गृह पाहिले. बरीच पडझड झाली आहे, तरी जो काही भाग शिल्लक आहे, त्यावरुन त्यांच्या वैभवाची व छान शोकीच्या छंदाची कल्पना येते “नरेची केला हीन किती नर” या म्हणींचा प्रत्यय येतो.
दोन हजार वर्षांपूर्वी बांधलेले पॉथीओन (pantheon) पाहिले. आजपर्यंत वापरात राहीलेली, जगातील सर्वांत जुनी वास्तु म्हणजे हे पॉथीओन. जणू काही वर्षांपूर्वीच ती बांधली आहे, असे वाटते. व ज्या लोकांनी तिचा असा सांभाळ केला, त्यांचे कौतुक वाटला. ‘पॅलाटिनाचे’ जुने राज महाल पाहून त्यावेळच्या वैभवाची फक्त कल्पना करावयाची ! “रोम एक दिवसात बांधले गेले नाही,” त्यामुळे केवळ तीन दिवसात काय काय पाहणार?
आज ‘रोम’ सोडून नेपल्स (Naples)ला जावयाचे सर्व सामाना सहित, हॉटेल ‘मर्क्युरोमा’ सोडले. खूप सुंदर व आटोपशीर निवास स्थान मिळाले. आज प्रथमच ‘ बुलेट ट्रेन’चा प्रवास इटली मध्ये करावयाची संधी- खूपच आरामदायी ‘अप्पर इकॉनॉमी’ (upper economy) क्लासचा हा प्रवास छान झाला. प्रवासात ‘रेल सुंदरी’नी खूप अगत्य दाखवून ‘चहापान’ दिले. आजूबाजूचा प्रदेश रम्य व शेती खाली असलेला वाटला.
नेपल्स स्टेशन भव्य आहे. हॉटेल ‘हॉलिडे इन’ जवळच असल्याने, पदयात्रा करीतच हॉटेलात पोहोचलो. तेव्हा १२ वाजले होते, थोडी विश्रांती घेऊन, टॅक्सीने नेपल्स बंदरावर आलो व ‘काप्री’ बेटासाठी जाणारी बोट पकडली. सुमारे २०० प्रवासी होते!
तासाभरात काप्री बेटावर पोहोचलो. जगातील उत्तम बेटा पैकी हे भूमध्य समुद्रातील ठिकाण व विराट-अनुष्का यांच्या विवाहाचे स्थान, यावरुनच जगात या रम्य भूमीचे काय महात्म्य आहे ते कळावे. नीळेशार पाणी, निरभ्र नीलाई आकाश आणि छोट्या मोठ्या टेकडीवर वसलेली टुमदार घरे पाहून, हे उत्तम बेट का याची प्रचिती येते.
येथून दुसरी छोटी स्पीड बोट ‘speed boat’ पकडून आम्ही ‘ब्ल्यू ग्राटो’ या निसर्ग चमत्कारांची प्रचिती घेण्यासाठी पुन्हा समुद्र प्रवास सुरु केला. हा प्रवास देखील खूपच आल्हाददायक! पाणी कापीत पुढे जाणारी बोट व मागे बोटीच्या पंख्याने पाणी घुसून तयार केलेला शुभ्र धवल फेस, अदभुत वाटत होते.
पण आज आम्हाला नशीबाची साथ नव्हती- डोंगर दिसू लागले, समुद्रातील या डोगरांत, काही गुहा तयार झाल्या आहेत.व त्यातील एक गुहा म्हणजे “ब्लू ग्रोट्टो”! मात्र आता भरती सुरु झाल्याने लहान बोट (गोंडोला), आत शिरु शकत नव्हती. थोडी उंची (पाण्याची) कमी असती तर स्पीड बोटीतून पुन्हा लहान गोंडोला बोटीत (माणसांनी वल्हे मारावयाची) बसून गुहेत शिरावयाचे व तेथील ‘धुंद निळाई’ अनुभवावी असा बेत होता, पण भरती मुळे पुन्हा परत यावे लागले. काप्री बेटावर फिरलो, अनाकाप्री हे गावही पाहिले व तेथील धुंद ग्रामीण वातावरणाचा आनंद चालत सफर करुन अनुभविला. एक दुसरा अदभुत अनुभव.
