मुका मामा

        कै.अनंत देवजी चुरी, मुकामामा
                   1925-2021

       ‘पापाची वासना नको दाऊ डोळा,

        त्याहुनी आंधळा बराच मी.

       निंदेचे श्रवण नको माझे कानी,

     बधीर करोनी ठेवी देवा. 

       अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, 

      त्याहुनी मुका बराच मी.’

आज आमच्या मुकामामाच्या दुःखद निधनाची बातमी आली आणि हा तुकोबाचा अभंग आणि मुकामामा बरोबर घालविलेल्या त्या बालपणीच्या व  तरूणपणीच्या,आठवणी जागृत झाल्या.. कुठेतरी कागदावर उतराव्या वाटल्या तो हा प्रयत्न.

या अभंगावरून आपल्याला त्या’तीन माकडांची’, गोष्ट सुचली असे गांधीजींनी म्हटले आहे. ती तीन माकडे म्हणतात,

   ” बुरा मत देखो बुरा मत सूनो बुरा मत बोलो”

   आमचे संत, महात्मे , हा संदेश माणसाला कशासाठी देतात? जीवनामध्ये पावित्र्य, शौच आणि परमेश्वर प्राप्ती होण्यासाठी या तीन तत्त्वांचे पालन करा. तुमचे आयुष्य सार्थकी लागेल.

    मुकामामाला, या तीन मूलभूत मानवी गरजांपैकी, बोलण्याची आणि ऐकण्याची क्षमता नियतीने आजन्म नाकारली. पण त्याच बरोबर जीवन पवित्र व निरागसतेने जगण्याची दुर्मीळ संधी दिली. 

        सबंध आयुष्यात संवाद झाला तो केवळ आवाजाचा चढउतार आणि हातवारे .त्यामुळे कोणाविषयी निंदा-नालस्ती, शिवीगाळ करण्याचा प्रश्नच आला नाही. वाणी कधीच विटाळली  गेली नाही.  तीच गोष्ट ऐकण्याची. कानाजवळ ढोल बडवले तरी त्याचा तसूभरही आवाज येत नव्हता.  नालस्तीचे,खोट्याआरोपांचे,लावालाव्यांचे,अश्लाघ्य  कारनामे त्याच्याकडून कधीच घडले नाहीत, ऐकले नाहीत.  केवढे पवित्र,शुद्ध, निरागस जीवन तो  जगाला!  मुका मामाचे जीवन पवित्र व शुचिर्भूत होते,म्हणून ते ,सार्थकी लागले, असेच म्हणावे लागेल.

      सर्वसामान्य माणसाला असे जगणे कधीच शक्य नाही. खरंच ह्या तीन,मूलभूत सुविधा निसर्गाने माणसाला दिल्या. पण त्यांचा आपल्या सोयीप्रमाणे वापर करून, जे हलाहल माणसाने पृथ्वीवर निर्माण केले आहे, ,तेच आजच्या सर्व निरंकुश समस्यांचे मूळ आहे!

    दिव्यांग जीवन तो जगला. नुसता जगला नाही,आनंदाने जगला. ज्यांचे संपर्कात आला, त्यांनाही आनंद दिला, दीर्घायुषी झाला आणि काल अगदी शांतपणे निघूनही गेला. जन्मात मुका, मृत्यु ही मुका!

      आध्यात्मिकदृष्ट्या, त्याचे आयुष्याला, साधनशुचितेमुळे  निश्चितच एका पावित्र्याचा स्पर्श झाला. मात्र, व्यवहारी जगात तो दुर्दैवी ,शापित ठरला. एकंदर 6 भावंडांपैकी तिसऱ्या नंबरावर जन्माला आलेला अनंता ,लहानपणी बोलू शकत नव्हता. परंतु ते लक्षात येईपर्यंत 3,4वर्षे गेली. आवाज निघतो आहे पण शब्द येत नाहीत,  तेव्हा थोडा उशिरा बोलेल असेच सर्वांना वाटले.त्यावेळी एवढे वैद्यकीय उपचार उपलब्ध नसल्याने काही परीक्षाही होऊ शकली नाही .मुकेपण समजण्यात वेळ गेला. ज्या वेळी ते समजले, त्या वेळी दुर्दैवाने वडीलही अकाली गेले.या सर्व सहा अपत्यांचा सांभाळ करण्यातच त्याची आई म्हणजे आमची आजी आक्का,हीचे आयुष्य गेले. मोठी सोमू दहा वर्षाची आणि सर्वात लहान खंडू केवळ काही महिन्याचा. या चिमुकल्या जीवांच्या तोंडात एक वेळ तरी, काही घास पडावा यासाठी त्या माउलीने, त्या दिवसात काय धडपड केली असेल ,त्याची आज फक्त कल्पनाच करता येईल. या मुक्यासाठी काहीतरी उपचार करण्यास वेळ कोणाला होता आणि त्यासाठी पैसेही कुठे होते?  त्यावेळीही मुंबई किंवा बलसाड सारख्या जवळच्या शहरात काही वैद्यकीय उपचार असतीलही पण धांडोळा घेतला गेला नाही. .परिस्थितीच तशी होती .

