पुण्यात्मा, कै. आत्मारामपंत सावे

3 जुलै,1894-19जुलै, 1953

     सर्वत्र समभाव पाहणाऱ्या भक्ताची किंवा सत्पुरुषाची भूमिका मांडताना ज्ञानदेवांनी फारच सुंदर दृष्टांत दिलेले आहेत.

    का घरीचिया ऊजियेडू करावा, पारखीया अंधारू पाडावा,

    हे नेणेची गा पांडवा, दिपू जैसा!

     जो खांडावया घाव घाली ,का लावणी जयाने केली,

     दोघा एक ची साऊली, वृक्षु दे जैसा!

   ज्याचे ठिकाणी भेदभावाची वार्ता नसते, तो शत्रू आहे,  हा मित्र आहे असा भेदभाव न पाहता दोघांनाही सारख्या योग्यतेने समजतो. घरातील माणसांना उजेड द्यावा आणि बाहेरच्यां साठी मात्र अंधार करावा, असा भेद दिवा जाणतच नाही. जो झाडावर कुर्‍हाडीचे घाव घालतो त्यालाही,आणि ज्याने लागवड करून पाणी घालून वाढविले त्यालाही, झाड सारखीच सावली देते. पाणी घालणार्‍याला दाट सावली द्यावी आणि  कुर्‍हाडीचे घाव घालणाऱ्यांची सावली काढून घ्यावी, अशी भूमिका वृक्ष कधीच घेत नाही.

    जो लोकनिंदा स्विकारीत नाही आणि स्तुती मुळे गर्व करीत नाही. निर्लेप जीवन जगत असतो. अभिलाषेच्या पलीकडे गेलेला, सर्वांठाई समत्व, अभेद्त्त्व आणि असंगत्व पावलेला पुरूष ,खऱ्या अर्थाने ब्रह्मभावाला जागवीत असतो. हा ब्रह्मभाव आणि साम्यभाव आपले परिसरांतील आजूबाजूच्या लोकांतही निर्माण व्हावा म्हणून मानवतेचा धर्म उभा करतो .नव्हे, मानवतावाद हाच त्याच्या जीवनाचा गाभा असतो. 

    मानवतेची ज्योत घेऊन, शंभर वर्षांपूर्वी बोर्डी गावाला व परिसराला शिक्षणाचा नवा प्रकाश दाखविण्यासाठी ज्या महामानवांनी भगिरथ प्रयत्न केले, त्या गोविंदराव चुरी, आचार्य भिसे, आचार्य चित्रे यांच्या मालिकेतील चौथा तळपता तारा म्हणजे गुरुवर्य आत्माराम पंत सावे!! सर्वत्र समभाव पाहून ,सर्वांना ज्ञानज्योतीचा प्रकाश दाखविण्यासाठी आयुष्यभर धडपडणारा तो सत्पुरुष म्हणजे  प्रि. आत्माराम पंत सावे! 

      संसाराबरोबरच परमार्थही साधण्याचे अजब कसब जगात खूप थोड्या लोकांना साधते. अशा अपवादात्मक, प्रेरक व्यक्तिमत्वामधील एक म्हणजे आजन्म सेवाव्रती, स्वातंत्र्यसैनिक, समाज सेवक, बोर्डी हायस्कूलचे एक आद्य संस्थापक, गुरुवर्य कै.आत्मारामपंत सावे सर ऊर्फ सर्वांचे नाना आणि विद्यार्थ्यांचे ए. वी. सावे सर!!

    नानांचा जन्म झाला, तो काळ परकीय राजवटीचा. भारतीय स्वातंत्र्याचे ध्येय बाळगणारा ,सामाजिक विकासाची कास धरणारा व अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा अंधार दूर करून ज्ञानाची मंगल पहाट ऊजाडण्यासाठी, आपल्या उच्च  शिक्षणाचा उपयोग करू पाहणारा,असे तीन विचारप्रवाह या काळात होते. त्या टप्प्यावर तिन्ही विचारसरणींची भारतीय समाजाला गरज होती.

    महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले आणि प्रिन्सिपल त्र्यंबकराव कुलकर्णी, यांच्या विचारसरणीने, आत्माराम सावेंना झपाटून टाकले होते. सावे गुरुजींमधील धडपडणाऱ्या तरुणाला, प्रथम आपल्या मातृभूमीला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करावयाचे होते. आपला सोमवंशी क्षत्रिय समाज अंधश्रद्धामुक्त करून संघटीत करावयाचा होता. आणि  जन्मभूमी बोर्डीमध्ये, शिक्षणाची उत्तम सोय निर्माण करून, येथील तरुणांना ‘वाघिणीचे दूध’ पाजून, भविष्यातील आव्हाने स्वीकारण्यासाठी बलशाली करावयाचे होते.

    गुरुवर्य नानांनी, यथाशक्ति आपले मनसुबे प्रत्यक्षात, कृतीत उतरविले.  सामाजिक उत्थान, शैक्षणिक योगदान आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्राम यांचा अचूक मेळ साधत जी‌वन जगण्यात धन्यता मानली. नाना आपले जीवन कृतार्थ करून गेले !

      आत्माराम पंत सावे यांचा जन्म बोर्डी येथे, 9  जुलै 1894 मध्ये झाला. घरची परिस्थिती अगदीच बेताची. वडिलांची थोडी शेती होती व त्यावरच या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह  होता.  चार बंधू व एक भगिनी असे हे मोठे कुटुंब बोर्डीच्या चाफा वाडीत राहत होते. त्यांची शेती, तेरफडे या बोर्डीच्या एका दूरवरच्या भागात होती. मोठे बंधू हरिभाऊ यांची जिद्द व अचूक मार्गदर्शनामुळे आत्माराम पंतांना लहानपणी शिक्षण घेता आले. प्राथमिक शिक्षण बोर्डी मध्ये घेतल्यानंतर, हायस्कूलसाठी त्यांना महाराष्ट्रातील व गुजरातेतील अनेक गावी फिरावे लागले. जेथे जेष्ठ बंधू,  डाॅ.हरिभाऊ, नोकरीनिमित्त असत , तेथे आत्मारामलाही घेऊन जात. कोणत्याही परिस्थितीत नुसते शिक्षणच नाही तर उच्च शिक्षण  घ्यायचेच, ही आपली जिद्द ,त्यांनी अपार कष्ट, चिकाटी  व बुद्धी चातुर्याच्या बळावर पूर्ण केली. बंधू डाॅ .हरिभाऊंच्या कर्तृत्वाचा थोडक्यात आढावा पुढे येणार आहे.

   नानांनी, बी ए ची,पदवी, इंग्रजी हा विशेष विषय घेऊन,उत्तम प्रकारे, विल्सन कॉलेजमधून मिळविली. वास्तविक त्या काळात  पदवी, तीसुद्धा  इंग्रजी विषयात,  मिळविल्यानंतर, अनेक सरकारी नोकऱ्या त्यांना खुणावत होत्या. अगदी कलेक्टरची नोकरी देखील त्यांना करता आली असती. मात्र तो काळ स्वातंत्र्य, देशभक्ती आणि समाजाप्रती ॠण मानणाऱ्या तरुणांचा होता. उदात्त विचारांनी  झपाटलेली ती पिढी होती. टिळक, आगरकर, महात्मा गांधी अशा महान नेत्यांनी,तरुणांना ,देशाच्या स्वातंत्र्यासाठी, सर्वस्व समर्पण करण्याच्या जिद्दीने झपाटले होते. मग नाना देखील त्याला कसे अपवाद ठरतील? आपल्या गावासाठी ,समाजासाठी, सर्व प्रलोभने बाजूस सारून, हा पदवीधर तरूण, मुंबईला रामराम  करून आपल्या बोर्डी गावी परत आला. जीवनाचा एक नवा अंक सुरु करण्यासाठी… 