आज शानदार लक्झरी बस मधून, इतर सह प्रवाशांच्या सोबतीने अमाल्फी, सोरेंटो, रावेल्लो, अशा बेटांची सफर केली.अमाल्फी बेटाचा रस्ता, आणि त्यांचे सौदर्य पाहून, या पेक्षा सुंदर जागा जगांत असेल काय, असे वाटू लागते. आम्ही काश्मीर तर अनेकदा पाहिले आहे, स्वित्झर्लंड, पॅरिस, ही पाहिले, मात्र येथील निसर्गाला उपमा नाही. समुद्राच्या निळ्याशार पाण्यात उभ्या असलेल्या छोट्या टेकड्या, त्यावर गोदांने चिकटवून ठेवावीत अशी टुमदार घरे व त्यांच्या भोवती रंगा रंगाची उमललेली फुले व पिवळ्या धमक लिबांचे घोस ! मध्येच, पाण्यात लांबवर दिसणाऱ्या छोट्या डोंगराच्या कातरलेल्या गुहा! एखाद्या लहान डोंगरावर दिसणारी एक वा दोन टुमदार आलिशान घरे, कोण्या धनीकांनी कधी काळी उभी केलेली !
बस मधून जातांना, सकाळच्या कोवळ्या उन्हात काय काय पाहू आणि नको, असे वाटते. बहुरत्न वसुंधरेचे हे आगळे रुप आणि त्याचा आस्वाद आयुष्यभर घेणाऱ्या या लोकांचा हेवा वाटत राहतो, परमेश्वराने आम्हाला काही तास का असेना, हे अनुभवण्याचे भाग्य दिले, म्हणून त्याचे कृतज्ञ पूर्वक स्मरण येथे होते !
खरं तर आजची आमची ट्रीप ही दोन तीन बेटे पाहण्या पुरतीच मर्यादित होती व सर्व प्रवाशांबरोबरच आम्हाला रहावयाचे होते, मात्र दीप्तीच्या मनात – “ब्लू ग्राट्टो” नाही तर येथून जवळ असलेला ” एमेराल्ड ग्राट्टो” पाहायचाच असे होते. सहल सूत्रधार आम्हाला एकटे सोडायला तयार नव्हता, मात्र दीप्तीने, जिद्द करुन व मोठी जबाबदारी घेऊन, दीड तासाच्या लंच टाईम मध्ये अमाल्फी बेटा पासून सुटणारी एक छोटी बोट पकडून समुद्रात कूच केले. उशीर करुन चालणार नव्हते, मात्र दैवाने ही साथ दिली. आम्ही ‘एमेराल्ड ग्राट्टो’ गुहे पर्यंत आलो, तेथे पुन्हा बोट बदलून छोटा ५/६ प्रवाशांच्या, हाताने वल्हविणाऱ्या ‘गोंडोला’ मध्ये बसलो व भरती नसल्याने आणि सूर्य प्रकाश असल्याने, त्या ‘अलिबाबाच्या’ गुहेत प्रवेश करता आले.खूपच सुंदर दृश्य होते. गुहेच्या अंधारात समुद्राचे पाणी हिरव्या गर्द रंगात चमकत होते व काही मिनिटे का असेना, ते दैव दुर्लभ दृष्य सर्वांनी पाहून नशिबाचे आभार मानले, कारण काल नशिबाने हुलकावणी दिली होती.
दिड तासाचे आत, आम्ही हा प्रवास आमच्या जबाबदारीवर आटोपून, पुन्हा अमाल्फी बेटावर येऊन, आमच्या ग्रुपमध्ये सामील झालो. सूत्रधारालाही कौतुक वाटले ! एक आगळा अनुभव व साहस अनुभवून आम्ही रात्री हॉटेल वर परत आलो.
