सुना “बेडा(पार)”!  

लेखांक 2

    सुनाबेडा, ओरीसा, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेडचा ( HAL), कारखाना.

     मला वाटते ही साधारणता 1970 च्या दशकातील गोष्ट आहे. त्यावेळी मी आमच्या ESSO या अमेरिकन कंपनीच्या संशोधन विभागात काम करीत होतो. अनेक चाचण्या, मुलाखती व अत्यंत काटेकोर मेडिकल तपासणीनंतर केवळ मेरिटवर ही नोकरी मला मिळाली होती. कंपनीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या संशोधन विभागात काम करण्यास मिळणे माझे भाग्य होते. हा विभाग या अमेरिकन कंपनीच्या न्यू जर्सी, अमेरिका (New Jersey) मधील केंद्रीय संशोधन विभागाशी संलग्न होता. मूलभूत संशोधन तिथे होई, तेथे फॉर्मुलेशन निश्चित केले जाई. भारतीय घटक द्रव्ये विशेषतः आमची भारतीय तेले (Base Stocks) व येथील उपलब्ध रसायने वापरून, भारतीय उद्योग समूहांना वापरता येतील अशा प्रकारची वंगणे(Lubricants) थोडा फार बदल करून, आम्ही तयार करीत असू. ती घन (Solid), द्रव(Liquid) व अर्ध-द्रव(Semi Solid)  स्वरूपात उपलब्ध असतात.

  आमचे कामही तेवढे सोपे नसे. या भारतात वापरण्यासाठी बनविलेल्या वंगणांना, आय एस आय, मानांकित करणे आवश्यक असे. त्याकरिता भारतीय मानद संस्थेच्या(Indian Standard Institute) चाचण्या पास होणे आवश्यक असे.

  या पेट्रोलियम व्यवसायात एक म्हण आहे, जिथे घर्षण तिथे वंगण! त्यामुळे अगदी कपडे शिलाईच्या मशीन पासून ते फायटर जेट इंजिन जोडण्यासाठी लागणारी वंगणे आम्ही बनवीत असू.

HAL  कारखान्यातील परिसरात, एरोनाॅटीकल म्युझियम.

    भारत सरकारचा प्रसिद्ध उद्योग एच ए एल(HAL)  ‘हाॅल’म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’  हेदेखील आमचे एक प्रतिष्ठीत ग्राहक होते . भारत सरकारच्या संरक्षण विभाग निर्मित हे व्यवस्थापन  त्या दिवसात लष्कराला लागणारी जेट फायटर्स (MIG) तयार करीत. या विमानांच्या निर्मितीसाठी सुखोई इंजिने बनविण्याचा कारखाना रशियन तंत्रज्ञान वापरून त्यांच्या सहाय्याने ओरिसातील कोरापुट जिल्ह्यातील सुनाबेडा या औद्योगिक शहरात आहे. इतर सर्व भाग तयार करणे व जोडणी बेंगलोर येथील ‘हॉल’च्या कारखान्यात होते . दोन्ही कारखान्यात तयार झालेल्या धातूच्या निरनिराळ्या भागांना, जोडणी आधी, गंज लागू नये(Corrossion)  म्हणून आमच्या ESSO या  अमेरिकन कंपनीची वंगणे वापरली जात. 

ही वंगणे या दोन्ही कारखान्यांना पुरविण्याआधी सरकारच्या डी आर डी ओ  (Defence Res.and Dev Organisation ) या संरक्षण खात्याच्या लखनौ स्थित संस्थेकडून मान्यता मिळविणे अत्यावश्यक असे.

डी आर डी ओ मान्यता ही खूपच गुंतागुंतीची व वेळखाऊ प्रक्रिया आहे. मात्र ती मिळाल्यावर पेट्रोलियम कंपन्या त्याची मोठी जाहिरात करत.  आमच्या  ESSO कंपनीस संरक्षण खात्याला पुरवठा होणाऱ्या वंगणांसाठी ती प्राप्त झाली होती.  आमच्या कंपनीचीच अनेक वंगणे  संरक्षण खात्याच्या विविध विभागांना पुरविली जात.

   हा  कारखाना भारत सरकारच्या संरक्षण खात्याचा, सहकार्य रशियन तंत्रज्ञानाचे व वंगण पुरवठा  एका अमेरिकन कंपनी कडून.. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही एक मोठी नाजूक अशी  बाब होती. याचे राजकारण होऊ नये म्हणून आम्हाला  खूपच सावधगिरी बाळगावी लागे.. आमच्या इतर ग्राहकासाठी कंपनीच्या गेटबाहेर माल गेल्यानंतर आमची जबाबदारी संपे. मात्र संरक्षण खात्यांना पुरवठा होणाऱ्या वंगणांच्या बाबतीत लष्करी ट्रकमधून हा पुरवठा होई . त्यामुळे अगदी वंगणे वापरून संपेपर्यंत कोणतीही ही समस्या निर्माण झाल्यास ती पुरवठा करणाऱ्या कंपनीची जबाबदारी असे!

   माझ्यासारखा नुकताच कामाला लागलेल्या अधिकाऱ्याला नोकरी म्हणजे डोक्यावरची टांगती तलवार होती. कामात जराशी जरी चूक झाली व वरिष्ठाची मर्जी खप्पा झाली तर दुसऱ्याच दिवशी त्याच्या हाती ‘पिंक स्लिप’ म्हणजे तुमच्या पगाराचा हिशोब व बडतर्फीची नोटीस दिली जाई. त्यावेळी ESSo कंपनीच्या राष्ट्रीयकरणाची (NATIONALISATION) बातमी आली होती . कंपनी ,कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामावरून कमी करत होती. स्वखुशीने राजीनामा योजना (VRS) सुरू होती. एकूण कंपनीतील वातावरण भीतीदायक व निरुत्साही झाले होते .कोणाचा नंबर कधी लागेल याचा भरवसा नव्हता. या परिस्थितीत काही विशेष कारणासाठी आम्हा  हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांची खास भरती कंपनीने केली होती. टॅक्स(2) ,प्रोडक्शन (1),क्वालिटी कंट्रोल(1), संशोधन(2), अशा फक्त सहा लोकांची तज्ञ(Specialist), म्हणून  हीअखेरीची  नवीन नेमणूक होती. 

    मी क्वालिटी कंट्रोल म्हणजे दर्जा नियंत्रण खात्यात ऑफिसर म्हणून नेमला गेलो होतो व नुकतीच तीन वर्ष पूर्ण करून संशोधन विभागात प्रमोशन मिळविले होते. स्वतःवरच खुश होतो. अनेक वरिष्ठ सहकारी प्रमोशन तर सोडा नोकरीही टिकवू शकत नव्हते, तेथे मला तीन वर्षात बढती मिळणे निश्चितच गौरवास्पद होते .सर्व ठीक चालले होते .कॉलेजात न शिकविलेल्या अनेक गोष्टी आमच्या कारखान्यात, संशोधन विभागात,तसेच ग्राहकांच्या कारखान्यास भेटी होत असल्याने  शिकावयास  मिळत.

    आणि एक दिवस माझ्या वरिष्ठांचा मला संदेश आला…

 “ HALच्या सुनाबेडा  कारखान्यातून आपल्या वंगणाबद्दल तक्रार आली आहे. तू व मार्केटिंग मधील श्री. रामचंद्रन दोघांनी सुनाबेडा येथील हाॅल कारखान्यास भेट देऊन आपल्या या महत्त्वाच्या ग्राहकाचे(VIP CUSTOMER) समाधान करावे…शुभेच्छा.”

    निरोप दोन ओळीचा होता. माझी तर झोप उडाली होती.  ही शुभेच्छा होती की गच्छंतीची नोटीस होती ,मला त्यावेळी कळले नाही !

    त्याआधीही अनेक ग्राहकांच्या समस्या मी दूर केल्या होत्या, मात्र हा ग्राहक खूपच वेगळा आणि प्रतिष्ठेचा होता. देशाच्या संरक्षणाशी सरळ निगडित होता. सुनाबेडा कारखान्यातील तज्ञांना आमच्या वंगणाचा दर्जा पटवून देण्यात जर चूक झाली तर?.. पुढचे चित्र दिसत होते … माझ्यासाठी ‘पिंक स्लिप’ तयार होती…!! पेट्रोलियम व्यवसायात त्या काळी नोकरीसाठी, आमची कंपनी, बर्मा शेल कंपनी व नुकतीच सुरू झालेली इंडियन ऑइल कंपनी, एवढे तीनच पर्याय भारतात  होते!