   नाना बोर्डीला आले, त्यावेळी तेथे माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. श्री. गोविंद चुरी या बोर्डातीलच गृहस्थांनी , इंग्रजी शिक्षणाचे वर्ग 1918 साली,सुरू केले होते. आत्माराम पंतांनी, गोविंदरावांबरोबर, या इंग्रजी शिक्षण वर्गात ,ज्ञानदानाचे काम सुरू केले. हा एक छोटा शिकवणी वर्ग होता. सावे सरांचे मनांत, यापेक्षा काहीतरी भव्य दिव्य करावे असे होते. त्यांचा प्राचार्य त्र्यंबकराव कुलकर्णी यांच्याशी परिचय होता. बोर्डीचे दुसरे नागरिक श्री मदनराव राऊत हे देखील प्राचार्य कुलकर्णी यांचे विद्यार्थी. प्रिन्सिपल कुलकर्णी सर अधून मधून बोर्डीस, विश्रांतीसाठी येत. त्यावेळी प्रि. कुलकर्णी यांनी मुंबईत, गोखले एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. या सोसायटीच्या मार्फतच,बोर्डी येथेही माध्यमिक शिक्षणासाठी हायस्कूल सुरू करावे अशी विनंती मदन मामा(मदनराव राऊत),व सावे सरांनी, प्रि. कुलकर्णी याना केली.आपल्या एका बोर्डी भेटीत, कुलकर्णी सरांनी, बोर्डीचे  निसर्गसौंदर्य, येथील ग्रामस्थांचा एकमेकाशी असलेला जिव्हाळा व आपल्या आवडत्या दोन विद्यार्थ्यांचा आग्रह पाहून,माध्यमिक विद्यालयासाठी, बोर्डी हे योग्य ठिकाण आहे अशी त्यांचीही खात्री झाली. त्यांनी बोर्डीला माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आत्माराम पंत सावे यांनी या शाळेची मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी स्विकारली. आत्माराम पंतांचे श्वशुर, कै. गोपाळराव पाटील, यांच्या ओळखीमुळे, धनबाई या दानशूर पारशी महिलेने शाळेसाठी भरीव देणगी देऊन एक भव्य इमारत उभी केली. पुढे  शाळेत आचार्य शंकरराव भिसे, आचार्य कृष्णराव चित्रे व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आपले योगदान देऊन प्रि.कुलकर्णीसरांचा निर्णय योग्य ठरविला. तो इतिहास ही मोठा रोमहर्षक आहे.

    आमच्या बोर्डी हायस्कूलचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. पश्‍चिमेला अथांग अरबी सागर, पूर्वेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा, मधोमध, चिकू, नारळी, केळी यांच्या फळबागा.. शाळेसमोर भव्य पटांगण..दक्षिणोत्तर किनाऱ्यालगत सुरू वृक्षाच्या मोठ्या बागा..अशा रमणीय परिसरात  बोर्डी हायस्कूलमध्ये ज्ञानदानाचे पवित्र काम सुरू झाले..   

      कै.आत्माराम सावे,उभे,डावीकडून दुसरे.

       नानांना, शिक्षणकार्याव्यतिरिक्त,आपल्या सो. क्ष. समाजासाठी काहीतरी काम करण्याची आंतरिक तळमळ होती. तत्कालीन ठाणे जिल्ह्याच्या डहाणू, पालघर, वसई तालुक्यांत व मुंबईत विखुरलेला सोमवंशी क्षत्रिय समाज, स्वातंत्र्यपूर्व काळात, व्यसनाधीन व अंधश्रद्धेच्या आहारी गेला होता. समाजाची आर्थिक स्थिती हलाखीची व शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत दुरवस्थेची अशी होती. अज्ञानामुळे अंधश्रद्धांचा सुळसुळाटही होता. विशेषतः  जगण्यासाठी आवश्यक मुलभूत सोयीदेखील गावोगावी नव्हत्या. रस्ते ,शाळा अगदी पिण्याचे शुद्ध पाणीदेखील लोकांना  गावात मिळत नव्हते. विशेषतः चटाळे , कोरे, एडवण या भागातील समाज बांधवांचे जीवन अतिशय खडतर होते. मुंबईपासून अगदी नजीक असूनदेखील नागरी जीवनाचा स्पर्श समाजाला झाला नव्हता. एकेकाळी अत्यंत दैदिप्यमान रोमहर्षक इतिहास असलेल्या या सोमवंशी क्षत्रिय समाजाची, अनेक वर्षांच्या राजकीय गुलामगिरीमुळे व व्यसनाधीनतेमुळे दुर्दशा झालेली होती. कालचक्र मोठे विचित्र असते एकेकाळी वैभवाला पोहोचलेला हा समाज, इतिहासाची जाण व पूर्वजांचा दैदिप्यमान वारसा यांचा विसर पडल्याने अधोगतीस जात चालला होता.

      कै. गोविंदराव वर्तक, कै.तात्यासाहेब चुरी, या तत्कालीन धुरिणांनी समविचारी तरुणांना एकत्र आणून एक कार्यकारी मंडळ, मार्च 1928 साली स्थापन झाले. या पहिल्या हंगामी कार्यकारी मंडळातील सभासदांची कांही नावे वाचल्यावर, याकामाचे सर्व समाज बांधवांना किती अगत्य होते, याची जाणीव होते. .

आदरणीय सर्वश्री, गोविंदराव धर्माजी वर्तक अध्यक्ष 

परशुराम धर्माजी चुरी उपाध्यक्ष,आत्माराम पंत विठ्ठल सावे चिटणीस,

मुकुंदराव अनंत सावे दुय्यम चिटणीस.काशिनाथ नारायण राऊत हिशोब

तपासणीस ,मदनराव लक्ष्‍मण राऊत हिशोब तपासनीस,

           

सन 1945 ,सो. क्ष. संघाचे पदाधिकारी. मागे, उभे असलेले डावीकडून दुसरे,कै.मदनराव राऊत, तिसरे,कै.आत्माराम पंत सावे, चौथे डाॅ. दीनानाथ बा. चुरी. सोबत, बसलेले, डावीकडून ,(सर्व कै.) मुकुंदराव सावे, अण्णासाहेब वर्तक, तात्यासाहेब चुरी, आत्माराम पंत चौधरी, बळवंतराव वर्तक. 

      पुढे 2 व 3 मे 1921 रोजी वसई येथे संघाची पहिली परिषद झाली. पहिले कार्यकारी मंडळ अस्तित्वात आले. त्यातील पदाधिकारी आदरणीय सर्वश्री, भायजी जगू राऊत.अध्यक्ष,  गोपाळराव नाना पाटील. उपाध्यक्ष,गोविंदराव धर्माजी वर्तक. खजिनदार,पांडुरंग आत्माराम चुरी. चिटणीस , आत्मारामपंत विठ्ठल सावे. चिटणीस, आत्माराम लक्ष्मण चौधरी. हिशोब तपासणीस, दाजी भास्कर वर्तक,हिशोब तपासणीस.

           या कार्यकारी मंडळाची पहिली तिमाही सभा तीन जुलै 1921 रोजी बोर्डी येथे झाली त्या सभेत माकुणसार येथे प्राथमिक शाळा सुरू करण्याचे ठराव करण्यात आला त्यानंतर फक्त दीड महिन्याचे आंत, 19 ऑगस्ट 1921 रोजी माकुणसार येथे शाळा सुरू करण्यात आली . संघाचे सर्व पदाधिकारी आणि माकूणसार परिसरांतील कार्यकर्ते यांनी हे कार्य पूर्ण करण्यासाठी किती परिश्रम घेतले असतील याची आज कल्पना करता येणार नाही .  आमच्या समाजधुरीणांच्या दूरदृष्टीला आणि संघटनाकौशल्याला सलाम!कै.आत्माराम पंत सावे यांनी  ही पहिली शाळा  समाजांत सुरू करण्यासाठी, चिटणीस म्हणून  जे कष्ट घेतले आहेत, त्यालाही दाद दिली पाहिजे. विशेष म्हणजे ही शाळा यावर्षी आपला शतकमहोत्सव पूर्ण करत आहे.

    कै.नाना,  सोमवंशी क्षत्रिय  संघ फंड ट्रस्ट ,या विश्वस्त संस्थेचे, बोर्डी मधील  पहिले विश्वस्त होते. सन 1939 ते 1953, आपल्या मृत्यूपर्यंत, त्यांनी हे काम मोठ्या जिद्दीने व इमाने-इतबारे निरलसपणे केलेले आहे. त्यांच्या कामाची मोहोर या संस्थेच्या एकूणच कामात ठळकपणे उमटली आहे . त्यांनी केलेले कार्य निःसंशय उल्लेखनीय आहे. त्यांच्यानंतर ,बोर्डीचे कै.मदनराव राऊत, कै.डॉ दीनानाथ चुरी, कै.डॉ.जयंतराव पाटील , श्री. प्रमोद चुरी,या बोर्डीच्या सूपुत्रांनी  हे विश्वस्तपद सन्मानाने सांभाळले. योगायोगाने आज ही सौ. कल्पलता प्रमोद चुरी, या कै.तारामाई वर्तक यांच्या सुकन्या व कै.नानांची नात..त्या सो. क्ष .संघ फंड ट्रस्टच्या विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. वडिलांच्या बाजूने सौ. कल्पलता या कै. अण्णासाहेब वर्तक यांची नात.. अशा रीतीने सौ कल्पलता यांना मातृ पितृ घराण्याकडून समाजसेवेचा मोठा वारसा मिळाला आहे . सावे, वर्तक कुटुंबातून आमच्या सो.क्ष समाजाला जास्तीत जास्त सामाजिक,राजकीय  कार्यकर्ते मिळाले असे म्हणावे लागते. सौ. कल्पलता व श्री. प्रमोद चुरी या  पती-पत्नींनी एकाच संस्थेचे विश्वस्तपद सांभाळण्याचा दुसराही एक अनोखा योगायोग आहे. 