काप्री, अमाल्फी, सॉरेंटो, रिव्हाली, ही बेटे पाहणे म्हणजे स्वर्गीय आनंद तर आहेच, पण एरव्ही कोणतीही प्रवाशी कंपनी दाखवीत नसलेल्या या पर्यटन स्थळांना आपण भेट दिली, हा विचार देखील खूपच सुखावून !
नेपल्स मधील पुढचा दिवस खूपच वेगळा. व्हेंसुव्हियस ज्वालामुखी सन ०७९ मध्ये प्रज्वलित झाला व त्यामुळे निर्माण झालेली राख, व लाव्हा याच्या थरा खाली, त्यावेळी आजुबाजुला नांदत असलेली दोन समृध्द शहरे पॉम्पी व इर्क्युलेनीयम ही राख व लाव्हा यांचे खाली संपूर्ण झाकली गेली. सुमारे ६ मीटर उंचीचा हा थर होता, त्यामुळे सुमारे दोन हजार वर्षे त्याच अवस्थेत ती दबून होती. मात्र सन १७५० च्या सुमारास त्याचे उत्खनन केले गेले व त्या सुमारे दोन हजार वर्षा पूर्वीच्या संस्कृतीचे दर्शन, आज पाहत असलेल्या जुन्या अवशेषांतून घडते. अतिशय समृध्द संस्कृती व वैभव यांचे दर्शन आपण या उकरुन काढलेल्या शहराच्या जुन्या स्मृती पाहून घेऊ शकतो. त्या काळातील सुंदर चित्रे, शिल्पे, आंघोळीची सार्वजनिक व्यवस्था, बेकऱ्या, वाईनरीज … काय नाही. दोन हजार वर्षांपूर्वी देखील मानवी व्यवस्था एवढी संपन्न व समृध्द होती. तेथे दिसणाऱ्या मानवी हाडांच्या, सापळ्यांच्या इतर अवषेशा वरुन संपन्न व श्रीमंतीत जीवन जगणारी ही माणसे, एका क्षणात कशी नामशेष झाली हे कळते – काही सांगाडे निद्रीस्तावस्थेत वर काही पळण्याच्या कृती मध्ये…. ‘काल-पुरुष’ सुद्धा किती निर्दय असू शकतो, याची प्रचिती येते! येथून बाहेर पडतांना मन सुन्न होऊन जाते!
दुपारी व्हेसुव्हीयस ज्वालामुखी वर चढाई होती. ज्या पर्वताने दोन हजार वर्षांपूर्वी एवढा आकांत करुन, दोन प्रचंड वैभवशाली शहरांची अक्षरशः धूळधाण केली व अजूनही तो धूमसतच असतो येत्या ३०/४० वर्षांत पुन्हा एक जबरदस्त तडाखा या ज्वालामुखी पासून मिळण्याचा संभव आहे. असा हा व्हेसुव्हियस जवळजवळ ३,५०० फूट उंचीचा, गोलाकारांत चढ आहे. सर्व रस्ता लाव्हा रसांतून बनलेल्या, चुनखडीचा असल्याने भुसभुशीत . त्या दिवशी तापमानही सुमारे १२℃, जोरदार वारे व मध्ये मध्ये पाऊस देखील, त्यामुळे बाकीची मंडळी दीप्ती, प्रशांत, क्रिशा, आर्यन आरामशीर पणे चढाई करु शकली- मंदाने तळाशी बसणे पसंद केले, तर मी आरामात, हळूहळू पण शेवटपर्यंत पोहोचलो. एकंदरीत आल्हाददायक व आत्मविश्वास देणारा अनुभव होता. मुखाजवळ पोहोचल्यावर येणार भयाण आवाज व धुराचे भपकारे अजून इशारे देत आहेत….. “माझ्या पासून सावधान राहा!” उतरण तर चढणी पेक्षा कठीण वाटली कारण, मागून सतत कोणीतरी ढकलत असल्याची जाणीव होत होती !
रात्री एवढ्या थकव्यानंतर, गेल्यागेल्या, कधी नव्हे अशी गाढ झोप लागली!
