बोर्डीचा सिंह कै. महादेव लक्ष्मण राऊत (माधवमामा)
शेकडो वर्षांच्या परकीय अमलाखाली पिचलेल्या भारतीय जनतेला, ’स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे!’ असा स्वातंत्र्याचा मंत्र देऊन एका ध्येयाने प्रेरित करून ऐन तारुण्यात, इंग्रजी सत्तेविरुद्ध आवाज बुलंद करण्याचे कार्य लोकमान्य टिळकांनी भारतभर सुरू केले होते. नरकेसरीच्या त्या हाकेला ओ देत भारताच्या खेड्यापाड्यात निद्रिस्त रयतेला जागविण्याचे काम अनेक स्थानिक नेत्यांनी केले. आपापल्या परिसरातील लोकांत स्वातंत्र्याची धग निर्माण करून त्या स्थानिक नेत्यांनी आपल्या महान नेत्याचे कार्य भारतभर पसरविले.
हे स्थानिक नेते देखील अत्यंत स्पष्टवक्ते, बेधडक, कणखर, व समर्पित वृत्तीचे होते. अत्यंत स्वतंत्र विचारसरणी आणि ‘मी सुद्धा माझ्या मातृभूमीची सेवा जमेल तशी करीन’ असा दृढ संकल्प केलेली होती. आपले मन, मनगट आणि मस्तिष्क बळकट असेल तरच देशकार्य करू शकू हा भाव त्यांच्याही मनात होता. इंग्रजांचे वर्चस्व असताना, लोकमान्यांच्या हाकेला ओ देऊन, भारत भूमीच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वाहणा-या व त्यासाठी तन, मन, धन समर्पित करणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांमध्ये आमच्या बोर्डीचे कै. महादेव लक्ष्मण राऊत उर्फ सर्वांचे माधवमामा हे एक असेच धडाडीचे नेतृत्व होते. ते म्हणत “ज्या अर्थी मला राष्ट्रसेवा करावयाची आहे तर ब्रिटिशसत्ते विरुद्ध संघर्ष अटळ आहे. या सत्तेविरुद्ध संघर्ष म्हणजे परिणामांच्या सिद्धतेलाही तयारी असली पाहिजे आणि माझी तयारी झालीआहे!”
इंग्रजी भाषेला ‘वाघीणीचं दुध’ असं संबोधणारे लो. टिळकच होत. देशात सामाजिक सुधारणा आणि राजकीय स्वातंत्र्य झालं पाहिजे, या विचारांनी टिळक प्रेरित होते. पारतंत्र्याचे खरे स्वरूप लोकांपर्यंत पोहोचविणे ही त्या काळाची गरज होती. स्वातंत्र्याविषयी जनतेच्या मनात आस्था निर्माण करणे, लोक संघटन करणे, त्यांना निर्भय बनवणे, जनतेला संघटीत करून कर्तव्याची जाणीव करून देणे हा टिळकांचा देशाला संदेश होता.
लोकमान्यांचा हाच संदेश माधवमामांना आपल्या परिसरातील जनतेला द्यावयाचा होता. कारण मामांकडे दूरदृष्टी, दृढनिश्चय होता. त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशकार्यासाठीच अर्पित करायचे, असा पण लहानपणापासूनच केला होता. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच देशात सामाजिक सुधारणाही झाल्या पाहिजेत.आपण शैक्षणिक प्रगतीही केली पाहिजे. त्याशिवाय स्वातंत्र्याला अर्थ नाही हेही त्यांना माहीत होते. आपल्या नव्वद वर्षाच्या दीर्घ आयुष्यात माधव मामांनी प्रत्येक क्षण आपल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी व्यतीत केला. माधव मामांना जाऊन आज सुमारे 54 वर्षे झाली आहेत, तरीही आम्ही गावकरी त्यांनी समाज व देशाप्रती दिलेल्या योगदानाची आठवण ठेवून त्यांच्या आठवणी जागवत असतो.आजचा हा लेखनप्रपंच माधव मामांच्या प्रदीर्घ निरलस सेवेचा आढावा घेऊन कृतज्ञतापूर्वक त्यांना वंदनकरणे हाच आहे!
माधव मामांनी लोकमान्यांच्या चतु:सूत्री बरहुकूम कार्य केलं. ‘स्वदेश, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण’ हे ते चार बिंदू. याच धोरणावर आधारित विचार माधव मामांनी आपल्या भाषणातून, प्रबोधनाद्वारे बोर्डी, घोलवड परिसरातील घराघरात पोहोचवले .इंग्रजी सत्तेविरूद्ध लढण्यासाठी स्वदेशाविषयी प्रेम आणि पारतंत्र्याविषयी असंतोष निर्माण करण्यासाठी त्यांनी सत्याग्रह,असहकार आणि निदर्शने अशा शस्त्रांचा वापर केला. अन्यायासमोर कधीही वाकले नाहीत, परकीय सत्तेला घाबरले नाहीत. आपल्या समाज बांधवांना तसेच शेतकरी बांधवांनाही शिक्षणाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांचे जीवन कसे सुसह्य करता येईल यासाठीही योगदान दिले.आपल्या प्रदीर्घ आयुष्यातच स्वातंत्र्य सूर्य उगवलेला पाहिला. म्हणूनच माधवराव राऊत म्हणजे ‘बोर्डीचा सिंह’ या नावाने डहाणू, घोलवड ,बोर्डी परिसरात ते संबोधले जातात.
सुदैवाने माधव मामांचे घर बोर्डीत माझ्या घरासमोरच असल्याने लहानपणी मी त्यांना पाहू शकलो. त्यांची काही भाषणेही त्या बालवयात ऐकता आली. माधव मामांचे विचार वा कार्य समजण्याचे ते वय नव्हते. मात्र आज त्या आठवणी काढताना त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची जाणीव होते आणि मान आदराने लवते!!
माधवमामा यांच्या तेजस्वी, स्वाभिमानी व महान व्यक्तिमत्त्वाची झलक समजण्यासाठी 1930 सालच्या त्या जून महिन्याची आठवण करावी लागेल…
गुजरातमधील धारासना या गावी गांधीजींनी सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली मिठाचा सत्याग्रह घडवून आणला .त्यावेळी निःशस्त्र सत्याग्रहींवर पोलिसांनी अनन्वित अत्याचार केले .तरुण ,वृद्ध, स्त्री ,पुरुष असा काहीही विचार न करता त्यांच्यावर लाठीमार तर केलाच मात्र ज्या घोड्यावरून पोलीस बंदोबस्त करीत होते ते घोडे ही सत्याग्रहीच्या अंगावर घातले.सत्याग्रहींना घायाळ केले . कोणतीही वैद्यकीय मदत तर दिली नाही उलट त्या रणरणत्या उन्हात सर्वांना कित्येक तास उभे ठेवले.पाशवी वर्तणुकीचा तो कळस होता!
त्यावेळी सुरत जिल्ह्याचे डेप्युटी पोलीस सुपरटेंडंट असणारे श्री. जी. एच. आंटीया यांनी त्या सत्याग्रहात खलपुरुषाची भूमिका निभावली होती. त्यांच्या आदेशाने सत्याग्रहीवर असे अत्याचार झाले होते. त्याप्रसंगी बोर्डीचे डॉ. दिनानाथ चुरी, मुकुंदराव सावे, देहेरीचे भास्करराव सावे(देहेरीकर), हे नेते सत्याग्रहींची शुश्रूषा करण्यासाठी तेथे गेले होते. भास्कररावांना त्याआधी बारडोली सत्याग्रहात भाग घेतला असताना, याच आंटीयाने लाठीचा प्रसाद दिला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम समुद्रपट्टीवरील या गावांत या आंटीयाविषयी एक तिरस्काराची भावना निर्माण झाली होती.दुष्ट आंटीयाला कसा धडा शिकवता येईल असा विचार बोर्डीकर करत होते?