     मला  सांगावयास अभिमान वाटतो की विश्वस्त पदाच्या त्या  खुर्चीवर माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ताही कांही वर्षे कार्यरत होता.बोर्डीच्या सूपुत्र, सुपुत्रींनी चालविलेल्या  समाज सेवेच्या वारशाचा मी एक छोटा अंश आहे..

       बोर्डी हायस्कूलची स्थापना झाली व मागे म्हटल्याप्रमाणे नानांनी अगदी पहिल्या दिवसापासून आपला सहभाग शाळेच्या व्यवस्थापनात दिला. सामाजिक ऋण, व बांधिलकीची जाणीव ठेऊन, सो. क्ष .संघ स्थापनेत मोलाची कामगिरी केली. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन त्यासाठी झालेली कारावासाची शिक्षा भोगली! अशा रीतीने  एक शिक्षणकर्मी, समाजसुधारक व सच्चा स्वातंत्र्यसैनिक असे अनेकांगी, भव्य, दिव्य काम, आपल्या छोट्या आयुष्यात करीत असताना एक आदर्श कुटुंब प्रमुख म्हणून सुद्धा यांनी आपले कर्तव्य बजावलेले आहे हे लक्षात घ्यावयास हवे. खऱ्या अर्थाने नानांचे जीवन सार्थकी लागले!

        नानांच्या कामाचे महत्व व वैशिष्ट्य असे की ज्या दोन संस्था, बोर्डी हायस्कूल व सो.क्ष.स. संघ, स्थापीत करण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले , तेथे ते ‘पायाचे दगड’ झाले.  हा पाया एवढा मजबूत झाला होता की, त्या दोन्ही संस्था ,आज शंभर वर्षांनंतर, नुसत्या टिकूनच नाहीत तर सर्वांगिण विकासाचे, अनेक ‘मैलाचे दगड’, पार करून,  समाजासाठी आधारवड ठरलेल्या आहेत! नाना व त्यांचे सहकारी,कल्पवृक्षाचा हा बहर पाहण्यासाठी आज या जगात नाहीत. ते कोठेही असोत, त्यांनी लावलेल्या इवल्या रोपांचे हे गगनावरी गेलेले वेलु पाहून त्यांना धन्य होत असेल… म्हणत असतील… “याचसाठी केला होता अट्टाहास”..!

       दुसरे वैशिष्ट्य म्हणजे,आपला  “अवघाची संसारही सुखाचा”, करून  त्यांनी हे सामाजिक ,शैक्षणिक, राजकीय योगदान दिले. आचार्य भिसे  आजन्म ब्रह्मचारी राहिले, चित्रेसरांचा संसार अल्पावधीतच मोडला, त्यांनी तो परत उभारला नाही. गोविंदराव     चुरींचे कौटुंबिक बाबींकडे पूर्ण दुर्लक्ष झाले.  सामाजिक, शैक्षणिक ,कौटुंबिक जबाबदाऱ्यांना योग्य न्याय देत, जीवनाचा समतोल राखीत,आयुष्याची वाटचाल केलेल्या नानांचे  जीवन वैशिष्ट्यपूर्ण आहे, खडतरही आहे.  संसारात  राहूनही,केवळ त्यातच गुरफटून न जाता, समाजोपयोगी कामे देखील करता येतात, हे नानांनी आपल्या स्वतःच्या आचरणातूनच दाखवून दिले. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करावा वाटतो तो यामुळेच !

    नानांच्या तृतीय कन्या, मालतीबाई, बोर्डी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. सन 1955 ते 1991 अशी 36 वर्षे त्यांनी बोर्डी शाळेला एक उत्तम शिक्षिका म्हणून योगदान दिले. 1989 ते 1991 अशी दोन वर्षे त्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. विशेष म्हणजे सन 1955  साली जेव्हा मी बोर्डी हायस्कूलात, इयत्ता आठवीसाठी  प्रवेश घेतला, त्याच वर्षी मालतीबाई शाळेंत  रुजू झाल्या होत्या.  जेव्हा पिताजी, नानांचे निधन झाले(1954) त्यावेळी बाईंचे महाविद्यालयीन शिक्षण चालू असावे. पितृनिधनानंतर लगेच पुढील वर्षी त्या शिक्षिका म्हणून हायस्कूलमध्ये रुजू झाल्या होत्या. विशेष योगायोग म्हणजे आमच्या आठवी ‘ड’ या त्याच वर्षापासून सुरू झालेल्या नवीन तुकडीच्या, मालतीबाई ह्या वर्गशिक्षिका होत्या. मराठी शाळेतून हायस्कूलमध्ये प्रवेश म्हणजे स्थित्यंतराचा काळ,खूपच कुतूहल मिश्रित असे दिवस. हायस्कूल मध्ये  येईपर्यंत इंग्रजीचा काहीच गंध नव्हता.  आणि आठवीपासून इंग्रजी शिकायचे, शाळा नवी, शिक्षक नवे, सर्वच नवलाई !त्यामुळे आपल्याला हे सर्व  झेपेल किंवा नाही,  इंग्रजीचा अभ्यास जमेल काय,अशा नाना शंका-कुशंकांनी मन त्यावेळी कातर झालेले होते? आमच्या पहिल्या वर्गशिक्षिका मालतीबाई. बाईंनी आमच्या हायस्कूल जीवनातील पहिला वर्ग घेतला. त्यांनी त्यावेळी आमची मनस्थिती ओळखून, दिलेला दिलासा व ,”काहीही अडचण आली, तर तुमची वर्गशिक्षिका म्हणून मला कधीही निसंकोचपणे भेटा”, असे दिलेले आश्वासन आम्हाला खूप  मनोबळ देऊन गेले.म्हणूनच बाईंची आजही, साठ वर्षानंतर तेवढ्याच आत्मीयतेने आठवण येते व अजूनही त्यांचेबद्दल तेव्हा असलेला आदर भाव आजही शाश्वत असल्याची जाणीव होते!   आठवणीत राहिलेल्या,आवडत्या, विशेष शिक्षक-शिक्षिकां पैकी  माझ्यासाठी, मालतीबाई, आदरणीय  आहेत! नानांच्या हयात अपत्यापैकी सध्या मालतीबाई एकट्या  आहेत.कै.आत्माराम पंत सावेसराविषयी लिहिताना त्यांची भेट घेणे व त्यांचे कडून, आपल्या पिताजींच्या, कुटुंबाच्या व एकूणच त्या कालखंडाच्या आठवणी ऐकणे जरूरी होते. बाई आज नव्वदीच्या जवळ पोहोचल्या आहेत .त्यामुळे स्मरणशक्ती जरी थोडी कमी झालेली असली तरी, उत्साह व चेहऱ्यावरील हास्य, आत्मविश्वास तोच आहे .सौ उज्वला चुरी बाई, यांच्यामार्फत त्यांची मुलाखत झाली. त्यांनी सांगितलेल्या आठवणी खूपच हृद्य, अतिशय बोलक्या  व वाचनीय आहेत..

       “आमच्या नानांचे वडील विठ्ठलराव,हे शेतकरी होते. त्यांची तीन-चार एकराची भातशेतीची जमीन होती. अर्धा पाऊण एकराची छोटी वाडी, तेरफडे भागात  होती.  तेरफडे हे सावे कुटुंबाचे बोर्डीतील मूळ निवासस्थान होते. या जमिनीतील उत्पन्नावरच  कुटुंबाचा आर्थिक भार होता.

 आजोबा विठ्ठल यांना,चार मुलगे व एक मुलगी.हरिभाऊ ,रामचंद्र आत्माराम व लक्ष्मण या चार भावांना  एक बहीण…मोठ्या हरिभाऊनी मेहनत व हुषारीने स्वबळावर, बडोदा संस्थानात वेटरनरी सर्जनचे शिक्षण घेतले.त्यांनी या क्षेत्रात मोठे नाव त्यावेळी कमावले होते. बडोदा संस्थानात ते व्हेटरनरी  डाॅक्टर म्हणून काम पहात होते. लहान भावंडांना व  एक विधवा वहिनीला त्यांनी आपल्या घरी आश्रय दिला होता.हरिभाऊंना गोपाळ व शशीताई अशी दोन अपत्ये होती. बोर्डीच्या राम मंदिरात हरिभाऊ प्रसंगानुरूप कीर्तने करीत. 