   निदान ,मुक्या बहीऱ्यांच्या शाळेत पाठविले असते, तरी जीवनात आपल्या पायावर तो सक्षम उभा राहू शकला असता. स्वतंत्र संसारही करू शकला असता. त्यावेळी समाजात अशा मूक बधीरांनी यशस्वी संसार केल्याची उदाहरणे आहेत. पण शेवटी नियती जे ठरवते तेच होते… वही होगा, मंजुरे खुदा होगा..  तो जसा जन्माला आला तसाच राहिला आणि काल तसाच गेला.. अगदी शांत अबोलपणे.. तो तर बोलला नाही, पण त्याच्या वेदनाही कधी बोलल्या नाहीत..

   आम्हा सर्व मावस भावंडांचे बालपण हे मुक्या  मामाच्या जीवनाशी एवढे संलग्न आहे की त्याची आठवण आल्याशिवाय आमच्या बालपणाचे संदर्भ समजणार नाहीत. आम्ही भावंडे व कमळी मावशीची मुले, बोर्डीतच लहानाची मोठी झालो.मावशीचे घर काही पावलावर आणि आम्ही तर मामे कंपनीचे,सख्खे शेजारी…अगदी मामाच्या गावांत, मामाच्या घरातच वाढलो असे म्हणणे अयोग्य होणार नाही. 

   लहानपणी अपंगत्वामुळे त्याला निश्चितच इतर भावंडापेक्षा थोडी विशेष वागणूक आक्का व दोन मोठ्या भगिनी कडून  मिळाली. त्यामुळे त्याचा स्वभाव थोडा चिडखोर व स्वतःच्या हट्टापाई थोडाही सामोपचार करून न घेणारा, असा झाला.  माझी आई, त्याची मोठी बहीण म्हणते , “लहानपणीच तो संतापी होता. प्रसंगी आक्रस्ताळेपणा ही करीत असे. वस्तूंची बेधुंद फेकाफेक करी .त्याचा  त्रास आक्काला होई.ती खूप सोशीक होती.”    

      आम्ही मामाच्या घरातच असल्यामुळे, आमची अवस्था,” अतिपरिचयात अवज्ञा “..अशीच झाली होती. त्यात आमची परिस्थिती गरिबीची व प्रतिकूल . त्यामुळे तो आमच्यावर नेहमी डाफरत असे..मात्र त्यात आमचा अपमान व्हावा अशी भावना नसे,तर आम्ही सुधारावे, चांगला अभ्यास करून काही तरी करून दाखवावे, अशीच असे.गावातील इतर सण उत्सवात  देखील तो आमच्यावर पाळत ठेवून असे. अगदी रामनवमीचे दिवशी, देवळांतील मिळणारा प्रसाद आम्ही दुसऱ्यांदा घेतो का, याची दखल घेई व आम्ही तसे केल्यास कॉलर पकडून, रांगेबाहेर काढी. त्यावेळी खूप वाईट वाटत असे. पण आज विचार केल्यानंतर, तो ते आमच्या भल्यासाठीच करत होता याची जाणीव होते.आपल्या  ‘दिवाण्या’ भाचे कंपनीमुळे, गावातील आपली प्रतिष्ठा कमी होऊ नये ,असे ही वाटत असावे.

   मुकामामाला स्वतः छानछोकी, झकपक राहणी आवडे. तशी मुले, लोक तो जवळ करी. आम्हाला तसे जमत नव्हते. त्यामुळेच कुठेतरी त्याचा व आमचा विसंवाद होई. परंतु त्यात द्वेषाची,तिरस्काराची,भावना कुठेही नसे.