कोणत्याही चांगल्या घटनेचा आनंद बोर्डीकरांना जसा होतो तसाच कोणत्याही अत्याचाराची बातमी ऐकून उद्विग्नताही येते. अन्याय कोणावरही झालेला असो त्याचा सूड उगवला पाहिजे ही एक नैसर्गिक भावना या परिसरातील लोकांमध्ये अगदी खूप वर्षापासून होती. जून 1930 च्या एका संध्याकाळी बोर्डीमध्ये अचानक खळबळ माजली. भास्करराव सावे बोर्डीच्या बाजारामधून जात असताना त्यांची नजर एका टांग्याकडे गेली. त्यात एक व्यक्ती बसलेली त्यांना दिसली. जरा जवळ जाऊन पाहिल्यावर त्यांना कळले की ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून धारासना सत्याग्रहीवर ज्यांनी पाशवी अत्याचार केले तोच पोलीस अधिकारी आंटीया आहे. त्याला पाहून भास्कररावांचे माथे भडकले. त्यांनी बोर्डीत जाऊन ही बातमी सर्वांना दिली. ऑंटीया आपले श्वशूर कर्नल नानावटी यांच्या बोर्डी गावातील समुद्रकिनारी असलेल्या ‘खानबंगला’ येथे आला होता . ती हकीगत भास्कररावांकडून सर्व बोर्डी गावाला कळली!
झाले, गावातील जनक्षोभाच्या दारूगोळ्यात ठिणगी पडली. माधवराव, मुकुंदराव सावे, आचार्य भिसे, शामराव पाटील ही मंडळी त्यावेळी गावाचे नेतृत्व करीत होती.. त्यांनी लोकांना आवाहन केल्याप्रमाणे रात्रभर जागून लोकांनी आपल्या छत्र्यांची काळी कापडे, काळ्या कांबळी आणि जे काळे वस्त्र मिळेल ते फाडून त्याचे झेंडे तयार केले. सकाळी सर्व मंडळी खानच्या बंगल्यासमोर येऊन हजर झाली.. धारासना सत्याग्रहींचा जयजयकार आणि ‘आंटीया गो बॅक..’ ‘ आंटीया चले जाओ ‘..या घोषणांनी सर्व गाव दुमदुमून गेला!! मोठा जमाव जमला.
ब्रिटिश सरकारची रोटी खाणारे आणि त्यांच्या तालमीत तयार झालेले कर्नल नानावटी आणि अँटिया अशा मोर्चाला पाहून घाबरणारे पारशी नव्हते. माधवराव राऊत आणि सहकारी नेत्यांनी गावाला आदेश दिला, ‘बहिष्कार अजूनही जोरदार करा. नानावटी आंटीया यांना बाजारातून कोणत्याही प्रकारचे सामान भाजीपाला वस्तू मिळता कामा नये’ त्यांचे दूध ,पाणी, मांस, मच्छी आणि सर्व रसद बंद करण्यात आली.. त्यांच्या घरी काम करणारी स्थानिक नोकर मंडळी देखील बंद झाली .जागृत स्वयंसेवकांनी खानच्या बंगल्यासमोर 24 तास पहारा ठेवला. .बोर्डी घोलवड मधील सर्व हिंदू, मुसलमान, आदिवासी या लढाईसाठी एकत्र झाले. एवढेच नव्हे तर या परिसरातील पारशी व ईराणी मंडळी देखील आंटीया- नानावटी यांच्या विरोधात संघर्षामध्ये सामील झाली .माधव मामांनी या मोर्चासमोर मोठे प्रभावी भाषण केले. मात्र आठवडाभराच्या या निदर्शनानंतरही आंटीया ,नानावटी शांत होते!
21 जून 1930 च्या’ टाइम्स ऑफ इंडिया’वृत्तपत्रात कर्नल नानावटी यांनी एक खरमरीत पत्र प्रकाशित केले आणि बोर्डी गावातील नेत्यांवर त्यांनी गंभीर आरोप केला.
‘बोर्डीत राज्य कोणाचे आहे?सरकारचे की या गाववाल्यांचे?’असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला.
‘सरकारात इमानदारीने सेवा करणाऱ्या एका अधिकाऱ्यावर हा अन्याय होत आहे आणि यासाठी संबंध ब्रिटिश सरकारने गंभीरतापूर्वक हस्तक्षेप करून या गाववाल्यांना अद्दल घडविली पाहिजे’ असे त्यांचे म्हणणे होते.
या पत्राची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने बोर्डीत त्वरित शस्त्रसज्ज पोलीसदल पाठविले, कर्नल नानावटी आणि त्यांचे जावई ऑंटीया या दोघांनाही पूर्ण संरक्षण दिले गेले.
एवढे होऊनी माधवराव व गावकऱ्यांनी हिम्मत हारली नाही. आपले अभियान चालूच ठेवले. विशेष म्हणजे बोर्डी अग्यारीमधील पारशी धर्मगुरूंनीदेखील आंटीया-नानाावटीला पाणी देण्याचे नाकारले .अन्न पाणी बंद झाले. गुपचूप एके रात्री हे दोघेही जावई-सासरे बोर्डी गाव सोडून पळून गेले. सत्याग्रहींचा विजय झाला!!
हा लढा आंटीया विरुद्ध नसून तो ब्रिटिश सरकार विरुद्ध आहे ,अजून तो संपलेला नाही, याची जाणीव माधवरावांना होती आणि म्हणून ते लोकांना सतत प्रोत्साहन देतच राहिले. होणाऱ्या परिणामांची मानसिक तयारी ही त्यांनी केली होती.
याचा परिणाम व्हायचा तोच झाला. ब्रिटिश सरकारने माधवराव, मुकुंदराव, नाना मळेकर या तिघांना अटक केली. ठाणे तुरुंगात रवानगी केली. त्यावेळचे जिल्हा न्यायाधीश मधुसूदन भट यांच्यासमोर माधवराव आणि त्यांच्या साथीदारांचा खटला चार महिने पर्यंत चालला. कोर्टामध्ये या लोकांना बसण्याची देखील सवलत नव्हती. संपूर्ण वेळ त्यांना उभे राहण्याची ताकीद होती. आणि वेळोवेळी त्यांचा अपमानही केला जाई. शेवटी योग्य पुराव्याअभावी न्यायाधीशांनी त्यांना निर्दोष ठरवून सोडून देण्याचे आदेश दिले. सत्याचा विजय झाला! माधव मामांचे नेतृत्व आणि त्यांच्या मनाची पोलादी चौकट यांचे दर्शन घडविणारा हा एक प्रसंग!
माधव मामांचे एक सत्याग्रही सहकारी श्री भास्करराव सावे,( देहेरीकर), यांचा उल्लेख वर आला आहे. समाजातील या महान स्वातंत्र्य सैनिकाचा आज आम्हाला संपूर्ण विसर पडला आहे. बारडोलीच्या शासनाच्या सत्याग्रहात विहिरीने भाग घेऊन त्यांनी परकीय सत्तेकडून मिळालेला लाठीचा प्रसाद व कारावास अनुभवीला आहे. तुरुंगात असताना त्यांचे एक सहनिवासी म्हणजे पुढे विशाल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व भारताचे पंतप्रधान झालेले मोरारजी देसाई होते. त्यामुळे दोघांचा अगदी दाट परिचय होता. स्वातंत्र्य मिळाले. मोरारजीभाई राजकारणात मोठे व्यक्तिमत्त्व झाले मात्र महाराष्ट्र या निष्ठावंत, प्रसिद्धीपराङमुख स्वातंत्र्य सैनिकाला विसरला. आयुष्य ‘स्वातंत्र्यप्राप्ती’, या एकाच ध्येयाला वाहिल्यामुळे भास्कररावांना काही कामधंदा करतात आला नाही. घरची थोडी शेती करीत कुटुंबाचे उदरभरण ही होत नसे. लोकांना त्यांची मोरारजीभाईशी असलेली जवळीक माहित होती. त्यांना त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या मोरारजी भाईंना सचिवालयात जाऊन भेटण्याची सूचना मित्रांनी केली. प्रथम भास्कर रावांनी ते मानले नाही. ”यासाठी मी कारावास भोगला नाही”, हे या निस्वार्थी माणसाचे बाणेदार ऊद्गार होते. मात्र जेव्हा अति होऊ लागले तेव्हा ते सचिवालयात गेले. त्यांचा फाटक्या कपड्यातील अवतार बघून कोणीही प्रवेश देईना. जातिवंत सत्याग्रही असलेले भास्करराव मोरारजीभाईंच्या केबिन समोर ठाण मांडून बसले. जोरजोराने “मोरयाला बोलवा, कुठे आहे मोरया?? ..”असे ओरडून सांगू लागले. केबिनमध्ये मोरारजी भाईंनी गडबड ऐकली. ते स्वतः बाहेर आले. आपला कैदेतील जुना सहकारी आपणास भेटण्यासाठी आला आहे हे पाहून त्यांनाही खूप आश्चर्य वाटले. त्याला घेऊन ते केबिनमध्ये गेले, तेव्हा मात्र कर्मचाऱ्यांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही! पुढे मोरारजी भाईंनी त्यांना योग्य ते मानधन सुरू करून ताम्रपट ही बहाल केला. भास्कर रावांना कोणीही संतती नसल्याने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे रहाते घर पत्नीने विकून देहरी सोडली. भास्कररावांचा नामोनिशाणा उरला नाही! ना वंशाचा दिवा ना समाज स्मृतीचा ठेवा!