      दुसरे बंधू रामचंद्र हे उत्कृष्ट बागायतदार होते. विशेषतः आंबे लागवड व उत्पादन , यात त्यांना चांगली गती होती. बलसाड, गुजरातमधील काही मोठ्या बागायतदारांच्या आंबेबागा ते जोपासत असत. अनेक वर्षे गुजरातेत घालवल्याने तेथे त्यांचे  स्नेहसंबंध प्रस्थापित  झाले होते. बहुतेक आयुष्य गुजरातमध्येच गेले.रामचंद्र यांना महादेव(गोटूभाऊ), गजानन, खंडेराव ,सखाराम, रंगुताई, प्रभावती अशी अपत्ये होती.त्यांचे चिरंजीव महादेव उर्फ गोटू भाऊ यांनीही वडिलांचा व्यवसाय गुजरातेत पुढे चालविला. आपले कौशल्य, उदारपणा व प्रामाणिक कामामुळे ते तेथील बागायतदारांना प्रिय होते. त्या काळात, आंब्याच्या सीझनमध्ये, चाफा वाडीत भरपूर आंबे पेट्या येत असत. आळीतील सर्वांना भरपेट आंबे खायला मिळत.त्या आठवणी आजही  काढतात.

  रामचंद्रपंतांचेच चिरंजीव सखाराम ,म्हणजेच, सर्व विद्यार्थ्यांचे, बोर्डी हायस्कूलमधील लाडके शिक्षक एस. आर. सावेसर होत. (त्यांचे विषयी मी स्वतंत्रपणे  लिहिलेच आहे)

  सर्वात लहान  बंधू लक्ष्मण यांचे अकाली निधन झाले. त्यांची दोन मुले बंड्यादादा  व बबीताई .सर्व एकत्र कुटुंबातच लक्ष्मणरावांची ही दोन मुले वाढली. पुढे विवाहानंतर त्यांनी मुंबईस प्रस्थान केले.

   रामचंद्र सावे यांचे चिरंजीव कै.गजाननराव सावे उर्फ गजू भाऊ हे आपल्या पेशानिमित्त मुंबईतच स्थायिक झाले होते.कै.पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांचेशी मैत्री असल्याने आमच्या सो क्ष समाज संघातही त्यांचा अनेक वेळा, प्रसंगोपात वावर असे. अतिशय स्पष्टवक्ते गजू भाऊ बराच काळ परदेशांतही वास्तव्य असल्याने ,खूपच बहुश्रृत होते. त्यांची कन्या डाॅ.सौ. प्रतिभा प्रेमानंद राऊत या आमच्या समाजातील अमेरिकेत उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी जाऊन तेथे स्थायिक झालेल्या व वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या डॉक्टर.नावाप्रमाणेच त्या अतिशय प्रतिभावान व हुशार होत्या. थोड्या महिन्यापूर्वीच त्यांचे अमेरिकेत दुःखद निधन झाले. नाना व भावंडांची एकुलती बहीण  मालाडला होती. तिचे यजमान वकील होते.

   नानांचा विवाह  बोर्डी गावचे पाटील गोपाळराव , यांची कन्या रमा हिच्याशी झाला होता. नानांना कुसुम, तारा,मालती, प्रमिला आणि मधुकर अशी मुले होती. सर्वच मुले उच्चशिक्षित झाली.  ताराताई म्हणजेच,  पुढे महाराष्ट्र सरकारात मंत्रीपद भूषविलेल्या, सन्मानीय  कै.ताराबाई वर्तक होत. ताराबाईंनी महाराष्ट्रात व भारतातीय राजकारणात ,समाजकारणांत मोठे नाव केले. आमच्या सो क्ष समाज संघाच्या  अध्यक्षाही राहिल्या. कै.अण्णासाहेब वर्तक यांच्या त्या स्नुषा  होत.

    नानांचे प्राथमिक शिक्षण बोर्डी गावातच झाले . मोठे बंधू हरिभाऊना आपल्या पेशा नुसार, महाराष्ट्र व बाहेरही भ्रमंती करावी लागली. जेथे बदली होई , तेथे ते आपल्या लहान भावंडांना नेत असत. त्यामुळे नानांचे शालेय शिक्षण काही वर्षे रत्नागिरी व बडोद्यात झाले.कॉलेज शिक्षण, विल्सन कॉलेजमध्ये झाले. शिक्षण कालात त्यांनी एल आय सी कंपनीत नोकरी करून थोडे अर्थार्जन केले. इंग्रजी विषयात पदवी मिळविली. पदवीधर झाल्यावर त्यांना  कलेक्टरची सरकारी नोकरी  मिळू शकत  होती. मात्र, “आपण ज्या गावात,समाजात राहतो,,तेथील मुलांना शिक्षण, विशेषतः इंग्रजी भाषेचे शिक्षण मिळाले पाहिजे” या त्यांच्या अंतःप्रेरणेनुसार, सर्व मोह बाजूला सारून ते आपल्या जन्मगावी, बोर्डीला परत आले.

    श्री गोविंदराव चुरी यांनी बोर्डीच्या मंदिरात, इंग्रजी शिकवणी वर्ग सुरू केला होता. नानांनी देखील त्या कामाला जोड दिली. इंग्रजी अध्यापनाचा वर्ग आता जोमाने सुरू झाला. ( कै. गोविंदराव चुरी यांचे विषयी  मी स्वतंत्रपणे लिहिले आहे)

     “भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त करावयाचे असेल, उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पहावयाची असतील, तर भारतीय समाजाला सुशिक्षित केलेच पाहिजे, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविले पाहिजे”, अशा प्रामाणिक तळमळीपोटी गोविंदराव चुरी या बोर्डीतील तरूणाने,स्वतः विशेष शिक्षित नसतानाही, गावातील राममंदिरात इंग्रजी शिकवणीचे वर्ग फुकट सुरू केले होते. त्यात स्वतःचा  कोणताहीआर्थिक लाभ नव्हता. सर्व विनाशुल्क  होते. स्वतःची आर्थिक कौटुंबिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही, गोविंदरावांचे त्यावेळेचे हे काम खूपच प्रशंसनीय आहे. आत्माराम सावे  सरांनाही याच ध्येयाने पछाडले होते. मात्र ते उच्चशिक्षित होते. त्यांनी मनाशी खूप मोठे स्वप्न बाळगले होते.  भारतीय समाजमानसाचे खूप विशाल चित्र त्यांनी आपल्या मनःपटलावर चितारले होते. ते त्यांना प्रत्यक्षात आणावयाचे होते.  या दोन तरुणांनी अशा रितीने बोर्डीत ईंग्रजी  शिक्षणाचा  श्रीगणेशा केला आहे. अनेक आर्थिक लाभ व कौटुंबिक सौख्य दूर सारून, या दोन पुण्यशील व्यक्तींनी, त्यावेळी सुरु केलेल्या या समाजसेवेला, दूरदृष्टीला तोड नाही.

    त्यावेळी प्रिन्सिपल त्र्यंबकराव कुलकर्णी बोर्डीला वरचेवर विश्रांती व हवा पालटासाठी येत असत. त्यांच्याशी नानांचा संबंध आला. कुलकर्णी सरांनी या होतकरू तरुणाला बरोबर हेरले. नानांचे सासरे ,गोपाळराव पाटील (जे आमच्या सो.क्ष. समाजाच्या पहिल्या कार्यकारिणीचे 1920 साली उपाध्यक्ष होते,असा उल्लेख वर आला आहे), हे गावचे पाटील होते. त्यांचे अनेक  पारशी कुटुंबांशी, विशेषतः, माणिकशा मसानी यांसारख्या मातब्बर व्यक्तीशी कौटुंबिक संबंध होते. गोपाळरावांचे मनात या  लहान शिकवणी वर्गाला मोठे स्वरूप द्यावे अशी इच्छा होती. त्यांनी धनबाई या धनाढ्य पारशी महिलेला, मसानी साहेबांच्यामार्फत आपली इच्छा कळविली. माणेकशां, हे घोलवड मधील, श्रीमंत पारशी बागायतदार होते. धनबाई या श्रीमंत पारशी महिला, माणेकशा यांना आपले मोठे भाऊ व सल्लागार म्हणून मान देत असत. धनबाईंनी, माणेकशांचे सल्ल्यानुसार, नवीन शाळेसाठी देणगी देण्याचे त्वरित कबूल केले.आपली आई, सुनाबाई पेस्तनजी, यांच्या  नावे मोठी देणगी देऊन, सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूल संस्था 1920 आली उदयाला आली. नाना तिथे पहिले शिक्षक होते. त्यानंतर भिसे गुरुजी, चित्रे गुरुजी, यासारखे ध्येयवादी शिक्षक शाळेला मिळाले . गोपाळराव पाटील व माणेकशा  मसानी या दोन,बुजुर्ग व शिक्षणप्रेमी,सद्गृहस्थांनी धन बाईंना केलेल्या विनंतीस मूर्त रूप आले, व एका महान संस्थेचा जन्म झालेला आहे. या दोघांचे ऋण आम्ही कधीच विसरता कामा नये. शाळेची प्रगती उत्तरोत्तर होत गेली. हा इतिहास आता सर्वांनाच ज्ञात आहे.”