आता पुढचा टप्पा “फ्लॉरेन्स”:
फ्लॉरेन्स हे इटालियन कलाकारांचे माहेरघर ! या देशाचा कोणताही श्रेष्ठ कलाकार घ्या, त्याची पाळेमुळे फ्लॉरेन्स मध्येच सापडतील ! शहर मोठे टुमदार आणि आजही त्या जुन्या ‘कला अस्मितेची’ जाणीव करुन देणारे. पिढ्यान पिढ्यानी हा जुना वारसा जपतांना शहर देखील तसेच ठेवले आहे. त्याच जुन्या इमारती, खिडक्या, बारीक बोळ आणि त्या विश्ववंद्य कलाकारांच्या अप्रतिम कलाकृती येथे मुळ स्वरुपात पहावयास मिळतात !
येथे रोमची भव्यता नाही, मात्र नजाकत भरपूर ! येथे इटालियन जेवण देखील सुंदर मिळते ! आमच्या हॉटेल शेजारीच एका इटालियन आजीबाईची खानावळ होती. आम्ही तेथे पहिल्यांदा जेवण घेण्यास गेलो व ओळख झाली – त्यानंतर दोन एक वेळा आम्ही तेथे गेलो, खूप अगत्य व आदरातिथ्य मिळाले!
सॅनमार्को, डेव्हीडचा पुतळा, व इतर अनेक सुंदर कलाकृती येथील म्युझियम मध्ये पहावयास मिळाल्या. डोळ्यांचे पारणे फिटले ! शहराची वॉकींग टूर ही घेतली !
एका शिल्पाने लक्ष विशेष आकर्षून घेतले, जगातील चार महान नद्यांचे ते शिल्प होते व आमच्या गंगामैया त्यांत स्थान होते. भारतीय संस्कृती ही ऋषीमुनींचा आदर करते, ऋषींच्या मुखातून पडणाऱ्या गंगेच्या धारेला, नमस्कार केला. बाकी तीन दिशांना नाईल, थेम्स, व अमेझॉन होत्या !
आज प्रथमच एक भारतीय भोजनगृहांत ‘बिर्याणी’ चा अस्वाद घेता आला ! फॉरेन्स मध्ये काय बघू आणि काय नाही असेच होते. इटली हे कलेचे माहेरघर आणि फ्लॉरेन्स हे इटलीच्या कलेचे माहेरघर – कितीही पाहिले तरी मन तृप्त होत नाही.
तेथील आर्ट म्युझियम, ड्यूओमो, सोता मारीयो कॅथेड्रल त्याचा विस्मय चकीत करणारा घुमट सर्व पाहून घेतले ! उफीजी गॅलेरी आणि पीट्टी पॅलेस हे तर पुर्ण पाहताच आले नाहीत. “देता अनंत हस्ते… घेशील किती दो कराने…” अशी स्थिती होती!
पुढचा दिवस, एक प्रसिद्ध ‘वायनरी’ला भेट देऊन ‘पिसाचा’ कलता मनोरा पाहण्यासाठी ठेवला होता. टूर कंपनी बरोबर, स्पेशल आराम बसने निघालो होतो. सकाळचा प्रवास, खूपच नयनरम्य आजूबाजूला फ्लॉरेन्सची नगरे, द्राक्षाचे मळे, व मायकेल एंजेलो काळातील टुमदार घरे पाहत खूप आनंद मिळत होता!
ही वायनरी खूप प्रसिद्ध होती व अनेक प्रकारच्या सुंदर इटालियन वाईन्स येथे तयार होतात. विषेशतः लिबांपासून बनविणारी वाईन आम्हाला खूप छान वाटली. सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला. इतरही अनेक (१५-२०) प्रकार येथे उपलब्ध होते. ३/४ वाईन्सचा आस्वाद घेतल्या वर ऑलिव्ह ऑईल मध्ये बनविलेले, खुमासदार इटालियन जेवण देखील यथेच्छ झोडपले ! काही वाईन्सची खरेदी करुन ‘पीसा’ च्या गावाला निघालो.