        एका प्रसन्न क्षणी …

     त्याची एक सायकल होती .गावातील फेरफटका हा सायकल वरूनच बहुदा होई. त्या सायकलीची जपणूक, त्याच्या स्वतःच्या शरीराच्या जपणूकीहून जास्त होई.  गावातून परत आल्यावर प्रत्येक वेळी,त्या सायकलची साफसफाई व तेलपाणी होत असे. त्यामुळे  गावांत अनंतरावची सायकल म्हणजे एक प्रेक्षणीय वस्तु वाटत असे. खास ही सायकल पाहण्यासाठी  काही मंडळी घरी येत. त्यांना मोठ्या कौतुकाने सायकल दाखवून स्वतःचे कौतुक करून घेणारा मुकामामा, आम्हाला सायकलच्या जवळपासही फिरकू देत नसे. आम्हा भाचे कंपनीला सायकलला हात लावण्याचीही  परवानगी नव्हती. सायकलचा  स्पर्श जाणवतो तरी कसा, हे जाणण्या साठी, तो आंघोळीस किंवा इतर काही कामात दंग असल्यास आम्ही हळूच जाऊन सायकलची घंटी वाजवत असू. त्याला ऐकू येत नसल्यामुळे घंटी वाजली तरी समजत नसे, व आम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटत. एखादे प्रसंगी दुर्दैवाने, जर त्याने असे करताना पाहिले तर “आता धरणी दुभंगो, आणि आपल्याला सामावून घेवो” अशीच अवस्था होत असे. ते दिवस आठवले की वाईट वाटते, गंमतही वाटते.

     तसे पाहिले तर मुका मामा आमच्या पेक्षा वयाने कितीतरी मोठा. पण तरीही आम्ही आमच्या लहानपणी त्याला आमच्या समवयस्क समजूनच त्याच्याशी गमती जमती करीत असू. वयाने मोठा असला तरी मनाने ,विचाराने,तो आम्हाला बरोबरचा वाटे.त्याच्या व्यंगामुळे तसे होत असावे. मुका मामाची थट्टा करणे, चेष्टा करणे ,मजाक करणे हे त्यामुळेच नैसर्गिकतःच  होत असे. तो त्यामुळे आमच्यावर चिडत असल्याने आम्हाला अधिकच चेव येई! आज त्याचे बरोबर केलेल्या त्या बालिश गंमती व त्यामुळे मिळालेल्या आनंदाचे क्षण आठवले ,म्हणजे हसू येते, पण वाईटही वाटते. कसाही असला, तरी,आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा असलेल्या मामाला आम्ही सतावले,त्याच्या व्यंगामुळे मस्ती केली,बरोबरी केली..,आज तो या जगातून गेला आणि ह्या साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही सर्व भावंडे कुठेही कधीही एकत्र आलो तर मुकामामाच्या आठवणी निघणारच. बालपणी जरी त्याच्याशी बरोबरीने वागलो, तरी आता मात्र त्याच्या विषयीचा आदर दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाणार… 

   त्यावेळी आमच्या सर्व भाचे कंपनीत एक वाक्प्रचार प्रचलित झाला होता,”एखाद्याचा मुका मामा होणे!” खूप  गमतीची आठवण आहे ती!! आमची मावशीआजी(भिमी मावशी) ही भाजीपाला व फळांचा घरगुती व्यापार, एकटीच्या बळावर करीत असे. बोर्डी, घोलवड गावांतील अनेक वसतिगृहे व काही श्रीमंत नागरिक हे तिचे रोजचे गिराईक. तिला त्यात खूप फायदा होई. व या कुटुंबाला तिचा आर्थिक हातभार लागे. गोदामाची एक लहान खोली मामाच्या घरात होती. त्यात सर्व फळफळावळ विशेषता केळी, चिकू, व पेरु,आंब्याचे दिवसात आंबे ,भरलेले असत. मावशी विक्रीला गेली असताना त्या खोलीला कुलुप असे  व ती विक्रा करून घरी आली की ती खोली उघडलेली असे. सहाजिकच आमची  नजर त्या खोलीच्या कुलपाकडे असे. खोलीच्या खिडकीतून आत भरलेल्या ‘मेव्या’चे दर्शन होत असे. अर्थातच योग्य संधी मिळताच मुका मामा व आम्ही बच्चे कंपनी आमचा कार्यभाग साधून घेत असू. क्षुधा शांती होई. मावशीला याचा संशय होता पण ती कोणाला तसे स्पष्ट सांगू शकत नव्हती. दुर्दैवाने एक दिवस तिला मुका मामा रंगेहात सापडला.  मग काय विचारता, मावशीने त्याला सज्जड दम भरला आणि ती पुढे  जास्त काळजी घेऊ लागली. आम्हा  मंडळीला ही गोष्ट कळल्यामुळे मोठा आनंद झाला. डोक्यात सुपीक कल्पना आली. आता बिनधास्त चिकू ,केळी खा.. ‘पावती’ मुकामामाचे नावावर फाडली जातआहे! तेव्हापासून  मावशीच्या फळांची  Inventory नजरेत भरेल एवढी कमी होऊ लागली. मावशीच्या  ते लक्षात येई आणि तिच्या रोख ठोक स्वभावामुळे ती मुका मामा वर डाफरे. बिचारा मुकामामा हतबल होता. कितीही हातवारे करून, आवाज चढवून, “मी चोरी केली नाही..” हे सांगण्याचा प्रयत्न करी, तरी मावशीचा विश्वास बसत नव्हता. कारण एकदा ‘चोर सापडला’ होता ना? आमचा ‘हस्तव्यवसाय’ बिनधास्त चालू होता.आता मुकामामालाच काहीतरी करणे आवश्यक होते. तो बुद्धीने कमी नव्हता. त्यालाही नक्की कोण हात मारते आहे हे माहीत होते.त्याने आम्हा मंडळीवर खास पाळत ठेवली. आमच्या दुर्दैवाने व त्याच्या सुदैवाने, एक दिवस, आमच्यातलाच,’ एकचोर’,पुराव्यानिशी त्याने पकडला व मावशी समोर हजर केला. चोर अगदीच,’कच्चे लिंबूटिंबू’, निघाला. त्याने माफीचा साक्षीदार होऊन,आपल्या इतर सहकार्‍यांची नावे ही भडाभडा ओकून टाकली. मग काय विचारता…पुढील चार दिवस मावशीला तोंड लावणे ही आम्हाला शक्य नव्हते.त्यानंतर मावशीने काढलेली आमची खरडपट्टी, व गोदाम खोलीला लागलेली दोन कुलपे यामुळे आम्हा सर्वांचे हे फावल्या वेळातले, भलते उद्योग थांबले ,हे सांगावयास नलगे!! 

    त्या दिवसांची आजही आठवण आली की गंमत वाटते.. मामाचा तो दीनवाणी चेहरा नजरेसमोर येतो. हसून हसून मुरकुंडी वळते.  बिचारा मुका मामा कळवळून,” मी केळी खाल्ली नाहीत..” हे सांगण्याचा प्रयत्न त्याच्या अंगविक्षेप व आवाजाच्या चढउतारातून, करीत होता…मावशीला ते पटत नव्हते.आम्ही मंडळी गुपचूप ती गंमत लांबून पहात आसुरी आनंद घेत होतो,..मात्र आमचे बिंग फुटल्यावर , मामाचा खुललेला चेहरा व आमचे पडलेले चेहरे.. सर्व सर्व आज आठवले की वाटते, किती निरागस दिवस होते ते.  त्या दिवसांचा साक्षीदार आमचा मुकामामा होता. अज्ञान व अजाणता पणी का असेना, आम्ही त्याला आमच्यातला एक केले होते. प्रसंगी थट्टा ही केली होती . आजही आम्ही गमतीने, कोणावर, अशा भुरट्या चोरीचा खोटा, आळ घरात घेतल्यास, “त्याचा मुकामामा झाला…” असे गमतीने म्हणतो. मुका मामा गेला तरी अशा अनेक प्रसंगांनी तो आमच्या आयुष्यात कायमचा ठासून भरलेला राहणार आहे .

     मुका मामाने कधीतरी लग्न करण्याची ही इच्छा प्रदर्शित केली होती असे कळले. ते साहजिकही होते. शेवटी मानवी भावभावनांचा अविष्कार, वाणी नसली तरी शरीराला आवश्यक असतो. दुर्दैवाने मावशीनेआजीने त्यावेळी ठामपणे त्याला नकार देऊन तसे होऊ दिले नाही. “याला स्वतःचे पोट भरता येत नाही ,तर बायकोचे पोट कसे भरील?” असा तिचा बिनतोड सवाल होता.त्यात तथ्यही होते. 

