लोकनेते अण्णासाहेब वर्तक व महानायक पद्मश्री भाऊसाहेब वर्तक – लोकोत्तर पितापुत्र

   

(10.10.1894-14.07.1953) पू.अण्णासाहेब वर्तक (डावीकडे)
(09.02.1914-7.10.1998)पद्मश्री भाऊसाहेब वर्तक(ऊजवीकडे)

   कै. अण्णासाहेब वर्तक व पद्मश्री भाऊसाहेब वर्तक या दोन पितापुत्रांची जोडी आमच्या समाजातच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारण या क्षेत्रात एक अद्वितीय उदाहरण आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या ज्या पितापुत्रांनी आपल्या अलौकिक सेवाभावी वृत्तीने समाजासाठी महान योगदान दिले त्यात आमच्या सोक्ष समाजातील ही जोडगळी अजरामर आहे यात शंका नाही. आमच्या समाजाचाच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रांचा इतिहास लिहावयास झाल्यास या  पिता-पुत्रांसाठी एक स्वतंत्र प्रकरण लिहावे लागेल. या दोघांच्या जीवनाकार्या संबंधात अनेक विद्वानांनी वेळोवेळी आपले विचार प्रकट केले आहेत, लिहून ठेवले आहेत. त्यामुळे मला त्यांचे विषयी जास्त भाष्य करण्याची आवश्यकता नाही. माझी तेवढी कुवतही नाही. मी माझ्या बालवयात अण्णासाहेबांना फक्त एकदाच ओझरते पाहिले होते. त्या उपर या महामानवाशी माझा कोणताच संबंध आयुष्यात आला नाही. मात्र सुदैवाने पू. भाऊसाहेबांच्या अल्प का असेना निकट सान्निध्याचे भाग्य मला मिळाले, आणि त्यामुळे या लेखात अण्णासाहेबांच्या तेजोमय जीवन कालांतील  काही महत्वाच्या  टप्प्यांचा उल्लेख करून विशेषतः आमच्या सोक्ष समाजाच्या निर्माणात लोकनेते म्हणून अण्णा साहेबांनी दिलेल्या योगदानाचे थोडक्यात महत्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

    भाऊसाहेबांचे मार्गदर्शन माझ्या विद्यार्थी दशेतच मिळाल्याने त्यातून मला दिसलेल्या एका तेजोमय व्यक्तिमत्वाचे दर्शन झाले. त्यातून मला समजलेल्या भाऊसाहेबांवर  लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. भाऊसाहेबांवर निघालेल्या गौरव ग्रंथांतून अनेक दिग्गजांनी भाऊसाहेबां संबंधी प्रकट केलेल्या विचारांचा सारांश दिल्याने आम्हाला अनभिज्ञ असलेल्या भाऊसाहेबांच्या कर्तृत्वाची दुसरी बाजू ही समजेल अशी अपेक्षा आहे.. 

     ज्या महानुभावांनी आमच्या संघाची 104 वर्षांपूर्वी स्थापना केली व समाज उपयोगी संस्था उभारल्या, त्यामुळेच आज आपण जे काही आहोत ते झालेलो आहोत. या संस्था उभ्या राहिल्या नसत्या तर ही प्रगती  झाली नसती. आपण कितीही हुशार असलो कर्तुत्ववान असलो तरी ज्या नेत्यांनी व शैक्षणिक संस्था मुळे आपण शिकलो त्याची जाणीव ठेवून व्यक्तिगत व सामाजिक जीवनात त्यांचे योगदान आपण मानले पाहिजे असे मला तीव्रतेने वाटते. त्या दृष्टीनेच आमच्या अण्णासाहेब वर्तक व भाऊसाहेब वर्तक अशा लोकत्तर नेत्यांची चरित्रे आपण लक्षात घेतली पाहिजेत.

   त्या पिढीतील आमच्या नेत्यांनी मूल्यांसाठी समाजकार्य व राजकारण केले. निश्चित मूल्यावर आधारित काम केले.त्यामुळेच ते सामाजिक व राजकीय जीवनात उच्च पदावर पोहोचले. दोघांनीही मंत्री पदापर्यंत पोहोचून अत्यंत चांगली कामगिरी केली. त्यांनी जपलेले त्यांचे विचार तरुणापर्यंत पोहोचविलेच पाहिजेत. आपल्याकडे आज भौतिक प्रगती झाली आहे पण सांस्कृतिक, नैतिक प्रगती झालेली नाही असे खेदाने म्हणावे लागते. भौतिक प्रगती बरोबर सांस्कृतिक, नैतिक प्रगती ठेवायची असेल तर लोकशाही व जमेल तेवढी लोकसेवा हे मूल्य महत्त्वाचे आहे.

      पू. अण्णासाहेबांचे जीवन कर्मयोग राष्ट्रभिमान आणि अध्यात्मिकता यावरच उभे होते. निष्ठेने प्रेरित होऊन त्यांनी आपले आयुष्य समाजसेवा व राष्ट्रसेवा या उद्दिष्टासाठी वाहिले. ‘तोंडात चांदीचा चमचा’, घेऊन जन्मलेल्या या लक्ष्मीपुत्राला खरे तर समाजसेवा करून लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची गरज नव्हती. पण त्यांच्या  जीवननिष्ठा वेगळ्याच होत्या. मूलतः ते समाजसुधारक होते. शेती सुधारणा,शिक्षण प्रसार, स्त्रियांना समान हक्क, हुंडाबंदी, स्वातंत्र्यसंग्रामातील साधना, ग्राम स्वराज्याचे स्वप्न, जिल्हा बोर्डाचे आर्थिक संवर्धन, स्थानिक स्वराज्याचे कार्य आणि सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाची स्थापना, हे त्यांचे कार्य अखिल महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे.

      सुमारे सव्वाशे वर्षे पूर्वीच्या आपल्या सोमवंशी क्षत्रिय समाजाची स्थिती अत्यंत दयनीय अशीच होती. अशिक्षित व व्यसनाधीन असलेला समाज अनेक अंधश्रद्धांच्या आहारी गेला होता.अण्णासाहेबांनी ते चित्र बदलण्याचा  निश्चय केला.

    बोर्डी, चिंचणी, विरार, मुंबई येथील सुशिक्षित मंडळींना हाताशी घेऊन समाज सुधारण्याचे काम सुरू केले. जानेवारी 1907 सालापासून बोर्डी व चिंचणी मधील समाज बांधवांनी ’ज्ञानवर्धक सभा’, हे मंडळ स्थापन केले होते. याच मंडळाच्या पुढाकाराने, 27 जानेवारी 1907 रोजी चिंचणी येथे कै. मोरेश्वर लक्ष्मण राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समाजाची परिषद भरली होती. ही परिषद म्हणजे पुढे होऊ घातलेल्या एका महान चळवळीचा पहिला ओंकार होता. यामागे चिंचणीचे परशुराम धर्माजी चुरी उर्फ तात्यासाहेब, बोर्डीचे आत्मारामपंत सावे आणि विरारचे गोविंद धर्माजी – अण्णासाहेब हेच मुख्य होते. याच मंडळींनी पुढे समाजव्यापी  ‘स्वयंसेवक मंडळाची’ स्थापना केली. त्या लोक जागृतीतून 2 मे 1921 रोजी वसई येथे सो. क्ष. समाजाची पहिली परिषद भरवण्यात आली. संघाच्या स्थापनेची हीच मुहूर्तमेढ होय. अण्णासाहेबांनी व्यासपीठावर उभे राहून, संघाची घटना सर्वांना दाखविली. आपले एक स्वप्न साकार होत आहे ही भावना त्यांच्या चेहऱ्यावर शब्दा शब्दातून प्रकट होत होती.

