पूजनीय आधारवड – पुस्तक प्रकाशन सोहळा
सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नतील संघ आणि ग्रंथाली प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पूजनीय आधारवड’ या दिगंबर राऊत लिखित पुस्तकाचे प्रकाशन, शनिवार १९ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी, पालघर जिल्ह्यात केळवे इथे झालं. समाजाला आधारभूत ठरलेल्या, पालघर जिल्ह्यातील नामवंत धुरिणांची पुढील पिढ्यांना ओळख कायम रहावी या हेतूने हे मोठे लेखन कार्य केलं आहे अशा शब्दांत, प्रमुख वक्त्यांनी लेखक श्री दिगंबर वामन राऊत यांचं कौतुक केलं. अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर श्रीकांत सांबराणी, राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, उद्योगपती अशोक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती आणि संघाचे अध्यक्ष नरेश राऊत होते.
लेखक दिगंबर राऊत यांनी साठच्या दशकात यु डी सी टी-मुंबई मधून बी-टेक ही रसायन-अभियांत्रिकीची (केमिकल इंजिनिअर) पदवी मिळवली असून हिंदुस्थान पेट्रोलियम मधून उपमहाव्यवस्थापक (डेप्युटी जनरल मॅनेजर) म्हणून निवृत्त झाल्या नंतर त्यांनी समाजकारणात स्वतःला झोकून दिले. आपले रसायन अभियांत्रिकीचे ज्ञान आणि आपल्या पदाच्या अनुषंगाने मान्यवरांशी निर्माण झालेला दांडगा संपर्क यांच्या माध्यमातून, त्यांनी पालघर जिल्ह्यातील बोर्डी-घोलवड-कोसबाड या देशातील अग्रगण्य शैक्षणिक केंद्र (शिक्षणाचे माहेरघर) ठरलेल्या आदिवासी परिसरात (जे त्यांचे वास्तव्याचे मूळ स्थान आहे) समाजकार्य तर केलेच, सोबत विविध केंद्र सरकारी योजना या परिसरात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या याच अनुभवाने संपृक्त झालेले हे लेखनकार्य अर्थात हे पुस्तक, म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचे ठरते.
ह्या सोहळ्यातील काही क्षणचित्रे –
या संपूर्ण कार्यक्रमाचे ग्रंथालीने केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग येथे सादर करण्यात आनंद होत आहे.
अनेक प्रचारमाध्यमांनी या स्पृहणीय कार्यक्रमाची दाखल घेतली. त्यातीलच काही…
मा. श्री दिगंबर भाई लिखित “पूजनीय धारवड” पुस्तक प्रकाशन समारंभासाठी दर्दी लोकांची गर्दी होती. तसेच स्टेज वरील उच्च प्रतीतील पाहुणेमंडळींची मर्यादित वेळेत अप्रतिम भाषणे झाली. काही नामवंतांच्या प्रतिक्रिया:
मान. श्री दिगंबर राऊत यांनी, मी पुस्तकात अमुक याच समाजधुरीणां विषयी का लिहिले ? याविषयी दिलेलं विवेचन समर्पक होते. मी हॉस्टेलवर राहिलेलो असल्यामुळे, मला स्वतःला असं वाटत होतं. की या हॉल मधील चौफेर रुबाबदार तसबीरीतील समाजधुरीणांची स्टोरी काय बरे असावी ? … तासबीरीतील एकेक रुबाबदार व्यक्तिमत्व… कोणी फेटा घातलेले, कोणी पगडी घातलेले, कोणी टोपी घातलेले. यातुन फेटा पगडी टोपी अशी वाडवळी संस्कृती होती हे लक्षात येत होते… हॉलमध्ये शिरल्यावर चौफेर फोटोंवर माझी नजर गेली नाही, अशी हॉलमधील एकही फेरी गेलेली नाही. श्री दिगंबर भाईन्नी “पूजनीय आधारवड” हे पुस्तक लिहून ग्रंथाली या नामवंत प्रकाशन संस्थेकडून पुस्तक प्रकाशित करून तमाम वाडवळ पाचकळशींची इच्छा पूर्ण केली आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. संघाचे ०१ले अध्यक्ष स्व.