या लेखाचे निमित्ताने या महान स्वातंत्र्यसैनिकालाही मानाचा मुजरा करणे मला आवश्यक वाटले!
10 सप्टेंबर 1882 रोजी माधव मामांचा जन्म बोर्डीतील प्रसिद्ध सधन अशा राऊत कुटुंबात झाला. महादेव हे त्यांचे आई-वडिलांनी ठेवलेले नाव . माधव हे मित्र व गावकऱ्यांनी प्रेमाने दिलेले नाव. सर्वत्र ते याच नावाने ओळखले जातात. त्यांचे वडील लक्ष्मणराव राऊत हे बोर्डीतील एक सधन शेतकरी होते..स्वातंत्र्याचे, मानवतावादाचे मोठे पुरस्कर्ते होते. आपल्या कृतीतूनही त्यांनी ते सिद्ध केले होते. त्यांच्याच विचारांचा व संस्कारांचा पगडा त्यांच्या तिन्ही मुलावर होता. माधवराव (तात्या)सगळ्यात मोठे, त्यानंतर दामोदरराव (आप्पा), सर्वात लहान मदनराव (नाना)..
वडील लक्ष्मण रामा राऊत हे प्रथमपासून एक ईश्वरनिष्ठ सज्जन व्यक्तिमत्व. नागणकस, अस्वाली या पूर्वेच्या डोंगर रांगांत त्यांची जमीन, शेती होती. तेथे जाण्यासाठी ते दोन घोड्यांचा टांगा वापरीत, म्हणून गावातील लोक ‘घोडेराऊत’ या नावानं त्यांना ओळखत. लक्ष्मणरावांना गरीबाबद्दल खूप आपुलकी, आस्था होती. गावाच्या बाहेर हरिजन, दलितांची वस्ती होती, आजही आहे. त्या वाड्यातील हरिजनांना अर्थप्राप्तीचा व्यवसाय नसल्याने खूप हलाखीत दिवस काढावे लागत होते. लक्ष्मण राऊतांनी जंगलातले बांबू आणून या हरिजन वस्तीला बुरुड काम करण्याचा सल्ला दिला, मार्गदर्शन केले. हरिजनांनी विणलेल्या टोपल्या, करंडे, खरेदी करून शेतातला भाजीपाला त्यात भरून मुंबईच्या मंडईत ते स्वतः पाठवू लागले. स्पृश्यास्पृश्यता कडक असलेल्या त्या जमान्यात हे फार मोठे धाडस होते. तत्कालिन गावकऱ्यांना ही कृती पटली नाही. परंतु हळूहळू बोर्डी गावांतील शेतकऱ्यांचा रोष कमी झाला, लोकही हरिजनांनी विणलेल्या बांबूच्या टोपल्या, करंडे विकत घेऊ लागले. निश्चितच दिडशे वर्षांपूर्वी हे खूप धाडसी पाऊल होते. लोक काहीही म्हणोत, लक्ष्मणराव आपल्या इच्छित कर्तव्यापासून कधीच दूर झाले नाहीत. हीच दूरदृष्टी, धाडस व सहसंवेदना लक्ष्मणरावांच्या तिन्ही चिरंजीवात आली होती .
माझ्या “तस्मै श्री गुरवे नमः” पुस्तकातील ‘अजात शत्रू, लोभस व्यक्तिमत्त्वाचे कै. मदनराव राऊत..’ या लेखात मी राऊत कुटुंबीयाविषयी अधिक माहिती दिली असून या तीनही भावांच्या सामाजिक, राजकीय, तसेच शैक्षणिक कर्तृत्वाविषयी लिहिले आहे .
माधवरावांनी समाजसेवेतही अनेक संकल्प केले व पार पाडले. त्यांनी ‘ज्ञानवर्धक सभा’ चळवळ बोर्डीत स्थापन केली. डहाणू तालुक्यातील अनेक गावांत त्याचा प्रचार केला. घरी गणपती उत्सवाला सुरुवात केली. त्यांच्या गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप असे. आजही तो दरवर्षी नेमाने होतो. त्या माध्यमांतून मुले तरुण, शेतकरी अशिक्षित मजूर यांचे मेळावे आयोजित करून त्यांना चांगले संस्कार आणि शिक्षण देऊन व्यसनाधीनता व अंधश्रद्धेपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. विवाहातील तसेच इतर धार्मिक विधीतील काही अनिष्ट प्रवृत्ती दूर करण्यासाठी लोकांचे प्रबोधन केले .गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणेही सुरू केले.
अज्ञान व अंधश्रद्धेने ग्रासलेल्या तत्कालीन समाजाला व्यसनाधीनतेपासून दूर करणे हे मोठे काम होते. माधवरावांनी मद्यपान निषेध आणि व्यसनमुक्ती साठी सभा आणि निदर्शने याद्वारे जोरदार प्रचाराला सुरुवात केली. मद्यपी समाज कोणत्याही राजकीय वा सामाजिक कार्यात आपले योगदान देऊ शकत नाही, हे त्यांना पक्के ठाऊक होते.
गाव आणि गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना माधवराव आपल्या सोमवंशी क्षत्रिय समाजालाही विसरले नाहीत. डहाणू पालघर तालुक्यातील सर्व समाज बांधवांना एकत्र करून त्यांनी त्यांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, नैतिक विकास कसा होईल या दृष्टीने प्रत्येक गावागावात जाऊन सभा, संमेलने, चर्चासत्रे आयोजित केली. संपूर्ण समाज संस्कार संपन्न कसा होईल हा ध्यास त्यांनी घेतला. अगदी पहिल्यांदा या अशा प्रकारचे, विकसित व संस्कारसंपन्न समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या आमच्या पहिल्या फळीतील नेत्यापैकी बोर्डीचे माधवराव राऊत हे एक होत ,यात शंका नाही! सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ या आमच्या केंद्रीय संस्थेच्या स्थापनेत माधव मामांचाही खूप मोठा वाटा आहे. संघाच्या 1950 साली माहीम येथे झालेल्या परिषदेचे अध्यक्षस्थान देऊन समाजाने त्यांचा मोठा बहुमानही केला होता.