  मी खूप विचार केला ..इतर काही कारखान्यात हेच वंगण वापरताना कोणती प्रक्रिया होते ते मनात आठवून पाहिले. सुनाबेडा कारखान्यात वंगणाचा वापर कसा होतो ही माहितीदेखील आमच्या ओरिसामधील मार्केटिंग कार्यालयाकडून मागविली.

   इंजिनचे पार्टस तयार करताना मशीनमध्ये घर्षण कमी करण्यासाठी वंगण  वापरले जाते. पुढे त्यावर पॉलिश करण्यासाठी ते पार्टस्  पाठवताना एका विशिष्ट अशा कागदात (Wax Paper) गुंडाळून ठेवतात. निश्चितच वापरलेल्या वंगणाचा थोडासा अंश  त्या धातूच्या पृष्ठभागावर असतो. गंज लागू नये म्हणून तो मुद्दाम थर राहू देतात . पॉलिशिंगसाठी हे धातूचे भाग बाहेर काढताना त्यावर थोडा गंज आढळून आला होता.आमच्या वंगणाने गंज थांबविण्याऐवजी गंज लागण्यास मदत केली, असा हॉलच्या तंत्रज्ञांचा दावा होता ! तसे असेल तर खरेच आमच्यासाठी ही गंभीर बाब होती. इंजिन विमानात बसविल्यानंतर अशा प्रकारचा  गंज दिसून आला तर करोडो रुपयांच्या त्या विमानाची किंमत त्वरित शून्य होत असते… खराब लुब्रिकंट ऑइल मुळेच हे झाले असा हॉलचा दावा होता.

    पेट्रोलियम उद्योगात हीच मोठी गंमत आहे. कुठल्याही कारखान्यात कोणतीही समस्या आली तर प्रथम दोष वापरल्या गेलेल्या वंगणाला दिला जातो. वस्तूची व मशीनची किंमत करोडो रुपये तर वंगणाची  किंमत काही शेकडा रुपये !  गरीब बिचाऱे वंगण प्रथम बदनाम होते हे सत्य आहे.

  या वंगणाचे फॉर्मुलेशन मीच बनविले होते. त्यामुळे त्याची गुणवत्ता सिद्ध करणे संपूर्ण जबाबदारी माझी होती. तसे झाले नाही तर हाॅल व्यवस्थापन आमच्या वंगणाऐवजी टपून बसलेल्या बर्माशेल अथवा इंडियन ऑइल कंपनीकडे जाऊ शकले असते. हा प्रतिष्ठित ग्राहक एस्सोकडून निघून गेला तर….. जेमतेम तीन वर्ष नोकरी झालेल्या व कर्मचारी कपात जारी केलेल्या या कंपनीत माझे भविष्य मला दिसत होते!!

      माझ्या कामाची मला पूर्ण खात्री होती .या आधीही हेच वंगण त्या कारखान्याने विनातक्रार वापरले होते  हे एक, दुसरे मी फॉर्म्युलाशन मध्ये कोणताही बदल केलेला नव्हता व  आमच्या फॅक्टरीतून हा माल  बाहेर जाण्याआधी संपूर्ण टेस्टस् क्वालिटी कंट्रोल प्रयोगशाळेत माझ्या देखरेखीखाली करून घेतल्या होत्या.

    असे का व्हावे ? मी खूप  विचार केला. खरेच आमचे वंगण कमी दर्जाचे आहे की आणि कोणी ‘व्हीलन’  या समस्ये मागे आहे ? आमच्या खात्यातील  सहकाऱी व धातु शास्त्रनांना विचारले, ,कुणीच काही संदर्भ देईना. 

  माझ्या अंतःर्मनाने मला कुठेतरी बजावले, ’तुझ्या वंगणात समस्या असू शकत नाही, दुसरे काही कारण असेल ते शोधून काढ’.

 मी कामाला लागलो.

 ओरिसा मार्केटिंग विभागातील आमच्या अधिकार्‍यास विनंती करून प्रॉडक्ट सॅम्पल, इंजिनसाठी धातू वापरला जातो त्याच्या काही पट्ट्या  व  ज्या कागदात धातूचे पार्टस गुंडाळले जातात त्या कागदाचे पूर्वीचे व आत्ताचे नमुने मागविले . 

