सोमवंशी क्षत्रिय वाडवळ पाचकळशी समाजाची मागील शंभर वर्षांतील वाटचाल

 – डाॅ. नरेश हरिश्चंद्र सावे, तारापूर

 संघ स्थापनेच्या वेळी वसई-होळी येथील भाईजी जगू राऊत यांच्या घरी उपस्थित संघश्रेष्ठी व समाज बंधू भगिनी. दुर्मिळ फोटो आहे.

सोमवंशी क्षत्रिय वाडवळ पाचकळशी हा प्रामुख्याने पालघर जिल्ह्यात वसलेला समाज आहे. शके  १०६२ म्हणजे इ. स. ११४० च्या सुमारास  प्रतापबिंब राजाने चाम्पानेरहून निघून पैठण येथे काही काळ वास्तव्य करून अपरान्त म्हणजे उत्तर कोकण जिंकण्याच्या उद्देशाने आपल्या भागावर स्वारी केली. तारापूर जिंकल्यानंतर तो महिकावती म्हणजे माहीम येथे येऊन त्याने ती राजधानी केली. या भागात येताना त्याने जी ६६  कुळे सोबत आणली त्यापैकी २७  कुळे सोमवंशीय होती. त्या कुळांपैकी काही कुळांचा समुदाय हाच सोमवंशी क्षत्रिय वाडवळ, पाचकळशी समाज!

    विचारांची धाटणी आणि रीतिरिवाज यांच्या समान धाग्यावर समाजाची ओळख निर्माण होते.  सोमवंशी २७ कुळांमध्येही थोड्याफार भिन्नतेवर विभागणी होऊन विवाहप्रसंगी वापरीत असलेल्या पाच कलश असलेल्या सिंहासनाच्या आधारावर या समाजाने आपली ओळख सीमित केली. प्रतापबिंब राजाने लढा देण्यासाठी आणलेली सर्व कुळे ही क्षत्रिय वर्णाचीच होती.

    कोणताही समाज अमुक एकावर्षी निर्माण होत नसतो. हा समाजही असाच बाराव्या शतकापासून येथे स्थिरावला आणि लढाया थांबल्यानंतर मुबलक जमीन उपलब्ध असल्यामुळे शेती बागायतीत रमून बेटी व्यवहारामुळे मिळून मिसळून आपली ओळख दृढ करीत राहिला.

    प्रतापबिंब राजाबरोबर १२ व्या शतकात आजच्या पालघर जिल्ह्यात हा समाज येण्यापूर्वी त्याची कुळे आणि पूर्वज चाम्पानेर किंवा त्यापूर्वी कोठे राहत असतील तेथेही हा समाज सोमवंशी (चांद्रवंशीय) असला तरी सोमवंशी क्षत्रिय वाडवळ पाचकळशी अशी त्याची ओळख नव्हती. आज या समाजासोबत असलेल्या पोटजातीतील आणि समसंस्कृतीच्या सोबत वावरणाऱ्या अनेक ज्ञातींपैकीच हा समाज होता. 

    बहुजनसमाजात या समाजाची ओळख निर्माण व्हायला विसावे शतक उजाडावे लागले. त्यावेळी ग-हाडीच्या वाटा, साधे रस्ते,  बैलगाड्या, टांगे याच संपर्काच्या सोयी उपलब्ध असताना; एखादी खाडी वाहत असलेल्या ठिकाणी पलीकडे कोणते गाव आहे याची तुटपुंजी माहिती असताना मुंबईतील महाविद्यालयात बी. ए. चा अभ्यास करणारा विशीतील एक तरुण आपल्या समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो; सन १९१९ मध्ये वयाच्या पंचविशीत गावोगावी स्वयंसेवक मंडळ स्थापन करतो आणि  दि. २८ मार्च १९२० रोजी वयाच्या सव्वीशीत सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाची स्थापना करतो हे सर्वच अचंबित करणारे आहे.

   सन १९४४~४५ मधील समाजाचे कार्यकारी मंडळ. 
  खुर्चीत बसलेले( डावीकडून) सर्वश्री-श्री मुकुंदराव सावे,अण्णासाहेब वर्तक, तात्यासाहेब चुरी, नारायण भास्कर म्हात्रे, बळवंत जगन्नाथ वर्तक, गोपाळराव नानाजी पाटील.
   मागे उभे (डावीकडून), सर्वश्री हिरा बापू पाटील, मदनराव लक्ष्मण राऊत, आत्माराम विठ्ठल सावे, भास्करराव राऊत, डॉक्टर दिनानाथ बा चुरी.

    हा तरुण म्हणजे विरारनिवासी आदरणीय श्री. गोविंदराव धर्माजी तथा अण्णासाहेब वर्तक. त्यांनी दि. २ व ३ मे १९२१ रोजी वसईत पहिली परिषद भरवून त्यात स्वतः तयार केलेली घटना मंजूर करून त्या संस्थेचे सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ असे नामकरण मंजूर करवून घेतले.