आपले गाव आपला समाज याबरोबरच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यावेळी सुरू असलेल्या राजकीय चळवळीतही माधवराव मागे नव्हते. त्यांच्यावर लोकमान्य टिळकांच्या राजनैतिक विचारधारेचा प्रभाव होता. ते ‘केसरी वृत्तपत्रा’चे भक्त होते. पहिल्या काही सभासदापैकी एक होते. ‘केसरी’नेच आमच्या समाजाला नवी दिशा दाखवली आहे’ असे त्यांचे म्हणणे होते. त्यांचे घरी ‘केसरी’ येई व त्याचे सार्वजनिक वाचन ओटीवर होत असे. 1918 साली लोकमान्य टिळकांनी होमरूल चळवळीला सुरुवात केली. त्यात माधवराव सामिल झाले. बोर्डीमध्ये होमरूल-लीगची शाखा स्थापन झाली. विशेष म्हणजे बोर्डी गावात माधव मामांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील होमरूल लीगचे पहिले अधिवेशन संपन्न झाले! त्या काळातील ही मोठी घटना होती.
1920 साली महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनातही माधवरावांनी सहभाग दिला. त्यांना जेलमध्येही पाठवण्यात आले. सन 1922-1932 अशी दहा वर्षे डहाणू तालुका काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्याच सहकार्याने ठाणे जिल्ह्यात काँग्रेसची राजनीती ठरवली जाई. त्याच कालखंडात ठाणे जिल्हा काँग्रेसचा खूप प्रसार झाला. जिल्हा काँग्रेसच्या सर्व सभा बोर्डीला माधव मामांच्या घरी होत. बोर्डी ग्रामपंचायत तालुका पंचायत आणि जिल्हा बोर्ड या संस्थांचा कारभार मामांच्या सल्ल्याशिवाय होत नसे. एवढा त्यांच्या शब्दाला मान होता. महाराष्ट्रात काँग्रेसच्या तत्कालीन नेतृत्वाला माधवमामांच्या कामाची, अनुभवाची व देशाप्रती असलेल्या निष्ठेची जाणीव होती.
माधवरावांना पूर्ण कल्पना होती की कोणतीही राजकीय, सामाजिक, शैक्षणिक चळवळ ही पैशाशिवाय अपूर्ण असते. उद्देश कितीही चांगला असला तरी त्या चळवळीला आर्थिक पाठबळ नसल्यास कार्य पुढे जात नाही. म्हणून त्यांनी लोकमान्य फंड, स्वराज्य फंड , हिंदू युनिव्हर्सिटी फंड, बोर्डी हायस्कूल फंड, बिहार भूकंप पिडीत फंड, आसाम पूर निवारण फंड, गुजरात दुष्काळ निवारण फंड, इत्यादी अनेक फंडांची उभारणी करण्यात पुढाकार घेऊन भरघोस निधी त्या सामाजिक चळवळींना पुरवून मोठे आर्थिक सहाय्य केले.
माधव मामांच्या प्रत्येक कृतीवर ब्रिटिश सरकार व त्यांची यंत्रणा पूर्ण लक्ष देऊन होती. सरकार विरोधी कारवायांचे केंद्रस्थान माधवमामांचे हे बोर्डीतील घर आहे, त्यामुळे त्याला ‘काँग्रेससदन’ ठरवून सरकारने घरावर जप्ती आणली. पोलीस पहारा बसविला. माधव मामांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. पुढे रीतसर खटला चालून त्यांना निर्दोष सोडण्यात आले. मात्र दरम्यानच्या काळात माधव मामांच्या कुटुंबाने जे धारिष्ट्य व बाणेदारपणा दाखवून ते दिवस निभावून नेले ते खूप स्पृहणीय होते. माधव मामा व त्यांचे कुटुंब ब्रिटिश सरकारच्या कोणत्याही दडपणाला व अन्यायाला न जुमानता आपले काम करीतच राहिले. माधवरावांना सरकार कधीही नमवू शकले नाही अथवा त्यांनी सरकार पुढे कधीही शरणागती पत्करली नाही.
एवढ्या सर्व सामाजिक, राजकीय आघाडीवर लढत असतानाही आपल्या बोर्डी गावातील ग्रामबंधू व तरुणांकडेही मामांचे पूर्ण लक्ष असे. त्यांच्याच पुढाकाराने बोर्डी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निर्माण झाली होती. गावातील शेतकरी बांधवांना उत्तम बियाणे व खते मिळावीत व त्यांच्या मालाची विक्री ही योग्य दरात व्हावी, तसेच गावकऱ्यांना दर्जेदार अन्नधान्य मिळून सामान्य जनतेला मदत व्हावी हाच त्यामागे मुख्य उद्देश होता. आजही ही सोसायटी उत्तम प्रकारे चालू आहे. 1923 पासून 1935 सालापर्यंत माधव मामा या संस्थेचे चेअरमन होते. बोर्डी ग्रामपंचायत तालुका बोर्ड अशा स्थानिक स्वराज्य संस्थातही त्यांनी योगदान दिले आहे.
बोर्डी गावात इंग्रजी शिक्षण देणारे हायस्कूल सुरू व्हावे आणि गावातील तरुणांना ‘वाघिणीचे दूध’ उपलब्ध व्हावे हा विचार माधवरावांच्या मनी होतेच . त्या सुमारास बोर्डीचे कै. गोविंदराव चुरी यांनी इंग्रजी शिकवणीचा एक लहान वर्ग त्यांच्या घरी सुरू केला होता. आमच्या तरुणांना इंग्रजी भाषा शिकणे अत्यावश्यक आहे हीच त्यांचीही भावना होती व त्यासाठी त्यांनी प्रत्यक्षात प्रयत्न सुरू केले होते. कै. आत्माराम पंत सावे या बोर्डीच्या सुपुत्राने बी ए पास झाल्यावर त्याच क्लासमध्ये गोविंदरावांना मदत करण्यासाठी इंग्रजी शिकविणे सुरू केले होते .1920 साली मुंबईतील गोखले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्णी सुट्टीत हवा पालटासाठी बोर्डीत आले होते. आत्मारामपंत सावे आणि मामांचे धाकटे बंधू मदनराव राऊत यांचे ते महाविद्यालयीन गुरु. त्यामुळे माधवरावांची प्रि. कुलकर्णी बरोबर घनिष्ठ मैत्री होती. मामांनी प्रिन्सिपल कुलकर्ण्यांना ,”आपल्या गोखले एज्युकेशन सोसायटी मार्फत आमच्या गावात इंग्रजी स्कूल सुरू करून आमची इच्छा पूर्ण करा”अशी विनंती केली. म्हणतात ना ‘शुभ संकल्पाचा दाता परमेश्वर’ या न्यायाने माधव मामांची ही विनंती प्रिन्सिपल कुलकर्णी यांनी स्विकारून बोर्डी गावात गोखले शिक्षण संस्थेचे हायस्कूल सुरू केले! आपले मुंबईतील सहकारी शंकरराव भिसे यांना त्यांनी बोर्डीस पाठवून शाळेचा कारभार पाहण्यास सांगितले. बोर्डीतील एक दानशूर पारशी महिला धनबाई यांनी या शाळेसाठी मोठी देणगी देऊन जमीन खरेदी केली व इमारत बांधून दिली.. आणि बोर्डीत एक मोठा इतिहास घडला!! एका ज्ञानवृक्षाची लागवड झाली. त्याला माधव मामांचा मोठा हातभार लागला आहे. आज हा शिक्षणाचा वटवृक्ष अनेक शाखांनी बहरून आला असून बोर्डी गावाचे नाव सबंध भारतात उज्वल होत आहे! सार्वजनिक कामाच्या घाईगर्दीतही स्वतंत्र भारतातील भावी पिढी सुशिक्षित तर असावी पण इंग्रजी ज्ञानाने ही परिपूर्ण असावी ही त्यांची मनीषा पूर्ण झाली. बोर्डी हायस्कूलच्या स्थापनेनंतर त्यांना कृतकृत्य वाटले असल्यास आश्चर्य नाही.