पिसाच्या झुकत्या मनोऱ्याचे शालेय पाठ्यपुस्तकात वर्णन वाचले होते. मात्र त्यावेळी एके दिवशी आपण प्रत्यक्ष याचे समोरुन दर्शन घेऊ, असे वाटले नव्हते. देवाची कृपा, तो योग, आज जुळून आला होता व ते कौतुक पहात आहोत, हे खरे वाटत नव्हते !
हा झुकता मनोरा खरोखर अचंबित करणारा आहे. काही वर्षापूर्वी याची डागडूग केल्याने तो आता स्थिरावला आहे व सुस्थितीत वाटतो ! मनोऱ्यावर चढणे सोपे काम नाही, कारण गोलाकारात जाणाऱ्या, आतील पायऱ्या व त्या देखील झुकलेल्या अवस्थेतील मनोऱ्यात ! दीप्ती, प्रशांत, व मुले हे दीव्य करुन आली. त्यांच्या तोंडून मनोऱ्याच्या टपावरून दिसणारे शहराचे दर्शन किती भव्य आहे ते ऐकले! पिसाला टाटा करुन निघालो, फ्लॉरेन्स मध्ये हॉटेलवर !
पिसा गावातील वाईनरीला भेट दिल्यावर एक महत्वाची गोष्ट कळली. ‘वाईन मेकींग’ या विषयाचे शास्त्र शुध्द शिक्षण देणारी काही महाविद्यालये येथे आहेत व तेथे जग प्रसिध्द ‘वाईन तज्ञांच्या’ मार्ग दर्शनाखाली विद्यार्थ्यांस, पदवी, पदव्युत्तर व अगदी पी.एच.डी पर्यंत शिक्षण मिळू शकते. ही तज्ञ मंडळी आपल्या विद्यार्थ्यांस, शिक्षण संपल्यानंतर, त्यांना ‘ वाईन मेकींग ’ मध्येच आपला व्यवसाय करावयाचा असल्यास, खूप मदत करतात. आज जगातील अनेक प्रसिध्द वाईनरीज चे मालक या अशाच विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत “युनिव्हर्सिटी कॅरोलिना डेल” ही अशीच येथील प्रसिध्द युनिव्हर्सिटी आहे.
आता आमच्या इटली प्रवासाचा, शेवटचा टप्पा सुरु झाला आहे. फ्लॉरेन्स सोडून आज व्हेनिसला जायचे. आज प्रवास सुरु करुन अकरा दिवस झाले आहेत. फ्लॉरेन्स ते व्हेनिस प्रवास बुलेट ट्रेननेच केला. तेच आरामशीर डब्बे, रेल सुंदरीचे आदरातिथ्य व गाडीच्या खिडकीतून दिसणारे निसर्गाचे लोभस रुप!
‘व्हेनिसला आम्ही एकच दिवस ठेवला आहे, कारण हे युरोप मधील एक महागडे शहर आहे व एका संपूर्ण दिवसांत निश्चितच जे महत्वाचे पहावयाचे ते पाहून घेऊ.
गाडीच्या प्रवासातच व्हेनिस दर्शनाचे मनसुबे ठरत होते. एक अनामिक आनंदाने मन भरुन गेले होते. सर्वजण खूप उत्साहात होतो. व्हेनिस हे एक काळचे स्वतंत्र राज्य, येथील व्यापाऱ्यांनी जगाशी व भारताशी देखील हजारो वर्षांपूर्वी जबरदस्त व्यापार केला व अमाप संपत्ती मिळविली. या नगरीला ‘सुवर्ण नगरी’ बनविली. येथील रस्ते म्हणजे खळाळणारे वाहते पाणी, येथील बसेस म्हणजे पाण्यातून सळसळ पळणाऱ्या बोटी. गोंडोलाचे तांडेल व त्यांच्या सांघिक गायनाने भारावलेला आसमंत, हे देखील येथील मुख्य आकर्षण. म्हणजे ह्या “जादुई नगरीचे दर्शन” हा एक महान आनंदाचा ठेवा.