    पुढे 1935 साली चिंचणी येथे झालेल्या संघाच्या 15 व्या वार्षिक परिषदेचे अण्णासाहेब वर्तक अध्यक्ष होते. 1936 साली कायदेशीर रित्या ट्रस्ट खत तयार करून सोमवंशी क्षत्रिय समाज फंड ट्रस्ट स्थापन करण्यात आला .12 व 13 मे 1945 रोजी संघाचा रौप्य महोत्सव वसईतील श्री भाईजी जगू राऊत यांच्या वाडीत मोठ्या थाटाने साजरा करण्याचा आला. पंचवीस वर्षाच्या या कालखंडात सोमवंशी क्षत्रिय समाजाची सृहणीय प्रगती घडून आली होती. अण्णांसाहेबांच्या जीवनातील तो एक अत्यंत रोमहर्षक प्रसंग होता. 1950 साली  दादर येथील अमर हिंद मंडळाच्या जागेत चौकशी-पाचकळशी समाजातील निरनिराळ्या ऊपजातींचे एकीकरण करून ‘क्षात्रैक्य परिषदेची’, स्थापना करण्यात आली. अण्णासाहेबांच्या हस्तेच या पहिल्या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

  समाजसेवेबरोबरच अण्णासाहेबांचे महाराष्ट्रातील राजकारणावर ही बारीक लक्ष असे.1925 मध्ये नवीन महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीची पहिली सभा पालघर येथे भरवण्यात आली. या सभेत अण्णासाहेब महाराष्ट्र प्रांतिक चे खजिनदार म्हणून निवडले गेले. 1930 मध्ये त्यांची महाराष्ट्र प्रांतिक उपाध्यक्ष पदावर निवड झाली. त्याच साली, ठाणे जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुका ‘स्वराज्य पक्षा’ तर्फे लढविण्यात येऊन अण्णासाहेब जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले .

    राजकारण  करीत असतानाच, ज्या शेतकरी समाजातून ते वर आले होते, त्या शेतकरी बांधवांकडेही त्यांचे लक्ष असे. आपल्या खेडेगावात व शेतकरी समाजात राहून आपणास जी लोकसेवा करता येईल ती करावयाची हे त्यांचे ध्येय होते. पानवेलीवर संशोधन करण्यासाठी सन 1929 मध्ये त्यांनी एक संशोधन केंद्र उघडले.  पानवेलीच्या रोगापासून वाचविण्याचे ज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. पुढे 1932 साली नारळीच्या झाडावर एक प्रकारची कीड पडून  झाडावरील झावळ्या आपोआप सुकू लागत, त्या रोगासंबंधी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी  काही कीटक शास्त्रज्ञांची मदत घेऊन ‘शेतकी सभेची’, स्थापना केली.  त्या सभेवर कै.भाईजी जगू राऊत यांच्यासारख्या प्रसिद्ध शेतकऱ्याची अध्यक्ष  म्हणून नेमणूक केली.  वसई तालुक्यातील धारावाढी विरुद्ध अण्णा साहेबांनी शेतकऱ्यांना संघटित करून, खूप मोठी चळवळ उभी केली होती. तिला ठाणे जिल्ह्या इतिहासात फार मोठे स्थान आहे. शेतकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही थंडीचे हंगामात हिवतापाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी दवाखाने उघडून औषधोपचाराची व्यवस्था केली .शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नात त्यांनी लक्ष घालून जी आस्था दाखविली व वसई तालुक्यातील शेतकऱ्यांना हर प्रकारची मदत देऊन जागृती निर्माण केली. त्यामुळे अण्णासाहेब ठाणे जिल्ह्यातील ‘शेतकऱ्यांचे पुढारी’, म्हणून ओळखले जाऊ लागले.त्यांचे हे कार्य बघून 1936 ते 38 अशा दोन वर्षाकरिता ‘राईस कमिटी’वर नेमणूक करण्यात आली.दिल्ली येथील, ‘इम्पीरियल कौन्सिल ऑफ अग्रिकल्चरल रिसर्च’,या संस्थेशी (आजची  इंडियन कौन्सिल ऑफ अग्रिकल्चरल संबंधित हे काम होते. अण्णासाहेबांचे काम,कर्तुत्व,नेतृत्व महाराष्ट्र काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आले होते.  त्यामुळे सन 1946 सालीस्थापन झालेल्या पहिल्या बाळासाहेब खेर मंत्रिमंडळात स्थानिक स्वराज्य मंत्री म्हणून अण्णा साहेबांची नेमणूक झाली. महाराष्ट्राचे स्थानिक स्वराज्य मंत्री म्हणून अण्णा साहेबांची काम सर्वख्यात आहे.

   अशा रीतीने या सरस्वती पुत्राने जीवनभर आपल्या निष्ठांना न्याय देण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाला सतत मदत व मार्गदर्शन करून,आपल्या जीवनाची सार्थकता केली. या लोकनायक अण्णासाहेबांची जीवन ज्योत दिनांक 14 जुलै 1953 रोजी मालवली.

    अण्णासाहेब निवर्तले पण त्यांचे कार्य थांबले नाही. आपले जेष्ठ सुपुत्र हरिभाऊ गोविंदराव वर्तक उर्फ भाऊसाहेब वर्तक यांना तो वसा घेऊन अण्णासाहेब गेले होते.

    महाराष्ट्रातील अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेमध्ये, आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयुष्यभर कार्यरत असलेले एक तेजस्वी विलक्षण व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भाऊसाहेब वर्तक होतं! विरार ग्रामपंचायतच्या सरपंचाची जबाबदारी घेतल्यापासून ते पुढे सुमारे तीन दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात अग्रेसर राहिलेल्या भाऊसाहेबांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदापर्यंत अनेक पदे समर्थपणे भूषविताना देशाच्या  राजकारणावरही आपला ठसा उमटविला. त्यांचे काही  कार्य एका विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. राजकारणाबरोबरच शिक्षण सहकार नागरी सुविधा शेती ग्राम सुधारणा क्रीडा धार्मिक इत्यादी विविध क्षेत्रात त्यांनी योगदान दिले. एकदा स्वीकारलेल्या जबाबदारीला आपण न्याय दिला पाहिजे हा त्यांचा  आदर्श ही घेण्यासारखा आहे.

    एक कुशल संघटक, बेडर नेतृत्व, उत्तम प्रशासक गांधीवादी सेवक आणि तरीही कुटुंब वत्सल गृहस्थ अशा अनेक विविध गुणसंचया मुळे भाऊसाहेबांनी आपले बहुआयामी नेतृत्व सिद्ध केले.  त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र ठाणे जिल्हा हे असले तरी राज्याचे मंत्री झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रा समोर  त्यांनी आपल्या कामाचा आदर्श ठेवला होता .

    आपल्या सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघा व्यतिरिक्त भाऊसाहेबांनी उभ्या केलेल्या अथवा विकसित केलेल्या संस्थांची यादी पाहू गेल्यास ती शेकड्याने होईल. त्यातील काही ठळक म्हणजे ,नेहरू मेमोरियल सेंटर वरळी,जीवन विकास केंद्र विलेपार्ले, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तारापूर अणुकेंद्र पुनर्वसन , मत्सोद्योग सहकारी प्रकल्प, गोखले एज्युकेशन सोसायटी शिक्षण संकुल नाशिक, फलोद्यान योजना महाराष्ट्र सरकार ,आदिवासी लँड रिफार्म योजना इत्यादी. यावरून भाऊसाहेबांनी योगदान  दिलेल्या विविध कार्यक्षेत्रांची विविधता व महत्त्व समजून येईल.

  भाऊ साहेबांचे अफाट कार्य पाहता या छोट्या लेखात त्या सर्वाला न्याय देणे शक्य नाही. म्हणून मागे म्हटल्याप्रमाणे, सोमवंशी क्षत्रिय समाजाचे एक दृष्टे नेते म्हणून मला भावलेले भाऊसाहेब,एवढ्या पुरतीच मी सीमित राहणार आहे.

      भाऊसाहेबांचे पिताश्री माननीय अण्णासाहेब वर्तक व त्यांचे तत्कालीन सहकारी यांनी 1921 साली आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती  संघाची स्थापना केली. त्या रोपट्याला खऱ्या अर्थाने विकसित करून त्याचा वटवृक्ष बनविण्याचे काम भाऊसाहेब व त्यांच्या पिढीने केले. भाऊसाहेबांच्या कारकिर्दीत  आमच्या समाजात अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर दादर, तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृह दादर,अण्णासाहेब वर्तक समाज मंदिर वसई, ही व अशाच अनेक  समाजोपयोगी  संस्था उभ्या झाल्या. भाऊसाहेबांचा विशेष कटाक्ष हा समाज शिक्षण व समाजातील भावी पिढीला उच्च विद्या विभूषित करून, त्यांच्या हातात शिक्षणाचे प्रभावी अस्त्र देऊन, त्यांना  भविष्यकालीन स्पर्धेसाठी सज्ज करणे हाच होता. त्यामुळेच त्यांनी पू.अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर व पू. तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वस्तीगृह दादरमध्ये उभे करून एक नवा इतिहास घडविला. त्यामुळेच आमच्या सो क्ष समाजातील अनेक तरूण उच्चविद्याविभूषित होऊन आज देश-परदेशात  आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहेत. तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृहाचे निर्माण ही आमच्या सो क्ष समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक परिवर्तनाची एक मोठी पायरी आहे.कै. भाऊसाहेब वर्तक यांच्या दूरदृष्टीमुळेच हे शक्य झाले आहे.