बोर्डीच्या या हायस्कूलात आचार्य भिसे, आचार्य चित्रे, आत्मारामपंत सावे यांच्या कार्यकर्तृत्वाला दाद देण्यासाठी त्याकाळी बोर्डीत अनेक महान नेते गावाला भेट देऊन गेले. डॉ. भारतरत्न भीमराव आंबेडकर, माजी राष्ट्रपती डाॅ.राजेंद्र प्रसाद, डॉ.चिंतामणराव देशमुख, वल्लभभाई पटेल, पंडित गोविंद वल्लभ पंत,माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी,कै. कस्तुरबा गांधी, भारतरत्न कै धोंडो केशव कर्वे ही त्यातील फक्त काही नावे. या लेखात मी कै. अण्णा कर्वे यांचा तत्कालीन प्रिन्सिपल आत्माराम पंत सावे यांच्याबरोबरचा एक दुर्मिळ फोटो दिला आहे.
माधवमामा वर्षानुवर्षे शेती करणाऱ्या कुटुंबाचे वारसदार होते. एक हाडाचे शेतकरी होते. त्यांच्या पूर्वजांनी तलवार म्यान करून शेती सुरू केली होती. नांगर आणि तलवार या दोघांचे सुंदर संतुलन माधवरावांच्या व्यक्तिमत्त्वात झाले होते. त्यांच्या कुटुंबाचा पूर्वापार जमीनजुमला होता. राऊत कुटुंबीय शेती हा व्यवसाय म्हणून करीत होते. स्वतःला खेडूत म्हणून घेण्यात मामांना धन्यता वाटे.
‘आपली शेती ही केवळ पूर्वापार परंपरेने न करता कालमानाप्रमाणे त्यात सुधारणा झाली पाहिजे आणि त्यासाठी विज्ञानाची मदत घेणे आवश्यक आहे, त्याशिवाय शेतीला भविष्य नाही’ असे त्यांचे स्पष्ट मत होते.
सुधारित बियाणे वापरून शेती उत्पादन कसे वाढविता येईल याचा प्रचार करण्यासाठी ते गावोगावी फिरत आणि सभा चर्चांमधून शेतकऱ्यांना तशी जाणीव करून देत. स्वतःचे अनुभव सांगत. कर्जत येथील ‘सरकारी शेती संशोधन केंद्राशी त्यांचा सतत संपर्क असे. शेती उत्पादन, शेतीवरील रोग, उत्तम बियाणे इत्यादी समस्यावर तज्ञांशी चर्चा करून ते शेतकऱ्यांना त्याबाबत मार्गदर्शन करीत. उत्तम चिकू लागवड व धान्य-भाजीपाला निर्माण करणारे त्यांचे निकटतम मित्र मुकुंदराव आणि गोपाळराव नाना पाटील यांच्याशी ते सल्ला मसलत करीत. ब्रिटिश सरकारनेही इतर राजनैतिक मतभेद बाजूला ठेवून माधवरावांची ‘रजिस्टर्ड सीड ग्रोवर’ अशी नेमणूक करून त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. त्यांनी ती जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली. सरकारचा विश्वास सार्थ ठरविला. सरकारी अन्यायाचा विरोध मात्र सरकारी धोरण योग्य असेल तर त्याला साथ, इतकी प्रगल्भ व संतुलित मनोवृत्ती माधव मामांकडे होती.
कर्जतच्या शेतकी संशोधन केंद्राचे तत्कालीन संचालक जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध शेतीतज्ञ डॉ. ना. शि. कदम माधवरावांचा आदरपूर्वक आणि गौरवपूर्वक उल्लेख करीत. ते म्हणतात, “भाताची व भाजीपाल्याची अनेक सुधारित बियाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात माधवरावांइतके काम संपूर्ण जिल्ह्यात कोणीच केलेले नाही.” माधवरावांनी स्वतः जिल्हा आणि प्रांतीय शेती प्रदर्शनात आपल्या उत्पादनांसाठी सुवर्ण, रजत पारितोषिके मिळविलेली होती.
1918 साली डहाणू तालुक्यात व सबंध समुद्रकिनारपट्टीत प्लेगने हाहाःकार माजवला होता. विशेषतः डोंगरटापूत राहणाऱ्या आदिवासींची ही त्यातून सुटका नव्हती. मोठ्या प्रमाणावर आदिवासी रोगाला बळी पडत होते. माधवरावांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, सहकाऱ्यांबरोबर आदिवासींच्या मदतीसाठी त्या भागात धाव घेतली. त्यांना मोफत औषधे, धान्य वाटून सेवाशुश्रुषा केली. साथ आटोक्यात आल्यावर बेरोजगार आदिवासींसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले, त्यांना कामे दिली. आदिवासींचे पुनर्वसन केले.
एक उत्कृष्ट सर्वसमावेशक नेतृत्व समाजाला भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येला भिडून सर्वसामान्य माणसाला किती प्रकारे दिलासा देऊ शकते ,याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्या बोर्डीचे माधव मामा होत!!
1940 साली माधवरावांना अर्धांगवायूचा झटका आला. मनोकामना जबर होती मात्र आता शरीराची साथ मिळेना. त्यांना सक्रिय राजकारण समाजकारण अशा विविध कार्यातून निवृत्ती घ्यावी लागली.
‘ही निवृत्ती माझ्यासाठी ईश्वराचा आदेश आहे’ असे मानून त्यांनी ती मनोभावे स्वीकारली. त्यांचे बाहेर फिरणे थांबले. कार्यकर्ते घरी येत. चर्चा मसलत होई. त्यांना मार्गदर्शन मिळे. दानधर्म तर चालूच होता .आपले पिताजी लक्ष्मणराव यांच्या स्मृती प्रित्यर्थ बोर्डीत एक शंकर मंदिर बनविले. हे मंदिर पहिल्यापासूनच अस्पृश्यांना खुले होते. श्रावण सोमवारी शंकराचे व्रत करून मंदिरात पूजेसाठी आलेल्या हरिजन लोकांना पाहून माधवरावांचे मन अतिशय आनंदित होत असे! आजही बोर्डी गावातील हे शंकर मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. बालपणी आम्ही या मंदिराचा परिसर आट्यापाट्या, लपाछपी आणि गोट्या खेळण्यासाठी करीत असू. शाळा सुटल्यावर आणि सुट्टीच्या दिवशी हे मंदिरच आमचे निवासस्थान असे. आजही माझ्या डोळ्यासमोर ते मंदिर व ते बालमित्र दिसतात!
माधवरावांचा परिवार खूप मोठा होता. एकशे पन्नास सदस्यांच्या या परिवारात नेहमी एकोपा आणि सहकार्य असे. सबंध ठाणे जिल्ह्यात त्याकाळी ह्या राऊत परिवाराचा आदराने उल्लेख होई.
”अतिथी देवो भव, हे भारतीय संस्कृतीचे प्रत्यक्ष प्रतीक जर कुठे पाहावयाचे असेल तर ते या बोर्डीतील राऊत परिवारात पहा” असे लोक म्हणत. आपल्या या कुटुंबाबद्दल व कुटुंब प्रमुख म्हणून स्वतःच्या भूमिकेबद्दल माधव मामांनी आपल्या दैनंदिनीत एके ठिकाणी लिहिले आहे…
“आमचे कुटुंब म्हणजे एक संस्थाच आहे. मी त्या संस्थेमधील एक सेवक आहे. ही भावना ठेवूनच कुटुंबसेवा करणे हे मी माझ्या आयुष्यातील एक पवित्र कर्तव्य मानतो. या कुटुंबरुपी बागेचा मी एक माळी आहे. ही बाग फुलविणे ,सदाबहार ठेवणे हे माझे कर्तव्यच आहे ही माझी जीवनधारणा आहे!”