   त्या मागविलेल्या सॅम्पलवर, प्रयोग शाळेत पुन्हा एकदा सर्व तपासणी चाचण्या केल्या. सुदैवाने अपेक्षेप्रमाणे आमच्या प्रॉडक्टमध्ये काही वैगुण्य आढळले नाही.  इंजिने बनविणाऱ्या व बेरिंग तयार करणाऱ्या कंपन्या धातूचा तो भाग तयार झाल्यावर खास पेपरमध्ये गुंडाळतात व त्यामुळे त्या कागदाच्याही परीक्षा घ्याव्यात अशी माझी मनोधारणा झाली होती व म्हणूनच मी कागदाचे जुने व नवे सॅम्पल मागविले होते..!!

    मला कागदाच्या तपासण्या करावयाच्या होत्या.  त्याचे मला काहीच ज्ञान नव्हते. तो आमचा विषय नव्हे. पुण्याचा ज्या ‘पदमसी पेपर मिल’ कडून हा कागद डिफेन्सला जात असे, त्यांच्या तज्ञाकडून पेपर निर्मितीची व तपासणीचे काही निकष मिळाले. पुण्यातील मार्केटिंग विभागाचे माझ्या काही मित्रांनी मला त्यात मदत केली. ती खूप मोलाची ठरली. कशासाठी मी माहिती मागत आहे याचे ज्ञान कोणत्याही परिस्थितीत पदमसी  कंपनीला होऊ नये याचीही खबरदारी घेतली.

  जुन्या व नव्या दोन्ही कागदांची तपासणी केली.

  ज्या कागदात धातूचे पार्टस् पॉलिश केल्यानंतर पॅक करतात ,तो नवा कागद मला आम्लधर्मी

( Acidic) तर जुना कागद ऊदासधर्मी(Neutral) दिसला.

   अंधारात कुठेतरी एक आशेचा किरण दिसला.  त्याच्या आधाराने वाटेने पुढे जाण्याचे ठरविले.

   एक गृहीत सत्य झाले होते !!

 दोन्ही कागदाचे नमुने धातूच्या पार्टबरोबर संपर्कात आणून चाचण्या केल्या. पहिल्या कागदाने धातूवर गंज  दाखविला  दुसऱ्या कागदाने  काही परिणाम दाखविला नाही 

  यस्स्.. माझा संशय खरा ठरला ..चोर सापडला होता !माझाच आनंद गगनात मावेना!

   आता सुनाबेडा हाॅल कंपनीत रशियन-भारतीय दुकली समोर माझी तलवार फिरवण्यासाठी पुराव्याचे  चिलखत-जिरेटोप घालून माझीही तयारी झाली होती! लढाई जिंकणार याची खात्री होती.  मी व रामचंद्रनने सुनाबेड्यास जाण्याचा  दिवस नक्की केला.

   मुंबई ते विशखापटनम( विशखा) सकाळी विमानाने व विशखा ते  सुनाबेडा  टॅक्सीने. दुसऱ्या दिवशी परत तोच रस्ता व संध्याकाळच्या विमानाने मुंबईस, असा दोन दिवसाचा कार्यक्रम ठरविला. तिकिटेही बुक झाली.

    विझगापटनमम-सुना बेडा, घाटातील निसर्ग सौंदर्याची उधळण!

  ओरीसाचा कोरापूट जिल्हा हा भारताच्या  ईशान्य सीमेलगत असून वनवासी, आदीमजातींचे (Triable) मुख्य आश्रयस्थान आहे. येथे एकेकाळी सातवाहनांचे राज्य होते. लोक खाऊन पिऊन सुखी होते . सध्या या प्रदेशात राहणाऱ्या आदिवासी आदिमजनांना गरीबीशी मुकाबला करावा लागत होता.  सुनाबेडा या शहरात  हॉलचा  सुखोई ईंजिने  बनविण्याचा कारखाना  व जवळच बॉक्साईटचा साठा असल्यामुळे ॲल्युमिनियम निर्मितीचा कारखाना NALCO आहे . भारतीय नाविक दलाचे एक केंद्रही  जवळच आहे. येथील हवामान जरी विषम असले तरी येथील निसर्ग सौंदर्य ,फळाफुलांची विविधता व ट्रायबल लोकांनी तयार केलेल्या अनेक कलाकुसरीच्या वस्तूसाठी हे शहर प्रसिद्ध आहे, असे कळले होते.  प्रथमच या भारताच्या ईशान्येकडील भागाला  भेट देण्यासाठी मी उत्सुक होतो.