        पूर्वीचे कै अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर व कै तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृह. आत्ता या वास्तूचे पुनर्बांधणीचे काम चालू आहे.

      1961 खाली या स्मारक मंदिराचे काम पूर्ण होऊन लग्नसमारंभ व इतर कार्यासाठी खाली  एक हॉल व पहिल्या मजल्यावर वसतिगृह अशा रीतीने येथे वस्तीगृहाची  सुरुवात झाली. पहिले रेक्टर  म्हणून श्री मधुकर ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली (पुढे ते डॉक्टर मॅथ्थु ठाकूर झाले.) मी सन 1963 साली विद्यार्थी म्हणून या वसतीगृहात आलो. त्यावेळी मला यु डी सि टी UDCT म्हणजे आजची आई सि टी..ICT, INSTITUTE OF CHEMICAL TECHNOLOGY..,या प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेमध्ये बी.एस्सी टेक् या दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला होता. मुंबईत राहण्यासाठी कुठेच जागा नव्हती. युडीसीटी वस्तीगृहात राहणे परवडणारे नव्हते. अण्णासाहेब  वर्तक स्मारक मंदिरात जागा उपलब्ध होती. अशा रीतीने माझा सोमवंशी क्षत्रिय संघाशी पहिला परिचय  या वसतिगृहापासून झाला, जो आजतागायत टिकून आहे.

 श्री मधुकर ठाकूर यांनी वस्तीगृहाची रेक्टरशिप सोडून् उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याचे ठरविले. नवीन रेक्टरची नेमणूक विश्वस्त मंडळीना करावयाची होती. माझी ही इच्छा आपण रेक्टर व्हावे अशी होती. मात्र त्यावेळच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांमध्ये मी ज्युनियर होतो. वसतिगृहात पहिल्या वर्षापासून असलेल्या विद्यार्थ्यांच्या मानाने मला वसतिगृहाचा अनुभव कमी होता. माझी नेमणूक होईल असे मला वाटत नव्हते. मात्र  विश्वस्त चिंतामणराव वर्तक व कार्यकारी विश्वस्त मामासाहेब ठाकूर या दोन व्यक्तींनी माझे दोन वर्षात वस्तीगृहातील काम, वर्तन व शिक्षण पाहून मला एक दिवस त्यांच्या ऑफिसमध्ये बोलाविले.  

  “तुझ्या नावाची शिफारस आम्ही भाऊसाहेबां कडे (जे त्यावेळी मुख्य विश्वस्त होते), करणार आहोत. तुझी तयारी आहे का?”असे विचारले. मला तर आश्चर्याचा मोठा धक्का बसला.

  मी आत्मविश्वासाने त्यांना, “जरूर माझी शिफारस करा, मी  जबाबदारी घेण्यास तयार आहे”,असे सांगितले.

  याचवेळी त्यांनी मला एक महत्वाची सूचना ही केली .

  “तुझ्यापेक्षा सिनीयर विद्यार्थी येथे आहेत. त्यांनीही या जागेसाठी आमच्याकडे विचारणा केली आहे. ज्येष्ठ परंतु नाराज विद्यार्थ्यांना सांभाळे जमेल काय?” 

  त्यालाही मी तयारी दाखवली.

  ” आपण संधी द्या, त्या  मित्रांचीही मी मर्जी संपादन करीन. हे काम आपल्या अपेक्षेनुसार करण्याचा प्रयत्न करीन “, असे आश्वासन दिले .           

   पुढे मुख्य विश्वस्त भाऊसाहेब, चिंतामणराव व कार्यकारी विश्वस्त मामा ठाकूर यांचे बरोबर विश्वस्तांच्या कार्यालयातच एक अनोपचारिक चर्चा झाली. भाऊसाहेबांनाही माझी निवड योग्य वाटली होती. त्यांनी  मला शुभेच्छा दिल्या.  

   माझी व भाऊसाहेबांची प्रत्यक्ष समोरासमोरील ती पहिली मुलाखत. भाऊसाहेबांची निर्णय क्षमता व विचारांतील स्पष्टता मला त्या छोट्या भेटीत जाणवली. कारण एका ज्युनिअर विद्यार्थ्याला रेक्टरशिपची संधी देताना विश्वस्तांनी माझ्यावर विश्वास ठेऊन, जोखीम  पत्करली होती.  स्वतःला सिद्ध करण्यासाठी माझ्यासाठी ती उत्तम संधी होती.

    1965 साली पू.तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतीगृहाचा दुसरा  रेक्टर म्हणून माझी नेमणूक झाली. अपेक्षित असल्याप्रमाणे काही सिनिअर विद्यार्थ्यांनी माझ्याशी असहकार सुरू केला. ‘मला हे काम जमत नाही’, हेच विश्वस्तांना दाखवून देण्याचा त्यांचा उद्देश असावा. आमच्या साप्ताहिक सभांना,सांस्कृतिक कार्यक्रमांना अनुपस्थिती,रात्री परवानगीशिवाय उशिरा येणे ,न सांगता कधीही घरी निघून जाणे, इतर विद्यार्थ्यांनाही बेशिस्त वागण्यास उत्तेजन देणे, अशा प्रकारचे उद्योग हे मित्र करीत. एकदा माझ्या विरुद्ध एक अनामिक तक्रार पत्र त्यांनी भाऊसाहेब व ईतर सर्व विश्वस्तांना पाठविले. ते पत्र  विश्वस्तांनी मला दाखविले. मला वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचे नियमन करता येत नाही व त्यामुळे वस्तीगृहाची शिस्त बिघडत झालेली आहे असा उलटा कांगावा त्या पत्रात होता. मी त्यांच्यापुढे सत्य परिस्थिती कथन केली. काही पुरावे ही दिले.

      मला खूप मनस्ताप झाला होता. हे काम सोडून द्यावे व आपला अभ्यास करावा असेही वाटले. मात्र ‘एकदा हाती घेतलेले काम नेटाने पुढे नेले पाहिजे’, ही माझी वृत्ती असल्याने ,विश्वस्तांना ,”मला थोडा अवधी द्या..” अशी विनंती केली. ती त्यांनी मान्य केली.

  पुढे एके दिवशी  भाऊसाहेब स्वतः विश्वस्त कार्यालयात आले असता त्यांनीही माझ्याशी त्या पत्राबाबत बोलणे केले. “तू त्याकडे जास्त लक्ष देऊ नको, तुझे काम चालू ठेव!” असा धीर दिला. तो माझ्यासाठी खूप मोलाचा होता. त्यांनी अण्णा मामा व त्यांच्या इतर सहकाऱ्यांकडून माहिती घेतली होती. त्यावेळी भाऊसाहेबांचा पाठिंबा मला नसता तर रेक्टर पदावरून माझी गच्छंती होण्यास वेळ लागला नसता ..

     माझ्या सुदैवाने आमच्या वस्तीगृहातील एक सीनियर विद्यार्थी श्री रवींद्रनाथ ठाकूर यांना माझ्याविषयी खूप सहानुभूती होती. माझ्या कार्यपद्धतीवर त्यांचा विश्वास होता. खरे तर ते स्वतः देखील रेक्टर पदासाठी लायक होते. पण त्यांना स्वतःला ते पद  नको होते. वसतिगृहात घडणारे सर्व प्रकार तेही पहात होते. तक्रारदार विद्यार्थ्यांशी श्री रवींद्र ठाकूर यांचे चांगले संबंध होते. एके दिवशी त्यांनी माझी व  विरोधक मित्रांची एक सामोपचाराची मीटिंग  घडवून आणली. सुदैवाने श्री ठाकूर यांच्या शब्दाला किंमत होती. हे प्रकरण शेवटी सामोपचाराने मिटले. सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य मला मिळू लागले.माझे काम व्यवस्थित सुरू झाले. मित्रवर्य रवींद्रनाथ ठाकूर आज या जगात नाहीत काही वर्षांपूर्वीच ते निवर्तले. मी त्यांचा सदैव ऋणी आहे .