एवढे विशाल कुटुंब हे एकोप्याने, समाधानाने, वर्षानुवर्षे एकत्र असण्याचे इंगीत, मला वाटते माधव मामांसारख्या कुटुंब प्रमुखाच्या या जीवनखहपधारणेत आहे! कुटुंबप्रमुख म्हणून माधव मामांनी त्या काळात घालून दिलेले काही पायंडे व प्रथा आजही सुरू असतील असे मला वाटते. मला आठवते रोज सकाळ व संध्याकाळचे वेळी माधव मामांच्या कुटुंबातून प्रार्थना व गीताई पठणाचे सूर आमच्या शेजारीच असलेल्या घरी ऐकू येत. मी प्रत्यक्ष प्रार्थनेत सहभागी होऊ शकत नसलो तरी, शांत बसून त्या पवित्र सुरांचे श्रवण करताना आनंद होई. आजही त्या दिवसांची आठवण झाली की प्रार्थनेचे ते पवित्र सूर माझ्या कानाभोवती रुंजी घालतात.
तात्यांची नात सौ. स्मिता ठाकूर, पूर्वाश्रमीची कु. हंसा विनायक राऊत हिने पाठविलेल्या तात्यांच्या आठवणी वाचून, एक कुटुंब प्रमुख आणि लोकनेते असलेले तात्या, आपले कुटुंब, मुले, नातवंडे, सुना, पैपाहुणे यांच्याकडे किती बारकाईने लक्ष देत. एवढ्या कामाच्या रगड्यातही ते आपली सौंदर्यदृष्टी आणि श्रद्धा कीती जपत याचे दर्शन होते, सौ स्मिता म्हणतात,
“ तात्या आमच्या कुटुंबाचे आधारवड होते. लोभस, प्रेमळ आणि भारदस्त व्यक्तिमत्वाचे तात्या, 70 ,80 जणांच्या सुसंस्कृत एकत्र कुटुंबाचेच नव्हे तर बोर्डी गावाचेदेखील आधारवड होते. आदर्श एकत्र कुटुंब प्रमुखाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमचे तात्या. घरातील लहानांपासून थोरापर्यंत प्रत्येकालाच तात्यांचे आपल्यावरच जास्त प्रेम आहे असे जाणवे. याच प्रेमाच्या रज्जुने त्यांनी संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवले होते. गावातील लोक सल्लामसलतीसाठी तात्यांकडे येत, कारण त्यांना योग्य तो सल्ला मिळेल याची खात्री असे. कोणाला आर्थिक मदतीची गरज असेल तर ती ही पुरी केली जाई. घरी आलेली व्यक्ती चहा पाणी घेऊनच जाई. तात्यांना भेटावयास दर आठ पंधरा दिवसांनी त्यांचे मित्र मुकुंदराव सावे येत, त्यांच्यात सामाजिक राजकीय विषयांवर चर्चा चाले. दोघांनाही गावाच्या आणि समाजाच्या उन्नतीचा ध्यास होता. सो. क्ष. संघाच्या स्थापनेसाठी तात्या झाई ते वसईपर्यंत फिरले होते. वसईतील सुप्रसिद्ध जगोबा घरत (उद्धव दादा यांचे वडील) यांच्याशी त्यांची मैत्री झाली आणि त्याची परिणीती बोर्डीचे राऊत कुटुंब आणि वसईचे घरत कुटुंब या दोन घरात घरोबा निर्माण होण्यात झाली आणि तो घरोबा दोन्ही कुटुंबातील दुसऱ्या आणि तिसऱ्याही पिढीने अजून पर्यंत जपला आहे.
मोठ्या आजारानंतर तात्यांचे अस्वाळ, नागणकास येथे शेतीवाडीवर जाणे बंद झाले होते. रोज दुपारी त्यांना मुलं नाहीतर नातवंड वर्तमानपत्र वाचून दाखवीत. बातम्या आणि अग्रलेख वाचून घेत कारण जगाचं भान राहायला हवं असे म्हणत. देवळात मात्र रोज नित्यनेमाने जात. रोज संध्याकाळी बंधूकाका आणि बाबाकाका त्यांना शेतावर आज आपण काय काम केले याची माहिती देत . दुसऱ्या दिवशी काय काम करायचे याच्या सूचना तात्या त्यांना देत .
तात्या देवभक्त होते पण देवभोळे नव्हते. तात्या ,आप्पा आणि नाना या तिघा बंधूंनी त्यांचे वडील कै.लक्ष्मण राऊत यांच्या स्मरणार्थ बोर्डी गावात शिवमंदिर बांधले. घरी रोज देवपूजा होई. आणि देवळातही रोज पूजेचे ताट जाई. ते नेहमी, “कैलास राणा..”, आणि इतर अभंग म्हणत असत. तात्यांना आम्ही कोणतीही आनंदाची बातमी सांगितली की ते आम्हाला आधी देवाला नमस्कार करावयास सांगत. रोज सकाळ, संध्याकाळ आम्ही मुलं श्रीरामरक्षा स्तोत्र,मारुती स्तोत्र, गीताईचा एक अध्याय आणि समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक एवढी प्रार्थना आप्पांच्या खोलीत चटईवर बसून करत असू. तदनंतर समोरच्या तात्यांच्या खोलीत ते आम्हां मुलांनाच नाही तर आमच्या आयांसाठीही खाऊ देत. सुनांवर मुलींप्रमाणे प्रेम करीत. आपल्याकडे जे आहे ते देवानेच आपल्याला दिले आहे म्हणून आपण एकट्यानेच त्याचा उपभोग घेऊ नये, ते सर्वांना वाटावे, असे ते म्हणत. त्या काळी फारच कमी लोकांच्या आंब्याच्या वाड्या होत्या म्हणून जवळच्या व दूरच्या सर्व नातेवाईकांना आंबे पोहोचवण्यास ते सांगत व आम्ही मुले आंबे नातेवाईकांकडे नेऊन देत असू.
तात्यांच्या प्रगतिशील विचारामुळे आणि पाठिंब्यामुळे काकीने लग्नानंतर बी. ए आणि बी. एड असे शिक्षण घेतले. तर दादीने लग्नानंतर एम. ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. घरात वैचारिक स्वातंत्र्य होते. बंधू आणि काका पक्के गांधीवादी तर बॅरिस्टर हरिहर दादा समाजवादी आणि डॉक्टर रामभाऊ कम्युनिस्ट होते. तात्यांच्या छत्राखाली सर्व गुण्यागोविंदाने नांदत होते.
तात्यांची रसिकता आणि सौंदर्यदृष्टी त्यांच्या खोलीतून जाणवे. तात्यांच्या खोलीत एक टेबल होते. त्यावर सुंदर टेबल क्लाॅथ अंथरलेला असे. वर फुलदाणीत रोज ताजी फुले असतं. मात्र मोगरा सायली चमेली सारखी नाजूक फुले उशी जवळ ठेवलेली असत. एका कोपऱ्यात हिशोबाची चोपडी, शाईची दौतआणि टाक होते तर दुसऱ्या बाजूला रोजचं ताजं वर्तमानपत्र असे. रात्री निजताना बिछान्यावर पांढरी शुभ्र चादर आणि वर तीन घड्यांचा पलंगपोस. “पलंगपोस” हा शब्द त्यांच्याच तोंडून प्रथम ऐकला होता.
तात्या काॅटवर लोडाला टेकून बसत. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाची कुटुंबियांसहित सर्वांचीच विचारपूस करीत आणि निघताना त्यांना आशीर्वाद देत. बाहेर गावावरून आलेल्या नातेवाईकांनी निघताना नमस्कार केला की तात्या शुभशकुन म्हणून त्यांच्या हातावर पैसे ठेवीत.
तात्यांच्या उदारतेमागे एक ठोस विचार असे. सु.पे ह. हायस्कूलला शेती विषय शिकविण्यासाठी स्वतःची जमीन मोफत वापरावयास देणं, बोर्डीच्या प्राथमिक शाळेची वास्तू उभारण्यासाठी देणगी देणे. सो.क्ष. संघासाठी तन,मन, धनाने काम करणे इत्यादी. गोष्टी मधून तात्यांना आपल्या गावातील व समाजातील भावी पिढीसाठी किती तळमळ होती हेच दिसून येईल. तात्यांच्या स्मृतीला वंदन!”
नातीच्या आठवणी खरोखर सुंदर व तात्यांच्या जीवनातील कौटुंबिक पैलू उलगडून दाखविणा-या आहेत.