    प्रस्तुत लेखाचा उद्देश सोमवंशी क्षत्रिय वाडवळ पाचकळशी समाजाची वाटचाल असा असला तरी संघाची स्थापना हीच समाजाची व्याप्ती निश्चित करणारी असल्याने संघाचे कार्य आणि समाजाची वाटचाल अभिन्न ठरतात. त्यामुळे संघस्थापनेपासून त्याचे निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी हा समाजाच्या वाटचालीचा अविभाज्य भाग आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.

     सोमवंशी क्षत्रिय वाडवळ पाचकळशी समाज हा शंभर वर्षांपूर्वी म्हणजेच सो. क्ष. स. संघ स्थापनेच्या वेळी आर्थिकदृष्ट्या अतिशय मागासलेला होता. त्यामुळे तो अन्य क्षेत्रांतही खूप मागे होता. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपणाचे एक दुष्टचक्र आहे. गरिबी असल्यामुळे शिक्षणात हा समाज मागे होता. त्यामुळे सामाजिक प्रगतीही नव्हती. सुदैवाने त्याकाळी अण्णासाहेब वर्तक, तात्यासाहेब चुरी, मुकुंदराव सावे यांच्यासारखे काही द्रष्टे नेते आणि अनेक कार्यकर्ते या समाजास मिळाले. त्यांच्या सामुदायिक प्रयत्नांनी संघाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी ठोस पावले उचलली गेली; शिक्षणप्रसाराला अग्रक्रम दिला गेला. या समाजाचे वास्तव्य असलेल्या प्रथम माकुणसार आणि नंतर अन्य दुर्गम गावांत शाळा सुरू करण्यात या नेतेमंडळींना यश आले. सुरुवातीस मुली फारशा शिकत नव्हत्या. त्यांना प्रोत्साहन म्हणून परकर-पोलक्याचे कापड त्यांना प्रोत्साहन म्हणून दिले जाई.  मुलं व्हर्नॅक्युलर फायनलपर्यंत शिकल्यानंतर त्यांना शिक्षकाची नोकरी मिळू लागली. त्यामुळे या समाजाच्या शैक्षणिक वाटचालीस चांगली चालना मिळाली.

सन 1969 सो क्ष संघ पदाधिकारी व संघ फंड ट्रस्टचे विश्वस्त.

   शंभर वर्षांपूर्वी अंधश्रद्धा, पारंपारिक जुने रीतीरिवाज यात हा समाज बऱ्यापैकी जखडलेला होता.  पारंपारिक शेतीमधील उत्पन्न तुटपुंजे असे. स्वतःची जमीन नव्हती. शेतीउत्पन्नाचा मोठा भाग खंड म्हणून सावकाराला द्यावा लागे. त्यातच अनेकांना मद्यपानाची सवय लागली होती. त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढला होता. इंग्रजांची गुलामगिरी होती. वादळ, पूर यासारख्या अस्मानी संकटाचा सामना करावा लागत होता.  त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत तरी वाडवळ समाज अप्रगत म्हणावा असा मागासलेला होता. कौतुकाची बाब म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत हा समाज बऱ्यापैकी सहभागी होता. या चळवळीत बोर्डीचा उल्लेख अभिमानाने करावा लागेल. या समाजातील शासन दरबारी नोंद असलेल्या ७३ स्वातंत्र्यसैनिकांपैकी ४७ जण बोर्डीतील होते.

    खानेसुमारी हे या समाजाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. भारत सरकारप्रमाणे या समाजाची सन १९२१ पासून सन १९७९ पर्यंत नियमित दशवार्षिक खानेसुमारी होत होती. त्यामुळे समाजाच्या लोकसंख्येचा, प्रगतीचा आणि विविध पैलूंचा आढावा घेता येत होता.

    विशेष म्हणजे राजकीय क्षेत्रात या समाजाने दमदार पाऊल टाकले. पंचायत समितीपासून संसदेपर्यंत या समाजातील बांधवांनी आपले स्थान अधोरेखित केले. यात विरारच्या वर्तक  कुटुंबाची विशेष नोंद घ्यावी लागेल.  सर्व मान. अण्णासाहेब वर्तक, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक, तारामाई वर्तक या विरारवासियांबरोबर बोर्डीचे शामराव पाटील यांनी वेगवेगळ्या काळात मंत्रिपदे भूषविली. सध्या चिंचणी/लातूरचे अतुलजी सावे हे मंत्रिपद भूषवीत आहेत. चिंचणी/लातूरचे मोरेश्वरजी सावे यांनी दोन वेळा खासदारपद भूषविले. विरारचे पंढरीनाथजी चौधरी यांचीही आमदारपदी निवड झाली होती. सध्या मनीषाताई चौधरी या आमदार आहेत.  ग्रामपंचायत सदस्यापासून महापौरपदापर्यंतच्या पदांवर कार्य करणाऱ्या समाजबांधवांची संख्या लक्षणीय आहे. राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाजबांधवांमुळे समाज विकासाला चांगली चालना मिळाली.