   या प्रकरणात मला भाऊसाहेबांचेही एक वेगळे रूप पहावयास मिळाले. एरवी अत्यंत शिस्तप्रिय, कणखर कठोर असणारे भाऊसाहेब कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी प्रथम सत्यता पडताळून पाहत व नंतर योग्य काय ते ठरवीत. निर्णय झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करीत. माझ्या बाबतीत भाऊसाहेबांचे वागणे खूप सौजन्यपूर्ण व आश्वासक असे होते.. पुढे सतत सहा वर्षे मी हे व्यवस्थापक व रेक्टर पदाचे काम समाधानाने करू शकलो त्यात भाऊसाहेबांचे त्यावेळचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे वाटतात. पुढे भविष्यात सोमवंशी क्षत्रिय संघ फंड ट्रस्ट या संस्थेचा कार्यकारी विश्वस्त म्हणून काम करण्याची जी संधी मिळाली याचे कारण त्या यावेळी भाऊसाहेबांनी मला दिलेले  उत्तेजन कारणीभूत आहेत, हे नमूद करण्यास मला  संकोच वाटत नाही.

  कै.तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतीगृह  रेक्टर व कै.अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर व्यवस्थापक ,असे दुहेरी जबाबदारी असलेले  काम मी 1965 पासून सुरू केले . डॉ.मॅथ्थू ठाकूर पहिले व मी दुसरा ,सुरुवातीचे दोन रेक्टर आहोत, ज्यांनी अशी दोन्ही कामे सांभाळली. 1969 साली श्री पांडुरंगराव पाटील हे स्मारक मंदिराचे व्यवस्थापक म्हणून रूजू झाले. माझी एक जबाबदारी संपली..पदव्युत्तर परीक्षेचा अभ्यास,वसतिगृहाचे काम,स्मारक मंदिर व्यवस्थापन हॉल वस्तीगृह आर्थिक व्यवस्थापन,,अशा सर्व आघाड्या सांभाळीत दिनक्रम चालू होता. हॉलचे व्यवस्थापन कठीण होते. कारण लग्नसराई सुरू असली की तिथे अनेक जबाबदाऱ्या असत .पैशाचा व्यवहार होता. चिंतामणराव वर्तका सारख्या एका काटेकोर हिशोब पाहणाऱ्या विश्वस्तांना अहवाल द्यावा लागे. भाऊसाहेब महिन्यातून कमीत कमी दोन वेळा तरी स्मारक मंदिरात येत.त्यावेळी सर्व विश्वस्त जमा होत भाऊसाहेबांचे मार्गदर्शन घेत. मलाही विश्वस्तांच्या सभेत महिन्याच्या जमाखर्चाचा तपशील, वसतीगृह प्रगती अहवाल, मागील सभेचे मिनिट्स असे तपशील तयार ठेवावे लागत. चिंतामण रावांना हवी असलेली माहिती द्यावी लागे. मला आठवते  भाऊसाहेबांना दादरला येणे शक्य नसल्याने त्यांच्या सरकारी बंगल्यात काही  मिटींगा  झाल्या होत्या. मीही तेथे उपस्थित होतो. तो एक वेगळाच अनुभव होता. सौ इंदुताई सर्वांचे हसून स्वागत करीत व योग्य तो सन्मान  देत. स्वतःहून चहापाणी, अल्पपोहार तयार करीत. सर्वांचीच वैयक्तिक चौकशी करीत. इंदुताईंशी झालेल्या ओळखीने  त्यांच्या सुसंस्कृत सालस व्यक्तिमत्वाचे दर्शन झाले.  एक सुस्वभावी, निगर्वी व आपल्या पतीच्या कामात समर्पित असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्या दिवसात भाऊसाहेबांच्या मागे महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ मंत्री व इतरही अनेक सामाजिक,शैक्षणिक संस्थांचे अध्वर्यु म्हणून बरीच कामे असत. तरीही वेळात वेळ काढून ते कधी दादर तर कधी त्यांच्या बंगल्यावर बोलावून आपल्या संघाचे व ट्रस्टचे काम जातीने लक्ष देऊन करीत. याचा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे, कारण मी त्या कालखंडातील संघ व ट्रस्टच्या कामाचा साक्षीदार होतो.

      मंत्री, राजकारणी, समाज व शैक्षणिक कार्यकर्ता म्हणून,म्हणून भाऊसाहेबांचे सभासमारंभात दर्शन होई. भाऊसाहेब एक व्यक्ती व कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व  म्हणून त्यांचे दर्शन मला अशा वेळी होई.आज मला खूप समाधान वाटते आहे की, अशा एका लोकोत्तर जोडप्याच्या कौटुंबिक जीवनाचे दर्शन जवळून मिळाले. खूप काही शिकता आले.

     भाऊसाहेबांना आदरांजली वाहतांना या छोट्या लेखात मला त्यांच्या या समाजाभिमुख नेतृत्वाचा आवर्जून उल्लेख करावयाचा आहे.  विशेषतः  आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजाच्या भावी पिढीला शैक्षणिक सुविधा पुरविण्याबद्दल त्यांना असलेला जिव्हाळा व आणि आंतरिक तळमळ  त्यांचे ठाई नेहमी दिसून येई. नुस्ती  तोंडी आश्वासे न देता विद्यार्थ्यांच्या सुख सोयीसाठी जी प्रत्यक्ष कृती करता येईल ती ही त्यांनी करून दाखविली. त्यावेळी कोणत्याही आर्थिक समस्येचा बाऊ त्यांनी व इतर विश्वस्तांनी केला नाही. .

                   तात्यासाहेब चुरी वस्तीगृहात सुरुवातीला फक्त राहण्याशिवाय दुसरी कसलीच सोय नव्हती. आंघोळीसाठी पाणीही बाहेरच गरम करावे लागे. सुमारे 25  विद्यार्थ्यांची सोय होती.  ही सोय देखील अपुरी पडत होती. कित्येक होतकरू हुशार विद्यार्थ्यांना केवळ मुंबईत राहावयास जागा नसल्याने शिक्षणाला वंचित व्हावे लागत होते. अथवा गावाहून मुंबई पर्यंत ये जा करण्यांत खूपच कष्ट करावे लागत होते.भाऊसाहेबांच्या ते लक्षात आले होते. ही त्यांची खंत होती. त्यामुळे 1968 साली तात्यासाहेब चुरी यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे योग्य स्मारक म्हणून वसतिगृह चे विस्तारीकरण व्हावे अशी योजना  तयार केली. कै.तात्यासाहेब चुरी स्मारक समिती स्थापन झाली. पद्मश्री डॉक्टर हरिश्चंद्र पाटील समितीचे अध्यक्ष होते. त्या समितीने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे  संघाची आर्थिक बाजू मजबूत झाली. वस्तीगृहाला  दोन मजले वाढवून मिळाले. आता केवळ 25-30 विद्यार्थ्याऐवजी सुमारे 70-75 विद्यार्थ्यांची सोय होऊ लागली. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या हस्ते  विस्तारित वस्तीगृहाचे उद्घाटन झाले. व्यवस्थापक म्हणून मलाही त्या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी होता आले.

        कै तात्यासाहेब चुरी वि. वसतिगृहाचे विस्तारीकरण झाल्यानंतर उद्घाटन प्रसंगी कै. वसंतराव नाईक, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांचा सत्कार करताना कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक.

      जागेच्या उपलब्धी नंतर ,माझ्या काही वरिष्ठ सहकाऱ्यांसह विचार विनिमय करून आम्ही वसतिगृहासाठी काही वाढीव सुविधां मिळाव्यात याकरिता विश्वस्तां कडे प्रस्ताव दिला.  भोजनालयाची व्यवस्था, विद्यार्थी वाचनालय, वैद्यकीय उपचारासाठी बाहेरून येणाऱ्या समाज बांधवांसाठी निवास व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमासाठी  आर्थिक निधी अशा काही  सूचना आम्ही कार्यकारी विश्वस्त चिंतामणराव वर्तक  यांचे समोर मांडल्या..मला खरोखर सांगावयास आनंद वाटतो की भाऊसाहेब व विश्वस्त मंडळींनी सर्व सूचना मंजूर करून आमचे वसतिगृह आदर्श व संपूर्ण होण्यासाठी  करता येईल तेवढी मदत केली. आर्थिक सहाय्य केले. विशेषतः  भोजनालयाची व्यवस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांना खूपच सोयीचे झाले. त्यांना अभ्यासात जास्त वेळ मिळू लागला.  साधे परंतु सकस जेवण अल्प किमतीत  मिळू लागले.भाऊसाहेबांनी या सुविधा निर्माण करण्याआधी माझ्याशी व आमच्या विद्यार्थी मित्राशी अनेक वेळा जातीने चर्चा करून अंमलबजावणी केली होती.एवढ्या महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ मंत्रिपदी असलेल्या अशा एका व्यक्तीने आपल्या कार्य बाहुल्यातून वेळ काढून आम्हा वसतिगृह वासियांच्या अडचणींची नोंद घेऊन या सोयी तात्काळ निर्माण केल्या. भाऊसाहेबांना आमच्या विद्यार्थ्याबद्दल असलेल्या जिव्हाळ्याचे हे प्रतीक आहे. त्याबद्दल त्यावेळीची व आताची विद्यार्थ्यांची पिढी त्यांचे सदैव आभारी असेल.  विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भाऊसाहेब किती बारकाईने लक्ष देत हे ध्यान्यात येते.