   मामाला कै.दीनानाथ पाटील(अण्णा),धुंडिया  वाडी, यांनी आपल्या डाय मेकिंगच्या कारखान्यात नोकरी दिली होती. काही दिवस तो तेथे गेला. पण अंगीभूत कौशल्य असूनही,आळस आणि संतापी स्वभाव यामुळे  तिथे तो अनियमित असे .पुढे अण्णांनी आपला कारखानाच बंद केला आणि मामाचीही सुटका झाली. मात्र त्या दरम्यान त्यांने धुंडीयावाडीमधील लोकांची मने जिंकली. एक आगळे नाते तयार केले हे खरे. त्या दिवसाबद्दल आमचे मित्र श्री भालचंद्र पाटील, धुंडीयावाडी यांनी केलेली ही टिप्पणी किती बोलकी आहे पहा:

   “मुका काका आणि धुंडिया ह्यांचा फार मोठा संबंध आहें. मुका काका अनेक वर्षे म्हणजे आम्ही शाळेत प्रवेश देखील घेतला नसेल त्याच्या अगोदरपासून अण्णाकडे डाय काम करायला यायचे. त्याच्यात कामाचे कसब असल्यामुळे ते कित्येक वर्षे येत असत. थोडक्यात जेव्हा अण्णांनी डाय काम बंद केले तेव्हा ते नियमित यायचे बंद झाले. सकाळी 10 ते संद्याकाळी 5.30 पर्यंत असत. त्यांची सायकल होती. ती घेतल्या दिवसापासून तिचे आयुष्य संपेपर्यंत नवीच्या नवीन राहीली . सायकल चा रंग, सीट, झालर, कॅरियर, गोंडे, हे सर्व सुंदर दिसें. धुंडिया मध्ये आल्यावर किमान 20  मिनिटे सायकल स्वच्छ करणे हा नित्यक्रम होता. दुसऱ्याला कोणाला देत नसत. राम अप्पाना आणि विरसेन, बाळूला दिली असेल तर. ते पण क्वचित. विरसेन थोडे फार डायकाम करत असल्याने त्यांचे थोडे ट्युनिंग होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मुकाकाका जीवन जगले. त्यांच्या सर्व नातेवाईकांनी त्यांना कायम  सपोर्ट दिला. मुकाकाका गेले ही बातमी त्यांच्या कुटुंबियांपुरती दुखदायक नसून बोर्डी गावासाठी आणि विशेषता धुंडियासाठी तेवढीच दुःखदायक आहें.”

         मुका मामाचे बोर्डीतील जीवन, राम मंदिर आळीत व्यतीत झाले.राम मंदिर परिसर महापरिवारातर्फे त्याला दिलेली श्रद्धांजली खूप हृदयस्पर्शी आहे. त्या परिसरात तो सर्वांचा आवडता होता…

         “मामा, आज तुम्ही हे जग सोडून गेलात हे ऐकून आम्ही दुःखी झालो, अस्वस्थ झालो. मामा , तुम्ही तर राममंदिर आळीतील एक आगळंवेगळं व्यक्तीमत्व! किंबहुना राममंदिर आळीची ओळख!

तुमचा शांत, हसरा चेहरा, डोळ्यांतील चमक, मनाचा निर्मळपणा, प्रामाणिकपणा, सर्वांप्रति असलेली आपुलकी  सारं काही आठवतं. बोलता येत नसले तरी कोणतीही गोष्ट, गावातील घटना हातवारे करुन समोरच्याला व्यवस्थित समजावून सांगण्याचा तुमचा प्रयत्न असायचा. लहानपणी आम्हाला तुमच्या खाणाखुणा कळत नसत, त्याची एक वेगळीच गंमत वाटायची.  

  वयाची सुमारे ९७ वर्षे आयुष्य जगण्याचं भाग्य तुम्हांस लाभलं. रवींद्रनाथ टागोरांच्या  “एकला चालो रे” या पंक्तीप्रमाणे तुम्ही एखाद्या योगी पुरुषाप्रमाणे तुम्ही हे जीवन व्यतीत केलं.”

 *मुकामामा, तुम्ही नेहमीच आमच्या स्मरणात राहतील.” 

 *मामा, अखेरचा हा तुम्हां दंडवत !*

आपल्या राम मंदिर परिसरात, मुका मामांनी या सर्व तरुणांचा किती प्रेमभाव मिळवला होता त्याची ही झलक.