शाळेमध्ये असतांना वाचले होते भारताचे व्हेनिस म्हणजे केरळ व ऐकले होते, शेक्सपीअरचे प्रसिध्द नाटक “मर्चंट ऑफ व्हेनिस” त्यामुळे आपण जगातल्या एका ऐतिहासिक परंतु आगळ्या वेगळ्या शहरात जात आहोत, ही जाणीवच मनाला खूप उत्साहित करीत होती !
आमचे ‘मोनॅको हॉटेल’ असेच, मुख्य ‘सॅनमार्को’ च्या बाजूला, पाण्याला खेटून उभे होते. एका छोट्या गल्ली तून इमारतीत शिरावे तर रिसेप्शन वर फक्त चार माणसे उभी राहतील एवढी जागा. मात्र लिफ्ट मधून दुसऱ्या मजल्यावर गेलो तर छान प्रशस्त खोल्या व खोलीची खिडकी उघडल्यास छान, छोटी गच्ची. गच्चीतून दिसणारे बाहेरचे दृष्य व कालव्यातील बोटींचे दळणवळण, म्हणजे धमालच !
हॉटेल मधून चेकइन करुन सकाळीच आम्ही ‘व्हेनिस दर्शनास’ निघालो. ‘सॅनमार्को’, सेंट मार्क स्क्वेअर,सेंट मार्क बेसीलिका, डोजे पॅलेस व गोंडोला मधून सफर ही झालीच पाहिजे! ग्रँड कॅनाल लगत बैठक आणि रिआल्टो ब्रीज ही जमत असल्यास करा! आम्हाला दिवसा भरात हे सर्व करता आले! सकाळचे जेवण घाईतच झाले, मात्र संध्याकाळी निवांत पणे वाहत्या पाण्या शेजारील एका ‘थाई हॉटेल’ मध्ये छान पैकी मासे व इटालियन वाईनचा आस्वाद घेतला.
थंडी व वारे असल्याने अंग कुडकुडत होते पण प्रखर हीटर्स व वाईनचा प्रभाव, यामुळे आरामात बाहेर बसता आले!
व्हेनीस दर्शनाची अखेर करताना दोन गोष्टीचा उल्लेख करावाच लागेल.
एक आहे महाराष्ट्राचे लाडके भूषण कै. पु.ल. देशपांडे यांची मीना प्रभु यांनी सांगितलेली आठवण! काही वर्षापूर्वी कै. भाई, सुनीता बाई ही दापत्य, मीना ताई बरोबर इटालीच्या दौऱ्यावर असतांना व्हेनीस शहरातही आले होते. तेथील सेंट मार्क स्क्वेअर मध्ये संध्याकाळी भाईचे दैवत, चार्ली चॅप्लिन यांचा एक सिनेमा दाखविला जाणार होता. त्यासाठी ही मंडळी तेथे बसली होती. अचानक सिनेमा बंद पडला व सर्व दिवे ही गेले. प्रकाशाचा एक झोत शेजारील इमारतीच्या एका खिडकीवर विसावला — आणि काय आश्चर्य, विनोदाचा महान बादशहा, नटसम्राट प्रत्यक्ष चार्ली चॅप्लिन तेथे प्रेक्षकांना हात हलवून अभिवादन करीत होता, सांगत होता “मला काय पहाता, माझा सिनेमा पहा — मी आता किती दिवस दिसणार?” मीना ताईंनी लिहले आहे. त्याला पाहून भाई जागेवरुन उठुन उभे राहिले व अश्रुभऱ्या नेत्रांनी त्यांनी आपल्या दैवताला वंदन केले. थोड्याच दिवसात चार्लीने ही या जगाचा निरोप घेतला. सॅनमार्कोचे ते विस्तिर्ण मैदान व ती इमारत पाहताना ही आठवण आली. आज चॅप्लिन ही नाही व भाई देखील नाहीत. दोघांच्या आठवणी व्हेनिसच्या त्या सुंदर स्थळी अनुभवल्या!