         मी तात्यासाहेब चुरी वस्तीगृहाचे  काम1971 च्या मार्च पर्यंत पाहिले .त्यानंतर लग्न झाल्यामुळे मला वसतिगृह सोडावे लागले. 1970 च्या मे महिन्यात संघाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने मोठा सोहळा करण्यात आला.  बोर्डी शाळेच्या क्रीडांगणावर सर्व कार्यक्रम पार पडले. त्यावेळची ही एक आठवण आहे. मी व भाऊसाहेब यांतील एवढ्या वर्षांचे जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध  तात्पुरते का असेना दुरावल्या सारखे झाल्याने ही घटना माझ्या चांगलीच लक्षात राहिली आहे म्हणून येथे मुद्दाम देत आहे.

   या सुमारास आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एक छोटेसे मंडळ, ज्यात विशेषेकरून वसतिगृहाचे माजी विद्यार्थी तसेच वसतिगृहात न राहणारे पण ज्यांना समाजाविषयी आस्था आहे,अशा लोकांचे हे मित्रमंडळ होते. पुढे सुरू केलेल्या, ‘तात्यासाहेब चुरी  वसतिगृह माजी  विद्यार्थी संघाची’,ही सुरुवातच होती म्हणाना! आम्ही यावेळी  “क्षात्रसेतू” नावाचे एक पाक्षिक देखील सुरू केले होते. ज्यामुळे समाजातील तरुणांना आपले विचार, समाजाविषयी आपल्या भावना तत्कालीन समाज धुरीणांकडून आमच्याअपेक्षा, व्यक्त करण्याचे ते एक माध्यम होते . सुवर्ण महोत्सव आमच्यासाठी एक मोठी संधी होती.आम्ही त्यावेळी चे अध्यक्ष व समाजाचे सर्वेसर्वा भाऊसाहेब वर्तक यांना विनंती करून त्या  महोत्सवात एक तास तरी तरुणांच्या परीसंवादासाठी द्यावा,अशी विनंती केली. त्यांनीही ती मान्य केली . तरुण मित्रांनी त्यात सहभाग घेण्याचे ठरवले .त्यात मी देखील एक  होतो.वसतिगृहाचे काम पाहत असल्यामुळे  आमचे समाजजीवन जवळून पाहता होतो. तत्कालीन परिस्थिती, विद्यार्थ्यांनी जवळीक, ,त्यांच्या अडीअढचणी व अपेक्षा याची थोडी जाणीव होती. 

   त्या  युवा संमेलनाचे अध्यक्ष श्री भानुदास सावे हे भारतीय कीर्तीचे शिक्षणतज्ञ व तरुणांविषयी आस्था असणारे व विद्वान व्यक्तिमत्व होते. या परिसंवादास  समाजातील तत्कालीन धुरीण .भाऊसाहेब ,चिंतामणराव वर्तक,   मामासाहेब ठाकूर,. दादासाहेब ठाकूर ,बाबुरावजी सावे,शांताराम पाटील अण्णा,अशी दिग्गज मंडळी मुद्दाम हून उपस्थित होती. महोत्सव बोर्डीत असल्याने बोर्डीची ही बरीच प्रतिष्ठित मंडळी मुद्दाम आली होती. सर्वच तरुणांनी जोरदार भाषणे केली. बहुतेकांचा सूर “समाजाकडून आजच्या तरुणांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत व त्यांना सामाजिक नेतृत्वात संधी देणे आवश्यक आहे, असाच होता. त्यानंतर समाजातील काही मित्रमंडळीनी आपले विचार मांडले. भानुदास सावे यांचेही शेवटी समारोप करणारे भाषण झाले. कार्यक्रम खूप छान झाला.मात्र माझे भाषण थोडेसे जहाल झाले हे आज मलाही पटते.तरुण वर्गाने भाषणाच्या वेळी, वेळोवेळी दिलेल्या टाळ्या यावरून मीही त्या वेळी थोडा उत्तेजित  झालो होतो असे आता वाटते.

    माझ्या म्हणण्याचा सारांश  होता की,”आपल्या समाजात आता अनेक तरुण सुशिक्षित होऊन निरनिराळ्या विद्याशाखांमध्ये प्रावीण्य मिळवीत आहेत. समाजासाठी योगदान द्यावे अशी त्यांची ही इच्छा आहे.आमच्या समाज नेतृत्वाने या तरुणांच्या शिक्षणाचा व अनुभवाचा फायदा घेऊन त्यांना योग्य तो न्याय द्यावा”.. अशी विनंती मी शेवटी केली.अनवधानाने बोलण्याच्या भरात काही ज्येष्ठ मंडळी वर अप्रत्यक्ष टीका झाली. परिसंवादाचे अध्यक्ष श्री. भानुदास सावे यांच्या हे लक्षात आले असावे. त्यांनी समारोपाचे भाषणात, “ही तरुण मंडळी आहेत. विचार अपरिपक्व असले तरी प्रामाणिक आहेत. त्यांच्या भावना समजून त्यांच्यावर राग धरू नका.” हे सांगितले. आमची बाजू थोडी सावरून घेतली. विशेषतः भाऊसाहेबांची नाराजी  होऊन ते दुखावू नयेत ही त्यांची भावना होती. मात्र व्हायचे ते झालेच. मान. भाऊसाहेबांना परीसंवादातील तरुणांचे बोलणे, विशेषतः माझे बोलणे,आवडले नसल्याचे इतर मंडळी कडून कळले. कारण भाऊसाहेबांनी कोणतेच भाष्य परिसंवादातील आपल्या भाषणात केले नाही.

   भाऊसाहेबांच्या विश्वासाला कुठेतरी  मी धोका दिला होता. ‘वसतिगृहाचा रेक्टर असताना असे वक्तव्य भर परिषदेत करणे योग्य नव्हे’ असे त्यांचे मत होते. ते रास्तही होते. परंतु माझ्या हातून ती गोष्ट घडली होती हे खरे. पुढे काही दिवस भाऊसाहेब वसतीगृहावर येत परंतु माझ्याशी विशेष बोलत नसत, हे मला जाणवले. सुदैवाने विश्वस्त कै दादासाहेब ठाकूर यांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने त्यांनी सामोपचाराने एका बैठकीत हा प्रश्न मिटविला. माझे साठी हा एक मोठा दिलासा होता. मीही भाऊसाहेबांकडे मनापासून दिलगिरी व्यक्त केली.

  “कोणत्याही प्रकारे आपला वा समाजनेतृत्वाचा उपमर्द करण्याचा हेतू नव्हता. तरुणांना काहीतरी वाव द्यावा, एवढेच सांगायचे होते” असे सांगितले. दादांनीही यात चांगली भूमिका बजावली. माननीय भाऊसाहेब समाजाचेही सर्वेसर्वा नेते होते. राज्याचे मंत्री होते त्यांच्या मोठ्या मनाचे दर्शन मला या प्रसंगातून झाले. माझ्या सुदैवाने यानंतर भाऊसाहेबांनी कोणताही  विकल्प मनात न ठेवता मला जे काही सहकार्य द्यावयाचे होते ते दिले. शेवटपर्यंत मी त्यांचा आदर केला. त्यांच्या अखेरच्या दिवसात देखील मी त्यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी गेलो होतो, तेव्हाही त्यांनी माझी आस्थेने चौकशी करून आशीर्वाद दिले.

   वज्रादपी कठोराणी, मृदुनी कुसुमादपी!

 हा थोरांच्या गुणांचा प्रत्यय भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वात येतो.