भाईजी जगू राऊत ते संघाचे १०१वे अध्यक्ष श्री.भाईसाहेब राऊत अध्यक्षीय वर्ष०१ ते अध्यक्षीय वर्ष१०१ बाबत श्री भाई साहेब राऊत यांच्यावर लेख लिहून योग्य सूचक मेळ साधला आहे. संघाने वर्तक स्मारक मंदिर ही इमारत दादरमध्ये दिमाखात उभी केली होती. याच इमारतीची १०१ व्या श्री भाईसाहेबांच्या अध्यक्षीय वर्षात जीर्णोद्धाराने पुनर्बांधणी होत आहे. ही समाजाला भूषणावह बाब आहे. स्व. दादासाहेब हे माझ्या माई मावशीचे दीर. माझ्या विद्यार्थी देशेत वय वर्षे ६ ते १६, दर मे च्या सुट्टीत मी मावशीकडे हिंदू कॉलनीत राहायला जात असे. त्यामुळे दादा साहेबांचे माझे संबंध यायचे. मामासाहेब त्यांना नियमित भेटायला येत असत… मी प्रत्यक्ष अनुभवलेल्या स्व. दादासाहेब, मामासाहेब व आदी यांच्या कथा वाचून मला खूप आनंद झाला. असो,… श्री.दिगंबर भाई आपल्या पूजनीय आधारवड पुस्तकाची जाडी-उंची पाहता, आपल्या शोधपत्रिकेला सलाम !!! – संघचिटणीस विविध पाटील
‘ पूजनीय आधारवड ‘ या ग्रंथप्रकाशनाच्या निमित्ताने मा. श्री. दिगंबरबंधू राऊत यांच्याबद्दल दोन शब्द! ग्रंथासाठी निवडलेल्या नावाची समर्पकता पाहा. ‘ पूजनीय आधारवड ‘. वटवृक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची पुरेशी वाढ झाली की, त्याला पारंब्या फुटून त्या खाली जमिनीपर्यंत जाऊन पुढे त्याचे खोड आणि मुळे बनतात. त्यामुळे तो नष्ट होत नाही हे त्याचे वेगळेपण आहे. सजीव साखळीही थोड्या फरकाने तशीच आहे. एका पिढीकडून दुसरी पिढी निर्माण होते. ती साखळी चालूच राहते; ते ऊर्जेचे संक्रमण असते. त्याला ऊर्जेचे अविनाशीत्वही म्हणता येईल. श्री बंधूंनी चरित्रकथन केलेली व्यक्तिमत्त्वेही समाजाला आधार देणारी आहेत म्हणून ते आधारवड. साधुसंत आपले जीवन समाजकल्याणासाठी वेचतात म्हणून ते पूजनीय ठरतात. आपल्या समाजधुरिणांनीही आयुष्यभर समाजकल्याणाचाच विचार केला. त्यामुळे साधुसंत आणि आपले समाजधुरीण यात अभेद आहे. आपले कल्याण व्हावे म्हणून आपण देवपूजा करतो आणि आपल्या भक्तीनुसार देव आपल्याला देत असतो ही आपली भावना असते. श्री साईबाबापासून तुकाराम, रामदास, गाडगेबाबांपर्यंतचे सर्व देहधारी परमेश्वर जसे पूजनीय आहेत तसेच आपले समाजधुरीणही आपल्याला पूजनीय आहेत. म्हणूनच आपल्याला ऊर्जा आणि दिशा देणाऱ्या या चरित्रांचा संग्रह आपल्यासाठी मौल्यवान आहे. माणसाला स्वतःबद्दल, आपल्या नातेवाईकांबद्दल लिहिणे आवडते पण समाजबांधवांबद्दल फारच थोड्यांकडून लिहिले जाते. श्री. बंधू हे त्या थोड्यांपैकी एक आहेत. एखाद्यावर लिहिताना इथून-तिथून माहिती घेऊन त्याचे संकलन करून कोणीही छापील. पण सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेलेल्यांची इत्थंभूत माहिती अत्यंत परिश्रमपूर्वक मिळविणे हे महाकठीण काम. ही आपल्या आजोबांची माहिती आहे हे त्यांच्या नातवंडांनाही अनेकदा माहीत नसते. हे काम श्री. बंधूंनी केले हे त्यांचे वेगळेपण. वयाच्या उमेदीच्या काळात आणि बहुतांश सेवानिवृत्त होऊन ज्येष्ठ नागरिकांच्या गटात नुकताच समावेश झालेल्यांनी हौस आणि टाइमपास म्हणून लिहिणे वेगळे आणि सहस्त्रचंद्रदर्शन योगानुभव घेतल्यानंतर ‘ आता विसाव्याचे दिन ‘ अनुभवताना वयाच्या ८२ व्या वर्षी लिहिणे वेगळे. हे श्री. बंधूंचे वेगळेपण.