    बोर्डीच्या कोंडीया तलाव आळीत राहणारे,श्री.अभिजित राऊत ,यांनीही मुकामामाबद्दल श्रद्धांजली वाहतांना, कोंडीया तलाव आळीत ,मुकामामा बद्दल केवळा सद्भाव होता ते सांगितले:

    ” सहा सात वर्ष अगोदर आपण ज्या काही आपल्या मंडळाच्या मार्फत वर्षासहल आयोजित केल्या होत्या त्यामधे मुका मामाचा सहभाग नेहमीच असे. मुकामामाचा  शेवट येण्या अगोदरची ३/४ वर्ष ही खूपच आंनदाची गेली असे मला वाटते.  रोज संध्याकाळी नित्य नियमानुसार, तात्यांच्या ओटीवर बसत. गोमा किंवा इतर कंपनीच्या बस संध्याकाळी, राममंदीर परिसराच्या रस्त्यावरून धावत होत्या.मामा त्यांचे निरीक्षण करीत .त्याचा आनंद घेत असत. यात त्यांना वेगळेपण वाटत होते. तो त्यांचा विरंगुळा होता. 

     वयाची ९७ वर्ष ,न बोलता कुठलेही मनोरंजनाचे साधन नसताना, कशी घालवली असतील ह्या गोष्टीचा आजच्या  काळात आपण विचार सुद्धा करू शकत नाही आणि विचार केला तरी डोळ्यासमोर मुकामामा चे चित्र उभे राहील. मुकामामाला भावपुर्ण श्रध्दांजली.!!”

   बोर्डी तील प्रत्येक आळीशी मुकामामां चा संपर्क  होता. सर्वांचे प्रेम त्यांनी संपादित केले होते.त्यांच्या जाण्याने सबंध गाव  दुःखी झालेला आहे.

        कै.अण्णा (धुंडीया वाडी), नंतर, त्याला आमचे हिरामामा(कै.लक्ष्मीकांत पाटील), यांनी प्रयत्न करून, धुळे येथे, ते काम करीत असलेल्या कापड्याच्या गिरणीत  लहानसे काम दिले. त्याच वेळी आमेचे आप्पा देखील धुळ्यात प्रशिक्षणासाठी गेले असल्याने त्यांचाही  मामाला तेथे नेण्‍यात हातभार लागला. पॅकिंग डिपार्टमेंट मध्ये साधे काम होते. पगारही चांगला होता. हिरा मामा हेच कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असल्याने तसा काही इतर त्रास नव्हता. पण खानदेशी जेवणात भात आणि मासे मिळत नाहीत याचा त्याला कंटाळा आला. ती नोकरी देखील त्याने मध्येच सोडून परत बोर्डी  गाठली.आयुष्यात कोणतेही कष्टाचे काम त्याला व्यवस्थित करणे जमले नाही, हा त्याचा दोष की त्याला मिळालेले बालपणीचे वळण… काहीही असेल, मात्र, स्वतःचा संसार ऊभा करण्याची त्याची स्वप्ने शेवटी धुळीला मिळाली हे खरे.

   पुढे काळ बदलला, जुनी समीकरणे ही बदलली! शिक्षणक्रम आटोपून आम्ही नोकरी धंद्याला लागलो. आम्ही बोर्डीस आल्यावर मामा आम्हाला खास भेट घेण्यासाठी घरी येई. कोणी नवीन शर्ट, पॅन्ट वा काही वस्तू दिलेली असेल ती दाखवून त्याचे कौतुक करी. आम्हीही त्याला कधी अशा वस्तू भेट देत असू. जाताना हातावर लहान टीप ठेवीत असू. आम्हा सगळ्याच मावसभावंडांशी, त्याची वेगळी ओळख झाली होती. बोर्डीत आल्यावर ,सर्वच त्याची आवर्जून भेट घेत व काहीतरी हातावर ठेवत. तोही आनंदाने त्याचा स्वीकार करी. लहानपणी आम्हाला नेहमी झापणारा, ओरडणारा, मुकामामा आता आमचा चांगला मित्र झाला होता. खूपचं बदलला होता.परिस्थितीच्या आघातांनी त्याला बदलले होते. ते आम्हाला जाणवत होते.. आम्ही आता त्याच्या वयोमानानुसार त्याचा योग्य तो आदर व सन्मान करीत असू . गावात आलो म्हणजे,  इतर नातेवाईक व गावाला तो आनंदाने ही बातमी देत असे . आम्ही बोर्डीचे घर सोडले व घोलवडला राहवयास आलो.  तिथेही तो  सुट्टीत आल्यावर सायकलवरून येई. नाश्ता, चहा करून, आपल्या ताईला भेटून, आमच्याशीही त्याच्या भाषेत संवाद साधे. आता त्याच्या चेहर्‍यावर एक प्रसन्नता व आनंदाचे भाव स्पष्ट दिसत. मात्र सायकलला हात लावण्याचे स्वातंत्र्य,अजूनही मर्यादित होते. मला आठवते का कुणास ठाऊक, पण माझा मुलगा श्रीदत्त, याला मात्र तो आपली सायकल कौतुकाने दाखवी. तो लहान होता, सायकल चालवण्याचे त्याचे वय नव्हते. तरीही मामाचा हे आगळे “औदार्य” आमच्या नजरेत भरे. पुढे, आपल्या घोलवडच्या प्रत्येक फेरीत न चुकता श्रीदत्त मुकामामाची भेट घेत असे, परदेशात असूनही त्याची चौकशी करीत असतो. त्याला मुकामामाबद्दल खूप आस्था व जिव्हाळा. हे ॠणानुबंधच! 