                नानांच्या कौटुंबिक जीवनाविषयी मालतीबाईंनी सांगितलेल्या आठवणी अत्यंत हृदयस्पर्शी  आहेत. “आपल्या मुलांनीच नव्हे तर कुटुंबातील सर्वांनी शिक्षण घ्यावे उच्चशिक्षित व्हावे ही नानांची इच्छा होती .विशेषतः मुलींनी सुशिक्षित असावे हा त्यांचा कटाक्ष होता. आद्य संस्थापक म्हणून कित्येक वर्षे त्यांना अर्धपगारी व कधीकधी बिनपगारीही नोकरी करावी लागली . शाळेला उत्पन्न नव्हते. अनेक लोकांनी शिक्षकांनी, अगदी सेवकांनी, ( Peons), त्यावेळी अर्धपगारी वा बिनपगारी सेवा शाळेला दिली आहे .आपल्या गावात मुलांच्या कल्याणासाठी शाळा होते आहे, तेव्हा आपलाही थोडाफार हातभार लावावा ही शाळेतील प्रत्येक कर्मचाऱ्याची इच्छा होती.  नानांनी शिक्षणाबरोबरच ,चांगले संस्कार ही मुलांना मिळावेत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. आपली आळी, चाफा वाडीतील मुलांना चांगले वळण लागण्यासाठी त्यांनी आपल्या ज्ञानाचा व शिक्षणाचा  उपयोग केला. आमच्या घरी एक घंटा ठेवली होती . सकाळी विशिष्ट वेळेला ती घंटा वाजली की सर्वांनी येऊन प्रार्थना म्हणावी असा नियम होता. गीताईचे श्लोक नाना शिकवीत. श्लोक पाठांतर करून स्पर्धा घेतली जाई. सर्व मुलांनी या प्रार्थनेला उपस्थित रहायलाच हवे असा नियम होता. जर एखादा मुलगा किंवा मुलगी आली नाही तर त्याला त्या दिवशी चहा मिळत नसे. या सामुदायिक प्रार्थनेमुळे सर्वांच्याच मनात शिक्षणाची आवड व एकमेकाबद्दल बंधुभाव निर्माण झाला. गीताई ची तोंडओळख तर झालीच पण काही श्लोक ही आत्मसात झाले.

   नानांचा बहुतेक वेळ शाळेत जात असे. तेथे पगाराचीही  निश्चिती नव्हती. माता, रमाबाईंवरच घर चालवण्याची जबाबदारी आली होती. सकाळी चाफावाडीतून तेरफडे वाडीत जाऊन, स्वतः श्रम करून, संध्याकाळी वाडीतील भाजीपाला ,केळी ,भाड्याच्या गाडीतून घेऊन येत असत.. उंबरगावच्या आठवडा बाजारात भाजीपाला विकून, काही कमाई करीत असत. अशा रीतीने शेतीतून मिळणाऱ्या थोड्या उत्पन्नावर कुटुंबाची उपजीविका चाले. गोपाळराव पाटलांच्या भारदस्त व सुखवस्तू कुटुंबातून आलेल्या रमाला, नानांनी अशी, ‘लंकेची पार्वती’, केले होते, तरी तिने , कधीही, त्रागा केला नाही. संपूर्ण सहकार्य नानांच्या  सामाजिक व शैक्षणिक कामाला दिले. “आपला नवरा काहीतरी जगावेगळे, परंतु समाजोपयोगी असे काम करीत आहे व त्याला सहकार्य देणे हे अर्धांगिनी म्हणून आपले कर्तव्य आहे” या पवित्र भावनेने तिने नानांना कौटुंबिक जीवनात साथ दिली. हा तिचा खूप मोठेपणा आहे, नानांच्या यशस्वी आयुष्यात तिही हिस्सा मोठा आहे.

    मालती बाई म्हणाल्या,” आम्ही सर्व बहिणींनी,नानांच्या इच्छेप्रमाणे,उच्च शिक्षण घेतले. आमचा भाऊ मधुकर, M.A. पर्यंत शिकला.बँकेत मोठ्या अधिकाराची नोकरी त्याला मिळाली.  कॉलेजमधील मैत्रीण शांता ओझरकर या मुलीशी लग्न करण्याचे त्याने ठरविले. शांता एक सुंदर सुविद्य व सुस्वभावी मुलगी होती. मात्र हा आंतरजातीय विवाह होता. नानांनी या विवाहाला मोठे मन करून संमती दिली. आमच्या समाजातील हा पहिला आंतरजातीय विवाह होता. आमच्या समाजातील व समाजाबाहेरील ही, अनेक प्रतिष्ठित लोकांनी  या लग्नाला तीव्र विरोध केला.सावे कुटुंबाला वाळीत टाकण्यापर्यंत त्यांची मजल गेली . ज्या मित्रांबरोबर, एकसाथ,एकनिष्ठेने कामे केली, सुखदुःखाच्या गोष्टी केल्या भविष्यातील जीवनाची स्वप्ने पाहिली ,त्यांनीसुद्धा नानांशी वैर धरले. मोठा  समाज विरोधात गेला. नानांना खूप दुःख झाले.. लग्नानंतर केवळ वर्षभरातच ,वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी ,आमच्या लाडक्या व एकुलत्या भावाचे निधन झाले.

   छोटी मुलगी व पत्नी अनाथ झाल्या. वडिलांचा एकुलता एक लाडका पुत्र  गेला. चार बहिणींचा प्रेमळ भाऊ गेला.अनेकांचा आवडता मित्र,सहकारी गेला.या कौटुंबिक संकटांचा  नानांच्या प्रकृतीवर व मनावर खूप परिणाम झाला. नाना खचले. नियतीचा हा आघात नानांच्या जिव्हारी लागला होता. रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा व उच्चशिक्षित मधु आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबाचेही नाव उज्वल करणार हीच सर्वांची अपेक्षा होती पण हाय रे दैवा, नियतीने डाव  साधला. मधु असा अचानक अकाली निघून गेला. आणि त्यानंतर वर्षाचे आतच 19 जुलै 1954 ला नानांचेही  निधन झाले..हा.. हंत हंत नलिनी….”.. सावे कुटुंबीयांच्या जीवनात ही कविकल्पना दुर्दैवाने प्रत्यक्षात खरी झाली.हाती तोंडी आलेला घास गेला आणि पितृछत्र ही अचानक हरवले. रमाबाईंचा डाव अर्ध्यावरच मोडला तर शांता ताईंची वैवाहिक जीवनाची नुकतीच सुरु झालेली कहाणी अधुरी राहीली .

     33 वर्षे शाळेत ज्ञानदान करून, शाळेचा कारभार मार्गी लाऊन, मुलींना उच्चशिक्षित करून, सुसंस्कार व समाजसेवेचा वारसा मागे ठेवून ते देवाघरी गेले.शनिवारी दुपारी शाळेतून आल्यावर, भोजनानंतर, झोपाळ्यावर बसून परीक्षेचे पेपर तपासत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला .तेथेच कोसळले .अखेरच्या क्षणापर्यंत नानांनी शाळेची सेवा केली.

   वयोमानानुसार बाईंची स्मृति आता सहाजिकच थोडी दगा देते. तरीही त्यांनी आपल्या वडिलांच्या आयुष्यातील, कौटुंबिक ,सामाजिक, आठवणींचा धांडोळा मोजक्या शब्दात घेतला.सांगताना कित्येकदा त्यांचा कंठ दाटून येत होता. जुन्या आठवणी अस्वस्थ करत असाव्यात.