    या समाजाने सामाजिक ऐक्याचा पूर्वीपासूनच पुरस्कार केला. या समाजाच्या अन्य पोटजातींचे ऐक्य साधण्यासाठी सन १९४९ मध्ये क्षात्रैक्य परिषदेची स्थापना होऊन पाच पोटजातींचे एकीकरण करण्यात या समाजाने पुढाकार घेतला. ख्रिश्चनांच्या धर्मप्रसाराच्या प्रयत्नात काही समाजबांधव या समाजापासून दुरावले होते. सन १९५६ मध्ये त्यांना पुन्हा या समाजात सामावून घेण्यात आले. समाजजागृती आणि सामाजिक ऐक्यवृद्धीसाठी या समाजाने विविध गावांत अनेक परिषदांचे आयोजन केले. या परिषदांच्या माध्यमातून महिलांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले.

    या समाजाच्या नेत्यांनी दूरदृष्टीने सन १९६१ मध्ये दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी अण्णासाहेब वर्तक स्मारकमंदिराची उभारणी करून एक बहुउद्देशीय सभागृह आणि त्यावर विद्यार्थ्यांसाठी पूज्य तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृह निर्माण केले. त्या वसतिगृहात राहून अनेक समाजबांधव शिकले. त्याचा उपयोग त्यांच्या कुटुंबियांनाही झाला. परिणामतः आज या समाजातील अनेक समाजबांधव नोकरी-व्यवसायात देश विदेशात नाव कमावून आहेत. अल्पकाळात ही प्रगती चक्रवाढ़ीने झाली. समाजाला विद्यार्थिनींसाठी शंभर वर्षात स्वतःचे वसतिगृह निर्माण करता आले नाही याची खंत आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून काही सदनिका भाड्याने घेऊन त्यात मुलींची व्यवस्था करण्यात आली. पण त्या योजनेस अपेक्षित यश लाभले नाही.

    या समाजाने ‘ उद्धरेत् आत्मना आत्मानम्। ‘ ही गीतेतील शिकवण स्वीकारून आपले क्षात्रतेज जागविले.  शिक्षणात, नोकरी-व्यवसायात स्वतःच्या पायावर उभे राहून प्रगतीचा बाणा स्वीकारला. पण पुढे काळाच्या बरोबर चालणाऱ्या या समाजाने परिस्थितीचा आढावा घेऊन आपली विचारधारा बदलली. आज या समाजाचा केंद्र व राज्य सरकारच्या इतर मागासवर्गीयांच्या यादीत समावेश झाला असून आरक्षणाचा लाभ हा समाज घेत आहे. त्याचा उपयोग हा समाज फक्त आपल्या उपजीविकेसाठी करीत नसून सर्वांगीण प्रगतीसाठी करीत आहे.

   सामाजिक स्तरावर या समाजाने मोठी उंची गाठली असून या समाजाची अनेक वैशिष्ट्ये इतरांसाठी मार्गदर्शक बनली आहेत. विवाहाबाबत सांगावयाचे तर हा समाज हुंडा पद्धतीपासून नेहमीच कोसो दूर राहिला. फार पूर्वी द्विभार्या पद्धत या समाजात रूढ असली तरी विसाव्या शतकात या पद्धतीस या समाजाने विरोध केला. तरीही विधवा विवाहास नेहमीच प्रोत्साहन दिले.  आंतरजातीय विवाहास खास प्रोत्साहन दिले नाही. पण टोकाचा विरोध करून कटूताही येऊ दिली नाही; विवाह समारंभातील साधेपणाचे नेहमीच कौतुक केले.

    या समाजाने समाजातील अंधश्रद्धांवर आधारित रीतिरिवाजांचा अभ्यास करण्यासाठी धर्मशास्त्रज्ञांना पाचारण करून त्यामागील शास्त्राधाराचा शोध घेऊन आणि त्यासाठी समाजातील विद्वानांची समिती नेऊन समाजाला मार्गदर्शन केले. सणासमारंभ प्रसंगी होणारा मद्यपानाचा वापर आणि त्याला मिळणारी प्रतिष्ठा दूर सारण्यासाठी या समाजाने सामाजिक व्यासपीठावरून विशेष प्रयत्न केले.

    काळाबरोबर चालणारा समाज अशी या वाडवळ पाचकळशी समाजाची ओळख राहिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीच्या रौप्य महोत्सवापर्यंत म्हणजेच यापूर्वीच्या पन्नास वर्षांपर्यंत एक पारंपारिक शेतकरी समाज हीच या समाजाची प्रमुख ओळख होती. पण त्यानंतर मात्र बहुजनसमाजाबरोबर या समाजाच्या प्रगतीचा वेग वाढला आणि विशेष म्हणजे अन्य समाजांपेक्षा या प्रगतीची गती अधिक राहिली. शेतीतही बहुजनसमाजापुढे आदर्श घडविणारे पद्मश्री हरिश्चंद्र गोपाळ पाटील याच समाजात निर्माण झाले. याच काळात प्रतिवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न यशस्वी झाले. समाजाच्या वाटचालीत सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ या समाजाच्या केंद्रस्थ संस्थेचा वाटा नेहमीच मोलाचा राहिला आहे. या संस्थेच्या माध्यमातून विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात समाजाला जोडणारे आणि समाजात जागृती आणि विविध क्षेत्रांत नवचैतन्य निर्माण करणारे अनेक उपक्रम सुरू झाले. 