माधवरावांना 90 वर्षाचै दीर्घायुष्य मिळाले. 25 ऑक्टोबर 1971 रोजी ते निधन पावले. त्यांनी एक यथार्थ जीवन व्यतीत केले. ज्या स्वातंत्र्यासाठी ते झगडत होते, आंदोलने केली, कारावास भोगला ते स्वातंत्र्य त्यांनी आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिले. बोर्डीमध्ये इंग्रजी हायस्कूल स्थापन झालेले पाहिले. त्या शाळेचा सुवर्ण महोत्सव त्यांनी पाहिला. ज्या सोमवंशी क्षत्रिय समाजात त्यांनी जन्म घेतला व विकासासाठी प्रयत्न केले त्या समाजातील तरुण शिक्षणात प्रगती करीत उच्चशिक्षण घेत देशापरदेशात नाव कमावतांना पाहिले. आपले अपुरे राहिलेले काम पुढे नेण्यासाठी समाजात निर्माण झालेली तरुण कार्यकर्त्यांची पिढी पाहिली. तात्या कृतकृत्य झाले.
10 सप्टेंबर 1982 हा दिवस माधव मामांच्या जन्मशताब्दीचा होता. त्यांच्या कार्याची आठवण ठेवून बोर्डी व परिसरातील जनतेने तो अतिशय श्रद्धेने व उत्साहाने बोर्डीच्या राममंदिर सभागृहात साजरा केला. गावातील व बाहेरील अनेक सुप्रतिष्ठित मंडळी मामांना श्रद्धांजली देण्यासाठी आली होती. त्या वेळचे सकाळचे वृत्त संपादक श्री राम प्रधान हे प्रमुख पाहुणे होते तर डाॅ. जयंतराव पाटील हे अध्यक्षस्थानी होते. श्री.खंडेराव सावे अनंतराव चुरी श्री. चिंतामणराव वर्तक, पद्मश्री अनुताई वाघ, चित्रे गुरुजी अशी माधव मामांना जवळून पाहिलेली मंडळी हजर होती. सर्वांनी तात्यांच्या आठवणींतून विविधांगी कर्तृत्वाचा आलेख नवीन पिढी पुढे ठेवला.
अध्यक्ष डॉक्टर जयंतराव पाटील म्हणाले,
“तात्यांच्या रूपात आपल्या गावाला जुन्या पिढीत एक कर्तबगार पुढारी व स्वातंत्र्यसेनानी, झुंजार नेता, प्रभावी वक्ता, धडाडीचा समाजसेवक मिळाला होता. तात्या शेतकऱ्यांचे कैवारी होते..त्यांच्या जाण्यामुळे निश्चितच समाजाची मोठी हानी झाली. बोर्डीचा चिरंतन दीपस्तंभ हरवला.”
प्रमुख पाहुणे श्री. राम प्रधान म्हणाले ,
“माधवराव राऊत ही प्रचंड प्रेरक शक्ती होती .माणसांतील माणूस जागा करणे व त्याला ताठ कण्याने उभे करण्याचे काम त्यांनी पारतंत्र्यात केले.माधवराव, शामराव, मुकुंदराव ही नेते मंडळी पूर्वजन्मीची कोणी तपस्वी योगी असावीत असे मला वाटते.”
कै. माधवरावांचे पुतणे, कै.मदनराव राऊत यांचे चिरंजीव पुरुषोत्तम(मदन कुमार), यांनी आपल्या काकांना श्रद्धांजली वाहताना म्हटले,
“ तात्यांनी गावाला संस्कृती देण्यापूर्वी आमच्या घराला फार मोठी संस्कृती दिली. त्यांच्या वागण्याबोलण्यात एक आगळी पण हवीहवीशी मधाळ शिस्त होती.राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात ते बोर्डीच नव्हे तर ठाणे जिल्ह्याचे एक नेते होते. तात्यांना आपल्या घराचा विसर कधीच पडला नाही.मुलांच्या शिक्षणात जातीने लक्ष द्यायचे. भविष्यकाळात जमीनदार-खोत यांच्या ताब्यात जमिनी राहणार नाहीत. तेव्हा मुलांनो तुम्ही खूप शिका व आपल्या पायावर उभे राहा ,असे त्यांचे आम्हाला सांगणे असे. कुळ कायदा येण्याआधी त्यांची ही आम्हाला शिकवणी होती. त्यामुळे कुळ कायद्यानंतर आम्हा मुलांना अश्रू ढाळावे लागले नाहीत..ही तात्यांची दूरदृष्टी होती!”
तात्यांच्या या सर्व श्रद्धांजलीपर भाषण व लेखांचे पुस्तक व्हावे अशी सूचना लोकांनी केली होती मात्र ते होऊ शकले नाही. भावी पिढीसाठी ती प्रेरणा असते, वारसा असतो. समाजातील अशा महान लोकांची चरित्रे, लिखित स्वरूपात कुठेतरी असावी या भावनेतूनच मी हे लेखन माझ्या पुढील पुस्तकासाठी करतो आहे.
भारतात, राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी तात्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच’ हा लोकमान्यांचा नारा सर्व समाजात पसरवून त्यांनी लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं. इंग्रज सरकारच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारले. समाजाचा विश्वास प्राप्त करून जनतेमधील असंतोष, अल्पसंतुष्टता, संशय व अज्ञान दूर केले. लोकांना जागृत केले.त्यासाठी पांडित्यापेक्षा परखड बोलीभाषेची जरुरी होती, योग्य वेळी तीच भाषा वापरली. त्यांना अनेक वेळा तुरुंगवास घडला, घरावर जप्ती आली. मात्र माधव मामा कोणत्याच अन्यायापुढे वा दडपणाखाली नेमले नाहीत. तत्वापुढे माघार घेतली नाही.
माधवमामांचे जीवन व कार्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही समाज बांधवांनी, बोध घेतला तर आजचा सुशिक्षित समाज सुसंस्कारी होण्यासही वेळ लागणार नाही.असा आदर्श व संस्कारित समाज उद्याच्या समर्थ भारताच्या निर्माणासाठी आवश्यक आहे . माधव मामांना खऱ्या अर्थाने आमच्याकडून ती श्रद्धांजली होईल!!
‘स्वावलंबन आणि स्वार्थत्याग हाच लोकांच्या उन्नतीचा मार्ग आहे ‘ असे प्रतिपादन माधवमामा आपल्या प्रबोधनांतून नेहमी करीत. आपल्या स्वतःच्या जीवनातून आपल्या आचरणाने त्यांनी ते दाखवूनही दिले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात आमच्या बोर्डी, घोलवड, डहाणू परिसराचे ‘लोकमान्य’ पुढारी म्हणून गणले गेलेले व्यक्तिमत्व म्हणजे कै.माधवराव राऊत! उदंड कर्तृत्वाचा साक्षात मेरुमणी, नरसिंह होता. या कणखर आणि ताठ बाण्याच्या, निष्कलंक चारित्र्याच्या लोकनायकास, म्हणजेच ‘बोर्डीचा सिंह’ माधव मामांना वंदन आणि त्यांच्या स्मृतीला शतशत प्रणाम!!
या लेखासाठी सौ.ज्योत्स्ना हेमंत राऊत सौ. स्मिता ठाकूर यांनी दिलेल्या माहिती व छायाचित्रां साठी त्यांचे आभार.
दिगंबर वा राऊत.
मा. कार्यकारी विश्वस्त सो क्ष संघ फंड ट्रस्ट.