    ज्या गावासाठी ,समाजासाठी नानांनी काही सुंदर स्वप्ने पाहिली होती .त्यासाठी आपल्या वैयक्तिक आयुष्यात मोठा त्याग केला होता. आयुष्याच्या एका मोक्याच्या क्षणी, नियतीच्या एका कठोर कटाक्षाने, आलेल्या भीषण परिस्थितीत त्यांना धीर,आधार देण्या ऐवजी काही मतलबी लोकांनी त्यांना काय दिले? दुःख आणि व्यथा..समाजाबाहेर करण्याचा कुटील डाव. त्याही परिस्थितीत त्यांच्या थोड्या जिवलगां नी सांभाळून घेतले.पण शेवटी मनावर आघात व्हायचे ते झालेच .आपल्या लाडक्या, कर्तृत्ववान मुलाचा अकाली वियोग. आणि समाजात उमटलेली त्याची तीव्र प्रतिक्रिया, नानांना असहाय,अस्वस्थ करून गेली. ते घाव कधीच भरून निघाले नाहीत. दृढ निश्चयी आणि व्रतस्थ नाना मनाने कोसळले. एकुलत्या पुत्राच्या वियोगात,, जवळच्यांनी  केलेले छुपेवार, त्यांना जिव्हारी लागले. जीवन असेच असते का ? समाजासाठी काहीतरी भले करण्याच्या प्रामाणिक इच्छेने,आपल्या कौटुंबिक सौख्या कडे दुर्लक्ष करून, दुसऱ्यांच्या आनंदात आपल्या जीवनाचे साफल्य शोधणाऱ्या माणसांना या जगात असेच वैफल्य, शेवटी का प्राप्त व्हावे? अनेक अनुत्तरीत प्रश्ना पैकी एक!!

     “छत्रपती शिवाजी राजांना जशी मावळ्यांची साथ मिळाली, तशी मला माझ्या मित्रांनी साथ दिली. म्हणूनच शाळेचा हा व्याप मी सांभाळू शकलो, पुढे नेऊ शकलो.” असे नाना नेहमी म्हणत. बोर्डी शाळेचे काम, सोमवंशी क्षत्रिय समाज उन्नती संघाच्या स्थापनेपासून त्या संघटनेला स्थैर्य देण्यासाठी विश्वस्त म्हणून  दिलेले योगदान, बोर्डी ग्रामपंचायतीमधील मार्गदर्शन अशी अनेक व्यवधाने सांभाळीत, नानांना कौटुंबिक जबाबदारी सांभाळावी लागली. आपल्या सर्व मुलींनी, मुलाने उच्च शिक्षण घेऊन जीवनक्रमणा केली पाहिजे हे आपले ध्येय त्यांनी त्याही परिस्थितीत पूर्णत्वास नेऊन दाखविले. आपला आनंदी स्वभाव कधीच सोडला नाही, क्वचितच  ते चिडलेले रागावलेले दिसत. चेहरा नेहमी आनंदाने फुललेला  व बोलताना नेहमी हास्य लकेरींची उधळण करणारे नाना एक अजब रसायन होते हेच खरे! 

    आपल्या गावांतील मित्रांना व शाळेतील सहकाऱ्यांना अधून मधून निवांतपणे भेटल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. सर्वांनी वारंवार भेटत राहावे, आपल्या घरी यावे, एकमेकांची दुःखे एकमेकांना सांगावीत व ती विसरून जाण्यासाठी असा प्रेमाचा संपर्क सुंदर उपाय आहे अशी त्यांची धारणा होती. आचार्य भिसे व चित्रे तर त्यांना सख्ख्या भावा समान, प्रिय आणि सन्माननीय होते. इतरही  शिक्षकांबद्दल त्यांना तेवढाच जिव्हाळा, आस्था व प्रेम असे. दरवर्षी ते नाना मळेकर यांच्या मदतीने  आपल्या घरी, शिक्षक  व गावांतील मित्रांसाठी, एक उकडहंडीची पार्टी करीत. त्या वेळी अनेक गप्पा-गोष्टी रंगत  व मोठा हास्याचा जलसा होत असे. स्वतःवरच विनोद करून दुसऱ्यांना हसवावे ही त्यांची खासियत होती.नानांनी आपल्या आयुष्यात कित्येक संकटांना धैर्याने तोंड दिले. त्यांच्या चेहऱ्यावरचे दैवी हास्य कधीच लोपले नाही. दिवसाचे बारा-बारा तास शाळेत व्यतीत करूनही, त्यांना कधीच थकलेले कोणी पाहिले नाही. मुलांच्या व इतर कौटुंबिक समस्यांचे निराकरण सौ. रमाबाईंनी, थोडक्या आर्थिक उत्पन्नात कसे केले असेल ते त्या माऊलीलाच ठाऊक? तिने ती आघाडी सांभाळली म्हणूनच नाना आपले इप्सित पूर्ण करू शकले हेही  निर्विवाद सत्य आहे.

   1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेल्या बोर्डीतील, अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांना ब्रिटिश सरकारने तुरुंगात टाकले. स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहन देणारी शाळा म्हणून या शाळेची ‘बदनामी’ त्यावेळी ब्रिटिश सरकारने केली. शाळा बंद होते की काय असाही संभ्रम निर्माण झाला. त्यावेळी तुरुंगात असलेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना जमेल तेवढी आर्थिक मदत चित्रे गुरुजी, नाना व त्यांचे इतर  सहकारी करीत.  शिक्षक, विद्यार्थी व शाळा,म्हणजे एक मोठे कुटुंबच आहे असेच ते मानीत.जी चांगली वस्तू आपल्याला मिळाली ती इतरांनाही कशी मिळेल याचा विचार त्याकाळी या कुटुंबाचा प्रत्येक घटक करीत असे.अगदी शाळेचा लहान कर्मचारी, बागेतील माळीदेखील या कुटुंबाचा घटक होता. या गडीमाणसांनाही कधी मदतीची गरज लागली व ते नानांचे घरी आले तर रिक्त हस्ताने  जात नसत, हीच त्यांच्या मोठेपणाची साक्ष आहे.  

     मी सुरूवातीलाच म्हटल्याप्रमाणे, नानांना वडिलांच्या अकाली निधनामुळे,डाॅ. हरिभाऊ या आपल्या ज्येष्ठ बंधूंचे मार्गदर्शन व सर्वतोपरी सहाय्य मिळाले. नानांच्या यशस्वी आयुष्यात ज्येष्ठ बंधूचा वाटा मोलाचा.  नानांच्या जीवनाचा आलेख मांडताना हरिभाऊंच्याबद्दल  दोन  शब्द सांगणे  भाग आहे. 

        कै. हरिभाऊ विठ्ठल सावे.,प्रिं.आत्माराम यांचे ज्येष्ठ बंधू व मार्गदर्शक, यांचे दुर्मिळ छायाचित्र. सौजन्य श्री मनीष अरुण सावे.

    सुदैवाने हरीभाऊंचे  नातू ,श्री वासुदेव गोपाळ सावे यांच्या कडून मला त्यांच्या या कर्तृत्ववान आजोबांविषयी अत्यंत मौलिक माहिती मिळाली. ती त्यांच्याच शब्दांत येथे देत आहे. 