    केळवेरोड येथील भूखंड खरेदी ही या समाजासाठी मोठी उपलब्धी ठरली आहे. बहुजनसमाजाची सेवा हे या समाजाच्या व्यापक दृष्टिकोनाचे निदर्शक आहे. त्याचा एक भाग असलेली रुग्ण आणि वृद्ध सेवा करण्याची संधी मिळण्यासाठी केळवेरोड येथील भूखंड अतिशय उपयुक्त ठरला आहे. लोकनेते अण्णासाहेब वर्तक आरोग्यधाम हा या भूखंडावर कार्यान्वित झालेला पहिला प्रकल्प हे या समाजाच्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाईल. विविध कारणांमुळे आजवर त्याचा मोठा विस्तार झाला नसला तरी भविष्यात त्याच्या प्रगतीचे मोठे स्वप्न पाहण्यास नक्कीच वाव आहे.

    या समाजाने हाती घेतलेल्या उपक्रमांमध्ये महिला मेळाव्याचे स्थान नेहमीच उच्च राहिले आहे. आजवर संघात आणि विविध गावात संपन्न झालेल्या अनेक मेळाव्यांतील महिलांची उपस्थिती चढत्या श्रेणीतील आहेच पण त्याचबरोबर त्याप्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, परिसंवाद हे मेळावा आयोजनाच्या उद्दिष्टपूर्तीस पोषक असेच असतात. सामान्यपणे इतर समाजांच्या तुलनेत या समाजात महिला जागृती, सक्षमीकरण यासाठी विशेष काही करण्याची आवश्यकता नाही. आज या समाजातील महिला शिक्षणात खूप पुढे आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींचे शिक्षण जास्त असल्यामुळे विवाह जुळवताना समस्या निर्माण होतात. विशेष नोंद घ्यायची तर वाडवळ पाचकळशी  समाजातील मुली मेडिकल, इंजीनियरिंग क्षेत्रातही आहेत.  नोकऱ्यांमध्ये त्या पुढे आहेतच पण व्यवसायातही त्या पुरुषांबरोबर आहेत. विशेष म्हणजे परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या आणि तेथेच नोकरी करणाऱ्या महिलांची संख्याही वाढत आहे.

    युवकांचा विचार करता या समाजातील युवक आता व्यवसायाकडे आणि त्यातही चाकोरीबाहेरील व्यवसायांकडे वळताना दिसत आहेत. प्रामुख्याने डहाणू तालुक्यातील युवा वर्ग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असणाऱ्या शेतीकडे वळताना दिसत आहे. या तरुणांनी भोपळी मिरची आणि ऑर्किड फूलशेतीचा व्यवसाय करणे हे अभिमानास्पद अशासाठी म्हणावे लागेल की, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शेती, शेतकरी ही समाजाची मूळ ओळख संपुष्टात येईल की काय अशी स्थिती होती.  आय. टी. क्षेत्रातील युवकांचा प्रवेशही विशेष नोंद घेण्याजोगा आहे.

     वाडवळी खाद्य संस्कृती आता खूप बदलली आहे. शंभर वर्षांपूर्वी वाडीतील भाजीपाला, ताजे मासे,  सुकी मासळी आणि भात हेच जेवण  असे. सकाळी तांदळाच्या भाकरीबरोबर रात्रीचे शिल्लक कालवण, कांदा, भाजलेले सुके बोंबील असा नाश्ता असे. मटन वर्षातून मोजक्या सणांनाच तोंडी लागत असे. घरच्या कोंबड्यांवर मात्र पाहुण्यांसोबत ताव मारला जाई. काळाच्या ओघात हे आता पार बदलले आहे. शहर निवासी वाडवळ तर आता मॉडर्न बनलेच आहेत पण गावातील वाडवळांच्या जेवणातही गव्हाची पोळी आज अनेक घरात असते. ब्रॉयलर चिकन हा आता जेवणाचा अविभाज्य भाग बनला आहे. भाजीपाला, कडधान्य, ओले-सुके मासे आज जेवणात असतात. शहरात ऑनलाइन जेवण, पिझ्झा, बर्गर, आधुनिक पदार्थ जेवण, नाश्त्यात सर्रास असतात. आठवड्यातून काही वार आणि काही तिथींना शाकाहारी जेवण अनेक कुटुंबात असते. महिलांच्या आग्रहास्तव किंवा व्यवहार म्हणून शाकाहारी जेवण संपूर्ण घरात असते.  उकडहंडी, पोतेंडी याबरोबर अळूवडी, कोंबडी वडे अशा पदार्थांची आवड भागविण्यासाठी आणि गावाकडचे मसाले आणि पदार्थ मिळविण्यासाठी शहरी भागात वाडवळी बाजारपेठांचे आयोजन केले जाते. महिलांचा व्यवसायाकडे कल वाढल्यामुळे आणि त्याची गरज बनल्यामुळे अशा बाजारपेठांना चांगली मागणी असते आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो.