आता जगप्रसिध्द ‘डोजे पॅलेस’ विषयी थोडे डोजे पॅलेस च्या भेटी शिवाय व्हेनिसची व इटलीची व्यर्थच म्हणावयाची ! ही वास्तू म्हणजे इटालियन मार्बल आणि सुवर्ण यांच्या संयुगाने हजार वर्षांपूर्वी उभे केलेले एक ‘महाकाव्यच’ आहे. महाकाव्याची प्रत्येक ओळ निरनिराळ्या व्यक्तिंना वेगवेगळ्या संवेदना देते. तसेच ह्या महान वास्तुंच्या अनेकविध दालनांतून फ़िरतांना, व तेथील शिल्पे, चित्रे, छतावरील व भिंती वरील सोन्याची चौकट घालून तयार केलेली सौंदर्य कला पाहताना मानवी मनाचे अनेक कंगोरे झंकारले जातात कारण ही वास्तू जणू आपल्यांशीच संवाद साधते!
एक हजार वर्षांपूर्वी, हीची निर्मिती एका किल्ल्यांच्या स्वरूपात झाली, मात्र पुढे प्रत्येक शतकात, येणाऱ्या ‘डोजे’ने या वास्तूला सौंदर्याची व शाश्वतीची अनेक परिमाणे दिली. सतराव्या शतकात लागलेल्या आगीने खूप नुकसान झाले, तरी आज हा ‘महाल’ तितक्याच दिमाखात उभा आहे.
‘डोजे’ म्हणजे व्हेनीसचा राज्यकर्ता. हजार वर्षांपूर्वी या शहरात लोकशाही होती व ‘निवडणूकीच्या’ पद्धतीने हा ‘डोजे’ निवडला जाई, निवडणूकीची पद्धत ही आपल्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकी प्रमाणे वेगळी होती- एक परिषद (४०-५० लोक) ही डोजेला निर्णय घेण्यासाठी मदत करीत असे व ह्या सर्वांच्या कार्य पद्धतीवर, क्षमतेवर व प्रामाणिक कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी, नऊ हेरांचे एक गुप्त पथक असे. खूपच मजेशीर कारभार!
असे म्हणतात की, येथील.स्फटिकाची रचना अशी केली आहे, जेणेकरुन दिवसाच्या विविध प्रहरात ही वास्तु विविध रंगाची उधळण करते, रंग बदलते! आम्हाला आमच्या तासाभराच्या वास्तव्यात हे निरीक्षण करता आले नाही. येथे ‘सिंह-मुखी’ पोस्ट बॉक्स आहे, ज्यांत नागरिकांनी आपली तक्रार कागदावर लिहून टाकली, की कौन्सीलच्या सदस्यांना तिची दखल घ्यावी लागे व त्याचा न्याय निवाडा होई.
सोनेरी जिन्या पासून (Golden stairs) सुरु झालेली तुमची सफर, सॅलेडलो स्क्रूटिनी (मतदान नोंदणी कक्ष), सॅलेडलो कॉलेजीओ (मंत्री मंडळाची सभेची जागा), सॅलेडलो सिनेटो (सिनेटची भेटण्याची जागा), सॅलेडलो कॉनसिग्लीओ (गुप्त हेरांची भेटण्याची जागा), असे करत करत शेवटी ह्या ऐतिहासिक वास्तुची सफर बंदीखाने व कोठड्या कडे जाते. आजही ह्या अंधाऱ्या कोठड्यांचे दर्शन घेतांना अंगावर शहारे येतात व ह्यात खितपत पडून शेवटी मृत्युनेच सुटका केलेल्या बंदीवानांच्या आठवणींनी ह्दय हेलावते, कुप्रसिध्द आंतरराष्ट्रीय गुन्हेगार कॅसेनोव्हा हा देखील एकेकाळी येथेच बंदिवान होता व येथून च त्याने पलायन केले.
तर अशा तऱ्हेने, इटली प्रवासाच्या साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण झाली. एक आगळा वेगळा अनुभव देऊन!