      ठरविल्याप्रमाणे आम्ही दोघे मुंबईहून विमानाने विशाखापटनम्ला सकाळी दहाचे  सुमारास आलो. विशाखापटनम येथील आमच्या मार्केटिंग कार्यालयात संबंधितांशी चर्चा केली. आमचे रिझल्ट्स त्यांना दाखविले .त्यांचेही समाधान झाले. भोजन उरकून दुपारी एकचे सुमारास टॅक्सीने निघालो. पाच ते साडेपाच वाजेपर्यंत  पर्यंत सुनाबेडाला पोहोचू अशी अपेक्षा होती. संध्याकाळीच तासभर संबंधितांशी बोलून आमची परीक्षणे त्यांना दाखवून ,हवे असल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी काही टेस्ट त्यांचे समोर करून, भोजन झाल्यावर  विशाखाला परतावे व तेथून संध्याकाळी विमान पकडून मुंबईत जावे, असा मानस होता. सुनाबेडा येथे राहण्याची हॉटेलची व्यवस्था नसल्याने HAL च्या गेस्ट हाऊसमध्येच आमची राहण्याची सोय केली होती .

   सुमारे 200 किलोमीटरचा  विशाखा – सुनाबेडा बराचसा प्रवास घाटातून होतो. हे घाटातून प्रवासाचे अंतर पार करण्यास सुमारे चार तास लागतील अशी अपेक्षा होती !

  विशाखा पासून अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आलो असू नसू तेवढ्यात गाडी थांबली…. दोन्ही बाजूस असलेली सुंदर हिरवी झाडे-पाने-फुले विविध फळांचे वृक्ष पाहताना मन हरखून जात होते.. ते घाटातील अनोखे सौंदर्य पाहताना जणू तंद्रीच लागली होती .. गाडीला अचानक ब्रेक लागल्याने त्या स्वप्नातून जाग आली.. काय झाले असावे?

हा ‘प्रथम ग्रासे मक्षिकापात’ होता का पुढच्या अशुभाची नांदी होती? त्यावेळी तरी काही अंदाज आला नाही.. …

   गाडीचा पुढील टायर नादुरुस्त झाला होता व तो काढून नवीन लावणे जरुरी होते. ते करण्यात ड्रायव्हरचा तासभर गेला. तेवढ्या वेळात आम्ही आजूबाजूला फिरून घाटातील निसर्ग सौंदर्य न्याहाळले. मनात धाकधूक होती तरी दरवळणारा रानवट पुष्पगंध व विविध रंगांची आजूबाजूला झालेली उधळण मनाला प्रसन्न करित होती.. 

हा नागमोडी वळणांचा, उंच सखल ,विविध रंगी वृक्षांनी, फुलांनी बहरलेला घाट म्हणजे, एक निसर्गाचा चमत्कार!!

    ह्या वळणावळणाच्या घाट माथ्यावरील रस्त्यावरून गाडी जाताना खरंच गाडीची क्षमता कसाला लागते,.ड्रायव्हरचे कौशल्यही पणाला लागते.

 या एक तासामुळे आमचे पुढील वेळापत्रकही बदलले.

   पोहोचण्यास संध्याकाळचे सहा वाजले तेथील प्रयोगशाळेतील लोकांना आम्ही आल्याची वर्दी दिली. उद्या सकाळी 9.0वा प्रयोगशाळेत भेटू असे सांगितले  दिवसभर प्रवास झाल्यामुळे संध्याकाळचे भोजन लवकरच आटोपून गेस्ट हाउस मध्ये विश्रांती घेतली.  हे गेस्ट हाऊस म्हणजे एक ‘फाईव्ह स्टार’ हॉटेल होते व जेवणही मनासारखे मिळाले .

     दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास प्रयोगशाळेत जाऊन त्यांचे चीफ केमिस्ट तसेच एक रशियन गृहस्थ ,जे उत्पादन विभागात  प्रोडक्शन इंजिनियर होते, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना आमचे रिझल्ट्स दाखविले. आमचे सर्व टेस्ट रिझल्ट पाहून त्यांना समाधान झाले . ‘कागदाची करामत’ पाहून आश्चर्य वाटले.

   विशेष गोष्ट म्हणजे HALची प्रयोगशाळा काही  विशेष ग्राहकाकडून येणाऱ्या कच्च्या मालावर (Raw Material) कोणत्याच चाचण्या घेत नसे. ग्राहकाने पाठवलेल्या अहवालावरच विसंबून राहून त्याचा वापर केला जाई. ग्राहकाने याबाबतीत विश्वासघात केल्यास त्यांचा पुरवठा बंद होत असे.

त्यांच्या प्रयोगशाळेतच आम्ही आमच्या वंगणाच्या काही भौतिक रासायनिक(Physici Chemical) चाचण्या करून ऑईलची  गुणवत्ता सिद्ध केली. तसेच जुन्या व नव्या  कागदातील गुणधर्म फरक दाखविला.

   दोन्ही कागदांची द्रावणे तसेच वंगण- पाणी मिश्रण वेगवेगळ्या धातूच्या पट्ट्यावर ठेवून दुसऱ्या दिवशी त्याचे परिणाम पाहण्याचे ठरले.

  आम्ही अगदी खुशीत होतो. मुख्य काम झाले होते .उद्या सकाळी काही मामुली टेस्ट करून दुपारी एक वाजता  निघून विशाखाहून रात्री विमान पकडून घरी उशिरा का होईना  मुंबईत पोहोचू .आमच्या वरिष्ठाकडून शाबासकी मिळवू,अशी स्वप्ने  पाहत गेस्ट हाऊसमध्ये विश्रांतीसाठी गेलो..पण.. उद्याची झोप तर बाजूलाच.. आजची झोपही उडाली…!! 

हालच्या चीफ केमिस्ट कडून रात्रौ निरोप आला..

 “हाल व्यवस्थापनाचे प्रमुख ले. जन. रॉय उद्या सकाळी दिल्लीहून सुनाबेडास येत असून तुम्हाला भेटू इच्छितात. त्यांच्याबरोबर भोजन घेऊन त्यानंतर तुम्ही परतीचा प्रवास सुरू करू शकता…”

  एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचा आलेला संदेश म्हणजे आमच्यासाठी आज्ञा होती. जनरल येईपर्यंत थांबणे जरुरी होते. त्यांच्याबरोबर भोजन घेणे आमच्यासाठी एक सन्मान होता. प्रयोगशाळेत चालू केलेल्या शासनाचे रिझल्टही त्यांना दाखवता आले असते. आम्ही उद्याही निघू शकत होतो..मात्र  शंकेच्या  अनेक पाली चूकचुकू लागल्या होत्या!! जनरल साहेबांना आम्हाला कशासाठी भेटावयाचे असेल.. आम्ही फक्त मूलभूत चाचण्या केल्या होत्या ..त्यांना याशिवाय काही ISI प्रमाणे चाचण्या कराव्याशा वाटतात काय ?नक्की त्यांचे मनात काय आहे …इत्यादी अनेक शंका येऊ लागल्या.. त्याच अवस्थेत मनस्थितीत भोजन करून कसेतरी  झोपी गेलो.

 सर्वच अनिश्चित अकल्पित घडत होते…

   सकाळी प्रथम आमच्या वरिष्ठांना मुंबईत फोन करून घडलेला वृत्तांत दिला. आजची  विमान तिकिटे रद्द करून उद्याची तिकिटे काढून ठेवा असे सुचविले. 

  प्रयोगशाळेत जाऊन रॉय साहेबांच्या आगमनाची वाट पाहत बसलो

भोजनाची वेळ झाली तरी राॅय साहेब सुनाबेड्यात  पोहोचले नव्हते.

    जनरल साहेब संध्याकाळी पाचच्या सुमारास आले.

    “उद्या सकाळी आपण माझ्या ऑफिसमध्ये भेटू”

  असा निरोप आला… . उद्या तरी निघता येईल काय याची शंका वाटू लागली.