     “माझ्या आजोबांचे शिक्षण त्याकाळी जी बी व्ही सी(GRADUATE OF BARODA VETERINARY COUNCIL), व्हेटर्नरी सर्जन, म्हणून झाले होते. बडोद्याला सयाजीराव गायकवाड यांचेकडे ते सर्जन म्हणून नोकरी करत असत.हत्ती, घोडे आणि कुत्रे हे सयाजीरावांचे आवडते प्राणी. त्यांच्या सांगण्यावरून आजोबांनी या  प्राण्यांवर पुस्तके लिहिली आहेत. त्यांची प्रस्तावना दस्तूरखुद्द सयाजीरावांनी आपल्या हस्ताक्षरात लिहून दिली होती. आपले धाकटे बंधू आत्माराम पंत सावे यांना त्यांनी शिक्षणासाठी रत्नागिरी, बडोदे येथे नेले होते. बी.ए. (Batchelor of Art), साठी त्यांना विल्सन कॉलेज मुंबई येथे राहण्यासाठी मदत केली. आपल्या गावचे दुसरे सद्गृहस्थ, श्री. दत्तात्रय मुळे यांना पण आजोबांनी बडोद्याला नेऊन बी.एससी. पर्यंत शिक्षण घेण्यास मदत केली. पुढे सयाजीरावांचे वारसदार प्रताप सिंह गायकवाड यांच्याशी त्यांचे मतभेद झाले.आणि  आपल्या तत्वांशी तडजोड न करता, आपल्या पदाचा त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. कायम वास्तव्यासाठी बोर्डी येथे राहण्यास आले. आमच्या वडिलांना(गोपाळराव सावे), त्यांनी, डिप्लोमा इन मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (DMEE),पर्यंत शिक्षण दिले. आजोबा सो. क्ष. स. संघाचे उपाध्यक्षही होते. व्यायामाची अत्यंत आवड होती. चहा किंवा सुपारीचेही त्यांना व्यसन नव्हते. ते हयात असेपर्यंत आमच्या घरात शाकाहारी भोजन असायचे. धार्मिक ग्रंथांचे सतत वाचन करीत. त्यातूनच त्यांना किर्तन करायची आवड निर्माण झाली. आपल्या गावातील श्रीराम मंदिरात, रामनवमी व जन्माष्टमी ला त्यांचे किर्तन नेहमी होत असे. तसेच दत्तजयंतीला त्यांचे कीर्तन, आपल्या गावांतील कै. गजानन मोरे यांचे कडे असायचे.  अगदी शेवटपर्यंत त्यांनी हा वसा सुरूच ठेवला होता. कीर्तनात ते अगदी तल्लीन होऊन जात असत. आपल्या गावातील राम मंदिराचे काही काळ ते विश्वस्त होते. बोर्डी गावातील इतरही अनेक संस्थांत त्यांचा मोलाचा सहभाग होता.”

    मी स्वतः सुदैवी आहे. डॉ. हरीभाऊंची अनेक कीर्तने, राममंदिरात मी ऐकली आहेत.  एका लेखात त्याचा ऊल्लेख  आहे. विशेष म्हणजे ते बोर्डीस स्थाईक झाल्यावर, आयुर्वेदाचा अभ्यास करून ,उत्तम  आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून  चांगला लौकिक मिळविला होता. गरजू लोकांना आयुर्वेदिक औषधे विनामूल्य देत असतं. माझे वडील आप्पा यांना काही त्रास झाल्यास त्यांना डॉ.हरिभाऊंकडूनच औषध हवे असे.  ते आणण्यासाठी मीच, त्यांचे  बंगल्यावर भाटआळी, येथे जात असे.  त्यामुळे अगदी लहानपणापासून मी त्यांना व्यवस्थित ओळखत असे. अतिशय रूबाबदार व्यक्तिमत्वाचे, उंच व हसतमुख, चेहऱ्यावर विद्वत्तेची, स्वाभिमानाची झाक असणारे, सार्वजनिक प्रसंगी लांब सफेद झब्बा ,उपरणे डोक्यावर पगडी अशा सात्विक वेषात वावरणारे हरिभाऊ,आमच्या बोर्डी  गावाची शान होती. आजही. कै.नानांबद्दल  लिहताना हरीभाऊंचेही स्मरण आवश्यक वाटले, म्हणून हे दोन शब्द लिहिले आहेत.

    आपल्या सर्व मुलांवरच नव्हे तर चाफा वाडीतील ,सर्व कुटुंबावर व शाळेतील आपल्या विद्यार्थ्यावर, नानांनी, शिक्षण व सेवा हेच संस्कार केले. “दुसऱ्या साठी, यथाशक्ति काहीतरी सतत करीत राहा“, हाच त्यांच्या जीवनाचा संदेश होता. नानांच्या पुढील पिढ्यांनी हा वारसा आजही जपलेला आहे.

    या एका सावे कुटुंबाने बोर्डी शाळेला किती नामवंत शिक्षक दिले, याची थोडी माहिती  घेतली तर या विधानाची यथार्थता पटेल. कै. आत्माराम पंत सावे, पुतण्या श्री. एस. आर. सावे, मुलगी  श्रीमती  मालतीबाई चुरी ,नातू  कै. प्रताप महादेव सावे ,कै.अरुण गोपाळ सावे ,व अरुणची स्नुषा सौ. प्रज्ञा मनीष सावे…  एकाच कुटुंबाने, एका शाळेसाठी, पिढ्या न् पिढ्या, एवढे शिक्षणकर्मी देत राहावे, असे उदाहरण क्वचितच सापडेल. हरीभाऊ व नानां नी दिलेल्या संस्कार व शिकवणीचा हा वारसाआहे.

      नानांची नात, कै.मधुकर सावे यांची कन्या, कै. डॉ. उल्का.

    नानांनी त्यांच्या पुढील पिढीला,” दुसऱ्यासाठी जमेल तेवढे, जमेल तसे, काहीतरी करीत राहा!”..या शिकवणीचा मला आलेला प्रत्यय … 

    1976,च्या सुमारास माझे वडील आजारी झाले आणि त्यांना विलेपार्ले मुंबई येथील नानावटी इस्पितळात दाखल करावे लागले .त्यांच्या बरोबर मी दिवसभर राहत असे व रात्री माझा भाऊ साथ देत असे .असेच एक दिवस दुपारी आप्पा झोपले असताना मी पुस्तक वाचत होतो. आणि एक डॉक्टरीणबाई मला  शोधत आमच्या रूममध्ये आल्या. मिस्टर राऊत कुठे आहेत ? अशी त्यांनी चौकशी केली. मीच मि.राऊत म्हणून त्यांना ओळख दिली.” कोण आजारी आहे ,काय झाले आहे अशी सविस्तर चौकशी झाल्यानंतर त्यांनी आपले नाव डॉक्टर ऊल्का मेहता असल्याचे सांगितले व त्या नानावटी इस्पितळातच  कामाला होत्या असे कळले. कधीही कोणती मदत हवी  असल्यास मला जरुर निरोप द्या असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले .बोर्डी, डहाणू परिसरातील कोणीही व्यक्ती नानावटी इस्पितळात उपचारासाठी आल्यास, त्यांना सर्वतोपरी उपचारासाठी त्या मदत   करतात असेही स्टाफ कडून कळले. “माझे लग्नापूर्वी नाव ऊल्का मधुकर सावे व आम्ही बोर्डीला चाफावाडीत  राहतो”, असे सांगितले…त्वरित माझ्या डोक्यात सर्व प्रकाश पडला… या डाॅ.उल्का मेहता, म्हणजेच  पूर्वाश्रमीच्या कुमारी उल्का मधुकर सावे. 1955 साली बोर्डी शाळेत माझ्याच वर्गात बसणाऱ्या! उल्काची आत्या, म्हणजेच आमच्या पहिल्या  वर्गशिक्षका, मालतीबाई  चुरी..   वडिल मधुकर सावे, यांचा अकाली मृत्यू झाल्यानंतर आपल्या आईबरोबर ऊल्का  मुंबईला आली आणि तेव्हापासून  आमचा  संपर्क तुटला, तो, त्या दिवशी अशा रीतीने, वीस वर्षानंतर मुंबईत पुन्हा प्रस्थापित झाला होता.. , नानांनी दिलेला तो ,”दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याचा”. वारसा त्यांच्या नातीने ही, पुढे चालविला होता. मनापासून केलेले संस्कार किती चिरस्थायी असतात याचे हे प्रत्यक्ष प्रत्यंतर! डॉ. उल्काचे ही  काही वर्षापूर्वी अकालीच निधन झाल्याचे कळले.

     मनमोकळा आणि निःस्वार्थी स्वभाव , सदैव मदत करण्याची वृत्ती, यामुळे नानांची लोकप्रियता त्यावेळीही होती. आजही तेवढीच आहे.नानांना  जाऊन आज  सुमारे 70 वर्षे होत आली आहेत. बोर्डीकरांच्या व समाज बाधवांच्या मनांत ह्या पुण्यात्म्याबद्दलचा जिव्हाळा ,आदर अजूनही तेवढाच आहे. यापुढेही तो राहील .नानांनी आपल्या सेवेचा व त्यागाचा   मोठा आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे. या शाळेचे आजी माजी विद्यार्थी आपल्या शक्ती – बुद्धी प्रमाणे, आत्माराम पंत सावे ,भिसे, चित्रे व गुरुजनांनी निर्माण केलेल्या या शाळेला, उज्वल भवितव्य मिळवून देण्यासाठी, हा उदात्त वारसा पुढे चालवतील,अशी आशा बाळगू या.