तात्यांबद्दल खुप चांगली माहिती दिली. धन्यवाद. बोर्डी गावातील अस्पृश्य समाजाला घरातील विहीरीचे पाणी वापरू दिले म्हणून राऊत कुटूंबियांना धेडे राऊत असे म्हणून डिवचण्याचा प्रयत्न झाला पण तात्यांनी “धेडेराऊत” हा शब्द एखाद्या पदवी सारखा मिरवला. कस्तुरबा गांधी मुलाच्या आजारपणात बोर्डीला वास्तव्याला होत्या. राममंदिर बांधताना गांधीजींचे पीए महादेव भाई यांच्या मार्फत तात्या बांना भेटायला गेले तेंव्हा “बा”नी ‘या मंदीरात हरीजनांना प्रवेश देणार का?’ असे विचारले तेंव्हा क्षणाचाही विचार न करता तात्यांनी ‘हो’ असे उत्तर दिले. त्यांच्या समविचारी गोतावळ्यात मुस्लिम देखील होते. तात्या जातधर्म भेदाभेद जाणीत नव्हते.
बंधू आपला माधव मामा वरील लेख अप्रतिम .
आम्ही बोर्डीचे रहिवासी असल्याने आपल्या लेखाचे महत्त्व ओळखू शकतो. महादेव मामा बोर्डीचे रत्न होते धन्यवाद
माधव मामा वरील लेख अप्रतिम आहे। माहीत नसलेल्या गोष्टी कळल्या। माधव मामांसारख्या नेत्यामुळे बोर्डीचे नाव ऊज्वल झाले
दीगंबरभाई अतिशय सुंदर माहीती,
वाचुन जुन्या स्म्रुतीला छान ऊजाळा मीळाला
हेमंत विनायक राऊत माझा वर्ग मीत्र व Best friend असल्याने व त्यांच्या होळी साईडच्या घरी आम्ही एकत्रीत अभ्यासाला बसत असत, राऊत बाईंचे पण मार्गदर्शन मीळायचे व त्या निमीत्ताने माझे हेमंतच्या घरी नेहमीच जाणे -येणे होते,ते खाटेवरच पडुन असत.
माझ्या SSC च्या दुसर्याच वर्षी महादेवतात्या गेले, त्या आधीच काही महीन्यापुर्वी हेमंतने आम्हा मित्रमंडळींना अस्वाळीच्या वाडीत पीकनीक साठी नेले होते व तेव्हा आम्ही बार्डाच्या डोंगरावर पण गेलो होतो. एवढ्या जंगल भागांत तात्यांनी खरच कष्टानी ती वाडी केली होती.
महादेवतात्यांच्या स्म्रुतीस त्रीवार अभिवादन
माधव मामांचे नाव मी लहानपणी ऐकले होते .पुढे माझी बहीण त्यांच्या कुटुंबात सून म्हणून गेल्यामुळे त्यांची जवळून ओळख झाली होती. एक जबरदस्त माणूस. अत्यंत निगर्वी व सेवाभावी असे व्यक्तिमत्व होते. आपल्या लेखामुळे त्यांची बरीच माहिती कळली
कै . महादेव ल राऊत उर्फ माधवमामा व त्यांचे बंधू ही बोर्डी मधील एक व्यक्ती वा कुटुंब नव्हते तर एक संस्था होती .एकत्र कुटुंब पद्धती कशी चालवावी व पिढीवर चारित्र्य संस्कार कसे घडवावेत ह्यांचे उत्तम शिक्षण देणारी एक आदर्श संस्था होती .
संध्या समयी दिवेलागण झाली की त्यांच्या घरांतून येणारे व सर्व आबालवृद्धांच्या मुखांतून एकवटणारे ‘ शुभम करोती ‘ चे सूर आमच्या कानी पडत . आम्ही त्यांच्या घराच्या मागिलबाजूस राहात असल्याने आम्हीही नकळत हात जोडून सामील होत .कांही सूर मला आजही आठवतात .
पक्षी जाय दिगंतरा बालकाशी आणी चारा
घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी !
माधवमामांच्या घरचा एक शिरस्ता असायचा जसे , शंकराच्या मंदिरातला पहाटे पाचचा पहिला अभिषेक हा त्यांच्या घरातूनच व्हायला हवा .माधवमामा कधी स्वतः येत तर कधी त्यांच्या निकटवर्तीयांपैकी कुणी .मात्र हा नेम कधीच चुकला नाही .
त्यांच्या वाडीतले आंबे पिकल्यावर शेजारी पाजारी प्रत्येक घरी दोन आंबे वाटल्यानंतरच त्यांच्या घरची मंडळी आंबे खात .
गावांत कुणीही अनोळखी येणारा पाहुणा त्यांच्या घरी जेवल्याशिवाय जात नसे .
कै . अण्णासाहेब वर्तकांनी आपला मुलगा कै भाऊसाहेब वर्तकांना बोर्डी हायस्कुल मध्ये शिकण्यासाठी कांही दिवस माधवमामांच्या छत्राखाली त्यांच्या घरी ठेवले होते .
अशा त्या ‘वज्रादपि’कठोराणि मृदुनि कुसुमादपि ‘ कृपा सिंधू माधवमामाना माझी भावपूर्ण श्रद्धांजली !
नमस्कार दिगंबर भाऊ
आपण अतिशय उत्तम,उद्बोधक असे लेख लिहिता त्याबद्धल तुमचे अगदी मनापासून अभिनंदन. आपले थोरसमाज सुधारक,डॉक्टर्स,रंगकर्मी, शेती तज्ज्ञ, साहित्यिक, आदर्श शिक्षक काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत त्यांच्या कार्याला उजाळा देऊं.नवीन पिढीला चरित्र कथनातून प्रेरणादायी माहिती तुमच्या ्लेखनातून मिळते.
तुमची लेखनशैली, प्रतिभाशक्ती वाखाण्याजोगी आहे.
कै.रमेश चौधरी ह्यांचे आजोळ आमच्या किरवली गावात हेमंत चौधरी(चंदू भाऊंकडे)ह्यांच्या कडे नानांनी गावात जानकी सदन नावाची शाळा उघडून गावात शिक्षणाचा मार्ग खुला केला. संघात काम करीत असताऔना रमेश भाईंचा सहवास आणि मार्गदर्शन मिळाले त्याबद्धल मी स्वतःला भाग्यवान समजते.
दिगंबर भाऊ तुमची लेखणी अशीच सतत चालू राहून अजूनही पडद्याआड गेलेले गावोगावच्या समाज धरीणांबद्धल आपण लिहित जावे.
पुनश्च आपले अभिनंदन
आपली भगिनी सौ.हेमलता म. राऊत
किरवली, वसई
प्रिया दिगंबर भाई ..
कै.माधव मामा वरील लेख वाचून खूप आनंद झाला. त्यांचे नाव मी नेहमी ऐकत असे. मात्र त्यांच्या कामाची विस्तृत माहिती आपल्यामुळे मिळाली. संघात एवढी वर्षे काम करून अशा महान समाजसेवकाबद्दल विशेष माहिती नव्हती. आपण ती दिली त्याबद्दल आपले अभिनंदन, धन्यवाद.
प्रिय दिगुभाऊ,
ब्लॉग कधीच वाचला होता.acknoledge करायला उशीर झाला,क्षमस्व.
स्व.माधव मामा यांच्या लढाऊ बाण्याचा परिचय करून दिल्या बद्दल धन्यवाद.मी तर नावापुरता बोर्डीकर.पण बोर्डी मधील महनीय व्यक्तिमत्त्व परिचय तुझ्या मुळेच झाला .
त्यांच्या स्मृतीला वंदन.
पुन्हा एकदा आभार.
स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय माधव मामा यांच्यावरील लेख वाचला त्यांच्या लढा विषयी आपण अतिशय सुंदर लेखन शैलीने त्यांचा इतिहास लिहिला आहे. त्यामुळे त्यांनी ब्रिटिशा विरोधात दिलेला लढा चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर दिसतोय असं भासते. हे आपल्या लेखनात शैलीचे खास वैशिष्ट्य आहे.
कायम मरेपर्यंत गांधीवादी तत्त्व आचारत जगलेले स्वातंत्र्य सैनिक स्व. उद्धव घरत वसई यांच्या जीवनाविषयी माहिती लिहून आपण त्यांच्यावरही लेख लिहावा अशी मी आपणांस विनंती करतो.
विविध पाटील, केळवे