      मुकामामा आमच्या मुंबईतील घरीही काही दिवस राहून गेला होता. त्या आठवणीही खूप गोड आणि रम्य. मी सकाळी ऑफिसात निघून गेलो की तो घरातील काही लहान-सहान कामे स्वतःच करी. सौ. मंदाला मदत करण्याचा प्रयत्न करी. छोट्या बापू बरोबर गमती करी. पेपर, मासिके घेऊन त्यातील चित्रे पाहून वेळ घालवी. संध्याकाळी आमच्या सोसायटीमधील लोकांशी संपर्क साधी. मुका व बहिरा असल्याने खूप लोकांची सहानुभूती तेथेही त्याने मिळविली. आजही काही जुने मित्र ,”तुमचा ‘तो’ मामा कसा आहे हो?” अशी चौकशी करीत असतात. विशेष म्हणजे त्या वेळी आमच्या घरात असलेल्या एका कॅलेंडर वरचे, तारीख व दिवस न चुकता बरोबर रोज लावीत असे. इंग्रजी अक्षरांचे ,आकड्याचे ज्ञान त्याने कुठून मिळवले होते कोण जाणे?

  माझी बहीण नीलम ही घोलवडच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. तिची ही भेट घोलवडला आल्यावर होत असे. नीलम मामाला, प्रत्येक महिन्याला त्याचा आवडीचा, आंघोळीचा सुगंधी साबण व कपडे धुण्याचा साबण देत असे. न चुकता तो तिच्या घरी जाऊन ते गोळा करी. मला वाटते नीलमच्या निधनानंतरही त्याचा हा क्रम सुरू होता. नीलमच्या अंत्यदर्शनाला आलेला, डोळ्यातील अश्रू पुसणारा मुकामामा आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. क्वचितच त्याच्या डोळ्यातून, कोणासाठी असे अश्रू आले असतील. आज तो गेला आहे आमच्या डोळ्यातील त्याच्यासाठी आलेले अश्रू पाहण्यास तो नाही.

मुकामामा एक वेगळे दर्शन… सौजन्य, राम मंदिर परिसर महापरिवार.

       आक्का, मावशीनंतर बोर्डीच्या घरात मुकामामा एकाकी झाला. खंडूमामा, मामीने त्याच्या जेवणाची व इतर खर्चाची उत्तम सोय केली. शेजारी असलेली बहीण,म्हणजे आमची कमळी मावशीकडे तो हक्काने मदत मागे. ती देखील आपल्या भावाचे करता येईल तेवढे करी. मावशीचेही आता वय झालेले. ती किती नियंत्रण ठेवणार? खाण्याचा शौकीन  मुका मामा, गावात, मित्र,नातेवाईकांचे घरी जाऊन त्यांना भेटू लागला.  काही गोड धोड, तिखट,आंबट मिळाल्यास खाऊ लागला. आधीच नाजुक असलेल्या, पोटाच्या तक्रारी सुरू झाल्या.वरचेवर आजारी पडू लागला. लहान भाऊ खंडू मामा, गेल्यानंतर त्याचा मुख्य आधारच गेला. मामी व मुलींनी त्याला जमेल तेवढे सांभाळले. शेजारची कमळी मावशी,गोंडु मावशी व सर्वच भाचे कंपनी त्याला मदत करण्यास तयार असत. हिरू मावशी थोडी दूर असली तरी बोर्डीत असलेली गीता व चिंचणीहून खास  मामास भेट देणारा मिलिंद यांनीही त्याची नेहमीच वास्तपुस्त केली. कमळीमावशी आजारी झाली, व गोंडूमावशी वृद्धाश्रमात गेली. त्याचे दोन मोठे मानसिक आधारही संपले. नुकत्याच निधन पावलेल्या, आमच्या बच्चू दादाचा त्याला आर्थिक आधार होता. त्याच्या डोळ्याच्या ऑपरेशनचा( Cataract),संपूर्ण  खर्च बच्चूदादाने केला होता. बच्चूदादा ही अकालीच गेला. हे सर्व आधार असे एका मागोमाग एक जात राहिल्याने कुठेतरी त्याच्या मनावर सतत आघात होतच राहिले. एकाकीपण वाढतच गेले. आपल्या वेदना बोलून न दाखऊ शकणारा मुकामामा, सर्व निमूटपणे सोशीत राहिला. त्याच्या वेदनाही मुक्याच राहिल्या. अगदीच एकाकी झाला. कधीही, कोणापुढे स्वतःहून हात न पसरणारा आमचा मानी मुकामामा, कधीतरी तेही करू लागला, असे कानावर येऊ लागले. कोणाचा चांगला सल्ला ऐकणे हे त्याच्या जीवनशैलीत बसणारे नव्हते. त्यालाच त्रास होऊ लागला. करोनाच्या आजच्या वातावरणात, बोर्डीला एकाकी अवस्थेत आजारी पडला. मात्र सर्वांनी दिलेल्या मदतीमुळे तो पुन्हा उभा राहिला.

     या आजारांमध्ये परिस्थिती गंभीर होती मुंबईहून कोणी येऊही शकत नव्हते .मात्र त्याच्या समोरील राऊत कुटुंबातील राजूने मनोभावे सर्व सेवा दिली. गरम पाणी, चहा, व जेवणाचे  पदार्थ रोज त्याला त्यांचे मार्फत मिळत. मामाला राजूने  एक शिट्टी देऊन ठेवली होती. काही त्वरीत मदत लागल्यास, ओटीवर उभा राहून मामा शिट्टी वाजवी व राजु नोंद घेऊन, आवश्यक ते पूरवी. एवढेच काय, दोन दिवस तो अस्वस्थ असतांना त्याचे कपडे बदलण्याचे काम ही या परोपकारी माणसाने केले. मुकामामाची पुण्याई! दुसरे काय?

   प्रणोतीने आणि  नरेशने योग्य विचार करून, वेळीच, काही महिन्यापूर्वी बोरिवलीला आपल्या घरी त्याला नेले. सांभाळ केला, अगदी अंतिम घडीपर्यंत योग्य ती जतन केली. त्याचे दिवस मजेत जात होते. मुंबईस जातांना तो आमच्या घोलवडच्या घरी वळून आम्हा सर्वांना भेटून गेला. ठीक वाटला. नुकत्याच होऊन गेलेल्या आजाराचे कोणतेही चिन्ह त्याच्या शरीरावर वा वागण्यात दिसत नव्हते. तीच त्याची अखेरची भेट, तेच त्यांचे अंत्यदर्शन.

                    फोटो सौजन्‍य, सपना चुरी.

   आज दीप अमावास्येचा  पवित्र दिवस! तमसो मा ज्योतिर्गमय.., ‘आम्हाला तमा कडून तेजाकडे ने’ अशी प्रार्थना करण्याचा दिवस. तेजोमय चैतन्याला वंदन करण्याचा दिन. आपले निरागस, शुद्ध, सहज निस्वार्थ, जीवन संपवून आमचा अनंत त्या तेजोमय’ अनंताच्या’ भेटीला आज निघून गेला. या पवित्र निर्वाणासाठी आयुष्यात त्याला कोणतीच अनुष्ठाने  पूजा ,प्रार्थना करावी लागली नाहीत. त्या अनंताला प्रार्थना करूया. पुढच्या जन्मी आमच्या मुकामामाला, शुद्ध वाणी, स्पष्ट श्रृती आणि तेजस्वी दृष्टीचे  वरदान देऊन पुन्हा या पृथ्वीवर पाठव. मुकामामाच्या स्मृतीला वंदन.

ओम शांती,शांती शांती…???

8  ऑगस्ट, 2021, दीप अमावास्या.

अखेरच्या दिवसातील दोन क्षणचित्रे

      श्री. भालचंद्र पाटील,सपना चुरी, श्रीराम मंदिर परिसर परिवार,अभिजीत राऊत, ,कोंडीया तलाव यांच्या  यांचे  सौजन्याबद्दल आभार.