       भाऊसाहेबांनी आपल्या दीर्घ व समृद्ध जीवनांतून अनेक चिरस्मरणीय उपक्रम सुरू केले, पूर्ण केले व अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्या जनता जनार्दनासाठी ज्ञानदीप प्रज्वलित करून ते अजरामर झाले.  या त्यांच्या अफाट कार्यात त्यांच्या सुविद्य सुशील पत्नी सौ ईंदूताई यांचा ही खूप मोलाचा वाटा होता हे नाकारता येणार नाही. इंदुताईंशी माझाही वैयक्तिक परिचय झाला होता हे मी मागे सांगितले आहे. ईंदू ताईंना तात्यासाहेब चुरी यांसारखा कर्तुत्ववान पिता लाभला होता. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नति संघाच्या स्थापनेत तात्यासाहेबांचा मोलाचा वाटा होता . एक शेतकरी व व्यावसायिक म्हणून त्यांनी महाराष्ट्रात नाव कमावले होते.  या कर्तुत्ववान सुसंस्कृत व उच्च विद्याविभूषित  गृहिणीचे  वर्णन मी कितपत करू शकेन ते कळत नाही. मात्र वर्तक कुटुंबीयांनी  त्यांच्याबद्दल प्रगट केलेल्या विचारातून एवढेच सांगतो,

         माननीय कै. भाऊसाहेब व कै सौ इंदूताई एका विसाव्याच्या क्षणी..

    सौ इंदुताई यांच्या चेहऱ्यावरील सुसंस्कृतपणा, शालिनता व खानदानीपणा पाहिल्यावर वाटत असे की मा भाऊसाहेब आपल्या घराबाहेरच्या जगामध्ये आत्मनिर्धाराने व कणखर वृत्तीने वागत असले तरी सौ ईंदूताईंना पाहिल्यावर त्यांचे करारीपणाचे शस्त्र सहजगत्या निखळून पडे.. आपणास कुटुंब प्रमुखाची जबाबदारीही पार पाडावयाची आहे म्हणून त्या कधीही मागे हटल्या नाहीत. सौ ईंदू ताईंची प्रकृती तशी थोडीशी नाजूकच असे.आपल्या दम्याच्या आजाराला सोबत घेऊन बरीच वर्षे त्या त्याच्याशी झुंज देत होत्या. परंतु स्वभावामधील संयम त्यांनी कधीही ढळू दिला नाही. धिरोदात्तपणाने वागून दुसऱ्याच्या सुखदुःखाशी ही त्या समरस झाल्या. भाऊसाहेबांच्या करारी स्वभावाला आवर घालून त्याला आपल्या संयमी वागण्याची त्यांनी जोड दिली. आपला संसार सुखी केला. सौ ईंदू ताईंच्या प्रकृती अस्वास्थ्याने  भाऊसाहेब कधीही कंटाळले नाहीत. उलट त्यांना सांभाळून घेऊन जगातील सर्व उपयुक्त औषधांचा त्यांच्यासाठी वापर केला. पुण्यात “अभिवादन”, हा छोटेखानी  बंगला भाऊसाहेबांनी त्यांच्यासाठी बांधला होता, जेणेकरून त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यास मदत होईल. दोघेही वारंवार पुण्यात जाऊन हवा पालट करीत असत. सर्व जावा कौतुकाने ईंदू ताईंना सांगत, “तुम्ही फार पुण्यवान आहात म्हणून असा भाग्यवंत जोडीदार मिळाला”. त्यांच्या पुण्याच्या बंगल्याला ‘लक्ष्मी नारायणाचे मंदिर’, असाच नेहमी उल्लेख करीत. हे सर्व खरे असले तरी.ईंदुताई होत्या म्हणूनच भाऊसाहेबांचा कर्तुत्व-रथ सतत पुढे जात राहिला एवढे निश्चित!

भाऊसाहेबांचे श्वशूर कै. तात्यासाहेब चुरी व पिताश्री कै अण्णासाहेब वर्तक.

भाऊसाहेबांचे कर्तृत्व अनेक अंगानी बहरून आले असले तरी माझ्या दृष्टीने त्यांच्या जीवनकार्याचा आंतरिक गाभा  म्हणजे त्यांची शिक्षणाप्रती, विशेषतः तरुण,मागास विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी असलेली आस्था, तळमळ व त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची  धडपड, हा होता!! त्यांच्या पिताजी कडून तोच वारसा त्यांना प्राधान्याने मिळाला होता. भाऊसाहेबांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त माझे मित्र विलास बंधू चोरघे यांनी प्रकाशित केलेल्या “स्मृतिगंध” या स्मृतिपुष्पांतून अनेक दिग्गजांनी पू.भाऊ साहेबांवर मनोभावे स्तुती सुमने उधळले आहेत ती उगीच नव्हेत. त्यापैकी काहीं सन्माननीयांच्या विचारांचा गोषवारा मुद्दाम येथे देत आहे, म्हणजे मला जे सांगावयाचे होते ते अधिक सुस्पष्ट होईल .

भाऊसाहेबांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्या विषयी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री भाऊसाहेबांचे एकेकाळचे सहकारी माननीय शरद पवार साहेब म्हणतात “अनेक शैक्षणिक संस्थांची धुरा त्यांनी सांभाळली. काम करणाऱ्यांना आत्मविश्वासाने पुढे नेणे, संस्थात्मक प्रश्न हळुवारपणे हाताळणे, मूल्याधिष्ठित कार्य शैक्षणिक क्षेत्रात प्रस्थापित करणे ,व व्यवस्थापनात अद्यावतता आणणे ही त्यांची विशेष कामगिरी होय. महाराष्ट्रातील गोखले एज्युकेशन सोसायटी,विद्यावर्धिनी, तसेच त्यांच्या स्वतःच्या सो क्ष समाजातील कार्य या माध्यमांतून त्यांनी केलेले काम शिक्षण क्षेत्राला अभिमान वाटावा असे आहे. शिक्षणातून समाजकारण व समाजकारणातून ज्ञानकारण असे अलौकिक कार्य प्रदीर्घकाळ आपल्या अंगीभूत गुणामुळे कुशल कार्यनिष्ठ सहकार्यांमुळे भाऊसाहेबांच्या हातून झालेले आहे.

    माजी विधानसभा अध्यक्ष व भाऊसाहेबांचे सहकार क्षेत्रातील सहकारी वि स पागे . साहेबांनी म्हटले आहे. “भाऊसाहेबांचे नेतृत्व लाभलेल्या महाराष्ट्रातील अतिशय नामवंत अशा शिक्षण संस्था, समाज संस्था, उद्योग संस्था यांचा व्याप व उद्दिष्टे विविध व वैशिष्ट्यपूर्ण आहेत.  नाशिकची ख्यातनाम गोखले शिक्षण संस्था, वडाळा मुंबई येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वसईचे अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, पालघरचे सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, वसई येथील ग्राहक सहकारी संस्था, बोर्डी कोसबाड भागातील आदिवासी शिक्षण विकास संस्थांचे जाळे, या सर्व संस्थांच्या कार्याचा ओझरता निर्देश केला तरी भाऊसाहेबांनी समाज जीवनातील स्थित्यंतरासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षण संस्थांची बांधणी करून त्यांच्या माध्यमातून दर्जेदार कार्य करून सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श निर्माण केला आहे .आदिवासी विभागातील गोरगरिबांच्या झोपडी पर्यंत शिक्षणाची गंगा नेण्याचे कार्य करणाऱ्या अनेक संस्था व व्यक्ती यांना सतत प्रेरणा व मार्गदर्शन भाऊसाहेबांनी केले आहे त्यांच्या शैक्षणिक कार्याला जोड नाही“.

    भाऊसाहेबांच्या अल्पसानिध्यातून मलाही भाऊसाहेबांच्या लोकोत्तर गुणांचे ओझरते  दर्शन झाले होते.आमच्या वर्तक स्मारक मंदिरातील त्यांच्या भेटी व विशेषतः आमच्या तात्यासाहेब चुरी  विद्यार्थी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचे बाबत त्यांना असलेली शिक्षणाची कळकळ व त्यासाठी  जेवढे देता येईल ते देण्याची तळमळ,  मला व्यवस्थापक व वसतिगृह रेक्टर असताना जाणवली होती. भाऊसाहेबांचे महाराष्ट्रातील व विरार मधील अनेक शिक्षण संस्थांची निकटचे संबंध होते. तिची विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत ते खूप जागरूक असत व तात्काळ अशा समस्या निवारण करण्याकडे त्यांचे लक्ष असे.