श्री. बंधू हे विज्ञान शाखेचे विद्यार्थी. त्यांनी विज्ञान कथा लिहिणे स्वाभाविक होते. पण ख्यातनाम साहित्यिकाला बाजूस सारणारी त्यांची शैली हे त्यांचे वैशिष्ट्य. संतजनांची वचने आणि गीतेतील तत्त्वज्ञानाचा त्यांनी जागोजागी केलेला वापर त्यांच्या व्यासंग आणि वैचारिक उंचीची साक्ष देतात. सामान्यपणे वयाची साठी उलटल्यानंतर आणि आजूबाजूच्या घटना पाहिल्यानंतर आता आपले काही खरे नाही अशी अनामिक भीती अनेकांच्या मनात निर्माण होते. पण वयाच्या ८३ व्या वर्षी असे दर्जेदार लेखन आणि ठणठणीत तब्येत पाहिल्यावर अजून आपल्याला किमान वीस वर्षे धक्का नाही अशी उमेद श्री. बंधू अनेकांच्या मनात निर्माण करतात हे त्यांचे ऊर्जादायी वेगळेपण. ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला खूप अंतरावरून आलेले मान्यवर पाहुणे आणि विविध गावांतून आलेला समाजबांधवांचा समुदाय ही श्री. बंधूंच्या मोठेपणाची आणि जनसामान्यांच्या त्यांच्यावरील प्रेमाची पावती. ‘ ग्रंथाली ‘ सारखी नामांकित प्रकाशन संस्था तिच्या वाटचालीच्या सुवर्ण महोत्सवी काळात श्री. बंधूंच्या एकापाठोपाठ एक अशा दोन ग्रंथांचे आनंदाने प्रकाशन करते हे श्री. बंधूंचे मोठेपण. श्री. दिगंबरबंधू राऊत यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. आजवर अनेकांना ते मदतरूप ठरले आहेत. त्यांच्या मदतीचा मी एक लाभार्थी आहे हे सांगताना अभिमान वाटतो. आदरणीय श्री. दिगंबरबंधूंना सौख्यदायी निरामय दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्याकडून यापुढेही मोठी सेवा घडो, ही यानिमित्त शुभकामना! – डॉ. नरेश हरिश्चंद्र सावे, संघाचे उपाध्यक्ष
आपणास स्नेहपूर्वक नमस्कार.
सर्वप्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन . आपल्या सोमवंशी क्षत्रिय मध्यवर्ती संघाच्या प्रदीर्घ वाटचालीमध्ये ज्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांचा जीवनपट नवीन पिढीसाठी उलगडून दाखविण्याचे कार्य यशस्वीपणे केल्याबद्दल मी आपले मनःपूर्वक अभिनंदन करीत आहे आणि आपल्या सोमवंशी क्षत्रिय समाज संघाच्या वतीने आपल्या प्रती ऋण व्यक्त करीत आहे . आपल्या समस्त समाज बांधवांसाठी एक ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्या प्रती समस्त समाज बांधवांतर्फे कृतज्ञता व्यक्त करीत आहे .
दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई विद्यापीठाची एक महत्त्वपूर्ण ऑनलाईन सभा असल्याने इच्छा असूनही मला या सुंदर कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही त्याबद्दल क्षमस्व . माझे स्नेही श्री भरत राऊत यांनी आपले “आधारवड ” हे पुस्तक मला लगेचच दोन दिवसांमध्ये उपलब्ध करून दिले. मी अधीरपणे ते लगेचच वाचायला घेतले . अतिशय ओघवत्या भाषेत लिहिलेले हे पुस्तक माहितीपूर्ण आणि वाचनीय असून वाचकांची पकड घेणारे आहे . केवळ दोन दिवसांमध्ये ते पुस्तक मी वाचून पूर्ण केले . आपल्या संघाच्या प्रत्येक सदस्याने स्वतःच्या संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे असे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते .
आपली एक हुरहुन्नरी , अष्टपैलू तसेच समाजसेवेला वाहून घेतलेले एक विलक्षण व्यक्तिमत्व अशी ओळख असून सोमवंशी क्षत्रिय मध्यवर्ती संघाशी आपण आपल्या कार्यामार्फत अत्यंत सक्रियपणे जोडले गेले आहात . आपण सोमवंशी क्षत्रिय संघाच्या प्रदीर्घ वाटचालीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आदरणीय अण्णासाहेब वर्तक यांच्यापासून ते विद्यमान अध्यक्ष आदरणीय भाईसाहेब राऊत यांच्यापर्यंत तसेच संघाच्या कार्याचा वसा पुढे नेणाऱ्या अनेक पूर्वसूरींचे कार्य अत्यंत प्रभावीपणे शब्दांकित केले आहे . आपल्या अथक प्रयत्नामुळे एक महत्त्वपूर्ण संग्रही ठेवावा आणि पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल असा ऐतिहासिक दस्तऐवज तयार झाला आहे . विद्यमान तसेच पुढच्या पिढीला हे पुस्तक निश्चितपणे मार्गदर्शक आणि प्रेरक ठरेल यामध्ये संदेह नाही .
सोमवंशी क्षत्रिय समाज संघाच्या शतक महोत्सवी वाटचालीमध्ये मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचे कार्य त्या त्या वेळेला शब्दबद्ध करणे अत्यंत महत्त्वपूर्ण असते . अन्यथा काळाच्या ओघांत काही व्यक्तींचे कार्य विस्मरणामध्ये जाण्याचा मोठा धोका असतो किंवा ते कार्य पुढच्या पिढीला अंधुकपणे आठवत राहते आणि नंतर ते नाहीसेच होते. अशा वेळेला पुढच्या पिढीकडे हे कार्य आणि हा वारसा तपशीलवार पोहोचविणे अत्यंत महत्त्वाचे असते . या दृष्टिकोनातून आपण केलेला हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य असून त्याबद्दल समाज आपले कायमच ऋणी राहील . – डॉक्टर किरण जयदेव सावे, पालघर कॉलेजचे प्रिन्सिपल