    वाडवळी पाचकळशी भाषेचा विचार करता या समाजाचे ढोबळमानाने चार भाग पडतात. बोर्डी ते तारापूर हा एक भाग, केळवे-माहीम हा दुसरा भाग, सफाळे परिसर हा तिसरा तर विरार-वसई हा चौथा भाग. स चा ह हा उच्चार (साखर- हाकर) हा सर्वांसाठी समान असला तरी नकार दर्शक नाहीला पहिल्या भागात नी  आणि उर्वरित तीन भागात नय हा फरक आहे. सफाळे भागात जास्त हेल काढून बोलले जाते. शंभर वर्षांतील बदलाचा विचार करता संपूर्ण पट्ट्यात वाडवळी भाषा लोप पावत चालली आहे असे म्हणावे लागेल.  नवीन पिढी मराठी बोलत असल्यामुळे ज्येष्ठांनाही मराठीच बोलावे लागते. घरातील आजची ज्येष्ठ मंडळी ही चांगली शिकलेलीच असल्यामुळे त्यांनाही मराठी बोलणे गैर वाटत नाही. त्यामुळे एकंदरीतच वाडवळी भाषाप्रेमच कमी झाल्याचे जाणवते.  अधूनमधून वाडवळी भाषाप्रेम उफाळून आले तर ती बोलण्याचा प्रयत्न ज्येष्ठांमध्ये होतो. सन २००७  मध्ये वाडवळी भाषा संमेलन वसई येथे आयोजित करण्यात आले होते. सन २०२१ मध्ये सो. क्ष. स. संघाने वाडवळी संस्कृती संवर्धन समिती  गठीत केली. पण तिच्याकडूनही काही ठोस पावले उचलली गेली नाहीत.  समाजात एखादा वाडवळी शब्दकोशही निर्माण झाला. परंतु अलीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे या समाजाचा कल वाढला आहे. त्यामुळे अनेकांच्या बोलण्यात So So चे प्रमाण इतके वाढले आहे की, वाडवळी भाषा समृद्ध होणे कठीण आहे असे वाटते.

    वाडवळी पेहरावचा विचार करता शंभर वर्षांच्या वाटचालीत पूर्वीचा पेहराव फार मागे पडला आहे.  पुरुषांची धोतर, बंडी, टोपी यांची जागा आता पाश्चात्य शर्ट, पॅन्ट, सूट यांनी घेतली आहे. महिलांचे नऊवारी लुगडे आणि मुलींचे परकर-पोलके यांची जागा पाचवारी साडी, पंजाबी ड्रेस, गाऊन यांनी घेतली आहे. या समाजातील मंडळी २१व्या शतकात मोठ्या संख्येने परदेशात गेली. परंतु हा पेरावातील बदल आसपास स्वातंत्र्यप्राप्तीकाळापासूनच झाला.  पेहराव या विषयात आपण जवळपास पूर्णपणे पाश्चात्य बनलो आहोत असे वाटून जाते. नजीकच्या भविष्यात महिलांची साडी ही सणासमारंभात मिरवण्‍यासाठीचाच पोशाख राहील असे वाटते.

    वाडवळी घरेही आता बदलली.  पूर्वी ओटा, ओसरी, खोली, स्वयंपाकघर, मागीलदार, बाजूला वाडा, वाड्यात बाथरूम अशी बहुतांश घरांची रचना असे. घरात लादी जवळपास नसेच. अलीकडच्या ३०/४० वर्षांत घरांची रचना बदलली.  बीएचके ही संकल्पना आली. ब्लॉक/ बंगल्यातच नव्हे तर लहान घरकुलातही मूळ कल्पना तीच आली आहे. फरक फक्त आकाराचा आणि दर्जाचा आहे. गावांमध्येही आता या समाजाचे टुमदार बंगले डौलाने मिरवत आहेत. शहरातही ब्लॉक संस्कृतीतच वाडवळांचे जीवन व्यतीत होते. उत्पन्नानुसार अलीकडे बृहन्मुंबईकडून उपनगरे आणि आता विरार, सफाळे, नवी मुंबई असे स्थलांतर होत आहे.