      आपल्या सर्व शाळांतील निकालांकडे भाऊसाहेबांचे बारकाईने लक्ष असे. निकाल असमाधानकारक लागल्यास शिक्षकांना विश्वासात घेऊन प्रसंगी समज देऊन शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारावा म्हणून त्यांचा सतत प्रयत्न असे.चांगल्या शिक्षकांचे नेहमीच कौतुक होत असे. गरीब विद्यार्थ्यांसाठी भाऊसाहेबांनी प्रथम स्वतः देणगी देऊन एक निधी स्थापन केला असून त्याद्वारे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी रुपये पाच हजार पर्यंत मदत दिली जाते. ते नेहमी कृतिशील असंत व आपल्या उदाहरणांनी इतरांना कामास लावीत

          कै. माननीय अण्णासाहेब वर्तक, मातोश्री सौ अन्नपूर्णाबाई वर्तक व सर्व वर्तक कुटुंबीय. कै.अण्णासाहेबांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त घेतलेले दुर्मिळ  छायाचित्र.

     भाऊसाहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या “अमृतांजली” या ग्रंथात भाऊसाहेबांचे मनोगत आले आहे. आपल्या जीवनावर दोन व्यक्तींचा प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले आहे! ते म्हणतात,

            ” माझ्या जीवनातील अमृत महोत्सवाच्या या शुभप्रसंगी ज्यांनी माझ्या व्यक्तिमत्त्वावर सुसंस्कार केले, ज्यांच्या छायेत व सहवासात वाढत असताना माझ्या अंगी सत्प्रवृत्तीचा विकास होत गेला त्यांचे मला स्मरण कृतज्ञतापूर्वक स्मरण होते. त्यातील सर्वप्रथम माझे पूज्य पिताजी स्वर्गीय अण्णासाहेब .अण्णा साहेबांच्या धीरोदात्त वृत्तीचा व त्यांच्या नैतिक आचरणाचा जबरदस्त प्रभाव माझ्या उभ्या जीवनावर पडलेला आहे.”

आपले गुरुवर्य ,बोर्डी शाळा व शारदाश्रमातील आचार्य चित्रे व आचार्य भिसे यांच्या बद्दल भाऊसाहेबांनी सदैव कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्या सत्कार करताना.

         “स्वर्गीय आचार्य भिसे गुरुजी यांचीही यावेळी मला तीव्रतेने आठवण होते. या ध्येयवादी त्यागी शिक्षक व समाजसेवकांनी बोर्डीचे विद्यालय शारदा श्रम व बोर्डी परीसर आपले कार्यक्षेत्र बनवून सेवा वृत्तीने अखंड कार्य केले .त्यांच्या कार्याने या विद्यालयाचे रूपांतर संस्कार केंद्रांत झाले. आचार्य भिसे यांची प्रखर ध्येयनिष्ठा सेवाभावी वृत्ती, प्रसिद्धी परांङगमुखता, आदिवासी सारख्या दुर्बल व उपेक्षित समाजाची सेवा करण्याची तत्परता, यांचा माझ्या संस्कारक्षम मनावर खोल परिणाम झालाआहे. राष्ट्र प्रेमाची व उदात्त विचारांची प्रज्वलित झालेली ज्योत माझ्या अंतकरणात सदैव तेवत राहिली. त्यातूनच आगाशी-विरार-अर्नाळा एज्युकेशन सोसायटी उगम पावलीआणि शिक्षण संस्था उभ्या करण्याच्या कार्यात मी पदार्पण केले.”

   “राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यकर्त्यांना समाज परिवर्तनाच्या व नवसमाज निर्मितीच्या कार्याला आपण शैक्षणिक कार्यातूनच गती दिली पाहिजे असे मला सातत्याने वाटत असे.”

   मला वाटते थोडक्या शब्दात  माननीय भाऊसाहेबांनी आपल्या जीवनातील  विविध क्षेत्रातील कामाचे श्रेय दोन ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांना दिले .समाज परिवर्तन हे शेवटी शैक्षणिक कार्यातूनच होऊ शकते ही त्यांची श्रद्धा असल्याने,त्यानुसारच शिक्षण संस्थांचे जाळे उभे करू शकलो असे नम्रतेने सांगितले आहे.  तसे करताना कोणाचीही जात-पात, गरिबी- श्रीमंती, राजकीय व विचारसरणी याचा  विचार न करता केवळ सर्व-समाज परिवर्तन हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले. म्हणून त्यांच्या  समत्व बुद्धीला मानवंदना देताना एवढेच सांगावेसे वाटते की 

    जो सर्वत्र सदासरिसा,परिपूर्ण चंद्रुका जैसा !

   अधमोत्तम प्रकाशा, माजी  न म्हणे!!

जो सर्वत्र समृद्धीने वागतो तोच असे करू शकतो.

    सुदैवाने मलाही बोर्डीच्या शाळेत आचार्य भिसे यांचे  मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे भाऊसाहेबांच्या वरील विचारांची सत्यता पटते.

    भाऊसाहेबांना खूप जवळून पाहिलेले माझे मित्र व सहकारी, सो क्ष समाजाचे माजी अध्यक्ष व सध्या विश्वस्त, तसेच विरारच्या सार्वजनिक, राजकीय जीवनात सक्रिय असलेले विरारचे, विलास बंधू चोरघे यांनी भाऊसाहेबां बद्दल प्रकट केलेल्या भावना शेवटी देत आहे. भाऊसाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त निघालेल्या स्मृतिगंध” या विशेष गौरव ग्रंथात बंधूंनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. भाऊसाहेबांचे स्वप्न असलेले, विश्रामधाम  प्रकल्पाचे काम बंधूंच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले. बंधू म्हणतात. “पद्मश्री भाऊसाहेब वर्तक जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर अनेक ठिकाणी निरनिराळे कार्यक्रम साजरे झाले. भाऊसाहेबांचे सामाजिक राजकीय शैक्षणिक व आध्यात्मिक कार्य महान आहे. त्यांच्या या महानकार्याची कल्पना नव्या पिढीला येणे जरुरी आहे.

     पूज्य पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांच्या दूरदृष्टीमुळे जवळजवळ वीस वर्षापूर्वी केळवे रोड येथे पाच एकराचा शासकीय भूखंड सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघास प्राप्त झाला. हा भूखंड त्या काळात प्रख्यात गायनाकॉलॉजिस्ट डॉ. बी एन पुरंदरे यांना शासनाने इस्पितळ उभारण्यासाठी दिला होता. परंतु हे कार्य त्यांच्याकडून होऊ शकले नाही. हा भूखंड संघास मिळताना शासनाने टाकलेल्या अटीत आरोग्यसेवा व वृद्ध सेवा याकरिताच हा भूखंड देण्यात येत आहे, असे स्पष्ट केले होते. हा भूखंड मिळविण्यासाठी पू. भाऊसाहेब वर्तकां बरोबर डाॅ.बळवंत ज पाटील व त्यावेळी सचिवालयात कार्यरत असलेले राजपत्रित अधिकारी श्री रामभाऊ वर्तक, यांची मोलाची मदत मिळाली आहे. भाऊसाहेब वर्तक यांनी हे मनोमन जाणले होते की,आज नाही तरी काही काळाने जेष्ठ नागरिकांची समस्या आपल्या समाजास नक्कीच भेडसाऊ लागेल. अशा प्रकारचे विश्राम धाम संघाने निर्माण करावे यासाठी त्यांनी समाज कार्यकर्त्यांना तयार केले. विचार मोठा होता.पण त्या वेळेच्या सामाजिक मनोबलास झेपणार नव्हता. तरीही त्यांनी त्याकरिता रुपये पाच लाखाची देणगीही देऊ केली.

     या भूखंडावर आरोग्य सेवा सुरू झाली व ती आजतागायत चांगल्या प्रकारे सुरू आहे. परंतु दुसरी अट वृद्धसेवा आजपर्यंत संघास पूर्ण करता आली नव्हती. आपणाकडून दिलेल्या अटीचे पालन होत नाही म्हणून हा भूखंड आपल्याकडून परत का मागू नये, अशा प्रकारची विचारणा शासनाकडून होऊ लागली. चक्रे फिरू लागली. आणि सर्व पूर्व तयारी करून जव्हारच्या कलेक्टर कडून ‘एन ए’, ची मान्यता,वृद्ध सेवा व सांस्कृतिक कार्य याकरिता मिळविण्यात आपणास यश प्राप्त झाले. संघातील सर्व मतभेद मिटवून भाऊसाहेबांचे स्वप्न असलेले हे विश्राम धाम उभारण्याचे नक्की करण्यात आले. सर्व समाजाची त्यास मान्यता मिळाली.पद्मश्री भाऊसाहेबांचा विचार हा मोठा होता याची जाणीव ठेवून समाजाने या प्रकल्पाचे नाव ,”पूज्य पद्मश्री भाऊसाहेब वर्तक व श्रीमती इंदुताई वर्तक विश्रामधाम”, असे नक्की केले. 24 एप्रिल 2012 या शुभमुहूर्तावर भूमिपूजनाचा कार्यक्रम भाऊसाहेबांचे धाकटे  बंधू श्री हरिहर गोविंदराव वर्तक यांच्या शुभहस्ते पार पडला. 