इटली हा युरोप मधीलच नव्हे, तर जगातील एक अविश्वसनीय, अदभुत देश ! रुचकर अन्न, अप्रतिम वास्तु कला, रमणीय निसर्ग दृष्य, आणि अफलातून चित्रकलेचा वारसा असलेल्या या देशात, त्या त्या विषयांत रुची असणाऱ्यांसाठी खजिना भरलेला आहे.
क्षेत्रफळात जगात ७० व्या क्रमांकावर असलेल्या या देशात world heritage (जागतिक वारसा) बाबतीत मात्र जगात प्रथम क्रमांक मिळालेला आहे. त्यांनी दगडांचे सोने केले आणि आम्ही मात्र सोन्यासारखे गड आणि वास्तु यांची माती केली. आता आपल्याकडे परिस्थिती सुधारत आहे, यात वाद नाही, पण सुधारणेला खूप वाव आहे.
सुमारे इ.स पूर्वी १३०० ते १५००, वर्षांच्या हडप्पा सिंधु संस्कृतीचा शोध लावला व उत्खनन झाले. परवा वाचले इ. स. पूर्वी सुमारे २००० वर्षांच्या (महाभारत कालीन) संस्कृती बद्दल देखील भारतीय उत्खनन संस्था काम करीत आहे, उत्तर प्रदेशात बागपत जवळ हे काम सुरु आहे. खरे तर भारत वर्ष देखील अशाच एका महान संस्कृतीच्या वारसाचा धनी पण, “लक्षात कोण घेतो” ही परिस्थिती आहे. जर भविष्य काळात आमच्या सर्व श्रेष्ठ गत संस्कृतीचा शोध लावून जगातील लोकांना आम्ही येथे आकर्षित करु शकलो, तर खऱ्या अर्थाने आमच्या वैदिक व आर्य संस्कृतीचा तो गौरव असेल.
प्रवास वर्णन खूपच मजेदार आहे सर्वांनी एकदा जरूर वाचावे असे आहे,सर तुमच्या सहवासात राहताना खुप शिकता आले ,आता हे प्रवासवर्णन वाचताना तुम्हा राऊत कुटुंबियांची सर्वांची आठवण झाली,वाईन वर संशोधन करणारी विद्यापीठे आहेत हे पहिल्यांदाच लक्षात आले.
Respected Bandhu,
I have gone through your life story and found it quite extra-ordinary and mesmerizing.
You have confessed every where in your write-up highlighting the role played by your beloved father – your Guru – in shaping up your career and growth right from your early childhood in Bordi till you went abroad.
Though you are a self-made person, however you claim that you could achieve the excellence, be in academic career, corporate employments and finally opting an assignment of consultant in different organizations, only because of your spiritual father.
Somewhere, you have mentioned that you wished to go for a teaching job like your father, but you changed the track and climbed the corporate ladder in reputed companies holding the managerial positions and finally retiring as Dy. General Manager from HPCL. It’s not a mean achievement that required tenacity coupled with conscious efforts and vision. I must point out that you did a job-hopping for the sake of new learning, enhanced compensation and higher positions.
It’s quite mesmerizing to note that for getting admission to engineering to your son, the monetary aids came from every corner because of the blessings of your late father assuring you in your dreams not to get perturbed as all would go well for getting your Son’s engineering admission. Now because of the blessings of your father your son, i.e. his grand-son, is very well settled abroad.
Finally, I would like to sum up your life story with the remarks that –
you had good sanskars in early childhood,
you had an influence of your father who was spiritual and saintly person,
You got excellent support from your wife during crisis, clear vision and focus on growth and career, capitalizing institutional knowledge to meet business goals in high-growth units, keen sense of business acumen and shouldering responsible positions.
Well done Bandhu. I thoroughly enjoyed reading your life story which is quite amazing, mesmerizing and thought-provoking for young generations.
Thank you so much for sharing such a wonderful piece of article.
With Best Regards,
SUBHASH PATIL