अनाकलनीय अतर्क…

पृथ्वीवरील सर्व सजीव आणि निर्जीव सृष्टीचे नियंत्रण करणारी एक यंत्रणा सतत कार्यरत आहे यावर आता माझा विश्वास आहे. कोणी तिला नशीब म्हणतात, कोणी नियती ,तर कोणी परमेश्वर म्हणतात! या अदृश्य शक्तीची ताकद,बुद्धिमत्ता व नियंत्रण यंत्रणा चक्रावून टाकणारी आहे.  भगीरथ प्रयत्न करूनही आज पावतो कोणासही त्याचा निश्चित थांग लागलेला नाही हे निश्चित!!

    प्रत्येक प्राण्याच्या मेंदूमध्ये अगदी मुंगीच्या छोट्या अति सूक्ष्म मेंदूपासून ते हत्तीच्या प्रचंड मेंदूपर्यंत सर्वांची बुद्धिमत्ता जरी एकत्र केली तरी या सगळ्यांच्या मिळून होणाऱ्या शक्ती- बुद्धि पेक्षा कितीतरी पट शक्ती-बुध्दि या निसर्ग यंत्रणेमध्ये सामावलेली आहे.

   अगदी कॉमर्सच्या  भाषेत बोलायचे तर प्रत्येकाचा “Balance tally”, करणे, मागच्या जन्माचा हिशेब ठेवणे अत्यंत क्लिष्ट काम, पण एवढीशी गोष्ट सुद्धा इकडची तिकडे होत नाही. प्रत्येकाचा हिशोब अगदी चोख ठेवला जातो. एका क्षणाची व एकाही कणाची चूक भूल होणार नाही.

   हे झाले चल सजीव सृष्टीचे, अचल अशा वनस्पती सृष्टी चे नियंत्रण हे तर त्याहून कठीण. हजारो लाखो वृक्षवेलीं चे एक एक पान, फुल, एक ना एक दिवस कसे गळून पडते, आम्ही त्याला निसर्ग नेम म्हणतो!

    नशिबात वाईट घडणार असेल तर ते न व्हावे यासाठी आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो. उपासना करतो. त्यामुळे  संकट आले तरी त्याची तीव्रता तरी कमी होईल अशी आमची आशा असते. ..आणि संकट टळल्यावर,”हातावरचे बोटावर निभावले..” असे म्हणतो !!.

   प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या त्याच्या विधीलेखा नुसार चांगले वाईट, खडतर, बिकट परीक्षा पाहणारे योगायोगाचे प्रसंग येतातच. भाग्यवान त्यातून निसटतात, नियतीचे आभार मानतात.  दुर्भागी पुढचा क्षण पाहण्यास शिल्लकच राहत नाहीत.  त्यांचे कुटुंबीय, मित्र नशीबाला दूषणे देत राहतात.. !!

     आजच्या संघर्षमय जीवनात प्रत्येकाच्याच आयुष्यात असे कसोटीचे, प्रसंग किती तरी येतात, आपण ऐकतो ,पेपरात वाचतो.

   विशेष करून ज्यांना व्यवसायासाठी नोकरीसाठी व  पर्यटनासाठीही देशांत वा देशाबाहेर भ्रमंती करावी लागते, त्यांच्यासाठी तर

 “रात्रंदिन आम्हा. …?”

    तरीही कोणी भ्रमंती करण्याचे  सोडले नाही, सोडणार ही नाही .

  मोरोपंतांचा काळ आज बदलला असला तरी ते सांगून गेलेले एक सत्य..

    “केल्याने देशाटन, पंडित मैत्री ,सभेत संचार ।

     शास्त्रग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार।।’

   हे आजही लागू आहे. कुठे, कसे, का, कधी, कुणाबरोबर जावयाचे याचे संदर्भ बदलले असतील तरी  मोरोपंतांच्या वचनात निश्चित तथ्य आहे!

   बोर्डीसारख्या खेड्यात राहणारा मी एक शालेय विद्यार्थी. आमच्या मराठी शाळेच्या सहली शेजारील झाई बोरीगाव व फार तर कोसबाडच्या टेकडीवर जात. प्रवास अर्थातच चालतच होई. जाताना घरून पोळी भाजीचा डबा घेऊन निघत असू. त्यामुळे कोणत्याही सहल खर्चाचा प्रश्न नव्हता.

पुढे हायस्कूलात  गेल्यावर  सहलींचा परिघ मोठा झाला. सहली मुंबई ,पुणे,वेरूळ लेणी, दिल्ली-आग्रा, अशा दूरवरच्या ठिकाणी जाऊ लागल्या. जाण्याची इच्छा तर खूप असे. एक दोनदा आप्पांना विचारले, त्यांनी असमर्थता दाखविली, नंतर विचारणेच सोडून दिले .त्या बालवयात ही मला आप्पांची मनस्थिती कळत होती.आप्पांना  त्याबद्दल मी तेव्हाही दोष दिला नाही,आजही देणार नाही. गरीबी माणसाला बालवयातच कितीतरी गोष्टी शिकविते !

   सहल झाल्यावर शाळेच्या नोटीस बोर्डावर जी छायाचित्रे लावली जात ती मोठ्या कौतुकाने परत परत पहात असे… सहलीला जाऊन आलेल्या मित्रांना त्यांनी केलेल्या गमती, अनुभव याबद्दल विचारीत असे…त्यातही खूप बरे वाटे!

  आपणास ही कधीतरी तेथे जाता आले तर काय मजा घेता येईल, अशी दिवास्वप्नेही पाही. आप्पाना ही माझी मनस्थिती कळे. कधीतरी ते माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हणत,

 ”बेटा  नाराज होऊ नकोस, भविष्यात तुला खूप फिरावयास  मिळेल..तु जग पहाशील…”

  मी मनाचे समाधान करून घेई. लहान मुलांच्या समाधानासाठी असेच बोलतात हे कळले होते.

   त्यांची वाणी एके दिवशी खरेच प्रत्यक्षात येईल असे तेव्हा वाटले नव्हते..

पण भविष्यात तसे खरेच घडले ! उभा आडवा भारत देश व तब्बल 17,18 विविध परदेशांची व्यवसायानिमित्त,सरकारी खर्चाने मुशाफिरी केल्यानंतर, निष्पाप निर्मळ मनाने दिलेले आशीर्वाद खरे ठरतात याचा प्रत्यय आला. आप्पा कोण होते …मी माझ्या  मनाशी संभाषणकरतो?

     काम, व्यवसायानिमित्त झालेल्या भारतातील व प्रदेशातील मुशाफिरीत असेच काही ,आणीबाणीचे, सत्व परीक्षेचे तर काही गमतीचेही अनेक प्रसंग आले.. त्या घडून गेलेल्या त्या प्रसंगांचा थोडक्यात लेखाजोगा मांडण्याचा हा प्रयत्न. ..आज खूप  वर्षानंतर!!

या प्रवास मालिकेतील लेख जसे जमतील तसे लिहून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे.