Rayat Days

साताऱ्याचे महाविद्यालयीन दिवस

मी एस.एस.सी. चांगल्या तऱ्हेने पास झालो. १९५९ झाली 74% गुण ही नक्कीच मोठी कमाई होती. त्यावेळी सर्व साधारणपणे 80-81% मार्क्स मिळणारा बोर्डात पहिला येत असे. मला आठवते आमच्या वेळी सुधीर देवरे नावाचा मुलगा पहिला आला होता, जो पुढे भारतीय परराष्ट्र सेवेत मोठा अधिकारी म्हणून नावारूपास आला.

वास्तविक एवढ्या गुणसंख्येने मला मुंबई-पुण्यात, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवणे कठीण नव्हते. परंतु एक तर “पुणे विद्यापीठात – साताऱ्यात मला पाठवायचे” हा आप्पांचा (आमच्या वडिलांचा) निर्णय पक्का झाला होता.  व त्याप्रमाणेच एसएससीला विषय घेतले होते. त्यामुळे कित्येक मित्र नातेवाईक यांनी मला मूर्खात काढले, की मुंबई-पुण्याची उत्तम महाविद्यालय सोडून एवढ्या लांब कशाला जातोय, याचा त्यांना उलगडा होत नव्हता. मात्र एकंदर त्यावेळची आप्पांची आर्थिक स्थिती पाहता व लगेच दोन वर्षांनी अण्णा देखील कॉलेजला येणार असल्याने, आप्पांनी जाणून बुजून हा निर्णय घेतला होता. त्यावेळी आमच्या बोर्डीची दोन मुले, श्री. आत्माराम के. राऊत व जयवंत राऊत हे साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शिकत होते. व त्यांनीच ही माहिती दिली होती की तिथे शिक्षणासाठी काही कामे देखील विद्यार्थ्यांस उपलब्ध केली जातात, जेणेकरून शिक्षण करून गरजू विद्यार्थी काही कमाई करू शकतो व स्वावलंबी होऊन शिक्षण घेऊ शकतो. ‘कमवा आणि शिका’ अशी ही योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या रयत शिक्षण संस्थेत राबवली होती व त्याला त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांनी पुरस्कृत केले होते.

आत्माराम व जयवंत, तसेच माझ्या एक वर्ष पुढे असलेला सुभाष मंगेश पुरी हे सर्व याच योजनेचा लाभ घेऊन तेथे गेले होते. व त्यांच्या शिफारसीवरून आप्पांनी मला साताऱ्याचे रयत शिक्षण संस्थेत छत्रपती शिवाजी कॉलेजात पाठवण्याचे नक्की केले होते.

जेव्हा आप्पांनी हा निर्णय सांगितला तेव्हा मी सुरुवातीस खूपच नाराज झालो. कारण साताऱ्याचे फक्त नाव ऐकले होते, कोणीच नातेवाईक वा ओळखीचे नव्हते, तसेच शिक्षणाच्या दृष्टीने ही मुंबई-पुण्याची कॉलेजेस खूप उजवी होती. माझे बरेच शालेय मित्र देखील मुंबई-पुण्यास प्रवेश घेणार होते. त्यामुळे आपण एकटेच अशा अज्ञात प्रदेशात अगदी वेगळ्या वातावरणात कसे राहू याची चिंता वाटत होती. मात्र अरुण गो. सावे हा माझा वर्गमित्र देखील साताऱ्यात शिक्षणासाठी जात आहे हे ऐकल्यावर जरा बरे वाटले व धीर ही आला. मात्र त्यावेळी माझी मनस्थिती पाहता साताराच काय, अंदमान-निकोबार मध्ये देखील मला उच्चशिक्षणासाठी जावे लागले असते, तरी मी शेवटी तयारी केली असती, कारण शिक्षण हवेच होते!

आचार्य चित्रे गुरुजी, भाई मळेकर सर, आपटे सर या माझ्याविषयी खूप सदिच्छा बाळगणाऱ्या गुरुजींनी देखील जेव्हा मला धीर दिला तेव्हा खूप बरे वाटले.

जून महिन्याच्या कोणत्यातरी दिवशी प्रस्थान करणेयाचे नक्की झाले, मात्र तो वटसावित्रीचा दिवस होता, हेदेखील स्पष्ट  आठवते. त्याआधी कपडे, पुस्तके भरून ठेवण्यासाठी दादरहून खंडू मामाने एक ट्रंक खरेदी करून आणली. (जी अजून माझ्या संग्रहि आहे!)  त्यावेळी फॅशनेबल सुटकेसचा जमाना नव्हता. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी ट्रंक म्हणजे लोखंडाच्या  पेटीची निवड करीत. एकदम नवीन पायजमा शर्ट व विशेष म्हणजे एक चप्पल खरेदी केली. एसएससी पर्यंत आम्हाला चप्पल मिळाली नव्हती. त्यामुळे नवीन पादत्राणे घालताना कोण कौतुक वाटले! दुसरी गोष्ट आठवते म्हणजे, आप्पांनी तोपर्यंत आम्हाला कधी फुल पॅंट शिवली नव्हती,  कॉलेजला जाताना ही त्यांनी पायजमे वापरण्यास सांगितले, मात्र खंडू मामा ने आपल्या दोन जुन्या फुलपॅण्ट दिल्या. ज्या मी मोठा दिमाखाने कॉलेजात वापरत असे. दिमाखाने अशासाठी, की साताऱ्याच्या त्या कॉलेजात त्यावेळी माझ्या सारखी अनेक पोरं पायजमे वापरीत, बाकीचे तर अर्ध्या पॅन्ट मध्ये- हाफ पॅन्ट मध्ये येत. त्यामुळे मी व अरुण सारखे,  कधी फुलपॅण्ट घालणारे , म्हणून कौतुकाचा विषय होत असे.

आम्हाला, मी व अरुण ला  बोर्डीपासून साताऱ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी खंडू मामांवर सोपवण्यात आली होती. खंडू मामा, अप्पांच्या हाकेला धावून येई, आप्पांना प्रकृतीमुळे हा लांबचा प्रवास करणे शक्य नव्हते, त्यामुळे असे ठरले होते.  बोरीबंदरला गाडी बदलून पुण्याची ट्रेन व पुढे पुणे-सातारा रोड, असा मीटरगेज रेल्वेचा प्रवास होता. बोरीबंदरला बराच वेळ थांबावे लागले, कारण पुण्याची गाडी रात्री होती. संध्याकाळी अरुणचा राजा मामा त्याला निरोप देण्यासाठी स्टेशनवर आला.पुढे प्रसिध्द  झालेल्या राजा ट्रॅव्हल चे मालक राजाभाऊंचे ते मला झालेले पहिलेच दर्शन. सफेद लेंगा, शर्ट मधील तडफदार, करारी व्यक्तिमत्वाचे ते राजाभाऊ अजून आठवतात. गाडी आल्यानंतर त्यात पटकन उडी मारून राजाभाऊंनी हमालाच्या दादागिरीला न जुमानता दोन बर्थ आमच्यासाठी पकडले व या मुलांना त्रास दिला तर याद राखा, मी देखील रेल्वे कर्मचारी आहे असा दम दिला. खंडू मामा बिचारा मवाळ होता, तो हे सर्व कौतुकाने पाहत होता. राजाभाऊंच्या या मदतीमुळे आमचा मुंबई-पुणे पहिला प्रवास अगदी मजेने झाला. पुण्यात देखील दहा वाजता सकाळी गाडी होती. त्यावेळची ती मिरज मीटर-गेज गाडी म्हणजे एक ‘नमुना’! टुक-टुक करत जात असे सर्व पॅसेंजर ही बहुतेक ‘भाऊ लोक’. त्यामुळे सर्वत्र तंबाखूच्या पिचकार्‍या! अगदीच कंटाळवाणा व नीरस असा हा प्रवास होता; दुपारची वेळ असल्याने तापही होता. सातारा रोड स्टेशन ते सातारा शहर व कॅम्प सातारा (येथे आमचे कॉलेजचे वसतिगृह होते). एस.टी.(बस) ने गेलो. बरोबर 24 तासापेक्षा जास्त प्रवास करून, संध्याकाळचे चार सुमारास आम्ही कॅम्प-सातारा येथील वसतिगृहावर आलो. त्या परिसराचे झालेले प्रथम दर्शन काही उत्साहवर्धक नव्हते. उजाड माळाचा तो डोंगराळ भाग होता. अगदीच सातारा शहराबाहेर, लष्कराची छावणी सैनिकांची, अधिकाऱ्यांची वस्ती, काही नागरी वस्ती- अगदीच विरळ. व शेजारून जाणारा सातारा-माहुली रस्ता. माहुली हे रामशास्त्री प्रभुणे यांचे सासर व कृष्णाकाठचे गाव. वसतिगृह  परिसरात दोन-तीन इमारती होत्या, दगडी बांधकाम एक बी. टी. कॉलेजची इमारत! आमच्या वसतिगृहाची इमारत म्हणजे शब्द अक्षरशहा तुरुंग होता. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश पलटणी नी, जर्मन युद्धकैदी स्त्रिया ज्या ब्रम्हदेशाच्या सीमेवर पकडल्या होत्या, त्यांना या माळरानावरील तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य-प्राप्तीनंतर सरकारने, मोठ्या आनंदाने ही इमारत भाऊरावांच्या रयत शिक्षण संस्थेस दान केली. जेणे करुन आमच्या सारख्या शिक्षणेच्छुकांची, शिक्षण करून राहण्याची माफक दरात सोय व्हावी.

खंडू मामाने रेक्टर स्वामी यांची भेट घेऊन, आम्हाला आमची खोली मिळवून दिली. पैसे वगैरे भरून प्रवेश घेतला.  मला आठवते,त्या दिवशी , कोकणामधील गावातून आलेल्या लोकांचे दर्शन घेण्यासाठी बरीच मुले होती गोळा झाली होती. बहुतेकांच्या चेहऱ्यावर तर अरेरे यांचे कसे होणार असे भाव स्पष्ट दिसत होते. रेक्टर स्वामींनी देखील आम्हाला खूप सहानुभूती दाखवून काही अडचण आली तर मला सांगा असं सांगून, आपल्या शेजारील खोलीत आम्हाला प्रवेश दिला. 

तुरुंगाची खोली, तिला भिंत आणि दरवाजा, याशिवाय आणि काहीच नव्हते. भिंती देखील कारागृहाच्या, जाड, दगडी आणि उंच. हवे साठी वर एक गोल झरोखा तेवढा होता. दगडाच्या फटीतील ढेकूणांची असंख्य कुटुंबे आपल्या पिल्लांसह अनेक वर्षे सुखनैव नांदत होती! केवळ एका वळकटीवर अथवा सतरंजीवर झोपणाऱ्या तेथील माणसांवर हल्ला करायला त्यांना कोणतीच अडचण नव्हती. प्रभाकर न्हावी व यशवंत  सासवडे हे  दोन विद्यार्थी इथे आधीच राहत होते. म्हणजे चार जण मिळून एक खोली होती. खालील दगडांचा पृष्ठभाग आणि वरील उंच भिंती, यामध्येच बॅगा,  पुस्तके, बिछाना मांडायचे होते! 

प्रभाकर हा नावाप्रमाणेच न्हावी समाजातून, खानदेशी मुलगा होता. त्याचे वडील देखील प्रार्थमिक शिक्षक होते व तो आमच्या पुढे एक वर्ष शिकत होता. त्यामुळे त्याचे आम्हाला मार्गदर्शन मिळावे हा प्रा. स्वामींना स्वामींचा उद्देश असावा. प्रभाकर अगदीच सरळ मार्गी, अभ्यासू आणि थोडा अबोल होता. याउलट सासवडे  एक वल्ली होती. याचे वडील देखील शिक्षक होते. व प्रथमच तो कॉलेजात प्रवेश घेत होता. गायन कला, नकला, अशा गोष्टीत प्रवीण असून, अभ्यासही चांगला करायचा व कधीकधी प्रभाकरची उत्तम फिरकी घ्यायचा- त्याचे उदाहरण पुढे देईनच.

खोलींतील  सामानाची लावा-लावी झाल्यावर मी, अरुण, खंडू मामा जरा बाहेर फिरावयास पडलो. संध्याकाळ झाली होती व आठ वाजता जेवणासाठी वसतिगृहाच्या भोजनालयात जायचे होते. परत खोलीवर येताना आम्ही दोन कंदील- घासलेट भरून, विकत घेतले. कारण आमच्या रूम पार्टनर्सने ही खास सूचना दिली होती की रात्री अभ्यास करायचा असेल तर तुमच्या कंदील हवा. येथे लाईट नाहीत. हा देखील एक नवाच अनुभव होता. भोजनालया देखील आम्ही आमच्या थाळ्या, पेले घेऊनच गेलो. खंडू मामाला पण कोण्या विद्यार्थ्याने आपली ताट-वाटी दिली होती. तेथे टेबल-खुर्च्या तर सोडा, खाली बसावयास जाजमही नव्हते. सिमेंटच्या फरशीवरच मांडी घालून बसलो. एक कुबट, अस्वच्छतेचा वास येत होता. पण पोटात कावळे ओरडत होते. मुलांची कुजबुज ऐकू आली आज जेवणात कालवण आहे, अरे वा खंडूमामा तर आम्हाला म्हणाला चला बरं आहे कधीतरी तुम्हाला घरच्यासारखे मासे मिळणार!

जेवण वाढायलाही मुलेच स्वयंसेवक होती कारण नियम तसे होते. प्रत्येकाला आळीपाळीने येथील सर्व कामे करावी लागत. भाजीपाला कडधान्ये आणणे, ती साफ करणे. तेथील भांडी, जेवायची खोली, स्वयंपाकगृह साफ करणे. व विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करून त्यांचे हिशोब ठेवणे इत्यादी कामे आळी पाळीने होत.

आमच्या ताटात गव्हाच्या पोळ्या पडल्या, मिरचीच्या चटणीचा ठेचा आला, आणि लाल लाल भडक वरणाचा  तेलकट तवंग ही ताटात ओतला.सर्व मुले जेऊ लागली. आम्ही मात्र अजून कालवणाची वाट पाहत होतो. आम्ही जेवत नाही असे बघून आमचा रूम पार्टनर सासवडे  जेव्हा म्हणाला, अरे हा वरणाचा तेलकट तवंग म्हणजेच कालवण तेव्हा आमचे चेहरे पाहण्यासारखे झाले. दोन घास खाऊन कसेबसे उठलो. खोलीवर येऊन हाश्श- हुश्श चालू झाले… खंडू मामा आम्हाला निरखत होता. तर आम्ही मामाची ,चेहरा लपवण्यासाठीची धडपड न्याहाळत होतो. दोघांसही कळून चुकले होते, पुढे काय वाढवून ठेवले आहे. पण त्याबाबत कोणालाच काही बोलायचे नव्हते. कारण त्याचा उपयोग काय होता? आता लोखंडाचे चणे खायला पाहिजे होते. कारण आम्हाला शिक्षणाच्या ब्रह्मपदी बसायचे होते. खंडू मामाने दुसऱ्या दिवशी आम्हाला सातारा शहरातील एका छानशा खानावळीत सुग्रास भोजन घातले. त्यालाही माहित होते आता असे भोजन घरी आल्यावरच!

खंडू मामा दुपारच्या गाडीने मुंबईस परत गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघताना आम्हाला भरून आले होते. त्यालाही तीच भावना असावी. त्याने आमच्याकडे न पाहता  हात केला. आमची ‘सत्वपरीक्षा’ सुरू झाली! 

आप्पांनी जरी तू काम करू नकोस सांगितले होते, तरी मला मात्र आपण काहीतरी करून चार पैसे कमवावे, तेवढाच आप्पांचा भार हलका होईल असे वाटे. त्यामुळे सुभाष चुरी प्रमाणे मी देखील श्रमदानाचे काम कसे झेपते हे पाहायचे ठरवले. 

सकाळी पाच वाजता उठून आम्ही लोक अंघोळीसाठी वसतिगृहाबाहेर एका नळावर जमत असू. तेथे गर्दी होई, म्हणून कधी आंघोळी बरोबर थोडा व्यायामही व्हावा, याकरिता २ मैलावरील कृष्णा घाटावर, ‘माहुली’पर्यंत धावत /चालत जात असू. व तेथे कृष्णेच्या थंड वाहत्या पाण्यात डुंबत असू! एक अनोखा आनंद मिळे. आता वाटते, साताऱ्याच्या डिसेंबर-जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीत आम्ही हे आंघोळीचे दिव्य कसे केले असेल?

आंघोळीनंतर  थोडा अभ्यास होई.  ब्रेकफास्ट /नाश्ता हा प्रकार  ठाऊकच् नव्हता. कधी मेसमध्ये आदल्या रात्रीच्या उरलेल्या पोळ्या असायच्या, तर त्या मिरची बरोबर खात असू! कधी एकदा मित्र त्याच्या शेतावरून आणलेल्या भुईमुगाच्या शेंगाचे पोते उघडी; मग गुळ- शेंगेच्या अल्पोपहार. एरवी  उपवासाचे फाकेच असत. 

त्यानंतर सकाळी ८ पासून ११ पर्यंत ‘लेबर-श्रमदान’ असे. कधी कॉलेजच्या इमारती बांधकामासाठी लागणारा दगड फोडणे, कधी बागकाम, कधी कॉलेजची साफ-सफाई असे अनेक प्रकारचे काम करणे करावे लागे! आपले इतर वर्गमित्र ‘कॉलेज कुमारा’सारखे आपल्या भोवती मिरवत असताना, कॉलेजच्या बागेत साफसफाई करतांना प्रथम थोडा संकोच वाटे, पण नंतर ते अंगवळणी पडले. मात्र आयुष्यात या कामाचा व विशेषतः त्यातून मिळणाऱ्या अनुभवाचा खूपच फायदा झाला. कोणतेही काम हलके नाही, काम करण्यास संकोच कसला? अशी वृत्तीच निर्माण झाली. ज्यामुळे नको ते अहंकार व गंड  नाहीसे झाले.

११ वाजता कॉलेज सुरू होई.  सायन्सचे विषय असल्याने, दुपारी देखील प्रयोगशाळेतील कामे असत. कॉलेज तसे नवीन व इमारत देखील एखाद्या हायस्कूल सारखी होती. बांधकाम चालू होते, प्रयोगशाळा तर शेडमध्येच होत्या. पदार्थविज्ञानाची प्रयोगशाळा मात्र व्यवस्थित इमारतीत व बऱ्याच उपकरणांनी सज्ज होती. 

संध्याकाळी पाच ५।।-६ पर्यंत कॉलेज झाले की पुन्हा वसतीगृह .. कॉलेज ते वसतीगृह अर्धा-एक मैल अंतर होते व रस्ता साधा व जंगली झाडांनी वेष्टीत होता. रस्त्यावर कोणताही प्रकाश नव्हता, त्यामुळे आपले कंदील घेऊनच रात्री वाटचाल करावी लागे. ८ वाजता जेवण झाले, की आम्ही काही विद्यार्थी, कॉलेजच्याच वाचनालयात अभ्यासास बसत असू, कारण तेथे विजेचे दिवे होते.

कधी-कधी या वाचनालयांतील वीज देखील गायब होई. त्यावेळी आम्ही स्वस्थ बसून बसत नसू! अशावेळी पेटवण्यासाठी आम्ही रबरी टायर, ट्यूब्स जमवुन ठेवीत असू व वीज गायब झाली की, एखाद्या लोखंडी तारेला हा रबरी तुकडा बांधून, त्याच्या उजेडात अभ्यास, वाचन सुरू होई. थंडीच्या दिवसात ऊबही मिळे, कारण हा वर्ग बाहेर माळरानात असे! 

काही सिनिअरस या अंधाराचा फायदा इतर प्रकारही घेत! कॉलेजच्या परिसरात मुलींचे वसतिगृह  होते व त्यांच्या खोल्यांत वीज असे. त्यामुळे ही मंडळी आपल्या मैत्रिणींशी ‘‘बौद्धिक चर्चा’’ करण्यासाठी असा वेळ येथे व्यतीत करीत. आमच्या सारख्यांना या अंधाराचा दुसरा ही फायदा होई. कॉलेजच्या परिसरातील शेतात भुईमुगाची लागवड असे. संध्याकाळी मेसच्या जेवणात न मिळणाऱ्या ‘स्वीट-डिश’ची उणीव आम्ही त्या अंधारात, कोवळ्या शेंगा चापून,  खाऊन ,भरून काढत असू. 

साधारणपणे रात्री ११ पर्यंत वाचनालय उघडे राही. त्यानंतर ती अंधारी वाट तुडवत, पुन्हा वसतिगृहावर येऊन ताणून देण्यास १२ वाजतं! दिवसभराच्या या श्रमानंतर ढेकणांना पूर्ण अभय असे! पुन्हा पाच वाजता नवीन दिवस सुरु होईल.  माझ्या सर्वच काॅलेज दिवसांत (अगदि पुढे BSc-tech पर्यंत) 5 तासांवर झोप घेतल्याचे आठवत नाही. कारण कार्यक्रमच तसा ठरलेला असे!

या सर्व धडपडीचा, पूर्वीची सवय नसल्याने, व तसा आहार पोषक मिळत नसल्याने, विपरीत परिणाम होऊ लागला.
थकल्यासारखे वाटे व अभ्यास ही नवीन विषयांचा इंग्रजीतून! त्यामुळे अभ्यास  कसा होणार ही देखील काळजी वाटे. शिकवण्या-गायडन्स इत्यादीचा तर प्रश्नच नव्हता.  मी प्रिन्सिपल पीजी पाटील, जे पुढे शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले यांना भेटून माझी अडचण सांगितली. त्यांनी खूपच सहानुभूतीपूर्वक माझी बाजू ऐकून, मला काही हलके काम देण्याबद्दल संबंधित प्राध्यापकांचा सूचना केल्या. विशेष म्हणजे त्यांनी मला ‘तू राऊत म्हणजे बोर्डीच्या आचार्य भिसेंच्या शाळेतील का? तुझ्या वडिलांनी मला पत्र पाठवले होते’ अशी माहिती दिली. आप्पांनी मात्र त्यांच्याबद्दल मला काहीच सांगितले नव्हते.

काही असो प्रिन्सिपल पाटलांच्या शिफारसीमुळे, मला रात्री पहारेकऱ्याचे (sentry duty) काम मिळाले.  आम्ही चार विद्यार्थी रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत आळी-पाळीन दर तासाच्या घटकेला तेवढे टोले, मारीत असू. व खडा पहारा देतादेता आळीपाळीने आडवे ही होत असू. झोपेचे खोबरे होई, पण सकाळच्या हाणामारीच्या कामाचे त्रास वाचले. हे काम मी सबंध प्रथम सत्रात केले. पुढे आप्पांना ही माहिती सुभाष-अरुण कडून कळली असावी. त्यांनी मला ते बंद करायला लावले व माझी मनीऑर्डर ताबडतोब ₹२५/- केली. 

भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेचे, छत्रपती शिवाजी कॉलेज हे पहिले महाविद्यालय! त्यांच्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य “बहुजन हिताय बहुजन सुखाय” हे एका वटवृक्षाखाली कोरले आहे. महाराष्ट्रात आम जनतेसाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून, भाऊरावांनी हजारो प्रार्थमिक शाळा, शेकडो हायस्कूल, व पुढेही  महाविद्यालय सुरू केले. खऱ्या अर्थाने भाऊराव पाटील हे या महाराष्ट्राचे शिक्षण महर्षी. आजच्या तथाकथित ‘शिक्षण-सम्राटां’सारखे त्यांनाही खोऱ्याने पैसे लुटता आले असते. पण त्यांनी श्रीमंतांकडून, राजे-राजवाड्यांकडून व सामान्यांकडून, घरोघरी जाऊन शिक्षणासाठी दान मागितले. व मिळालेले सर्व दान आपल्या अथक परिश्रमांची त्यात भर घालून, बहुजन समाजाच्या शैक्षणिक उत्थापनासाठी वापरले. भाऊराव खरा पोलाद माणूस! तत्कालीन धुरिणांनी व काही समाज द्वेष्ट्यांनी जाती-पातीचे राजकारण करून व महाराष्ट्रातील जुनेच  ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद उकरून काढून, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. साताऱ्यात तर त्यांना जीवे मारण्याचाही घाट घातला होता. पण भाऊराव मागे हटले नाही. त्यांनी आपले पहिले वसतिगृह साताऱ्यातील प्रसिद्ध “धनिणीची बाग” या प्रसिद्ध भागात काढले. अवघे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके विद्यार्थी जमा करून, त्यांच्या पालकांना खूप समजावून, कामाला सूरूवात केली. त्यांच्या या वसतिगृहात यावेळी महात्मा गांधींनी भेट दिली होती व भाऊरावांचे कार्य ऐतिहासिक होईल असा आशीर्वाद दिला होता. महात्माजी द्रष्टे होते. गावोगावी फिरून, शाळेतील गुरुजींना विचारून, प्रत्यक्ष चाचणी घेऊन, तर कधी पालकांशी बोलून, भाऊराव त्या गावातील हुशार चुणचुणीत, परंतु गरीब व निराधार मुलांना आपल्या वसतिगृहात घेऊन येत. व त्यांच्या शिक्षणाचा सर्व भाग, अगदी परदेशी शिक्षण सुद्धा आपल्या शिरावर घेऊन त्याला उच्चशिक्षित बनवीत . त्यापैकी काही पुढे भाऊरावांचे ऋण विसरले परंतु बहुतेक मंडळी त्यांच्या रयत शिक्षण संस्थेत योगदान देण्यासाठी  सामील झाले व त्यांनी हे महान ऐतिहासिक कार्य पुढे नेले. आज महाराष्ट्र, शैक्षणिक, सांस्कृतिक व औद्योगिक दृष्ट्या भारतातील एक प्रगत राज्य आहे; त्याचे बरेचसे श्रेय, भाऊरावांनी आपल्या रयत शिक्षण संस्थेद्वारा महाराष्ट्रातील असंख्य गोरगरिबांच्या मुलांना ज्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या त्याला जाते, हे मान्य केले पाहिजे. 

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी भाऊराव यांचे कार्य खूपच जवळून पाहिले होते व काही काळ ते या शिक्षण संस्थेचे अध्यक्षही होते. (आम्ही या शिक्षण संस्थेत शिकत असतानाच्या काळात 1960 ते 62 साली ते या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते व मुख्यमंत्री ही  होते.) त्यांच्या भेटी या वसतिगृहास व कॉलेजात वरचेवर होत. वसतिगृहाच्या हिरवळीवर बसून कित्येकदा त्यांनी मुलांशी चर्चा केली आहे. एवढी महान व्यक्ती आपल्या वसतिगृहावर येऊन असे सहज अनौपचारिक पणे आपल्याशी संवाद साधते याची आम्हास त्यावेळी खूप अप्रूप होते व आनंदही आहे. 

कॉलेजचे प्रि.पाटील हे असेच एक रत्न भाऊरावांना आपल्या भ्रमंतीत सापडले. व या हिऱ्याला त्यांनी पैलू पाडून, एका उच्चशिक्षित तज्ञ कुलगुरूत त्याचे रूपांतर केले! गरीब प्राथमिक शिक्षकाचा हा मुलगा, अन्नालाही मोताद होता, पण भाऊरावांनी त्याला आपल्या वसतिगृहात ठेवून, एम.ए. पर्यंत त्यांच शिक्षण पुण्यात केल्यावर त्याला इंग्लंडला बॅरिस्टर करून आपल्या शिक्षण संस्थेत दाखल केले. 

बॅरिस्टर पाटील हे फर्डे वक्ते होते. मराठी इंग्रजी त्यांचे वक्तृत्व ऐकणे हा एक अनोखा अनुभव होता. ते एम.ए.च्या विद्यार्थ्यांस इंग्रजी विषय शिकवीत. त्यांचा सुविद्य पत्नी प्रा. सुमित्रा पाटील, यादेखील इंग्रजीच्या विदुषी होत्या. या दाम्पत्याने भाऊरावांचे ऋण आयुष्यभर आठवून, मोठ्या संधी उपलब्ध असून सुद्धा, रयत शिक्षण संस्थेची खूप सेवा केली. पुढे प्राध्यापक पाटील, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.

पाटील यांच प्रमाणे प्रा. अब्दुल गणी सत्तार हे उप-प्राचार्य होते व त्यांचे शिक्षण देखील भाऊरावांच्या मदतीने इंग्लंडला झाले होते. ते देखील इंग्रजी वाङ्मयाचे वर्ग घेत व सबंध वर्गात तासभर जिवंतपणा आणत. प्राध्यापक बी एस पाटील हे पदार्थ विज्ञानचे मुख्य होते. व अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून पुणे विद्यापीठात अनेक पारितोषिके मिळवली होती. बीएससी पदवीनंतर, त्वरित पीएचडी. पदवी मिळवणाऱ्या हुशार लोकांपैकी एक होते. नेहमी सूट-बूट-टाय मध्ये  असत तरी विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागत. प्रा. एस एस पाटील हे अर्थशास्त्राचे शिक्षक. त्यांनीदेखील भाऊरावांच्या कृपेने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदवी घेतली होती. व मोठ्या मोठ्या बँकांच्या नोकऱ्या नाकारून शिक्षकी पेशा पत्करला होता. अतिशय फर्डे इंग्रजी बोलत व प्रसंगी मराठीतही सुंदर अनुवाद साधत. 

प्रा. आप्पासाहेब वरूटे हे तरुण प्राध्यापक त्यावेळी जीवशास्त्र (बायलॉजी) विभाग सांभाळीत. अतिशय देखणे व्यक्तिमत्व, अस्खलित इंग्रजी, व नेहमी अदबशीर वागणूक, त्यामुळे ते खूप विद्यार्थीप्रिय ही होते. थोडेसे रुबाबदार असलेल्या प्राध्यापक वरुटेंनी आपल्याच एका ब्राह्मण शिष्येशी विवाह केला. व पुढे हेच प्रा.वरूटे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देखील झाले. 

प्रा. शेख व प्रा. राईकर ही जोडगोळी रसायनशास्त्र विभाग सांभाळीत. शेखर खूप उत्साही, मेहनती व उत्तम शिक्षक होते. रायकर हे थोडे बुटके, नाजूक व अतिशय शिस्तप्रिय होते. मात्र दोघांचा आपल्या विषयाचा व्यासंग दांडगा होता. सर्व प्राध्यापकात आम्हा वसतिगृहवासियांची मने जर कोणी जिंकून घेतली असतील तर ती प्राध्यापक एस एस पाटील यांनी. त्याच वर्षी गणिताचे प्राध्यापक म्हणून आलेल्या पोरसवदा तरुण शिक्षकाने! प्रा. पाटील नुकतेच MSc math ही पदवी प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले होते. व केवळ भाऊरावांच्या आदरापोटी, त्यांना काहीतरी “दान” या संस्थेसाठी द्यायचे होते. म्हणून ते साताऱ्यास आले. एस एस पाटलांकडे विद्वत्ता खूपच होती, पण गणितासारखा किचकट विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची कला अजून झेपली नव्हती. कारण नुकतेच त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केले होते. खूप मेहनतीने पुन्हा पुन्हा विषय समजावीत, परंतु बहुतेक विद्यार्थ्यांस त्यांचे मराठमोळे इंग्लिश समजत नसे. व नेहमी वर्गात गोंधळ उडालेला असे. असाच वर्गात एकदा आवाज चाललेला असताना पाटलांनी, जोशी नावाच्या एका विद्यार्थ्यावर उभे राहण्यास सांगितले व विचारले, Mr. Joshi, What is your problem? 

जोशी: Sir, I dont understand the subject. 

पाटलांनी पुन्हा विचारले  Why dont you understand? 

जोशी: Sir, your language of English is more difficult than mathematics! 

प्रा. पाटील रागावले नाहीत, मात्र त्यांना एवढे नक्की कळले की आपल्या विषयाच्या हाताळणीत काहीतरी चुकते आहे. त्यांनी आपले बोलणे त्यानंतर सुधारले. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी पहाटेचे वेळी आम्हा वसतिगृहातवासिय  विद्यार्थ्यांस त्यांनी आणखी एक आश्चर्याचा धक्का दिला. सकाळी साडेपाचच्या सुमारास प्रा. पाटील रोज सकाळी आमच्या दरवाजा खडखडावीत. व हातात कंदील घेतलेले असे दर्शन देत. काल शिकवलेल्या गणिताच्या तासात काही समजावयाचे राहिले आहे काय? हे विचारीत. वर्षभर त्यांचा हा नेम अबाधित चालू होता. त्यामुळे आम्ही झोपताना सरांना काय विचारायचे हे ठरवूनच झोपत असू. व त्यामुळे गणित हा एरवी कठीण विषय, आम्हाला खूप सोपा गेला. या विषयात पास होईल काय ही धास्ती होती, त्या विषयात युनिव्हर्सिटी वार्षिक परीक्षेत मला 80% मार्क मिळाले व मी कॉलेजात विषयात पहिला आलो यात प्रा. एस.ए. पाटीलांचे गणितासाठी माझ्यावर तरी अगणित उपकार झाले! पुढे दोन वर्षांनी मी कॉलेज सोडल्यावर एकदा कळले की प्रा. पाटील अमेरिकेत कोणत्यातरी विद्यापीठात संशोधन करण्यासाठी, शिष्यवृत्ती घेऊन रवाना झाले. ते काही असो, आम्हा सर्वांसाठी व विशेषतः माझ्यासाठी त्यांनी गणित विषयाचे मार्गदर्शन विनामूल्य आमच्या दारी येऊन केले त्याला तोड नाही. आजही माझे त्यांना नम्र अभिवादन.

तेव्हा या छोटेखानी कॉलेजात अशी विद्वान, तळमळीची व केवळ स्वेच्छेने आपणास काहीतरी समाजाचे देणे आहे या भावनेने आलेली प्राध्यापक मंडळी होती. व ते या कॉलेजचे मोठे वैभव होते. म्हणून साताऱ्यात दोन वर्षाचा वनवासात पुस्तकी शिक्षण तर मिळालेच पण त्यापेक्षा या दीपस्तंभासारख्या भासणाऱ्या मंडळीचा सहवास व त्यातून मिळालेली पुढे जगण्याची प्रेरणा ही सातारची खरी कमाई.

अशा रीतीने कॉलेजचे व साताऱ्यातील पहिले वर्ष पार केले. विशेष नाही, तरी प्रिडिग्री (प्रथम वर्ष) परीक्षेत पहिल्या वर्गाचे मार्क्स मिळाले. एस.एस.सी.त 74% मार्क मिळवून आता 70% ही अधोगती होती, पण एकंदरीत सर्व परिस्थिती व कॉलेजातील  इतर मुलांची प्रगती पाहता हे ही नसे थोडके! 

मी कॉलेजात दुसऱ्या क्रमांकावर आलो होतो. मधील काळात फक्त दिवाळीत पंधरा दिवस व नंतर मे महिन्यात दीड महिना असे बोर्डीत वास्तव्य झाले. पुढील वर्षांसाठी आमच्याबरोबर अशोक पाटील (बबन), रमेश दा. राऊत (चाफावाडी), व हिराकांत राऊत हे तिघेही साताऱ्यास शिक्षणासाठी निघाले. हिराकांतचा मोठा भाऊ जयवंत तेथे आमच्या आधीच गेला होता.

हे दुसरे वर्ष (त्यावेळी त्यास Pre-professional degree) महत्त्वाचे होते. इंटर-सायन्स प्रमाणे पुढील इंजिनिअरिंग- मेडिकल प्रवेश या परीक्षेच्या मार्कावर अवलंबून होता. दुर्दैवाने या वर्षी खूपच अडचणीचा सामना करावा लागला. व त्याचा परिणाम गुणांवर होऊ लागला, व मला सेकंड क्लासचे मार्क मिळाले. इंजिनिअरिंगला जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. तो इतिहासही थोडक्यात सांगितलेला बरा.

मी, अरुण, अशोक, रमेश, अशी आमची चौकडी त्या वर्षी साताऱ्यात दाखल झाली. मात्र आल्याआल्याच रेक्टर स्वामींनी हा दणका दिला! मला वसतिगृहाचा प्रवेश नाकारण्यात आला होता. खरे तर गेल्या वर्षीचा मी विद्यार्थी असल्याने, कॉलेजात पुढील वर्षी प्रवेश घेतल्यानंतर वसतिगृह प्रवेशास कोणतीही हरकत नव्हती. गेल्या वर्षीच्या विद्यापीठ परीक्षेत गुणही चांगले होते. मग स्वामींनी फक्त मलाच का प्रवेश नाकारला? तसे आधी कळवण्याचे तरी होते! आता येथे आल्यावर दुसर्‍या दिवसापासून वर्ग सुरू होत असताना, मी कुठे जायचे? अरुण, सुभाष यांनी स्वामींना विनंती करून पहिली. पण काही उपयोग झाला नाही. पुढील जागा रिकामी झाली तर बघू असे मुद्दाम उत्तर त्यांनी दिले. व मला इतरत्र सोय करण्यास सांगितले. हा धक्का मोठा होता. पण काही मित्रांनी पुढील सोयी होईपर्यंत वसतिगृहात तात्पुरता आश्रय दिला. 

स्वामी असे का वागले? 

मला वाटते पहिल्या वर्षीच्या माझ्या वास्तव्यात वसतिगृहात घडलेल्या एका प्रसंगाशी याचा संबंध असावा. प्राध्यापक स्वामी हे अविवाहित होते व साधारणतः त्यावेळी चाळीस एक वर्षांचे असून, कॉलेजात इंग्रजीचे अध्यापक होते. तशी विशेष हुशारी नव्हती, पण संस्थेचे आठ-दहा वर्षे सेवा झाल्याने भाऊरावांनीच त्यांना वसतिगृहाची रेक्टरशीप दिली होती. ते थोडेसे विक्षिप्त वागत व शीघ्रकोपी होते. दररोज सकाळी सातच्या सुमारास ते आपल्या खोलीच्या दरवाजा बंद करून (खिडक्या बंद करायचा प्रश्न नव्हता!) अर्धा-एक तास स्वतःला बंद करून घेत. व त्यावेळी कोणाला दरवाजा खटखटविण्याचा अधिकार नव्हता. सहाजिकच मुलांना कुतूहल होते. सर एवढा वेळ एकटे करतात? बहुदा काही योगासने ध्यान करीत असावे. पण मुलांची उत्सुकता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, आणि एक दिवस काही अतिउत्साही मुलांनी आमच्या खोलीत येऊन, खुर्च्या दगड रचून वरील झरोक्यातून डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला.  खालील दगड घसरल्याने आवाज झाला व स्वामींच्या ते लक्षात आले की वरच्या वरून कोणीतरी पाहण्याचा प्रयत्न करीत आहे.  आमची खोली त्यांच्या खोलीला लागूनच होती, त्यावेळी खोलीत मी अरुण होतो, बाकीची मुले एव्हाना पसार झाली होती. स्वामींना अरुण निरागस गंभीर चेहऱ्याकडे पाहून त्याचा अजिबात संशय आला नाही, मात्र मला हसू फुटले होते, त्यामुळे स्वामींचा संशय माझ्यावरच बळावला व त्वरित यांनी शिक्षा म्हणून मला वसतिगृह  सोडण्या सांगितले. मी व अरुण ने खूप समजावले. दुसरी मुले येथे आली होती असेही सांगितले पण स्वामींचा रागाचा पारा खूपच वर गेला होता.  ते कोणाचे ऐकेनात, मला त्वरित खोली खाली करण्याचे फर्मान काढले. तो रविवारचा दिवस होता व त्या परक्या शहरात माळरानाच्या वस्तीत, शहरापासून चार-पाच मैल दूर असलेल्या वसतिगृहातून मी कुठे जाणार होतो? मला काहीच सुचेना, रडू फुटले. आप्पांची आठवण झाली, पुस्तके व कपडे भरले व वसतिगृहातून बाहेर पडलो.  सकाळीची वेळ होती, अरुणही बरोबर आला. वसतिगृहपासून थोड्याच अंतरावर कॉलेजची बाग होती. काही आंबा-पेरूची झाडे त्यात होती व राघू नावाचा माळी या बागेची देखभाल करीत असे, तेथेच त्यांचे तेथे झोपडे होते. आमची थोडी ओळख होती, त्यामुळे त्यावेळी मला तो मोठा सहारा वाटला राघूला सगळी हकीकत कळल्यावर, त्याला ही वाईट वाटले. स्वामींचा रागही आला. तू काळजी करू नकोस बागेत अभ्यास कर व आज रात्री माझ्या टपरीत झोप  एवढे आश्वासन दिल्यावर खूप बरे वाटले.  मी आरामात पुस्तकं काढून झाडाखाली बसलो व अरुणला  परत पाठवून दिले. त्याला म्हटले शहरातील कोणा मित्राकडे राहण्याची चौकशी कर, इकडे स्वामींना कल्पना नव्हती की एवढ्या लवकर मी त्यांचा निर्णय मान्य करून निघून ही जाईन. त्या दिवशी रविवारची फीस्ट (मिष्टान्न जेवण) होती व जेवणही न घेता मी वसतिगृह त्वरित सोडल्याचे जेव्हा इतर मुलांकडून कळले तेव्हा त्यांनाही आपली चूक कळली असावी. संध्याकाळच्या सुमारास ते जेव्हा शहरातून वसतिगृहाकडे आले तेव्हा त्यांना सर्व हकीगत कळली व राऊत बागेत मुक्काम ठोकून आहे हे कळल्यावर त्वरित त्यांनी, अरुणला मला वसतिगृहावर परत बोलाविण्यासाठी पाठवले. पुढे खेद वगैरेही व्यक्त केला, पण तेव्हापासून मने दुरावली ती कायमची. आमचा हा वाद वाढवण्यामध्ये  वसतिगृहातील माझा अभ्यासातील एक प्रतिस्पर्धी विद्यार्थी होता. हे नंतर मला कळले, पण याच प्रकरणामुळे स्वामींनी पुढील वर्षी मला इंगा दाखवला हे नक्की!

आता विचार, दुःख करण्यात वेळ घालवण्यापेक्षा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा, पुढील सोय करण्याच्या खटपटीत लागलो. कॉलेज सुरू झाले होते, आठ-एक दिवस नुसतेच धावपळीत गेले.  शेंडगे नावाचा माझा वर्गमित्र, सातारा कॅम्प मध्ये कॉलेज पासून दहा मिनिटांच्या अंतरावर खोली घेऊन राहत होता. त्याला अभ्यासात मार्गदर्शनाची जरुरी होती, त्याने आपल्या खोलीवर मला पार्टनर घेतले व राहायचा प्रश्न सुटला. आता जेवणाचे काय करायचे? शेंडगे महाराज स्वतः आचारी होते. कुस्तीमध्ये प्रवीण असल्याने, पहिलवानाला साजेसा खुराक व व्यायाम करीत तब्येत कमावली होती. त्यांनी मला विचारले, आपण दोघे मिळून जेवण करू, जेवण बनवायचे काम माझे, तू मला सामान आणणे, भांडी साफ करणे, अशा इतर कामात मदत कर. सुरुवातीस हे मला खुप बरे वाटले, म्हटले आयते जेवण तयार मिळणार! पण जेव्हा प्रत्यक्ष कामास लागलो तेव्हा कळले गहू विकत घेऊन, निवडून, दळून आणणे, व त्याचे पीठ चाळून डब्यात भरून ठेवणे, हे एकच काम किती वेळ खाऊ आहे! त्याशिवाय भाज्या, डाळी, हे सर्व सातारा शहरातून घेऊन येणे, वगैरे कामे खूपच वेळ घेणारी होऊ लागली. पण मी करार मोडला नाही, कॉलेज व्यवस्थित सुरू झाले. अभ्यासात माझी मदत होऊ लागली, म्हणून तोही खूष होता. दोन-अडीच महिने व्यवस्थित चालले होते, वेळ वाया जात होता, पण रात्री जागरणे करून भरपाई करीत होतो. आता, कॉलेजचे वाचनालय थोडे दुर पडे म्हणून आधी मधे तेथे जात असे. एरवी खोलीतच अभ्यास होई. आणि विशेष म्हणजे विजेचा दिवा होता. 

 एक दिवस अशोक व रमेश दोघे माझ्या खोलीवर आले. दोघांचे चेहरे पडले होते, त्यांना वसतिगृहाचे जेवण पसंत नव्हते, व तेथे अभ्यासही होत नव्हता. शेंडगे छान जेवण करतो तेव्हा, आम्ही दोघेही तुझ्याबरोबरच राहून, आपण चौघे मिळून काम वाटून घेऊ. एकत्र येऊन अभ्यासही ठीक होईल असे त्यांचे  म्हणणे होते. मला व शेंडगे ला हे पसंत नव्हते, कारण जागा अपुरी पडणार होती. अशोक, रमेश यांनी वसतिगृहात राहणे चांगले होते. कारण त्यांच्या वर्गातील मुले तेथे होती. एस ए पाटील सरांसारखे लोक अजूनही वसतिगृहावर येऊन गणित शिकवत होते, व त्याची इथे मोठी उणीव भासत होती. पण शेवटी दोघेही हट्टास पेटले व शेंडगेने मन मारून त्यांचे स्वागत केले, नवीन पर्व सुरू झाले. एकदा संकटे येऊ लागली कि एकामागोमाग एक अशी येतात याचा हे वर्ष म्हणजे नमुना ठरले. 

अशा रीतीने आम्हा चौघांची ‘सहकारी खानावळ’ सुरू झाली. थोडे दिवस गेल्यानंतर शेंडगेने कामाच्या विभागणी बद्दल कुरबुर सुरू केली. आम्ही तिघे कामे वाटून घेत होतो, पण चपात्या व जेवण बनवण्याचे त्याचे कामे वाढले होते.  शेवटी पोळ्या करण्याचे कामही आम्ही घेतले. अभ्यासाच्या बाबतीत ही, गर्दी वाढल्याने, व रमेश व अशोक तेवढे उत्साही नसल्याने, शेंडगे तक्रार करू लागला.  

तो अतिशय मेहनती व महत्त्वाकांक्षी मुलगा होता. मराठवाड्यातील एका गावातून शिक्षणासाठी साताऱ्यास आला होता. कोणतेही शिक्षणाचे संस्कार नसताना, व बुद्धीची साथ नसताना, केवळ मेहनतीच्या जोरावर त्याने कॉलेज पर्यंत मजल मारली होती. वयाने आम्हापेक्षा तीन एक  वर्षांनी मोठा होता, पण इंजिनिअरिंगला जाण्यासाठी त्याची सारी धडपड सुरू होती. म्हणून जेव्हा त्याला हवे असलेले वातावरण व मनासारखी सोबत मिळेना, तेव्हा त्याने आम्हाला दमबाजी करून पाहिली. मी त्याला हवा होतो, पण माझे गावातले मित्र, त्याला नको होते. माझी त्रिशंकू अवस्था झाली होती. कारण रमेश-बबनला असे सोडून देणे मला पटत नव्हते. शेवटी कसेबसे या टर्म पुरते, आपण येथे राहू या, अशी समजावणी  करून आम्ही ऑक्टोबर पर्यंत त्या रूमवर राहिलो. अभ्यासावर तर खूपच ताण आला होता, त्यामुळे पहिली सहामाही काही ठीक गेली नाही. परिणाम मार्कांवर झाला, जेमतेम मी पास झालो, मात्र रमेश व बबन काही विषयात अनुत्तीर्ण झाले. 

दिवाळीच्या सुट्टीनंतर आम्ही पुन्हा एकत्र आलो तर आणखी एक नवीन संकट उभे होते .  शेंडगे आमच्या आधीच रूमवर दोन दिवस आला होता व आम्ही गेल्यागेल्या त्यांनी गुड न्यूज दिली घर मालक आपल्याला रूम द्यायला तयार नाही दुसरी सोय करा म्हणतो! आम्हाला काही कळेना आमच्या कुरबुरी आपसात होत्या घरमालकाला काही त्रास नव्हता कारण त्यांची मंडळी वरच्या मजल्यावर राहत होती भाडे वगैरेही आम्ही लोक व्यवस्थित भरत होतो मग असे कसे झाले? चौकशी केल्यावर घरमालकांकडून कळले की, आम्ही खाली रहात असलेली खोली तळमजल्याचा  भाग होती व तळमजल्यावर सातारा शहराचे पीडब्ल्यूडी खात्याचे मोठे इंजिनिअर सहकुटुंब राहात होते. त्यांची तरुण मुलगी देखील आमच्या कॉलेजात, परंतु कला शाखेत होती व कधीतरी सहज जाताना दृष्टीस पडल्यास आम्हा मंडळींशी ‘हॅलो’ करीत असे. तिच्या खडूस बापाच्या हे लक्षात आल्यावर पुढच्या सहामाहीत ही ब्यादच नको, म्हणून त्याने घर मालकाला सांगून आमची खोलीही त्यालाच हवी आहे हे पटवले व त्याचे वजन पाहता घर मालकाला आम्हास नारळ देण्याचा निर्णय घ्यावा लागला! पुनश्च हरिओम म्हणायची पाळी आली!

आता पुन्हा कोठे निवारा  शोधायचा ? दुसरी सहामाहि सुरू झाली होती,महत्त्वाचे वर्ष होते व आम्हाला राहायची सोयही  झाली नव्हती. पहिल्या सहामाहीत ‘बारा वाजलेच होते’ सर्वच दृष्ट्या कसोटी चालू होती. एक बरे  झाले आता आम्हा सर्वांचा राग घरमालकाकडे वळल्याने शेंडगे देखील नवीन खोलीच्या तपासात फिरू लागला व सर्वांनीच एकत्र राहण्याबद्दल एकमत झाले. थोड्या दिवसात त्याच भागात एक खोली मिळाली, ती एक बैठी चाळ होती व त्या  मध्येच एक खोली आम्हाला मिळाली.दोन खोल्यांमधील भिंत वर उघडीच होती. खोली सरळसोट आठ बाय पंधरा फुटी असेल . मध्ये काहीच सोय नव्हती फक्त एक विजेचा दिवा तेवढा होता जुनी चाळ असल्याने वरची कौलेही कोठे कोठे तुटली होती आणि कोळीष्टके माजली होती. काही का असेना आमची झोपायची सोय झाली होती, अभ्यासाला आम्ही खोलीबाहेर  अंगणातच बसत असून कारण आत बसले की शेजारील दोन बिऱ्हाडांच्या चुलींचा धूर डासांना पिटाळण्याबरोबरच आम्हालाही खोली बाहेर काढीत असे!अभ्यास आटोपल्यावर अकरा साडे अकराच्या सुमारास झोपण्यास जात असू, तर शेजारील ड्रायव्हरच्या बिऱ्हाडात तमाशा सुरू असे कारण हे दादा दारू ढोसून, रोज खूप दिवसांनी आल्याने, नवरा बायकोचे नेहमी खटके उडत असंत! त्या  दिवसांची आठवण झाली की अजून गंमत वाटते व अंगावर शहारेही येतात!

राहायची सोय  कशीबशी,जेवायच्या सोयीसाठी एकादशी व अभ्यासाची ऐशीतैशी अशी अवस्था त्या दिवसात झाली होती. आमच्या दोन मित्रांनी तर कॉलेजचे पहिले वर्ष ‘टिळकांप्रमाणे देवाला’ अर्पण करायचा निर्णयच  करून टाकला होता त्यामुळे त्यांचे सुखाने दिवस जात होते. उशिरा उठणे, व्यायाम ,पोहणे,कधी सिनेमा तर कधी गावात जाऊन उत्तम भोजन! पण संध्याकाळच्या जेवणाची सोय होत नव्हती, सकाळी कॉलेज कॅन्टीन मध्ये उसळ पाव खाऊन राहात असू संध्याकाळी शेंडगेने  जेवण बनवायचे बंद केले व ते बरोबरही होते. रमेश ने मार्केट सर्व्हे करून (कारण वेळ भरपूर होता) बातमी आणली की आमच्या समोरच्या चाळीत एक मुसलमान कुटुंब रहात असून त्यांना कोणी जेवणासाठी पेइंग गेस्ट हवे आहेत. महिन्यात २५ रुपये देऊन, ते आठवड्यातून दोन दिवस मटण रस्सा ही देण्यास तयार आहेत. मुसलमान म्हटल्यावर शेंडगेच्या  चेहऱ्यावर नाराजी उमटली. तो टिळा लावणारा वारकरी पंथी होता पण शेवटी हो ना करता त्याच्यासाठी स्वतंत्र शाकाहारी जेवण बनवायचे त्या गृहस्थाने मान्य केले व आम्हास संध्याकाळचे जेवण खोलीवर येऊ लागले. पोळ्या, भात, भाजी, कोशिंबीर व कधी मटण असे खरेच चवदार जेवण त्याची बायको बनवीत असे. पण आम्हाला कुठे ठाऊक होते हा ‘मृगजळाचा’ भास होता!

हा खाणावळवाला महिन्याचे पूर्ण पैसे आगाऊच घेऊन ठेवी व नोव्हेंबर-डिसेंबर दोन महिने उत्तम चालले होते.  जेवणाचा दर्जा व आकार ठीक असे ,भूक लागत असल्याने ते जेवण बरे वाटे ! जानेवारीचे ही पैसे आम्ही भरले, दोन-तीन दिवस जेवण आले, चौथ्या दिवशी, रात्र झाली तरी जेवणाचा पत्ता नाही, म्हणून आम्ही सहजच चौकशीसाठी चालत त्या माणसाच्या चाळीवर गेलो होतो, त्या खोलीला कुलुप! वाटले कोठे बाजाराला गेले असतील, उशिरा येतील, पण  शेजारी चौकशी केल्यावर कळले की सकाळी एक टेम्पो आला होता त्यात सर्व सामान भरून ती मंडळी गावाला कायमची गेली आहेत! आम्हाला मोठाच धक्का बसला.  गृहस्थ मुसलमान असला तरी तो, त्याची बायको व दोन मुले उत्तम मराठी बोलत. चेहऱ्यावरुनही  गरीब व सालस वाटत होता. व अशा रीतीने सरळ सरळ आम्हाला हा शेंडीला लावेल याची आम्हास अजिबात कल्पना नव्हती. आमच्याप्रमाणे आणखीही ही चार-एक  पोरांची अशीच फसवणूक झाली होती पण आम्हा पोरांना परीक्षेच्या काळजी पुढे त्याच्या मागे लागण्यासाठी वेळ कुठे होता? पैसे गेल्याचे दुःख होते तसेच पुन्हा नवीन सोय पाहायची झंझट करावी  लागणार होती. फेब्रुवारीत तर नऊमाही परीक्षाही जवळ आली होती! इंटर सायन्स चे वर्ष होते! नंतर शेजाऱ्यांकडून कळले कि, तो माणूस खरेच चांगला होता मात्र नुकतीच नोकरी गेली होती व जुगाराचे व्यसन असल्याने काही कर्ज झाले होते. त्यामुळे जे काही दीडशे-दोनशे रुपये मिळाले ते घेऊन त्याने  तात्पुरता आधार शोधला होता! मला मात्र तो महिना, एक वेळ उपवास व संध्याकाळी काही उसळ-पाव ,क्वचित राईस प्लेट जेवण करीत काढावा लागला. कारण माझी मनीऑर्डर आता फेब्रुवारीत येणार होती. आप्पांस त्यावेळी मी काहीच सांगितले नाही, कारण मला माहित होते…!

फेब्रुवारीत मात्र जेवणाची व्यवस्थित सोय झाली, जवळपासच्या वस्तीत एक विधवा बाईने मुलांसाठीच  एक खानावळ महिनाभर आधीपासूनच चालू केली. पैसेही महिनाअखेर घेइ व गरम गरम साधे शाकाहारी जेवण देइ .  विठाबाई हे तिचे नाव अजूनही आठवते. आम्ही पाटावर बसलो कि,ती पोळ्या करायला घेई व गरम गरम फुलके पानावर  टाकी. हात ही पटापट चाले, त्यामुळे गरम फुलक्यांचा तो खरपूस भाजल्याचा वास, चविष्ट आमटीबरोबर जेवताना एक तृप्तीचे समाधान देई. खूप दिवसांनी हे जेवण मिळत होते त्यामुळे अभ्यास ही नीट होत होता.  साताऱ्यातील अखेरच्या दिवसापर्यंत मी विठाबाइंची खानावळ सोडली नाही कारण माझ्या दृष्टीने ती ‘अन्नपूर्णा’ होती, सालस व गरीब होती, पैशापेक्षा माणुसकीचे मोल तीला जास्त होते व आम्हा सारख्या आईच्या जेवणास पारखे झालेल्या मुलांसाठी मी काहीतरी करते याचा तिला खूप आनंद होता! 

विठामावशी अकालीच विधवा झाल्याने मुलेबाळे नव्हती, भावांच्या आश्रयाने राहत होती व स्वावलंबी होती.  त्यावेळी ती पन्नाशीत होती पण कधी त्रागा म्हणून करीत नसे, कधी उशीर झाला तरी हातपाय धुवून पुन्हा चुलीजवळ बसे, गरमा गरम  पोळ्या देई. माझ्या मनात तिची स्मृती कायम घर करून आहे. सातारा सोडल्यानंतर वाटले, आपण खास विठामावशींना भेटण्यासाठी एक साडी घेऊन जावे. पण आम्ही एवढे स्वार्थी आहोत की हे फक्त विचारच राहतात, नेहमीच्या पोटापाण्याचा  धावपळीत कधीतरी ते संपूर्ण विसरले जाते मात्र आज या लिखाणाच्या निमित्ताने तिला स्मरण करून विनम्र प्रणाम करतो!

ह्या चाळीतील दिवस हे असे चालले होते.  नऊमाही परीक्षेत काही विशेष करून दाखविता येणे शक्यच  नव्हते. रमेश अशोक तर त्या परीक्षेत बसलेही नाहीत. खोलीतील धुर, ड्रायव्हर दादाची भांडणे, अपुरी जागा इत्यादी सर्व गोष्टीमुळे त्यांनी काही दिवसांनी, आपल्या दुसऱ्या एका मित्राच्या खोलीवर स्थलांतर केले. आता मी व शेंडगे  दोघेच ह्या खोलीत राहू लागलो ! शेंगडेचाही मुड आता मजेशीर असे !पहिलवान गडी होता व बारा गावचे पाणी चाखले होते! तमाशाचा ही शौकीन होता हे देखील कळले ,साताऱ्याला येऊन एकही तमाशा पाहिला नाही ही त्याची खंत होती एक दिवस त्याने मला ही सोबत घेऊन ती ‘इच्छा पूर्ण केली’!

रात्री असेच जेवून  आम्ही बाहेरच्या दिव्याखाली अभ्यासास  बसलो होतो. थंडीचे दिवस होते, सातारची थंडी कडकच असते! रात्रीच्या शांततेत ढोलकीचा आवाज ऐकू आला व शेंडगे महाराज बिथरले . त्यांनी चौकशी केलीच होती. भाऊ बापू मंगू यांचा  सुप्रसिद्ध ‘फड’ शेजारच्या मार्गावर तंबू टाकून होता. कुडकुडत्या थंडीत त्या माळावरच्या तंबूमध्ये पाहिलेला तो तमाशा, व तेथील वातावरण मी कधी विसरणार नाही! तंबाखू पानाच्या पिचकार्‍या टाकणारे फेटेवाले मंडळी, भडक  रंगरंगोटी व चापून-चोपून केलेल्या पोशाखामुळे मादक वाटणाऱ्या नर्तिका, दौलत जादासाठी चाललेली त्यांची जवळीक, सर्व इतके विभत्स वाटत होते कि, मी तरी त्यानंतर कोणत्याच तमाशाला गेलो नाही- मात्र कानात अजून घुमत होते तेथील एका गाण्याचे बोल… 

“माझ्या इहिरीवर इंजन बांधा …”

वार्षिक परीक्षा ही झाली. थोडे  दिवस प्रॅक्टिकल परीक्षेसाठी थांबावे लागले व मला वाटते एप्रिलच्या अखेरीस मे 1961 साली  मी पुन्हा बोर्डी गावी सातारा शहर व कॉलेजला अखेरचा जय महाराष्ट्र करून पुन्हा परत आलो . वार्षिक परीक्षेच्या निकालाची वाट पाहण्यासाठी! मात्र एक सल सतत वाटत होती, आता पुन्हा साताऱ्याला जायचे नाही! आता मुंबई जिंदाबाद!

साताऱ्याच्या दोन वर्षाच्या कालावधीत, विशेषतः पहिल्या वर्षी वसतिगृहातील काही गमतीजमती घडल्या, मजेशीर अनुभवही आले, अविस्मरणीय अशा कोयना-हेळवाक सहल झाली . जवळच असलेल्या समर्थ रामदासांच्या चाफळ येथील समाधीचे दर्शन झाले, वाईला कृष्णेचे घाट पाहिले. महाराष्ट्रातील त्यावेळी गाजलेल्या विष्णु बाळा पाटील खटल्यातील आरोपी विष्णू बाळा ची  लोकप्रियता प्रत्यक्ष पाहिली. छत्रपती शिवरायांचे वंशज राहत असलेल्या ‘जलमंदिर’ राजवाड्याचे व तेथील भवानी तलवारीचे दर्शन घेतले. अनेक बरेवाईट अनुभव घेतले पण दिवसच असे होते की त्या सर्व अडचणींवर मात करून पुढे पुढे जायचे असा निश्चय झाला होता. त्यामुळे त्यावेळी काही विशेष करत आहोत असे वाटले नाही, आमचा रूम पार्टनर सासवडे खूप गंमत्या  प्राणी होता, बहुदा स्वामी रेक्टरच्या प्रसंगामध्येही तोच मोरक्या असावा. पण स्वतः लांब राहून. अशीच एकदा त्याने जीवघेणी थट्टा आमचा दुसरा पार्टनर प्रभाकर न्हावी याची केली. नशीब बलवत्तर म्हणून ते दोघेही यातून बचावले. प्रभाकर खूपच मेहनती व वक्तशीर विद्यार्थी होता, इंटर सायन्स चे वर्ष असल्यामुळे रात्री बारा एक वाजेपर्यंत आपल्या कंदिलाचे रॉकेल जाळीत अभ्यास करायचा व पुन्हा पहाटे ५ चा गजर लावून झोपी जायचा.  पाचला उठायचा ,केवळ ४-५ तास झोप घेत असे. एकदा सासवडेने उचापत केली, प्रभाकर १२ ला झोपी गेल्यावर ही स्वारी गुपचूप कुठली व घड्याळाचे काटे तीन तास पुढे फिरवले! अर्थातच पाच वाजता गजर झाला (प्रत्यक्ष तेव्हा २ वाजले होते.) व प्रभाकर डोळे चोळीत उठला! मी आणि अरुण ला याची कल्पना नव्हती, प्रभाकर नेहमी पाचला उठून आम्हाला तासाभराने उठवीत असे मात्र त्यादिवशी प्रभाकरला ही समजेना झोप कमी कमी का वाटतेय? बिचारा सकाळी पाचला उठून व्यायामासाठी सातारा-माहुली रस्त्यावरून रनिंग करत असे व  येऊन आंघोळ करीत असे. नेहमीच्या सवयीप्रमाणे, त्यादिवशी मात्र भल्या पहाटे दोन वाजता, स्वारी रस्त्यावर धावत सुटली! आजूबाजूला उसाची, भुईमुगाची शेते होती व काही मजूर शेतकरी शेतात राखणीला झोपले होते, आपल्या शेताकडून धावत जाणारी मानव आकृती पाहून ही मजूर मंडळी घाबरली मात्र चोर समजून प्रभाकरच्या मागे धावू लागली. ही भुताटकी कि काय हे वाटून प्रभाकर ही ‘बचाव-बचाव’ ओरडला! वसतिगृहाकडे जीव घेऊन जाऊ लागला! बाकी कोणाला याचा काही पत्ता नव्हता! शेवटी त्या मजुरांनी प्रभाकरला पकडल्यावर त्यांना सर्व खुलासा झाला, वाईटही वाटले, पण तोवर प्रभाकरचा जीव अगदीच अर्धमेला झाला होता.  रात्री तीन वाजता जेव्हा आपल्या खोलीच्या दारावर थाप पडली तेव्हा सासवडे साहेब ढाराढूर झोपले होते! आम्ही दार उघडले तर दोघे मजूर घाबरलेल्या प्रभाकरला घेऊन दारात उभे होते. व प्रभाकरलाही हे झाले कसे हे कळत नव्हते! आम्हीही पेचात होतो पण सासवडेने शेवटी खूप उशिरा ‘गजराचे’ गुपित फोडले तेव्हा खरा गुन्हेगार कळला, पण तोवर प्रभाकरने ही हे प्रकरण हसण्यावारी नेले होते. मात्र कोणी खूनशी माणसे त्यावेळी भेटली असती तर प्रभाकरचे या मध्यरात्री भयाण रस्त्यावर काय झाले असते याचा विचार केला तर आजही माझ्या अंगावर काटा उभा राहतो!

मात्र प्रभाकरला काहीतरी कुणकुण लागली असावी व आम्हा तीन पार्टनर्स बद्दल त्याच्या मनात कोठेतरी अढी उभी राहिली होती त्यामुळेच की काय कोण जाणे पण त्यानेही एकदा आम्हा तिघांना चांगलेच पेचात आणले व आम्हाला शिक्षा भोगावयास  लावली.

बेलोसे नावाचा आमचा शेजारील खोलीतच राहणारा मुंबईकर होता. त्याचे वडील त्यावेळी मुंबईचे नगरसेवक/ महापौर, कोणीतरी मोठे व्यक्ती होती .केवळ भाऊरावांच्या  प्रेमाखातर व आपल्या उडाणटप्पू चिरंजीवस स्वावलंबनाचे धडे मिळावे म्हणून या गृहस्थांस बापाने साताऱ्यास पाठवले होते व त्यामुळे बापावरील राग तो अभ्यासावर काढून ‘जिवाचा सातारा’ करीत होता. तो  अरुणचा चांगला मित्र होता व दोघेही शहरातील चित्रपटगृहात कोणता नवीन चित्रपट आला की जोडीने जात असत. एकदा ‘बरसात’ हा राज कपूरचा प्रसिद्ध चित्रपट पाहण्यासाठी त्याने अरुणला बोलावले व अरुणने सासवडेला ‘बरसात’ची महती  पटवून आम्हासही बरोबर येण्यास तयार केले! साताऱ्यातील दोन वर्षात पाहिलेला पहिला आणि शेवटचा चित्रपट! रात्री बाहेर जाण्यासाठी रेक्टरांची परवानगी घ्यावी लागे व चित्रपट पाहण्यासाठी तर परवानगी मिळवणे अशक्य होते. बेलोसेचे  तिन्ही पार्टनर बरोबर होते त्यामुळे त्यांनी किल्ली घेतली होती, आमच्याकडे एक किल्ली होती. पण प्रभाकर खोलीला आतूनकोयडा घालणार असल्याने आम्हाला त्याच्या मदतीशिवाय दार उघडणे शक्य नव्हते. रात्री बाराच्या सुमारास आम्ही परत आलो तेव्हा बेलोसे मंडळी पटकन कुलूप उघडून खोलीत कशी गेली कळले देखील नाही, मात्र आम्ही तिघांनी जोरात दार ठोठावून सुद्धा प्रभाकर आतून  कडी खोलेना. कदाचित खरोखरच ‘गाढ’ झोपला असेल! मात्र या गडबडीत समोरच्याच खोलीतील रॅक्टर स्वामींना जाग आली, त्यांनी आम्हा तिघांना रंगेहात पकडले आणि मग काय! पुढील आठवडाभर भोजनालयात भाजी साफ करणे, भांडी साफ करणे ही शिक्षा आणि सर्व सहाही मित्रांच्यावर ‘बरसातमे-ताक धिनाधीन’ असे उपरोधिक टोमणे! त्या प्रसंगामुळे देखील पुढे घडलेल्या माझ्या बडतर्फीवर परिणाम झाला असावा असे वाटते!

 या कॉलेजच्या दिवसातील काही मनोहर रम्य आठवणी देखील आहेत.1960 चाली कोयना धरणाचे बांधकाम चालू होते व सुमारे शंभर किलोमीटर असलेल्या या ठिकाणी  सायकलवरून स्वारी करण्याचे मुलांनी ठरवले. रेक्टर स्वामी ही बरोबर येणार होते! दुपारी आम्ही तीन वाजता निघालो व मजल-दरमजल करीत पाटण, उम्रज अशी गावें करत  साधारणतः आठ च्या सुमारास कोयनानगर च्या अलीकडे कोणत्यातरी गावाजवळ आलो. अजून तासभर प्रवास करायचा होता पण कृष्णा कोयनेचे संगम तेथे होत असल्याने थोडे थांबून, काही फराळ करून पुढे जायचे होते. पौर्णिमेचा  किंवा त्याच्या पुढचा मागचा दिवस असावा, पूर्णचंद्र बिंबाच्या त्या चंदेरी प्रकाशात कृष्णा-कोयनेच्या निवांत संगम स्थळी, शांत वातावरणात आम्ही घालवलेला तो एक तास, म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. शरीर थकलेले होते, त्यामुळे निसर्गदेवतेच्या त्या नयनरम्य परिसराने जी उभारी दिली, त्यामुळे ही असेल त्या दिवसाचे दृश्य केवळ दोन नद्यांच्या संगम म्हणून राहिलं नाही तर ते आमच्या मनाचे निसर्गाशी झालेले अनुपम मिलन होते. म्हणूनच अत्यानंद देणारा होते! आजही ‘कृष्णा मिळाली कोयनेला…‘ हे गाणे ऐकले की ते दृश्य डोळ्यासमोर येते.

कोयनानगरच्या सरकारी विश्रामधामात विश्राम घेऊन आम्ही दुसरे दिवशी हेळवाक येथे जाण्यास निघालो, पाय दुखत होते व उन्हात घशाला कोरड पडत होती. डोंगर घाटाच्या रस्त्याने पाणी पिण्यासाठी कोणी अनामिकांनी,  खडकाच्या फटीतून झिरपणारे पाणी, पोकळ लाकडी नळीवाटे बाहेर काढले होते. बाहेर उन्हाचा ताप होता, तरी ते ठिबकणारे अमृततुल्य थेंब थंडगार होते. खाली आ वासून थेंबाथेंबाने आलेल्या त्या पाण्याची चव… त्याला तुलनाच नाही! तोही एक अविस्मरणीय अनुभव होता!

त्या दिवसात घडलेली एक पावन यात्रा म्हणजे स्वामी समर्थांच्या सज्जनगडास भेट. हे ठिकाण, आमच्या वसतिगृहापासून ८-१०  मैला वर होते व सायकलवरूनच समर्थांच्या चरणाने पावन झालेल्या या परिसरात फिरताना खूप धन्य धन्य झालो. त्याचवेळी कश्मिरा प्रिन्सेस नावाचे एअर इंडियाचे विमान अपघात ग्रस्त झाले होते व त्या विमानाचे वैमानिक कॅ.जठार हे महाराष्ट्रीयन होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांनी बांधलेल्या पहिल्या दोन पायऱ्या त्यावेळी अगदीच नवीन असल्याने उठून दिसत होत्या आणि म्हणूनच खास लक्षात राहिल्या आहेत! 

सज्जनगड
अजिंक्यतारा

अजिंक्यतारा किल्ला तर आमच्या कॉलेज समोरच होता, त्यामुळे आज पाहू उद्या पाहू करता करता शेवटी सातारा सोडण्याच्या आधी अवघे काही दिवस गडावर करण्याचा योग आला. किल्ल्याची अगदी दशा झाली होती व जेथे  चांदबिबीस बंदिवान केले होते, तो चांदबिबी महाल ही मोडकळीला आला होता.

साताऱ्याच्या वास्तव्यातील एक प्रेक्षणीय प्रसंग देखील लक्षात आहे. ‘विष्णु बाळा पाटील खून खटला’ हा त्या काळातील एक गाजलेला खटला होय. विष्णू बाळा हा, वाळवे तालुक्यातील एक चांगला मध्यमवर्गीय सुशिक्षित शेतकरी परंतु गावातील काही धनदांडग्यांनी  आपल्या वहिनीवर अत्याचार केले; म्हणून एका मागून एक त्याने अनेकांना योजनापूर्वक यमसदनी पाठवले; कारण पोलिस यंत्रणा त्याला साथ देत नव्हती. या त्याच्या कृत्यामुळे जरी पंचक्रोशीतील जनता त्याच्यावर बेहद खुश होती, तरी शासन यंत्रणेच्या दृष्टीने तो खुनी गुन्हेगार होता. खूपच प्रयत्नांनंतर जेव्हा त्याला पोलिसांनी पकडले व साताऱ्याच्या सेशन्स कोर्टात बेड्या घालून आणले, त्यावेळी आम्ही आवर्जून त्याला बघण्यासाठी गेलो होतो. प्रचंड गर्दी उसळली होती, त्याच्यावर पहारा ठेवून त्याला हिणवणार्‍या पोलीस अधिकाऱ्याने गुर्मीत सिगरेट काढून शिलगावली. विष्णूलाही सिगरेट पिण्याची तलफ आली, पण जवळ सिगारेट नव्हती. त्याने केवळ खुणेने जमलेल्या जमावाच्या दिशेने सिगारेट काडीची खूण केली आणि काय नवल! क्षणार्धात  त्याच्यावर उंची सिगरेट व काड्यांचा व लाईटचा नुसता वर्षाव झाला. आमच्यासारखी ‘बघी’ मंडळी आ वाचून पाहत राहिली. त्या वेळेचा कडकडीत इस्त्रीचा शर्ट, धोतर व मंदिल (फेटा) घातलेला रुबाबदार विष्णू डोळ्यासमोर येतो, पुढे त्याला फाशी झाली असे वाचले. 

त्यावेळी बोर्डीहुन साताऱ्याला गेलेल्या आम्हा तरुणांकडून आत्माराम राऊत, जयवंत यांनी आपली बी. ए ची पदवी घेतली. आत्माराम पुढे बी.ए. ही तेथूनच झाला. मात्र शास्त्र शाखेकडेच गेलेल्यांपैकी सुभाष धुरी, रमेश, अशोक, हिराकांत काही तेथे शिक्षण पूर्ण करू शकले नाही. मी दोन वर्षांनी मुंबईत आलो, अरुणनेच साताऱ्याहून बी.एस.सी.ची पदवी घेतली मात्र पहिल्या वर्षी अरुण देखील कित्येक वेळा कॉलेज सोडून द्यायचे ठरवीत असे व तसे घरी कळवीत असे. त्यावेळी राजाभाऊ पाटील स्वतः साताऱ्याला व त्याची समजूत काढलाय आले होते. दोन एकदा असे झाले होते.  त्याच कालावधीत अरुणची थोरली बहीण शरयू हिची पत्रे त्याला येत. मलाही अरुण ती दाखवत असे, त्यामुळेच शरयूचे प्रगल्भ विचार व जीवनविषयक दृष्टिकोन त्या पत्रातून स्पष्ट डोकावत असत. ती खूपच भावनाशील व हुशार होती, तिच्या पत्रातील एक वाक्य माझा कायमचे लक्षात आहे “तुम्हा सारख्या, पैशाचे वा इतर कोणाचेही पाठबळ नसलेल्या तरूणांना शिक्षण घेण्याची ही सुवर्णसंधी आहे, शिक्षण हे एक शक्तिमान आयुध, आयुष्यात मिळवलेच पाहिजे.” या व अशा अनेक विचार धनाने आम्हास त्यावेळी खूपच धीर मिळाला, कष्ट करण्याची शक्ती मिळाली. नंतर शरयू मुंबईस भेटायची तेव्हा, मी हे तिचे ऋण मान्य केल्यावर ती केवळ हसली होती दुर्दैवाने शरयू व तिचे यजमान श्री. रघुवीर पाटील अकाली गेले व एका सुसंस्कृत, धडपडणाऱ्या दांपत्याचा शेवट झाला. 
साताऱ्यात मी काय कमावले? काय गमावले? या दोन वर्षात निश्चितच खूप शारीरिक, बौद्धिक शक्ती खर्ची पडली व तसा आहार न मिळाल्याने, वजन घटले, चेहऱ्यावरची हाडे ही दिसू लागली होती, हे त्यावेळचे माझे फोटो पाहून लक्षात येते. अभ्यासही पुरेशा उजेडात न करता असल्याने, मुंबईस आल्या आल्या चष्मा लागला! अभ्यासातही इंटर-सायन्सच्या परीक्षेतही विशेष यश न मिळाल्याने, मुंबई व पुण्यात इंजिनिअरिंग न करता बी.एस.सी.च्या पदवीचा अभ्यासक्रम निवडावा लागला. मात्र कामाच्या दृष्टीने खूप काही मिळवले. बोर्डीसारख्या छोट्याशा गावात आई-वडिलांच्या छत्रछायेखालीच चाललेली  सुरक्षित वाटचाल ही कोठेतरी वेगळ्या रस्त्याने व्हायलाच हवी होती, साताऱ्याने ती संधी दिली. मराठमोळी माणसे भेटली, चांगली-वाईट, स्वार्थी, प्रेमळ! त्यामुळे माणसांची पारख करण्यास शिकलो. आपण देखील काहीतरी करू शकतो, आपल्याहून गरीब व उपेक्षित विद्यार्थी जर पुढे जाऊ शकतात, तर आपणास यशस्वी होण्यास काहीच हरकत नाही. असा आत्मविश्वास साताऱ्याच्या वास्तव्याने दिला जो पुढील आयुष्यात खूपच उपयोगी पडला. सातारा कॉलेजचे माझ्यावर खूप मोठे ऋण आहेत!