   गोखले शिक्षण संस्थेने आत्माराम पंत सावे यांच्या स्मरणार्थ एक प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल निर्माण केले असून ती त्यांची चिरंतन स्मृती होय. आयुष्याच्या प्राथमिक अवस्थेत, शिक्षणाचा श्रीगणेशा सुरू करणाऱ्या,  प्रत्येक विद्यार्थ्याला ही वास्तू सावेगुरुजींचा ऊज्वल वारसा पुढे नेण्याची स्फूर्ती सदैव  देत राहील !

    सावे सरांचे चाफावाडीतील घर लहानपणी पाहिले होते. या लेखाच्या  निमित्ताने  त्या वास्तूला भेट देऊन तिला  वंदन करून यावे अशी इच्छा झाली.  परवा चाफावाडीत जाऊन त्या  खूप वर्षानंतर दर्शन घेतले त्या वास्तूचा फोटो या लेखात दिला आहे. आज घर बाह्यदर्शनी  तरी व्यवस्थित वाटते. दरवाजाला कुलूप होते . दाराच्या लाकडी चौकटीवर तीन फोटो  नाना, कै. सौ. रमाबाई व कै. डॉ. ऊल्का. आत  थोडी पडझड झालेली असल्याने आत प्रवेश केला नाही. ओटीवरील सिमेंटच्या बैठकीवरच शांतपणे बसलो. आपोआपच तंद्री लागली…

   त्या तंद्रीत, काही अस्फुट, अस्पष्ट बोलणे माझ्या कानावर पडू लागले. वास्तुपुरुष’ बोलत होता का?… कुणाचीतरी अस्पष्ट कुजबुज मला, त्या अवस्थेतून बाहेर येऊ देईना. 

   “एके काळी येथेच आचार्य भिसे, चित्रे, प्रि.कुलकर्णी अशा महान गुरुवर्यांनी, आपल्या पावन पदस्पर्शाने ही भूमी पवित्र केली आहे…. त्यांचे  विद्वत्ताप्रचुर संवाद येथेच झाले. कै. अण्णासाहेब वर्तक, तात्यासाहेब चुरी, मदनराव राऊत, डॉ. दीनानाथ चुरी अशा अनेक मातब्बर समाजसेवकांनी आपली भविष्यातील समाज उन्नतीची स्वप्ने येथे पाहिली… गावातील आपले मित्र, आप्त आणि शाळेतील सहकारी शिक्षक यांचे सोबत नानांनी येथेच सुखदुःखाची मनसोक्त बोलणी केली.. मने हलकी झाली येथेच….हास्याचे धबधबे येथेच बरसले.. आणि …आणि .आम्हा सर्वांचा लाडका मधु, अचानक देवाघरी गेल्यावर झालेल्या विलापाच्या आक्रंदानातून, मनावर जीवघेणे ओरखडे येथेच उमटले …एके दुपारी, मुलांचे पेपर तपासता तपासता, झोपाळ्यावर बसलेले  नाना कोसळले ते येथेच.. मी खूप भाग्यवान आणि मी खूप दुर्दैवी… नाना व त्यांच्या नंतरच्या पिढीची उमलती स्वप्ने मी येथे पाहीली..  काही स्वप्ने साकारतांना पाहिली काही उमलता उमलताच कोमेजून गेलेली पाहिली..  खूप मोठी माणसे पाहिली. त्यांचा असीम त्याग, धवल चारित्र्य ..  या सगळ्याचा  मी साक्षीदार आहे.. आज अगदी  एकाकी..गत कालाच्या ,सुखद,दुखःद आठवणीत, दिवस काढतो आहे…तेही दिवसाः गता. गेले  ते दिन गेले ..आणि गेली ती लोकोत्तर माणसे!! “..  कुजबुज थांबली..

    ती वास्तू, व त्या पवित्र भूमीला वंदन करून मी तेथून निघालो…

    चाफावाडीतील घरी असलेला फोटो.

     आज माणुसकीची मूलभूत व्याख्या  विसरत चाललेल्या माणसांच्या जगात ,सामाजिक आणि राष्ट्रीय विचारांचा समन्वय साधणाऱ्या, कौटुंबिक, वैयक्तिक स्वार्थाचा विचार बाजूस सारून  “आपल्याला समाजास काहीतरी द्यावयाचे आहे,”. या पवित्र भावनेने आयुष्यभर धडपड करून बोर्डी  गाव व आजूबाजूचा परिसर, शिक्षणाच्या दिव्य प्रकाशाने प्रज्वलित करण्यासाठी आपल्या जीवनाचे साफल्य करून गेलेला, एक पुण्यात्मा म्हणजे आत्माराम विठ्ठल सावे, सर्वांचे नाना!!

   अज्ञान अंधकारात चाचपडणाऱ्या, अंधश्रद्धा व अनिष्ठ प्रथा,यांनी वेढलेल्या समाजाला वळण लावून, योग्य मार्गावर नेण्याचा प्रयत्न करणे, हे लहान-सहान काम नव्हे.तो प्रयत्नवादाचा वस्तुपाठ आहे. आपली उमेद न हरवता, अखंड कार्यरत राहणे, निंदा वा स्तुती  कडे  लक्ष न देता आपल्या वाटेने पुढे जात राहणे, मानव समाजाच्या अंतिम हिताचीच जाणीव ठेवून ,त्याचा सतत पाठपुरावा करीत राहणे, हाच आमच्या भागवत धर्माचा संदेश आहे. नानांनी आपल्या परीने त्याच संदेशाचे पालन करीत, आपले जीवन व्यतीत केले. जगण्याचे सोने केले.

    व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात नानांना पावलोपावली संघर्ष करावा लागला. त्यांच्या कुटुंबियांना तात्कालीन, तथाकथित मित्रांनी, संबंधितांनी, धर्मरक्षकांनी बहिष्कृत ठरविले. उपेक्षा ,विरोध आणि निंदा यांचे चटके त्यांना सहन करावे लागले. पण आश्चर्य म्हणजे त्यांच्या नियोजित, अंगीकारलेल्या कामांत या वेदनामय अनुभवांनी फरक पडला नाही. एका निश्चित ध्येयानुसार, सात्विक  भूमिकेतून आपले ईप्सित  त्यांनी साध्य केले. त्या भूमिकेत, व्यक्तिगत राग लोभ गळून गेले. नानांची ही विशेषता त्यांच्या कार्याला व जीवनाला एक आगळा गंध देऊन जाते. चंदनाच्या झाडाने कुऱ्हाडीला ही सुवासित करावे तसे ते अंतर्बाह्य शुचिष्मंत  व्यक्तिमत्व होते. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका वचनाची येथे अपरिहार्यपणे आठवण होते

   “The  Sandal tree, as if to prove that, man can conquer hate with love, perfumes the Axe that lays it low!”

         सामाज‌िक आण‌ि राष्ट्रीय व‌िचारांचा समन्वय साधणाऱ्या या व्यक्त‌िमत्त्वाचा गौरव कुसुमाग्रजांचे शब्दात, ‘प्रकाशाचा प्रवासी’ असा करावा लागेल.या प्रकाशाच्या प्रवाशाने, जीवनभर अखंड पुण्यसंचय केलेल्या पुरुषोत्तमाने आता चिरविश्रांती घेतली आहे. पुण्यात्मा कै.आत्मारामपंत  सावे यांचे पावन स्मृतीस नम्र भावे अभिवादन.

    कै.गुरूवर्य आत्माराम विठ्ठल सावे, यांच्यावरील या टिपणी मुळे बोर्डी हायस्कूलच्या संस्थापनेतील, पायाचे दगड ठरलेल्या पंचरत्नांच्या गौरव मालिकेतील हा पाचवा लेख पूर्ण करून मी माझे कर्तव्यच केले. पुण्यश्लोक धनबाई, द्रष्टा अवलिया गोविंदराव चुरी, देवस्वरूप आचार्य भिसे, कारूण्यसिंधु आचार्य चित्रे ,गुरुवर्य पुण्यात्मा आत्माराम सावे ही ती पंचरत्ने! बोर्डी शाळेत शिकून गेलेल्या, आज शिकणाऱ्या व पुढेही प्रवेश घेणाऱ्या, प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांची आठवण कृतज्ञता पूर्वक ठेवावीच लागेल. म्हणून हा माझा अल्प प्रयत्न. सर्वांनी गोड मानून घ्यावा हीच नम्र विनंती.

   प्रिं.आत्माराम पंत सावे, प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल, बोर्डी.

   हा लेख लिहिण्यासाठी  श्रीमती मालतीबाई चुरी, सौ उज्वला विवेकानंद चुरी, श्री वासुदेव गोपाळ सावे, श्री मनीष अरुण सावे यांनी बहुमोल मदत केली. त्यांचे मनापासून आभार मानतो.