     तीन वर्षाचा कालावधी निश्चित करून या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. ही निश्चितच समाधानाची बाब आहे की,आम्ही या प्रकल्पाची पूर्तता केवळ 22 महिन्यात केली. केळवे रोड येथील पाच एकर भूखंडाचे संपूर्ण चित्रच बदलून टाकणाऱ्या या भव्य व दिव्य विश्रामधामाची वास्तु दिमाखात उभी आहे . संपूर्ण परिसरच बदलण्याची किमया संघाने केलेली आहे. भविष्याचा वेध घेऊन ही निर्माण झालेली वास्तू, डहाणू  पालघर, वसई तालुक्यात एकमेव अशी आहे.या वास्तूमुळे ज्येष्ठ नागरिकांना आपल्या स्वतःच्या घरापासून दूर पण वास्तव्यातले घर प्राप्त झालेले आहे. रुपये एक कोटी ऐंशी लेख  ,(1,8000,000रू),इतका खर्च होऊन अजूनही रुपये तीस लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या विश्रामधामात दोन व्यक्ती राहतील अशा दहा सदनीका असून,पाच व्यक्ती राहतील अशा तीन सदनिका आहेत. अशा प्रकारे एकूण 35 व्यक्तींच्या वास्तव्याकरिता सोय झालेली आहे. सर्व सदनीका स्वयंपूर्ण असून मदतीकरिता स्वागत कक्ष,कार्यालय व सहाय्यक आहेत.याशिवाय  मनोरंजनासाठी वाचनालय,इंटरनेट सहित, संगणक कक्ष आणि जेवणासाठी दालन, आधुनिक स्वयंपाक घर, स्टोर रूम व लॉन्ड्री अशा विभागाने विश्रामधाम परिपूर्ण झाले आहे. आजच्या घडीला फक्त तळमजल्याचे  काम पूर्ण झाले आहे.भविष्यात या वास्तूवर आणखी तीन मजले बांधण्याचा मानस संघ बाळगून आहे.

     या सर्वाकरिता समाजांतील थराथरांमधून देणगी रूपाने  मदत मिळाली  आहे.  त्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नसता. आमच्या सर्व देणगीदारांना मानाचा मुजरा! भविष्यात अजूनही मदत लागणार आहे . समाज ती आनंदाने पूर्ण करेल असा मला विश्वास वाटतो. आपल्या सहकार्यातून पूज्य पद्मश्री भाऊसाहेब वर्तक व श्रीमती इंदुताई वर्तक विश्रामदामाची भव्य वस्तू निर्माण झाली आहे .सर्व सोयींनी स्वयं असलेल्या या विश्रामधामाचे उद्घाटन भाऊसाहेबांच्या जन्मशताब्दी दिनी केंद्रीय कृषिमंत्री नामदार सन्माननीय श्री  शरद रावजी पवार यांच्या शुभहस्ते होत आहे.  त्यानिमित्त प्रसिद्ध होणारा पद्मश्री भाऊ साहेबांच्या जीवनकार्याचा हा” स्मृतिगंध”, वाचकांना, नव्या पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो “.

   श्री. विलास बंधू चोरघे, सन्मा. मनोहर जोशीसर मा. केंद्रीय मंत्री व मा. सभापती लोकसभा, यांना “स्मृतिगंध”शताब्दी गौरव ग्रंथ भेट देताना।

   विश्रामधाम प्रकल्पाची पूर्तता होत असताना बंधू बरोबर काम करण्याची संधी मलाही मिळाली होती. त्यावेळी बंधूंचा लोकसंग्रह व धडाडी यामुळेच हे काम केवळ 22 महिन्यात होऊ शकले याची मला जाणीव आहे.

    पू अण्णासाहेब व पद्मश्री भाऊसाहेब या पिता-पुत्रांची जोडी आमच्या समाजाला निश्चितच संजीवनी ठरली आहे.दोघांच्या योगदाना विना सोमवंशी क्षत्रिय संघाची कल्पनाही करवत नाही .खरंतर असे म्हणतात, मायेची ऊब आणि पित्याची छत्रसावली यामध्येच माणसाचे व्यक्तिमत्व घडत असते.या दोन महापुरुषांच्या बाबतीत ते तंतोतंत खरे आहे. मोठ्या वृक्षाखाली लहान रोपटे कधीच वाढत नाही ते खुरटते, असेही   म्हणतात. पण त्याला भाऊसाहेब अपवाद आहेत. अण्णासाहेब एक महावृक्ष होते.आधारवड होते. त्यांच्या सावलीत भाऊसाहेबांचे व्यक्तित्व फुलले. ते अधिक बहरून आले. याला कारण त्यांनी वाढावं, फुलाव ,बहराव वेळप्रसंगी त्यांच्या पेक्षाही उंच भरारी घ्यावी अशीच अण्णासाहेबांची मनोमन कामना होती. आपले जीवन समाजोउन्नतीच्या कारणे लागले हा आनंद दोघांनाही आपल्या जीवनाच्या अंतिम समयी होता. म्हणून अण्णासाहेब म्हणाले..

    “माझ्या सबंध आयुष्यात वाईट वाटण्यासारखे काही घडले आहे काय? शेवटपर्यंत मी सर्वांची सेवा करू शकलो यातच माझ्या व्रताची पूर्तता झाली. माझे जीवन सार्थकी लागले.”

   अण्णासाहेबांनी जपलेली मूल्ये  व त्यांचे विचार तरुणापर्यंत पोचविण्यासाठी भाऊसाहेबांनी सर्व काही केले.  भाऊसाहेब म्हणत ,

     “माझ्या जीवनातील ज्यांनी माझ्या व्यक्तिमत्त्वावर सुसंस्कार केले ज्यांच्या छायेत व सहवासात वाढत असताना माझ्या अंगी सत्प्रवृत्तीचा विकास होत गेला त्यांचे स्मरण मी कृतज्ञतापूर्वक करीत असतो.त्यातील सर्वप्रथम माझे पूज्य पिताजी स्वर्गीय अण्णासाहेब व माझे शालेय जीवनातील गुरुजी स्वर्गीय आचार्य भिसे सर. या ध्येयवादी त्यागी, वडील व गुरुजनांचे मला नेहमी तीव्रतेने आठवण येते .त्यांच्या शिकवणीतून राष्ट्र राष्ट्र प्रेमाची व उदात्त विचारांची प्रज्वलित ज्योत माझ्या अंतकरणात सदैव देवत राहिली माझेही जीवन सार्थकी लागले!”

      दोघेही पिता-पुत्र आज स्वर्गातून आपल्या संघाच्या या डेरेदार वृक्षाकडे मोठ्या गर्वाने बघत असतील. तुकाराम महाराज म्हणतात की हरीचे नाम कितीही सेवन केले तरी पोट भरल्यासारखे वाटत नाही. ते सुख साठवण्याकरता एक जन्म पुरेसा पडणार नाही, अनेक जन्म घ्यावे लागतील. त्याप्रमाणे या पिता-पुत्रांच्या मनात हेच विचार येत असतील. लोकांसाठी काम करताना जे सुख मिळाले ते साठवण्यासाठी आमच्याकडे एक जन्म पुरेसा नव्हता. ते सुख भोगण्यासाठी आम्हाला कितीही जन्म घ्यावे लागले तरी बेहत्तर!

  आवडीन पुरे, सेविता न सरे! पडियेली धुरेसवे गाठी,

  न पुरे हा जन्म, हे सुख सांठिता,पुढती ही आता हे चि मागितो!!

कै. पू. अण्णासाहेब वर्तक व पूज्य पद्मश्री भाऊसाहेब वर्तक या दोघांच्याही स्मृतीला विनम्र अभिवादन करून हे लिखाण संपवितो.

दिगंबर वा राऊत 

माजी कार्यकारी विश्वस्त 

सो. क्ष. संघ फंड ट्रस्ट.