  काल भेटलेल्या त्या दोन अधिकाऱ्यांसह आम्ही सकाळी साडेनऊ वाजता जनरल साहेबांच्या ऑफिसात दाखल झालो. त्यांनीही सर्व चाचण्यांचा खुलासा जनरल साहेबांसमोर केला. विशेष चौकशा न करता ,साहेबांनी समाधानाने मान डोलविली.

   ‘मिनिट्स’तयार झाली. हॉल च्या वतीने साहेबांनी स्वतः त्यावर स्वाक्षरी केली. Esso  च्या वतीने आम्ही दोघांनी स्वाक्षऱ्या केल्या . आमची प्रत ही जणू आमच्यासाठी  एक खास प्रशस्तीपत्रक होते.

 आम्ही प्रयोगशाळेतून बाहेर येण्यासाठी उभे राहिलो जनरलना नमस्कार करून निघणार तो जनरल साहेब म्हणाले 

“आज माझ्याबरोबर लंच घ्यायचे आहे. काल आपणाबरोबर डिनर घ्यावयाची इच्छा होती.  एवढ्या लांबून आलात, आमची समस्या दूर केली,  एक नवा दृष्टिकोन आम्हाला दिलात  त्याबद्दल आम्ही आभारी आहोत .मात्र तुम्हाला एक दिवस अधिक थांबून रहावे लागले याचे कारण … काल सुनाबेडा घाटात झालेला तो भयंकर अपघात आहे..…

   जनरलनी सांगितलेली धक्कादायक माहिती अशी होती … 

….काल दुपारी, विशाखापटनमच्या पुढे घाटात दुपारी  अपघात झाला  होता .

ज्वालाग्रही रसायनांनी भरलेला एक कंटेनर उलटा झाला होता. रसायनांचा स्फोट व आगीच्या लोळामुळे जवळपासच्या काही गाड्यांना व प्रवाशांनाही झळ लागली  होती. अग्निशामन दलाला ती आग विझवणे ही कठीण झाले होते.  बंब तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते. जखमी प्रवाशांनाही प्राथमिक उपचारासाठी  इस्पितळत नेणे बिकट झाले होते.  सर्व गोंधळ  काल संध्याकाळपर्यंत चालू होता…नंतर थोडी  रहदारी  नियंत्रणात आली होती.. जनरल साहेबही यातून सुटले नव्हते ..व्हीआयपी गाडी असल्याने  त्यांना वाहतूक पोलिसांनी संरक्षण देत बरेच अंतर चालत नेले व पुढे दुसऱ्या गाडीने सुनाबेडा मध्ये आणून सोडले ..! थकून आले होते म्हणून सरळ घरी गेले.

अरे बापरे . . काल दुपारी सुनाबेडा सोडले असते तर त्या गोंधळात नक्कीच सापडलो असतो . कोणत्या परिस्थितीस तोंड द्यावे लागले असते कल्पनाच करवेना …?घाटात रात्री अडकून पडण्याची कल्पनाच आम्हाला सहन होईना ..पुढेही जाता आले नसते मागेही वळता आले नसते . परिस्थिती खूपच बिकट झाली असती… त्या घाटात रात्री चोर दरवडे खोरांचे ही वर्चस्व होते..

  काल झालेला उद्वेग ,मनस्ताप आणि जनरल साहेबांबद्दल झालेला गैसमज आता कुठल्या कुठे निघून गेला..  मी व राम एकमेकाकडे पाहतच राहिलो.. हात आपोआप आकाशाकडे गेले.. आणि “त्याचे”  आभार मानले.वाकून जनरल साहेबांना  नमस्कार केला… तुम्ही आम्हाला थांबवले नसते तर आम्ही काल नक्कीच  निघालो असतो.. जे झाले ते बऱ्यासाठीच अशी खात्री झाली! हा फौजी भाई दिलदार तर खराच आमच्यासाठीही देवदूत ठरला .. आमच्या कामाचे स्वहस्ते शिफारस पत्र दिले व एका अनाकलनीय योगायोगाने आमच्या परतीच्या प्रवासातील मोठे विघ्न टळले होते..

  त्या दोन दिवसात झालेले सर्व काही अनाकलनीय असेच होते. दुपारी विशाखापट्टणला आलो व संध्याकाळचे विमान पकडून मुंबईस परतलो.

…  आम्ही खऱ्या अर्थाने ‘सुना बेडा-पार’ केला हेच खरे..!!