    लेखन क्षेत्रात या समाजाने अलीकडच्या काळात प्रवेश केला आहे. या समाजातील साहित्यिक म्हणून मोजक्याच जणांनी नाव कमावले आहे. कवी आरेम पाटील,  नंदन पाटील, डाॅ. जयंतराव पाटील यांची साहित्य सेवा करणारी बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातही डाॅ. जयंतराव पाटील यांची अनेक पुस्तके कृषी क्षेत्राशी निगडित आहेत. अलीकडच्या काळात विविध विषयांवर अनेकांनी लेखन केले असून काही जणांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. तरीही शिक्षण क्षेत्रात नावलौकिक कमावलेल्या या समाजाने साहित्य क्षेत्रात यापेक्षा अधिक योगदान देणे अपेक्षित आहे.

    या समाजात क्रीडा क्षेत्रात विसाव्या शतकात नावाजलेले क्रीडानैपुण्य अपवादानेच कमावले असेल. पूर्वी आर्थिक कमजोरीमुळे बिनपैशाचेच खेळ खेळण्यावर भर असे. मुलींसाठी बिट्ट्या, कवड्या, आट्यापाट्या, पत्ते असेच खेळ असत. मुलांसाठी कबड्डी,  खो-खो, सुरपारंब्या, आबादुबी,  कवड्या, पत्ते असे खेळ प्रमुख असत. काही खेळ कॉमन होते. अलीकडच्या काळात क्रिकेट या खेळाने तरुणांचे जीवन व्यापले आहे. अगदी अलीकडच्या काळात मोजके  वाडवळ खेळाडू राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले असले तरी क्रीडा क्षेत्रातील या समाजाची गती मर्यादित आहे.

    या समाजाने केळवेरोड येथील भूखंडावर सन २०१४ मध्ये प. भाऊसाहेब वर्तक व श्रीमती इंदुताई वर्तक विश्रामधामची निर्मिती केली. बहुजनसमाजासाठी असणाऱ्या या वृद्धाश्रमाला विश्रामधाम म्हणण्यात समाजाच्या वैचारिक उंचीचे दर्शन घडते. महाराष्ट्रातील अनेक वृद्धाश्रमांच्या तुलनेत अनेकदृष्टींनी हा प्रकल्प उजवा ठरेल. येथील सुविधा,  वातावरण आणि सेवाशुल्क हे सर्वच विशेष नोंद घेण्याजोगे आहे. आरोग्यधामप्रमाणे विश्रामधामची उभारणी हे या समाजाच्या विशाल दृष्टिकोनाचे दर्शन घडविते.

    या समाजाच्या पुढाकाराने बोरीवली येथे समाजोन्नती शिक्षण संस्था हे एक शैक्षणिक संकुल उभारून शिक्षण क्षेत्रात एक दमदार पाऊल टाकले आहे. समाजविकासासाठी समाजबांधवांची आर्थिक बाजू भक्कम असणे हे शिक्षणाइतकेच महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या समाजातील काही समाजधुरिणांनी एकत्र येऊन दि सेतू क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी तसेच वसई विकास सहकारी बँकेची स्थापना केली. या दोन्ही आर्थिक आस्थापनांच्या या समाजबांधवांच्या प्रमुख वास्तव्य असणाऱ्या परिसरात शाखा उघडण्यात आल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक वाडवळ बांधव आपल्या व्यवसायाचा विकास करीत आहेत. वास्तू बांधणी कर्ज व शैक्षणिक कर्ज उपलब्ध झाल्यामुळे समाज विकासाला चालना मिळत आहे.

    एकंदरीत सोमवंशी वाडवळ पाचकळशी समाजाची मागील शंभर वर्षांची वाटचाल ही यशस्वी आणि उद्दिष्टानुगामीच झाली आहे असे सकृतदर्शनी दिसून येते. जवळपास सर्वच क्षेत्रांत या समाजातील बांधवांनी दमदार पावले टाकली असे म्हणता येईल. या शंभर वर्षांच्या वाटचालीच्या प्रारंभकाळात अनेक द्रष्टे समाजधुरीण  या समाजास लाभले. त्यांनी सो. क्ष. स. संघ या संस्थेच्या माध्यमातून समाजबांधवांना एकत्र आणून त्यांना दिशा दिली. विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजाचा विकास केला. आपले अनेक समाजबांधव निरक्षर होते पण ते अशिक्षित नव्हते. ते सुसंस्कृत होते. म्हणूनच त्यांनी समाज नेत्यांचा मान ठेवून त्यांच्या योजना यशस्वी करण्यासाठी सक्रिय योगदान दिले. या समाजबांधवांनी आपल्या नेत्यांचा मान तर ठेवलाच पण त्यांच्याप्रति शक्य तेथे कृतज्ञताही व्यक्त केली. परिणामतः विविध गावांमध्ये समाजधुरिणांची निर्माण झालेल्या सव्वाशे स्मारकांची यादी वाचताना समाज आणि समाजबांधवांबद्दल अभिमान वाटतो आणि ऊर भरून येते. ज्या समाजात ज्येष्ठांप्रति आदर बाळगला जातो तो समाज प्रगत मानला जातो. हा समाज दुसऱ्यांच्या द्वेषावर मोठा झाला नाही. द्वेषावर मिळविलेला नावलौकिक अल्पजीवी असतो. सभोवतालच्या अनेक तथाकथित प्रगत समाजांत विवाहप्रसंगी हुंडा आणि मान सन्मानासाठी बैठकी होतात आणि ते राजमान्य असते. हे सर्व माहीत असूनही त्या कल्पनेचा या समाजात प्रवेश झाला नाही हे या समाजाचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अशा अनेक बाबतीत हा समाज कौतुकास पात्र आहे. या समाजाच्या अनेक कौतुकास्पद बाबी मी येथे नमूद करीत असलो तरी मी येथेच थांबलो तर ते  विश्लेषण एकतर्फी होईल. त्यामुळे या समाजाच्या प्रगतीतील बाधक बाजूही विशद करणे गरजेचे आहे. २१ व्या शतकाच्या प्रारंभापासून बहुजनसमाजाबरोबरच विविध क्षेत्रांत या समाजाने शब्दशः मुसंडी मारली. या समाजाची शिक्षणातील प्रगती नेत्रदीपक म्हणावी अशीच आहे.  त्याचा परिणाम असा झाला की, मूळ गावी राहणे प्रगतीच्या आड येऊ लागले. त्यामुळे नोकरी-व्यवसायासाठी स्थलांतर करणे आवश्यक झाले. आपल्या देशातील अन्य राज्यात जाणे ठीकच होते पण तेवढ्याने भागणारे नव्हते. त्यामुळे प्रामुख्याने अमेरिका आणि इंग्लंडबरोबर अन्य देशांतही शिक्षणासाठी आणि नंतर नोकरी-व्यवसायासाठी जाऊन तेथे स्थायिक होणे क्रमप्राप्त झाले. परदेशगमनाचा निश्चित आकडा उपलब्ध नसला तरी हल्ली अनेक गावांतून अनेक समाजबांधव आज परदेशांत आहेत. तारापूर या गावाने त्यांच्या सोमवंशी क्षत्रिय समाज संघ या संस्थेचा शतक महोत्सव साजरा करताना सन २०१६  मध्ये गावातील वाडवळांची जनगणना केली. त्यावेळी एकूण १३७५ लोकसंख्येपैकी ६७ म्हणजे ४.८८ टक्के वाडवळ परदेशात राहत असल्याचे दिसून आले. 

   हे विस्ताराने सांगण्याचे कारण एवढेच की, प्रगतीच्या नावाखाली हा समाज मूळ गावापासून दूर गेल्यामुळे विभक्त कुटुंबांचा स्वीकार ओघानेच आला. त्याचा परिणाम म्हणजे वृद्धांच्या समस्या निर्माण झाल्या. मूळ संस्कारांमुळे इतरांइतके त्यांचे आज हाल होत नसले तरी त्या समस्येची वाटचाल दुर्लक्ष करण्याजोगी नक्कीच नाही. मूळ गावातील वास्तव्य बदलल्यामुळे आणि नोकरी-व्यवसायात संपर्क वाढल्यामुळे मिश्र जातीविवाह संख्या वाढली. काळानुसार आणि पुरोगामी विचारसरणीनुसार त्याचा स्वीकार अपरिहार्य असला तरी भिन्न संस्कृतीचा स्वीकार करणे ओघानेच आले. एकूण काय तर पूर्वीची कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली हे नक्की. बदललेली परिस्थिती, उच्च शिक्षणामुळे नवविचारांचा स्वीकार,  पाश्चात्त्य संस्कृतीशी आलेली जवळीक, पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित आणि स्वतंत्रमतवादी त्यामुळे कुटुंबातील बेबनावाचे प्रमाण वाढले आणि कुटुंबात टोकाचा विसंवाद सुरू झाला. हे प्रत्येक कुटुंबात झाले नसले तरी अशा कुटुंबांची संख्या वाढली. एका कुटुंबाचे अनुकरण दुसऱ्या कुटुंबात होऊ लागले. घटस्फोटांची संख्या वाढली. अशा परिस्थितीत कुटुंबातील आई-वडिलांची आणि सासू-सासर्‍यांची घुसमट होणे ही आज मोठी समस्या निर्माण होऊन अनेकांची रवानगी वृद्धाधामात होणे हा त्याचा परिणाम ठरला आहे. 

    याच शतकात मुलींचा हिस्सा हा आजपर्यंत नसलेला विषय पुढे आला आणि आजपर्यंत वाडवळ कुटुंबातील मुलीचे माहेरपण आणि त्यातील मायेचा ओलावा आता संपुष्टात येऊ लागला आहे. आय. टी  क्षेत्रातील नोकऱ्या, तासन् तास बैठे काम, चौरस आहाराकडे दुर्लक्ष, घरगुती जेवणापेक्षा हॉटेलच्या सोडायुक्त आणि अनारोग्यकारक आहार आणि आरोग्यविषयक काळजीचा अभाव यामुळे शारीरिक स्थूलपणा आणि  बळावलेल्या शारीरिक समस्यांचा हा समाज बळी ठरतो आहे हे सांगताना प्रगती आणि सुशिक्षितपणाची परिभाषा समजून घेण्याची गरज आहे असे आग्रहाने सांगावेसे वाटते. अनेक समस्यांना हा समाज तोंड देत आहे.  या संपूर्ण परिस्थितीकडे डोळसपणे पाण्याची आज गरज आहे. पर्यटन, सणांचे सेलिब्रेशन याकडेही नव्याने पाहण्याची गरज आहे निर्माण झाली आहे. या समाजाच्या मागील शंभर वर्षांच्या वाटचालीकडे आणि प्रगतीच्या विषयांकडे सकारात्मकपणे पाहताना या काळजी वाढविणाऱ्या बाजूकडे पाहणेही तितकेच गरजेचे आहे.

    समाज विकासाचा पाया घालणारे कै. पूज्य अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर.

शंभर वर्षांपूर्वी समाजाला दिशा देणारा आदरणीय अण्णासाहेब वर्तकांसारखा द्रष्टा नेता आणि त्यानंतरही अनेक नेते या समाजाला लाभले. तसाच नेता १०० वर्षांनंतर या समाजास लाभला आहे. हा दैवी संकेत असावा. अण्णासाहेब वर्तकांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व हे या समाजास प्रेरणादायी ठरले. आज आदरणीय श्री. भाईसाहेब राऊत यांचे नेतृत्वही त्याच निकषांवर खरे उतरत आहे. कारखानदारीत अब्जावधींची वार्षिक उलाढाल करणारा हा नेता आपल्या परिसराबरोबरच परक्या जिल्ह्यात स्वतःच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी करोडोंचे दान करतो आणि आपल्या समाजसंस्थेचे नेतृत्व करताना समाजाचे अनेक वर्षांचे विद्यार्थिनी वसतिगृहाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःची तीन कोटी रुपयांची देणगी जाहीर करतो; त्याचवेळी संस्थेचे अध्यक्षपद भूषविताना अहोरात्र झटून समाजाच्या वास्तूचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दारोदार देणग्या गोळा करण्यासाठी फिरतो. म्हणूनच या नेत्याच्या कर्तृत्वाला तोड नाही. या नेत्याच्या खांद्याच खांदा लावून अन्य समाजनेते समाज विकासासाठी सदैव झटत आहेत ही या समाजाची कमाई आहे.

    सोमवंशी क्षत्रिय वाडवळ पाचकळशी समाजाची मागील शंभर वर्षांची वाटचाल ही अन्य ज्ञातींसाठी दीपस्तंभाची भूमिका बजावणारी आहे, हे निःसंशय सत्य आहे. हे सांगताना मी या समाजाचा घटक असल्याचा मला अभिमान वाटतो. 

    ज्यांच्या आधारवड या ग्रंथासाठी हा लेख लिहिला आहे त्या आदरणीय श्रीमान् दिगंबर वामन राऊत यांच्या विषयी दोन शब्द लिहिल्यावाचून राहवत नाही. ज्यांच्या कृपेचा मी लाभार्थी आहे ते श्री. दिगंबर राऊत हे या समाजाचे आधारस्तंभ आहेत. या समाजाच्या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त पद भूषविताना त्यांनी समाजाच्या वृद्धसेवा प्रकल्पाची उभारणी करण्यात मोठे योगदान दिले. ते विज्ञान शाखेचे पदव्युत्तर शिक्षणप्राप्त विद्यार्थी असले तरी आदर्श चरित्रलेखक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यांची भाषाशैली अतिशय दर्जेदार आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या गुरुजनांबद्दलचा आदर अनेकांना असतो पण स्वतःच्या सहस्त्रचंद्रदर्शनयोगाचा आनंद अनुभवण्याच्या वयात आपल्या शालेय जीवनातील शिक्षकांची दुर्मिळ माहिती संकलित करून त्याचा ‘ तस्मै श्रीगुरवे नमः। ‘ हा ग्रंथ निर्माण करणे तसेच ज्या समाजात आपण वाढलो त्यातील काही समाजधुरिणांची दुर्मिळ माहिती मिळवून त्यांचे चरित्रलेखन करण्यामागील त्यांच्या भावनेला आणि त्यांच्या शैलीदार लेखनाला मी सलाम करतो. त्यांच्यासारख्या दर्जेदार चरित्रलेखकाने मला त्यांच्या ग्रंथात लिहिण्याची संधी देऊन केलेल्या माझ्या बहुमानाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.

   पू. अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिराची पुनर्विकासानंतरची वास्तू.

माझ्या सोमवंशी क्षत्रिय वाडवळ पाचकळशी समाजाचा उत्कर्ष होऊन बहुजनसमाजासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावण्याचे बळ आणि क्षमता त्यास प्राप्त होवो, ही यानिमित्त प्रभूचरणी प्रार्थना!

 – डाॅ. नरेश हरिश्चंद्र सावे, तारापूर